नोकरीमधलं पहिलंच
परफॉर्मन्स अप्रेझल काही खास गेलं नाही, मला सुब्रमण्यम सरांनी याची वॉर्निंग
दिलीच होती. माझा परफॉर्मन्स (एच आरच्या दृष्टीनं) फार खास नव्हता. मला त्यामध्ये
खरंच काही प्रॉब्लेम नव्हता, फार काय पगारवाढ जास्त होणार नाही, की फरक पेंदा है! बाप
नावाचं एटीएम अजून कमावत होतंच. मी वेळेत ऑफिसला जात होते आणि दिलेली सर्व कामं
करत होते हेच माझ्या दॄष्टीनं भारी होतं. आमच्या घराण्यामध्ये “नोकरी” करणारं कुणी
नव्हतंच. आजोबांचा आंब्यांच्या कलमांचा धंदा, बाबाचे तर अनेकोनेक वेगवेगळे धंदे,
काकाकाकूंचा दवाखाना म्हणजे स्वतंत्र बिझनेसच. नोकरी करणारी मी पहिलीच. त्यामुळे
हे सर्व तसं नवीनच. माझे रिपोर्ट्स वेळेवर जायचे, लॅंग्वेज कमांड चांगली होती,
त्यामुळे चुका फारश्या असायच्या नाहीत. परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे काय आणि त्याचा
एकंदरीत करीअरवर कितपत परिणाम होतो वगैरे गोष्टी समजल्याच नव्हत्या. त्यात मी
कॉलेजामधून डायरेक्ट आले ती नोकरीमध्ये. तेपण फारशी शोधाशोध न करता. माझ्यासाठी हे
कॉलेजचंच एक्स्टेन्शन असल्यासारखं. रॉय आणि मी तर एकाच वर्गात होतो. पण इतरही बरेच
जण, माझ्यासारखे कॉलेजामधून आलेले होते. आमचा एक भलामोठ्ठा ग्रूप तयार झाल्यासारखंच
होतं. सगळेच अनमॅरीड त्यातही बहुतेकजण सिंगलच होतो, त्यामुळे ऑफिस म्हणजे
कॉलेजच्या कॅंटीनसारखं कायमच हॅपनिंग होतं. कॉलेजच्या रंगीबेरंगी कपड्यांमधून एकदम
टकाटक फॉर्मल्समध्ये आलो इतकाच काय तो फरक.
पण ऑफिसमध्ये कितीही
मज्जा येत असली तरी मला काहीतरी खुपत होतं, हे मला करायचं नव्हतं, असं सतत
वाटायचं. मला प्युअर रीसर्च मध्ये रस होता, आता जरी मी रीसर्च असिस्टंट असले तरी
माझं मुख्य काम माझ्या फिल्डमधल्या सायंटिफिक रीसर्चचा डेटा कोलेट करून त्याची
समरी आणि रिपोर्ट बनवणे इतकंच होतं. हे इतकं पण काही इंटरेस्टिंग वाटत नव्हतं, थोड्या
दिवसांनी तर मोनोटोनस वाटायला लागलं. पण आता जॉब प्रोफाईल बदलून मिळाला नसता,
त्यामुळे आहे तेच काम ओढत राहिले. रॉय अजूनही युएसमध्ये पीएचडी साठी ट्राय करत
होता. त्याच्या नेट सर्चमध्ये मी थोडीफार मदत करत होते. तिकडच्या युनिव्हर्सिटीचे डीटेल्स
आणि रीसर्चसाठी मिळत असलेले सब्जेक्ट्स बघून एकदम भारी वाटायला लागलं होतं. हळूहळू
रॉयसोबत मीही डीसीजन घतला. आपणसुद्धा अप्लाय करायचं, सिलेक्ट झाल्यावर आईबाबा
“नाही” म्हणणार नाहीत. आधीच सांगितलं तर कदाचित ते नको म्ह्णतील. पण ऍडमिशन हातात
असेल तर मला सपोर्ट करतील. अगदी लहान असताना तुम्हाला काय हवंय ते आईबापाला लगेच
समजतं, टीनेजमध्ये तुम्हाला काय हवंय ते त्यांना समजू शकतच नाही असं तुम्हाला वाटत
असतं, मग त्यामधून केवळ भांडणंच होत राहतात. त्याहून थोडं मोठं झालं की आपल्याला
जे हवंय ते आईबापाला नक्की कसं गळी उतरवता येईल याचा बरोब्बर अंदाज आलेला असतो.
