Sunday 29 March 2015

इश्क विश्क (भाग ५)

बॅण्डस्टॅण्डवरून एरवी दिसणारा सूर्यास्त खूप सुंदर. आज मात्र तोच सूर्यास्त तिला भेसूर दिसत होता. गेल्या दोन तासामध्ये एकही क्षण तिच्या डोळ्यांमधलं पाणी खळलं नव्हतं. 

आलोक तिच्या बाजूला शांत बसला होता. गौरवच्या  फ्लॅटमधून निघाल्या निघाल्या तिनं आलोकला फोन केला. फोनवर तिच्या रडणार्‍य हुंदक्यांव्यतिरीक्त त्याला काहीही समजलं नव्हतं. ऑफिसची वेळ नाहीतरी संपत आलीच होती, तो सरळ तिला भेटायला इथं आला होता. 
“त्याचा असा गैरसमज होऊ तरी कसा शकतो? मी प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर इतकी नीट वागत होते, चुकूनही कधी मी त्याला असं काही वाटू दिलं नाही” ती म्हणाली. आलोकनं वळून तिच्याकडं पाहिलं. केशरीशेंदरी सूर्यप्रकाशांत उडणारे तिचे भुरे केस, मघापासून रडून रडून लाल झालेले नाकडोळे... त्यानं किंचित हसून तिला थोडं जवळ घेतलं. “आभा, तुला अजून कसं कळत नाही.. इतकी वेडी आहेस का? तू त्याला काही वाटू दिलं वगैरेंचा प्रश्नच येत नाही. कुणीही सहजपणं तुझ्याकडे खेचला जाऊ शकतो...”
“आलोक, नाही. मी असं कधीच काहीच केलं नाही...”
“आभा, लूक ऍट मी.. मी कसा तुझ्या प्रेमात पडलो असेन... तसाच तोही..”
“नाही, तू अशी तुलना करूच कशी शकतोस.. आपलं लग्न झालंय. घरच्यांनी ठरवून. यु डोण्ट नो दीज पीपल. एखादा हट्ट किंवा खेळणं म्हणून मी त्याला हवी आहे. कमीटमेंट, लाईफलॉंग  रिलेशनशिप म्हणून नाही. आज किती शब्दांचे भोपळे बनवत असला तरी मला माहित आहे... याच्या आईवडलांनी तीस वर्षांनी घटस्फोट घेतला. कॅन यु इमॅजिन? हे असं आपल्याबाबतीत...”
“आभा, तुला एक गोष्ट सांगू? आपण त्या दिवशी गौरवच्या  घरी डिनरला गेलो होतो, तेव्हाच मला हे जाणवलं होतं, पण वाटलं. हे फिल्मी लोकं आपण यांना जास्त ओळखत नाही.. पण तरीही मला हे समजलं होतं की.. त्याला तू आवडतेस. वरकरणी त्यानं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही तो खूप दुखावलेला होता.  समहाऊ, आय नो दॅट फीलिंग....”
“आलोक, तो मूर्ख आहे... काय वाट्टॆल ते बोलत होता. मला म्हणे मी आत्महत्या करेन. तू माझ्याशी लग्न कर काहीही.. मला खूप भिती वाटतेय...”
“कशाला घाबरतेस... काही होणार नाही...” त्यानं तिचे डोळे पुसत म्हटलं. “आभा, एक गोष्ट बोलू?”
तिनं त्याच्याकडे पाहिलं. “मला वाटतं, तू फार चुकीचा विचार करते आहेस. गौरवनं तुला प्रपोज केलंय.. तुला जर त्याला हो म्हणायचं असेल तर...”
“आलोक, हे कसं काय..” आभा बोलत असताना  त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प  केलं. “प्लीज! मला जे बोलायचं आहे ते पूर्णपणे बोलू देत. गेल्या कित्येक दिवसांमध्ये ही गोष्ट मला सांगायची होती. आज एकदाच बोलू देत. हा निर्णय तुला घ्यायचा आहे. कारण, प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. माझ्याशी लग्न केलंस म्हणजे आयुष्यभर माझी गुलाम झाली नाहीस. तू अजूनही स्वतंत्र आहेसच. तुला जर या लग्नाच्या बंधनामधून मोकळीक हवीच असेल तर मी देईन. तुझ्या आईवडलांना काय सांगायचं ते मी बघेन. आभा, गौरव तुझ्यावर खरं प्रेम करतो. माझ्यासारखं खोटं खोटं दिखाव्याचं प्रेम नाही” 
“आलोक, आता खरंच बास. मला काही ऐकायचं नाही”
“नाही, आभा. नीट ऐक. तुला असं कधीच वाटत नाही का मी जरूरीपेक्षा जास्त चांगला वागायचा प्रयत्न करतोय? कारण मी हा कर्तव्यनिश्ठ प्रेमळ नवर्‍याचा मुखवटा चढवलाय. तुला आजवर तो कधीच जाणवला नाही का? मला तुझं स्थळ आलं तेव्हा आज्जी खूप आजारी होती, माझं लग्न बघणं हीच तिची अंतिम इच्छा म्हणून घरातल्यांनी मला लवकरात लवकर लग्न करायला लावलं हेच एक व्हर्जन तुला माहित आहे. आज्जी वर्षभर अंथरूणाला खिळलेली होती. तेव्हाही माझ्या लग्नाचे असेच पडघम घरभर वाजत होते, पण मी बधलो नाही. कारण, मी दुसर्‍याच एका मुलीच्या प्रेमात होतो. आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं”
“तू याहीआधी मला तुझ्या त्या  गर्लफ्रेण्डविषयी सांगितलं आहेस.”
“पण पूर्ण नाही सांगितलं. तिनं लग्नाला अचानक नकार दिला. आणि मग मी चिडून, संतापून, इरेला पेटून दोन आठवड्यांत लग्न केलं. जस्ट टू प्रूव्ह समथिंग. काय ते मलाही माहित नाही. पण माझ्या या इर्ष्येमध्ये तुझी काहीच चूक नव्हती. आईवडालांनी सांगितलं, सगळी चौकशी केली म्हणून तू अक्षरश: माझ्यावर विश्वास टाकून माझ्या घरी आलीस. या लग्नाचं हे सत्य फक्त मला एकट्याला माहित होतं. तुला सांगायचं ठरवलं होतं. पण जमलंच नाही. आज ती संधी मिळाली आहे. आभा, हे लग्न सच्चं नाही, या लग्नांमध्ये आपल्या संसारापेक्षाही जास्त तिचा द्वेष होता. म्हणून तुला सांगतोय, तुला जर या लग्नामधून मोकळीक हवी असेल. तर खरंच...जा”
आभा काही न बोलता त्याच्याकडे केवळ पाहत होती. “आय ऍम सॉरी.” तोच पुढं म्हणाला. “गौरव तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहशील. माझ्या नाटकी प्रेमापेक्षा त्याच्या भावना जास्त प्रामाणिक आहेत. ऍण्ड यु डीझर्व इट! आभा तुझ्यासारख्या मुलीवर असंच कुणीतरी इतकं निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करणारं हवं, माझ्यासारखं खोटं बोलून आणि फसवून नाही”
“म्हणजे आलोक गेले सात महिने हे लग्न तुझ्यासाठी फक्त एक नाटक आहे..”
“होतं. पण नंतर कधीतरी नाटक राहिलंच नाही, मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो. पण तरी ही टोचणी कायम राहिली की मी तुला फसवतोय. मी त्या मुलीवर आजही प्रेम करतो. कदाचित आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहीन.... कितीही ठरवलं तरी मी तिला मनातून काढू शकत नाही. हे खरं आहे. मला माझं सच्चं प्रेम कधीच मिळालं नाही, यापुढे मिळणारही नाही. पण ती संधी तुला मिळाली आहे. प्रेम ही जगामधली सर्वात सुंदर भावना असते, त्याहून सुंदर असतं तुमच्यावर असं कुणी वेड्यासारखं प्रेम करणारं. गौरव तुझ्यावर प्रेम करतो, कर्तव्य म्हणून नाही, लग्न झालं म्हणून नाही. तर मनाच्या आतल्या कुठल्यातरी एका अनामिक कोपर्‍यापासून त्याला वाटतं म्हणून...”
“आलोक, चल! घरी जाऊया” आभा अचानक उठत म्हणाली. 
“का? काय झालं?”
“काय झालं? समजतोस काय मला? एखादी वस्तू? विकत आणली, वापरली आता तीच वस्तू दुसर्‍या कुणाला हवी आहे म्हणून तू उदारतेनं देऊन टाकणार? हा निर्णय माझा आहे, आणि माझाच राहिल. सॉरी, तुम्ही दुसर्‍या कुण्या मुलीवर प्रेम करत असाल, आय डोण्ट केअर. पण कायद्यानं आणि देवाधर्माच्या साक्षीनं तुम्ही मला पत्नी मानलेलं आहे, आणि ते आयुष्यभरासाठी आहे. टिल डेथ डू अस पार्ट. तोवर हे नातं तुला निभवावंच लागेल. मला ना तू आणि गौरव हे जे काय बोलता ना तेच समजत नाही. म्हणे, प्रेम आहे. माय फूट!! एखादी व्यक्ती आवडते, हवीहवीशी वाटते म्हणजे लगेच प्रेम आहे? काय असतं काय हे प्रेम? मला माहित नाही, आणि त्याहून जास्त जाणून घ्यायची इच्छा पण नाही. आय ऍम मॅरीड टू यु आणि म्हणून मी तुज्झ्यावर प्रेम करते. इतकं आणि एवढं सिंपल आहे. गौरवला जर मी आवडत होते, तर त्यानं माझ्या लग्नाआधी मला सांगायला हवं होतं. मी कदाचित हो म्हणाले असते. पण आता गेली सात महिने तुझ्यासोबत राहून, तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं हे ठरवून मी मागे हटू शकत नाही. तुला मागे हटायचं तर तुझी मर्जी. मी या नात्यामध्ये आज जिथं उभी आहे तिथंच शेवटच्या क्षणापर्यंत उभी राहेन. तुझं माझ्यावर प्रेम असलं तरी आणि नसलं तरीही...” 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सकाळी साडेसातवाजता रिक्षेवाल्याला पैसे देऊन आभानं बॅगा खाली उतरवल्या. गेट उघडून आत गेली, तर दरवाज्याला भलेमोठे कुलूप. बंगल्याच्या आजूबाजूनं फिरत तिनं आईला फोन लावला. बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवलेला फोन वाजल्यावर तिनं कपाळावर हात मारून घेतला. परत गेटबाहेर आली अणि तिनं स्वत:लाच दोन शिव्या घातल्या. समोरच्या गेटमध्ये अरमान उभा होता, एकच नजर तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि मान वळवली. हा इथे आलेला तिला कसं माहित नव्हतं. “काय झालं?” त्यानंच हाक मारून विचारलं. 
“आईबाबा घरात नाहियेत” जवळजवळ चार वर्षांनी ती त्याच्याशी बोलली. 
“तुला सरप्राईझ द्यायला स्टेशनवर गेलेत. सकाळी नऊच्या ट्रेनने येणार होतीस ना?” 
तिनं नेहमीच्या सवयीनं रागानं मुठी आवळल्या. “मी बसनं आले, त्यांना सरप्राईझ द्यायला!! म्हटलं तासभर आधी येईन..”
तो किंचित हसला. त्याच्या हातामधलं दोन वर्षाचं बाळ मघापासून खाली उतरायला नुसत्या उसळ्या मारत होतं. त्यानं घरामध्ये कुणालातरी हाक मारली. “चावींचं गिटार ठेवलंय ना, तिथं एक टेडीबेअरच्या कीचेनची चावी आहे, ती आण!” दोनच मिनीटांनी वाट्टेल त्या रंगाचं मिश्रण केलेली साडी नेसलेली, आणि तोंडावर हातभर घुंघट ओढलेल्या एका बाईनं बाहेर येऊन अरमानच्या हातात चावी दिली. “विजय स्टेशनवर जायला निघत असेल तर त्याला सांग, वनिताकाकीला निरोप द्यायला, आभा घरी पोचली. याला आत घेऊन जा, रस्त्यावर पळायला सोकावलाय!” अरमाननं ते बाळ त्या बाईच्या हातात दिलं. आभा रस्त्यावरून थोडीपुढे आली, तोपण गेटबाहेर आला. “नशीब, तुमच्या घराची एक स्पेअर चावी आमच्याकडे कायम असते” 
“कधी आलास?” तिनं चावी घेताना विचारलं. 
“दहा दिवस झाले, अजून महिनाभर मुक्काम आहे..” तो सहज म्हणाला. तिनं रस्त्यावर ठेवलेली एक बॅग उचलली. त्यानं उरलेल्या दोन बॅगा घेतल्या. “माय गॉड! काय दगडं भरली आहेस?”
“पुस्तकंच आहेत. माझ्या सामानांत अजून काय असणारे?” तिनं दरवाजा उघडत विचारलं. “इथं पॅसेजमध्ये आणून ठेवलंस तरी चालेल. मी नंतर सावकाश आत घेईन. मुलगा छान आहे, तुझ्यासारखाच दिसतो. काय नाव ठेवलंस?” 
“तू आणि मी मिळून ठरवलं होतं तेच” तो दोन्ही बॅगा आत हॉलमध्येच नेऊन ठेवत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर ती किंचित घुटमळली. “कशी आहेस?” त्यानंच पुढं विचारलं. 
“ठिक आहे! तू कसा आहेस?”
“कसा दिसतोय?” 
“जाड! काही नाही तर पंचवीसेक किलो वजन सहज वाढलंय. युएसला गेलेली सगळी लोकं जाड का होतात यावर शोधप्रबंध लिहयला हवाय. तू चहा घेणार?” 
“तुझ्या हातचा चहा! इतकी मोठी शिक्षा कशासाठी?” त्यानंपण तिला चिडवलं. तिनं काही न बोलता सिगरेट पेटवली. “ही सवय आहेच का अजूनही?” 
“माझ्यासारख्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, आम्ही झटकन बदलत नाही. वर्षानुवर्षे तसेच राहतो. मग ती एखादी सवय असो वा एखादी व्यक्ती!” 
“किती दिवस आहेस?” त्यानं विषय बदलत विचारलं. 
“माहित नाही. ज्या दिवशी बाबांबरोबर वादावादी होइल, त्या दिवशी निघायचं. तोपर्यंत रहायचं. नेहमीचंच आहे. मला काही सुट्टीचा वगैरे प्रॉब्लेम नाही. तुमच्यासारखा. कभीभी आओ कभीभी जाओ. धंदा करत असलं की ते सर्वात बेस्ट!”  
“हे असलं बोलतेस म्हणून अंकल इतके चिडतात...जरा नीट बोलत जा!! बाकी तू काय काम करतेस? वनिताकाकीला म्हणाली कोच वगैरे आहेस. जिममध्ये इन्स्ट्रक्टर वगैरे आहेस का? तिथं हवी तशी सुट्टी मिळते?” 
आभा शांतपणे सोफ्यावर बसली. हातातली सिगरेट विझवली. “इकडे ये. बस. असा माझ्यासमोर बस” तिनं अरमानचा हात हातात घेतला. “हे बघ, आयुष्यामध्ये प्रत्येकाला बंधनं असतातच, उद्या मोराला कितीही कंटाळा आला तरी त्याला पिसारा फुलवावाच लागेल. श्रावण आल्यावर नाचावंच लागेल. तसंच, तू नोकरी करतोस. म्हणजे तुला वेळेत ऑफिसला जावंच लागेल. हवी तेव्हा सुट्टी घेता येणारच नाही. तुझ्यावर जबाबदारी आहे, माझं तसं नाही. मोर तर तू आहेसच पण आता फोटोशॉप व्हायचा प्रयत्न कर. म्हणजे तुला हव्या त्या रंगाचा पिसारा घेता येईल. माझ्यासारखं स्वत:चा व्यवसाय स्वत: सुरू कर म्हणजे तुला हवी तेव्हा सुट्टी घेता येईल. आणि तुला ते जमेल.. मिस्टर अरमान शहा. स्वत:वर विश्वास ठेव. तुला ते जमेल” 
“हे काये?” त्यानं भांबावून विचारलं. 
“माझा धंदा” तिनं त्याचा हात सोडून दिला आणि ती उठली. “लाईफ कोच. आईला विचारलं तर ती काय भलतंच सांगते. मी लोकांना त्यांच्या आयुष्याबद्दल शिकवते”
“म्हणजे लोक तुझ्याकडे पैसे देऊन त्यांच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम डिस्कस करतात आणि तू त्यांना उपाय सुचवतेस?”
“च्च्क्क! बहुतेकवेळा मी त्यांना त्यांच्या आयुष्यापेक्षा माझं आयुष्य किती कॉम्प्लीकेटेड आहे ते सांगते. मग बिचारे माझी दया करतात. पण पैसा चांगलाय.”
“पण तू कॉलेज...”
“यासाठी एज्युकेशनल डिग्री लागत नाही. समोरच्याला समजून घेणं, त्याला धीर देणं वगैरे गोष्टी लागतात. आणि मला ते चांगलं जमतं. मोस्टली सेलीब्रीटी क्लायंट्स आहेत, त्यांची सुखदु:खं म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली कागदाची फुलं. सगळंच कसं बेगडी खोटंनाट”
“तुझ्यासारखंच” तो अचानक म्हणाला. “आभा, खरंच खुश आहेस की नुसता आभास निर्माण करतेस?” 
“आभास! म्हणजे आभासाठी.. आभानं निर्माण केलेलं खोटं!” 
“सांग ना. खुश आहेस? आनंदात आहेस?” 
“त्याआधी तुझी आनंदाची व्याख्या काय आहे ते कळू देत! अरमान, मी आयुष्यात दु:खी कधीच नव्हते रे. स्वत:वर.. हर्षूवर.. तुझ्यावरच चिडले असेल, संतापले असेन. पण दु:खी कधीच नाही. डोळ्यांसमोर तुझी आणि हर्षूची वाढत जाणारी लव्हस्टोरी बघतानाही नाही, आणि तुझ्या लग्नाची निमंत्रणपत्रिका आल्यावर पण नाही. मला कधीच कशाचं दु:ख वाटत नाही”
“मग अशी का वागलीस?” 
“कशी? हा!!!! हे दारू पिणं वगैरे रीबेल प्रकार. ते घडलेच असते. तू किंवा हर्षू नसता तरीही. कारण मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून दारू पित नव्ह्ते, तर मला त्यावेळी दारू प्यावी वाटत होती. बस्स इतकंच.”
“अजूनही माझ्यावर प्रेम करतेस?” त्यानं तिच्याजवळ येत विचारलं. 
“याहून मूर्ख प्रश्न मी आजवर ऐकला नाही. ऑफकोर्स मी तुझ्यावर आजही प्रेम करते. कायम करत राहीन.” 
“म्हणून आजही एकटीच आहेस?”
“नाही, तुझ्यावर प्रेम करत असले नसले तरीही मी एकटीच असते. तू मिळत असताना तुला नकार दिला... कारण मी  अशीच आहे. प्रेमाच्या संपूर्णतेपेक्षाही मला त्यामधली अपूर्णता जास्त हवीहवीशी वाटली, तसंही तू माझ्यावर प्रेम कधी केलंच नाहीस...”
“आभा,  दोन वर्षं”
“चूक. २४८ रात्री. आणि थोडेफार दिवस. तू माझ्या फ़्लॅटवर आलास किंवा मी तुझ्या रूमवर आले. आपण एकत्र बसलो, बोललो, दारू प्यायलो ऍण्ड वी हॅड सेक्स. त्याला प्रेम म्हणत नाहीत... मी तुझ्यासाठी तेव्हा एक गिल्टी फीलींग होते. हर्षला सोडल्यानंतर तुला अचानक वाटलं, अरे आपल्यामुळे आभाचं लाईफ बरबाद झालंय. अरमान इज रीस्पॉन्सिबल. म्हणून तू माझ्यावर एक जबाबदारी म्हणून प्रेम केलंस. म्हणून आपण एकत्र आलो. मीसुद्धा त्यात वहावलेच. वाटलं साला लाईफ चेंज झालं. अक्खं आयुष्य बदललंय. पण मी हे विसरले की तू आणि मी मुळातच एका विश्वात नाही. तू तुझ्या जगात आहेस आणि मी माझ्या जगात. आपण एकत्र कधीच राहू शकलो नसतो... दोन वेगळ्या जगावरच प्राणी होतो.”
“म्हणजे आपल्या लग्नामुळे नंतर काहीतरी ऍडजस्टमेंट किंवा तडजोडी कराव्या लागतील म्हणून तू नातंच तोडलंस? तुला हे सगळं फार सोपं वाटलं ना? कधी माझा विचार केलास? एके दिवशी रात्री मला रडत म्हणालीस की आय लव्ह यु, मग म्हणालीस की मी खोटं बोलले, मग जेव्हा मी तुझ्यापायी इतका वेडा झालो की...” त्यानं तिच्या उजव्या दंडावरच्या जखमेवरून हात फिरवला. “तेव्हा तू मला सोडून दिलंस. एकाकी करून. तुझ्या या प्रेमापायी माझी किती आणि कशी धूळधाण उडाली...”
“काय धूळधाण? यु आर हॅपीली मॅरीड. सगळं आयुष्य तुझं सुखाचं चालू आहे...”
“का असू नये?? त्याआधी मी काय भोगलंय हे तुला माहित आहे... ती माझी बायको आहे ना... तिला मी सगळं सांगितलंय. तिनं सावरलं मला, तुझ्या या असल्या पुचाट प्रेमाच्या तत्त्वज्ञानापेक्षा तिनं आधारासाठी धरलेला हात मला महत्त्वाचा वाटतोय. म्हणे प्रेमामधली अपूर्णता हवीहवीशी वाटते... अरे हेच हवं होतं तर माझ्यावर प्रेम करायचंच नाही ना? गेली कित्येक वर्षं... आभा, तुझ्यासाठी, तुझ्यामुळे, तुझ्यापायी!!!!  तुझ्यामुळे मी स्वत:ला अपराधी कितीवेळा वाटून घेऊ?”
“अरमान, अपराधी वाटून घेऊच नकोस ना. आनि मी काय ठरवून तुझ्या प्रेमात पडले न्नाही. इट जस्ट हॅपन्ड. तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालेलं नाही. जिनं खरोखर माझं तेव्हा नुकसान केलं ती हर्षू तिसर्‍याच बरोबर सुखात आहे.”

