Showing posts with label MADरास. Show all posts
Showing posts with label MADरास. Show all posts

Monday, 1 August 2016

MADरास (भाग ७)

चेन्नईमध्ये येऊन मला फारतर महिना झाला होता, मागे चौथ्या भागात लिहीलं तसं थोड्या दिवसांनी किराणा वगैरे संदर्भामध्ये शॉपिंगला जाणं ही गरज निर्माण झाली. आजूबाजूच्या बायांना सगळे भाषाअडचणी पार करत चांगला किराणा कुठे मिळेल याबद्दल विचारलं तर काही ठोस उत्तर मिळेना. गावामधला कुठलाच किराणा दुकानदार ठिकठाक वाटेना. एके दिवशी गेटमध्ये आमच्या समोरचे अंकल उभे होते. त्यांना “व्हेअर टू गो फॉर शॉपिंग?” असं विचारलं.
तर ते हस्त म्हणाले. “गो टू पॅरीस”
“पॅरीस?”
“येस येस. व्हेरी गूड शॉपिंग. यु विल लाईक देअर ओन्ली”
मला रागच आला. अंकल चक्क मला टोमणा मारत होते. मला काही फार भारी शॉपिंग करायची नव्हती, तर साधा नेहमीचा किराणा आणायचा होता. हे त्यांना मी सांगितलं होतं, तरीपण त्यांनी हसत का होइना हेच उत्तर परत दिलं. मी काही न बोलता घरात निघून आले. इतके दिवस आपल्याशी इतक्या मायेनं आणि आपुलकीनं बोलणार्‍या या अंकलनी आज असा आणि इतका टोमणा का मारावा ते समजेना. संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला दिवसांच्या इतर इत्यंभूत घटनेसोबतच हाही किस्सा सांगितला. त्यानं  याच्या एका ज्युनिअरला विचारलं. तो म्हणाला, “सार  नो प्रॉब्लेम. गो टू सावकारपेट. नीअर टू युअर एरीया.”
आता पुढचा प्रश्न साहजिक आला की या सावकारपेटला जावं तरी कसं.
ज्युनिअर म्हणे, “कॅच अ बस टू पॅरीस”
च्यामायला!!!! ये क्या भानगड है.. लगोलग गूगलकाकाला साकडे घातले. सावकारपेट हा ओल्ड चेन्नईमधला एक भाग आहे हे समजलं. प्रामुख्याने मारवाडी लोकांची इथे वस्ती आहे आणी हा भाग होलसेल मार्केटसाठी प्रसिद्ध आहे हे समजलं. माझ्या गावापासून इथवर यायला साधारण ४५ मिनिटे लागली असती असं गूगलकाका प्रेमानं म्हणाले. इथे येण्यासाठी मला मनाली न्यूटाऊन पासून मला हाय कोर्टापर्यंत बसने जाऊन अथवा पॅरीसपर्यंत टॅक्सीने जावं लागणार होतं.
सकाळी अंकल म्हणाले तेव्हा अथवा तो ज्युनिअर म्हणाला तेव्हा पॅरीस म्हटलं की समोर आयफेल टॉवरवालं शहर उभं ठाकलं होतं. आता नेटवर वाचताना नीट ध्यानांत आलं की ते Parry’s आहे.  पॅरीज कॉर्नर हा मद्रासमधल्या सर्वांत जुन्या भागांपैकी एक. पण आता हे स्पेलिंग वाचल्यावर तुम्हाला पटकन काय आठवलं सांगा? बरोब्बर. पॅरीज चॉकलेट्स. झोकदार रोमन अक्षरांत लिहिलेली Parry’s ची थोडी कडक असणारी मस्त खमंग चवीची चॉकलेट्स लहानपणी आपण सर्वांनी खाल्ली होतीच. त्याच कंपनीची एकेकाळी मुख्य ऑफिस असणारी ही भलीमोठी वास्तू म्हणजे पॅरीज. रस्त्याच्या कॉर्नरवर असल्याने त्या भागाला नाव मिळालंय पॅरीज कॉर्नर. या कॉर्नरवर चेन्नईचे दोन अतिशय महत्त्वाचे रस्ते- एन एस सी बोस रोड आणि राजाजी सलाई रोड सुरू होतात. चेन्नईचा इतिहास आणि भूगोल या पॅरीशिवाय अधुरा आहे. या बिल्डिंगबद्दल आणि ज्याने ती बांधली त्या पॅरीचा आणि या भागाचा इतिहास खूपच रोचक आणि मसालेदार आहे. नंतर कधीतरी तो याच मालिकेमध्ये लिहेन, पण तूर्तास समाधान इतकेच की, समोरचे अंकल मला कसलाही टोमणा वगैरे मारत नव्हते तर जेन्युइनली मला माहिती देत होते. माझ्याच गैरसमजामुळे मी सकाळी त्यांच्या उत्तरावर थॅंक्स इतकेसुद्धा न म्हणता धाडकन निघून आले होते.

हे असं आपल्यासोबत बर्‍याचदा घडतंच. खासकरून सोशल मीडीयावर. समोरचा माणूस वेगळंच काहीतरी सांगत असतो, आणि आपण आपल्याच समजुतीच्या परीघामध्ये त्याचा अर्थ काढून घेतो आणि गैरसमज करून घेतो. दुसर्‍या दिवशी सकाळी मी स्वत: अंकलच्या घरी गेले आणि थॅंक्स म्हणून आले. जाण्यासाठी योग्य बस कुठली, त्याचं टायमिंग काय वगैरे माहिती विचारून घेतली. पण त्यानंतर दोनच् दोवसांत आम्हाला चेन्नई सिटीमध्ये कॉलटॅक्सी घेऊन जावं लागलं आणि आम्ही येतानाच स्टारबझारमधून भरमसाठी किराणा घेऊन आलो. एक प्रश्न तर मिटला होता, पण होलसेल मार्केटमध्ये भटकत खरेदी करायची मजा निराळीच.
यादरम्यान नवरात्र जवळ आलं होतं, आमची शेजारीण शरण्या मला म्हणाली, की “मी या वीकेंडला सावकारपेटला जाणार आहे. मला साड्या घ्यायच्या आहेत.” ये तो औरभी चंगा हो गया. म्हटलं  मी पण येते. एकतर शरण्या इंग्लिश उत्तम बोलते (ती तेव्हा इंग्लिश लिटरेचरमध्ये एम ए करत होती शिवाय गावातल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.)म्हणजे भाषेचा मुख्य अडसर दूर झाला. शिवाय ती सोबत असताना आपण कुठंतरी भरकटण्याची शक्यता कमी. तशी मला खरेदी काही करायची नव्हती पण घरी बसूनही कंटाळा आला होता. त्या शनिवारी नवर्‍याला सुट्टी होती म्हणून त्याला आणि लेकीला घर सांभाळायची जबाबदारी दिली आणि चेन्नईला आल्यावर पहिल्यांदाच “निरूद्देश” (याला कोटमार्क का टाकलेत ते समजेलच!!) भटकायला बाहेर पडले.
हायकोर्ट हा आमच्या बसचा लास्ट स्टॉप. त्या आधी येणारा स्टॉप बीच स्टेशन. हे चेन्नईच्या उत्तर भागाकडचे टर्मिनस आहे. जरी याचे नाव बीच असले तरी हे स्टेशन फेमस मरीना बीचजवळ नाहीये.  हा भाग चेन्नई पोर्टला फार जवळचा आहे. आमची बस अल्मोस्ट चेन्नईच्या बाहेरून चेन्नईमध्ये येत असल्याने आम्हाला आधी तिरूवट्ट्रीयुर, वॉशरमन्पेट, रोयापुरम असे भाग लागले. चेन्नई पोर्टाचे दृश्य तर अतिशय सुंदर दिसत होतं. जर हा बसचा रूट घेतला नाही तर आम्हाला एवरेडीच्या (तेच ते गिव्ह मी रेड बॅटरीवाले, त्यांचा कारखाना आहे इथं) डावीकडे वळून समद्र किनार्‍याच्या बाजूबाजूनं जाणार्‍या कोस्टल रोडने निवांत जाता येतं. पण चेन्नईमधली बस सिस्टीम अजबगजब आहे. बसचा रूट निवडताना शक्यतो अधिकाधिक फिरून कशी जाईल यावर अभ्यास केला जात असावा. प्रवाश्यांनाही फिकीर नसते. एकूणातच निवांत शहर आहे आमची चेन्नई. त्यामुळे आता ही बस या सर्व भागांमधल्या गल्ल्यांगल्ल्यांमधून फिरून मस्त जात होती. अर्थात, बस प्रचंड फिरली तरीही तिकीटमात्र त्यामानाने फारच कमी आहे. एकंदरीत पब्लिक ट्रान्सपोर्ट हा फारच स्वस्त मामला आहे. बसचं फिरणं नको असेल तर याच रूटवर शेअर ऑटो पण आहेत पण त्या बसपेक्षा जास्त पैसे घेतात आशी माहिती शरण्याने मला दिली. पुढे जेव्हा स्वत: एकटी फिरायला लागले तेव्हा समजलं की शेअर ऑटो पण काही तितक्या जास्त महाग नाहीत. उलट बस इतक्या फिरत नसल्याने वेळेच्या बाबतीत त्याच जास्त परवडतात. अर्थात हे नंतर आलेलं शहाणपण.

हाय कोर्टापासून चालायला सुरूवात केली तेव्हा समोरच रस्त्यावर भलामोठा बोगदा खोदून ठेवला होता. याभागामध्ये चेन्नई मेट्रो अंडरग्राऊंड जाणार आहे. त्याचं काम जोशात चालू होतं. अजूनही या भागात मेट्रो चालू झालेली नाही, आणि अद्यापही तो बोगदा रस्त्यावर आहे. परिणामी आपल्याला एक भलामोठा वळसा घालून चालत जायला लागतं.
सावकारपेट ही चेन्नईमधल्या मारवाड्यांची वस्ती. चेन्नई सेंट्रल स्टेशनपासून अतिशय जवळ असलेला हा बाजारी भाग. सावकारी धंद्यामध्ये सुरूवातीपासूनच असलेले गुजरात-राजस्थानामधून आलेले हे मारवाडी दुकानदार आता मोबाईलपासून ते किराणाभुसारीमालापर्यंत सगळ्यामध्ये व्यापार करतात. त्यामुळे इथं तमिळइतकंच हिंदीपण कानावर पडत राहतं. शिवाय दुकानदारांची आपापसामधली राजस्थानी-मारवाडी भाषा.
 मला इथे आल्यानंतर एकदम क्रॉफर्ड मार्केटजवळच्या गल्ल्यांमध्ये फिरल्यासारखंच वाटू लागलं. एकदम चिंचोळ्या गल्ल्या. छोटी छोटी कितीतरी दुकानं. पिढ्यानपिढ्या चालवलेली. एक गल्ली फक्त साडी घागर्‍याच्या दुकानांची, एक स्टेशनरीची. एक लाईटच्या दिव्यांचे, एक गल्ली खेळण्यांची, एक गल्ली फूलवाल्यांची. जागा मिळेल तिथे टेकलेले फळवाले आणि भाजीवाले. या सर्व दुकानांमधून चाललेली खरेदीविक्रेची लगबग, घासाघीस. “देने का बोलो ना भय्या, अंकल, हमेशा आपही से तो लेके जाते है, ठिक ही तो बता रहे है. हमको कौनसा ये बेचके बंगला बनाना है” सारखे संवाद केवल असल्याच बाजारामध्ये ऐकू येतात. मी “देसाई” आडनाव आणि मुंबईमध्ये अस्ताना गुज्जू बॉसच्या कृपेने शिकलेली थोडीफार गुजराती आणि बॉलीवूडी हिंदीच्या जोरावर बरीच घासाघीस करत खरेदी केली. खासकरून स्टेशनरी, दिवे, पणत्या, थोडीफार भाजी आणि फळं वगैरे. शरण्याला साड्य़ा घ्यायच्या होत्या तर तिला कंपनी म्हणून मी पण दोन साड्या घेतल्या. दोनच, जास्त नाही. (आता समजलं वर त्या “निरूद्देश”ला कोट मार्क का टाकले होते)
हा भाग जरी प्रामुख्याने राजस्थानी-मारवाड्यांचा असला तरीही काही दुकानदार इतर ठिकाणाहून आलेले आहेत. मला नंतर माहित असलेले काही दुकानदार मूळचे मिरजचे आहेत, तीन चार पिढ्या इथे राहूनही ते उत्तम मराठी बोलतात, मिरजेला त्यांचे नातेवाईक आहेत. आणि (हे सर्वांत महत्त्वाचे) त्यांच्या दुकानामध्ये विचारलं तर चटणी मसाला, कोल्हापुरी ठेचा, थालीपीठ भाजणी असले मराठमोळे पदार्थ मिळू शकतात.

