Wednesday, 30 October 2013

समुद्रकिनारा ( ५)


लिहायला आज वेळ मिळाला मला. घटनाच अशी आहे....

भाऊंना जाऊन महिना झाला. आज जाणार उद्या जाणार करत करत भाऊ गेले शेवटचा श्वास घेऊन. जाताना फ़ार त्रास झाला त्यांना, माझ्यामधेच जीव अडकला असणार त्यांचा...भाऊचे दिवस म्हटले तर घातले आणि म्हटले तर नाही. काकाने सगळं करायचं म्हणून केलं पण काकूची धुसफ़ुस चालूच होती. चौदाव्याला जेवायला मोजून पाच ब्राह्मण बोलावले होते.
भाऊ गेल्यापासून या घरामधे आता मी कायमची अनाथ झाले होते. घरकामाची आयती मोलकरीण. काकू मला आता शाळेत जायची काही गरज नाही हे आडून आडून सांगतच होती. त्यात परत काकाने....मघाशीच  काका-काकूचं चाललेलं बोलणं ऐकलं.
"काय मुलगी आहे.. बाप गेला तर डोळ्यातून पाणी नाही. आईवर गेली आहे असंच येणारे जाणारे म्हणत होते.” काकाने ऐकवलं. 


"आता पुढे काय?" जयाकाकूनी काकाना विचारलं."काय पुढे? ते ओझं तर आपल्यालाच वहावं लागणार आहे. अठराची होईपर्यं सांभाळू.. पुढे उजवुन देऊ.." काका विचार करून म्हटल्यासारखा म्हणाला, पण त्याच्या मनातले विचार वेगळेच चालू होते."तवर ठीक राहील ना? उद्या आईशीसारखे गुण उधळायला गेली तर काय घ्या.. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घालवून टाका घरातून.." काकूने नवर्‍याला ठणकावुन सांगितलं.माझ्या डोळ्यातुन नकळत पाणी आलं. माझं काय झालं होतं ते माहित असून काकू असं म्हणू कशी शकली? मला कुणी घालवायची गरज नाही, मी जाते इथून.....इथून कुठेतरी लांब या सगळ्यापासून लांब..... आज माझे वडील असते तर... आज माझी आई इथे असती तर... कुशीत शिरून रडण्यासाठी, भाऊ हवे होते. डोक्यावरून हात फ़िरवण्यासाठी. पण आज ते दोघं तर नव्हते म्हणून हे ऐकून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.


आज मी अंगण झाडत होते. कुणीतरी आल्याची चाहूल आली म्हणून वर पाहिलं. माझी आई आली हे सांगायची गरजच नव्हती. निळा सलवार कमीझ घातलेली, डोक्यावर दुपट्टा ओढून घेतलेली. तिच्या पाठोपाठ तो उस्मान...
त्या दोघांना बघताच विश्वाकाका आणि जयाकाकू दोघे पुरते गांगरले.
आई म्हणवत नाही मला तिला... तिचं बदललेलं नाव काय माहित नाही... लक्ष्मी…..मात्र शांतपणे पडवीत आली. एकदाच तिने पाठी वळून माझ्याकडे पाहिलं आणि ती हलकेच हसली.

आज पहिल्यादा मी माझ्या आईला पाहिलं. मी दोन वर्षाची असताना ती मला सोडून गेली. त्या उस्मानशी लग्न करायला

"इथे कशाला आलीस?" जयाकाकूने तिला तिखटपणे विचारले.

"तुला माहीत आहे." लक्ष्मीने शांतपणे उत्तर दिलं. "हे बघ, विश्वनाथ गेला. त्या आधी तू या घरातून गेलीस. तुला इथे काहीही मिळणार नाही. या घराशी तुझा संबंध नाही." वासुकाका म्हणाला. "मला माहीत आहे की त्यानी माझ्यासाठी काही सोडलं नाही. माझा या घराशी पण काही संबंध नाही. मला घरातलं काही नको. पण मला माझी मुलगी हवी.." लक्ष्मी म्हणाली.माझी आई मला न्यायला आली होती! हे ऐकून दुसर्‍या कुणाचा नाही पण वासुकाकाचा मात्र संताप अनावर झाला. "काय? तुझी मुलगी? कुठे आहे ती? सोडून जाताना आठवली नाही का ती?" जोरात ओरडत त्याने विचारलं. "हे बघा भावोजी, तुम्ही विनाकारण आवाज चढवू नका. तेव्हापण तुम्ही आणि तुमच्या भावाने मला तिला नेऊ दिलं नव्हतं. माझी मुलगी मला कधीच जड झाली नव्हती. पण त्यांनी मला सांगितलं की ते तिला सांभाळतील म्हणुन मी गेले होते. का गेले होते ते तुम्हाला चांगलंच माहित आहे... त्या माणसाने माझ्या जाण्याचा दोष या लेकराच्या माथी मारला. खुदा गवाह आहे, मी घर सोडून गेले त्याला सरस्वतीची काही चूक नाही. पण तरीही तिने न केलेल्या गुन्ह्याची सजा तिने का भोगावी? मी आज तिला घेऊन जाणार.." ती शांतपणे म्हणाली.


