अमलताश हे डॉ. सुप्रिया दिक्षीत यांचं पहिलंच
पुस्तक. डॉ. सुप्रिया या प्रसिद्ध लेखक प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी. गेली
अनेक वर्षे प्रकाश संतांच्या लंपनने मराठी माणसावर भुरळ घातलेली आहे. लंपनचा
निरागसपणा, भाबडेपणा, सच्चेपणा,
त्याची
रसिकता, पोगंडावस्थेतील त्यांच्या भावनांची आंदोलनं अगदी तरलतेने वाचकांना
दाखवणारे प्रकाश संत माझ्या अत्यंत आवडत्या लेखकांपैकी एक. त्यामुळे अशा लेखकाच्या
पत्नीने लिहिलेले पुस्तक कधी एकदा वाचेन असं मला झालं होतं. उत्सुकतेने दोन तीन
सलग बैठकींमधे मी पुस्तक वाचून लगेच संपवलं देखील.
मुळात गेले काही दिवस प्रसिद्ध लेखकांच्या
पत्नींनी लिहिलेल्या पुस्तकांवर आमची चर्चा चालू होती, त्याप्रमाणे
"हे पुस्तक लिहून काय साध्य झालं?" असा प्रश्न तर
मनात पडलाच- कारण हे पुस्तक कुठेही डॉ. सुप्रिया यांच्या मेडिकल प्रोफेशनबद्दल
अथवा प्रकाश संत म्हणाले होते तसं "अॅडव्हेंचर इन सेकंड वर्ल्ड" बद्दल
सांगत नाही. उलट, पूर्ण पुस्तकभर आठवणी आणि आठवणीच आहेत.
त्यादेखील अगदी खास घरगुती म्हणता येतील अशाच. पुस्तकाची भाषा खूप साधी आणि सरळ
आहे, उगाच लिहायचे म्हणून काहीही “साहित्यिक” लिहायचा आव न आणतादेखील डॉ सुप्रिया
अतिशय तरलतेने लिहितात. अधेमध्ये नातेवाईकांची आजारपणे आणि टिपिकल
रोजनिशीसारखं "हे झालं मग ते झालं" अशा टाईपची वर्णने येत राहतात.
पुस्तक अधेमधे खूप पाल्हाळिक झालंय आणि मधेमधे कुठे उल्लेख होणार्या व्यक्तींचा
व्यवस्थित परिचयच करून दिला जात नाही. हा दोष लेखिकेचा म्हणता येत नाही कारण, डॉ.
सुप्रिया या काही व्यावसायिक लेखिका नव्हेत, पण प्रकाशकांनी पुस्तकाचे
व्यवस्थित संपादन करून घ्यायला हवे होते. ज्यायोगे, पुस्तक अजून
"क्रिस्प" करता आलं असतं.
अमलताशमधून डॉ. सुप्रिया दिक्षित या केवळ
प्रकाश संतांच्या पत्नी म्हणून आपल्याला भेटत नाहीत तर एक सुसंस्कृत, बुद्धीमान
आणि रसिक व्यक्तीमत्व म्हणून भेटतात. डॉ. सुप्रिया प्रत्येक नात्यामधून आणि प्रसंगामधून
आपल्या मनामध्ये ठसत जातात. एका प्रसिद्ध कवयित्रीची सून, एका प्रथितयश लेखकाची
पत्नी असूनदेखील सुप्रिया आपले वेगळे व्यक्तीमत्त्व आणि करीअर उभारतात. त्यांच्या
मनामध्ये कलावंताबद्दल अतिशय आदर आहे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे पाय मातीचेच
असतात याचीदेखील त्यांना जाणीव आहे. याच जाणीवेमुळे त्यांच्या लिखाणामध्ये कसलिही
कटुता जाणवत नाही.
माझ्या दृष्टीने या पुस्तकाचे दोन भाग पडतात,
एक
प्रकाश आणि सुप्रिया यांच्या लग्नाआधीच्या मैत्रीचा आणि प्रीतिचा. दुसरा त्यांच्या
लग्नानंतरचा भाग. पहिला भाग लालित्यपूर्ण आहे, सुंदर आहे आणि
दुसरा भाग अतिशय रूक्ष आणि टिपिकल. त्यानंतरचा येणारा प्रकाश संत यांच्या लेखनाचा
आणि अपघाताचा भाग मात्र जीवाचा ठाव घेउन जाणारा आहे.
