Thursday 5 September 2019

रूम नं फिफ्टी फोर


“वेदिका!” कॅफ़ेत शिरल्याक्षणी पल्लवीच्या तोंडून हाक गेली.
“पल्लो डार्लिंग!” वेदिकानं उठून तिला मिठी मारली. अर्ध्याहून अधिक कॅफे दोन मैत्रीणींच्या या भरतभेटीकडे वळून बघायला लागला.
“एक मिनिट हां!” पल्लवीनं स्मार्टफोनवर बोलायला सुरूवात केली. “यप्प. पोचलेय मी. ऑफ कोर्स. सेल्फी टाकेनच. येस्स. तिचा एकटीचाही टाकू का?... दॅट्स स्टुपिड. ऐक ना… तुला तिच्याशी बोलायचंय? का? यु आर जस्ट क्युट!! चालेल. मी सांगेन. बाय!” तिनं स्क्रीनवर बोट फिरवून कॉल कट केला.
“अक्षत?” वेदिकानं विचारलं. पल्लवीनं केवळ मान डोलावली. हो किंवा नाही अशा अर्थाची. “कित्ती वर्षांनी भेटतोय.. लास्ट मला वाटतं माझ्या लग्नांतच भेटलो होतो ना”
“भेटलो काय? पल्लो, तेव्हा आपण फक्त एकमेकींना दिसलो होतो. फोटो काढण्यापुरत्या बाजूला उभ्या राहिलो.. दोन शब्दही बोललो नाही. तू त्या विधींमध्ये बिझी आणि तुझी सासू सारखी फुरफुरत.. उशीर होतोय उशीर होतोय. तिला कुठलं विमान पकडायचं होतं गं?”
“पण ती लग्नाला तयार झाली यातच बाकीचे सारे इतके खुश होते की तिचे सगळे नखरे लोकांनी चालवून घेतले अर्थात अक्षतखेरीज सर्वांनी!!!”
“तो तर स्टेजवरच कसला भडकलेला. मी त्याला इतका संतापलेला कधीच पाहिलं नव्हतं.”
“तूच काय मीपण नाही” दोघी मैत्रीणी त्या आठवणीने बेजार हसल्या. कॉफीची ऑर्डर दिल्यावर वेदिकानं पर्समधली निमंत्रणपत्रिका काढून टेबलावर ठेवली. “धाकट्या नणंदबाईंचं लग्न आहे. तुला यायलाच हवं.”
“ही फॉर्मॆलिटी कशाला? इथं चेन्नईमध्येच लग्न आहे म्हणजे मी येईनच. पण काय गं, तुझ्या इतक्या जुनाट घराण्यात तमिळ मुलगा कसा काय चालला?”
“विचारू नकोस. पल्लो, आयुष्यात पहिल्यांदा मोठी सून असल्याचा हक्क बजावलाय. घरात इतर कुणालाही न सांगता तिनं मलाच सांगितलं. मुलगा छान आहे गं. काय बोलतो ते मला अजिबात कळत नाही पण चांगला आहे. घरी समजलं तेव्हा हे तुफान आलं. सर्वांचं बोलून झाल्यावर म्हटलं, तिचं जिथं प्रेम आहे तिथंच लग्न करू देत. निदान एक तरी लव्हस्टोरी कंप्लीट होऊ देत.” तितक्यात वेटर ऑर्डर घेण्यासाठी भुंग्यासारखा तडमडायला लागला. “पल्लो, त्याला थंड काहीतरी द्यायला सांग. आईस्ड टी असेल तर बेस्ट”
“स्नॅक्समध्ये काही?”
“नको! मी जरा वजन कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतेय”
“प्रयत्न चांगलाच जोशात सुरू दिसतोय...” वेदिकाच्या लग्नाला दहा वर्षं होऊन गेली होती. मोठी चौथीला आणि धाकटा दुसरीला असा सुटसुटीत संसार. सासर तालुक्याच्या गावचं. सासरे आणि मोठे दीर पंचायत समितीच्या राजकारणात. नवर्‍याचं भलंमोठं दुकान होतं. प्रचंड पैसा आणि शेती. गावामध्ये मुंबईचा आर्किटेक्ट आणून झक्कास बंगला बांधलेला. वेदिका मुळात दिसायला सुंदर. गोरीपान आणि एखाद्या शिल्पकारानं घडवावी तशी आखीवरेखीव. आता जरी वजनाचं कारण देत असली तरी ती स्थूल अजिबात नव्हती. उलट लग्न मानवलेल्या गृहिणीचा शांतपणा आणि समृद्धपणा तिच्या नजरेत जाणवत होता. गावी असतानाही गळ्यात आणि हातात किमान वीसेक तोळ्याचा ऐवज असाही कायम असणार. आता तर लग्नकार्याला आलेली म्हणून डिझायनर डबल-पदराच्या साडीसकट किमान चार-पाच लाख रूपये अंगावर बाळगून. लांब केसांची वेणी आणि त्यावर आज सकाळी नवर्‍याने हौसेने घेऊन दिलेली मल्लिगेचा गजरा. तिच्यासमोर बसलेली पल्लवी मात्र टोटल विरूद्ध. जीन्स आणि साधासा टॉप. कुरळ्या केसांचा आडवातिडवा कसाही बांधलेला बन. त्यावर चढवून ठेवलेला गॉगल. एकाच वयाच्या असूनही दोघीही इतक्या वेगळ्या दिसत होत्या की, या एकेकाळी हॉस्टेलमधल्या रूममेट्स असतील हे सांगूनही कुणाला पटलं नसतं.
 “गंमत बघ, रूम नं फ़िफ़्टीफ़ोरची आताची अवस्था” वेदिकानं तिच्या मोबाईलमधली गॅलरी उघडून फोटो दाखवले. “मी मागच्या महिन्यांत गेले होते तेव्हा काढलेत”
“हायला, आपण काय क्लीन रूम ठेवायचो!” पल्लवी उद्गारली. “हे मला फॉरवर्ड कर ना.”
घरादाराची, एकमेकींच्या आईवडलांची चौकशी करून झाली आणि दोघींच्या गप्पांना चांगलाच रंग चढला. कॉलेजमधला हा काय करतो, हॉस्टेलमधली ती कुठे आहे वगैरे बरीच माहितीची देवाणघेवाण करून झाली. फक्त एका नावाचा उल्लेख अजिबात न करता दोघींनी शिताफीनं आपलं बोलणं चालू ठेवलं होतं.
मात्र गप्पा मारत असतानाच, वेदिकानं पाठवलेले फोटो पल्लवीनं त्याच तिसर्‍या रूममेटला लगोलग फॉरवर्ड केले. ===================================================================
कॉलेजमध्ये ऍडमिशन फायनल झाल्यापासून पल्लवी हे नाव ऐकत होती. पश्मीना.