"कशाला? तुमच्यात नेऊन बाटवायला. तू एक धर्म बुडवलास. बाजारबसवी झालीस म्हणून लेकीलाही विकणार.." जयाकाकू म्हणाल्या.

"वहिनी, तोंड सांभाळून बोला. तुमच्या घरात मला काय भोगायला लागलं याची पूर्ण कल्पना आहे तुम्हाला. मी माझ्या आयुष्याचा मार्ग स्वत्: निवडला. माझी लेकसुद्धा तेच करेल. तिच्या बाजूने तुम्ही बोलायची गरज नाही. आज मी इथे आले कारण तिच्या बापानंतर तुम्ही तिला विकून टाकाल कुठेतरी." लक्ष्मी अजूनही शांतपणे बोलत होती.


मी हे सगळं ऐकत होते."मी सरस्वतीला तुझ्याबरोबर पाठ्वणार नाही. जे काही व्हायचं ते होऊन जाऊ दे. एवढी पंधरा वर्ष सांभाळली आहे आम्ही... " वासुकाका निर्धाराने म्हणाले.लक्ष्मीने वळून माझ्याकडे पाहिलं.


"सरस्वती.. " पहिल्यान्दाच मी माझ्या आईच्या तोंडून माझं नाव ऐकलं. का कुणास ठाऊक वेगळंच वाटलं. लक्ष्मीकडे बघताना मला “हीच माझी आई का?” असा प्रश्न पडला. ल्क्ष्मी गोरीपान, तेजस्वी. मी माझ्या भाऊंच्या रूपाची. सावळी!
"तू येणार माझ्याबरोबर?" तिने हसत विचारलं.

आता निर्णय मला घ्यायचा होता. भाऊ कायम म्हणायचे, तुझी आई पैशापाठी त्या उस्मानच्या मागे गेली. तसं आपण पण करायचं????  "अगं, मी तुला खूप खुश ठेवीन. तुझ्या काकाकाकूपेक्षाही. तुला खूप शिकवीन. मोठ्या शाळेत घालेन..." लक्ष्मी माझ्याकडॆ आशेने बघत म्हणाली.


"पण मी नाही येणार.. " मी हळू आवाजात म्हणाले.

"अगं पण.. " ती काही बोलायच्या आत वासुकाका पुढे आले.
"ऐकलस ना? असे आमचे संस्कार दिलेत आम्ही तिला. तुझ्यासारखी लाज विकणारी नाही. समजलं? आता चालती हो तुझ्या या दुसर्‍या नवर्‍याला घेऊन." काकानी उस्मानकडे पाहिलं. तो शांत उभा होता. न बोलण्याची शपथ घेतल्यासारखा.


"बेटा, असं करू नकोस. तुझ्या बाबानी मला तुला कधी भेटू दिलं नाही. आता तू तरी असं वागू नकोस. " लक्ष्मी च्या डोळ्यात पाणी तरारलं.मी काही न बोलता शांत उभी राहिले.


“हं” तिरस्काराने जयाकाकू म्हणाली. “आता तुला मुलगी आठवली का ग? या तुझ्या दुसर्‍या नवर्‍याकडून पोट पिकलं नाही ना.... कळतात हो मोहल्ल्यातल्या गोष्टी आम्हाला. म्हणून ही इतकी माया उतू चालली होय तुझी...” 


"सरस्वती..." लक्ष्मी आता मात्र रडायला लागली. उस्मान लक्ष्मीजवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "चलो." इतकंच म्हणाला."लेकीन मै.. सरस्वती... बेटा.. मी आई आहे तुझी "त्याच गोष्टीचा तर मला राग होता...कसं सांगणार मी आईला.... लक्ष्मीला? ती मला सोडून गेली याचा राग नव्हता, तिने धर्म बदलला याचा राग नव्हता... पण सगळ्यांत मोठा राग मला जन्म दिला होता त्याचा होता, तिला जर भाऊंबरोबर संसार करायचाच नव्हता, त्यांच्या पोस्टमनच्या नोकरीत तिला रहायचंच नव्हतं तर मग मला कशाला जन्म दिला? जन्म देऊन मोठं कशाला केलं? आज मी या जगात एकटी आहे. भाऊ नाहीत. काकाने दोन दिवसापूर्वी मी घरात एकटी आहे ते बघून मला.... नको नको ते केलं. काकूला सांगितल्यावर तिने मला “गप्प बैस. कुणाहीपुढे काही बोलू नकोस” एवढंच ऐकवलंय.या सर्वाला कोण जबाबदार? तर मला जन्म दिलेली आणि जन्मानंतर दोन वर्षांनी सोडून गेलेली माझी आई. आणि मी... एकटी या जगामधे हरवण्यासाठी फ़िरत असलेली.... भाऊ जोपर्यंत होते तोपर्यंत मला कित्येकदा चेष्टामस्करीत म्हणायचे, “मुली, कसलाही नवरा कर... तुझ्या आईने केलंस तसा मात्र करू नकोस. एक मी तिच्यालेखी कर्तुत्वशून्य,. आणि दुसरा तो... उस्मान दुबईवाला. आधी तू खूप शिक, मोठी हो... आणी मग नवरा कर. तुझ्यासारखाच हुशार आणि बुद्धीमान”
“आणी मुख्य म्हणजे आपल्याच धर्मातला” मी त्यांना हसत उत्तर द्याय़चे...

