Monday 26 December 2022

अवतार: कथा समुद्रमंथनाची!!

 



 2009 साली आलेला अवतार हा जेम्स कॅमेरूनचा मेगा ड्रीम प्रोजेक्ट. खरंतर 1995 पासून कॅमेरूनच्या डोक्यात असलेला हा विषय. पण त्याला अनुलक्षून असलेली तांत्रिक करामत उपलब्ध नसल्याने बाजूलाच राहिलेला हा विषय. अखेर 2004 नंतर मोशन कॅप्चर आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर संगणकीकृत करामती दिमतीला हजर झाल्यावर, कॅमेरूनने या त्याच्या आवडत्या विषयाला हात घातला होता. अवतार हा आतापर्यंतच्या जगभरामध्ये गाजलेल्या सिनेमांपैकी एक. अगदी ब्लॉकबस्टर म्हणून ऑलटाइम क्लासिक सिनेमा. या सिनेमाने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले, आणि तसेच, नवनवीन तांत्रिक कौशल्येही उपलब्ध करून दिली. थ्रीडी सिनेमाला जगभरामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून यानंतर अनेक अ‍ॅक्शन मारधाडपट थ्रीडीमध्ये आले. अर्थात हा सर्व झाला पूर्वेतिहास. अवतार – द वे ऑफ वॉटर हा त्या चित्रपटमालिकेमधला दुसरा चित्रपट. एकूण चार चित्रपट प्रदर्शित करायचा दिग्दर्शकाचा मानस आहे. पैकी, तिसर्‍या सिनेमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाल्याची बातमी आहे. ट्रेलरदेखील येण्यापूर्वीच “हा चित्रपट मी बघणारच” असे आपण ठरवून टाकतो त्यापैकी एक असा हा अवतार.

जेम्स कॅमेरूनचा प्रत्येक सिनेमा हा अप्रतिमच असतो. त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जितके गाजतात, तितकेच ते समीक्षकांच्याही पसंतीस पडतात.  हे असे यश मिळवणारे फार थोडकेच दिग्दर्शक सध्या कार्यरत आहेत. द टर्मिनेटरसारखा जॉनर डिफायनिंग सिनेमा असो, ट्रू लाइज सारखी अ‍ॅक्शन कॉमेडी असो किंवा टायटॅनिकसारखा मास हिस्टेरीया देणारा सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असतंच. अगदी छोट्या छोट्या फ्रेम्समधून त्याच्या सिनेमाची कथा उलगडत जाते, त्याचवेळी तंत्रज्ञानावर त्याची असलेली पकड इतकी मजबूत आहे की, इतक्या वर्षांनीही त्याचे सिनेमा फ्रेश वाटत राहतात.



अवतार – द वे ऑफ वॉटर त्याबबातीत मात्र अजिबात निराशा करत नाही. तंत्रज्ञान इतके कमालीचे वापरले आहे की, पॅन्डोरा या एका चंद्रावरची ही वसाहत अगदी सच्ची वाटत राहते. सायन्स फिक्शनमध्ये सायन्स आणि फिक्शन दोन्ही जमून येतात तेव्हाच ती कलाकृती खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते. इथे, एकंदरीत, पाण्याखाली असणारे सर्व सीन शूट करण्यासाठी वापरलेली तंत्रज्ञाने, मोशन कॅप्चर टेक्निक, पॅण्डोरावरचे प्राणी, निसर्ग, पाण्याखालचे जग सर्व काही बेस्ट असतानाही, कुठेतरी काहीतरी उणीव राहून जाते.

 


