इंधन ही हमीद दलवाईंची यांची
एकमेव कादंबरी. याआधी त्यांचा “लाट” हा अप्रतिम कथासंग्रह वाचला होता, इंधनबद्दल
बहुतेकांनी “अवश्य वाच” असे सांगितल्यामुळे वाचायची फ़ार उत्सुकता होती. पण हे
पुस्तक बाजारामधे मला कित्येक दिवस मिळाले नव्हते. पुस्तकजत्रा.कॉमच्या राज जैन
यांनी हे पुस्तक उपलब्ध असल्याचा फ़ेसबूकवर मेसेज टाकल्यावर ताबडतोब ही कादंबरी
मागवून घेतली.
हाती आल्यावर सलग वाचून
काढली एवढी छोटीशी कादंबरी आहे, पण या छोट्याशा प्रतलावर हमीद दलवाईंनी जो पसारा उभा
केलाय, तो एकमेवाद्वितीय असा आहे. कादंबरी बरीचशी आत्मचरित्रात्मक आहे. भडकवण्यासाठी
एक वार्याचा झोतदेखील पुरेसा ठरत असताना त्यामधे कुणी भसाभसा इंधन ओतल्यावर आग
जशी काय पेटेल, तशाच गावामधल्या काही छोट्या छोट्या घटनांमुळे संपूर्ण गाव कसं
गढळून निघते, त्याचे चित्रण म्हणजे इंधन. १९६५
साली प्रकाशित झालेली ही कादंबरी एका गावातील विविध घटनांचा आणि त्यांच्या
आपापसातील नात्याचा वेध घेते. या कादंबरीचा नायक (ज्याचे नाव कधीच समजत नाही)
पंधरा वर्षांनी गावाला परत आला आहे. त्याच्या निवेदनामधून या गावाची पात्रं, त्यांचे
व्यक्तिगत संबंध आणि वादविवाद येत जातात. स्वातंत्र्यानंतरची दोन दशकं जेव्हा
फ़ाळणीसारखी गोष्ट देश विसरला नव्हता, जेव्हा देशाचा एक भलामोठा हिस्सा
आंबेडकरांच्या विचारावर पाऊल ठेवून स्वत:चे अस्तित्व शोधत होता, जेव्हा
खोती-जमिनदारी यांसारख्या सरंजामी प्रवृत्तींना चाप बसत होता- या काळांमधे ही कथा
घडते. धर्म-जात यांसारख्या गोष्टींमधे हजारो वर्षं गुंतून पडलेला समाज आणि नव्या
काळामधे या धर्म-जातीपेक्षाही जास्त महत्त्वाची ठरणारी सत्ता-पैसा आणि मग्रूरीची
ताकद ही या कादंबरीचे बीज. तत्त्वापेक्षाही अहंकाराला, स्वत:चंच खरं करण्याच्या
सामूहिक अट्टहासाचा परिपाक म्हणजे ही कादंबरी.
मुळात या कादंबरीचा नायक
फ़ार विलक्षण आहे. त्याचा धर्मावर, दीनवर विश्वास नाही, तो नमाझ रोझे असले काहीही
धर्माशी संबंधित करत नाही. तो अतिशय विवेकवादी आहे, पण त्याचबरोबर त्याला
चांगले-वाईट, उच्च-नीच यांची जाणीव आहे पण आपल्या वैयक्तिक मूल्यांवर तो
समोरच्याला जोखत नाही. स्वत:च्याच भावाची रखैल असणार्या सुमतीबरोबर तो मैत्री करू
शकतो, तिच्याशी गप्पा मारू शकतो. कधीकाळी जिच्याबद्दल आपल्या मनामधे काही नाजुक
भावना होत्या, अशी मुलगी मेल्यावरदेखील तो मरतिकाची नमाझ पढावी लागेल म्हणून
तिच्या मूठमातीला जात नाही. नायकामधला हा प्रखर विवेकीवाद अर्थात गावामधे कुणालाच
आवडत नसल्याने तो गावी कित्येक वर्षे येतच नाही. मुंबईमधे राजकारण-समाजकारण यामधे
कार्यरत असणारा हा मध्यम-वयीन नायक हार्ट ऍटॅकसारखे दुखण्यातून बाहेर पडून गावी विश्रांतीसाठी
येतो. गांधी टोपी घालून राष्ट्रसेवादलात जाणारा नायक पंधरा वर्षापूर्वी गाव सोडतो