“पल्लवी? नवीन रूममेट?” लॅपटॉपवरची मान वर करून किंचित वैतागत तिनं विचारलं. “परत?”
“होय. आताच वॉर्डन मॅडम सांगून गेल्यात.” वेदिका  दारात उभ्या असलेल्या पल्लवीजवळ जात म्हणाली. “आत ये ना, तुझं सामान त्या तिकडल्या कपाटात ठेव. हा कोपर्‍यातला बेड तुझा आणि हा कप्पा...” वेदिका तिला रूममध्ये सेटल करत असतानाही पल्लवीला पश्मीनाची नाराज नजर आपल्यावर रोखल्याचं साफ दिसत होतं. वॉर्डननं तिला रूम नं फ़िफ़्टीफ़ोरमध्ये चल म्हटल्यावर तिथं मेसमध्ये बसलेल्या दोन मुलींनी आश्चर्यानं वळून पाहिलं होतं.  हॉस्टेलमधल्या त्या टीचभर खोलीमध्ये पुढची चार वर्षं काढायची, आणि पहिल्यांदाच आईबाबांना सोडून इतक्या लांब राहिल्यानं एकाकी पडल्याची जाणीव.  एकतर ऍडमिशन कन्फ़र्म व्हायला महिना गेला होता, तितके लेक्चर्स चुकले होते. भरीसभर म्हणून परत नवीन रूममेटनं केलेलं असं थंडं स्वागत. सुदैवानं पल्लवी आणि पश्मिना दोघी इलेक्ट्रॉनिक्सला होत्या, आणि ती कंप्युटर्सला. त्यामुळे केवळ रूमवरच दोघींचा काय तो संबंध आला असता. 
आठवड्याभरातच तिच्या लक्षात आलं की, कॉलेज हॉस्टेलमध्ये रॅगिंगविरूध अनेक नियम आहेत.  तरीही त्या नियमांच्या पलिकडे जाऊन पश्मिना तिला त्रास देत होती. चार्जिंगला लावलेल्या  मोबाईलची पिन काढून ठेवणं, तिनं लिहिलेल्या नोट्स कचरा समजून फेकणं, तिनं तासभर बसून इस्त्री केलेल्या कपड्यांवर चुकून चिखलाचा पाय ठेवणं वगैरे वगैरे. अखेर तिनं एके रविवारी पश्मीना लायब्ररीमध्ये गेल्याची संधी साधून वेदिकाला विचारलंच.  “तिचा काय प्रॉब्लेम आहे?”
“काय झालं?” वेदिकानं भाबडेपणानं विचारलं. खरंतर त्याच रूममध्ये वेदिकापण असल्यामुळे तिला यातल्या अनेक गोष्टी माहित होत्याच. “मी तिला समजावते. तशी मनानं फार चांगली आहे गं” इतकंच बोलून तिनंही विषय संपवला.
पण विषय कधी संपलाच नाही. वेदिका आणि पश्मीना दोघी चांगल्या मैत्रीणी होत्या. मूळच्या एकाच गावामधल्या त्यामुळे दोघी घनिष्ट मैत्रिणी, पल्लवी मात्र वेगळी पडल्यासारखी. त्यात वर्गामध्ये लेट ऍडमिशन झाल्यामुळे तिथंही ऑलरेडी ग्रूप बनले होते. सतत घरची आठवण यायची. अभ्यासात लक्ष लागणं शक्यच नव्हतं. वर्गात, हॉस्टेलमध्ये सगळीकडे एकटीच पडली होती. एकदा लंच ब्रेकमध्ये सहज बाजूला बसलेल्या सावीला काहीतरी सांगताना तिच्या तोंडून पश्मिनाचं नाव निघून गेलं.
“तू पश्मिनाच्या खोलीत राहतेस?”
“नाही, मी रूम नं फिफ्टीफोरमध्ये राहते आणि पश्मीना माझी रूममेट आहे.”
“व्हेरी क्लेवर जोक. पण ती पोरगी एक नंबरची गुंड आहे. कुणालाही रूममध्ये राहू देत नाही. तिची ती पिद्दी फ्रेंड आहे ना, ती पण तिला सामिल असते. मी सुरूवातीला दोनच दिवस तिथं होते, तेव्हा तर आपले क्लासेस चालू पण नव्हते झाले पण हिनं मला इतकं सतावलं की मी रूम चेंज करून घेतली.”
“मला तोही ऑप्शन नाही. हॉस्टेलमध्ये कुठेच जागा खाली नाही. शिवाय, आईबाबा कॉलेजचं हॉस्टेल सोडून अजून कुठं पीजी म्हणून राहायला परमिशन देणार नाहीत.”
“पण वॉर्डनला सांगून ठेव, आणि कुठं जरी कुणी मुलगी सोडून गेली की लगेच क्लेम लाव.” सावी तिला समजावत म्हणाली.


कॉफी झाल्यावर वेटरला दोन क्लब सॅंडविचची ऑर्डर दिल्यावर पल्लवी म्हणाली. “डाएट वगैरे मेरे बसकी बात नहीं. खूप वेळ काही खाल्लं नाही की अक्षत माझ्यावर भडकतो.”
“कुठला वड पूजला होतास गं असला काळजीवाहू नवरा मिळायला?”
“कमॉन यार! पित्त होईल म्हणून त्याला काळजी. वड कशाला पूजायला हवाय? त्यानं स्वत:हून तर मला विचारलं होतं. विसरलीस का?”
“पण काळजी करण्यासारखं इतर काही खास कारण नाही ना?” वेदिकानं विचारलंच. पल्लवीनं नुसती मान हलवली. तिचा उतरलेला चेहरा वेदिकाच्या लक्षात आला.
“पल्लो, प्लानिंग करताय की...”
“ट्राय करतोय, पण कन्सिव्ह होत नाहीय. डॉक्टर म्हणतात, की सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तसा काहीच प्रॉब्लेम व्हायला नको. पण...” बोलताना तिचा आवाज एकदम हळू झाला. “अक्षतला मी आयव्हीएफ करू या म्हणून मागे लागले तर नको म्हणतो. डॉक्टर म्हणतात की ट्राय करत रहा.”
“अक्षतला काही सांगायला नकोच. जर सर्व नॉर्मल असेल तर होईलच.”
“हं.”
“मी सांगते ना, होईल. या वर्षभरामध्ये नक्की. माझा आशीर्वाद आहे असं समज.” पल्लवी किंचित हसली. “पल्लो, यार. माझ्यासारख्या मुलीला दोन पोरं झालीत. काही प्रयत्न न करता. तृष्णा तर लग्नानंतर दोन महिन्यांतच कन्सिव्ह झाली होती.”
