Saturday 30 September 2023

फिरूनी नवी (भाग 8)

 (फिरूनी नवी भाग 7)

 

पुन्हा एकदा तोच प्रवास. त्याच्या घरापासून तिच्या घरापर्यंत. वास्तविक बाइकवरून तो सहज पोचू शकला असता, इतक्या रात्री फारसे ट्रॅफिकही मिळालं नसतं, पण आता या क्षणाला त्याला त्याचा मेँदू पूर्ण बंद करायचा होता. त्याने सरळ कॅब बूक केली. ती कुठे आहे हे त्याला माहीत होतं. तिच्या घराशिवाय ती आज कुठेही असणार नाही. रात्रीचे बारा वाजले, कॅबच्या डॅशबोर्डमध्ये तारीख बदलली. आजची अधिकृत तारीख. निहालच्या मृत्यूची. ती काल सकाळी त्याच्या घरून बाहेर निघाली. तिचा एकही फोन त्याने उचलला नव्हता, पण तिचा तो व्हॉइस मेसेज ऐकल्यावर मात्र तो बावचळला. हा असा विचार आपण कसा काय केला. ती इतक्या विश्वासाने आज आपल्याकडे आली होती. आपण एकमेव मित्र उरलोय. अशावेळी तिला सोडून आपलंच दु:ख कुरवाळत तो कसा तिच्यापासून दूर निघून आलाय?

 

तिरीमिरीत दूर निघून आला खरा, पण आता परत तिच्याकडे जाण्यासाठी मात्र त्याला हिंमत गोळा करावी लागली होती. कॅब तिच्या बिल्डिँगसमोर उभी रहिली, तेव्हा त्याने मान वर करून तिच्या खिडकीकडे पाहिलं. एरवी कायम अंधारी दिसणार्‍या खिडकीमध्ये आज एक दिवा लागलेला होता. जिना चढून त्याने बेल मारली तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला. काल ती आली तेव्हा आपण एकटे नव्हतो, आज जर ती एकटी नसेल तर.... तिने मूव्ह ऑन व्हावं असं सर्वानाच वाटत होतं. त्यालापण... जर तिने खरंच मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं तर... तिचे आईबाबा तिच्यासाठी स्थळं शोधत होते... त्याच्या मनामधले विचार अंतराळामधून कुठल्या कुठे जाऊन पोचले होते. तिनं दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या मनामधले विचार पुन्हा जमिनीवर आले होते. ती कालच आईवडलांशी भांडून आलेली आहे. काल रात्री आपण तिला हे असे परक्यासारखे वागवले आहे. इतक्यात ती काय कुणासोबत जाणार नाही, निमिष. रिलॅक्स!

 

दारात ती त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहत होती.

“तू? पुन्हा इथे?”

“अनि, सॉरी यार! आत येऊ का?” त्याने विचारलं. ती दारामधून बाजूला झाली पण तिने त्याला आत ये म्हटलं नाही. किमान तिने तोंडावर धापकन दरवाजा तरी आपटला नाही, हीच एक काय ती जमेची बाजू असा विचार करून तो घरात आला. आज तिच घर नीट आवरले होते. एका कोपर्‍यामध्ये एक मोगर्‍याच्या फुलांचा हार पडलेला होता. त्याच्यासमोर एक लाकडी फ्रेम. त्या लाकडी फ्रेममध्ये निहालचा फोटो. त्यासमोर लावलेली उदबत्ती.

टेरिफिक. ज्या गोष्टीपासून तो दूर पळत होता, तीच इथे मुबलक प्रमाणात होती. निहालचा मृत्यू. ते मरण त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही आयुष्यावर सावट बनून पसरलेलं होतं.

“अनीयार मी!” तो पुढे काही बोलण्यापूर्वीच तिने त्याचं वाक्य तोडलं.

“जेवला आहेस का?”

“भूक नाहीये मला”

“माझा प्रश्न तो नव्हता. मी सकाळी इडली सांबार केलं होतं. आता सांबार संपलंय. पण इडलीचं पीठ आहे. पटकन मिक्सरला चटणी फिरवते. खाशील?”

“नको. खरंच”

“निमिष, रात्रीचे दहा वाजलेत. सव्वादहानंतर अश्विनवाला ऑर्डर घेत नाही. बाकी काही मिळणार नाही”

“मी वाटेत पावभाजी खाल्ली” तो खोटं बोलून गेला. इतक्या सगळ्या खोट्या गोष्टी तिला सांगितल्यात, त्यात याची एक भर.

“ठीक. मग चहा टाकू?”

“नको. सरबत असलं तर दे” तिनं फ्रीझमधून पाण्याची बाटली काढली. ओट्याच्या बाजूच्या कपाटामधून कोकम सरबताची बाटली घेऊन तिनं एका ग्लासामध्ये सरबत बनवलं. तो आमसुली रंगाचा कोकम सरबत नामक प्रकार त्याला कधीच आवडला नाही पण आता तिला ते सांगत बसण्यात अर्थ नव्हता. त्यापेक्षा चहाला हो म्हटलं असतं तर अधिक बरं झालं असतं. हॉलमधल्या खुर्चीत बसून तो किचनमधल्या तिच्या हालचाली फक्त न्याहाळत बसला होता. तो तिच्या फ्लॅटवर पहिल्यांदा आला तेव्हा जितका ऑकवर्ड होता त्याहून शंभरपटीने आज तो ऑकवर्ड होता.

