निधीसोबत आफताब सध्या फारच स्टेडी रिलेशनशिपमध्ये होता.
गंमत म्हणजे, माझ्यासोबत निधी फारशी बोलायची नाही. इन फॅक्ट, जर मी मुंबईत कुणाला
निधी आणि मी एकाच वर्गात होतो, आणि आफताब वेगळ्या वर्गात होता हे सांगितलं तर
खरंसुद्धा वाटलं नसतं. मला गावामध्ये खबर मिळाली होती की, निधीच्या घरचे
तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत तेपण एकदम फुल फोर्समध्ये. तिचंही मास्टर्स संपलं होतं.
तिला पुण्यातच जॉब लागला होता, पण ती दर शनि रवि हल्ली आफताबच्याच घरी होती. आफताब
आधी दोन तीन रूममेट्ससोबत रहायचा, पण त्यांच्यासोबत त्याचं फार काही पटलं नाही आणि
आता तो एकटाच राहत होता. वीकेंडला निधी येतच होती. एकंदरीत मला तरी त्या दोघांच्या
वागण्य़ाबोलण्यावरून ते लग्नाचादेखील विचार करत होते असं वाटत होतं. आय वॉज हॅपी
फॉर बोथ ऑफ देम. माझ्या मनात अजूनही आफताबबद्दल फीलींग्स होत्या, पण त्या अशा
होत्या की आहेत तर खर्र्या पण असून नसल्यासारख्या! मला त्यांचं हल्ली काही वाटतच
नव्हतं. चुकूनमाकून माझ्या मनात कधी यावर वादंग माजलाच तर मी स्वत:लाच “यु लव्ह
आफताब. सो व्हॉट! ही डझण्ट लव्ह यु” हे ऐकवून गप्प बसवायचे. आजही तेच करायचा
आटोकाट प्रयत्न करते. स्वत:ला फसवण्याचा अजून एक प्रयत्न.
माझी आई माझ्यासाठी स्थळं शोधायच्या विचारात होती, मला
म्हणाली तुझ्या काही अटी आहेत का? अटी घालून काय डोंबल लग्न करणार? चांगलासा आणि
छानसा नवरा हवा होता. समजूतदार आणि कमवायची अक्कल असलेला हवा. कमवत नसेल तरी
चालेल, मी बर्यापैकी कमावत होतेच पण दिसायला हॅंडसम हवाच. इतकंच काय ते.
मी पनवेलला शिफ्ट होऊन जवळजवळ सहा महिने झाले होते. मध्येच
सुट्टी असली की गावी जायचे, किंवा कधीमध्यी आईबाबा येऊन रहायचे. बाबानं हा फ्लॅट
खूप आधी एकदम स्वस्तात घेतला होता. तेव्हा पनवेल म्हणजे कंप्लीट मुंबईच्या बाहेर
होतं, आता नवी मुंबई असलं फाफट्यासारखं वाढलं होतं की पनवेलच काय, थोड्या दिवसांनी
पेण पण लोकांनी मुंबईतच धरलं असतं असं बाबा गमतीनं म्हणायचा. पेणमध्ये आमची थोडी
जमीन होती म्हणे!! म्हणजे काकानं घेतली होती.काकूचं गाव असल्यानं तिथं हॉस्पिटल
काढायचा प्लान होता. पण ते काही झालं नाही. पण जमीन पडून होती.
एके दिवशी शुक्रवारी ऑफिस संपवून घरी यायला निघाले होते,
तेव्हा आफताबचा फोन आला. लोकलमध्ये असल्यानं नीट ऐकू आलं नाही. घरी आल्यावर त्याला
लगेच फोन केला.
“स्वप्नील, उद्या काय करतेस?”
“स्वप्नील, उद्या काय करतेस?”
“काही खास नाही, जानेमन रीलीज होतोय. तिकीटं मिळाली तर
बघेन. का रे?”
“ओह! तुझा पक्का प्लान ठरलाय का?”
“नाही. तिकीटं मिळाली तर ना. सलमानभाईचा पिक्चर आहे.
ऍडव्हान्स बूकिंगपण मिळालं नाहीये. पण का विचारतो आहेस?”
“उद्या जरा माझ्याबरोबर येशील?”
