कधी कधी काही
पुस्तकं लोणच्यासारखी असतात, ही पुस्तकं सावकाश निवांत बैठक लावून वगैरे वाचली
जातात. काही काही पुस्तकं मात्र अधाश्यासारखी आता पुढे काय झालं करत धडाधड संपवावी
लागतात. रहस्याचे असे बेमालूम गुंते करत जाणं आणि ते अलगद सोडवत जाणं हे फारच
कौशल्याचं काम. थ्रिलर्स लिहिणारे म्हणूनच मला कमालीच्या आदराला पात्र वगैरे
वाटतात. इंग्रजीमध्ये थ्रिलर हा एक भलामोठा जॉनर आहे त्यात परत अजून काय वेगवेगळे
सब जॉनर आहेत. मराठीमध्ये फार कमी वेळा थ्रिलर कादंबर्या वाचायला मिळतात आणि
त्याही बहुतेकदा “हूडनिट” या टाईपमधल्या असतात. हिस्टॉरिकल थ्रिलर हा प्रकार
आपल्याकडं अतिशय कमी पहायला मिळतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कधी आपल्याला
इतिहासाबद्दल लिहायचं असतं तेव्हा काळ्यापांढर्या- नायक खलनायक या स्वरूपांतच
लिहावं लागतं. तुम्ही यामध्ये करड्या रंगांची व्यक्तीमत्वं (डोंबल! हल्लीतर तुम्ही
“भावना दुखावणारा” एकही शब्द वापरू शकत नाही!!!) रंगवणं अलाऊड नाही. मग उरतं काय
तर “ते झर्र्कन वळाले, त्यांनी गर्रकन नजर वळवली. इत्यादि इत्यादि) पण या
इतिहासाचा वर्तमानाशी सांगड घालून केलेलं लिखाण फार थोडंच आहे. शिवाय ऐतिहासिक
लिखाण म्हणजे ठराविक व्यक्तीरेखांचा केलेला उदोउदो, इतर “साईड कॅरेक्टर्स”ना त्यात
स्थानच नाही. अशावेळी आपल्याकडे इतका प्रचंड मोठा इतिहास असताना ऐतिहासिक थ्रिलर्स
मात्र फार थोडीच आहेत. (जवळजवळ नाहीतच) अंताजीची बखर सारखे थोडे वेगळे प्रयोग
सोडल्यांस इतरत्र सर्व आनंदच (टॅंजंट मारून: सध्या हिस्टॉरिकल फिक्शनचा एक वेगळाच
अवतार सर्वत्र पहावयास मिळतो आहे. दुर्दैवाने त्या “फिक्शन”लाच “सत्य” मानायचे ही
जबरदस्तीदेखील त्याच्यासोबत असतेच!! हे तथाकथित इतिहासाचे पुनर्लेखन करणारे लोकं
कादंबर्या का लिहत नाहीत?? सुरस चमत्कारिक कहाण्या तशाही रोज प्रसवत असतातच!!
असो, टॅंजंट समाप्त)
आता एवढा सगळा
उहापोह करण्याचं कारण आहे मुरलीधर खैरनारांची “शोध” ही कादंबरी. माझी आणि
खैरनारांची ओळख फेसबूकावर झाली. तेव्हा ते शोध : काही नोंदी या फेसबूक पेजवर
शोधबद्दल काही माहिती टिपणं लिहत होते. मला ती कल्पनाच फार इंटरेस्टिंग वाटली. या
नोंदी वाचतानाच कादंबरीचा आवाका आणि त्यामध्ये अचूकता येण्यासाठी केलेली तयारी आणि
अभ्यास कुतूहल वाढवणारे ठरले. त्यादरम्यान मीही माझी पहिली कादंबरी लिहतच होते,
मार्गदर्शनासाठी- खास करून काही कॅरेक्टर्सच्या संदर्भामध्ये मी तेव्हा खैरनारांबरोबर
चर्चा देखील केली होती. त्याचवेळी त्यांची कादंबरी वाचायचीच हे ठरवलं होतं.
कादंबरी प्रकाशित
झाल्यानंतर ऑर्डर करून मागवेपर्यंत बरेच दिवस गेले, पण एकदा हातात कादंबरी आल्यावर
मात्र सलग बसून वाचून काढली. एक वेगळाच जबरदस्त अनुभव म्हणता येईल अशी ही कादंबरी
आहे. कादंबरीमध्ये रहस्य आहे, थरारक पाठलाग आहेत, प्रणय आहे, एकमेकांचे केलेले
विश्वास्घात आहेत, वेषांतरे आहेत, हीरो आहे, व्हिलन आहे आणि आदिवासी आहेत. एका
उत्तम मसाला करमणुकीसाठी लागणारे सर्वच घट्क यामध्ये आहेत. ही भट्टी अशी मस्त
अफलातून जमून आली आहे की, कादंबरी एकदम खुसखुशीत झाली आहे.