.
आज आयुष्याचा फ़ार मोठा निर्णय घेतला. मी आईसोबत जाणार नाही. जे आईने केलं ते मी करणार नाही. मी आयुष्यात कधीही “त्या” धर्माच्या माणसांशी ओळखदेखील करून घेणार नाही.    

माझ्या भाऊंसाठी मी एवढं नक्कीच करू शकते.

“आज एवढ्या पहाटे? तेही चक्क बांद्र्याच्या समुद्रकिनारी? सूर्योदय बघायला आलीस का? पश्चिमेकडून?” बेंचवर मागे टेकून ती डोळे मिटून बसले होते तेव्हा अगदी कानाशीच आवाज आला. डोळे न उघडताच तिच्या चेहर्‍यावर त्या आवाजाने हसू आलं.

“वीर म्हणाला की थोडाफ़ार तरी एक्सरसाईझ करत जा. तब्बेतीला चांगला असतो” तिने तसंच डोळे मिटून उत्तर दिलं
.
“मग जा, ऊठ. जॉगिंग कर. बसून काय राहिलीस?” तो तिच्या केसांतून हात फ़िरवत म्हणाला.

“दहा मिनिटे धावले, तेवढंच बास. आता कंटाळा आला, इथे आले तेच मुळात तुला भेटायला. मी सात वाजता ये असा मेसेज केला होता ना?” ती डोळे उघडत त्याच्याकडे बघत म्हणाली. उशीर का केलास?” तोच चेहरा, तेच हसरे ओठ, तेच कुरळे केस, तीच अंतरात्म्याचा डोह शोधणारी नजर असं कसं मी याला माझ्या आयुष्यातून कायमचं घालवायचं? तिच्या मनात विचार येऊन गेला.


“एवढ्या सकाळी रिक्षा मिळाली नाही. त्यातून आज रविवार..” तो तिच्याकडे बघत म्हणाला. “का इतकी थकलेली दिसतेस? खूप काम आहे का?”


“साहिल, तसं काम फ़ारसं नाही, पण गेले दोन तीन महिने... फ़ार प्रॉब्लेम चालू आहेत...” सारा हलक्या आवाजात म्हणाली.

“मग मला साधा एक फोन पण का केला नाहीस? जग सोडून गेलो नव्हतो मी” साहिलने चिडून विचारलं.

“प्लीज असलं काही बोलू नकोस... मला काहीच समजत नाही, साहिल! वीर म्हणतो की तुझ्याशी कसलाही संबंध नको. 
माझं स्वत:चं मन मला सांगतं आता झालं तितकं पुरे झालं. माझ्या आयुष्यामधे मी निर्णय घ्यायलाच हवा... पण ते शक्य होत नाही...”


“तू ऑलरेडी निर्णय घेतला आहेस, सरस्वती. तुला आता तो निर्णय निभवायचा आहे फ़क्त” साहिल दूर समुद्राकडे बघत म्हणाला. “मी मीडीयामधे वाचत होतो. वीरचं अचानक दुसर्‍याच कुठल्या मुलीबरोबर अफ़ेअर वगैरे... आधी वाटलं पब्लिसिटी स्टंट असेल... पण मग लग्नाची अनाऊन्समेंट वगैरे ऐकली, म्हणून त्या दिवशी तुला फोन केला.. तू म्हणाली होतीस, करू नको.. तरी राहवलं नाही…… एवढं सगळं घडत असताना तुला माझी एकदापण आठवण आली नाही?” “साहिल, आयुष्यातला एक क्षण असा जात नाही जेव्ही मी तुझा विचार करत नाही. तू युकेला गेल्यापासून सतत सतत तुझाच विचार करत होते आठ दिवस... आणि मग माझं आणि वीरचं भांडण झालं एके दिवशी. खूप वादावादी... मी त्याने दिलेली रिंग काढून फ़ेकली, त्याने मला मारलं...”

“सरस्वती!!! त्याची हिंमत कशी झाली?” “नातं तुटलंच होतं आमचं. पण समहाऊ गेल्या चार पाच दिवसात परत... वीर परत आला माझ्याकडे. हे काय घडतंय ते मला माहित नाही. असं काहीतरी होइल असं वाटलं पण नव्हतं.... सगळं नॉर्मल झाल्यासारखं वाटत होतं. आणि......”

“आणि तू वीरला सांगितलंस की मी तुला फोन केला होता... का? सरस्वती. वीरला आवडत नाही, हे माहित असूनसुद्धा!!”

“मग मी काय करू? त्याच्याशी खोटं बोलू? मी नाही बोलू शकत... त्याच्याशी अथवा तुझ्याशी...” तू जितक्या मोकळेपणाने माझा निर्णय स्विकारलास.... माझं आणि वीरचं नातं स्विकारलंस. तसं वीर का नाही करू शकत?”

