Thursday, 28 April 2016

रहे ना रहे हम (भाग 8)

आपल्या आयुष्याचे अनेक भाग असतात, पण सगळेच भाग एकसारख्या लांबीचे नसतात. वेगवेगळ्या आकाराचे, लांबीचे, रूंदीचे आणि आठवणींचे हे गुंते असतात. एक धागा या आयुष्यात कधी सरळ नसतो. ज्या रात्री आफताब माझ्या फ़्लॅटबाहेर पडला. त्यानंतर दुसर्‍या दिवसापर्यंत घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचं, सेकंदाचं वर्णन मी करू शकते. तो अख्खा चौदा तासाचा काळ मी माझ्याच मनामध्ये कित्येक वेळा जगली आहे.. ही तर नुकतीच घडलेली घटना. पण केदारबरोबर माझं लफडं... अफेअर, प्रेमप्रकरण, रिलेशनशिप, भानगड.. जी काय तुमची सांस्कृतिक व्याख्या आहे त्यानुसार नाव द्या... तब्बल दोन वर्षं चाललेली ही गोष्ट. ही दोन वर्षं मात्र माझ्या मेंदूमध्ये अगदी तीन चार सेकंदामध्ये झरझर निघून जातात. पण मन घुटमळतं ते आफताबसोबत काढलेल्या प्रत्येक क्षणाभोवती.

कॉलेज डेजच्या पहिल्या दिवशी आमची ओळख झाली. दुसर्‍या दिवशीच्या मिसमॅच डेला त्यानं मला एक भलंमोठं झेंडूचं फूल दिलं. “आजच्या दिवसाला झेंडूच शोभेल.” या कार्डासकट.
त्यानंतर मी त्याच्या ग्रूपला भेटले. तो माझ्या मैत्रीणींना. ट्रॅडिशनल डेला मी काकीने मद्रासवरून आणलेली हाफ साडी नेसले होते. खरंतर त्याचं आणि माझं यावर काही बोलणं झालंच नव्हतं पण त्त्यादिवशी तो नेमका मद्रासी लुंगी नेसून आला होता. पूर्वीनं मला यावरून चिडवून चिडवून हैराण केलं. निधी बॉंम्बेमधला कहनाही क्या मधला सोनेरी ड्रेस घालून आली होती. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं ते एका अर्थानं बरं आहे. केदारनं त्या दिवशी सगळ्या ग्रूपनं लंचला जायचा प्लान केला. अर्थात त्याचा ग्रूप आणि आमचा ग्रूप. गौतमी त्या दिवशी साधीशीच साडी नेसली होती. तिला म्हटलं चल आमच्यासोबत. ती तयार नव्हती तरी तिला जवळजवळ ओढून कारमध्ये घेतलं. पूर्वी (डीडीएल्जेमधला काजोलचा तो हिरवा लुंगीसारखा ड्रेस. ओल्ड फ़ॅशन्ड पण छान), मी, निधी, रझिया (ही नऊवारी साडीमध्ये असली गोड दिसत होती.) केदारच्या ग्रूपमध्ये चारपाच जण होते. मला आता त्या सर्वांची नावे आठवत नाहीत.
दुसर्‍या दिवशी चॉकलेट डे आणि रेड कलर डे एकाच दिवशी होता. चॉकलेट डेचा मला काहीच उपयोग नव्हता. मी लाल रंगाचा वन पीस घातला होता.  मी कॉलेजमध्ये आले तेव्हा केदार नव्हता, वर्गात लेक्चरला गेले तर माझ्या बेंचवर एक गुलाबांचा बूके ठेवला होता. नाव पत्ता काहीच लिहिलेलं नव्हतं, पण कुणी ठेवलाय हे मलाच काय पण अख्ख्या वर्गाला समजणार.
अखेर, केदारने मला साडी डे च्या दिवशी विचारलं. त्यादिवशी दोन वर्षांपूर्वी आज्जीने दिलेली पैठणी नेसले होते (तीच पीरीयड्सच्या साडीचोळी फंक्शनची) आज्जीनेच गिफ़्ट दिलेला नेकलेस आणि आईचे इतर दागिने. छान तर दिसत असणारच. अगदी बाबा पण म्हणाला, “निल्या, जास्त भटकू नकोस रे. घरी लवकर ये. दृष्ट लागेल तुला” पण त्या दिवशी मी कॉलेजला गेलेच नाही. कॉलेजच्या आधीच वळणावर केदार माझी वाट पहात होता.
त्यादिवशी आम्ही पहिल्यांदा दोघंच फिरायला समुद्रावर गेलो. सकाळी दहाचं कॉलेज. त्यावेळेला बीचवर कुणी असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर...
कॉलेजमधले बहुतेक प्रेमी कपल्स आज समुद्रावर आले होते. त्यात आम्ही दोघंही. केदार तेव्हा मला “जबरदस्त, भन्नाट” वगैरे वाटायचा. त्याच्या प्रत्येक वाक्यावर मला हसू यायचं. त्याचे वार्‍यावर उडणारे सिल्की केस पहातच बसावेसे वाटायचे. आज इतक्या वर्षांनी वाटतं, जे काही होतं ते केवळ आकर्षण तर होतं. त्या वयामध्ये असं आकर्षण वाटणं काही फार गहजब वाटण्यासारखं नसतं. पण आपल्या आजूबाजूला ना समाज नावाचा एक व्हिलन कायम असतो. या समाजाला नक्की काय हवं अस्तं माहित नाही, पण दुसर्‍यांच्या भानगडीमध्ये नाक खुपसायचं असतं. दुसर्‍यांना टोमणे मारायचे असतात आणि असलंच बरंच काही.
मी आणि केदार “कपल” आहोत आणि बरेच सीरीयस आहोत ही गोष्ट अख्ख्या कॉलेजभर व्हायला जराही वेळ लागला नाही. निधीसारखं मला माझं लफडं लपवून ठेवावं असंदेखील कधी वाटलं नाही. आय ऍम शुअर, घरीपण कु्णीतरी आई अथवा बाबाला यातलं काहीतरी सांगितलं असेल. पण आईबाबा मला एका शब्दानं काही बोलले नाहीत. कसल्यातरी नोट्स द्यायला, एकदा कंप्युटरचा माऊस बदलायला केदार माझ्या घरीपण येऊन गेला. आई काही बोलली नाही. एक तर केदारची आणि माझी जात सेम होती. शिवाय तो चांगल्या घरामधला मुलगा होता. पैसेवाला होता. सेम गोष्ट माझीपण. त्यामुळे त्याच्या किंवा माझ्या घरात कुणालाही विरोध करायला काहीच कारण नव्हतं. हा मुद्दा सध्या कितीही फेवरमध्ये वाटत असला तरी याच मुद्द्याने नंतर माझ्या गळ्याला फास लावला. कसं ते सांगेनच, पण त्या आधी दोन अपडेट्स.
माझं कॉलेजचं पहिलं वर्षं संपलं आणि चाची गेल्या. कायमच्याच. त्या खूप आजारी होत्या. वय झालं होतंच. ऍंजिओप्लास्टी आणि बायपास होऊनही तब्बेत कधी नीट झालीच नाही. पुण्यामधल्याच हॉस्पिटलमध्ये त्या गेल्या. आम्हाला बातमी समजली तेव्हा त्यांचं सर्व काही होऊन गेलं होतं. आफताब फक्त एका दिवसासाठी गावी आला होता. त्याच्याशी बोलणं झालं तेही जुजबीच. अझरभाई दोन महिन्यांनी आला. तोही फारसा बोलला नाही. मी पण माझ्याच विश्वांत मग्न होते. आई मला सांगत होती की, आफताबच्या काकांचं म्हणणं होतं की अझरभाईनं हे घर आता विकून टाकावं. पण आफताबचे मामा म्हणत होते की घर विकू नका, भाड्यानं द्या.
अझरभाईला काय करावं तेच सुचत नव्हतं. या गावाशी वास्तविक पाहता त्याचा काही संबंध नाही, हे चाचींचं माहेर. चाची त्याची सावत्र आई. सावत्रपणाची नाती टिकणार कशावर, आता चाचीच नाहीत. घराचं काय करायचं तेच अजून ठरत नसताना एके दिवशी आफताबनं मला फोन केला.
“काल अझरभाईंची सगाई झाली.” “अरे वा, कधी?” गेले आठ दिवस अझरभाई गावातच होता. घरात क्वचित असायचा, पण लग्न ठरल्याचं वगैरे काहीच बोलला नव्हता.
“कालच. आपल्याच गावातली मुलगी आहे. रिश्त्यामधलीच. माझ्या एका दूरच्या मामांची मुलगी” आफताब पेपरमधली बातमी वाचून सांगावी इतक्या रूक्षपणे सांगत होता. मी पण इकडून केवळ ह्म्म म्हटलं. “पुढच्या महिन्यांत शादी. गावाकडेच असेल. तेव्हा मी येईन” इतकंच बोलून त्यानं फोन बंद केला.
त्यादिवशी संध्याकाळी केदारला भेटायला गेले तेव्हा ही बातमी सांगितली.
“ते तुमच्या बाजूला राहतात ते मुस्लिम फॅमिली? ते जर घर विकणार असतील तर मी घेईन”
“आता कशाला घर विकतील? अझरभाई राहील. त्याचं लग्न झालं की. शिवाय तुझं घर आहे की इतकं मोठं! मग हा बंगला कशाला घेशील?”
“असंच. आपल्यासाठी” तो हसत म्हणाला.
“मग माझं घर आहेच की. वेगळं कशाला घ्यायला हवंय?”
अझरभाईंचं लग्न झालं तेव्हा आई आणि मी गेलो होतो. त्या लग्नाबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं. कुठलंतरी कोपर्‍यातल्या खेड्यातली मुलगी होती. घरातच निकाह केला पण जागा पुरेशी नव्हती. गर्दी, उकाडा, आणि एकूणातच अव्यवस्था. लग्न केवळ निभवायचं म्हणून केलं होतं. त्यात कुठेही प्रेमळपणा नव्हता. आपुलकी नव्हती. एखाद्या अनाथ मुलाचं लग्न लावून द्यावं तसंच हे सर्व चालू होतं. मुलीकडचेदेखील फार उत्साही दिसत नव्हते. मी आयुष्यातलं पहिलंच मुस्लिम लग्न पाहत असल्यानं काहीकाही गोष्टींची जाम मज्जा वाटली. इतक्या गर्दीत आफताब मला एकदोनदा दिसला. शेरवानीमध्ये ओळखू न येण्याइतका ताडमाड उंच दिसत होता. “निधी नाही आली?” एकदा मी हळूच चिडवलं.
त्यानं माझ्याकडे एकटक रोखून क्षणभर पाहिलं. “आमचा ब्रेक अप झाला” चुकीच्याच वेळी बोलले असं क्षणभर वाटलं. पण मी आफताबला पूर्ण ओळखून होते. यानं परत कुठेतरी भानगड केली असणारच याची मला खात्री होती.
सेहरा बांधलेला जादू खरंच देखणा दिसत होता. त्याची बायको नूरी पण दिसायला खूप सुंदर होती. नाजुक आणि अगदी त्याला शोभेल अशी. या दोघांचा संसार अगदी सुखाचा आणि आनंदाच होइल अशीपण मला खात्री होती.
माझीच मला वाटणारी ही खात्री किती पोकळ होती हे माझं मलाच थोड्य़ा दिवसांनी समजलं.
केदार म्हणतो तेच खरं, मला माणसं वाचताच येत नाहीत.