“आभा, मला एक दिवस तुला अशाच सुखात बघायचंय... लग्न कर करू नकोस, तुझा प्रश्न आहे. पण अशी भरकटल्यासारखी जगू नकोस.”
“नाही, अरमान. सॉरी टू बर्स्ट दिस बबल, पण मी अजिबात भरकटलेली नाही. माझ्याकडे कॉलेज डिग्री नाही, तुमच्यासारखी नोकरी नाही,पण याचा अर्थ मी आयुष्यात काहीच करायला सक्षम नाही असा काढू नकोस. माझ्यापरीनं  मला माझ्या आयुष्याचा अर्थ केव्हाच सापडलाय. तुझ्यावर मी करत असलेल्या प्रेमाहूनही जास्त महत्वाचा तो अर्थ आहे. तुला माहिताय, गावामध्ये चार लायब्ररी आहेत आणि चारही लायब्ररीमधलं प्रत्येक पुस्तक मी वाचलंय... हा रेकॉर्ड होता. तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा मी इथं बागेत बसून चरस पित नव्हते. म्हणजे... अधूनमधून्पित होते पण त्याहून जास्त हा वेळ माझा माझ्यासाठी होता... मी स्वत:ला शोधत होते. आता इतक्या वर्षानंतर कुठं मला मी सापडतेय. हा सगळा प्रवासच एकाकी होता. कुणी सोबत असायची अपेक्षाच नव्हती. कॅन यु इमॅजिन, हातात काही नसताना मी एके दिवशी घर सोडून बाहेर पडले, गाव सोडलं. तेव्हापासून आजतागायत वडलांकडून एकही पैसा घेतलेला नाही. वेळ आली तर चार पोरांच्या शिकवण्या घेतल्या, पण स्वत: कमावलं. भरकटल्यासारखी? मी तरी नाही. अरमान शहा, प्रेम माणसाला आंधळं करतं, मूर्ख करतं, अक्कलशून्यही करतं, पण माझ्या प्रेमानं मला एकाकी केलं आणि तो एकटेपणा मी पुरेपूर उपभोगला, सो प्लीज कशाहीबद्दल गिल्टी वाटून घेऊ नकोस” 
“आभा, खरंच सांगतेस की परत नेहमीसारखं तुझं बुद्धीभेद करणं चालू आहे? तुला आयुष्यात कसलीच कमतरता नाही? सगळंच मिळालंय तुला?” 
“अरमान, आयुष्य आहे!! हिंदी पिक्चर नव्हे. सगळंच मिळायला. जितक्या असोशीनं आणि जीव मोडून मी तुझ्यावर प्रेम केलं तसं माझ्यावर प्रेम करणारं कुणी मिळालंच नाही ही कमतरता आहेच ना. मिळेलही, आणि तोपर्यंत वाट बघायला मी तयार असेन..”
“मी खरंच तुझ्यावर तितकं प्रेम करतो होतो. तू कितीही डीनायलमध्ये जगलीस तरीही... हीच गोष्ट सत्य आहे.”

“एखादी गोष्ट वारंवार सांगितली म्हणून ती सत्य होत नाही.  आता मघाशी जितक्या प्रेमानं तू तिला हाक मारलीस ना... त्याच्या एक  दशांशसुद्धा माझ्यावर प्रेम केलं नाहीस. हे मला चांगलंच माहित आहे. गमतीची गोष्ट अशी की, की मी हे सत्य आरामात स्विकारू शकते. अरमान डझ नॉट लव्ह मी. हे मला पटतंय. ऍण्ड आय ऍम ओके विथ इट. मी ज्याच्यावर इतकं आणि असं प्रेम करू शकते... त्यानं उलट माझ्यावर तितकंच प्रेम करावं अशी अपेक्षाच अवाजवी आहे हे मला माहित आहे. फक्त तुला त्यामध्ये चूक दिसतंय...”
“आय डोण्ट नो, मला फक्त आणि फक्त तुला आयुष्यात सुखी बघायचंय.”
“गेली कित्येक वर्षं बघतोच आहेस. आताही बघ. सुखी मी आहेच. आणि राहीन. उलट आज तुला पाहून.. तुझ्याशी इतकं बोलताना... मी अजून सुखी झालेय. तू परत भेटायची अजिबात आशा नव्हती. आपण ते क्षणभंगुर नातं इतक्या वाईट अवस्थेमध्ये सोडलं होतं.... परत एकदा तुला भेटून धन्यवाद द्यायचे होते. तुला सॉरी म्हणायचं होतं... तुला खूप जखमा दिल्यात, त्या जखमांची भरपाई करायची होती..” 
“मघापासून एकदाही सॉरी म्हणाली नाहीस.”
“म्हणायची गरजच उरली नाही. तुझ्या जखमा भरल्यात. अगदी खपलीसुद्धा निघाली. काही व्रण शिल्लक आहे. जाणार्‍या काळासोबत तेही फिके पडतील. चार वर्षांपूर्वी जे ठसठसत होतं ते आज केवळ एक आठवण बनून राहिलंय. थोड्या दिवसांनी ही आठवणदेखील तुझ्यासाठी धूसर बनत जाईल. आभा म्हणजे दुधाळ काचेमधून दिसणारं एक प्रतिबिंब इतकंच राहील. त्यादिवशी तुला मी आज जे काय म्हणतेय ते मनापासून जाणवेल.”
“आणि तू?”
“तू माझी चिंता करूच नकोस. म्हटलं ना, कुठल्यातरी विश्वात माझ्यावर असंच आणि इतकंच प्रेम करणारं कुणीतरी असेल. असायलाच हवं!” 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गौरव प्रचंड कंटाळलेला होता. गेले तीन तासभर सतत कुणीतरी त्याच्या खोलीमध्ये येत होतं आणि सर एक ऑटोग्राफ, सर इक फोटोग्राफ म्हणत अर्धा तास पकवून जात होतं. एक तर जेटलॅगमुळे झोपेचं खोबरं झालं होतं त्यात संध्याकाळी डान्स परफॉर्मन्स असल्यानं बन्नीनं स्ट्रीक्टली नो दारू असं सांगून ठेवलं होतं. अगदी कफ सिरपसुद्धा प्यायला दिलं नाही. भरीसभर नवीनच चालू केलेल्या या डायेटनं जीव मेटाकुटीला आलेला. इवलालेसे चार घास खाऊन पोट भरल्यासारखंच वाटायचं नाही आणि बन्नी इतर काही खाऊ द्यायचा नाही. पण स्वत:ला कितीही वैताग असलातरी फॅन्सना हिरमुसलं पाठवलेलं त्याला आवडायचं नाही. बिचारे पैसे देऊन आपले पिक्चर बघतात (काही इंटरनेटवर फुकट बघणारे सोडल्यास) मग त्यांना आपण दोन मिनिटं हसून बोलू शकत नाही का? असा त्याचा साधा सरळ प्रश्न असायचा, पण आज जरा जास्तच वैताग आलेला होता. मनामधली अस्वस्थता बन्नीला बरोबर समजलेली असणार, सारखा त्याच्यावर पाळत ठेवल्यासारखं आज वागत होता. 
आता परत दारावर टकटक झाली, तेव्हा तो काहीतरी वैतागून “थोड्यावेळानं वगैरे या” असं काहीतरी म्हणणार होता. पण दारात बन्नी उभा होता. 
“गौरव, शी हॅज कम” तो अतिशय गंभीरपणे म्हणाला. इतक्या वर्षांमध्ये बन्नीनं ते नाव चुकूनही कधी घेतलं नव्हतं. “तिला भेटायचंय. येऊ देत?”
“ओके” तो कसाबसा म्हणाला. दारामधून आभा आत आली. 
“हॅलो सर” पाच वर्षांपूर्वी त्याच्या फ़्लॅटमधून रडत बाहेर पडणारी आभा जशी दिसत होती, तशीच आजची आभासुद्धा. “कसे आहात?” तिनं विचारलं. 
“फाईन” ती खोलीत आल्यापासून त्यानं एकदासुद्धा डोळे बंद केले नव्हते, न जाणो हे स्वप्नं असलं तर... पण हे स्वप्न खचितच नव्हतं. “तू कशी आहेस?” त्यानं विचारलं. 
“मी ठिक.” ती अजूनही दारापाशीच उभी होती. 
“आत ये. तुझ्या गावात शो असल्यामुळे तू भेटशील असं का कुणास ठाऊक वाटतच होतं. कॉफी घेशील? आणि प्लीज हो म्हण. तुझ्यासोबत मलाही एक कप घेता येईल. नाहीतर बन्नी माझा जीव खाईल” तो सहजपणे म्हणाला. काही झालं तरी अभिनेता होता, अभिनय करता आलाच पाहिजे. प्रत्यक्ष मनामध्ये ती समोर आल्यावर कितीही भूकंप झाले तरी वरकरणी चेहरा शांत ठेवायलाच हवा. 
“ओके, अर्धा कप चालेल, बाय द वे, तुमची ती नवीन कॉफी ब्रॅण्डची ऍड पाहिली. डिड नॉट एक्स्पेक्ट दिस फ़्रॉम यु” ती आत येऊन खुर्चीवर बसत म्हणाली. गौरव खन्नाच्या त्या जाहिरातीनं रीलीज झाल्यावर तीन तासांत “ब्रेक द इंटरनेट” पराक्रम केला होता. इतके दिवस क्युट, स्वीट, गोंडस असणारा गौरव या जाहिरातीमध्ये चक्क अर्ध्याउघड्या कपड्यांमध्ये तीन चार मॉडेलसोबत बर्‍याच आक्षेपार्ह कृती करताना दिसला होता. आयुष्यात पहिल्यांदा आशिष खन्नाला त्यानं “प्लीज काही झालं तरी ही ऍड पाहू नका,” असं सांगितलं होतं. 
“नवीन इमेज कन्सल्टंट म्हणाला की ईट्स टाईम टू ब्रेक युअर इमेज.. पर्सनली, मलाही ते फारसं आवडलेलं नाही” थर्मासमधली कॉफी मगात ओतत तो म्हणाली. 
ती हसली, किंचितशीच. “मग करायचं नाही ना, ब्रेक युअर इमेज म्हणजे तुम्हाला जे सूट होत नाही ते उगाच करायचं का? तुम्ही म्हणजे दावणीला बांधलेलं जनावर नव्हे, इन फॅक्ट त्या जाहिरातीमध्ये तुम्ही किती ऑकवर्ड दिसताय...” ती म्हणाली अणि जरा जास्तच बोललोय हे समजून अचानक गप्प बसली. 
“आलोक कसा आहे?” त्यानंच विचारलं. “तुझा छोकरा गोड आहे. त्याला सोबत आणलं नाहीस?” तिनं अचानक चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं  मग तिच्या हातात दिला. “फेसबूकवर फक्त ४५८ फ्रेन्डस आहेत तुझे. त्यात एक मी पण आहे. ऑब्व्हियसली गौरव खन्ना नावानं नाहीये! फेक अकाऊंटवर आहे. पण तुझी बर्‍यापैकी खबरबात ठेवली आहे.” 
तिच्या मनांत झालेली चलबिचल त्याला दिसली. “डोन्ट वरी..स्टॉकिंग वगैरे करत नाहीये. कधीमधी तुझे आणि आलोकचे फोटो बघतो. बिरबलाच्या खिचडीच्या गोष्टीमधला तो माणूस कसा रात्रभर थंडीत कुडकुडत राहतो, पण दूरवर असलेल्या शेकोटीकडे नजर लावून बसतो. इथं ऊब नाही, पण किमान तिथं तरी आहे. तू तुझ्या संसारात खूप सुखी आहेस, हे बघून माझंच मला बरं वाटतं. माझ्यासोबत नाही... किमान त्याच्यासोबत तरी” 
“गौरव, मी त्याही दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की...” 
“आभा, तू सांगायच्याहीआधीपासून मला माहितच होतं की. अन्यथा माझ्याकडे काय दुसरे पर्याय नव्हते. बन्नी तर वेडाच झाला होता, म्हणे दोन दिवसांत निकाल लावेन- तिला काहीही करून तुमच्यापर्यंत आणेन. म्हट्लं नको, ती स्वत:हून माझी झाली तर माझी. जबरदस्तीनं, फसवून किंवा अजून कसल्या  मार्गानं मला फक्त तिचं शरीर मिळेल.. ती कधीच नाही” 
“तुम्हाला इतक्या वाईट रीतिनं दुखवण्याचा माझा कधीच इरादा नव्हता...” 
“आय नो. या गोष्टी कुणाच्याही हातात नसतात.. इट जस्ट हॅपन्स.”
“सो एनीबडी स्पेशल इन युअर लाईफ?” 
“स्पेशल अशी आभा एकटीच होती. त्या आधी खूप लफडी केली. तिच्यानंतर मात्र कधीच नाही. सध्या एकटाच आहे. कमॉन, डोण्ट टेल मी, की तू माझ्या न्युज फॉलो करत नाहीस...”
“करते. पण गॉसिप न्युज नाही. तुम्ही नवीन प्रॉडक्शन कंपनी स्टार्ट केली तेव्हापासून त्या कंपनीच्या आणि तुमच्या न्युज.. तुमच्या आईवडलांबद्दल वाचलं”
“सीरीयसली, व्हॉट अ मेस! दे आर टूगेदर अगेन. हे म्हणजे माझ्याच आकलनापलिकडलं आहे. आधी लग्न, मग घटस्फोट, आणि अता एकत्र लिव्ह इन. आय मीन, मी सध्या त्या घरात राहतच नाहीये, लास्ट थिंग आय नीड टू हीअर इज दोज स्ट्रेंज स्क्रीम्स फ़्रॊम देअर बेडरूम.”
“मग कुठं? तुमच्या लपण्याच्या जागी?”
“नाही, वेगळं घर घेतलंय. वाचलं असशीलच... एनीवेज, इनफ अबाऊट मी, तुझं कसं चालू आहे?”
“परफेक्ट. जॉब आहे, मुंबईइतका एक्सायटिंग नाही, पण टुकूटुकू काम चालू आहे.”
“मी जर तो गाढवपणा केला नसता तर अजून माझ्याचसोबत काम करत राहिली असतीस ना?”
“वी विल नेव्हर नो. आलोकला तसंपण इकडचा चान्स आलाच होता. सो... कदाचित असंच घडलं असतं.” 