 

काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. ती सरबताचा ग्लास त्याच्या हातात देऊन तशीच अवघडून उभी राहिली. उगाच त्याने त्या रंगीत पाण्याचा एक घोट घेतला.  इकडे तिकडे नजर फिरवली. समोर एक पुस्तक पडलं होतं. जमुनाचं. तीच ती कंटेंट ओरिजिनेटर. त्याला त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी अगदी समजून उमजून विचारणारी. त्या तीन भागाच्या सिरीजमधलं पहिलंच. त्याने दारावरची बेल मारली तेव्हा अनिशा कदाचित हेच पुस्तक वाचत बसली असावी कारण पुस्तक अजून उघडं होतं, आणि सहज पालथं ठेवलं होतं. या पुस्तकाच्या कव्हरवर तीच मुलगी होती. मीटिंग सुरू असताना त्याने सहज काढलेलं चित्र. सायकल घेऊन जाणारी दोन वेणीवाली ती मुलगी. ते दृश्य त्याच्या मनामध्ये कितीवेळा येऊन गेलं होतं... त्या दिवशी अति शहाणपणा करत तिच्याशी तो बोलला नसता. व्यवस्थित स्वत:ची ओळख करून दिली असती, तर कदाचित्त ती निहालऐवजी त्याची बेस्ट फ्रेंड झाली असती. ती दोन वेण्यावाली मुलगी कदाचित त्याची गर्लफ्रेंडही झाली असती... कुणी सांगावं, काय घडलं असतं... पण किमान तीच मुलगी अशी त्याच्या समोर इतकी अवघडून गप्पगप्प तरी बसलेली नसती.

त्याची नजर त्या पुस्तकावर पडलेली दिसली तेव्हा ती म्हणाली, “आय लाइक हर. छान लिहिते ही”

“किती पुस्तकं वाचलीस तिची?”

“अलमोस्ट सगळीच. अमेझिंग डिटेलिंग असतं. खूप विचार करून रिसर्च करून लिहिते. तू वाचलंयस कधी तिचं?” त्यानं हातातला तो सरबतचा ग्लास बाजूला ठेवला. ते पालथं टाकलेलं पुस्तक उचललं. जमुना आणि तो. ही पब्लिशिंग इंडस्ट्रीमधली जोडी होती. तिच्या प्रत्येक पुस्तकाला त्याचंच चित्र होतं. पुढे जेव्हा जमुनाच्या पुस्तकांवर फिल्म्स, वेब सिरीझ निघाल्या तेव्हा तिच्या हट्टामुळे त्या सर्वांचं पोस्टरही त्यानेच केलेलं होतं. आणि ऑफ कोर्स, तिच्या प्रत्येक लेखनाचा पहिला वाचक तोच होता.

त्याने पुस्तकाचं पहिलं पान उघडलं. कव्हर पेज आर्टिस्ट म्हणून त्याचं नाव होतं. अनिशाला त्या नावावर बोट ठेवून त्यानं दाखवलं.

“निमिष अधिकारी? सिरीयसली?” ती चित्कारली. तिच्यासाठी ही माहिती नवीनच होती.

“इतकी तिची पुस्तकं वाचलीस आणि माझं नाव कधीच वाचलं नाहीस?” त्यानं मुद्दाम तिला चिडवत विचारलं. वातावरणामधला ताण हलका करायचा एक मार्ग त्याला मिळाला.

“नाही ना. हे तिचं पहिलंच पुस्तक ना? तू काढलेलं चित्र आहे हे? माय गॉश. कसलं क्यूट चित्र आहे हे. मी जबरदस्त फॅन आहे रे तिची.”

 

“थॅंक यू! आणि हा, तुला कधी जमुनाला भेटायचं असेल तर मला सांग. माझी खूप चांगली मैत्रीण आहे. नेक्स्ट टाइम ती मुंबईत आली की आपण डिनरलाच भेटू तिला.”

“आईशप्पथ! काय सांगतोस?”

“अरे, खोटं कशाला सांगू? पण अनिशा मला एक सांग. तू शाळेत असताना सतत अगाथा क्रिस्ती नाहीतर ती भुतांची पुस्तकं वाचायचीस. ते सोडून इकडे या लव्ह स्टोरीज वाचायच्या फंदात कधी पडलीस?”

“जेव्हा माझी  स्वत:ची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली तेव्हापासून...” तिनं मॅटर ऑफ फॅक्टली उत्तर दिलं.

वातावरणामध्ये इतकावेळ तो असोशीने दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असलेला ताण परत एकदा त्या दोघांच्या दरम्यान आला.

 

“निमिष, अजून कुठल्या पुस्तकांसाठी तू कव्हर्स केलीयेत?”

“मार ना कधीतरी गूगल सर्च माझ्या नावाने. बघ काय काय माहिती मिळतेय”

“इंटरेस्टिंग माहिती नक्कीच मिळेल. बरं ऐक, सलोनीने तुला विचारलंय”

“काय?”

“अरे, म्हणजे बरा आहेस ना. वगैरे”

“बरा नसायला मला काय धाड भरली आहे”

“धाड भरली नव्हती तर काल सकाळी मला तुझ्या फ्लॅटवर एकटीने सोडून का गेलास?”

अनिशाने त्याच्यावर अखेर तो वार केलाच. तो आल्यापासून ती त्याला न्याहाळत होती. तिचा तो व्हॉइस मेसेज ऐकल्यावर तो फोन करेल, सॉरी म्हणेल काहीबाही कारणं देईल अशी तिची अपेक्षा होती. पण यापैकी काहीही न करता तो थेट रात्री तिच्या समोर उभा ठाकला होता. त्याची मन:स्थिती हार काही चांगली दिसतच नव्हती. विषयाला तोंड फोडायचं होतं पण कसं ते त्याला नक्कीच समजत नव्हतं. एरवीही निमिष कमीच बोलणारा. अगदी कमी मित्रांमध्ये रमणारा. निहाल उलट जगन्मित्र. सरकारी कार्यालयाच्या शिपायापासून ते वरच्या लेव्हलच्या ऑफिसरपर्यंत त्याची ओळख. आताही आल्यापासून निमिषची चुळबुळ सुरू होती. माफी तर मागायची होती पण कशी? बोलू कसे? मनामध्ये विचारांची अनंत आवर्तने घेऊन दोघे केव्हाचे समोरासमोर बसले होते.

“मी सॉरी म्हटलं तर मला माफ करशील?” त्यानं अगदी हलक्या आवाजात तिला विचारलं.