“कुठे?”
“जमेल का ते सांग आधी. माझ्यासाठी तुझे काही मेजर प्लान्स
चेंज व्हायला नको”
“आता फटके खाशील. बोल कुठे जायचंय?”
“उद्या चार वाजेपर्यंत बांद्रा स्टेशनला पोहोच. मी
येईन तिथं. मगच सांगेन.”
त्यानं फोन कटसुद्धा केला. आफताब इतक्या घुमवून फिरून काय
विचारत होता, कुणास ठाऊक! एरवी मी फार विचार केला नसता, पण आज एकंदरीत त्याच्या
बोलण्याचा टोन थोडा उदास वाटला.
दुसर्या दिवशी त्यानं सांगितल्यासारखं मी बांद्रा स्टेशनवर
पोचले. सकाळपासून त्याचे नुसते मेसेजेस चालू होते. “अमुक वाजता येच” “लंच करून ये”
“तुझा तो लाल रंगाचा सलवार सूट घालून ये” म्हटलं कशाला? एक तर मला तो लाल ड्रेस
अजिबात आवडत नाही. खरंतर तो ड्रेस आमच्याकडे कामाला येणार्या कविताने तिच्या
लेकीच्या लग्नांत मला दिला होता. मला अजिबात आवडला नाही, पण आई म्हणे कसाही असला
तरी तिनं मायेनं दिलाय. घालायचाच.. मुंबईच्या गर्मीमध्ये इतका अंगभर कपडे घालून
फिरणे म्हणजे मुश्किल. तरी म्हटलं जवळ ठेवून घेऊ. लालभडक रंगाचा ड्रेस. मुश्किल
दिनो में काम आता हय. पण आफताबनं अगदी हाच्च ड्रेस घालून ये म्हणून सांगणं म्हणजे
काय तर प्रचंड भानगड असणार!
तसंही शनिवारी दुपारच्या वेळेला लोकलमध्ये इतकी गर्दी
नव्हती. मी लेडीज फर्स्ट डब्यात असल्याचं मेसेजवर कळवल्यानं आफताब समोरच उभा होता.
“काय रे?कशासाठी बोलावलंस?” मी लगेच विचारलं.
“तूपण विसरलीस ना? आजची तारीख?” मला तारीख लक्षात होती, पण
आजच्या तारखेचा सिग्निफिकन्स लक्षात येईना. माझा वाढदिवस नक्कीच नाही. आफताबचाही
नाही. निधीचा असेल, तर मला कशाला बोलावलं?
“स्वप्निल, आज अरिफचा बर्थडे. मला वाटलं तुझ्या लक्षात
असेल!”
खरंच, कशी काय विसरले मी? अरिफला जाऊनच इतकी वर्षं झाली.
कमवायला लागल्यापासून आफताब अरिफच्या आणि अम्मींच्या वाढदिवसाला कुठल्याशा
अनाथाश्रमामध्ये देणगी द्यायचा. अझरभाईंना ते फारसं आवडायचं नाही, म्हणायचा की
आपल्याला जेव्हा पैसे द्यावेसे वाटतात तेव्हा द्यावे. ऑकेजनची वाट कशाला बघायची.
पण आफताब म्हणायचा की किमान त्या
निमित्ताने आपल्याला आठवण राहते. तसं बघायला गेलं तर अरिफला तसं आम्ही कुणीच
विसरलो नव्हतो. ऑफिसमध्ये कंप्युटरवर प्रेझेंटेशन बनवताना विनॅम्पमध्ये हळू आवाजात
रफीची गाणी चालू रहावीत तसा अरिफ मनाच्या कोपर्यामध्ये कुठंतरी कायम होताच.
स्टेशनबाहेरच्या मॅक्डोनाल्डमध्ये बर्गर खाताना आफताबनं मला
सर्व सविस्तर सांगितलं. त्यानं कुठल्याशा आश्रमामध्ये देणगी म्हणून काही कपडे आणि
वस्तू दिल्या होत्या. आपण उचलून पैसे दिले की, त्याचं पुढे काय होतं ते समजत नाही मागच्या
एक दोन वर्षांच्या अनुभवानंतर म्हणून यावर्षी त्यानं स्वत:च ड्रेस मटेरीअल फ्रॉक
आणि शाळेसाठी स्टेशनरी आणल्या होत्या.
