Showing posts with label मराठी कथा. Show all posts
Showing posts with label मराठी कथा. Show all posts

Sunday, 17 September 2023

फिरूनी नवी (भाग 5)

 

लंच ब्रेक झाला तशी अनिशा तिच्या ऑफिसमधून बाहेर पडली. सलोनी तिच्यावर लक्ष ठेवून होतीच.

तिच्यामागोमाग तिही बाहेर आली.

हॅलो, निघालीस कुठे?” तिनं हाक मारली. ऑफिसच्या रिसेप्शन काऊंटरवरून अनिशाने मागे वळून पाहिलं.

तुला मघाशीच म्हटलं ना, मी लंचला बाहेर जातेय.

तू रोज तुझ्याच त्या कुबट केबिनमध्ये बसून लंच घेतेस. माझ्यासोबत ये म्हटलं तर बिल्कुल ऐकत नाहीस. मग आज कुठे निघालीस?”

अनिशाच्या मनामध्ये या सलोनीच्या खचखचून कानाखाली मारावी का असा विचार येऊन गेला. पण हे असे हिंसक विचार सलोनीच्या आगाऊपणामुळे आलेले नसून आपल्याला लागलेल्या तीव्र भुकेमुळे आहेत याची तिला कल्पना होती.

मॅडम, मघाशी सांगितलं ना, माझ्या एका मित्राने मला फोन केला होता. लंचसाठी भेटूया का म्हणून? त्याला भेटायला निघाले आहे

सकाळी निमिषचा कॉल तसा एकदम अचानकच आला होता. त्या दिवशी तिच्या घरून गेल्यानंतर त्यानं अधून मधून तिला मेसेजेस केले होते. क्वचित एखादा कॉल. त्याहून कधीतरी लंच किंवा डिनरसाठी भेटणे. किंबहुना, हे भेटणं डेट वगैरे कारणांसाठी नसून, तिला खाऊपिऊ घालण्यासाठीच असावं असा तिला संशय होता.

आजही त्याने एकदम ठामपणेआपण लंचला भेटू. मी साडेबारा वाजता तुला न्यायला ऑफिससमोर येतोआणि वर तिच्या होय नाहीची वाट बघता फोन ठेवूनही दिला. दुर्दैवाने हा फोन आला तेव्हा, सलोनी तिच्यासोबत होती. अनिशा कुणासोबत तरी लंच डेटवर जातेय हे समजल्याक्षणी तिच्यामधले प्रोटेक्टिव्ह अंटेने ऑन झालेले होते.

मग कोण निमिष? कुठे भेटला? काय करतो? वगैरे चौकश्याना सुरूवात.

मुळात बाराशे जण काम करत असलेल्या त्या ऑफिसमध्ये बाकीच्या अकराशे अ‍ठ्ठ्याण्णव जणांना सोडून ती अनिशालाच मैत्रीण का मानत होती देव जाणे. एरवीची तुसडी, एकटी राहणारी अनिशापण कधी काही बोलायची ती फक्त सलोनीशी.

अर्थात, सलोनीला निहालबद्दल काहीही माहित नव्हतं. अनिशाच्या पास्ट बद्दल काहीही माहित नव्हतं. तरीही चार वर्षांपूर्वी जेव्हा तिनं एच आर को ऑर्डिनेटर म्हणून अनिशाचा इंटरव्ह्यु घेतला, तेव्हापासून तिनं तिच्या बॉडीगार्डचा रोलही घेतला. अनिशाने तिला कधीही निहालबद्दल सांगितलं नाही, कारण निहालपासून डीटॅच होण्याची तिची ही पहिली सुरूवात होती. निहालबद्दल कुणालाही सांगणं. आपल्या आयुष्यामधल्या एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीबद्दल कुणालाही काहीही सांगणं.

आणि निहालबद्दल काही सांगितलं नाही तर, निमिषबद्दल सांगण्याचा प्रश्नच येत नाही ना.

सांगितल्या वेळेप्रमाणे ती आणि सलोनी दोघी जणी ऑफिसबाहेर येऊन थांबल्या. साडेबाराला येतो म्हणालेला निमिष एक वाजला तरी उगवला नाही.

तू परत त्याला कॉल करसलोनी म्हणाली. मी पुन्हा एकदा मोबाईल काढून त्याचा नंबर डायल केला.पाचच मिनिटांत पोचतोहे तिनं पाचव्यांदा ऐकून घेतलं.

