Tuesday 20 December 2016

रहे ना रहे हम (भाग २२)


मी साधारण पाचवीला असताना आईनं ठरवलं की मी यापुढे तिच्या बेडरूममध्ये झोपायचं नाही. बाबा तर तेव्हा रात्रीचा कधी नसायचाच त्यामुळे मला आठवतं तसं आई आणि मी एकाच बेडवर झोपायचो. मग पाचवीनंतर आई म्हणाली की तू आजपासून तुझ्या खोलीमध्ये झोपायचं, तोपर्यंत माझी खोली ही केवळ मला पसारा करायला, खेळायला वगैरे कामांसाठी आहे  असा माझा समज होता. इतकं आठवतंय की त्याआधी आईबाबाचं भांडण झालं होतं. आता ते भांडण कशामुळे झालं ते लक्षात आलंय पण तेव्हा ते समजायची अक्कल नव्हती. आईनं हा हुकूम काढलं तेव्हा मला काय इतकं वाटलं नाही कारण, मला झोप लागेपर्यंत आई माझ्याच खोलीमध्ये मला झोपवायची, काहीतरी गोष्टीबिष्टी सांगत. रात्री मला कधीतरी जाग आली की मी सरळ बेडवरून खाली उतरून आईच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचे. बाबा बहुतेकदा नसायचाच. अजून कधीतरी मला रात्रीअपरात्री स्वप्नांत असं वाटतं की मी माझा तो मिकी आणि मिनीमाऊसचा पांढरा नाईट पायजमा घालून माझ्या बेडवरून खाली अंधारातच उडी मारतेय आणि तशीच दुडूदुडू धावत जाऊन आईच्या बेडवर  चढतेय. झोपेतच आई मला जवळ घेतेय, माझ्या केसांमधून हात फिरवून मला कुशीत घेऊन थोपटतेय.   
पुढे जसजशी अक्कल आणि शहाणपण वाढत गेलं तसं “माझी खोली” या गोष्टीला माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड अस्तित्व मिळालं. कंप्युटर आल्यापासून तर अतिच. मग मी आईच्या खोलीत जाऊन झोपणं बंद केलं, नंतर तर मला माझ्या खोलीमध्ये कुणी आलेलं पण आवडायचं नाही. कविता येऊन रोज घर झाडून-पुसून जायची, अकरावी-बारावीला असताना तर मी घरात नसेल तर तिलाच काय आईलापण माझ्या खोलीत जायला बंदी केली होती. तेव्हापासून मी कायमच घराबाहेर पडताना माझ्या खोलीला कुलूप लावून बाहेर पडायचे. आता मुंबईला हॉस्टेलला आल्यापासून ती सवय कमी झाली. तसं माझ्या खोलीमध्ये लपवण्यासारखं काय फार मोठं सिक्रेट नसायचं पण तेव्हा प्रायव्हसी जपणे हा फार मोठा विषय होता.
आफताब माझ्यासोबत रहायला आल्यानं पहिल्यांदा सुरूंग लागला तो या गोष्टीला. माझ्या खोलीमध्ये, बेडवर, कपाटामध्ये, बाथरूममध्ये एकूणच आयुष्यामध्ये चोवीस तास इतर कुणीतरी सतत आहे, फिजिकली नसेल तरी त्याच्या वस्तूंमुळे ही गोष्ट मला फार ओव्हरव्हेल्मिंग वाटत होती. बाथरूममम्ध्ये त्याचं शेव्हिंग किट मला सतत खुपायचं. तशी चिडायची गरज नाही हे मलाही समजत होतं तरीही “माझ्या” वस्तूंसोबत इतर वस्तू ठेवलेल्या मला चालायचं नाही. शेअरिंगची सवयच नव्हती...