एकंदरीत चेन्नईच्या या भागाशी माझा दोस्ताना फार मस्त जमला. या खरेदी प्रकरणानंतर मी एकटीपण या भागामध्ये भटकून येऊ लागले. एकट्या भटकंतीत मला अत्तर बाजाराचा पत्ता लागला. शिवाय स्टेशनजवळच्या एका गल्लीचं नाव कोवागल्ली असून तिथे दुधाचा अप्रतिम खवा मिळणारी दुकानांची रांग आहे वगैरे शोध लागले. अर्थात ज्या किराणासाठी म्हणून मी याभागात आले तो इथं कधीच फारसा घेत नाही, एक तर इथल्या छोट्या गल्ल्यांमधून इतक्यामोठ्या पिशव्या वागवत चालणं शक्य नाही. मात्र, सुकामेवा, अख्खे मसाले, वर्षाची चिंच, सुक्यामिरच्या वगैरे खासमखास पदार्थ मात्र मी इकडूनच घेते.  
पण खरेदी अथवा होलसेल मार्केट हीच आमच्या सावकारपेटची ओळख नाही. सावकारपेटच्या या चिंचोळ्या गल्ल्यांमधून एक अखंड जितीजागती खाद्यसंस्कृती नांदतेय.
चेन्नई म्हटलं की सर्वसाधारणपणे इडली-वडा-सांबार हेच पदार्थ चटकन आठवतात. पण चेन्नईची खाद्यसंस्कृती खकर्‍या अर्थाने जागते ती बिर्याणीमध्ये. चेन्नईत फिरताना एक गल्ली अशी नाही जिथे बिर्याणी स्टॉल नसेल – बिर्याणीवर आपण एक लेख लिहूयाच. पण सावकारपेट मात्र त्याला सणसणीत अपवाद आहे. टिपिकल गुजराती राजस्थानी पदार्थ, पण चेन्नई ट्विस्टने! महिन्यामधून एकदा मी या भागात खरेदीला फिरकत असल्याने बर्‍यापैकी “उत्तम खाऊची” काही ठिकाणं माहित झाली होती. तरीही ऑगस्टमध्ये साजरा केल्या जाणार्‍या मद्रास वीकसाठी फेसबूकवर श्रीधर वेंकटरामन यांची सावकारपेट फूडवॉकसंदर्भामधली पोस्ट पाहिली. गेली सतरा वर्षे आयटीमध्ये उच्चपदावर असलेल्या आणि सध्या शिक्षकी पेशा पत्करलेल्या श्रीधरचा “फूड” हा वीकपॉइंट आहे. केवळ हौस म्हणून ते असे फूड वॉक आयोजित करतात. त्यासाठी स्वत: प्रचंड फिरतात, माहिती गोळा करतात. त्यांचा पोस्ट्स फेसबूकावर आधीपासून वाचत होते, पण फूड वॉक हा प्रकार मला नवीन होता.

रविवार असल्याने यायला जमणारं होतं, म्हणून मी या फूडवॉकसाठी आले. तसं पहायला गेला तर वॉक करता करता बर्‍याचदा पेटपूजा होतेच, पण फूडसाठी असं चालत पहिल्यांदाच फिरणार होते. ग्रूपमधलं कुणीही ओळखीचं नव्हतं, तरीही किमान नवीन ओळखी तरी होतील वगैरे पण अगदी खरंखुरं कारण सांगू का? फूडवॉकचा पहिला स्टॉप वडापाव असा होता, सावकारपेटमध्ये इतके दिवस फिरूनही वडापाव काही मिळाला नव्हता, शिवाय पावभाजी, भेळ, कचोरी अशी इतरही बेस्टसेलर्स नावं होती. त्यामुळे बरीच उत्सुकता होती. या फूडवॉकमुळे सावकारपेट माझ्यासाठी अधिकच प्रिय झालं.  
काकडारामप्रसाद हे सावकारपेटेमधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण. इतक्या चिंचोळ्या गल्लीमध्ये ही तीनमजली सुंदर इमारत शानसे उभी आहे. गुजराती जेवण, मिठाई, चाट आयटम्स ही त्यांची खासियत.
पण मी पहिल्यांदा इथे गेले तेव्हा गल्ल्यावरचा माणूस सोलापुरी सोलापुरी ओरडत होता. चादरींचं तर दुकान नाही आणि आपलं सोलापूर हे काय चाट आयटमसाठी फेमस नाही! भाकरी-चटणी तर नक्कीच विकत नसतील, म्हणून काय भानगड आहे या उत्सुकतेनं पाहिलं तर “छोला-पुरी” विकली जात होती. छोलेभटुर्‍यांचं मद्रासी नाव छोलापुरी असं होतं!!! काकडामध्ये गुजराती थाळी मिळते. पावभाजी मिळते, भेळ पाणीपुरी मिळते, पण इथला सर्वात महान प्रकार म्हणजे आलू पनीर टिक्की. बटाट्याचा पनीर घातलेला भलामोठा पॅटीस गोल्डन रंगावर तळलेला. त्यावर पांढरंशुभ्र दही, मग हिरव्या रंगाची पुदिना चटणी, आंबट गोड चिंचेची चटणी आणि वर भरपूर बारीक शेव. एक खाल्ला की आठवड्याभराच्या कॅलरीजचा हिशोब् संपलाच.
काकडाच्या जवळच कमल चाट हाऊस आहे, हे नावाला चाट हाऊस असलं तरी इथं तुमचं लक्ष वेधून घेईल तो जिलेबी तळल्याचा वास. ताजी गरमागरम केशरी जिलेबी बाहेरून कुर्रमकर्रम आणि आतमधून साखरेच्या पाकाने मऊसर झालेली. दिवसाच्या कुठल्याही वेळेत इथे ताजी ताजी जिलेबी मिळते.
पण जर तुम्ही सावकारपेटला गेलात, आणि अनमोल लस्सी प्यायला नाहीत तर तुमची खेप फुकट गेली. वाटल्यास, लस्सी पिऊ नका, पण दुकानवाल्याला भेट द्या. असा माणूस वारंवार भेटत नाही. मि. दिनेश सोनी हे स्वत:ची ओळख करून देतानाच सावकारपेट का डॉन म्हणून करून देतात, त्यांनी तशी ओळख करून दिली नाही तरी मनोमन हे पद आपणच त्यांना देऊ. सहा फुटाची उंची आणि उंचीला साजेशा बांधा. कपाळावर मोठा टिळा आणि दणदणीत आवाजामध्ये केलेलं समोरच्याचं स्वागत. एकेकाळी कुस्तीगीर असलेल्या दिनेश सोनींनी हे छोटंसं दुकान केवळ त्यांच्या लस्सीच्या क्वालिटीवर इतकं फेमस केलंय. लस्सीचा ग्लास कसला भलामोठा जगच आहे, दुकानामध्ये बसलेले दिनेश सोनी आपली लस्सी ही किती बेस्ट आहे आणि ते ताक-लस्सीसाठी केवळ बाटलीबंद मिनरल वॉटरच वापरतात. हे समोरच्याला सांगतात. मध्येच शेरोशायरी ऐकवतात. सावकारपेटेमध्ये खरेदी करून जीव दमला असेल तर या केसर लस्सीमुळे नाहीतर मसाला छांछमुळे त्वरित एनर्जाईझ व्हायलाच पाहिजे. अनमोल लस्सीच्या बाजूलाच दिल्ली हॉटेल म्हणून एक अतिशय छोटं हॉटेल आहे, मस्त पंजाबी जेवण मिळतं. (पंजाबी म्हणजे ते टिपिकल तेलकट मसालेदार टोमॅटो ग्रेव्हीने लतपतलेलं नव्हे, तर अस्सल ढाबा साईडकडे मिळणारं पंजाबी जेवण)
सावकारपेटेमध्ये मिळणारा अजून एक अफलातून प्रकार म्हणजे मुरूक्कू सॅंड्विच. मुरूक्कू म्हणजे तांदळाच्या चकल्या. आपल्याकडे बर्‍याचदा बटर चकली म्हणून मिळतात तश्या नाजुकसाजुक पांढर्‍या इवल्यश्या चकल्यांच्यामध्ये काकडी टोमॅटो आणि चाटच्या चटण्या घालून केलेला हा तोंडाला पाणी सुटेलच याची खात्री देणारा अनोखा प्रकार. याखेरीज, माया चाट हाऊसमधली गरमागरम कांदा कचोरी, अजनबी मिठाई हाऊस, अगरवाल भोजनालय, छोटूमोटूचे जैन सॅंडविच, नॉव्हेल्टीची पावभाजी असे अनेक जिभेला खवळणारी टिकाणं आहेत. पण सावकारपेटेची माझी वारी एका ठिकाणी गेल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे नाहीच!
कदाचित अख्ख्या सावकारपेटेमधलं हे एकमेव साऊथ इंडियन खाण्याचं ठिकाण असावं, सीनाभाई टिफीन सेंटर असं नाव असलेलं हे छोटंसं दुकान. याच्याकडे घी इडली / नै इडली मिळतात, म्हणजे मिनी इडल्या तुपावर परतून त्यावर चटणी भुरभुरवून देतात. (नै म्हणजे तूप बरं का!) या इडल्या अतिशय रूचकर लागतात त्या या लाल चटणीमुळे. गन पावडर असे सार्थ नाव असलेली ही जहाल चटणी इडली आणि तुपाबरोबर असली खमंग आणि बेस्ट लागते!!
मघाशी म्हटलं तसं, हा भाग सगळा परप्रांतामधून आलेल्या लोकांचा. इथली दुकानं अथवा हॉटेलं ही “नॉर्थ इंडियन स्पेशालिटी” असल्या नावाखाली भंपकपणा म्हणून उघडलेली नाहीत, तर या भागामध्ये व्यापाराच्या निमित्ताने, खरेदीसाठी येणार्‍या बहुतांश बाहेरील जनतेला “घरचं खाणं” असल्यासारखं तेही वाजवी दरामध्ये मिळावं म्हणून चालू झालेली. अर्थात जागा बदलली की पदार्थाचे घटक बदलले, चव बदलली मग मूळचे गुजराती-राजस्थानी पदार्थ हे मद्रासी रूप घेऊन तयार झाले. त्यातून काही नवीन पदार्थ तयार झाले, काहींनी रूपडं बदललं, काहींनी नाव. पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे, रसना तृप्त करणारी चव.

एकूणात काय, मद्रासमध्ये आल्यावर भटकंतीसाठी, कुठेतरी “आपल्या” माणसांमध्ये फिरल्यासारखं वाटणारं ठिकाण मला मिळालं. शेवटी सावकारपेटेमधले व्यापारी काय, अथवा आमच्यासारखी नोकरदार माणसं काय! आपलं गाव आणि शहर सोडून इतक्या लांब आलो तेच मुळात पोटासाठी. आता ज्या पोटासाठी दाही दिशा भटकायचे त्याचे थोडेतरी चोचले पुरवायला नकोत का? आता मी या भागात एकटीच भटकते. थोडीफार खरेदीसाठी, थोडीफार खाऊसाठी आणि बरीचशी स्वत:ला रीचार्ज करण्यासाठी. 
शिवाय हल्ली आम्ही "खरेदीला फक्त पॅरीसमध्येच जातो" असंही आम्हाला म्हणता येतंय!!!!! 
(क्रमश:) 

Thursday, 21 April 2016

MAD-रास ६

चेन्नईमध्ये आल्यानंतर मी उत्साहानं “लर्न तमिळ इन थर्टी डेज” वगैरे पुस्तकं आणली. अत्यंत भिकार छपाई असलेल्या या पुस्तकांची दोन पानं वाचणं म्हणजे डोकेदुखीला आमंत्रण. त्यापेक्षा आपली नजर आणि कान उघडे ठेवून शहरामध्ये वावरायला सुरूवात केल्यावर सुरूवातीला काही अक्षरांची लांबलचक ट्रेन वाटणारी भाषा आता वेगवेगळ्या शब्दांद्वारे समजत गेली. भाषेचा हा तिळा उघड मंत्र मिळाल्यावर मद्रास चक्क आपलं वाटायला लागलं. दरम्यान कुणीतरी मला मराठी इंग्लिश तमिळ डिक्शनरी पीडीएफ दिली. सुमारे १९७४ मध्ये कै. सौ. रमाबाई जोशी यांनी लिहिलेला हा शब्दकोष खूप सुटसुटीत आणि समजायला सोपा आहे. तमिळ उच्चार देवनागरीमधून लिहून मग मराठी अर्थ सांगितलेला असल्याने कुठल्याही मराठी व्यक्तीला पटकन वाचता येऊ शकतो. मद्रासप्रांती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी आलेल्या कुण्या गृहिणीनेच लिहिलेला हा शब्दकोष. रोजच्या व्यवहारामधले नेमके शब्द सांगणार्‍या या कोषाबद्दल मलातरी फार कौतुक आहे. ज्या काळी हाताशी गूगल नव्हते, इंटरनेट नव्हते, मद्रासामधला सर्वसाधारण काळच हिंदीविरोधाचा होता. तश्यावेळी एका साध्याशा स्त्रीने आपल्यासारख्या लोकांना इकडे आल्यावर त्रास होऊ नये म्हणून रचलेला हा शब्दकोष व्यावहारिकदृष्ट्या आजही खूप उपयोगी आहे. शिवाय त्यात मराठी आणि तमिळ दोन्ही भाषांमधल्या समानार्थी म्हणींचा फार मोठा संग्रह आहे. त्याखेरीज रोजच्या व्यवहारामध्ये वापरता येण्याजोगी वाक्ये, दिशा, वार, महिने, अंकमोजणी, विभक्ती यासारख्या अनेक छोट्या छॊट्या पण निकडच्या शब्दप्रयोगांची माहिती यात दिलेली आहे. मला अडचणीच्या वेळी जिथे गूगलने हात टेकलेत तेव्हा या शब्दकोषाने मदत केली आहे. त्यासाठी मी रमाबाई  जोशी आज्जींची कायम आभारी राहीन. पन्नास वर्षांपूर्वी इतका मोठा शब्दकोष एकहाती करणं हे फार सोपे काम खचितच नाही.