त्यानं हातातला मग खाली ठेवला. “आय रीअली मिस यु” तो गंभीरपणं म्हणाला. तिच्या खुर्चीशेजारी खालीच तिच्या पायाशी बसत तो म्हणाला, “पर्सनल लेव्हलवर तर करतोच पण प्रोफेशनली खूप. तू जितक्या सहजपणं मला समजून घेऊन काम करायचीस... निर्धास्त होतो. आभा आपलं पोर्टफोलिओ बघतेय. अगदी शूटवर पोचेपर्यंत सुद्धा मला क्रीएटीव्ह बघावी लागायची नाहीत. तू निघून गेलीस, आणि करीअरमध्ये फार झटके बसले. सलग चार फिल्म्स फ्लॉप. काम करायचा उत्साहच नव्हता. बन्नी अक्षरश: मला सेटवर ओढत न्यायचा... आय वॉज बीकमिंग ड्रंक. मला ते कळत होतं, वळतही होतं. पण वागता येत नव्हतं. आय वॉज फिनिश्ड. तुझा प्रचंड राग होता.. एकतर माझं आयुष्य बरबाद करून गेलीस. सोबत करीअरपण. सगळंच चुकत होतं... कधीकधी वाटायचं साला, काय लायकी आहे या मुलीची? मनात आणलं तर कुठलीही मुलगी आपल्यासोबत आयुष्य घालवेल. कशासाठी आपण इतकं प्रेम करतो.. काय गरज आहे.. मग एके दिवशी अचानक जाणवलं. गरज आहे म्हणून मी प्रेम करतच नाही. मी प्रेम करतो कारण तो माझा स्वभाव आहे. आभा स्पेशल नाही, मी स्पेशल आहे. समोरच्याकडून नकारच मिळेल याची प्रचंड खात्री असतानासुद्धा वेड्यासारखा इतका जीव मोडणारा मी खास आहे. तुझ्या प्रेमानं मला बरबाद केलं... पण त्याच प्रेमानं मला समृद्ध केलं. माझ्या आयुष्याचा गाभा मला दिला. गौरव खन्ना हे एक पोकळ नाव राहिलं नाही. त्या नावाला एक वेगळं निरतिशय अस्तित्व या प्रेमानं दिला. जगासाठी मी काहीच बदललो नव्हतो, हा बदल झाला फक्त माझ्यापुरता. जी शंका तुला होती... तीच मलाही होती... इज दिस जस्ट इन्फ़ॆच्युएशन? हे केवळ आकर्षण आहे का? पण तू दूर गेलीस आणि मला उत्तर मिळालं. काळासोबत क्षीण होत जाते ती वासना, आणि त्याच काळासोबत वाढत जातं ते प्रेम. तू जितकी लांब गेलीस तितकंच माझं प्रेम सशक्त राहिलं. अधिकाधिक नितळ होत गेलं. त्या प्रेमाच्या आजूबाजूला वासनेचा जो काही दर्प होता, तोही कापरासारखा उडून गेला. राहिलं ते केवळ फक्त प्रेम. या प्रेमाची गंमत माहितीये? हा मामला एकतर्फीच असतो. एकतर्फीच असायला हवा. समोरून प्रतिसाद आला की हे प्रेम परत गढुळतं. ते चांगलं की वाईट मला माहित नाही कधी कळणार पण नाही, कारण तू कधीच प्रतिसाद देणार नाहीस.. पण तरीही आयलव्ह यु. तुझ्यावर प्रेम करण्याचा मला हक्क आहे आणि तो हक्क तू माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाहीस... “
ऐकताना तिचे डोळे भरून आले. “गौरव, कितीवेळा माझी परीक्षा घ्याल? क्षणभरासाठी वाटतं की तुमच्या या गोष्टी ऐकून...”
तो हसला, “मी इतकं जीव तोडून सांगत असताना तू त्याला गोष्टी म्हणतेस, यातच सर्व काही आलं आभा! तुझी परीक्षा वगैरे घ्यायचा काहीच उद्देश नाही. पाच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा तुम्ही दोघंच होता, आता तिघं आहात आणि माझं प्रेम कितीही महान उदात्त वगैरे असलं तरी माझ्या आईवडलांच्या मूर्खपणामुळे जे मला भोगायला लागलंय... एनीवेज. या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. आणि मला आता या जरतरमध्ये खरंच गुंतायचं नाही. स्वत:शीच खेळ करत राहिल्यासारखं होतं... भूलभुलैय्यामध्ये हरवल्यासारखं.” 
“मी तुम्हाला परत एकदा सॉरी म्हणू?”
“नको. उलट मी तुला थॅंक्स म्हणतो. थॅंक्स आभा. तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मला या भावनेची खरी किंमत कधी कळालीच नसती. तुझ्यामुळे ती जाणीव झाली. तू मला अधिक श्रीमंत केलंस. माझ्या ब्रॅण्ड व्हॅल्युपेक्षा जास्त... इथं.. मनामध्ये. तू मला एक नवीन ओळख दिलीस. वेळ आली तर मी स्वत:ला किती बरबाद करू शकतो आणि तशीच वेळ आली तर मी काय करू शकतो याची जाणीव तू दिलीस. तुझ्यानकळत. तुझ्यावरच्या प्रेमानं” 
“गौरव, काय बोलावं ते समजत नाहीये...”
“मग बोलूच नकोस. फक्त अशी समोर बसून रहा. मी डोळे बंद करून जेव्हा कधी तुझा चेहरा नजरेसमोर आणेन, तेव्हा मला असाच चेहरा दिसू देत....” तो बोलत असतानाच परत एकदा दारावर टकटक झाली. तो झटकन उठून तिच्यापासून दूर गेला. तिनं डोळे पुसले. बन्नी परत आला होता. “एवरीथिंग ऑलराईट, गौरवबाबा?” त्यानं विचारलं. 
“येस.” तो म्हणाला. 
“मी निघतच होते,” आभा उठत म्हणाली. 
“नको. थांब थोडावेळ. बन्नी जरा प्लीज सुजितला बोलावलंय़ म्हणून सांग, आभा कॅन गाईड हिम” गौरवच्या या वाक्यासरशी बन्नीच्य कपाळांवर आठ्यांचं जाळं पसरलं. “आभा, सुजित माझा इमेज कन्सल्टंट. ती कॉफीची ऍड त्याच्याच सजेशनवर केली. त्याला प्लीज जरा माझ्या ब्रॅण्डसंदर्भात थोडं सांगशील.. तुझ्याइतकं परफेक्ट मला ओळखणारं कुणीच नाही.”
“सर्टनली”

बन्नीचा नाईलाज झाल्यासारखा तो खोलीबाहेर निघून गेला. “बन्नीला माझी काळजी आहे. डिप्रेशनमध्ये त्यानं खूप सावरलं. कुणी काय काय उपाय  सांगितले ते यानं केलं. सायकोलॉजिस्ट, नेचर थेरपी, अरोमा थेरपी, फ्लावर थेरपी, फ्रूट थेरपी काय नि काय. डाएट चेंज केलं. वास्तू चेंज केली. कुणी सांगितलं... अमक्या देवाला जा तर तेही सगळं झालं. मग मध्येच ते क्राफ़्ट थेरपी म्हणत मला लोकरीचे स्वेटर विणायला लावले. म्हटलं बावा, डिप्रेशन आवरतं घेतो, पण तुझी ही थेरप्यांची थेरं आवर. त्यात मध्येच एक मस्त किस्सा घडला... एक लाईफ़ कोच आहे...अगदी अतरंगी नमुना, यु शूड सी हर. बन्नी तिचे इतके गोडवे गात होता, म्हणून गेलो. तिच्याकडे जाऊन सगळी कर्मकहाणी ऐकवली. तर ती म्हणे, ये तो बॉलीवूड लव्हस्टोरी है. आप इसपे पिक्चर क्यु नही बनाते.. त्या दिवशी इतका हसलो... तू गेल्यानंतर पहिल्यांदा हसलो असेन. आपल्या आयुष्याचे धिंडवडे लोकांसाठी करमणूक वाटू शकते....” 
“नॉट अ बॅड आयडीया!”
“हो. मी ते सजेशन खरंच विचारात घेतलंय. खूप झालं हे स्टारडम. प्रॉडक्शनला सुरूवात केलीच आहे. आता डिरेक्शनपण करेन. स्क्रीप्टींग वर काम करतोय, त्याच लाईफकोचसोबत स्क्रीप्टींग. शी इज गूड..”
“तुमच्या फिल्ससाठी स्टोरी?” तिनं विचारलं. 
“सध्या करतोय ती आपली स्टोरी नक्कीच नाही. पण एक दिवस माझी प्रेमकथा नक्की करेन. महत्त्वाचं म्हणजे त्याचा एंड काय करायचा हे माझ्या हातात असेल... तेव्हा मी कुणाच्यातरी हातातली कठपुतळी नसेन, तर मी कठपुतळया नाचवणारा असेन.. शेवट माझ्या हाती..”
“मला ना तुमचं किंवा आलोकसारख्यांचं फार कौतुक वाटतं.. किती सहजपणे तुम्ही एखाद्यावर इतकं प्रेम करू शकता. कसं जमतं तुम्हाला? मी.. मला कधीच जमलं नस्तं... कधीतरी मला असं हे इतकं प्रेम करता येईल?” 
“केलंही असशील! तुलाच माहित नसेल. आभा, आपल्या प्रत्येक अस्तित्वाचे हजारो तुकडे आहेत. प्रत्येक तुकड्याचं एक विश्व आहे. त्या कुठल्यातरी विश्वामध्ये आभा कदाचित माझ्यावर इतकंच वेड्यासारखं प्रेम करत असेल. असल्याच कुठल्यातरी विश्वामध्ये ती माझी झालेली असेल.. कुठल्यातरी विश्वामध्ये...”

त्याचं वाक्य तोडत ती म्हणाली. “कदाचित आभाला प्रेमाची ही अशी अधुरी आणि दुर्दैवी किंमत समजली असेल. आय होप, असंच घडलं असावं. कूठल्यातरी विश्वामध्ये हात पुढं केला तर आपलं प्रेम हाती येऊ शकतंय हे समजत असूनही हात पुढं न करण्याचं करंटेपण तिच्या नशीबात असेल. असं तरी किमान घडायला हवंय” 
दारावर पुन्हा टकटक झाली. बन्नी आलेला असणार. 
“माहित नाही. आभा! पण एक मात्र निश्चित आहे, कुठलंही विश्व असो, कुठलाही क्षण असो. तो जिवंत आहे. कारण कुणीतरी कुणावर इतकं प्रेम करू शकतं. त्याशिवाय ही सृष्टी टिकणारच नाही..”



(समाप्त) 

Saturday 28 March 2015

इश्क विश्क (भाग ४)

“आभा, कम टू माय सेट इमीजीएटली” हा मेसेज वाचताच आभा ऑफिसमधून कृष्णनला सांगून बाहेर पडली. बन्नीला - गौरवच्या सेक्रेटरीला फोन करून त्याचं शूटिंग नक्की कुठं चालू आहे ते विचारलं आणि ती सेटवर पोचली. कसल्यातरी गाण्याचं शूटिंग चालू होतं. गौरवचा शॉट ओके होइपर्यंत ती कोपर्‍यात एका खुर्चीवर बसून राहिली. इतर कुठल्याही चित्रीकरणाला गौरव “ड्युटी” म्हणून कामावर गेल्यासारखा काम करायचा, पण गाण्याचं शूटींग हे मात्र त्याच्या मनापासून आवडीचं काम. कोरीओग्राफरला काहीबाही सूचना देत, एक एक स्टेप त्याच्या समाधानाला येईपर्यंत रीटेक्स घेत गौरवचं काम चालायचं. 
गौरव पडद्यावर जितका आकर्षक दिसायचा, तितकाच किंबहुना त्याहून काकणभर अधिकच देखणा प्रत्यक्षात दिसायचा. फिल्मी सेलीब्रीटी म्हणजे नुसता दिखाऊपणा हे आभाला या फिल्डमधेय तीन वर्षं काम करून समजलंच होतं. पण गौरवच्या बाबतीत त्या दिखाऊपणामागे एक वेगळीच किनार होती. एजन्सीमधले इतर क्लायंट्स जेव्हानुसता पैसापैसा करताना दिसायचे तेव्हा गौरव खन्ना मात्र त्याच्याच विश्वांत मग्न असायचा. अर्थात त्याला तसंही पैशांची चिंता करायचं काहीच कारण नव्हतं. पुढ्यात आलेलं काम सीन्सीअरपणं करून झालं की गौरव स्वत:चा सेलीब्रीटी असल्याचा दिखावा उतरवून ठेवायचा, आणि ते त्याला सहजपणे जमायचं. इतक्या दिवसांत आभानं त्याला कधीच स्टार असल्याचा मोठेपणा मिरवताना पाहिलं नव्हतं.  अधेमध्ये कधीतरी फायनान्शिअल न्युजपेपर्समध्ये गौरवची ब्रॅन्ड व्हॅल्यु वगैरेंचे आकडे छापलेले असायचे, ते आकडे बघून आभाला हसू यायचं. गौरवची पैशामधली खरी ब्रॅन्ड व्हॅल्यु नक्की किती आहे हे फार थोड्या जणांना माहित होतं, पण पैशाव्यतिरीक्त एक व्यक्ती म्हणून त्याची व्हॅल्यु त्याहून फार थोड्या जणांना माहित होती... 

शूटींगमध्ये ब्रेक अनाऊन्स केला. आभानं बन्नीकडून निरोप पाठवून ती सेटवर आल्याचं कळवलं. आज एकंदरीतच गौरवचा मूड थोडा डाऊन वाटत होता. बन्नीनं दहा मिनिटांनी गौरव मेकपरूममध्ये तिची वाट बघत असल्याचं सांगितलं. 
“हॅलो सर. काही अर्जण्ट काम होतं?”
“माझा उद्याचा सीजे ऍवॉर्ड्समधला परफॉर्मन्स कॅन्सल करायचा आहे. आय ऍम नॉट डूइंग इट” उजव्या डोळ्यांमधली लेन्स काढत तो म्हणाला. 
“गौरव, आपण ऑलरेडी ऍडव्हान्स घेतलाय, आता परफॉर्मन्स कॅन्सल केला तर.... आय विल लूक इन्टू द कॉन्ट्राक्ट पण फाईन भरावी लागेल.... इट्स जस्ट टेन मिनिट्स परफॉर्मन्स. तुम्हाला ईव्हेंटला पूर्ण वेळ थांबायची गरज नाही. काही अडचण असेल तर मी वेळ बदलून घेऊ शकते. यु कॅन परफ़ॉर्म एनी टाईम..वाटलं तर आपण प्रीरीकॉर्ड करून घेऊ. कधीही!!!”
गौरवनं लेन्स स्वच्छ केली आणि परत डोळ्यांत घातली. “आभा, हे सगळं मला माहित नाहिये का? फाईन आपण भरू. ऍडव्हान्स लगेच रीटर्न करू. आय डोन्ट केअर...”
“ओके सर, पण एक सजेस्ट करू का? असं कबूल करून मग आयत्यावेळी नकार देणं इज नॉट अ गूड थिंग. त्यांचा मेन टीआरपी तुमच्या पराफॉर्मन्सवर आहे. आय मीन... प्लीज तुम्ही परत एकदा विचार करा. दहाच मिनिटांचा प्रश्न आहे. डान्स रेडी आहे, इट्स जस्ट...इतक्या कमी वेळेत त्यांना दुसरा स्टार मिळणार नाही.”
“मी उद्या मुंबईमध्ये नसेन. मी आज रात्रीपासून गायब होतोय.  कुठं जाणार आणि कशासाठी हे मी कुणालाच सांगत नाहिये.. त्यामुळे मी उद्या परफॉर्म करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ माझ्या गायब होण्यामुळे तुला उद्या धावपळ करावी लागेल, विनाकारण त्रास होइल, सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसावं लागेल म्हणून तुला आत्ता सांगतोय” त्याचा आवाज अतिशय गंभीर होता. 
 “सर, इज दिस अगेन अबाऊट सम रोमॅन्टीक गेटअवे? तुम्ही इतकं अनप्रोफेशनली वागू शकत नाही. मागे पण मी तुम्हाला बोलले होते. आपण त्यांना लेखी कमिटमेंट दिली आहे, तुमच्या त्या डान्सवर त्यांचे करोडो रुपये अडकून आहेत. तुम्ही केवळ तुमच्या व्हिमवर असे निर्णय घेऊ शकत नाही. पैशांचं जाऊ दे पण तुमचं नाव खराब होइल. या घडीला तुमची येत्या दोन तीन महिन्यामध्ये रीलीज असताना आपण तसा चान्स घेऊ शकत नाही. वी सर्टनली डोन्ट नीड एनी निगेटीव्ह पब्लिसीटी. तुम्हाला सुट्टी घ्यायचीच असेल तर ती व्यवस्थित प्लान करून घ्या, असं अचानक उठून तुम्ही कुठे जाऊ शकत नाही.” मग अचानक तिला आठवलं “ओह, उद्या सायमापण तुमच्यासोबत येईल का? उद्या तिचाही परफॉर्मन्स त्याच सेरेमनीमध्ये होणार आहे. तोही कॅन्सल? दिस विल बी अ नाईटमेअर” ती बडबडत सुटली. 
या वाक्यावर मात्र गौरव कडवट हसला. “आभा, सायमासोबत माझा ब्रेकप चार महिन्यांपूर्वी झालाय. केवळ तुझ्या एजन्सीच्या सांगण्यावरून आमचे एकत्र ब्रॅन्ड प्रमोशन्स चालू आहेत. अदरवाईझ, मी तिचं तोंडही बघत नाहीये.”
“पण मग उद्याचा इव्हेंट, तुम्ही असं अचानक कॅन्सल.. सॉरी, तुमच्या ब्रेकपबद्दल माहित नव्हतं” ती वरमून म्हणाली. 
“आय नो.. बात करोडो रूपयांची आहे. प्रोफेशनलिझम इस ऍट स्टेक. स्क्रीनवरचं द मोस्ट रोमॅण्टिक कपल म्हणून लोकांनी आमच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. मी त्या पैशाला जागतोय, माझ्यामुळं कुणाचं नुकसान होऊ देणार नाही.. एनीवेज. मी कुठंच जात नाहीये. इथं सिटीमध्येच असेन, पण माझ्या घरी नाही. कुठंतरी लपून बसेन. तुला मीडीयानं विचारलंच तर माहित नाही म्हणून सांग. प्लीज. एवढीच एक रीक्वेस्ट आहे. उद्याचा अख्खा दिवस माझ्यासाठी फाए क्लेषकारक असणार आहे.” 
“ओके. ऍज यु विश. एनीथिंग एल्स सर?” तिनं उठत विचारलं. 
“नो! दॅट्स इट” ती दरवाज्याकडे जात होती तेव्हा तो अचानक म्हणाला. “उद्या माझे आईवडील डिव्होर्स फाईल करतायत. तीस वर्षांच्या मॅरीड लाईफनंतर आता ते एकमेकांसोबत राहू शकत नाहीत” 
“आय ऍम सॉरी टू हीअर.” काहीतरी बोलायचं म्ह्णून ती म्हणाली. 
“म्हणून मला चार पाच दिवस लोकांसमोर यायचं नाहीये. उद्या दुपारी अकरानंतर न्युज येईल. जो तो मला यासंदर्भात विचारेल म्हणून....” 
“इट्स ओके, सर” ती म्हणाली. “मला हे माहित नव्हतं पण आता उद्याचेच काय तुम्ही म्हणाल तिथवर सगळे इव्हेंट्स, पब्लिक ऍपीअरन्सेस मी कॅन्सल करेन. तुमच्या पीआर टीमसोबत बोलून घेईन. वी विल स्टार्ट वर्किंग ऑन इट” इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवरदेखील तिची तितकीच कोरडी प्रतिक्रिया पाहून त्याला गंमत वाटली. 
“फार नुकसान होइल का गं?” सिगरेट पेटवत त्यानं विचारलं. 
“त्याची चिंता तुम्ही कशाला करताय? झालेलं नुकसान भरून काढायची जबाबदारी माझी. पर्सनली तुम्हाला काय त्रास होत असेल तो तर मी इमॅजिनही...”