>>>>> 
अझरभाईंचं लग्न झालं आणि आमचं शेजारचं घर आठवड्याभरासाठी का होइना पण परत एकदा गजबजून गेलं. लग्नासाठी आलेली पाहुणे, भेटायला येणारे कोण कोण असं अख्खा शेजार नांदता राहिला. आफताबपण थोडे दिवस होता.
“अभ्यास कसा चालू आहे?” माझ्या खोलीत आल्यावर त्यानं पहिलाच प्रश्न विचारला.
“ठिक, लिसन, मी निधीशी हल्ली रोज बोलत नाही, त्यामुळे ती काहीच बोलली नाही” मी लग्नाच्या मांडवामध्ये झालेला प्रकार सावरून घेण्यासाठी म्हटलं.
“ते ठिक आहे, वी आर बॅक टूगेदर”
“काय?” हे म्हणजे हॉलीवूड स्टार कपल्सच्या वरताण झालं.
“फोनवरून चिक्कार भांडलो होतो तेव्हा तुटलं होतं पण आता गावी आल्यावर भेटल्यावर परत दिलजमाई झाली. सो नो टेन्शन” निधी आफताब लव्हस्टोरीचा ग्राफ काढला तर तो नक्की इंटरेस्टिंग येणार. एक तर अतिशय वरचं टोक नाहीतर एकदम खालचा बार. अधलीमधली काय स्टेज नाहीच.
“ऐकून बरं वाटलं.”
“मलाही बरंच वाटलं. केदारबद्दल ऐकून”
ही गोष्ट आफताबपर्यंत पोचणारच नाही वगैरे माझे भ्रम कधीच नव्हते. इन फॅक्ट त्याला आधी कळलेलं असतानाही त्यानं मला चिडवलं कसं नाही हाच प्रश्न पडला होता. मी काहीच बोलत नाही हे बघून तोच पुढे म्हणाला. “आता अझरभाईनंतर तुमचाच नंबर लागणारे”
“चल. मूर्खपणा करू नकोस”
“उगाच लाजायची ऍक्टींग करू नकोस. तुला जमत नाही. बट एनीवेज कॉंग्रॅट्स, केदार चांगला मुलगा आहे”
“तुला काय माहित?”
“हा! हा! हा!” तो विनाकारण फिल्मी हसत म्हणाला. “जानी, हम सब जानते है. इतकंच काय पण मागच्या महिन्यात मैत्रीणीच्या गावाला म्हणून...” मी उगाच डोळे मोठे केले. त्यानं आवाज कमी केला. “गोव्याला गेला होतात ना? तीन चार दिवस. समुद्र, बीच, बीअर आणि....”
“शटाप” मी आफताबला फटका मारला.
ही गोष्ट त्याला कशी कळली याचं मात्र मला अतोनात आश्चर्य वाटलं. कारण मी निधीलादेखील हे सांगितलं नव्हतं. जनरलच बोलले होते. मुळात ही आयडीया केदारचीच होती. आमचं अफेअर सुरू होऊन वर्ष झालं होतं. तरी आमची मजल काही किसिंगच्या पुढे गेली नव्हती. जाणार कशी? उघड्यावर काही करायला माझा ठाम नकार होता. कुठं हॉटेल लॉजवर जायचं तर अख्ख्या गावामध्ये कोणतरी मला अथवा केदारला ओळखणार. त्याच्या अथवा माझ्या घरी जायचं तरी वांदेच. शेवटी तीन चार दिवस गोव्याला जायचं ठरवलं. फिरणं, भटकंती, एंजॉय वगैरे सर्व काही अपेक्षित होतंच. पण मुख्य उद्देश मात्र सेक्स होता.
इथवर आमचं खटलं येईपर्यंत मी केदारशीच लग्न करणार हे मला चांगलंच माहित होतं. केदार सारखा जोडीदार मला हवा होता. तो मनमोकळा होता, प्रचंड बोलायचा, माझी त्याला खूप काळजी होती. मी घरामधली एकुलती एक होते. त्याचं अखंड एकत्र कुटुंब होतं. केदारच्या वडलांचे तीन भाऊ आणि त्यांची फॅमिली असे सगळे पंधरासोळाजण मिळून एकाच घरात रहायचे. घर कसलं...अपार्टमेंट कॉंप्लेक्स होतं. प्रत्येक मजल्यावर दोन फ़्लॅट असं बांधल्यासारखं. पण मुख्य किचन एकच. तरी केदार म्हणायचा की मी त्याच्या घरात व्यवस्थित ऍडजस्ट होइन, त्यासाठी तो हेल्प करेल. घरचे मला सांभाळून घेतील. मुख्य म्हणजे तो माझी साथ कधीच सोडणार नाही.
गोव्याचा प्लानपण त्यानंच ठरवला. त्याची कार घेऊन आम्ही गेलो होतो. त्यानं घरी काय सांगितलं ते माहित नाही. माझ्या घरी मी गौतमीच्या गावाला दोन चार दिवस सुट्टीसाठी जातेय असं सांगितलं. गौतमीला कल्पना देऊन ठेवली होती हे एक नशीबच.
गोव्याला जाताना मी काय केदार काय दोघांनाही फार थ्रिलिंग वाटत होतं. आयुष्यातला पहिला अनुभव. माझाही आणि त्याचाही. गोव्यामध्ये कार घातल्यापासूनच हवा बदलल्यासारखी वाटायला लागली. गोव्याच्या हवेतच खरंतर नशा आहे. केदारनं समुद्राकाठचं एकदम भारी रीझॉर्ट बूक केलं होतं. रूम छानच होती. सर्व्हीसपण एकदम नीट. हॉटेलमध्ये जे रेस्टॉरंट होतं तिथलं जेवण अप्रतिम होतं. एवढं सर्व छान छान का सांगतेय माहित आहे का? कारण, आमचा मेन प्रोग्राम सुरूवातीलाच टोटल फेल गेला होता.
माझं ज्ञान इतपतच होतं की मला काहीही करायचं नाहीये. जी काय जबाबदारी आहे ती केवळ केदारचीच. इकडं येण्याआधी मी निधीसोबत एकदा बोलले होते. (निधी-आफताब लव्हस्टोरी या स्टेशनवरून केव्हाच भुर्रकन गेली होती) तिनं पण मला तेच सांगितलं होतं. “नंतर सवय झाली की तू इनिशीएटीव्ह घेऊ शकशील” असा महत्त्वाचा सल्ला पण तिनं दिला.
केदारनं कुणासोबत काय सल्लामसलत केली होती माहित नाही. पण त्याला काही जमेना. म्हणजे इतर सर्व जमतच होतं. किसिंग वगैरे आधीपासून आम्ही करत होतो, त्यामुळे एकमेकांच्या शरीराचा अजिबात परिचय नव्हता असंही नाही. तरीही पहिल्यांदाच एकदम कपड्यांशिवाय पाहताना अवघडलोच. त्याच्याहीपेक्षा मी जास्त. निधीच्याच सल्ल्यानुसार मी शेविंग वगैरे केलं होतं. केदार तर खूपच एक्सायटेड होता. पण..
इतर सर्व काही करूनही त्याला आत काही जाता येईना. मला तर खूप दुखत होतं. थोडंफार ब्लीडींगही झालं होतं. ते रक्त पाहून माझ्याहीपेक्षा जास्त केदार गडबडला. त्याला हे नवीनच. मला काय महिन्याला इथून धबधबे वहायची सवय. पण रक्ताहीपेक्षा जास्त त्रास दुखण्याचा होत होता. केदार प्रयत्न करत होता, पण तरीही जमेचना. शेवटी मी बास म्हनून सांगितलं.
“अजून झालंय कुठे?” तो म्हणाला.
“जितकं झालंय तितकंच बास. मला सहन होत नाही”
“असं म्हणून कसं चालेल, एकदा लास्ट ट्राय करतो. प्लीज” तो माझ्या डोळ्यांवर किस करत म्हणाला.
पण तरी लास्ट ट्रायला काही जमलंच नाही. शेवटी आम्ही दोघांनीही नाद सोडून दिला. केदारने रूम सर्विस मधेच बीअर आणि काही स्नॅक्स मागवले, मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले. कपडे घातले.
केदार खूपच नर्व्हस होता.  एकूणातच आपण या डीपार्टमेंटमध्ये फेल गेलोय हे त्याला झेपत नव्हतं. प्रश्न क्षमतेचा नव्हता, टेक्निकचा होता आणि हे मला समजलेलं असून मी त्याला सांगू शकले नसते. दिवसभर रूममध्येच होतो, म्हणून संध्याकाळी बीचवर पाण्यात खेळायला गेलो.
परत आलो तेव्हा रात्र झालेली होती. बाहेरच हक्का नूडल्स खाल्ले होते म्हणून भूक जास्त नव्हती. सकाळपासून ड्रायव्हिंग, दुपारचे श्रम आणि पाण्यात खेळून केदारपण खूप दमला होता. तरी म्हणाला. आपण परत एकदा प्रयत्न करू.
मी नको म्हटलं असतं तर तो खूप दुखावला असता. खरंतर माझी बिल्कुल इच्छा नव्हतीच. साला, या सेक्सचा नुसता गवगवा करून ठेवतात. प्रत्यक्षात ही कृतीच अत्यंत घाणेरडी आणि ओंगळ आहे या मतावर मी हळूहळू ठाम होत होते. पण तरी केवळ केदारच्या मनासाठी मी कपडे उतरवले. आता केदार दुपारपेक्षा जास्त वेळ माझ्याबरोबर खेळला, मलाही जरा बरं वाटलं. मी अधिकच झपाट्यानं त्याच्या कुशीत शिरले, त्याचवेळी तोही माझ्यामध्ये शिरला.
मरायला ही हायमेनची कन्सेप्ट कशाला असते बाईच्या शरीरात? उपयोग काय आहे असल्या गोष्टींचा? जिथे केदारला अमाप सुख का काय ते मिळत होतं तिथं माझी बोंबलण्यासारखी परिस्थिती झाली होती. खूप जोरात बाथरूमला आल्यासारखं वाटत होतं. पण जाणार कसं? अंगावर तर केदार त्याच्याच विश्वात मग्न होता. इतके दिवस हातात धरून खेळायच्या खेळाला हक्काचं घर मिळालं होतं. लवकरच केदारचं  सुखही संपून माझ्या ओटीत सांडलं. दमून थकून तो माझ्याच अंगावर कोसळला.  आपण जगात कायतरी भारी अचिव्ह केलंय आणि आपल्यापेक्षा भारी पुरूष या भूतलावर होणेच नाही, अशा अविर्भावात त्यानं मला तो भरलेला कंडोम उचलून दाखवला. यक्क! माझं तुझ्यावर कितीही प्रेम असेल तरीही मी असलं काही माझ्या हातात घेणार नाही. तोंडात वगैरेतर फारच दूरची बातच.
एकूणातच हा सेक्सचा पहिला अनुभव फार काही एनकरेजिंग नव्ह्ताच. पण आयुष्य हे केवळ सेक्सच्या अनुभवांवर बनत नाही. केदारनं नंतर मलाजवळ घेऊन माझे खूप लाड केले. त्रास झाला का म्हणून विचारलं. जनावरासारखा अंगावर चढून झोंबणार्‍या केदारचा मला राग आला होता, पण त्यानंतर मला त्रास होइल म्हणून अतिशय काळजी घेणार्‍या केदारवर तितकंच प्रेमही आलं होतं. त्यानं जबरदस्ती केली नाही हाही त्यातल्याच त्यात प्लस पॉइंट
ऍंड निधी वॉज राईट. इट गेट्स बेटर ऍंड बेटर. अगदी सुरूवातीला यामधेय मला एंजॉय करण्यासारखं असेल असं मला कधी वाटलंच नाही. समाधानासाठी माझ्याकडे माझी हातचलाखीची पद्धत होतीच. पण तरीही नंतर तीनचार वेळेनंतर मी आणि केदार एकदमच आलो. माय फर्स्ट ऑरगॅझम थ्रू सेक्स. अमेझिंग!   
नंतर गावी परत येताना जाणवलं की आता माझ्या आणि केदारच्या नात्याचे डायनॅमिक्स पूर्ण बदललेत. इतके दिवस आम्ही केवळ एकमेकांना ओळखत होतो. आता हे नातं त्याही पलिकडे गेलेलं आहे.
कारमध्ये केदार मला काहीतरी स्किनबद्दल सांगत होता. त्यामुळेच त्याला पहिल्यांदा त्याला इतका त्रास झाला वगैरे काहीतरी. त्याला काय म्हणायचंय ते मला समजलं नव्हतं त्यामुळे मी केवळ ऐकल्यासारखं दाखवत होते.
त्याला काय म्हणायचं होतं ते मला खूप नंतर लक्षात आलं. आफताबबरोबर सेक्स केल्यानंतर.

