Sunday, 5 January 2014

प्रेमकथा

“नवीन काही लिहिलंस?” तिनं विचारलं.

“हं”

“काय?”

“एक प्रेमकथा” तो त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला. ती हसली. “प्रेमकथा आणि तू?”

“का? त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे?”

“विश्वास बसत नाही. इतक्या दिवसांत कधी प्रेमकथा लिहिली नव्हतीस तू...”

तो गालातच हसला, तेव्हा तिने त्याच्या गालावरच्या खळीवर हलकेच टिचकी मारली. “ऐकव ना..”

“आता?”

“मग कधी? ऐकव पटकन!”

“मग ऐक, मधेमधे बोलू नकोस, आणि भलतेसलते प्रश्न विचारू नकोस”

“वा! वा!! इरशाद” ती पटकन बोलून गेली. त्याने तिच्या डोक्यात टपली मारली. “असला वात्रटपणा करशील तर मी नाही ऐकवत.”
“सॉरी” ती त्याचेच कान पकडत म्हणाली. “आता अजिबात बोलणार नाही..” त्याने एक क्षण तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या हसर्‍या डोळ्य़ांत त्याचाच चेहरा नाचत होता.

“एक दुनिया होती. वेगळीच, दूर कुठेतरी. सुरूवात, शेवट, आदि, अंत काहीही नसलेली. एखाद्या विस्तीर्ण अवकाशासारखी ती दुनिया. एक वेगळंच विश्व होतं ते. त्या दुनियेमधे दोन जीव असेच फ़िरत होते. कशासाठी? कुणासाठी? त्यांनापण माहित नव्हतं. कधीपासून? कधीपर्यंत? तेही माहित नव्हतं. पण ते असेच फ़िरत होते. खरंतर तरंगत होते. कारण या दुनियेला जमीन नव्हती, आकाश नव्हतं, होतं ते फ़क्त चारी बाजूंना पसरलेलं क्षितीज.” ऐकता ऐकता तिने डोळे मिटून घेतले. आता तिला फ़क्त त्याचा आवाज तिच्या डोळ्यासमोर दिसत होता. “तर असेच हे दोन जीव एकमेकांसमोर आले. एके दिवशी. फ़िरता फ़िरता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांनाही वाटलं... आपण ओळखतो एकमेकांना. काहीतरी ओळख आहे, पण नाही. दोघंही स्वत:लाच एकदम म्हणाले. “आपण तर एकदम अनोळखी आहोत” आणि ते आपापल्या मार्गाने पुढे निघाले. निघताना दोघांची नजर मात्र एकमेकांना भेटली. किती वेळ? निमिष हा शब्द म्हणायला जेवढा वेळ लागतो त्याच्या पाव शतांश वेळ. बट देन देअर वॉज मॅजिक... जादू झाली. त्या दोघांच्या नजरेतून एक ठिणगी जन्मली. स्पार्क! केवढी होती ती ठिणगी. एवढीशी, चिमुकली. पण जादू होती खरी. जादू! ती ठिणगी मोठी मोठी होत गेली. इथे आपल्या त्या दोन अनोळखी जीवांना माहितच नाही, ते आपले फ़िरतातच आहेत तिकडे भलतीकडे. काहीतरी शोधत. आणि इकडे ही ठिणगी इतकी मोठी झाली.... की तिचे हजारो तुकडे झाले. हजारो तुकड्यांचे परत हजार तुकडे. त्यातल्या एका तुकड्याचा बनला एक तारा, तेजस्वी, लकाकणारा. चमकणारा. तुझ्या डोळ्यांसारखा. मग त्या तार्‍याच्या भोवती अजून काही तुकडे जमले. त्यातला एक निळा तुकडा होता, त्यावर सृष्टी तयार झाली. तिथेच का? कुणालाही माहित नाही. हजारो रंगांची, लाखो क्षणांची, करोडो श्वासांची सृष्टी....” बोलता बोलता तो थांबला.