सवयच आहे त्याला अशा लेट करंटगिरीची. निहाल एकदम पंक्चुअल..बोलता बोलता अनिशा थबकली. व्हॉट्सॅप चेक करत असलेल्या सलोनीचं नेमकं लक्ष नव्हतं ते एका अर्थाने बरंच  झालं. निहालचा उल्लेख असाच हवेमध्ये अर्धवट राहून गेला.

तेवढ्यात गेटमधून बाईक येताना दिसली.. अर्थात निमिषची.  त्यानं बाईक समोर आणून लावली तरी सलोनीचं लक्ष नव्हतं. त्याच्यासमोर उभी असलेली अनिशा आता कितीतरी बदललेली होती. अंगामधला काळा प्लेन कुर्ता त्यावर घेतलेली गुलबक्षी ओढणी. मोकळे सोडलेले पण नीट विंचरलेले केस. डोळ्यात काजळाची हलकीशी रेष. आणि ओठांवर लिपस्टिक. अनिशा बदलत होती हे त्याला दर भेटीमध्ये जाणवत होतं, पण हा बदल अजून तिला स्वत:लाच जाणवलेला नव्हता.

हॅलो.”  ती म्हणाली. त्यानं डोक्यावरचं हेल्मेट काढून एका हातात घेतलं आणि दुसर्‍या हातानं केस सारखे केले.. त्याचवेळी सलोनीनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.

होली शीट!तिच्या तोंडून आपसूक उद्गार निघाला.यु आर हॅण्डसम

वेल् थॅंक्स्”  स्वतःच्या अकारण वाढवलेल्या दाट केसांवरून हात फिरवत तो म्हणाला. अनिशाने शांतपणे दोघांकडे एकवार पाहून घेतलं. मुळात आधी सलोनी फ्लर्ट आणी तिच्या दीडपट निमिश फ्लर्ट !!

त्यामुळे आता संभाषणाची गाडी तिला स्वत:कडे वळवणं भाग होत. अन्यथा, यांच्या मुलांची नावं सामिष आणी निलोनी वगैरे ठेवण्याचं प्लानिंग तिला करायला लागलं असतं.

वाजले साडेबारा तुमच्या ग्रहावर?”

हे बघ, लंचला भेटू म्हटलं होतं, तसं लंचच्या वेळेमध्ये पोचलो आहे हे नशीब समज

खरंय तुझं. बाय वे, ही माझी कलिग सलोनी. आणि मीट माय स्कूल फ्रेंड निमिष अधिकारी

हॅलो मिस्टर अधिकारी.अतिशय फार्मली आपला हात पुढे करत सलोनी म्हणाली.मी नुसती कलीग वगैरे नाहीए बरं का! मी या ढापण्या मुलीची बेस्ट फ्रेण्ड पण आहे!!

तिच्या या बोलण्यावर निमिष हसला.आयला, अनी!! गेली अनेक वर्षं मी समजतोय की तुझा बेस्ट फ्रेण्ड मी आहे.

वेल् तू माझा काहीही लागत नाहीस.तिनंही तितक्याच टोमण्यात उत्तर दिलं.

धोकेबाज!!तो फिल्मी स्टाईलने डोळे उगारत म्हणाला. मग लगेच डोळ्यांत पाणी आणल्यासारखं करत म्हणाला.अगं काही नाही, तर इतकी वर्षे राखीसाठी दिलेल्या गिफ्टला तरी जागायचंस” 

ओह, तू हिचा राखी ब्रदर आहेस का?” सलोनी मध्येच म्हणाली.

निमिष परत एकदा गालात हसला. अनिशा अणि तिची फॅमिली शिफ्ट झाली तेव्हा, रक्षाबंधनलाअनिकेतसोबत तुम्हाला दोघांनाही राखी बांधेनअसा निरोप आला तेव्हा त्याच्यापेक्षा निहाल जास्त हादरलेला. मग त्यानंच कितीतरी वेळराखीवगैरे काही नाही, अंधश्रद्धा असते रे. उलट आता राखी बांधून घेतली नाहीस तर तिच्या घरचे अधिक संशय घेतील, तेव्हा आता राखी बांधून घे. बाद में देखा जायेगा!  वगैरे त्याची समजूत काढली होती. दोघानी मिळून तिला ओवाळणीत घालायला दोन क्युट टेडी बेअर पण घेतले होते.

