Thursday, 26 May 2016

रहे ना रहे हम (भाग १०)

अखेर सेकंड इयर पार पडलं. मला फारश्या अपेक्षा नव्हत्याच पण तरी पेपर बर्‍यापैकी चांगले गेले होते. केदारची युनिव्हर्सिटी एक्झाम असल्याने त्यानं पण बराच अभ्यास केला होता. क्वचित कधीतरी फोन करायचा अथवा मला भेटायला बोलवायचा. पण त्याच्या परीक्षेच्या काळात आम्ही फारसे भेटलो बोललोच नाही.
अझरभाई गल्फमधून परत आला होता. त्याचं कॉंट्राक्ट संपलं  होतं आणि परत रीन्यु करण्याऐवजी तो सरळ भारतात परत आला होता. इथेच एखादी साधी नोकरी करायची त्याची इच्छा होती. तो आल्यामुळे नूरीभाभीला माहेरामधून या घरात यावं लागलं होतं. आफताब परत पुण्य़ाला गेला. त्याचं आणि नूरीचं भांडणं नक्की कशामुळे झालं हे मला माहित नव्हतं. त्यानं सांगितलं नाही. मी विचारलं नाही. अझरभाई माझ्याशी जेवढ्यास तेवढंच बोलायचा. नूरीभाभी आधीसारखीच आमच्यापासून लांब असायची.
केदारचं थर्ड इयर संपल्याने तो आता पूर्ण वेळ रिकामाच होता. पुढं शिकायचं नाही हे नक्की होतं. त्याच्या बाबाच्या सांगण्यावरून तो संध्याकाळी पूर्ण वेळ दुकानातच असायचा. सकाळी अगदीच वेळ जाण्यासाठी म्हणून कसलातरी हार्डवेअरचा कोर्स करत होता. आधी तोच कॉलेजात असायचा तेव्हा आम्ही दिवसाभरात कधीही एकमेकांना भेटू शकत होतो. आता मात्र अगदी अपॉइंटमेंट वगैरे ठरवावी लागायची. अगदी बर्‍याचदा तो कॉलेज सुरू होण्याआधीच मला येऊन भेटायचा. “काऊ, तुला सकाळीच भेटलं की दिवस फार मजेत जातो” या मखलाशीसकट.
मला इथे जर लिहायचंच झालं तर मी केदारला किती वाटेल तितकी दूषणं देऊ शकते. पण देणार नाही. आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवते. मग केदार तर तीन वर्षं माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा होता.
मघाशी मी म्ह्टलं की आमच्या प्रेमकथेची ही दोन-तीन वर्षं माझ्या मेंदूमध्ये तीन चार सेकंदात झर्रकन जातात. जात नाहीत खरंतर मी घालवते. कारण जिथे जिथे त्याच्या आठवणी येतात तिथे तिथे मी पॉझचं बटण दाबल्यासारखी अडकून राहते...
केदारनं मला प्रेम करायला शिकवलं. प्रेमामध्ये बेभान व्हायला शिकवलं. त्याचबरोबर माझ्या स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाची जाणीव त्यानं मला करून दिली. तो भेटण्याआधी मी चारचौघी टीनेजर असतात तसली होती. माझ्या व्यक्तीमत्त्वाला काही वेगळेच कंगोरे नव्हतेच म्हटलं तरी चालेल. मला कसलीच ठाम मतं नव्हती. केदारनं मला केवळ हे कंगोरे दिले नाहीत तर स्वत:च मत बनवायला शिकवलं.
प्रेम म्हणजे केवळ लफडं नाही, सेक्स नाही तर त्याहीपलिकडे जाऊन कसलातरी गूढ पण गुंतागुंतीच्या धाग्यांचा होणारा मोहक घोळ आहे हे त्याच्यामुळे मला जाणवलं. कितीतरी बाबतीत केदार “टिप्पिकल” होता. त्याची मतं पारंपारिक होती. पण वेळ आल्यास ती पारंपारिक मतं बाजूला ठेवण्याचीदेखील त्याची तयारी होती. काही गोष्टींमध्ये त्याचं आणि माझं बिल्कुल पटायचं नाही. मी खरंच खूप हट्टी होते, आजही आहे, पण वेळ आली तर तो माघार घ्यायचा. आमच्या लग्नानंतर त्याला घरात खूप प्रॉब्लेम झाले असते हे सांगायला कुण्या भविष्याची गरज नव्हती. रोजच्या बोलण्यातूनही ते आम्ही दोघांना जाणवायचं. पण हे प्रॉब्लेम आपण निस्तरून घेऊ असा त्याला प्रचंड विश्वास होता.
मी एकुलती एक. आईच्या पदराखाली अगदीच लाडाकोडांत वाढलेली. त्याउलट तो वीस पंचवीसजणांच्या कुटुंबात वाढलेला. सर्वांत मोठा नातू म्हणून आज्जीआजोबांचा लाडका. गंमत म्हणजे केदारची पणजी अजून होती. वयाची नव्वदी आली तरी त्या अतिशय तरतरीत होत्या. त्यांच्या घरामध्ये सर्व निर्णय त्यांच्याच कलानुसार व्हायचे. माझ्या घरात बाबा मी आणि आई असे तिघेच. घरामध्ये भाजी कुठली करायची इथपासून दिवाळीला दुकानाला रंग कुठले द्यायचे इथवर सर्व निर्णय माझ्या मतानुसार. मनाविरूद्ध वागणं म्हणजे काय ते मला माहितच नाही.
आज आठवलं तरी गंमत वाटते. पण केदारला भेटेपर्यंत मी एकदाही कधी रस्त्यावर पाणीपुरी खाल्ली नव्हती. त्याच्या दुकानामध्ये पाणीपुरी संध्याकाळी मिळायची. पण तिथं खाणं शक्य नव्हतं. केदारला अख्ख्या गावात कुठे पाणीपुरी मिळते आणि कशी मिळते याचे सर्व डीटेल्स माहित होते., आम्ही एकदा असंच सहज हायवेवर एका छोट्याशा पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. आजारी पडेन म्हणून आई मला कधी बाहेर खाऊ द्यायचीच नाही. हवी असेल तेव्हा घरी बनवायची. शाळेत असताना बाहेर वडापाव वगैरे खात होते. पण पाणीपुरी म्हणजे बिग नो नो. केदारमुळे मी पाणीपुरी खायला शिकले.
वसीम प्रभातच्या ग्रूपमुळे मी खरंच किती बिघडले होते ते मला आज जाणवत होते. केदारला अर्थत हे सर्व मी कधीच सांगितलं होतं. असं वागू नये म्हणून केदारनं मला लेक्चरपण दिलं होतं. मी सिगरेट ओढते हेही त्याला सांगितलं. त्यानं मला त्याची शपथ घातली. हे शपथ घालणं प्रकरण मला आजवर समजलेलं नाही. केवळ एखाद्यी व्यक्ती अमुक वागली तर मी मरेन. म्हणून तू असं वागू नकोस. या अटीला काही अर्थ तरी आहे का? पण मी त्याची शपथ घेतली. नंतर त्यानं घेतलेल्या सगळ्याच शपथा मोडल्या तरी मी माझी शपथ मोडली नाही.
आजही मी माझ्या आजूबाजूला जेव्हा खुज्या मेंदूचे अनेक नवरे बघते तेव्हा मला केदार किती प्रगल्भ होता हे सतत आठवत राहतं.  एकदा मी असंच चिडून त्याला बाबाविषयी काहीतरी सांगत होते. बाबानं बाई ठेवली आहे वगैरे मी त्याला सांगितलं होतंच.
“माझ्या आईनं ना असल्या नवर्‍याला सोडून द्यायला हवं होतं” मी चिडून म्हटलं.
“हे बघ, काही झालं तरी तो त्यांचा संसार आहे. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये तिसर्‍या व्यक्तीने कधीच बोलू नये. अगदी मुलांनीपण नाही” इतकंच बोलून त्यानं विषय संपवला. हाच नियम सगळीकडे लागू पडला तर या समाजासमोरचे किती प्रॉब्लेम कमी होतील. नवरा बायकोच कशाला, दोन व्यक्ती ज्या एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये इतर कुणी पडूच नयेत... त्यांच्या नात्यांची चिंता त्यांची त्यांनी वहावी. ज्याची लफडी त्यानेच निस्तरावीत.