लतिकासोबत हॉस्टेलमध्ये राहताना तशी थोडाफार सवय झाली होती. तरीही खोलीचा तिचा भाग स्वतंत्र, माझा स्वतंत्र. एकाच खोलीमध्येही आम्ही वेगवेगळ्या होत्या. पण आता तीच सेम परिस्थिती नव्हती. रात्रभर आपल्या बेडवर दुसरं कुणीतरी झोपलंय हे फारच वैतागवाणं फीलिंग असतं. हेकाय मी त्याला बोलून दाखवलं नाही,पण तरी त्याला लक्षात आलं असावं, तो बहुतेकदा काहीतरी वाचत किंवा लॅपटॉपवर काम करत हॉलमध्येच झोपायचा.  
त्यानं आयुष्याची पहिली बरीच वर्षं भावांच्या रूममध्ये एकत्र काढली होती. नंतर आमच्या बाजूला रहायला आल्यानंतर जरी घर भलंमोठं असलं तरी कायम येणारेजाणारे लोक, नातेवाईक यामुळे तो एकटा असा फारसा राहिलाच नाही. आणि राहिला तरी सगळं स्वत:चं स्वत: करता येण्यासारखं असल्यामुळे त्याला याचा फारसा त्रास होत नसावा. कदाचित झालाही असेल, पण मी विचारलं नाही. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा वाटलं की आम्ही कित्त्त्ती वेगळे आहोत. आमचं काहीही जमण्याची शक्यता नाहीच, पण आज इतक्या वर्षांनी त्याचा सततचा सहवास म्हणा किंवा दोघांची वाढलेली मॅच्युरीटी लेव्हल म्हणा आमचे छोट्यामोठ्या गोष्टींवर खटके फार कमी उडायला लागले.
या लिव्ह इनमुळे मला मी किती मोठा मूर्खपणा एकेकाळी केला असता याची जाणीव व्हायला लागली. एखादा पुरूष जेव्हा चोवीस तास तुमच्यासोबत रहायला लागतो तेव्हा काय मेजर झोल होतात. शिवाय, सगळं बाडबिस्तारा नेऊन दुसर्‍याच्या घरात जाऊन रहायचं, आणि तिथंच ऎडजस्ट करायचं ही कसली भयंकर पद्धत आहे. नवीन पार्टनर, नवीन घर, नवीनच “अहो” आईबाबा आणि एकूणातच सगळंच काही नवीन नवीन. या घरामधले लोकं ब्वा आपल्या घरी ही नवीन मुलगी आली आहे, आपण जरा ऍडज्स्ट करू वगैरे कशाचा विचार करत नाहीत. पण त्या मुलीनं मात्र या कंप्लीट नवीन ठिकणी जमवून घ्यायचं, वेळ पडेल तसं स्वत:च्या बेसिक सवयींनादेखील मुरड घालायची आणि ऍडजस्ट व्हायचं! झोपायचं कधी उठायचं कधी हे त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरणार. त्यांच्या पद्धतीने जेवायचं, चहा त्यांच्या पद्धतीने आणि टॉयलेटचं शेड्युलपण त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरवायचं!! या लग्न नावाच्या गोष्टीचं पोरींना इतकं भयंकर आकर्षण कशापायी असतं हो? म्हणजे एकेकाळी मलाही होतंच, पण आता अनुभवांती हे शहाणपण आलंय की “लग्न” या घटनेमध्ये काहीही ग्लॅमरस नाही!

त्याकाळामध्ये मी आणि तो माझ्या ऑफिस किंवा असंच सटरफटर याशिवाय जास्त कधी बोललोच नाही. बोलण्याव्यतिरीक्त ओठांना इतरही बरीच कामं होती हे गंमत म्हणून म्हणता येईल. पण प्रत्यक्षात तो अजूनही निधीमधून सावरला नव्हता. बोलताना कुठूनही विषय सुरू झाला तरी कसंही कुठूनही पोचून तिच्यापर्यंत येऊन थांबायचा.  तसं झालं की त्याची नजर एकदम फार कडवट व्हायची, बोलणं तर अल्मोस्ट थांबायचंच, मग लॅपटॉपमध्ये मेल्स चेक करणं किंवा लॅपटॉपवर जाऊन काहीतरी वाचत  बसणं. घरामध्ये एक भीषण शांतता.