त्याहून पुढची काही स्टेज असली तर मला माहित नाही, मी अजून तिथं पोचलेले नाहीये.
एकूणात मला नोकरीमध्ये
महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला बॅंकेत जमा
होणार्या पॉकेटमनीइतकाच मला रस होता. आफताबसारखं फार करीअर ओरिएंटेड वगैरे वागणं
जमलंच नस्तं.
त्या रात्रीनंतर मी
आफताबला स्वत:हून कधीही फोन केला नाही, त्यानंही मला कॉल केला नाही. आधी पण आम्ही
काय दररोज फोन करत होतो अशातला भाग नाही, पण आता तर पूर्णच संवाद बंद होता. मी
निधीलाही फोन केला नाही, मला अजूनच कॉम्प्लिकेशन्स नको हवी होत्ती. आय लव्ह्ड
आफताब. आय स्लेप्ट विथ हिम. मला तो कधीतरी एका क्षणापुरता का होइना “माझा” म्हणून
हवा होता, तसा मिळाला. याहून जास्त अपेक्षा माझीच कधी नव्हती. पण माझ्याबाबतीत अपेक्षांची
गणितं कायम चुकत आलीत.
त्या रात्री टीव्हीवर
क्युंकि सांसभी कभी बहु थी बघत हॉलमध्येच अस्ताव्यस्त पडले होते. खरंतर मला आता या
सीरीयलमध्ये कोण कुणाचं काय लागतं ते काही केल्या कळायला मार्ग नव्हता, पण सवय
म्हणून मी रोज की सीरीयल बघत होते. मुळात तुलसीचा नवराच इतक्यांदा बदलला होता की
मला तिचं कन्फ्युजन कसं होत नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
लतिकानं एकदा भन्नाट
किस्सा सांगितला, ती एका मित्राबरोबर अलिबागला गेली, तिथं अतिशय चुकीच्या क्षणी,
तिनं या मित्राऐवजी तिच्या कास्टिंग
एजंटचं नाव घेतलं होतं. तो मित्र पण असला की, त्यानं चालू क्रिया ताबडतोब थांबवून
तिच्याशी कडाकडा भांडायला सुरूवात केली. आय मीन, आधी काम पूर्ण करावं मग ते काय
भांडत बसावं! लतिका म्हणे, “मै तो कन्फ़्युज हो जाती हू! सामने कौन है वो हरबार याद
रखना पडता है. अच्छा है के हम गॉड गॉड
कहते रहे. भगवान किसी काम तो आये” लतिका इतकी अचाट होती.
हा किस्सा आठवून आता मी आता
एकटीच हसत होते. इतक्यात फोन वाजला. पलिकडे आफताब होता. आमच्या त्या रात्रीनंतर
जवळजवळ वर्षभरानंतर आलेला हा त्याचा पहिला कॉल.
“काय वैताग आहे” हॅलो
वगैरे काही म्हणायच्या भानगडीत न पडता त्यानं सरळ मुद्दा मांडला.
“कुणाचा?”
“ट्राफिकचा. पुण्यामधून
केव्हाचा निघालोय. अजून पनवेलमध्येच आहे” त्याचा आवाज वैतागवाणा कमी आणि
चिवचिवणार्या चिमणीइतका उत्साही जास्त वाटत होता.
“हे सांगायला फोन केलास”
“केव्हाचा या रस्त्यावर
अडकून पडलोय. सहज आठवलं तू इथंच राहतेस म्हणून तुला कॉल केला. आय होप मी तुला
डिस्टर्ब करत नाहीय. बिझी आहेस का?”
