Thursday 3 September 2020

शब्द - सावधान!

 कधी कधी डोक्याची मंडई होते ती अशी. ही कथा ब्लॉगवर अपलोड केलेली आहे, अशी माझी अनेक वर्षे समजूत आहे. कालपरवा लक्षात आलं की अपलोड केलेली नाही. त्वरित चूक सुधारण्यात आलेली आहे. 


एशान सीरीजमधली ही कथा तितकीच तुम्हाला आवडेल जितकी आधीची आवडली होती. 


फक्त एक विनंती. कथा आवडली असेल तर प्लीज या ब्लॉगची, कथेची लिंक फेसबुक आणि व्हॉट्सॅप वर शेअर करा. कथा का आवडली आहे ते आवर्जून लिहा. धन्यवाद. एंजॉय. 


>>>>>>>>>>>>>>>>

सावधान! चालक शिकत आहे.

नंदिनी देसाई.

“स्टेअरिंग सोड, स्टेअरिंग सोड” बाजूला बसलेला एशान माझ्या कानांत जोरजोराने ओरडत होता पण मला ऐकू येत नव्हतं. क्षणार्धात गाडीने काटकोनात टर्न घेण्याऐवजी जागच्या जागी गोल टर्न घेतला होता आणि आता तिला अजिबात सरळ होता येत नव्हतं. ती अगदी हळूवारपणे रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात निघाली. शान परत जोरात ओरडला आणि मी स्टेअरिंग अजूनच घट्ट धरलं., स्टेअरिंग वळवायचा प्रयत्न केला हॅण्डब्रेक दाबण्याचा त्याने प्रयत्न केला पण तोवर कार ऑलरेडी खड्ड्यामधे गेली होती आणि बूड वर करून पडली होती.

रस्त्यावरचे लोक लगेच धावत आले, मला कुणीतरी व्हर्टीकल झालेल्या दरवाज्यामधून ओढून बाहेर काढलं. एशान हीरो असल्याने तो स्वत:च टुणकन उडी मारून बाहेर आला. कारची पूर्ण वाट लागलेली होती. बघ्यांची वाढलेली गर्दी बघून माझं अंग थरथरायला लागलं. एवढ्यात शान माझ्यावर खेकसला, “बापाचा माल असल्यासारखं काय ते स्टेअरिंग घट्ट धरून बसलेली?” डोळ्यांतून डायरेक्ट पाणीच. “दादा, असे ओरडू नका. मॅडम घाबरल्यात. काही लागलंय वगैरे का ते बघा” कुणीतरी म्हणालं. पण शानने मला काहीही लागलेलं नाही याची पूर्ण खात्री केलेली असणार आणि मगच तो असा वसकणार! तरी लाजेकाजेस्तव माझ्या बाजूला आला आणि डोक्यावरून हात फ़िरवून म्हणाला “ठिक आहेस का?”

“शान, आय ऍम सॉरी! कारचं खूपच नुकसान झालंय़ का?”

“ती कार खड्ड्यात गेली.” स्वत:च्याच पीजेवर हसला आणि म्हणाला. “आठ दिवस चांगली चालवत होतीस. आज काय धाड भरली?”

“मी सांगितलं होतं ना तुला.. मला जमणार नाही.” रडूबाई मोड ऑन..

“असू दे! इट्स ओके.. कंचनला फोन करतो आणि डॅडलापण.. कार खड्ड्यातून काढण्यासाठी क्रेन वगैरे लागेल. स्टाफपैकी कुणाला तरी बोलावून घेतो. डोण्ट वरी..” पडलेल्या कारचे मोबाईलमधून सटासट फोटो काढत तो म्हणाला, “एवढा जबरदस्त स्टंट जमला कसा काय तुला? इतक्या स्लोमोशनमध्ये असलेली गाडी अशी अलगद खड्ड्यात नेणं... इट्स नॉट इझी” हे शान गमतीने सांगत असला तरी मला डोळ्यापुढे कारचं झालेलं नुकसान एवढंच दिसत होतं. प्रश्न निव्वळ पैशाचा नव्हता, असल्या दहा कार नेऊन आपटल्या तरी एशानला काडीचाही फरक पडला नसता, पण ही जुनी असली तरी एशानच्या वडलांची कार होती. आणि मी जगात सर्वात जास्त कुणाला घाबरत असेन तर त्यांना.

अगदी कॉलेजमध्ये असताना एशान जेव्हा त्याच्या वडलांविषयी सांगायचा, खास करून त्यांच्या संतापी आरड्याओरड्याविषयी तेव्हापासून भिती होतीच. आमचं लग्न ठरल्यानंतर तर भिती अजूनच वाढली. एशान लग्नाच्या आधीपासूनच वेगळ्या फ़्लॅटमध्ये राहत होता, त्यामुळे एकत्र रहायचा प्रश्नच नव्हता. आजवर मी त्यांच्याशी क्वचित बोलले असेन. मुळात ते जास्त बोलायचेच नाहीत. कंचनशी म्हणजे एशानच्या आईशी (हो! एशान आईला नावाने हाक मारतो) बोलताना मात्र कसलीही टेन्शन नसायचं. एखाद्या छान मैत्रीणीशी बोलल्यासारखं वाटायचं. लग्नाआधी मी “आहोजाहो” केलं, नंतर एकदा तीच म्हणाली. “तूपण सरळ कंचनच म्हण, तेच बरं, मम्मीजी वगैरे ऐकलं की टीवी सीरीयलमधली खाष्ट सासू झाल्यासारखं वाटतं..” खूप मस्त सासू. अशी सासू मिळायला मी वर्षातून चारवेळा वडाच्या फेर्‍या मारायला तयार आहे. थोडक्यात काय सासुरवास वगैरे कसलाच त्रास नाही. एक ती एशानच्या डॅडची भिती सोडल्यास. आणि आज मी त्यांच्याच कारचा अपघात केला होता.

मी टिपिकल मराठी घरात वाढलेली मुलगी. शिकायला मुंबईत आले. एशान कॉलेजमधला मित्र, कॉलेजनंतर वर्षभराने त्यानं लग्नासाठी विचारलं. एशानचे वडील सिंधी, आणि आई मराठी. त्याच्या घरी काहीही प्रॉब्लेम नव्हताच. माझ्या घरून बर्‍य़ापैकी विरोध झाला, पण इतकं श्रीमंतघर बघून मावळलासुद्धा. आमचा संसार कायम असल्या विरोधाभासांनी भरलेलाच.