“व्हॉट त्रास? या डिव्होर्सच्या बातमीचा!!! मला गेले वर्षभर माहित आहे. त्याहीआधीपासून घरात भांडणं चालू आहेतच. इन फॅक्ट, इतके दिवस आम्ही एकत्र होतो त्याचं कारण तू आहेस हे वाक्य मी इतक्या वेळा ऐकलंय की बास. एकदा तर सांगितलंसुद्धा इतका मी जड झालो असेन तर उचला मला आणि बाल्कनीमधून फेकून द्या. म्हणजे मी मरायला मोकळा आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगायला मोकळे. नऊ दहा वर्षांचा असेन मी. साले. लग्न कशाला करतात हे लोकं, निभवायचंच नसेल तर.” तो चिडून एकटाच बोलत असल्यासारखा म्हणाला. ती काही न सुचून नुसती ऐकत राहिली. इतक्या दिवसांत पहिल्यांदा गौरव स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल असं काही बोलत होता. “एनीवेज, आता त्यांनी डीसीजन घेतलाय, लीगली डिव्होर्स घ्यायचा, सो लेट इट बी.”
आभा शांतपणे बसून ऐकत होती. “व्हॉट आर यु थिंकिंग?” गौरवने विचारलं. 
“नाही, तुम्ही सांगत होता तेच ऐकत होते....” 
“कमॉन, मनातल्या मनात या बातमीचा, स्कॅण्डलचा माझ्या ब्रॅन्ड इमेजवर किती फरक पडेल याचं कॅलक्युलेशन्स करत नव्हतीस?” त्यानं सरळ विचारलं. 
“नाही, सर.”
“खोटं बोलू नकोस. खरं सांग!”
“सर, तो विचार मनात एकदा येऊन गेलाय. पण काही झालं तरी ही बातमी तुमच्या फायद्यामध्येच येईल. मला तुमचे आईवडील घटस्फोट का घेत आहेत ते माहित नाही. पण तुमची एकंदर ट्वीन्स आणि कॉलेजकिडसमध्ये असणारी लोकप्रियता या बातमीमुळे अजून वाढेल यात मला शंका नाही. यु आर मोर व्ह्लनरेबल. पण आता याक्षणी तो विचार करायची अथवा त्याबद्दल बोलायची गरज नाही. ऑब्व्हियसली या सर्वांमुळे तुम्ही खूप दुखावले आहात. तुम्ही स्वत:ला सावरा. एकदा सर्व सुरळीत झालं की मग आपण नंतरचा विचार करू....” ती किंचित थांबली आणि मग म्हणाली, “तुम्हाला अजून एक सांगू? थोडंसं आगाऊपणाचं वाटेल पण....” तिनं त्याच्याकडं पाहिलं. त्यानं हातातली सिगरेट ऍशट्रेमध्ये विझवत तिला पुढं बोलायचा इशारा केला. 
“सर, नेक्स्ट टाईम, असं काही असेल तर मला सांगत जा. तुमच्या आणि सायमाच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, आय थॉट यु आर स्टिल टूगेदर. जर मला आधीच सांगितलं असतं तर मी अगदीच गरज असेल तर  तुम्हाला एका स्टेजवर आणेन. जिथं शक्य असेल तिथं अव्हॉइड करेन. पण जर मला माहितच नसेल तर... गूफ अप्स होत राहतील. माझ्याकडून कुठलीही तुमची वैयक्तिक गोष्ट मीडीया लिक होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. तुमच्या पब्लिक लाईफपेक्षाही तुम्हाला पर्सनल स्पेस मिळणं फार गरजेचं आहे.. एक स्टार म्हणून नवे तर एक व्यक्ती म्हणून तर नक्कीच. तुम्ही जिथं अनकंफर्टेबल असाल तर नक्की सांगा. आफ़्टर ऑल आय वर्क फॉर यु. नॉट फॉर अदर कंपनीज.”
“थॅंक्स. मी यापुढं हे कायम लक्षात ठेवेन” तो हसत म्हणाला. 
ती परत उठली आणि दारापर्यंत गेली. 
“आभा, जितक्या असोशीनं तू माझं पब्लिक लाईफ सांभाळतेस तितक्याच असोशीनं माझं प्रायव्हेट लाईफ सांभाळशील? माझी होशील? आय लव्ह यु आभा!!!” 
ती दरवाज्याजवळ थबकली. “सर, काही म्हणालात?” तिनं मागे वळून विचारलं. 
“नो, नथिंग!!” तो म्हणाला. ती रूमच्या बाहेर निघून गेल्यावर मात्र कितीतरीवेळ  चरफडत राहिला. “व्हॉट्स रॉंग विथ यु गौरव? प्रायवेट लाईफ सांभाळशील? वर्स्ट प्रपोज लाईन एवर नशीब तिनं ऐकलं नाही” तो स्वत:लाच शिव्या घालत राहिला. 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हर्षू अरमानला एकच गोष्ट सांगून सांगून थकली होती पण त्याला ते पटतच नव्हतं. “हर्षू, जर माझा गैरसमज झालाय तर तो नक्की कसा झालाय ते सांगशील? मी तुझ्यावर कसलाही दोषारोप करत नाही. पण मला त्या मुलानं फोन केला होता... त्याचा नक्की अर्थ काय आहे?”
“सिम्पल अर्थ आहे. तो माझ्यावर लाईन मारतो, पण मी तुझ्यासोबत असल्यानं... त्याला आपलं रिलेशनशिप तोडायचं आहे, इतक्कुसंही तुला कळत नाही का? तो फोनवर नक्की काय म्हणाला ते जरा सांगशील का?”
 हर्षू त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावत असल्यासारखी म्हणाली. “हे बघ, आजवर तुझ्याशी कधीही काहीही खोटं बोललेली नाही” 
हर्षूच्या या वाक्याबरोबर कुठूनतरी खिदळत हसल्याचा आवाज आला. अरमान आणि हर्षूनं त्या आवाजाकडे वळून पाहिलं. गार्डनमधे सगळ्यांत मोठं जे आंब्याचं झाड होतं, त्याच्याजवळ आभा बसलेली होती. 
“आभा,तू इथं कधी आलीस?” हर्षूनं चिडून विचारलं. “मी आणि अरमान इथं बोलत असताना चोरून ऐकायला आमच्या पाठून आलीस?”
सिगरेटची राख तिनं हलक्या हातानं झटकली. दुसर्‍या हातातलं पुस्तक ठेवलं आणि बसल्या जागेवरून ती सावकाश उठली. “हर्ष, मी सकाळी साडेदहा वाजल्यापासून इथंच बसलीये. पुस्तक वाचत. रोज या वेळेला इथंच असते. तुमचं बोलणं ऐकायला वगैरे अजिबात आले नव्हते.. इतक्या दुपारी इथं आलात, मी इथं बसलेली तुम्हाला दिसले नाही इज नॉट माय मिस्टेक. म्हटलं चला, लवबर्ड्स आलेत म्हणजे काहीतरी लाईव्ह पॉर्न बघायला मिळेल.... तर कसलं काय.. तुमची भांडणंच चालू झाली. जान दो, थोडावेळ भांडतील आणि निघून जातील.. पण सालं तुमचं एकच एक रट चालूच!! ऐकून ऐकून  मला कंटाळा आला, साला तुम्हाला गेला तासभर भांडून आला नाय.. तुझा गैरसमज झाला, तू मला खरं सांग, तुझा गैरसमज झाला, तू मला खरं सांग. इतक्यांदा बोलाय ऐवजी सरळ कॉपी पेस्ट  इतकंच का म्हणत बसत नाही?” 
“आभा, हा आमचा पर्सनल मामला आहे..” अरमान पहिल्यांदाच काहीतरी म्हणाला. “प्लीज इथून जा” 
“का? तुझ्या मारवाडी बापानं बंगल्यासोबत हे गार्डन पण विकत घेतलंय? मी आधीपासून इथं आलेय, तसंही दिवसभर मी इथंच असते. खोटं वाटलं तर सोसायटीत कुणालाही विचार. आजकाल आभा इथं चरस पित असते म्हणून बायका त्यांची पोरं खेळायला गार्डनमध्ये पाठवत नाहीत... इथं वहीवाटीचा हक्क माझा आहे. कॉलेजमधून सुट्टीसाठी दहापंधरा दिवस येऊन इथं अधिकार गाजवायचे नाहीत..”  आभा दोघांच्या अगदी  समोर येऊन उभी राहत म्हणाली. “आणि मामला जर इतकाच पर्सनल असेल तर आपापल्या बेडरूममध्ये राहून सोडवायचा, असा सार्वजनिक बागेमधे येऊन नाही” 
“चल रे अरमान, आपण माझ्या घरी जाऊन बोलूया, इथं ही बया काय बोलेल आणि काय वागेल त्याचा काही भरवसा नाही” हर्षू हलकेच अरमानच्या कानात पुटपुटली. “शी इज रीअली ऍडिक्ट”
“ओ हर्षदाताई इंजीनीअर!” आभाचा खणखणीत आवाज आला, “इतके पण वाईट दिवस आले नाहीत. अजूनतरी “व्यसनी” या लेबलपर्यंत पोचलेले नाही. अर्थात तुझी अशीच कृपा राहिली तर पोचेनसुद्धा. बट आय ऍम जस्ट ऑकेजनल युजर. तसंही माझ्या भानगडीत पडण्याआधी स्वत:च्या भानगडी निस्तरा की. काय गंमत करून ठेवलीत? त्या प्रसाद वेलणकर पोरानं अरमानला फोन केला? कशासाठी? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग!”अरमान आभाकडे मघापासून बघत होता. दोन वर्षांपूर्वी त्याला “माझी अजिबात काळजी करू नको” म्हणून डोळ्यांत पाणी आणणारी आभा ही नव्हतीच. खोचक कडवट बोलणारी, हर्षूकडे  अतितिरस्कारानं बघणारी ही आभा. 
“आभा, मी परत एकदा सांगते,हा आमचा पर्सनल मामला आहे, त्यात तू मध्ये पडायची गरज नाही!” हर्षू थडाथडा म्हणाली. 
“रीअली?” हार्षूच्या चिडक्या आवाजाला तितक्याच शांतपणे उत्तर देत आभा म्हणाली. “तू इतके दिवस माझ्या पर्सनल मामल्यामध्ये टांग घालून ठेवलीस ती आधी काढ ना.... माझ्याविरूद्ध अख्ख्या सोसायटीभर तू आणि तुझी आई जे बडबडत असता..” 
“आभा, प्लीज!” अरमान मध्येच म्हणाला. “खरंच बास कर. आय रीक्वेस्ट यु, प्लीज. तुला जे काही म्हणाबोलायचं आहे ते मला किंवा हर्षूला, आईवडलांना यात आणायची गरज नाही!”
“ओके, सॉरी.” ती म्हणाली, पण तरी तिची गुर्मी मात्र तीच राहिली. “मला वाटलं होतं आजच्या दिवसाभरामधली ब्रेकिंग न्युज म्हणजे गौरव खन्नाच्या आईवडलांचा डिव्होर्स असेल, पण त्याहून ब्रेकिंग न्युज इथं चालू आहे. सीरीयसली हर्षू!!!! अरमानसारखा बॉयफ्रेण्ड असताना अजून एक भानगड??  प्रसाद वेलणकरच आहे ना त्याचं नाव. तुझ्याच क्लासमध्ये आहे ना? अरमानला त्याच्याबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस? ये तो साला गंगा जमना सरस्वती हो गया”
“अरमान, तिचं काहीच ऐकू नकोस. चक्क खोटं बोलतेय. तिला प्रसादबद्दल कसं समजलं मला माहित नाही... पण माझ्यावर इतका तरी विश्वास ठेव.. आभा तुला सर्व खोटं सांगतेय. तिला काहीही माहित नाही, मनाला वाट्टेल ते बडबडतेय” हर्षू अरमानला विनवत म्हणाली. 
आभा परत एकदा मोठ्यानं हसली. हर्षूचा संतापानं होणारा त्रागा बघून तिला अजूनच गंमत वाटली. “मला फक्त एवढंच सांगायचंय़, अरमान, हर्षू खरं बोलतेय. तिचं त्या प्रसादबरोबर कसलंही अफेअर नाही. त्या कसल्या तुमच्या इंजीनीररिंगच्या चित्रांमध्ये तो हिला मदत करतोय, बाकी काहीही भानगड नाहीये” तिचं हे वाक्य ऐकून हर्षू गडबडली. इतकं बोलून आभा मागे वळाली. दोन पावलं चालत गार्डच्या गेटकडे निघालीच होती, तितक्यात झटक्याने ती मागे वळाली आणि मघासच्या कुजकट आवाजात हर्षूला म्हणाली, “बट ऑफकोर्स, मी सर्व खोटं सांगतेय, मला काहीही माहित नाही, मनाला वाट्टॆ ते बडबडतेय, असं आताच हर्षू म्हणाली. आता दोन मुली आहेत. दोघी तुला काहीतरी सांगताहेत. एक खरं बोलतेय, आणि एक खोटं. कोण खरं आणि कोण खोटं याचा निर्णय तुला घेणं फारसं अवघड नसावं” 
“आभा, काय चालवलं आहेस?” अरमान अचानक तिचा हात पकडून म्हणाला. “काय बोलतेस तुला तरी समजतंय?” आभानं त्याचा हात झिडकारला. “अरमान, आय नो इट व्हेरी वेल, की प्रसाद नावाच्या अत्यंत हुशार आणि सीन्सीअर मुलाला हर्षू खुळावतेय. अफ़ेअर वगैरे काही नाही, पण ऍट द सेम टाईम हर्षूनं त्या मुलाला तुझ्याबद्दल म्हणजे आधीच बॉयफ्रेण्ड असल्याबद्दल काही सांगितलेलं नाही..”
“हे सर्व तुला कसं माहित?” हर्षूनं विचारलं. 