“आणि मग?” तिने मिटलेले डोळे उघडत विचारलं.

“ते अनोळखी जीव असेच कधीतरी फ़िरत फ़िरत त्या निळ्या तुकड्याजवळ आले, आणि योगायोग बघ, दोघांना पण ही नवीन दुनिया प्रचंड आवडली. दोघंही इथेच रहायला आले. इथल्या दुनियेचेच बनून. आणि मग एके दिवशी अजून एक जादू झाली... इथेच राहत असताना ते एकमेकांना भेटले. अजून एकमेकांसाठी अनोळखीच होते ते. पण त्या नजरेने दुसर्‍या नजरेला लग्गेच ओळखलं. हीच ती जादू करणारी नजर. हीच ती फ़ुलबाजीसारखी ठिणग्या उडवणारी नजर.. हीच ती....” तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला, “हीच ती... स्वतंत्र दुनिया वसवणारी नजर... हीच ती.. इतकी वर्षं शोधत असलेली नजर..”

तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “हीच ती... नजरेने नजरेला भिजवणारी नजर, आणि मग ते दोघं अनोळखी राहिलेच नाहीत.. या नजरेनेच कधीचेच एकमेकांचे होऊन गेले.” तो हलकेच म्हणाला आणि पुढे होऊन त्याने तिच्या गालावर ओठ टेकले.

ती हसली. थोडीशीच. “काहीही...” डोळ्यांतलं पाणी पुसत ती म्हणाली. “ही अशी प्रेमकथा? कोण वाचेल?”

“तू ऐकलीस ना? मग अजून कशाला कुणी वाचायला हवी?” तो म्हणाला.

“काहीही...” ती परत म्हणाली. “असं थोडीच घडत असतं कुठे?”

“पण कुठेही असं घडतच नसतं, असंही नाही ना.......” तो म्हणाला.  

Thursday, 2 January 2014

राधा

एक ओढ लागते मनाला...

तुझ्या दर्शनाची..

कधी गेला होतास तू इथून? किती दिवस, किती महिने, किती वर्षं, हिशोब तरी आहे तुला.

माझ्याकडे आहे. त्या प्रत्येक क्षणाचा, त्या प्रत्येक निमिषाचा, डोळ्यांतून झरलेल्या प्रत्येक अश्रूचा.. माझ्याकडे आहे  हिशोब.

एवढ्यात विसरलास का रे मला? कधीकाळी तुझ्या मुखातून पडणारा पहिला शब्द माझ्यासाठी होता, तुझ्या तेजस्वी डोळ्यांतला प्रकाश माझ्या स्वप्नात होता. होते आणि तुझ्या बासरीची धुन माझ्या श्वासात होती. आज ते शब्द आहेत, स्वप्नं आहेत आणि तेच श्वास आहेत. नाहीयेस तो फ़क्त तू.

वेशीपलिकडे तू गेलास तरी मागे वळून पाहिलं नाहीस. दूरदेशी निघालास... आणि मी मागेच राहिले. एवढं बळ नव्हतं माझ्यात की मी तुला म्हणावं. “सरक!मीपण येते तुझ्यासोबत” पण तू तरी मला म्हणालास का रे माझा हात धरून? “चल माझ्यासोबत” जगाच्या अनादिअनंतापर्यंत कुठेही तुझ्यासोबत आले असते, कसल्याही मार्गावरून केवळ तू पुढे आहेस म्हणून चालले असते. आणि कसल्या संकटांना केवळ तू सोबत आहेस म्हणून भिडले असते. क्षितीजाच्या अंतापर्यंत आणि जगाच्या कूठल्याही टोकापर्यंत. कशालाच घाबरले नसते. जर  तुझी साथ असती तर... तू सोबत असतात तर.. तर.. तर.. -शेवटी या जर-तरच्याच गोष्टी.