“मी क्युंकी बघतेय”
“ओह, इतक्या महत्त्वाच्या
कामामध्ये मी तुला त्रास देतोय का? ओके, जास्त वेळ घेत नाही. मला फक्त जरा
चांगल्या हॉटेल्सची नावं सांग. इथंच कुठंतरी डिनर करेन. असल्या ट्राफिकमध्ये घरी
पोचायला दीड दोन वाजतील”
“हॉटेलची नावं आणि नंबर
मेसेज करते. पण जर इतका उशीर झाला असेल, आणि अंधेरीमध्ये तुझा कुणी बेइंतिहा
इंतजार करत नसेल, तर तू माझ्याकडे येऊ शकतोस. डाळभात रेडी आहे.”
“तुझ्याकडे! आए यु शुअर? स्वप्नील,
कदाचित माझी नियत ठीक नसेल” तो हसत म्हणाला.
“कदाचित म्हणूनच मीही
तुला बोलवत असेन” मी पण हसतच उत्तर दिलं. इतकं खोटं मी आजवर कधी हसले नसेल. तो
इतक्या रात्री कशासाठी फोन करत होता आणि इकडेच का येत होता हे न समजायला मी काय
साठच्या दशकांची हिरॉइन नव्हते. तरीही मीच स्वत: त्याला बोलावलं. कौन कंबख्त कहता
है के प्यार अंधा होता है... प्यार टोटली कंप्लीट स्टुपिड होता है.
अर्ध्या तासांनी तो माझ्या
घरी आला. बिल्डिंगच्या सेक्युरीटीला इतक्या रात्री माझ्याकडे कुणीतरी आल्याचं बघून
फारच आश्चर्य वाटलेलं. वॉचमननं लगेच इंटरकॉमवर फोन केला.
“पता है भैय्या, वो मेरा
ब्रदर लगता है. अंदर भेज दो और कार पार्किंगमे आज् रातके लिये जगह देदो” मी त्याला
सांगितलं. त्या रात्रीनंतर आम्ही परत पहिल्यांदाच भेटत होतो. मला वाटलं की फारच
ऑकवर्डनेस असेल, पण त्याच्या वागण्यामध्ये तसं काहीच वाटलं नाही. नेहमीच्या
सवयीप्रमाणे तो बोलत होता. येतानाच त्यानं चायनीझ फ्राईड राईस आणि आईस्क्रीम
पार्सल आणलं होतं. हे आणायला हॉटेल बरं सापडलं होतं याला. मी त्याला राईस
मायक्रोवेव्हमध्ये गरम करून दिला, तसं माझं जेवण आधीच झालं होतं, पण आईस्क्रीमला
सर्व गुन्हे माफ असतात.
“तुझे पता है, आईस्क्रीम
दूधसे बनती है” माझ्या बाजूला बसत तो म्हणाला.
“थॅंक्स फॉर द जनरल नॉलेज
अपडेट” मी टीव्हीचं चॅनल बदलत म्हटलं. सेट मॅक्सवर सूर्यवंशम लागला होता. म्हणजे
जगामध्ये सर्व काही नॉर्मल चालू असावं.
“तू दूध पित नाहीस, मग
आईस्क्रीम चालतं?”
“आईस्क्रीम चालत नाही
आफताब! ते विरघळतं. तसंपण मी आईस्क्रीम खाते कारण मला ते आवडतं. दूध पित नाही कारण
ते मला आवडत नाही. जरी दुधापासून आईस्क्रीम बनवत असले तरीही दोन्ही गोष्टी भिन्न
आहेत. फिजीकल प्रॉपर्टीज वगळ्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, त्यामुळे यु
कान्ट कंपेअर”
“मी कंपेअर करतच नाहीय
फक्त मला कधीकधी तुझी मजा वाटते.”
“मला माहिताय, मीच
एकंदरीत तुझ्यासाठी मजेचा मामला आहे. हो ना?” मी अचानक गरज नसताना बोलून गेले.
“स्वप्निल, व्हॉट आर यु
सेइंग? वाईट टोमणा मारतेस!” तो अचानक सावरून म्हणाला.