“माफ करायला तू काही चूक केली नाहीस. आय नो. निमिष. हे सारं किती किचकट होतय हे मला माहीत आहे. निहाल... आज निहाल असता ना तर तिघं बसून आपण किती काय बोललो असतो. किती काय चेष्टा केली असतीस तू माझी... आणि.... मी उगाच परवा तुझ्या घरी आले. आय क्रॉस्ड द लाईन”

“ नो, यु डिड्न्ट. अनि. यार. तू माझ्या घरी त्या दिवशी आलीस. मला हक्काचा मित्र समजून. तुला समजलं तरी का, त्या एका कृतीमुळे.. निहाल जर आज इथं असता ना, तर तुझ्यावर ही अशी वेळ आलीस नसती ना गं. आईवडलांचं घर सोडून अशी तू वेळीअवेळी एकटी राहिलीच नसतीस. या सगळ्याला मी कारणीभूत आहे.”

“नको ना, आता पुन्हा तेच तेच गिल्ट दोषारोपाचं सत्र. घडून गेलंय ते. मी त्यातून बाहेर येण्याचा पुष्कळ प्रयत्न करतेय. बिलीव्ह मी. गेली पाच वर्षं आयुष्य पॉझ बटणावर थांबवून ठेवलं होतं. वाटायचं निहाल आहेच इथं कुठेतरी. येईल परत. आता कणाकणाने ही जाणीव बळकट होत चालली आहे. की तो येणार नाही. पूर्वी मला दिसायचा तो. आता तू जसा समोर बसलेला दिसतोयस ना थेट तसाच. बोलायचाही माझ्याशी. पण आता तो धुरकट होत चाललाय. त्याचं अस्तित्व नाही हे माझ्या मनाने मान्य करायला सुरुवात केली आहे आणि मला त्या क्षणाची खूप भिती वाटते रे. तो क्षण जेव्हा माझं मन हे पूर्ण मान्य करेल की निहाल या जगात नाहीये. निहाल माझ्या अवतीभवतीसुद्धा नाहीये. निहाल इज नो मोअर!” बोलता बोलता तिचा आवाज भरून आला. अचानक तिला हुंदका फुटून ती रडायला लागली.

“अनि, यार प्लीज तू रडू नकोस ना” तो तिच्या या ओक्साबोक्षी रडण्याने गडबडला. उठून तो तिच्याजवळ गेला. तिच्या केसांमधून हलकेच हात फिरवत राहिला. कितीतरी वेळ ती रडत होती कुणास ठाऊक. तो शांतपणे फक्त तिच्याजवळ होता. हळूहळू तिचं रडं ओसरलं. तसं त्याने तिला जवळ ओढून घेतलं. तिला कुशीत घट्ट घेऊन तो कितीतरी वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती निपचित पडून राहिली. त्यच्या जिवंत हृदयाचे ठोके मोजत.

 

थोड्यावेळाने कधीतरी त्याला जाणवलं की तिचे डोळे मिटलेत. ती प्रगाढ झोपली होती. हलक्या हाताने त्याने तिला उचललं. तिच्या बेडवर आणून निजवलं. परवाच्याच रात्रीचा हा सीन रिपीट होतोय, निमिष. त्याने स्वत:ला बजावलं. तरी तिला अद्याप गाढ झोप लागलेली आहे हे चेक करून तो उठून हॉलमध्ये आला. निहालच्या फोटोसमोरची उदबत्ती संपत आली होती. त्याने अजून एक उदबत्त्ती लावली. निरांजन कधीचे शांत झाले होते. तेही त्याने लावले. उठून हॉलचा लाइट घालवला. शांत स्निग्ध निरांजनाच्या प्रकाशामध्ये निहाल हसरा समोर बसला होता. काही न सुचून निमिषने त्याच्यासमोर हात जोडले. पुन्हा एकदा माफी मागितली. ती कधीच मिळणार नाही आणि आपण या सार्‍या जंजाळामधून कधीच सुटू शकणार नाही याची त्याला कल्पना असूनही. रात्र फारच चढली, तेव्हा तो तिथेच बाजूला जमिनीवर आडवा पडला. झोप नीट अशी लागलीच नाही पण जागाही राहिला नाही.

पहाटे कधीतरी अनिशाला जाग आली. तिने उठून बेडरूमचा दिवा लावला. समोरच्या फिश बोलमधला राज त्या प्रकाशाने जागा झाला होता. तिने त्याला डबीमधून थोडे दाणे खायला दिले. फ्रेश होऊन ती हॉलकडे आली तेव्हा तिला तिथे निहालच्या फोटोसमोर जमिनीवरच झोपलेला निमिष दिसला.

“निमिष! अरे निमिष” तिने त्याला हाक मारली. तो हूँ का चूं झाला नाही. कितीवेळ रात्रीचा जागा होता कुणास ठाऊक. जेव्हा जाग येईल तेव्हाच पाहू, असा विचार करून ती बेडरूममध्ये परत आली. येताना तिथेच बाजूला पडलेलं ते जमुनाचं पुस्तक मात्र तिनं उचलून घेतलं. आता तिला परत तशी झोप आलीच नसती. त्यापेक्षा चहा घेत पुस्तक वाचत पडावं असा विचार तिनं केला. किचनमध्ये येऊन गॅसवर तिनं चहाचं आधण ठेवलं. पुस्तक तिनं ओट्यावर बाजूला ठेवलं होतं.

 

काल रात्रीपासून काहीतरी खटकत होतं. काहीतरी प्रचंड चुकतंय असं तिला वाटत होतं. परीक्षेमध्ये एखादं गणित चुकल्याचं घरी आल्यावर कसं होतं. तसं काहीतरी. काहीतरी समोरच प्रचंड आहे आणि आपल्या ते लक्षात येत नाहीये असं काहीतरी. काल रात्री झोपेतही तिला काहीबाही असंच दिसत होतं. एकाकी वाट. तिन्हीसांजेची वेळ. खुनी चेहरे असलेला टीशर्ट घातलेला निहाल. तिचं आणि त्याचं दप्तर सायकलला अडकवून सायकल चालवत नेणारा निहाल. तिच्या गालाला हलकाच स्पर्श करून तिला स्टुपिड म्हणणारा....

