Tuesday 20 December 2016

रहे ना रहे हम (भाग २२)


मी साधारण पाचवीला असताना आईनं ठरवलं की मी यापुढे तिच्या बेडरूममध्ये झोपायचं नाही. बाबा तर तेव्हा रात्रीचा कधी नसायचाच त्यामुळे मला आठवतं तसं आई आणि मी एकाच बेडवर झोपायचो. मग पाचवीनंतर आई म्हणाली की तू आजपासून तुझ्या खोलीमध्ये झोपायचं, तोपर्यंत माझी खोली ही केवळ मला पसारा करायला, खेळायला वगैरे कामांसाठी आहे  असा माझा समज होता. इतकं आठवतंय की त्याआधी आईबाबाचं भांडण झालं होतं. आता ते भांडण कशामुळे झालं ते लक्षात आलंय पण तेव्हा ते समजायची अक्कल नव्हती. आईनं हा हुकूम काढलं तेव्हा मला काय इतकं वाटलं नाही कारण, मला झोप लागेपर्यंत आई माझ्याच खोलीमध्ये मला झोपवायची, काहीतरी गोष्टीबिष्टी सांगत. रात्री मला कधीतरी जाग आली की मी सरळ बेडवरून खाली उतरून आईच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचे. बाबा बहुतेकदा नसायचाच. अजून कधीतरी मला रात्रीअपरात्री स्वप्नांत असं वाटतं की मी माझा तो मिकी आणि मिनीमाऊसचा पांढरा नाईट पायजमा घालून माझ्या बेडवरून खाली अंधारातच उडी मारतेय आणि तशीच दुडूदुडू धावत जाऊन आईच्या बेडवर  चढतेय. झोपेतच आई मला जवळ घेतेय, माझ्या केसांमधून हात फिरवून मला कुशीत घेऊन थोपटतेय.   
पुढे जसजशी अक्कल आणि शहाणपण वाढत गेलं तसं “माझी खोली” या गोष्टीला माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड अस्तित्व मिळालं. कंप्युटर आल्यापासून तर अतिच. मग मी आईच्या खोलीत जाऊन झोपणं बंद केलं, नंतर तर मला माझ्या खोलीमध्ये कुणी आलेलं पण आवडायचं नाही. कविता येऊन रोज घर झाडून-पुसून जायची, अकरावी-बारावीला असताना तर मी घरात नसेल तर तिलाच काय आईलापण माझ्या खोलीत जायला बंदी केली होती. तेव्हापासून मी कायमच घराबाहेर पडताना माझ्या खोलीला कुलूप लावून बाहेर पडायचे. आता मुंबईला हॉस्टेलला आल्यापासून ती सवय कमी झाली. तसं माझ्या खोलीमध्ये लपवण्यासारखं काय फार मोठं सिक्रेट नसायचं पण तेव्हा प्रायव्हसी जपणे हा फार मोठा विषय होता.
आफताब माझ्यासोबत रहायला आल्यानं पहिल्यांदा सुरूंग लागला तो या गोष्टीला. माझ्या खोलीमध्ये, बेडवर, कपाटामध्ये, बाथरूममध्ये एकूणच आयुष्यामध्ये चोवीस तास इतर कुणीतरी सतत आहे, फिजिकली नसेल तरी त्याच्या वस्तूंमुळे ही गोष्ट मला फार ओव्हरव्हेल्मिंग वाटत होती. बाथरूममम्ध्ये त्याचं शेव्हिंग किट मला सतत खुपायचं. तशी चिडायची गरज नाही हे मलाही समजत होतं तरीही “माझ्या” वस्तूंसोबत इतर वस्तू ठेवलेल्या मला चालायचं नाही. शेअरिंगची सवयच नव्हती...
लतिकासोबत हॉस्टेलमध्ये राहताना तशी थोडाफार सवय झाली होती. तरीही खोलीचा तिचा भाग स्वतंत्र, माझा स्वतंत्र. एकाच खोलीमध्येही आम्ही वेगवेगळ्या होत्या. पण आता तीच सेम परिस्थिती नव्हती. रात्रभर आपल्या बेडवर दुसरं कुणीतरी झोपलंय हे फारच वैतागवाणं फीलिंग असतं. हेकाय मी त्याला बोलून दाखवलं नाही,पण तरी त्याला लक्षात आलं असावं, तो बहुतेकदा काहीतरी वाचत किंवा लॅपटॉपवर काम करत हॉलमध्येच झोपायचा.  
त्यानं आयुष्याची पहिली बरीच वर्षं भावांच्या रूममध्ये एकत्र काढली होती. नंतर आमच्या बाजूला रहायला आल्यानंतर जरी घर भलंमोठं असलं तरी कायम येणारेजाणारे लोक, नातेवाईक यामुळे तो एकटा असा फारसा राहिलाच नाही. आणि राहिला तरी सगळं स्वत:चं स्वत: करता येण्यासारखं असल्यामुळे त्याला याचा फारसा त्रास होत नसावा. कदाचित झालाही असेल, पण मी विचारलं नाही. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा वाटलं की आम्ही कित्त्त्ती वेगळे आहोत. आमचं काहीही जमण्याची शक्यता नाहीच, पण आज इतक्या वर्षांनी त्याचा सततचा सहवास म्हणा किंवा दोघांची वाढलेली मॅच्युरीटी लेव्हल म्हणा आमचे छोट्यामोठ्या गोष्टींवर खटके फार कमी उडायला लागले.
या लिव्ह इनमुळे मला मी किती मोठा मूर्खपणा एकेकाळी केला असता याची जाणीव व्हायला लागली. एखादा पुरूष जेव्हा चोवीस तास तुमच्यासोबत रहायला लागतो तेव्हा काय मेजर झोल होतात. शिवाय, सगळं बाडबिस्तारा नेऊन दुसर्‍याच्या घरात जाऊन रहायचं, आणि तिथंच ऎडजस्ट करायचं ही कसली भयंकर पद्धत आहे. नवीन पार्टनर, नवीन घर, नवीनच “अहो” आईबाबा आणि एकूणातच सगळंच काही नवीन नवीन. या घरामधले लोकं ब्वा आपल्या घरी ही नवीन मुलगी आली आहे, आपण जरा ऍडज्स्ट करू वगैरे कशाचा विचार करत नाहीत. पण त्या मुलीनं मात्र या कंप्लीट नवीन ठिकणी जमवून घ्यायचं, वेळ पडेल तसं स्वत:च्या बेसिक सवयींनादेखील मुरड घालायची आणि ऍडजस्ट व्हायचं! झोपायचं कधी उठायचं कधी हे त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरणार. त्यांच्या पद्धतीने जेवायचं, चहा त्यांच्या पद्धतीने आणि टॉयलेटचं शेड्युलपण त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरवायचं!! या लग्न नावाच्या गोष्टीचं पोरींना इतकं भयंकर आकर्षण कशापायी असतं हो? म्हणजे एकेकाळी मलाही होतंच, पण आता अनुभवांती हे शहाणपण आलंय की “लग्न” या घटनेमध्ये काहीही ग्लॅमरस नाही!

त्याकाळामध्ये मी आणि तो माझ्या ऑफिस किंवा असंच सटरफटर याशिवाय जास्त कधी बोललोच नाही. बोलण्याव्यतिरीक्त ओठांना इतरही बरीच कामं होती हे गंमत म्हणून म्हणता येईल. पण प्रत्यक्षात तो अजूनही निधीमधून सावरला नव्हता. बोलताना कुठूनही विषय सुरू झाला तरी कसंही कुठूनही पोचून तिच्यापर्यंत येऊन थांबायचा.  तसं झालं की त्याची नजर एकदम फार कडवट व्हायची, बोलणं तर अल्मोस्ट थांबायचंच, मग लॅपटॉपमध्ये मेल्स चेक करणं किंवा लॅपटॉपवर जाऊन काहीतरी वाचत  बसणं. घरामध्ये एक भीषण शांतता.
प्रॉब्लेम हा होता की माझं त्याच्यावर इतकं प्रेम असतानाही मला त्याची ही अवस्था पुरेपूर पटत होती. केदार प्रकरणाच्या वेळी माझी हीच अवस्था झाली होती. त्यावेळी केदारच्या कानाखाली मारताना आफताबला नक्की काय वाटलं असेल ते मला आज जाणवत होतं. अर्थात आमच्या दोघांच्या प्रेमभंगामध्ये एक भलामोठ्ठा फरक मात्र होता.
 केदारचं लग्न झाल्याबद्दल ज्याक्षणी मला समजलं त्याक्षणी मी आमच्या नात्याचं श्राद्ध उरकून मोकळी झाले. एका निमिषार्धात मी आणि केदार आता या जन्मात एकत्र येऊ शकणार नाही हे मला कळून चुकलं पण आफताब मात्र, अजून निधीला विसरला नव्हता. मनाच्या एका कोपर्‍यामध्ये अजूनही कुठेतरी ती परत येईल याची त्याला प्रचंड आशा होती. दिवसाच्या कुठल्याही वेळेला वाजलेला मोबाईल, मेसेजचा टोन, असो नवीन इमेलचं नोटिफिकेशन “कदाचित निधी असेल” हा विचार त्याच्या मनामध्ये चमकून जायचा, हे त्यानं मला कधी सांगितलं नाही, पण मी आणि तो एकमेकांना इतके ओळखून होतो की मला ते आपसूकच समजलं होतं. निधी खरंतर युएसला गेली होती, जाताना तिनं कुणालाही तिचा पत्ता, मोबाईल नंबर इतकंच काय पण ईमेल आयडीपण दिला नव्हता. तिच्या कॉलेज फ्रेंड्सपैकी अगदी चारदोन जणांशीच तिच संपर्क होता आणि त्यांच्यापैकी कुणीही या “गावगुंड मवाली” पोराला तिचे कॉंटॅक्ट डीटेल्स दिले नसते.
मला ना निधीचं याबाबतीत जाम कौतुक वाटतं. कसं व्यवस्थित प्लानिंग केलं या पोरीनं. आधी आफताबला जाळ्यात अडकवला, मग सहासात वर्षं त्याच्यासोबत राहून स्वत:च्या सर्व शारिरीक, मानसिक आणि भावनिक गरजा भागवल्या. (थोड्याफार आर्थिकसुद्धा.). मात्र हे करताना स्वत:च्या सामाजिक इज्जतीला तिनं जरासुद्धा धक्का लागू दिला नाही. आयमीन, मी वसीमसोबत केवळ फ्रेंड म्हणून असताना सुद्धा गावभरात माझा लौकिक मुसलमानाच्या सोबत फिरणारी असा झाला आणि हिनं मुसलमानाचा बॉयफ्रेंड इतकी वर्षं ठेवूनसुद्धा ही मात्र “चांगल्या कॅरेक्टरची”. शिवाय ऍडिशनल बोनस म्हणून तिच्या घरदारच्या लोकांसाठी आफताबसारखा शिकलासवरलेला मुलगासुद्धा गुंड म्हणून कन्व्हिन्स करण्यात ती कामयाब झाली. हे असं एका क्षणात नातं तोडण्ं जमतं कसं या लोकांना?
त्याकाळी मी आणि आफताब फार जवळ आलो, पण तरीही कुठेतरी एकमेकांपासून दूरच राहिलो. या नात्याचं भविष्य काय, नावपण आम्हाला माहित नव्हतं. त्याच्या मनामध्ये या नात्याला काय स्थान आहे ते मला व्यवस्थित माहिती होतं, याहीआधी निधीचा आणि त्याचा ब्रेकप जेव्हा कधी झालाय, त्यानं लगेच असं दुसरं एखादं नातं जोडलंय, पण निधी परत आली की तो कायम तिच्याचकडे गेलाय. पूर्वी मला माहित नसलेल्या अशा कुणीतरी होत्या, आता मी होते. यानं त्याला काय फरक पडला असता! मी मात्र या औटघटकेच्या संसारामध्ये समाधान मानत होते.
तोही हळूहळू सावरत होता, मुद्दाम त्याला थोडं अजून रीलॅक्स वाटावं म्हणून मी माझ्या ग्रूपमध्ये त्याला घेऊन जात होते. माझ्या अख्ख्या फ्रेंडसर्कलमध्ये मी त्याची ओळख करून दिली. आमच्यासोबत वीकेंडला मूव्हीज डिनर किंवा इतर आऊटिंगमध्ये तो पण सामिल झाला. सर्वांनाच तसा तो खूप आवडला, आशीशखेरीज!  
आशिष अतिशय दुखियारी आत्मा होता. त्याचा काय प्रॉब्लेम होता माहित नाही, पण तो कायम दोन विभिन्न जगात असल्यासारखा वावरायचा. म्हणजे, आमच्यासोबत फिरायला, पिक्चर बघायला त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यातही कधी चान्स मिळालाच तर इकडेतिकडे हात लावून घेणे, नको तिथं टक लावून बघणं वगैरे चीप उद्योगपण करायचा. पण त्याच्या बहिणींबद्दल एक शब्द बोललेला त्याला सहन व्हायचं नाही. बहिणीच कशाला? भारतीय संस्कृतीमध्ये जे काय महानोत्तम आहे ते सर्व काही त्याला पूजनीय होतं. अपवाद फक्त आमच्यासारख्या एकट्या स्वतंत्र मुलींचा. देबजानीला त्याने “मी अधेमध्ये तुझ्या फ्लॅटवर येऊका विचारलं होतं. तिनं एच आरच्या सीनीअरकडे कंप्लेंट केली होती. तरी आशिष वठणीवर काही आलाच नाही. त्यानं मला याआधी टोमणे मारले होते आणि वरकरणी गोड बोलत काय घाण कमेंट्स पास केल्या होत्या. आता मी आफताबसोबत असल्यावर तर चेकाळल्यासारखा काहीही बोलायचा. आम्ही बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. एकाच ऑफिसमध्ये असल्यानं त्याला तसंही टाळता यायचं नाही. आशिष स्वत: एकदम कर्मठ घरामधला होता. त्याच्या बहिणींनी इतर फॅशनचे कपडे राहू देत, बिनाओढणीचा सलवार सूट घातलेलं पण चालायचं नाही. बाय द वे, त्याला चार मोठ्या बहिणी आणि नंतर झालेला हा पाचवा वंशाचा दिवटा. आताच्या या जगामध्ये पण असले फॅमिलीज आहेत हे एक आश्चर्यच म्हणायचं.
तर आम्ही बाहेर गेलेले असताना हे आफताब व्हर्सेस आशिष कायमच घडायचं. आशिष सतत त्याच्याशी हिंदीत बोलायचा. ग्रूपमध्ये तसे नॉनमराठी लोक बरेच होते, पण आशिष मुद्दाम आफताबसोबतच हिंदी बोलायचा. तेपण “तुमको ये पिक्चर नाही देखने का तो हम काय करे?” टाईप हिंदीचा मुडदा पाडत!
एकदा आम्ही सर्वजण वीकेंडला लंचसाठी वाशीला भेटलो होत. सर्वजण म्हणजे ऑफिसचे सर्वजण. शिवाय मी आफताबलाही सोबत घेतलं होतं. लंचनंतर आम्हा दोघांचा प्लान जब वी मेट परत बघण्याचा होता. कधीनव्हेते, मला आणि त्याला दोघांनाही एकच पिक्चर बेहद आवडला होता. आर्थात, त्याला जबवी मेट आवडण्याची कारणं वेगळी होती, माझी कारणं वेगळी. त्याला खासकरून करीना कपूर फार म्हणजे फार आवडली होती. पहिल्यांदा पिक्चर पाहिला तेव्हा तो मला म्हणाला, “ही एकदम निधीसारखंच कॅरेक्टर घेतलंय, हो ना?”
आसपास भिंत नव्हती म्हणून अन्यथा मी दाणदाण डोकं आपटलं असतंच. निधीनं तुला सोडून दुसर्‍या कुणाशीतरी संसार मांडलाय हे या शहाण्याला कधी कळणार. अर्थात, मला अख्खा पिक्चर आवडला तो शाहिदच्या एका डायलॉगसाठी. ते नाही का, ट्रेनमध्ये ती विचारते “तुम मुझे पसंद करते हो ना?”
त्यावर तो इतकं मस्त समजूतदार उत्तर देतो. “हा! पर तुम्हे टेन्शन लेने की जरूरत नही है. वो मेरा प्रॉब्लेम है” इतके डझनावारी हिंदी आणि इंग्लिश रोमँटिक पिक्चर पाहिलेत, पण फार कमी वेळा ऑन स्क्रीन इतका समजूतदारपणा बघायला मिळालाय.
पिक्चर पाहून आल्यावर लंचदरम्यान ऍडमिनची हरिनी तिचा काहीतरी स्केरी एक्स्पीरीयन्स सांगत होती. “मी अशी रोडवरून जात होते. तर माझ्यामागे एक व्यक्ती. मला तो कोण ते माहितच नाही. तो व्यक्ती माझ्यामागून येत होता”
आम्ही सगळे टोटल गुंगून हे ऐकत असताना मोबाईलमध्ये काहीतरी वाचत असलेला आफताब मध्येच म्हणाला. “ती व्यक्ती”
हरिनी या मध्येच बोलण्यानं टोटल गोंधळली. “नाय रे. माणूसच होता. अंधार असला तरी तेवढा समजतंच ना”
“माणूस.. आय मीन, पुरूष असेल. पण व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे तो व्यक्ती चूक” आफताब ठामपणे म्हणाला.
वास्तविक यावर हरिनीने “ओके” म्हणून तिची गोष्ट पुढे सांगायला सुरूवात केली. पण आशिष तडमडला.
“पण जर तो पुरूष असेल तर तो व्यक्ती म्हणणं बरोबर आहे. मराठीमे तो ऐसेही बोलते है”
“नोप. तो पुरुष, ती स्त्री, तो माणूस, ते बाईमाणूस आणि ती व्यक्ती, मराठी व्याकरणाचं कुठलंही पुस्तक उघडून बघ. हेच दिसेल.”  
“ओह. मराठी व्याकरण ऍंड ऑल दॅट हा? मला वाटलं तुझी मातृभाषा उर्दू असेल”
“मी काय युपी लखनौचा आहे का? पुण्यात अर्धं आयुष्य गेलंय. माझी मातृभाषा मराठीच”
 “पण मदरश्यामध्ये अरेबिकच शिकवतात ना?”
“हो शिकवतात, पण मी मुळात मदरश्यामध्ये शिकलो नाहीये. मला अरेबिकमध्ये प्रार्थना करता येते. पण त्याचा अर्थ असा नाही की, ती माझी बोलीभाषा आहे. लहानपणापासून जी भाषा माझ्या कानांवर पडली, मी ज्या भाषेत पहिले शब्द उच्चारले, ज्या भाषेची बडबडगीतं माझ्या आईनं मला शिकवली ती माझी भाषा” अशारितीनं अतिशय शांत शब्दांमध्ये आफताबनं आशिषचा खातमा केला. त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. इतक्या शाब्दिक मारानंतर आशिष अर्थातच गप्प बसणार्‍यांमधला नव्हता पण सुदैवानं ग्रूपमधल्या देबजानीनं इथून पुढं विषय बंगाली आणि तमिळवर नेला. तिचा बॉयफ्रेंड तमिळ होता, त्यांच्याकडे तर हा भाषिक अस्मितेचा प्रश्न चांगलाच धगधगता होता.  त्या दिवशी ग्रूपमध्ये अख्खी संध्याकाळ आम्ही भाषा या विषयावर चर्चा करण्यात घालवली.
मात्र, या प्रसंगांनंतर आशिष दरवेळी मला ऑफिसमध्येही काहीबाही ऐकवू लागला होता. माझ्या अपरोक्ष तर तो माझा उल्लेख घाणेरड्या शिव्यांनीच करायचा ही गोष्टसुद्धा माझ्या कानावर आली.
अर्थात त्यानं मला फारसा काही फरक पडत नव्हता! मी आता आफताबशिवाय जगणं या कल्पनेचा विचारदेखील करू शकले नसते. पण अखेर काही झालं तरी मामला अजूनही एकतर्फीच होता. “वो मेरा प्रॉब्लेम है, किसी और को टेन्शन लेनेकी जरूरत नही है!”

