Sunday 17 September 2023

फिरूनी नवी (भाग 6)

 

फिरूनी नवी भाग 5 
नीलम त्याच्या घरामध्ये रात्रभर थांबली. पण तो तिच्याशी एक शब्द बोलला नाही. अख्खी रात्र तो शांत खुर्चीमध्ये बसून राहिला. नीलमने इतक्या दिवसामध्ये त्याला इतकं गप्प राहिलेलं कधीच पाहिलं नव्हतं. तो फार बोलायचा अशातला भाग नाही, पण त्याचे हात कधीच स्थिर नसायचे. अगदी टीव्ही अथवा लॅपटॉपवर पिक्चर बघतानाही तो हाताने काही पेपर्स घडी घालत आकृत्या करत बसायचा. ओरिगामी म्हणे. पण आज मात्र नाही. नीलमला निमिषची ही बाजू माहीतच नव्हती. प्रत्येकाला एक भूतकाळ असतो, आणि आपण वर्तमानकाळामध्ये ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा खरंतर भूतकाळाच्या त्या संचितालाही भेटत असतो, पण ते आपल्याला जाणवत कधीच नाही. तिच्या मनामध्ये असे काही विचार येऊन जात होते. निमिषसाठी ती फक्त एक सोय होती. कॅज्युअल रिलेशनशिप. तिच्या दृष्टीने मात्र निमिष तितकाच आणि तेवढाच राहिला नव्हता. मनातल्या मनामध्ये तिने त्याच्यासोबत आअपल्या भविष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. निमिष प्रचंड मूडी होता, त्याच्यासोबत राहणं म्हणजे सातत्याने सापशिडीचा खेळ. कसलं दान कधी पडेल आणि कधी याचा मूड सापासारखा जहरी फुत्कार टाकणे बनेल देव जाणे. तरीही, या सगळ्या अडचणींना सांभाळून ती त्याच्यासोबत आयुष्य कंठायला तयार होती.
अर्थात, निमिष तयार झाला असता तर. पुढच्याच महिन्यात व्हॅलेंटाईन्स डे येणार होता. त्यादिवशी निमिषला कुठेतरी रोमॅंटिक डिनरवर जाऊया असं सांगायचं. दीड वर्षांच्या त्यांच्या रिलेशनशिपमध्ये ते दोघे असे डेटवर डिनरला वगैरे कधी गेलेच नव्हते. पण यावेळी त्याला सांगू, आणि रिलेशनशिप कॅज्युअलकडून थोडं अधिक सीरीयस होईल का हे विचारू. तो हो म्हणेलच. आपल्याशिवाय इतर कुणीही त्याच्या आयुष्यामध्ये नाही, हे तिला चांगलंच माहीत होतं.
विचार करता करता, तिचा कधीतरी डोळा लागला. निमिष मात्र टक्क डोळे उघडे ठेवून प्रत्येक क्षण आठवत होता. त्याचे आणि निहालचे. त्याला आठवत होतं त्या प्रत्येक वाढदिवसाला आईबाबा दोन केक घेऊन यायचे. दोन्ही केक एकसारखेच. दोघांना अगदी एकसारखाच ड्रेस घेतलेला असायचा. एरवीही त्यांना वेगळं ओळखणं मुश्किल होतं पण वाढदिवसाच्या दिवशी अगदी मिरर इमेज बनून ते इतरांना अधिकच गोंधळात  टाकायचे. शाळेत असेपर्यंत घरी मोठ्ठी बर्थडे पार्टी. समोसे, वेफर्स आणि रसना. रीटर्न गिफ्ट म्हणून बाबा गोष्टींची पुस्तके द्यायचे. ते सगळं आता त्याला आठवत होतं.
 
आज त्याचा वाढदिवस असूनही आईचा बाबांचा फोन येणार नाही. अनिशाला फोन करण्याची हिंमत त्याच्यामध्ये नव्हती. खरंतर ती केवळ एका फोन कॉलइतकी दूर होती. किंवा बाईक घेऊन निघाला असता तर दोनेक तासांच्या अंतरावर. पण कधीकाही अंतरांचे हिशोब वेगळेच असतात. एरवी तो कितीही सहज अनीशाला फोन करत असला तरीही, आजच्या दिवशी मात्र ती हिंमत त्याच्याकडे नव्हती.
 