अवतार म्हणजे काय हे आपण भारतीयांना समजावून सांगायची आवश्यकता नाही. भारतीय मिथकांमध्ये असलेले देवादिकांचे अवतार आणि त्यांचे अवतार कार्य यामधूनच कॅमेरूनला ही “अ‍ॅव्हटार” संकल्पना सुचली होती. एरवी हॉलीवूडपटांमध्ये असलेली कल्पना ही साधारण – पृथ्वीवर(म्हणजे केवल आम्रिकेत) आक्रमण करणारे परकीय एलियन्स, मग ते सर्व कसे दुष्ट दुष्ट, अमेरिकन लोक कसे हीरो हीरो इत्यादि. कॅमेरूनने ही संकल्पनाच उलट केली होती. त्याच्या नॅरेटिव्हमध्ये मानव हा यामधला खलनायक आहे. या पृथ्वीवरच्या मानवाने दूर कुठल्यातरी ग्रहावरच्या एका चँद्रावरच्या वस्तीवर आक्रमण केलेले आहे. ही परग्रहीय वस्ती अत्यंत सुंदर आहे, विलक्षण आहे. इथे असणारा निसर्ग हा पृथ्वीवरच्या निसर्गासारखाच विविधरंगी, विविधढंगी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे तिथले मानव म्हणजे नावी लोक. हे लोक निळे आहेत, कॅमेरूनला ही रंग संकल्पना कृष्णाच्या रंगावरून सुचली असे म्हणतात. उंच आहेत, प्रचंड शक्तीशाली आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या मानवाने त्यांना नमवले आहे. पॅन्डोरावर मानवाने स्वत:ची कॉलनी प्रस्थापित केलेली आहे. इथली हवा मानवासाठी विषारी आहे, पण या ठिकाणी मिळणारी नवीन खनिजे मात्र मानवासाठी मौल्यवान आहेत. इथे टिकून राहण्यासाठी नावी लोकांसोबत त्याचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. हा संघर्ष कमी व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी अवतार तयार केले आहेत. म्हणजे, मानव चक्क नावी अवतारामध्ये अवतीर्ण होतो, आणि त्यांच्यासारखाच दिसू-वागू लागतो. या अवताराचा आत्मा मात्र मानव आहे. या अवतारांनी मूळ नावी लोकांमध्ये मिसळून जावे, त्यांना आपलेसे करावे, थोडक्यात कॉलनायझेशनला मदत करावी असा त्यांचा सुप्त हेतू. या ग्रहावर आलेला जॅक सली हा अपंग सैनिक मात्र अवतार रुपामध्ये नावी टोळीमध्ये पूर्ण मिसळून जातो, त्यांच्यापैकीच एक होतो, आपले मानवरूप सोडून तो स्वत:ला नावी म्हणून स्विकारतो, आणि त्यांच्याच दुनियेत जगतो. पहिल्या भागामधला हा सर्वात रोचक भाग. दुसर्‍या भागामध्ये जॅक सली हा नावी झाला आहे, इथे त्याचे स्वत:चे कुटुंब आहे, मित्रमंडळी आहेत. मानव वस्ती आता पॅण्डोरावरून निघून गेली आहे. सर्व आलबेल आहे पण.... मानवाचा लोभीपणा काही कमी होत नाही.

 


मानवाचा इतिहास हा आपापसातल्या लढायांचाच राहिलेला आहे. आपल्यापेक्षा तांत्रिक दृष्ट्या मागासलेल्या मानववंशावर हल्ले करून त्यांना नामोहरम करतच होमो सेपियन आजवर इथे पोचलेला आहे. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यंत एका मानव टोळीने दुसर्या मानव टोळीला टाचेखाली ताबून ठेवणे, त्यांचे भूभाग बळकावत लूट करणे इतकेच काय, एका मानवाने दुसर्‍या मानवाला विकणे-विकत घेणे हे सुरूच होते. या अस्सल इतिहासाचे रोपण कॅमेरूनने सायन्स फिक्शनच्या रुपात केलेले आहे. इथे पॅंडोरावर असलेली नावी जमात ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये असलेली निसर्गदेवी आयवा ही सर्वच चराचरामध्ये अखंड वाहते आहे, असा त्यांचा गाढ विश्वास आहे. पृथ्वीवरून आलेल्या प्रगत मानवाला मास्त्र हे थोतांड मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने पैसा हेच काय ते खरे दैवत. या अशा मानवाचा आणि नावी अवतारामधील मानवाचा हा संघर्ष अवतार 1 मध्ये होता.

 


अवतार 2 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र व्हायला हवा होता, पण दुर्दैवाने तो तसा होत नाही. पहिल्या भागामध्ये असलेली अवतार आणि त्यामागची तात्त्विक बैठक दिग्दर्शक या भागामध्ये प्रकर्षाने दाखवत नाही. तांत्रिक करामती दाखवण्याच्या नादामध्ये कथेमधल्या काही महत्त्वाच्या बाजूंकडे लक्ष किंचित कमी पडतं, आणी मग एकदम प्रेडिक्टेबल कथा सुरू होते. कथेमध्ये एक मेजर झोलदेखील झालेला आहे. (स्पॉयलर असल्यामुळे इथे लिहत नाही). अख्खी कथा ही जॅक सली विरूद्ध मानव अशी सुरू होते. खरंतर, वास्तविक, भारतीय मिथकांमध्ये समुद्र, सामुद्रिक जीव यांच्याशी संबंधित अवतार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपली सृष्टी समुद्रामध्ये जन्म घेते, आपला सर्जक विष्णु समुद्रामध्येच स्थित आहे. समुद्रमंथन हा आपल्या पौराणिक मिथकांमधला एक महत्त्वाचा भाग. त्यामधले अमृत मात्र अवतार 2 मध्ये आणताना अतिशय ओढून ताणून आणले आहे, आणि त्याचे पुरेसे स्पष्टीकरण देखील येत नाही.