“व्हॉट डू यु मीन बाय माझ्यासारख्या?” समोरच्या कपामधली कॉफी ढवळत तिनं विचारलं.
“सांगायला हवं का आता?” क्षणभर पल्लवीनं वेदिकाकडं नजर उंचावून पाहिलं. वेदिकाच्या नजरेमधली शांतता आता किंचित निवळली होती. तिनं आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी घेतलेला मुखवटा एखाद निमिषासाठी का होईना पण उतरवला होता. पल्लवीसाठी.
“वेदिका, सॉरी यार. पटकन लक्षातच आलं नाही...”
“तुझ्याच काय हल्ली कित्येकदा माझ्याही येत नाही. आई झाल्यानंतर तर अजिबात नाही. नवर्‍याला त्यानं काही फरक पडतही नाही म्हणा. ज्या एका व्यक्तीला फरक पडायला हवा होता, ती आता फार दूर निघून गेली. त्यामुळे तुझ्याखेरीज हे आता कुणालाही माहित नाही...”
पल्लवीनं समोर बसलेल्या वेदिकाचा हात हातात घेतला. “कसं सहन केलंस?”
“आपण फक्त एक शरीर आहोत आणि या शरीराला कसल्याही इच्छा नाहीत असं सतत स्वत:ला समजावत राहून”
“फार त्रास झाला असेल ना?”
“त्रास म्हणजे फिजिकली म्हणालीस तर फारसा कधीच नाही. नवरा तसा फार समजूतदार आहे गं. जोरजबरदस्ती कधी करत नाही. पण कधीकधी बोलून दाखवतो, की मी प्रतिसाद देत नाही. पुढाकार घेत नाही. नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा मी तसा प्रयत्नही केला, पण गरोदर राहिले आणि मग तेही राहूनच गेलं. आणि आपल्या बाबतीत एक बरं असतं गं, आपल्याला गुरूत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन काही काम करायचं नसतं.” तिच्या या वाक्यावर पल्लवी एकदम हसली. तरी तिच्या मनामधला प्रश्न काही गेला नाही.
“आणि मानसिकरीत्या?”
“मनात काय त्रास होतो, तो कुणालाच दिसत नाही ते एका अर्थानं बरंच आहे गं. कुणाला काय सांगणार होते. सांगूनही कुणाला काय समजलं असतं. सगळेच काय माझ्या रूममेटसारखे- पल्लोसारखे समजूतदार नसतात. मला अजूनही कित्येकदा आठवलं की आश्चर्य वाटतं, तू किती सहजगत्या समजून घेतलंस. तुला सगळंच माहिती होतं तरी कधी चुकूनही तू राग केला नाहीस.”
“यात राग करण्यासारखं काय आहे?”
“ते या आपल्या सो कॉल्ड भारतीय समाजाला सांगून बघ. पाश्चात्य संस्कृतीची विकृती, समाजाला कलंक आहेत. मानसिक रोगी आहेत इत्यादि इत्यादि”
“बुलशिट. कधीकधी असल्या गोष्टी वाचल्या ऐकल्या तरी इतका राग येतो.. परवा पश्मीनाच्या ब्लॉगवर एका बाईंनी लिहिलं होतं..” बोलता बोलता अचानक तिचं नाव घेतलं हे जाणून ती गप्प झाली.
वेदिका समजूतदारपणे हसली. “मी ही वाचते. तो ब्लॉग हाच माझा तिच्यासोबत एकमेव संपर्क उरलाय”

सेमिस्टर संपलं आणि सुट्टीसाठी घरी जाऊन पल्लवी तितकीच रीचार्ज होऊन आली. पश्मीना अजूनही तिच्या अलूफ मूडमध्येच होती. तिचं हॉस्टेलमध्येच काय कॉलेजमध्येही कुणाशी फार पटायचं नाही. एक वेदिका सोडल्यास इतर कुणाही ती जास्त बोलायची पण नाही. वेदिकाशी पण रूममध्ये असतानाच. बाहेर कॅंपसमध्ये किंवा मेसमध्ये कधीच नाही. जणू कॉलेजमध्ये ती असून नसल्यासारखी. पण पश्मीना तिच्या स्ट्रीममध्येच नाही तर कॉलेजमधल्या प्रत्येकाला माहित होती... कारण, एक तर प्रत्येक सेमीस्टरला टॉपर! तिच्या असाईनमेंट्स अख्ख्या वर्गामध्ये कॉपी करायला फिरायच्या. कॉलेजमधल्या काही प्रोफेसरांच्या मते, पश्मीनाचा आयक्यु बॉर्डरलाईन जीनीयस होता. तिला मुंबईपुण्यामधल्या मोठ्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये मिळालेली ऍडमिशन कॅन्सल करून ती असल्या आडवाटेवरच्या शिक्षण संस्थेने काढलेल्या गल्लाभरू इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये का आली कुणास ठाऊक.. मोजकंच एक दोन वाक्यं बोलणं ही तिची अजून एक पहचान. वेदिका सोडल्यास कुणीही तिला गप्पा मारताना ऐकलं नसावं. पश्मीना फक्त हुशार नव्हती, दिसायलाही प्रचंड सुंदर होती. रहाणंही तिचं कायम टिपटाप. काळे काजळवाले डोळे, कुरळ्या केसांचा अस्ताव्यस्त ब्लंट कट तिच्या गोल चेहर्‍याला फार शोभून दिसायचा. तिची गव्हाळी स्किन तेजस्वी आणि एकसलग होती. पश्मीना क्वचित हसायची, पण जेव्हा हसली की तिच्या उजव्या गालाला खळी पडायची. सीनीअर्सनी केव्हाच तिला कॉलेजची प्रीटी झिंटा ठरवून टाकलं होतं.  पण कॉलेजमधल्या कुठल्याही मुलाला पश्मिनाने कधीही प्रतिसाद दिला नाही. सिव्हिलचा हीरो राज तर तिच्यामागे अलमोस्ट पागल होऊन फिरत होता, पण पश्मीना कायम आपल्या विश्वात मश्गुल….
त्याच कॉलेजचा अजून एक हीरो मात्र गर्ल्स हॉस्टेलच्या रूम नं फ़िफ़्टीफ़ोर सोबत नातं जोडण्यात यशस्वी झाला होता. मोबाईलवर घरी हवा तेव्हा फोन करून बोलता यावं म्हणून पल्लवीच्या बाबांनी अनलिमेटेड कॉल्स आणि टेक्स्टचा प्लान घेऊन दिला होता. त्या प्लानचा नक्की फायदा काय होता ते तिला आता उमगलं होतं.