>>>>>>> 
 ऑफिसच्या ऍडमिनकडून मेल आली होती की यंदा ऑफिस डे सेलीब्रेशनसाठी सर्वांनी ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायचं. आमच्याकडे तमिळ, बंगाली, तेलुगु, मराठी, गुज्जू, पंजाबी (गूडनाईटच्या कागदावर जितक्या भाषा लिहिलेल्या असतात ते सर्व) लोकं असल्याने साहजिकच या ट्रॅडिशनल डेचं फारच कौतुक सुरू झालं. कोण काय घालणार? कुणाची जोडी कुणासोबत. शॉपिंगला कुठे जायचं. एक्सेसरीज काय घ्यायच्या. असं बरंच काहीबाही. ऑफिसमधले दिवसच्या दिवस या चर्चेमध्ये जात होते. मी जोधा अकबर लूक करायचं ठरवलं.. पिक्चर नुकताच पाहिला होता. मस्त लव्हस्टोरी होती, ऐतिहासिक वगैरे गोष्टींशी त्याचा फारसा संबंध नसेल, (म्हणजे नव्हताच त्यावरून आफताबशी चिक्कार वादावादीपण झाली होती.) पण मला पिक्चर आवडला. फिक्शन म्हणून बघायचं तर एका राजकन्येच्या मनाविरूद्ध झालेल्या विवाह, आणि ज्या संस्कृतीशी तिचा अजिबात संबंध नाही, तिथे तिने ऎडजस्ट करण्याचा प्रयत्न, सोबत अधेमध्ये नवर्‍याने दिलेली साथ किंवा कधीतरी रागामध्ये सोडलेली साथ. मध्येच उफाळून येणारा टिपिकल मेल इगो. शिवाय दोन्ही प्रेमिकांमध्ये व्हिलनगिरी करणारे बाहेरचे कुणी नव्हे, तर घरातलेच घरफोड्ये. एखादी आदर्श प्रेमकहाणी असावी अशी ही गोष्ट. पण सर्वांत मॊठा प्लस पॉइंट म्हणजे, उघड्या अंगानं तलवारबाजी करणारा ह्रितिक!!
विषय भरकटला... पण आता मुद्दा होता, जोधाच्या लूकचा.
एकतर मला तो कुंदनचा भलामोठा सेट फार आवडला होता, शिवाय माझ्याकडे सागरदादाच्या लग्नासाठी शिवलेला रेड घागरा पण होता. परफेक्ट लूक झाला असता. मी अंधेरीला एका दुकानांत तो कुंदनचा सेट बघितला तर फारच महाग होता, पण मला देबजानीने सांगितलं की क्रॉफर्ड मार्केट किंवा भुलेश्वरला एकदम स्वस्त मिळेल. पण मी त्या भागात कधीच फिरले नव्हते. देबजानीला माझ्यासोबत ये म्हटलं तर म्हणाली, “आफताब को लेके जाव. वो सब उन लोगोंका एरिया है” मी लगेच तुणतुणं आफताबसमोर वाजवलं.
“अजिबात नाही” लॅपटॉपवर काहीबाही खडबडवत  नजर स्क्रीनसमोरून न ढळवता इतकंच उत्तर आलं.
“पण का?” परत कीबोर्डची लटपटकटपट! मी तोच प्रश्न दोन तीनदा विचारला.
अखेर मेलच्या सेंडवर क्लिक झालं आणि नजर उठून माझ्यावर स्थिरावली. डाव्या हाताने चष्मा सावरला, आणि मग निवांत उत्तर आलं.
“मला त्या गर्दीत फिरायला आवडत नाही. चीप वस्तू मिळतात म्हणून मी तीन तास त्या गर्दीत घामेजत भटकणार नाही” या व्यक्तीला शॉपिंगचा अर्थच कळत नाही खरंतर. पण मी काही बोलायच्या आत, “दुसरं म्हणजे तो बटबटीत सेट तुला अजिबात चांगला दिसणार नाही” असा निकाल!! नजर परत लॅपटॉपकडे आणि किबोर्डची लटपटलटपट चालू.
“मग मी काय घालू? माझ्याकडे ट्रॅडिशनल डेमध्ये घालण्यासारखा तोच एक ड्रेस आहे. बाकी सर्व फॉर्मल”
“नऊवारी नेस ना”
“काय? वेड लागलंय का? ऑफिसला जायचंय, मला सांभाळता येत नाही. एकदाच कॉलेजच्या फंक्शनला नेसले होते. हालत खराब झाली होती. आठवतंय?”  
पण आता काही उत्तर येणं शक्य नव्हतं कारण, आफताबमहाराज परत स्वत:च्या एक्सेलशीट गुहेमध्ये तपस्येला बसले होते. एकवेळ मेनका येऊन नाचली म्हणून अख्खी बिल्डिंग जागी होईल, पण जोवर समोरची एक्सेलशीट निस्तरत नाही तोवर त्याची नजर हालणार नाही. त्याच्या लॅपटॉपसमोरच मी माझं पुस्तक वाचत बेडवर लोळत पडले. थोड्यावेळानं अचानक गुणगुणण्याचा आवाज आला, मला वाटलं यानंच मीडीयाप्लेयरवर गाणं लावलं असणार, पण तो लॅपटॉपसमोरून उठला होता आणि माझ्या बाजूला बसला होता. हातातलं पुस्तक मीटून मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तोच गुणगुणत होता. “तू जो हसती है, तो बिजली सी चमक जाती है”
“हे काय?”
“विसरलीस? मै भला होश मे कैसे रहू”
“ओह! लक्षात आहे की. दिवसभर मला चिडवत होतास.”
“दिवसभर तुलाच बघत होतो. स्वप्निल, काय कातील दिसत होतीस”
“शटाप! काकूबाई दिसते म्हणून तूच म्हणत होतास”
“मग काय तुला केदारसमोर आणि निधीसमोर काय सेक्सी दिसतेस! आता याक्षणी तुला उचलून आपल्यासोबत कुठंतरी दूर घेऊन जावं आणि तुझ्यासोबत बेदरकार शृंगार उधळावा असं वाटतंय हे म्हणणार होतो का?”
“असं म्हणणार होतास का?”
“अल्लाकसम! एक्झाक्टली हीच भावना होती. त्यादिवशी पहिल्यांदा तू मला आवडलीस. म्हणजे मैत्रीण म्हणून नव्हे, एक मादी म्हणून. याआधी कसं कुणाबद्दलही वाटलं नव्हतं. टीनेजरमधले क्रश असो, वा गर्लफ्रेंड्स या सर्वांबद्दल असलेल्या आकर्षणापेक्षाही त्यादिवशी, त्याक्षणी तुझ्याबद्दल वाटलेलं ते आकर्षण आदिम होतं, रानटी होतं पण सच्चं होतं.”
त्याला माझ्याबद्दल असं कधी वाटलं असेल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. पण  तूर्तास हे वाटण घाटण जरा बाजूला ठेवू. “मी अख्खा दिवस तुझ्यासोबत होते, पण तुझ्या वागण्यांत जे जाणवलं नाही”
“देन आय ऍम अ गूड ऍक्टर. असंपण.. ही भावना चोवीस तास तुमच्या मनांत नसते. काही क्षणांपुरतंच वाटणारं अस्तं. जबरदस्त ओढ म्हण, वासना म्हण किंवा अजून काहीही ग्लोरीयस नाव दे. स्वप्निल, तुला खूप वेळेला पाहिलंय, पण त्या नऊवारी साडीमध्ये तू जे काही दिसलीस.” त्यानं माझ्या ओठांवर ओठ टेकवले.
दुसर्‍या दिवशी, मी देबजानीला हे सर्व सांगितलं, म्हणजे याच शब्दांत नव्हे पण साधारण. देबजानी आणि मी बर्‍याचदा असल्या बकवास गप्पा मारत बसायचो. तिचा बॉयफ्रेंड सध्या युकेला गेला होता. त्यांना लग्न करायचं होतं, पण स्वत:चा फ्लॅट झाल्याशिवाय करता आलं नसतं. म्हणूनच दोघंही पैसे साठवून साठवून ठेवत होते.
“पागल है क्या? तू तो फिर वो मराठी स्टाईल साडी पहन”
“मुझे नही आती”
“क्यु? वेस्टर्न स्टाएल तो अच्छी पहनती है” देबजानीच्या भाषेत आपण जी पाचवारी साडी गुंडाळतो ती वेस्टर्न स्टाईलची साडी. आता तशी मला नेसता येते. लतिकाने शिकवली होती. आईच्या भाषेत झाकायचं ते सगळं उघडं टाकून नेसायची ती साडी. सागरदादाच्या रिसेप्शनला मी वाईन कलरची साडी घेतली होती त्याचा ब्लाऊज इतका मस्त शिवला तरी आई “यामध्ये ब्रेसियर कशी घालायची?” टाईप मूलभूत प्रश्न विचारून मला सतावत होती. लारा दत्ता कींवा प्रियांका चोप्रा फार मस्त कॅरी करतात अशा डीझायनर साड्या.
“मराठी स्टाईल अलग रहता है. धोती के जैसे पहनना पडता है. फिरसे संभलनेमे बहुत प्रॉब्लेम. वो चाची ४२० मे कमल हासन देख कैसे पहनता है...”
बराच वेळ डिस्कशनावर डिस्कशन झाल्यानंतर अखेर रसिकाने (ती मध्येच आम्हाला जॉइन झाली होती) मार्ग सुचवला. तिची आईच्या मावशीच्या नणंदेची सून नऊवारी शिवून देते म्हणे- नात्यांचा इतका मोठा पिरॅमिड समजेप्र्यंत माझी इजिप्शियन ममी व्हायची. ते मरो. हे प्रकरण चांगलं होतं. आपण साडी फक्त पॅंटसारखी घालायची आणि पदर पिनप करायचा. हे फारच भारी आणि सिंपल काम झालं. लगेच रसिकाने त्या आ. मा. न. सूनेला फोन लावला आणि माझी मापं वगैरे सर्व काही मेसेजवर देऊन (त्यासाठी आम्ही दोघी वॉशरूमात मेजरिंग टेप घेऊन!!! ऎडमिनकडून टेप घेतल्याने हरिनी पण आमच्यांत सामिल) साडी फायनल केली.