“मग माझी काय गरज?”
“फक्त मुलींसाठी जो सेक्शन आहे तिथं जेंट्स लोकांना आतमध्ये एंट्री नाही. त्यामुळे
तुला आत जाऊन प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार फ्रॉक अथवा मटेरीअल द्यावं लागेल.
शिवाय इतर सामानपण. प्रत्येकीच्या हातात सामान दिलं तरच ते त्यांच्यापर्यंत पोचेल
असं मलातरी वाटतंय.”
“ओह, म्हणून मला हा फुल ड्रेस घालायचा हुकूम झाला का?”
“ताई, ड्रेस फुल किंवा हाफचा प्रश्न नाही. तुम्ही ब्रॅंडेड
कपडे वापरणार. अनाथ गरीब लोकांसमोर आपण महागडे कपडे घालून फिरणं ठिक वाटलं असतं
का?” आता माझ्या लक्षात आलं, खुद्द आफताबनंसुद्धा कॉटनचा शर्ट आणि साधी जीन्स
घातली होती. शिवाय हातामध्ये कायम अस्तं ते फंकी घड्याळ आणि गळ्यामधली सोन्याची
चेन सुद्धा नव्हती.. कसं याला इतक्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करायला कायम जमतं?
“मी येणार हे तिथं आधीच कळवलंय. त्यामुळे ते वाट बघत असतील.
थोडेफार स्नॅक्स वगैरे असतील पण फार ग्रेट नसेल. कदाचित तुला आवडणार नाही, म्हणून
इथंच पोटभर खाऊन घे. संध्याकाळ तर होईल सर्व कार्यक्रम आटपेपर्यंत. खूप उशीर झाला
तर मी कारने सोडीन”
“काही गरज नाही. मी लोकलने जाईन. शिवाय शनिवार संध्याकाळी
पनवेल हायवेवर भयंकर ट्राफिक असतं. पण मला एक सांग. वीकेंड असून निधी आली नाही?
मला बोलावलंस ते.” तो दोन सेकंद काहीच बोलला नाही. मला वाटलं परत ब्रेकप झाला की
काय!
“मीच सांगितलं तिला येऊ नकोस म्हणून!” शेवटी तो म्हणाला. “इन
फॅक्ट, आधी ठरलं होतं की आम्ही दोघंपण जाऊ. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, ती
माझ्यासोबत फक्त मजा म्हणून येतेय. अरिफ कोण आणि काय होता हे तिला माहितच नाही. मी
कितीहीवेळा सांगितलं तरी तिच्या दृष्टीने अरिफ कधीच जिताजागता माणूस असणार नाही.
तिच्यासाठीच काय, माझ्या आजूबाजूला सध्या जे कोण आहेत त्या सर्वांसाठी अरिफ म्हणजे
केवळ पास्ट आहे. भूतकाळ जो कधीकाळी घडून गेलाय. फक्त तू आणि मी, स्वप्निल! आपण
दोघंच असे आहोत ज्यांच्यासाठी अरिफ एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट कल्पनेपेक्षा किंवा
एखाद्या फोटोमधल्या थिजलेल्या स्माईलपेक्षा जास्त आहे. तो माझ्यासाठी भाऊ होता,
तुझ्यासाठी फ्रेंड! त्याला ओळखणारं या जगात आता आपल्या दोघांशिवाय कुणीही नाही..”
“अझरभाई आहे ना...”
“अझर!! तो ऋषीमुनी व्हायच्या कॅटेगरीमधला माणूस आहे हे तुला
माहित आहे ना. त्याला काही फरक पडतो का? मी त्याला महिनाभर आधी सांगितलं होतं! तू
ये म्हणून रोज फोन केला, पण तो आला नाही. त्याच्यादृष्टीनं विषय संपतात गं. अब्बा,
अरिफ, अम्मी. एकदा मूठमाती दिली की विषय संपला. नंतर तो आठवणही काढत नाही, रडतही
नाही आणि त्यांच्याविषयी बोलतही नाही. सुखानं हसत नाही आणि दु:खानं रडत नाही.