केदारमुळे मला भटकायची आवड लागली. तो दर वीकेंडला कुठेतरी ट्रेकला जायचा. त्यांचा ट्रेकवाल्यांचा वेगळाच ग्रूप  होता. दोन-तीनदा मी त्यांच्यासोबत गेले पण तो ग्रूप मला फारसा काही कंफर्टेबल वाटेना. मी आणि केदार एकमेकांशी बोललोच काय अगदी बघितलं तरी ते चारपाच जणं अगदी फिल्मी स्टाईलने “काय चाल्लंय? बघतांव हा” वगैरे चिडवायचे. वैताग यायचा. आम्ही दोघं कपल आहोत म्हणजे काय दिवसाचे चौवीस तास रोम्यांटिक चान्स मारायच्या मूडमध्ये असतो की काय...
मला हे आवडत नाहीये हे केदारला मी स्पष्ट सांगितलं. मग नंतर आम्ही दोघंच कुठं फिरायला गेलो तरच... त्या ग्रूपसोबत कधीच नाही. पण तरी केदारने माझ्यासारख्या घरकोंबड्याला घराबाहेर काढलं. रविवारचा दिवस हा विधात्यानं आपल्याला सकाळपासून अखंड टीव्ही पाह्यला दिलाय अशी माझी प्रामाणिक समजूत होती. त्यात बारावीनंतर घरात केबल आल्याने ठराविकच प्रोग्राम पहायचे अशी काही अटपण नव्हती. त्यात जुने पिक्चर पण मस्त लागायचे. तरी केदारमुळे मी अख्खा रविवार कुठल्या तरी गडाच्या पायथ्यावरून कड्याकडे चालत घालवलेत. आमच्या दोघांच्याही सॅक तोच घ्यायचा, मी मस्त फिरायचे.
सुरूवातीला सेक्स खूप हवाहवासा वाटायचा, त्यावेळी अल्मोस्ट रोजच आम्ही दोघं कारमधून लॉंग ड्राइव्हला जात होतो. सेक्सचं नावीन्य होतं, एक्साईटमेंट होती. पण हळूहळू ती कमी झाली. म्हणजे असं अगदी ठरवून नाही... पण कमी झालीच. केदार अगदी सुरूवातीला मला खूप लिंगपिसाट वगैरे वाटला होता. सलग दोन चार वेळेला करूया म्हणायचा. पण मग त्यालाही ते फारसं काही वाटेनासं झालं. मला वाटतं कुठल्याही कमिटेड रिलेशनमधली ही स्टेज फार मस्त आणि भन्नाट असते. तुम्ही एकमेकांना शारिरीकरीत्या जाणता, भावनिकरीत्या एकमेकांवर अवलंबून आहात आणि भविष्यामध्ये तुम्हाला एकत्र रहायचं आहे. खळाळता ओढा जसा येऊन नदीमध्ये शांत होतं. तसं काहीसं या स्टेजला होतं. अगदी सुरूवातीला केदारनं माझ्या बॊटामधली अंगठी नीट करण्यासाठी जरी हात धरला तरी अंगामध्ये काहीतरी सळसळायचं, पण आता ते स्पर्शाचं नावीन्य राहिलं नाही. पहाटेच्यावेळी निवांतपणे डोळे उघडावेत आणि आपल्या अंगाभोवती त्याचा हात वेढलेला असावा, याचंही नंतर अप्रूप वाटेनासं होतं. पण तरीही नातं शिळं बनत नाही. ते वाहत राह्तं. नवनवीन वळणं घेत राहतं.
मला आयुष्यात मोठेभाऊ बहिण कोणच नाही. दोन्ही चुलत भाऊ साधारण माझ्या वयाचे. आतेभाऊ तर खूपच लहान. केदार मात्र मला मोठ्या भावासारखा होता. हे वाक्य कितीही ट्विस्टेड वाटलं तरी तसंच होतं. म्हणजे तो मला आवडत होता. सेक्शुअल रिलेशनशिप होतंच. लाईफ पार्टनर म्हणून तर तोच हवा होता. पण तरीही तो मला दादासारखा वाटायचा. असं नक्की का ते मला सांगता येणार नाही. मोठा भाऊ कधी अस्तित्त्वात नसल्याने माझ्या मनामध्ये त्याची अशी इमेज का झाली माहित नाही. तसं तो माझी फार काळजी घ्यायचा वगैरे अशांतला भाग नाही. उलट मी जास्तीत जास्त स्वावलंबी झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं. “अगं, माझ्या घरात स्वयंपाकाला बाई आहे. मीही बनवेन. पण तुझं तुला काहीतरी करता यायला नको का? हलवायाच्या बायकोला अगदीच अडाणी राहून कसं चालेल?” तो मला चिडवायचा.  त्याची कटकट ऐकून मी आईकडून चहा, मॅगी आणि खिचडी या राष्ट्रीय डिशेस शिकून घेतल्या. त्याच्या घरामध्ये माझा विषय वारंवार येत होता त्यावरून तरी मी घरात सर्वांना पसंत होते असं त्याच्या बोलण्यावरून मला वाटलं होतं. माझ्या वाढदिवसाला तर त्याच्या आईनं मला चक्क फोन करून हॅपी बर्थडे पण म्हटलं होतं.
माझ्यामुळे केदारच्या आयुष्यावर इतकाच प्रचंड फरक पडला असेल का? माहित नाही. मी त्याला कधी विचारलंच नाही. पण त्याच्या डोळ्यांमध्ये माझ्याविषयी काळजी सतत दिसायची. म्हणजे “आजारी पडलेल्याची काळजी” किंवा “वाया गेलेल्या मुलाची काळजी” अशी नाही. तर “कसं होणार आहे या पोरीचं” छाप काळजी. अगदी पहिल्या दिवसापासून सायीसारखी ही काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये तरळताना मी पाहिली आहे. पुढे कित्येक वर्षांनी त्या फनफेअरमध्ये त्यानं मला पाहिलं तेव्हाही हीच काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये लगेच अवतरली. पुढच्याच मिनिटाला ती हळूहळू निवळलीदेखील, कदाचित आता माझी काळजी करायचं काहीच कारण उरलं नसेल. तो एक रूपया माझ्यावर कधीचा उधार राहिलाय!!!
मी फारसं केदारबद्दल कधीच बोलत नाही. जितकं मी अरिफबद्दल बोलेन, निधीबद्दल बोलेन, अझरबद्दल बोलेन. आफताबचं नाव तर सतत ओठांवर असतंच... पण केदारचं क्वचित. भळभळणारी जखम आहे ती. कधीही उघडली तरी तेवढ्याच आणि तितक्याच वेदना होतात. अश्या जखमा कधीच भरत नाहीत. भराव्यात अशी अपेक्षादेखील नसते.
केदारने मला या जखमा दिल्या. आयुष्यभराची संचित म्हणून. केदार माझं पहिलं प्रेम होता. त्याला विसरणं आयुष्यातून घालवून देणं कधीही मला जमलं नाही. आजही रिकाम्या वेळेमध्ये मी कधीतरी विचार करते. काळाचं चक्र मागं फिरवावं. त्या रात्री. दीड वाजता मला फोन करणारा केदार. त्याचा रडका आवाज ऐकून गडबडलेली मी.
“एकच वर्ष काय... स्वप्नील.. अख्खं आयुष्य घेऊन टाक. पण सोडव मला या द्विधेमधून ... तूच सांग मी काय करू?”
आणि मी त्याला सांगतेय.. “आपण लग्न करू केदार. तुझे घरचे लोक म्हणतात तसंच करू” मग तो हसतो. मी पण हसते. आम्ही दोघंही हसतो. तो फोन ठेवतो. दुसर्‍या दिवशी आमच्या लग्नाचे बेत ठरतात.
पण असं घडणं शक्य  नाही. कारण असं घडलंच नाही.
त्या रात्री मी फोनवर त्याला येऊ नकोस असं सांगितलं. मग तो आलाच नाही. त्यारात्रीपण. दुसर्‍या दिवशीपण. तिसर्‍या दिवशीदेखील. चौथ्या दिवशी मला त्याच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका निधीने आणून दाखवली.
माझ्या आणि केदारच्या प्रेमकहाणीचा हा अंत. छोटीशी प्रेमकहाणी. पण त्याचा अंत मात्र आतपर्यंत जाऊन चिरफाळणारा.
>>>

माझं थर्ड इयर खरंतर अजून चालू व्हायचं होतं. एप्रिलचा महिना चालू होता. एके दिवशी आईनं मला टीव्ही बघत असताना पाठीत धपाटा घातला.
“का गं! त्रास देतेस” मी पाठ चोळत म्हटलं.
“आळशाराम, उठ. सकाळी उठल्यापासून तिथंच बसून आहेस. घर आवरायला मला मदत कर. बाबाला मी फोन केलाय तो दुपारी घरी येतोच आहे”
“कशाला?”
