Wednesday 1 June 2022

केके!!

काल रात्री केके गेल्याची बातमी आली आणि मन किंचित सुन्न झालं. माझा अतिशय आवडता सिंगर. तितकाच अंडररेटेड. 


त्याच्या गाण्यांवर दोन फेसबुक पोस्ट लिहिल्या होत्या. त्या आता इथे डकवून ठेवत आहे. 


नंदिनी देसाई 


*11 जून 2020* 


आज रत्नागिरीत मॉन्सूनची एंट्री झाली आहे. मॉन्सून कधीच गडगडत लखलखत येत नाही. काळेकरडे ढग आकाशाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत निवांत पहुडलेले असतात. आसमंतामध्ये एक शांतता दरवळलेली असते. कधीही कुठल्याहीक्षणी तो बरसायला लागतो. संततधार. एकसलग. 

पण तो बरसेपर्यंत मात्र, मन नुसतं कुंद कुंद झालेलं असतं. साचल्यासारखं. तिथंच अडकल्यासारखं. पण थोड्याच वेळात पाऊस बरसणार असतो. अभी मुझ में कही थोडी बाकी है जिंदगी असं ऐकवत. 


पण तो पाऊस बरसेपर्यंत काय? 

अशावेळी कानात आपसूक वाजतो केकेचा आवाज. केके हा बॉलीवूडमधला अत्यंत अंडररेटेड सिंगर आहे, हे आमचे आधीचेच मत पुन्हा एकदा इथं या निमित्ताने नोंदवून घेतो. पण त्याचवेळी, केकेचा आवाज मला अनेकदा “माझा” स्वत:चा आवाज वाटलेला आहे. त्याने गायलेली कित्येक गाणी जणू माझ्यासाठीच लिहिलेली आहेत असं वाटत राहतं. 

आज नेमकं याच मूडमध्ये रोगमधलं हे गाणं वाजायला लागलं. 


बेचारा कहाँ जानता है, खलिश है या खला है 

शहरभर की खुशी से ये दर्द मेरा भला है 

जश्न ये राझ ना आये, मझा तो बस गम में आया है 


हेच तर मी अनेकदा स्वत:ला अनेकदा समजावत आलेली असतेच की. नेमकं काय शोधतोय आपण? काय हरवल्यासारखं वाटतंय? कशासाठी आयुष्य हे असं ओकंबोकं आणि सुनंसुनं आहे. जेव्हा प्रत्येक जण त्याच्या कोषामध्ये खुश खुश असतो, तेव्हा कुठलीतरी जुनीपुराणी जखम घेऊन तीच कुरवाळत बसायची मला हौस. माझ्या एका जवळच्या मित्राच्या भाषेत सांगायचं झालं तर, “रस्त्याने जाणारं मढं माझं म्हणायचं आणी रडत बसायचं” पण यात जेन्युइन प्रॉब्लेम असा असतो, की मढं भलेही माझं नसेल. पण डोळ्यांतून येणारं पाणी तर खरं असतंच ना. आठवणींचे होणारे हल्ले हे तरी खरे असतातच ना. त्याचं काय!!! 


भट कॅम्पमधला रोग नावाचा हा पिक्चर. इरफान खानचा पहिला मेनस्ट्रीम बॉलीवूड पिक्चर. नायकाची सगळी तगमग त्यानं डोळ्यामधून दाखवलेली आहे. एम एम क्रीमरचे संगीत हे कायमच एका अर्थाने टिपिकल पण त्याचवेळी कुठल्याही साच्यात न अडकवता येण्यासारखं. या अशा काही गाण्यांमध्ये त्यानं तो संथ तरीही डोहासारखा खोलपणा दिलेला आहे, तो निव्वळ अनुभवण्यासारखा आहे. हेडफोन लावून शांत, सुकूनमध्ये ऐकायची गाणी आहेत की. त्याचवेळी, बॉलीवूडमधून झपाट्याने गायब होणारी अजून एक गोष्ट म्हणजे, अर्थपूर्ण गाणी. या गाण्यामध्ये काव्य आहे, काहीतरी आर्थ आहे, आणि त्या सिनेमाशी ते गाणं कुठेतरी जोडलेले आहे- म्हणून असेल पण हे गाणं कधीही ऐकताना केकेचा आवाज, निलेश मिश्राचे शब्द आणी इरफानचा चेहरा असं सारं या पावसाळी करड्या रंगामध्ये सामोरं येत जातं. 