“प्रत्येक माणूस वेगळा असतो.. वीर खूप पझेसिव्ह आहे... मी आधीच सांगितलं होतं तुला हे.. आणि का असू नये? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने उलटपक्षी फ़क्त आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा चूक थोडीच आहे का?” तो शांतपणे म्हणाला.

“मी तशी अपेक्षा कधी केलीच नाही... केली असती तर!! तर आपलं नातं कदाचित वेगळं असतं का रे साहिल?”

“माहित नाही... मी कधीच तितक्या लांबचा विचार करत नाही. आज आणि आत्तामधे जगणारा माणूस आहे मी. सरस्वती, जास्त विचार करू नकोस. वीर तुझ्या आयुष्यामधे फ़ार महत्त्वाचा आहे. तो प्रेम करतो तुझ्यावर.  त्याला असं वारंवार दुखवत जाऊ नकोस. मी स्वत:हून त्याच्याशी बोलेन एकदा. नाही आवडत त्याला तू माझ्याशी बोललेलं. पण मग मला तुझी खुशाली त्याच्याचकडून समजत राहू देत. मी त्यालाच फोन करत जाईन”


“प्लीज!” सारा घाबरून म्हणाली. “असं काही करू नकोच. तो उलट अजून चिडेल. मी तुला ऑफ़िसमधूनच कॉल देत जाईन. वीरला काय सांगायचं ते मी सांगेन.”“तू एवढी घाबरतेस त्याला?” तो किंचित हसत म्हणाला.


“नाही, पण तो परत निघून जाईल याची मात्र भिती वाट्ते. साहिल, तुझ्याइतकाच वीरपण माझ्यासाठी जगण्याचा भाग होत चाललाय. कधीकधी भिती वाटते... तुला मी माझ्या स्वत:च्या हातांनी आयुष्याबाहेर लोटलं तसंच वीरने पण...”

“असं काहीही होणार नाही” त्याने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून म्हटलं. “मी होऊ देणार नाही... घड्याळ बघ, साडेसात वाजलेत. वीर वाट बघत असेल ना तुझी?” तो विषय बदलत म्हणाला.

“नाही... तो जिमला गेला असेल. साडेनऊनंतरच येईल. तू किती दिवस आहेस इथे? गावाला गेला होतास?”

“परवाच गेलो होतो. तुझ्या आश्रमात पण जाऊन आलो. सगळे ठिक आहेत. तुझी फ़ार आठवण काढतात.
सारा हसली. “मला पण त्यांची फ़ार आठवण येते...... लेलेआज्जी जायच्या आधी त्यांना एकदा भेटायचं होतं मला!”

“मग चल ना एकदा, तुला कितीवेळा सांगितलं की माझ्यासोबत चल. तुझा काका मेला तेव्हापण गेली नाहीस.”

“काका मेल्यावर महिन्याने समजलं मला.....”

“कसं समजणार? तू काही संबंधच ठेवले नाहीस.” बोलता बोलता तो थबकला. “मी... मी गावाला गेलो होतो तेव्हा उस्मानचाचाच्या घरी पण गेलो होतो..”

अचानक सारा चिडली. “का? काही गरज होती का?”

“उस्मानचाचाच्या मयतीला.” तो शांतपणे म्हणाला. “सरस्वती, ज्याच्यासाठी तुझ्या आईने घर तोडलं, तुला अनाथ केलं तो माणूसच या जगात राहिला नाही.”

“मरेल नाहीतर काय? त्या बयेपेक्षा वीस वर्षाने मोठा होता तो” सारा दूरवर बघत म्हणाली.

“तुला जरापण काही वाटत नाही का? रक्ताचं नातं आहे तुमचं. आता ती एकटी आहे, तिला कधीतरी जाऊन भेट.. ती वागायची कशीही चुकली असेल, तिचे निर्णय चुकले असतील... पण तू? तू तर बुद्धीमान आहेस, मग तिला माफ़ करू शकत नाहीस?”

“साहिल. परत एकदा सांगते. सुलतानाची... तेच नाव आहे ना तिचं? बाजू घेऊन माझ्याशी प्लीज बोलू नकोस. आधीच मला माझे गोंधळ निस्तरताना माझा जीव मेटाकुटीला आलाय.” सारा अजूनच चिडली.

“बरं.. राह्यलं. पण तरी एकदा गावाला ये माझ्यासोबत. मनामधला हा कडवटपणा काढून टाक. किती चिडत राहशील प्रत्येकावर? माझ्यावर? स्वत:वर? कधीतरी मनामधून या सगळ्यांनाच माफ़ करून टाक. खूप खुश होशील!”

“तू माझ्या आनंदाची आणि खुशीची बात करूच नकोस. माझी जर इतकीशी पर्वा असती तर असा माझा हात अर्ध्यावर सोडला नसतास...”

“सोडणं भाग आहे. सरस्वती. किस्मत की बात है... बदकिस्मती तर किती माझी? तुझ्यापासून एवढा लांब गेलो तरी तुझ्याजवळच राहिलोय...”