कादंबरीच्या
रहस्याची सुरूवात होते ती सुरतेच्या लूटीपासून. शिवाजीराजांनी सुरत लुटल्यानंतर
आणलेला भलामोठा खजिना कुठंतरी दडवून ठेवला गेला या ऐतिहासिक गोष्टीतून ही कथा पुढे
सरकते. हा खजिना शोधण्यासाठी अनेक जण झटत आहेत. प्रत्येकाचे त्यामागचे हेतू
पूर्णपणे भिन्न आहेत. मात्र, गेली कित्येक शतकं हा खजिना कुठं आहे याची कुणाला
माहिती नाही. कथानकाची चाकं फिरू लागतात ती एका ब्रिटीश तरूणीच्या हाती मिळालेल्या
पत्रामधून. हे पत्र खजिन्याबद्दलचा सुगावा सांगतं आणि मग सुरूवात होते ती एका
विलक्षण थरारक पाठलागाला. यामध्ये राजकारणी धेंडं आहेत, उद्योगपती आहेत, पोलिस
यंत्रणा आहे, मारेकरी आहे आणि दोन अगदीच सामान्य असे तरूण तरूणी आहेत. मुंबई-पुणे-नाशिक
या भागांमध्ये घडत जाणारी ही कथा आपल्याला अनेक प्रसिद्ध आणि अनवट अशा दोन्ही
ठिकाणी घेऊन जाते, एशियाटिकसारखी जुनीपुराणं वाचनालय किंवा आदिवासींसाठी पूज्य
असणारे गौळ अशा अनेक ठिकाणांमध्ये हे कथानक वेगानं फिरत राहतं. शेवटी रहस्य
उलगडलंय असं वाटत असतानाच वाचक पुन्हा एकदा वेगळ्याच रहस्याच्या भोवर्यामध्ये
अडकतो. याहून जास्त कथानकाबद्दल काही सांग्ण्य़ात अर्थ नाही, कारण ती प्रत्यक्ष
वाचण्याची गोष्ट आहे.
कादंबरीवर डॅन
ब्राऊनचा ठसा स्पष्टच आहे, डॅनच्या कादंबर्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याजवळ
असलेली हजारो वर्षांच्या गुपितांची कन्स्पिरसी थेअरीज. होली ग्रेल असो वा मेसन्स
असो या सर्वांना त्या भागामध्ये प्रचंड लेखन होऊनदेखील त्यांचं खरं स्वरूप आजवर
सामोरं आलेलं नाही. परदेशांमध्ये अशा गुप्त संघटना केवळ कपोलकल्पित नाहीत, तर
प्रत्यक्षामध्ये आहेत. भारतात मात्र, अशा संघटना
बहुतेक नाहीतच (इथं दोन पिढ्यापूर्वींच्या इतिहासबद्दल गुद्दागुद्दी चालते, तर
हजारो वर्षांच्या इतिहासाचं काय घेऊन बसलोय!) त्यामुळे खैरनारांना हे सर्वच काही
“निर्माण” करावं लागलं आहे. त्यापैकी शिवाजी महाराजांनी सुरतेहून लुटून आणलेला
खजिना लपवून ठेवला या दंतकथेला सेंटर प्लॉट करून त्यांनी इतर सर्व डोलारा उभारलेला
आहे.
मला व्यक्तीश:
कादंबरीचा प्लॉट फार् आवडला तरीही अशा प्रकारच्या कादंबर्यांमधल्या रहस्याचा जो
मूळ कणा असतो तो सुगावे अथवा क्लू शोधत जाणं तो भाग मला किंचित सरधोपट वाटला. नकाशाचे क्लूज फार
पटापट सुटतात किंवा इतर टेक्निकल वर्णनांमध्ये तो भाग डोक्याला फारश्या झिणझिण्या
आणत नाही. बर्याचदा कादंबरीच्या बारीकसारीक डीटेलिंगमध्ये तो भाग थोडासा वेगळा
पडत जातो आणि काय घडतंय याच्या फ्लोम्ध्ये हे क्लूज थोडेसे हरवल्यासारखे वाटतात.