“अक्षत?” वेदिकानं एके रविवारी तिला विचारलंच. “एमबीएच्या सेकंड सेमला आहे तो?”  पल्लवीनं काहीही उत्तर दिलं नाही, तरी वेदिका समजून गेली. ही तिची खासियत. समोरच्यानं काहीही सांगण्याआधीच त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहून वेदिका काय ते समजून जायची.
“त्याचं काय?” मोबाईलमध्ये गेम खेळत असलेल्या पश्मीनानं विचारलं.
“पल्लोताईंना सतत फोन किंवा मेसेज करत असतो.”
पश्मीनानं “अस्सं का?” टाईप लूक देऊन पल्लवीकडे पाहिलं. एरवीही कधी तिच्याशी फारसं बोलणं नसल्यानं पल्लवीनं केवळ एक हसू तिच्याकडे फेकलं.
“यु आर डेटिंग हिम? सीरीयसली?” वेदिकानं विचारलं. “मी परवा तुम्ही दोघांना कॅंटीनमध्ये पण पाहिलं होतं. यार कुछ डीटेल्स तो शेअर कर. अक्षत अख्ख्या कॉलेजमधला सगळ्यात फेमस हीरो आहे. टॉल डार्क आणि एकदम इंटेन्स लूकवाला. आणि तू अशी फटकळ अजागळ! तुमचं जमलं तरी कसं?”
“मी अजागळ होय गं. आणि जमलं म्हणजे त्यानं मागे एकदा मला सहज कॉफी घेऊया का म्हणून विचारलं आणि मग ओळख झाली.”
“शॉर्ट फ़िल्म नको. एकता कपूरची अखंड सीरीयल सांग.” वेदिका ओरडली. “ड्डीट्टेल्ल्स”
“आणि त्याचा पत्ताही घेऊन ठेव. बेस्ट ऑफ लकचं कार्ड पाठवून देऊ” पश्मीना म्हणाली.
यानिमित्ताने का होईना, पण ही  लव्हस्टोरी वेदिका आणि पल्लवीच्या मैत्रीचा मार्ग बनली होती. पश्मीनाला त्यामध्येही काही इंटरेस्ट नव्हता, पण तरीही हळूहळू ती अधेमध्ये या दोघींच्या गप्पांमध्ये भाग घेत होती. किमान काहीतरी टोमणे मारण्यासाठी तरी…

“तुझा तिच्याशी काहीच कॉंटॅक्ट का नाही?”  वेटरनं टेबलवर दोन क्लब सॅंडविचेस आणून ठेवली. तो निघून गेल्यावर पल्लवी हळू आवाजात म्हणाली.
“मी मागे तिला रीक्वेस्ट टाकायचा विचार केला होता… पण नंतर म्हटलं तिला आवडेल ना आवडेल.”
“रीक्वेस्ट टाक. ती एक्सेप्ट करेल” तिनं शांतपणे उत्तर दिलं.
“तुला कसं माहित?”
“मी तिच्याशी चिकारवेळा बोललेय. मागे एकदा ती हैद्राबादला कसल्यातरी कॉन्फ़रन्सला आली होती तेव्हा मुद्दाम भेटलेपण होते.”
“एकटीच आली होती?”
“नाही. तिचा मुलगाही सोबत होता. वेद नाव आहे”
वेदिकानं हातामधला कॉफीचा कप खाली ठेवला. “शी डिड इट. स्वत:च्या हिमतीवर एकटीनं. वेळ आली तर आईवडलांशी भांडून, समाजाशी झगडून तिनं तिला हवं ते मिळवलं. लाईफ पार्टनर, मुलं, करीअर, सगळं काही स्वत:च्या हिमतीवर”
“तुलाही करता आलं असतं..”
“हिंमत नव्हती.”
“खरं सांगू? हिमतीपेक्षाही तुला विश्वास नव्हता. तिच्यावर. तुमच्या दोघींवर आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वत:वर. वेदिका, तुझ्यावर समाजाचं कंडिशनिंग इतकं झालेलं आहे की तुला आजही वाटतं की… यात तुझीच चूक आहे”
वेदिकानं समोर आलेल्या सॅंडविचवर किंचित सॉस घातला आणि मग मान वर करून ती म्हणाली, “वेल, आता इतक्या वर्षांच्या संसारानंतर काय बरोबर आणि काय चूक हे कळून उपयोग काय?”
त्यादिवशी रविवार होता. गेले दोन दिवस बरसत असलेल्या पाऊस किंचित थांबला होता. आज दिवसभर अक्षतसोबत फिरायचं म्हणून पल्लवी सकाळीच रूमबाहेर पडली. त्याची बाईक घेऊन लोणावळ्यापर्यंत जायचा दोघांचा प्लान होता. हॉस्टेलच्या बाहेरच एका कारने चिखलाचं पाणी सप्प्पक्ककरून उडवून तिच्या नवीन टॉपचा सत्यानाश केला. ती परत मागे रूमवर आली.
रूमचं दार पुढे लोटलेलंच होतं, तिनं फक्त ढकललं. आतलं दृष्य पाहून ती अलमोस्ट किंचाळली. अलमोस्ट!! दोन्ही हात तोंडावर घेऊन तिनं आश्चर्याचा बसलेला धक्का ओसरू दिला. ती रूममध्ये आल्याक्षणी वेदिकाचं तिच्याकडे लक्ष गेलं.
“पल्लो! यार... तू परत कशी काय आलीस?” तिच्या आवाजाबरोबर पश्मीनानं मान वर करून पाहिलं. पल्लवीच्या तोंडून शब्द येईना. वेदिकानं बाजूला पडलेलं बेडशीट ओढून दोघींच्या अंगावर घेतलं.
“कुणाला काही बोलू नकोस” वेदिकाचा कुजबुजता आवाज आला. “प्लीज!”
पल्लवीनं दार बंद करून घेतलं.  दोन पावलं पुढं येऊन ती तिच्या बेडवर बसली. कितीतरीवेळ रूममध्ये असह्य शांतता पसरून राहिली.
“तुझ्या टॉपला काय झालं?” अखेर वेदिकानं विचारलं. “ऎक्सिडेंट वगैरे?”
“चिखल!” पल्लवी हलक्या आवाजात म्हणाली. “तो बदलायला म्हणून मी परत आलेय... ओह गॉड. वेदिका.... तुम्ही दोघी.. आणि....” पल्लवी तिरीमिरीत उठली, कपाटामधला अस्मानी रंगाचा टीशर्ट घेऊन ती रूमबाहेर निघाली. “मी बाथरूममध्ये चेंज करून येते. माझ्यावर दया करा आणि तोवर तुम्ही दोघींनीपण लज्जारक्षणार्थ काही कपडे घाला.”