चहाचा कप घेऊन ती वळाली. ओट्यावर राहिलेलं पुस्तक घेण्यासाठी अगदी किचनच्या दारापर्यंत जाऊन ती परत आली. तेव्हा अचानक जाणवलं.

 

खिडकीच्या बाहेर पूर्वेला झुंजूमुंजू होत होतं. त्याची तिरीप पुस्तकाच्या कव्हरवर पडलेली होती. असाच तिन्हीसांजेचा फिकट पिवळा प्रकाश. ती सायकलवरून जात होती.. समोर तो उभा होता. बर्मुडा शॉर्ट आणि कसलासा विचित्र टीशर्ट घालून. त्याच्यासमोर ती उभी होती. दोन वेण्या घालून.

जमुनाच्या पुस्तकाच्या कव्हरवर ती उभी होती. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट नावाच्या एका लव्ह स्टोरीच्या पुस्तकावर निमिष अधिकारीने त्याला ती पहिल्यांदा जेव्हा दिसली तेव्हाचे चित्र काढले होते.

क्षणार्धात या सर्वाचा अर्थ तिच्या लक्षात आला आणि ती जागच्या जागी थिजून गेली.

 

 (क्रमश:) 

Sunday 17 September 2023

फिरूनी नवी (भाग 7)

 

 

दुपारचे दोन वाजत आले होते. निमिषचा फोन अद्याप स्विच ऑफ होता. नीलम टीव्हीवर पिक्चर बघत बसली होती. सकाळी जाग आली, तेव्हा काल रात्री झाल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणून ती परत निघाली होती. पण निमिषने तिला थांबवलं. आजचा दिवस एकाकी घालवायचा कितीही विचार असला तरीही, ती निघून गेल्यानंतर या घरामध्ये येणारं भकास एकटेपण त्याला सहन झालं नसतं. मागच्यावेळी आईबाबांना कोर्टात सही देऊन आल्यानंतर असाच वेड्यासारखा विचार करून तो थेट अनीशाच्या घरी पोचला होता. आज पुन्हा तसं काही करायचा त्याचा विचार नव्हता. त्यानं जेवण बाहेरून ऑर्डर केलं. एकही घास त्याला गिळवत नव्हता, पण नीलमच्या समोर बसून मुकाट पाण्याच्या घोटासह काहीबाही खाल्लं.

 

जेवण झाल्यावर तो पुन्हा खोलीत येऊन पडला. काल रात्रभर झोप लागलीच नव्हती. आजही झोप आली असती असं नाही. पण किमान थोडा आराम तरी करायला हवा. उन्हाची तिरीप बेडरूमच्या खिडकीवरून त्याच्या डोळ्यांवर येत होती. पण बेडवरून उठून पडदा ओढून घ्यावा असे वाटत नव्हतं.

त्याचा हा गंभीर मूड बघून नीलम हबकली होती. काल रात्री ती केक घेऊन आल्यावर तो जे काय चिडून बोलला तितकंच. त्यानंतर तिच्या बोलण्याला फक्त हो नाही इतकी तुटक उत्तरं. तो बेडरूममध्ये आल्यावर ती मागोमाग आली. तो हात डोळ्यांवर ठेवून तो पडला होता. तिनेच खिडकीवरचा पडदा पुढे ओढून घेतला. त्याच्या डोळ्यांवरची तिरीप गेल्यावर त्याने हात दूर केला.

“जागा आहेस का?” तिनं विचारलं

“हं”

“एसी लावू?”

“नको” तो म्हणाला, आणि बेडवर बाजूला सरकला. काही न उमजून ती तशीच उभी राहिली. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं.

“तू पण थोडावेळ झोप. पहाटे लवकर उठलीसअखेर तो म्हणाला.

“नको, मी निघते. उशीर होईल”

तिच्या या उत्तरावर तो काही न बोलता कुशी वळाला. काही क्षण ती गोंधळून उभी राहिली. अखेर तिनं काहीतरी ठरवलं आणि ती रिकाम्या झालेल्या बेडवरच्या जागेत पहुडली.

पण तो वळाला नाही. तसाच कितीतरी वेळ तिच्याकडे पाठ करून पडून राहिला. तो अजून जागा आहे हे तिला माहीत होतं पण त्याच्याशी काय बोलावं हे मात्र तिला अद्याप सुचत नव्हतं.  तिचा डोळा लागतच होता, की अचानक बेल वाजली.

 

“आता कोण आलं असेल? तू काही ऑर्डर केलं होतंस का?” त्यानं उठत विचारलं.

“नाही. तू झोप मी बघते” ती उठून बेडरूमबाहेर आली.

दार उघडलं तर समोर एक तिशीची मुलगी उभी होती.

“निमिष अधिकारी इथंच राहतात ना?” तिनं बिचकत विचारलं.

“अं.. हो. आपण कोण?”

“कोण आहे गं?” पाठीमागून निमिषचा आवाज आला. पण नीलमने काही उत्तर देण्यापूर्वीच, तो सामोरा आला.

“अनिशा? तू इथं कशी काय?”

“अ‍ॅक्चुअली, तुझा फोन खूप वेळ ट्राय करत होते. पण स्विच ऑफ होता. मागे तू म्हणाला होतास की या सोसायटीमध्ये राहतोस. नक्की फ्लॅट नंबर माहीत नव्हता म्हणून मग वॉचमनला विचारलं. तर.... आय मीन... मी उगाच इकडे आलेय. सॉरी. डिस्टर्ब केलं. सॉरी.. मी येते! आय मीन निघते” नीलमला आणि निमिषला बघताच ती काय समजायचे ते समजून गेली होती. इतके दिवस निमिषला भेटत असतानाही तिनं चुकूनही एकदाही त्याला त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारलं नव्हतं. पाच वर्षांपूर्वी तो बिनधास्त कॅसानोव्हा होता. आताही तो तसाच असेल असं तिला का वाटलं होतं देव जाणे. तो कदाचित सेटल झाला असणार. लग्नही केलं असेल कुणास ठाऊक. समोर उभी असलेली मुलगी याच घरात राहणार असणार. अंगात असलेला टीशर्ट आणि शॉर्ट्स पाहता तितकं समजत होतंच. प्रचंड ऑकवर्डनेस तिच्या मनामध्ये दाटून आला होता. ती परत जाण्यासाठी मागे वळाली.