Sunday, 24 April 2016

नजर

खरंतर दोन तीन मिनिटांत घडलेल्या प्रसंगाचं एवढे काय कौतुक. पण प्रसंग लक्षात राहिला हे मात्र खरं.

कुठल्याही मॉलमध्ये असते तसली ब्रॅंडेड कपड्यांची भलीमोठी शोरूम. वीकेंड शॉपिंगसाठी जमलेली जत्रा. मी आणि माझा हीरो त्या जत्रेत सामील. मी लेडीज सेक्शनमधून तीन चार टॉप उचलले आहेत, हीरो एक लाल टीशर्ट माझ्याकडे देऊन “हा घे. तुला छान दिसेल” असं सांगतोय.

“ट्रायल घेऊन बघू की” मी त्याला हटकते. त्याला ट्रायल रूमच्या बाहेर वाट बघायला आवडत नाही. त्याला खरंतर शॉपिंग करायलाच आवडत नाही. पण मी बधत नाही. मी शोधलेले इतर कुठलेही कपडे त्याला तसेही कधी आवडत नाहीत.

ट्रायल रूमच्या बाहेर भलीमोठी रांग आहे. ट्रायल घ्यायला गेलेल्या लोकांपेक्षा बाहेर वाट पाहणार्‍या लोकांची रांग जास्त आहे. काहीकाही बहाद्दर हातात पाच सहा हॅंगर घेऊन वाट पाहत उभे आहेत- त्यांच्या रीस्पेक्टीव्ह बीलव्हेडची वाट बघत.. आता इथून बाहेर गेल्यावर फेसबूकावर ते ताबडतोब बायकांचं शॉपिंग किती वाईट वगैरे फन्नी स्टेटस टाकणार आहेत. पण सध्यातरी इथं “बिच्चारे” थांबलेत.  

मी एका खोलीत घुसते, मला ना तो काळा लखनवी  डीझाईन असलेला टॉप फार आवडलाय. मी तोच आधी घालून पाहते. बाहेर उभ्या असलेल्या हीरोला “कसा दिसतोय?” हे विचारण्यासाठी मी दार उघडते. काहीतरी जब्बरदस्त अंदाज चुकतो. माझ्या ट्रायल रूम समोर दुसरीचाच हीरो उभा आहे. माझ्यापेक्षा जास्त अंदाज त्याचा चुकतो. आपली सोबतीण कुठल्या रूममध्ये गेली आहे याचा! ती बाहेर आली असं समजून तो दोन पा्वलं पुढं आलाय पण समोर आलेली मुलगी भलतीच! ही कोणे? आणि आपली पोरगी गेली कुठं? तितक्या दोन सेकंदाच्या गोंधळात मी त्याला “कशी दिसतेय” हे खुणेनं आधीच विचारलंय. तो गडबडतो, मी पण गडबडते. मी लगेचच नजरेनं सॉरी म्हणते. तो हसतो, त्याच्या उजव्या गालाला खळी पडते. तो नजरेनंच “हा टॉप नॉट गूड” म्हणतो. उगाचच. दोघंही आधी ओशाळलेले. त्यावर सारवासारव म्हणून असेल कदाचित.

मी ट्रायल रूमचं दार परत बंद केलंय. आतमध्ये माझंच मला हसू येतंय. त्याचा तो गोंधळलेला चेहरा बघून. माझा चेहरा बघून त्यालाही असंच हसू आलं असेल. माझा हीरो इतक्यात कुठे गायब झाला होत माहित नाही. मी तो बेबीपिंक कलरचा टीशर्ट ट्राय करून बघते. साईझला थोडा मोठा आहे, पण दिसतोय छान. परत ट्रायल रूम यायच्या आधी मी हीरोला फोन करते पलिकडून “बाहेरच उभाय, दिसेना का?” अशी जबरदस्त खेकसणी होते. यांचं “बाहेरच” म्हणजे अर्धा किमीच्या परीघामध्ये कुठंही असू शकतं. मी परत दार उघडून बाहेर येते. बरोबर!! आमचा हीरो दिसेना, अर्धा किमी दूर पाहण्याइतकी माझी नजर नाहीये. मघासचा खळीवाला पोरगा (थोडा बाजूला सरकून) अजून तिथं बुजगावण्यासारखा उभाय. तो परत माझ्याकडे बघून हसतो, मी पण उगाचच. तो आता परत नजरेनं “हा मघापेक्षा बेकार आहे” अशी टिप्पणी देतो. मी थॅंक्स म्हणते आणि परत आत जाते.