एशानला लग्नानंतर जवळ जवळ सहा महिन्यांनी आपल्या बायकोला चारचाकी गाडी चालवता येत नाही ही गोष्ट समजली. त्यादरम्यान त्याला रोजच्यारोज अमुक एक गोष्ट मला येत नाही अथवा मला माहितच नाही असे साक्षात्कार होत असायचे. हल्ली ते प्रमाण जरा कमी झालंय. लग्नाला हजारेक दिवस झाल्याचा परिणाम असावा. त्याचं जगातलं सर्वात जास्त आवडतं काम ड्रायव्हिंग त्यामुळे कुठेही जायचं असलं तरी तोच ड्रायव्हर. तो नसला तरी माझं काहीही अडत नाही. मुंबईमधे कुठेही फ़िरायचं असलं तरी मला लोकल, बस, टॅक्सी वगैरे सुटसुटीत पर्याय असतात. कधीतरी असंच ड्रायव्हिंग शिकून घे असं त्यानं सांगितलं पण मी त्याच्या बर्‍याचशा आचरट सूचनांप्रमाणे (केस रंगवून घेणे, आम्ही एकमेकांच्या नावाचा टॅटू गोंदवून घेणे,) त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केलं होतं.

एशानच्या डोक्यात एके दिवशी प्लान आला की, गाडी घेऊन दोघांनीच अख्खा साऊथ इंडिया फिरायचा. जवळजवळ महिन्याभराची ट्रीप. एशानचं एक बरं आहे, त्याची स्वत:चीच जाहिरात कंपनी आहे, ऑफिस घराजवळ आहे, बर्‍याचदा घरून काम करतो. वाटेल तितकी सुट्टी घेऊ शकतो.. मला दरवेळेला सुट्टी मिळेलच असं नाही, त्यामुळे प्लानचा मलातरी भरवसा वाटत नव्हता. यावेळेला सुट्टीपेक्षा महत्त्वाचा अडथळा आणला तो कंचनने. “इतक्या जास्त दिवसांचं ड्रायव्हिंग रोज करायचं असेल तर गाडीमध्ये दोन ड्रायव्हर असायला हवेत” असं विध्यर्थी दिसणारं पण प्रत्यक्षात आद्न्यार्थी असणारं वाक्य तिच्याकडून खरंच अनपेक्षित होतं. पण नेमक्या याच विधानाला डॅडनी पण “सही बात है” म्हटल्याने एशानचा नाईलाज झाला. मग दुसरा एखादा प्रोफेशनल ड्रायव्हर अथवा मित्र वगैरे घेऊन ट्रीपचं भरीत घालण्यापेक्षा त्यानं “तूच शिकून घे की, आपल्याला जायला अजून दोनेक महिने आहेत, तोपर्यंत मस्त प्रॅक्टीस होऊन जाईल.” असं जाहीर करून टाकलं. त्याच्यादृष्टीने हा प्रश्न फारच क्षुल्लक होता.

एशानसोबत रहायचं असेल तर त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा आपण होला हो म्हणून विषय मिटवून टाकलेलं बरं असतं. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा तो विषय तिथल्या तिथे विसरून गेलेला असतो. नव्व्याण्णव वेळाच!!!  यावेळेला माझं बॅड लक खराब असणार.  

कारण लगोलग एशानने एका ओळखीच्या ड्रायव्हिंग  स्कूलमध्ये माझं नाव घातलं आणि माझ्या दररोजच्या सकाळी साडेपाच ते रात्री अकराच्या बिझी शेड्युलमधे एक तास या ड्रायव्हिंग शिकण्याची भर पडली. आठच दिवसांनी ड्रायव्हिंग स्कूलच्या मास्तराने एशानला फोन करून “काही अपरिहार्य कारणामुळे मी तुमच्या मिसेसना शिकवू शकत नसल्याचं सांगितलं. हे अपरिहार्य कारण काय ते सांगितलं नाही.. माझ्या दुर्दैवाने नंतर आलेल्या म्हातार्‍य़ा इन्स्ट्रक्टरने माझ्याकडून पैसे घेऊन झाल्यावर दोन दिवसांनी एशानला अपरिहार्य वगैरे फ़ुटकळ गोष्टी न सांगता स्पष्टपणे मी न शिकवण्याचे पैसे दिल्याचं सांगितलं.

“मला समजतच नाहिये यात कठिण काय आहे?” एशान त्या रात्री माझ्यावर ओरडत होता. “इतकं घाबरण्यासारखं काय आहे? जगामध्ये किती बायका गाडी चालवतात. तुलाच काय प्रॉब्लेम आहे?”

“कितीवेळा सांगू? दहावीचं परीक्षाकेंद्र तालुक्याला होतं. जवळजवळ चाळीस किलोमीटरवर. गावातल्या सगळ्यां मुलामुलींच्या वडलांनी मिळून एक ओमनी ठरवली होती. रोज जाण्य- येण्यासाठी. विज्ञान १ च्या पेपरवरून येत असताना गाडी ड्रायव्हरच्या अतिस्पीडने रस्त्याबाहेर गेली. धडाधडा कोलांटीउड्या मारत. मला जास्त लागलं नव्हतं. माझ्या बाजूला बसलेला मुलगा पूर्ण रक्तबंबाळ झाला होता.  मग नेक्स्ट पेपर मी अक्षरश: थरथरत लिहिला. मला दहावीला एकूणच मार्क कमी पडले. इंजीनीअरिंगला जायचं होतं पण सायन्सला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून आर्ट्सला गेले. बारावीला खूप चांगले मार्क मिळाले, म्हणून बाबांनी मुंबईला मास कॉम शिकायला ठेवलं. तरी इंजीनीअर होणं नशीबात नव्हतं म्हणून आता हे असले फ़ुटकळ ईव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जॉब करावे लागतात. शिवाय तिथं तू भेटलास, आणि लाईफमध्ये प्रॉब्लेम्सची मालिका....” मी धडाधड टेप ऐकवली.

“मुद्द्याचं बोल..”

“मुद्दा एवढाच की. मला ड्रायव्हींगची खूप भिती वाटते. त्या अपघातापासून मी कितीतरी दिवस कारमध्ये बसायला सॉलिड घाबरायचे. हळूहळू ती भिती गेली. आता मी कारमध्ये बसू शकते, पण मी गाडी चालवू शकणार नाही.... मला प्रचंड भिती वाटते” माझं बोलणं संपेपर्यंत शांत बसून राहिला. वाटलं हा आता परत खेकसेल, वसकेल, नाहीतर नेहमीसारखी माझी टिंगल करेल. पण तो म्हणाला, “दिस इज जस्ट स्टुपिड फोबिया. कंचनशी कधी यावर बोललीस? ती योग्य सल्ला देईल.” डोक्यामध्ये काही बिघाड असला की आम्ही तिच्याचकडे सल्ले घेणार. कारण ती न्युरोसर्जन. माझ्या या फोबियावर तिचा सल्ला भारी होता! “एवढी भिती वाटत असेल तर थोडेदिवस कार-रेसिंग गेम्स खेळत जा. स्टिम्युलेशन गेम्समुळे ब्रेनला गाडी चालवायचं म्हणजे नक्की काय करायचं हे समजेल. मग पुढे बघू.”