“क शा ला? लाज तरी वाटते का गं?” आई अशी भडकली की तिला भडकवायला मला अजून मजा येते. “मीनावहिनींचा फोन आला होता. उद्या सकाळी घरी येतायत. तुला बघायला”
माझ्या हातातला रिमोट खाली पडता पडता राहिला. मला बघायला? आईला केदार प्रकरण माहित होतंच तरीही ही काय भानगड होती.. माझा चेहरा बघून आई चक्क हसली. “केदारची आई. कळ्ळं? त्यांचा फोन आला होता. उद्या ते सर्वजण येतायत. बोलणी ठरवायला.”
चांगला एच बी ओ वर अलादिन लागला होता ते बंद करून मला आईसोबत घर आवरणे या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागलं याबद्दल नाही म्हटलं तरी मला थोडं हसू आलंच की.
“हसतेस काय? उद्या छान साडी नेस. ब्लाऊज ठीक आहेत ना ते बघ. इस्त्री करून घे. जमत नसेल तर बाबाला सांग.” आमचा बाबा कपड्याला इस्त्री करणार म्हणजे काय विचारायचंच नाही. धोबीघाटवाल्यांना पछाड मारेल. आईच्या एकामागोमाग सूचना चालू झाल्या. खरतर याबद्दल केदार मला काहीच बोलला नव्हता. संध्याकाळी आमच्या घरात पुरेसा हलकल्लोळ उडालेला बघून अझरभाई डोकावून गेला. तेव्हा बाबा कोळिष्टकं काढायला स्टुलावर उभा होता. आई चायनाची क्रोकरी धुवत होती आणि मी टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या बघत होते. सलमानचा पिक्चर मी चुकवेन तरी का!
“उद्या सकाळी दहा वाजता येतात. तेव्हा तूही ये. नूरीला पण घेऊन ये.” आईनं त्याला सांगितलं.
“आम्ही कशाला?”
“अरे, ते किमान दहाजणं येतील असा अंदाज आहे. आमच्याकडे तिघंच ते बरं दिसत नाही. मुलीकडचे थॊडेतरी पाहुणे नकोत का?” आई बहुतेक उद्या बोलणी झाल्याझाल्या लगेच लग्न करायचंय अशा तयारीमध्ये होती. मघाशी तिनं कपाटामधली चांदीची ताटवाटी आणि कुंकवाचे करंडे काढून ठेवलेले पाहिले.
पण तसं काही झालं नाही. सकाळी आम्ही अगदी सुसज्ज होऊन केदार आणि फॅमिलीची वाट पाहत होतो. मी आईची एक मोरपंखी साडी नेसले होते. अझरभाईने सकाळी मोगर्‍याची भरपूर फुलं आणली होती. आईने त्याचा गजरा पण घातला होता. एकदम तमिळ हीरॉइन झाल्यासारखं वाटावं म्हणून आईनं सापडतील तितके दागिने मला घातले होते. सांगितल्यासारखा अझरभाई आला. नूरी काही आली नाही.
आईचा दहाजणांचा अंदाज साफ खोटा ठरला. मोजून चार जणं आले होते. केदार. केदारची आई. केदारचे बाबा. केदारची धाकटी काकी. या काकीला काही मूलबाळ नव्हतं म्हणून तिनं केदारला अथवा केदारच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं होतं म्हणे!
आल्याआल्या या बसा. वगैरे गप्पा झाल्या. हळूहळू बाबा आणि केदारचे बाबा बाजारपेठ या त्यांच्या आवडत्या विषयावर बोलायला लागले. अझरभाई आणि केदार काहीबाही बोलत बसले. आईनं चहा पोहे वगैरे काय काय आणून दिलं. केदारची आई माझ्याशी थोडंफार बोलत होती. एकंदरीत बाकीचं सर्व बोलतोय, पण “आपल्या पोरांचं लफडं आहे म्हणून त्यांचं लग्न लावूया” हा विषय कसा काढावा हे कुणालाच समजत नव्हतं. केदारची काकी मात्र जरा फुरंगटून बसली होती. का ते मलाही माहित नव्हतं.
अखेर, केदारच्या आईनेच विषय काढला. “केदारनं सांगितलेल्या जन्मतारखेवरून आणि वेळेवरून हिची पण पत्रिका काढून घेतली. आमचे गुरूजी म्हणाले की सत्तावीस गुण जमतायत. तर काही हरकत नाही”
“बरं केलंत. मी तिची पत्रिकाच बनवली नाहीये. लहानपणी आजारी म्हणून सासूबाई म्हणाल्या की पाहूच नकोस. तेव्हा राहून गेलंच” इथून पुढे सर्वांना व्यवस्थित ट्रॅक मिळाला.
“अम्हाला काय? हा एकुलता एक. चुलत्यांत पण सर्वात मोठा हाच. मोठी बहिण आहे त्याला, पण तिचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. कॅनडाला असते.”
“अच्छा. स्वप्निलला इतक्या लांब कुठे द्यायची म्हटलं की माझा जीव कासावीस होतो. इथं गावातच राहिली तर बरी”
“हो. मुली फार लांब गेल्या की सारखं जाणंयेणं पण होत नाही. सणवार नाही की दिवाळसण नाही. आता कावेरीचं बाळंतपण आहे. तर मलाच तिकडे जायला लागणार बघा! कालच फोन आला होता. ती डिसेंबरमध्ये ड्यु आहे”
“अगं बाई! थंडी मरणाची म्हणे तिकडे”
“काय करणार. म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं आणि ही बोलणी तरी ठरवून घ्यावीत. म्हणजे इकडे सर्व निस्तरून मी तिकडे जायला मोकळी. जूनमध्ये मुहूर्त आहेत चांगले. एखादा ठरवू या का?”
इतकावेळ बाबा हे बोलणं केवळ ऐकत होता. पण आता मात्र तो बोलला. “अहो, तिचं एक वर्ष आहे”
“असू देत की” केदारचे बाबा म्हणाले. “लग्नानंतर करेल. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही”
“हे फारच लवकर होतंय हो” आई पण म्हणाली. खरंतर आमचा अंदाज होता की माझं फायनल इयर झाल्यानंतर लग्नाचा विषय सुरू होइल. केदार पण तसंच म्हणाला होता.
“हे बघा, आमच्या काहीच अपेक्षा नाहीत. देणंघेणं सर्व तुमच्या मर्जीवर. काहीच दिलं नाहीत तरी चालेल. घरादाराबद्दल आमचा काही प्रश्न नाही. मुलं एकमेकांना पसंद करतायत. आपण काय केवळ अक्षता टाकायच्या आहेत. अहो, साध्यातलं साधं लग्न लावून द्या. आमचं काही म्हणणं नाही.” केदारचे बाबा म्हणाले. “मस्त हॉल बूक करू आणि सर्व ऑर्डर देऊन टाकू. आमचा परांजपे बेस्ट माणूस आहे याबाबतीत. आठ दिवसांत लग्न लावून देतोय. आपल्याकडे अजून दोन महिने हातात आहेत”
आई बाबा एकदम गप्पच झाले. इतक्या लवकर लग्न!
“हे बघा, खोटं सांगत नाही. आमच्या आजेसासूबाई आजून आहेत. पण फार थकल्यात. पणतवाचं लग्न बघण्याचं पुण्य़ मिळेल. त्यांची तितकीच हौस. शिवाय लग्न झालं म्हणून काही कॉलेज बंद करणार नाही. डिग्री होऊ देत. नंतरही शिकायचं तर शिकूदेत. छोटासा बिझनेस वगैरे करायचा असला तरी आम्हाला चालेल. आमच्या घरात तुमच्या लेकीला काही कमी पडू देणार नाही याची खात्री बाळगा.”
“ महत्त्वाचं म्हणजे तिसरं लवकर येऊ द्या, तेवढंच आमच्या बाई खापरपणतू बघतील” केदारच्या काकी म्हणाल्या. सगळेजण हसले.
“आम्हाला थोडा वेळ द्या. मी माझ्या मोठ्या भावाशी आणि आईशी बोलतो. त्यांना वाटलं तर एकदा बोलावून घेतो. इतक्या घाईगडबडीमध्ये ठरवूया नको. तिचं शिक्षणाचं एकच वर्ष शिल्लक आहे. ते पूर्ण होऊ दे.”