“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...” साराचा आवाज भरून आला.


“तेच तर तुला करायचं आहे...” उत्तर देताना त्याचापण आवाज तितकाच भरून आला. 

(क्रमश:) 

Monday, 21 October 2013

समुद्रकिनारा (४)

“हे बघ तुला जर इंटरेस्ट नसेल तर आधीच सांगत जा... तुझं साधं लक्षसुद्धा नाही” अभिजीत बेडवरून बाजूला होत म्हणाला. “आल्यापासून बघतोय, माझ्यासोबत असून नसून आहेस..काही भलतेच विचार चालू आहेत”
नेत्रा त्याच्याहून जास्त वैतागत म्हणाली, “तू आलास तेव्हाच सांगितलं तुला. दमलेय मी आज दिवसभर त्या आझाद मैदानाच्या धुळीमधे फ़िरून फ़िरून. झोपून जाते म्हटलं तर तुला फ़ार प्रेमाचा उत्साह आलाय...”
“आठवड्यातून एका रात्री सुट्टी मिळते.... त्याहीवेळेला तुझे असले नखरे... हे दमण्याचे वगैरे बहाणे आहेत... तुझ्या मनामधे दुसरंच काही तरी चालू आहे.”

“मी तुझी लग्नाची बायको नाही, तू म्हणशील तेव्हा तुझ्याबरोबर सेक्स करायला....”नेत्रा उठून बसत म्हणाली... “आणि हो... आज दिवसभर माझ्या डॊक्यामधे फ़क्त आणि फ़क्त या सरस्वतीचेच विचार चालू आहेत.”
 
“कोण सरस्वती?” अभिजीतने सिगरेट पेटवत विचारलं.
“आमची चीफ़ एन्टरटेनमेंट रिपोर्टर... सारा व्ही के. असलं फ़ॅन्सी नाव ठेवलं म्हणून बॅकग्राऊंड बदलत नाही..” नेत्राच्या आवाजातला तिरस्कार लपत नव्हता.  
 
“तू काय म्हणतेस मला काही समजत नाही. आता रात्री बारा वाजता माझ्या मिठीत असताना तुला तिचा विचार करायची काय गरज आहे?”
 
“अभिजीत, मी आल्यावर काय सांगितलं तुला? विसरलास का? सारा वीर कपूरसोबत आहे. आम्ही दोघी परत येताना मी तिला बिल्डिंगपर्यंत टॅक्सीने सोडलं. मी लगेच तिच्यामागे गेले मुद्दाम. अभिजीत, ती हिल रोडला राहते. एकदम पॉश सोसायटीमधे.... आणि लिफ़्ट्मधून तिच्यामागोमाग गेले तर.... तिने डोअर बेल वाजवली.. कुणीतरी दरवाजा उघडला... पण ती एकटी राहते......”