अवतार 1 मध्ये पृथ्वीवर परत गेलेले लोक या सिनेमाच्या सुरुवातीला पॅन्डोरावर परत येतात. ते नक्की का येतात हे समजत नाही. पण नावी बनलेल्या जॅक सलीला मात्र स्वत:चे शांत कौटुंबिक जीवन सोडून या स्काय पीपलविरूद्ध उठाव करावा लागतो. या प्रयत्नामध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला स्वत:चे मूळ स्थान सोडून परागंदा व्हावे लागते आणि समुद्रकिनारी दलदलीत राहणार्‍या एका टोळीकडे आश्रय मागावा लागतो. जॅक सली, नेतिरी आणि त्यांची मुलं ही डोंगराळ भागामधली आहेत, त्या जीवनाशी, तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेली आहेत, आता त्यांना हा बदल सहन करावा लागतो. एका वेगळ्या निसर्गाशी, प्राणीजीवनाशी समरूप व्हावे लागते. इथे जगायचे तर इथलेच व्हावे लागते. आणि यामधून घडत असणार्‍या एका आगळ्यावेगळ्या नात्यांची इथे सुरुवात होताना दिसते. देवमासा हा यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो. केवळ मानव अथवा मानवस्वरूपच नव्हे, तर इतर प्रत्येक चराचरामधल्या निसर्गाची ही कहाणी बनत जाते. ही केवळ स्वअस्तित्वाचीच लढाई नाही, तर ती भवतालाच्या अस्तित्वाचीदेखील लढाई आहे, आणि म्हणूनच या लढाईमध्ये केवळ जिंकून चालणार नाही तर पूर्ण बळाने शत्रुला नामोहरम करावे लागणार आहे.

 


इतकी सुंदर तात्विक पार्श्वभूमी असलेल्या या कथानकामध्ये कॅमेरूनने विनाकारण टीनेजर हायस्कूल हॉलीवूड ड्रामा का आणला आहे ते तोच जाणे. या अशा नाटकी फटकार्‍यांमधून उभे राहणारे कथेचे चित्र  फार ढोबळ आहे. अर्थात या कथामालिकेचे अजून दोन भाग येणार आहेत, आणि त्यांचे प्रमुख चित्रीकरणदेखील आटोपलेले आहे अशी बातमी नुकतीच वाचली आहे. त्यामुळे अखंड चार चित्रपट पाहताना कदाचित आज जाणवणारे लूपहोल्स त्यामध्ये बुजवलेलेदेखील असू शकतात. त्यामुळे त्यावर फारसे  भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र, सिनेमा म्हणून पाहत असताना यामधला भपका प्रचंड प्रमाणात जाणवतो, आणि कथामूल्य किंचित कमी पडते हे मात्र निश्चित.

 


मात्र हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पकड घेतो, ते त्याच्या तांत्रिक बाजूमध्ये. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणासाठी वापरलेले अत्याधुनिक मोशन कॅप्चर तंत्रज्ञान असो, अथवा बखुबीने केलेले एडिटिँग असो, आपण सिनेमा पाहताना एक वेगळेच विश्व अनुभवत आहोत, हे प्रेक्षकांना वारंवार जाणवत राहते. अनेक समीक्षकांनी अवतार 2 ला करोडों डॉलर्सचा स्क्रीनसेव्हर म्हणून चिडवलेले आहे. अवतार 2 मधले पाण्याखालचे अद्भुत विश्व मला स्वत:ला मात्र जिवंत रसरशीत आणि अस्सल वाटले. फार क्वचित इतके सुंदर आणि तपशीलवार काल्पनिक विश्व उभारलेले दिसून येते.

 

सिनेमा म्हणून अवतार 2 बॉक्स ऑफिसवर गाजत आहेच. अवतार 1 च्याही पुढे तो मजल मारेल अशी चिन्हे आता दिसत आहेत. तसे घडल्यास अवतार 3 आणि 4 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा काय्च्याकाय उंचावलेल्या असतील. त्या सर्वांना जेम्स कॅमेरून यशस्वीपणे पुरा पडेल याची खात्री आतातरी वाटत आहे, पण पुढल्या सिनेमांमध्ये स्क्रीनसेव्हरपेक्षा आणि तांत्रिक करामतींपेक्षाही कथा आणि त्यामधल्या घटकांचे परस्परसंबंध अधिक विस्तृतरीत्या दाखवल्यास अधिक उत्तम.

 

नंदिनी देसाई