अर्थात आयत्यावेळी निहाल एकटाच राखी बांधून घ्यायला अनिशाच्या घरी पोचला होता. निमिष काहीतरी कारण काढून जो पळाला, तो निसटलाच.

मग दुसर्‍या दिवशी राखी बांधल्याबद्दल तिला त्यानं टेडी बेअर आणि चॉकलेट्स गिफ्ट दिली होती. आणि मग ही दरवर्षीची परंपराच बनून गेली.

निहाल आणि अनिकेत राखी बांधल्यावर तिला गिफ्ट द्यायचे. आणि निमिष दुसर्‍या दिवशी. राखी बांधून न घेता.

दोघांच्या या कायमच्या तू तू मैं मैं मध्ये सलोनी फारच इन्टरेस्ट घेत होती. एरवी तिनं कधीच अनिशाला इतकं बोलताना पाहिलं नव्हतं. ऑफीसमध्येच सर्वांशीच ती कायम मोजून मापून बोलायची पण आज तीच सेम अनिशा हसत खेळत बोलताना पाहून तिला खरंतर मजा वाटत होती. जणू काही तिला पुन्हा टीनेजर बनवण्याचं कौशल्य फक्त या निमिष अधिकारीकडेच होतं.

सलोनी लंचमध्ये सुद्धा दोघांच्या नात्याचा अंदाज घेत होती. हे दोघं फक्त एका वर्गात शिकलेले नव्हते तर शेजारी पण होते. शिवाय काहीतरी घरगुती संबंध पण होते. नातं नक्की काय आहे ते माहित नव्हतं, पण सलोनीची अनुभवी नजर सांगत होती की. वरकरणी दिसतात तितकेच हे दोघे मित्र नाहीत. काहीतरी पूर्वसुकृताचे म्हणावेत तसे यांचे ऋणानुबंध आहेत.

जेवणानंतर निमिषने सगळ्यांसाठी आईस्क्रीमची ऑर्डर दिली. सलोनीच्या मनामधला कॅलरीमीटर जागा झाला होता. अनिशाने पणपोट फुल्ल भरल्याचीतक्रार सुरू केली.

काहीही उगाच फेकू नकोस. मोजून इवलासा राईस खाल्लायस. चुपचाप आईस्क्रीम खा

मला जाणार नाही. विनाकारण वाया जाईल.

काही वाया जात नाही. तुझ्याच्याने संपलं नाही तर मी खाईन. ओके?”

या बाप्या लोकांचं एक बरं असतं गं. त्यांना वजनाची वगैरे चिंता नसतेसलोनी बोलून गेली.

सलोनी, मला वाटतं, की अनिशाला वजन वाढण्याचा फार काही त्रास होणार नाही. खरंतर सध्या कुपोषित व्यक्ती दिसतेय. गुपचुप ते आईस्क्रीम खा.निमिष उगाच दरडावण्याच्या सुरात तिला म्हणाला. आणि मग सलोनीकडे वळून म्हणाला, “तुला तसंही डाएटकडे फार लक्ष द्यायला नको. आय थिंक यु आर परफेक्ट!

निमिषच्या या एका वाक्यावर कित्येक मुलींनी आपला दिल निछावर केलाय, हे सलोनीला अर्थात माहित नसल्याने तीपण एकदम खुश झाली. अर्थात तेवढ्यात अनिषाच्या नजरेमधली नाराजीही तिला जाणवून गेली.

सो निमिष, तुला एखादा भाऊ वगैरे आहे का? नाही म्हणजे, उगाच मी अनिशाच्या टेरीटरीमध्ये घुसायला नको आणि…. विनाकारणसलोनी बोलता बोलता बोलून गेली. क्षणभर अनिषा अणि निमिषची नजरानजर झाली. निमिषने मनातल्या मनात स्वत:ला चारेक शिव्या घातल्या. गेला तासभर सलोनी सोबत गप्पा मारत अनिषासोबत वेळ घालवत असताना असं वाटलं होतं की, सर्व ठिक होईल.

पण नाही. काही गोष्टी कधीच ठीक होत नसतात.

