Tuesday, 25 December 2012

विठ्ठल तो आला आला!!

पंढरपूरवरून तसं माझं कायमचं येणं जाणं. आईचं माहेर बार्शी त्यामुळे कोल्हापूर बार्शी रस्त्याला पंढरपूर लागायचंच. लहानपणी एस्टीतून जाताना आई विठोबाला नमस्कार कर असं सांगायची. पण हा विठोबा नक्की कुठल्या देवळात आहे हे माहीत नसल्यामुळे, मी दिसला कळस की कर नमस्कार असं करायची.
नंतर नंतर बार्शीला जाणं कमी होत गेलं. स्वत्:च्या व्यापात दडत गेल्यावर कुठलं आजोळ नी काय... बार्शीतल्या रणरणत्या उन्हापेक्षा सुट्टीतली नाट्य शिबिरं महत्वाची वाटायला लागली.
थोडक्यात म्हणजे कितीहीवेळा पंढरपूरवरून गेलं तरी विठोबा काही मला भेटला नव्हता. योग असावा लागतो दर्शनाचासुद्धा.....
एकदा मी कॉलेजमधे असताना पप्पाचा फोन आला, ताबडतोब निघ, आपल्याला बार्शीला जायचे आहे. शेताच्या वाटणीचं काहीतरी काम होतं आणि मामाला अचानक जहाजावर जॉईन व्हायची ऑर्डर आल्यामुळे ते ताबडतोब संपवायचं होतं. तिथे आईने हजर होणं जरूरी होतं. त्यामुळे आम्ही सहकुटुंब सहपरिवार (हो, आमच्या आईला escort लागतो) बार्शीला गाडी घेऊन निघालो.
"मला बार्शीला जायचय." मी वर्गातल्या मुलीना सांगितलं.
"हे कुठे आहे?"
अं.... पंढरपूरच्या पुढे दोन तास...
"ए.. म्हणजे तू विठ्ठलाच्या देवळात जाशीलच ना.. प्रसाद घेऊन ये."
"अगं मला जायला जमेल की नाही माहीत नाही.."
"अगं असं काय करतेस? देवळात नक्की जाऊन ये आणि प्रसाद घेऊनच ये.."
"बघते..."
"बघते... नाही प्रॉमिस कर."
विठ्ठलाच्या प्रसादाला प्रॉमिस??
मी केलं.
दुपारचे तीन वाजले होते. बार्शीवरून आम्ही जऊन वगैरे निघालो होतो. पंढरपूर हायवेचा बायपास नुकताच झाला होता. त्यामुळे गावातुन गाडी न्यायचा प्रश्न नव्हता. पण बार्शी सोडल्यापासून मी भुण भुण लावली होती.

"पप्पा प्लीज, मी इतक्या दिवसात एकदाही ते देऊळ पाहिलं नाही. आई कित्येकदा जाऊन आलीये. तुम्ही गेलाय. मीच नाही गेले. मला काहीतरी पुण्य नको का?"

"मुली, हे तुझं वय पुण्य करायचं नाही. म्हातारी झालीस की हवं तितकं पुण्य कर पण त्या आधी एखाद्या चांगल्या डीटर्जंटने पापं धुवून टाक. त्यात खूप वेळ जाईल तुझा..." माझा लहान भाऊ... जर हा माझ्यापेक्षा सात वर्षानी लहान नसता आणि जन्मल्या जन्मल्या बार्बी बाहुल्यासारखा दिसत नसता तर नक्की त्याला मारलं असतं..

"पप्पा प्लीज ना.. पाचच मिनिटं. "
"हे बघ, ते देवळात खूप गर्दी असते. वारकरी लोकाची रांग असते. वेळ जाईल. रात्र व्हायच्या आत आपल्याला रत्नागिरी गाठायची आहे." पप्पा.
"कुणी वाट पहात नाही तिथे. एवढं मुलगी म्हणते तर घेऊउ या ना दर्शन.."
आई..
"वेळ नाही."

"ठीक आहे, दर्शन नको, पण प्रसाद घेऊन जाऊ ना.. मी वर्गात सांगेन की मी पंढरपूरवरून प्रसाद आणला. मी मैत्रीणीना प्रॉमिस केलय... प्लीज.."

