Monday 18 December 2017

हंपी (कथा)


"अस्मि, ऊठ. पोचलो आपण" विवानने मला उठवलं. झोपेतून जागी झालेच नव्हते मी, कसेबसे डोळे उघडले. "अ.... झोपू..देना" मी परत सीटवर मान टेकवली.
"ए स्वीटू. जागी हो ना. हे बघ,मी खाली उतरतोय.  आपण बूक केलेलं हॉटेल हेच आहे का ते बघून येतो. रूम्स वगैरे पण चेक करतो."
मी तरी डोळे चोळतच होते. "किती वाजलेत?" मी त्याला विचारलं, बाहेर काळामिट्ट काळोख होता. आजूबाजूला गाव वगैरे तर काही दिसत नव्हतं. भर रस्त्यात गाडी थांबवल्यासारखी वाटत होती. त्याला इथं हॉटेल नक्की कुठं दिसलं होतं कुणास ठाऊक.
"साडेतीन वाजलेत!! मी ण ड्राईव करून थकलोय, रूमवर जऊन झोपू निवांत. तू जागी झालीस ना? मी जाऊ का?"
मी मुश्किलीनी डोळे पूर्ण उघडले. "लवकर ये. मी जागी आहे अता" जांभई देत मी कसंबसं म्हटलं.
"ओके, पण मी आल्याशिवाय कुणाला कारचं दार वगैरे उघडू नकोस."
मी सीटवर नीट बसून, हातानेच केस सावरत म्हटलं . "नाही, बाबा, लवकर जाऊन ये. टक्क जागी झालेय!"
माझ्या गालावरून हात फिरवून तो हसला आणि कारमधून बाहेर पडला. तो बाहेर पडल्यावर मला त्या बाजूला एक लॉजची इमारत छोटी दिसली. पण तिथले बरेचसे लाईट्स बंद होते. अगदी पॅसेजमधला एक बल्ब तेवढा मिणमिण चालू दिसत होता. मी एसी बंद केला आणि माझ्या बाजूची खिडकी खाली केली. पहाटेचा गार वारा एकदम आत आला. डोळ्यावरची झोपेची झापडं थोडी गेल्यासारखी वाटली त्या वार्‍याने.  पलिकडच्या अंधारामधे मी मुद्दाम डोळे फाडून बघत होते. आठवणींच्या कप्प्यामधे एकतरी आठवण ओळखीची निघते का... चांदण्यामधे दूरवर उभे असलेले ते चित्रचिचित्र आकराचे डोंगर सोडल्यास काहीही  दिसत नव्हतं. आणि मीपण एवढ्या अंधारामधे आणि तेही इतक्या वर्षानंतर नक्की काय शोधत होते कुणास ठाऊक.
पाचेक मिनीटांनी विवान परत आला.
"हेच आहे हॉटेल आणि रूम्स पण ओके आहेत. क्लीन आहेत, त्यामुळे आपण आता इथे उतरू आणि मग नंतर बघू." म्हणत त्यानं गाडी स्टार्ट केली. "पार्किंगमधे गाडी आपल्यालाच लावावी लागेल. लगेज राहूदे गाडीतच, फक्त माझी सॅक घेऊ.. बाकीचं उद्या सकाळी.. " अचानक त्याचं लक्ष मी उघडलेल्या खिडकीकडे गेलं. "खिडकी कशाला उघडलीस??" त्याने वैतागून विचारलं.
"एसीच्या हवेपेक्षा बाहेरची हवा किती मस्त आहे बघ.... "
"यु आर इम्पॉसिबल, रात्रीचे तीन वाजलेत मॅडम आणि हे आपलं पुणे नव्हे, हंपी आहे!!" त्याने मला कोपर्‍यापासून हात जोडत म्हटलं. मी नुसतीच हसले.
विवान आज दिवसभर ड्राईव्ह करत होता, त्याला ट्रेननं जाऊया असं मी एकदोनदा म्हट्लंपण  होतं. पण यावेळेला त्याला गाडी घेऊनच यायचं होतं. त्याचं आणि माझं लग्न झाल्यापासून माझी त्याच्या नातेवाईकांना  भेटायची ही पहिलीच वेळ. आमचं रजिस्टर लग्न. त्यामुळे टिपिकल तमिळ लग्नांसारखा गर्दीगोंधळ, देणंघेणं ,जेवणावळी वगैरेभपका नव्हता. आम्ही परस्पर पुण्या ध्ये अचानक रजिस्टर लग्न केलं हे जेव्हा त्याच्या नातेवाईकांना समजलं तेव्हापासून ते सर्व नाराजच होते- खास करून त्याचे बाबा. एक तर समाजाबाहेरची मुलगी केली, ती पण माझ्यासारखी, आणि असं कुणालाही न सांगता. त्यातही इतर काही नातेवाईकांनी एवढं मनाला लावून घेतलं नाही, मेलमधून, फोनमधून त्यांचे संपर्क चालू होते. पण गेली दीडेक वर्षे  विवानची आणि त्याच्या आईवडलांची मात्र बोलाचाली बंद होती. लग्नानंतर सहा महिन्यातच त्याची आजी गेल्यावर पण आमचं गावी जाणं शक्य झालं नव्हतं. म्हणून अगदी मुद्दामून ठरवून यावेळेला आम्ही तिच्या वर्षश्राद्धाला इथे आलो होतो. श्राद्धापेक्षाही जमलंच तर विवानचा स्वत:च्या आईवडलांशी पुन्हा संवाद चालू होतो का ते पण बघायचं होतंच. त्याचं इतर सर्व भले मोठे कुटुंब येणार असल्याने त्याच्या आईवडलांची कुणीतरी समजूत काढली असती, आणि इतक्या दिवसांची नाराजी कमी झाली असती.
परवा विवानच्या आज्जीचं हंपीला वर्ष श्राद्ध.. हंपी. माझ्यासाठी असलेली आठवणींची शिदोरी. तो जेव्हा श्राद्धाला जाऊया म्हणायला लागला तेव्हा किती वेळा मनात आलं त्याला सांगावं नको म्हणून. जगात दुसरीकडे कुठेही घेऊन चल. पण हंपीला नको... पण हे त्याला सांगता आलंच नाही. गेली अडीच वर्षं तो मला सांभाळतोय. एक दिवस त्याने कधी मला दुखवलं नाही. त्याचे घरचे त्याचा फोनदेखील घेत नाहीत, पण त्यानं एकदाही तक्रार केली नाही. त्याच्या घरच्या आठवणी कधी त्याने मला सांगितल्या नाहीत. वर्षभरापूर्वी त्याची आज्जी गेल्याचा फोन आला तेव्हा मात्र तो खूप रडला होता. त्याला आज्जीला बघायला जायचं होतं.... त्यामुळे वर्षश्राधाला जाऊ असं त्याने म्हटल्यावर मला नाही म्हणता आलंच नाही.
विवान जर माझ्या आयुष्यात आला नसता तर माझं आयुष्य नक्की काय झालं असतं? त्याला माझ्यासारखीच कुणीतरी नक्कीच भेटली असती, पण मला त्याच्यासारखं कुणी भेटलं असतं कामेकॅनिकल इंजीनीअर हे त्याचं प्रोफेशन झालं पण त्याच्या स्वभाव मात्र नर्सिंगचा. खूप काळजी घ्यायची, खूप समजूतदारपणे वागायचं. कमालीचा शांतपणा आणि ऋजूपणा मुळातच त्याच्याकडे. मी मात्र त्याच्या अगदी विरूद्ध, सतत चिडचिड, वैताग आणि नैराश्य. आयुष्याने दु:खंच असली दिली होती... मी तरी काय करणार... मीच माझी मला ओळखून येत  नव्हते इतकी बदलले होते पण त्यानं ओळखलं मला. अक्षरशः निराशेच्या गर्तेतून मला परत ओढून आणलं. पुन्हा जगायला शिकवलं. त्याच्यासाठी मी काय केलं तर जाणते अजाणतेपणाने का होइना त्याचं घर कुटुंब त्याच्यापासून तोडलं. आणि आता जेव्हा त्याला या सर्वांना भेटायचं होतं तेव्हा मला माझ्या दु:खाची आठवण त्याला करून द्यावीशी वाटली नाही.....
दुपारी पुणं सोडलं खरं पण जसाजसा रस्ता कापला जायला लागला तसंतसं मेंदूमधल्या स्मृती नागिणीच्या पिल्लांसारख्या वळवळायला लागल्या. हुबळी सोडल्यावर तर सगळा रस्ताच ओळखीचा वाटायला लागला, वाटलं क्षणभरात कुठूनतरी बाईक येइल आणि बाईकवर बसलेला सुयोग माझ्याकडे बघून हसेल. नेहमी हसायचा तसा गालातल्या गालात. डोळे बंद करून बसले तरी नजरेसमोरचा त्याचा चेहरा हालेना. विवानने माझ्या आवडीची गाणी सीडीप्लेयरमधे लावली होती. ती गाणी पण मी बंद केली. आणि मुद्दाम त्याला त्याच्या  घरच्या लोकांविषयी, नातेवाईकांविषयी काहीबाही विचारत बसले. त्याचा स्वभाव तसा एकलकोंडाच. मुळातच तो फ़ार कमी बोलायचा, पण त्याच्या आज्जीविषयी आठवणी मात्र फ़ार उत्साहात सांगत होता. त्याच्या बोलण्याकडे माझं फ़ारसं लक्ष नव्हतं मात्र त्याच्या बोलण्यामध्ये  स्वतःला हरवून टाकत सुयोगचा चेहरा डोक्यातून बाजूला काढत राहीले. कायम करते तसंच.
रूमवर येऊन ड्रेस वगैरे पण न बदलता आम्ही बेडवर पडलो.. विवानच्या सर्व कुटुंबीयांनी याच भागामधल्या लॉजेसमधे रूम्स बूक केलेल्या होत्या. त्या सर्वांची भेट आता उद्या सकाळी झाली असती. भेट नक्की कशी झाली असती कुणास ठाऊक... आता मात्र त्या कशाच काहीही विचार न करता आम्ही झोपून गेलो. इथे येइपर्यंत माझ्या मनामधल्या विचारांना विश्रांती नव्हती. विवान जरी येण्यासाठी उत्साही असला तरी माझं मन मानत नव्हतं.
अगदी घराबाहेर पडून कार चालू केली तरी माझ्या मनामधे खळबळ चालूच होती.
विवान. तुझ्या फॅमिलीला अशा वाईट वेळी भेटणं... इज इट अ गूड आयडीया?” मी शेवटी पुन्हा एकदा त्याला विचारलं. दर वेळेला तो “सर्व ठिक होइल गं” एवढंच उत्तर द्यायचा.
“वाईट वेळी म्हणजे?"
"हे असं वर्षश्राद्ध वगैरे... नवीन सुनेला बघायच्या..... भेटायच्या मूडमधे कुणी नक्कीच नसेल ना.
तो हसला. "कुणी सांगितलं तुला? माझे दोन्ही कलकत्त्याचे काका आणि त्यांची फॅमिली येतेय ना ते फक्त तुला भेटायला म्हणूनच. जेव्हापासून मी सर्वांना सांगितलं की मी येतोय हंपीला तेव्हापासून सगळेच खूप एक्साईटेड आहेत.... जे झालं गेलं ते त्यांनी ऑलरेडी बाजूला ठेवलंय. इन फॅक्ट जाह्नवीअक्काने बसून माझ्या अम्माची चांगली खरडपट्टी काढली म्हणे, इतके दिवस माझ्याशी का बोलत नाही म्हणून. आणि वाईट वेळ वगैरे असं काही नसतं. उद्याचं श्राद्ध काही फार सिरीयस वगैरे नाही.माझी आज्जी वयाच्या ९२व्या वर्षी गेली. जाताना कसला त्रास नाही; काही नाही. नंतर सर्व व्यवस्थित झालं. सगळ्या मुलांच्या स्वप्नात येऊन तिने सांगितलं की बाबांनो सुखाने गेले मी पुढे. आता माझं काही राहिलं नाही..... त्यामुळे उद्याचं वर्षश्राद्ध ही फक्त एक फॉर्मॅलिटी. डोन्ट वरी. सगळं नीट होइल”
“पण तरी मला भिती वाटत राहते. तुला तिथे कुणी काही म्हटलं तर..शिवाय माझ्यासाठी भाषेचा पण प्रॉब्लेम आहेच की.”