त्याचा फोन अख्खा दिवस स्विच ऑफ येत राहिला. पूर्वा आणि अनिकेत त्यांचा परफेक्ट रोमॅंटिक प्लान आटोपून घरी आले तेव्हा, रात्रीचे दीड वाजले होते. बाळी आणि अनिशा दोघी झोपून गेल्या होत्या. सकाळी उठून मात्र पूर्वाची भुणभुण सुरू झाली. काल रात्री अनीशाने बाळीला डायपर नीट लावलाच नव्हता, कपडे पण नीट बदलले नव्हते. डायपर क्रीम नव्हतं लावलं. दोनेक तासांनी अनीशाला या सगळ्याचा वैताग आला. वास्तविक पूर्वाला आजचा दिवस माहीत होता. सासूने आधीच तिला काही बोलू नकोस अशी तंबी दिलेली होती पण ऐकेल ती पूर्वा कसली.... तिची किरकिर ऐकून अनीशाने सकाळी दहा वाजता मुंबईला परत जायचं ठरवलं.
“अनीशा, नको ना तिचं ऐकूस” आई तिच्या कानात कुजबुजली. “तू आजचा दिवस रहा. उद्या सकाळी जा”
“आई, तू तिला घाबरून रहा. मी नाही. हे माझं हक्काचं घर आहे. माझ्या आईवडलांचं घर. म्हणून इतके दिवस मी इथे येत होते. पण आज समजलं की जर हे मुळात माझ्या आईवडलांचंच घर नसेल तर...” ती आवाज चढवून म्हणाली.
व्हायचा तोच परिणाम झाला. किचनमधून तरातरा पूर्वा आईच्या खोलीत आली.
“हक्कांची भाषा कुणासाठी वापरतेस अनीशा? इतके दिवस केलंय..”
“काय केलंस गं? हा!! काय केलंस?” अनीशानेही त्वरित विचारलं.
“शांत व्हा. पूर्वा, तू आत जा. मी बोलते अनीशासोबत. किमान आजच्या दिवशी तरी...”
“काय लावलंय हे आजच्या दिवशी? आजच्या दिवशी? आम्ही सतत हिला सांभाळून घ्यायचं. हिचे वेडेविद्रे चाळे खपवून घ्यायचे. तिशी उलटत आली तरी घरामध्ये बिनालग्नाची नणंद असताना संसार करायचा. लहान भाऊ असून अनिकेत किती करतोय किती राबतोय याची कुणालाच काही कल्पना नाही”
“एकेक शब्द परत सावकाश बोल पूर्वा” अनीशा अत्यंत थंड आवाजात म्हणाली. “मला सांभाळून घ्यायचं? माझे वेडेविद्रे चाळे? तुझ्या लग्नाला साडेतीन वर्षं झालीत, या इतक्या वर्षांत किती दिवस मी तुझ्या या घरी राहिलेय याचा हिशोब करायला माझ्या हाताची बोटे पुरे. आणि मला कुणीही पोसत नाहीये. निहाल असतानाही मी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होते. तो नसतानाही आहे. आणि आयुष्यभर राहीन. माझ्यासाठी अनिकेतने आजवर एकही दमडा खर्च केलेला नाही. बाबांचा सगळा पीएफ घेऊन तुम्ही हा फ्लॅट बूक केलात. त्यात एक पैसा मी विचारलेला नाही. आई, मी निघते”
“नको ग. अशी भांडून जाऊन मी सांगते ऐक ना. मी समजावते पूर्वाला” आई तिला विनवत राहिली. पूर्वा पुढेही काही बोलत राहिली. तिचं लक्षच नव्हतं. तिने भराभरा बॅग भरली. म्हणायला दोन दिवसांचे कपडे तर आणले होते.
आईची पूर्वाला काही बोलण्याची टाप नव्हती. घरात बाबा आणि अनिकेत दोघेही नव्हते. ते परत येईपर्यंत तरी थांब असं आई परोपरीने सांगत राहिली. पण ती बधली नाही.
बॅग घेऊन ती घराबाहेर पडली. तिच्या मागे पूर्वाने दार लावून घेतलं. हे लावलेलं दार आपल्यासाठी केवळ या क्षणासाठी नसून भविष्यामधल्या प्रत्येक क्षणासाठी आहे याची तिला खात्री होती. बिल्डिंगच्या खाली आल्यावर तिने रिक्षेला हात केला. जवळच्याच कुठल्याशा रेस्टॉरंटचं नाव सांगितलं. प्रचंड भूक लागली होती. गेल्या काही दिवसामधला तिच्यामधला हा बदल तिला पहिल्यांदा जाणवला. एरवी तिला भूक लागायचीच नाही. दोन तीन दिवस ती ब्रेडचा एखादा स्लाईस नाहीतर, एखादा लाडू पुरेसा व्हायचा. हल्ली मात्र भूक जाणवेल इतकी तीव्र लागायची.
 