प्रॉब्लेम हा होता की माझं त्याच्यावर इतकं प्रेम असतानाही मला त्याची ही अवस्था पुरेपूर पटत होती. केदार प्रकरणाच्या वेळी माझी हीच अवस्था झाली होती. त्यावेळी केदारच्या कानाखाली मारताना आफताबला नक्की काय वाटलं असेल ते मला आज जाणवत होतं. अर्थात आमच्या दोघांच्या प्रेमभंगामध्ये एक भलामोठ्ठा फरक मात्र होता.
 केदारचं लग्न झाल्याबद्दल ज्याक्षणी मला समजलं त्याक्षणी मी आमच्या नात्याचं श्राद्ध उरकून मोकळी झाले. एका निमिषार्धात मी आणि केदार आता या जन्मात एकत्र येऊ शकणार नाही हे मला कळून चुकलं पण आफताब मात्र, अजून निधीला विसरला नव्हता. मनाच्या एका कोपर्‍यामध्ये अजूनही कुठेतरी ती परत येईल याची त्याला प्रचंड आशा होती. दिवसाच्या कुठल्याही वेळेला वाजलेला मोबाईल, मेसेजचा टोन, असो नवीन इमेलचं नोटिफिकेशन “कदाचित निधी असेल” हा विचार त्याच्या मनामध्ये चमकून जायचा, हे त्यानं मला कधी सांगितलं नाही, पण मी आणि तो एकमेकांना इतके ओळखून होतो की मला ते आपसूकच समजलं होतं. निधी खरंतर युएसला गेली होती, जाताना तिनं कुणालाही तिचा पत्ता, मोबाईल नंबर इतकंच काय पण ईमेल आयडीपण दिला नव्हता. तिच्या कॉलेज फ्रेंड्सपैकी अगदी चारदोन जणांशीच तिच संपर्क होता आणि त्यांच्यापैकी कुणीही या “गावगुंड मवाली” पोराला तिचे कॉंटॅक्ट डीटेल्स दिले नसते.
मला ना निधीचं याबाबतीत जाम कौतुक वाटतं. कसं व्यवस्थित प्लानिंग केलं या पोरीनं. आधी आफताबला जाळ्यात अडकवला, मग सहासात वर्षं त्याच्यासोबत राहून स्वत:च्या सर्व शारिरीक, मानसिक आणि भावनिक गरजा भागवल्या. (थोड्याफार आर्थिकसुद्धा.). मात्र हे करताना स्वत:च्या सामाजिक इज्जतीला तिनं जरासुद्धा धक्का लागू दिला नाही. आयमीन, मी वसीमसोबत केवळ फ्रेंड म्हणून असताना सुद्धा गावभरात माझा लौकिक मुसलमानाच्या सोबत फिरणारी असा झाला आणि हिनं मुसलमानाचा बॉयफ्रेंड इतकी वर्षं ठेवूनसुद्धा ही मात्र “चांगल्या कॅरेक्टरची”. शिवाय ऍडिशनल बोनस म्हणून तिच्या घरदारच्या लोकांसाठी आफताबसारखा शिकलासवरलेला मुलगासुद्धा गुंड म्हणून कन्व्हिन्स करण्यात ती कामयाब झाली. हे असं एका क्षणात नातं तोडण्ं जमतं कसं या लोकांना?
त्याकाळी मी आणि आफताब फार जवळ आलो, पण तरीही कुठेतरी एकमेकांपासून दूरच राहिलो. या नात्याचं भविष्य काय, नावपण आम्हाला माहित नव्हतं. त्याच्या मनामध्ये या नात्याला काय स्थान आहे ते मला व्यवस्थित माहिती होतं, याहीआधी निधीचा आणि त्याचा ब्रेकप जेव्हा कधी झालाय, त्यानं लगेच असं दुसरं एखादं नातं जोडलंय, पण निधी परत आली की तो कायम तिच्याचकडे गेलाय. पूर्वी मला माहित नसलेल्या अशा कुणीतरी होत्या, आता मी होते. यानं त्याला काय फरक पडला असता! मी मात्र या औटघटकेच्या संसारामध्ये समाधान मानत होते.
