Sunday, 10 September 2023

जवान- बटबटीत पैसावसूल!‍

 जवान पहावा की पाहू नये असा एक काहीतरी सोशल मीडीयावर वाद सुरू आहे म्हणे. सोशल मीडीयावर बाकी काय सुरू असतं म्हणा, पण या वादावर माझ्याकडे केवळ एकच उत्तर आहे. 


ज्याला पहायचा आहे त्यांनी अवश्य पहावा. अतिशय पैसावसूल मनोरंजन आहे जवान! 


त्याचवेळी, प्रचंड काहीतरी करायचा स्कोप असूनही बटबटीतपणामुळे झाकोळलेला आहे जवान. 
सिनेमाचा सुरुवातीचा सिक्वेन्स बेफाट जमला आहे. ईशान्य भारतातल्या एका लहानश्या खेड्यामध्ये जवळपास मृतावस्थेमध्ये मिळालेल्य एका माणसाला तिथे जीवदान मिळतं. त्याच गावावर जेव्हा परदेशी लष्कर चालून येतं तेव्हा हा मसीहा देवाच्या कृपेने उभा राहतो. इथून पुढे हा सिनेमा सुपरहीरो वाटेने जाऊ शकत होता. पण दिग्दर्शकाला घोळ घालायची सवयच आहे. पुढे सिनेमा तीस वर्षांची उडी मारतो, आणि मग मेट्रो हायजॅकिंगचा एक लांबसडक सिक्वेन्स सुरू होतो. संपता संपत नाही, हीरो हा अ‍ॅंटीहीरो आहे की व्हिलन आहे असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात सुरू होत असतानाच खर्‍या व्हिलनची एंट्री होते आणि पुन्हा एकदा दोनअ‍डीच दशकांनी डर आणि बाझिगरमध्ये पाहिलेला नीतीमूल्ये तुडवूनही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारा शाहरूख आपल्याला दिसत नाही हे समजून चुकते. मग टिपिकल साउथ इंडियन प्रेम कहाणी येते. नाच गाणी येतात आणि प्रेक्षक विसावतात. इथून पुढे सिनेमात काय होते ते समजून घ्यायला तुम्हाला फार अभ्यासाची गरज नाही. अन्नियन, इंडियन, नायक, शिवाजी  सारख्या सिनेमामधून जे घडते तेच इथेही घडत राहतं. अत्यंत् गुंतागुंतीच्या सिस्टिममधल्या भ्रष्टाचाराला काही मिनिटांच्या आत उत्तरे मिळतात आणि तुंबलेला नाला स्वच्छ होऊन तसाच निर्मळ पाण्याने वाहत राहतो. हे असं होत नाही, हे आपल्याला आता अनेको वर्षांनी कळून चुकले आहे. तरीही सिनेमाविश्वामध्ये जे काही घडते ते अचाट आहे, आणि म्हणूनच पैसावसूल मनोरंजन आहे! 


सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, जवान हा काही समाज प्रब्नोधनासाठी लोकांना जागृत करण्यासाठी वगैरे काढलेला सिनेमा नाही. ती त्याची झेपच नाही. इथले राजकारणी, उद्योगपती हे वाईट्ट, दुष्ट्ट आणि कसल्याही नितीमूल्यांकी पर्वा न करणारे आहेत हे ठरवून टाकले, की मग तुरुंगामध्ये असणार्‍या सर्व बाया या निरपराधीच आहेत हेही लगेच ठरवता येऊ शकते. व्यवस्था भ्रष्ट कशी आहे हे म्हणयचे, तर  आपल्याला त्या व्यवस्थेमधून मायनस करून टाकायचे, सामान्य माणसाच्या  हातात काहीही पॉवर नाही हे वारंवार ठासून सांगायचे, दुष्ट लोकांचा खातमा करायचा आणि. मग सरतेशेवटी, निवडणुका आणि डेमोक्रसीवर भाष्य देऊन सामान्य माणसेच तारणहार असल्याचे सांगितले की संपला सिनेमा. याचसोबतीला, प्रत्येक प्रसंगाला डोळे पुसणारे अधिकारी, बायाबापडे, सर्वसामान्य प्रेक्षक आणि अधीमधी कधीतरी व्हिलनही असले की इमोशनल अ‍ॅंगल पूर्ण. मग लव्हस्टोरी, गाणी, नायकावर होणारे करुण अत्याचार. वगैरे सर्व मालमासाला योग्य प्रमाणात घातलं की काम झालं. ज्या सिनेमामध्ये इव्हीएम हायजॅक केले की, निवडणुका होऊ शकत  नाहीत तिथे कसलं आलंय डोंबलाचं समाजप्रबोधन आणि सरकारविरोधी भाष्य! 