“तू पण एकटीच राहतेस...” अभिजीत्त तिचं वाक्य तोडत म्हणाला. “.... तरी आज आहे ना मी तुझ्या रूमवर? तसा तिचा कुणी बॉयफ़्रेंड असेल.. पण आपण आता या वेळेला तिच्याबद्दल का डीस्कस करतोय ते सांगशील??”  
“कारण, मला तिच्याबद्दल खूप आधीपासून संशय आहे.. अभिजीत... तुला गंमत समजलीच नाही का? ती वीर कपूर... फ़िल्महीरो.. नेस्क्ट सुपरस्टार वगैरे.. त्याच्यासोबत झोपते. आज मी तिच्या फोनवरून कन्फ़र्म केलंय. तिच्या रूमवरती पण तोच असेल एवढ्या रात्री.. आय ऍम शुअर..”
“नेत्रा, प्लीज... मला आता काहीही समजत नाहीये. आधीच ब्रेनचं ब्लड सर्क्युलेशन कमी झालंय माझं... त्यात तू हे काय बोलतेस? कसला संशय... कोण ती सारा.... भले त्या वीर कपूरबरोबर तिचं अफ़ेअर असेनात का... की फ़रक पेंदा हे?”
“अभिजीत, सारा तिच्या पर्सनल लाईफ़मधे काय वाट्टेल ते करू देत, आय डोण्ट केअर. पण वीर कपूर??? वीर कपूर तिचा न्युज सोर्स आहे. इतका मोठा स्टार बेस्ट फ़्रेण्ड असल्यासारखा तिला फ़िल्मच्या सगळ्या न्युज पुरवत असतो. तिच्या आधीच्या कचरा न्युजपेपरमधून तिला या न्युजपेपरमधे जॉब त्याच्याच जोरावर मिळालाय. प्रश्न सारा वीरसोबत काय करते तो नाहीये. प्रश्न हा आहे की, तिने हे रिलेशनशिप लपवून का ठेवलंय? जर तिला लपवायचंच होतं तर तिने सर्वांना साहिलबद्दल का सांगून ठेवलंय?”
“अता हा साहिल कोण?” अभिजीतने मघशी काढून ठेवलेला टीशर्ट अंगात घालत विचारलं.
“साराचा बॉयफ़्रेन्ड. ऍकॉर्डिंग टू सारा, तो गल्फ़ला असतो. मुसलमान आहे, त्याच्या घरून लग्नाला परवानगी नाही..” नेत्राने अभिजीतच्या हातातली सिगरेट घेऊन ओढली, “म्हणून दोघं लग्न करत नाहीत... ब्ला ब्ला ब्ला... पण ही स्टोरी नक्कीच खोटी आहे... साराच्या फ़ेसबूकवर त्याचा आणि तिचा एकही फोटो नाही. गेल्या तीन वर्षात त्याला ऑफ़िसमधे कुणी पाहिलेलं नाही... साराच्या मोबाईलवरून साहिलला फोन लावला तर तो फोन वीर कपूर उचलतो...”
“सो?”
“म्हणजे सारा आणि वीर दोघेही हे रिलेशनशिप लपवतायत... आलं का लक्षात? वीरने चार दिवसापूर्वी लग्नाची अनाऊन्समेंट रद्द केली होती. कशासाठी ते कुणालाच माहित नाही... पण त्यावर साराच्या रिपोर्टलाच सगळ्यांनी खरं मानलंय...”
“नेत्रा, हे सगळं खरं असलं तरी त्याचा नक्की काय संदर्भ लावतेस तू? तिचं पर्सनल लाईफ़ आहे...”
“हो. पण वीर कपूरचं लाईफ़ पर्सनल नाहीये ना... ही इज अ स्टार... ऍन्ड मोस्ट इम्पोर्टंटली ही इज अ सन ऑफ़ अ सुपर्स्टार..”
“व्हॉट रब्बिश!! त्या सर्व अफ़वा आहेत... मीडीयामधे छापून येतं विनाकारण..”
“नो, अभिजीत. तुला त्याची काहीच हिस्ट्री माहित नाही का? वीर कपूरबद्दल??”
“मला कशाला माहित असायला हवं? मी केपीओमधे काम करणारा माणूस आहे, तुझ्यासारखा जर्नालिस्ट नाही... लोकांची गॉसिप्स चघळत लिहायला... सालं आठवड्यातून एखादी रात्र मिळते.. ती एंजॉय करणे सोडून हे असलं भलतंच काही तरी विचार.... खड्ड्यात गेली ती सारा आणि तो वीर. असेल त्यांचं काही लफ़डं. ठेवली असेल त्याने तिला.. तुला घेऊन काय करायचंय??
“मला भलामोठा स्कूप मिळतोय... साराच्या पर्सनल लाईफ़वरून जर मी धवनला हे पटवून देऊ शकले की सारा स्लीप्स अराऊन्ड फ़ॉर स्टोरीज.. तर माझा किती फ़ायदा आहे ते बघ ना.. अनाथ आहे ती, म्हणजे घरचे तर कुणी पैसे देत नसणार. बाजारात येणारं प्रत्येक नवीन गॅजेट तिच्याकडे असतं. कपडे तर युरोपियन ब्रॅन्डचे वापरते. अभिजीत, माझे वडील कस्टम्समधे ऑफ़िसर आहेत, तरीपण मी तिच्याइतके पैसे उधळू शकत नाही.... मग साराकडे कुठून येतात एवढे पैसे? कसं काय तिने वीरला पटवलं असेल... दिसायला तर काळीच आहे की ती... ” नेत्रा बोलत असतानाच अभिजीत बेडरूममधून बाहेर पडून हॉलमधे गेला, “कुठे निघालास?” तिने बेडवरूनच विचारलं.
“मी माझ्या फ़्लॅटवर जातोय. नेक्स्ट टाईम, तू तिकडेच ये. एवढं सालं ड्राईव्ह करून इथे यायचं आणि तुझं ऑफ़िस पुराण ऐकायचं. झक मारली आणि आज इथे आलो.”
“एवढापण चिडू नकोस. माझ्या करीअरचा प्रश्न आहे. थोडीफ़ार साथ देऊ शकतोस तू मला....” ती चिडून ओरडली.
“काय साथ देणार? काय अपेक्षा आहेत काय तुझ्या माझ्याकडून? मघासी तर ओरडलीस ना.. लग्नाची बायको नाही म्हणून... मग आता?” अभिजीत तिच्याहून जास्त जोरात ओरडत म्हणाला.
“तुझ्याशी ना बोलणंच बेकार होत चाललंय”
“मग नकोच बोलूस... यु नो व्हॉट.... कदाचित तुझ्या आणि सारामधे हाच डिफ़रन्स असेल.. ती कदाचित त्या वीरला अशी बेडवरून रात्री दीड वाजता हाकलून देत नसेल...”
“मी तुला कुठेही हाकलत नाहीये, तू स्वत:हून जातोयस”
अभिजीतने बाहेरचा दरवाजा उघडला, “पण तू थांब हे देखील म्हणू शकत नाहीस ना...” आणि धाडकन दरवाजा ओढून तो बाहेर पडला.
==========================================================

 
“सारा... सारा... लवकर ये” वीरच्या आवाजातलं हे ओरडणं ऐकून साराचे डोळे उघडले. डोळे चोळत तिने मोबाईलमधे किती वाजले ते पाहिले तर पहाटेचे साडेपाच वाजले होते.
“सारा.. प्लीज लवकर ये...” पुन्हा एकदा वीरचा घाबरा आवाज आला.
सारा कशीबशी बेडवरून उतरली.
 