अर्थात, मी ती साडी कम पॅंट ऑफिसच्या ट्रॅडिशनल डेला घातलीच नाही. मला हवा होता तसा जोधा लूकच केला होता. ती नऊवारी फक्त आणि फक्त आफताबसाठी... तो ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी सॉरी रात्री!! अति डिटेल्स द्यायची काही गरज नाही!! 


Sunday 20 November 2016

रहे ना रहे हम (भाग २१)

निधीच्या लग्नाची तारीख मला पक्कीच माहित आहे. एकवेळ ती किंवा तिचा नवरा विसरेल पण मी विसरणार नाही.. कारण त्या रात्री आफताब पहिल्यांदा माझ्या फ्लॅटवर आला. अर्थात त्या रात्री आमच्यामध्ये काहीच फिजिकल घडलं नाही. त्याला मैत्रीच्या आधाराची गरज होती, माझ्यासाठी माझ्या प्रेमापेक्षाही मैत्रीचं नातं जास्त महत्त्वाचं होतं. पण तरी त्यानंतर तो सतत येतच राहिला. कधी वीकेंडला तर कधी सुट्टी आहे म्हणून सहज. मग कधीतरी माझी आठवण आली म्हणून. हक्कानं तो येत राहिला आणि आमचं नातं तसंच वाढत गेलं.
नातं म्हणायला गेलं तर फार मोठी कन्सेप्ट होईल. मी आणि आफताब एकमेकांना ओळखतच होतो, अरिफच्या बर्थडेदिवशी एकमेकांना शरीरानंदेखील व्यवस्थित ओळखू लागलो आणि मग हळूहळू हीपण ओळख अधिकाधिक दृढ गेली. मला कधीतरी हे खरंच वाटायचं नाही की इतक्या वर्षांनी आफताबच्या ओठांवर निधीचं नाही तर माझं नाव होतं. माझी निधीसोबत काही इर्षा नव्हती. म्हणजे किमान सुरूवातीला तरी, नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की मीच आफताबच्या प्रेमात पडले आहे, त्तेव्हा कळत नकळत का होईना निधीचा जाम राग यायचा. ते साहजिकही होतं. निधीनं त्याच्याशी लग्न न करायला धर्म हे एकमेव कारण होतं (म्हणे!). गेली सात वर्षं त्याच्यासोबत फिरताना, झोपताना तिला या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही का? मला ती लग्नानंतर एकदा फक्त भेटली. गावी आली होती तेव्हा आमच्या दुकानामध्ये येऊन गेली.. त्यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा होता, त्यामुळे मला आफताबबद्दल काही बोलणं शक्य झालं नाही. तरीही “कशी आहेस? लग्नाचं काय ठरलं?” या तिच्या खवचट प्रश्नाचं उत्तर देताना मी पण तितक्याच खवटपणे सांगितलं “लवकरच ठरतंय, आमचे नेबर आहेत सुर्वे. त्यांच्याच धाकट्या मुलासोबत. तू पाहिलंयस ना त्याला? सीए झालाय तो?” मी बोलत असताना निधीचा चेहरा काय रंगला होता हे इथं लिहून मजा येणार नाही. त्यादिवशी हे उत्तर देऊन मी माझ्यापरीनं सूडाला पूर्णत्त्वाकडे नेलं होतं. पण तरी अखेर निधीचीच सरशी झाली!!! मला आणि आफताबला तिनं वेगळं केलंच.
पण ते फार नंतर! महत्त्वाचं काय तर अखेर, आफताब अंधेरीच्या फ्लॅटमधलं त्याचं सर्व सामान घेऊन माझ्या फ्लॅटवर रहायला आला. सामान म्हणायला होतं काय, ढीगभर पुस्तकं आणि दोन कपड्यांच्या बॅगा. हे पुरूषांचं एक बरं असतंय, आमचं झालं तर कपड्यांच्याच दहाबारा बॅगा भरतील. त्याला आता पुढची सीएफएची परीक्षा द्यायची होती. त्यासाठी चिक्कार अभ्यास करायचा होता आणि म्हणून त्यानं नोकरीमधून वर्षभर ब्रेक घेतला होता. परीक्षेशिवाय मुख्य कारण म्हणजे, निधी प्रकरणामधून आलेलं डिप्रेशन होतं. हे त्याला स्वत:लाही नीट माहिती होतं. त्याला पैशाचा तसा काही प्रश्न नव्हता. सीए म्हणून काही छोटीमोठी रीटर्न्स भरायची वगैरे कामं करून चाललं असतं. आता अभ्यास करण्यासाठी माझा फ्लॅट अतिशय निवांत म्हणून तो इकडे रहायला आला. म्हणजे,  खरंतर मीच त्याला तसं सुचवलं. आमच्या बिल्डिंगजवळ असलेल्या एका अतिशय महागड्या क्लासमध्ये सीए इंटरच्या मुलांना शिकवण्यासाठी त्याला जॉब आला. एखाद्याला “शिकवणे” याची त्याला इतकी आवड होती की, त्यानं पगार वगैरे कसलाही विचार न करता डायरेक्ट हो म्हणून सांगितलं. अर्थात पगार जबरदस्तच होता.
तो माझ्या घरी रहायला येईपर्यंत आईबाबाला यातलं काहीच माहित नव्हतं म्हणजे अधूनमधून येतो तेसुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे आमचं काही फिजिकल आहे हे समजायचा प्रश्नच नव्हता. केदारच्या वेळेला आईला सर्व समजल्यावर तिनं माझी बरीच खरडपट्टी काढली होती. त्यात नेहमीचे “स्त्रीची अब्रू काचेचं भांडं” वगैरे फिल्मे डायलॉग तर होतेच. त्यामुळे मी हा मामला तिच्यापासून जरा लांबच ठेवला. तसे हल्ली आईबाबा इकडं जास्त यायचे नाहीत. बाबा स्थानिक राजकारणामध्ये बरा रमला होता, दिवसामध्ये दोन चार दुकानांमध्ये महागडा माल विकून झाल्यावर उरलेला वेळ तो पक्षाच्या कामामध्ये गुंतला होता. कॉलेजच्या गुंडागर्दीनंतर राजकारणामध्ये जायला बाबाला तसा उशीरच झाला म्हणायचा. आईनं वेळ जायला म्हणून अनेक उपद्व्याप लावून घेतले होते. कुठे बालसाक्षर वर्ग, कुठे महिला बचतगटांना मार्गदर्शन, तर कुठे काय कसलं! हे उद्योग वेळ खायला उठू नये म्हणून केले पण आता मलाच खायलासुद्धा वेळ नाही असं तिनं मला ऐकवलं होतं. शाब्दिक कोट्या म्हणून ठिकच आहे तरीही हे खरं की माझे आईबाबा आता अतिशय बिझी झाले होते. खरंतर मी आईला किंवा बाबाला आफताबबद्दल सांगायला हरकत नव्हती. पण मी सांगितलं नाही. काय सांगणार? या नात्याला काहीही भविष्य नव्हतं. मुळात त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं!
ही गोष्ट कितीही कडू वाटली, अप्रिय वाटली तरीही खरी होती. तो माझ्यासोबत होता. फिजिकली वी वेर ग्रेट! इमोशनलीही आम्ही एकमेकांचा आधार होतोच पण तरीही मी आफताबचं “प्रेम” नव्हते. हे त्यानंच मला सांगितलं होतं. निधीच्या लग्नादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला त्याच्या दुसर्‍या दिवशी.
“स्वप्निल, मला अजून कॉम्प्लिकेशन्स नकोयत. मी निधीला अजून विसरलो नाही. विसरेन असंही वाटत नाही. मला तू आवडतेस, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, पण याहून अधिक दुसरं नाव मी या नात्याला याक्षणी देऊ शकत नाही. जर हे तुला मान्य नसेल तर मी निघून जाईन. पण मी तुला कसलीही कमिटमेंट देऊ शकत नाही.”
मला नात्याला नाव, कमिटमेंट वगैरे गोष्टी हव्याच कुठे होत्या? मला केवळ तो हवा होता. निधीला अजून विसरू न शकलेला तरीही माझ्यासोबत राहणारा असा हा बॉयफ्रेंड मीच स्विकारला होता. त्यामुळे त्याबद्दल नो रीग्रेट्स! ही गोष्ट आईबाबाला अजिबात न सांगता निभावणं हे अतिशय रिस्की होतं. जर चुकून त्यांना बाहेरून कूठंतरी समजलं तर आजवर त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिंध्या उडाल्यासारखं झालं अस्तं. हे नातं अतिशय क्षणभंगुर होतं याची मला कायमच जाणीव होती आणि म्हणूनही असेल पण हे नातं जितके दिवस टिकतंय तितके दिवस का होईना मला आसुसल्यासारखं जपायचं होतं. त्याच्याकडून मला याहून दुसरी काहीही अपेक्षा तेव्हा नव्हती.
पण, आशा अपेक्षा आणि नाती अशी कायमच एकसारखी राहत नाहीत. पेट्रीडिशमध्ये ठेवलेल्या फंगससारखी ती सतत बदलत राहतात. पण ते पुढे. सध्यातरी माझा बॉयफ्रेंड माझ्या घरी मूव्ह झालाय. आम्ही म्हणजे अगदी न्युएज लिव्ह इन कपल आहोत असं माझ्या ग्रूपमधल्या प्रत्येक फ्रेंडचं मत पडलंय. काहीतरी भयंकर परंपरा वगैरे मोडल्याचा फील तेव्हा निमिषभर का होईना पण येऊन गेला होता.
आम्ही दोघं एकत्र रहायला लागल्याचा साईड इफेक्ट म्हणजे, माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स एकदम सुधारला. आता हे काय कॉज आणि इफेक्ट इतकंसाधं सोपं नाहीये. मी रोज ऑफिसमधून आल्यानंतर सर्व घडामोडी सविस्तरपणे त्याला सांगायचे, दोघांमध्ये बोलायला रोज काहीतरी विषय नको! त्यानंतर मग एक्स्पर्ट कमेंट चालू व्हायच्या, “तू त्याला मेल करायचं ना. आणि फोनवर हे टॉपिक कधी डिस्कस करायचे नाहीत. मिनट्समध्ये हा पॉइंट मेन्शन का केला नाहीस, सरांना सांग, हे माझ्या कामात बसत नाही तरीही मी केलंय. आणि अगदी बेस्ट वेने केलंय” वगैरे वगैरे. कॉलेजं संपली तरी आमच्या घरात लेक्चर्स चालूच राहिली पण हळूहळू ऑफिसच्या कामाला शिस्त आली, प्रोफेशनल अप्रोच बदलू लागला.
घरातही बरेच बदल झाले. पहिली गोष्ट म्हणजे, माझं ऊठसूट हॉटेलमध्ये ऑर्डर करणं बंद झालं. घरामध्ये ओट्स कॉर्नफ्लेक्स, मुसली वगैरे हेल्दी (आणि भयंकर बेचव गिळगिळीत) वस्तू आल्या. आपल्या रोजच्या आहाराचे तीन भाग असतात. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे लहानपणी पहिली दुसरीमध्ये ईव्हीएसमध्ये शिकवलं होतं. आता इतक्या वर्षांनी त्याचा पुढचा धडा शिकले, ब्रेकफास्टला केलेले पोहे दुपारी दोन वाजता गरम करून खाणे म्हणजे लंच नव्हे आणि तेच पोहे रात्री परत (वर शेवकांदा घालून) खाणे म्हणजे डिनर नव्हे. मुळात पोहे एकदा खाण्यापुरतेच बनवावेत. अर्धा किलो पोहे हे महिन्यातून तीन चार वेळेला बनवता येतात एक्दाच सर्व करायची गरज नसते. शिवाय एकावेळेचे पोहे करून झाल्यावर नीट डब्यात भरून ठेवावेत. पिशवीला स्टेपलरच्या पिना मारून सापडेल त्या डब्यात टाकू नये. वगैरेवगैरे. चाचींनी तिन्ही मुलांना सगळा स्वयंपाक शिकवला होता. त्यात इतकी वर्षे तो एकटा राहत असल्यानं सर्व करायची सवय लागली होती. त्यामुळे सकाळी मी ऑफिसला जाण्याआधी ब्रेकफास्ट. दुपारी स्वत:पुरतं लंच, आणि रात्री दोघांसाठी ताजं गरमागरम डिनर इतकं तोच करत होता. पुढं नंतर अभ्यास वाढल्यानंतर महिन्याभरानं त्यानंच सोसायटीमध्ये शोधाशोध करून पोळ्यांना बाई लावली. त्यात मला काय प्रॉब्लेम असणारे! रोज सकाळी त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करून मी ऑफिसला बाहेर पडायचे. रात्री गरमगरम् भाजी वरण आणि पोळ्या आयत्या मिळायच्या, म्हणजे मी काहीच करत नव्हते अशातला भाग नाही, पण माझ्यापेक्षा त्याला कूकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. अभ्यासामधून ब्रेक म्हणून कूकिंग करायचा म्हणे!!  नाहीतर आम्ही... अभ्यासामधून ब्रेक म्हणून ऑक्रुट नाहीतर नवीनच आलेल्या फेसबूकावर बागडायचं!