एशानला हा सल्ला मनापासून आवडला, आणि मला गेम नक्की खेळायचा हे शिकवण्याच्या बहाण्याने स्वत: रोज तीन तास गेम खेळणं चालू. सुदैवाने,  त्याला एका मेगा प्रोजेक्टच्या क्रीएटीव्ह्चं काम मिळालं आणि आमची साऊथ इंडिया ट्रीप पुढे गेली होती. त्यामुळे माझं ड्रायव्हिंग (म्हणजे कारचं बरं का, गेममधलं व्हर्च्युअल ड्रायव्हिंग जमायला लागलं होतं.) लांबणीवर पडत चाललं होतं. मला नाहीतरी कुठे घाई होती.

असंच वर्ष गेलं असावं आणि एकदा पार्किंगमध्ये एशान गाडी चुकीची पार्क करून दुकानात गेला होता आणि पोलिसाने मला गाडी हलवायला सांगितल्यावर मी “येत नाही” म्हटल्यावर पावती फाडली. त्यानंतर लगोलग फ़र्मान सुटलं. “बास झालं, आता तू कार शिकायचीच” मग माझाही इगो फणा काढून फुत्कारला. “नाही शिकत जा. काय करायचंय ते कर. एकदा सांगितलं ना, मला भिती वाटते, तरी परत परत तेच तेच काय?”

घाबरून कसं चालेल? अपघात होतच असतात. त्यावेळेला भिती वाटते हे कबूल. पण त्या गोष्टीला आता पंधरापेक्षा जास्त वर्षं झालीत. विसरायचा प्रयत्न कर..”

“मला शक्य नाही. मी दोनवेळेला प्रयत्न केलाय. गाडी चालवायला स्टेअरिंगवर बसलं की मला असं वाटतं की ही गाडी तिच्या मर्जीने वाटेल तिथे जाईल. आणि जर मला ती गाडी कंट्रोल करायचा आत्मविश्वासच नसेलतर मी काय डोंबल ड्रायव्हिंग करणार?”

“तू दहावीत होतीस तेव्हा अपघात झाला म्हणून अजून घाबरतेस. मी आठवीत असेन. जेमतेम क्लचपर्यंत पाय पोचायला लागला होता, तेव्हा स्वत:च कार चालवायला लागलो. तिसर्‍याच दिवशी जाऊन एका रिक्षेला ठोकली. डॅड प्रचंड संतापलेला. तासभर ओरडला, बेल्टने मारलंसुद्धा. पण नंतर लगेच दुसर्‍या दिवशी स्वत: मला ड्रायव्हिंग शिकवायला घेतली, मी पण घाबरलोच होतो. पण डॅडने धीर दिला. शिवाय लायसन्स मिळेपर्यंत रस्त्यावर चालवायची नाही अशी ताकीद दिली.  मला जमलंच ना? तुलाही जमेल.”

तुझ्या हातांत कायम कार होती, माझ्या नव्हती. आतापण आमच्या अख्ख्या कुटूंबामध्ये असल्या लक्झरी कार्स असणारी मी एकटी आहे. तुमच्या घरामध्ये कार असणं मस्ट असेल, मला त्याची गरज नाही.

हे काही लॉजिक आहे का? तुला कार घेऊन कुणी पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगत नाहीये. कधीतरी इमर्जन्सीला अथवा गरज पडली तर...”

त्या ड्रायव्हिंग स्कूलवर किती वाटेल तितका पैसा खर्च कर. मी गाडी चालवणार नाही. बस, ट्रेन, रिक्षा तेही नाही जमलं तर चालत फिरेन. ड्रायव्हिंग ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही

जीवनावश्यक नसेल पण आवश्यक तरी आहे, मी काही कायम शोफर म्हणून येइनच असं नाही. आणि आता एकटी आहेस तर फिरशील. पण उद्या बाळूला घेऊन….”

आता हा बाळू कोणे?” अशा वेळेला एशान माझ्याकडे अगदीकाय करू काय मी तुझंया नजरेने बघतो. “ओह!” आमच्या अंधारगृहात तेवढ्यात दीप उजळला. “पण आपण काय ठरवलंय, अजून दोन-तीन वर्षं तरी….”

हो, म्हणजे तेवढा वेळ आहे ना? मग ड्रायव्हिंग शिकून घेना.” तो अगदी काकुळतीला वगैरे येऊन म्हणाला. “प्लीज! माझ्यासाठी!”

कर किती विनंत्या करायच्यात. मी यावेळेला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन महिनाभर टाईमपास करून येणार आणि लायसन्सच्या वेळेला काहीतरी घोळ घालून ठेवणार, बघच तू!! कोण म्हणतं टेलीपथी नसते, कुठल्याही नवराबायकोला विचारा... मी मनातच बोलत असले तरी ते ऐकल्यासारखं शान जोरात म्हणाला, “आणि आता ती ड्रायव्हिंग स्कूलची पाचकळगिरी खूप झाली. मीच शिकवेन. डॅडची जुनी मारूती आहे, पंधरा दिवस त्याच्यावर प्रॅक्टीस आणि मग माझ्या कारवर. दोनेक महिन्यांत आपण तुझ्या त्या फोबियाचं कायमचं लोणचं घालून टाकू”

“मी गाडी शिकणे” यापेक्षा एशानने मला गाडी शिकवणे ही कल्पना ब्लॉकबस्टर होती कारण, रात्री साडेअकरा वाजता हा प्राणी मला “चल, आत्ताच गाडी शिकवतो” म्हणायला लागला. मी कानांत हेडफोन कोंबले आणि तोंडावर पांघरूण घेऊन झोपी गेले. अवघ्या सहा तासांसाठीच. कारण पहाटे साडेपाच वाजता पांघरूण खासकन ओढून मानेवर फ्रीझमधला बर्फ टाकण्यात आला. लगेच एशानची शिकवणी चालू झाली.

शिकवणी म्हणजे अगदी बेसिकपासूनच. माझी जांभई कशीबशी आवरली होती, पण एशान मात्र सोड्यासारखा उत्साहाने फसफसत होता. “ही कार. हिला एकूण पाच चाकं असतात” मी एकदम दचकले. पण एशान “ऐक्कतच नाही” मोडमध्ये होता. “चार चाकं गाडी चालवायला आणि हे पाचवं स्टेअरिंग व्हील. ही इथून गाडी अशी चालवायली. हा क्लच. हा एक्सेल आणि हा ब्रेक. नीट लक्ष दे.” अशी इथपासून सुरूवात होऊन गाडीचं इंजिन नक्की कसं चालतं. त्याचा आरपीएम काय असतो, ब्रेक कसा लागतो यावर अगदी साद्यंत इत्यंभूत माहिती मला दिली गेली. एवढी माहिती ऐकून नवर्‍याचा एखादा छुपा बिझनेस कारच्या शोरूममध्ये सेल्समन किंवा गाड्या दुरूस्त करायचा असावा की काय अशी शंकासुद्धा आली.  एशानचा काय भरवसा नाही.