सलोनीच्या या नकळ्त झालेल्या भल्यामोठ्या घावावर काय उत्तर द्यावं हे त्याला सुचतच नव्हतं. पण तेवढ्यात अनिशा बोलून गेली.

डोंट वरी सलोनी. निमिष एकुलता एक आहे. युनिक पीस. आणि माझा त्याच्यावर कसलाही क्लेम लावायचा काहीही इरादा नसल्यामुळे, बिनधास्त गो अहेड!!!

तिनं विषय खेळीमेळीनं घेतला तरीही, त्यानं हलकेच हात पुढे करून तिच्या मनगटावरून अंगठा फिरवला. हलकेच, पण त्या स्पर्शामध्ये कित्येक वेदनांचे घाव सहन करण्याची क्षमता होती.

>>>>>>>>>>>>>> 

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. उद्यासाठी त्याची परफेक्ट तयारी झाली होती. मोबाईल स्विच ऑफ. इंटरनेट बंद. उद्या दिवसभर तो केवळ एकटा राहणार होता. त्याच्या या बेडरूममध्ये. जगामध्ये इतर कुणी माणसं आहेत की नाहीत अशी शंका यावी इतपत एकाकी.

आजच्या दिवशी अनिशाला फोन करण्याची हिम्मत मात्र त्याच्याकडे नव्हती. एरवी आठवड्यातून दोन-तीनदा तो तिला भेटत होता. फोनवर मेसेजवर काहीबाही गप्पा मारत होता. पण जसजशी आजची तारीख जवळ येत गेली, तशी ती अधिकाधिक अबोल होत गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

मग त्यानंही तिला फोन केला नाही. ती काल सकाळी पुण्याला आईकडे गेली.

पावणेबाराच्या सुमाराला कधीतरी दरवाजाची चावी फिरली. तो टीव्ही बघत सोफ्यावर पसरला होता. दारामधून नीलम आत येताना दिसली.

तू? आज कशी?” एरवी नीलम कधीही कॉल न करता येत नाही.

हाय! सॉरी. तू घरी असशील की नाही हे माहित नव्हतं… पण…” दारामध्ये उभी असलेली नीलम त्याच्या या थंड स्वागतानं भांबावली. तिच्या हातामधला केकचा बॉक्स दिसताच त्याच्या अंगामध्ये संतापाची एक लहर उमटून गेली.

निमिष आधिकारी जगापासून कधीच कुठलीच गोष्ट लपवत नाहीत. फक्त स्वत:चा वाढदिवस सोडून.

हॅपी बर्थडे” ती हळूच म्हणाली. “आय नो, की तुला वाढदिवस सेलीब्रेट करायला आवडत नाही, पण मागे कधीतरी तुझ्या पॅन कार्डवर तुझी बर्थडेट पाहिली होती. तेव्हाच म्हटलं होतं की… डोण्ट वरी. नॉट अ सेलीब्रेशन. मी स्वत: केक केलाय. फार ग्रेट झाला नाहीये.. पण…. मी परत निघू का?” त्याच्या अंगार धुमसत्या डोळ्यांकडे बघत तिनं अखेर विचारलं.

टॅक्सी करून जाऊ नकोस. मी ओला बूक करून देतो. आणि प्लीज, नेक्स्ट टाईम मला विचारल्याखेरीज कधीही असलं काही करत जाऊ नकोस”

तिच्या डोळ्यांत पाणी आलं. “सॉरी. तुला सेलीब्रेशनचा इतका राग असेल असं वाटलं नव्हतं. आय जस्ट थॉट…”

नीलम. आज फक्त माझा बर्थडे नाहीये. माझ्या भावाचा पण आहे. आणि दुर्दैवाने आजच त्याचं श्राद्धही असतं.” तो इतकंच म्हणाला आणि सोफ्यावर बसला.

काय? ओह, मला खरंच माहित नव्हतं. आय अ‍ॅम सॉरी” ती परत म्हणाली.

तू आणि मी हजार काय लाखवेळेला सॉरी म्हणालो तरी गोष्ट बदलणार नाहीये”

मी निघते” ती मागे वळत म्हणाली.

नको जाऊस. थांब” तो इतकंच म्हणाला.

आज त्याचा वाढदिवस. आणि आजच निहालचा मृत्यू. टेक्निकली त्याचा मृत्यू आयसीयुमध्ये आजपासून दोन दिवसांनी झाला. पण त्या मरणाला कारणीभूत असलेला अपघात त्याला आजच्याच दिवशी झाला होता. त्याच्याच डोळ्यांसमोर!