इतका वेळ दाबून धरलेला
माझा धीरपण आता बाहेर पडला. “टोमणा नाही, सत्य तेच सांगतेय. त्या रात्रीपासून मला कॉल
केला नाहीस. आणि आज अचानक मी तुला घरी बोलवेनच अशी काहीतरी कहाणी रचून मला
सांगितलीस. आफताब, मी मूर्ख नाहीये. हे नातं तुझ्यासाठी केवळ फिजीकल रिलेशनशिपवर
आहे हे मला माहित आहे तरीही...”
मी बोलत असतानाच त्यानं माझ्या
ओठांवर त्याचा हात ठेवला. “काहीही बोलू नकोस. त्या रात्रीनंतर मी तुला काय फोन
करणार होतो? वी गॉट ड्रंक, वी स्लेप्ट टूगेदर. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तू
निघून गेली होतीस. मोबाईलवर तुझा “मी पनवेलला जातेय” इतकाच मेसेज. इतकं सारं
घडल्यावर फोन करायची माझी हिंमत नव्हती. तू फोन करशील म्हणून खूप दिवस वाट पाहिली.
अगदी अझरभाईला पण आडून आडून विचारलं. डोंट वरी. त्याला हे सगळे झोल काही माहित
नाही. पण मी आज दिवसभर फक्त तुझाच विचार करतोय. तुला फोन करू का की नको. स्वप्निल,
तुझ्या मनामध्ये अजून दुसरंच कुणीतरी आहे असं अझरभाई म्हणाला. त्यानंतर मला समजेना
की...”
“तू यामध्ये माझी ढाल का
वापरतोस? मला फोन करण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतो? मी त्यादिवशी निघून
गेले, कारण जाग आल्यानंतर तुझ्या मोबाईलमध्ये मला निधीचा ती तुझ्या घरी येत
असल्याचा मेसेज दिसला. त्याक्षणी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली, तुझ्यासाठी
मी केवळ सेक्सटॉय असू शकते, पण मी इमोशनली अटॅच्ड आहे त्याचं काय? निधीशिवाय तू
जगू शकत नाहीस हे सांगून माझे कान किटवले आहेस. मग त्यानंतर सर्वच इतकं
कॉम्प्लिकेटेड झालं की मी तुझ्यासून दूरच रहायचं ठरवलं. पण ते जमत नाही. आजही तू
फोन केलास मी तुला घरी ये म्हटलं. मी स्वत:ला पूर्ण ओळखून आहे, त्यामुळे कदाचित
आजची रात्रही आपण एकाच चादरीत घालवू....बट दॅट डझ नॉट मीन दॅट...”
“नाही, स्वप्निल. मी इथं
केवळ सेक्ससाठी किंवा... मजा मारण्यासाठी आलो नाहीय. मी.... मला सांगायचंय की,
त्या रात्रीनंतर.... मला.... स्वप्निल.. हे फार कन्फ़्युझिंग आहे. आय डोंट नो...”
“इतक्या वर्षांमध्ये
पहिल्यांदा तुला असं अडखळताना बघतेय.”
तो क्षणभर माझ्याकडे
रोखून बघत राहिला. “स्वप्निल, निधी चॅप्टर इज ओव्हर फ़ॉर मी. फॉरेव्हर”
“त्यात काय मोठी न्युज
आहे. तुमचा ब्रेकप हजारदा होतो, हजार प्लस एक वेळेला पॅचप होतो”
आणि मग अचानक इतका वेळ त्यानं
घेतलेला “नॉर्मलपणाचा” मुखवटा धाडकन गळून पडला. त्याचा फोन आल्यापासूनच काहीतरी
गडबड असल्याच जाणवत होतं. त्याचं एकंदरीत वागणं उसनं अवसान आणल्यासारखं होतं. खाली
मान घालून त्यानं एक एक शब्द उच्चारला. “निधीचं लग्न झालं. आज. दुपारी. साडेतीनवाजता”
ही बातमी खरंच फार शॉकिंग
होती. निधीचं लग्न ठरलेलं मला कसं माहित नाही? मला आईपण याबाबतीत काही बोलली
नव्हती. गावामध्ये अश्या बातम्या आईला खरंतर आधीपासून माहित होतात.