"इतकी वर्षं ओळखतो आपण एकमेकांना, कधी भाषेचा प्रॉब्लेम आलाय का?  आणि आमच्याकडे सर्व भाषा बोलणारे लोक आहेत, आपण ना हंपीमधे मस्तपैकी फिरायला जाऊ. प्रचंड बघण्यासारखं आहे इथे... तुला तर फिरायला खूप आवडतं ना? मला एकदा सुयो..…........." बोलता बोलता विवान गप्प झाला. पुढचं वाक्य तो न बोलतादेखील मला समजलं.
मी त्याच्या हातावर हात ठेवला.. दोन क्षण आम्ही दोघंही काही बोललो नाही. मग लगेच आवाजामधे उसना उत्साह आणत तो म्हणाला.
"हंपीमधे आसपास तर पायी पण फिरता येइल... आम्ही लहानपणी खूप फिरायचो. मला तर गाईडची पण गरज नाही, मीच फिरवेन तुला"
"लहानपणी म्हणजे? किती वेळा गेलास तू तिथे?"
"मी तुला सांगितलं नाही का स्वीटू? आमच्या घरामध्ये सर्वांचे शेवटचे दिवस श्राद्ध, वगैरे इथे हंपीत करायची पद्धत आहे. कशामुळे ते मलाही माहित नाही. पण आजोबा सांगायचे की आमची फॅमिली मूळची हंपीमधलीच आहे म्हणून. पाच सहा पिढ्यामागे आम्ही तिकडे गेलो. अ‍ॅक्चुअली, तमिळ ब्राह्मणांमधे पण वर्षश्राद्धाची अशी पद्धत नाही. त्यांची वेगळीच पद्धत असते. पण आमच्या घरामधे तरी असंच चालू आहे. ते हिस्ट्री वगैरे मला काही माहित नाही, पण नात्यामध्ये कुणीही वर गेलं की मग आमची हंपी ट्रिप व्हायचीच... मग काय दिवसभर हुंदडा इकडे तिकडे... "
मी हसले. "आमच्या घरात असं कधी काय व्हायचंच नाही. नानांचा विश्वास नव्हता, म्हणून आईने पण कधी काही केलं नाही..."
"तुमची फॅमिली साईझ अगदी छोटीच आहे, आमच्यासारखं नाही. माझ्या आजोबांना सात भाऊ आणि चार बहिणी. माझ्या डॅडला सहा बहिणी आणि तीन भाऊ. दहाजण भावंडं. मग त्यांच्या बायका-नवरे, मग त्यांची मुलं, मग त्यांची लग्नं झाली. आम्ही लहानपणी कधी एकत्र जमलो ना तर शंभरेक माणसं घरचीच व्हायची.. त्यात माझे डॅड सर्वात लहान. मी जन्मलो ना तेव्हा माझ्या सर्वात मोठ्या काकांच्या मुलीचं लग्न होऊन तिला मुलगी पण झाली होती.उद्या बघच तू, वैष्णवी नाव आहे तिचं. रीलेशनमध्ये मी तिचा काका... पण ती आता दोन मुलांची अम्मा आहे, अशी सगळी फॅमिली मिळून तीस जणं तरी असणारच..वडोदर्याचे काकापण येतात म्हणाले काल.त्यांच्या जुळ्या मुली आहेत"
“बापरे, तुझ्या घरातले लोक कुठे कुठे सेटल झालेत.?”
जिथं नोकरी मिळेल तिकडं. आधीच्या पिढीत ऑल ओव्हर इंडिया, आणि आता तर जगभरात सगळीकडे. यु एसचे दोन कझिन्सपण आलेत. भेटतील उद्या.”
“ग्लोबल फॅमिली”
विवान हसला. त्याच्या दिलखुलास गप्पांनी मघाशी आलेलं क्षणभराचं मळभ दूर झाल्यासारखं वाटलं. तरीपण इथे हंपीमधे येऊन सुयोगच्या आठवणी आणि विवानच्या कुटुंबाला भेटणे अशा दोन लढाया होत्याच माझ्यासाठी.
मला सकाळी जाग आली तेव्हा साडेसात वाजत आले होते. विवान अजून गाढ झोपेत होता. त्याच्या केसांतून हलकेच हात फिरवला आणि मी उठून रूमच्या बाल्कनीचा दरवाजा उघडला. समोर दूरवर पसरलेली हंपी दिसत होती. एकेकाळची अतिशय वैभवसंपन्न असलेली ही नगरी आणि आता नुसत्या उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष म्हणून वावरणारी नगरी. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेले भले मोठे लाल मोतिया रंगाचे ते खडक. त्या खडकांच्या अधूनमधून उभी असणारी, कधी कोसळणारी आणि कुठेकुठे ढिगारे बनलेली मंदिरं. सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणांनी ही मंदिरं उजळून निघणार, दिवसभर  उन्हामधे तेजाणारी ही मंदिरं संध्याकाळी पुन्हा एकदा रात्री काळोखामधे गूडुप्प  होणार. जगालाच काय पण स्वतःलाच दिसणार नाही अशा अनोळखी काळोखात..... आता मात्र पूर्ण हंपी नवीन दिवसासाठी ताजीतवानी झालेली होती. जगभरातून पर्यटक येणार आणि या भग्नावशेषांमधून सौंदर्य शोधायला बघणार... नक्की काय सौंदर्य असतं या मोडक्या पडलेल्या वास्तूंमधे? मागच्या वेळेला सुयोगला मी हाच प्रश्न विचारला होता. कोरलेल्या शिल्पाकृती कधीच्याच विद्रूप झाल्या. देवांच्या मूर्ती तोडून झाल्या, मग आता या भकास गावामधे राहिलं काय? तेव्हाही उत्तर मिळालं नव्ह्तं. आजही मिळण्याची शक्यताच नव्हती.
माझं सर्व आवरून मी रूम सर्व्हीसला फोन करून ब्रेकफास्ट मागवला तरी विवान झोपेतच. हलकेच त्याच्या बाजूला मी पहुडले आणि त्याच्या गालावरून हात फिरवला.
"गूड मॉर्निंग" त्याची झोप चाळवली. डोळे किंचित उघडून माझ्याकडे बघत तो हसला. "ऊठणार आहेस का? की अजून  थोडावेळ झोपतोस?" मी विचारलं.
"किती वाजले?"
"आठ वाजले असतील... "
"आधी नाही का उठवायचं. लेट झाला.. " म्हणत तो डोळे चोळत उठला. "तुझा शॉवर वगैरे पण घेऊन झाला.." माझ्याकडे बघत तो म्हणाला.
"हो. आता लवकर ऊठ आणी कारमधून माझी बॅग घेऊन ये. कितीवेळ या हॉटेलच्या बाथरोबमधे बसू.."
"म्हणजे... फक्त बाथरोबच आहे अंगावर?.... " विवान माझ्याजवळ येत मिश्किलपणे म्हणाला....
"टाईमपास पुरे... आटप लवकर, तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घ्यायची थांबलेय. आज्जीच्या श्राद्धासाठी जायचंय ना आपल्याला?."
विवान बेडवरून उठून मझ्या ओठार ओठ टेकव हलक्या अवाजात म्हणाला, "साडेनऊ वाजता, तोपर्यंत वेळ आहेच की."
त्याला हातानेच दूर कर मी उठले. "विवान, टाईमपास पुरे हां आता. आज तुझ्या आज्जीचं श्राद्ध आहे.. शिवाय तुझे खंडीभर नातेवाईक येणार आहेत म्हणे. त्यांना भेटायचंय. टेन्शन येतंय मला..त्याचं काही नाही तुला?"
"त्यात टेन्शन कसलं? शिवाय इथे आलोय ते थोडंसं साईट सीइंगपण करून घेऊया. तू याआधी कधी आली होतीस का हंपीला?"
अं...." मला पटकन काय बोलायचं ते सुचेना..."कॉलेजमधे असताना एकदा आले होते." मी बोलून गेले.
पण लगेच मनाने आठवण करून दिलीच. कॉलेजमधे असताना नव्हे, बंगलोरला जॉब करत असताना आलो होतो, मी आणि सुयोग. तेव्हा दर आठवड्याला कुठेना कुठेतरी आम्ही फिरायला जायचो. कितीही काम असलं तरी वीकेंडची भटकंती ही ठरलेलीच. विवानला हे माहिती असणार.. न जाणो कधीतरी सुयोग त्याला बोललादेखील असेल. विवान आणि सुयोग कॉलेजमधले मित्र, अगदी घनिष्ट वगैरे नसला तरी ग्रुपमधलाच. पण विवान चुकूनही कधी सुयोगचा विषय काढायचा नाही, मी काढलाच तर लगेच विषय बदलायचा.
आता देखील तो माझ्या बाजूला येऊन बसला... "ठिक आहे ना” त्याच्या आवाजामध्ये खूप हळूवारपणा होता “तू  खूप दिवसांपूर्वी आली होतीस, मी पण खूपदा येउन गेलोय.पण आज तू आणि मी दोघं मिळून पहिल्यांदाच आलोय इथेतसं पण आपण लग्नानंतर कुठेच गेलो नाही फिरायला.... इथे फिरू दोन दिवस.. " विवानचा आवाज येत गेला तशी पुन्हा माझ्या काळजाला घरं पडात गेली.. वाटलं एकदा ओरडून त्याला विचारावं....
का? विवान का? का इतका समजूतदारपणे वागतोस? का दरवेळेला मला संभाळतोस? तुला माहिती आहे ना मी इथे सुयोगसोबत आले होते, मग विचार ना तसं..... बोल ना त्यावरून काहीतरी मला.... तू सुयोगचा मित्र. त्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तूच एकटा त्याच्यासोबत होतास. तो गेल्यानंतर पण मला सावरायला तूच आधार दिलास. तुझ्याशी लग्न करताना तुला चांगलं माहिती होतं ना... की सुयोगचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं ते... मग का दरवेळेला असा वागतोस? जणू काही तू आणि मी कुठल्याही सुयोग नावाच्या माणसाला ओळ्खतच नाही असं का वागतोस?पण यातलं काहीच बोलता आलं नाही.... कारण, हे मी त्याला कधीच म्हणू शकणार नाही.. कधीच नाही. मी स्वतः आतमधून कितीही जळत असले तरी त्याला जाणूनबुजून कधीच दुखवू शकणार नाही.
सुयोगच्या जाण्यानंतर त्या दिवशी विवान मला घरी भेटायला आला तेव्हा काय होते मी. एक जिवंत प्रेत. चारेक महिने नोकरी सोडून बसले होते. घराबाहेर जाउ दे, घराच्या बाल्कनीमध्ये पण जात नव्हते. तेव्हा तर माझ्या डोक्यामध्ये सतत काहीही करून स्वत:ला संपवण्याचेच विचार चालू होते. ज्या जगात सुयोग नाही तिथे राहून तरी काय करणार होते मी. पण त्या दिवशी संध्याकाळी विवान माझ्या घरी आला, कसल्याश्या गाण्याची सीडी मागायच्या निमित्ताने. त्याला बघताच मला फ़क्त एकच गोष्ट आठवत राहिली. सुयोगाचा अपघात झाला तिथे सर्वात आधी विवान पोचला होता. सुयोगला हॉस्पिटलमध्ये नेताना तो ऎम्ब्युलन्समध्ये होता. विवानला त्या दिवशी पाहिलं, आणि डोळ्यासमोर फक्त सुयोग येत राहिला. त्याचं घरात आलेलं सुद्धा सहन झालं नव्हतं मला. कधी एकदा निघून जाईल असंझालं होतं मला. पण तरीही त्यानंतर रोज विवान येतच गेला. कधी निमित्त असायचं तर कधी सहजच यायचा. आला की प्रचंड गप्पा टप्पा. कॉलेजमध्ये असताना तो खूप शांत प्राणी होता.पण मला भेटायला आल्यावर मात्र खूप भरभरून बोलायचा. पण चुकूनदेखील कधी सुयोगचा विषय काढायचा नाही. मला त्याचं येणं सुरूवातीला अजिबात आवडायचं नाही. उलट आईनानांना मात्र  त्याचं येणं मुद्दाम माझ्यासाठी आवडत होतं.  हळूहळू मला पण त्याच्या नियमित येण्याची सवय पडत चालली होती. सुयोगच्या आठवणी थोड्यातरी धूसर होत गेल्या. त्याच्याच ओळखीने एका छोट्या कंपनीमध्ये जोब मिळाला. त्याच्याच सांगण्यावरून नानांनी मला एका चांगल्या सायकियाट्रेस्टला दाखवलं. डिप्रेशमधून हळू हळू बाहेर येत गेले.   सहासात महिन्यानंतर नानांना मात्र एकंदरीत या पूर्ण नात्याविषयी चिंता वाटू लागली... त्यांनी विवानला लग्नाबददल विचारलं. त्यानं होकार दिल्यावर  आईच्या आनंदासाठी मी लग्नाला तयार झाले,.....