डॉ. सुप्रिया (पूर्वाश्रमीच्या सुधा) या शालेय
जीवनापासूनच अत्यंत हुशार आणि अभ्यासू. त्यांच्या घरचे त्या काळाच्या मानाने
विचारांनी पुढारलेले असल्याने मेडिकल शिक्षणाची परवानगी देणारे. डॉ. सुप्रिया
बालपणाच्या काही आठवणींमधून डॉ. सुप्रियांचे वाचन अफाट. याच वाचनाच्या वेडामुळे
चंदू उर्फ प्रकाश संत यांच्याबरोबर त्यांची मैत्री झाली. हे बालपणीच्या मैत्रीचे
निखळ कोवळे रंग विविध प्रसंगातून खूप छानरीत्या आले आहेत. दोघांच्या लहानपणच्या कोवळ्या मैत्रीचा आणि
त्यामधून हलकेच जाणवणार्या या प्रेमाचे काही रंग प्रकाश संतांनी लंपनच्या
कथांमधून बखूबीने मांडले आहेत. त्यानंतर डॉ. सुप्रिया मुंबईला शिकायला
गेल्यानंतरच्या पत्रांमधून उमलत जाणार्या प्रेमाचे किस्से तर मु़ळातून
वाचण्यासारखे आहेत. प्रकाश संतांचे इंग्रजी भाषेवरदेखील प्रभुत्व होते, त्यांचा
आणि सुप्रियांचा बहुतेक पत्रसंवाद इंग्रजीतून आहे. सुदैवाने प्रकाशकांनी ही पत्रे
जशीच्यातशी छापली आहेत. (भाषांतर वगैरे न करता) साध्या सरळ शब्दांतून मनातल्या
भावना व्यक्त करणारी, आजूबाजूच्या छोट्या छोट्या प्रसंगांचं मिश्किक
शैलीत वर्णन करणारी, क्वचित चिडलेली, रागावलेली तर
कधी हैराण झालेली ही पत्रे म्हणजे प्रकाश संतांच्या व्यक्तीमत्त्वाचा एक वेगळाच हिस्सा
दर्शवणारी आहेत. कुवेशीसारख्या जंगलभागाचे त्यांनी पत्रामधून कळवलेले वर्णन
चित्रदर्शी आहेच, पण त्या वर्णनातून त्यांच्यामधला चित्रकार आणि
लेखक दोन्ही दिसून जातो.
डॉ. सुप्रिया यांच्या मेडिकल शिक्षणादरम्यान
त्यांच्या आणि प्रकाश यांच्या मैत्रीला लागलेले प्रेमाचे वळण, त्यातून
प्रकाश यांचे लग्नाचे प्रपोझल आणि "सध्या शक्य नाही" म्हणून त्यांनी
दिलेला नकार वगैरे प्रसंग साध्यासरळ पण सहजरीत्या मनाला स्पर्शून जातात. नंतर तीन
वर्षांनी शिक्षण, नोकरी अशा जबाबदा॑र्या पार पडल्यानंतर पुन्हा
प्रेमाचे प्रपोझल स्वतःहून डॉ, सुप्रिया स्वत: पुढे करून दोघांची
लग्नाच्या मार्गाने गाडी चालू लागते आणि इथपासून पुढे अनेक अडचणींना सुरूवात होते.
लग्नानंतर शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय त्यांच्या सासरी फारसा कुणाला रूचत
नाही. आणि मग तिथून वेगवेगळ्या संघर्षांना सुरूवात होते, हळव्या मनाच्या
प्रकाश यांना पत्नीने लांब गेलेले आवडत नाही, ते आजारी पडतात
आणि मग नंतर डॉ. सुप्रिया आपले पुढचे शिक्षण अर्धवट सोडून कर्हाडला येतात आणि इथे
खर्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाला सुरूवात होते. इथपासूनचा पुढचा भाग मला फार
कंटाळवाणा वाटला. त्यातही डॉ. सुप्रिया यांनी काम आणि घर या दोन्ही ठिकाणी केलेली
कसरत. कुणाचीही मदत नसताना सुरू केलेली जनरल प्रॅक्टीस, सासरकडच्या काही
व्यक्तींकडून झालेली टीका सहन करणे वगैरे प्रसंग खूप भावून जातात. खास करून
त्यांनी रत्नागिरीला नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावर झालेल्या उलटसुलट चर्चा व टीका. मात्र, रत्नागिरीत राहून
कुमुदताई रेगे सारख्या व्यक्तीकडून डॉ सुप्रिया जीवनाचा सकारात्मक दृष्टीकोन घेतात.