Wednesday 2 November 2016

रहे ना रहे हम (भाग २०)

नोकरीमधलं पहिलंच परफॉर्मन्स अप्रेझल काही खास गेलं नाही, मला सुब्रमण्यम सरांनी याची वॉर्निंग दिलीच होती. माझा परफॉर्मन्स (एच आरच्या दृष्टीनं) फार खास नव्हता. मला त्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम नव्हता, फार काय पगारवाढ जास्त होणार नाही, की फरक पेंदा है! बाप नावाचं एटीएम अजून कमावत होतंच. मी वेळेत ऑफिसला जात होते आणि दिलेली सर्व कामं करत होते हेच माझ्या दॄष्टीनं भारी होतं. आमच्या घराण्यामध्ये “नोकरी” करणारं कुणी नव्हतंच. आजोबांचा आंब्यांच्या कलमांचा धंदा, बाबाचे तर अनेकोनेक वेगवेगळे धंदे, काकाकाकूंचा दवाखाना म्हणजे स्वतंत्र बिझनेसच. नोकरी करणारी मी पहिलीच. त्यामुळे हे सर्व तसं नवीनच. माझे रिपोर्ट्स वेळेवर जायचे, लॅंग्वेज कमांड चांगली होती, त्यामुळे चुका फारश्या असायच्या नाहीत. परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे काय आणि त्याचा एकंदरीत करीअरवर कितपत परिणाम होतो वगैरे गोष्टी समजल्याच नव्हत्या. त्यात मी कॉलेजामधून डायरेक्ट आले ती नोकरीमध्ये. तेपण फारशी शोधाशोध न करता. माझ्यासाठी हे कॉलेजचंच एक्स्टेन्शन असल्यासारखं. रॉय आणि मी तर एकाच वर्गात होतो. पण इतरही बरेच जण, माझ्यासारखे कॉलेजामधून आलेले होते. आमचा एक भलामोठ्ठा ग्रूप तयार झाल्यासारखंच होतं. सगळेच अनमॅरीड त्यातही बहुतेकजण सिंगलच होतो, त्यामुळे ऑफिस म्हणजे कॉलेजच्या कॅंटीनसारखं कायमच हॅपनिंग होतं. कॉलेजच्या रंगीबेरंगी कपड्यांमधून एकदम टकाटक फॉर्मल्समध्ये आलो इतकाच काय तो फरक.
पण ऑफिसमध्ये कितीही मज्जा येत असली तरी मला काहीतरी खुपत होतं, हे मला करायचं नव्हतं, असं सतत वाटायचं. मला प्युअर रीसर्च मध्ये रस होता, आता जरी मी रीसर्च असिस्टंट असले तरी माझं मुख्य काम माझ्या फिल्डमधल्या सायंटिफिक रीसर्चचा डेटा कोलेट करून त्याची समरी आणि रिपोर्ट बनवणे इतकंच होतं. हे इतकं पण काही इंटरेस्टिंग वाटत नव्हतं, थोड्या दिवसांनी तर मोनोटोनस वाटायला लागलं. पण आता जॉब प्रोफाईल बदलून मिळाला नसता, त्यामुळे आहे तेच काम ओढत राहिले. रॉय अजूनही युएसमध्ये पीएचडी साठी ट्राय करत होता. त्याच्या नेट सर्चमध्ये मी थोडीफार मदत करत होते. तिकडच्या युनिव्हर्सिटीचे डीटेल्स आणि रीसर्चसाठी मिळत असलेले सब्जेक्ट्स बघून एकदम भारी वाटायला लागलं होतं. हळूहळू रॉयसोबत मीही डीसीजन घतला. आपणसुद्धा अप्लाय करायचं, सिलेक्ट झाल्यावर आईबाबा “नाही” म्हणणार नाहीत. आधीच सांगितलं तर कदाचित ते नको म्ह्णतील. पण ऍडमिशन हातात असेल तर मला सपोर्ट करतील. अगदी लहान असताना तुम्हाला काय हवंय ते आईबापाला लगेच समजतं, टीनेजमध्ये तुम्हाला काय हवंय ते त्यांना समजू शकतच नाही असं तुम्हाला वाटत असतं, मग त्यामधून केवळ भांडणंच होत राहतात. त्याहून थोडं मोठं झालं की आपल्याला जे हवंय ते आईबापाला नक्की कसं गळी उतरवता येईल याचा बरोब्बर अंदाज आलेला असतो. त्याहून पुढची काही स्टेज असली तर मला माहित नाही, मी अजून तिथं पोचलेले नाहीये.
एकूणात मला नोकरीमध्ये महिन्याच्या अठ्ठावीस  तारखेला बॅंकेत जमा होणार्‍या पॉकेटमनीइतकाच मला रस होता. आफताबसारखं फार करीअर ओरिएंटेड वगैरे वागणं जमलंच नस्तं.
त्या रात्रीनंतर मी आफताबला स्वत:हून कधीही फोन केला नाही, त्यानंही मला कॉल केला नाही. आधी पण आम्ही काय दररोज फोन करत होतो अशातला भाग नाही, पण आता तर पूर्णच संवाद बंद होता. मी निधीलाही फोन केला नाही, मला अजूनच कॉम्प्लिकेशन्स नको हवी होत्ती. आय लव्ह्ड आफताब. आय स्लेप्ट विथ हिम. मला तो कधीतरी एका क्षणापुरता का होइना “माझा” म्हणून हवा होता, तसा मिळाला. याहून जास्त अपेक्षा माझीच कधी नव्हती. पण माझ्याबाबतीत अपेक्षांची गणितं  कायम चुकत आलीत.