“कॉफी मागवलीस का?” विवानने मला विचारलं तेव्हा मी भानावर आले. “हो, तिथे थर्मासमध्ये ठेवली आहे बघ.”
विवान कितीही पक्का मुंबईकर झालेला असला तरी सकाळी मात्र त्याला मद्रासी कॉफी हवीच. विवान मुळचा तमिळनाडूचा. पण त्याचे आईवडील मुंबईतच स्थायिक झाले होते. आई बॅंकेत नोकरीला होती आणि वडलांची सरकारी नोकरी. त्याच्या आईवडलांचं बोलणं बंद असलं तरी तो इथं  येणार हे त्यांना माहित होतंच. घरातल्या मोठ्यांशी बिनसलेलं असलं तरी काही भावंडांशी तो संपर्कामधे होताच. त्यापैकी काहीजण तर फ़ेसबूकवर माझ्यापण फ़्रेंड्स लिस्टमधे होते आणि आज मी त्यांना पहिल्यांदाच भेटणार होते.
"श्या.... साले काय नालायक लोक आहेत. इन्स्टंट कॉफी आहे ही" विवानने एक घोट घेताच लगेच कप खाली ठेवून दिला.
"एक काम कर, आवरून घे. मी ऑर्डर केलेली इडली पण गार झालीये. आपण खाली ब्रेकफास्टला जाऊ... तिथे फिल्टर कॉफीची ऑर्डर दे. पण त्याआधी जाऊन माझं सामान घेऊन ये पण" मी माझं हसू कसंबसं दाबत म्हटलं. विवान सहसा न चिडणारा, पण तमिळी अण्णाला सकाळी सकाळी इन्स्टंट कॉफी?
लगेज वर आणून सगळं व्यवस्थित रीत्या आवरून आम्ही ब्रेकफास्टला खाली लो तेव्हा नऊ वाजून गेले होते. हॉटेलात फिल्टर कॉफ़ी प्यायल्यावर विवानचं डोकं थोडं ताळ्यावर आलं असावं. तिथून आवरून गाडी हॉटेलमधेच ठेवून आम्ही विरूपाक्ष मंदिराकडे निघालो. याच मंदिराच्या आसपास कुठेतरी घाट होता.
घाटावर पोचण्याआधी चालता चलाता विवानने माझा हात हातात घेतला. “चालताना इकडे तिकडे बघू नकोस.
तो माझ्या कानात कुजबुजला. “का?” मी विचारलंच. “इथे बारावा तेरावा वगैरे अभ
द्र चालू असतं. तू नवी नवरी आहेस, म्हणून.” माझा चिडलेला चेहरा बघून तो लगेच म्हणाला, “असं मी म्ह्णत नाही. अम्माचा मेसेज आलाय.” म्हणत त्याने माझ्यासमोर त्याचा मोबाईल धरला. त्याच्या आईचे आणि त्याचे मेसेज देवाण घेवाण चालू झाली हे मला माहितच नव्हतं.
मी काही न बोलता गुपचूप चालत राहिले. नवी नवरी आणि मी? नवरी झालेच कधी होते? एका दुपारी मी विवान, त्याचे दोन मित्र आई आणि नाना एवढे मिळून लग्न रजीस्टर करून आलो. लग्नानंतर आठेक दिवस मी आईकडेच होते. नंतर आई-नाना स्वत: मला नेउन विवानच्या घरी घेउन गेले. माझी जायची खरंच इच्छा नव्हती. विवानच्या घरी गेल्यावर परक्यासारखं राहिले. मला हे लग्न करायचं नव्हतं हे प्रत्येक कृतीमधून विवानला दाखवत राहण्याचा माझा अट्टाहास.

“विवान, मला आज संध्याकाळी माझ्या घरी नेन सोड. इथे फार कंटाळा येतोय.” मी ऑफिसमधून आल्या आल्या स्पष्ट सांगितलं. तो बाल्कनीमध्ये पाठमोरा उभा होता. “मी तिथंच राहीन दोन दिवस. आईची पण तब्बेत ठीक नाही. तिला माझी गरज असेलच” माझ्या आवाजातला रूक्षपणा त्याच्यापर्यंत पोचला होता की ते माहित नाही.
विवानने हातातली सिगारेट विझवली. “परवाच तर घरी गेली होतीस ना?” माझ्याकडे न बघता तो म्हणाला.
“पण मला परत जायचंय. आईची आठवण येते. इथं कंटाळा येतो. इथून ऑफिसपण लांब आहे” मी परत तुटकपणे सांगितलं. लग्नाला अवघा महिना झाला होता. पण या महिन्याभरात मी सलग दोन दिवस पण त्याच्यासोबत राहिले नव्हते. सतत माझ्याच घरी जात होते. इतके दिवस विवान फक्त एक मित्र म्हणून घरी येत-जात होता, आता त्याला नवरा हे लेबल लागल होतं. सगळ्या नात्यात अवघड असं हे नातं. प्रत्येक नात्याला कुठेतरी मर्यादा असतात,पण या नात्याला कुठेच मर्यादा नसतात. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक कसल्याच मर्यादा नसलेलं हे नातं.निभवायचं तरी कसं?
“ठीक आहे. आवरून घे. जेवण झाल्यावर जाउया” तो म्हणाला.
“आईला फोन केला होता मी. ती जेवायला माझी वाट बघतेय.
“मी पण इथे स्वयंपाक केलाय. तुझ्या आईइतका चांगला नसेल झाला हे ठाउक आहे. तरी आता ते सगळं वाया कोण घालवणार? इथे जेव आणि मग जा. वीकेंडनंतर मी न्यायला येईन.”
विवान नवरा म्हणून चांगलाच होता, पण विवानचा आणि माझा हा “संसार” बघताना मला सुयोगची तीव्र आठवण यायची. हे मी कधीच त्याला सांगितलं नव्हतं. उगाच त्याला अजून कशाला दुखवा... लग्नाचा निर्णय मला मनापासूपटलेलाच नव्हता, रजिस्टर लग्न ही नानांची आयडीया, त्यात विवानचं घरच्यांशी झालेले भांडण. कुठंतरी माझं आयुष्य माझं राहिलच नव्हतं. इतके दिवस माझ्या आयुष्याचे निर्णय माझे मीच घेत होते, सुयोगच्या जाण्याने मात्र उन्मळून पडले होते. कुठेतरी स्वत:चाच स्वत:शी विश्वास हरवून बसले होते. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींमधे कुठेतरी तो कंट्रोल पुन्हा ठेवायचा प्रयत्न करत होते.
“न्यायला यायची गरज नाही” मी माझी बॅग भरत सांगितलं.“मी येईन बसने नाहीतर रिक्षेने. असं कितीसं अंतर आहे?  मला थून फक्त तू नेउन सोड..” कधी परत येणार याचा उल्लेख मुदाम टाळत सांगितलं.तो काहीच बोलला नाही. बाल्कनीत उभा राहून माझ्याकडे फ़क्त बघत होता.
“अस्मि,” थोड्या वेळाने विवान बेडरूममध्ये येत म्हणाला. “एक रिक्वेस्ट करू?प्लीज आज नको जाउस ना. तू गेलीस की मी इथे एकटा वैतागतो. तुला आधार द्यायला तुझे आईवडील आहेत... मला तर तो रस्ता पण बंद आहे. प्लीज नको जाउस. हा एक वीकेंड... प्लीज.
त्या दिवशी मी घरी गेलेच नाही. आईला फोन करून येत नाही म्हणून सांगितलं. विवान आणि मी पूर्ण शनिवार रविवार एकत्र होतो. सिनेमा बघितला, बाहेर जेवायला गेलो. डीव्हीडीवर टॉम एंड जेरीची कार्टून्स पाहिली. त्या रविवारी पाहिल्यांदा मी त्या किचनमध्ये स्वैपाक केला.विवान पूर्ण वेळ माझ्या आजूबाजूला होता, पण चुकुनदेखील स्वत:हून माझ्याशी बोलायचा नाही. मी काही विचारलं तर तेवढ्यापुरतं उत्तर. जणू माझ्या आजूबाजूला तो असून नसल्यासारखा.आणि माझ्या मनामधे मात्र सुयोगच्या आठवणीच आठवणी. आज इथे असता सुयोग तर..... पण आज इथे सुयोग नव्हता, विवान होता. या सर्वांमध्ये खरंतर त्याची चूक काहीच नव्हती, पण तरी शिक्षा मात्र त्यालाच होती. मधेच केव्हातरी त्याच्या निरागसतेवर, त्याच्या भाबड्या प्रेमावर मी कुठेतरी मनातून भाळत असल्याचं मलादेखील समजत होतं, पण माझं मन सतत मला ताळ्यावर आणत रहयाचं. मला सतत सुयोगची आठवण करून द्यायचं. “माझं प्रेम सुयोगवर आहे आणि सुयोगवरच राहिल”
“पायर्‍या बघ खाली स्वीटू” विवानने माझ्या दंडाला धरत म्हटलं. मी आणि विवान घाटावर पोचलो होतो. हंपी मधल्या विरूपाक्ष मंदिराच्या जवळून वाहणार्‍या तुंगभद्रा नदी किनार्‍यावरचा हा घाट. सुयोग आणि मी आलो होतो तेव्हा त्याला इथे नक्की काय चाललंय हे बघायची फार उत्सुकता होती, पण तेव्हा मीच त्याला इथे येऊ दिलं नव्हतं. बघण्यासारखी इतकी ठिकाणं असताना हेच काय बघायचं म्हणत. माझंच ते वाक्य आता आठवून पटकन कसंतरी झालं मला. समोरची तुंगभद्रा नदी स्वत:च्याच नादाने वाहात होती. कशाचीच आणि कुणाचीच पर्वा नसल्यासारखी. पूर्ण काठावर छोटे छोटे दगडी मंडप घालून ठेवले होते. कदाचित हे मंडप पण जुन्या ऐतिहासिक काळातले असावेत. किंवा विजयनगरचे साम्राज्य उधळल्यानंतर लोकांनी हे मंडप उभारून साईड बिझनेस म्हणून हे श्राद्धकर्म चालू केलं असावं. वैभवाने लखलखणारं शहर उजाड झाल्यावर तिथे अजून कुठला व्यवसाय चालणार? कणाकणाने बांधलेलं साम्राज्य जेव्हा मणामणाने कोसळतं तेव्हा तिथे सतत मृत्यूची छाया फ़िरत राहील नाहीतर काय?  अक्षय्यतेचा आशीर्वाद घेउन उभ्या राहिलेल्या या घरांना, देवळांना, या भूमीला कधी हा असा उध्वस्तेचा शाप लागला असेल?

सकाळचे नऊ पण वाजले नव्हते पण ऊन मात्र रणरणत होतं. थं मराठी, तेलुगु, तमिळ, कानडी असे बरेचसे लोक दिसत होते, विधी सांगणारे भटजीदेखील त्या त्या भाषेमधून सांगतात, असं विवान म्हणाला होता. तो आजूबाजूला बघत कुणाला तरी शोधत होता. तेवढ्यात उजवीकडच्या एका मंडपातून खणीत हाक ऐकू आली. “विवान!!! कम हीअर” विवान त्या हाकेकडे बघून हसला आणि हातउंचावून “हेलो” म्हणूनओरडला. हंपीच्या घाटावरचा हा मंडप सर्वात मोठा असणार. किमान पन्नास साठ लोक तिथे सहज बसले होते. विवानच्या आवाजाने त्यातले निम्मे लोक उठून उभे राहिले होते. विवान धावत तिकडे निघाला.. त्याच्यापाठोपाठ मी पण निघाले. त्यानं धावत जाउन त्याच्या आईला मिठी मारली होती. त्याची आई आणि बाबा हे फक्त मला ओळखू आले, ते पण फोटोत पाहिलेले असल्यामुळे. बाकीच्या लोकांपैकी कुणीच ओळखीचे वाटेना. तो सगळ्यांशी हसून बोलत होता. तेपण सुपरफास्ट तमिळमध्ये. त्यामुळे मला काही समजणं शक्य नव्हत.  मी मागेच अवघडून उभी होते. तेवढ्यात दुसर्‍या कुणाचं नाही पण विवानच्या आईचं लक्ष माझ्याकडे गेलं. “अस्मि का?”