नि:संग म्हणतात बघ. तसा आहे. आणि आय ऍम शुअर, आज अरिफ असता ना, तर त्याचा हा
बर्थडे आपणच तिघांनी सेलीब्रेट केला असता. आठवतं! अम्मीच्या बर्थडेला आपण केक
बनवला होता... आणि त्यानं बिर्याणी. किती धमाल केली होती.”
ऍक्चुअली मला खरंच असं वाटलं नाही, पण त्याचं बोलणं ऐकताना डोळे
किंचित ओले झाले. एरवी मी तशी कधीच रडत नाही पण त्या क्षणी मात्र रडू आलं. अरिफचं
जाणं पुन्हा एकदा मनाच्या तळापर्यंत जाऊन सगळ्या आठवणी ढवळून आलं.
“स्वप्निल, तू
माझी फ्रेंड आहेस ना?” म्हणणारा माझा मित्र. मृत्यू कसला क्रूर डाव टाकतो. आम्ही
तेव्हा आठवी नववीत होतो. आता मोठे झालो, नोकरी करून स्वत: एकटे रहायला लागलो. आणि
अरिफ, तो मात्र तेवढाच राहिला. त्याच्या आयुष्यामध्ये पुढे काहीच घडलं नाही, ना
बरं ना वाईट. आयुष्यच संपलं! तिथल्या तिथंच साचून राहिल्यासारखं!
“हे!!रडू नकोस
प्लीज. तू रडलेली, तेही माझ्यासमोर. तो मला म्हणेल की मीच तुला रडवतोय. कायम मला
म्हणायचा, किती तुडतुड भांडतोस तिच्यासोबत. तुझी होणारी भाभी आहे, जरा रिस्पेक्टने
बात कर”
“काय?” डोळे पुसत
असताना मला एकदम ठसका आला. “काय?”
“अरे, हा आमच्या
दोघांचाच फंडा होता. तुला नक्की कुणी पटवायची यावर आम्ही चिक्कार वाद घातलेत. मी
म्हणायचो की तुला प्राजक्ता आहे ना. तुझा टाका सेट झालाय, आता स्वप्निल माझी.” मला
खरंच एकदम हसू आलं. इतकावेळ गंभीर असलेला विषय त्यानं शिताफीनं बदलला होता.
“तू खरंच असं
म्हणालास? निर्लज्जा!!”
“लहान होतो यार.
स्कूलमध्ये. तेव्हा अशी कितीशी अक्कल असणार. तर अरिफभाई म्हणायचे की असं नाही. मीच
स्वप्निलला पटवणार..मग मी वाद घालायचो. मग मी प्राजक्ताचा मुद्दा काढला की तो
म्हणायचा काय फरक पडतो.. आपल्यात तश्यापण चार अलाऊड आहेत! तू दुसरीकडे कुठेतरी
शोधाशोध कर. पण स्वप्निल माझीच होणार”
मी त्याला एक
फटका मारला. “लाज वाटते का रे? एखादं खेळणं असल्यासारखं तुझं माझं करायला!”
“मारतेस काय?
खडूस!!! बीलीव्ह मी फार काही सीरीयस प्रकरण तसंही नव्हतं. माझं पण आणि अरिफचं पण.
तू तेव्हा काय जाडू आणि खडूस होतीस. आठवतं का? “बोर्नविट्या च्यालेल?” करून मला
टोमणे मारायचीस. अशीच गंमत चालायची गं! चल, ते लोकं आपली वाट बघत आहेत. लेट होईल”
आफताबची कार
अख्ख्या सामानानं भरली होती. त्यानं हा कार्यक्रम अचानक ठरवलेला नव्हता, तशी
कुठलीच गोष्ट तो कधीच इंपल्सने करत नसणार. बांद्याच्या कुठल्यातरी चाळीचाळीच्या
भागामध्ये हा अनाथश्रम होता. मुख्यत्वे मुस्लिम लोकांनी चालवलेला हा आश्रम फार
मोठा नव्हता. तरीही, छोट्याश्या जागेमध्ये किमान पंचवीस तीस मुली राहत होत्या. आम्ही
मुलीसाठी कपडे आणि खाऊ घेतला होता. शिवाय काही पुस्तकं वह्या आणि इतर सामान. मी
आयुष्यामध्ये पाहिलेलं हे पहिलंच अनाथाश्रम. पिक्चरटीव्हीमध्ये पाहिलेली अनाथाश्रम
बर्याचदा एकदम हॅपी हॅपी प्लेस तरी होते, किंवा प्रचंड छळवणूक करणारे तरी.