आपल्याला (म्हणजे देवनागरी लिहिता-वाचता येणार्‍यांना) डोळ्यांना आणि डोक्याला थोडाफार ताण देऊन का होईना, गुजराती वाचता येते. थोडेसे अजून प्रयत्न केल्यास बंगाली अक्षरंही समजतात. पंजाबीसुद्धा वाचता येईल. पण कधी तमिळ अक्षरं समजतात? अजिबात समजत नाहीत. मला आधी थोडीफार कानडी अक्षरं वाचता येत होती, पण तरीही तमिळमध्ये ओ की ठो काही कळायचं नाही. कारण, त्यांची लिपी पूर्ण वेगळी आहे. आता यावर भाषातज्ञ बरंच काही सांगू शकतील पण मी काही भाषातज्ञ नाही. एकंदरीत वाचनावरून असं लक्षात आलंय की भारतात भाषांचे दोन गट आहेत. संस्कृत आणि द्राविडी. द्रावीडीमध्ये तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कानडी या भाषा येतात. पैकी कानडी आणि तेलुगु मराठी भाषेसोबत बराच रोटीबेटी व्यवहार करून आहे. पण तमिळ -मल्याळम या मात्र वरकरणी फार वेगळ्या भाषा वाटतात. तमिळ बोलण्यासाठी मला जितके प्रयत्न करावे लागले नाहीत त्याहून अधिक प्रयत्न मला लिहिण्यावाचण्यासाठी करावे लागत आहेत. खरंतर इथली पहिली दोन वर्षं मला एकदम निरक्षर झाल्यासारखंच वाटायला लागलं. काहीच वाचता यायचं नाही. आता हळूहळू सरावानं काही अक्षरं वाचता येतात.


तमिळ भाषिकांनी लिहिलेली रोमन लिपी हा अजून एक वेगळाच विषय आहे. तमिळनाडूच काय पण एकंदरीत दक्षिणेकडे बर्‍याचदा अजून एक मजा दिसून येते. माझं नाव इकडे लिहिताना सर्रास “Nandhini” असं लिहिलं जायचं. कितीतरीवेळा मग ते “नंधीनी नाहीये, नंदिनी आहे” असं सांगावं लागायचंतरी कित्येकदा समोरच्यावर परिणाम व्हायचा नाही. मग लेकीच्या शाळेमध्ये तमिळ मुळाक्षरं चालू झाली तेव्हा या घोटाळ्याचा नक्की काय तो शोध लागला. तमिळ मध्ये महाप्राण व्यंजने नाहीच. म्हणजे ध, ढ, थ, ठ ही  व्यंजने त्यांच्या बाराखडीत नाहीतच. क, ख, ग, घ या चारही व्यंजनासाठी एकच க  हे अक्षर वापरले जाते. त्यानंतरची तीन व्यंजने ख ग घ नाहीत पण ङ मात्र आहे. तसंच च नंतर येणारं अक्षर ञ आहे. असंच त, न, ट ण,  प, म या अक्षरांचं आहे.
ही तमिळ व्यंजने.

க क  ங  ङ  ச च ஞ ञ ட ट ண ण த त ந न (न चे अजून एक अक्षर आहे!!)
ப प ம म ய य ர र ல ल வ व ழ ळ्ळ (यावर सविस्तर लिहिले आहे)  
ள ळ  ற र्र ன न.
 वडामोळि एळुतकळ म्हणजेच ग्रंथाक्षरे किंवा “उत्तर भारतीयांची अक्षरे” ही अक्षरे फारशी वापरली जात नाहीत.
ஜ ज  ஶ श, ஷ ष , ஸस , ஹ ह  க்ஷ क्ष ஸ்ரீ श्री

  
तमिळमध्ये स्वरांसाठी चौदा अक्षरं आहेत. अं आणि अ: नाही, पण दीर्घ ए आणि दीर्घ ओ आहे. बहुतेक तमिळ अक्षरांचे उच्चार हे “अ” ने होत नाहीत तर आ, उ, इ नए वगैरे होतात. शब्दाच्या शेवटी “आ‍ऽ“ जोडल्यास तो प्रश्नार्थक बनतो. उदा: साप्पडु म्हणजे जेवण. साप्पिडु म्हणजे खा आणि साप्प्टीयाऽऽ म्हणजे जेवलास का?
च, छ, ज, झ साठी तमिळमध्ये केवळ च वापरला जातो. “स” साठी सुद्धा “च” वापरला जातो. मग मटण सुक्काचा तमिळ उच्चार “चुक्का” असा केला जातो. “चावी” चा उच्चार इकडे “सावी” होतो.  ज हे ग्रंथाक्षर म्हणून त्याचे वेगळे व्यंजन जरी तमिळने स्विकारलेले असले तरी मुख्य भर “च” वरच असतो. तीच गत “प” ची. त्याला प फ ब भ ही चारही अक्षरं दर्शवावी लागतात. आता यामध्ये कशाचा उच्चार कशाने करायचा हे वाचून वाचून (च) समजू शकेल. लिहिताना பம்பாய் (पंपाय) लिहायचं आणि वाचताना ते रोमन शहर नसून “बंबाय” म्हणजेच मुंबई आहे असं समजायचं याला फार प्रदीर्घ साधना करावी लागणार. माझी तितकी साधना अद्याप झालेली नाही त्यामुळे ही अंकलिपी आता जरा बाजूला ठेवते आणि मजेमजेच्या गोष्टींकडे येते. या लिमिटेड व्यंजनांमुळे तमिळ भाषेमध्ये जेव्हा इतर भाषिक शब्द येतात (खासकरून इंग्रजी आणि संस्कृत) तेव्हा त्यांचं सगळं रूपडंच बदलतं.


विनायक म्हणजेच गणपती तमिळमध्ये विनायगार बनतो. पुरणपोळी हा शब्द इकडे सर्रासरीत्या बुरणबोळी असा म्हटला जातो. ह फारसा नसल्याने होळीचा सणसुद्धा इकडे बोळी म्हणूनच ओळखला जातो. म्हणजे आपल्याकडे पुरणपोळी आणि होळी यांचे अतूट नाते आहे, इकडे तर त्यांचे पार अद्वैतच झाले आहे.  मागे एका फ़ेसबूक ग्रूपवर एक बाई मराठी पद्धतीची पर्फी (PURFI)  केली असं सांगत होत्या. मला काही केल्या या बाईंनी नक्की काय पदार्थ केला ते समजेना. म्हणून त्यांना रेसिपी विचारली तेव्हा उजेड पडला की बाईंनी बेसनाची “बर्फी” केली होती. पुरीला बुरीदेखील सर्रास म्हणतात. डायेटवाल्यांनी हे लक्षात ठेवायला हरकत नाही.



तमिळमधे न साठी दोन वेगवेगळी अक्षरे आहेत. पैकी ந हे अक्षर केवळ शब्दाच्या सुरूवातीला “न” असेल तरच वापरले जाईल. इतरवेळी ன हे अक्षर वापरले जाते. ண म्हनजे “ण”. अनुस्वार देताना त्या त्या वर्णमालेमधले अनुनासिक अक्षरेच लिहिली जातात. उदा. नंदिनी लिहिताना : நந்தினி असं लिहिलं जाईल. इथे न सुरूवातीचा असल्याने ந वापरला गेलाय मग अनुनासिक स्वरासाठी अपूर्ण न ந்  (इथे त्यासाठी डोक्यावर टिंब देतात) मग नेहमीचा न आणि त्याला वेलांटी. னி ही वेलांटी नीट पाहिलीत तर लक्षात येईल की आपल्या दीर्घ वेलांटीसारखीच आहे. पण ही तमिळमधली र्‍हस्व वेलांटी आहे.



आता आपली नावे रोमन लिपीमध्ये लिहिताना तमिळ लोकं वेगळीच पद्धत वापरतात. त्यांना नंदिनी लिहायचे झाले तर NANDINI असे लिहिले की ते नंडीनी वाचतात. म्हणून मग लिहितीना NANDHINI लिहितात म्हणजे मग ते नंदिनी झाले. आता थ आणि ध हा मुळातच या भाषेत नसल्याने त्यांचे घोळ होत नाहीत. पण आपल्याला मात्र पावलोपावली धक्के खात रहावं लागतंय. माझ्या लेकीचं नाव मी अतिशय सुटसुटीत “सुनिधी” ठेवलं, पण हाय रे कर्मा. इथे तमिळनाडूमध्ये तिला हाक मारताना “सुनिती” अशीच हाक मारली जाते. क्वचित स्पेलिंग लिहितानासुद्धा SUNITHEE लिहीतात. मग ते खोडून मला परत T नाय ओ D असं चारचारदा सांगावं लागतं. शेजारणीने लेकीचं नाव दिशीका ठेवलं. हाक मारताना तीशिखा. तिला त आणि द मधला फरक समजवून सांगेपर्यंत माझी जीभ पोंपलली.


मध्यंतरी एका तमिळ लेखिकेचे मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक वाचत होते. वाचताना कित्येक शब्दांना चांगल्याच ठेचा लागत होत्या पण कुझांबु शब्दाने तर हैराण केलं. अनुवादकाने तमिळ कादंबरीचा अनुवाद इंग्रजीवरून केल्यामुळे इंग्रजीमधले काही शब्द जसेच्या तसे उचलले होते. Kuzhambu असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा उच्चार आहे- कोळंबु. कोळंबु म्हनजे रस्सा असलेली भाजी अथवा कालवण. तमिळमध्ये ळ चे दोन वेगळे उच्चार आहेत, त्यांसाठी दोन स्वतंत्र अक्षरंही आहेत. यापैकी  त्यातल्या एका ழ “ळ” (जीभेला अधिकाधिक मागे नेऊन टाळूला लावून ळ म्हणायचा प्रयत्न करा) रोमन लिपीमध्ये ट्रान्स्लिटरेट करताना ZH असे वापरले जाते. यामागे नक्की काय भाषाशास्त्रीय कारणे आहेत माहित नाही. पण सर्वसाधारणपणे आपण वाचताना याचे “झ” करून वाचतो. पण ते चूक आहे. कणीमोझी नाही, कणीमोळ्ळी. कोझीकोड्डे नाही, कोळ्ळीकोड्डै. हा ழ तमिळ भाषेमधला सर्वात अनोखा उच्चार मानला जातो. केवल तमिळ आणि मल्याळममध्येच असला उच्चार आहे म्हणे.