आता हा तिसरा टॉप कुठल्या गाढवानं शिवलाय माहित नाही, पण फिटिंगला एकूणच विचित्र आहे, घेण्यात काहीच अर्थ नाही. सर्वात शेवटी मी हीरोला आवडलेला लाल टीशर्ट घालून बघते. काय मस्त फिटिंग आहे, रंगपण एकदम फ्रेश लाल. हीरो बाहेर नसणार याची खात्री आहे तरी मी एकदा बाहेर डोकावते, मघासचा बुजगावणेवाला अजून तिथंच उभा आहे. त्याच्या चेहर्‍यावर किंचित वैताग आहे. साहजिक आहे, कधीचा खोळंबलाय. मी दार उघडलेलं पाहताच तो माझ्याकडे बघून हसतो. “परफेक्ट” म्हणून तो खूण करतो. मी परत एकदा थॅंक्स! करून आत जाते.


ट्रायल रूमच्या बाहेर येते तेव्हा हीरो समोरच उभा असतो. हिला चार टॉपची ट्रायल घ्यायला साधारण किती वेळ लागेल याचा त्याला परफेक्ट अंदाज आहे. खळीवाला हीरो अजून बुजगावणे मोडमध्येच आहे. “लोकांच्या गर्लफ्रेंड्स चार चार टॉप बदलून येतात आणि आमच्या हिलाच इतका वेळ लागतोय. हळूबाई कुठची!” तो मनातल्या मनात म्हणत असणार याची पूर्ण खात्रीच...
त्याच्याकडे पाहून मी उगाच बाय करते. “लोकांचे बॉयफ्रेंड्स बघ किती रोमॅंटीकपणे ट्रायल रूमसमोर उभे असतात नाहीतर आमचं ध्यान!” मी हीरोला सांगते. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. 

Thursday, 21 April 2016

MAD-रास ६

चेन्नईमध्ये आल्यानंतर मी उत्साहानं लर्न तमिळ इन थर्टी डेजवगैरे पुस्तकं आणली. अत्यंत भिकार छपाई असलेल्या या पुस्तकांची दोन पानं वाचणं म्हणजे डोकेदुखीला आमंत्रण. त्यापेक्षा आपली नजर आणि कान उघडे ठेवून शहरामध्ये वावरायला सुरूवात केल्यावर सुरूवातीला काही अक्षरांची लांबलचक ट्रेन वाटणारी भाषा आता वेगवेगळ्या शब्दांद्वारे समजत गेली. भाषेचा हा तिळा उघड मंत्र मिळाल्यावर मद्रास चक्क आपलं वाटायला लागलं. दरम्यान कुणीतरी मला मराठी इंग्लिश तमिळ डिक्शनरी पीडीएफ दिली. सुमारे १९७४ मध्ये कै. सौ. रमाबाई जोशी यांनी लिहिलेला हा शब्दकोष खूप सुटसुटीत आणि समजायला सोपा आहे. तमिळ उच्चार देवनागरीमधून लिहून मग मराठी अर्थ सांगितलेला असल्याने कुठल्याही मराठी व्यक्तीला पटकन वाचता येऊ शकतो. मद्रासप्रांती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी आलेल्या कुण्या गृहिणीनेच लिहिलेला हा शब्दकोष. रोजच्या व्यवहारामधले नेमके शब्द सांगणार्‍या या कोषाबद्दल मलातरी फार कौतुक आहे. ज्या काळी हाताशी गूगल नव्हते, इंटरनेट नव्हते, मद्रासामधला सर्वसाधारण काळच हिंदीविरोधाचा होता. तश्यावेळी एका साध्याशा स्त्रीने आपल्यासारख्या लोकांना इकडे आल्यावर त्रास होऊ नये म्हणून रचलेला हा शब्दकोष व्यावहारिकदृष्ट्या आजही खूप उपयोगी आहे. शिवाय त्यात मराठी आणि तमिळ दोन्ही भाषांमधल्या समानार्थी म्हणींचा फार मोठा संग्रह आहे. त्याखेरीज रोजच्या व्यवहारामध्ये वापरता येण्याजोगी वाक्ये, दिशा, वार, महिने, अंकमोजणी, विभक्ती यासारख्या अनेक छोट्या छॊट्या पण निकडच्या शब्दप्रयोगांची माहिती यात दिलेली आहे. मला अडचणीच्या वेळी जिथे गूगलने हात टेकलेत तेव्हा या शब्दकोषाने मदत केली आहे. त्यासाठी मी रमाबाई  जोशी आज्जींची कायम आभारी राहीन. पन्नास वर्षांपूर्वी इतका मोठा शब्दकोष एकहाती करणं हे फार सोपे काम खचितच नाही.

आपल्याला (म्हणजे देवनागरी लिहिता-वाचता येणार्‍यांना) डोळ्यांना आणि डोक्याला थोडाफार ताण देऊन का होईना, गुजराती वाचता येते. थोडेसे अजून प्रयत्न केल्यास बंगाली अक्षरंही समजतात. पंजाबीसुद्धा वाचता येईल. पण कधी तमिळ अक्षरं समजतात? अजिबात समजत नाहीत. मला आधी थोडीफार कानडी अक्षरं वाचता येत होती, पण तरीही तमिळमध्ये ओ की ठो काही कळायचं नाही. कारण, त्यांची लिपी पूर्ण वेगळी आहे. आता यावर भाषातज्ञ बरंच काही सांगू शकतील पण मी काही भाषातज्ञ नाही. एकंदरीत वाचनावरून असं लक्षात आलंय की भारतात भाषांचे दोन गट आहेत. संस्कृत आणि द्राविडी. द्रावीडीमध्ये तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कानडी या भाषा येतात. पैकी कानडी आणि तेलुगु मराठी भाषेसोबत बराच रोटीबेटी व्यवहार करून आहे. पण तमिळ -मल्याळम या मात्र वरकरणी फार वेगळ्या भाषा वाटतात. तमिळ बोलण्यासाठी मला जितके प्रयत्न करावे लागले नाहीत त्याहून अधिक प्रयत्न मला लिहिण्यावाचण्यासाठी करावे लागत आहेत. खरंतर इथली पहिली दोन वर्षं मला एकदम निरक्षर झाल्यासारखंच वाटायला लागलं. काहीच वाचता यायचं नाही. आता हळूहळू सरावानं काही अक्षरं वाचता येतात.


तमिळ भाषिकांनी लिहिलेली रोमन लिपी हा अजून एक वेगळाच विषय आहे. तमिळनाडूच काय पण एकंदरीत दक्षिणेकडे बर्‍याचदा अजून एक मजा दिसून येते. माझं नाव इकडे लिहिताना सर्रास “Nandhini” असं लिहिलं जायचं. कितीतरीवेळा मग ते नंधीनी नाहीये, नंदिनी आहेअसं सांगावं लागायचंतरी कित्येकदा समोरच्यावर परिणाम व्हायचा नाही. मग लेकीच्या शाळेमध्ये तमिळ मुळाक्षरं चालू झाली तेव्हा या घोटाळ्याचा नक्की काय तो शोध लागला. तमिळ मध्ये महाप्राण व्यंजने नाहीच. म्हणजे ध, , , ठ ही  व्यंजने त्यांच्या बाराखडीत नाहीतच. क, , , घ या चारही व्यंजनासाठी एकच   हे अक्षर वापरले जाते. त्यानंतरची तीन व्यंजने ख ग घ नाहीत पण ङ मात्र आहे. तसंच च नंतर येणारं अक्षर ञ आहे. असंच त, , ट ण, म या अक्षरांचं आहे.
ही तमिळ व्यंजने.

                  न (न चे अजून एक अक्षर आहे!!)
             ळ्ळ (यावर सविस्तर लिहिले आहे)  
 ळ   र्र  .
 वडामोळि एळुतकळ म्हणजेच ग्रंथाक्षरे किंवा उत्तर भारतीयांची अक्षरेही अक्षरे फारशी वापरली जात नाहीत.
    ,   ,  ,    க்ஷ क्ष ஸ்ரீ श्री

  
तमिळमध्ये स्वरांसाठी चौदा अक्षरं आहेत. अं आणि अ: नाही, पण दीर्घ ए आणि दीर्घ ओ आहे. बहुतेक तमिळ अक्षरांचे उच्चार हे ने होत नाहीत तर आ, , इ नए वगैरे होतात. शब्दाच्या शेवटी आ‍ऽजोडल्यास तो प्रश्नार्थक बनतो. उदा: साप्पडु म्हणजे जेवण. साप्पिडु म्हणजे खा आणि साप्प्टीयाऽऽ म्हणजे जेवलास का?
, , , झ साठी तमिळमध्ये केवळ च वापरला जातो. साठी सुद्धा वापरला जातो. मग मटण सुक्काचा तमिळ उच्चार चुक्काअसा केला जातो. चावीचा उच्चार इकडे सावीहोतो.  ज हे ग्रंथाक्षर म्हणून त्याचे वेगळे व्यंजन जरी तमिळने स्विकारलेले असले तरी मुख्य भर वरच असतो. तीच गत ची. त्याला प फ ब भ ही चारही अक्षरं दर्शवावी लागतात. आता यामध्ये कशाचा उच्चार कशाने करायचा हे वाचून वाचून (च) समजू शकेल. लिहिताना பம்பாய் (पंपाय) लिहायचं आणि वाचताना ते रोमन शहर नसून बंबायम्हणजेच मुंबई आहे असं समजायचं याला फार प्रदीर्घ साधना करावी लागणार. माझी तितकी साधना अद्याप झालेली नाही त्यामुळे ही अंकलिपी आता जरा बाजूला ठेवते आणि मजेमजेच्या गोष्टींकडे येते. या लिमिटेड व्यंजनांमुळे तमिळ भाषेमध्ये जेव्हा इतर भाषिक शब्द येतात (खासकरून इंग्रजी आणि संस्कृत) तेव्हा त्यांचं सगळं रूपडंच बदलतं.