“आत तरी ये. अनीशा! प्लीज” तो दारामधून बाहेर आला. त्यानं तिचा दंड हलकेच धरला. “थांब.”

“मी यायला नको हवं होतं. सॉरी”

“ते बोलून झालंय तुझं. आता घरात चल.” तिला घेऊन तो घरात आला.

“नीलम, ही अनीशा. माझी शाळेपासूनची मैत्रीण. आणि अनी, ही नीलम. माझी...” नीलमची नक्की ओळख कशी द्यावी या प्रश्नावर तो अडला.

“मी पण मैत्रीणच. पण कॉलेजपासूनची नाही. अगदी नुकतीच झालेली मैत्री आहे” नीलम हसून म्हणाली. “निमिष, मी निघते आता. खूप उशीर झालाय. उद्या परत काम आहे.” ती बेडरूममध्ये आली. अनीशाला हॉलमध्ये बसवून निमिष मागोमाग बेडरूममध्ये आला.

“नीलम, प्लीज थोड्यावेळाने जाशील का? इथे अनीशाला..”

“निमिष, आय हॅव्ह टू गो. प्लीज अ‍ॅंडरस्टॅंड. उद्या शूट आहे माझे. आणि तुझा बर्थडे सेलीब्रेट करायला तुझी शाळकरी मैत्रीण आली आहे ना? सेलीब्रेट विथ हर”

“जस्ट शटाप. डोण्ट क्रॉस द लाईन”

“मी लाईन क्रॉस करतेय? मिस्टर अधिकारी, गेले अठरा तास तुम्ही काय करताय? मला कधी सांगितलंत... तू बर्थडे सेलीब्रेट का करत नाहीस? तुला जुळा भाऊ होता. ही तुझी मैत्रीण आहे!! मला काय माहीत आहे तुझ्याबद्दल? माझ्याकडून एका सेक्स डॉल असण्याव्यतिरीक्त काय अपेक्षा आहेत तुला?”

“नीलम, हे बोलण्याची आता वेळ नाही. अनीशा बाहेर बसली आहे, मला प्लीज”

“येस एक्झाक्टली. ती अनीशा. कोण तुझी मैत्रीण, तुझ्या घरी येते. आणि माझ्याशी गेली अख्खी रात्र आणि दिवसभर न बोलणारा तू, तुझा चेहरा अचानक खुलतो. यु आर हॅपी टू सी हर”

“नीलम, आपण नंतर बोलू”

“नाही, निमिष. मी काल रात्रभर हाच विचार करत होते. मला वाटत  होतं की आपलं रिलेशनशिप पुढे कुठे जाणार आहे. आय वॉज एक्स्पेक्टिंग मच मोअर. पण ते शक्य नाही. तू ज्या नजरेनं त्या मुलीकडे पाहिलं असतंस ना, त्या नजरेनं माझ्याकडे एकवार पाहिलं असतंस तरी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहिले असते. इतके दिवस विचार करत होते की, तू प्रत्येकापासून इतका डीटॅच्ड कसा काय राहू शकतोस, आज समजलं की तू कुठे अ‍ॅटॅच आहेस!” बोलता बोलता नीलमने स्वत:चे कपडे एका बॅगेत कोंबले.

“नीलम, प्लीज ऐकून घे. इतक्यावेळा सांगतोय, प्लीज”

“नाही, निमिष. हे रिलेशनशिप कधीच वर्क झालं नसतं. आय गेस. मी माझ्या परीने इन्व्हॉल्व्ह होते, तू कधीच नव्हतास. आय थिंक वी शूड कॉल इट अ ब्रेकअप.”

 

नीलम वादळासारखी सुसाट त्याच्या घरामधून बाहेर पडली. लिव्हिंगरूममध्ये बसलेली अनीशा तिला निघताना बघून गांगरली.

“काय झालं निमिष?” तिनं विचारलं. निमिषने शांतपणे दरवाजा लावून घेतला. आणि लिव्हिंगरूममध्ये तिच्या समोर बसून त्याने सिगरेट पेटवली.

“माय लाईफ इज फक्ड अप” तो पाच मिनिटांनी म्हणाला.

“सॉरी, तुझा फोन लागत नव्हता आणि म्हणून मी थेट तुझ्या घरी आले”

“अनी, यार कमॉन. तुझ्या घरी असा कितीकवेळा मी अचानक येऊन धडकलो आहे! आज तू आलीस तर काय.... पण अचानक कशी काय?”

“वीकेंडला पुण्याला गेले होते”

“आईबाबांकडे?”

“नाही, अनिकेत पूर्वाकडे. आता आईबाबांचं घर उरलंच नाही”

“काही वाद झाला का?”

“फार काही नाही. पण काही नवीन गोष्टी समजल्या, पूर्वा मला सांभाळते, विनालग्नाची नणंद घरी असल्याचा तिला त्रास होतो. वगैरे.”

“पूर्वा आधीपासून हरामखोर आहे. अनिकेतला तेव्हाच सांगितलं होतं. फसशील हिच्या नादी लागून”

“असो. ते खुश आहेत. अडचण माझीच आहे. मग भांडून निघाले पण एकटीने मन रमलं नस्तं म्हणून म्हटलं तुला भेटावं....”

“बरं झालं आलीस. जेवली आहेस का?”

तिने फक्त मान हलवली.