पण तुझी साथ नाही.. हेच एक विदारक सत्य. या गावामधे, या घरामधे, या मनामधे... आता फ़क्त मीच आहे. एकटी. एकाकी. तू फ़ार मोठा झालास म्हणे. कित्येक आयुष्यांचे निर्णय हल्ली तुझ्याच मर्जीने होतात. पण मग या एका साध्या क्षुल्लक जीवाचा निर्णय करायला तुला एवढा वेळ का लागतोय? काय मागितलंय मी तुझ्याकडे? केवळ तुझं एकवार दर्शन. केवळ तुझी सस्मित मुद्रा डोळ्यांमधे साठवून घेण्याचं भाग्य. एकदा तुझं दर्शन घडू देत, आणि तोच श्वास अखेरचा असू देत, ही मागणी माझी. पण अद्याप ती तुझ्या कानांपर्यंत गेली नाही...

किती वेळ मी अशीच तडपत राहू? किती वेळ मी अशीच स्वत:शी झुंजत राहू? खिडकीमधून येणारा वारासुद्धा हल्ली मला बघून हसतो. “अगं वेडाई, मी त्याच्याच गावाकडून आलो, त्याला पाहून आलो” त्याच खिडकीतून अंगणभर सांडलेलं चांदणंसुद्ध हेच सांगतं.. “आम्ही भेटलो बरं का त्याला” आणि मी मात्र इथे तुझ्या दर्शनासाठी वाटेवर नजर पसरून बसले आहे. एक एक श्वास मोजत.

परत एकदा डोळ्यांतून पाणी येतं. स्वत:च्याच दुर्भाग्याची दया येते. कित्येकदा वाटतं इथून उठावं, रस्ता फ़ुटेल तिथे निघून जावं. कुठलातरी एक रस्ता असेल, जो तुझ्या घराकडे जात असेल. कुठलीतरी एक वाट असेल ज्याच्या शेवटी तुझे चरण दिसतील. हृदयाच्या कोपर्‍या कोपर्‍यामधे जपून ठेवलेल्या तुझ्या स्मृती वेळीअवेळी नजरेसमोर येत जातात. माझ्या नकळत माझ्या मनावर साम्राज्य करतात, आणि मग सगळं जग म्हणतं ती बघा चालली, अजून एक वेडी. त्याच्यापायी.

वेड लागेल नाहीतर काय? तुझ्यापासून दूर गेल्यावर काय अवस्था होते याची तुला कधी कल्पना तरी आहे? कधी मागे वळून पाहिलंस? कधी पाहिलंस की तुझ्या पायाने तुडवली गेलेली फ़ुलं अजून कशाच्या प्रतिक्षेमधे आहेत? निव्वळ तुझ्या दर्शनाच्या आशेने जिवंत जळणारी मी तुला अजूनही दिसत नाही का?

पंचमहाभूतांवर  ज्याची सत्ता आहे, त्याला मला एकहीवेळ दर्शन देता येऊ नये? माझ्यासाठी त्याच्या व्यग्रातिव्यग्र दिनक्रमातून थोडावेळ काढता येऊ नये.. की मग त्याला आवश्यकताच भासत नसेल. कोण आहे मी आता त्याच्या लेखी? संपूर्ण देशामधल्या लावण्यवतींचा खजिना त्याच्या अंत:पुरामधे वसलेला आहे. ज्याच्यासमोर साक्षात रतीमदनाने नतमस्तक व्हावं असा तोच मुळात सौंदर्याचा पुतळा आहे... राजबिंडा, काळासावळा, चेहर्‍यावर सदैव असलेलं ते खट्याळ हसू. त्याला माझी चिंता कशाला?
मी डोळे मिटून तुझा चेहरा आठवतेय. विश्वास बसतोय? मी तुझा चेहरा आठवतेय.. जी गोष्ट कधी विसरलीच नाही ती आठवतेय... किती वर्षं झाली तुला पाहून... आता कदाचित बदलला असशील. पण माझ्या नजरेसमोर अद्याप तुझा तो एकच चेहरा दिसतोय.. माझ्याकडे अशा काही प्रेमानं पाहणारे- जणू काही अख्ख्या सृष्टीमधे मीच एकटी आहे, असं मला भासवणारी ती नजर. तुझीच ती मायावी नजर. एकदा या नजरेला नजर भिडली की ही अशी माझ्यासारखी अवस्था होते. ना धड जिवंत, ना धड प्रेत!  