एखादं शांत सरोवर पहुडलेलं असावं, कुणीतरी एखादा खडा फेकावा आणि त्या सरोवरामध्ये तरंग ऊठावेत तशी मनाची अवस्था होते हे असं काहीतरी ऐकलं की. नको त्या आठवणींचे फेर धरून सोबत घुमायला लागतात आणि मग नजर धूसर करत जातात. 

नशीब इतकंच की तेव्हा बाहेर पाऊस कोसळायला लागलेला असतो, आणि आपल्या नजरेमधलं पाणी कुणालाच दिसत नाही. 

#आजचेगाणे 

#नंदिनी 

>>>>>>


01-04-2017 


आज सकाळी हे गाणं शेअर केलं तेव्हाच लिहिणार होते,पण प्रापंचिक जबाबदार्या् खुणावत होत्या! तरीही, दिवसभर हे गाणं मनांत वाजत राहिलंच. गुझारिश माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, आणि भन्साळीचा हा पिक्चर फ़्लॉप पिक्चर असूनही त्याचा वन ऑफ द बेस्ट आहे. सगळीच गाणी आवडती असली, तरी जाने किसके ख्वाब अधिक जवळचं आहे. 


केकेचा आवाज फार कमी ऐकू येतो हे एका अर्थाने बरंच आहे. टिपिकल पंजाबी ठेक्यावरच्या पार्टी गाण्यांमध्ये ऐकून ऐकून त्याच्या आवाजामधला तो स्पेशल धारदारपणा गायब व्हायची भितीच वाटते. या गाण्याच्या  शब्दांमध्ये अतोनात दर्द आहे, पण त्याचबरोबर एक आशेची सोनेरी किनार आहे. हे सगळं काही केके त्याच्या आवाजामध्ये पेलवू शकतो. 


एकेकाळी, स्टेज गाजवणारा जादूगार आणि गेल्या चौदा वर्षांपासून अपंगांचं जिणं जगत असलेल्या इथनला आता मरायचं आहे. दुसर्यााच्या दयेवर जगण्याचा मनस्वी कंटाळा आलेला आहे. अतिशय कुशाग्र बुद्धी असूनही मानेखालचं लुळं पडलेल्या या इथनला स्वप्नं तरी कसली पडणार!! गत आयुष्यामधल्या अनेक फोटोफ्रेममधून झळकणारा तो हसरा, जगज्जेता चेहरा आता सुकत चालला आहे, तरीही उशीखाली कुणीतरी रोज स्वप्नं मात्र ठेवतंच आहे.  मरण्याची- हे आयुष्य संपवून पुढच्या प्रवासाला निघायची अतोनात हौस असतानादेखील काहीतरी क्षीणमात्र का होईना त्याला या इथल्या जगण्याशी बांधून ठेवतंय! सुन्यासुन्या नजरेसमोर तो स्वत:लाच पाहतोय.. असा लुळापांगळा नाहीतर आधीसारखाच! त्याचं शरीर त्याची साथ देतंय. तो प्रेक्षकांसमोर असलेला कलाकार आहे. त्याच्या स्वप्नांशी खेळण्याचा त्याला अजूनही हक्क असल्यासारखा तो स्टेजभर बागडतोय. स्वप्नांचा भलामोठा बुडबुडा सोबत ठेवून त्याच्यासोबत खेळतोय. प्रकाशाच्या वाटेवर उडत जाण्याची आकांक्षा, ऊनसावलीच्या खेळामधला लपंडाव, आपल्याच शरीराचे मुक्त अविष्कार, सगळंसगळं काही अनुभवतो आहे. त्याच्या नजरेसमोर स्वप्नांची ती आतिषबाजी होते. अखेरीस, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि तो स्वत:शी प्रसन्नपणे हसतो. हेच तर हवं असतं नाही का कलाकाराला?


#आजचेगाणे 

- नंदिनी देसाई


- नंदिनी देसाई