“खबरदार, रूमच्या बाहेर गेलीस तर…  आधी कबूल कर की, कुणालाही काहीही बोलायचं नाही...” पश्मीना उठत म्हणाली.
“मी चेंज करून येते. मगच बोलू” तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता रूमबाहेर पडली.
बाथरूमच्या पॅसेजमध्ये दोन मिनिटं थांबून तिनं स्वत:चं धडधडतं अंत:करण जरा शांत केलं. बाथरूममधून शर्ट चेंज करून येताना तिनं अक्षतला मेसेज केला. “मला अजून थोडावेळ लागेल.” त्यानं रागीट चेहरे आणि किसवाल्या स्मायली उत्तरादाखल पाठवून दिल्या. पल्लवी रूममध्ये आली तेव्हा वेदिका बेडवर गुडघ्यात मान खुपसून बसली होती आणि पश्मीना खिडकीजवळ ठेवलेल्या इलेक्ट्रीक केटलमध्ये पाणी गरम करत होती. “चहा बनवत असलीस तर माझ्यासाठी पण...”
पश्मीना रागानं उलटून तिच्याकडं बघत म्हणाली. “तू वॉर्डनला काही बोललीस तर....”
“मला सांगाबोलायचं असतं तर मी याआधीच केलं असतं... पश्मीना!!”
“म्हणजे तुला आधीपासून माहित होतं?” वेदिकानं मान वर करत विचारलं.
“अर्थात, पण नक्की माहित नव्हतं. पश्मीनानं मला इतका त्रास दिला होता की, हळूहळू मला समजलं होतं की मी तिला या खोलीमध्ये नकोय. त्याचं कारण काय असेल हे समजून घ्यायला जीनीयस असायची गरज नाही! पण इतके दिवस फक्त संशय होता, आज तर आय विटनेस झाले.” पल्लवी अतिशय शांतपणे म्हणाली.
“तू  खरंच कंप्लेंट करणार नाहीस?” वेदिकानं परत विचारलं.
“इज दिस कन्सेन्स्युअल?” तिनं विचारलं.
“ऑफ कोर्स इट इज” तिच्याऐवजी पश्मीना कपामध्ये टीबॅग्ज टाकत म्हणाली. “आम्ही अकरावीपासून एकमेकींना ओळखतो. एकाच वर्गामध्ये आणि ट्युशनला होतो. तेव्हापासून....”
“सो” पल्लवी एक एक शब्द शांतपणे म्हणाली. “हे एक्स्परिमेंटेशन किंवा टाईमपास नाही? यु आर..”
“आमचं एकमेकींवर प्रेम आहे” पश्मीनानं केटलमधलं पाणी कपामध्ये ओतलं.
“ओके! ओके!” दोन्ही हात पल्लवी म्हणाली. “गॉट इट.”
“प्लीज पल्लो. कुणाला काही बोलू नकोस. हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये कुणालाही...” वेदिकाची पिन अजून तिथंच अडकलेली होती.
“वेदिका, लेट्स बी क्लीअर!! मी याबद्दल कुणालाही काही सांगणार नाहिय. काय सांगू? तुम्ही दोघी एकमेकांसोबत काय करता याच्याशी मला देणंघेणं नाही.  पश्मीना, याच कारणासाठी तू रूममध्ये इतर कुणाला राहू देत नाहीस का?”
चहाचा कप तिच्या हातात देत पश्मीना “यप्प” एवढंच म्हणाली.
“ओके. मी आधी म्हटलं तसं, मला यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या दोघींचं लाईफ, तुमच्या दोघींचा डीसीजन. माझं काही म्हणणं नाही. लेट्स नॉट मेक अ बिग डील आऊट ऑफ इट.”
==================================================================
“तू महान आहेस!” वेदिकानं बाजूला ठेवलेल्या पेपर नॅपकिननं तोंड पुसलं.
“महान वगैरे काही नाही. लहानपणापासून अमेरिकन शोज बघत असल्याचा परिणाम.” पल्लवीनं डोळे मिचकावले.
“तरीही, माझा स्वत:वर विश्वास बसत नव्हता की, कुणी इतक्या इझीली आमचं नातं स्विकारू शकतं. काश, तुझ्यासारखंच इतर समाजानंही आमचं नातं स्विकारलं असतं”
“इतरांनी आपलं नातं स्विकारावं म्हणून सतत मान तुकवण्यापेक्षा आपली ओळख स्वत:शी मान्य करणं अधिक गरजेचं. असं मी नाही पश्मीनामॅडम आपल्या भाषणात म्हणतात.”  
वेदिकानं काही न बोलता हातामधल्या मोबाईलची स्क्रीन उगाच अनलॉक केली आणि परत लॉक केली.
“वेद, तू आणि मी. आपल्या दोघांकडे फक्त एक चान्स होता. सच्च्या प्रेमाचा. तू गमावलास. पण तुझ्याच त्या हरलेल्या प्रेमानं मला माझं प्रेम मिळवून दिलं.” पल्लवी तिच्याकडे रोखटक बघत म्हणाली.
“काय गमावलं? आय स्टिल लव्ह हर. शेवटपर्यंत करेन. ती दूर निघून गेली तरीही… प्रेम करतच राहीन. पण मला तिच्याशी एकदा बोलायचंय, फक्त तिचा आवाज ऐकायचाय. पण भिती वाटते.”
“कशाची? समाजाची? नवर्‍याची?”
“स्वत:ची. पल्लो, तुला किंवा तिला वाटतं की मी सोप्पा मार्ग निवडला. समाजासोबत, घरच्यांसोबत कसलाही संघर्ष न करण्याचा सोप्पा मार्ग. पण या सर्वांमध्ये माझा बळी गेलाय हे कुणीच लक्षात घेत नाही ना. या सर्वांची किंमत मी चुकवली. अशी पत्नी जी नवर्‍यासोबत कधीच मनापासून रमू शकत नाही… यामध्ये त्याची तर काहीच चूक नाही. पण आयुष्यामधला सर्वात निखळ आनंद मी आजवर त्याला कधी देऊ शकले नाही. तिच्यासोबत केली तितकीच मोठी प्रतारणा मी त्याच्यासोबतही केली आहे. तिचा राग संताप सर्व काही मी समजू शकते. पण तिच्याइतकं बिनधास्त होऊन मी स्वत:शी प्रामाणिक राहू शकले नाही. हे ही तितकंच खरं!!”