“नको.” परत केदारच्याच काकीने ठामपणे सांगितलं “जितक्या लवकर होतंय तितक्या  लवकर होऊ देत. तरणीताठी पोर आहे. तुम्हाला जराही काळजी वाटत नाही का? उद्या काय म्हणता काय होऊन बसलं तर कोण निस्तरणार? आमचा एक पोरगा संस्कारी आहे म्हणून इतक्या व्यवस्थितपणे घरी सर्वांना त्यानं सांगितलंन. पण विस्तवाची परीक्षा कोण घेणार? ते काही नाही. उगाच फट म्हणता काही झालं म्हणजे गावात मान खाली जायची. आमचं जाऊ द्या हो. तुमची तर मुलगी आहे.” त्यांच्या या थाडथाड बोलण्यावर आईबाबाच काय पण केदारचे आईबाबा पण चकित झाले.
“वहिनी, अहो असं काय. मुलं गुणी आहेत” केदारचे बाबा म्हणाले. गुणीतर आहेतच शिवाय या जगात कंडोमसारख्या वस्तू आहेत हे त्यांना माहित आहे. म्हणून तर गेल्या दीड वर्षांत फट काय सट म्हणता काही झालं नाही! मी केदारकडे पाहिलं तर त्यानं गालातच हसून मला “शांत रहा” असं डोळ्यांनीच सांगितलं.
पण सुरूवातीचा गप्पांचा मूड आता पूर्ण बिघडला होता. केदारच्या काकीचं म्हणणं लवकरात लवकर लग्न करून द्या. चारपाच वेळा तेच तेच बोलणं झाल्यावर शेवटी त्या केदारच्या आईला एकदम उसळून म्हणाल्या. “जाऊबाई, पाहिलंत. ही यांची पद्धत. मुलीचं लग्न करायला नको. मुलगी गाव बोंबलत फिरते ते चालतं. शेवटी खाण तशी माती. बापच असला”
माझा बाबा काही म्हणायच्या आधी आई म्हणाली. “आम्ही लग्नाला नाही म्हटलेलं नाही. केदार आम्हालाही पसंद आहे. आमच्या मुलीमध्ये तर खोट काढण्यासारखं काही नाही. फिरतेय ती तुमच्याच मुलासोबत.”
“हो क्का? त्याच्याआधी उधळलेले गुण विसरलात की काय!” आता केदारच्या या काकींनी एकदम नळावरच्या भांडणाचाच आवेश घेतला. “त्या मुसलमान पोरासोबत....”
“कोणासोबत?” अझरभाई इतक्या वेळात पहिल्यांदा बोलला. “काही वाट्टेल ते आरोप लावू नका”
“हे बघा, तुम्ही या देशात नसता त्यामुळे तुम्हाला माहित नसेल. पण मी या मुलीची चौकशी केली तेव्हा मला सर्व खरं समजलंय. कोण तो हेकना वसीम की काय....” ओह!! ती फालतू गोष्ट इथपर्यंत पोचली. मी अकरावीनंतर त्या वसीमला भेटलेसुद्धा नव्हते. रस्त्यात दोनतीनदा पाहिलं होतं.
“ते काही खरं नाहीय” मी बोलायचा प्रयत्न केला. पण माझं बोलणं यायच्याआधीच बाबा उठला पण त्यालाही बोलू न देण्याची संधी न देता काकीच पुढे म्हणाल्या. “ते सर्व प्रकरण आम्हाला माहित आहे. तरी केवळ केदारच्या हट्टासाठी आम्ही या लग्नाला तयार झालो तर तुम्ही चक्क नाहीच म्हणताय.” काकीबाई सतत “तुम्ही लग्नाला नाही म्हणताय” हेच एक वाक्य तीन तीनदा म्हणत होत्या. “एवडी घोडी मुलगी झाली तरी... अहो, गाव उंडारतेय. कुणाहीसोबत फिरतेय”
“मीरावहीनी, आता पुरे!” अखेर केदारचे बाबा म्हणाले. “माझा केदारवर विश्वास आहे. त्याची पसंद उत्त्तमच आहे. अम्हाला तुमची मुलगी पसंद आहे. यतिन, लग्न लव्कर करूया, जुलैमध्ये चातुर्मास चालू होइल आणि तो संपायच्या आधीच केदारची आई कॅनडाला जाईल. ती परत येईपर्यंत म्हणाजे पुढचा मार्च उजाडेल.”
“अहो, मग आता ठरवून ठेवू आणि पुढच्या वर्षी करू. आम्हालाही ते सर्व सोयीस्कर पडेल. साखरपुडा करून ठेवू.” बाबा म्हणाला. शेवटी अजून थोडावेळ चर्चा करून “पुढच्या आठवड्यांत परत भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात मोठ्यांशी काय ते बोलून ठेवा” असा मार्ग निघाला. एकंदरीत सुखासुखी काहीच चालू नव्हतं हे साफ दिसत होतं. केदारच्या आईबाबांचा प्रश्न नव्हता. पण काकीबाई सॉलिड वट दाखवत होत्या.
संध्याकाळी मला केदारचा भेटायला ये म्हणून फोन आला. मी मनापासून चिडले होते. गेल्या गेल्या लगेच त्याला विचारलं. “ती काकी मला काय वाट्टेल ते बोलत असताना तू काय गप्प बसलास. यु नो वेरी वेल की मी फर्स्ट टाईम तुझ्यासोबत केलंय..मग तरी?”
“शांत काऊ शांत. काकी घोळ घालणार आहे याचा अंदाज मला आधीपासून होताच. मी तिथे जर हे सांगितलं असतं की आपण ऑलरेडी सुहागरात साजरी केली आहे, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा तू वाईट आहे असाच झाला असता. समजतंय का तुला? म्हणून मी गप्प राहिलो. काकीला तर हातात कारण दिलं असतं की ही मुलगी कशी उठवळ आहे वगैरे बोलायला”
“उठवळ म्हणजे?”
“मला नाही माहित. पण घरात हंगामा चालू आहे. काकीने तुझ्याबद्दल नक्की कुठून माहिती काढली माहित नाही, किती खरी ते माहित नाही. पण गेल्यावर्षीच्या गॅदरिंगला अख्खं कॉलेजभर तू कुण्या मुलासोबत हातात हात घेऊन फिरत होतीस इथपासून हा कोण वसीम आहे तिथवर इतिहास खणलाय... आजोबांना तर ती काहीही सांगून बहकवतेय”
“पण का?”
“आमच्या इस्टेटीच्या वाटण्या होतायत. माझ्या बाबांना मी आणी ताई. दोन नंबरच्या काकांना दोन्ही मुली. महेशकाकाला तर काही झालंच नाही. मग आजोबांनी ठरवलंय की आता वाटण्या करून तिन्ही मुलांना हिस्से द्यायचे. घराचे हिस्से आधीच झालेत. दुकान माझ्याकडे येतंय. पण त्या बदल्यात बाबा दोन्ही काकांना काही पैसे देतील. काकीची मोठ्या भावाची मुलगी माझ्याबरोबरीची आहे. तिच्या मनात आमचं लग्न लावून द्यायचं आहे. आताच नाही, फार आधीपासून. म्हणजे आमच्या इस्टेटीमध्ये तिच्या माहेरकडच्यांना वाटा मिळेल. मला दत्तक घेणार, म्हणजे महेशकाकाचा वाटापण मलाच मिळेल – म्हणून त्या पैशासाठी आईबाबा हे लग्न लावून देतील असा तिचा अंदाज. पण मी आईला तुझ्याबद्दल खूप आधी सांगितलं होतं. प्लीज. लग्नाला लवकर हो म्हण. एकदा लग्न झालं की मी वेगळंच घर घेणार आहे. पण आता तू विनाकारण उशीर केलास तर घरात प्रॉब्लेम होइल. आजोबांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. त्यांनी नाही म्हटलं तर..”
“तू मला सोडून देशील...”
“वेडी आहेस का? असा कसा सोडून देईन. पळून जाऊ. रजिस्टर लग्न करू. काहीही करू. पण गोष्टी तितक्या चिघळवायच्याच कशाला? तू हो म्हण. महिन्याभरात लग्न करू. घरी तुझ्या आईवडलांना ही परिस्थिती सांग. काकी माझं लग्न मोडायला बसली आहे. तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा.”

पण काकीच्या बोलण्याकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागलंच नाही. त्या काकीने हे लग्न मोडूनच मग दम घेतला.
Saturday, 14 May 2016

रहे ना रहे हम (भाग ९)

अझरभाई लग्नानंतर पंधराच दिवसांत परत गेला. बाजूच्या घराला आलेली  जाग परत सुस्तावली. नूरीभाभीसोबत तर मी फार बोलले पण नाही. आफताबकडून जेमतेम माहिती समजली ती इतकीच, की नूरी फार गरीब घरामधली होती. दहावीपर्यंत शिकलेली होती. आफताबच्या एका मामांनी पुढाकार घेऊन हे लग्न जरी लावलं असलं तरी आफताबला मनातून ते फारसं आवडलं नव्हतं. अझरभाईला तर कुणी हो की नाही हे पण विचारलं नव्हतं, परस्पर निर्णय घेऊन टाकला होता.