त्या रात्री टीव्हीवर क्युंकि सांसभी कभी बहु थी बघत हॉलमध्येच अस्ताव्यस्त पडले होते. खरंतर मला आता या सीरीयलमध्ये कोण कुणाचं काय लागतं ते काही केल्या कळायला मार्ग नव्हता, पण सवय म्हणून मी रोज की सीरीयल बघत होते. मुळात तुलसीचा नवराच इतक्यांदा बदलला होता की मला तिचं कन्फ्युजन कसं होत नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
लतिकानं एकदा भन्नाट किस्सा सांगितला, ती एका मित्राबरोबर अलिबागला गेली, तिथं अतिशय चुकीच्या क्षणी, तिनं या मित्राऐवजी  तिच्या कास्टिंग एजंटचं नाव घेतलं होतं. तो मित्र पण असला की, त्यानं चालू क्रिया ताबडतोब थांबवून तिच्याशी कडाकडा भांडायला सुरूवात केली. आय मीन, आधी काम पूर्ण करावं मग ते काय भांडत बसावं! लतिका म्हणे, “मै तो कन्फ़्युज हो जाती हू! सामने कौन है वो हरबार याद रखना पडता है. अच्छा है के हम  गॉड गॉड कहते रहे. भगवान किसी काम तो आये” लतिका इतकी अचाट होती.
हा किस्सा आठवून आता मी आता एकटीच हसत होते. इतक्यात फोन वाजला. पलिकडे आफताब होता. आमच्या त्या रात्रीनंतर जवळजवळ वर्षभरानंतर आलेला हा त्याचा पहिला कॉल.
“काय वैताग आहे” हॅलो वगैरे काही म्हणायच्या भानगडीत न पडता त्यानं सरळ मुद्दा मांडला.
“कुणाचा?”
“ट्राफिकचा. पुण्यामधून केव्हाचा निघालोय. अजून पनवेलमध्येच आहे” त्याचा आवाज वैतागवाणा कमी आणि चिवचिवणार्‍या चिमणीइतका उत्साही जास्त वाटत होता.
“हे सांगायला फोन केलास”
“केव्हाचा या रस्त्यावर अडकून पडलोय. सहज आठवलं तू इथंच राहतेस म्हणून तुला कॉल केला. आय होप मी तुला डिस्टर्ब करत नाहीय. बिझी आहेस का?”
“मी क्युंकी बघतेय”
“ओह, इतक्या महत्त्वाच्या कामामध्ये मी तुला त्रास देतोय का? ओके, जास्त वेळ घेत नाही. मला फक्त जरा चांगल्या हॉटेल्सची नावं सांग. इथंच कुठंतरी डिनर करेन. असल्या ट्राफिकमध्ये घरी पोचायला दीड दोन वाजतील”
“हॉटेलची नावं आणि नंबर मेसेज करते. पण जर इतका उशीर झाला असेल, आणि अंधेरीमध्ये तुझा कुणी बेइंतिहा इंतजार करत नसेल, तर तू माझ्याकडे येऊ शकतोस. डाळभात रेडी आहे.”
“तुझ्याकडे! आए यु शुअर? स्वप्नील, कदाचित माझी नियत ठीक नसेल” तो हसत म्हणाला.
“कदाचित म्हणूनच मीही तुला बोलवत असेन” मी पण हसतच उत्तर दिलं. इतकं खोटं मी आजवर कधी हसले नसेल. तो इतक्या रात्री कशासाठी फोन करत होता आणि इकडेच का येत होता हे न समजायला मी काय साठच्या दशकांची हिरॉइन नव्हते. तरीही मीच स्वत: त्याला बोलावलं. कौन कंबख्त कहता है के प्यार अंधा होता है... प्यार टोटली कंप्लीट स्टुपिड होता है.
अर्ध्या तासांनी तो माझ्या घरी आला. बिल्डिंगच्या सेक्युरीटीला इतक्या रात्री माझ्याकडे कुणीतरी आल्याचं बघून फारच आश्चर्य वाटलेलं. वॉचमननं लगेच इंटरकॉमवर फोन केला.
“पता है भैय्या, वो मेरा ब्रदर लगता है. अंदर भेज दो और कार पार्किंगमे आज् रातके लिये जगह देदो” मी त्याला सांगितलं. त्या रात्रीनंतर आम्ही परत पहिल्यांदाच भेटत होतो. मला वाटलं की फारच ऑकवर्डनेस असेल, पण त्याच्या वागण्यामध्ये तसं काहीच वाटलं नाही. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. येतानाच त्यानं चायनीझ फ्राईड राईस आणि आईस्क्रीम पार्सल आणलं होतं. हे आणायला हॉटेल बरं सापडलं होतं याला. मी त्याला राईस मायक्रोवेव्हमध्ये गरम करून दिला, तसं माझं जेवण आधीच झालं होतं, पण आईस्क्रीमला सर्व गुन्हे माफ असतात.
“तुझे पता है, आईस्क्रीम दूधसे बनती है” माझ्या बाजूला बसत तो म्हणाला.
“थॅंक्स फॉर द जनरल नॉलेज अपडेट” मी टीव्हीचं चॅनल बदलत म्हटलं. सेट मॅक्सवर सूर्यवंशम लागला होता. म्हणजे जगामध्ये सर्व काही नॉर्मल चालू असावं.
“तू दूध पित नाहीस, मग आईस्क्रीम चालतं?”
“आईस्क्रीम चालत नाही आफताब! ते विरघळतं. तसंपण मी आईस्क्रीम खाते कारण मला ते आवडतं. दूध पित नाही कारण ते मला आवडत नाही. जरी दुधापासून आईस्क्रीम बनवत असले तरीही दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. फिजीकल प्रॉपर्टीज वगळ्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, त्यामुळे यु कान्ट कंपेअर”
“मी कंपेअर करतच नाहीय फक्त मला कधीकधी तुझी मजा वाटते.”
“मला माहिताय, मीच एकंदरीत तुझ्यासाठी मजेचा मामला आहे. हो ना?” मी अचानक गरज नसताना बोलून गेले.
“स्वप्निल, व्हॉट आर यु सेइंग? वाईट टोमणा मारतेस!” तो अचानक सावरून म्हणाला.
इतका वेळ दाबून धरलेला माझा धीरपण आता बाहेर पडला. “टोमणा नाही, सत्य तेच सांगतेय. त्या रात्रीपासून मला कॉल केला नाहीस. आणि आज अचानक मी तुला घरी बोलवेनच अशी काहीतरी कहाणी रचून मला सांगितलीस. आफताब, मी मूर्ख नाहीये. हे नातं तुझ्यासाठी केवळ फिजीकल रिलेशनशिपवर आहे हे मला माहित आहे तरीही...”
मी बोलत असतानाच त्यानं माझ्या ओठांवर त्याचा हात ठेवला. “काहीही बोलू नकोस. त्या रात्रीनंतर मी तुला काय फोन करणार होतो? वी गॉट ड्रंक, वी स्लेप्ट टूगेदर. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तू निघून गेली होतीस. मोबाईलवर तुझा “मी पनवेलला जातेय” इतकाच मेसेज. इतकं सारं घडल्यावर फोन करायची माझी हिंमत नव्हती. तू फोन करशील म्हणून खूप दिवस वाट पाहिली. अगदी अझरभाईला पण आडून आडून विचारलं. डोंट वरी. त्याला हे सगळे झोल काही माहित नाही. पण मी आज दिवसभर फक्त तुझाच विचार करतोय. तुला फोन करू का की नको. स्वप्निल, तुझ्या मनामध्ये अजून दुसरंच कुणीतरी आहे असं अझरभाई म्हणाला. त्यानंतर मला समजेना की...”
“तू यामध्ये माझी ढाल का वापरतोस? मला फोन करण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतो? मी त्यादिवशी निघून गेले, कारण जाग आल्यानंतर तुझ्या मोबाईलमध्ये मला निधीचा ती तुझ्या घरी येत असल्याचा मेसेज दिसला. त्याक्षणी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली, तुझ्यासाठी मी केवळ सेक्सटॉय असू शकते, पण मी इमोशनली अटॅच्ड आहे त्याचं काय? निधीशिवाय तू जगू शकत नाहीस हे सांगून माझे कान किटवले आहेस. मग त्यानंतर सर्वच इतकं कॉम्प्लिकेटेड झालं की मी तुझ्यासून दूरच रहायचं ठरवलं. पण ते जमत नाही. आजही तू फोन केलास मी तुला घरी ये म्हटलं. मी स्वत:ला पूर्ण ओळखून आहे, त्यामुळे कदाचित आजची रात्रही आपण एकाच चादरीत घालवू....बट दॅट डझ नॉट मीन दॅट...”
“नाही, स्वप्निल. मी इथं केवळ सेक्ससाठी किंवा... मजा मारण्यासाठी आलो नाहीय. मी.... मला सांगायचंय की, त्या रात्रीनंतर.... मला.... स्वप्निल.. हे फार कन्फ़्युझिंग आहे. आय डोंट नो...”
“इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा तुला असं अडखळताना बघतेय.”
तो क्षणभर माझ्याकडे रोखून बघत राहिला. “स्वप्निल, निधी चॅप्टर इज ओव्हर फ़ॉर मी. फॉरेव्हर”
“त्यात काय मोठी न्युज आहे. तुमचा ब्रेकप हजारदा होतो, हजार प्लस एक वेळेला पॅचप होतो”
आणि मग अचानक इतका वेळ त्यानं घेतलेला “नॉर्मलपणाचा” मुखवटा धाडकन गळून पडला. त्याचा फोन आल्यापासूनच काहीतरी गडबड असल्याच जाणवत होतं. त्याचं एकंदरीत वागणं उसनं अवसान आणल्यासारखं होतं. खाली मान घालून त्यानं एक एक शब्द उच्चारला. “निधीचं लग्न झालं. आज. दुपारी. साडेतीनवाजता”
ही बातमी खरंच फार शॉकिंग होती. निधीचं लग्न ठरलेलं मला कसं माहित नाही? मला आईपण याबाबतीत काही बोलली नव्हती. गावामध्ये अश्या बातम्या आईला खरंतर आधीपासून माहित होतात.
“काय सांगतोस? पुण्यामध्ये? तू तिच्या लग्नाला गेला होतास?” इतक्या सीरीयस क्षणी बावळट प्रश्न विचारायचे अनेक फायदे असतात. समोरचा स्वत:चं दु:ख विसरून लगेच आपली अक्कल काढायला धावतो. खासकरून समोरचा जर आफताब असेल तर
“वेडी आहेस का स्वप्निल? तिच्या लग्नाला मी जाणारे का? इथं मुंबईत झालं. मुंबईचाच मुलगा आहे पण जॉबसाठी युएसला असतो. टिपिकल आयटी वाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरलं. लगोलग झालं. निधीनं तिच्या घरी म्हणजे होणार्‍या नवर्‍याला सांगितलं की तिला एक मुसलमानाचा मुलगा फार त्रास देतो पार कॉलेजपासून, तो गावी हे लग्न सुखासुखी होऊ देणार नाही म्हणून लग्न मुंबईलाच करू या. त्या मुसलमानाच्या गुंडमवाली मुलाला कळू नये म्हणून गावी कुणाला खबर लागू दिली नाही. लकी गर्ल!” पण हे बोलताना आफताबचे डोळे भरून आले होते.
“मला हे आधी का नाही सांगितलंस?”
“मग मी इथं का आलोय? स्वप्निल, तुझ्याखेरीज कुणाला हे सांगू? मलाच आज सकाळी समजलं. काय करावं सुचेना, घरामध्ये स्वत:ला संपवायचे विचार यायला लागले. अझरभाईला फोन केला तर तो म्हणाला की कामासाठी गोव्याला गेलाय. आपण उद्या बोलू. मग मी काय करणार! सगळं जग हरल्यासारखं वाटतंय. निधी मला सोडून गेली याचं काही नाही. ते आजनाउद्द्या होणार होतं. मला पक्कंच माहित होतं. पण तरीही अखेर तिनं माझी किंमत गुंड पोरगा इतकीच केली. काय त्रास देणार होतो मी तिला? तोंडावर येऊन सांगायचं होतं ना, की ब्वा आफताब! माझ्यामध्ये वेगळ्या धर्मातल्या मुलाशी लग्न करण्याची हिंमत नाही. माझ्या आईवडलांची जगामध्ये जी काय नाचक्की होइल त्याची मला जास्त पर्वा आहे. तर आपलं जे काय नातं होतं ते ठिक, पण मी दुसर्‍याशी लग्न करतेय. इतकं कबूल जरी केलं असतं ना तरी मी मानलं असतं. खैर! जे घडलंय ते ऑलरेडी घडून गेलंय. माझ्याकडे आता मन मोकळं करायला कुणीही नाही. फ्रेंड्स नाहीतच. तूच एक होतीस. तुझ्याहीसोबत त्या रात्रीनंतर नात्यामध्ये विनाकारण कॉम्म्प्लीकेशन्स आलेत. आय नो, मी तेव्हा चुकलो.”
“आपण दोघंही चुकलो”
“तसं म्हण. पण सत्य हेच की, मी माझ्या आयुष्यामध्ये असलेली एकमेव मैत्रीण तेव्हा गमावली. मला तुला गमवायचं नाहीये, फ़रगेट फिजिकल रिलेशनशिप ऍंड ऑल दॅट. मला माझी बेस्ट फ्रेंड परत हवीये. मी इथं मजा मारायला आलो नाहीय स्वप्निल. माझ्या प्रेमभंगाच्या दु:खावर रडण्यासाठीही आलो नाहिये. मला फक्त एक आधार हवाय. स्वप्निल, शक्य झालं तर ती रात्र आपल्या आयुष्यामध्ये आलीच नाही असं समज किंवा त्या रात्री मी तुझ्या गैरफायदा घेतला असं समज. पण आज मी इथं आलोय ते केवळ एक मित्र म्हणून!”  


Tuesday 27 September 2016

रहे ना रहे हम (भाग १९)