नवीन सेमीस्टर चालू झालं होतं आणि सुट्टी संपवून नुकतीच मुलं हॉस्टेलवर परत येत होती. वेदिकाची ट्रेन पाच वाजता येणार होती. पण पल्लवी आणि पश्मीना आदल्या संध्याकाळी आल्या होत्या. कालपासून पश्मीनाचा मूड फार विचित्र होता. आल्यापासून ती एकही शब्द न बोलता वावरत होती. पल्लवी लेक्चर संपवून अक्षतला भेटून मग रूमवर आली तेव्हा तिन्हीसांज होत आली होती. तिनं दारातूनच पाहिलं तर अख्खी रूम अस्ताव्यस्त पसरलेली होती. वेदिकाचे कपडे कपाटामधून काढून फ़ेकलेले होते. ड्रेसरवरच्या तिघींच्या कॉस्मेटिकच्या बाटल्या खाली पडलेल्या होत्या.
पश्मीना एखाद्या हिंसक श्वापदासारखी बेडवर बसून वेदिकाकडे बघत होती. तिच्या डोळ्यांत अंगार फ़ुलला होता. वेदिका गुडघ्यात मान खाली घालून रडत बसली होती.
“काय झालं?” आत येत तिनं दरवाजा आतमधून लॉक करून घेतला. दोघींचं भांडण काही तिला तसंही फार नवीन राहिलं नव्हतं. पश्मीना चिडणार, वैतागणार आणि वेदिका तिची समजूत घालणार. हे नेहमीचंच.
“प्लीज पश्मीना शांत हो” वेदिका मुसमुसत म्हणाली. “कुणीतरी ऐकेल”
“हेच्च... हेच्च गेली चार-पाच वर्षं ऐकतेय. कुणीतरी ऐकेल. कुणीतरी बघेल. कुणालातरी समजेल. चोरून मारून हे नातं इतके दिवस चालवलंच ना. काय उपयोग झाला? कशासाठी इतके दिवस लपवून ठेवलं. सांग ना!” पश्मीनाचा आवाज बराच वेळ रडल्यासारखा घोगरा झाला होता. तिचे डोळे आता कोरडेठक्क असले तरी…
“काय झालं?” पल्लवीनं परत एकदा विचारलं.
“दाखव! दाखव ना!” पश्मीना फिसकारत जागेवरून उठून वेदिकासमोर आली. खासकन तिचा डावा हात ओढून तिनं पल्लवीसमोर धरला. “कॉंग्रॅच्युलेशन्स आर ईन ऑर्डर. दिस गर्ल गॉट एन्गेज्ड”
बोटातली सोन्याची अंगठी आणि फिकटलेली मेंदी. “यार” काही तरी म्हणायचं म्हणून ती म्हणाली. “सांगितलं पण नाहीस.”  पश्मीनानं वेदिकाचा हात झटकला आणि ती परत तिच्या बेडवर गेली.
“सॉरी, पश्मीना. मी तुला फोन खूप वेळा ट्राय केला. तुझ्या घरीपण फोन केला होता. तू ट्रेकिंगसाठी हिमालयात गेलेली. सगळं इतकं अचानक ठरलं की...”
“तीच तीच वाक्यं कितीवेळा बोलणार आहेस? सगळं अचानक ठरलं. चुलत बहिणीचं लग्न होतं. तिच्या होणार्‍या नवर्‍याच्या मामेभावानं तुला पाहिलं. मागणी घातली. लग्न ठरलं. साखरपुडा झाला.. लास्ट सेमीस्टर झालं की लग्न... सगळंच इतकं अचानक ठरलं की... मी तुला खूप वेळा फोन ट्राय केला.” पश्मीना ओरडली.
“शांत हो, पश्मीना.पश्मीनाच्या डोळ्यांतलं किंचित पाणी पाहून पल्लवी म्हणाली. “पल्लो, तिनं फक्त तिच्या आयुष्याचा विचार केला. माझा अजिबात नाही. दोघींनी मिळून इतकी स्वप्नं रंगवली होती. एकत्र कॉलेज. त्यानंतर एकत्र जॉब... एकत्र रहायचं.. मला पुण्याच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत होती. तितके मार्क्स होते पण फक्त हिला इथं ऍडमिशन मिळाली म्हणून मी हा प्रेफरन्स घेतला. कॅंपस इंटरव्युमध्येपण ती जिथं सिलेक्ट होईल तिथं मी जाणार आधीच ठरवलं होतं.. पण... ती माझा विचारपण करत नाहीये. ऍंड इट हर्ट्स. शांत हो म्हणायल काय... यु नो हाऊ मच इट हर्ट्स?”
“पश्मीना, लिसन टू मी. फक्त माझ्यासाठी ऐकून घे.” वेदिका मध्ये येत म्हणाली.”मी हे मुद्दाम केलेलं नाही. तुला आधीपासून माहीत आहे की माझे घरवाले किती जुन्या विचारांचे आहेत. त्यांना मी काय सांगणार? चांगलं स्थळ आलं तेव्हा मला आईनं विचारलं.... तिनं मला विचारलं... की कुणासोबत माझं अफेअर आहे का? आपल्या जातीमधला किंवा आपल्या घराण्याला साजेसा मुलगा असेल तर ते मानले असते. पण मी आपल्याबद्दल काय सांगणार  होते? मी काय करायला हवं होतं सांग ना”
“थांबायला हवं होतंस. थोडे दिवस. साखरपुडा किंवा लग्न ठरवण्याआधी तुझ्या आईवडलांकडे थोडे दिवस मागून घ्यायचे होतेस. वेदिका, मी मागेही तुला म्हटलं होतं. वर्षं- दोन वर्षं. शिक्षण संपल्यानंतर थोडे दिवस जॉब करू आणि मग ज्या देशामध्ये आपल्याला मान्यता असेल, जिथं आपले संबंध बेकायदेशीर नसतील अशा देशामध्ये तुला घेऊन जायची जबाबदारी माझी. आपण आयुष्यभर एकत्र राहू शकतो. असे चोरून लापवून पाप करत असल्यासारखे नाही. राजरोसपणे उघड माथ्याने. तुला हे मी सांगितलं होतं की नाही? बोल ना? मग का थोडे दिवस थांबू शकली नाहीस?”
“पश्मीना, घरचे मानले नसते यार. नोकरीसाठी मला परदेशी पाठवलं नसतं आणि जरी गेलो असतो तरीही मी आईवडलांना असं काही करून दुखवलं नसतं”
“असं काही? व्हॉट डू यु मीन बाय दिस?”
“मी घरच्यांना दुखावलं नसतं” वेदिका ठामपणे तेच वाक्य म्हणाली.
“मग माझ्यावर प्रेम का केलंस? माझा बळी देण्यासाठी?”