अनिशा गावी आलेली पाहताच पूर्वाच्या कपाळावर स्पष्ट आठी आलेली दिसत होती. पण ज्यावेळी ती म्हणाली, की आज तू आणि अनिकेत डिनरला बाहेर जा, मी बाळीला सांभाळेन. तेव्हा मात्र पूर्वा प्रचंड खुश झाली.

मग तिनं सरळ प्रॉपर प्लानच आखला. आधी डीनर. मग फिल्म आणि मग लॉंग ड्राईव्ह. रात्री उशीराच परत येऊ असं सांगून पूर्वा आणि अनिकेत घराबाहेर पडले. अनीशाने आईला पण कामातून सुट्टी दिली. बाहेरून जेवण ऑर्डर केलं आणि बाळीला खेळवत बसली. आईला अर्थात आजच्या दिवसाबद्दल आणि एकंदरीतच तिच्याबद्दल काही बोलायचं होतं पण ती मात्र शिताफीनं हे टाळत होती.

निहाल आणि अनिशाच्या साखरपुड्यानंतर आलेला हा पहिलाच वाढदिवस. दोघं तेव्हा मुंबईमध्ये नोकरीला. मुद्दाम सुट्टी घेऊन दोघेही खास गावी आले होते. लग्नाची खरेदी हा अजून एक महत्त्वाचा जॉब चालूच होता. सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं. पण या सार्‍यामध्ये निमिष कुठेच नव्हता. तिनं काकीना विचारलं पण.

त्यासरशी पूजाकाकी रागानं म्हणाली. “नाव काढू नकोस त्या कार्ट्याचं. वाढदिवस आहे म्हणत कुठं उलथलाय काल रात्रीपासून देव जाणे.” त्यावर ती गप्प बसली. मागे एकदोनदा तिनं निमिषची बाजू घेऊन थोडा आवाज चढवला होता, पण त्यावर निमिषचं वागणंच इतकं बहकलेलं होतं की, तिला काय बोलावं तेच सुचलं नसतं.

बाळी तासाभरानंतर दूध पिऊन गाढ झोपली. तिनं लॅपटॉपवर दिल तो पागल है पिक्चर लावला. करिष्मा कपूर प्रेमाबद्दल काही तरी बोलत असताना सीन चालू होता. कॉलेजमध्ये वगैरे असताना असले सीन कसले भारी वाटायचे, पण आता तेच किती पुचाट वाटत होते.

तिनं मोबाईलमध्ये पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. निमिषला फोन करावं असं वाटत होतं पण फोन करून बोलणार काय? तरी तिनं त्याचा नंबर फिरवला. पलिकडून स्विच ऑफ ऐकल्यावर तिनं फोन ठेवून दिला.

स्क्रीनवरची करिष्मा काहीतरी मैत्री आणि प्रेमाबद्दल बोलत राहिली. अनिषाच्या नकळत तिच्या चेहर्‍यावर हसू आलं. कसले मूर्ख लोक असतात हे? यांना मैत्री आणी प्रेम कळत नाही म्हणे. तिला आणि निहालला कधी एकमेकांना सांगावंच लागलं नाही. त्यांचं एकमेकावर प्रेम असल्याबद्दल. त्यांचं त्यांनाच ते केव्हाच समजलं होतं. अलगदरीत्या. आपसूकरीत्या.

 

वास्तविक वाढदिवसाच्या संध्याकाळी ती दोघं परत निघणार होती. पण निहालला निमिषचा फोन आला की तासाभरात घरी येतोय.  म्हणून मग आडनिड वेळेला निघण्याआधीच पूजाकाकी म्हणाली, “मग असं करा. तुम्ही पहाटेचंच निघा की. निवांत जेवून खाऊन झोप तरी होईल”

अर्थात ज्याच्यासाठी प्लान बदलला तो निमिष काही तासाभरात आलाच नाही. वाट पहात तसा बराच वेळ गेला.

तेव्हा ती अजून तिच्या घरी होती, आणि निहाल त्याच्या घरी. अर्थात सतत फोन कॉल नाहीतर मेसेजेस चालूच होते. अखेर अकराच्या सुमारास तिनं गूड नाईटचा मेसेज टाकला, आणि फोन बंद केला.