पण अझरभाई तरी खुश होता. तश्या त्याच्या कधीच आयुष्याकडून फारशा अपेक्षा नसतात. आहे त्यात समाधान मानणारी लोक असतात, त्यापैकी अझरभाई.
तो परत गेल्यावर नूरीभाभी पण माहेरीच रहायला गेली. हे घर परत बंदच राहिलं. आफताबची इंटर्नशिप चालू होती. तो आता पुढच्या  परीक्षेच्या तयारीला लागला होता. अझरभाई हे एक कॉंट्राक्ट संपवून कायमचाच भारतात यायचं म्हणत होता. देश सोडून त्याला पाच वर्ष झाली होती.
“पाच वर्षात चार वेळा परत आलो दर वेळी मयतीची बातमी घेऊन. अब्बा, अरिफ, अम्मी... आता बास झालं. पैसा कमवायचा कुणासाठी... आफताबची चिंता नाही. तो आता स्वत:च्या पायावर उभा राहिला” यावेळी निघताना अझरभाई बाबाला सांगत होता. माझ्याशी मात्र तो फारसा बोलला नाही. दोन तीन गाण्यांच्या सीडी तेवढ्या दिल्या. नूरीभाभीला एक दिवस आईनं सहज घरी बोलावलं तर तिनं “घरमें भौ काम है. कलको आती” असा निरोप दिला. ती मराठी फारशी बोलायची नाही, उर्दू मीडीयमची होती ना.
नंतरही कधी ती आमच्या घरी आली नाही, आईनं एकदोनदा घरात केलेलं काही स्पेशल तिला पाठवून दिलं तेव्हा तिनं “हमकू ऐसा कुच भाता नही” असं सांगून आमच्या ताटवाट्या रिकाम्याच परत पाठवल्या. तिला फारशी ओळख वाढवायची नसणार. आईनं पण नंतर नाद सोडला. अझर आणि आफताब मात्र आमच्या घरी आधीसारखे येतजात होतेच. आफताब क्वचित इकडे यायचा. अधूनमधून फोन करायचा, काही मेल्स असतील तर फॉरवर्ड करायचा. पण तेवढ्यापुरतं. सेकंड इयरला आल्यापासून निधीसोबतही माझं फारसं बोलणं व्हायचं नाही.
माझ्या आणि केदारच्या लव्हस्टोरीला वर्ष झालं होतं. कॉलेजमध्ये सर्वांना समजलंच होतं. त्याची मला काहीच फ़िकीर नव्हती.
एके दिवशी मी नेहमीसारखे प्रॅक्टिकल संपवून त्याला भेटायला गेले तर तो धड बोलेचना. तिरसटासारखीच उत्तरं द्यायला लागला. शेवटी “काय झालं ते स्पष्ट सांग”
“तू काल दुकानांत आली होतीस?” त्यानं विचारलं.
“दुकानांत? हो, आमच्या दुकानात आईला सोडायला गेले होते. बाबाला वेळ नव्हता म्हणून.. पण तुमच्या दुकानात काही..”
“पण दोन्ही दुकानं जवळ्जवळ आहेत ते तुला माहित आहे ना?
“मग..”
“मग? स्वप्नील, काल तू बिनाबाहीचा ड्रेस घालून गेलीस. माझ्या बाबांनी काकांनी सर्वांनी पाहिलं. काल घरात हाच विषय चालू होता... आमच्या घरामध्ये मुली...”
केदार जे काय म्हणतोय ते समजायला मला दोन क्षण लागले. मी याच्याबरोबर गोव्याला फिरायला गेले की शॉर्ट्स घातले तरी त्याला आवडायचे मग आता स्लीवलेस ड्रेसवरून का तडकतोय?
“मी काल कॉलेजमध्ये पण तोच ड्रेस घातला होता. तेव्हा तू काही बोलला नाहीस..”
“हे बघ, कॉलेजची गोष्ट वेगळी. पण माझ्या घरातल्यांसमोर..”
“केदार, मी तुझ्या घरतल्यांसमोर गेले नव्हते. मी माझ्या बापाच्या दुकानात गेले होते. तो ड्रेस तू घेऊन दिलेला नाहीस.”
“स्वप्नील, आता तू लहान राहिली नाहीस. एकटीच आहे, लाडात वाढलीस हे मला कबूल आहे पण आता मोठी झालीस. आपलं लग्न झाल्यावर तुला आमच्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायचं आहे. मी सोबत असेनच, पण तुलाही काही जबाबदारी घ्यावी लागेल. हे असं..अजून आपलं लग्न झालेलं नाही.... तोपर्यंत तू काय घालावं आणि काय नाही हे काही मी तुला सांगू शकणार नाही..”
आईच्यान!! या वाक्याची डोक्यात तिडीकच गेली. “व्हॉट डू यु मीन केदार? हं? लग्नानंतर मी काय घालावं हे तू सांगणार आहेस का? माझा पर्सनल ड्रेस स्टायलिस्ट आहेस का?”
“तू भलतीकडे जाऊ नकोस. हे बघ, मी सांगतो ते ऐक. लहान नाहीस. हे असं छोटे कपडे घालून भटकणं, वडलांना एकेरी हाक मारणं, बसल्याजागी चहाचा कप घेणं, त्या मुसलमान पोरासोबत हाहाहीही करत बसणं आता चालणार नाही. मी काय सतराव्या शतकात जन्मलेलो नाहीये. अगदीच तुला नव्वारी नेसून कुणी घरात बस म्हणत नाहीये. चोवीस तास स्वयंपाकाला बाई आहे आमच्याकडे, तुला किचनमध्येच काम कर म्हणत नाही. आम्ही पण फॉरवर्ड लोक आहोत. तुला लग्नानंतर जॉब करायचीही परवानगी असेल.. पण स्वातंत्र्य कधीही अमर्यादित नसतं. स्वातंत्र्याला जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते..”
तो पुढे बोलत राहिला, मला ऐकायचीही जरूर भासली नाही. मी तोंड फिरवून बसले.
“सॉरी!” त्याच्या लक्षात आल्यावर तो म्हणाला. “जरा प्लीज मलाही समजून घे की, घरामध्ये सगळे आपसूक तयार आहेत. लव्ह मॅरेज असूनही... थोडं ऍडजस्ट कर”
“केदार... मी...”
“हे बघ, स्वप्नील, मला माहित आहे. पण आपण ज्या समाजात राहतो त्यानुसार रहायला नको का? तू आणि मी दोघंच कुठंही फिरायला जाऊ तेव्हा तू हवं तसं वाग ना. इव्हन गावातही तू जीन्स घाल, स्लीवलेस घाल.... माझी ताई ड्रेस घालतेच की. फक्त जुन्या मताची माणसं आहेत ना! त्यांच्यासमोर अगदीच मुद्दाम नको गं. बाकीचं काही मी म्हटलंय का..” मघासचा डिक्टेटर टोन आता गायब झाला होता. चक्क माझी विनवणी करत होता. “आय लव्ह यु, स्वप्नील. प्लीज!” त्यानं मला मिठीत घेत म्हटलं. “आपण दोघंच असताना तू हवे तसे कपडे घाल, मी काही म्हणणार नाही”
“पण आपण दोघंच असस्ताना मी कपडे घालायची काही गरज आहे का?” मी त्याला चिडवत म्हटलं. मला विषय फार वाढवायचा नव्हता. तसंही मी कुठं कायम कमी कपडे घालून फिरायचे. खरंतर स्लीव्हलेस वगैरे घालायचे म्हटलं की थोडं त्रासाचंच.  आधी वॅक्सिंग करा वगैरे. रोज रोज कोण घालणार आहे तसे ड्रेस. पण असो.
हे असे एकदोन भांडणाचे चुटपुट प्रसंग सोडले तर आमचं खरंच ठिकठाक चाललं होतं. केदार बीएससी केवळ डिग्रीसाठी करत होता. त्यांचं दुकान तीन पिढ्यांपासून चालत आलेलं. गावामधलं सर्वात मोठं मिठाईचं दुकान. अगदी चुलत भावंडांच्या वाटण्या जरी झाल्या तरी केदारला बरंच काही मिळालं असतं शिवाय मध्ये एकदा बाबा गमतीत म्हणाला तसंच, आमची दोन दुकानं नंतर कुणी बघितली असती...