मी हसून त्यांना हातानेच नमस्कार केला. नंतर वाटलं वाकून नमस्कार करायला हवा होता.
“ये ना. बस इथे” त्यांनी मला त्यांच्या बाजूला बसवून घेतलं.आम्ही दोघी ऑलमोस्ट मंडपाच्या एका कोपर्‍यात बसलो होतो. विवानचं माझ्याकडे बहुधा लक्षच नसावं. तो आमच्यापासून पुष्कळ लांब बसला होता. कुणाकुणाशी आणि कितीतरी बोलू असं त्याला झालं असावं. इतका खुश मी त्याला आजवर कधी पाहिलं नव्हतं. प्लीज, विधी खतम होने को बस पंधरा मिनिट. फिर आपका फ्यामिली गेट टूगेदर करना” तिथे बसलेल्या भटजीने दोन तीनदा ऐकवलं तरी कुणाचं लक्षच नव्हतं. शेवटी सगळ्यात वयस्कर दिसणारे एक गृहस्थ उठून उभे राहीले. चांगल्या मोठ्या आवाजात त्यांनी तमिळमधून सर्वाना गप्प बसायची ऑर्डर दिली. त्यांचा आवाज ऐकून क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात विवान माझ्याकडे बघून हसला आणि खुणेनेच त्याने मला “ओके?” असं विचारलं. हसून मी त्याला “सगळं ठीक आहे” एवढं सांगितलं. भटजींनी परत मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मग लगेच बसलेल्यांनी हळू आवाजात इकडेतिकडे गप्पा मारायला सुरुवात केली.
“काय मुलं आहेत ही. इथे काय चालू आहे आणि गप्पा मारताहेत. पण आता जास्त वेळ नाही, विधी संपतच आलेत. मग जेवणाच्या वेळेपर्यंत निवांत. रात्री आलात ना तुम्ही?” विवानची आई माझ्याकडे बघून म्हणाली. “हो, पहाटे तीनला पोचलो” पुढे काय बोलायचं ते न सुचल्याने शांत बसून राहिले. खरं तर माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. लक्ष होतं ते समोर चाललेल्या एका विधीकडे. माझ्या बरोबर समोरच्या छोट्या मंडपामध्ये एक छोटेसे कुटुंब बसलेले होते..सगळ्यांच्या चेहर्‍यावर दु:ख. अकरा बारा वर्षाच्या त्या दोन्ही मुली तिथं भांबावून बसल्या होत्या.तिच्या बाजूलाच बसलेले एक पन्नाशीतले गृहस्थ. आणि त्यांच्या अगदी कोपर्‍यात बसलेली एक तिशीमधली बाई. तिचे डोळे कोरडेक्क होते. पण तिची नजर माझ्या खूप खूप ओळखीची होती..त्या नजरेमधे असलेला एकच प्रश्न “असा कसा तू सोडून गेलास मला? माझा विचार पण केला नाहीस का जाताना?” आयुष्याची सगळीच स्वप्नं एका क्षणात चक्काचूर झाल्यावर तशी बनते नजर. पण तिच्या बाजूला बसलेली पन्नाशीमधली  एक बाई.. कधीपासून रडत होती कुणास ठाउक.
 “हे बघा काकू. तुम्ही रडू नका. जितकं रडाल तितका जीव इथे घुटमळत राहिल. जाऊ द्या पुढे त्याला. जे काय झालं ते होऊन गेलं. आता काय बदलता थोडीच येणार आहे?” तिथे बसलेले भटजी त्या काकूंना कानडीमिश्रित मराठीमधे म्हणाले. त्या काकूंनी पदराने डोळे पुसले. “एकुलता एक होता हो मला... आता या वयात कसं भोगावं?” त्या कशाबशा म्हणाल्या. “अहो, म्हणूनच तर हे विधी करायचे ना. याचा फ़ायदा फक्त गेलेल्या जीवाला होत नाही. आपल्याला पण होतोच की. आपण पण त्यातून शांत होतोच की. सावरा आता स्वत:ला. नातींकडे बघा, सुनेकडे बघा. त्यांना आता तुमच्या आधाराची जास्त गरज.” हे ऐकताना त्या सुनेला हुंदका फ़ुटला. इतका वेळ कष्टाने रोखून धरलेले अश्रू आता मोकळे झाले.
“आज इथले सर्व विधी संपले. हे पिंडदान झालं की इथला जीव पुढे गेला. आता त्याला सतत बोलावू नका. त्याला त्याचा पुढचा रस्ता धरू द्या. त्याची वाट मोठी बिकट आहे. शिवाय तिथे एकटा आहे तो. त्याला त्रास होइल असं वागू नका. तुमच्या रडण्याने त्याला वाटेत अडथळे येतील..” मी भान हरपल्यासारखी त्या माणसाचं बोलणं ऐकत होते. किती मृदुपणे आणि प्रेमाने तो त्या म्हातार्‍या बाईला समजावत होता. “येणंजाणं सर्व त्या वरच्या मर्जीनुसार. त्यात आपण काही हस्त़क्षेप करू शकत नाही, पण जोवर माणूस आहे तोवर त्याच्यासाठी हे जग आहे. एकदा का तो इथून गेला, की मग त्याचा मार्ग वेगळा, आपला वेगळा” समोरचं विधींसाठी ठेवलेले सामान आवरत ते म्हणाले “तो आज इथे असता तर... त्याने काय केलं असतं, तो कसा वागला असता याला आता काही महत्त्व उरत नाही. महत्त्व राहतं ते पाठीमागे राहिलेल्या माण्सांचं. जीवनाची दशाच अशी असते हो.”
“जाणारा जातो, आणि पाठीमागे आमच्यसारखे आठवणींचे भुंगे ठेवून जातो” सोबत असलेले ते काका प्रचंड थकलेल्या आवाजात म्हणले. ते भटजी हसले, “नाही हो. जाणारा जाताना पण तसलेच आठवणींचे भुंगे घेऊन जातो. तुटता तुटत नाही ही मायेची नशा. सतत पाठी यायला बघतो. त्या आत्म्याचा जीव अड्कलेला असतो इथे. पण पुढे तर जावंच लागतं ना. म्हणून तर हे सर्व विधी करून आपण त्याला पुढे जाऊ द्यायचं. जितकी त्याची आठवण काढणार, तितका त्याचा पाय अडकत जाणार. हे खरं की एखादा माणूस गेला की आपलं आयुष्य कधी तसंच राहत नाही. त्यामधे पोकळी तर निर्माण होतेच, पण त्या पोकळीतच आपण आपलं अख्खं आयुष्य बसवायला गेलो ना. कि सगळाच घोळ होतो बघा. जाणार्‍याच्या दु:खापेक्षा आहे त्याचं सुख मोठं मानायचं” त्या भटजीनी छोट्या मुलीच्या गालावरून हात फ़िरवला, “आता तुम्हाला जगणं शिकायलाच हवं. आता तो इथे कधीच असणार नाही या सत्याला कायमचं स्विकारून. त्याची आपल्याला गरज नाही असंच मानायचं आता” शेवटचं वाक्य म्हणता म्हणता त्यांनी त्या काकांच्या खांद्यावर हात ठेवला.
“अस्मि,” विवानच्या आवाजाने मी भानावर आले. “चल, निघू या?”
आमच्या मंडपामधील सर्व विधी बहुतेक आटोपले असावेत. बहुतेक जण उठून निघाले होते. त्यापैकी काहीजण माझ्याचकडे बघत होते. “सगळ्यांना भेटायचंय तुला... उठ” म्हणत विवानने माझा हात धरला. मी कशीबशी उठले. माझ्या डोळ्यांतून नकळत कधी पाणी यायला लागलं तेच मला माहित नव्हतं. विवान माझी अवस्था बघून गोंधळला होता. “काय झालं?” त्यानं अगदी हळू आवाजात मला विचारलं.
मी काही नाही म्हणून मान हलवली. डोळ्यातलं पाणी पुसलं. पण अचानक खूप जोरात रडू आलं. विवानला समोर बघताच..... त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी हमसून हमसून रडायला लागले. “अस्मि, आर यु ओके?” त्यानं विचारलं आणि लगेच तमिळमधून त्याच्या आईवडलांना काहीतरी सांगितलं. आणि मला म्हणाला “चल, रूमवर जाऊ” मला घट्ट धरत तो म्हणाला. त्याचे सर्व नातेवाईक माझ्याकडे बघत होते, एक दोघांन्नी विवानला काहीतरी विचारलं पण काहीतरी उत्तर देऊन तो पुढे आला.
हॉटेलवर येण्यासाठी त्याने एक रिक्षा ठरवली, मोठ्या कष्टाने मी डोळ्यातलं पाणी पुसलं. रूमवर आल्यावर मात्र माझा बांध पुन्हा कोसळला. नक्की कशासाठी रडत होते मी? सुयोगच्या आठवणींनी? सुयोगच्या जाण्याने? त्याच्या आठवणींनी? की तो गेल्यानंतर मी त्याच्याशी केलेल्या प्रतारणेनी?
विवान माझ्या बाजूला शांत बसून होता. “अस्मि, रडू नकोस प्लीज” माझ्या केसांतून हात फ़िरवत तो म्हणत राहिला, कितीतरी वेळाने उठून मी डोळ्यातलं पाणी पुसलं. “विवान, आय ऎम सॉरी”
“सॉरी कशाबद्दल?”
“तुझी फ़ॆमिली तुझी वाट बघत असेल. माझं हे असं वागणं..... दे विल हेट मी.”
“नोबडी इज हेटिंग यु, त्यांना माहित आहे तुझ्याबद्दल. अशा वातावरणात गेल्यावर तुझ्यावर काय परिणाम होइल हे ठाऊक आहे.... आणि त्यात काहीच चुकीचं नाही. त्यामुळे त्याबद्दल काळजी करू नकोस. इन फॅक्ट अम्माने आता फोन करून विचारलंय, तू कशी आहेस म्हणून... चला, आज सकाळपासून अम्मा किमान फोनवर बोलायला लागली.”
“विवान, कसं ते मला पण नाही माहित. कारण, सुयोगचं त्याच्या आईवडलांनी हे असं काहीच केलं नव्हतं. त्यांचा विश्वास नाही अशा गोष्टींवर. माझा पण विश्वास नाही, पण तरी आज मला अचानक तिथं असं वाटलं की सुयोग माझ्या आजूबाजूला आहे. मला काहीतरी सांगतोय. हा भास तर मला कायम होतच असतो पण मला आज त्या घाटावर असं मनापासून वाटलं त्याचं अस्तित्व माझ्या आयुष्यात नकोय. तो का जात नाही? गेलेला माणूस कधीही परत येत नाही हे पूर्ण ठाऊक आहे मला. पण तरी.........”
“अस्मि, जास्त चिंता करू नकोस. होतं असं कित्येकदा, आपल्याच मनाचे खेळ आस्तात. उठ आता, आवरून घे. जेवायची वेळ झाली की आपण जाऊ आता.”
“मी परत तिथेच नाही येणार विवान..”
“वेडाबाई आहेस का? घाटावर नाही जायचं आपल्याला आता. ज्यांच्याकडे श्राद्द्ध करवून घेतलं ना, त्यांच्याकडे असते जेवणाची सोय. तू माझ्यासोबत चल. प्रसाद म्हणून थोडंसं खा. आणि रूमवर येऊन आराम कर. नंतर संध्याकाळी आपण सर्वांना भेटू. तुझी ओळख करून घ्यायची आहे सर्वांना. ठिक आहे?”
“नको विवान. मला आता खरंच कुठे नाही जायचं. तू जा एकटा. मी गोळी घेऊन झोपते. काल रात्रीचं जागरण पण आहे.”
“हे बघ, मी तुला इथे रूमवर एकटं ठेवून कुठंही जाणार नाही. आता सकाळचे साडेदहा वाजलेत. एकच्या सुमाराला जेवायला जायचं आहे. तोपर्यंत आराम कर. गोळी वगैरे घ्यायची गरज नाही. तुला किती वेळा सांगितलंय की झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून रहायचं नाही म्हणून. मी आहे ना इथे? चहा घेतेस का थोडा? बरं वाटेल मग तुला?” तो अगदी शांतपणे मला म्हणाला. “माझंच चुकलं. तुला त्रास होइल हे माझ्या जरासुद्धा लक्षात आलं नाही. सॉरी.”
“तुझ्या घरचे अजून नाराज झाले असतील ना?”