तेव्हापासूनच घरच्यांशी, गावातल्यांशी त्याचे संबंध तणावपूर्ण आहेत. गावामधे इतर
मुसलमान त्याला अंतर राखून आहेत त्याचे मुख्य कारण, त्याने पंधरा वर्षापूर्वी
मुसलमान खोतांची बाजू न घेता, कुणब्यांना जमिनीवरचा ताबा न सोडण्याचा दिलेला
सल्ला. खोतांच्या जमिनी कसंही करून गेल्याच असत्या, पण तरीही दोषाचा ठपका नायकावर
येऊन बसलेला आहे. तो त्याला मान्यदेखील आहे. पंधरा वर्षांनी परिस्थिती बरीच बदलली
आहे, आता गावातील लोकांना आपल्या गावच्या या नेत्याचे कौतुक आहे. “छाप्यामधे”
येणारे नायकाचे फोटो व इतर बातम्या याबद्दल गावामधे चर्चादेखील होते. आता नाजुक
तब्बेत घेऊन आलेला नायक मात्र शक्य तितके तटस्थ राहून गावामधल्या कॉम्प्लेक्स
नात्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गावामधील मुस्लिम, ब्राह्मण, परीट,
न्हावी, वाणी, कुळवाडी, कुणबी आणि पूर्वीचे महार पण आता बौद्ध झालेले दलित अशा
अनेक समाजघटकांमधे झालेले बदल- अथवा अजिबात न झालेले बदल नायक टिपत जातो. गावातले
हे सगळे घटक उदरनिर्वाहासाठी एकमेकांवर अवलंबून असलेले. आणि तरीदेखील मनामधे
एकमेकांबद्दल सूक्ष्म अढी कायम ठेवून असणारे. उच्च-नीच, शुद्ध-अशुद्ध, आपला-परका
या भावनांना अद्याप कुरवळणारे पण तरीही “भानगडी” मात्र पुष्कळ करणारे. गावामधे अशा
भानगडी आधीपासूनच आहेत. खुद्द नायकाचा भाऊ एका ब्राह्मण विद्यार्थिनीसोबत गेले
कित्येक वर्षे झोपतो. गावामधे एकटीच राहणारी परटीण आपखुशीने मुसलमान खोतांना जवळ
येऊ देते. सुदाम आपल्या तरण्याताठ्या सुनेवर बलात्कार करतो. तर अशा गावामधे नवीन
घर बांधणारा इसाक त्याच्या बांधकामावर मजुरी करणार्या बौद्धाच्या लक्षुमीला घरी
ठेवून घेतो आणि इथे ठिणगी पडते या आगीची. खोतांनी महारांच्या बाया लागू कराव्यात
हे पूर्वी काही फ़ार आश्चर्याचं नव्हतं, पण आताच्या बद्ललेल्या काळात एका
मुसलमानाने राजरोसपणे तिला आपल्याच घरात ठेवून घेणं तेदेखील विवाहित स्त्रीला हे
बौद्धांना रूचत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची, आपल्या स्त्रियांच्या अब्रू
इज्जतीची त्यांना आता जाणीव आली आहे शिवाय त्यांना कुळवड्यांची साथ मिळते आणि मग
सुरू होतो एक वेगळाच संघर्ष. या संघर्षामधे नुकसान दोन्ही बाजूंचं होणार हे माहित
असतं, तरीदेखील ही लढाई असते स्वत:च्या धर्माभिमानाची, जातीच्या अभिमानाची.... शिमग्याच्या
पालखीच्या मिरवणुकीत ही लढाई अत्यंत भेसूर रूप धारण करते... आणि त्यानंतर नायक गाव
सोडून निघून येतो, पण तरीही गावामधे घटनांची साखळी पुढे चालूच राहते. नायक
गावामधून बाहेर पडल्यावर इतकावेळ वर्तमान काळामधे असलेलं निवेदन भविष्यकाळात चालू
होतं. हा भविष्यकाळ म्हणजे “हे असंच घडणार” अशी नायकाची दृढ मनोधारणा की त्याचा
“हे असं घडायला हवं” हा स्वप्नविलास याचा निर्णय वाचकांवर सोडला आहे.