तोही हळूहळू सावरत होता, मुद्दाम त्याला थोडं अजून रीलॅक्स वाटावं म्हणून मी माझ्या ग्रूपमध्ये त्याला घेऊन जात होते. माझ्या अख्ख्या फ्रेंडसर्कलमध्ये मी त्याची ओळख करून दिली. आमच्यासोबत वीकेंडला मूव्हीज डिनर किंवा इतर आऊटिंगमध्ये तो पण सामिल झाला. सर्वांनाच तसा तो खूप आवडला, आशीशखेरीज!  
आशिष अतिशय दुखियारी आत्मा होता. त्याचा काय प्रॉब्लेम होता माहित नाही, पण तो कायम दोन विभिन्न जगात असल्यासारखा वावरायचा. म्हणजे, आमच्यासोबत फिरायला, पिक्चर बघायला त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यातही कधी चान्स मिळालाच तर इकडेतिकडे हात लावून घेणे, नको तिथं टक लावून बघणं वगैरे चीप उद्योगपण करायचा. पण त्याच्या बहिणींबद्दल एक शब्द बोललेला त्याला सहन व्हायचं नाही. बहिणीच कशाला? भारतीय संस्कृतीमध्ये जे काय महानोत्तम आहे ते सर्व काही त्याला पूजनीय होतं. अपवाद फक्त आमच्यासारख्या एकट्या स्वतंत्र मुलींचा. देबजानीला त्याने “मी अधेमध्ये तुझ्या फ्लॅटवर येऊका विचारलं होतं. तिनं एच आरच्या सीनीअरकडे कंप्लेंट केली होती. तरी आशिष वठणीवर काही आलाच नाही. त्यानं मला याआधी टोमणे मारले होते आणि वरकरणी गोड बोलत काय घाण कमेंट्स पास केल्या होत्या. आता मी आफताबसोबत असल्यावर तर चेकाळल्यासारखा काहीही बोलायचा. आम्ही बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. एकाच ऑफिसमध्ये असल्यानं त्याला तसंही टाळता यायचं नाही. आशिष स्वत: एकदम कर्मठ घरामधला होता. त्याच्या बहिणींनी इतर फॅशनचे कपडे राहू देत, बिनाओढणीचा सलवार सूट घातलेलं पण चालायचं नाही. बाय द वे, त्याला चार मोठ्या बहिणी आणि नंतर झालेला हा पाचवा वंशाचा दिवटा. आताच्या या जगामध्ये पण असले फॅमिलीज आहेत हे एक आश्चर्यच म्हणायचं.
तर आम्ही बाहेर गेलेले असताना हे आफताब व्हर्सेस आशिष कायमच घडायचं. आशिष सतत त्याच्याशी हिंदीत बोलायचा. ग्रूपमध्ये तसे नॉनमराठी लोक बरेच होते, पण आशिष मुद्दाम आफताबसोबतच हिंदी बोलायचा. तेपण “तुमको ये पिक्चर नाही देखने का तो हम काय करे?” टाईप हिंदीचा मुडदा पाडत!
एकदा आम्ही सर्वजण वीकेंडला लंचसाठी वाशीला भेटलो होत. सर्वजण म्हणजे ऑफिसचे सर्वजण. शिवाय मी आफताबलाही सोबत घेतलं होतं. लंचनंतर आम्हा दोघांचा प्लान जब वी मेट परत बघण्याचा होता. कधीनव्हेते, मला आणि त्याला दोघांनाही एकच पिक्चर बेहद आवडला होता. आर्थात, त्याला जबवी मेट आवडण्याची कारणं वेगळी होती, माझी कारणं वेगळी. त्याला खासकरून करीना कपूर फार म्हणजे फार आवडली होती. पहिल्यांदा पिक्चर पाहिला तेव्हा तो मला म्हणाला, “ही एकदम निधीसारखंच कॅरेक्टर घेतलंय, हो ना?”