मी धावत आरश्यासमोर जातेय. आरश्यामधे माझीच प्रतिमा माझ्याकडे उलट बघतेय. नाही.. मला नाही पहायचा हा चेहरा. मला दुसरा कुठलाच चेहरा आता पहायचा नाही  मला तो चेहरा पहायचाय. ज्याच्या दर्शनासाठी मी एक एक श्वास मोजतेय तो चेहरा. आरश्याच्या समोर पडलेली काजळाची ड्बी मी उचलली. यातलं काजळ माझ्याच गोर्‍या चेहर्‍यावर माखून घेतलंय. माझ्या काळ्याच्या चेहर्‍यासारखे... लांबलचक सरळ आणि मोकळे सोडलेले उचलून केस घट्ट बांधले.. कधीतरी तुला आठवत असतील का रे हे केस? तू हातात घेऊन कायम म्हणायचास “भगवान शिवशंकरांनी जसं गंगेला जटेमधे रोखलं तसं तुझ्या या केसांनी मला रोखून धरलंय....”
  
अंगावरच्या वस्त्रांची किती दिवस झाले मला शुद्ध नाहीच.... तरी आता धावत जाऊन कुठून तरी एक पिवळा शेला आणलाय. अगदी तुझ्यासारखाच. तू जसा नेसतोस तसाच नेसायला. गळ्यामधे तुझ्यासारखीच टपोर्‍या फ़ुलांची माळा घालतेय. आता यावेळी घरामधे कुठून आली ही माळ, माहित नाही. पण सुवर्ण मोती, चांदीपेक्षा तुला फ़ुलांचं भारी कौतुक, अगदी मला भेटायला येतानासुद्धा कायम वेगवेगळ्या रंगाची, वासांची फ़ुलंच घेऊन यायचास. “हे निसर्गाचं देणं आहे, त्याच्यासारखी कारागिरी कुणालाही करता येणार नाही” असं म्हणत. तुला किती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रूप, मग ती पक्ष्याची शीळ असो, वा नदीकाठी मिळालेला रंगीबेरंगी दगड. ही अख्खी सृष्टीच जणू तुला आनंद देण्यासाठी निर्माण झालेली.

खिडकीमधून एवढा वेळ येणारा वारा अचानक थांबलाय. चांदणं गायब झालंय. आत्ता इतके दिवस जपून ठेवलेलं ते एकुलतं एक मोरपीस मी बाहेर काढलंय, माझ्याच केसांत लावायला. आता फ़ार मोठा राजा झालास म्हणे. पण इथे असताना कुठे होता तुझ्याकडे मुकुट. एका गवळ्याचा पोर तू. रानावनात कुठेतरी मिळालेल्या मोरपिसाचेच अलंकार होते की तुझ्याकडे. आता ढीगाने असेल तुझ्याकडे अलंकार, पण हे असं सुंदर रंगीबेरंगी झळाळतं मोरपीस आहे का तुझ्याकडे? जसं आता या क्षणी मी तुझ्या कुरळ्या केसांमधे लावलं आहे अगदी तसं. तुझ्या निळ्या रंगाची सावली ज्यामधे पडली आहे तसलं मोरपीस.

आरश्यामधे मी हे रूप निरखतेय. केव्हापासून. काहीतरी कमी आहे. माझ्या सावळ्याच्या रूपामधे आणि या रूपामधे काहीतरी कमी आहे. अचानक आठवलं. ठेवलीये... मी तीसुद्धा जपून ठेवलीये. अशीच कुठेतरी. सगळं घर शोधायला लागलं तरी हरकत नाही. इथेच.. याच ठिकाणी ठेवली आहे. सापडली. हीच ती तुझी बासरी... इथून जाताना इथलं काहीही घेऊन गेला नाहीस. ही बासरी पण इथेच ठेवलीस. माझ्याशिवाय लाख करमत असेल तुला. पण हिच्याशिवाय कसं करमतं रे तुला? तुझ्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य हिस्सा असल्यासारखी ही बासरी.