“परत तिथेच कॅसेट अडकली का? कुणीही नाराज झालेले नाही. तू आराम कर. मी चहाची ऑर्डर देऊन येतो” म्हणून तो रूमबाहेर गेला.
डोळे मिटून मी शांत पडून राहिले. नक्की काय बिनसलं होतं हे माझं मला माहित होतं. पण ते आता त्याला सांगण्यात काही अर्थ नव्हता. तो स्वत:हून चुकूनही सुयोगचा विषय काढायचा नाही, आणि मी जर चुकूनमाकून बोललेच तरी त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा.  आताही त्यानं तेच केलं होतं.
विवानसोबत लग्न होऊन चार महिने झाले होते. सुरूवातीला त्याच्यासोबत एक विचित्रसा अवघडलेपणा होता, तो आता जरा कुठे कमी झाला होता. पण तरी विवानची नजर माझ्यावरच खिळलेली आहे हे सतत जाणवायचं मला. त्याच्या नजरेतली आशादेखील मला समजत होती. हल्ली अधूनमधून होणारे त्याचे सूचक स्पर्श पण ल़क्षात यायचे, पण तरी मनामधे सतत सुयोगचा विचार येत रहायचा. सुयोग आणि मी एकत्र होतो ते क्षण मनामध्ये रूंजी घालत रहायचे. त्यानंतर दुसर्‍या  कोणाबरोबर तरी ते सर्व.... कल्पनासुद्धा असह्य व्हायची. पण त्याच वेळेला विवानची इच्छादेखील समजायची, काय चूक होती त्याची अपेक्षा?
कायद्याने लग्न केलं होतं माझ्यासोबत त्याने. मी  त्याची पत्नी होते. पती म्हणून त्याचा अधिकार होता, हे सगळं पटायचं. मी सुयोगला विसरू शकत नव्हते, पण मग विवानची यात काय चूक? त्यानं का संन्यासासारखं रहावं माझ्यासोबत.  पण तरी मनामधे मात्र सतत सुयोगच्या स्मृतींचा गुंतवळा.. झोपेच्या गोळ्या बंद करण्यासाठी विवान मला वारंवार विनवत होता, पण मला त्यांचाच एक आधार होता. रोज रात्री तो यायच्या आधी मी गोळी घेऊन झोपून जायचे. तो येऊन एकटाच जेवायचा आणि माझ्या बाजूला येऊन झोपायचा. पहाटे तो उठायच्या आत मी उठून सर्व आवरून सकाळी लवकर ऑफ़िसला निघूनपण जायचे. पण हे असं किती दिवस चालणार?  विवानला आता नक्की काय हवंय ते मला स्पष्ट समजत होतं. सेक्स माझ्यादृष्टीने काही अगदी “सोवळ्यातली” संकल्पना नव्हती. पण विवानसोबत सेक्स म्हणजे एका तर्‍हेनं मी स्वत:हून त्याच्या आणि माझ्या नात्यावर शिक्कामोर्तब करणं असं माझं मन मला सांगत होत. जणू काही मी असलं काही केलं असतं तर तो सुयोगशीच धोका ठरला असता. मनाला आवर घालणं फ़ार सोपं असतं. पण शरीराचं पण एक वेगळंच मन असतं..... जितकी मी विवानपासून लांब रहायला बघायचे, तितकीच त्याच्याकडे ओढली पण जात होते. मनाने नाही, पण शरीराच्याच ओढीने..
“अस्मि, चहा घे” विवानच्या हाकेनं मी भानावर आले.
“नको विवान. चहा नको. खरंच काही नको. मी पडते थोडावेळ”
“जितका वेळ एकटी राहशील तितका अजून त्रास होइल. बाहेर येतेस का? फ़िरायला म्हणून. इथेच आसपास जाऊ कुठेतरी. नाहीतर माझे सर्व नातेवाईक इथे जवळच्या हॉटेलमधे उतरलेत. तिथं जाऊया का? बरं वाटेल तुला सर्वांसोबत गप्पा वगैरे मारताना”
“नको विवान. खरंच नको” मी डोळे मिटूनच उत्तर दिलं.
“ठिक आहे. ऍज यु विश.....” म्हणत विवान बाल्कनीमधे गेला. त्याचा आवाज दुखावलेला होता, त्याला त्याच्या कुटुंबियांना भेटायचं होतं, ते पण इतक्या दिवसांनी. आणि इथे इतक्या लांब येऊनसुद्धा त्याला माझी काळजी करणे हेच प्रमुख कर्तव्य करावं लागत होतं. कसंबसं स्वत:लाच समजावलं आणि पाचेक मिनिटांनी मीउठले, बाथरूममधे जाऊन तोंड धुवून आले. “चल जाऊया?” मी त्याला विचारलं.
“कुठे?” हातातली सिगरेट माझ्यापासून लपवत तो म्हणाला.
“तुझ्या नातेवाईकांना भेटायला. मघाशी म्हणालास ना?”
“तुला जायचं असेल तरच जाऊ या, उगाच ऑब्लिगेशन समजून येऊ नकोस”
“विवान, आपण इथे हंपीला आलो तेच मुळात तुझ्या आईवडलांच्यात आणि तुझ्यामधला दुरावा मिटवण्यासाठी. शिवाय तू म्हणतोस तसं इथे बसून मला अजूनच त्रास होइल.  थोडी बाहेर फ़िरले तर मला पण बरं वाटेल.” मी त्याला हसत सांगितलं. “फ़क्त तुझ्या आईची मात्र मला अजूनही भिती आहे. काही बोलणार तरी नाहीत ना त्या मला?”
त्यानं माझ्या कपाळावर ओठ टेकवले. “डोन्ट वरी, मी आहे तुझ्यासोबत. चल. आणि घाबरायचंच असेल तर माझ्या डॅडना घाबर. ते अजून माझ्याशी एक वाक्य पण बोलले नाहीयेत. शिवाय त्यांना मराठीपण येत नाही..” तो हसत म्हणाला.
विवानच्या बहुतेक सर्व नातेवाईकांनी जवळच्याच एका लॉजमधे रूम्स बूक केलेल्या होत्या. आतापण सगळेजण तिथेच बसून गप्पा मारत होते. तिथे आम्ही गेल्या गेल्या दोघीजणी माझ्याकडे धावत आल्या. “क्या अस्मि? हमारे मामाको लेके किदर गायब हो गयी थे?” दोघी दिसायला एकसारख्याच. वयाला वीस एकवीसच्या.
“ही संध्या आणि ही वंदना. माझ्या सगळ्यात मोठ्या काकाच्या जुळ्या नाती आहेत. और मेरेको मामा बोला ना, तो फ़िर कभी बात मत करना” विवान त्यांच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. यानंतर सगळ्या कुटुंबाची ओळखपरेड होइपर्यंतच एक तास गेला. तरी त्यातल्या कित्येकांचं विवानशी असलेलं नातं आणि त्यांची नावं मला किती समजली होती कुणास ठाऊक? सुदैवानं विवानची आई आणि इतर बर्‍या बायका देवळांत गेल्या होत्या, म्हणजे अजून त्यांच्या ओळखी व्हायच्या होत्या. पण बाकी, तमिळ, कानडी, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि अधूनमधून बंगाली आणि गुजराती भाषेमधे बोलणारं हे कुटुंब खरंच खूप मस्त होतं. विवान सर्वांशी अगदी दिलखुलासपणे बोलत होता, गप्पा मारत होता, चेष्टा मस्करी करत होता, पण तरी मला चांगलं माहित होतं की त्याचं माझ्यावर सतत लक्ष आहे, एक दोनदा त्याने येऊन “ठिक आहेस ना?” असं विचारूनपण घेतलं. सकाळपेक्षा आता मला खरंच खूप मोकळं वाटत होतं. एक खूप वयस्कर आज्जी होत्या. मघाशी भेटलेल्या संध्याने मला सांगितलं की या विवानच्या सर्वात मोठ्या काकू. आधीचा अनुभव लक्षात घेऊन मी आठवणीने त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी मला तमिळमधून काहीतरी विचारलं. संध्याने लगेच मला हिंदीमधे ट्रान्स्लेट करून सांगितलं. “विवान आपकेसाथ हॅपी तो है ना?”
“आप विवानसेही पूछ लो. मै क्या बोलू...” मी उत्तर दिलं. संध्या हसली. “विवानमामा कितने दिनोंसे हमको मिले नही ना.... बहोत सॅड लगता था... अभी आप एक बार हमारे घर वडोदरा आना” तेवढ्यात  त्या काकूनी तमिळमधून एक लांबलचक माळ सोडली, माझ्य चेहर्‍यावरचे भाव पाहून संध्या म्हणाली, “डोन्ट वरी, आची तुमको कुछः नही बोल रही है.. विवानकी अम्माको बोल रही है. बोलती है मराठी लोगों जैसा नाम रख्खा, मराठी लोगोमे उसको बडा किया, मराठी लोगोके स्कूल मे डाला, फ़िर मराठी लडकी से शादी किया तो इतना हंगामा किया वगैरा बोल रही है...ज्यादा ध्यान मत दो!!” तिनं हसत सांगितलं. मी काहीच बोलले नाही.
“ये सब ना विवान के पापा का गुस्सा था... अब कम हो गया...अभी आप फ़िकर मत करो. एव्हेरीथिंग इज ओके. विवान की अम्मा वैसे बहुत अच्च्ही है...” संध्याची टकळी चालूच राहिली. 
दुपारी जेवायला साडेबारा वाजता आम्ही त्या भटजींच्या घरी गेलो. घर म्हणायला ते रहात होते म्हणून, अन्यथा तिथे या अशा दिवसासाठी आणि श्राद्धासाठी बांधलेले हॉल्सच जास्त दिसत होते. जेवताना मात्र वातावरण थोडंफ़ार गंभीर होतं. विवानच्या काकू आणि आईला मधेच थोडं रडू पण आलं होतं. पण ते तेवढ्या वेळेसाठीच. गेलेला माणूस असा श्राद्धाच्या दिवशी परत येतो की नाही यावरच खरंतर माझा विश्वास नव्हता, पण एकंदरीत आज जर विवानची आज्जी खरोखर इथे आलेली असेल तर सुना-जावयांनी, नतवंड-पतवंडांनी भरलेलं आणि हसतं खेळतं घर बघून तिला काय आनंद झाला असता कोण जाणे. आपण गेल्यावर कुणालाही आपली आठवण नाही, कारण त्यांचं जीवन सुरळीत चालू आहे ही भावना चांगली की आपण गेल्यापासून सतत प्रत्येक क्षणाला आप्लीच आठवण काढून कुणीतरी रडतंय ही भावना चांगली. जर असाच सुयोग परत आला तर माझ्याकडे बघूनआता त्याला नक्की काय वाटलं असतं? या विचाराशी माझ्या हातातला घास तसाच राहिला.
विवान आणि माझ्या लग्नाचा फ़ार्स असाच चालू होता. विवानने माझ्याकडून कधीच काही अपेक्षा ठेवल्या नाहीत, म्हणूनही असेल पण मला प्रत्येक वेळेला हल्ली त्याला उलट उत्तर द्यायला अथवा त्याचा विरस करायला जमायचं नाही. मनातून कुठेतरी विवानचा साधेपणा, सहजपणा आवडायला लागला होता.
आणि कधीतरी एक दिवस असंच सहज रात्री आमच्या नात्यामधल्या सर्व भिंती कोसळून गेल्या. आधी सहज हात हातात घेतला, मग ओठ, मग शरीराने शरीराला मूक प्रतिसाद दिलेच. विवानच्या नाजुक हळूवार प्रेमाने मला जिंकून घेतलं. खर्‍या अर्थाने आम्ही पती पत्नी झालो. संसाराला आता काही अर्थ मिळाला, पण हे सगळं इतक्या साहजिकरीत्या घडलं नाही, हे मात्र खरं. मनामधे सतत कुठेतरी “तू सुयोगचा विश्वास्घात करतेस” हा अनाहत पुकारा सतत होत होता. अंगावरून फ़िरणारा हात विवानचा असला तरी स्पर्श जाणवायचा तो मात्र सुयोगचाच. एकीकडे विवानसोबतच्या आयुष्यामधे नवीन रंग भरले जात होते तर दुसरीकडे सुयोगच्या स्मृतींशी सतत लढा चालू होताच. त्या दिवशी. त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी, आजही अगदी आजच्या क्षणीदेखील.