तमिळ भाषा व्यंजनांच्या बाबतीत परिपूर्ण नाही. अनेक व्यंजने नसताना ती आपल्या भाषेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आहे तेच योग्य आहे असा पवित्रा घेऊन मुद्दाम चुकीचे उच्चार करण्यामध्ये काही लोकं धन्य मानत असतात.. पण यामुळे कित्येक अशक्य विनोद मात्र घडत असतात. इंटरनेट्वर “आर आय पी इंग्लिश” वगैरे म्हणून काही इमेजेस आलेल्या पाहिल्या असतील. “गोभी” हा शब्द तमीळमध्ये “कोपी” असा लिहायचा, आणि मग त्याचं परत रोमनीकरण करताना ते “गोपी” असं करून मेनूकार्डावर GOPI MANCHURIYAN असं छापायचं. फ़्रॉक्सचं तमिळीकरण वरून रोमनीकरण करताना ते FROGS  केलेलं मी पाहिलं आहे.



पण या सर्व उहापोहाचा मला फायदा काय झाला? एक तर जी भाषा आधी कानाला ऐकायला फारच कठीण वाटत होती, त्यामधली व्यंजनं आणि स्वरावली लक्षात आल्यावर तेच शब्द मराठीच्या अथवा कानडीच्या रूपामध्ये वापरले तर कित्येक शब्द समान आहेत हे लक्षात आलं. पळम समजायला किती कठीण पण फळ हा शब्द तमिळमध्ये पळ असाच लिहिला जाईल हे समजलं की पळ= फळं हे बरोबर ध्यानात आलं. मोदगम हे नवीन नाव वाटतं, पण मराठीमध्ये तेच मोदक आहेत. एखादा म्हणजे ओण्णू हे समजल्यावर ओण्णूवेळ्ळे म्हणजे एखादवेळी हे बरोबर समजलं. वेळ हा शब्द मराठीमध्ये आहेच की. मग ओण्णू ओण्णे हे कितीही  विचित्र वाटलं तरी “एकुलता एक” आहे हे पटकन लक्षात आलं. बारम म्हणजेच भार म्हणजेच ओझे! कानडीमध्ये हुळी म्हणजे आंबट आणि ह चा प केला की तमीळमधला पुळी म्हणजे आंबटच! मग पुळी म्हणजे चिंच हे ओघानं आलंच.  सेम याच नियमाने हू म्हणजे पू म्हणजे फुलं. कानडीमध्ये येली म्हणजे पान, तेच  तमिळमध्ये इलै म्हणजे पान. कलिंगडाचे नाव आहे तरबूसपळम. लांबलचक नाव असलं तरी टरबूज फळ हे दोन कीवर्ड्स ध्यानात घेतले की शब्द लक्षात राहतो. तुणी म्हणजेच मराठीमधला धुणी म्हणजेच कपडे हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे? पात्रम म्हणजेच भांडी. गच्ची म्हणजे माडी. हे शब्द मराठीमध्येही वापरले जातातच की. आपण औषधाची “मात्रा” घेतो, इकडे औषधालाच मात्रै म्हणतात. आहे की नाही मज्जा!!! घात= अबायम (अपायम) ,  दुपार= मध्यान्नम, कोथंबीर- कोतमल्ली, फटाके = पटास, बयम= भय. असे अनेक वरकरणी कठीण वाटणारे पण समजून घेतल्यावर सोपे वाटणारे शब्द मेंदूच्या डिक्शनरीमध्ये आपोआप भरले गे्ले त्यासाठी फारसे आयास करावे लागले नाहीत..

हा लेख जरा जास्तच कठिण झालाय का? लिहायला सुरूवात केली तेव्हा इतका किचकट होइल असं वाटलं नव्हतं. हरकत नाही, आता हळूहळू माझी तमिळ भाषेबद्दलची भिती गेल्यातच जमा आहे. लेकीच्या शाळेसोबत मी पण अक्षरांची बाराखडी गिरवतेच आहे. पण आता अभ्यास फार करून झालाय. पुढच्या लेखामध्ये मात्र फिरायला कुठंतरी जाऊ या. मस्तपैकी शॉपिंग आणि खादंती करण्यासाठी तर नक्कीच.

Tuesday, 5 April 2016

MAD-रास ५

चेन्नईमध्ये आल्यापासून मला माझे मित्रमैत्रीणी बर्‍याचदा हा प्रश्न हमखास विचारतात. “तिकडे हिंदी अजिबात बोलत नाहीत, मग तुझं कसं निभावतं?” यावर उत्तर: माझं अतिशय उत्तमरीत्या निभावतं.

आपल्याला हे ऐकून माहित असतं की दाक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्याच भाषा बोलाव्या लागतात, अन्यथा ते लोकं फार त्रास देतात. हे एका बाजूने बरोबर आहे आणि एका बाजूनं नाहीसुद्धा. दाक्षिणात्यांना हिंदीचा इतका राग आहे कारण त्यांच्यासाठी ती भाषाच पूर्णपणे परकी आहे आणि याच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या मराठी भाषिकांना हिंदी फार सोपीची वाटते, तसं त्यांना वाटत नाही.


चेन्नईमध्ये आल्यानंतर आठेक दिवसांत मुंबईच्या सवयीने बाहेर बर्‍याचदा दुकानांतून वगैरे आपसूक हिंदी बोललं जायचं,  ते हिंदी बोललं काय आणि मराठी बोललं काय फारसा फरक पडणार नाही हे लक्षात आलं. लहानपणापासून घरात कानडी असल्याने आणि मंगळूरला दोन वर्षं काढल्याने कानडीची सणसणीत सवय होती. मग इकडे बाहेर सर्रास कानडीमधूनच बोलायला सुरूवात केली. अजिबात काही कळत नाही यापेक्षा किमान काय तीस चाळीस टक्के समजतंय तितकं तरी पुरेसं! कानडी तमिळ भाषा बर्‍यापैकी जवळच्या आहेत पण एकदा तमीळसाठी कान तयार झाला की मराठी-तमिळ-कानडी अशा तिन्ही भाषांमधल्या शब्दांची गंमत मला तरी घेता येते.


साधारण बर्‍यापैकी चांगल्या दुकानांमधून अथवा शेजार्‍यांबरोबर फार मोठा प्रश्न आला नाही. बहुतेक सर्वजण इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने इंग्रजी झिंदाबादचा नारा देता आला. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही अशा “काकू आंटी” वगैरेंच्या मुलांनी भाषांतरकाराचं काम केलं. ती मुलं नसली की काकू तमिळमध्ये मी इंग्लिश-कानडीमध्ये असा संवाद चालू झाला. एकंदरीत बोलायचंच असेल तर भाषेचा अडथळा कधी येत नाही, आणि बोलायचंच नसेल तर कितीही समान भाषा असली तरी संवाद साधला जात नाही, हेच खरं. आमच्या घरासमोरच एक मारवाडी फॅमिली राहते. गेली वीस वर्षे इथंच राहत असल्याने त्यांचं तमिळ उत्तम आहे, शिवाय हिंदी समजतं. त्या भाभींनी मला खूप मदत केली.

रोजच्या वापरामधले शब्द  मी एका वहीमध्ये लिहून ठेवले. वाणसामानाची नावं, फळं भाज्यांची नावं. मराठी तमिळ हिंदी कानडी अशी सापड्तील त्या भाषेमध्ये लिहून ठेवत गेले. आकड्यांचा फारसा प्रश्न आला नाही. मला तमिळमधले वर,रंडं, मुणं, नालं हे आकडे आधी पासून येत होते. पुढचे आकडे मी कानडीमधून बोलायचे. ते थोडेफार सारखेच आहेत. कानडीमधला “ह” इकडे “प” होतो. कानडी “हत्त” तमिळ पत्त (दहा), हन्नोंद-पन्नोंद (अकरा), हन्यार्ड-पन्यार्ड (बारा) असे आकडे लक्षात ठेवले. पण बर्‍याचदा पायांत पाय अडकवून तोंडघशी पाडलं ते “पांज” ने. बहुतेकदा दुकानामध्ये समोरच्याने “पांज रूपया” सांगितलं की मी पाचचं नाणं काढून द्यायचे. समोरचा माझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक द्यायला. “इन्न पत्त कोडी”. मग कानडीमधून “पाच रूपये म्हणालात ना?” समोरून तमिळमध्ये “आमा, पांज” (ज चा उच्चार “च” आणि “ज” मधला) मग लक्षात यायचं त्याला पंधरा रूपये म्हणायचं आहे. निमूटपणे अजून एक दहाची नोट द्यायची. मागे  रत्नागिरीमध्ये लिंबं घेतल्यावर ती बाई “पाच द्या” म्हणाली. मी पर्समधून मोजून पंधरा रूपयाचे सुट्टे दिल्यावर त्या बाईनं परत मझ्याकडे “कहांकहांसे आते है” टाईप लूक दिला. चालायचंच!! चेन्नई काय आणि रत्नागिरी काय.. आम्ही असलेच वेंधळे.


भाजी-फळं वगैरे घ्यायला इतका त्रास झाला नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून दारावर विकायला घेणार्‍या विक्रेत्यांमुळे पुन्हा एकदा आपण गावकुसात रहायला आलोय याची जाणीव झाली. हे लोक काय ओरडतात ते समजायचं नाही, म्हणून हाक मारून नक्की काय भाजी आहे ते बघावं लागायचं. एकदा या नादांत मी स्टोव रीपेअरी आणि छत्री दुरूस्तीवाल्याला हाक मारली आहे. एकदा सकाळी साडेसहाला एक बाई अगम्यपणे काय ओरडत होती ते कळेना, म्हणून बोलावली तर ती इडियप्पम विकत होती. कोकणामधल्या लोकांना रसशेवया माहित असतील. त्याच या तांदळाच्या गरमगरम वाफवलेल्या शेवया. दहा रूपयाचे चार. ही बाई आता आमची फार आवडती झाली आहे. सकाळच्या वेळी कंटाळा आला असेल तर तिच्या “इड्डीआपै” अशा जोरदार हाकेची वाट पहायची, गरम शेवया आणि त्यावर दूध साखर हा नाश्ता पोटभरीचा तर होतोच, शिवाय डायेट फ्रेंडलीसुद्धा.


या दारी येणार्‍या विक्रेत्यांमुळे मला भाज्यांची तमिळ नावे लगेच समजत गेली. “कीरै” म्हणजे पालेभाजी. सीरीकीरै, मणतक्कालीकिरै, पुळच्चीकीरै ही लोकल पालेभाज्यांची नावं समजली. तक्काली तक्काली तक्काली असं सकाळी सकाळी ओरडत येणारा बावा टोमॅटो आणि इतर भाज्या घेऊन यायचा. तक्काली म्हणजे टोमॅटो. सोरेकाई म्हणजे दुधी. वेंडेकाई म्हणजे भेंडी. वाळेकाई म्हणजे केळी. (कानडीमधल्या बाळेकाई मुळे हे लक्षात रहायला बरंच सोपं) काई म्हणजे भाज्या-फळफळावळ. पळम म्हणजे फळं. हे तर लक्षात ठेवायला बरंच सोपं होतं. असे बरेच रोजच्या वापरातले शब्द समजल्यानंतर एकेक मजा जाणवायला लागली. मांगा म्हणजे आंबा. अरिसी म्हणजे तांदूळ. याचे मॅंगो आणि राईस हे इंग्रजी शब्द याच तमिळ शब्दांवरून आलेत असं कुठंतरी लेखामध्ये वाचलं होतं. खरंखोटं असेल का माहित नाही, पण मला लक्षात ठेवायला हे नीमॉनिक बरंच उपयोगी पडलं. पुरूप्पू म्हणजे डाळी. कडलीपुरूप्प्पू म्हणजे हरभर्‍याची डाळ. इथंही नीमॉनिक वापरलंच. J


भाषेची सर्वात जास्त अडचण जाणवली ती कामवालीच्या संदर्भात. सेल्वीला इंग्लिश समजायचं, पण तेही थोडंसंच. सेल्व्हीने महिनाभर माझ्याकडे धुणीभांडी, झाडू पोछा आणि अंगण झाडणे इतकं काम केलं. पुढच्या महिन्यापासून तीच स्वयंपाक करायला लागली. सेल्व्हीच्या हाताला जबरदस्त चव होती, मसालेदार, झणझणीत पन अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. मला मासे चिकन वगैरे काही घरी बनवता यायचं नाही. तिच्यामुळे थोडंफार करायला शिकले. पण हे करणं-शिकणं-शिकवणं फार मजेदार असायचं. किचनमध्ये ती मला काहीतरी “हवंय” किंवा “संपलंय” म्हणून सांगायची. तिला काय हवंय ते मला कळलेलं नसायचं. मग अख्ख्या  किचनमध्ये सापडलं तर ठिक अन्यथा कंप्युटर चालू करून ती जे सांगेल ते गूगल सर्च करून त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते शोधणे. मग ते इंग्रजीमधलं नाव आपल्याला समजलंतर ठिक नाहीतर त्याचं परत मराठी मध्ये काय म्हणतात ते शोधणे. इतक्या सर्चिंगमध्ये काहीतरी गमतीजमती व्हायच्यात. एकदा सेल्वी चिकन बिर्याणी करत होती. काहीतरी मसाल्याचा पदार्थ तिला हवा झाला. काय ते गूगलभाऊला विचारलं. इंग्रजी नाव मला उमगेना. त्याचं मराठी नाव काय म्हणून विचारलं. “मराथीमोगू इन मराठी” असं स्पेलिंग टाकल्यावर गूगल पण गरगरला असणार. अखेर त्याला मराठीमध्ये “नागकेशर” म्हणतात हे मायबोली.कॉमवर समजले. पण मग ह्या नागकेशराला तमीळमध्ये “मराठी” का म्हणतात ते मात्र अद्याप समजलेले नाही.