विनायक म्हणजेच गणपती तमिळमध्ये विनायगार बनतो. पुरणपोळी हा शब्द इकडे सर्रासरीत्या बुरणबोळी असा म्हटला जातो. ह फारसा नसल्याने होळीचा सणसुद्धा इकडे बोळी म्हणूनच ओळखला जातो. म्हणजे आपल्याकडे पुरणपोळी आणि होळी यांचे अतूट नाते आहे, इकडे तर त्यांचे पार अद्वैतच झाले आहे.  मागे एका फ़ेसबूक ग्रूपवर एक बाई मराठी पद्धतीची पर्फी (PURFI)  केली असं सांगत होत्या. मला काही केल्या या बाईंनी नक्की काय पदार्थ केला ते समजेना. म्हणून त्यांना रेसिपी विचारली तेव्हा उजेड पडला की बाईंनी बेसनाची बर्फीकेली होती. पुरीला बुरीदेखील सर्रास म्हणतात. डायेटवाल्यांनी हे लक्षात ठेवायला हरकत नाही.



तमिळमधे न साठी दोन वेगवेगळी अक्षरे आहेत. पैकी  हे अक्षर केवळ शब्दाच्या सुरूवातीला “न” असेल तरच वापरले जाईल. इतरवेळी  हे अक्षर वापरले जाते.  म्हनजे ”. अनुस्वार देताना त्या त्या वर्णमालेमधले अनुनासिक अक्षरेच लिहिली जातात. उदा. नंदिनी लिहिताना : நந்தினி असं लिहिलं जाईल. इथे न सुरूवातीचा असल्याने  वापरला गेलाय मग अनुनासिक स्वरासाठी अपूर्ण न ந்  (इथे त्यासाठी डोक्यावर टिंब देतात) मग नेहमीचा न आणि त्याला वेलांटी. னி ही वेलांटी नीट पाहिलीत तर लक्षात येईल की आपल्या दीर्घ वेलांटीसारखीच आहे. पण ही तमिळमधली र्‍हस्व वेलांटी आहे.



आता आपली नावे रोमन लिपीमध्ये लिहिताना तमिळ लोकं वेगळीच पद्धत वापरतात. त्यांना नंदिनी लिहायचे झाले तर NANDINI असे लिहिले की ते नंडीनी वाचतात. म्हणून मग लिहितीना NANDHINI लिहितात म्हणजे मग ते नंदिनी झाले. आता थ आणि ध हा मुळातच या भाषेत नसल्याने त्यांचे घोळ होत नाहीत. पण आपल्याला मात्र पावलोपावली धक्के खात रहावं लागतंय. माझ्या लेकीचं नाव मी अतिशय सुटसुटीत सुनिधीठेवलं, पण हाय रे कर्मा. इथे तमिळनाडूमध्ये तिला हाक मारताना सुनितीअशीच हाक मारली जाते. क्वचित स्पेलिंग लिहितानासुद्धा SUNITHEE लिहीतात. मग ते खोडून मला परत T नाय ओ D असं चारचारदा सांगावं लागतं. शेजारणीने लेकीचं नाव दिशीका ठेवलं. हाक मारताना तीशिखा. तिला त आणि द मधला फरक समजवून सांगेपर्यंत माझी जीभ पोंपलली.


मध्यंतरी एका तमिळ लेखिकेचे मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक वाचत होते. वाचताना कित्येक शब्दांना चांगल्याच ठेचा लागत होत्या पण कुझांबु शब्दाने तर हैराण केलं. अनुवादकाने तमिळ कादंबरीचा अनुवाद इंग्रजीवरून केल्यामुळे इंग्रजीमधले काही शब्द जसेच्या तसे उचलले होते. Kuzhambu असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा उच्चार आहे- कोळंबु. कोळंबु म्हनजे रस्सा असलेली भाजी अथवा कालवण. तमिळमध्ये ळ चे दोन वेगळे उच्चार आहेत, त्यांसाठी दोन स्वतंत्र अक्षरंही आहेत. यापैकी  त्यातल्या एका  ” (जीभेला अधिकाधिक मागे नेऊन टाळूला लावून ळ म्हणायचा प्रयत्न करा) रोमन लिपीमध्ये ट्रान्स्लिटरेट करताना ZH असे वापरले जाते. यामागे नक्की काय भाषाशास्त्रीय कारणे आहेत माहित नाही. पण सर्वसाधारणपणे आपण वाचताना याचे करून वाचतो. पण ते चूक आहे. कणीमोझी नाही, कणीमोळ्ळी. कोझीकोड्डे नाही, कोळ्ळीकोड्डै. हा  तमिळ भाषेमधला सर्वात अनोखा उच्चार मानला जातो. केवल तमिळ आणि मल्याळममध्येच असला उच्चार आहे म्हणे.

तमिळ भाषा व्यंजनांच्या बाबतीत परिपूर्ण नाही. अनेक व्यंजने नसताना ती आपल्या भाषेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आहे तेच योग्य आहे असा पवित्रा घेऊन मुद्दाम चुकीचे उच्चार करण्यामध्ये काही लोकं धन्य मानत असतात.. पण यामुळे कित्येक अशक्य विनोद मात्र घडत असतात. इंटरनेट्वर आर आय पी इंग्लिशवगैरे म्हणून काही इमेजेस आलेल्या पाहिल्या असतील. गोभीहा शब्द तमीळमध्ये कोपीअसा लिहायचा, आणि मग त्याचं परत रोमनीकरण करताना ते गोपीअसं करून मेनूकार्डावर GOPI MANCHURIYAN असं छापायचं. फ़्रॉक्सचं तमिळीकरण वरून रोमनीकरण करताना ते FROGS  केलेलं मी पाहिलं आहे.



पण या सर्व उहापोहाचा मला फायदा काय झाला? एक तर जी भाषा आधी कानाला ऐकायला फारच कठीण वाटत होती, त्यामधली व्यंजनं आणि स्वरावली लक्षात आल्यावर तेच शब्द मराठीच्या अथवा कानडीच्या रूपामध्ये वापरले तर कित्येक शब्द समान आहेत हे लक्षात आलं. पळम समजायला किती कठीण पण फळ हा शब्द तमिळमध्ये पळ असाच लिहिला जाईल हे समजलं की पळ= फळं हे बरोबर ध्यानात आलं. मोदगम हे नवीन नाव वाटतं, पण मराठीमध्ये तेच मोदक आहेत. एखादा म्हणजे ओण्णू हे समजल्यावर ओण्णूवेळ्ळे म्हणजे एखादवेळी हे बरोबर समजलं. वेळ हा शब्द मराठीमध्ये आहेच की. मग ओण्णू ओण्णे हे कितीही  विचित्र वाटलं तरी एकुलता एकआहे हे पटकन लक्षात आलं. बारम म्हणजेच भार म्हणजेच ओझे! कानडीमध्ये हुळी म्हणजे आंबट आणि ह चा प केला की तमीळमधला पुळी म्हणजे आंबटच! मग पुळी म्हणजे चिंच हे ओघानं आलंच.  सेम याच नियमाने हू म्हणजे पू म्हणजे फुलं. कानडीमध्ये येली म्हणजे पान, तेच  तमिळमध्ये इलै म्हणजे पान. कलिंगडाचे नाव आहे तरबूसपळम. लांबलचक नाव असलं तरी टरबूज फळ हे दोन कीवर्ड्स ध्यानात घेतले की शब्द लक्षात राहतो. तुणी म्हणजेच मराठीमधला धुणी म्हणजेच कपडे हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे? पात्रम म्हणजेच भांडी. गच्ची म्हणजे माडी. हे शब्द मराठीमध्येही वापरले जातातच की. आपण औषधाची मात्राघेतो, इकडे औषधालाच मात्रै म्हणतात. आहे की नाही मज्जा!!! घात= अबायम (अपायम) दुपार= मध्यान्नम, कोथंबीर- कोतमल्ली, फटाके = पटास, बयम= भय. असे अनेक वरकरणी कठीण वाटणारे पण समजून घेतल्यावर सोपे वाटणारे शब्द मेंदूच्या डिक्शनरीमध्ये आपोआप भरले गे्ले त्यासाठी फारसे आयास करावे लागले नाहीत..

हा लेख जरा जास्तच कठिण झालाय का? लिहायला सुरूवात केली तेव्हा इतका किचकट होइल असं वाटलं नव्हतं. हरकत नाही, आता हळूहळू माझी तमिळ भाषेबद्दलची भिती गेल्यातच जमा आहे. लेकीच्या शाळेसोबत मी पण अक्षरांची बाराखडी गिरवतेच आहे. पण आता अभ्यास फार करून झालाय. पुढच्या लेखामध्ये मात्र फिरायला कुठंतरी जाऊ या. मस्तपैकी शॉपिंग आणि खादंती करण्यासाठी तर नक्कीच.