हे असे प्रसंग अथवा इतर कुणाहीबद्दल लिहिताना
कुठेही डॉ. सुप्रिया कडवट होत नाहीत, अथवा त्यांनी टीकेची झोड उठवून माझेच
कसे बरोबर हे सिद्ध करत नाहीत. किंबहुना त्या प्रसंगामधे एखादी व्यक्ती अशी का
वागली असेल याचा शोध मात्र घेताना दिसतात.
सुनेच्या भूमिकेतून सासूच्या भूमिकेत गेल्यावरदेखील त्या अशाच समजूतीने आणि
आनंदाने वागताना दिसतात. कुठेही अपेक्षा ठेवून "असं केलंच नाही" वगैरे
रडगाणं गात नाहीत. कराडसारख्या छोट्याशा शहरामधे अगदी तुटपुंजीच्या उत्पन्नापासून
सुरूवात करत त्या मात्र, या
अशा अडचणीच्या आणि कसोटीच्या काळातदेखील प्रकाश आणि डॉ. सुप्रिया यांचे
एकमेकांवरील प्रेम कमी होत नाही अथवा ते एकमेकांवरचा विश्वस गमावत नाहीत. पुढे
मुलं झाल्यावर या सहजीवनामधे आलेले वडील आणि आईचे नातेदेखील निभावतात, तेदेखील
नवीन काळाला अनुसरून. मुलीच्या रजिस्टर लग्नाला परवानगी देणारे त्याच्यबरोबर
तिच्या शिक्षणाची चिंता करणारे हे जोडपे एका परिवर्तनाचा साक्षीदार ठरतात.
प्रकाश यांनी नव्वदच्या दशकामधे लंपन लिहायला
सुरूवात केल्यानंतरचा भाग पुन्हा ओघवता झाला आहे. त्यानंतर प्रकाश संतांचा अपघात
आणि मग नियतीने त्यांना हिरावून नेणे हे प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. डॉ सुप्रिया आणि
प्रकाश संत यांनी कौतुकाने आपल्या घराचे नाव “अमलताश” ठेवले. आज प्रकाश संत या
जगामध्ये नसताना डॉ सुप्रिया यांनी बांधलेली ही शब्दावास्तू देखील “अमलताश”.
वास्तविक प्रकाश संत आणि डॉ. सुप्रिया यांचं
चारचौघांसारखं असलेलं सहजीवन. मात्र, प्रकाश संतांचा विलक्षण हळवेपणा,
कलावंतांचा
मनस्वीपणा या सहजीवनाला एक वेगळाच आयाम देऊन जातो. प्रकाश संत नुसतेच लेखक नव्हते,
उत्तम
चित्रकार होते, अफाट वाचन करणारे होते, नकलाकार होते,
शास्त्रीय
संगीताची जाण ठेवणारे होते. तीव्र
निरीक्षणशक्ती आणि साधीसहज लिखाणशैली यामुळे प्रकाश संतांचा लंपन मराठी
साहित्यामधे अजरामर झालेला आहे. हा लंपन किती काल्पनिक आणि किती खरा ते एक प्रकाश
संतच जाणोत. पण लंपनच्या मनावर भुरळ घालणारी सुमी मात्र या पुस्तकांमधून खर्या
अर्थाने भेटत जाते. कारण, ही सुमी लंपनइतकीच निरागस आहे, रसिक आहे, उत्तम वाचक आणि
श्रोती आहे, जीवनातल्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मकरीत्या पाहणारी आहे, कुणाहीबद्दल
वाईट न बोलणारी आहे. म्हणूनच कदाचित सहा दशकांहून अधिक वेळ लम्पन आणि सुमी
एकमेकांना भावत राहिले.