पण हे मात्र खरं आहे की, तमिळ आणि मराठी संस्कृती फार जवळच्या आहेत. वरवर पाहता त्या अजिबात तश्या जाणवत नाहीत याची मला कल्पना आहे. पण मुळातून आपली आणि तमिळ नाळ कुठंतरी खोल जुळल्यासारखी वाटते. रा. चिं ढेर्‍यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी याबद्दल बरंच लिहिलं आहे. अगदी मराठीमधला “मुलगा” हा शब्ददेखील तमिळ देव मुरूगावरून आल्याचं ढेरे यांनी लिहिलं आहे. मुरुगन म्हणजेच आपला मल्हारी असंही वाचलंय. गंमत म्हणजे मराठी टीव्हीवर सध्या चालू असणारी हिट सीरीयल “जय मल्हार” तमिळमध्ये डब करून दाखवली जाते, आणि ती बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. इथल्या इमिटेशन ज्वेलरीच्यादुकानात मला बानु नथ पण दिसली होती. मुरूगन आपल्याकडे कार्तीकेय (शिवपुत्र) समजला जातो आणि स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत. इकडे मात्र मुरूगनची कृष्णासारखीच प्रियकर म्हणून आळवणी केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया त्याचे आवर्जून दर्शन घेतात. अशा अजबगजब कहाण्या ऐकायला मला फार गंमत वाटते.


इतक्या दूर आल्यावर सणावारांची त्यानिमित्ताने घराची आठवण होणं साहजिक आहे. सणांच्या पूजाविधीपेक्षा नैवेद्यावर आमचं जरा जास्त प्रेम. आल्यानंतर महिन्याभरातच गणपतीचा सण होता. घरून “आला असतात तर..” चे हेव्ही इमोशनल डोसेस चालू होते. आता गणपतीच्या वेळेला कोकणी माणूस गावात नसेल तर काय चिडचिड होइल.  सकाळीच आम्ही तिघं घराजवळच्या गणपती देवळात गेलो. हे देऊळ चांगलं मोठं आहे. खरंतर देवांचं हाऊसिंग संकुल आहे कारण तिथे देवळाच्या अंगणामध्ये गणपतीसोबतच देवी, विष्णू, हनुमान, कार्तीकेयन, शंकर अशा सर्वच मुख्य देवांची मंदिरं आहेत. आम्ही आत गेल्यागेल्या देवळात जाण्याआधीच पुजा्र्‍यानं आम्हाला बघून इकडे असे या, रांगेत उभे रहा असे तमिळमधून सुनावले. देवळात जायच्या आधीच आम्ही देवळाबाहेर असलेल्या प्रांगणात कशाला उभे आहोत ते समजेना. आमच्यासोबत अजून वीस पंचवीस माणसं होती. मग त्या पुजार्‍यानं आमच्या हातात एक मातीचं सुगड टाईप दिलं. त्यात पाणी, थोड्या दुर्वा आणि झाडांची पानं फुलं वगैरे होती. ती छोटी सुगड सर्वांच्या हातात दिल्यावर पुजार्‍याने आम्हाला “चला आता” असं सांगितलं. आम्हाला काहीही समजत नसल्याने आम्ही आपले हल्याहल्या करत इतर काय करतात त्यांच्यासारखे निघालो. अख्ख्या देवळाला प्रदक्षिणा घालून मग आम्ही प्रांगणाच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे गणपतीची एक सुंदर पितळी मूर्ती बाहेर चौथर्‍यावर ठेवली होती. पुजार्‍यांनी त्या मूर्तीला मंत्र म्हणत अभिषेक चालू केला. त्याचा अभिषेक झाल्यावर ज्या लोकांच्या हातात ही सुगड होती त्यांनी त्यातलं पाणी मूर्तीवर ओतलं. आम्ही कॉपी पेस्ट केलं. मग पुजार्‍यांनी ते अभिषेकाचं पाणी ज्या मातीत मुरवलं ती थोडी माती फुलं वगैरे त्या सुगडीत घालून दिलं. “आता याचं काय करायचं” असा प्रश्नचिन्ह तोंडावर झळकलं असणार कारण शेजारी उभ्या असलेल्या बाईनं “वीडीगं पोणा सॅंड मे ऎड माडी” असं सांगितलं. घरी जाऊन मातीत मिसळा असा अर्थ. आम्हाला समजावं म्हणून तिला काय कसरती कराव्या लागल्या. गणपती विसर्जन करून आलं की त्याची मूठभर का  होइना ओली माती घरात आणून ठेवायची आपली पद्धत. इथंही थोडाफार तीच पद्धत पण किंचित फरक. पुजार्‍यांनी त्या पितळी मूर्तीची पूजा करेपर्यंत आम्ही आत देवळांत जाऊन दर्शन घेतले. 

तोवर बाहेर प्रसाद द्यायला सुरूवात झाली होती. देवळात आलेल्या प्रत्येकाला प्रसाद हा दिलाच जातो. काबुली चण्यांचे सुंडल आणि गोड पोंगल. गोडगोड गुळाचा केलेला पोंगल इतका खमंग लागतो की बास. पोंगल आणि सुंदलबद्दल नंतर सविस्तर सांगेन. “इकडे घरी गणपती बसवत नाहीत वाटतं” मी नवर्‍याला सांगितलं. त्याला देवदर्शनापेक्षा उकडीच्या मोदकांची आस अधिक लागली होती. देवळाबाहेर पडल्यावर गावच्या मुख्य बाजारात काहीतरी आणायला गेलो. तिथं तीन-चार विक्रेते रस्त्याच्या एकाकडेला गणपतीच्या मूर्ती विकत होते. पूर्ण मातीने बनवलेली ओली मूर्ती. गुंजेचे लावलेले लाल डोळे. रंग वगैरे काहीही नाही. शब्दश: पार्थिव मूर्ती. अगदी छःओट्याच्या पण गोजिर्‍या मूर्ती. विक्रेत्यांपैकीच काही लोक साच्यामध्ये ओली माते घालून फटाफट या मूर्ती घडवत पण होते. लोक या मूर्ती ताटात ठेवून घरी घेऊन जात होते. आजूबाजूला फुलाफळांची विक्री चालू होती. इकडे कुठल्याही सणाला तोरण म्हणून झावळ्यांचा एक प्रकर करतात. तोही विकायला होता. सणाचा दिवस म्हणजे केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री. नेहमीचा बाजार सणासाठी छानच नटला होता.. कोकणापासून इतक्या दूर येऊन इतका सुंदर गणपतीचा सण बघायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. याच बाजाराच्या रस्त्यावरून आमच्या घराकडे येताना मुरुगनचे घर आहे. हा मुरुगन नुकताच आमच्या ओळखीचा झालेला. त्याची बायको मराठी आहे, पण सध्या ती युएसला कामासाठी गेली होती. पण बायकोची भाषा बोलणारे लोक् इतकी ओळख त्याच्यासाठी पुरेशी होती. बाजारात जातायेताना तो घरी असला की हाक मारायचा, तो नसला की त्याची आई तमिळमध्येच सर्व काही कुशलमंगल विचारायची. आताही आम्ही घरी जाताना त्याने हाक मारली. “प्रसाद घ्यायला या”


त्याच्या घरात ही पार्थिव इवलाली मूर्ती सुंदर पुजून ठेवली होती. आज संध्याकाळी आम्ही घरातल्याच बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांत ओततो म्हणाला. “आमच्याकडे” सणाच्या नावाखाली हाय हैदोस घालतात ते त्याला सांगायची गरजच नाही. मुरूगन मुंबईला दोन तीन वर्षे होता. मुरूगनची आई टिपिकल तमिळ. बाहेर येऊन माझ्याशी आणि लेकीशी दोन वाक्यं बोलून गेली. मला वाटलं होतं की प्रसाद म्हणजे परत पोंगल येईल. मुरूगनच्या आईंनी ताटामध्ये वाढून आणले ते “मोदगम” त्या मोदगम म्हणाल्या तरी मी एकदम “उकडीचे मोदक” बघून उडालेच. कर्नाटकात उकडीचे मोदक फारसे मीतरी पाहिले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोकण साईडकडे उकडीच्या मोदकांचं फार असतं. घाटावर तळणीचेच मोदक. पण तरी हे तिथून ते इकडे इतक्या तमिळनाडूपर्यंत कसं आलं ते माहित नाही (का इकडून तिकडे गेलं तेही माहित नाही) पण गरम गरम वाफवलेले, साजुक तुप घातलेले, नारळागुळाचा खमंग सारण वगैरे भरलेले मोदक. नवरा एकदम खुशच झाला. गणपती बाप्पा मोरया!! फक्त इकडे या मोदकांचा कायापालट होतो. आपल्या महाराष्ट्री पद्धतीसारखे नाजुक कळीदार मोदक इकडे बनवत नाहीत. सरळ समोसाशेपमध्ये मोदक वळतात. २१ करा नाहीतर ४२. मग तसे हे झटपट होतात हे मोदक.  चवीला सेमच लागत् असल्याने केवळ रूपाने असा काही फारसा फरक पडत नाही. मोदक न जमणार्‍यांनी मोदगम करून बघा!!!


या खाण्यापिण्यावरून अजून एक गंमत आठवली. कसल्याशा स्वीट मार्टमध्ये गेलो होतो. तिथले नेहमीचे केक्स पेस्ट्रीज आणि अतिशय गोड चपचपीत बंगाली  मिठायांपेक्षा वेगळं काही आहे हा ते बघत होते. एका ट्रेमध्ये पोळ्यांची चळत ठेवली होती.  मी दुकानदाराला “वोबट्टू?” म्हणून विचारलं. मंगलोरकडे पुरणपोळ्यांना वोबट्टू म्हणतात. त्याला काय ते समजेना. मी परत कानडीतून विचारलं “हुरणद्द होळगी” तो परत नॉनप्लस. मग तोच म्हणाला. “इदु पुरणपोळी” क्काअय्य्य? मी मराठीमध्येच आले. चक्क!! पुरणपोळी (ण आणि ळ! हल्ली त्तर काही मराठी लोकंसुद्धा पुरनपोली म्हणतात). चेन्नईमध्ये ही पोळी दोन तीन प्रकाराने करतात. पैकी कोकोनट पोळी म्हणजे खोबर्‍याची पोळी तर अप्रतिम लागते. पुरूप्पू पोळी म्हणजे चणाडाळीचं पुरण वापरून केलेली पोळी. बर्‍याच स्वीट मार्टमध्ये ताज्या पुरणपोळ्या हमखास विकायला ठेवलेल्या असतात. मी लगेचच विकत घेतली हे सांगायला नको.  तमिळनाडूमध्ये आल्यावर बर्‍याच दिवसांनी आयती पुरणपोळी खाल्ली. घरगुती पोळी अजून वेगळी असणार पण एकंदर चव बरीचशी आपल्या मराठी पुरणपोळीसारखीच. आकार थोडासा लहान. पुरणपोळीला साधारण इकडे बोळीदेखील म्हणतात. प आणि ब ची हे अशी अदलाबदल कशी काय होते याबद्दल आता पुढच्या लेखात. तूर्तास मला चेन्नईमध्ये उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या विनासायास मिळू शकतात याचा शोध लागल्याने आनंदी आनंद गडे म्हणत बागडायचंय.




Monday, 29 February 2016

MADरास ४

मागच्या दोन तीन लेखांमध्ये मद्रासला आल्यानंतरचे झालेले त्रासच बरेचसे लिहिले गेलेत. जसे वाईट अनुभव आले तसे चांगलेही अनुभव आलेच, पण वाईट अनुभव कधीही मनावर जास्त रूजले जातात. चांगले अनुभव मात्र सटीसमाशी कधीतरी आठवलेच तर अन्यथा कडू अनुभवच जास्त मनात रेंगाळतात.