Sunday, 17 April 2016

रहे ना रहे हम (भाग ७)

जॉयसने बारावीच्या वर्षासाठी टाईमटेबल आखलं होतं, पण तिच्या घरामध्ये तिला अभ्यासाला जास्त वेळ मिळायचा नाही. तिची आई कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स असल्याने तिची शिफ़्ट ड्युटी असायची, जॉयस सर्वात मोठी. त्यानंतरची कॅरोल आणि मग मायकल. शिवाय त्यांचं एकत्र कुटुंब, काकाकाकी, त्यांची मुलं आणि अजून बरंच कोण कोण. इन मिन चार खोल्यांच्या घरामध्ये एवढी सर्व माणसं. त्यामुळे ती अभ्यासाला माझ्याचकडे येऊ लागली. जादू आल्यापासून परत घरामध्ये येणारे जाणारे लोक वाढले होते, म्हणजे आफताबची चिडचिडपण. ती आणि आफताब या दोन पुस्तकी किड्यांमध्ये माझा अभ्यास झाला नसता तर तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता.

आईसोबत बोलायला मला खरंतर आधी फार आवडायचं. रोज शाळेत काय काय घडलंय त्याबद्दल मी सविस्तर सांगायचेच, पण आता आईला काही सांगितलं की ती भलतेच उपदेश करायची. वसीमबद्दल तिनं मला एकदोनदा चौकशी केल्यासारखं विचारलं... फार खोलात जाऊन नाही सहजच विचारल्यासारखं, पण टोकेरी प्रश्न बरोबर समजतातच की. मी तसंच काहीतरी उडवून लावलं.
आफताब बोर्ड एक्झामसोबतच सीएच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. आम्हाला नुकतीच मेडीकलसाठी एंट्रन्स एक्झाम सुरू झाली होती. जॉयस त्याची तयारी करत होती.
“तू पण एक्झाम देना” आफताब मला दोन तीनदा म्हणाला.
“पण मला डॉक्टर व्हायचंच नाही.”
“का? तुझे काका आणि काकी मुंबईला डॉक्टर आहेत ना, मग तुलाही त्यांच्यासोबत काम करता येईल” आफताब आजचा विचार करतच नाही, पुढच्या पाच दहा वर्षांचा विचार करून मगच बोलतो, तरीही नशीबाचे फासे कायम विचित्र पडतच राहतात. ठरवल्यासारखी एकही गोष्ट घडत नाहीच. शाहीनशी लग्न करताना पुढं असं काही घडेल हे त्याला चुकून तरी वाटलं असेल का? 
“मला इतका अभ्यास झेपणार नाही. शिवाय मला ते इंजेक्शनं सलायनी वगैरे अजिबात आवडत नाहीत.” मी त्याला उडवून लावलं.
“डॉक्टर व्हायचं नाही तर इंजीनीअर हो” जॉयस आमच्यामध्ये पडली.
“बिल्कुल नाही. मला गणितं आवडत नाही. शिवाय...”
“सॉफ्टवेअर इंजीनीअर हो, ते बेस्ट आहे. तो शाळेजवळच्या गल्लीमधला प्रवीण माहिताय? तो मेकॅनिकल इंजीनीअर झाला. कॅंपस इंटरव्युमध्ये सीलेक्ट झाला. डायरेक्ट अमेरिका. करोडोंमध्ये कमावेल. त्याच्याकडे तर घरी कंप्युटर पण नव्हता तरी तो सॉफ्टवेअर इंजीनीअर झालाय. तुज्याकडे मस्त पीसी आहे.” जॉयसला काय सांगावं? घरात पीसी आहे म्हणून मी प्रोग्रामर व्हायचं का? अजून काय करीअर चॉइसेस नाहीतच.
“नॉट इंटरेस्टेड”
“कशामध्ये? इंजीनीअर होण्यामध्ये की, अमेरिकेला जाण्यासाठी?” आफताबनं अतिशय सीरीयसली विचारलं.
“म्हणजे?”
“इंजीनीअर व्हायचं नसेल तर ओके, तसाही अभ्यास खूप असतो. पण तुला अमेरिकेला तसंही जाता येइल. आमच्या घरात नवीन ट्रेंड चालू झालाय. पोरं अमेरिकेत जातायत. सॉफ्टवेअरमध्ये पैसे कमवायला आणि पोरी त्यांच्याबरोबर लग्न करून जातायत. जास्त शिकलेल्या नसाल तरी चालेल, फक्त “अमेरिकेतील जीवनमानाशी जुळवून घेण्याची तयारी हवी” जाहिरातीत असंच लिहितात. सिराजभाई तर पंधरा दिवसांच्या सूट्टीवर आला आणि निकाह लावून बायको नेली. गल्फ़मध्ये असता तर बायको इथंच सोडून गेला अस्ता, आमच्याकडे हल्ली बघताना असे अमेरिकन पोरंच डीमांडमध्ये आहेत. बायकोला नेतात म्हणून”
एकूणात आमच्याकडे सध्या सॉफ्टवेअर इंजीनीअरिंग आणि त्यामागोमाग अमेरिकेला जाणं हे फारच रूळत चाललं होतं. मागे मुंबईला गेले होते तेव्हा काकीची आई आली होती. त्यापण नुकत्याच त्यांच्या सुनेच्या बाळंतपणासाठी त्या बोस्टनला जाऊन आल्या होत्या. तिकडच्या थंडीच्या, भरपूर सामानाच्या आणि सगळं काम स्वत:चं स्वत:च करावं लागत असल्याच्या कायकाय गप्पा सांगत होत्या. आमच्या गावात परदेशी जाणं म्हणजे मुस्लिम लोकांसाठी गल्फ नेहमीचंच होतं. त्यातही गल्फचा पैसा म्हणजे प्रचंड! अझरभाईसारखे लोकं तिथं राबायचे ते केवळ पैशासाठीच. करीअर म्हणून नव्हे. पण अमेरिकेत जाणं म्हणजे करीअरची दिशा सेट करणं. आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं अचिव्ह करणं वगैरे. इतके दिवस पुण्या-मुंबईमध्ये नोकरी मिळणं हे फार भारी काम मानलं जायचं, इंग्लंडमध्ये वगैरे जाणारे लोक फारच हुशार पैसेवाले आणि भलतेच चिकाटीवाले. पण आता हळूहळू गेल्या दहा वर्षामध्ये अमेरिकेला जाऊन नोकरी करणं खूपच कॉमन झालं होतं.
मला डॉक्टर व्हायचं नव्हतं की अमेरिकेला जायचं नव्हतं. खरंतर मला काय करायचं आहे तेच क्लीअर नव्हतं. पुढच्या शिक्षणासाठी आईवडलांनी मला गावाबाहेर ठेवलं नसतं. मी हॉस्टेलमध्ये वगैरे राहतेय ही कल्पनाच आईला असह्य झाली असती. बाबानं काय केलं असतं माहित नाही.
त्यामुळे मी बारावी झाल्यावर गावातच बीएससी असा सुटसुटीत पर्याय डोळ्यांसमोर ठेवला होता.
“टीव्ही लगाव” आम्ही बोलत असतानाच जादूचा जोरात आवाज आला. त्यांचं केबल कनेक्शन आफताबनं गरज नाही म्हणून काढून टाकलं होतं. “जल्दी न्युज चॅनल्स लगाव” तो गडग्यावरून उडी मारत आला.
आम्ही लगेच एनडीटीव्ही लावलं. अमेरिकेमध्ये कसल्यातरी विमानांचा अपघात झाला होता. दोन्ही विमानं भल्यामोठ्या शेकडो मजल्यावरच्या इमारतींवर जाऊन धडकली होती. टीव्ही बघताना केवळ ती विमानं धडकत असल्याचं दृश्य वारंवार दिसत होतं. बाकी टीव्हीवाल्यांचं नेहमीची फालतू बकबक चालू होती, काय झालं कळायला मार्ग नव्हता. आम्हाला फक्त तो हॉलीवूडच्या पिक्चरमध्ये शोभेल असा विमानांचा स्टंट बघून मज्जा वाटली, आणि किती लोकं मेली असतील याबद्दल काळजीसुद्धा. जादू कितीतरी वेळ चॅनल्स बघत राहिला, हे सगळं घडून चार-पाच तास उलटून गेले होते. आम्हाला आत्ता पत्ता लागला होता, पण त्यात विशेष लक्ष घालण्यासारखं काही वाटलं नाही. आम्ही परत अभ्यासाकडे वळालो.
या असल्या गोष्टींचे भविष्यावर काय परिणाम होतील याचा विचार करायची आमची अक्कल नव्हती आणि तशी आवश्यकतादेखील वाटली नाही. आणि तसंही असल्या गोष्टींचे परिणाम एका दिवसात थोडीच दिसून येतात.