“तुझ्या वर्गामध्ये एक मुलगी आहे, अश्विनी सुर्वे, तिचा मोठा भाऊ आशय सुर्वे आमच्या ग्रूपमध्ये आहे. आमचा ग्रूप म्हणजे आम्ही जे तथाकथित वाया गेलेली कार्टी वगैरे आहोत ते सगळे. पण या अश्विनी सुर्वी कडून मला हर्षदाच्या वर्गामध्ये नक्की काय चालू असतं ते पुरेपूर माहिती मिळते. सो प्रसाद वेलणकर हर्षूवर लाईन मारतो, हर्षू त्याचा गैरसमज होइल इथवर त्याला लाईन देते, आणि स्व्त:चा सगळा होमवर्क त्याच्याकडून फिनिश करवून घेते, आय मीन, दिस इज क्लासिक, एकेकाळी “तू माझ्झ्ही बेस्ट फ्रेण्ड ना गं आभू” म्हणत माझ्याकडूनही तेच करवून घ्यायची. त्यामुळे त्या  वेलणकरला माझ्याकडून पूर्ण सहानुभूती आहे” 
“हे तू का सांगतेस?” हर्षूनं विचारलं. “माझ्यात आणि अरमानमध्ये तुला भांडणं लावायची आहेत?”
“सॉरी, पण मी इथं येण्याआधीपासूनच तुमची भांड्णं चालू आहेत... आणि आता मी जे सांगतेय” 
“बस्स!!” अरमान अचानक ओरडला. “बस्स्स झालंय आभा. हर्षूच्या आणि माझ्यामध्ये जे काही आहे ते आम्ही बघून घेऊ. पण तू? का अशी वागतेस? किती वेळा समजावू.... आरश्यात पाहिलंस कधी? ओळखतेस तरी स्वत:ला? हाऊ यु हॅव्ह चेंज्ड” 
“अरमान, मी तुला मघासपासून सांगतेय की..” हर्षूनं मध्येच बोलायचा प्रयत्न केला. अरमाननं आभाशी इतक्या सलगीनं समजावत बोलणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. 
“मला आता या क्षणाला दोघींकडून काहीही समजावून घ्यायचंच नाहीये.” अरमान संतापून ओरडला. “हर्षू, मला नक्की काय चालू आहे ते स्पष्ट सांग, आय ऍम रेडी फ़ॉर ब्रेकप. तसंही या रिलेशनशिपमध्ये इतके प्रॉब्लेम्स आणि इगो इशूज आहेत की मी आता फेडप झालोय. सो टेल मी क्लीअरली, आणि आभा, कुणाच्याही पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. माझा फुकटचा सल्ला, आधी स्वत:चं आयुष्य किती मेस्डअप आहे ते बघ” इतकं बोलून अरमान ताडताड तिथून निघून गेला. हर्षू पाठीमागून अरमान अरमान ओरडत राहिली, खरं तर तिला अरमानच्या मागोमाग धावत जायचं होतं, पण आभानं तिचा डावं मनगट घट्ट धरून ठेवलं होतं, एका हातानं ते सोडवायचा तिचा प्रयत्न चालू होता, “अरमान ऐक तरी प्लीज अरमान, मला बोलू देत” ती ओरडत राहिली. पण  आभानं तिचा हात सोडला नाही. 
अरमान त्याच्या बंगल्याच्या गेटमधून आत गेला, त्याबरोबर आभानं हर्षूचा हात सोडला. हर्षूनं खाच्च्करून आभाला एक कानाखाली  मारली. “हरामखोर, काय गरज होती मध्ये बोलायची?” हर्षू जोरात किंचाळली. 
“नशीब समज, मी अरमानला त्याच प्रसादसोबत तू तीन दिवस “फिरायला” म्हणून महाबळॆश्वरला गेली होतीस हे सांगितलं नाही... सांगू? आं? सांगू काय?” आभाचा आवाज अजूनही तितकाच शांत होता. 

“आय जस्ट न्यु इट,” हर्षू परत ओरडली. “तू अजून अरमानला...”
“येस्स, आय स्टिल लव्ह हिम. मी ही गोष्ट तुला नववीमध्ये असताना सांगितली होती. किती  वर्षं झालीत? तरी आय स्टिल लव्ह हिम..”
“ओह, म्ह्णून तू आमच्या दोघांचा ब्रेकप होण्यासाठी इतकं सर्व करतेस?”
“हर्षू, मला जर तुझं आणि अरमानचं रिलेशनशिप तोडायचंच असेल तर त्यासाठी मला पाच मिनीटंही लागणार नाहीत.  पण मला तसलं काहीही करायचं नाहीये. तुझ्याइतकी खालच्या लेव्हलला मी उतरू शकत नाही. पण एक लक्षात ठेव, ज्याक्षणी अरमानचं आणि तुझं नातं संपेल त्यानंतर नाही अरमानला माझ्यापाठी लावला तर नावाची आभा नाही. त्या दिवशी तुला येऊन स्वत:हून सांगेन, इट्स ऑफिशीअल, अरमान माझा झाला. तो दिवस यायला नको हवा असेल तर हे आता सगळे नखरे चालू आहेत ते बंद कर. अरमान हातून निघाला तर परत मिळणार नाही.”

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


दरवाज्यावरची बेल ती संतापून वाजवत राहिली. जवळ जवळ पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. आधी तिला वाटलं बन्नी किंवा अजून एखादा नोकर दार उघडेल. पण समोर चक्क गौरव उभा होता. 
“आभा, इथं कशी काय?” त्यानं आश्च्चर्यानं विचारलं. “हा पत्ता कुणी दिला?”
“तुमच्या वडलांनी. गेले चार दिवस मी रोज तुमच्या घरी जातेय. फक्त एकदा  तुम्हाला भेटायचं होतं, पण वारंवार मला फक्त इतकंच उत्तर मिळतंय की तुम्ही मला भेटणार नाही. शेवटी काल माझ्यावर दया दाखवून आशिषसरांनी मला तुमच्या या फ्लॅटबद्दल सांगितलं, मी फोन केला तर तुम्ही माझा फोन घेतासुद्धा नाहीये. का?” 
“आत ये,” तो दरवाज्यामधून बाजूला सरकत म्हणाला, “या बिल्डिंगमध्ये मी राहतोय हे कुणाला माहित नाही. ही माझी लपून बसायची जागा आहे.” 
आभा आतमध्ये आली. हा फ़्लॅट एका सुपरस्टारचा आहे, असं कुणाला सांगूनही खरं वाटलं नसतं इतका साधा होता. प्लास्टिकच्या दोन तीन खुर्च्या, आणि एक साधं लाकडी टेबल इतकंच फर्निचर. नाही म्हणायला भिंतीवर एक मोठा टीव्ही लावलेला होता. 
आभानं आत आल्यावर हातातलं प्रिंट आऊटचं बाड गौरवच्या हातात दिलं. “हे काय??” त्यानं विचारलं. 
“माझी गेल्या अडीच वर्षांची मेहनत.  सर, प्लीज एकदा हे सर्व वचून बघा.तुम्ही अडीच वर्षापूर्वी केवळ एक हिट  फिल्म्स देणारे अभिनेते होता, तुम्हाला मार्केटमध्ये ब्रॅण्ड मिडास मी बनवलंय. निव्वळ मी एकटीनं, तुमची प्रत्येक छोट्यातली छोटी इच्छा पूर्ण करत, तुमचे सगळे उलट सुलट नखरे सहन करत, रात्रंदिवस एक करत मी काम केलंय... प्लीज हे सगळे रिपोर्ट एकदा वाचून बघा आणि मग मला सांगा...  
त्यानं हातातले ते प्रिंट आऊट टेबलवर ठेवले. “आभा, तू माझ्यासाठी किती काय केलंस त्याच्यासाठी मला या असल्या कागदांची गरज नाही... आय नो इट वेरी वेल...”
“मग का?” पहिल्यांदा आभा संतापानं बोलली. “का? तुम्ही असं मेल पाठ्वलंय? माझ्या एजन्सीला तुम्ही कळवलंय की तुम्ही आमच्यासोबत काम करणं थांबवता, बीकॉज यु हॅड सम पर्सनल इशुज विथ मी. मी असं नक्की काय केलंय ते तरी मला कळू देत... गेले आठ दिवस तुम्हाला फोन करतेय. बन्नीला फोन करतेय. तुमच्या घरी जातेय.... गौरव, इतक्या फिल्मी दिखाऊ लोकांमध्ये मला कायम असं वाटलं की तुम्ही फार सच्चे आहात. पण तुम्हीही तसेच... खोटारडे!” बोलताना अचानक तिच्या डोळ्यांतून पाणी आलं “डू यु रीअलाईज... मला एजन्सीनं शो कॉज नोटीस दिली आहे. सगळ्यांत महत्त्वाचा क्लायंट सोडून का गेला... आणि मला कारणं माहितच नाहीत. आय डोण्ट नो... तुम्ही असं का केलंत? जर माझ्या कामाबद्दल तुम्ही समाधानी नव्हता, तर एजन्सीनं अधिक अनुभवी कुणीतरी तुम्हाला दिलं असतं... पण हे असं करून...” ती रडायला लागली. 
त्यानं दोन पावलं पुढं येऊन तिचे डोळे पुसले. तिला हाताशी धरून एका खुर्चीवर बसवलं. “आय ऍम सॉरी आभा, आय ऍम रीअली सॉरी. त्या दिवशी मी तुझ्या एजन्सीला मेल पाठवून कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला सांगितलं हे खरं आहे. पण माझ्या त्या वाक्यामुळं असा अर्थ घेतला जाईल हे लक्षात आलं नाही. सॉरी. मी उद्या कृष्णनला फोन करेन आणि यात तुझी काहीच चूक नाही हे सांगेन” 
“पण मुळात तुम्ही असं केलंतच का? माझ्या कामामध्ये तुम्हाला काय चूक वाटलं? काय चुकलं?” तिनं विचारलं. 
तो स्वत:शीच हसला. “सॉरी म्हटलं ना, तुझ्या कामाचा इश्यु कधीच नव्हता, माझा काहीतरी पर्सनल... एनीवेज, लेट्स नॉट टॉक अबाऊट इट.”
“काय झालंय ते तरी मला कळेल? तुम्ही गेले पंधरा दिवस गायब आहात. कुठे आहात कुणालाच माहित नाही. बन्नी तर माझ्याशी नीट बोलतच नाही. तुमचे सगळे इव्हेंट्स आणि शोज कॅन्सल इतकंच समजतंय... तुम्ही इतके का बदललाय? खूप दमल्यासारखे दिसताय. काही मोठा इशु आहे का?” तिनं काळजीनं विचारलं. 
तो काहीच बोलला नाही. तिनं टेबलावर ठेवलेले कागद उचलले. “मला माहित आहे, तुमच्य पर्सनल लाईफबद्दल विचारायचा काहीच संबंध नाही.. तरीही...”
“प्लीज विचार!” तिच्यासमोरच्या खुर्चीवर बसत तो म्हणाला. “प्लीज, आभा! एकदा... केवळ एकदा विचार. माझ्या पर्सनल लाईफबद्दल. सुपरस्टार गौरव खन्नाच्या ईव्हेंट्सबद्द्दल आणि शोज आणि जाहिरातींबद्दल नाही.. तर या हाडामांसाच्या गौरव खन्नाच्या आयुष्याबद्दल विचार. मला फक्त एकदाच विचार की मी इथं येऊन का राहतोय. ऍक्युट डिप्रेशनची शक्यता असतानासुद्धा मी इथं राहतोय. माझे आईवडील कधी नव्हे ते माझी चिंता करतायत. माझा कुठल्याही क्षणी नर्वस ब्रेकडाऊन होइल हे असं सगळं का झालं ते विचार..” बोलता बोलता त्यानं तिचा हात धरला.  “गेल्या आठ दिवसांमध्ये आत्महत्येचा मी किती वेळा विचार केलाय ते विचार” 
“गौरव, हे तुम्ही असं का बोलताय? एवढं डिप्रेस होण्यासारखं काय घड्लंय?” 
“लव्ह! प्रेम! इश्क” तो सावकाश म्हणाला. “आम्ही पिक्चरवाल्यांनी या शब्दांचा बाजार मांडलाय. पैशाला पासरीसारखे हे शब्द इकडून तिकडे वापरत असतो. पण प्रत्यक्षात... आभा, आय लव्ह यु.”
“काय?” आभा अचानक उठून उभी राहिली. “हे तुम्ही काय बोलताय. तुम्हाला तरी कळतंय?”  
“कळत असतं तर इतक्या दिवसांत बोललो नस्तो का? वर्षभरापासून तुला सांगायचंय. नक्की कधी आवडायला लागलीस मलाही माहित नाही. पण हळूहळू मला माझी लाईफ पार्टनर म्हणून तूच दिसायला लागलीस. पण तुला सांगायची हिंमत मात्र कधीह्च आली नाही.... आणि मी काही सांगायआधीच तू....”
“गौरव, आय ऍम मॅरीड!” 
“माहित आहे. तू लग्न केलंस, मी तुझ्या दृष्टीनं कायम एक प्रोफेशनल कमिटमेंट इतकाच होतो. माझ्या स्वप्नांमध्ये केवळ तू आणि तूच असताना तुझ्या आयुष्यात मात्र गौरव खन्ना एक सेलीब्रीटी इतकंच नातं राहिलं.... आभा मी गेले पंधरा दिवस याच सत्याचा सामना करायचा प्रयत्न करतोय. आभा आता आपली राहिली नाही. यापुढेही कधी होणार नाही. तिनं तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला. अरेंज मॅरेज... ज्याला ती आयुष्यात एकदाही भेटली नव्हती अशी व्यक्ती... तो तिचा नवरा बनू शकतो. पण मी... गेली अडीच वर्षं तिच्यासोबत आहे. दिवस रात्र, महिने, वर्षं... पण तरी मी तिचा कुणीही नाही... नाही सहन होत आभा. हे मला आता सहन होत नाहिये” 
ती किंचित घुटमळली. “सॉरी, गौरव...”
“आभा, जर आता याक्षणी मी मनात आणलं ना, तर काहीही करून तुला मिळवू शकेन. तसे विचार माझ्या मनात आलेच नाहीत असं नाही. चिक्कार पैसा आहे, पॉवर आहे, वशीला आहे. तुला आणि तुझ्या नवर्‍याला दूरच करायचं म्हटलं तर फारसं कठीण नाही” तिनं घाबरून त्याच्याकडं पाहिलं. “पण तो प्रत्येक रस्ता फक्त आभाला माझ्यापर्यंत घेऊन येतो, आभाला माझ्यापर्यंत पोचवत नाही, तिला “माझी” करत नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर काम न करायचं ठरवलंय. म्हणून मी तुझी एजन्सीच सोडली. कसं शक्य तरी आहे? तू आजूबाजूलाच अस्ताना मी स्वत:ला समजावणं...”
“मी तुमच्यापासून दूर जायला हवी...”
“किंवा माझ्या खूप जवळ यायला हवीस..” तो किंचित पुढं येऊन म्हणाला. “आभा, इतक्या वर्षांत हिंमत झाली नाही... आज विचारतोय. माझ्यासोबत येशील? माझी होशील? जगातलं प्रत्येक सुख, प्रत्येक हौसमौज तुझ्या पायाशी आणून टाकेन. कधीही कसलीही कमी पडू देणार नाही.. आणि फक्त पैशाचं बोलत नाही. प्रत्येक क्षण तुझ्यावर इतकंच किंबहुना याहून जास्त प्रेम करत राहीन. आजवर मी कधीच हरलो नाहिये. अता या प्रेमात पण मला जिंकू दे. माझा हात धरून चल.”
“आलोक... माझा नवरा”
“ही कॅन अंडरस्टॅण्ड. ही हॅज टू. आपण दोघं एकमेकांसाठी बनलो आहोत. तू माझ्यासाठी बनली आहेस.. आलोकबरोबर तुझं लग्न हे केवळ घरचे म्हणाले म्हनून झालंय. आय नो, मी माहिती काढलीये. तुझं त्याच्यावर किंवा त्याचं तुझ्यावर प्रेम नाही. मी करतो तितकं तर नक्कीच नाही.. प्लीज आभा! एकदा हो म्हण. पुढची सर्व जबाबदारी माझी.  तू फक्त हो म्हण!!!” 