पहिला महिनाभर मंगलोरवरूनच आणलेला किराणा संपल्यावर “किराणा भरणे” या लढ्याची सुरूवात झाली. तेव्हा गावामध्ये किराणा-वाणसामानाची एकूणात चार दुकानं होती. चार दुकानांपैकी दोन दुकानदारांनी “तमिळ तेरीम्मा?” या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिल्यावर “घ्यायचं तर घ्या, नाहीतर चालते व्हा” टाईप उत्तर दिलं. अजून एका मारवाड्याच्या दुकानामध्ये अळ्याकिड्यांच्या वसाहतीमध्ये काहीबाही तांदळाचे आणि डाळीचे वगैरे दाणे दिसत होते. एवढे पैसे देऊन किडे विकत घ्यायचे नसल्याने मोर्चा चौथ्या दुकानात वळवला. या अंकलना अजिबात हिंदी येत नव्हतं, पण मदत करायची इच्छा मात्र होती. त्यांनी सरळ काऊंटरवरची फळी काढून मलाच दुकानात बोलावलं आणि काय काय हवं ते डब्यांमधून दाखवायला सांगितलं. हे एक बरं झालं. भाजीच्या दुकानामध्ये हीच ट्रीक कामी येत होती. पण किराण्याचा एक मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे मला असलेले सर्वच आयटम्स या दुकानामध्ये उपलब्ध नव्हते.


मी स्वयंपाकघर चालवायला शिकले ती २००५ नंतर. तोपर्यंत आई जिंदाबाद. नंतर हॉस्टेल झिंदाबाद! नंतर बेलापूरला एकटं रहायला लागल्यावर रोजच्या रोज बाहेरून ऑर्डर करून जेवणे इथपासून ते रोजच्या रोज घरी स्वयंपाक करणे हा प्रवास मी एकटीनंच केलाय. इतरांसारखे आईबाईंच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे न घेतल्यानं माझा किचनवावर हा मुख्यत्वेकरून पॅक्ड फ़ूड्स, रेडीमेड आणि इन्स्टंटवर राहिला होता. लग्न झाल्यावर आणि मंगलोरला गेल्यावरही यातलं काहीच बदललं नव्हतं. महिन्याचा किराणा म्हणजे मॉलमध्ये जाऊन सुपरमार्केटमधून भसाभसा पिशव्या उचलून कार्टमध्ये टाकणे. मनाली न्यु टाऊन हे काळाच्या वीस वर्षं मागं असल्यानं इथं असले चोचले नव्हते. रीडीमेडमध्ये मिळणारे पाकिटं ठराविकच होती. पास्ता, नूडल्स, वेगवेगळे सॉस, तयार जॅम, जेली, मेयॉनिज, सॅलड ड्रेसिंग, चीज, बटर, फ्रोझन मटार, भाज्या  वगैरे काहीही इथं मिळत नव्हतं. हा वेगळाच मोठा प्रॉब्लेम होता. परिणामी, इथून जवळ्पास कुठला मॉल आहे याची चौकशी सुरू केली. “किराणासामान घेण्यासाठी या बाईला मॉलची काय गरज?” हा प्रश्न तिथं बहुतेकांना पडत होता. माझ्याकडं उत्तर नव्हतं. इथं बहुतेक घरांमध्ये वर्षाचे डाळ तांदूळ भरायचे, आणि महिन्याला लागेल तेवढंच सामान आणायचं अशी पद्धत. जेवणामध्ये भात-सांबार-रस्सम, आणि भाज्यांचे कूटू पोरीयल वगैरे प्रकार महत्त्वाचे. आहारामधला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इडली डोसा इत्यादि आंबवलेले पदार्थ. पोळी-पुरी हे मुख्य जेवणाचे भाग नाहीत तर ते “टीफीन आयटम्स” म्हनजे नाश्त्याचे प्रकार. अशावेळी आमचं सामान नक्की हवं म्हणजे सांगणार कसं? शिवाय बर्‍याच गोष्टी ज्या मला हव्या तशा मिळत नव्त्या. इथं सर्रास दुकानांमधून मिळणारं तेल तिळाचं किंवा सूर्यफुलाचं. शेंगदाण्याचं तेल अजिबात मिळायचं नाही (ब्रॅंडेड, नॉन ब्रॅंडेड दोन्हीही)



 परीणामी, अण्णानगरच्या मॉलमध्ये कार भाड्यानं घेऊन गेलो आणि हवं ते सामान घेऊन आलो. हे दर महिन्याला अर्थात परवडण्यासारखं नव्हतं. तरी सध्या इलाजच नसल्यानं गाडं असंच ओढत होतं. मग कार घेऊन नुसतं किराणा आणण्यापेक्षा दिवसभर मद्रास फिरणे, बाहेरच मस्तपैकी जेवणे आणि संध्याकाळी मॉलमध्ये जाऊन जमके शॉपिंग करना असा कार्यक्रम आम्ही सुरूवातीचे काही महिने आखला. नंतर तो कार्यक्रम का बंद पडला ते नंतर सांगेनच.



पण आजचा विषय तरी मद्रासची तोंडओळख हाच-
पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागराजवळ बसलेलं हे भलंमोठं शहर म्हणजेच मद्रास उर्फ चेन्नई. याचं ब्रिटीशांनी ठेवलेलं नाव मद्रास. नंतर बर्‍याच वादविवादग्रस्त विचारांती याचं नाव बदलून ठेवलं चेन्नई. मद्रास हे नाव खरंतर ब्रिटीशांनी इथं शहर वसवण्याआधीपासूनच प्रचलित आहे. चेन्नई ही भारतामधलं सेकंड इंडस्ट्रीयल कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. डॅट्रॉइट ऑफ इंडिया असंही या शहराला कौतुकानं म्हट्लं जातं इतके इथं गाड्यांचे कारखाने आहेर्त.



खरंतर मद्रास हे नाव जास्त प्रचलित होतं, पण १९९६ मध्ये तत्कालिन शासनाने हे नाव बदलून चेन्नई हे नाव औपचारिकरीत्या रूढ केल. पण प्रश्न हा की, या गावाचं मूळ नाव चेन्नई की मद्रास? यामागे अनेक थेअरीज आहेत त्यापैकी, मद्रासपट्टणम हे सेंट जॉर्ज फोर्टजवळचं एक छोटंसं खेडं होतं. इथली मुख्य वस्ती ही मासेमार लोकांची होती, ही जास्त प्रसिद्ध आहे त्याखेरीज. हे नाव पोर्तुगीजांनी दिलं. फ्रेंचांनी दिलं, इथल्य स्थानिक राजांनी दिलं, हा मद्रसाचा अपभंश आहे वगैरे अनेक् थेअरीज इथं प्रचलित आहेत. यामधेय चेन्नी म्हणजे चेहरा हे तमिळ नाव इथपासून ते पोर्तुगीज, फ्रेंच, तेलुगु वगैरे कित्येक शब्दांवरून ही नावं पडली असावीत असं विकीपीडीया सांगतंय. सध्या तरी या सर्वच थेअरीज आहेत आणि नक्की इतिहास कुणालाच माहित नाही. थेअरीज मांडणं आणि खोडणं हा इतिहासकारांच्या कामाचा विषय आहे, आपला नव्हे. त्यामुळे आपण तरी या शहराचं नाव मद्रास आणि चेन्नई असं दोन्ही धरून चालूया. मी राहत असलेला भाग हा मद्रासपट्टणम या खेड्याच्या आसपासचा असल्यानं मी मद्रास म्हणणं जास्त योग्य ठरतं.  मद्रासला दक्षिण भारतामधलं सर्वात महत्त्वाचं शहर म्हणायला हवं. भारताच्या पूर्वकिनार्‍यावर (कोरामंडल किनारा असंही म्हणतात) वसलेलं हे शहर लांबच लांब पसरलेलं आहे. चेन्नईचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुंबईसारख्या इमारतींची जिचकीगर्दी जाणवत नाही. जितक्या इमारती दिसतात त्याही अशा मोठ्यामोठ्या उंच टॉवर्स नसलेल्या. हे अर्थात साऊथ चेन्नईसाठी खरं नाही. हा आयटीहबचा भाग. कुठल्याही मोठ्या शहरातली ही आयटी हब्ज एकाच रंगारूपाची दिसतात, त्यामध्ये वेगळेपणा असा काही नसतोच. पण शहराचा जर आत्मा बघायचा असेल तर त्या शहराच्या जुन्या भागांतून फिरावं, मग ते शहर अस्सल चेहरा घेऊन सामोरं येतं. प्रत्येक वेळी हा चेहरा भावेलच असं नाही, पण त्याची अस्सलता मात्र अनुभवण्यासारखीच असते.



जुन्या चेन्नई शहराचे मुख्य भाग म्हणजे फ़ोर्ट सेंट जॉर्ज, पॅरीज वगैरे उत्तर चेन्नईकडचा भाग. मायलापोर हादेखील चेन्नईचा महत्त्वाचा भाग. या भागात एकेकाळी खूप मोर होते म्हणून त्याचं नाव मायलापोर. मायिल म्हणजे तमिळमध्ये मोर. (यावरूनच इथल्या प्रसिद्ध लोकनृत्याचं नाव मायिलअट्टम- यामधेय नर्तक मोरासारखा पिसारा लावून नाचतात. अट्टम म्हणजे नृत्य. हे असंच उगाच आपलं माहितीसाठी!) मी जास्त फिरले तो भाग फोर्ट सेंट जॉर्ज, पॅरीज वगैरे. मी जिथं राहते तिथून हा भाग जवळ आहे, आणि या भागात बरीच दुकानं आहेत. 


चेन्नईमधला उन्हाळा हा सर्वांसाठी महत्त्वाचा “इशू” असतो. इथलं वातावरण वर्षभर साधारण सारखंच अस्तं. मे आणि जून हे सर्वात गरम महिने. इथं त्यांना “अग्नि नक्षत्रम” असंच म्हणतात. अंगावर अक्षरश: गरम गरम वार्‍याचे झोत जाणवतात. तापमानाचा आकडा सहजपणे चाळीशी पार करतो. इतकं ऊन असताना दुपारच्यावेळी बाहेर पडणं मूर्खपणाच असतो. कोकणात आयुष्य काढलेलं असल्यानं मे महिन्याच्या गर्मीची आम्हाला चांगलीच् सवय होती. पण गमतीची गोष्ट म्हणजे कोकणापेक्षा इथला उन्हाळा सुसह्य वाटला. कोरडसर वातावरण असल्यानं घाम जास्त येत् नाही. आमचं कोकण निसर्गसौंदर्यानं नटलेलं वगैरे आहे, पण इथली आर्द्रता प्रत्येकाला सहन होतेच असं नाही. चेन्नईचा उन्हाळा भाजून काढतो, पण खूप पाणी घामावाटे गेल्यानं जो मरगळलेपणा जाणवतो तो इथं जाणवत नाही (तरीही... उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही क्कोकणात जातोच! बात हककी भी तो है) ऑक्टोबर ते डिसेंबर इथं पावसाळा असतो. पण परत एकदा कोकण किंवा मुंबईच्या पावसाळ्याशी तुलना केली तर हा पाऊस म्हणजे विनोदच. कोकणात एकदा पाऊस लागला की आठआठ दिवस उसंत घेत नाही सूर्याचं दर्शन मुश्किल होतं. इथे पाऊस जेमतेम दोन तीन तास धुवांधार कोसळतो आणि लगेच आकाश मोकळं होतं. अर्थात याला सणसणीत अपवाद म्हणजे २०१५ च्या  नोव्हेंबरमधेय झालेला प्रचंड पाऊस आणि चेन्नई  पूर्मय झालेली. त्यावर सविस्तररीत्य अनंतर लिहिणारच आहे.


चेन्नई सर्वात सुंदर असतं ते डिसेंबर ते फेब्रूवारीमध्ये. तापमान साधारण वीसपेक्षा कमी होतं. चेन्नईच्या संगीत कचेरींचा, लग्नांचा आणि अनेक कार्यक्रमांचा सीझन चालू होतो. रस्ते कांजीवरमनी, जाईमोगर्‍याच्या गजर्‍यांनी, सोन्याच्या दागिन्यांनी भरून जातात. चेन्नईचं सोशल लाईफ एकदम हॅपनिंग होतं. अशावेळी चेन्नई फिरायला फार मजा येते.