“काय झालं?” तिने पेंगुळल्या आवाजात विचारलं. वीर हॉल आणि किचनमधल्या पॅसेजवर उभा होता.
“पाल आहे” वीर सावकाश म्हणाला.
साराने पुन्हा एकदा डोळे चोळले. “आणि म्हणून तू मला मध्यरात्री झोपेतून उठवलंय?” सारा अविश्वासाने म्हणाली. वीर एकटक त्या पालिकडे बघत हातात झाडू घेऊन उभा होता.
“नीट बघ तिकडे. गॅसच्या बाजूला आहे अजून” वीर पुन्हा एकदा हळू आवाजात म्हणाला.
“तू जोरात बोललास तरी पालीला काही समजणार नाही... बेडरूममधे जाऊन बस..” साराने चष्मा पुसून डोळ्यांवर लावला आणि वीरच्या हातातला झाडू घेतला. वीर तिथून गेल्यावर ओट्यावरची ती पाल दात ओठ खात झाडूच्या दोन तीन फ़टक्यात गारद करून टाकली.
“नीट मार गं. नाहीतर मागच्या वेळेसारखी परत जिवंत व्हायची.” वीरची सूचना आली.
“एवढी चिंता असेल तर तू येऊन मार ना... मला कशाला आमंत्रण दिलंस..” साराने लगेच उत्तर दिलं. मेलेली ती पाल किचन बाल्कनीमधून खाली भिरकावून दिली. “गेली आता घराबाहेर. तुला इकडे यायचं असलं तर ये” सारा म्हणाली.
“थॅन्क गॉड तू घरात होतीस.. नाहीतर काही खरं नव्हतं माझं. आय जस्ट हेट दीज लिझर्ड्स.” वीर म्हणाला.
“मी घरात होते म्हणजे? हे माझं घर आहे वीर. विसरलास का? आणि तू एवढा मोठा ऍक्शन हीरो म्हणवतोस आणि साध्या एका पालीला घाबरतोस?” सारा त्याला चिडवत म्हणाली. “उद्याला तुझ्या मूव्हीमधे एखादी पाल व्हिलन म्हणून असेल तर?”
“असले व्हिलन नसतात आपल्याकडे.. असली तर मी काय तो रोल करणार नाही.... कॉफ़ी घेतेस?”
“मी परत जाऊन झोपते तासभर. आज सुट्टीचा दिवस आहे माझा... सकाळी सकाळी तुझ्यामुळे पाल मारावी लागली.”
“पण तू ते पेस्ट कंट्रोल करून घेतलं नाहीस का? मागच्यावेळेला केलं होतं ना?”

“हो, ते तुला झुरळं वगैरे दिसले होते म्हणून तूच कुणालातरी बोलावलं होतंस. वर्ष होऊन गेलं त्याला... मला त्याची काही गरज वाटत नाही.. झुरळं दिसली की सरळ स्प्रे मारते.. आणि पाल दिसली की सरळ सुतावरून स्वर्गात पाठवते...”


“तुला बरोबर जमतं ना हे पाल वगैरे मारायला..” वीर तिच्या हातात कॉफ़ी देत म्हणाला.
“मग? तू आमच्या आश्रमात कधी पाहिलं नाहीस. तिथे फ़रशी नव्हती, शेणानं सारवलेली जमीन. पाल, कुसरूम्ड वगैरे तर नेहमीचेच होते तिथे. पावसाळ्यात कधीकधी विंचू, जनावरं पण यायची...” एरवी सारा तिच्या आश्रमांच्या दिवसाबद्द फ़ारसं कधी बोलायची नाही.
“जनावरं? यु मीन गाय बैल वगैरे?”
“नाही रे वेड्या. जनावरं म्हणजे साप वगैरे. तेव्हा रोज कुणाच्याना कुणाच्या खोलीत साप निघायचेच.आधी पहिले थोडे दिवस मला भिती वाटायची, नंतर सवय झाली होती मी पण साप मारायला लागले होते. एकदा तर मी आणि साहिल बागेत असंच काहीतरी बोलत बसलो होतो. आणि समोरून चक्क जातिवंत नाग आला. मारू नये म्हटलं तरी धोक्याचाच. मारावं म्हटलं तर आम्हीच दोघं तिथे... उलटून आला तर काय करा. शेवटी साहिलने तिथलाच एक दगड उचलून मारला... मी पण दोन तीन दगड घेतले आणि मारला एकदाचा त्याला..” सारा भराभर बोलत होती... तिचं वीरकडे लक्षच नव्हतं. असतं तर तिला ताबडतोब वीरच्य चेहर्‍यावर आलेला संताप आणि तिरस्कार ताबडतोब दिसला असता...
“बरोबर आहे... तुझ्या साहिलला एखाद्याला मारणं फ़ारसं कठिण नाहीच” तो कड्वट आवाजात म्हणाला.
 