(क्रमश: ) 


इश्क विश्क (भाग ५)


Tuesday 24 March 2015

इश्क विश्क (भाग ३)



इश्क विश्क (भाग २)



अंधार्‍या कॉन्फरन्सरूममध्ये  कृष्णन एकटाच बोलत होता. “इफ वी लूक ऍट दिस  ग्राफ, व्हेर टोटल ब्रॅण्ड व्हॅल्यु ऑफ टॉप टेन ऍक्टर्स, वी गेट अ टेन पर्सेण्ट ऑफ मार्ज्जिन आबाऊट ऍक्ट्रेसेस ऍज वेल ऍड देन वी कंबाईन दिस ग्राफ विथ क्रिकेटर्स ऍन्ड अदर सेलीब्रीटीज, वी अंडरस्टॅण्ड दॅट...” 
“वन सेकंड!” गौरव खन्नाचा आवाज आला. “लाईट्स प्लीज” कृष्णननं प्रेझेंटेशन पॉज केलं. कुणीतरी दिवे लावले. प्रेझेण्टेशन चालू होऊन दोन मिनिटं पण झाली नव्हती. कृष्णन आताशी ब्रॅण्ड इमेजसंदर्भामध्ये बोलायला सुरूवात करत होताच की गौरवनं मध्येच थांबवलं होतं. “सॉरी टू डिस्टर्ब. बट आय नीड अ ब्रेक” गौरव म्हणाला. 
कुणी काही म्हणायचा प्रश्नच नव्हता. गौरव खन्ना सेलीब्रीटी होता, शिवाय क्लायंट म्हणून या एजन्सीकडे पहिल्यांदाच येत होता. जोपर्यंत तीन वर्षासाठी कॉन्ट्राक्ट साईन करत नाही तो पर्यंत तो म्हणेल ती पूर्व दिशा! 
दोन मिनिटांनी गौरव त्या ऑफिसच्या बाल्कनीमध्ये उभं राहून सिगरेट ओढत होता. काहीतरी आठवल्यासारखं त्यानं कृष्णनला हाक मारली. “ती कॉन्फरन्सरूममध्ये मुलगी बसली होती ना, ऑफव्हाईट ड्रेसमध्ये, तिला जरा पाठवशील. एक छोटंसं काम होतं” 
“यास्सर, एनिथिंग  एल्स सार?” कृष्णननं विचारल. 
“नथिंग” 
आभा टीममधली सर्वात ज्युनिअर होती, तिचं काम कॉन्फरन्सरूममध्ये बसून मीटींगची मिनट्स बनवणे वगैरे तसलं. क्लायंट हॅण्डल करणं तिचं कामच नव्हतं. आता या हीरोनं तिलाच भेटायचं म्हटल्यावर कृष्णननं तिला लगेच बोलावून घेतलं. 
“हॅलो सर” ती बाल्कनीमध्ये येत म्हणाली. 
“हाय, गौरव खन्ना” आपलं नाव जणू तिला माहितीच नसावं अशा पद्धतीनं तो हात पुढं करत म्हणाला, तिनं हात घेऊन हसून लगेच सांगितलं. “हॅलो, मायसेल्फ आभा” 
“ओह,” त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्य आलं. “मला वाटलेलं ते माणसाचं नाव असतं. मुलीचं पहिल्यांदा ऐकलं”
“सर, इट्स आभा! भ फॉर....”
“ओह ओके.. ओके. गॉट इट! गॉट इट.” तो हसत म्हणाला. “यु स्मोक?”
“नो, सर!  यु वॉन्टेड समथिंग एल्स?” 
“आभा, तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काये?” त्यानं विचारलं. 
“सर, एम बी ए, मार्केटींग” 
“हा कृष्णन तुझा बॉस आहे?”
“येस सर”
“तो प्रेझेण्टेशनमध्ये जे काय बोलत होता ते तुला समजतं?” 
“ऑफ कोर्स सर” 
“ग्रेट! मग माझं एक काम करशील? प्लीज तो जे काय बोलत होता ते जरा एका दहावी नापास माणसाला समजू शकेल अशा भाषेत समजावून सांगशील??”
“डेफिनेटली सर. प्रेझेण्टेशन संपल्यावर...”
“नो. आय हेट दोज. साले हरामखोर दोन स्लाईडनंतर पाय चार्ट दाखवतात आणि मग मला भूक लागते. डायेट बोंबलतं सो आय थिंक आय डोण्ट नीड  दोज प्रेझेण्टेशन्स.”
“सर, तुमच्या ब्रॅण्ड इमेज डेव्हलपमेंटसाठी ते सगळं गरजेचं आहे. आय मीन... शेवटी यात फायदा तर तुमचाच आहे ना! कॉन्ट्राक्ट साईन करण्याआधी आम्ही काय करू शकतो, आमचे डीलीव्हरेबल्स काय आहेत आणि आमच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत ते क्लीअर व्हायला नको. करोडो रूपयांची बात आहे!”
“आभा, बात करोडो रूपयांची  नाही, बात मला जगासमोर तुम्ही कशापद्धतीनं विकणार आहात त्याची आहे. फ्रॅंकली स्पीकिंग, मला अशी एजन्सी हवी, जी केवळ मला विकण्यसाठी नाही तर माझ्या समाधानासाठीसुध्दा काम करेल. मला समजून घेऊन, माझ्या परीनं काम करणारी” 
“नक्कीच सर, ऍट दिस एजन्सी वी गिव्ह सो मच अटेन्शन टू युअर पर्सनल इंटरेस्ट्स..आणि...”
“आभा, आय डोण्ट नीड ऍन एजन्सी, आय नीड अ  पर्सन. गूड पर्सन टू वर्क विथ. विल यु हॅण्डल माय अकाऊंट?” 
“सर, आय ऍम व्हेरी ज्युनिअर... आय कान्ट से”
“एक्झाक्टली माझ्याच वयाची आहेस. जर तू अकाऊंट हॅण्डल करणार असलीस तर मी आता लगेच कॉन्टाक्ट साईन करेन...पण कायम लक्षात ठेव. तुला माझ्यासोबत काम करावं लागेल. एजन्सीसाठी नाही तर गौरव खन्नासोबत.” 
हे ऐकल्यावर कृष्णन आनंदानं नाचायचाच शिल्लक राहिला होता. चार महिन्यांपूर्वी जॉइन झालेल्या आभानं एका तासांत इंडस्ट्रीचा सुपरस्टार एजन्सीच्या पोर्टफोलिओमध्ये आणून ठेवला होता. 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


“हा भातुकलीचा खेळ वाटतोय का तुला?” अरमाननं तिला चिडून विचारलं. “तू असा निर्णय घेऊच कसा शकतेस?”
“अरमान, ट्राय टू अंडरस्टॅण्ड. हे माझ्यासाठी पण फार सोपं नाहीये” आभा त्याला समजावत म्हणाली. 
“मी आता रात्रीच्या ट्रेनने घरी निघतोय. गावाला जाऊन मला आईबाबांना, तुझ्या आईबाबांना सांगायचं आहे, लग्नासाठी तयारी करायची आहे. आणि आता तू म्हणतेस की आपण हे नातं संपवू या. आय डोण्ट अंडरस्टॅण्ड ऍट ऑल.” 
ती काही न बोलता तशीच सोफ्यावर शांत बसून राहिली. तो काही न सुचून मोबाईलमधले मेसेजेस वाचत राहिला. थोड्या वेळानं त्यानंच विचारलं. “का? काय कारण?” 
तिचे डोळे पाण्यानं भरले होते. “आपण कधीच एकत्र खुश राहू शकणार नाही. शी विल मेक इट शुअर” 
“आभा, तू हर्षदा नावाच्या मुलीबद्दल बोलत असलीस तर मी तिला ओळखत नाही. माझ्या लाईफमध्ये अशी कुठलीही मुलगी कधीच नव्ह्ती” 
“हे असं बोलणं फार सोपं असतं. पण प्रत्यक्षात....” त्यानं हातातला मोबाईल खाली ठेवला आणि तिचे खांदे धरले. “काय प्रत्यक्षात? काय... गेली दोन वर्षे आपण एकत्र आहोत. दोन वर्षं. त्या दोन वर्षांमध्ये आपण कधीच खुश नव्हतो? शी इज जस्ट मेसिंग विथ यु” 
“अरमान, प्रश्न तिचा नाहिये. ती जरी तुझ्या आयुष्यामधून गेली तरी ग्रहण बनून कायम आपल्या दोघांमध्ये येत राहणार. तू जितक्या ईझीली म्हणतोस की तू तिला विसरलास... खरंच असं विसरणं शक्य असतं का?”
“मी आजमध्ये जगणारा माणूस आहे. ती माझ्यासाठी फक्त भूतकाळ आहे. मी कॉलेज संपताना तिच्यासोबत असलेलं प्रत्येक नातं संपवलं होतं. मी तिला विसरलो. त्यानंतर तू मला इथं भेटलीस. आपलं नातं नव्यानं चालू झालं. आणि मी या नात्यामध्ये प्रचंड समाधानी आहे, माझं आयुष्य मला तुझ्यासोबत काढायला आवडेल. मला तू लाईफ पार्टनर म्हणून हवीस. हे मी तुला आज पहिल्यांदा सांगतोय असं नाही. याहीआधी कित्येकदा सांगितलंय. ते तुला तेव्हा मान्य होतं.... मग आज अचानक तू एकतर्फी हा निर्णय का घेतेस? अशी कूठली इनसीक्युरीटी तुझ्या मनात आहे ते तरी समजू देत.”
“अरमान, हर्षू....”
“मला ते नाव खरंच ऐकायचं नाही. हो! माझं तिच्यासोबत तीन साडेतीन वर्षं अफेअर होतं. येस्स, आम्ही एकत्र आयुष्याची स्वप्नं रंगवली होती. पण जेव्हा ते नातं मोडलं तेव्हा ती स्वप्नं पण मोडली. आता या क्षणाला माझ्या आयुष्यात तू आहेस. यापुढेही तूच रहावीस असं वाटतंय. प्लीज, असा आततायी निर्णय घेऊ नकोस” तो तिला विनवत म्हणाला. 
“अरमान, अता मला यावर काहीच बोलायचं नाही... मी निर्णय घेतलाय. माझ्यापरीनं तो निर्णय बरोबर आहे. आता त्यात बदल होणार नाही...” 
“तुझ्या या निर्णयामुळे कितीजणांचं जीवन बरबाद होइल याची तुला कल्पना तरी आहे? माझं तर नक्कीच. तूतरी सुखी होशील? आभा, मी प्रेम केलंय तुझ्यावर. टीनेजमधलं भानगडीवालं प्रेम नाही. जे मनाच्या असं आतपासून वाटतं ते प्रेम. तू जर असं मध्येच मला सोडलंस तर...” तिनं त्याचं वाक्य मध्येच सोडलं. “तू माझ्यावर प्रेम केलंस? कधी? अरमान, तू माझ्याजवळ आलास ते हर्षूवर सूड घेण्यासाठी. तिला हे दाखवून द्यायला की तिला सोडून पण तू किती खुश आहेस.” 
“हे तुला कुणी सांगितलं? आभा, हर्षू जे सांगते ते ऐकू नकोस. स्वत:च्या अकलेनं काम घे”
“नोप! मला मूर्खाला अक्कलच नाही ना. बावळट, बावळट आहे मी. जरा अक्कल असती तर त्या दिवशीच तुला सांगितलं असतं, अरमान परत निघून जा. पण नाही, तुझा ब्रेकप झाला म्हणून तुझ्याबरोबर दारू पित बसले. तुझं रडगाणं ऐकत राहिले.... तेव्हाच चुकलं माझं” 
“काही चुकलेलं नाही आणि काहीच बदललेलं नाही. हा जो गैरसमज तुझ्या मनात आहे तो काढून टाक. आभा, यु नो मी.. प्लीज! पुन्हा एकदा सांगतोय. हर्षू तुझ्या मनामध्ये विष कालवतेय”
“आर यु शुअर... हर्षूच विष कालवतेय?”
“मग दुसर्‍या कुणाचा यामध्ये  संबंध आहे का? हर्षू आपल्यामध्ये येतेय हे तुला अजून समजत कसं नाही..” 
“अरमान, फक्त आजच्या प्रसंगाचा विचार करू नकोस. सगळ्याच घटना लक्षात घे....कदाचित हर्षू खरं बोलत असेल आणि मी खोटं सांगितलं असेल!”
“कसल्या घटना? आभा, वी आर गेटींग मॅरीड. यापलिकडे मला कसलाही विचार करायचाच नाहीये. तू हे असले बुद्धीभेद करणं बंद कर! काय हर्षू खरं सांगते की तू खोटं त्याच्याशी मला देणंघेणं नाही. मला फक्त एक गोष्ट माहित आहे.. आय लव्ह यु. बास्स. आणि हे तुलाही चांगलंच माहित आहे की यु लव्ह मी. बरोबर ना?”
“अरमान, हे इतकं सोपं नाहीये. हर्षूच्या कॉलेज ऍडमिशनच्य आधी मी तुला खोटं सांगितलं होतं... माझ्याबद्दल हर्षूबद्दल आणि एकंदरीतच. तू दोन तीनदा घरी येऊन मला शहाणपणाच्या चार गोष्टी शिकवाय्च्य बाता करायला लागलास... म्ह्णून मीही म्हटलं थांब तुझी बोलतीच बंद करते. आणि  तेव्हाच खोटं सांगितलं तू आवडतोस वगैरे. पण माझ्या त्या खोट्यामुळं तुझ्यात आणि हर्षूमध्ये भांडणांना सुरूवात होइल असं चुकूनही वाटलं नव्हतं... तरी तुम्ही नंतर दोनेक वर्षं रिलेशनशिपमध्ये होतात....”
“हो, लॉंग डिस्टन रिलेशनशिपचा तो एक तोटा असतो. ब्रेकप पटकन होत नाही...पण ते कारण खचितच नव्हतं. तू मला सांगितलंस आणि मग नंतर..”
“मी ते विसरून गेलो. बरोबर ना? अरमान, मी माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी गोष्ट तुला सांगितली आणि तू वि स रू न गेलास?” 
“आभा, ते पाच वर्षांपूर्वी. मी आजबद्दल बोलतेय. तेव्हा तू काय बोललीस आणि मी काय केलं ते जरा बाजूला ठेवू. हे हर्षू नावाचं कॅरेक्टर बाजूला ठेवू... आणि फक्त आपल्या दोघांबद्दल बोलू...”
“फक्त आपल्या दोघांबद्दल? व्हॉट डू यु मीन बाय दिस?”
“एक मिनिट... आभा, त्या रात्री तू मला दोन व्हर्जन सांगितली होतीस. म्हणजे आता तुला असं म्हणायचं आहे की... आय ऍम अ बिट कन्फ़्युज्ड... कुठलं व्हर्जन खरं आहे?”
आभानं बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि अरमानच्या अंगावर फेकला. “साल्या, दोन वर्षं माझ्यासोबत झोपतोस तरी अजून विचारतोस कुठ्लं व्हर्जन खरं आहे.” त्यानं तिचा नेम चुकवला तरी तिच्या या संतापाचं त्याला इतक्या बिकट क्षणी पण हसू आलं. 
“आभा, दिस इज यु, दिस क्रेझी गर्ल. जे मनात आलं ते केलं, पश्चातबुद्धीला तिथं स्थानच नाही. आयुष्यात इतका वेडेपणा केलास. कधीच कुणाचंही ऐकलं नाहीस मग आताच का बिचकतेस?” तो अचानक गंभीर होत म्हणाला. “तू आता काहीही म्हण पण उद्या मी वनिताकाकीशी बोलणार आहे. तुझ्या घरामध्ये कुणीही विरोध करणार नाही. माझ्या घरामध्ये थोडासा झाला तर..”
“थोडासा? अरमान शहा. तुमचा आणी माझा धर्म वेगळा. खाणंपिणं वेगळं. शिवाय प्रेमाभाभींना मी काय आहे आणि काय काय केलंय याचा सगळा रेकॉर्ड माहित आहे...”
“द पॉईण्ट इज, मी आईला कसंही करून कन्व्हिन्स करेन. तुझा काय इतिहास असेल त्यासकट आणि धर्म वगैरे ते नंतर बघू. अगदीच वेळ आली तर...”
“अरमान, माझा निर्णय अंतिम आहे. त्यात बदल होणार नाही. आपलं नातं संपलं” ती ठामपणे म्हणाली. 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

अचानक ऐकू आलेल्या किंकाळ्यांनी आलोकला जाग आली, दोनेक सेकंद त्याला काहीच उमजेना. धडपडत त्यानं झोपमध्येच खोलीमधला दिवा लावला. त्याच्या बाजूला झोपलेली आभा किंचाळत होती. त्यानं तिला हलवून हलवून जागं करायचा प्रयत्न केला. पण  स्वत:चा उजवा दंड डाव्या हातानं घट्ट धरून ती ओरडतच राहिली. शेवटी त्यानं ग्लासमधलं पाणी तिच्या तोंडावर मारलं, तेव्हा कुठं तिला जाग आली. 
“आभा, स्वप्न पडलं का?” त्यानं विचारलं. ती अजूनही त्या वाईट स्वप्नामध्येच जगत असल्यासारखी घाबरलेली होती. दचकून तिनं स्वत:चाच उजवा दंड परत परत चाचपून पाहिला. “आर यु ओके?” आलोकनं विचारलं. ती किंचित सावरली. आपल्या बाजूला बसलेला माणूस कुणी परका अनोळखी नसून महिन्याभरापूर्वीच लग्न झालेला आपला नवरा आहे हे हळूहळू तिच्या लक्षात आलं. 
“फार वाईट स्वप्नं पडलं” ती सावकाश म्हणाली. “मी घरात होते, कुणीतरी दार वाजवलं, आय होलमधून पाहिलं तर ओळखीची व्यक्ती होती. कोण ते आठवत नाही. पण मी दरवाजा उघडला. आणि मग त्या माणसानं हातातला कोयता माझ्यावर मारला. नशीब इतकंच की त्याचा हल्ला झाल्यावर लगेच मी आत  जायला पळाले आणि तो कोयता असा... इथे.... इथे माझ्या दंडावर बसला. सगळं रक्त उडालं...”
आलोकनं तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. “डोण्ट वरी. कधीकधी फार टेन्शनमध्ये असलं की अशी वाईट स्वप्नं पडतात. त्यात तुला हे घर नवीन.. सगळंच नवीन..इट्स ओके” 
“आय ऍम सॉरी, माझ्यामुळं तुझी झोपमोड झाली. किती वाजलेत?”  
तिच्या कपाळांवर आलेला घाम हलकेच पुसत तो म्हणाला. “अडीच वगैरे झाले असतील आणि माझी झोपमोड वगैरे काही नाही. आता निवांत झोप. घाबरू नकोस. मी आहे ना?” तिला जवळ कुशीत घेऊन थोपटत तो म्हणाला. 
“मला याआधी असली स्वप्नं कधीच पडली नाहीत” ती सावकाश म्हणाली. “स्वप्नं वाटतच नाही, असं वाटतंय की खरंच कुणीतरी..”
“श्श!! जास्त विचार करू नकोस. ते स्वप्नंच होतं. मी इथं असताना कुणी तुला काही करू शकणार नाही” 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