निधीसोबत आफताब सध्या फारच स्टेडी रिलेशनशिपमध्ये होता. गंमत म्हणजे, माझ्यासोबत निधी फारशी बोलायची नाही. इन फॅक्ट, जर मी मुंबईत कुणाला निधी आणि मी एकाच वर्गात होतो, आणि आफताब वेगळ्या वर्गात होता हे सांगितलं तर खरंसुद्धा वाटलं नसतं. मला गावामध्ये खबर मिळाली होती की, निधीच्या घरचे तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत तेपण एकदम फुल फोर्समध्ये. तिचंही मास्टर्स संपलं होतं. तिला पुण्यातच जॉब लागला होता, पण ती दर शनि रवि हल्ली आफताबच्याच घरी होती. आफताब आधी दोन तीन रूममेट्ससोबत रहायचा, पण त्यांच्यासोबत त्याचं फार काही पटलं नाही आणि आता तो एकटाच राहत होता. वीकेंडला निधी येतच होती. एकंदरीत मला तरी त्या दोघांच्या वागण्य़ाबोलण्यावरून ते लग्नाचादेखील विचार करत होते असं वाटत होतं. आय वॉज हॅपी फॉर बोथ ऑफ देम. माझ्या मनात अजूनही आफताबबद्दल फीलींग्स होत्या, पण त्या अशा होत्या की आहेत तर खर्र्‍या पण असून नसल्यासारख्या! मला त्यांचं हल्ली काही वाटतच नव्हतं. चुकूनमाकून माझ्या मनात कधी यावर वादंग माजलाच तर मी स्वत:लाच “यु लव्ह आफताब. सो व्हॉट! ही डझण्ट लव्ह यु” हे ऐकवून गप्प बसवायचे. आजही तेच करायचा आटोकाट प्रयत्न करते. स्वत:ला फसवण्याचा अजून एक प्रयत्न.
माझी आई माझ्यासाठी स्थळं शोधायच्या विचारात होती, मला म्हणाली तुझ्या काही अटी आहेत का? अटी घालून काय डोंबल लग्न करणार? चांगलासा आणि छानसा नवरा हवा होता. समजूतदार आणि कमवायची अक्कल असलेला हवा. कमवत नसेल तरी चालेल, मी बर्‍यापैकी कमावत होतेच पण दिसायला हॅंडसम हवाच. इतकंच काय ते.
मी पनवेलला शिफ्ट होऊन जवळजवळ सहा महिने झाले होते. मध्येच सुट्टी असली की गावी जायचे, किंवा कधीमध्यी आईबाबा येऊन रहायचे. बाबानं हा फ्लॅट खूप आधी एकदम स्वस्तात घेतला होता. तेव्हा पनवेल म्हणजे कंप्लीट मुंबईच्या बाहेर होतं, आता नवी मुंबई असलं फाफट्यासारखं वाढलं होतं की पनवेलच काय, थोड्या दिवसांनी पेण पण लोकांनी मुंबईतच धरलं असतं असं बाबा गमतीनं म्हणायचा. पेणमध्ये आमची थोडी जमीन होती म्हणे!! म्हणजे काकानं घेतली होती.काकूचं गाव असल्यानं तिथं हॉस्पिटल काढायचा प्लान होता. पण ते काही झालं नाही. पण जमीन पडून होती.
एके दिवशी शुक्रवारी ऑफिस संपवून घरी यायला निघाले होते, तेव्हा आफताबचा फोन आला. लोकलमध्ये असल्यानं नीट ऐकू आलं नाही. घरी आल्यावर त्याला लगेच फोन केला.
“स्वप्नील, उद्या काय करतेस?”
“काही खास नाही, जानेमन रीलीज होतोय. तिकीटं मिळाली तर बघेन. का रे?”
“ओह! तुझा पक्का प्लान ठरलाय का?”
“नाही. तिकीटं मिळाली तर ना. सलमानभाईचा पिक्चर आहे. ऍडव्हान्स बूकिंगपण मिळालं नाहीये. पण का विचारतो आहेस?”
“उद्या जरा  माझ्याबरोबर येशील?”
“कुठे?”
“जमेल का ते सांग आधी. माझ्यासाठी तुझे काही मेजर प्लान्स चेंज व्हायला नको”
“आता फटके खाशील. बोल कुठे जायचंय?”
“उद्या चार वाजेपर्यंत बांद्रा स्टेशनला पोहोच. मी येईन तिथं. मगच सांगेन.”
त्यानं फोन कटसुद्धा केला. आफताब इतक्या घुमवून फिरून काय विचारत होता, कुणास ठाऊक! एरवी मी फार विचार केला नसता, पण आज एकंदरीत त्याच्या बोलण्याचा टोन थोडा उदास वाटला.
दुसर्‍या दिवशी त्यानं सांगितल्यासारखं मी बांद्रा स्टेशनवर पोचले. सकाळपासून त्याचे नुसते मेसेजेस चालू होते. “अमुक वाजता येच” “लंच करून ये” “तुझा तो लाल रंगाचा सलवार सूट घालून ये” म्हटलं कशाला? एक तर मला तो लाल ड्रेस अजिबात आवडत नाही. खरंतर तो ड्रेस आमच्याकडे कामाला येणार्‍या कविताने तिच्या लेकीच्या लग्नांत मला दिला होता. मला अजिबात आवडला नाही, पण आई म्हणे कसाही असला तरी तिनं मायेनं दिलाय. घालायचाच.. मुंबईच्या गर्मीमध्ये इतका अंगभर कपडे घालून फिरणे म्हणजे मुश्किल. तरी म्हटलं जवळ ठेवून घेऊ. लालभडक रंगाचा ड्रेस. मुश्किल दिनो में काम आता हय. पण आफताबनं अगदी हाच्च ड्रेस घालून ये म्हणून सांगणं म्हणजे काय तर प्रचंड भानगड असणार!
तसंही शनिवारी दुपारच्या वेळेला लोकलमध्ये इतकी गर्दी नव्हती. मी लेडीज फर्स्ट डब्यात असल्याचं मेसेजवर कळवल्यानं आफताब समोरच उभा होता. “काय रे?कशासाठी बोलावलंस?” मी लगेच विचारलं.
“तूपण विसरलीस ना? आजची तारीख?” मला तारीख लक्षात होती, पण आजच्या तारखेचा सिग्निफिकन्स लक्षात येईना. माझा वाढदिवस नक्कीच नाही. आफताबचाही नाही. निधीचा असेल, तर मला कशाला बोलावलं?
“स्वप्निल, आज अरिफचा बर्थडे. मला वाटलं तुझ्या लक्षात असेल!”
खरंच, कशी काय विसरले मी? अरिफला जाऊनच इतकी वर्षं झाली. कमवायला लागल्यापासून आफताब अरिफच्या आणि अम्मींच्या वाढदिवसाला कुठल्याशा अनाथाश्रमामध्ये देणगी द्यायचा. अझरभाईंना ते फारसं आवडायचं नाही, म्हणायचा की आपल्याला जेव्हा पैसे द्यावेसे वाटतात तेव्हा द्यावे. ऑकेजनची वाट कशाला बघायची. पण आफताब म्हणायचा की  किमान त्या निमित्ताने आपल्याला आठवण राहते. तसं बघायला गेलं तर अरिफला तसं आम्ही कुणीच विसरलो नव्हतो. ऑफिसमध्ये कंप्युटरवर प्रेझेंटेशन बनवताना विनॅम्पमध्ये हळू आवाजात रफीची गाणी चालू रहावीत तसा अरिफ मनाच्या कोपर्‍यामध्ये कुठंतरी कायम होताच.
स्टेशनबाहेरच्या मॅक्डोनाल्डमध्ये बर्गर खाताना आफताबनं मला सर्व सविस्तर सांगितलं. त्यानं कुठल्याशा आश्रमामध्ये देणगी म्हणून काही कपडे आणि वस्तू दिल्या होत्या. आपण उचलून पैसे दिले की, त्याचं पुढे काय होतं ते समजत नाही मागच्या एक दोन वर्षांच्या अनुभवानंतर म्हणून यावर्षी त्यानं स्वत:च ड्रेस मटेरीअल फ्रॉक आणि शाळेसाठी स्टेशनरी आणल्या होत्या.
“मग माझी काय गरज?”
“फक्त मुलींसाठी जो सेक्शन आहे तिथं  जेंट्स लोकांना आतमध्ये एंट्री नाही. त्यामुळे तुला आत जाऊन प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार फ्रॉक अथवा मटेरीअल द्यावं लागेल. शिवाय इतर सामानपण. प्रत्येकीच्या हातात सामान दिलं तरच ते त्यांच्यापर्यंत पोचेल असं मलातरी वाटतंय.”
“ओह, म्हणून मला हा फुल ड्रेस घालायचा हुकूम झाला का?”
“ताई, ड्रेस फुल किंवा हाफचा प्रश्न नाही. तुम्ही ब्रॅंडेड कपडे वापरणार. अनाथ गरीब लोकांसमोर आपण महागडे कपडे घालून फिरणं ठिक वाटलं असतं का?” आता माझ्या लक्षात आलं, खुद्द आफताबनंसुद्धा कॉटनचा शर्ट आणि साधी जीन्स घातली होती. शिवाय हातामध्ये कायम अस्तं ते फंकी घड्याळ आणि गळ्यामधली सोन्याची चेन सुद्धा नव्हती.. कसं याला इतक्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करायला कायम जमतं?
“मी येणार हे तिथं आधीच कळवलंय. त्यामुळे ते वाट बघत असतील. थोडेफार स्नॅक्स वगैरे असतील पण फार ग्रेट नसेल. कदाचित तुला आवडणार नाही, म्हणून इथंच पोटभर खाऊन घे. संध्याकाळ तर होईल सर्व कार्यक्रम आटपेपर्यंत. खूप उशीर झाला तर मी कारने सोडीन”
“काही गरज नाही. मी लोकलने जाईन. शिवाय शनिवार संध्याकाळी पनवेल हायवेवर भयंकर ट्राफिक असतं. पण मला एक सांग. वीकेंड असून निधी आली नाही? मला बोलावलंस ते.” तो दोन सेकंद काहीच बोलला नाही. मला वाटलं परत ब्रेकप झाला की काय!
“मीच सांगितलं तिला येऊ नकोस म्हणून!” शेवटी तो म्हणाला. “इन फॅक्ट, आधी ठरलं होतं की आम्ही दोघंपण जाऊ. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, ती माझ्यासोबत फक्त मजा म्हणून येतेय. अरिफ कोण आणि काय होता हे तिला माहितच नाही. मी कितीहीवेळा सांगितलं तरी तिच्या दृष्टीने अरिफ कधीच जिताजागता माणूस असणार नाही. तिच्यासाठीच काय, माझ्या आजूबाजूला सध्या जे कोण आहेत त्या सर्वांसाठी अरिफ म्हणजे केवळ पास्ट आहे. भूतकाळ जो कधीकाळी घडून गेलाय. फक्त तू आणि मी, स्वप्निल! आपण दोघंच असे आहोत ज्यांच्यासाठी अरिफ एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट कल्पनेपेक्षा किंवा एखाद्या फोटोमधल्या थिजलेल्या स्माईलपेक्षा जास्त आहे. तो माझ्यासाठी भाऊ होता, तुझ्यासाठी फ्रेंड! त्याला ओळखणारं या जगात आता आपल्या दोघांशिवाय कुणीही नाही..”
“अझरभाई आहे ना...”
“अझर!! तो ऋषीमुनी व्हायच्या कॅटेगरीमधला माणूस आहे हे तुला माहित आहे ना. त्याला काही फरक पडतो का? मी त्याला महिनाभर आधी सांगितलं होतं! तू ये म्हणून रोज फोन केला, पण तो आला नाही. त्याच्यादृष्टीनं विषय संपतात गं. अब्बा, अरिफ, अम्मी. एकदा मूठमाती दिली की विषय संपला. नंतर तो आठवणही काढत नाही, रडतही नाही आणि त्यांच्याविषयी बोलतही नाही. सुखानं हसत नाही आणि दु:खानं रडत नाही. नि:संग म्हणतात बघ. तसा आहे. आणि आय ऍम शुअर, आज अरिफ असता ना, तर त्याचा हा बर्थडे आपणच तिघांनी सेलीब्रेट केला असता. आठवतं! अम्मीच्या बर्थडेला आपण केक बनवला होता... आणि त्यानं बिर्याणी. किती धमाल केली होती.”
ऍक्चुअली मला खरंच असं वाटलं नाही, पण त्याचं बोलणं ऐकताना डोळे किंचित ओले झाले. एरवी मी तशी कधीच रडत नाही पण त्या क्षणी मात्र रडू आलं. अरिफचं जाणं पुन्हा एकदा मनाच्या तळापर्यंत जाऊन सगळ्या आठवणी ढवळून आलं.
“स्वप्निल, तू माझी फ्रेंड आहेस ना?” म्हणणारा माझा मित्र. मृत्यू कसला क्रूर डाव टाकतो. आम्ही तेव्हा आठवी नववीत होतो. आता मोठे झालो, नोकरी करून स्वत: एकटे रहायला लागलो. आणि अरिफ, तो मात्र तेवढाच राहिला. त्याच्या आयुष्यामध्ये पुढे काहीच घडलं नाही, ना बरं ना वाईट. आयुष्यच संपलं! तिथल्या तिथंच साचून राहिल्यासारखं!
“हे!!रडू नकोस प्लीज. तू रडलेली, तेही माझ्यासमोर. तो मला म्हणेल की मीच तुला रडवतोय. कायम मला म्हणायचा, किती तुडतुड भांडतोस तिच्यासोबत. तुझी होणारी भाभी आहे, जरा रिस्पेक्टने बात कर”
“काय?” डोळे पुसत असताना मला एकदम ठसका आला. “काय?”
“अरे, हा आमच्या दोघांचाच फंडा होता. तुला नक्की कुणी पटवायची यावर आम्ही चिक्कार वाद घातलेत. मी म्हणायचो की तुला प्राजक्ता आहे ना. तुझा टाका सेट झालाय, आता स्वप्निल माझी.” मला खरंच एकदम हसू आलं. इतकावेळ गंभीर असलेला विषय त्यानं शिताफीनं बदलला होता.
“तू खरंच असं म्हणालास? निर्लज्जा!!”
“लहान होतो यार. स्कूलमध्ये. तेव्हा अशी कितीशी अक्कल असणार. तर अरिफभाई म्हणायचे की असं नाही. मीच स्वप्निलला पटवणार..मग मी वाद घालायचो. मग मी प्राजक्ताचा मुद्दा काढला की तो म्हणायचा काय फरक पडतो.. आपल्यात तश्यापण चार अलाऊड आहेत! तू दुसरीकडे कुठेतरी शोधाशोध कर. पण स्वप्निल माझीच होणार”
मी त्याला एक फटका मारला. “लाज वाटते का रे? एखादं खेळणं असल्यासारखं तुझं माझं करायला!”
“मारतेस काय? खडूस!!! बीलीव्ह मी फार काही सीरीयस प्रकरण तसंही नव्हतं. माझं पण आणि अरिफचं पण. तू तेव्हा काय जाडू आणि खडूस होतीस. आठवतं का? “बोर्नविट्या च्यालेल?” करून मला टोमणे मारायचीस. अशीच गंमत चालायची गं! चल, ते लोकं आपली वाट बघत आहेत. लेट होईल”
आफताबची कार अख्ख्या सामानानं भरली होती. त्यानं हा कार्यक्रम अचानक ठरवलेला नव्हता, तशी कुठलीच गोष्ट तो कधीच इंपल्सने करत नसणार. बांद्याच्या कुठल्यातरी चाळीचाळीच्या भागामध्ये हा अनाथश्रम होता. मुख्यत्वे मुस्लिम लोकांनी चालवलेला हा आश्रम फार मोठा नव्हता. तरीही, छोट्याश्या जागेमध्ये किमान पंचवीस तीस मुली राहत होत्या. आम्ही मुलीसाठी कपडे आणि खाऊ घेतला होता. शिवाय काही पुस्तकं वह्या आणि इतर सामान. मी आयुष्यामध्ये पाहिलेलं हे पहिलंच अनाथाश्रम. पिक्चरटीव्हीमध्ये पाहिलेली अनाथाश्रम बर्‍याचदा एकदम हॅपी हॅपी प्लेस तरी होते, किंवा प्रचंड छळवणूक करणारे तरी. समोरच्या या खोलीमध्ये वाढलेली ही खुरटी मुलं पाहताना तसं काहीच वाटत नव्हतं. मुलं इथं तशी नीट होती. करता येतील तितक्या सोयी केल्या जात होत्या खाण्यापिण्यामध्ये आबाळ नव्हती, पण तरी या सर्व वास्तूला एक भावनाशून्य, कोरडा रखरखीत भाव होता. आश्रमाच्या व्यवस्थापकांनी आम्हाला सगळीकडे फिरून दाखवलं. मुलींच्या खोल्यांमध्ये आफताबला प्रवेश नव्हता. तिथं एकटीनं फिरताना माझ्या घश्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं. तेरा वर्षांच्या मुलीपासून ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत सर्वांचं हे घर. आईवडील नसलेल्या या मुली. कुणाला नको झाल्या म्हणून सोडल्या, कुणाला पोसायची ताकद नव्हती म्हणून सोडल्या. आपल्याला ज्यानं शरीर दिलंय, ज्याच्या मुळे अस्तित्व झालंय, त्यालाच आपण नको हवे आहोत ही भावना किती कोलमडवणारी असेल! मी माझ्या बापावर राग ठेवून आहे कारण त्यानं बाहेर कुठंतरी लफडं केलंय. पण या मुलींना बापाचा किती राग येत असेल. आईचा किती राग येत असेल. आई आणि बाप यांचा द्वेष करण्यासाठीसुद्धा त्यांना आईबाप माहित नाहीत.

आफताबनं दिलेल्या सूचनांप्रमाणे मी प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार कपडे दिले. त्यांच्या वयानुसार पुस्तकं आणि स्टेशनरी दिली. एका चार वर्षाच्या बाळाला क्रेयॉन्स दिल्यावर जो काही आनंद झाला की ते नाचायलाच लागलं. इतर प्रत्येक मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसतच होता, पण मला तो आनंद फार बघवेना. “कुणीतरी” आपल्याला काहीतरी दिलंय याबद्दल लाचारी अथवा वाईट वाटण्यापेक्षा त्यांना आनंद वाटत होता. या मुलींना संभाळणारी पन्नाशीची एक बाई होती. ती म्हणे, “नया कपडा कब्बीच मिलता है. नही तो सब आके पुराना कपडा देके जाते. सेकंडहॅंड सामानमे तो हमारा काम चलता है”
“आपलं” स्वत:चं हक्काचं असं काहीच नाही. जे काही आहे, ते दुसर्‍यानं दिलेलं...
मला या खोलीमध्ये अचानक घुसमटायला लागलं. मी बाहेर आले, ऑफिसमध्ये आफताब मॅनेजरला काही सांगत होता. “काय झालं?” मी बाहेर आलेली पाहून त्यानं विचारलं.
“कसंतरी होतंय!”
“इथे थोडावेळ बस. मी इथं पहिल्यांदा आलो तेव्हापण मला असंच वाटलं होतं. आपल्याला कल्पनाच नसते ना, आपल्या विश्वाखेरीज अजून किती विश्वं आहेत या जगामध्ये.” मला खुर्चीमध्ये बसवून हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाला. “म्हणूनच मी इथं वरचेवर येतो. आपला पैसा किती क्षुल्लक आहे, आणि आपलं जगणंच किती कवडीमोल आहे ते मला इथं येऊन जाणवतं. अल्लाची मर्जी म्हणून मी आईबाप भाऊ घर या सर्वांसोबत वाढलो. नाहीतर काय माहित! असल्याच एखाद्या आश्रमामध्ये वाढलो असतो” त्याक्षणी मला त्याचं पूर्ण बोलणं समजलंच नाही. मीच त्या मन:स्थितीमध्ये नव्हते. नंतर खूप दिवसांनी हा प्रसंग आठवला तेव्हा जाणवलं कदाचित त्याला खरं काय ते माहित असावं. पण मी त्याला विचारलं नाही. विचारावंसंही वाटलं नाही. आज इतक्या वर्षानंतरही मी याबद्दल त्याच्याशी काहीच बोललेली नाही.
थोडावेळ त्याच्याशी बोलून कपभर गोडंमिट्टं चहा पिऊन मी परत कामाला गेले. सर्व मुलींची नावं विचारून घेतली, काहींसोबत फोटो काढले. रात्रीचं जेवण आम्ही त्या मुलींसोबतच केलं. आफताबनं मिठाई मागवली होती. मुलींनी आवडीनं गोडाधोडाचं खाल्लं. मी एरवी दुध्याची भाजी कधीच खात नाही त्यादिवशी गुपचुप खाल्ली.