“चल, तुझ्या घरी आल्यावर कसं फर्मास ऑर्डर करतेस, तसंच आज माझ्या घरी पण. इथं जवळ एक खास रेस्टोरंट आहे, पण ऑर्डर करू या नको. चल बाहेरच जाऊ”

“इतक्या उन्हात?”

“जानेवारीचं तर ऊन. तू बस दोन मिनिटं. मी चेंज करून येतो.निमिष आतल्या खोलीमध्ये गेला. ती पुन्हा एकदा तिथेच अवघडून बसून राहिली. निमिषचं घर त्याला शोभेल असंच होतं. सामानाचा फाफ़टपसारा नाही, जास्त फर्निचर नाही. चित्रकार असूनही भिंतीवर एकही चित्र नव्हतं. भिंती मोकळ्याच होत्या. अपवाद फक्त ती बसली होती त्या समोरच्या भिंतीचा. त्यावर फक्त एक फोटो होता. निहालचा. हातात भलामोठा पिंक रोझेसचा बुके घेऊन उभा असलेला.

साखरपुड्याच्या नंतर दोन की तीन दिवसांनी ती आणि निहाल कशावरून तरी भांडले होते. कारण इतकं क्षुल्लक होतं की, तिला आता ते आठवतही नव्हतं. पण ती वैतागून त्याच्याशी चक्क दोन तास बोलली नव्हती, आणि म्हणून तो सॉरी म्हणायला हा बुके घेऊन तिच्या घरी आला होता. सर्वांसमक्ष तिला सॉरी म्हणून त्यानं ही फुलं दिली होती. निमिषने बहुतेक  हा फोटो निहाल तिच्या घरी येण्यापूर्वी काढला असणार.

“चल, निघूया?” आतमधून टीशर्ट आणि पायजमा बदलून तोच टीशर्ट आणि जीन्स घालून आलेल्या निमिषने विचारलं. तिची नजर त्या फोटोवरून ढळली. निमिषच्या ते लक्षात आलं, पण तो काही बोलला नाही.

मग ते दोघं जेवायला म्हणून जे बाहेर पडले, ते अख्खी संध्याकाळ बाहेरच भटकत राहिले. तिने नीलमचा विषय परत काढला नाही. त्याने तिच्या घरचा विषय पुन्हा काढला नाही. निहालचा उल्लेखदेखील परत आलाच नाही. दोघंही मोजून मापून एकमेकांशी बोलत राहिले. आधी बाहेर पिझ्झा खाल्ला. मग मॉलमध्ये भटकंती करत करत शॉपिंग केली. ती नको म्हणत असतानाही त्याने तिच्यासाठी दोन तीन ड्रेस, फॉर्मल शर्ट असं काहीबाही घेतलं. मग तिनं त्याच्यासाठी एक खास परफ्युम घेतला. संध्याकाळ होत आली, तशी ती दमलेय हे त्याच्या लक्षात आलं. त्याला घरी जायचं नव्हतं. घर ही एक अशी जागा होती, जिथं खूप सारे विषय अर्धवट पडून होते. नीलमने केलेला ब्रेकप, अथवा तिचं घरी झालेलं भांडण या सर्वांचा उल्लेख घरी गेल्यावर झालाच असता. अखेर तो म्हणाला की, चल पिक्चर पाहू. मग कुठला पिक्चर बघायचा यावर दोघांनी अर्धा तास वेळ घालवला.

 

हा वाद घालत असताना त्याला पक्कं माहीत होतं, आपण अनीशाच्या आवडीचा सिनेमाच बघणार. पण तरीही..... अखेर, त्यानं हार मानली आणि अत्यंत मूर्ख हाणामारीपट बघायला तो तयार झाला. तो पण इंग्लिश. अनीशाला हे काय वेड होतं देव जाणे. साधेसरळ सुंदर पिक्चर बघायचीच नाही. हॉरर, अ‍ॅक्शन, थ्रिलर असल्याच पिक्चरांची आवड. अगदी शाळेत असतानादेखील रात्री उशीरापर्यंत जागून भुताचे पिक्चर बघायची. बिल्कुल घाबरायची नाही.

सुदैवाने, या आठवड्यात कुठलाही भुताचा पिक्चर रीलीज झालेला नव्हता. मारधाडपट मात्र तुफान हिट सुरू होता. त्याचीच तिकीटं काढली. पिक्चर सुरू झाला तोच मारामारीने. कोण कुणाला कशासाठी कुठून कितीवेळा मारतंय हे त्याच्या आकलनापलिकडे होतं. पण अनीशा एंजॉय करत होती. हा व्हिलन पण स्पेशल होता. पिक्चरच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत अखंड मार खाऊन पण मरत नव्हता. या व्हिलनने हीरोच्या भावाला ठार मारलेलं होतं म्हणे, त्याचा बदला घेण्यासाठी हीरो मार्शल आर्ट्सचा कसलातरी खास प्रकार शिकतो, आणि मग व्हिलनचा शोध घेऊन त्याला बुकल बुकल बुकलतो. काश! असाच एखादा व्हिलन असता तर निहालच्या मृत्यूसाठी मला कुणालातरी जबाबदार धरता आलं असतं, दोष कुणाच्या तरी माथी मारता आला असता. पण असं जगात काहीही घडत नाही. विचारांचं जाळं त्याला आता घेरून टाकत होतं. दिवसाभरामध्ये आलेला ताण आता असह्य झाला होता. अचानक एकाक्षणी त्याला वाटलं आपल्याला खरोखर रडू येणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये तो रडला नव्हता. निहाल गेला तेव्हाही नाही पण आता मात्र मन भरून आलं होतं.

बाजूला बसलेली अनीशा इतका वेळ हीरोला चीअर करत होती. तिचा आवाज शांत झाला होता, म्हणून त्याने वळून पाहिलं. अंधारामध्ये ती खुर्चीवर मागे डोकं ठेवून झोपी गेली होती. तिच्या मिटलेल्या पापणीमधून अश्रूचा एक चुकार थेंब त्याला त्या काळोखातही दिसला. सिनेमा संपायला अजून तासभर अवकाश होता. तरीही, त्याने तिला हलकेच उठवलं.