“अस्मि, डायेटिंग पे हो क्या? कितना कम खा रहे हो?” आजूबाजूच्या पैकी कुणीतरी मला चिडवलं.
जेवणानंतर परत एक दोन काहीतरी छोटेसे विधी झाले आणि या वर्षश्राद्ध कार्यक्रमची सांगता झाली.
जेवणानंतर बहुतेक नातेवाईकांनी कुठेतरी फ़िरायला जायचं असं ठरवलं. मग हा पॉइन्ट, ते मंदिर, इकडे जाऊ तिकडे जाऊ वगैरे चर्चा करण्य़ामध्ये तास गेला, सर्वात शेवटी हंपीच्या त्या प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिराकडे जायचं ठरलं. मग तिथे जाईपर्यंत गाड्या कुठल्या, त्यामधे कोण कोण बसणार यावर परत चर्चा. मी शांत बसून हे सर्व ऐकत होते, या सर्वांमधे विवानचा उत्साह एकदम भारी होता. त्यानं त्याच्या गाडीमधून फ़क्त सीनीयर सीटीझन्सच येतील असं सांगितल्यानं मी संध्यासोबत त्यांच्या गाडीमधून त्या देवळाकडे गेलो. हंपीच्या इतर स्थळांपासून हे मंदिर जरा लांबच होतं.

मंदिरामधे पोचायलाच आम्हाला दुपार टळून गेली होती. उन्हं किंचित कललेली असताना हे एकाकी मंदिर दिसत मात्र सुंदर होतं. विवानच्या त्या चुलत-आते-मावस बहिणीपैकी कुणीतरी लगेच गाईडची भूमिका घेऊन मंदिराबद्दल माहिती द्यायला सुरूवात केली. कृष्णदेवरायाचं हे राज मंदिर होतं एकेकाळी. विठठल रुक्मिणीची इथली मूर्ती नेऊन पंढरपुरामधे स्थापन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध. त्यामुळे या देवळात देव नाही. नुसतं मंदिर. पण मूर्ती नसलेल्या वास्तुला मंदिर का म्हणावं मुळात? सर्व काही सुंदर, भव्य मंडप, सुंदर शिल्पं, मंडपामधे संगीत वाजवणारे खांब, पण या सर्व आराशीपुढे देवच नाही.
“हे मंदिर फ़ार सुनसान वाटतं ना?” मी माहिती देणार्‍या बाईंना विचारलं. मी काकू म्हणून हाक मारण्याइतक्या त्या मोठ्या होत्या, पण नक्की काय नातं आहे ते माहित नसल्यामुळे सरळ मॅडम म्हणायचं मी ठरवलं.
“कुठून बघतेस त्यावर अवलंबून आहे.” त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या. “इथून मंडपातून बघशील तर गाभार्‍यात देव नाही, म्हणून मंदिर सुनसान वाटेल. पण गाभार्‍यातून बाहेर बघशील तर ही सुंदर शिल्पं, ही आरास, ही नृत्यकला, ही संगीत हे सर्व जाणवेल. मग गाभार्‍यात काही नाही, हे लक्षात सुद्धा येणार नाही.”
“पण जिथं देव नाही.. त्याला मंदिर का म्हणावं?”
“देव सगळीकडेच असतो गं. आणि तसंही मंदिर फक्त देवामुळे बनत नाही, इथंच बघ ना, हे मंदिर किती दिवसांपासून रिकामं आहे. पण तरी लोक इथे येतातच ना... देवळातल्या देवापेक्षा आपल्याला देऊळ याच गोष्टीचं जास्त अप्रूप असतं नै.” त्या माझ्याकडे हसत म्हणाल्या.
“हो, पण तरी हे असं मोकळं....”
“तसं नसतं गं. गाभार्‍यात देव नाही म्हणून रडायचं की समोरच्या या शिल्पांमधलं सौंदर्य बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी... रडण्यामुळे त्या देवाच्या मूर्ती परत येणार आहेत का? त्या सुखाने दुसरीकडे कुठेतरी नांदताहेत, आपण तिथे नाही, आपण इथे आहोत. हंपीमधे. म्हणून आपण हे मंदिर बघायचं, इथला इतिहास अनुभवायचा. जिथे मूर्ती असतील तिथे नमस्कार पूजा वगैरे सोपस्कार करायचे. सिंपल.” गोड हसत त्या म्हणाल्या. “काय आहे याकडे जास्त बघावं, काय नाही त्याच्याबद्दल जास्त विचार करून काही फ़ायदा होतो का? कुणासाठी जगायचं हे एकदा मनाशी ठरवलं की मग अशी द्विधा अपरिस्थिती येत नाही”
काय बोलायचं तेच न सुचल्याने मी गप्प राहिले.
"काय स्वीटू? कसला विचार चाललाय?" विवान बाथरूममधून बाहेर येत म्हणाला. मी बेडवर डोळे मिटून शांत बसून होते. संध्याकाळभर प्रचंड फिरलो होतो. हंपीमध्ये फिरताना वेळ कसा जातो तेच कळत नाही.त्यात सोबत विवानचे तीस पस्तीस नातेवाईक. मला कित्येकांची नावंच मोठ्या मुश्किलीने ल़क्षात राहिली होती, तर त्यांचं आणि विवानचं नातं तर फ़ार लांबची गोष्ट. विवानची आई माझ्याशी जास्त बोलली नसली तरी किमान मला अपेक्षा होती तशी काही वाईट पण वागली नाही. इकडे तिकडे भटकून रस्त्यावरच खादाडी करून आम्ही आता कुठे रूमवर आलो होतो. त्यातून सकाळी घाटावरून आल्यापासून माझा मूड थोडासा ठिक पण नव्हता.
"काही नाही, असंच.."
"चालून पाय दुखले का?की उन्हात फिरून डोकं दुखलं? पेनकिलर घेतेस का? आधी जेवून घे.डिनर रूम सर्व्हिसने मागवू या." तो माझ्या बाजूला येउन बसत म्हणाला.
जेवण लगेच अगदी पान मिनिटात आलं.विवानचं पूर्ण कुटुंब जेवण्यासाठी कुठल्याशा हॉटेलात एकत्र भेटणार होतं. विवानने फोन करून येत नसल्याचं सांगून टाकलं. दुपारी त्या भटजींचा घरात मला जास्त जेवण गेलंच नव्ह्तं. डोळ्यासमोर सतत तो घाट आणि तिथे दिसणारे व्याकुळ चेहरेच नजरेसमोर फ़िरत होते. परत एकदा सुयोगची ती जीवघेणी आठवण माझ्या मागे फ़िरत होती.. आतापण जास्त जेवलेच नाही. सकाळी घाटावर आणि दुपारी त्या मंदिरामध्ये झालेलं बोलणं आठवून मनामधे खळबळ माजली होती.
"विवान, खरंच माणूस मेल्यानंतर असा कुठे जातो? पुढे जातो म्हणजे... आणि नसेल गेला तर तो असा आपल्या आठवणीत रेंगाळत राहतो का, आपण सतत त्या गेलेल्या माणसाचाच विचार का करत असतो? आपल्याला असं का वाटत राहत की आपल्या आजच्या वागण्याने त्या गेलेल्या माणसाला वाईट वाटेल... "
"आपण त्या विषयावर बोलू या नको, अस्मि." विवानने आमच्या जेवणाच्या प्लेट्स रूम बाहेर ठेवून दिल्या. "सकाळी पाचचा अलार्म लावतो. तुला उद्या डोक्यावरून अंघोळ करायची आहे ना? तेल लावून देऊ का केसांना?" विवान माझ्या बाजूला बसत म्हणाला.
"नको." मी तुटक शब्दांत उत्तर दिलं.
"अस्मि, अगं नको एवढा विचार करू... एव्हरीथिंग इज ओके. अम्मा डॅड दोघे खुश आहेत आपल्याबद्दल. डॅड काही बोलले नाहीत, पण थिंक अबाऊट इट, काही बोलले नाहीत इज अ गूड थिंग!!"
"नाही विवान. मी फक्त त्याच गोष्टीचा विचार नाही करत..." शेवटी मी खरं काय ते सांगितलं.. "सुयोगची फार आठवण येते रे... आय अ‍ॅम सॉरी..." मी डो़ळ्यातलं पाणी पुसत म्हटलं.
"सॉरी काय त्यात? तुम्ही दोघं एकदा इकडे आला होतात, ते माहित आहे मला., दिवसभर फिरताना तुला आठवण येणारच.." तो माझा हात हातात घेत म्हणाला. पहिल्यांदा मी सुयोगचा विषय काढल्यावर त्याने विषय बदलला नव्हता. "मला पण कधीकधी त्याची खूप आठवण येतेच की. गेलेल्या माणसाची आठवण येणं हा काही गुन्हा आहे का? भूतकाळावर कुणाचा कंट्रोल नसतो अस्मि.”
"पण त्या भूतकाळामुळे तुमच्या वर्तमानावर मात्र परिणाम होता असेल तर? विवान, मला कधीकधी लाज वाटते माझी... तू इतका चांगला आणि माझी इतकी काळजी घेणारा? मी काय केलं तुझ्यासाठी? तर आईवडील म्हणाले म्हणून तुझ्याशी लग्न केलं. आणि सतत सुयोगची आठवण मनामध्ये येत राहते.... येउ दे नको म्हटलं तरी. मनापासून कधीच तुझी झाले नाही, शिवाय तुझ्या घरच्यांना तुझ्यापासून तोडलं..." बोलता बोलता मला रडू आलं.
त्यानं मला जवळ घेतलं आणि माझ्या केसांतून हात फिरवत म्हनाला, "रडू नकोस. यात तुझी काही चूक नाही. मी लग्न करणार होतो हे घरी सांगितलंच नाही. माझी सगळ्यात मोठी चूक. समाजाबाहेरची मुलगी असल्याने अम्मा-डॅडी थोडाफार विरोध करतील असं मला वाटलं होत.. पण माझ्या न सांगता-सवरता लग्न केल्याने ते उलट जास्त दुखावले. आय होप, आता सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. डोन्ट वरी... सगळं काही नीट होईल" माझे डोळे पुसत तो म्हणाला.
"विवान, का लग्न केलंस तू माझ्याशी?" मी त्याला विचारलं.
"का म्हणजे? मला तू आवडायला लागली होतीस. तुझ्या नानांनी मला स्पष्ट सांगितलं की आमच्या मुलीला भेटायचं असेल, तिच्या आयुष्यात रहायचं असेल तर कमिटमेंट द्या. म्हणून लग्न केलं... तू होतीस ना तेव्हा तिथे. मग आता का विचारतेस हा प्रश्न?"
"मी तुला नक्की कधीपासून आवडायला लागले?"
" असं सांगता येतं का कधी कुणाला? अमुक तारखेला इतक्या वाजता तू मला आवडायला लागलीस म्हणून वगैरे. झोपूया आता. उद्या सकाळी लवकर उठायचंय" विवानने उशी सारखी केली आणि तो बेडवर पडला.
"विवान, प्लीज आजतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. दरवेळेला हा विषय बदलतोस तू... "
"काय उत्तर आहे या प्रश्नाचं? तुझ्या आईवडलांना तुझी काळजी होती, मला तू खूप आवडतेस. तुझ्यासारखी मुलगी मला हवी होती. शिकलेली, नोकरी करणारी वगैरे. म्हणून तुझ्याशी लग्न केलं. अजून काय हवय तुला.. आणि यामधे काय कॉप्लिकेटेड आहे?"
"कॉम्प्लिकेटेड हे आहे की मी सुयोगची गर्लफ्रेंड होते. पाच वर्ष आमचं प्रेम होतं, आणि तू सुयोगचा मित्र होतास. तो सुयोग आता या जगात नाही. बाईकच्या अ‍ॅक्सिडेन्टमधे तो गेला. त्यानंतर वर्षभराने आपण लग्न केलं. आणि जेव्हा केव्हा मी सुयोगचा विषय काढते तेव्हा तेव्हा तू तो विषय बदलतोस. आधी मला वाटायचं की कदाचित तुला ते आवडत नसेल- एक नवरा म्हणून.  पण तुझं एकंदरीत वागणं बघता तू ज्या पद्धतीने मला दरवेळेला सावरतोस-ते कारण नक्कीच नाही... मग सांग ना विवान... तुला तुझ्या गेलेल्या आज्जीबद्दल- आजोबांबद्दल तासनतास बोलायला आवडतं... पण सुयोगबद्दल एक शब्दपण नाही. असं का?" माझा आवाज भलताच चढलेला होता. “मला सुयोगची आठवण जरी आली तरी मी ती आठवण मनातून पुसून टाकायचा प्रयत्न करते. पण तेवढं सोपं पण नाही ना? तुझ्याशी बोलून मी माझं मन मोकळं पण नाही करू शकत. कारण दरवेळेला तू विषय बदलतोस. मला दुखवायचं नाही म्हणून तू सुयोगचं नाव पण घेत नाही. पण तुझ्या या सततच्या दुर्ल़क्ष करण्याने मला जास्त त्रास होतो... असं का?”