"घाल रे गावातून गाडी.." पप्पा लेकीवर दया दाखवत ड्रायव्हरला म्हणाले.

माझे पप्पा सर्वीस इंजीनीअर म्हणून काम करत असताना बर्‍याचदा पंढरपूरला येऊन गेले होते. त्यामुळे मला सगळे रस्ते माहीत आहेत. हा त्याच्या घोषा.. वीस वर्षात गावं बदलतात हे मानायला तयारच नाही.

कोकणातल्या स्वच्छ वाड्यातुन गाडी चालवायची सवय असलेला आमचा ड्रायव्हर पंढरपूरच्या पहिल्या दर्शाने जरा गांगरलाच. समोर उक्किरडेच उकीरडे. त्यातून धावणारी डुकरे आणि कुत्री, तिथेच खेळणारी लहान मुलं, पंढरीच्या या रूपाने मी पण जरा गडबडलेच.

"अगं, इथे जरा घाण आहे. पण देवळाकदे एकदम स्वच्छ आहे." बरोबर, आईच्या माहेरकडचं गाव न!
पण आईच्या वाक्यातला अर्थ लक्षात घेऊन (लग्नाच्या यशस्वी २० वर्षाचा पुरावा) पप्पा लगेच "मी गाडी देवळात घालणार नाही. इथेच प्रसाद घेऊन ये."

तीर्थक्षेत्रे म्हटलं की गल्लीबोळात प्रसादाची ती टीपिकल दुकानं असतातच. कुठल्याशा दुकानासमोर ड्रायव्हरने गाडी उभी केली. पप्पानी माझ्या हातात पाचशेची नोट दिली. "खूप सारा प्रसाद घेऊन ये, मी ऑफ़िसमधे वाटेन" माझ्या प्रॉमिसवर हे प्रसाद वाटणार.

साधारणपणे पन्नास साठ रुपयाचा चुरमुरे बत्तासे असलं बरंच काही मी घेतलं आणि मागच्या ज्न्मी सरकारी अधिकारी असल्यामुळे उरलेले सुट्टे पैसे माझ्या खिशात घातले.

आता गाडी गावाबाहेर काढून हायवेला न्यायची होती. पप्पाना रस्ता माहीत आहे असं त्याना वाटत होतं. जवळ जवळ पाच मिनिटं त्यानी ड्रायव्हरला इकदे घाल तिकडे वळव वगैरे सांगून फ़िरवलं. बरं कुणाला रस्ता विचारायला देखिल तयार नाहीत.

पुढे एक सर्कल होतं. "आता या सर्कलच्या इथून बाहेर पडलं ना की सरळ गावाबाहेर.."
"पण नक्की कुठून बाहेर पडायचं." माझा भाऊ..

"थांब जरा. गाडी हळू कर. मला आठवू दे. हा.. एक काम कर तो नघ समोर तो मोटरसायकलवाला जातोय ना.. तो जिकडे वळला तिथे घाल.. तो रस्ता गावाबाहेर जातो."

आमच्या ड्रायव्हरला गावाबाहेर पडायची इतकी ओढ लागली होती. की त्याने जोरात गाडी मोटरसायकलवाल्याच्या पाठून घातली. अजून दोन मिनिटं पण झाली नसतील. त्याने करकचून ब्रेक मारला.

समोरचा रस्ता संपला होता आणि एक हसरी कमान तिथे उभी होती.
"श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपले सहर्ष स्वागत आहे"

एक क्षण दोन क्षण आम्ही तसेच बघत उभे होतो. अख्खं पंढरपूर पायी फ़िरून माहीत असणार्‍या या माणसाला हा विठ्ठल देवळाच्या दरवाजाशी घेऊन आला होता.

पप्पा काही बोलायच्या आत आईने जाहीर केलं. "आता इथे आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जायचं. मग भले कितीहीवेळ लागेना का..."