पण असं काही उत्साहाने सांगत असताना एशान इतका मस्त दिसतो की माझं अर्ध्याहून जास्त लक्ष तो काय बोलतो त्याकडे कमी, आणि त्याच्या चेहर्‍याकडेच आणि चमकदार हिरव्यानिळ्या डोळ्यांकडेच.  आमच्या लग्नाच्यावेळेला केशरी सोवळं नेसून बसलेला एशान इतका देखणा दिसत होता, की भटजी काय बडबडत होता त्याकडे माझं लक्ष नव्हतंच. शेवटी ते करवादले “आता विधींकडे लक्ष द्या, नंतर आयुष्यभर बघायचंच आहे त्यांच्याकडे” दुष्ट!! खडूस!! हा असा मुंडावळ्या घातलेल्या, टिळा लावलेला, सोवळ्यांतला एशान मिरचंदानी मला नंतर कधी बघायला मिळाला असता का?

भलत्यावेळी भलत्या गोष्टी आठवत राहिल्या की त्याला रोमॅन्टिक होणे म्हणतात का?

तर पहिले दोन दिवस ही अशी माहिती वगैरे देऊन झाल्यावर आमची वरात (लग्नातली नव्हे!) निघाली रेल्वे ग्राऊंडवर. इथे होल वावर इज अवर असल्याने थोडी कमी भिती! शिवाय एशानची कमेण्ट्री. गाडी स्टार्ट करून बंद करणे वगैरे दोन दिवस झाल्यावर मी हळूहळू गाडी चालवायला लागले. ही गाडीपण असली वस्ताद, एशान चालवत असतला की गपगुमान जायची आणि मी चालवायला लागल्यावर आचके देत डान्स करणे, गोलगोल फिरत राहणे असे नखरे करायची. एशान माझ्यावर ओरडायचा, मध्येच प्रेमाने समजवायचा, पण एकंदरीत बाकीच्या ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टरपेक्षा बराच चांगला होता. शिवाय रोज गाडी शिकून झाल्यावर ब्रेकफास्ट आयता मिळायचा, तसा तो रोज मिळतोच, पण गाडी शिकून दमल्यावर म्हणून एशान स्पेशल मेनू! 

पण मग थोड्या दिवसांनी वाटलं आपण उगाच इतके घाबरत होतो. सोबत एशान असल्यामुळे असेल कदाचित, पण एवढं दडपण वाटत नव्ह्तं. त्याच्या  सततच्या सूचना ऐकून गाडी शहाणी झाली असावी, आता थोडीतरी सरळ जात होती, मग वाटायला लागलं, ही गाडी मला कंट्रोल होऊ शकते, स्वत:चीच मर्जी असणारा हा एखादा राक्षस नाही तर ज्याचा कंट्रोल माझ्या हातात आहे अशी एक निर्जीव वस्तू आहे. आपणच चालवत असलेली गाडी रस्त्यावरून जात असताना मनामध्ये जो एक छान फील येतो तो कसला ऑस्सम असतो. पहिल्यांदाच हे अनुभवलं.

“उद्यापासून मी सोबत यायची गरजपण नाही. मस्त पिकप केलंस. याच रोडवर अजून आठवडाभर एकटी चालव, मग आपण कधीतरी हेवी ट्राफिकमध्ये चालवू” एशान शाबासकी देत म्हणाला. “आता लेफ़्टला घे, इथे एक मस्त कॅफ़े आहे, कॉफी भयानक असते...” असं तो म्हणत असताना आणि मी कार वळवत असताना समोरून एक ट्रक आला, आणि मग ते बापाचा माल असल्यागर स्टेअरिंग धरणं गाडी खड्ड्यात जाणं आणि ते पुढचं सगळं.

घरी आल्यावर मात्र मला लाज वाटायला लागली. कंचन आणि डॅड आले, आणि मला बोलताच येईना इतकी भिती वाटायला लागली. डॅडनी तीनदा “ठिक हो ना?” विचारलं तरी माझी दातखीळ बसलेलीच. जुनी का होइना, पण त्यांची कार मी ठोकली होती. त्याबद्दल ते काहीही म्हणाले नाहीत तरी मलाच कसंतरी वाटून राहिलं. नंतर तासभर बसून कंचनने माझं कसं काहीच चुकलं नाही, असे अपघात होणं किती नॉर्मल आहे हे मला सांगितलं, माझा बीपी वगैरे चेक केला आणि एशानला हॅन्डब्रेक मारायचं आधीच का सुचलं नाही म्हणून बडबडली.

या सगळ्यामध्ये एशान अचानक खूप शांत वाटत होता. अपघात झाल्याझाल्या ओरडला. नंतर थोडाफार बोलला तितकंच. पण डॅड आणि कंचन निघून गेल्यावर मात्र टोटल सायलेन्स. त्याचा नक्की काय मूड आहे ते मलाही समजत नसल्याने मीही गप्पच राहिले. कदाचित माझ्या असल्या बावळटपणामुळे चिडला असावा.

अपघाताच्या वेळेला जाणवलं नाही, पण संध्याकाळनंतर पाय प्रचंड ठणकायला लागला. एशानला काही म्हणावं तर तो त्याच्या ऑफिसरूममध्ये बसून होता. माझ्याशी अजिबात न बोलता. कसलीतरी पेनकिलर चहासोबत गिळली आणि झोपून गेले. वाटलं, एशानचा मूड उद्या ठिक होइल.

दुसर्‍या दिवशीपासून आमचं रूटीन चालू झालं, पण नेहमीसारखं हसत-खेळत नाही, तर गुपचुपपणे. वरकरणी पाहता कुणाला काही वेगळं जाणवलं नसतं पण मला शानमधला हा बदल फार डाचत होता. निव्वळ कामापुरतं गरज असेल तर बोलायचा. अन्यथा नाहीच. सकाळी मी ऑफिसला जायच्या आधीच तो जिमला निघून गेलेला असायचा, संध्याकाळी परत आल्यावर रोजच्यासारखी टीवटीव करत कॉफी बनवायचा नाही. उलट स्टडीरूममध्ये निघून जायचा आणि दरवाजा बंद करून घ्यायचा. एक-दोनदा मी असंच बोलायचा प्रयत्न केल्यावर तो सरळ निघून गेला. हे असं गप्प्गप्प वागण्यापेक्षा त्या अपघातासाठी त्याने माझ्या थोबाडीत मारले असते तरी परवडलं असतं.

रविवारच्या दिवशी मला सुट्टी असल्याने तो जिमला गेल्यावर त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑर्डर करून मागवला. मी स्वत: काही बनवणं तेही एशानला आवडेल असं या जन्मांत तरी शक्य नाहीये. सुगरण नवरा हा अतिशय तापदायक प्रकार असतो. आपण बनवलेलं त्याला काहीच आवडत नाही, म्हणून मी बाहेरून ऑर्डर केलं. घरात आल्याआल्या मी लगेचच “सॉरी एशान” म्हणून टाकलं. “कशाबद्दल” पायांतले शूज काढत त्याने विचारलं. अर्थात माझ्याकडे जराही न बघता.