कादंबरीमधला
सर्वात सशक्त भाग आहे तो म्हणजे व्यक्तीरेखा. केतकी आणि शौनक या दोन व्यक्तीरेखा
अधिकच ठळकपणे उभ्या राहिलेल्या आहेत. पैकी, केतकी ही स्त्री व्यक्तीरेखा खूपच
ताकदीनं आणि ठळकपणे सामोरी येते. या व्यक्तीरेखेचे सर्वच पैलू फार सुंदररीत्या
रेखाटलेले आहेत. तिचा चाणाक्षपणा, धोरणीपणा, तिची नितीमूल्यं आणि तिचा ध्यास या
सर्वांमूळे ही व्यक्तीरेखा फार आव्हानात्मक बनली आहे. तिच्या मानानं शौनक ही
व्यक्तीरेखा थोडी खुजी वाटली तरी त्याला स्वत:चा वेगळा अवकाश आहे. शौनक पूर्ण वेळ
केतकीबरोबर असला तरी त्याची धोरणं वेगळी आहेत. या खेळामध्ये केतकी आणि शौनक अथातच
रोमॅण्टिकली इन्वॉल्व होतात, पण ते इन्वॉल्व होणं दोघांच्याही दृष्टीनं फारसं
महत्त्वाचं नाही, इतक्या वेगानं कथानक पुढे सरकत राहतं. वाचकाला जरासुद्धा उसंत
घ्यायला मिळू नये अशा तुफान स्पीडनं कथानक पुढे धावत राहतं, हे या कादंबरीचं अजून
एक वैशिष्ट्य, स्थलकालाची प्रत्यक्षाबरहुकूम वर्णनं आणि तरीही वेळेकाळेचं भान ठेवत
चाललेला पाठलाग ही कसरत सांभाळणं सोपं नाहीच, खैरनारांना ते सहजपणे जमलंय.
कादंबरी वाचून
जॅक्सन या ब्रिटीश ऑफिसरबद्दल खरंच खूप वेगळी आणि डोळे उघडणारी माहिती मिळाली.
पुन्हा एकदा, एखाद्या व्यक्तीला खलनायक म्हणून रंगवताना त्याचे इतर पैलू कसे डोळे
झाकून दुर्लक्षित केले जतात ते आठवलं.
शोध ही कादंबरीचं
अजून एक खास गंमत म्हणजे ती तिच्या जॉनरशी पूर्णपणे प्रामाणिक राहते. उगाच नंतर
घालायचे म्हणून जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे फंडे (कित्येक मराठी लेखकांच्या कसल्याही
कादंबर्या या असल्या सुविचाररूपी चांदण्यांनी चमकचमक् चमकतात) शोध मात्र, केवळ
आणि केवळ थ्रिलर इतक्याच परीघाभोवती फिरते आणि तिथेच ती यशस्वी होते.
कादंबरी वाचताना
काही गोष्टी मात्रफार खटकल्या. पहिलं म्हणजे मुद्रित शोधनामधल्या चुका. या चुका
काही ठिकाणी फार प्रकर्षानं जाणवतात, आणि त्या सहज् टाळता येणार्या आहेत. पुढील
आवृत्तीमध्ये या चुका निश्चितपणे काढून टाकता येतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे
अधेमध्ये येणारी हेलीकॉप्टरची वगैरे टेक्निकल वर्णनं, यांचा मूळ कादंबरीच्या
विषयाशी फारसा संबंध नाही आणि एकंदरीत कादंबरीला ती खूप पसरट बनवत जातात.
माझ्या मते तरी
सर्वात उत्तम जमलेला भाग म्हणजे केतकी आणि शौनक दोघंही आदिवासीपाड्यावर पोचतात
तिथून पुढला भाग. इथून कादंबरी पूर्णपणे वेगळं वळण घेते. कोकणा आदिवासांच्या
समजुती, त्यांच्या पद्धती आणि त्यांचे आचार विचार वाचताना आपण पूर्णपणे वेगळ्याच
जगात पोचतो. आपल्याच आजूबाजूला असणार्या या आदिवासींची संस्कृती त्यांच्या
पूजाअर्चनेच्या पद्धती आपल्याला नीट ठाऊक नसतात खरंतर. या आदिवासींच एकवीसाव्या
शतकामध्ये जगतानादेखील जपलेल्या हजारो वर्षांच्या संकल्पना यांची सांगड फार
सहजरीत्या घातली आहे. हा भाग वाचताना नकळत आपणदेखील त्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन
पोचतोच.
प्रत्येक मराठी
वाचकानं “मराठी पुस्तकं का खपत नाही” वगैरे आरडाओरडा बंद करून आणि साठ सत्तरच्या
दशकांमधल्या क्लासिक पुस्तकांबद्दल स्तुतीपर काव्यं लिहिणं थोडं कमी करून आजच्या
काळाशी सुसंगत आणि एक चांगला प्रयोग म्हणून शोध ही कादंबरी वाचायला हवी. मी स्वत:
तरी ही कादंबरी सलग वाचून काढली, इतकी या उत्सुकत्ता या कादंबरीनं नक्कीच निर्माण
केली आहे. उत्तम कथा मिळत नाहीत (अथवा सुचत नाहीत) म्हणून अद्यापही त्याच त्यात
कथा रीसायकल करणार्या मराठी चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी शोधचा
विचारदेखील करायला हरकत नाही (अर्थात त्यासाठी त्या ताकदीची टीम हवीच हवी)
(end)