परत एकदा कॉलेजमध्ये डेजचे वारे चालू झाले होते. यावेळी केदार मुख्य ऑर्गनायझिंग कमीटीच्या फ़ूड भागाचा प्रमुख होता. म्हणजेच, कॉलेजच्या गॅदरिंगचे सर्व स्नॅक्स त्याच्या दुकानामधून येणार होते. लाखोंचं बिल एका दिवसात. मी केदारला होइल तितकी मदत करत होते. त्याच्याच भाषेत सांगायचं तर धंदा चालवायला शिकत होते. अर्थात मला तळलेल्या तेलाच्या धुरानं फार खोकला येत असल्यानं मी वडेसमोसे बनवत असताना अजिबात तिकडे फिरकत नव्हते, पण पॅकेट्स बांधणे, ती ट्रान्स्पोर्ट करणे, मोजून उतरवणे वगैरे कामे चालू होती. यावर्षी निधी मार डाला वर डान्स करणार होती.. ती लहानपणापासून कत्थक शिकली होती. त्यासाठी तिला माझा ग्रीन ड्रेस हवा होता. मागच्या वर्षी आईने तिच्या एका साडीचा ड्रेस माझ्यासाठी शिवून  घेतला होता. मला अजिबात आवडला नव्हता, आफताब तर त्याला डिस्को लाईट्स म्हणायचा, पण निधीला तो ड्रेस हवा होता.. यावेळी निधी आफताब लव्हस्टोरी नीट ट्रॅकवर होती. आफताब तिचा डान्स बघायला खास पुण्यावरून येणार होता म्हणे! ग्रेट!!! कित्ती रोमॅंटिक.
यावर्षी साडी डेला मी नऊवारी नेसले होते. नऊवारीचा तो बोंगा संभाळताना टूव्हीलर मरोत कार चालवता येणार नाही याची मला खात्री होती. त्या झाशीच्या राणी वगैरे बायका नव्वारी नेसून लढाया वगैरे कश्या करायच्या ते एका परमेश्वरालाच माहिती. ऍक्च्युअली लढाया वगैरे फार दूरची गोष्ट, हे सगळं नेसून (अथवा सोडवून) बाथरूमला कसं जायचं आणि नंतर परत कसं सावरायचं हा प्रश्न मला पडला होता. नव्वरी नेसवायला गौतमीच्या हॉस्टेलमधली एक मुलगी घरी आली होती. ती कुठल्यातरी ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. वेणी आणि मेकप भान्गड तिनेच केली.
“बाबाला फोन करून तुला कॉलेजमधून सोडायला सांगू का?” आईनं अखेर माझी वेंधळलेली हालत पाहून विचारलं.
“नको. माझा एक मित्र येणार आहे.” मी तरी आदल्याच दिवशी कार घेऊन यायला केदारला सांगून ठेवलं होतं. आजच ड्रेसचं फिटिंग कसं आहे ते बघायला निधी घरी आली होती. ती माझ्या रूममध्ये ड्रेस घालून बघत होती. आई किचनमध्ये चहा करत होती. केदार यायची वेळ झालीच होती. हॉलमध्ये गौतमीची मैत्रीण माझा गजरा नीट करत होती. “ताई, नव्वारीला पिनप करू या?” तिनं माझा दोनतीनदा पडलेला पदर पाहून विचारलं. “सुईदोरा घे आणि शिवून टाक”.
आत्ताच्या आत्ता सरळ सुटसुटीत एखादा ड्रेस घालावा असं वाटायला लागलं होतं. कुठून ही नव्वारीची अवदसा सुचली कुट्नास ठाऊक? रोज ही असली साडी नेसावं लागणार्‍य़ा मागच्या शतकामधल्या बायांबद्दल मला दयाच वाटायला लागली. ती मुलगी पिना आणायला परत माझ्या खोलीमध्ये गेली. गेट उघडल्याचा आवाज आला, मला वाटलं केदार आला.
“उघड रे,” मी आवाज दिला. नाकामधली नथ कितीवेळा दाबून बसवली तरी खाली घसरतच होती. सर्दी नसताना शेंबूड आल्यासारखं वाटत होतं.
“काकी! काकी” मला बघताच आफताब जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून आई आतमधून बाहेर अलमोस्ट धावत आली.
“काकी, तुमच्या घरात ही कोण आज्जीबाई आली आहे?” त्यानं माझ्या चेहर्‍यावरची नजर जराही न हलवत विचारलं. अरे देवा, नव्वारीचा बोंगा नसता ना, आत्ता या क्षणाला जाऊन त्याला दोन फटके हाणले असते. तोपर्यंत ती नथ परत खाली आली. आई आमच्या नेहमीच्या गप्पा ऐकून हसत सरळ आत गेली. “कशाला आलास?” मी नथ घट्ट करेपर्यंत तो इडियट स्टुपिड पदर परत खाली. बाजारात नव्वारी इतक्या सुळसुळीतच का मिळतात?
आफताब आता मस्तपैकी हसत होता. “इतना फ़िल्मी सीन तो करन जोहर के पिक्चर मे भी नही होगा”
“व्हेरी फनी. आफताब! कशाला आलास?” मी परत तोच प्रश्न विचारला.
“तेरा आंचल है ढला! तेरी जुल्फे है खुली... मैं भला होश मे कैसे रहू... तू मेरे सामने है...” आफताब चक्क गाणं म्हणायला लागला. एक मिनिट! कायतरी जबरदस्त गडबड होती. आफताब पुण्यावरून कधी आलेला मला माहित नाही. नेहमीसारखा गडग्यावरून उडी न मारता गेटने घरात आलाय. मला बघून चक्क हसतोय आणि... शक्यच नाही... आफताब रफीचं गाणं गातोय. म्हणत नाही तर चक्क गातोय.
हा आफताबचा डुप्लिकेट असणार. मी परत त्याला दोन चार फटके हाणले. “आय आय! मारू नकोस गं! रात्रभर बसमध्ये बसून हालत खराब आहे. जोक्स अपार्ट, खरंच मस्त दिसते आहेस. केदारभावजींचं आज काही खरं नाही. फुल्टू कलेजे का खिमा बन जायेंगा”
“कशाला आलास?”
“रेकॉर्ड अडकली का तुझी? कशाला आलास? कशाला आलास? तुझं गॅदरिंग बघायला. केदार अन तू काहीतरी समोसा डान्स करणार म्हणे.  बाय द वे, माझा आयटम तुझ्या बेडरूममध्ये कपडे का बदलतोय? आता माझ्या रूममधून पाहिलं. आधी वाटलं तूच आहेस. पण तू इतकी काळी कशी काय झाली ते समजेना! कन्फ़्युज झालो ना मी”
“तिकडे तर निधी आहे..” आणि मग काही तरी अचानक डोक्यात प्रकाश पडला.
“आफताब, तुझ्या रूममधून माझी खोली दिसते?” आणि कपडे बदलत असताना दिसण्याइतकी!! खरंतर चाचींकडे मी इतक्या वेळा जात होते, पण आफताबच्या रूममध्ये फारशी कधी गेले नव्हते. गेले तरी त्याच्या रूमच्या खिडकीतून कशाला बघेन... एरवी तर जाडेमोठे पडदे लावले होते त्याच्या खिडक्यांना. आता तो अचानक बोलून गेला...
“बाय!! निधीला सांग मी बाहेर वाट बघतोय तिची” तो गपगुमान सटकायला बघत होता.
“आफताब, कम बॅक. आय विल किल यु”
“ओह या? आधी ढेंगा तरी टाकता येतायत का ते बघ” तो मला चिडवत दार पुढे करून बाहेर गेला. गौतमीची मैत्रीण पिना घेऊन आली होती. “एक मिन थांब. हा आफताब ना खालमुंड्या आहे. फटके देऊन काम होणार नाही” मी पुढे जाऊन दार उघडताना ओरडले. “आफताब, परत ये. जास्त शाणपणा करू नकोस”
दारात लाल गुलाबांचा बूके घेऊन छान सूट घालून टाय लावलेला केदार उभा होता.
>>>>>>

मी, आफताब, केदार आणि निधी एकदमच केदारच्या कारमधून कॉलेजकडे यायला निघालो.
“याला परवानगी मिळेल कशी? हा कॉलेजचा स्टुडंट नाही” मी निधीला विचारलं. निधी ऑर्गनायझिंग कमीटीमध्ये होती. “एखादा वेंडर्स पास बनवून देऊ की” निधी लगेच म्हणाली.