“डोंट बी सो ड्रामाटिक. बळी वगैरे काहीही देत नाहीये. या नात्याला भविष्य कधीच नव्हतं हे तुलाही माहित आहे. रोमॅंटिक कल्पनांमध्ये आयुष्य काढता येत नाहीत.”
“ओके. हे तुला माहिती होतं किंबहुना तुला खात्री होती. कम टू थिंक ऑफ इट, मी इतके दिवस जेव्हा बाहेर जायचं वगैरे बोलत होते तेव्हा तू कधीच पॉझिटीव्हली हो म्हणाली नाहीस. नुसती वेळ मारून नेलीस. ऍम आय दॅट फॉर यु? मी तुझ्यासाठी फक्त टाईमपास होते? समथिंग थ्रिलिंग? एक्सायटिंग? खेळायला आयतं मिळालेलं एक शरीर? बाईचं असलं तरीही याच शरीरानं तुला शेकड्याने ऑर्गॅझम्स दिलेत? का मी तुझं सेक्स टॉय होते? जितक्या आनंदानं तो या लग्नाला तयार झालीस ते पाहून मला तरी वाटतंय की तू बहुतेक…..” तिनं दोन्ही हात टेबलावर आपटले. “वेद, काहीही असलं तरी हे नातं तुझ्यासाठी फक्त फिजिकल लेव्हलवर होतं हो ना? त्याहून जास्त नाही.. मी मूर्ख गेली चार वर्षं तुझ्याशीच एकनिष्ठ राहिले. मनोमन तुला आपला लाईफ पार्टनर मानलं होतं...शिक्षण संपल्यावर मी माझ्या पॅरेन्ट्सना सांगणार होते. कदाचित त्यांनी मान्य केलं असतं किंवा घराबाहेर काढलं असतं. प्रत्येक परिणामाला सामोरं जाण्याची माझी तयारी होती. पण माझ्याइतकी तू कधीच गुंतली नाहीस.”
“ओह पश्मीना, प्लीज असले आरोप माझ्यावर तरी करू नकोस. तुला माहित आहे की, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. पण...”
“पण तरी तू माझ्याबद्दल घरी सांगणार नाहीस? माझ्यासोबत राहणार नाहीस?”
“हे शक्य नाहिये, कारण मी तुझ्याइतकी स्ट्रॉंग नाही. माझ्यात तितकी हिंमत नाही.”
“हा प्रश्न फक्त हिमतीचा नाही, खरं कारण आहे की, तुला माझी लाज वाटतेय”
“नाही, खरं कारण आहे की, मला माझीच लाज वाटतेय”
“एक्झाक्टली. आय ऍम ग्लॅड वी क्लीअर्ड इट आऊट” इतकं बोलून पश्मीना रूमबाहेर पडली.
“पल्लो, तिला समजाव प्लीज” वेदिका म्हणाली. “असं आपल्या समाजामध्ये घडू शकत नाही हे तिला कळतच नाहीये” पल्लवीनं काही न बोलता मघाशी पश्मीनासमोर धरलेला पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. “शांत हो. आज माझी वेदिका झालीये. एकच वाक्य परत परत सांगतेय”
“पल्लो, ती अशी अपेक्षा कशी ठेवू शकते? समाजामध्ये या संबंधांना मान्यता असणे फार दूरची गोष्ट. मुळात असं काही असू शकतं आणि ते नैसर्गिक प्रवृत्ती असू शकते हे जाणवणं हीच फार कठीण बाब. किंबहुना, स्त्रीला स्वत:चा सेक्स ड्राईव्ह असल्याचंच हा समाज कधी मान्य करत नाही. बाईला सेक्सची इच्छा होणं हेदेखील बदफैली असल्याचं लक्षण आहे. मुलीला जिथं स्वत:च्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा हक्क नाही, आपल्याला मुलं किती आणि कधी होऊ द्यावीत हेच जिथं बाई ठरवू शकत नाही, तिथं एका मुलीवर प्रेम करायचं जाहीर करणं हे कसल्या अनोख्या धाडसाचं काम असेल. ती जराही या गोष्टीचा विचार करत नाहीये. प्लीज तिला समजाव”
“तिला सांगून काय उपयोग? गोंधळलेली तर तू आहेस. मी तुला विचारते. वेदिका, तू तुझा नैसर्गिक कल सोडून केवळ समाजासाठी म्हणून वेगळ्या रूपामध्ये जगणार आहेस का? स्वत:शी सतत प्रत्येक सेकंदाला प्रतारणा करत? याचा कधी विचार केला आहेस का?”
वेदिका काही न बोलता मुसमुसत रडत राहिली. तिन्हीसांजेला चिडून रूमबाहेर पडलेली पश्मीना त्याच रात्री नंतर कधीही रूमवर परत आली नाही. रूम नं फिफ्टीफोरमध्ये ते सेमीस्टर संपेपर्यंत दोनच रूममेट्स राहिल्या.
“पल्लो, हे वेदिकाला देशील?” पश्मीनानं तिच्या हातामध्ये एक फोटो ठेवला. “अशीच आठवण म्हणून. तिला लग्नाचं गिफ़्ट म्हणून काय देऊ ते अजून सुचलेलं नाहीये. पण काहीतरी नक्की पाठवेन”
“पश्मीना!”
“संपली. आम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट सेमला होतो ना, तेव्हा कुठलेतरी प्रोफेसर चक्क क्लासमध्ये म्हणाले होते की, एक-एक बॅच बाहेर पडते तशा कित्येक लव्हस्टोरीज इथंच संपतात. हीपण लव्हस्टोरी तशीच संपली.”
“वेल, चीअर्स! अजून एक लव्हस्टोरीपण संपली”
“व्हॉट?” पश्मीनानं आश्चर्यानं विचारलं.
“मी आणि अक्षत. ब्रेकप.” पश्मीनानं एक भुवई किंचित उचलून तिच्याकडे पाहिलं. “त्याच्या घरी मान्य नाही. खरंतर मला न विचारताच त्यानं घरी आमच्याबद्दल सांगितलं. त्याला जॉब लागल्यावर ओळखीमधलं कुठलंतरी स्थळ आलं होतं वगैरे काहीतरी भानगड झाली. त्याच्या घरी सर्व समजलं. पण त्याची आई आमच्या लग्नाला तयार नाही, तिला काहीही करून त्याचं लग्न याच वर्षी करायचंय, जे मला शक्य नाही सो!!!”
“सो? ब्रेकप?”
“मग काय करणार आहोत? हिंदी पिक्चरसारखे पळून जाणार आहोत? तो जॉबमध्ये अजून नवीन आहे. अजून माझं कॉलेज संपायला तीन-चार महिने आहेत. त्यानंतर मला किमान थोडे दिवस जॉब करायचा आहे. लग्नाचा विचार मी इतक्यात केला नाहीय. पण... अक्षतची आई.”