वाद घालण्यात अर्थ नाही हे पप्पाना उमजलं. त्यामुळे डायव्हरला गादी पार्क करायला सांगून आम्ही तिघे उतरलो. समोर एक हेमांडपंथी देऊळ होतं. छानसं सुबक. विठ्ठलाच्या दिगंत कीर्तीच्या अगदी विरुद्ध. उशीर झाला तर पप्पा कटकट करत बसतील म्हणून मी धडाधड पायर्‍या चढून दर्शनाला गेले.
"ए म्हशे. इकडे ये." जवळपासच्या सर्व लोकाना ऐकु जाईल इतक्या हळू आवाजात आईने हाक मारली.

"इथे बघ, ही नामदेवाची पायरी आहे. तुकारामाच्या पादुका आहेत. नमस्कार कर." इथून पुढे आईने माझ्या गाईडचा भूमिका घेतली.

"नामदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस." मी नमस्कार केला. चोखामेळ्याच्या समाधीवर डोकं टेकवलं.

देवळात गेल्यावर एकदम थंड वाटलं. थोडीफ़ार रांग होती. आजूबाजूच्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. "आई, मी पट्कन जाऊन देवाला हार फ़ुले घेऊन येते."

हारवाल्या बाईकडे गप्पा मारायला वेळ होता. त्यामुळे तिने मला विठ्ठालाचा हार रुक्मिणीची ओटी वगैरे सर्व काहीबाही सांगतच दिलं माझं अर्धं लक्ष रांगेकडे होतं.
"ताई, तुळशीचा हार घ्या ना.."
"नको. एवढे घेतले तेवढे पुरे आहेत.
"ताई, आज एकादशी हाये. इठ्ठलाला तुळशी घालतात."
"बरं द्या."


मी ते अजून दोन हार घेतले आणि देवळात आले.

"गधडे, आज पंचमी आहे. एकादशी कुठली.. पंचांग सुद्धा नीट थाऊक नसतं.."
माझी आई ना म्हणजे इज्जत का कचरा करण्यात नंबर वन. अख्ख्या देवळाला समजलं.
"पंचांग काय कॅलेंडर धड माहीत नसतं." माझा बार्बीचा बाहुला. पण याला एक दिवस मी बदडणार आहे. सॉरी. देवळात असे विचार मनात आणू नये.

"तुला हंपीमधलं संगीत खांबवालं मंदिर आठवतं? हा तिथला विठ्ठल."
मी कसं विसरेन ते मंदिर. इतकं सुंदर मंदिर मी अजवर कधी पाहिलंच नाही आहे. मोठच्या मोठं देऊळ. प्रत्येक भिंतीवत चितारलेली एकसोएक शिल्पमूर्ती. आणि दगडातून वाजणारी वाद्यं. पण हे सर्व सोडून हा विठ्ठल इथे पुंडलिकाला भेटायला आला. पण पुंदलिक आईवडीक्लाच्या सेवेत गुंतला आहे त्याच्याजवळ वेळ नाही. आणि म्हणून हे परब्रह्म कमरेवर हात ठवून वाट बघत उभं आहे. अठ्ठावीस युगं लोटली तरीही.

किती लोभसवाणं हे श्रद्धेचं रूप. म्हटली तर भाकडकथा, आणि म्हटली तर जगण्याची शिदोरी.
ही श्रद्धा माझ्याजवळ का नाही? का माझ्या जगण्याचे फ़ॉर्मुले इतके सोपे नाहीत. साक्षात देवाला थांबायला लावणारा तो आणि घड्याळाच्या सेकंदकाट्यावर धावणारी मी .