विवान बेडवरून उठून बाल्कनीत गेला. तिथे त्याने एक सिगरेट शिलगावली.
"विवान, स्मोक करू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे” मी उठून त्याच्या पाठी गेले. लॉजचीही बाजू पूर्ण मोकळी होती. बाहेरचांदणं पडलं होतं. आजूबाजूचं हंपी कालच्यासारखंच अंधाराची चादर गुंडाळून झोपलं होतं. जूबाजूची शांतता आता जाणवत होती.दिवसा अक्राळ- विक्राळ पसरलेले ते डोंगर रात्रीच्या अंधारामधे अजूनच भयाण दिसत होते.
"तुझ्या या दरवेळच्या शांततेने मला किती त्रास होतो हे माहित आहे का तुला?आय नो, की माझ्याशी लग्न तू करून तू माझ्यावर उपकार केलेस. दुसरं कुणी लग्न केलं नसतं माझ्याशी..... कारण मी सुयोगची झाली होते. बहुतेकांना माहित होतं ते. सुयोगच्या जाण्यानंतर डिप्रेशनमधे गेले होते... सगळं माहित आहे मला... समहाऊ आय ऑलवेज फील की मी तुझ्यासाठी सेकंड हँड माल आहे... म्हणून तुला सुयोगाविषयी बोलायला आवडत नाही का? सांग ना...."
"अस्मि, प्लीज शट अप" विवान माझ्याकडे वळून म्हणाला. हातातली सिगारेट त्याने विझवून दूर फेक्ळून दिली.त्याच्या डोळ्यांत अंगार फुलला होता. "उपका? पकार केले मी तुझ्यावर लग्न करून? आय अ‍ॅम सेल्फिश, डू यु नो दॅट? त्या दिवशी दीपकच्या पार्टीवरून घरी परतताना जेव्हा सुयोगचा अ‍ॅक्सिडेंट झाला तेव्हा लास्ट डायल्ड्मधे माझा नंबर होता. कारण मी पार्टीला का येत नाही म्हणून विचारायला..त्यानं दहा मिनिटे आधी फोन केलेला... म्हटलं अरे कालच युकेवरून आलोय, जेटलॅग आहे असं खोटंच सांगितलं त्याला. अर्ध्या तासाने फोन आला, हा नंबर ज्याचा आहे त्या माणसाचा अपघात झाला म्हणून...."
"विवान हे सगळं माहित आहे मला."
"नाही अस्मि तुला पूर्ण माहिती नाही. मी त्या दिवशी खोटं का बोललो हे तुला माहित नाही. मी त्या पार्टीला किंबहुना जिथे कुठे सुयोग आणि तू असाल तिथे कधीच येत नव्हतो. हे माहिती आहे तुला?  आणि त्या दिवशी पण मी मुद्दाम आलो नव्हतो. हे मी कधीच सांगितलं नाही तुला, पण तो  अपघाताचा फोन आल्यावर मी लगेच तिकडे गेलो. मी तिथे पोचलो तेव्हा तो अजून होता, बोलत होता... मला म्हणाला “अस्मिला सांगू नकोस हे ऎक्सिडॆंटचं. घाबरेल ती..  त्याला हॉस्पिटलमधे नेत होते तेव्हा पण मी त्याच ऎम्ब्युलन्समधे होतो. त्यालाच काय मला पण वाटलं नव्हतं की हे जीवघेणं असेल... अगदी शेवटी मला म्हणाला “कुणी आलं नाही तरी चालेल... पण अस्मिच्या लग्नाला तू यायचं विवान”. मी त्याला....” विवानचा आवाज भरून आला “...... त्यानं माझ्या मांडीत डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला... अस्मि. माझ्या मित्रानं. आणि मी काय केलंतर तो गेल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. आय जस्ट फील दॅट आय बीट्रेड हिम."
“पण विवान, हे तू माझ्या वडलांच्या सांगण्य़ावरून केलंस.... त्यांनी तुला सांगितलं की... “
“नाही, अस्मि. हे लग्न मी माझ्यासाठी केलं. कॉलेजमध्ये असल्यापासून तू मला आवडायचीस. तुझं आणि त्याचं अफेअर जमल्यापासून मी जाणूनबुजून त्याच्या ग्रुपपासून लांब रहात गेलो. ही गोष्ट कुणाला नाही फक्त सुयोगला माहित होती. कित्येकदा त्याची आणि माझी मस्करी चालायची यावरून. नंतर पुढे नोकरीसाठी आपल्या वाटा वेगळ्या झाल्या, तरी पण तू मला आवडत राहिलीस. सुयोला मी शपथ दिली होती की ही गोष्ट कुणाला सांगायची नाही. त्याचा या असल्या शपथावर वगैरे कधी विश्वास नव्हता. पण त्याने हे कधीच कुणाला सांगितलं नाही, अगदी तुलासुद्धा, हे मात्र खरं."
"विवान...." मी जे काही ऐकत होते त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजवर कधीच मला विवान समजला नव्हता की काय....
"हो, हेच खरं आहे.” तो बाल्कनीतून दूर बघत म्हनाला.
" हे काय सांगतोस तू... आधी कधीच काही म्हणाला नाहीस... इतक्या दिवसात हे सारं का नाही सांगितलं तू मला...."
"देवाची शप्पथ अस्मि, मनात कधी विचार आला तरी मला लाज वाटते स्वत:ची. सुयोगचं असं काही व्हावं असं माझ्या मनात कधीच आलं नाही कधी. मला तू आवडत होतीस तरीपण...... आय वॉज हॅपी फॉर बोथ ऑफ यु, नंतर सुयोगच्या जाण्याने तू डिप्रेशनमधे गेलीस तेव्हापण माझ्या मनात असं लग्न वगैरे  काही नव्हतं.... मला फक्त तुला आनंदी ठेवायचं होतं. म्हणून मी तुला भेटत राहिलो.तुझ्या घरी येण्याआधी चारदा तुझ्या दारापर्यंत येऊन परत गेलो. पण कुणीतरी सांगितलं की..... तू एकदा झोपेच्या गोळ्या खाल्ल्यास. तेव्हा स्वत:शीच निश्चय केला. काही झालं तरी तुला गमवायचं नाही. चेहयावर एक खोटं हसू पांघरलं आणि तुझी विचारपूस करायला म्हणून तुझ्या घरी आलो. तुला ते आवडलं नव्हतं. पण तरी रोज निर्लज्जासारखा येत गेलो. शेवटी नानांनी मला नक्की मनात काय आहे ते सांग म्हटल्यावर मला आधी काही समजेचना. तेच् म्हणाले लग्न कर... म्हणून मी लग्न केलं. अगदी माझ्या घरच्यांना न सांगता कारण, त्यांनी काही विरोध केला असता आणि तुझे नाना नाही म्हणाले असते तर... हाच एक विचार... अस्मि, आय अ‍ॅम सॉरी, तुला दुखवायचा, त्रास द्यायचा किंवा तुला हर्ट नाही करायचं मला. उपकार वगैरे तर अजिबात म्हणू नकोस. मीसंधीसाधू माणूस आहे... तू समजतेस तितका महान नाही. आय एम व्हेरी सेल्फिश...पण जेव्हा तुझ्या तोंडून सुयोगचा विषय येतो तेव्हा तेव्हा मला माझ्या या वागण्याची लाज वाटते.... मला जाणवतं की मी काय केलंय ते...”
क्षणभर विवानचं बोलणं ऐकून मला काय बोलायचं तेच सुचेना.
"विवान, काय केलंस तू?सुयोगच्या जाण्यानंतर मी पूर्ण कोसळले होते. जीव द्यायचा विचार कितीवेळा मनात येत होता ते मला आजही आठवतं. एक दोनदा प्रयत्न पण केला. तेव्हा तू मला आधार दिलास, परत जगायला शिकवलंस. नोकरी सोडून चार महिने घरात बसून होते तेव्हा मी. तुझ्यामुळे पहिल्यांदा घराबाहेर पडले. मला सुयोगची आठवणदेखील येऊ न देता तू मला परत जगवलंस. जेव्हा आईने मला तुझ्याशी लग्न करायचं हे सुचवलं तेव्हा मी नकार दिला होता. तेव्हा आईने किती समजावलं, दुसर्‍या कुणाच्या नाहीतर फ़क्त आईसाठी मी हे लग्न केलं... जेव्हापासून तुझ्याशी लग्न केलंय तेव्हापासून एकही क्षण असा नसेल जेव्हा तू माझा विचार केल नसशील. आणि मी प्रत्येक क्षणी सुयोगचाच विचार करतेय हे तुला माहित असताना.... तुझं अख्खं आयुष्य जणू काही अस्मिची काळजी घेणं यासाठीच राहिलंय ता."
“अस्मि, मी वेड्यासारखा प्रेम करतो गं तुझ्यावर. गेली कित्येक वर्ष... पण तुला कधी सांगितलच नाही..आणि दिवसेंदिवस अजूनच तुझ्या प्रेमात पडतोय. तुझं असं मनातल्या मनात जळणं, स्वत:चं आयुष्य बरबाद करणं बघवत नव्ह्तं मला. म्हणूनत्या दिवशी मी तुला भेटायला लो. तुझ्या आयुष्यातली सुयोगची जागा घ्यावी असं चुकूनही कधी वाटलं नव्हतं मला. म्हणून असेल कदाचित पण सतत हा अपराधीपणा छळत राहतो. सत असं वाटतं के आय डोन्ट डीजर्व दिस हॅपीनेस, दुसर्‍या कुणाकडून तरी हिरावून आणलंय मी हे सुख."
"मला अपराधीपणा येत नाही का??जेव्हा माझं एक मन सतत सतत तुलना करत राहतं, आज इथे सुयोग असता तरत्याने काय केलं असतं कसा वागला असता तो?..... तुझ्या प्रत्येक कृतीमधून, प्रत्येक विचारामधून मी सुयोगला शोधत असते. तेव्हा माझंच दुसरं मन मला किती खात असतं याची कल्पना आहे तुला? तू आणि सुयोग... दोन ध्रुवावरचे प्राणी तुम्ही."
"अस्मि, आय अ‍ॅम सॉरी.... " म्हणत विवानने मला मिठीत घेतलं आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवले. "मला तुला कधीच दुखवायचं नाही, तुला कायम खूप खुश ठेवायचंय...."
"मला कसा खुश ठेवणार तू विवान. जेव्हा तू स्वत: खुश नाहीस? जो प्रमाद तू कधी केलाच नाहीस त्याची सजा तू का स्वत:ला देतोयस? कधी विचारलंस मला की मी या लग्नात किती खुश आहे ते?"
"अस्मि...."
“हेल्लो... हाऊज लाईफ?” बाल्कनीच्या खालून जोरात कुणीतरी हाक मारली. आमच्या लॉजच्या बाजूने रस्त्यावरून एक परदेशी जोडपं फुल्ल पिउन चाललं होतं. अवघ्या विशी बावीशीची असतील दोघंही. त्याला तर अजिबात चालतापण येत नव्हतं. तिच्या गळ्याभोवती हात टाकून कसाबसा चालत होता तो. विवान त्यांच्याकडे बघून हसला. “फाईन..”

“कम हिअर. लेट्स पार्टी!” त्याने हातातली दारूचे बाटली उंचावून आमंत्रण दिलं.
“नो थॆंक्स, यु कंटीन्यु. वीजस्ट कॊल्ड इट अ डे” विवानने हात हलवून त्यांना बाय केला. माझ्याकडे बघत तो म्हणाला. “अस्मि. आत जाउया. रात्रीचे अकरा वाजून गेलेत. तुला थंडी नाही वाजत?”
आम्ही दोघंही आत आल्यावर विवानने बाल्कनीचा दरवाजा बंद करून घेतला. “रात्रीचं फिरताना या लोकांना भीती कशी वाटत नाही कुणास ठाउक..” विवान सहजपणे म्हणाला.