“पूर्ण बघायचा की घरी जाऊया?” त्यानं विचारलं

“घरी” ती म्हणाली.

त्याने कॅब बूक केली. तिला घेऊन तो घरी आला. त्याच्याच घरी. तिच्या घरी इतक्या दूर घेऊन जाण्यापेक्षा हे बरं. टॅक्सीमध्ये थोडावेळ जागी होती पण घरी पोचेपर्यंत पुन्हा एकदा झोपली. ती अजून झोपेत होती. तो तिला घेऊन बेडरूममध्ये गेला. बेडवर तिला नीट झोपवलं. तिच्या अंगावर चादर घातली.

तिचा कोवळा निरागस चेहरा झोपेत अजूनच शांत वाटत होता. अगदी न राहवून त्याने हलकेच तिच्या कपाळावर स्वत:चे ओठ टेकवले. “गूड नाईट” तो कुजबुजला.

“गूडनाईट, निहाल” ती झोपेतच उत्तरली.

अंगावर कुणीतरी बर्फाचं बादलीभर पाणी ओतावं तसा तो भानावर आला. शॉक बसावा तसा तिच्यापासून दूर गेला.

काय करतोयस निमिष? तिचं प्रेम निहालवर होतं. तुझ्यावर कधीच नाही. तुझा तो हक्कच नाहीये.

तिला बेडरूममध्ये सोडून तो तसाच बाथरूममध्ये गेला. नळ सोडून भसाभसा पाणी त्याने चेहर्‍यावर मारून घेतलं. वर पाहिलं तर बाथरूममधल्या आरश्यामध्ये त्याचा चेहरा अजूनही तसाच होता. फडाफडा त्याने स्वत:च्याच थोबाडीत मारून घेतलं. तरीही, तो चेहरा अजून तिथेच होता. त्याचा चेहरा. जन्मापासून त्याला मिळालेला चेहरा. निहालचा चेहरा....

आणि तो चेहरा आता त्याच्या चेहर्‍याकडे बघून खदाखदा हसत होता..

>>>>>>>> 

दुसर्‍या दिवशी अनीशाला जाग आली तेव्हा क्षणभर कुठे आहोत तेच तिला कळेना. अखंड घर एकदम शांत होतं. घरात निमिषचा काहीही वावर जाणवत नव्हता. तू कुठं आहे हे विचारायला म्हणून तिनं मोबाईल हाती घेतला. त्यावर निमिषचे दोन मेसेजेस. पहिला गूड मॉर्निंग. आणि दुसरा “मी कामासाठी अचानक गोव्याला जातोय. तू फ्रेश हो, आणि टॅक्सी पकडून घरी जा. चावी शेजारच्या कटारिया आंटीकडे ठेव. बाय” एवढाच आणि इतकाच तुटक मेसेज.

रात्री कितीवाजता निमिष घराबाहेर पडला, आणि अचानक कुठे गेला तिला काहीच समजेना. हे गोव्याला जाण्याबद्दल तो काहीच बोलला नव्हता. तिने त्याचा नंबर ट्राय केला. तो स्विच्ड ऑफ होता. निमिषच्या या अचानक तुटक वागण्याचं तिला मनापासून प्रचंड आश्चर्य वाटलं. पण, तरीही, ती सर्व आवरून त्याच्या घराबाहेर पडली. त्यानं दिलेल्या सूचनेप्रमाणे चावी शेजारच्या घरी ठेवण्यासाठी बेल मारली. एका नऊ वर्षांच्या गोबर्‍या मुलीने दार उघडलं.

“निमिष अधिकारी, उनकी चाबी रखनी थी” ती मुलीला म्हणाली.

ती मुलगी दार तसेच उघडे ठेवून आत पळाली. “मम्मा, निमिषभैय्याने फिरसे लडकी बदल दी” आतमधून चाळीशीची एक थुलथुलीत बाई बाहेर आली. लेकीच्या आगाऊपणामुळे तिला काहीतरी गुजरातीमध्ये बडबडतच. अनीशाच्या हातून चावी घेतली, आणि धाडकन घराचं दार लावून घेतलं.

प्रचंड शरम आणि घृणा अनीशाच्या मनामध्ये दाटून आली. “कसे काय आपण इतके बहकलो? कालचा निम्मा दिवस आपण निमिषसोबत काढूच कसे शकलो?” स्वत:लाच पुन्हा एकदा दोषी मानत, ती टॅक्सी पकडून घरी आली. वाटेत बॉसला मेसेज करून तिने आजची आणि उद्याची अशा दोन्ही सुट्ट्या टाकल्या होत्या. उद्याचा दिवसही असाच कठीण जाणार. उद्या निहालच्या मृत्यूची ऑफिशिअल तारीख. अपघात झाल्यापासून ते जवळजवळ 48 तास त्याची मरणाशी झुंज सुरू होती. तो बरा होईल याची खात्री तर सर्वांनाच होती. पण अखेर सर्वांची नजर चुकवून तो या जगामधून गेलाच. उद्या ती तारीख.

तिने घरी पोचल्यावर निमिषला पुन्हा एकदा फोन केला. नंबर अजून स्विच्ड ऑफ होता. तो नक्की गोव्याला गेला होता की, अजून कुठे काहीच माहीत नव्हतं.

अखेर न राहवून तिने त्याला व्हॉइस मेसेज पाठवला.

“निमिष, काय चालू आहे? बरा आहेस ना? मला तुझ्या घरामध्ये हे असं एकटीला सोडून जाताना... तुला लाज लज्जा शरम काही नाहीच आहे का रे? आता मघापासून फोन करतेय, तर फोन बंद ठेवून बसलायस. तुझ्या त्या शेजारच्या आंटीला वाटलं की मी तुझी... तुझी सेक्स पार्टनर वगैरे आहे. इतकी चीप आहे का मी? का असा मुद्दाम वागतोस?” बोलतानाच तिचे डोळे भरून आले. तिने तो मेसेज पाठवून दिला.