“अरमान, वेड लागलंय तुला? वेड?” राहुल त्याच्यावर ओरडला. इतक्या रात्री अरमानचा फोन आल्यावर त्याला दोनेक मिनिटं काहीच सुचलं नव्हतं. मुळात अरमानला नक्की काय म्ह्णायचं आहे तेच त्याला समजत नव्हतं. पण अरमाननं फोन आभाच्या हातात दिला... आभाचा तो आवाज ऐकल्या ऐकल्या राहुल त्याच्या फ़्लॅटवरून निघाला होता. अवघ्या पंधरा मिनिटांत टॅक्सी पकडून तो हॉस्पिटलमध्ये पोचला होता. 
“अरे गाढवा, सहा टाके पडलेत तिच्या हाताला. काय केलंस तू नक्की?” राहुलनं भांबावून विचारलं. 
“आय डोण्ट नो... मला माहित नाही...” अरमान कसाबसा म्हणाला. गेल्या दीड तासामध्ये त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. अंगातला शर्ट रक्तानं भरला होता. 
“अरमान, कोयता! अरे, तिचा जीव गेला असता. रात्री दोन वाजता मालाडवरून वाशीला गेलास; तिच्या खोलीवर आणि तिला मारलंस? कशाला? आता म्हणतोस माहित नाही!!!” राहुलचा अजून हे सगळं खरंच घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. “अरमान, काय झालंय?” अरमान काही न बोलता शून्यामध्ये टक लावून बसल्यासारखा होता. बाजूच्या खोलीमधून आभानं राहुलला आवाज दिला. तो आत गेला. नर्स कसली तरी औषधं घेऊन मघाशीच बाहेर गेली होती. डॉक्टर अजून अर्ध्या तासानं परत चेकपला येणार होते. 
“काही हवंय आभा?”
“तो अजून इथंच आहे?” तिनं विचारलं.
“हो, बाहेर बसलाय. काय चालू आहे आभा? मला जरा प्लीज सांगशील का?”
“रोजचं झालंय राहुल. रोज मला फोन करतो. धमकावतो. शिव्या देतो. ब्लॅकमेल करेन म्हणतो..”
“कोण? अरमान.. आपला अरमान? असं का करतोय?” राहुल पूर्णच गोंधळला. 
“आम्ही गेले दोन वर्षं रिलेशनशिपमध्ये आहोत.. कुणालाच माहित नाही. गावी कुणालाच सांगितलेलं नाही. आता अरमान म्हणतोय की लग्न करू या. मी तयार नाही... म्हणून...” तिनं दंडावरच्या जखम दाखवली. “हे पाहिलंस? जरा मी गाफील असते तर दंडाऐवजी माझा गळा चिरला असता” 
राहुलनं केसांत हात खुपसला. “अनबिलीव्हेबल. कशाकशावर विश्वास ठेवू मी? तू आणि अरमान... लग्नाच्या गोष्टी करताय. तू नाही म्हणतेस. म्हणून तो येऊन तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करतो”
“मी जीव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही...” बाहेर बसलेला अरमान अचानक खोलीत येत म्हणाला. “आभा, तुला काही करावं असं मला चुकूनही वाटत नाही गं. तसं असतं तर तुला लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं असतं का?” अरमान खोलीत आलेला बघून आभा बसल्या जागीच मागे सरकली. तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड भिती दाटून आली. ते पाहून राहुल पुढे आला. “अरमान, बाहेर जा. ती आधीच शॉकमध्ये आहे. आपण नंतर बोलू” 
“राहुल, तूच सांग तिला प्लीज, समजाव ना” अरमान काकुळतीनं म्हणाला. 
“काय समजावू?” राहुलचा संयम आता संपला. तो ओरडलाच. “समोर दिसतंय ना? हे हाताला झालेली जखम दिसतेय ना? कुणी केलं हे? मी? तिनं? का कुण्या भुतान? म्हणे जीव घ्यायचा प्रयत्न केला नाही. लूक व्हॉट यु हॅव्ह डन... ही गोष्ट वनिताकाकीला किंवा तुझ्या आईला कळलं तर काय होइल? तिनं जर पोलिस तक्रार केली ना तर बाराच्या भावात जाशील. इडियट. आता उपकार कर आणि बाहेर बस. तिला अजून घाबरवू नकोस”
“आय ऍम सॉरी, आभा.” अरमान अचानक आभाच्या एकदम जवळ आला. “आय ऍम रीअली सॉरी.” तिचा चेहरा हातात घेऊन तो म्हणाला “मी असं का केलं ते मला माहित नाही. मला फक्त तुला घाबरवायचं होतं, मारायचं नव्हतं. फक्त तुला “लग्नाला हो म्हण नाहीतर मी जीव देतो” असं सांगून घाबरवायचं होतं. तुला नव्हतं मारायचं.” बोलता बोलता तो रडायला लागला. “आभा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.. खरंसांगतो. गेले दोन महिने तू मला भेटत नाहीस. माझ्याशी बोलत नाहीस.. प्लीज, असं नको ना करूस... प्लीज. मला सोडून जाऊ नकोस.. मी तुझ्याशिवाय काहीच नाहिये” आभा काहीच न बोलता घाबरून त्याच्याकडे बघत राहिली. राहुलनं त्याला पाठी ओढलं. 
“अरमान, ऐक माझं. इकडे बघ” आभाकडेच एकटक बघत असलेल्या अरमानचा चेहरा त्यानं वळवला. “आपण नंतर सगळे बसून डिस्कस करूया. आता तिला थोडा वेळ दे. रक्त किती वाहिलंय. थोडातरी अशक्तपणा असेल... थोडावेळ बाहेर बस. आपण सकाळी बोलू” कसंबसं त्याला समजावत तो बाहेर घेऊन गेला. खोलीबाहेरच्या बाकावर त्याला बसवलं आणि तो परत आत आला. आभा हमसून हमसून रडत होती. 
“रडू नकोस, मी आहे ना. हे असं काय वागतोय?” आभासारखी धडाडीची मुलगी इतकी कोसळू शकेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. 
“त्याची चूक नाहीये राहुल. आय नो... त्यानं मुद्दाम केलं नाही” 
“म्हणजे?” राहुल आता परत एकदा भांबावला. 
“हे सगळं हर्षदा करवते. तिला ब्लॅक मॅजिक येतं. मागे मी मेडीकलला गेल्यावर तिनं माझ्यासोबत पण असंच केलं होतं” आभा डोळे पुसत म्हणाली. “आम्हा दोघांना ती कधीच खुश राहू देणार नाही... कधीच एकत्र राहू देणार नाही. अरमानच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष कालवता येणार नाही हे तिला माहित आहे. म्हणून आता माझ्या मनामध्ये अरमानबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी ती हे सगळं करतेय. अरमानला मी मागेही ही गोष्ट सांगितली आहे. पण त्याचा विश्वास नाही....”
राहुल एका रात्रीमध्ये आपण किती धक्के पचवू  शकतो याचा अजून अंदाज घेत होता. येणारं प्रत्येक वाक्य नवीन ट्विस्ट घेऊन येत होतं... देवाधर्मावर कसलाही विश्वास नसलेली आभा काळ्या जादूबद्दल सांगत होती. 
“आभा, असं काही नसतं. उद्या तुला गावाला मीच घेऊन जाईन. घरी गेल्यावर आईबाबा तुला काय ते सांगतील शिवाय अरमानला आपण एखाद्या चांगल्या सायकियाट्रीस्टला दाखवूया. ही वील बी बेटर” 
“नाही. मी त्याच्यापासून खूप लांब खूप दूर गेले तरच आम्ही दोघं जगू शकू. नाहीतर ती हर्षू आमचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही” आभा शांतपणे म्हणाली. 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


इश्क विश्क (भाग ४)


Monday 23 March 2015

इश्क विश्क (भाग २)



इश्क विश्क (भाग १)


हर्षूच्या गच्चीवर नुसता हलकल्लोळ चालू होता. सायली गरमगरम बटाटेवडे घेऊन जिन्यामधून वर यायच्याही आधी अरमान पुढं आला, वड्यांचं ताट त्यानं घेतलं आणि पुढच्याच दोन मिनिटांत रिकामं ताट सायलीकडे दिलं. 
“अरे गरम आहेत. सावकाश खा रे मुलांनो” सायली हसून म्हणाली. पण कुणी ऐकायच्या मन:स्थितीमध्ये नव्हतं. सायली शांतपणे उभं राहून खिदळणार्‍या सर्वांकडे बघत राहिली. अख्ख्या सोसायटीमधली मिळून वीसबावीस मुलांची ही पार्टी. एकेकाळी आपल्यासमोर शाळेत युनिफॉर्म घालून जाणारी ही चिल्लीपिल्ली. आज सगळीच कॉलेजकुमार-कुमारी बनल्या होत्या. शेजारचा अरमान इंजीनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला. देशपांड्याची तेजल  कमर्शिअल आर्ट्स. काझीच्या दोन्ही जुळ्या लेकी बीएससीला, सगळ्यांत मोठा असलेला राहुल तर चक्क पीएचडी करत होता. अगदी कालपरवापर्यंत आपल्याच समोर फिरणारी आपली हर्षू.... तिची पण इंजीनीअरिंगची ऍडमिशन झाली. दोन दिवसांनी ती पण हॉस्टेलला जाणार. मग आपण एकटेच उरणार. घरट्यामधून पक्षी उडावेत तशी ही सगळीच बाळं आपापल्या पंखांचं बळ आजमावून बघायला बाहेर पडणार. 
उभ्या उभ्या सायलीचे डोळे भरून आले. किचनमधून अरूणची हाक ऐकू आली म्हणून ती भानावर आली. जिन्यामधून खाली उतरताना अचानक आठवलं, या सर्वांमध्ये आभा आली नव्हती. तिनं किचनमध्ये गेल्यावर वनिताला हाक मारून आभाला पाठवायला सांगायचं ठरवलं. 
गच्चीवर मुलांच्या चेष्टामस्करीला ऊत आलेला. काहीबाही चिडवाचिडवी चालू होतीच. त्यातही राहुलचं नुकतंच समजलेलं प्रकरण हा आजच्या पार्टीचा मुख्य करमणूक कार्यक्रम होता. रात्रीचे नऊ वाजले तशी एकादोघांनी निघायला सुरूवात केली. तसं सोसायटीमध्येच असल्यानं कुणाला फारशी चिंता नव्हती. तरीही दहानंतर राहुल, आकृती, हर्षू, अरमान आणि आर्शिया एवढीच शिल्लक राहिले. 
या सर्वांमध्ये फक्त आर्शियालाच काहीतरी गडबड वाटत होती, शेवटी अरमान आणि राहुल सर्वांच्या डिशेस आणि पाण्याचे ग्लास घेऊन खाली गेलेलं बघून तिनं हर्षूला विचारलं. “नक्की काय चालूये?”
“कशाबद्दल म्हणतेस?”
“कालपासून बघतेय. इथं पार्टीमध्ये आल्यापासून तर खात्रीच पटलीये. तुझं आणि अरमानचं काही....”
“चल!” हर्षू ताडकन म्हणाली. अर्थात हे म्हणणं किती खोटं होतं हे आर्शियाला समजायला वेळ लागला नाही. तितक्यात अरमान आणि राहुल परत वर आले त्यासरशी तिनं हर्षूला कोपरखळी मारली. हर्षू नुसतीच हसली आणि हळूच अर्शियाच्या कानांत कुजबुजली. “येस्स, पण आम्ही सध्या हे कुणालाही सांगणार नाही असं ठरवलंय, तुला आज लक्षात येतंय पण तसं आमचं खूप दिवस झाले चालू आहे.” आर्शिया आणि हर्षू नंतर बराच वेळ खुसखुसत बसल्या... 
गच्चीवरून अरमानला कुणाचीतरी बाईक येताना दिसली. त्यानं वाकून पाहिलं तर बाईक समोरच्या बंगल्याजवळ थांबली. बाईकवरून उतरलेली आभा त्याला दिसली. 
“आभाला बोलावलं नव्हतंस?” त्यानं वळून हर्षूला विचारलं. 
“न बोलवायला काय झालं? ती येणार नाही हे माहित असूनही दोनदा बोलावलं. आईनं पण वनिताकाकीकडे निरोप दिलाच होता” 
“ती आता कुठून आली? इतक्या रात्री?” 
“माहित नाही. ती हल्ली आपल्यापैकी कुणाशीच बोलत नाही” यावेळी राहुलनं उत्तर दिलं. “तिची सध्याची संगत चांगली नाही.”
अरमान अजूनही गेट्जवळ उभ्या असलेल्या आभाकडं बघत होता. त्याच्या आजूबाजूला अर्शिया हर्षू सगळेच उभे राहून खाली बघत होते. “पाहिलंस, ती दारू पण पिते. हा तिचा खास मित्र. विजय म्हणे. एक नंबरचा गुंड आहे.” हर्षू म्हणाली. 
“आभाला नक्की झालंय काय? किती चांगली हुशार मुलगी आहे.”
“तू सहासात महिन्यानंतर गावात आलास म्हणून असं वाटतंय. आम्हाला रोजचंच झालंय. एकदोनदा तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या बाबांनी तिला मारलं तर तिनं लगेच या मित्राला फोन केला. दहा मिनिटांत गुंडं पोरं सगळी सोसायटीमध्ये. कसल्या धमक्या देत होती, आणि काय घाण बोलत होती. वनिताकाकी तर तिला घाबरूनच असतात. कधीपण येते कधीपण जाते. काय वाट्टॆल तसे कपडे घालते” आकृतीनं माहिती पुरवली. 
“आणि कॉलेज?” अरमाननं विचारलं. 
“डोंबल. सहा महिन्यांत सोडून आली. हॉस्टेलवर जमत नाही म्हणून” 
आभा गेटमधून आत गेली. वनितानं दरवाजा उघडेपर्यंत टणाटणा बेल मारत राहिली. ती घरात गेल्यावर मग तिचा तो बाईकवाला मित्र निघून गेला. आभा शुद्धीत नव्हती हेतर इथूनपण सर्वांना दिसत होतंच. 
“इतकी कशी वाया गेली?” अरमाननं विचारलं. 
“जाऊ देत ना” आर्शिया पहिल्यांदाच बोलली. “फालतू मुलगी आहे. तिचा इतका विचार काय करतोस? आपण इथं पार्टीसाठी आलोय की तिच्याबद्दल बोलायला? या एका मुलीमुळे सोसायटीचं नाव बदनाम होतंय.. पण काय करणार?” 
तितक्यात राहुलचा मोबाईल वाजला. हा फोन त्याच्या “खास मैत्रीणीचा” असल्यानं यापुढं चेष्टामस्करीचा विषय राहुलकडे वळाला आणि आभाचा विषय बाजूला पडला. पण अरमानच्या मनामधून विषय गेला नाहीच. 

दुसर्‍या दिवशी सहज कसलंतरी पुस्तक देण्यासाठी तो आभाच्या घरी गेला. वनितानं त्याला आत बोलावलं. त्याला कॉलेज कसं चालू आहे, हॉस्टेल लाईफ कसं आहे वगैरे विचारलं. पण काकी आभाबद्दल काही बोलेनात. शेवटी त्यानं विचारलं. “काकी, आभा कुठाय?”
वनिता किंचितशी गडबडली. “आहे, घरातच” 
“जरा बोलावता का? मला थोडंसं बोलायचं होतं. मी उद्या निघून जाईन. तेव्हा बोलायला वेळ मिळणार नाही”
“अरमान, ती आता बाहेर येणार नाही. मी संध्याकाळी तुझ्या घरी यायचा निरोप देईन. ठिक आहे?”
“काय झालंय काकी? आभा अशी का वागतेय?”अरमाननं थेट विचारलं. 
“काही माहित नाही” वनिता हताशपणे उद्गारली. “गेल्या वर्षीपर्यंत सर्व नीट होतं. बारावीला किती चांगले मार्क्स घेतले. बारावीची परीक्षा झाली आणि मग हे असलं सर्व चालू झालं. मेडीकलला सीट मिळाली म्हणून इतक्या लांब शिकायला ठेवली तर पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत परत आली. काय करू?” 
“मी बोलू का तिच्याशी? कदाचित मी थोडंफार समजावेन” अरमान शांतपणे म्हणाला. 
“आता ती खोलीमध्ये आहे, पण बोलण्यांत काही अर्थ नाही, डोळ्यांसमोर हे सगळं घडताना. काय  करावं?....” वनिताच्या डोळ्यांत आता पाणी आलं. 
“एक काम करा, ती जागी झाली की मला हाक मारा. मी येईन आणि तिच्याशी बोलेन” तो हलकेच म्हणाला आणि बाहेर पडला. 

पण वनितानं दिवसभर काही त्याला हाक मारली नाही. नंतर खरंतर त्याच्याही लक्षात राहिलं नाही. उद्या हॉस्टेलवर जायचं म्हणून त्यानं आणि हर्षूनं पिक्चरचा प्लान बनवलेला होता. त्यामुळं संध्याकाळी तोही घरी नव्हताच. रात्री नऊ वाजता घरी आल्यावर सगळावेळ पॅकिंग आणि आईच्या सूचना ऐकण्यांतच गेला. तरी साडेदहा वाजता आईला अचानक आठवलं. 
“अगं बाई, घरात विरजण नाहीये, उद्या तुला दहीसाखर कशी देणार?” यापुढं आपल्याला आईची काय आज्ञा असेल ते आधीच लक्षात येऊन तो म्हणाला. “आई, नाही दिलंस तरी चालेल. मी आता रात्रीचं बाहेर दुकानात जाणार नाहीये” 
“अरे असं काय करतोस बाळा? सज्जादचं दुकान अकरापर्यंत चालू असतं, जा ना” आई अगदी प्रेमानं त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली. “उद्या तू हॉस्टेलला गेल्यावर कुणाला अशी कामं सांगेन. तू नस्लास तर माझं किती अडतं माहिताय. प्लीज ना रे राजा!!”
“दुकानात जातो पण तुझे इमोशनल अत्याचार आवर.” तो हसत म्हणाला. “अजून काय हवंय ते आताच सांगून ठेव. मी उद्या पहाटे दुकानांत जाणार नाहीये. सकाळी सातची ट्रेन आहे” 
गेटमधून बाहेर पडताना त्यानं हर्षूच्या घराकडं नजर टाकली. हर्षूच्या खोलीचा दिवा बंद होता, नाहीतर तिला हाक मारून बोलावलं असतं. तेवढीच उद्या जायच्या आधी परत चोरून एखादी भेट. तीपण अश्या चांदण्यारात्री वगैरे. त्याच तंद्रीमध्ये कसलंतरी गाणं गुणगुणत तो चालत राहिला. 