चेन्नई शहरांमधून दोन नद्या वाहतात, अड्यार नदी (तुम्हीजर तमिळ सिनेमा पाहत असाल तर बर्‍याच सिनेमांमध्ये पाहिला असेल) दुसरी नदी कूवम नदी. या दोन्ही नद्यांना जोडलेला कालवा म्हणजे बकिंगम कालवा. सध्या हे सर्वच प्रकरण नदी-कालवा म्हणायच्या लायकीचं राहिलेलं नाही, मोठमोठी गटारं म्हणता येतील. तिसरी नदी कोर्तालैयार नदी आमच्या गावाजवळून वाहते आणि एन्नोरच्या समुद्रामध्ये जाऊन मिळते. तोची खाडी आमच्या घरापासून जवळच आहे, तिथे कधीमधी आम्ही संध्याकाळी भटकंतीसाठी जातो.



चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी असल्याने तमिळ भाषा ही इथली प्रमुख भाषा. त्याहीखेरीज तेलुगु, कानडी, इंग्रजी या भाषा बहुतेकांना बोलता येतात. इथला हिंदीविरोध हा जगप्रसिद्ध असलातरी बदलत्या काळानुसार हिंदी हीदेखील इथे बर्‍यापैकी बोलली जाते. चेन्नईमधला एक व्यापारी भाग सावकार पेट म्हणून ओळखला जातो. (पेठा फक्त पुण्यातच आहेत असा अभिमान बाळ्गणार्‍यांसाठी खास माहिती: चेन्नईमधेय बहुतेक ठिकाणांची नावे अमुकपेठ वगैरे आहेत. तमिळमध्ये ठ नसल्यानं ट लिहिलं आणि बोललं जातं) हा सावकार पेट प्रामुख्यानं मारावडी गुजराती व्यावसायिक लोकांचा भाग आहे. इथल्या दुकानदारांबद्दल आणि अफलातून खाद्यसंस्कृतीबद्दल नंतर सेपरेट भाग टाकण्यात येतील.


जशी चेन्नईमध्ये फिरायला, इथल्या स्थानिक लोकांशी बोलायला आणि एकंदर जीवनशैलीसोबत जुळवून घ्यायला सुरूवात झाली तसं राहणं अधिकाधिक सुखकर होत गेलं.


मद्रासमध्ये येऊन हळूहळू इथल्या वातावरणाशी, भाषेसोबत, लोकांसोबत परिचय होऊ लागला आणि “हे वाटलं होतं तितकं वाईट नाही” अशी भावना मनात येऊ लागली. हे गावच आता काही दिवस “आपलं” आहे हे मनाला पटायला लागलं आणि इथलं राहणं अधिक सुखकर होत गेलं.

शेवटी म्हट्लंच आहे. जहां पे बसेरा हो सवेरा वही पे.



Monday, 12 October 2015

MAD-रास ३

 हे साधारण कुठल्याही नवीन शहरामध्ये गेल्यानंतर होणारेच हाल आहेत. त्यात शहर स्पेसिफ़िक असं काहीच नाही. पण चेन्नईचे खास असे काही वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथला उन्हाळा (खरंतर इथं दुसरा ऋतू नाहीच तरीही मे महिना सर्वात कठीण) आणि दुसरं म्हणजे प्यायचं पाणी. चेन्नईचं पाणी हे खारं पाणी आहे. इथे तसेही पाण्याचे स्त्रोत फार कमी आहेत. बघायला गेलंतर शहरामधून तीन नद्या वाहतात पण त्यांची अवस्था भलीमोठी गटारं अशीच आहे. परिणामी पाण्यासाठी असलेले तीन मोठे तलाव आणि बोरवेल यावरच मुख्य भिस्त आहे. लहरी पावसामुळे पाण्याची टंचाई आधीपासूनच होती.




त्यातही गेल्या दशकामध्ये पाण्याची इथं अतिप्रचंड टंचाई जाणवली होती. जवळ्जवळ दोनशे किमीवरून पाणी वाहून आणावं लागत होतं. त्यानंतर शहरातला पहिला डीसलायनेशन वॉटर प्लाण्ट चालू केला. हा प्लाण्ट आम्ही राहत असलेल्या गावापासून अवघ्या दहा किमीवर मिंजूर इथं आहे. शहराकडे जाणारा पाण्याचा साठा आमच्याच गावावरून जात असल्याने आम्हाला पाण्याची टंचाई कधीही जाणवत नाही. अगदी उन्हाळ्यांतसुद्धा पाणीकपात होत नाही. अर्थात पाणी भरपूर असलं तरी त्याचे स्वत:चे नखरे असे वेगळेच आहेत. हार्ड वॉटर म्हणता येईल असल्या क्वालिटीचं पाणी, त्याला अजिबात चव नाही आणि प्यायचं पाणी म्हणून सुरक्षित अजिबात नाही.



चेन्नईमध्ये नळाला येणारं पाणी हे पिण्यालायक नसतं ही माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्यावर उपाय म्हणून तथाकथित बिसलेरीची कॅन विकत घ्यायचे हेही सांगितलं होतं. पंचवीस रूपयाला पाच लिटरचा कॅन.  हा काही मिनरल वॉटरचा कॅन नव्हेच. खारं पाणी गोडं करून विकतात, पण हे पाणी जंतुविरहीत वगैरे अजिबात नसतं. आम्हाला त्याची सत्यता फारच मनापासून नंतर पटली. इथे येऊन पंधरा-वीस दिवस झाले होते. सतिशच्या नोकरीची घडी बसत चालली होती. सुनीधीसाठी मी नर्सरी अथवा प्रीकेजी टाईप एखादं स्कूल शोधत होते. भाषेचा लढा चालूच होता. तर इतक्या सर्व गडबडींमध्ये तापाचं दुखणं निघालं. पहिला एक दिवस क्रोसीनवर घालवला. दुसर्‍या दिवशी मात्र प्रचंड अंगदुखी आणि ताप. सकाळी झोपेतून जागेच होता येईना इतका थकवा. सेम अवस्था नवर्‍याची सुद्धा. नवीन नोकरीमध्येच फार सुट्ट्या नकोत म्हणून तो कसाबसा कामावर गेला. मी मात्र अख्खा दिवस झोपूनच. जेमतेम घरातली काही कामं केली, स्वयंपाक म्हणायला काय खिचडीभात केला. 

सगळं अंग गळून गेलं होतं. संध्याकाळी तो घरी आला तोसुद्धा तापानं फणफणलेला. शेजारणीला हाक मारून सांगितलं की आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. कुणाकडे जाऊ? तिनं बाजारामध्ये असलेल्या एका डॉक्टरचा पत्ता सांगितला. मी आणि सतिश दोघंही तोपर्यंत अक्षरश: झोकांड्या जावेत इतके तापाने फणफणलेले होतो. चालत कसेबसे डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत गेलो, तिथं रीसेप्शन काऊंटवर एक अत्यंत अजागळ, घाणेरडी आणि उर्मट बाई बसली होती. वय साधारण पन्नाशीच्या पुढ्चं. आम्ही दोघं तिला सांगत होतो की खूप ताप आहे, बस्ण्याची सुद्धा ताकद नाहीये वगैरे. ती वस्सकन तमिळमध्ये आमच्यावर ओरडली. काय ओरडली ते शब्दश: समजलं नाही तरी टोकन घ्या आणी गप्प बसा, नंबर आला की आत सोडू हे असावं. अजून  वीसेक नंबर शिल्लक होते. शेजारी उभा असलेला पेशंट म्हणाला “और एक घंटा लगेंगा”. मला पाच मिनीटं उभं रहावत नव्हतं. जमलं तर लवकर नंबर लाव नाहीतर आम्ही घरी जातो, तासाभरानं परत येऊ तेव्हा लगेच नंबर दे असं त्या रीसेप्शनिस्टला सांगायचा प्रयत्न केल्यावर ती परत एकदा डबल वस्सकन ओरडली. तेही इतक्या जोरात की अर्धा दवाखाना आमच्याकडे वळून बघायला लागला.



दवाखान्यात लोकं गंमत म्हणून येत नाहीत काहीतरी त्रास होत असतो म्हणून आलेले असतात, त्यातही जर उशीर होत असेल तर नंतरचा नंबर देणं अथवा उशीरा यायला सांगणं हे त्या रिसेप्शनिस्टच्या कामामध्ये येत नाही का? त्याक्षणी बाहेर बसलेल्या पेशंटवर नजर टाकली तर बहुतेक पेशंट हे गरीब, मजूर आणि अशिक्षित असे दिसले. जर ही बया आमच्यासारख्या सुशिक्षित दिसणार्‍या लोकांसोबत बोलताना इतक्या घाणेरड्या टोनमध्ये बोलत असेल तर या बिचार्‍या पेशंटशी कशी बोलत असेल... काही पेशंट्स जमीनीवर बसले होते, त्यांना मुद्दाम तिथं बसायला सांगितलं होतं.. का ते कारण सांगायची गरज आहे का? एकंदरीत वातावरण खूप वाईट होतं.


मी, नवरा दोघंही तापानं आजारी होतो... तेव्हा बोलवागायचं सौजन्य तरी किमान दाखवणं इतकी चूक असते का? अगदी चकचकीत मेकप केलेली रीसेप्शनिस्ट नको. पण किमान स्वच्छ साडीनेसलेली, केस विंचरलेली आणी तोंडात पानपरागचा तोबरा भरलेली तरी नकोच. हे सर्व बघून नवरा मला म्हणाला, चल इथून. परत या दवाखान्यात यायला नको.


मघाशी ज्या शेजारणीला डॉक्टरणीचा पत्ता विचारला ती आमच्या पाठोपाठ दवाखान्यात आली, आम्ही व्यवस्थित पोचलो की नाही बघायला!!! आमची अवस्था बघून आणि इतकी गर्दी बघून ती म्हणाली की इथं एक नवीन दुसरी डॉक्टर आली आहे तिच्याकडे जाऊया का?



ही दुसरी डॉक्टरीण बाई अगदी नुकती महिन्याभरापूर्वी आली होती म्हणे. तिच्याकडे काहीही गर्दी नव्हती. तिनं तपासलं आणि एक दोन औषधं लिहून दिली. इंजेक्शन तर दिलंच. घरी आलो आणि जे काय होतं ते खाऊन झोपलो. रात्रीतून सुनिधीलादेखील ताप भरला. दुसर्‍या दिवशी नवरा ऑफिसला जाण्याच्या स्थितीमध्येच नव्हता. परत डॉक्टरीण बाईकडे गेलो. म्हणाली बहुतेक कावीळ आहे, ब्लड टेस्ट करावी लागेल. एका अतिशय जुनाट  लॅबचा पत्ता दिला. (लॅब इतकी जुनाट होती की तिथे त्या माणसानं ब्लड रीपोर्ट टाईपरायटवर टाईप केला. टाईपरायटर!! आठवला का? कीबोर्डसारखाच दिसतो पण जरा मॊठा असतो!! त्याच्यावर!!) कावीळ नव्हती. पण डॉक्टरीण बाई म्हणे, गडबड आहे आपण लगेच परत ब्लड टेस्ट करू. त्याच लॅबमध्ये. हे काय गौडबंगाल आहे कळेना. गेले तीन दिवस ताप जराही कमी झाला नव्हता. अंग दुखत होतं भरीसभर उलट्या चालू होत्याच. सुनिधीला ताप आला होता म्हणून बाईला म्हटलं पेडीयाट्रीशीअन रेकमेंड कर. तर म्हणे, मीच औषधं लिहून देते. कशाला हवा पेडीयाट्रीशीअन?


मला आता एकंदरीत डॉक्टरीण बाई बोगस वाटू लागली होती. त्याच दिवशी कामवालीने बॉम्ब टाकला, तुमच्याकडे काम करायला जमणार नाही. माझे पैसे द्या, मी उद्यापासून येणार नाही. हे राम!! ऊठाले रे बावा!! म्हणायची वेळ आली.


संध्याकाळी परत त्याच डॉक्टरकडे गेले तर म्हणे, तुला खूप अशक्तपणा आलाय, सलाईन लावते. म्हटलं आधी ताप तर उतरूदेत. त्यासाठी औषधं दे. तर म्हणे आता परत ब्लड टेस्ट करू. मगच औषधं देऊ.