सगळा कार्यक्रम संपेस्तोवर जवळजवळ साडेआठ वाजले. स्टेशनवर आलो ते ही ऽऽऽ गर्दी उसळलेली. हार्बर लाईन बंद होती. सायनला कुठेतरी ओव्हर हेड वायर तुटली होती. अजून दोन तास लोकल सुरू व्हायचे काही चान्स नव्हते.
“चला, कारने सोडू”
“ट्राफिक असेल वेड्यासारखं त्यापेक्षा दादरला सोड, तिथून एस्टीची बस पकडून जाते”
“एकटीच?”
“नाही! डीजे मागव, नाचत वरात घेऊन जाईन. काय एकटी एकटी लावलंयस? मी काय फिरत नाही का?? चांगली सवय आहे मला. डोंट वरी”
“नऊ वाजत आलेत. तशीपण दमली आहेस. उद्या संडे आहे. बेस्ट वे, माझ्या फ्लॅटवर चल. सकाळी उठून जा. लोकलने गेलीस तर प्रॉब्लेम नव्हता, पण बसने वगैरे एकटी जाऊ नकोस.”
“वेडा आहेस का? तुझ्या फ्लॅटवर आणि मी?”
“का? मी काय रात्रीचा ड्रॅक्युला होत नाही. चल लवकर. स्टेशनवर गर्दीत बसण्यापेक्षा घरी जाऊ”
मी याआधी एक दोनदा त्याच्या खोलीवर आले होते. छोटासा वन बीएचके फ्लॅट. टिपिकल बॅचलर लोकं राहतात तसलाच. पण आफताब टचने. इथेही पुस्तकांचे गट्ठे होते. शिवाय लॅपटॉप, टीव्ही आणि असलंच इतर सामान. किचनमध्ये चहा कॉफी करता येईल इतपतच किराणा. बाकी सर्व मामला विकतच्या खाऊचा. शिवाय कॅबिनेटमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्या. हा पितो हे माहित होतं पण इतकं कलेक्शन असेल असं वाटलं नव्हतं. भयंकरच दर्दीमाणूस!! भलत्याच गोष्टींमध्ये.
“मी अशी आले, तर तुला बिल्डींगमध्ये कुणी काही बोलणार नाही” लिफ्टमधून बाहेर पडताना त्याला विचारलं.
“बोलतील ना. सगळे विचारतील. का हो, तुमच्याकडे येणारी मुलगी आज बदलली की काय!! तू पण ना स्वप्निल, इथं कुणाला माहित आहे! निधी नेहमी येतेच की. कुणी काही बोलत नाही. तू कॉफी घेणारेस की ड्रिंक्स?”
ओह, मी निधीबद्दल इतकावेळ खरंच विसरले होते. इतकावेळ मी ज्याला आफताबचं घर समजत होते ते खरंतर आफताब-निधीचं घर होतं. आज ना उद्या तिचं झालं असतं. “आपलं” स्वत:चं हक्काचं असं नाहीच. जे आहे ते दुसर्‍याचं!!! “ऑफकोर्स ड्रिंक्स”
“फ्रेश होऊन घे. कपाटामध्ये निधीचे ड्रेस असतील त्यातला एखादा घाल. भूक लागली असेल तर बाहेरून मागवूया” तो नेहमीसारखाच बोलत होता.
“मला भूक् नाहीये, निधीचे ड्रेस मला नको! नीट बसणार नाहीत त्यापेक्षा हाच राहू देत.” निधी माझ्यापेक्षा बुटकी आणि जाड. म्हणजे आधी मी जाड होते, पण आता गेल्या काही वर्षांमध्ये निधी माझ्या जवळाजवळ दुप्पट झाली होती, आणि मी “हेल्दी” म्हणता येईल अशी.
“माझा टीशर्ट घालशील का?” मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्याची कुठलीही वस्तू मला हवी होत्ती. किंबहुना तोच तर मला हवा होता. इतके दिवस मला त्याच्याबद्दल ज्या काही भावना वाटत होत्या, त्या अगदीच सटल होत्या. आज मात्र त्या भावना इतक्याही सच्च्या राहिल्या नाहीत. मला तो हवा होता, आणि नक्की कशापद्धतीने हवा होता हे माहित होतं.
“स्वप्निल, काय झालं? एकदम गप्प गप्प झालीस!”
“काही नाही, दमले पण खूप आणि या अशा गोष्टी मला खूप ओवरव्हेल्मिंग होतात. सवय नाही ना! शिवाय नाही म्हटलं तरी आज आरिफची, चाचींची आठवण येतेय, अरिफ असता तर...”
“असायला हवा होता, मी सीए झालेलं बघायला, अझरभाईचा बिझनेस इतका मोठा झालेला. तू अशी नोकरी वगैरे करत असलेली बघायला. आय ऍम शुअर, तो कायम माझ्या आजूबाजूला असतो, माझा एंजल असल्यासारखा. तुला गंमत सांगू, मला आजवर कधीही खूप उदास वाटलं की हमखास अरिफचा आवाज ऐकू येतो. आज तर सतत वाटतंय की तो इथंच आहे. तो गेल्यानंतर मी जो एकटा पडलो ते तसाच आहे. निधीला ही गोष्ट कधीच समजत नाही. तिला वाटतं की मी खूप् माणूसघाणा आहे, पण मी तसा नाहीये, अरिफसोबत मी जितक्या मोकळेपणानं वागूबोलू शकतो तसा इतर कुणाहीसोबत नाही. अपवाद फक्त तू!”
“माझ्याशी कधी मोकळेपणानं बोललास? महिनोनमहिने फोन सुद्धा करत नाहीस!”
“पण ज्यावेळी मला खरंच कुणासोबततरी बोलायचं असतं तेव्हा तुझ्याचकडे येतो ना! आज तुलाच फोन केला ना. माझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, किंवा काय आहे ते तूच समजून घेशील याची खात्री होती.”



>>>>>>>>>>

तुला ना हल्ली काही कामंच करायला नको हवी अस्तात,” आई मला बडबडत होती, एक तर ऑफिसमध्ये तीन दिवस सुट्टी होती म्हणून मी घरी आले होते. त्यात परत सकाळीच टीव्हीवर मस्त गाणी लावून बसलेली असताना आईचं एकच एक पालुपद केव्हाचं चालू होतं. “जाशील ना? नाहीतर मीच जाते सरळ” आई आता ओरडलीच.
“आई, अगं दहानंतर जाऊ ना. आताशी साडेनऊ वाजलेत”
“महामाये, मग उठ, देह धू, कपडे बदल आणि बाहेर पड तोपर्यंत दहा वाजतीलच ना! नऊशे रूपयांची पर्स आहे म्हणून जीव थोडाथोडा होतोय. जाशील ना राणी?” श्या! ओरडणारी, करवादणारी आई परवडली पण ही अशी जवळ येऊन केसांतून हातबीत फिरवून लाडानं बोलणारी आई म्हणजे आपण शरणागतीच पत्करणे हितकर.
गावामध्ये कसलंतरी हॅंडलूमचं प्रदर्शन लागलं होतं. दोन दिवसांपूर्वी आईनं तिथून कसलीतरी पैठणीची पर्स आणली होती. पर्स मस्तच होती, आईकडून ढापणे यात शहाणपणा होता. पण नीट बघताना लक्षात आलं की त्याचा पट्टा थोडा उसवलाय. आता ही पर्स बदलून आणायची तर आजच जावं लागणार होतं कारण प्रदर्शन संपणार होतं. पर्स मलाच हवी असल्यानं मलाच बदलून आणावी लागणार.  तेही संध्याकाळची गर्दी व्हायच्या आत पण दुपारचं ऊन चढायच्या आत. असा माझा हिरण्यकशिपु झाला होता. लवकर आवरलं पाहिजे.
 बाबा स्कूटी घेऊन दुकानावर गेला होता, त्यामुळे मला कार घेऊन जावं लागलं. प्रदर्शनामध्ये सकाळी दहा वाजता पण बर्‍यापैकी गर्दी होती. आईनं सांगितलेल्या सूचनांप्रमाणे त्या पैठणी वस्तूंच्या स्टॉलवर जाऊन त्यांना ही पर्स बदलून द्या, अहो मीच तुमच्याकडून घेतली आहे, काल आठशेमध्येच दिली होती की, आज नऊशे काय म्हणताय, साडे आठशेमध्ये आम्हाला नको का परवडायला, मला हा रंग नकोय, पट्टापण उसवलाय काल गर्दीत नीट पाहिलं नाही आता बदलून द्या सेम रंगाची नकोय जरा हटके रंग दाखवा वगैरे मंत्रोच्चार करून वेगळी पर्स घेतली, शिवाय आवडला म्हणून एक पैठणी स्टाईलचा स्टोलपण घेतला. फॉर्मलस वर असे एथनिक स्टोल्स मस्त दिसतात.
त्यानंतर घरीच जायचं असं काही नव्हतं, म्हणून थोडावेळ प्रदर्शनामध्ये इकडे तिकडे फिरले. दोन चार कुर्ती, कानातले, ब्रेसलेट वगैरे काहीबाही खरेदी केली. प्रदर्शनाच्या शेवटी खाऊपिऊचे स्टॉल्स होते. सध्या अजिबात गर्दी नसल्याने हे सर्व लोक अगदी निवांत बसले होते. मी पाणीपुरीवाल्याला एक प्लेटची ऑर्डर दिली. पनवेलला गेल्यापासून रोजच्या रोज पाणी पुरी खाणं व्हायचंच नाही. हॉस्टेलवर असताना लतिकाचे डायेट सूचना कंप्लीट झिडकारून मी एकदातरी पाणीपुरी खायचेच. पण नोकरी सुरू झाल्यावर मार्त रोज जमायचं नाही.
आता पाणीपुरीचा स्टॉल दिसल्यावर राहवलं नाहीच. मस्त चव होती, कधी नव्हंते पाणीपुरीचं पाणी केवळ तिखट झणझणीत नाहीतर आंबट-तिखट-गोड असं परफेक्टली बॅलन्स केलं होतं. पण पैसे देताना उगाच घेतली पाणीपुरी म्हणायची वेळ आली.
“तेरा रूपये असा कधी रेट असतो का? सरळ दहा-पंधरा असा रेट का ठेवत नाही? आणि ठेवला तर सुट्टे पैसे ठेवा ना” मी त्या स्टॉलवाल्यावर खेकसलेच. नेमकी माझ्याकडची चिल्लर संपली होती, दहा रूपयाच्या दोन नोटा होत्या तर हा बाब्या म्हणे, सुट्टे नाहीयेत. मी पर्समध्ये इकडेतिकडे शोधाशोध करून एक-एक रूपयाची दोन नाणी काढली. तर तो म्हणे, अजून एक रूपया द्या.
“अरे नाहीये. दहाची नोट आहे तर उरलेले पैसे परत दे, नाहीतर हे बारारूपये ठेवून घे. नाहीतर मला अजून सात रूपयाची पाणी पुरी दे. विषय खतम.” त्या मठ्ठाडाच्या डोक्यात गणित शिरतच नव्हतं. एका रूपयाने असा काय फरक पडला असता? बरं, ठिक तो रूपया मी द्यायला हवा, पण आता सुट्टे नाहीत तर काहीतरी कर ना. बरं मी जाऊन आणते म्हटलं तर तेही नको. “मग तुम्हाला आम्ही कसे शोधणार?” जणू याचा एक रूपया घेऊन मी पळून जाणारे.
“ताई, पैसे द्या हो” तो ओरडला.
“अरे पण नाहीयेत ना. कुठून आणू?” मी पण आवाज चढवला. चढलेला आवाज ऐकून आजूबाजूचे आमच्याकडे वळून बघायला लागले.
“पैसे नाहीत तर खाता कशाला?” त्याच्या बाजूचा एक माणूस काहीही माहित नसताना मध्ये पडत म्हणाला.
“पैसे आहेत, पण त्याच्याजवळ सुट्टे नाहीत.” मी हातामधले बारा रूपये त्याच्या काऊंटरवर ठेवले. “अजून एक रूपया हवा असेल, तर मला चिल्लर परत दे. तुझ्याशी इथं वाद घालत बसायला मला वेळ नाहीये. सुट्टे पैसे नसतील तर दुकानं उघडता कशाला? आणि एका एका रूपयासाठी इतका वाद घालताय! मूर्ख!”
तितक्यात माझ्या बाजूला आलेल्या कुणीतरी त्या पाणीपुरीवाल्याच्या हातात एक रूपया ठेवला. “हे घे, झाले ना? हिशोब पूर्ण? आता आवाज बंद!” मी वळून त्या माणसाकडे पाहिलं. खरंतर एका क्षणासाठी विश्वासच बसला नाही. केदार! केदार उभा होता. “सॉरी! हा स्टॉलवाला खरंच मूर्ख आहे, संध्याकाळी याचा मालक आला की त्याला सांगतोच. वागायची पण अक्कल नाही या पोरांकडे”
“इट्स ओके. पण थॅंक्स आणि तू इथे कसा काय? खरेदीला?” मी बडबडत सुटले. खूप नर्व्हस झालं की मला असंच होतं. “नाही गं! मी ऍक्चुअली आयोजकांमध्ये आहे. म्हणून तर सकाळपासून आहे. तू इथं कशी? ते ही इतक्या सकाळी?”
मी गेल्या कित्येक वर्षामध्ये केदारला भेटले नव्ह्ते, एक दोनदा गावात आल्यावर त्याला पाहिलं होतं, तेही दुरून. आज मात्र अगदी अनपेक्षितरीत्या तो माझ्यासमोर उभा होता. अगदी जवळच. त्याच्या हातामध्ये दोन अडीच वर्षाचं बाळ होतं. काहीतरी हिशोब चुकलाय माझा किंवा ते बाळ लहान असावं. मला अशी बाळांची नक्की वयं ओळखता येत नाहीत.
“एक पर्स बदलून घ्यायची होती, मग नंतर गर्दी होते म्हणून आताच आले.”
“पर्स बदलण्याव्यतिरीक्तही इतर बरीच खरेदी झालेली दिसतेय!” तो माझ्या हातामधल्या बॅगच्या ढिगार्‍याकडे बघत म्हणाला. “स्कूटीवरून इतकं नेणार आहेस की... रिक्षा करून देऊ?”
“नको, कार आणलीये.” त्याच्या कडेवरचा बाळ काहीतरी हात पुढे करून सांगत होता. “तुझा?”
“नाही गं, ताईचा. आयुष नाव आहे. तुझं काय चालू आहे?” केदारचं नक्की काय चालू आहे हे जसं मला माहित होतं तसंच, माझं काय चालू आहे ते त्याला माहित असेलच ना पण तरी विचारायची पद्धत असते. हां! आठवलं या कडेवरच्या बाळाच्या डीलीव्हरीसाठी केदारची आई तेव्हा कॅनडाला जाणार होती. मेंदूच्या कप्प्यांमध्ये आपण किती क्षुल्लक माहिती गोळा करून ठेवलेली असते. नको तेव्हा ती माहिती अचूक आठवते कशी!
“मुंबईला आहे, जॉब करतेय. तुझा बिझनेस कसा चालू आहे?”
“तो जर धड चालू असता, तर अशी प्रदर्शनं वगैरे केली असती का?” तो किंचित हसत म्हणाला. केदार खूप बदलला होता. अवघ्या तीन वर्षापूर्वीचा केदार आणि हा समोर उभा असलेला केदार यामध्ये बराच फरक होता. आधीसारखा उत्साही नव्हता तर जबाबदारीच्या अणि एकंदरीत परिस्थितीमुळे दबला गेला होता. किंवा कदाचित मला तसं वाटत असेल. दृष्टीकोनाचा फरक.  “मी येऊ का तुझ्यासोबत? कारपर्यंत? एवढं सामान घेऊन जाशील ना?”
“नो, थॅंक्स. मी जाईन.”
तितक्यात त्याला कुणीतरी आवाज दिला, प्रदर्शनाच्या दुसर्‍या बाजूकडून ती आली. मला तिचं नाव माहित नव्हतं, पण ही केदारची बायको इतकं नक्कीच समजलं. ती आमच्या अगदी समोर आली. खरंतर ती येण्याआधी मी तिथून जायला हवं होतं. पण आता तिच्यासमोरून लगेच निघून गेले असते तर ते अगदीच वाईट दिसलं असतं. हा तरी बायकोसोबत इकडे आलाय हे मला कसं माहित असणार!
“सौम्या, ही स्वप्नील! स्वप्नील, ही सौम्या.” केदारने ओळख करून देण्याचा क्षीण प्रयत्न केला. खरंतर ती काय आणि मी काय एकमेकींना माहित होतोच. चेहर्‍यानं आज ओळख झाली असेल, पण याआधी ती आल्यामुळे माझं आयुष्य किती उद्ध्वस्त झालं म्हणून तिला शिव्या घातल्या, आणि तिच्या नवर्‍याच्या आयुष्यात तिच्याआधी मी आलेली असल्यामुळे तिनं मला किती शिव्या घातल्या असतील...
मात्र एक गंमत झाली हां. मी कोण आहे हे समजल्याबरोबर ती एकदम नवर्‍याच्या बाजूला सरकली आणि अल्मोस्ट तिनं केदारचा दंडच पकडला. जणू काही ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं मला सांगितल्यासारखं. मला हे बघून खरंच हसू आलं. अरे, ही काय मला नवराचोर समजते की काय. जणू हिचा नवरा मी पळवून नेणार आहे. आणि पळवून करणार काये? मी याआधी केदारचा मनसोक्त उपभोग घेतला होत्ता. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आफताब आला होता. आता तीन वर्षानंतर मी परत याला घेऊन काय करणार होते? त्याचे आणि माझे रस्ते वेगळे झाले होते. हे त्याला माहित होतं. मला माहित होतं.  एकमेकांसमोर येऊन कितीहीवेळा भेटलो, तरीही आता आम्ही अनोळखी म्हणूनच जगणार  होतो. काही नाती तुटली की मरतात. त्यानंतर त्याचं फक्त श्राद्ध घालता येतं. बाकी काही नाही.
पण तिच्या या पझेसिवपणावर हसणारी मी कोण? तिच्याकडे तर सबळ कारण होतं. मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे तिचा नवरा कित्येक दिवस तिच्याशी बोलत नव्हता, नुकतीच कुठेतरी त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली होती, आता कुठे तिला बायकोपणाचं सुख मिळत होतं. अशावेळी मी म्हणजे नवर्‍याची एक्सगर्लफ्रेंड भेटली म्हणून तिला थ्रेटनिंग वाटणं सहज आहे. मला निधीमुळे किती इन्सीक्युअर वाटलं होतं, माझ्याबाबतीत तर आफताब तिला स्वत:हून सोडून माझ्याकडे आला होता, तरीही निधीचा संशय माझ्या मनामध्ये कायम राहिलाच. अगदी माझं आणि आफताब दोघांचंही आयुष्य पाचोळ्यासारखा उडवून गेला तो संशय!