समोरच्या या खोलीमध्ये वाढलेली ही खुरटी मुलं पाहताना तसं काहीच वाटत नव्हतं. मुलं
इथं तशी नीट होती. करता येतील तितक्या सोयी केल्या जात होत्या खाण्यापिण्यामध्ये
आबाळ नव्हती, पण तरी या सर्व वास्तूला एक भावनाशून्य, कोरडा रखरखीत भाव होता. आश्रमाच्या
व्यवस्थापकांनी आम्हाला सगळीकडे फिरून दाखवलं. मुलींच्या खोल्यांमध्ये आफताबला
प्रवेश नव्हता. तिथं एकटीनं फिरताना माझ्या घश्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं. तेरा
वर्षांच्या मुलीपासून ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत सर्वांचं हे घर. आईवडील
नसलेल्या या मुली. कुणाला नको झाल्या म्हणून सोडल्या, कुणाला पोसायची ताकद नव्हती
म्हणून सोडल्या. आपल्याला ज्यानं शरीर दिलंय, ज्याच्या मुळे अस्तित्व झालंय,
त्यालाच आपण नको हवे आहोत ही भावना किती कोलमडवणारी असेल! मी माझ्या बापावर राग
ठेवून आहे कारण त्यानं बाहेर कुठंतरी लफडं केलंय. पण या मुलींना बापाचा किती राग
येत असेल. आईचा किती राग येत असेल. आई आणि बाप यांचा द्वेष करण्यासाठीसुद्धा
त्यांना आईबाप माहित नाहीत.
आफताबनं दिलेल्या
सूचनांप्रमाणे मी प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार कपडे दिले. त्यांच्या वयानुसार
पुस्तकं आणि स्टेशनरी दिली. एका चार वर्षाच्या बाळाला क्रेयॉन्स दिल्यावर जो काही
आनंद झाला की ते नाचायलाच लागलं. इतर प्रत्येक मुलीच्या चेहर्यावरचा आनंद दिसतच
होता, पण मला तो आनंद फार बघवेना. “कुणीतरी” आपल्याला काहीतरी दिलंय याबद्दल
लाचारी अथवा वाईट वाटण्यापेक्षा त्यांना आनंद वाटत होता. या मुलींना संभाळणारी पन्नाशीची
एक बाई होती. ती म्हणे, “नया कपडा कब्बीच मिलता है. नही तो सब आके पुराना कपडा
देके जाते. सेकंडहॅंड सामानमे तो हमारा काम चलता है”
“आपलं” स्वत:चं
हक्काचं असं काहीच नाही. जे काही आहे, ते दुसर्यानं दिलेलं...
मला या खोलीमध्ये
अचानक घुसमटायला लागलं. मी बाहेर आले, ऑफिसमध्ये आफताब मॅनेजरला काही सांगत होता. “काय
झालं?” मी बाहेर आलेली पाहून त्यानं विचारलं.
“कसंतरी होतंय!”
“इथे थोडावेळ बस.
मी इथं पहिल्यांदा आलो तेव्हापण मला असंच वाटलं होतं. आपल्याला कल्पनाच नसते ना,
आपल्या विश्वाखेरीज अजून किती विश्वं आहेत या जगामध्ये.” मला खुर्चीमध्ये बसवून
हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाला. “म्हणूनच मी इथं वरचेवर येतो. आपला पैसा किती
क्षुल्लक आहे, आणि आपलं जगणंच किती कवडीमोल आहे ते मला इथं येऊन जाणवतं. अल्लाची
मर्जी म्हणून मी आईबाप भाऊ घर या सर्वांसोबत वाढलो. नाहीतर काय माहित! असल्याच
एखाद्या आश्रमामध्ये वाढलो असतो” त्याक्षणी मला त्याचं पूर्ण बोलणं समजलंच नाही.