 “काय म्हणालास?” सारा बोलताना अचानक थांबत म्हणाली.
“काही नाही... असंच सहज..” तो बाल्कनीमधून बाहेर बघत म्हणाला.
“सॉरी.. साहिलचं नाव तुझ्यासमोर घ्यायचं नाही असं कायम ठरवते.. पण ते शक्य होत नाही...” सारा अपराधी स्वरांत म्हणाली.
वीर काही न बोलता शांत बसून राहिला.
“वीर, सॉरी म्हटलं ना...”
“नुसतं सॉरी म्हणून काय होणारे? सारा, आपलं नातं तुटलं होतं ते याचसाठी. मी, राजनने तुला कितीवेळा समजावून सांगितलंय.. प्रोफ़ेशनल काऊन्सिलींग देऊन सांगितलंय...” वीर बोलत असताना साराच्या डोळ्यांतून पाणी आलं. “सारा, ट्राय टू अंडरस्टॅन्ड.. हे तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे... समजतंय का तुला मी काय म्हणतोय ते?” वीर समजुतीच्या स्वरांत म्हणाला.
“हो.. मी माझ्यापरीने प्रयत्न करत नाही का? मला तुमच्या या सर्वांची ही अपेक्षाच समजत नाही... मी माझ्या आयुष्यामधून त्याला कायमचं वजा करावं... जणू तो आणि मी कधी भेटलोच नव्हतो.. असं मानावं.... पण हे शक्य नाही वीर... माझ्याच्याने हे जमणार नाही. कारण, वीर जेव्हा माझ्या आयुष्यात तू नव्हतास, तेव्हा साहिल ही एकमेव व्यक्ती होती... त्याने मला आधार दिला... कितीवेळा वाटलं की जाऊन जीव द्द्यावा. त्याने परत जगायला शिकवलं. मी त्याच्याशिवाय आज इथे कधीच आले नसते... आणि वीर, तू दरवेळेला मला चुकीत धरतोस? माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना मी तुला सांगितली आहे. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या सख्ख्या काकाने केलेला बलात्कार असू दे वा मी फ़र्स्ट इयरनंतर साहिलसोबत पळून गेले ते असू दे.. काय लपवून ठेवलंय मी तुझ्यापासून? ज्या क्षणापासून तुझ्या प्रेमात पडले त्या क्षणापासून साहिलशी सगळे संबंध तोडले. कितीतरी दिवस माझा फोन नंबर पण नव्हता त्याच्याकडे... त्याला माझा नंबर कुठून मिळाला माहित नाही... अधून मधून फोन करतो... तेवढंच!” साराच्या या वाक्याबरोबर वीर चमकला... “कालच त्याचा फोन आला होता... दोन मिनिटं बोलल्यासारखं केलं आणि फोन ठेवून दिला... अजून काय करू मी? माझ्या भूतकाळातील आठवणी मिटवून तर टाकून देऊ शकत नाही ना?”
“सारा... सांगितलं ना एकदा. सॉरी! माझा खरंच तस काही उद्देश नव्हता.. तुझ्या लाईफ़मधे साहिल काय आहे ते माहित आहे मला.. पण आता... जाऊ देत तो विषय. आजचा पेपर आलाय का? तुला फ़्रंटपेज बायलाईन असेल ना?”
“नाही, आजची बायलाईन मला नाहीये” सारा डोळ्यांतलं पाणी पुसत म्हणाली. “आणि त्यात काही फ़ारसं ग्रेट पण नव्हतं, रोहित कपूर शेवटी स्टेजवर आलाच नाही. काय गडबड झाली कुणास ठाऊक....”

“गडबड काही झाली नाही. मी काल त्याला फोन केला होता.” वीर सहजपणे म्हणाला. “रसिकासाठी म्हणून...”


“खरंच वीर? पण कसं काय...”
“काही नाही गं, त्याला फोन केला आणि...” एवढ्यात वीरचा मोबाईल वाजला. राजनचा नंबर होता.
“सारा, एक मिनीट हा... फ़ायनान्सरचा फोन आहे. मी जरा बाल्कनीमधे जाऊन बोलेन” म्हणत वीर बाल्कनीमधे आला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला.
पलिकडे राजन काही बोलणार त्याआधीच वीर हळू आवाजात म्हणाला, “राजन... साहिल परत आलाय?”
“क्या बात कर रहा है?”

“आता सारासोबत आहे मी. तिनेच सांगितलंय” वीर प्रचंड चिडलेला होता.
“कसं शक्य आहे? साहिल....”
“हे बघ कसं शक्य आहे ते मला माहित नाही. काहीही कर आणि कसंही कर.. पण हे असलं परत घडता कामा नये” एवढं बोलून वीरने फोन कट केला.
साहिल परत आला होता ही काही फ़ार आश्चर्याची गोष्ट नाही, पण त्याने साराला फोन करायची हिंमत केली ही फ़ार वाईट गोष्ट आहे, वीर स्वत:शीच पुटपुटला.