मी काय अथवा सौम्या काय... आमचं वागणं काही फार वेगळं नव्हतं. अगदी टिपिकल म्हणावं असंच आम्ही वागलोय. पण अशावेळी शाहीन मला हमखास आठवते. ती खरंच अतिशय प्रगल्भ विचारांची. माझं आणि आफताबचं नातं तिला माहित असूनही ती किती समजूतदारपणे सर्व निभावू शकली. “मी त्याच्या आयुष्यांमधून तुम्हाला वजा करू शकत नाही, हे मला माहित आहे, म्हणून मी तसा प्रयत्नही करणार नाही. पण यापुढे भविष्यामध्ये केवळ मीच असेन यासाठी प्रयत्न करू शकते, हो ना?” साधंसोपं सरळ सुटसुटीत आयुष्य! शाहीनला ते अगदी प्रांजळपणे जमलं! मला कधीच नाही. आजवर नाही. विनाकारण गोष्टी कॉम्प्लीकेट करून ठेवायची सवयच.
त्यादिवशी केदारला भेटल्यानंतर नक्की काय वाटलं ते सांगणं अशक्य आहे. त्याचा राग आला, तो बाय डीफॉल्ट येणारच होता. वाईटही वाटलं, त्याचवेळी बरंदेखील वाटलं. त्याचा संसार व्यवस्थित चालू होता. कदाचित अजून वर्षभरात मुलं होतील (आपल्याकडे नै.... संसार व्यवस्थित म्हणजे मुलं असा नियमच आहे. नवरा बायको एकत्र नांदत नसतील, तर एखादं मूल होऊ द्यासर्व नीट होईल असा आचरट सल्ला आपल्याचकडे मिळू शकतो.) पण आज बघताना तरी दोघं एकमेकांशी व्यवस्थित बोलताना दिसत होते. मी त्याला बाय म्हणून पुढे निघाले. त्यानं हातातलं बाळ तिच्याकडे दिलं आणि माझ्या हातातली पिशवी घेतली. “मी येतो कारपर्यंत. इतकं ओझं घेऊन एकटीच कशाला चालतेस?”
मिस्टर केदार, केवळ दोन कुर्ती आणि असल्या सटरफटर सामानाच्या वजनाला तुम्ही “इतकं ओझं” म्हणताय, मग मनामध्ये जो इमोशनल बॅगेज तुम्ही दिला आहे त्याचं काय? अर्थात हे मी त्याला काही म्हटलं नाही. दोन जुने प्रेमी खूप वर्षांनी भेटल्यानंतर लंबेलंबे फिलॉसॉफिकल डायलॉग मारतात हे गुलझारच्या पिक्चरांमध्येच होतं. प्रत्यक्षामध्ये आपण बोलत राहतो. एकमेकांची चौकशी करतो वगैरे. पण संवाद काही साधला जात नही. तो दुवा निखळतोच.
कारमध्ये बॅग ठेवताना तो सहज म्हणाला. “कधीतरी घरी ये. आहेस ना दोन चार दिवस?”
“नाही.  परवा निघेन. जास्त सुट्टी नाहीये.”
“जॉब कसा चालू आहे?”
“एकदम इंटरेस्टिंग.”
त्याला यानंतर पुढे काहीतरी बोलायचं होतं, पण त्याआधीच मी कार स्टार्ट केली. मला काहीच बोलायचं नव्हतं, काहीच सांगायचं नव्हतं. जे घडलं तो सर्व भूतकाळ. आता मला ते गढे मुर्दे खणायचे नव्हते. केदार या व्यक्तीखेरीज माझ्या आयुष्यामध्ये बरंच काही होतं. तो एक रूपया त्याच्यावर उधार राहिलाच, पण त्यानं केलेल्या इतक्या सार्‍या गुन्ह्यांचं काय?
संध्याकाळी नेहमीप्रमाणे अझर घरी आला. हल्ली तो संध्याकाळीपण रोज बाबांसोबतच जेवायचा. बाबांना डॊक्टरांनी साडआठपयंत जेवायला सांगितलं होतं. अझर आणि त्याच्या “कार्यक्रमावर बंदी आणून” आईनं हा टाईम कंपलसरी डिनरसाठी केला होता. एकटंच कुठं जेवायचा म्हणून अझरभाईपण आमच्याकडे यायचा. येताना काहीतरी भाजी नाहीतर चटणी वगैरे बनवून आणायचा.
मी त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. माझं ना हेच असतं, मला कुणालातरी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. निधी तिचं आणि आफताबचं अफेअर आहे हे वर्षानुवर्षे कसं काय लपवून ठेवू शकते कुणास ठाऊक. त्यारात्री मी त्याच्या समोर माझ्या भावना लपवू शक नाही... केदारला मी आफताबबद्दल सांगायला हवं होतं का? त्यानं काय फरक पडला असता म्हणे... तर ते एक असोच.
“मग? कधी जातेस त्याच्या घरी?” माझं भडाभडा बोलून झाल्यावर अझरभाई मला चिडवत म्हणाला. जेवणं झाल्यावर आम्ही घरासमोरच्या बागेमध्ये गप्पा मारत बसलो होतो. या बागेला सोसायटीनं नुकतंच नाव दिलं होतं. अरिफ गार्डन!!
“जादू! चेष्टा करू नकोस. मी इतक्या सीरीयसली सांगतेय..”
“मग मी पण सीरीयसलीच विचारतोय. म्हणाला ना, कधीतरी घरी ये. आपण जायचं बिनधास्त. त्याच्या घरचे काय एक्स्प्रेशन्स देतील?”
“मला त्याच्या घरी जाण्यात काही इंटरेस्ट नाही. तसंही तो आता जॉइंट फॅमिलीमध्ये राहत नाही. वेगळं घर भाड्यानं घेतलंय” हे वाक्य बोलताना किती नाही म्हटलं तरी नजरेसमोर तो केदारच्या मित्राचा फ्लॅट “तुझंमाझं” घर तरळून गेलंच. क्षणभरासाठी का होईना पण तरीही.
“बरीच माहिती आहे की. एकीकडे म्हणायचं आता माझा काही संबंध नाही आणि तरी इतकी माहिती!”
“जादू, तू मला काय क्रॉस् एक्झामिन करतो्यस? मी त्याच्याबद्दल कुणाला विचारत नाही. लोकं सांगतात, मी ऐकते. मनामधून मी कितीहीवेळा त्याला काढून टाकलं तरी आठवणी नावाची चीज असते. ती तुम्ही डीलीट करू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी. मी मागेही तुला सांगितलं होतं.”
“तेव्हाही मी हेच सांगितलं होतं आठवणी डीलीट करायच्या नाहीत. पण आपल्यापासून दूर नेऊन ठेवायच्या. अशा ठिकाणी जिथं काही घडलं तरी आपल्यावर परिणाम होणार नाही.”
“माझ्यावर काही परिणाम झालाय का? मी फक्त तुला काय घडलं ते सांगतेय. आणि मला एक सांग! तू नूरीला असा विसरलास? सोपं असतं का? सांग ना?”
“मी नूरीला विसरणार नाही. माझं तिच्यावर प्रेम वगैरे काही नव्ह्तं. पत्नीचा दर्जा होता आणि मी त्यासाठी कधीही तिचा अपमान केला नाही. पण तिनं मला कधीही समजून घेतलं नाही हे खरंय. नको असलेलं नातं केवळ पुढं रेटायचं म्हणून रेटत होतो. एनीवेज, आता मी एकटाच आहे आणि खर्ंच ही फेज खूप एंजॉय करतोय.”
“आय नो! मी पण ही फेज खूप एंजॉय केली होती.” प्रेमभंग झाल्यानंतर जो एकटेपणा येतो त्याला लोकं उगाच दु:खाची वगैरे किनार देतात, दु:ख असतंच पण त्याहून अधिक स्वातंत्र्याची एक वेगळीच जाणीव पण असते. हे असलं एकटेपणा तुम्हाला फार स्ट्रॉंग बनवतं. तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देतं.
“केली होती? म्हणजे आता अजून एका हीरोची एंट्री झालीये का?”
“ते मी तुला का सांगू?”
“मग कुणाला सांगणार?”
“तो हीरोच सांगेल की तुला!”
“वाट बघतो”
“वाटच बघ तू”

 (क्रमश:)