>>>>> 
एके दिवशी आई बाहेर गेली होती, तेव्हा पोस्टमन आला. पत्रं काही खास नव्हतीच. आता कोण पत्रं लिहितंय. एक दोन एल आय सीचे रीमाईंडर्स, बाबांच्या दुकानामधल्या मालाचे काही बोशर्स आणि आईसाठी एक लिफाफा होता. मागच्या महिन्यांत आईला अशाच लिफाफ्यामधून टप्पारवेअरचं ब्रोशर आलं होतं. मला वाटलं तेच असेल, असल्या ब्रोशरमधली चित्रं पहायला मला फार आवडाय्चं. (आताही आवडतंच, सगळे हसतात पण मी सर्व मेलर्स फ्लायर्स, ब्रोशर्स इतकेच काय टेक अवेचे मेनूसुद्धा अखंड वा्चून काढते)
 पण या मधलं ब्रोशर वेगळंच होतं. मुंबईमधल्या कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये कस्लंतरी फंक्शन होतं त्यासाठी आईला आमंत्रण होतं. कॅन्सर सर्वायवर म्हणून! आई घरी आल्यावर मी आईला ते ब्रोशर लगेच दाखवलं.. “आई! तुला कॅन्सर कधी झाला होता?” हे खरंच मला माहित नव्हतं म्हणजे एक तर मी खूप लहान असताना किंवा माझ्या जन्माच्याही आधी.
“खूप वर्षं झाली” ते ब्रोशर आईनं कचर्‍याच्या पेटीत फेकून दिलं.
“मग तू मला सांगितलं का नाहीस?”
“त्यात तुला सांगण्यासा्रखं काय आहे? अजून लहान आहेस”
“इतकी पण लहान नाही. हे बघ, आम्हाला बायोमध्ये कसले सब्जेक्ट्स आहेत. सांग की, काय झालं होतं?”
आई माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता किचनमध्ये चहा करत होती “सांग ना गं, आई” मी माझी किरकिर प्रत चालूच ठेवली. शेवटी आईनं चहाचा कप माझ्यासमोर आदळला. “लग्नानंतर मला कॅन्सर झाला. गर्भाशयाचा. केवळ तू व्हावीस म्हणून मी ट्रीट्मेंट घेत राहिले. तू जन्मल्यावर मात्र लगेच हिस्टरेक्टोमी झाली. त्यानंतर मी ठणठणीत आहे. अजून काय सांगू?” आई माझ्यावर ओरडलीच.
मी काही न बोलता चहाचा कप उचलला. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, मी व्हायच्या आधीपासून. मी झाले मग तिनं ऑपरेश्न केलं. आईला एवढं सर्व काही त्रास होत असूनसुद्धा बाबानं बाहेर लफडं केलं होतं. बाई ठेवली होती.
आईनं चहा आज इतका पांचट आणि बेक्कार केला होता की.... असला चहा पिताना मला रडूच यायला लागलं.




बारावीचं वर्ष एकदाचं संपलं. काही खास नव्हतंच. क्लास, ट्युशन्स, अभ्यास इतकंच आणि एवढंच. आईच्या आजाराबद्दल समजलं होतं. नंतर बोलताना आईनं अजून काय काय सांगितलं. बाबानं आईची किती काळजी घेतली, तिला किती सपोर्ट केला वगैरे वगैरे आईनं ऐकवलं. पण त्या संध्या नावाच्या काळ्या बाईबद्दल ती काही बोलली नाही.
पण मला आता तितकं गणित येत होतं. आईचा आजार चालू झाला, माझा जन्म झाला, आईची हिस्टेरेक्टोमी झाली आणि त्यानंतर बाबानं बाई ठेवली. ऑब्व्हियसली, सेक्ससाठी. कुणी निव्वळ गप्पा मारण्यासाठी तर बाई ठेवत नाही.. पण का? आई बाबाचं काही भांडण नव्हतं. दोघांच्या नात्यात कसला कडवटपणा मला आजवर दिसला नव्हता. उलट माझ्या सर्व मैत्रीणींचे आईवडील कायम अवघडलेल्या नात्यात असायचे. प्रत्यक्षात एकत्र तर झोपायचं आहे, पण चारचौघांत मात्र आपण एकमेकांना ओळखत नसल्याचा आव आणायचा आणि हे केव्हा तर मुलं दहा बारा वर्षं झाल्यानंतरदेखील. मग एरवी इतका दांभिकपणा कशाला? नवरा बायकोच्या नात्यामधली ही गुंतवळ मला कधीच समजली नाही. माझ्या आईबाबाचं लव्ह मॅरेज होतं. तरी बाबानं केवळ झोपण्य़ासाठी वेगळ्या बाईची सोय केली होती. गणित येत तर होतं पण अजून समजत नव्हतं.
बारावीनंतर जॉयस इंजीनीअरिंगला गेली. तिला चांगली गव्हर्नमेंटची सीट मिळाली. यशस्वी पुढच्या शिक्षणाला पुण्याला गेली. गेली बीएससी करायलाच पण तरी एकूण अविर्भाव फारीनात चालल्याचा  होता. ते काय फार खोटं पण नव्हतं. नात्यामधल्याच एका मुलाबरोबर आईवडलांनी लग्न ठरवलं होतं. मुलगा युएसला होता. अजून दोन वर्षांनी लग्न आणि तोपर्यंत जमेल तितकं शिकत रहायचं. निधी आणि रझियानं आमच्याच गावातल्या कंप्युटर सायन्सला ऍडमिशन घेतली. त्यांचं कॉलेज माझ्या कॉलेजपासून पाच मिनिटाच्या अंतरावर. मी आणि पूर्वी बीएससीला गेलो. पूर्वीला मार्क जास्त नव्हते आणि मला सत्तर टक्के मार्क असूनही कुठेही जायचं नव्हतं.
आफताब सीएच्या परीक्षांची तयारी करत होता. बारावीला त्यालाही चांगले पंचाएंशी टक्के मार्क मिळाले. त्यानं पुण्याला बीकॉमसाठी ऍडमिशन घेतली. तिकडे सीए साठी क्लासेस चांगले आहेत म्हणाला. परीक्षेमध्ये पास झाला की लगेच त्याला इंटर्नशिप करावी लागणार होती.
“सो, आता पुढच्यावेळी सुट्टीत आलो की भेटू” डोळ्यांवरचा चष्मा सारखा करत तो मला म्हणाला. त्याच्या दोन तीन बॅगा आमच्या कारमध्ये ठेवल्या होत्या. बाबा पुण्याला काहीतरी कामासाठी निघाला होता. त्याच्याचसोबत आफताब जाणार होता.. माझ्या खोलीमध्ये मला बाय करायला आला होता.
“ईमेल्स करत रहा. चॅटवर भेटूच की” मी म्हटलं.
“सायाबर कॅफेमध्ये जायला तरी वेळ मिळेल का?”
“मग फोन कर” बाबानं कार गेटच्या बाहेर काढली होती. “अर्थात, निधीला फोन करण्यापासून वेळ मिळाला तर...” मी तेवढ्यात त्याला चिडवून घेतलं. बाहेरून आईचा आवाज आला. “अझरभाई दोन-तीन महिन्यांत परत येतील. तेव्हा मी इकडे चक्कर मारेनच. अभ्यास कर. काळजी घे. स्वत:ची आणि काकीची पण” तो म्हणाला. “सारखी तुडतुडत राहू नकोस. कॉलेज लाईफ एंजॉय कर.” माझ्यापेक्षा तीन महिन्यांनी लहान असलेल्या आजोबांनी मला सल्ला दिला.
“तू पण अभ्यास कर.” आफताबसाठी अत्यंत अनावश्यक असलेला सल्ला मीपण दिला.
तो नुसता हसला. “फोन करेन. अम्मीची काळजी घे.”
“आय विल मिस यु” तो दाराजवळ गेल्यानंतर मी अचानकच म्हटलं.
“आय विल मिस यु, टेक केअर” तो क्षणभर मागे वळून म्हणाला. पुढं त्याला काहीतरी सांगायचं असणार पण तेवढ्यात बाबानं कारचा हॉर्न जोरात मारला आणि आफताब तडक रूमबाहेर पडला.