माझ्यापेक्षा जास्त वेळा तुझ्या हातामधे असलेली. तुझ्या ओठांना नित्य स्पर्श करणारी ही बासरी. आता हातात घेतल्यावरपण तुझाच स्पर्श जाणवून देणारी. सहज ओठांना लावली तर अचानक तीच धुन उमटली... तुझ्या श्वासांची लय असलेली धुन... असं वाटलं जणू तुझ्या विशाल छातीवर माझं डोकं ठेवून मी तुझ्याच हृदयाचे ठोके ऐकतेय. माझ्याच नावाच्या लयीत पडणारे ठोके. 

तू कुठे आहेस? केव्हाची शोधतेय मी तुला... भान हरवून चारी दिशांना बघतेय. घरातल्या प्रत्येक खिडकी दरवाज्यामधे तुला धावत शोधतेय. तुला तुझ्या नावांनी हाक मारतेय. तू तुझं नाव पण बदललंस का? कुठल्या नावाने तुझा पुकारा करू? कुठल्या दिशेने तुला आवाज देऊ.. ये. ये. आता तरी ये. नको अजून त्रास देऊन. संपवून टाक हे सगळं. अजून काहीही इच्छा राहिलेली नाही. फ़क्त एकवार.. फ़क्त एकवार तुझं दर्शन.
एवढ्या साध्या इच्छेमधे माझा आत्मा अजून अडकलाय, हे तुला अजून समजलं नाही.. की समजून उमजून पण तू मुद्दाम आला नाहीस? कुठल्या जन्मातल्या कुठल्या पापांचा हा बदला आहे? सांग ना!!!

पण मग आता या क्षणी माझ्या नजरेसमोर या आरश्यामधे तुझं प्रतिबिंब कसं काय आलंय? तूच आहेस ना हा? कुरळ्या केसामधे मोरपिस लावलेला, पितांबरी शेला नेसलेला, रात्रीच्या आकाशासारखा काळा असलेला. तूच आहेस  ना हा?

हो.

हा इथे तूच आहेस. शेवटी माझी प्रार्थना ऐकलीस का? हीच तुझी ती स्निग्ध नजर. एखाद्या भोवर्‍यासारखी. स्वत:मधेच गुंतवून ठेवणारी. हीच ती गालावरची खळी, एखाद्याच्या जीवाला खोलवर घेऊन जाणारी. हेच ते स्मित, पौर्णिमेच्या चंद्रालाही फ़िकं पाडणारं.

आणि हाच तुझा चेहरा.

जो पाहण्यासाठी मी स्वत:ला इतके दिवस रोखून धरलं होतं. अजून तसाच आहेस तू. काहीही बदलला नाहीस. अजून तुझी कांती तशीच झळकतेय. अजून तुझं हसणं तितकंच जीवघेणं आहे. अजून तुझे बाहू मला पाशात घेण्यासाठी तत्पर आहेत. अजून तू तसाच आहेस. कित्येक वर्षापूर्वी तुला पाहिला होता तसा... तसाच दिसतो आहेस अगदी.

तुझं हेच रूप पाहण्यासाठी तर आजवर इथे राहिले होते. आता कशाचीच गरज नाही. कशाचीच. ना जगण्याची. ना मरण्याची. आहे तो काळ इथेच थांबावा. आणि मी इथेच स्थिर अशीच उभी रहावी. तुझं हे रूप माझ्या डोळ्यांत साठवत. तुझ्यामधे स्वत:ला हरवत आणि माझ्यामधे तुला शोधत. अशीच. कायम. कायम.  

( समाप्त)