आसपास भिंत नव्हती म्हणून अन्यथा मी दाणदाण डोकं आपटलं असतंच. निधीनं तुला सोडून दुसर्‍या कुणाशीतरी संसार मांडलाय हे या शहाण्याला कधी कळणार. अर्थात, मला अख्खा पिक्चर आवडला तो शाहिदच्या एका डायलॉगसाठी. ते नाही का, ट्रेनमध्ये ती विचारते “तुम मुझे पसंद करते हो ना?”
त्यावर तो इतकं मस्त समजूतदार उत्तर देतो. “हा! पर तुम्हे टेन्शन लेने की जरूरत नही है. वो मेरा प्रॉब्लेम है” इतके डझनावारी हिंदी आणि इंग्लिश रोमँटिक पिक्चर पाहिलेत, पण फार कमी वेळा ऑन स्क्रीन इतका समजूतदारपणा बघायला मिळालाय.
पिक्चर पाहून आल्यावर लंचदरम्यान ऍडमिनची हरिनी तिचा काहीतरी स्केरी एक्स्पीरीयन्स सांगत होती. “मी अशी रोडवरून जात होते. तर माझ्यामागे एक व्यक्ती. मला तो कोण ते माहितच नाही. तो व्यक्ती माझ्यामागून येत होता”
आम्ही सगळे टोटल गुंगून हे ऐकत असताना मोबाईलमध्ये काहीतरी वाचत असलेला आफताब मध्येच म्हणाला. “ती व्यक्ती”
हरिनी या मध्येच बोलण्यानं टोटल गोंधळली. “नाय रे. माणूसच होता. अंधार असला तरी तेवढा समजतंच ना”
“माणूस.. आय मीन, पुरूष असेल. पण व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे तो व्यक्ती चूक” आफताब ठामपणे म्हणाला.
वास्तविक यावर हरिनीने “ओके” म्हणून तिची गोष्ट पुढे सांगायला सुरूवात केली. पण आशिष तडमडला.
“पण जर तो पुरूष असेल तर तो व्यक्ती म्हणणं बरोबर आहे. मराठीमे तो ऐसेही बोलते है”
“नोप. तो पुरुष, ती स्त्री, तो माणूस, ते बाईमाणूस आणि ती व्यक्ती, मराठी व्याकरणाचं कुठलंही पुस्तक उघडून बघ. हेच दिसेल.”  
“ओह. मराठी व्याकरण ऍंड ऑल दॅट हा? मला वाटलं तुझी मातृभाषा उर्दू असेल”
“मी काय युपी लखनौचा आहे का? पुण्यात अर्धं आयुष्य गेलंय. माझी मातृभाषा मराठीच”
 “पण मदरश्यामध्ये अरेबिकच शिकवतात ना?”
“हो शिकवतात, पण मी मुळात मदरश्यामध्ये शिकलो नाहीये. मला अरेबिकमध्ये प्रार्थना करता येते. पण त्याचा अर्थ असा नाही की, ती माझी बोलीभाषा आहे. लहानपणापासून जी भाषा माझ्या कानांवर पडली, मी ज्या भाषेत पहिले शब्द उच्चारले, ज्या भाषेची बडबडगीतं माझ्या आईनं मला शिकवली ती माझी भाषा” अशारितीनं अतिशय शांत शब्दांमध्ये आफताबनं आशिषचा खातमा केला. त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. इतक्या शाब्दिक मारानंतर आशिष अर्थातच गप्प बसणार्‍यांमधला नव्हता पण सुदैवानं ग्रूपमधल्या देबजानीनं इथून पुढं विषय बंगाली आणि तमिळवर नेला. तिचा बॉयफ्रेंड तमिळ होता, त्यांच्याकडे तर हा भाषिक अस्मितेचा प्रश्न चांगलाच धगधगता होता.  त्या दिवशी ग्रूपमध्ये अख्खी संध्याकाळ आम्ही भाषा या विषयावर चर्चा करण्यात घालवली.