“फ़ूड कमीटीचे एक्स्ट्रा पासेस आहेत. मी देईन.” केदार म्हणाला. आमचं हे बोलणं चालू असताना आफताब मात्र डोळ्यांवर गॉगल चढवून कसलंतरी गाणं गुणगुणत खिडकीबाहेर बघत निवांत बसला होता. (आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है. नंतर त्यानंच मला सांगितलं.) “तसंही कुणी विचारणार नाही. कॉलेजमधला स्टुडंट वाटतोच की”
“आवाज छान आहे हां तुमचा” केदार त्याला म्हणाला. “उद्याच्या प्रोग्राममध्ये एखादं गाणं म्हणा की”
“तू म्हटलंत तरी चालेल. सध्या नोकरी करत असलो तरी पण” आफताब म्हणाला. “मी इथं सर्वात लहान आहे..”
“काहीही!” निधी अचानक उद्गारली.
“ऑफ कोर्स. केदार तर एक वर्षं सीनीअर आहे. तू फेब, स्वप्नील जुलैमधली आणि मी ऑक्टोबरमधला. म्हणजे मी सर्वात लहान नाही?”
केदार हसला. “बरोबर आहे. ते काय तू एकदम जॉब वगैरे करतोस ना..त्यामुळे थोडं”
“इंटर्नशिप आहे रे. साडेतीन वर्षांची. नंतर परत एक्झाम. मग ती पास झाल्यावर खरा जॉब चालू.”
“काही का असेना. वी आर रीअली प्राऊड ऑफ यु. निधी कायम तुझ्याबद्दल सांगते. तुझं डेडीकेशन, तुझा स्टडी आणि असंच.. ते राहू देत. उद्या गाणं म्हणशील ना?” केदारनं तोच मुद्दा पकडून ठेवला. त्याचं बरोबर होतं. उद्याच्या गाण्याच्या प्रोग्रामला चोवीस मुली म्हणणार होत्या मुलगे फक्त तीन. त्यातले दोन शास्त्रीय संगीतवाले. हलकीफुलकं काहीच म्हणणार नाहीत. बॉय्ज सिंगर अजून एखाद दोन वाढले असते तर जरा बरं पडलं असतं. पोरी फार पिळवटून वगैरे गातात. पोरांची गाणी जरा जास्त रोमॅंटिक.
“सॉरी,  उद्या लेट ईव्हनिंगला प्रोग्राम आहे ना? मी बाहेर जाणार आहे. भाभीला आणायचंय”
“तू उद्या प्रोग्रामला येणार नाहीस?” निधीनं विचारलं. मी विचारलं नाही, रादर, मी जास्त काहीच बोलले नाही कारण ती शेंबडासारखी नथ खाली यायची भिती वाटत होती. पदराला पिनप केला तसा या नथीला पण एक पिन मारायला हवा होता. (केवळ एका दिवसासाठी नाक टोचून घेणं हे परवडलं नसतं)
“येईन. पण लवकर जाईन. भाभीला माहेरावरून आणायचंय. परवा भाई येईल....त्याच्याआधीच तिला घेऊन!”
“क्काय्य? जादू येतोय?” मी न राहवून बोललेच. आफताबने हे चालवलंय काय. मला काही म्हणजे काही धड सांगत नाहीये. जादूचा पण येणार असल्याचा काहीच इमेल आला नाही.
“येस्स्स मॅडम. तुमचा जादू येतोय”
“हे जादू काय आहे?” केदारने विचारलं.
“माझा मोठा भाऊ. त्याला ही महामाया जादू म्हणते. का ते विचारायचं नाही. दोघं सेम टाईपचे नमुने आहेत.” आम्ही बोलत असतानाच कॉलेजजवळ पोचलो. “काऊ, मी कार पार्क करून येतो. तू कॅंटीनजवळ थांब. मी तिथंच येतो” केदार मला सहज म्हणाला.
आम्ही कारमधून बाहेर पडल्या पडल्या अपेक्षित प्रश्न आला. “काऊ?? सीरीयसली, व्हॉट्स दॅट?”
निधी ताबडतोब काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून तिच्या रजिस्ट्रेशन डेस्ककडे गेली होती. त्यामुळे आता मी आणि आफताब कॅंटीनच्या दिशेने चालू लागलो. म्हणजे आफताब चालायला लागला. मी तो अख्खा नव्वारीचा बोंगा सांभाळत सरपटत चालल्यासारखी.
काऊ हे केदारने मला दिलेलं लाडाचं नाव. असंच कधीतरी त्यानं नावांचं एक पुस्तक आणलं होतं. बसमध्ये कुणीतरी सेल्समन विकत होता म्हणे. म्हटलं एवढ्या लवकर बाळांची नावं ठरवायची तर म्हणाला. वेडीच आहेस. तुझं नाव!
माझं नाव? अरे हां!! लग्नानंतर मुलीचं नाव बदलायची पद्धत आहे ना. पण मला ही पद्धत बिल्कुल आवडत नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं की मी माझं नाव बदलणार नाही. एक तर इतकं युनिक नाव तेही आईनं इतक्या लाडानं दिलेलं. मी माझं नाव अजिबात बदलणार नाही.
“अगं, पद्धत म्हणून बदलायचं. आई तुला स्वप्निलच म्हणेन. मी पण... लग्नानंतर विधीमध्ये नाव बदलतात. आयत्यावेळी काहीतरी नाव सुचवतील आणि मग ते आपल्या दोघांनाही आवडणार नाही. म्हणून आधीच तुझ्या पसंतीनं नाव शोधून ठेवू. काव्या कसं आहे?”
मी आणि कावया? का वाया घालवताय मला? मला एकही कविता येत नाही उलट लोकं कविता म्हणायला लागले की मला झोप येते.
“किमया कसं आहे?” त्यानं पुढे विचारलं. याबया, ही कसली किमया?
“कौमुदी?” ते लहान बाळाच्या कानात मुदी घालतात तसलं काहीतरी वाटतंय.
“क्रिया?” तो पुस्तकामधली नावं वाचत होता. क्रिया  आणि कृती ही काय मुलींची नावं आहेत का? उद्या मुलाचं नाव अनुमान ठेवाल. नातवंडाचं निरीक्षण.
“काऊ?” हे नाव असतं तरी का? मी विचारलं.
पुस्तकामध्ये छापलं होतं. आईच्यान!! काऊबाई. असं नाव. मुलीचं. मी ते वाचून खूप वेळ हसत बसले. केदार गमतीत म्हणाला. “ठरलं तर मग! तुझं नाव आपण काऊच ठेवू”
तेव्हापासून तो क्वचित कधीतरी मला काऊ म्हणायचा. असा चारचौघांत कधीच नाही, पण दोघंच असताना तर नक्कीच. आता हे सर्व आफताबला सांगायचं म्हणजे वेगळीच आफत!!! “स्वप्नील इतर कुठल्याही नावात मी तुला इमॅजिन पण करू शकत नाही” तो म्हणाला.
“जादू येणार असल्याचं सांगितलं नाहीस” मी विषय बदलत म्हटलं. अख्खं कॉलेज रंगीबेरंगी नटून आलं होतं. कॅंटीनच्या कोपर्‍यात कुणीतरी टेबल टाकून फुलं विकत होतं. शंभर रूपयावरचा बूके घेतला तर तेच नेऊन त्या ठराविक व्यक्तीला देणार अशी ऑफर. आफताबनं त्या मुलाकडून भलामोठा बूके घेतला. त्यावर स्टाईलमध्ये निधीचं नाव लिहून दिलं.
“मज्जा आहे निधीची” मी टोमणा मारला. खरंतर दिवसाभरात मला असला एखादा बूके केदारकडून नक्की मिळाला अस्ताच. तरी आफताबला चिडवायची संधी का सोडा? त्यानं खिशामधून एक प्लास्टिकची पिशवी काढली. “हा तुझ्यासाठी”
“काय आहे?” मी पिशवी उघडून पाहिलं. आतमध्ये टप्पोर्‍या मोगर्‍याचा छान गजरा. हा सूर्य आज नक्की पाताळातूनच वर उगवला असणार.  “आपल्या  झाडावर खूप फुलं आली होती. पहाटे आलो तेव्हा सगळीच काढली. तुझ्या या हेअरस्टाईलवर छान दिसेल म्हणून मघाशी निधी तयार होइपर्यंत काकींकडून गजरा करून घेतला. इतके दिवस घर बंद आहे तर मला वाटलं की सगळी झाडं सुकली असतील.”
“कशी सुकतील? आई दर दोन दिवसांनी कविताला पाणी घालायला सांगते ना.” हे मोगर्‍याचं झाड चाचींनी आणलं होतं. याचा वास इतका भारी होता! हे झाड होतं आमच्या शेजार्‍यांच्या अंगणात पण त्याचा वास मात्र आमच्या घरभर दरवळायचा. “थॅंक्स. हे खरंच मस्त सरप्राईझ आहे. उद्या जादूपण येईल. नूरीभाभी पण येतेय ना? किती दिवस राहणार आहेस?”