हमीद दलवाईंनी उभा केलेला
हा कोकणी गाव आजच्या काळाला मात्र पूर्णपणे बदलला आहे. किंबहुना साठच्या
दशकापेक्षाही वाईट परिस्थिती गावांमधून पहायला मिळते हेच सत्य. संपूर्ण देशाचे
राजकारणच आता जाती-धर्मानिष्ठित झाल्याने कोकणातील गावागावामधून देखील तेच चित्र
आहे. आता मुसलमान खोत राहिले नाहीत. पूर्व आणी दक्षिण आफ़्रिकेमधे जाऊन पैसे कमावून
येणारे तुरळक मुसलमान गावांमधून असायचे. ८०च्या दशकानंतर गल्फ़मधे जाऊन काम करणार्या
मुसलमानांची एक अख्खी पिढी इथे उदयाला आली. शिक्षण, सुधारणा याहीपेक्षा जास्त
महत्त्व जास्तीत जास्त पैसे कमावण्याला आले. नव्वदच्या दशकांतील राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय घटनांनंतर हिंदु आणि मुस्लिम दोघेही भिन्न रहाणेच पसंत करू
लागले आहेत.
बाणकोटी अथवा संगमेश्वरी
नावाने ओळखली जाणारी मुसलमान समाजाची बोली हल्ली फ़ार कमी ऐकू येत आहे. किंबहुना,
कोकणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या कित्येक कादंबरीमधेदेखील ही भाषा दिसत नाही. कादंबरीमधे
मात्र या बोलीचा सहज सुंदर असा वापर आहे. गावातील सर्व पात्रे त्यांच्या ग्रामीण
बोलीमधे बोलतात, आणि नायक सहजपणे ग्रामीण आणि शहरी बोलीमधे संवाद साधताना दिसतो. हमीद
दलवाई यांची लेखणी फ़ार नेमकेपणाने ओघवतं लिहीते. सुमती, भाबी, बाबा, जनार्दन, इसाक
यांसारखी पात्रे जिवंत उभी राहताना दिसतात. कादंबरीमधे कुणीच ब्लॅक ऍन्ड व्हाईट
शेडमधे नाही, प्रत्येक पात्र हे ग्रे आहे. कुणालाही उदात्त करण्याचा अथवा कुणाचीही
टीका करण्याचा इथे सोस नाही. लेखक फ़क्त घटना टिपतो आणि त्या मांडत जातो, परंतु दत्यातून
कसलीही वैयक्तिकरीत्या टिप्पणी करत नाही. या सर्व घटनाक्रमाकडे नायक ज्या
तटस्थतेने आणि अलिप्ततेने पाहतो ते फ़ारच रोचक आहे. वास्तविक, नायकाला संघर्षाची
ठिणगी पडण्याआधीच त्यामागची भयावहता जाणवते, तसे घडू नये म्हणून तो त्याच्यापरीने
प्रयत्नदेखील करतो. कुटुंबीयाविषयी, गावातील व्यक्तींविषयी, त्याला माया आहे,
काळजी आहे पण त्याचबरोबर त्याला या गावातील चुका, त्यांच्या विचारधारेतील त्रुटी
स्पष्टपणे जाणवतात. अधूनमधून तो हे सर्व व्यक्त करतो, परंतु गावामधील व्यक्ती
जेव्हा आपले ऐकत नाहीत हे लक्षात येते तेव्हा नायक निवांतपणे प्रेक्षकाची भूमिका
स्विकारतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी लेखकाचा विवेकवाद, त्याच्या जीवनमूल्यावरील
निष्ठा कुठेही ढळत नाहीत अथवा कुठेही “उपदेशकाची” भूमिका लेखक घेत नाही.
दिलीप चित्रे यांनी “द
फ़्युएल” या नावाने या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर केले आहे. आता कधी जमल्यास ते
भाषांतर वाचण्याची इच्छा आहे.
इधंनएवढच भारी लिहिलय. कादंबरीतील सुमती हे पात्र माझं खूप आवडतं पात्र आहे.
ReplyDeleteThanks.
Delete