रात्री दोन तीन वाजेपर्यंत डीस्कोत अंग घुसळणारे आम्ही, आम्हाला टिळा लावणारे, वाळवंटी नाव्हणारे वारकरी गावंढळ वाटतात. मागासलेले वाटतात. पण आम्ही कुठले पुढारलेले? आमच्याकडे याच्या डोळ्यात असणारं समाधान का नाही? कसलीतरी एक प्रचंड खळबळ घेऊन आम्ही जगत आहोत. जणू प्रत्येकाच्या छातीत एक ज्वालामुखी. आमच्या मनात हे शांततेचं चांदणं का नाही? कशासाठी जगतोय आम्ही? काय अर्थ आहे या अस्तित्वाला? मला देव तेव्हा आठवतो, जेव्हा मला गरज असते. जेव्हा माझी गरज सरते तेव्हा मी देवाला विसरते.. तो ठेवतो का मला लक्षात? इत्क्या माणसाना त्याने जगायची दृष्टी दिली मला का नाही दिली? कारण ती माझी लायकी नाही म्हणून? इतक्या जणाना सांभाळणारा तो. कदाचित विसरला असेल मला.. एवढ्या मोठ्या पसार्‍यात मी कोण कुठली?
गर्दी कमी असल्यामुळे आमचा नंबर तसा पटकन आला. त्या अंधार्‍या गर्भगृहात शिरल्यामुळे मला समोरचे काहीच दिसेना. त्यात बडव्याने हातातले हार काढून घेतले. आणि माझं डोकं त्या विठ्ठलाच्या चरणाला टेकवलं.

मान वर करून पाहिलं तर तो माझ्याकदे बघून गालातल्या गालात हसत होता. जणू तो आणि मी लहानपणचे मित्र होतो. त्याला माहीत होतं की मी येणार आहे. तो मला ओळखत होता. जरी मी त्याला कधीच ओळखलं नसलं तरी. मी त्याच्याकडे नुसती बघत होते. सगळं जग जणू हरवून गेलं होतं. कोण होते मी? काय माझं नाव? कशाला आले होते इथे? काहीच आठवत नाहीये. पण एक गोष्ट माहीत आहे, तो माझ्यासाठी आहे. तो जनाबाईसाठी होता, तुकारामासाठी होता. नामासाठी होता. प्रत्येकासाठी होता. माझ्यासाठीपण. मी काहीच नव्हते. पण त्याने मला अस्तित्व दिलय. त्याने मला हे जीवन दिलय. "मी" त्याची जबाबदारी आहे. तो मला सांभाळेल. कधीही कुठल्याही प्रसंगात. सुखात तो माझ्याबरोबर हसतो. दु:खात मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. तो धीर द्यायला कायम असतो. पण मी त्याला कधीच ओळखत नाही. कारण मी माझ्या डोळ्यावरचा माझ्या अहंकाराचा चष्मा कधीच काढत नाही.

तो महार बनून येतो, त्याला लाज वाटत नाही. तो जात्यावर दळण दलतो. त्याचे हात दुखत नाही.
मला माझी चूक कबूल करायला लाज वाटते. दुसर्‍यासाठी काही करताना मला त्रास होतो.
आणि तरीही तो माझ्यासाठी आहे. तो खूप मोठा आहे. मी खूप क्षुद्र. तरीही त्याचं माझ्याकडे लक्ष आहे. एखादं जुनं आठवणीतलं माणूस पाहिल्यावर होतो तसा त्याला आनंद झालाय. त्याच्या चेहर्‍यावर दिसतोय.

समोरचा तो मंदपणे हसणारा विठ्ठल आणि त्याच्यासमोर उभी असलेली मी. काही क्षणापूर्वी प्रश्नानी छळलं होतं. आता उत्तरे मिळतील असं वाटलं तर प्रश्नच गायब झाले.

"चला पुढे व्हा... पाठचे ओरडतायत."

बडव्याच्या या उद्गारानी मी जागी झाली. पण मी झोपेत नव्हते. कुठे होते मी इतका वेळ? किती वेळ झाला मला इथे येऊन? बाजूला आई पप्पा योगेश सर्व होते. मग मी कुठे गेले होते?

पाठून येणार्‍या माणसामुळे मी पुढे निघाले तरीही पाठी वळून त्याच्याकडे बघण्याचा मोह मला आवरला नाही.

"परत भेटशीलच. अशीच एखाद्या रस्त्यावर. अशीच हरवलेली. मी रस्ता दाखवेनच, माझ्या पाठून येण्याचा" तो हलकेच बोलला.

आज मी त्याच्या येण्याची वाट बघतेय. रस्तातर केव्हाच चुकलेली आहे.

==समाप्त==