“गोळी घाल तिला.” पश्मीना उसळून म्हणाली. साला, वेडी आहेस का तू? आई लग्नाला तयार नाही म्हणून ब्रेकप करताय… डू यु लव्ह हिम?”
“ऑफ कोर्स पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये”
“मग नको करूस!! पण त्यासाठी अक्षतला का सोडतेस? पल्लो, तो मुलगा खरच तुझ्यासाठी काहीही करेल. सध्या त्याला  फायनांशिअली थोडा स्टेबल होऊ देत, अख्खं आयुष्य समोर उभं आहे आणि तुम्ही गाढवपणा करताय.. सगळ्यांत आधी ते आईवडील आणि त्यांची परवानगी वगैरे डिडीएलजे टाईप चुतियापाला खरंच गोळी घाला यार. कंटाळा आला. कुणी कुणाबरोबर आयुष्य काढावं हा निर्णय फक्त त्या दोनच व्यक्तींचा असला पाहिजे….” बोलता बोलता तिचा आवाज एकदम भरून आला.
“आय ऍम सॉरी, पश्मीना, आय नो, तू सध्या विचित्र मन:स्थितीमध्ये आहेस”
“बरोबर शब्द वापरलास पल्लो, विचित्र. सगळंच विचित्र झालंय. गेली कित्येक वर्षं मी स्वत:ला समजावत राहिले की आय ऍम इन लव्ह. तुला गंमत माहितीये, मुंबईला एक संस्था आहे. आमच्यासारख्या मुलींची. जेव्हा मला एका मैत्रीणीने मेंबर व्हायला सुचवलं तेव्हा मी हसले. म्हटलं गरज काय? कशाला हव्यात असल्या संस्था? मी कुणावर प्रेम करावं, कुणाकडे आकर्षित व्हावं हा फक्त माझा माझ्यापुरता प्रश्न असू शकतो. पण तसं नाहिये ना. वेदिका इज राईट. हा समाज एका स्ट्रेट कपलकडे निर्मळ मनाकडे पाहू शकत नाही. सेक्स या गोष्टीकडे पाहू शकत नाही. त्याच्याकडून आम्ही नक्की काय अपेक्षा करत आहोत? कशाला जगतात आमच्यासारखी लोकं? आम्ही मरून जायला हवं”
“पश्मीना, चुकूनही असा विचार करू नकोस?” पल्लवी भांबावून म्हणाली. “प्लीज”
“आरआयपी सार्काझम! पल्लो, मी काय तुला नव्वदीच्या कथांमधली नायिका वाटले का? जीव-बीव द्यायला? वेदिकाला तिच्या नैसर्गिकतेपेक्षा समाज महत्त्वाचा वाटतो, गेस व्हॉट. मला माझी स्वत:ची ओळख या समाजापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यासाठी मी झगडणार आहे किमान यानंतर परत कधी एखादी वेदिका या समाजाच्या कंडिशनिंगला बळी पडणार नाही.”
“तिच्यासाठी हे सोपं नाहीये…”
“हाच विचार ती करू शकत नाहीये. पल्लो, दिस इज नॉट ओन्ली अबाऊट मी. तिला माझ्याशी ब्रेकप करायचंय. फाईन, पण ती स्वत:लाच नाकारतेय. स्वत:च्या इच्छेची तिला आता घाण वाटतेय. या सोशल स्टिग्मापुढे ही हरतेय. पुढचं अख्खं आयुष्य तिला असंच काढावं लागणर आहे. दॅट हर्ट्स मी मोअर! मी स्वत:शीच ठरवलंय. बास झालं हे लपून राहणं. इतके दिवस तिचं ऐकून मी इतरांपासून स्वत:ला लपवलं. आता नाही. मी काय आहे ते मला माहित आहे आणि मला माझ्या सेक्शुअल ओरिएंटेशनचा अभिमान आहे. मी आता लपून राहणार नाही. म्हणून मी हॉस्टेल सोडलं. पण रूम नं फिफ्टीफोरमधली यावर्षीच्या बॅचमधली हीच एकमेव लव्हस्टोरी संपेल. आय प्रॉमिस. तुझा फोन दे”
मध्येच आलेल्या या वाक्यानं पल्लवी गडबडली. “माझा फोन? कशाला?
“दे ना. किती प्रश्न विचारतेस” तिनं मुकाट फोन दिला. तिच्या फोनवरून पश्मीनानं अक्षतला टेक्क्स्ट मेसेज केला. “कॉल हर नाऊ- पश्मीना!”
“बोल त्याच्याशी. सांग त्याला. थोडे दिवस थांबलात तर सगळं मिळेल. हॅव सम पेशन्स.”

त्या कॅफेमधून चारेक तास चिक्कार गप्पा मारून निघताना वेदिकाच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. “पल्लो, अधून मधून का होईना भेटत राहू या गं. तुझ्याशिवाय माझी आयुष्यामध्ये कुणाशी मैत्री अशी झालीच नाही. आधी कित्येक वर्षं आपल्याला मुलींबद्दल हे कसं वाटू शकतं याची लाज वाटून आणि नंतर कदाचित कुणाला तरी हे समजेल या भितीमधून कुणाशी मैत्री केलीच नाही. एक तुझ्याशिवाय आणि…” पल्लवीनं तिचा हात हातात घेतला.
“पश्मीनासारखी चांगली मैत्रीण फार नशीबानं सापडते. आणि एकदा हरवली की परत मिळत नाही.”
“माहित नाही, आता कदाचित सगळं इतकंच बदललंय! ती परदेशामध्ये आणि मी इथं. तिनंही इतक्या वर्षांत कधी मला कॉंटॅक्ट केला नाही. आता मी केला तर कदाचित तिला राग येईल”
“असं तुला वाटतं. कधीतरी तिलाही हाक मारून बघ. मे बी, ती तुझ्या कॉलची वाट पहात असेल. प्रेयसी म्हणून नाहीतर मैत्रीण म्हणून तरी किमान… आणि माझी कधीही आठवण आली की बिनधास्त फोन कर. मनसोक्त गप्पा मारू” वेटर कार्ड स्वाईप करेपर्यंत पल्लवीनं बॅगमधला मोबाईल बाहेर काढला. दोघींचा एक गोडसा सेल्फी घेतला आणि लगेच फेसबूकवर अपलोड केला.
“ओल्ड फ्रेंड्स! हॉस्टेलमेट्स! रूम नं ५४!” अशी कॅप्शन देऊन.
तिसर्‍या सेकंदाला त्यावर पहिला लाईक पश्मीनाकडून आला होता.


------समाप्त------