मीच त्या मन:स्थितीमध्ये नव्हते. नंतर खूप दिवसांनी हा प्रसंग आठवला तेव्हा जाणवलं
कदाचित त्याला खरं काय ते माहित असावं. पण मी त्याला विचारलं नाही. विचारावंसंही
वाटलं नाही. आज इतक्या वर्षानंतरही मी याबद्दल त्याच्याशी काहीच बोललेली नाही.
थोडावेळ
त्याच्याशी बोलून कपभर गोडंमिट्टं चहा पिऊन मी परत कामाला गेले. सर्व मुलींची नावं
विचारून घेतली, काहींसोबत फोटो काढले. रात्रीचं जेवण आम्ही त्या मुलींसोबतच केलं.
आफताबनं मिठाई मागवली होती. मुलींनी आवडीनं गोडाधोडाचं खाल्लं. मी एरवी दुध्याची
भाजी कधीच खात नाही त्यादिवशी गुपचुप खाल्ली.
सगळा कार्यक्रम
संपेस्तोवर जवळजवळ साडेआठ वाजले. स्टेशनवर आलो ते ही ऽऽऽ गर्दी उसळलेली. हार्बर
लाईन बंद होती. सायनला कुठेतरी ओव्हर हेड वायर तुटली होती. अजून दोन तास लोकल सुरू
व्हायचे काही चान्स नव्हते.
“चला, कारने
सोडू”
“ट्राफिक असेल
वेड्यासारखं त्यापेक्षा दादरला सोड, तिथून एस्टीची बस पकडून जाते”
“एकटीच?”
“नाही! डीजे
मागव, नाचत वरात घेऊन जाईन. काय एकटी एकटी लावलंयस? मी काय फिरत नाही का?? चांगली
सवय आहे मला. डोंट वरी”
“नऊ वाजत आलेत.
तशीपण दमली आहेस. उद्या संडे आहे. बेस्ट वे, माझ्या फ्लॅटवर चल. सकाळी उठून जा.
लोकलने गेलीस तर प्रॉब्लेम नव्हता, पण बसने वगैरे एकटी जाऊ नकोस.”
“वेडा आहेस का?
तुझ्या फ्लॅटवर आणि मी?”
“का? मी काय
रात्रीचा ड्रॅक्युला होत नाही. चल लवकर. स्टेशनवर गर्दीत बसण्यापेक्षा घरी जाऊ”
मी याआधी एक
दोनदा त्याच्या खोलीवर आले होते. छोटासा वन बीएचके फ्लॅट. टिपिकल बॅचलर लोकं
राहतात तसलाच. पण आफताब टचने. इथेही पुस्तकांचे गट्ठे होते. शिवाय लॅपटॉप, टीव्ही
आणि असलंच इतर सामान. किचनमध्ये चहा कॉफी करता येईल इतपतच किराणा. बाकी सर्व मामला
विकतच्या खाऊचा. शिवाय कॅबिनेटमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्या. हा पितो हे माहित
होतं पण इतकं कलेक्शन असेल असं वाटलं नव्हतं. भयंकरच दर्दीमाणूस!! भलत्याच
गोष्टींमध्ये.
“मी अशी आले, तर
तुला बिल्डींगमध्ये कुणी काही बोलणार नाही” लिफ्टमधून बाहेर पडताना त्याला
विचारलं.
“बोलतील ना. सगळे
विचारतील. का हो, तुमच्याकडे येणारी मुलगी आज बदलली की काय!! तू पण ना स्वप्निल,
इथं कुणाला माहित आहे! निधी नेहमी येतेच की. कुणी काही बोलत नाही. तू कॉफी घेणारेस
की ड्रिंक्स?”
ओह, मी निधीबद्दल
इतकावेळ खरंच विसरले होते. इतकावेळ मी ज्याला आफताबचं घर समजत होते ते खरंतर
आफताब-निधीचं घर होतं. आज ना उद्या तिचं झालं असतं. “आपलं” स्वत:चं हक्काचं असं
नाहीच. जे आहे ते दुसर्याचं!!! “ऑफकोर्स ड्रिंक्स”
“फ्रेश होऊन घे.
कपाटामध्ये निधीचे ड्रेस असतील त्यातला एखादा घाल. भूक लागली असेल तर बाहेरून
मागवूया” तो नेहमीसारखाच बोलत होता.