“त्या ऍक्सिडंटबद्दल. आय ऍम रीअली सॉरी” इतक्या दिवसांचं साठवलेलं पाणी डोळ्यांतून उतू जायला लागलं. “त्यात तू सॉरी म्हणण्यासारखं काहीही नाही. जे झालं ते झालं.” म्हणून तो सरळ किचनमधे गेला. मी लगेच मागोमाग गेले. “मग तू नॉर्मलपणे का वागत नाहीस?”

घामेजलेल्या केसांवरून थंड पाण्याची बाटली अख्खी ओतत तो म्हणाला, “मी नॉर्मलच आहे की”

“कुठल्या ऍंगलने? जिममधून आल्यावर लोक शॉवर घेतात.. अशी बाटली ओतून घेत नाहीत” मी माझं सॉरी वगैरे म्हणायचं विसरून त्याच्यावर ओरडले.

“पहिल्यांदा बघते आहेस का? मला अशीच सवय आहे!” तो म्हणाला “आणि तुला सॉरी म्हणायची काहीही गरज नाही. मीच ऐकलं नाही. यु आर रीअली फोबिक. लेट्स नॉट टॉक अबाऊट इट”

“अरे पण, मी प्रयत्न करत होते ना....” माझं बोलणंदेखील ऐकून न घेता तो निघून गेला. मग काय, दिवसभर मी और माझी तनहाई, तो आणि त्याचा लॅपटॉप. मागवलेला ब्रेकफास्ट त्याने मधेच कधीतरी खाल्ला. मग मी थोड्यावेळाने. एकाच टूबीएचकेच्या खोलीमध्ये आमचा लपंडाव किती दिवस चालणार होता कुणास ठाऊक.

याआधी त्याचं आणि माझं भांडण कधी झालंच नाही असं नाही. किंबहुना भांडण ही एक गोष्ट आमच्या संसारामधे सर्वात कॉमन. आजवर आमचं कुठलंही भांडण बारा तासापेक्षा जास्त चाललेलं नाही. तेराव्या तासाला आम्ही भांडण संपवतो आणि मग चौदाव्या तासाला परत वेगळं भांडण. यावेळी मात्र तसं झालं नाही. आमचा प्रेमविवाह असला तरी मी घरातून अगदी कर्मठ सोवळ्याची आणि एशानचं घर पूर्णपणे नास्तिक. शिवाय, आंतरजातीय, आंतरप्रांतीय (शानच्या वडलांचं मूळगाव सध्या पाकिस्तानात असल्याने त्यामुळे एशान आंतरदेशीयसुद्धा म्हणतो) आमचं बर्‍य़ाच गोष्टींवर पटत नाही. मग अक्षरश: कचाकचा भांडायचो, पण तरी ती सगळी भांडणं लुटुपुटूचीच. हे असं इतकं तुटक वागणं मात्र पहिल्यांदाच.

माझ्यावर खेकसणारा वसकणारा भांडणरा एशान कसाही सहन करता येऊ शकतो, परवडत नव्हता हा असला पराकोटीचा अबोला. पहिल्यांदा असं जाणवलं की कदाचित एशानला मी आता नको झालीये. भांडताना “तुझ्याशी लग्न केलं तेच चुकलं म्हणणं वेगळं” आणि हे असं वागण्यातून जाणवून देणं वेगळं.

माझ्या घरी कुणाशी बोलायची सोय नव्हती. नवरा मारतोय, झोडतोय का? नाही ना, मग कसली चिंता. नाही बोलला महिनाभर तर काय बिघडलं. तूच पटवून घे, थोडं जुळवून घे वगैरे टिपिकल सल्ले मिळाले असते. त्यापेक्षा एशानशीच भांडलेलं परवडलं.

शेवटी कंचनशी बोलले. “कदाचित तू ओव्हर रीऍक्ट होतेस. आणि  किती दिवस गप्प बसेल? बोलेल कधीतरी.. उलट तुला जरा निवांतपणा. नाहीतर सारखी बडबड चालूच. टेन्शन घेऊ नकोस. कामाचे काही प्रॉब्लेम चालू असतील.” पण असं काहीही नाही, हे मला चांगलंच माहित होतं. मग तिने विचारलं “मी बोलू का त्याच्याशी?” महटलं नको, उगाच भडकायचा.

प्रत्येक वेळेला याचा अबोला तोडण्यासाठी म्हणून मी काहीही केलं तर ते माझ्याच अंगलट यावं अशी देवाची इच्छा. त्यादिवशी त्याला सहज विचारलं “उद्या घरी आहेस का?” तर “नाही. ऑफिस” असं निबंधाएवढं मोठं उत्तर आलं. मग ऑफिसमध्ये पोचल्यावर लगेच एक भलामोठ्ठा बूके आणि चॉकलेट्स त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवली. दिवसभर वाट पाह्यली, काहीतरी फोन येईल, मेसेज येईल काहीतरी म्हणेल, पण छे! पलिकडच्या लाईनवर कंप्लीट शांतता. पडलेली टाचणी टोचण्याइतकी.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरी आले तर एशान महाराज घरातच. “ऑफिसला गेला नाहीस?” मी आल्यावर सहज विचारलं. परत एक निबंध “नाही!”. शांतता. थोड्य़ावेळाने एशानला कुणाचातरी फोन आला, काहीतरी तणातणी झाली, आणि तो फोनवर बोलत तसाच बाहेर निघून गेला. अर्ध्या तासाने परत आला तेव्हा हातात सकाळी ऑर्डर केलेला बूके आणि चॉकलेट्सचा बॉक्स शिवाय, “हे आणण्यासाठी मला आत्ता ऑफिसमध्ये जावं लागलं. काही गरज होती का?” असं सांगणारी जळजळीत नजर. हे जेव्हा असले बूके पाठवतात तेव्हा आम्ही आपलं “सो क्युट” म्हणत यांच्या गळ्यात पडायचं आणि तेच आम्ही केल्यावर यांच्याकडून असलं वागणं. भलाई का जमाना नही, हेच खरं.

या अबोल्याचं काहीतरी करायलाच हवं होतं...