निमिषचा अद्याप काही पत्ता नव्हता. तिचा डोळा लागतच होता की, निहालचा फोन आला.

झोपली आहेस का?” त्याच्या नेहमीच्या हळूवार आवाजात त्याने विचारलं.

नाही”

मागच्या दरवाज्याने बाहेर ये ना!”

आता! ही काही वेळ आहे का रे?”

बयो, वेळ कायमच असते. पण तुला आता बोलावतोय ते वेगळ्याच कारणासाठी. लगेच ये.”

तिच्या मनात एक विचार येऊन गेला. हे खरं तर निहालच्या नेहमीच्या वागण्यासारखं नव्हे. एरव्ही कधीही त्याने तिला असं रात्री अपरात्री घराबाहेर बोलावलं नव्हतं. पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना! ती ड्रेस वगैरे बदलायच्या भानगडीत न पडता अंगाभोवती एक शाल गुंडाळून बाहेर आली. अजून तिची आई जागीच होती. सकाळी निघताना सोबत द्यायला म्हणून पुरणपोळया लाटत किचनमध्ये होती. निहाल बोलावतोय एवढंच सांगून ती मागच्या दारानं बाहेर आली.

दारात गाडी काढून महाशय तयारीत होते.

हे काय? कुठे चाललो?” जानेवारीची थंडी अंगाला लागत होती त्यामुळे शाल खांद्याभोवती घट्ट गुंडाळून घेत तिनं विचारलं.

बस तरी गाडीत. लाडक्या बंधूरायाला घेऊन येऊया.” तो ड्रायव्हर सीटवर बसत म्हणाला.

आहे कुठे हा माणूस?” तिनं वैतागून विचारलं.

मित्रांसोबत वाढदिवस सेलिब्रेट करताहेत. काल रात्रीपासून आज रात्री बारापर्यंत म्हणजे चोवीस तास सेलिब्रेशनचा प्लॅन होता म्हणे. कुठे कुठे भटकून आणि उंडगून आलेत. आता गावाबाहेर झालेल्या नवीन पबमध्ये मग्न आहेत.”

म्हणजे दिवसभर त्याला आपल्या दोघांना भेटायला साधा वेळ झाला नाही!!! म्हणून आपण त्याला भेटायला निघालोय!! हा खासा न्याय आहे. दिवसभर सख्ख्या जुळया भावाला येऊन बर्थ डे विश करता आलं नाही. आणि इतक्या रात्री तू त्याला भेटायला निघालायस. तू ही ग्रेट आणि तोही ग्रेट”

शांत बालिके शांत.” तिच्या नाकावर हलकेच बोटांनी टिचकी मारत तो म्हणाला. “सकाळपासून त्याचा फोन लागत नव्हता. आणि आता दहा मिनीटापूर्वी मी फोन केला, तेव्हा तो म्हणाला की आपण घरी आल्याचं त्याला माहितच नाही”

म्हणजे? मला काही कळलं नाही.”

फार काही नाही ग. निमिष गेले अनेक महिने घरात धड येत जात नाही. आई बाबांशी बोलत नाही. शिक्षण अर्धवट सोडलंय. काय कमावतो माहित नाही. पण आई बाबांकडून पैसे घेत नाही. गावातले सगळे हरामखोर मित्र यांना जमवून ठेवलेत. आणि आता त्यांच्या संगतीला लागून पूर्ण बिघडलाय. आईला वाटतं की तो काहीतरी इल्लीगल काम करतोय. मी विचारलं तर मलाही सांगत नाही. तर आज आईनं त्याला सांगितलंच नाही की आपण आलोय.”

निमिष दारू पितो. ही काही नवीन बातमी नाही. पण तो इतका वहावला असेल असं कधी वाटलं नव्हतं.”

वहावला नाहीये. त्याला दिशा सापडत नाहीये. त्याचं तुझ्यामाझ्यासारखं डोकं चालत नाही. कलाकार माणूस आहे तो. त्याला हे असं नोकरीच कर. बिझनेसच कर वगैरे चौकटीत अडकवणं यानं काही होणार नाहीये. अनी, जर तुला ओके वाटत असेल तर किमान आपलं लग्न होइपर्यंत तरी निमिषला मुंबई घेऊन जाऊ. बघ तो नक्की सुधारेल” निहाल बोलत राहिला.