रेस्टॉरंटमध्ये तिने इडलीवडासांबारची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला, कारण आई वारंवार फोन करत होती. थोड्यावेळात अनिकेत आणि बाबादेखील फोन करायला लागले असते. रविवार सकाळ असल्याने रेस्टॉरंटमध्ये तशी बर्‍यापैकी गर्दी होती. ती एका कोपर्‍यामधल्या दोन जणांच्या खांबाआडच्या टेबलावर बसून होती. इडली खाल्ल्यावर मस्त फिल्टर कापीची ऑर्डर द्यावी का असा विचार ती करत असताना अचानक तिची नजर समोरच्या खुर्चीवर गेली. तिच्यासमोर अवघ्या काही फुटांवर मंद हसत निहाल बसला होता.
निहाल!
तिच्या तोंडून नकळत शब्द फुटला.
“बोल” तो म्हणाला. तिचा श्वास जणू थांबला. निहाल तिला पहिल्यांदा जाणवला होता तो गेल्यानंतर महिन्याभराने. घरामध्ये आई तिला जरा बाहेर फिरून येऊ म्हणत बागेत घेऊन गेली होती. ती महिनाभर खोलीबाहेरही पडली नव्हती. आई अगदी अलमोस्ट ओढतच तिला घेऊन निघाली. तेव्हा अचानक जाणवलं, तिच्या बाजूने निहालदेखील चालतो आहे. तिच्या पावलांशी पावलं जुळवत. हा भास तिनं आईला सांगितला नाही. त्यानंतर वारंवार तो भास होतच राहिला. निहाल आजूबाजूला असल्याचा. घरात, रस्त्यात, दवाखान्यात सर्वत्र तो तिच्या आसपास असायचा. आईबाबांच्या नकळत तिनं एकदा सायकॉलॉजिस्ट गाठला. थेरपी सुरू झाल्यावर तिला स्वत:मध्ये फरक जाणवला. झोप नीट झाली, की निहाल दिसत नाही. निहालबद्दल बोलत राहिलं, की निहाल दिसत नाही. आयुष्याच्या इतर कप्प्यांमध्ये निहालला स्थान दिलं की निहाल दिसत नाही.
 
मग तिनं गाव बदललं. मुंबईमध्ये नोकरी पत्करली. इथं आवडीचा गोल्डफिश आणून ठेवला. त्या गोल्डफिशला ती निहालबद्दल सांगायची. ऑफिसमध्ये कुणाचीच “बिचारी” ही नजर तिला नको हवी होती म्हणून तिनं सलोनीलादेखील निहालबद्दल काही सांगितलं नव्हतं. गेल्या इतक्या वर्षामध्ये राज सोडल्यास इतर कुणालाही तिनं निहाल हे नाव ऐकवलेलं नव्ह्तं.
 
अगदी निमिषशी इतके दिवस बोलत असूनसुद्धा, निहालचा उल्लेख कधीच आला नव्हता. आणि आज मात्र....
 