“मी दोन चार दिवस आहे. भाई आता कायमचा येतोय”
“तू काय मला सरप्राईझवर सरप्राईझ देणार आहेस का?” त्याने तो गजरा माझ्या हेअर स्टाईलवर (खरंतर तो अंबाडाच होता पण गौतमीच्या मैत्रीणीने एकदम स्टायलिश घातला होता) लावून दिला.
“बास्स. आज इतकीच सरप्राइझेस. च्यायला, हे गजरा लावताना कसं अगदी फिफ्टीजमधल्या कादंबरीसारखं वाटतंय. चलो. तुला काही मदत हवी आहे का? मी आता दिवसभर फ्रीच आहे” तो म्हणाला.
माझा नाव्वारी वावराचा तो अख्खा दिवस सुसह्य करण्याचं श्रेय आफताबला जातं. मला नेमून दिलेली बहुतेक कामं त्यानंच केली. दिवसभर आम्ही कॉलेजमध्ये मस्ती करत होतो. कधीकधी आज विचार करताना वाटतं, बारावीनंतर आफताब कॉलेजला  गेलाच नाही. सरळ इंटर्नशिपच्या नावाखाली नोकरीला लागला. कॉलेजची ही दोन वर्षं माझ्यासाठी निवांत होती. त्याचं तसं कधी झालंच नाही. काहीही न करण्याचा आळसपणा आणि निवांतपणा त्याला परवडलाच नसता. पण ते गॅदरिंगचे दिवस मात्र त्यानं माझ्याबरोबर खूप एंजॉय केले. त्या संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर आम्ही डिनरला चौघंजण हॉटेलमध्ये गेलो. तिथं निधीने त्याला अंताक्षरीसाठी क्लूज शोधून द्यायला सांगितलं होतं. “स्वप्निलकडे जाऊन शोधेन. तिच्या पीसीमध्ये बरीच गाणी आहेत.” तो सहजपणे म्हणाला.
“म्हणजे तू स्वप्निलच्या घरी रात्री जाणार आहेस का?” निधी त्याला म्हणाली.
“माझं आणि तिचं घर यात असं कितीसं अंतर आहे?” त्यानं विचारलं. यावर निधी खूप चरफडली हे माझ्याही लक्षात आलं. एक्स्ट्रा गोष्ट इथं सांगायला हवी. मी आणि केदार झालंच तर अजून कुणी ए्कदोन जोडपी सोडल्यास इतर कुणाचीही “लफडी” सार्वजनिकरीत्या सर्वांना माहित नव्हती. निधी तर चुकूनही आफताबचा उल्लेख करायची नाही. आज गॅदरिंगला आला तरी तो माझा मित्र म्हणून आला होता. तिचा बॉयफ्रेंड म्हणून नाही.. निधी कॉलेजमध्ये असताना त्याच्याशी बोलणं दूरच पण ओळख दाखवत नव्हती. तिच्या मते, जर इतरांना खास करून कॉलेज प्रोफेसर्सना याबद्दल समजलं तर तिच्याविषयी त्यांचं मत खराब होइल. मला हे तितकंसं काही पटत नव्हतं. तरी आफताब ज्युनिअर कॉलेजचा जुना स्टुडंट आणि तोदेखील अतिशय हुशार वगैरे असल्याने प्रोफेसरांचा आधीपासून लाडका होता. माझा मित्र म्हणून त्याची ओळख करून दिल्यामुळे मला काहीच फरक पडत नव्हता. केदारला मी काही बाबतीत कित्ती वाट्टेल त्या शिव्या घालेन, पण याबाबतीत कधीच नाही. त्याला माझी आणि आफताबची मैत्री माहित होती. आम्ही दोघं एकत्र अभ्यास करत होतो, एकत्र बाजारात जात होतो हे त्याला माहिती होतं. मला कधी कंटाळा आला तर मी तासभरसुद्धा आफताबबरोबर फोनवर बोलायचे पण केदारनं त्यावर कधी संशय घेतला नाही अथवा मला काही म्हटलं नाही. आफताब निधी अफेअर तर त्याला माहित होतंच शिवाय मी असलं वागणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती.
त्या दिवशी अंताक्षरीसाठी आम्ही कितीतरी गाणी शोधली. जुन्या गाण्यांची त्याला इतकीच माहिती आहे हे बघून मला गंमत वाटली. प्रत्येक राऊंडसाठी बारा क्लूज हवे होते आम्ही सेफर साईड म्हणून पंधरा शोधून ठेवले. आफताबनं त्याच्या मोठ्या अक्षरामध्ये सर्व क्लूज लिहून काढले. हे करताना तो नेहमीसारखा शांत नव्हता, सतत काहीतरी बोलत होता, हसत होता.
“आफताब. खूप बदललास.” मी शेवटी त्याला म्हटलंच.
“बदल कसाय? चांगलं की वाईट?”
“माहित नाही. आधीसारखा अजिबात राहिला नाहीस. आधी कसा एकदम शांत होतास. आता...”
“यु नो व्हॉट. मी आधीपण शांत नव्हतोच. पण परिस्थिती उधळ्याची नव्हती. आताही नाही. पण किमान आता दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अझरभाईंचे पैसे आलेत का यांची चिंता करावी लागत नाही, स्वत:पुरता का होइना कमावतो.. आता चिंता नाही गं”
“आज खरंच चाची असायला हव्या होत्या...”
“अम्मी हवी होती. अरिफ हवा होता! अझरभाई आमच्यासाठी अक्षरश: राबलाय. आता मी कमवतोय पण ते केवळ स्वत:इतकंच. अल्लाकडे कधी दुआ मागितली तर मी एकच मागतो. इतका पैसा दे की, मी अझरला सांगेन. आता कष्ट करू नकोस. खूप राबलास. निवांतपणे घरी बस आणि काय हवं ते कर. तो लाईफमधल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करत गेला. स्वत:ची स्वप्नं, ऍंबिशन्स सगळं बाजूला ठेवलं... घर चालवायचं म्हणून. हे लग्न करायचं त्याच्या मनात नव्हतं. त्याला दिसायला साधी पण शिकलेली बायको हवी होती. पण मामुनीने ही शादी ठरवली. त्याला नाही बोलता आलं नाही...”
“छान आहे की नूरी...”
“छान आहे. पण संसार करायला नुसतं छान असून चालत नाही. काहीतरी कनेक्शन असावं लागतंच”
“तुझ्या आणि निधीमध्ये आहे तसं कनेक्शन?”
“मी निधीबरोबर संसार करेन याची मला काही खात्री वाटत नाही” क्लूसाठी फाडलेले चिटोरी अगदी नीट फोल्ड करून एन्व्हलपमध्ये ठेवत तो म्हणाला.
“असं का? तुमचं तर गेली कित्येक वर्षं..”
“सो व्हॉट! आज तिला माझ्यासोबत अफेअर आहे हे सांगायाची लाज वाटते. टीचरसमोर माझ्याविषयी मत खराब होइल... का!! तर मी मुसलमान आहे. आणि एका मुस्लिम पोराबरोबर..” ही गोष्ट त्याला सकाळपासून खटकत असणार हे माझ्या आत्ता लक्षात आलं.
“कमॉन, याचा काही संबंध आहे का? तुला तिचा स्वभाव माहिती आहे. तिनं मला कित्येक महिने सांगितलं नव्हतं. मग इतर कुणाला...”
“असो! आता त्यावर चर्चा नको. जे काही पुढे होइल ते होइलच. सबकुछ आखिर उसकी मर्जी पे डीपेंड!”
“रात्र खूप झाली. तू आज जेवायला आमच्याचकडे थांब आणि उद्या ब्रेकफास्टला पण. नूरीभाभी येईपर्यंत..”
“हो, आता भाई कायमचा येणार म्हटल्यावर ती इथंच राहील... घर परत आधीसारखं होईल ना?”
पण ते घर आधीसारखं कधी झालंच नाही.
दुसर्‍या दिवशी आफताब गावाला जाऊन नूरीभाभीला घेऊन आला.. तिसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्या घरामधून आफताब आणि नूरीचे जोरजोरात भांडल्याचे आवाज यायला लागले. मी नूरीचा तर आवाज कधी ऐकलाच नव्हता पण आफताबचा इतक्या जोरात चढलेला आवाज की गेल्या पाच सहा वर्षांत पहिल्यांदा ऐकला.

(क्रमश:)