बाहेर थंड गार वारा सुटला होता. गाडी हाय वे वरून बाहेर आली होती. हा पब म्हणजे हायवे वरची येणा-या जाणा-याची दारू पिण्याची सोय असलेला गुत्ता. याहून अधिक काही नाही.  कारण सरकारी नियमांप्रमाणे, निम्मा रस्ता कसल्याशा कामासाठी ऑलरेडी खोदून ठेवला होता. त्यामुळे निहालने रस्त्याच्या याच बाजूला गाडी पार्क केली.

तू गाडीतच बसून रहा गं. मी निमिषला घेवून येतो. पिऊन टाइट झालाय. त्यामुळे त्याला आताच काही बोलू नकोस! नंतर बघू.” निहाल गाडीतून खाली उतरला. रस्ता ओलांडून पलिकडे जात होता. क्रॉस करण्यापूर्वी त्याने निमिषला फोन केला आणि बाहेर यायला सांगितलं.

-----

आजवर आयुष्यात कधीही प्यायला नव्हत इतकी दारू त्यादिवशी निमिष प्यायला होता. निहाल गावात आलेलं त्याला माहितच नव्हतं. आईनं सांगितलं नाही आणि त्यानं विचारलं नाही. तसंही त्याच्या येण्या न येण्याने त्याला काय फरक पडत होता? पण तरीही मघाशी निहालचा “मी परत निघालोय, आता तरी भेटशील का?” मेसेज आला तेव्हा मात्र त्याने कॉल बॅक केला.

 

आदल्या रात्री बारा वाजता बरोबर निहालचा हॅपी बर्थडे टू यु अ‍ॅंड मी  असा मेसेज आला होता. मग नंतर दिवसभर तो फोन करत राहिला. पण निमिषने फोन घेतला नाही. अखेर रात्री अकरानंतर निमिषने फोन केला. “आय अ‍ॅम ड्रंक. त्यामुळे तूच ये”

 

त्यामागे अजून एक स्वार्थी विचार होता.

एवढ्या थंडीमधून इतकं पिऊन मग बाईक चालवत घरी जाण्यापेक्षा कारने आयतं घर गाठलेलं अधिक बरं.

निहाल प्रॉमिस केल्याप्रमाणे अर्ध्या तासात पबच्या समोर हजर होता. त्याचा कॉल आल्यावर निमिष बाहेर आला. पण त्यानं कार रस्त्याच्या पलिकडे का लावली होती ते मात्र त्याला समजले नाही. कारमध्ये बहुतेक कुणी मुलगी होती. अनिशाच असणार की. निहाल तिला सोडून इतर कुणासोबत हा विचारही करू शकणार नाही. एकगर्लफ्रेंडधारी येडा साला! निमिष स्वत:शीच हसला. इतक्या रात्री तिला या अशा हायवेवर घेऊन यायची काही गरज होती का? पण प्रेमात पडलेली माणसे काहीही वागू शकतात.

 

रस्ता क्रॉस करून इकडे येत असताना निहालने त्याला हात दाखवला. त्यानंही जमेल तितक्या ग्रेसफुली त्याला हात दाखवला. काहीतरी गडबड झाल्याची त्याला ज्याक्षणी जाणीव झाली त्याक्षणाला पाठीमागे कारमधून अनिशा उतरली होती. सेकंद दोन सेकंदात जाणवलेली बाब म्हणजे तो आलेला आवाज. अनिशाच्या किंचाळण्याचा. यानंतर पुढे अनेक दिवस तिच्या तोंडून दुसरा आवाज निघाला नाही.

रस्त्यावर खणलेला खड्डा चुकवायला म्हणून ट्रकने भसकन गाडी या साईडला घातली होती ज्या साईडने निहाल रस्ता क्रॉस करत होता.

 

निमिष मटकन् तिथेच खाली बसला. आधीच त्याला कशाची शुद्ध नव्हती आणि आता तर आजूबाजूला काय घडतंय याचं भानही त्याला राहिलं नाही. कुणीतरी अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला. कुणीतरी पोलीसांना फोन केला. कुणीतरी त्याच्या आईबाबांना फोन केला.

 

 

हॅपी बर्थ डे. निमिष!!!! व्हेरी व्हेरी हॅपी बर्थ डे!!






फिरूनी नवी भाग 6