भीती वाटण्यासारख काय आहे त्यात? हे गाव आधी केवढं. त्यात हे फोरेनर्सच जास्तशिवाय इथे येतात ते पण सुट्टीला. मज्जा करायलाच..पैसे वगैरे तर जास्त नसतातच, लुटणार तरी कोण यांना आणि कशाला?” मी म्हटलं. मनामध्ये वादळ चालूच होतं, फक्त ते शब्दांत येत नव्हतं.
“बस इथे,” विवान मला बेडवर बसवत म्हणाला. “आणि सांग मला तू या लग्नांत किती खुश आहेस ते? कारण मला माहित आहे अस्मि, मी कितीही प्रयत्न केला तरी सुयोगची जागा...”
"ऐक विवान, मी खूप आनंदी आहे तुझ्यासोबत. सगळ्याच बाबतीत. मला तुझ्याइतकं माझ्यावर प्रेम करणारं दुसरं कुणी मिळालं नसतं. सुयोग गेल्यानंतर....... विवान, पण तरी मनात नकळत तुलना होते आणि मग स्वतःचाच स्वतःला त्रास होतो. सुयोगच्या जाण्यानंतर त्याच्याच मित्राशी लग्न केलं म्हणून त्रास होतो आणि इतका चांगला वागणारा नवरा असतानादेखील गेलेल्या माणसाच्या आठवणी येतात म्हणून त्रास होतो. एकाच वेळेला माझी सुयोगशी पण प्रतारणा. आणि तुझ्याशी पण. मनातलं बोलणार कुणापुढे? आईनाना तर ऐकून घेणार नाहीत. सुयोगचं नाव जरी काढलं तरी तू विषय बदलणार.... त्यातून तुझे आईवडील तुझ्याशी बोलत नाहीत हा एक वेगळा अपराधीपणा मनामधे सतत जाणवणारा...सुदैवाने आज ते एक शल्य दूर झालं. मी प्रत्येक क्षणाला जळत राहिले हे समजून की माझ्याइतकंच हे लग्न तुझ्यावर पण लादलं गेलेलं आहे. नानांच्या हट्टापायी आणि तुझ्या भिडस्त स्वभावापायी तू या लग्नाला होकार दिलास असं मी इतके दिवस समजत होते."
“अस्मि, आय ऎम रीअली सॊरी, मी तुला आधी सांगायला हवं होतं पण कधी हिंमत झालीच नाही...”
“प्लीज ही गिल्टी भावना  मनातून काढून टाक. तू काहीही चुकीचं केलं नाहीस. उलट जे काही केलंस त्यासाठी जगातल्या कुठल्याही भाषेत शब्द नसतील. ज्या व्यक्तीवर तू इतकं प्रेम केलंस तीच व्यक्ती तुझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून लाभली, ही किती भाग्याची गोष्ट आहे हे तू मला विचार. विवान, तुला भेटल्यापासून कित्येक दिवस मनात विचार यायचा, इतका हा माणूस शांत असूच कसा शकतो.... तेव्हा तू मला चक्क खोटा वाटायचास. आता समजतंय की तू खोटा नाहीस. या शांततेच्या पलिकडे एक प्रचंड मोठं वादळ घेऊन जगतोयस तू. आणि त्याची खरंच काही गरज नाही. तुझं मन तुझा स्वभाव सगळं पारखलंय मी. पण तुझ्या मनातली घालमेल सगळी मला आज उमजतेय.” मी बोलत असताना विवानच्या डोळ्यांतून पाणी आलं. “अस्मि, मला तुला परत गमवायचं नाही, उलट तुला आयुष्यामधे खूप खुश ठेवायचं आहे.”
“अरे मग ठेवतोच आहेस ना तू? जे तू माझ्यासाठी केलंस आणि अजून करतो आहेस, ते इतर कुणी केलं असतं का हा प्रश्न मी स्वत:ला दिवसांतून पंचवीस वेळा विचारते. प्लीज यापुढे कसलाही अपराधीपणा नको.... तू प्रत्येक क्षणाला माझा विचार आधी करणार... इतकी पण आता नाजूक राहिली नाही रे. तुझ्या संगतीने, तुझ्या प्रेमाने मी पण आज उभी आहे. दोन वर्षापूर्वी वाटलं होतं की संपलं आयुष्य. तुझ्यामुळे जगायची प्रेरणा मिळाली. मी आज जे काही आहे ते तुझ्यामुळे....”
“अस्मि, पण सुयोग मला कधीही माफ़ करणार नाही.....” विवान माझ्या कुशीत तोंड खुपसत म्हणाला.
“विवान,” त्याच्या केसांमधून हात फ़िरवत मी म्हणाले. “आज इथे हंपीमधे येऊन त्या घाटावर मला एक गोष्ट चांगलीच उमगली आहे. सुयोग आता आपल्यामधे नाही. त्याला काय वाटेल अथवा त्याला काय वाटणार नाही याबद्दल आपण कितीही विचार केला तरी त्याला फ़रक पडणार नाही.”
“अस्मि, असं का म्हणतेस?” विवान माझ्याकडे बघत म्हणाला.
“कारण हेच खरं आहे विवान. एकीकडे मी सतत स्वत:ला कोसत राहणार... कारण मी तुझ्याशी लग्न केलं. तू सतत स्वत:ला त्रास करत राहणार. तुझं माझ्यावर प्रेम असूनदेखील... का तर सुयोगला वाईट वाटेल. पण त्याला या सर्वांनी खरंच काही फ़रक पडतो का? तो तर केव्हाचा मला सोडून गेला. त्याच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यावर त्याचा काही कंट्रोल राहतो का?”
“पण आठवणी सोबत असतात कायम....”
“पण त्या आठवणींना आता माझ्यावर हक्क गाजवण्याचे स्वातंत्र्य नाही. दुपारपासून हाच विचार करतेय मी विवान. सुयोगच्या जाण्याने पूर्ण उन्मळून पडले होते मी. तेव्हा सुयोग या एका शब्दापाशीच माझं आयुष्य थांबलं होतं. पण आता तसं नाही, तो गेला हे माझं मलाच आज कळून चुकलंय. आणि माझ्या आयुष्याचा जोडीदार आता तू आहेस. विवान,” मी माझ्या डोळ्यंत आलेलं पाणी पुसत म्हटलं, “यापुढे मला आपल्या आयुष्यामधे सुयोगची सावली नको. तुझ्या मनामधे ्त्याला काय वाटेल हा विचार नको आणि माझ्या मनामधे मी त्याच्याशी प्रतारणा केली ही भावना नको. त्याचा आता माझ्या आयुष्याशी संबंध नाही. तो गेला, आपल्याला सोडून खूप लांब”
“अस्मि, तू सुयोगला विसरावं वगैरे असं कधीच माझं म्हणणं नाही...”
“आणि ते शक्य पण नाही. अशा आठवणी कुठल्याच खोडरबरानं पुस्ता येत नाहीत. पण तरी आता मला हे अपराधी जगणं नको, तुझ्याकडूनही आणि माझ्याकडूनही”
विवान हसला, “अस्मि, खरंच आज तुला खरं काय ते सांगून मला खूप हलकं वाटतंय, इतके दिवस हे असं खोटं जगणं माझ्यासाठी फ़ार कठिण होतं.”
“आणि आज फ़ायनली सुयोगला माझ्या आयुष्यातून वजा करून पण मला फ़ार हलकं वाटतंय. आय लव्ह यु विवान” मी त्याच्या मिठीत शिरत म्हटलं.
सकाळी जाग आली तेव्हा उन्हं बरीच वर आलेली होती. घड्याळात बघितलं तर साडेसात वाजून गेले होते. कानोसा घेतला तर विवान रूममधे नव्हता, इतक्या सकाळी कुठे गेला असेल याचा विचार करत होते, सहज मोबाईल बघितला तर त्यामधे विवानचाच मेसेज होता. “अम्माने तिच्या रूमवर बोलावलंय म्हणून गेलोय, उठलीस की फोन कर” त्याच्या मोबाईलवर फोन केला तर दोन रिंग नंतर त्याने कट केला. माझं सर्व आवरून मी रूमवर ब्रेकफ़ास्ट मागवला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यात परत त्याच्या आईने बोलावलेलं असल्याने अजून परत नवीन काय वादळ असेल ही एक वेगळीच चिंता लागून राहिली होती.
लॉजच्या बाल्कनीमधून बाहेर पाहिलं तर हंपी आज परत ताजीतवानी होऊन तयार होती. काल रात्री काळोखाच्या सावलीसारखे दिसणारे छोटेमोठे डोंगर आज परत सूर्याच्या किरणांनी वेगवेगळ्या रंगानी चमकत होते. दूरवर वाहत जाणारी तुंगभद्रा नदी आज जरा जास्तच अवखळल्यासारखी वाटत होती. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेले मंदिरांचे अवशेष आज मला ताठ मानेने “देव नसला म्हणून काय झालं? आमचा प्रत्येक दगड म्हणजे एका जिवंत इतिहासाची निशाणी आहे” म्हणून सांगत होते. इथेपण कधीकाळी कुणी हसलं असेल, इथल्या वास्तूंमधे कधीतरी मंत्राचा तो नाद घुमला असेल. इथल्या अंगणांमधे कधीतरी सडारांगोळी घातली असेल. त्याच अंगणात कुणाचे तरी चिमुकले पाय धावता धावता धडपडले असतील. इथे कधीतरी घुंगरांचे बोल आणि वाद्यांची मैफ़िल रंगली असेल...  इथे पण कधीतरी कुणीतरी एका नवीन आयुष्याची स्वप्नं पाहिली असतील. इथे पण कुणीतरी स्वत:च्याच मनाशी खुदकन हसलं असेल... आता जरी सर्वत्र उजाड आणि भकास असलं तरी ही हंपी कधीकाळी उत्साही आणि रंगात न्हायलेली असणारच की.
शेवटी साडेआठच्या सुमाराला विवान आला. आल्या आल्या त्याच्या चेहर्यावरचा प्रसन्न भाव बघितला आणि किमान चिंतेचं काही कारण नाही हे समजलं. पण विवानकडे नीट पाहिलं आणि मला माझं हसूच आवरेना. विवान अगदी टिपिकल तमिळी लुंगी शर्ट घालून आलेला.
“हसण्यासारखं काय आहे स्वीटु?” त्याने माझ्याकडे बघत गमतीने विचारलं.
“हसू नाहीतर काय करू? पहिल्यांदा तुला अशा अवतारात बघतेय. फ़ार क्युट दिसतोस तू”
“अजून एक मजेची गोष्ट आहे.” त्याने हातातल्या दोन मोठ्या पिशव्या माझ्याकडे देत म्हटलं. “उघडून बघ”
एका पिशवीमधे साडी आणि असलंच बरंच काहीबाही. “हे माझ्यासाठी कशाला?” साडी सोनेरी रंगाची कंजीवरम का काय म्हणतात तसली, एकदम भारी. किमतीचं माहित नाही पण वजनाला नक्कीच.
“काल रात्री घरातले सगळयांनी एकत्र बसून प्लान ठरवलाय. आपलं लग्न झालं पण नंतर ते सूनमुख वगैरे काही झालंच नाही असं सर्व म्हणाले. म्हणून आज हा कार्यक्रम. एक छोटासा गणहोम, तू आणि मी करायचा. मग जास्त काही नाही, तुला सगळेजण गिफ़्ट्स देतील तेवढे घ्यायचे आणि सर्वांना नमस्कार करायचा, सिम्पल” विवान माझ्याजवळ येत म्हणाला, त्याचा आवाज थोडा गंभीर झाला होता, “डॆडींनी जेव्हा हा प्रोग्राम मला सांगितला तेव्हा मी ओके म्हणून गेलो. तुला विचारलं सुद्धा नाही. तुझा देवाधर्मावर वगरे विश्वास नाही हे माहित आहे मला. पण तरी......”
“विवान, काल काय ठरलं आपलं? आता हे दरवेळचं अपराधीपणा वाटून घेणं बंद. माझा विश्वास वगैरे नसला तरी मी पूजा करणारच नाही अशी काही भीष्मप्रतिज्ञा केलेली नाही. कधीतरी एकदा करून बघायची. पण एक दुसरा भला मोठ्ठा प्रॉब्लेम आहे...”
“तो कसला?”
“मला साडी नेसता येत नाही.”
“एवढंच ना... मग मी मदत करतो की तुला. लुंगी नेसता येते मग साडी नेसवणं किती कठिण असणारे?”
विवान आणि मी दोघंही एकदम हसलो. त्यानं माझा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाला. “अशीच हसत रहा अस्मि, जगल्यासारखं वाटतं.