महिन्याभरानंतर ऑफिसमधून बाहेर पडायची तयारी करत होते तेव्हा एशानचा मेसेज आला. “आज डिनरला भेटू या?” खुर्चीतच परत धपकले. किती दिवसानंतर एशानकडून मेसेज आला होता. शेर ए चायनामध्ये भेटायचं म्हणे, एशानच्या बहुतेक बिझनेस रिलेटेड मीटींग इथेच व्हायच्या. त्याचं अत्यंत आवडतं आणि माझं तितकंच नावडतं हॉटेल. चायनीझ आणि पंजाबी पदार्थाचं फ़्युझन रेस्टॉरंट!! मी त्याला कायम म्हणायचे, तुझे बहुतेक क्लायंट हातातून जाण्याचं कारण हेच हॉटेल असावं. हक्का चिकन टिक्का, सेझवान मटण बिर्याणी असले पदार्थ आवडीने कोण खाईल? आमच्या इकडच्या स्वारीव्यतिरीक्त. पण आता स्वत:हून काहीतरी म्हणतोय तर मी जास्त विचार न करता येस असं उत्तर पाठवून दिलं. नाहीतरी मला त्याच्याशी स्पष्ट बोलायचंच होतं. घरात नाहीतर हॉटेलमध्ये तरी.. खूप विचार करून मी कपाटातला एक फुलाफुलांचा (फ्लोरल प्रिंट असं म्हणावं! कधी सुधारणार?) ड्रेस काढला, त्याला खूप आवडलेला.. आणि (बरोबर ओळखलंत) मला अजिबात न आवडलेला. त्यानंतर प्रचंड मेहनत करून (म्हणजे ब्युटीपार्लरमध्ये जाऊन) मेकप आणि हेअरस्टाईल वगैरे सर्व रीतीरिवाजानुसार केलं. खरंतर एशानला मी अशी नटले-सजले की फार आवडायचं. पण मलाच त्यामध्ये कसलाही उत्साह नसायचा. बर्‍याचदा माझा जागतिक वेष टीशर्ट, जीन्स, शॉर्ट्स-गंजी वगैरे असलाच!! पण आज इतक्या दिवसांनी असं रोमॅन्टिक डेटवर विचारलंय तर... होऊ दे खर्च!

मी पोचले तेव्हा त्याच्या नेहमीच्या आवडत्या टेबलवर बसलाच होता. “मोबाईल फोन उशीर होतोय हे सांगण्यासाठी पण असतो,  नुसती गाणी ऐकण्यासाठी नाही” पोचल्यापोचल्या आहेर मिळालाच. सो मच फॉर द रोम्यान्टिक डेट. “सॉरी, ट्रेनला फार गर्दी होती” मी सवयीने बोलून गेले. त्यानं माझं बोलणं न ऐकल्यासारखं करत मेनूमध्ये तोंड खुपसलं होतं. मी थोडावेळ उगाच इकडेतिकडे बघत राहिले. असं वाटलं की मी इथे आलेलं एशानला आवडलं नाही. मला आलेलं बघून त्याच्या नजरेमधली नाराजी स्पष्ट दिसली होती. मग कशाला बोलावलं होतं आणि काय खटकलं होतं कुणास ठाऊक. काम कसं चालू आहे?” मीच विचारलं.

“ठिकठाक!!” आणि मग वेटर ऑर्डर घेऊन गेला. उरलेलं सर्व डिनर संपूर्ण शांततेमध्ये. तो काही बोलत नव्हता, म्हणून मी काही बोलत नव्हते. मी एवढा वेळ खपून तयार झाले, त्याने आणलेला ड्रेस घातला त्यावर एशानने चकार शब्ददेखील काढला नव्हता. शेवटी हॉटेलबाहेर पडताना मी त्याला धीर करून विचारलं. “एशान. ड्राईववर जाऊ या, शहराबाहेर!”

“एवढ्या उशीरा?” मी नुसती मान डोलावली. त्यानं गाडी पार्किंगमधून काढून हायवेला घातली. सुदैवाने कुठेही जास्त ट्राफिक लागलं नाही. रफी आणि लता दोघे मिळून काय तरी म्हणत होते, पण आमचं लक्षच नव्हतं.  दोघंही दोन वेगळ्या ग्रहांवर असल्यासारखे एकमेकांच्या नजरेपासून लांब!! जवळ जवळ तासभर फिरत होतो, पण एकही शब्द बोलता. पनवेलजवळ आल्यावर त्याने विचारलं. “आता कुठे? पुण्याला की गोव्याला?” अंगभर खवचटपणा!

“एवढ्या लांब कुठेही नाही, इथेच कुठेतरी चहा घेऊ आणि परत फिरू. रात्रीचा एक वाजलाय.”

“चहा घेण्यासाठी इतक्या लांब, सांगितलं असतं तर मी घरात पण करून दिला असता” खवचटपणा गुणिले शंभर.

“खरंच, ऐकलं असतंस? गेल्या दोन महिन्यांत काय ऐकलंस?” मी अचानक विचारलं.

“आय ऍम सॉरी.” एवढंच तुटक उत्तर. याचा अर्थ हा विषय इथेच बंद.

“सॉरी कशाबद्दल?मी आता ऐकणार नव्हते. “नक्की काय प्रॉब्लेम आहे हेतरी समजू देत.. मागे आपलं भांडण झालेलं तेव्हा काय लेक्चर दिलं होतंस. आपल्या दोघांमधले शब्द महत्त्वाचे, संवाद महत्त्वाचा. काहीही झालं तरी आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलायचं आणि आता असा तिर्‍हाईतासारखा का वागतोस?”  

काही न बोलता तो गाडी चालवत राहिला, हायवेने नव्हे, कुठल्यातरी आतल्या रस्त्यावरून. थोड्या वेळाने गाडी बाजूला लावली. “मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केलाय, पण हिंमत होत नाही. स्वत:ची चूक कबूल करता येत नाहीये. मला तुला काहीतरी सांगायचं आहे..पण.....”

“प्रस्तावना बंद कर आणि मुद्द्याचं बोल. काय सांगायचं आहे? मला काय समजत नाही का? एरवी टिपीरटिपीर बोलता येतं पण जिला साधी चारचाकी गाडी चालवता येत नाही असली बावळट बायको नको हे सांगायला दोन महिने लागतात? एशान, मला चांगलं माहित आहे की मी तुझ्यालायक नाही, मग....”

“शटाप!!” एशान हात स्टेअरिंगवर आपटत जोरात ओरडला. “जस्ट शटाप. कोणी म्ह्टलंय की तू माझ्यालायक नाहीस? तू जशी आहेस, तशीच मला आवडली होतीस. आणि मी त्याच मुलीवर आजही प्रेम करतो जिला मी कॉलजच्या पहिल्यादिवशी सात वर्षापूर्वी पाहिलं होतं, त्यामुळे लायकीचं वगैरे प्लीज बोलू नकोस.”

“ओरडू नकोस. तुझं वागणं काय ते बघ.. क्लीअरली  अपघातापासूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे!”