आजारपणामुळे आमच्या दोघांचं विचार करण्याचं यंत्रच बंद झाल्यासरखं वाटत होतं. तरीही ओळखीच्या दोन डॉक्टरांना शेवटी फोन केला. ते म्हणाले असे बारा बारा तासांनी रक्त तपासायची गरज नाही. दुसरा डॉक्टर बघा. आम्हाला काहीही समजेना. बाईला एकूणातच निदान होत नाहीय हे लक्षात आलं होतं. दिवसाभरात या डॉक्टरकडे चार चकरा मारल्या होत्या. या वाटेवर जिथे आमची गल्ली संपत होती तिथे एक भलामोठा बंगला होता. त्याच्या गेटवर नावांच्या दोन पाट्या होत्या. एक ऍडव्होकेटची आणि एक डॉक्टरची. माझा अंदाज होता की बाबा  वकील आणि मुलगा डॉक्टर. पण बंगल्यावर कुठेही दवाखान्याची पाटी दिसत नव्हती. म्हण्जे हा केवळ रीसीडेन्शियल बंगला होता, अशावेळी घरामध्ये जाऊन डायरेक्ट विचारणार कसं की डॉक्टर आम्हाला तपासतील का?  शिवाय गेटवर लिहिलंय केवळ डॉक्टर, पीएचडीवाला डॉक्टर असला तर कुठं आपलंच हसं करून घ्या. आज दिवसाभरातून दोन तीनदा या रस्त्यावरून फिरताना चौकशी करावी का असं मनात येऊन गेलं पण ओळख ना पाळख असताना कसं कुणाच्या घरात शिरणार...


तरी मी म्हटलं  आपण घरात जाऊन विचारू. किमान या दोन अतरंगी बायांव्यतीरीक्त इतर कुठल्या डॉक्टरांचं क्लिनिक जवळपास कुठे असेल तर त्याचा पत्ता विचारू.. तीन दिवसांत जीवाला जरासुद्धा आराम पडलेला नव्हता. शेवटी मीच त्या बंगल्याचं गेट उघडून आत गेले आणि तिसर्‍या सेकंदाला लगेच बाहेर पडले. कारण, एक भलं मॊठं कुत्रं.



आता मी भीत तर शैतानालासुद्धा नाही. पण कुत्रं इज अ डिफ़रंट गेम अल्टूगेदर. रस्त्यावरून जाताना दूर कुठे जरी कुत्रं  भुंकायला लागलं की माझी बोबडी वळते. इथं तर कोल्ह्यासारखं दिसणारं कुत्रं भ्वाक भ्वाक भुंकत होतं. तापामुळे खूप अशक्तपणा आलाय असं जे काय वाटलं होतं ते या कुत्र्यामुळे दूर झालं इतक्या सुसाट वेगानं मी गेटबाहेर आले. सुदैवाने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून एक आजोबा बाहेर आले. तोवर आम्ही रस्त्यावरच उभे. मग काय हवंय कसं हवंय नवीन आलोय ताप आलाय डॉक्टर आहेत का? असा एक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. मध्येमध्ये कुत्र्याचे भुंकणे बॅकग्राऊंड म्युझिकला. बोलताना समजलं की हे आजोबाच डॉक्टर (मेडीकलवाले) आहेत; त्यांचा मुलगा वकील आहे. त्यांनी आम्हाला घरात बोलावलं (कुत्रं नीट बांधलं आहे ना याची दोनतीनदा चौकशी करून) आम्ही आत गेलो. त्यांचा दवाखाना गावाच्या दुसर्‍या टोकाला होता, पण तरी त्यांनी आम्हाला पाहून औषधं लिहून दिली, आणि म्हणाले. “कावीळ वगैरे काही नाही. तुम्हाला इथलं पाणी सहन होत नाहीये. मी माझं मेडीकल मंगळूरला केलंय त्यामुळे मला माहित आहे तिथल्या पाण्याची क्वालीटी. तुम्ही आर ओ वॉटर प्युरीफ़ायर बसवून घ्या, लगेच आराम मिळेल”  हे मात्र खरंय, मंगळूरचं पाणी अतिशय गोड आणि चांगल्या प्रतीचं. आम्ही तिथं असताना केवळ लेकीसाठी उकळलेलं पाणी आणि आम्हाला साध्या फिल्टरचं पाणी, इतकंच पुरत होतं. त्या पाण्याला मुळातच तहान शमवणारी गोडसर चव होती. मद्रासचं पाणी कितीही प्यायलं तरी तहान भागल्यासारखी वाटायचीच नाही. त्यामुळे वॉटर पुरीफायर ही इथें चैन नसून अत्यावश्यक गरज होती.



डॉक्टरांकडून बाहेर पडत असताना त्यांच्या कंपाऊंडमध्ये एक बाई अंगण झाडत होती. तिला इंग्लिशमधूनच विचारलं. “इथं कामाला आहेस का? आमच्याकडे काम करशील का?”
ती म्हणाली उद्यापासून येईन. अशा रीतीने पैसा वगैरे काहीही न बोलता काय काम करायचं हेही न ठरवता दुसर्‍या दिवसापासून सेल्व्ही आमच्याकडे कामाला येऊ लागली. मला या तिरपागड्या गावामध्ये स्थिर करायचं बरंचसं काम सेल्व्हीनं केलं. सेल्व्हीमुळे मला थोडंफार तमिळ  येऊ लागलं.  तमिळ पदार्थ आणि सणवार वगैरे समजत गेले.


सेल्वी धर्मानं ख्रिश्चन. पण तिला आमच्या दारात रांगोळी घातली जात नाही हे बिल्कुल सहन व्हायचं नाही. तिचा आणि माझा संवाद फार मजेशीर व्हायचा. ती तमिळमधून बोलायची, मी इंग्लिश आणि कानडीमधून. एकदा तिनं माझ्याकडं रांगोळी मागितली. मी तिला “बासमती चालेल?” असं विचारून पेलाभर तांदूळ दिला. तिनं कपाळावर हात मारून घेतला. (एफ वाय आय: तमिळमध्ये रांगोळीला कोलम म्हणतात. कोलम जातीच्या तांदळाचा इथं काहीही संबंध नाही) शेवटी तिनंच कुठूनतरी डबाभर रांगोळी आणली आणि रोज अंगण झाडून झाल्यावर पाणी मारून तिथं छानशी रांगोळी काढू लागली. बहुसंख्य तमिळ बायकांचं सकाळचं हे लाडकं काम असतं दारासमोरचं अंगण झाडून  पाणी मारून त्यावर रांगोळी काढायची. बहुतेकदा ही रांगोळी आपल्यासारखी ठिपक्यांची वगैरे नसते तर भौमितीक पॅटर्न्सनी सलग काढत गेलेली असते. ही सर्पाकृती, वेलीसारखे दिसणारे डीझाईन्स दिसायला खूप छान असतात आणि काढायला (सवय जमली की) फार चटकन होणारे असतात.



डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी ताप आटोक्यात आला, शिवाय लगेचच वॉटर प्युरीफायर बसवून घेतल्यामुळे आजवर पाण्यापासून काही त्रास झालेला नाही. डॉक्टरांना आम्हाला वारंवार यायला सांगून पैसे उकळणं सहज् शक्य होतं, तरीही त्यांनी एकाच फटक्यात योग्य निदान करून उपचार सुचवले त्याबद्दल आजही त्यांचे आभार मनापासून मानावेसे वाटतात. जगात देव आहे की नाही यावरून चिक्कार वाद घातला जाऊ शकतो. पण या जगामध्ये देवदूत आहेत हे मात्र नक्की.


राहिली ती आधीची डॉक्टरीण बाई. तर ती बोगस आहे हा माझा अंदाज दोन तीन महिन्यांतच बरोबर ठरला. ती कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे काम करत होती आणि तिथून सोडून आमच्या गावात दवाखाना थाटायला बघत होती. गरीबगुरीब लोकांना फसवणे हा तिचा मुख्य उद्देश. आमच्यासारखे यडे बकरे मिळालेत तरी चालेलच की. सुदैवानं कुणीतरी तिच्याविरूद्ध तक्रार केली आणि मग ती गाशा गुंडाळून पळून गेली असं ऐकलंय.



आमचा हा गाव मुख्यत्वेकरून कामगार लोकांचा गाव. जवळच असणारं मनाली पूर्णपणे इंडस्ट्रीअल भाग शिवाय याच गावापासून जवळ अशोक लेलॅंड, एन्नोर पोर्ट, थर्मल पॉवर प्लान्ट असे मोठेमोठे प्रोजेक्ट्स आहेत. या सर्व ठिकाणी काम करणारी लोकं इथे राहतात. (त्यात आमची म्हणजे कट्टुपल्ली शिपयार्डची नुकतीच भर पडली) पंचवीस तीस वर्षापूर्वी चेन्नईचं एक्स्टेन्शन म्हणून सरकारने हा भाग डेव्हलप करायला सुरूवात केली. इथे प्लॉट्स पाडून जमीनी विकल्या गेल्या. त्यावेळी बस-ट्रेन वगैरेची कनेक्टीव्हीटी मिळेल वगैरे बरेच प्लान्स होते. पण ते नंतर काही कामी आले नाहीत. परिणामी हे गाव सॅटेलाईट टाऊन म्हणून अजिबात विकसित झालं नाही. त्याकाळी बर्‍याच कामगारांनी स्वस्तात जमीनी घेऊन इथे घरं बांधली होती, हळूहळू सरकारचा इंटरेस्ट कमी झाला आणि इथला विकास अर्धवटच राहून गेला. पण त्यादरम्यान गावाला  विजेची, पाण्याची आणि रस्ते वगैरे सोयी चांगल्या मिळाल्या होत्या. (रस्त्यांची नंतर वाट लागली. आता परत सुधारले जात आहेत.) योजनाबद्ध रीतीनं गाव वसवलेलं असल्याने गाव अतिशय आटोपशीर आहे. नीट पाडलेले ब्लॉक्स आहेत. शाळा बांधल्या गेल्या आहेत. गावामध्ये मोठमोठी प्रचंड झाडं लावलेली आहेत. जरी एकेकाळी बहुसंख्य वस्ती कामगारांची असली तरी आता मात्र गावामध्ये इतरही बरेच लोक राहत आहेत. आजूबाजूच्या खेड्यांपेक्षा या गावामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे. तीन चार चांगल्या शाळा आहेत, परिणामी स्थलांतर करून येणारे मजूर इथं भाड्यानं राहण्याचं प्रमाणही जास्त आहे. इथे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन खोल्या एक्स्ट्रा काढून ते भाड्यानं द्यायची पद्धत आहे. दूरवरून आलेल्या गरीब मजूरांना (हे जास्तकरून युपी, बिहार, ओरिसा आणि आंध्रमधून येतात) नाडणारे लोकंही मग आपसूकच जास्त आहेत. वरच्या बोगस डॉक्टरणीचं तर केवळ एक उदाहरण, अशीच काही उदाहरणं नंतरही दिसलीच. नवीन ठिकाणी आल्यानंतर माझ्यासारखी शिकली सवरलेली बाई जर इतकी भांबावू शकत असेल तर शाळेचं कधीही तोंडही न पाहिलेल्या आजवर युपी बिहारच्या त्या गावामध्ये असताना कधीही बाहेरदेखील न पडलेल्या मुली जेव्हा नवर्‍याबरोबर इथं येतात तेव्हा त्या किती भांबावून जात असतील?


मी इथं राहून आता बर्‍यापैकी रूळल्यानंतर काही बायका मदतीसाठी माझ्याकडे येतात – ही नवीन भाडेकरू आलीये, हिला काही समजत नाहीये काय म्हणतेय ते जरा सांगा. मग मी त्या नवभाडेकरणीचं हिंदी समजून घेऊन ( आपली हिंदीची झेप ही बॉलीवूडी हिंदीपर्यंतच आहे!! तरीही हल्ली युपी बिहारी आणि छत्तीसगढची हिंदी हे वेगवेगळे भाषेचे प्रकार आहेत हे समजायला लागलंय) मला ते या तमिळ बायकांना तमीळमध्ये समजवायचं असतं. अशावेळी आपण शाळेत संस्कृत घेतलं होतं, आपण बरेच हिंदी पिक्चर पाहिलेत, आणि आपलं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, आणि आपली मातृभाषा कानडी आहे याचा जो काय सणसणीत उपयोग होतो त्याबद्दल नंतर सविस्तर कधीतरी!!!



काही तमिळ बायका मला अजूनही हिंदीअम्मा म्हणतात. मी मराठी आहे असं सांगून काही उपयोग होत नाही. आपण नाही का सर्रास सर्व दाक्षिणात्यांना “मद्रासी” म्हणत. मग त्यांनी सर्व नॉर्थलाच एका तागडीत तोललं तर आपण का चिडावं?


पण आता मद्रासमध्ये येऊन महिना झाला होता. इतके दिवस मनाली न्यु टाऊनच्या खेड्यामध्ये ऍडजस्ट करण्यामध्येच गेले होते. पण अजून अख्खं मद्रास आपली वाट बघतंय. पुढच्या लेखापासून मद्रास भटकंती चालू!!