निहाल तिच्यासमोर बसला होता. केवळ भास म्हणून दिसत नव्हता तर चक्क बोलतही होता.
आणि अजून एक गोष्ट: हा निहालच होता. कितीही सारखे दिसत असले तरीही हा निमिष नव्हता हे निश्चित.
ती काही न बोलता शांत बसून राहिली. इतक्या भर गर्दीमध्ये निहाल केवळ आपल्याला दिसत असणार. आपण त्याच्याशी बोललो तर इतरांना वाटेल की आपण एकटेच बडबडतो आहोत. इतके दिवस पूर्वाला वाटतं की आपल्याला वेड लागलेलं आहे. पण हे असंच चालू राहिलं तर प्रत्येकालाच वाटेल की आपल्याला वेड लागलेलं आहे.
की खरंच आपल्याला वेड लागलेलं आहे?
वेटरने तिच्यासमोर प्लेट आणून ठेवली. समोर बसलेल्या निहालकडे शक्य तितके दुर्लक्ष करत तिनं खायला सुरूवात केली. भूक तर लागलेलीच होती. वेटरला तिनं कॉफीची ऑर्डर देऊन टाकली.
निहाल शांत बसून होता. तिच्याकडे एकटक बघत.
ती खाऊन उठली तसा तोही उठला. तिच्यासोबत बाहेर चालत आला. तिनं मोबाईलवर कॅब बूक केली. मुंबईला जाण्यासाठी. पर्समध्ये ठेवलेला ब्लूटूथ हेडफोन तिनं कानात घातला, माईक तोंडाजवळ आणला, आणि ती म्हणाली.
“निहाल”
“बोल” तिच्याबाजूला बसलेला निहाल म्हणाला.
“का माझा पाठलाग करतोयस?”
“तुला काहीतरी सांगायचंय”
“काय?”
“अनिशा!!...” इतक्यात तिचा मोबाईल वाजला. कॅब आलेली होती. ती कॅबमध्ये बसली. निहाल तिच्यासोबत होताच.
“बोल” ती पुढे म्हणाली.
“मी खुश आहे. तूपण खुश रहा”
“मी खुशच आहे.
“खोटं बोलू नकोस. किमान माझ्याशी तरी. गेली पाच वर्षं तुझी परवड पाहतो आहे. किती त्रास करून घेतेस स्वत:ला.”
“मी काहीही त्रास करून घेत नाही.. नोकरी करते.”
“नोकरी करतेस, आर्थिक बाबतीत स्वतंत्र आहेत. एकटीच राहतेस. सर्व माहीत आहे. पण त्याहीपलिकडे जाऊन किती एकाकी आहेस. आजूबाजूला सगळे इतके तुझे लोक असताना”
“माझे लोक? आज घरात काय झालं ते पाहिलंस ना? घर उरलं नाहीये मला. हक्काचं एकही ठिकाण राहिलं नाहिये हे समजतंय का तुला?”
“नसेनात का. अनीशा, पण तू एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत कायम आहे. तुला दिसत असेन वा नसेन, पण मी सावली बनून तुझ्यासोबत इतके दिवस होतोच. माझ्या दिसण्याने तुला त्रास होतोय हे समजल्यावर तुझ्यापासून स्वत:ला लपवून घेतलं होतं. पण मी होतोच अनीशा.”
“काय उपयोग? जगाच्या दृष्टीने मेलायस तू. आणि इतका नालायक आहेस की मला मरूही देत नाहीस. किती वेळा विचार केला की तुझ्या आणि माझ्यामध्ये असलेलं हे श्वासाचं अंतर पार करावं आणि तुझ्याजवळ निघून यावं. दरवेळी अडवतोस मला. थांबवतोस मला. दुष्ट!” ती बोलून गेली. आणि अचानक तिला आठवल्या त्या असंख्य रात्री जेव्हा तिनं ठाम विचार केला होता, की हे सर्व संपवून टाकावं.
“ती वेळ अद्याप आली नाहीये. आणि येणारही नाही. तुला जगायचं आहे अनीशा. आणि खूप खूप जगायचं आहे. आपण एकत्र खूप स्वप्नं पाहिली होती. ती सगळी तुला माझ्यासाठी पण सत्यात आणायची आहेत. हेच आज मी तुला सांगायला आलोय. तू छान राहीलीस, खुश राहिलीस तर चूक करत नाहियेत. स्वत:ला गिल्टी मानणं सोडून दे. कशाचबद्दल पश्चाताप बाळगू नकोस. माझ्या जाण्याबद्दल. तुझ्या राहण्याबद्दल. निमिषबद्दल. कशाचबद्दल.”
 
अनीशा चमकली. निमिषबद्दल? निमिषला भेटून आल्यावर, त्याच्याशी अगदी फोनवर बोलल्यानंतर मनामध्ये स्वत:बद्दल द्वेषाची भावना दाटून यायची.... ती निहालला नक्की कशी समजली?
चालत्या कॅबमध्ये ती स्वत:शीच हसली. निहाल हे तुझ्याच मनाचं एक प्रोजेक्शन आहे अनीशा. निहाल अस्तित्वात नाही. निहाल फक्त तुझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तुझ्या मनात जे चालू आहे ते त्याला माहीत असणारच..
 
एखाद्या मौल्यवान दागिन्याची पेटी जशी हलक्या हातांनी बंद करावी तसा तिने मनाचा तो कोपरा बंद केला. निहालला तिथेच आत ठेवून. ती खुश राहिली असती तर हा निहाल खुश राहिला असता. मनाशी काहीतरी एक निर्णय तिनं त्याचक्षणी घेऊन टाकला.


No comments:

Post a Comment