“येस्स, त्या अपघाताच्या दिवसापासून... त्या दिवशी पहिल्यांदा काहीतरी जाणवलं आणि मी अजूनही ते मान्य करू शकत नाहीये... त्या दिवशी जर तुला काही झालं असतं तर.. माझ्या हट्टासाठी, माझ्या इगोसाठी तुला भिती वाटत असतानासुद्धा गाडी चालवायला लावली, तू तयार नव्हतीस. पण मला ही गोष्ट इतकी क्षुल्लक वाटली होती.... त्या दिवशी जे काही घड्लं त्यासाठी मी मला अजिबात माफ करणार नाही...”

“पण काही झालं तर नाही ना? आपण दोघे होतो त्या गाडीमध्ये, पण नशीब चांगलं होतं...”

“पण... नशीब चांगलं नसतं तर? मी तुला इतकं गृहित धरत चाललोय की... विसरूनच जातो की तू माझ्यापेक्षा वेगळी आहेस..”

“तेच तर मी मघाशी म्हणत होते...”

“नाही, तू वेगळी आहेस, कारण तू मी नाहीस, आपण एकत्र आहोत, एकमेकांवर खूप प्रेम करतो, एकरूप झालोय.. व्हॉटेव्हर. पण मी खरंच... हे लक्षात घेतलं नाही.. की तू म्हणजे मी नव्हे... जे मला जमेल ते तुला जमायलाच हवं हा अट्टहास चुकीचा. तुझं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे, अस्तित्त्व वेगळं आहे. ज्या गोष्टीवर मी इतकं प्रेम करतो, तुझं माझ्यापेक्षा खूप वेगळं असणं, तुझं इतरांपेक्षाही वेगळं असणं तीच गोष्ट मी मिटवायला बघतोय. जणू काही, तुला मोडून-तोडून तुला एका टिपिकल साच्यात घालून तुला फक्त आणि फक्त एशानची बायको एवढंच बनवतोय....त्याअलिकडे आणि पलिकडे तुझं काही अस्तित्वच नसल्यासारखं... तू मला खुश करण्यासाठी जितकी तुझ्यापेक्षा वेगळी वागत जातेस, तितकं मला ते जास्त डाचत जातं. जी गोष्ट तुला करायचीच नाही, ती केवळ मला बरं वाटावं म्हणून, तुझ्या मनाविरूद्ध वागायला, मी तुझ्यावर अशी जबरदस्ती करणं....इट इज मोअर ऑर लेस, आय ऍम रेपिंग यु”

“एशान, एवढा एक्स्ट्रीम विचार करायची गरज नाहीये, तुझं म्हणणं चूक नव्हतं, मी ड्रायव्हिंग शिकायची खरंच गरज आहे...”

“नाही, प्रश्न फक्त ड्रायव्हिंगचा नाही. प्रत्येक बाबतीतच. मी तुला इतकं फोर्स करायला नको हवं होतं. आय ऍम सॉरी. यापुढे मी असं कधीही करणार नाही” तो मान खाली घालून अगदी गंभीरपणे म्हणाला, आणि मला फिस्सकन हसू आलं. एशान नेहमी म्हणतो तसं चुकीच्या वेळी चुकीची प्रतिक्रिया!!! “कमॉन, एवढा काही मोठा प्रॉब्लेम झालेला नाही. इट्स ओके.” मी त्याचा हात धरत म्हटलं. “इतका विचार करू नकोस.”

“ईट्स नॉट ओके, कधीकधी वाटतं तू मला जशी आवडतेस तसं तू रहावंस. आणि मग  वाटतं, तसं नाही, तुला जसं हवं तसं तू रहायला हवंस. माझ्यासाठी म्हणून तू बदलता कामा नयेस, शेवटी असं वाटतं की मलाच इमोशनल स्किझोफ्रेनिया झालाय!”

“एशान,” मी त्याच्या केसांतून हात फिरवत म्हटलं. “कसला गोड आहेस. आणि हा काय विचार करतोस? मूर्खासारखं बोलायला काही लिमिट आहे का? मी तुझ्यासाठी पूर्णपणे बदलण्याचा प्रश्न येतो कुठे? तुझ्या आवडीचा ड्रेस घातला, तुला आवडतं म्हणून त्या बेक्कार हॉटेलमध्ये जेवायला आले, किंवा तुला आवडतं म्हणून काहीही वागले, तरी मी बदलत नाही. मी आतून तीच आहे. तुला असं वाटतं का की गेल्या साडेतीन वर्षाच्या आपल्या लग्नामध्ये मला ही छोटीशी गोष्ट समजली नसेल... की माझा नवरा माझ्यावर प्रेम नक्की कशासाठी करतो? आतून, मनामधून... असं माणूस बदलत नसतं. एकत्र राहिल्यावर थोडेफार बदल लाईफस्टाईलमध्ये होणारच.  तू नाही का बदललास.. रजिस्टर मॅरेजचा हट्ट सोडून विधीवत लग्नाला मान्यता दिलीस. माझं कसलं बावळटासारखं वागणं सहन केलंस. मग तूही बदललास का? नाही ना. तू मला कसल्याही साच्यामध्ये घालूच शकत नाहीस कारण एशानची बायको असा साचाच अस्तित्त्वात नाही. तुझ्यासारख्या गोड आणि वेड्या नवर्‍याची बायको ही युनिकच असू शकते. माझ्यासारखीएशान किंचित गालांत हसला. “माझं काय चुकलं ते मला चांगलं समजलंय, चूक सुधारण्यासाठी मी तयार आहे. पण तू प्लीज माझ्यापासून असा दूर दूर राहू नकोस. मला ओरड, माझ्याशी भांड, पण हा असा कोरडेपणा नको....मी तुझ्यापासून दूर होण्य़ापेक्षा तू जवळ असून असा दुरावत गेलास तर.... तर मला ते सहन होत नाहिये. डू यु रीअलाईझ गेल्या दोन महिन्यांमध्ये मी कितीवेळा एकटीच रडलेय, किती वेळा विचार केला की संपलं सगळं, ज्या एशानचा वेडेपणानं हात धरून मी आले, त्यानं आता माझा हात सोडून दिलाय. कदाचित, इतके दिवस आम्ही दोघं सुखी संसाराचं नाटकच करत होतो, आणि आता त्याला हे नाटक नकोय. एशानला मी नकोय...कितीही वेळा या असल्या विचारांना मनातून हाकलायचं म्हटलं तरी शक्य होत नव्हतं. यु नो व्हॉट, आय लिटरली हॅव गॉन एन एक्स्ट्रा माईल, जस्ट टू प्रूव्ह हाऊ मच आय लव्ह यु!...” बोलता बोलता डोळ्य़ांतून पाणी आलंच. “पण जर तुला मी नकोच हवी असेल तर...”

“नाही.... चुकूनही असं म्हणू नकोस. त्या क्षणाला, तुझ्या हातातून गाडीचा कंट्रोल गेला, त्याच वेळी मी स्वत: किती घाबरलो होतो.. तुझ्याशिवाय एकही क्षण जगण्याची, किंबहुना तुझ्याशिवाय एखादं विश्व असण्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. आयुष्यातला एक क्षण... जिथे तू नसशील.. असा एकही क्षण मला नकोय. माझ्या या वागण्यामुळे तुला जो काही त्रास झाला,  त्याबद्दल आय ऍम सॉरी,  मला माफ कर.”