मात्र, या प्रसंगांनंतर आशिष दरवेळी मला ऑफिसमध्येही काहीबाही ऐकवू लागला होता. माझ्या अपरोक्ष तर तो माझा उल्लेख घाणेरड्या शिव्यांनीच करायचा ही गोष्टसुद्धा माझ्या कानावर आली.
अर्थात त्यानं मला फारसा काही फरक पडत नव्हता! मी आता आफताबशिवाय जगणं या कल्पनेचा विचारदेखील करू शकले नसते. पण अखेर काही झालं तरी मामला अजूनही एकतर्फीच होता. “वो मेरा प्रॉब्लेम है, किसी और को टेन्शन लेनेकी जरूरत नही है!”

>>>>>>> 
 ऑफिसच्या ऍडमिनकडून मेल आली होती की यंदा ऑफिस डे सेलीब्रेशनसाठी सर्वांनी ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायचं. आमच्याकडे तमिळ, बंगाली, तेलुगु, मराठी, गुज्जू, पंजाबी (गूडनाईटच्या कागदावर जितक्या भाषा लिहिलेल्या असतात ते सर्व) लोकं असल्याने साहजिकच या ट्रॅडिशनल डेचं फारच कौतुक सुरू झालं. कोण काय घालणार? कुणाची जोडी कुणासोबत. शॉपिंगला कुठे जायचं. एक्सेसरीज काय घ्यायच्या. असं बरंच काहीबाही. ऑफिसमधले दिवसच्या दिवस या चर्चेमध्ये जात होते. मी जोधा अकबर लूक करायचं ठरवलं.. पिक्चर नुकताच पाहिला होता. मस्त लव्हस्टोरी होती, ऐतिहासिक वगैरे गोष्टींशी त्याचा फारसा संबंध नसेल, (म्हणजे नव्हताच त्यावरून आफताबशी चिक्कार वादावादीपण झाली होती.) पण मला पिक्चर आवडला. फिक्शन म्हणून बघायचं तर एका राजकन्येच्या मनाविरूद्ध झालेल्या विवाह, आणि ज्या संस्कृतीशी तिचा अजिबात संबंध नाही, तिथे तिने ऎडजस्ट करण्याचा प्रयत्न, सोबत अधेमध्ये नवर्‍याने दिलेली साथ किंवा कधीतरी रागामध्ये सोडलेली साथ. मध्येच उफाळून येणारा टिपिकल मेल इगो. शिवाय दोन्ही प्रेमिकांमध्ये व्हिलनगिरी करणारे बाहेरचे कुणी नव्हे, तर घरातलेच घरफोड्ये. एखादी आदर्श प्रेमकहाणी असावी अशी ही गोष्ट. पण सर्वांत मॊठा प्लस पॉइंट म्हणजे, उघड्या अंगानं तलवारबाजी करणारा ह्रितिक!!
विषय भरकटला... पण आता मुद्दा होता, जोधाच्या लूकचा.
एकतर मला तो कुंदनचा भलामोठा सेट फार आवडला होता, शिवाय माझ्याकडे सागरदादाच्या लग्नासाठी शिवलेला रेड घागरा पण होता. परफेक्ट लूक झाला असता. मी अंधेरीला एका दुकानांत तो कुंदनचा सेट बघितला तर फारच महाग होता, पण मला देबजानीने सांगितलं की क्रॉफर्ड मार्केट किंवा भुलेश्वरला एकदम स्वस्त मिळेल. पण मी त्या भागात कधीच फिरले नव्हते. देबजानीला माझ्यासोबत ये म्हटलं तर म्हणाली, “आफताब को लेके जाव. वो सब उन लोगोंका एरिया है” मी लगेच तुणतुणं आफताबसमोर वाजवलं.