“काय सांगतोस?
पुण्यामध्ये? तू तिच्या लग्नाला गेला होतास?” इतक्या सीरीयस क्षणी बावळट प्रश्न
विचारायचे अनेक फायदे असतात. समोरचा स्वत:चं दु:ख विसरून लगेच आपली अक्कल काढायला
धावतो. खासकरून समोरचा जर आफताब असेल तर
“वेडी आहेस का स्वप्निल?
तिच्या लग्नाला मी जाणारे का? इथं मुंबईत झालं. मुंबईचाच मुलगा आहे पण जॉबसाठी
युएसला असतो. टिपिकल आयटी वाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरलं. लगोलग झालं. निधीनं
तिच्या घरी म्हणजे होणार्या नवर्याला सांगितलं की तिला एक मुसलमानाचा मुलगा फार
त्रास देतो पार कॉलेजपासून, तो गावी हे लग्न सुखासुखी होऊ देणार नाही म्हणून लग्न
मुंबईलाच करू या. त्या मुसलमानाच्या गुंडमवाली मुलाला कळू नये म्हणून गावी कुणाला
खबर लागू दिली नाही. लकी गर्ल!” पण हे बोलताना आफताबचे डोळे भरून आले होते.
“मला हे आधी का नाही
सांगितलंस?”
“मग मी इथं का आलोय?
स्वप्निल, तुझ्याखेरीज कुणाला हे सांगू? मलाच आज सकाळी समजलं. काय करावं सुचेना,
घरामध्ये स्वत:ला संपवायचे विचार यायला लागले. अझरभाईला फोन केला तर तो म्हणाला की
कामासाठी गोव्याला गेलाय. आपण उद्या बोलू. मग मी काय करणार! सगळं जग हरल्यासारखं
वाटतंय. निधी मला सोडून गेली याचं काही नाही. ते आजनाउद्द्या होणार होतं. मला
पक्कंच माहित होतं. पण तरीही अखेर तिनं माझी किंमत गुंड पोरगा इतकीच केली. काय
त्रास देणार होतो मी तिला? तोंडावर येऊन सांगायचं होतं ना, की ब्वा आफताब!
माझ्यामध्ये वेगळ्या धर्मातल्या मुलाशी लग्न करण्याची हिंमत नाही. माझ्या
आईवडलांची जगामध्ये जी काय नाचक्की होइल त्याची मला जास्त पर्वा आहे. तर आपलं जे काय
नातं होतं ते ठिक, पण मी दुसर्याशी लग्न करतेय. इतकं कबूल जरी केलं असतं ना तरी
मी मानलं असतं. खैर! जे घडलंय ते ऑलरेडी घडून गेलंय. माझ्याकडे आता मन मोकळं
करायला कुणीही नाही. फ्रेंड्स नाहीतच. तूच एक होतीस. तुझ्याहीसोबत त्या रात्रीनंतर
नात्यामध्ये विनाकारण कॉम्म्प्लीकेशन्स आलेत. आय नो, मी तेव्हा चुकलो.”
“आपण दोघंही चुकलो”
“तसं म्हण. पण सत्य हेच
की, मी माझ्या आयुष्यामध्ये असलेली एकमेव मैत्रीण तेव्हा गमावली. मला तुला गमवायचं
नाहीये, फ़रगेट फिजिकल रिलेशनशिप ऍंड ऑल दॅट. मला माझी बेस्ट फ्रेंड परत हवीये. मी
इथं मजा मारायला आलो नाहीय स्वप्निल. माझ्या प्रेमभंगाच्या दु:खावर रडण्यासाठीही
आलो नाहिये. मला फक्त एक आधार हवाय. स्वप्निल, शक्य झालं तर ती रात्र आपल्या
आयुष्यामध्ये आलीच नाही असं समज किंवा त्या रात्री मी तुझ्या गैरफायदा घेतला असं
समज. पण आज मी इथं आलोय ते केवळ एक मित्र म्हणून!”
No comments:
Post a Comment