माझे आणि आफताबचे रस्ते वेगवेगळे झाले.
रीझल्ट झाल्यानंतर बीएससीचं कॉलेज लगेच चालू झालं. पहिले काही दिवस कॉलेज म्हणजे बोरिंग होतं. बोरींग हा शब्द एक्सायटिंग वाटावा इतकं बोरींग. सब्जेक्ट्स इंटरेस्टिंग होते पण आमच्या नशीबानं प्रोफेसर एकदम फालतू. कसले कसले भयाण आवाजात टेप लावल्यासारखे बडबडायचे. माझ्यासारख्या इंग्लिश मीडीयमच्या मुलीला त्यांचे उच्चार समजायचे नाहीत तर मराठी मीडीयम आणि खेड्य़ापाड्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांची काय कथा? पण एक बरं होतं. प्रत्येक लेक्चर अटेंड करायलाच हवी अशी काही अट नव्हती. आमच्या कॉलेजपासून निधीचं कंप्युटर कॉलेज जवळच होतं. आमचा ग्रूप आधीसारखाच अजूनही भेटत होता. अगदी रोजच्या रोज नाहीतरी किमान आठवड्यांतून एकदा तरी. मी बारावीच्या सुट्टीत कार चालवायला शिकले होते. त्यामुळे आता आम्हाला गावामध्ये अगदी रात्री उशीरापर्यंत भटकता येत होतं. आईला रात्री मी बाहेर गेलेलं आवडायचं नाही. एकदोनदा तिनं मला यावरून बोलून दाखवल्यानंतर मी स्पष्टपणे मी अठरा वर्षांची झालीये, मला सज्ञान असल्यामुळे कसंही वागायचा हक्क आहे हे सांगितलं. त्यानंतर आईनं माझ्याशी जास्त बोलणंच सोडलं. बाबाशी तर मी कित्येक वर्षांपासून धड बोलत नव्हते.
यावर्षी माझी मैत्री गौतमीबरोबर झाली. ही आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहायची. बारावीला मार्क चांगले होते पण ते मार्क सगळे पाठांतराचे. कसलीच कन्सेप्ट क्लीअर नव्हती. तशी ती हुशार होती. वर्गात माझ्या जवळपास बसायची, म्हणून मी तिला नोट्स वगैरे द्यायचे. एकदा कशासाठी तरी मी तिला माझ्या घरी घेऊन आले होते. माझं घर बघताच ती म्हणाली. “काय छान बंगला आहे गं!”
डोंबल. आमचं घर पंधरा वर्षांपूर्वीचं जुनं होतं. आई गेल्या कित्येक महिन्यांपासून बाबाला रीनोव्हेशन करूया म्हणून मागे लागली होती. यावर्षी करू त्यावर्षी करू करत बाबा मागेपुढे करत होता.
आणि हे असलं घर हिला सुंदर वाटतंय. घरची परिस्थिती खास नव्हती. जॉयसपेक्षाही वाईट. गौतमीचे बाबा कुठल्यातरी आमराईमध्ये गडी म्हनून काम करायचे. आई घरातच शिवणकाम. पाठीमागे अजून दोन भावंडं. तिला बीएससी करून मग बीएड करायचं होतं म्हणजे शिक्षिकेची चांगली नोकरी मिळाली असती. मला तिच्याशी बोलायला आवडायचं, पण ती लेक्चर्स सोडून एरवी कुठेही यायची नाही. अगदी चल कॅंटीनमध्ये कॉफी पिऊ म्हटलं तरी “नक्को” म्हणायची. परिस्थिती नव्हती हे मान्य आहे पण पाच पाच रूपयांच्या कॉफीकरता इतका विचार कशाला करायचा? आता मी काय फार करोडपतीची मुलगी नाही. पण तरी घरात पैशांचा काहीच त्रास नाही. मला रोजच्या रोज आई खर्चाला पैसे द्यायचीच. मग दोन कप कॉफीचे पैसे मी दिले तर काय प्रॉब्लेम, तर तेही हिला पटायचं नाही. “नक्कोच”
मी वैतागायचे तरी तिच्याशी बोलायचे. माझ्यापेक्षा ती खूप वेगळ्या लाईफस्टाईलमधली मुलगी होती. आईवडलांना लांब सोडून हॉस्टेलवर राहणारी ती एकटी मुलगी तेव्हा मला बिच्चारी वाटायची.  तिला स्वत:ला तसं कधी वाटायचं नाही. आपण आठवड्यांतून तीनदा एकच पंजाबी ड्रेस कॉलेजला घालतो, आपण रोज एकच चप्पल वापरतो, बॅगचा बंद तुटला तर तो चांभाराकडून शिवून तसाच वापरतोय यामध्ये तिला कधीही कमीपणा वाटायचा नाही. माझी एक बॅग रंग उडाल्यासारखी झाली म्हणून मी फेकेन म्हणाले तर लगेच “फेकू नकोस. इतकी फाटली नाही. मी वापरेन” असं स्वत:हून म्हणाली. त्या दिवशी मला गौतमीचं खरंच खूप आश्चर्य वाटलं. दुसर्‍याची वस्तू वापरणं मला कधीच सहन झालं नसतं, पण तिच्यासाठी “जर आपले पैसे वाचत असतील तर दोन तीन महिने वापरलेली वस्तू वापरण्यात काहीच हरकत नव्हती”. फालतूच्या इगोपेक्षा तिला प्रॅक्टिकल विचार करता येत होता. आयुष्यात एकदातरी आफताब आणि गौतमी भेटायला हवे होते. दोघंही काहीकाही बाबतीत कित्ती सारखेच होते आणि काही बाबतीत कित्त्ती वेगळे!!

कॉलेजचे पहिले सहा महिने इतके बोरिंग गेले पण नंतर गॅदरिंग आणि डेज चालू झाले. आता कॉलेज एकदम एक्सायटिंग झालं. महिनाभर सगळीकडे नुसते उत्साहाचे वारे का काय म्हणतात तेच. कॉलेजच्या समित्या बनल्या त्यामध्ये मी कशातही भाग घेतला नाही. जळ्ळं, मला काहीच येत नव्हतं. निधी ऑर्गनायझिंग कमीटीमध्ये होती. दिवाळीच्या सुट्टीत ती पुण्याला चार-पाच दिवस गेली होती. “आमचे एक परिचित आहेत, त्यांनी मला ही साडी दिली” परत आल्यावर निधीनं आम्हाला एक सोनेरी रंगाची झिरझिरीत साडी दाखवली. ही साडीडेला नेसणार होती. अर्थात हे परिचित म्हणजे आमच्याच बाजूला राहणारे चष्मीस सद्गृहस्थ हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.. पण मलाच खूप उशीरानं समजलं. त्यांचा सीएचा रीझल्ट लागला होता. काहीतरी पहिली परीक्षा पास करून सध्यी कुठल्यातरी मोठ्या कार्पोरेटमध्ये इंटर्नशिप चालू झाली होती. आफताब महाशय “कमावते” झाले होते... तरीच डीझायनर साडी वगैरे!!!
कॉलेज डेजचा पहिला दिवस ब्लॅक ऍंड व्हाईट डे होता. मी आधीच बाबाला सांगून एक पांढराशुभ्र ड्रेस मागवला होता. दिल तो पागल है मध्ये माधुरीचे नेटेड ड्रेस होते ना, त्या टाईपमध्ये. ब्लॅक पर्ल्सचा सेट आणि हातात ब्लॅक क्लच. केस मुद्दाम मोकळेच ठेवले होते.
त्यादिवशी चाची पण म्हणाल्या, “गौरी, लेकीची नजर उतरव गं. सुभानअल्ला, आज परी दिसतेय”

कॉलेजमध्ये गेले तेव्हा अख्खं कॉलेज काय माझ्याकडे बघत राहिलं वगैरे काही झालं नाही. ते फक्त फिल्म हिरॉइन्ससोबत होतं. आज सगळ्याच जणी छान दिसत होत्या. काळी पॅंट आणि पांढरा शर्ट हा पोरांसाठी काय फारसा वेगळा ड्रेस नसल्याने ते सर्व नेहमीसारखेच चंपट दिसत होते. तशी आज लेक्चर्स फारशी नव्हतीच. इकडेतिकडे नुसते भटकत होतो. निधी कमिटीमध्ये असल्यानं ती बिल्ला लावून उगाच मिरवत होती. गौतमीनं साधाच ड्रेस घातला होता आणि त्यावर शोभत नसतानाही काळी ओढणी घेतली होती. डेजसाठी नवीन ड्रेस वगैरे घेणं तिच्या स्वप्नांतही आलं नसतं. ट्रॅडिशनल वगैरे साठी तर ती काही स्पेशल करणार नव्हती म्हणाली. माझ्या ड्रेसेस मधलं काही घालशील का तर नक्को!
बोरिंग असलं तरी ते लेक्चर एकदाचं संपलं.
“एक्स्युज मी,” मी वर्गामधून बाहेर पडताना दारात उभ्या असलेल्या एका मुलानं मला हाक मारली. “तुझं नाव स्वप्नील, राईट?”
मी मान डोलावली. हा मुलगा बहुतेक एस वायचा असावा.. वर्गामधली सगळी मुलं निघून जाताना त्यानं मला हातानं केवळ थांब असा इशारा केला. मी जरी थांबले तरी आता मला वर्गात यावरून चिडवलं गेलं असतं हे नक्की. वर्ग रिकामा झाल्यावर तो जरा दोन पावलं पुढे आला. “हाय,” तो जरा बिचकतच म्हणाला. “सॉरी, आपली आधीची ओळख नाही. पण झालंय असं की...”
मला निधीसोबत तिच्या डान्सची प्रॅक्टीस बघायला जायचं होतं. “लवकर बोला”
“माझी वर्गातल्या मुलांबरोबर पैज लागली आहे. तुला चॉकलेट द्यायची आणि... आणि... एनीवेज, मी केदार. बाजारपेठेमध्ये तुझ्या वडलांच्या दुकानाजवळचं आमचं स्वीट मार्ट आहे”
ओह, केदार मिठाईवाल्यांचा मुलगा. “मग?”
“प्लीज, हे चॉकलेट घेशील?” त्यानं हातामध्ये एक डेअरी मिल्क धरलं होतं. मी ते चॉकलेट घेतलं. तसंही मला कुठं खायचं होतं. “थॅंक्स. आज तू छान दिसतेस.”
“थॅंक्स. पण तुमची पैज नक्की माझ्यावरून का लागली? आय मीन, स्पेशल काय आहे?”
“स्पेशल काही नाही” तो एकदम गांगरला. “त्याचं काये की, आपली दुकानं जवळ असल्यानं वर्गातली मुलं मला चिडवतात. दॅट्स इट”
गोष्ट दॅट्स इट असण्याइतकीच नव्हती हे तर साफ होतं. कारण जर पैज लावलेली असती तर हा चॉकलेट देतो की मी त्याच्या कानाखाली मारते ते बघायला त्याचे मित्र आजूबाजूलाच घोटाळत राहिले असते.. तसं कुणीही दिसत नव्हतं. समोरचा मुलगा मी आधी एकदोनदा कधीतरी पाहिला होता. छान गोरासा, टिपिकल पिंगट केस आणि घार्‍या डोळ्यांचा. काळा कॉटनचा शर्ट आणि ऑफव्हाईट कलरची डेनिम. उलटंच कॉंबिनेशन, पण त्याला एकदम कातिल दिसत होतं.
“ओके” तो हसून म्हणाला. “बाय”
मी पण बाय म्हटलं. तो निघाला, आणि निघतानाच हलकेच मला ऐकू येईल अशा आवाजात कुजबुजला. “उद्यापण मी अशीच पैज लावली तर चालेल ना?”
“चालेल, पण मी चॉकलेट खात नाही.” मीही तितक्याच हळू आवाजात कुजबुजत म्हटलं.
“हरकत नाही, तसाही उद्या मिसमॅच डेच आहे”

(क्रमश:)