शाहरूख खानच्या चेहर्‍यावर वय दिसते म्हणायला आता काही अर्थ नाही. पण अठ्ठावन्नाव्या वर्षी त्याचा स्क्रीनवरचा वावर मात्र अद्याप विशीच्या तरूणासारखाच आहे. बाप रोलमध्ये तर त्याने धमाल उडवून दिली आहे. नयनतारा डेशिंग दिसते, पण साऊथच्या सिनेमामध्ये हीरोला वावरायला जागा दिली की नायिकेला गप्प बसावं लागतं, तेच इथे घडते. दिपिका पदुकोणचा रोल कॅमिओ म्हणवण्याइतका क्षुल्लक नाही आणि नायिका म्हणवण्याइतका मोठा नाही. पण ती विलक्षण सुंदर दिसते आणि कमी मेकपमधला तिचा लूक सुरेख जमला आहे. सिनेमा खर्‍या अर्थाने खाऊन जातो तो मात्र विजय सेतुपती. आउट अ‍ॅंड आउट व्हिलन असल्याचा पुरेपूर फायदा त्याने उठवला आहे. अगदी जाणवेल इतपत तामिळ छापाची हिंदी बोलत असूनही त्याचे संवाद खर्‍या अर्थाने जान आणतात. सिनेमा बघायचाच असेल तर शाहरूख अणि विजय सेतुपतीच्या जुगलबंदीसाठी अवश्य पहायला हवा. 
गाणी विस्मरणीय आहेत. (अ मुद्दाम लिहिला नाहिये!!) अ‍ॅक्शन सीन खूप सफाईने आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहेत. हॉस्पिटलमधला हेलिकॉप्टरचा सीन तर अगदी श्वास रोखून धरायला लावण्याइतका थरारक झाला आहे. 


जवानची अजून एक गम्मत म्हणजे या फिल्ममध्ये अनेको फिल्मचे रेफरन्सेस येतात. अगदी लाल कि निळी गोळी इथपासून ते शाहरूखच्या स्वत:च्या मै हू ना, चक दे इंडिया, स्वदेससारख्या सिनेमाचे धमाल रेफरन्सेस येत राहतात. लायन किंग (शाहरूख आण आर्यन खानने डब केलेला सिनेमा!) मनी हाइस्ट, डार्क नाइट सारखे अनेक देशीविदेशी सिनेमा आठवत राहतात. सिनेमाचा शेवट धूम 2 ची थेट आठवण करून देतो. फीमेल एम्पॉवरमेंट, सोशल जस्टीस, समानता यासारखे अनेक समाजकारणी पैलूंना सिनेमा एकेकदा स्पर्श करून येतो. मला स्वत:ला आवडलेली गोष्ट म्हणजे, सिनेमा फक्त नॉर्थच्या पट्ट्यात अडकत नाही, इशान्य भारत ते केरळ ते महाराष्ट्र ते कश्मिर अशा अनेक भागांमधले लोक दाखवत राहतो. चोप्रा जोहरनी दाखवलेला पंजाबी आणि युपीकडचा उच्छाद आता साहवत नाही, त्यापेक्षा साउथ अतिरंजितपणा परवडला. शाहरूखवर कायम लावलेला आरोप म्हणजे, तो प्रत्येक सिनेमात शाहरूख खान म्हणून वावरतो. इथे (यापूर्वी पठाणमध्येही) त्याने या आरोपाला पद्धतशीररीत्या उत्तर दिले आहे. 


दाक्षिणात्य अ‍ॅटलीच्या सिनेमाविश्वामध्ये शाहरूख अतिशय कंफर्टेबली वावरतो आणि रोमान्सचा राजा इथल्या अ‍ॅक्शनसिक्वेन्समध्येही जबरदस्त काम करतो. वय वर्षे अठ्ठावन्न असतानाही, "जवान" नावाच्या सिनेमामध्ये काम करायला धारिष्ट्य लागतं. आणि कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते धारिष्ट्य शाहरूखने दाखवलेले आहे. यापुढेही त्याने असे वेगळे काहीतरी रोल करावेत. स्वप्रतिमेच्या पूजनामध्ये अडकू नये इतकीच इशचरणी प्रार्थना. 

No comments:

Post a Comment