“अजिबात नाही” लॅपटॉपवर काहीबाही खडबडवत  नजर स्क्रीनसमोरून न ढळवता इतकंच उत्तर आलं.
“पण का?” परत कीबोर्डची लटपटकटपट! मी तोच प्रश्न दोन तीनदा विचारला.
अखेर मेलच्या सेंडवर क्लिक झालं आणि नजर उठून माझ्यावर स्थिरावली. डाव्या हाताने चष्मा सावरला, आणि मग निवांत उत्तर आलं.
“मला त्या गर्दीत फिरायला आवडत नाही. चीप वस्तू मिळतात म्हणून मी तीन तास त्या गर्दीत घामेजत भटकणार नाही” या व्यक्तीला शॉपिंगचा अर्थच कळत नाही खरंतर. पण मी काही बोलायच्या आत, “दुसरं म्हणजे तो बटबटीत सेट तुला अजिबात चांगला दिसणार नाही” असा निकाल!! नजर परत लॅपटॉपकडे आणि किबोर्डची लटपटलटपट चालू.
“मग मी काय घालू? माझ्याकडे ट्रॅडिशनल डेमध्ये घालण्यासारखा तोच एक ड्रेस आहे. बाकी सर्व फॉर्मल”
“नऊवारी नेस ना”
“काय? वेड लागलंय का? ऑफिसला जायचंय, मला सांभाळता येत नाही. एकदाच कॉलेजच्या फंक्शनला नेसले होते. हालत खराब झाली होती. आठवतंय?”  
पण आता काही उत्तर येणं शक्य नव्हतं कारण, आफताबमहाराज परत स्वत:च्या एक्सेलशीट गुहेमध्ये तपस्येला बसले होते. एकवेळ मेनका येऊन नाचली म्हणून अख्खी बिल्डिंग जागी होईल, पण जोवर समोरची एक्सेलशीट निस्तरत नाही तोवर त्याची नजर हालणार नाही. त्याच्या लॅपटॉपसमोरच मी माझं पुस्तक वाचत बेडवर लोळत पडले. थोड्यावेळानं अचानक गुणगुणण्याचा आवाज आला, मला वाटलं यानंच मीडीयाप्लेयरवर गाणं लावलं असणार, पण तो लॅपटॉपसमोरून उठला होता आणि माझ्या बाजूला बसला होता. हातातलं पुस्तक मीटून मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तोच गुणगुणत होता. “तू जो हसती है, तो बिजली सी चमक जाती है”
“हे काय?”
“विसरलीस? मै भला होश मे कैसे रहू”
“ओह! लक्षात आहे की. दिवसभर मला चिडवत होतास.”
“दिवसभर तुलाच बघत होतो. स्वप्निल, काय कातील दिसत होतीस”
“शटाप! काकूबाई दिसते म्हणून तूच म्हणत होतास”
“मग काय तुला केदारसमोर आणि निधीसमोर काय सेक्सी दिसतेस! आता याक्षणी तुला उचलून आपल्यासोबत कुठंतरी दूर घेऊन जावं आणि तुझ्यासोबत बेदरकार शृंगार उधळावा असं वाटतंय हे म्हणणार होतो का?”
“असं म्हणणार होतास का?”
“अल्लाकसम! एक्झाक्टली हीच भावना होती. त्यादिवशी पहिल्यांदा तू मला आवडलीस. म्हणजे मैत्रीण म्हणून नव्हे, एक मादी म्हणून. याआधी कसं कुणाबद्दलही वाटलं नव्हतं. टीनेजरमधले क्रश असो, वा गर्लफ्रेंड्स या सर्वांबद्दल असलेल्या आकर्षणापेक्षाही त्यादिवशी, त्याक्षणी तुझ्याबद्दल वाटलेलं ते आकर्षण आदिम होतं, रानटी होतं पण सच्चं होतं.”