चाळीसेक बंगल्यांची ही सोसायटी जिथं संपत होती, तिथं आंब्याची चार पाच झाडं लावली होती, शिवाय मुलांना खेळयला म्हणून गार्डन एरिया. आता त्या गार्डन एरियाचं गेट उघडं होतं. आतमध्ये लाईट वगैरे काही नसल्यानं पूर्ण अंधार होता. रस्त्यावरून चालताना अरमानला आतमध्ये कुणीतरी बसलंय असं वाटलं. हातातल्या मोबाईलचा उजेड त्यानं अंधारामध्ये मारून पाहिला. “आभा? इतक्या अंधारात एकटीच का बसली आहेस?” दोन पावलं पुढं येत त्यानं विचारलं. 
“माझा फ्रेण्ड येणार आहे. त्याची वाट बघतेय” ती एखाद्या अनोळखी माणसाशी बोलावं इतक्या तुटकपणे म्हणाली. 
“इतक्या रात्री?” तो तिच्या जवळ आला. “इथं भिती वाटत नाही का?” 
“कुणाची?” तिनं उलट प्रश्न केला. 
“भटक्या कुत्र्यांची! अजून कुणाची? मला तरी रात्री रस्त्यावरून फिरताना त्यांचीच भिती जास्त वाट्ते” ती काहीच बोलली नाही. त्यानं तिच्याच बाजूला बसकण मारली. तिच्या हातातली सिगरेट काढून मातीमध्ये विझवली. 
“हा काय मूर्खपणा आहे?” तिनं चिडून विचारलं. 
“सेम प्रश्न मी तुला विचारू? हा काय मूर्खपणा आहे?” 
“माझ्या पर्सनल बाबतीत बोलायचं तुझं काम नाही. सांगून ठेवते” तिचा आवाज अजून चढला. 
“काय करशील? तुझे ते गुंड मित्र बोलावशील? माझे हातपाय तोडायला?” त्याचाही आवाज तितकाच चढला. “आठ दिवस झाले, रोज तुझे हे नखरे बघतोय. काय चालवलं आहेस? थोडीफार मित्रमैत्रीणींबरोबर मस्ती हे एकवेळ ठिक आहे. पण तू जे करतेयस ते अति आहे” 
“मला जास्त बोलायचं नाही, परत तेच सांगतेय. माझ्या पर्सनल बाबतीत बोलू नकोस” अंधारात तिचा चेहरा दिसत नसला तरीही तिच्या डोळ्यांतला संताप त्याला जाणवला. “तुमच्यासारखी गूड गर्ल नाहीये मी. मला तसं रहायचं पण नाही. गेट लॉस्ट!” 
“आभा, पर्सनल असं काय असतं गं! इतकी वर्षं एकमेकांना ओळखतोय. तुझं हे असं बेफाम वागणं जरातरी चांगलं आहे का?” त्याचा आवाज प्रचंड शांत होता. “सकाळी मी तुझ्या घरी आलो होतो. याच विषयावर तुझ्याशी बोलायला. तुला माहित तरी आहे का?” 
“तेव्हा झोपले असेन... सॉरी” 
“सॉरी म्हणू नकोस. फक्त मला सांग, काय झालंय. कशामुळं इतकं बिनसलंय. रोज तुला बघतोय. मला माहित असलेली आभा असं वागेल हे पटतसुद्धा नाही.” तो परत तितक्याच शांतपणे म्हणाला. 
“काहीही  बिनसलेलं नाही”
“कॉलेज का सोडलंस?” 
“ते मेडीकल मला जमत नव्हतं. डेड बॉडीज वगैरे. माझ्याच्यानं तसलं झालं नसतं” 
“ठिक आहे, मग दुसरं काही शिक्षण? कॉलेज पूर्ण करायला नको का?” 
“कंटाळा येतो... नकोसं वाटतंय.” ती तुटकपणे म्हणाली. 
“असं करून कसं चालेल? आपल्याला शिक्षण हवंच. आयुष्यात पुढं जायला हवं ना? तिथंच थांबायचं आहे का? तुझ्या अश्या वागण्याचा वनिताकाकीला किती त्रास होतोय याचा विचार केलास का?”
ती यावर काहीही बोलली नाही. “हे बघ, शिकू नकोस. ड्रॉप घे. एक वर्षं दोन वर्षं तुला वाटेल तितके दिवस. पण किमान हे असं वागू नकोस ना. दारू पिणं... हे असं मित्रांबरोबर रात्रबेरात्र भटकणं, चांगलं वागणं आहे का?”
“अरमान, तुझं लेक्चर देऊन झालं की मला उठव. मी तोपर्यंत एक झोप काढते” ती म्हणाली. 
तो हसला. “मी लेक्चर देतोय का? तुझी काळजी आहे मला.”
त्याचं वाक्य अर्धवट तोडत ती म्हणाली. “करू नकोस.  जगामध्ये कुणाची वाट्टेल त्याची काळजी कर. पण माझी चुकूनही करू नकोस”
“याला काय अर्थ आहे?”
“काहीच अर्थ नाही. माझ्याप्रत्येक गोष्टीला काहीच अर्थ  नाही. मी अशी का वागते? इतकी कॅरेक्टरलेस का झाले? आईवडलांना इतका मनस्ताप का देते? या कुठल्यही प्रश्नाला काहीच अर्थ नाही. माझ्यातर साल्या जगण्यालाच काही अर्थ नाही. हरामी जगणं झालंय. एक दिवस संपवेन.. तेव्हा” 
“आभा, काय बोलतेस?” त्यानं हबकून विचारलं. “काय झालंय? मला सांग. प्लीज. तुला माझी शपथ आहे.... काय झालंय़?” त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. 
“सांगू? ऐकशील??? माझ्याकडे या कथेची दोन व्हर्जन आहेत. तुला कुठलं सांगू?”
“मला  फक्त खरं सांग. काय झालंय?”
“अरमान, मला एक मुलगा आवडतो. गेल्या काही वर्षांपासून. खूप आवडतो. अगदी ज्याला आपण प्रेम म्हणू शकतो इतक्या लेव्हलवर... मी ही गोष्ट त्याला स्वत: सांगणार होते. पण त्याआधी मी हीच गोष्ट माझ्या बेस्ट फ्रेण्डला सांगितली. ती म्हणाली, इतकंच ना. आता त्याला काही बोलू नकोस. मी योग्य वेळ येताच त्याला सांगेन. योग्य वेळ आली, आणि तिनं त्याला सांगितलं. फक्त माझ्या नावाऐवजी स्वत:चं नाव घालून” 
“आभा, कुणाबद्दल बोलतेस?” 
“अरमान, जगात अशा किती बेस्ट फ्रेण्ड आहेत मला?” 
दोन क्षण तो काहीच बोलला नाही. ती मान फिरवून दुसरीकडं अंधारात कुठंतरी बघत राहिली. “आय ऍम सॉरी, आभा!” तो हलकेच म्हणाला. “मला खरंच माहित नव्ह्तं” 
“वेल, आता समजलंय. हो ना? मग आता प्लीज मला विचारू नकोस, मी अशी का वागते. माझं काय बिनसलंय...”
“तू कधीच का बोलली नाहीस...”
“कधी बोलणार? तुझं आणि हर्षूचं ठरल्यावर? तुम्ही एकमेकांना चोरून भेटायला लागल्यावर? किस करायला लागल्यावर? मिठ्या मारल्यावर? कधी बोलणार?”
“आय डोण्ट नो व्हॉट टू से. ही गोष्ट हर्षूला माहित होती?”
“ही गोष्ट फक्त हर्षूला माहित होती. एनीवेज, तुम्ही दोघं एकत्र आहात, त्याबद्दल नो रीग्रेट्स. मी आज जे तुला सांगितलंय ते केवळ आपल्यामध्येच. प्रॉमिस कर” तिनं तळहात पुढं केला. त्यानं तो हातात घेतला. 
“आभा, आय प्रॉमिस. पण तूही एक प्रॉमिस कर. कुणीही... अगदी कुणीही आयुष्यात तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं असता कामा नये. मीसुद्धा. जे घडलं ते मी रोकू शकलो नाही. तुला दुखवायचं म्हणून मी जाणूनबुजून काहीच केलेलं नाही. तरीही माझ्यामुळं तू अशी वागलीस तर मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही. यापुढं असं करू नकोस. ऐकतेस ना आभा.” तो अगदी हळूवार पणे म्हणाला. तिनं त्याच्या हातातून हात सोडवून घेतला. 
“अरमान, सगळीच घडी विस्कटलीये. सगळंच कोलॅप्स झाल्यासारखं वाटतंय.” बोलताना तिचा आवाज भरून आला. “यापुढे काय कधीच माझं आयुष्य नीट होणार नाही- हे मात्र नक्की” 

दोन मिनिटं तो शांत बसून राहिला. नंतर त्यानं सावकाश विचारलं. “आणि या कथेचं  दुसरं व्हर्जन काय आहे?”
तिनं डोळे पुसले. “सांगू? ते जास्त इंटरेस्टिंग आहे...इन  फॅक्ट, इतरांना सांगताना... एस्पेशली हर्शूला सांगताना हेच व्हर्जन सांग. आणि जेव्हा सांगशील तेव्हा तिचा चेहरा काय होइल तेही सांग.”
“आता एवढं सगळं सांगितलं आहेस तर तेही सांगच. आय ऍम शुअर तुझ्या तिरपागड्या डोक्यामधून काहीतरी विचित्रच येऊ शकेल” 
“दॅट आय ऍम इन लव्ह विथ हर्षू”. 
“काय?” तो क्षणभर हबकलाच. “आभा, हा जोक आहे का?”

ती जागेवरून उठली, गार्डनच्या गेटपर्यंत गेली. “तुला दोन्ही वर्जन सांगितली आहेत. एक खरं आणि एक खोटं. कशावर विश्वास ठेवायचा ते तूच ठरव” म्हणत ती अंधार्‍या रस्त्यावरून तरातरा निघून गेली. 


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

गुरफटलेल्या चादरीमधून हात बाहेर काढून आभानं वाजणारा मोबाईल घेतला. अपेक्षेप्रमाणं ऑफिसमधूनच फोन होता. उद्याच्या इव्हेंटच्या कन्फर्मेशनसंदर्भात काहीतरी पॉइन्टर्स हवे होते. तिचं फोनवर बोलून होइपर्यंत आलोक बेडरूममध्ये आला. “गूड मॉर्निंग” तिनं मोबाईलमध्ये किती वाजले ते पाहिलं. 
“बापरे, साडेनऊ वाजलेत. मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या उशीरापर्यंत झोपले असेन” ती ओरडलीच. 
“आयुष्यात पहिल्यांदा इतक्या उशीरापर्यंत जागलीही असशील...” तो तिच्या गालांवरून हलकेच हात फिरवत म्हणाला. ती लाजली. “आज तुला पूर्ण दिवस सुट्टी आहे ना?” त्यानं विचारलं. तिचं ऑफिस सोमवार ते शुक्रवार असलं तरी बहुतेक ईव्हेंट्स वीकेंडलाच असायचे, म्हणजे ते दोन्ही दिवस ती घराबाहेरच. 
“हो. आज एकही ईवेंट नाही.” 
“लग्नानंतर पहिल्यांदा एखाद्या वीकेंडला दोघंही घरी आहोत. बोल, काय प्लान? बाहेर जाऊया?” 
ती आळसावत उठली. “नको. कंटाळा आलाय. खरंच किती महिन्यामध्ये शनिवार रविवारी घरी राहिलेच नाहिये.”
“ऍज यु विश. मी ब्रेकफास्टसाठी अंडी उकडून ठेवली आहेत.” 
“अंडी? का?” तिनं विचारलं, “आज संकष्टी चतुर्थी आहे, अंडी कशी खाणार?” 
त्यानं सॉरी म्हणत कान पकडले. “मी कालच साबुदाणे भिजत घातलेत. पंधरा मिनिटांत खिचडी करते. ती अंडी तूच खा” ती हसत म्हणाली. 
“तुझा उपवास असतो?”
“हो.” ती चादरीच्या घड्या घालत म्हणाली. 
“सॉरी अगेन, मला माहितच नाही. आय मीन... लोकं हसतील मला.”
“ठिक आहे, तुला चालत असेल तर दुपारला एग करी बनवते. मला दिवसभर खिचडी पुरेल” तिनं विषय मिटवला. “आणि लोकं का हसतील?”
“लग्नाला इतके महिने झाले तरी बायकोचा उपास कधी असतो ते मला माहित नाही” 
“अरे, मी काय इतकीपण धार्मिक नाहीये. लहानपणापासून सवय आहे म्हणून उपास करायचा. आज समज जर ईव्हेंट  असता आणि तिथं उपासाचं काही अव्हेलेबल नसतं तर काय केलं असतं? बिनधास्त खाल्लं असतं. देवाला प्रत्येक गोष्ट माहित असतेच” 
“हो, पण मला किमान तुझ्याबद्दल थोड्यातरी गोष्टी माहित हव्यात की नाही... आय मीन. अर्ध्या एक तासासाठी भेटलो. थोड्याफार गप्पा मारल्या. आणि पंधरा दिवसांत लग्न केलं... तेपण अगदी साधेपणानं. आय मीन.. अगदी दागिनेसुद्धा तुला माझ्या मॉमचे घातले कारण ज्वेलरकडे जाण्याइतका वेळ नव्हता” 

“आलोक, अरे कितीवेळा त्याच एका गोष्टीवर बोलणार आहेस? लग्न गडबडीत झालं, साधेपणानं झालं, याबद्दल मला काहीही रीग्रेट्स नाहीत. उलट मला माझं लग्न असंच सिंपल व्हायला हवं होतं.... तेच जास्त आवडलं! भपकेबाजी वगैरे तर बिल्कुल नको. आणि दागिन्यांचं काये? कोण वापरतंय तसंही. तू प्लीज सारखा त्याच एका गोष्टीचा गिल्ट घेऊ नकोस” 
“तू माझ्यासोबत खुश  आहेस ना?” त्यानं हलकेच विचारलं. 
“आलोक, मी आयुष्यात इतकी खुश कधीच नव्हे, बीलीव्ह मी. तुला तासभर भेटल्यावर लग्नाचा निर्णय घेतला तो नक्की कशाच्या जोरावर हे मला माहित नाही. पण तो निर्णय फार अचूक होता हे मात्र मला समजलंय. आय ऍम रीअली हॅपी विथ यु... आणि येस्स.. आय ऍम इन लव्ह विथ यु. इतक्या वर्षांत कधीच कुणाच्या प्रेमात पडले नव्हते. पण आता असं वाटतंय की......” तिला पुढे बोलूही न देता आलोकने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. 

दुपारी कसलंसं पुस्तक वाचत होती तेव्हा मोबाईलवर मेसेज आला. आलेला मेसेज वाचताच ती हसली. “या राहुलदादाच्याना... अजून चिडवतो” 
“काय झालं?” आलोकनं टीव्हीचा आवाज म्युट करत विचारलं. 
“अरे काही नाही. आम्ही स्कूलमध्ये होतो ना तेव्हा मला अभिषेक बच्चन खूप आवडायचा. कैच्याकैच. तर म्हणून मी हट्ट करून सगळ्या ग्रूपचा मै प्रेम की दिवानी हू बघायला लावलं होतं. असला पकाव पिक्चर होता, त्यावरून सगळे मला अजून चिडवतात. आता कुठल्याशा चॅनलवर लागलाय म्हणे तोच पिक्चर...” 
“तुमचा हा सोसायटीचा ग्रूप म्हणजे विचित्रच आहे. अजून किती क्लोजली कम्युनिकेट करता. अगदे डेटूडे लाईफ ऍक्टीव्हीटीपण” 
“साहजिक आहे ना. लहानाचे मोठे एकत्रच झालोय. दिवसभर हुंदडत असायचो. तशी आमची अख्खी सोसायटीच फार केरिंग होती. तरी तू अजून निम्म्याहून जास्त नमुन्यांना भेटला नाहीस. अरमान युएसला, आकृती जपानला, आणि अर्शिया दिल्लीला.... कधीतरी तुला भेटवेन.”
एरव्ही कधीही जास्त न बोलणारी आभा या ग्रूपचा विषय आला की मात्र अगदी मनमोकळेपणानं बोलायची. लग्नाच्या दिवशी आभाच्या नातेवाईकांपेक्षा जास्त गर्दी तिच्या मित्रमैत्रीणींची होती. परत आभाचा मोबाईल वाजला. “आता कोणे?” आलोकनं चिडवत विचारलं. 
“मिस्टर प्रोफेसर, अरमान शाह! हा कुठल्याही विषयावर एकदा लेक्चर द्यायला लागला की संपलं. समोरचा जागा आहे की नाही तेसुद्ध न बघता याचं चालूच.... सीरीयसली, स्टुपिड फ़ेलो” 
आभा बोलत असतानाच मोबाईलवर कॉल आला. “अयाईगं! ऑफिसमधून फोन. आता काही असलं तर वैताग आहे” म्हणत तिनं कॉल घेतला. 
पाचेक मिनिटं ती फोनवर बोलत राहिली. मामला केवळ कसल्यातरी ईव्हेंटचा नसून काहीतरी जास्त गंभीर  आहे हे आलोकच्याही लक्षात आलं होतं. आभानं कॉल बंद केल्यावर तो तिच्या जवळ गेला. “काय झालं?” 
“एजन्सीच्या एच आरमधून कॉल होता. गौरव खन्नानं एजन्सीशी टायअप कॅन्सल करायचं ठरवलंय”
“ओके, तू त्याची मॅनेजर आहेस म्हणून तुला कॉल केला होता...”
“हो. त्यानं मेलमध्ये लिहून दिलंय की हे टाय अप तो आभामुळे कॅन्सल करतोय.... माझ्या करीअरसाठी इतका मोठा सेटबॅक बसलाय.. आय ऍम शॉक्ड!”
आभाचा उतरलेला चेहरा पाहून आलोकनं तिला कुशीत घेतलं. “डोण्ट वरी. पण त्यानं असं का केलं... परवा आपण डिनरला गेलो तेव्हा तरी ठिक होता”
“माहित नाही.... एच् आर माझ्याकडे एक्स्प्लेनेशन मागतंय. आणि मला काहीच माहित नाही. गौरवनं असं का केलं”




 (क्रमशः) 


इश्क विश्क (भाग ३)