एशानने माझा हात घट्ट धरला.  काही क्षण असे असतात, जिथे बोलायची गरजच नसते. असाच हाही एक क्षण. भर रात्री दोन वाजता अत्यंत सुनसान अशा त्या रस्त्यावर मी आणि एशान कारमध्ये बसून एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलो होतो. एशान खरंच वेडाय. त्याला असं वाटलंच कसं.... आणि मी काहीतरी कमी वेडी आहे का.... मला माझा एशान असा का वागतोय हे कसं लक्षात आलं नाही. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट त्याच्याच मनासार घडत गेलेल्या.. कुठल्याही बाबतीत जमत नाही, जमलं नाही हे माहितच नाही. जी गोष्ट जमणार नाही, त्याच्याच उरावर बसून त्याचाच ध्यास घ्यायचा स्वभाव. माझ्या अगदी उलट. जी गोष्ट जमत नाही, तिथून सरळ पळून निघायचं. देवाने ही जोडी अशी काय जमवली होती... दोघांनाही हीच भिती होती की, समोरचा बदलून गेलाय. पण खरंच काही बदललेलं नव्हतं. एशान आधी जसा होता, तसाच आताही होता.  अशाच एका दिवाळीच्या रात्री त्याने मला घरी सोडायला म्हणून माझ्यासोबत येऊन अनपेक्षितरीत्या मध्यरात्री रस्त्यावर विचारलं होतं. “माझ्याशी लग्न करशील?” चार वर्षं कॉलेजमध्ये सोबत असून कधीच मला समजलं नव्ह्तं, की या मुलाचं माझ्यावर प्रेम आहे. प्रेम वगैरे नाहीच, डायरेक्ट लग्नच. आयुष्यामध्ये त्याने माझा हात धरला तो कधीही न सोडण्याचं वचन देऊनच.... कितीवेळा भांडून घर सोडून गेले तरी त्यानं मला कधीच थांबवलं नाही, तो माझ्यासोबत घर सोडून आला. बीलीव्ह मी, ते खरंच जास्त वैतागवाणं असतं, आपण भांडून त्वेषानं बाहेर निघालोय आणि हा आपला बॉडीगार्डसारखा मागे मागे येतोय.

“निघू या?” थोड्यावेळाने त्यानंच विचारलं. “तुला उद्या ऑफिस आहे...”

“उद्या? आज म्हण. पहाट व्हायला आली. घरी पोचायला सकाळ उजाडेल. मी आज सरळ सुट्टी घेईन....”

तुला बरंय, पण माझा खडूस बॉस मला सुट्टी देणार नाही” गाडी चालू करत एशान खोट्या गंभीरपणे म्हणाला, आणि मी त्याला फटका मारला. बिल्डिंगजवळ आलो तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. “एशान, एक सांगू”

“हुकूम करा!”

“गाडी सोसायटीमध्ये घेऊ नकोस. रेल्वे ग्राऊंडला जाऊ या...”

“कशाला? ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस करायला? रात्रभर जागरण झालंय़. उद्यापासून येत जाऊ... तुला भिती वाटत असेल तर अजिबात नको.”

“प्लीज. चल ना...” मी चेहर्‍यावरचं हसू कसंबसं लपवत म्हटलं. “ट्राय करून बघू...”

“ओके... ऍज यु विश. पण मी रोडवरून चालवू देणार नाही.”

रेल्वे ग्राऊंडवर मी ड्रायव्हर साईडला बसले. आणि एशान माझ्या जागेवर. “हे बघ, सावकाश. घाबरू नकोस. नजर समोर. पाय क्लचवर आणि.....” त्यानं पुढं काही बोलायच्या आत काही आचके बिचके न देता गाडी चालू झाली होती आणि सरळ ग्राऊंडबाहेर निघाली होती. ग्राऊंडमधून गाडी रस्त्यावर आणेपर्यंत एशान माझ्याकडे नुसता बघत होता.

“इम्पॉसिबल!!! शक्यच नाही” तो अविश्वासानं म्हणाला, “डॅडने शिकवली?”

इतका वेळ कंट्रोल करून ठेवलेलं हसू अचानक सांडलं. “बरोब्बर.. तू एकदा म्हणाला होतास की त्यांनी तुला गाडी शिकवली. म्हटलं फुटकळ शिष्याकडून शिकण्यापेक्षा गुरूच गाठावा, दोन महिने रोज त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करत होते. ”

“तू जसा रीव्हर्स मारलास ते बघून समजलं.. पण घरात डॅड आल्यावर तू समोर येत नाहीस. लहान पोरांसारखी घाबरतेस. एक वाक्य नीट बोलत नाहीस... आणि मग आता अचानक.. “

“कंचनची आयडीया. मी आधी तयार नव्हते. इट वॉज अ बॅटल बीटवीन टू फोबिया. जास्त भिती कशाची वाटते.. ड्रायव्हिंगची की डॅडची. अल्टीमेटली, हे समजलं की दोघांनाही घाबरण्यासारखं काही नाही. ड्रायव्हिंग हा प्रॅक्टिसचा भाग आहे, आणि डॅड खरंच खूप चांगले आहेत.... इतकी वर्षं मी उगाच बिचकत होते. त्यात तू शहाणा मला उगाच घाबरवायचा, डॅड असे मारायचे तसे  ओरडायचे वगैरे... डॅडनी तुझ्या लहानपणचे किस्से सांगितले. मार खाण्यालायकच कामं करायचास!!” पण एशानचं माझ्या बोलण्याकडे कमी आणि मी गाडी कशी चालवत होते त्याकडे जास्त लक्ष होतं. सकाळचे नुकते सहा वाजले होते. रस्त्यावर ट्राफिक जवळ जवळ नव्हतंच त्यामुळे तसंही मला ड्रायविंगला फारसा प्रॉब्लेम नव्हता. “पण जोपर्यंत तू मला सॉरी म्हणत नाहीस, तोवर तुला सांगणार नव्हते.”

“आधी माहित असतं तर केव्हाच सॉरी म्हटलं असतं, यु आर जस्ट अमेझिंग!”

नुकत्याच उगवलेल्या सूर्याची किरणं एशानच्या चेहर्‍यावर पडली होती. त्या कोवळ्या उन्हामध्ये त्याचा गोरा रंग चमकत होता. त्याच्या हिरव्यानिळ्या डोळ्यांमध्ये रंगांची वेगळीच उधळण झाली होती. खूप सारं आश्चर्य, खूप सारं कौतुक, खूप सारी माया, खूप सारं समाधान आणि खूप सारं प्रेम... अर्थातच फक्त माझ्यासाठी!!

+++++(समाप्त)