>>>>>>> 

“लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट! तुझा विश्वास आहे यावर?” निमिषच्या बाजूला बसलेली जमुना त्याला विचारत होती. जमुना म्हणजे दिल्लीमधून मुंबईला नुकतीच शिफ्ट झालेली ओरिजिनेटर. लेखिका, रायटर, ऑथर वगैरे डाऊनमार्केट लोकांची नामाभिधानं होती. पण जमुना ट्रेंडसेटर होती. ती लिहायची, पण नाव मात्र कंटेंट ओरिजिनिटर.. तिच्या तीन पुस्तकांची मालिका प्रकाशकांनी काढायचं ठरवलं होतं. यातल्या पहिल्या पुस्तकाच्या कव्हर पेज डिझाईनसाठी ब्रेनस्टॉर्मिंग सुरू होतं. प्रकाशकांची भलीमोठी टीम त्या एसी हॉलमध्ये बसून पुस्तकाच्या वेगवेगळ्या अ‍ॅंगल्सवर आणि छुप्या सिम्बॉलिझमबद्दल चर्चा करत होती. त्यात अगदी नवीन लागलेला हा मुलगा निमिष अधिकारी. वास्तविक त्याचं डेजिग्नेशन फक्त इंटर्न इलस्ट्रेटर म्हणून होतं, पण तो उत्तम चित्रं काढतो, म्हणून बॉसने त्याला या चर्चेमध्ये ओढलं होतं. गेले दोन तास शब्दांचे विनाकारण उडणारे बुडबुडे बघत तो शांत बसला होता. एका नोटपॅडवर कसलंतरी स्केच काढत. मध्येच कॉफीसाठी ब्रेक म्हणत सर्वजण इकडेतिकडे पांगले, तेवढ्यात ही जमुना त्याच्या बाजूला येऊन बसली.

“माझा मुदलात लव्ह प्रेम वगैरे गोष्टींवरच विश्वास नाही, मग लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईटसारख्या तद्दन फिल्मी गोष्टींची बात कशाला?” निहालने त्याच्या स्केचवरची नजर हटवत तिला उत्तर दिलं. त्याच्या नोकरीचा हा अगदीच पहिला आठवडा. निहालच्या ओळखीने या भल्यामोठ्या इंग्रजी पुस्तक प्रकाशन कंपनीमध्ये मिळालेली ही नोकरी. आमच्याकडे पगार जास्त नाही, पण शिकायला खूप मिळेल या मधाच्या बोटासह.

“तुझ्या दृष्टीने हे माझं सर्व लेखन फालतू आहे?”

“मी फालतू हा शब्द कुठे वापरलाय?”

“व्हेरी गूड. चित्रकार तर आहेसच” तिची नजर त्याच्या हातामधल्या स्केचवर होती, “पण उत्तम लेखकही होऊ शकशील.”

“बाप रे! फार कष्टाचं काम आहे. जे वाक्य म्हणायला जगामधले तीन शब्द पुरतात, त्यासाठी तुम्ही लाखभर शब्दांची कादंबरी लिहून काढता”

“तू म्हणू शकशील? सांगू शकशील?” जमुना चाळीशी क्रॉस केलेली होती पण चेहरा मात्र अद्याप तिशीमध्ये होता. काळ्या सरळ केसांचा बॉब कट, हलकासा मेकप आणि डोळ्यांवरच्या चष्म्यावरचे दोन चार खडे अधेमध्येच चमकणारे.

“काय?” स्वत:चे लक्ष पुन्हा एकदा त्या स्केचपॅडकडे वळवत निमिषने विचारलं.

“माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. हे तीन शब्द तू तुझ्या प्रेमाला सांगू शकशील?”

“आय लव्ह यू” नजर थेट जमुनाकडे वळवत तो म्हणाला. “इतकं सोपं तर आहे. का नाही सांगू शकणार?”

“आजवर का नाही सांगितलंस?”

“कुणाला? आताच तर तुम्हाला ऐकवलं. अजुन कुणाला म्हणत असाल तर त्यांनाही सांगेन. यात कठीण आहेच तरी काय?”

“यंग मॅन, मी उगाच लिहत नाही. काहीच कठीण नाही तर या मुलीला कधी हेच वाक्य आजवर का सांगितलं नाहीस?” जमुनाने त्याच्या हातामधल्या स्केचकडे इशारा केला. साधं पेन्सिलने काढलेलं चित्र. एका शाळकरी मुलीचं. सायकल चालवणारी, दप्तर अडकवलेली मुलगी. ती मुलगी कोण काय हे काहीही जमुनाला माहित असायचं कारणच नव्हतं.

 

निमिषला मात्र हेच स्केच आपण आता का काढलं हे परफेक्टली माहित होतं, मघापासून प्रेम, प्रेमाशी असोसिएटेड गोष्टी अशी काहीबाही चर्चा सुरू असताना त्याच्या नजरेसमोर आलेलं पहिल आणि एकमेव दृश्य हेच होतं. पहिल्यांदा भेटलेली अनीशा. शाळेमधून येत असताना.

त्यानंतर अनेकदा अनीशा त्याला इथे तिथे भेटत राहिलीच होती. पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की, स्कॉलर निहाल तिच्यासाठी आपल्यासारख्या वाया गेलेल्या मुलापेक्षाही जास्त चांगला चॉइस आहे.

तो तिच्यापासून दूर होत चाललाच होता. आता तर निहालला नोकरी लागल्यापासून घरामध्ये अनीशाला सून करून आणण्याचे मनसुबे सुरू असल्यापासून तर जास्तच. पण ती मात्र त्याच्या मनामध्ये केव्हापासूनच ठाण मांडून बसली होती. ते म्हणतात ना, “लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट” ते इतकंही काही खोटं किंवा कवीकल्पना नाही- हे त्याला पुरेपूर माहित होतं.

 


(फिरूनी नवी भाग 8)