त्याला माझ्याबद्दल असं कधी वाटलं असेल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. पण  तूर्तास हे वाटण घाटण जरा बाजूला ठेवू. “मी अख्खा दिवस तुझ्यासोबत होते, पण तुझ्या वागण्यांत जे जाणवलं नाही”
“देन आय ऍम अ गूड ऍक्टर. असंपण.. ही भावना चोवीस तास तुमच्या मनांत नसते. काही क्षणांपुरतंच वाटणारं अस्तं. जबरदस्त ओढ म्हण, वासना म्हण किंवा अजून काहीही ग्लोरीयस नाव दे. स्वप्निल, तुला खूप वेळेला पाहिलंय, पण त्या नऊवारी साडीमध्ये तू जे काही दिसलीस.” त्यानं माझ्या ओठांवर ओठ टेकवले.
दुसर्‍या दिवशी, मी देबजानीला हे सर्व सांगितलं, म्हणजे याच शब्दांत नव्हे पण साधारण. देबजानी आणि मी बर्‍याचदा असल्या बकवास गप्पा मारत बसायचो. तिचा बॉयफ्रेंड सध्या युकेला गेला होता. त्यांना लग्न करायचं होतं, पण स्वत:चा फ्लॅट झाल्याशिवाय करता आलं नसतं. म्हणूनच दोघंही पैसे साठवून साठवून ठेवत होते.
“पागल है क्या? तू तो फिर वो मराठी स्टाईल साडी पहन”
“मुझे नही आती”
“क्यु? वेस्टर्न स्टाएल तो अच्छी पहनती है” देबजानीच्या भाषेत आपण जी पाचवारी साडी गुंडाळतो ती वेस्टर्न स्टाईलची साडी. आता तशी मला नेसता येते. लतिकाने शिकवली होती. आईच्या भाषेत झाकायचं ते सगळं उघडं टाकून नेसायची ती साडी. सागरदादाच्या रिसेप्शनला मी वाईन कलरची साडी घेतली होती त्याचा ब्लाऊज इतका मस्त शिवला तरी आई “यामध्ये ब्रेसियर कशी घालायची?” टाईप मूलभूत प्रश्न विचारून मला सतावत होती. लारा दत्ता कींवा प्रियांका चोप्रा फार मस्त कॅरी करतात अशा डीझायनर साड्या.
“मराठी स्टाईल अलग रहता है. धोती के जैसे पहनना पडता है. फिरसे संभलनेमे बहुत प्रॉब्लेम. वो चाची ४२० मे कमल हासन देख कैसे पहनता है...”
बराच वेळ डिस्कशनावर डिस्कशन झाल्यानंतर अखेर रसिकाने (ती मध्येच आम्हाला जॉइन झाली होती) मार्ग सुचवला. तिची आईच्या मावशीच्या नणंदेची सून नऊवारी शिवून देते म्हणे- नात्यांचा इतका मोठा पिरॅमिड समजेप्र्यंत माझी इजिप्शियन ममी व्हायची. ते मरो. हे प्रकरण चांगलं होतं. आपण साडी फक्त पॅंटसारखी घालायची आणि पदर पिनप करायचा. हे फारच भारी आणि सिंपल काम झालं. लगेच रसिकाने त्या आ. मा. न. सूनेला फोन लावला आणि माझी मापं वगैरे सर्व काही मेसेजवर देऊन (त्यासाठी आम्ही दोघी वॉशरूमात मेजरिंग टेप घेऊन!!! ऎडमिनकडून टेप घेतल्याने हरिनी पण आमच्यांत सामिल) साडी फायनल केली.

अर्थात, मी ती साडी कम पॅंट ऑफिसच्या ट्रॅडिशनल डेला घातलीच नाही. मला हवा होता तसा जोधा लूकच केला होता. ती नऊवारी फक्त आणि फक्त आफताबसाठी... तो ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी सॉरी रात्री!! अति डिटेल्स द्यायची काही गरज नाही!! 


No comments:

Post a Comment