“मला भूक्
नाहीये, निधीचे ड्रेस मला नको! नीट बसणार नाहीत त्यापेक्षा हाच राहू देत.” निधी माझ्यापेक्षा
बुटकी आणि जाड. म्हणजे आधी मी जाड होते, पण आता गेल्या काही वर्षांमध्ये निधी
माझ्या जवळाजवळ दुप्पट झाली होती, आणि मी “हेल्दी” म्हणता येईल अशी.
“माझा टीशर्ट
घालशील का?” मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्याची कुठलीही वस्तू मला हवी
होत्ती. किंबहुना तोच तर मला हवा होता. इतके दिवस मला त्याच्याबद्दल ज्या काही
भावना वाटत होत्या, त्या अगदीच सटल होत्या. आज मात्र त्या भावना इतक्याही सच्च्या
राहिल्या नाहीत. मला तो हवा होता, आणि नक्की कशापद्धतीने हवा होता हे माहित होतं.
“स्वप्निल, काय
झालं? एकदम गप्प गप्प झालीस!”
“काही नाही, दमले
पण खूप आणि या अशा गोष्टी मला खूप ओवरव्हेल्मिंग होतात. सवय नाही ना! शिवाय नाही
म्हटलं तरी आज आरिफची, चाचींची आठवण येतेय, अरिफ असता तर...”
“असायला हवा
होता, मी सीए झालेलं बघायला, अझरभाईचा बिझनेस इतका मोठा झालेला. तू अशी नोकरी
वगैरे करत असलेली बघायला. आय ऍम शुअर, तो कायम माझ्या आजूबाजूला असतो, माझा एंजल
असल्यासारखा. तुला गंमत सांगू, मला आजवर कधीही खूप उदास वाटलं की हमखास अरिफचा
आवाज ऐकू येतो. आज तर सतत वाटतंय की तो इथंच आहे. तो गेल्यानंतर मी जो एकटा पडलो
ते तसाच आहे. निधीला ही गोष्ट कधीच समजत नाही. तिला वाटतं की मी खूप् माणूसघाणा
आहे, पण मी तसा नाहीये, अरिफसोबत मी जितक्या मोकळेपणानं वागूबोलू शकतो तसा इतर कुणाहीसोबत
नाही. अपवाद फक्त तू!”
“माझ्याशी कधी
मोकळेपणानं बोललास? महिनोनमहिने फोन सुद्धा करत नाहीस!”
“पण ज्यावेळी मला
खरंच कुणासोबततरी बोलायचं असतं तेव्हा तुझ्याचकडे येतो ना! आज तुलाच फोन केला ना.
माझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, किंवा काय आहे ते तूच समजून घेशील याची खात्री
होती.”
>>>>>>>>>>
“तुला ना हल्ली
काही कामंच करायला नको हवी अस्तात,” आई मला बडबडत होती, एक तर ऑफिसमध्ये तीन दिवस
सुट्टी होती म्हणून मी घरी आले होते. त्यात परत सकाळीच टीव्हीवर मस्त गाणी लावून
बसलेली असताना आईचं एकच एक पालुपद केव्हाचं चालू होतं. “जाशील ना? नाहीतर मीच जाते
सरळ” आई आता ओरडलीच.
“आई, अगं दहानंतर जाऊ ना.
आताशी साडेनऊ वाजलेत”
“महामाये, मग उठ, देह धू,
कपडे बदल आणि बाहेर पड तोपर्यंत दहा वाजतीलच ना! नऊशे रूपयांची पर्स आहे म्हणून
जीव थोडाथोडा होतोय. जाशील ना राणी?” श्या! ओरडणारी, करवादणारी आई परवडली पण ही
अशी जवळ येऊन केसांतून हातबीत फिरवून लाडानं बोलणारी आई म्हणजे आपण शरणागतीच
पत्करणे हितकर.
गावामध्ये कसलंतरी
हॅंडलूमचं प्रदर्शन लागलं होतं. दोन दिवसांपूर्वी आईनं तिथून कसलीतरी पैठणीची पर्स
आणली होती. पर्स मस्तच होती, आईकडून ढापणे यात शहाणपणा होता. पण नीट बघताना लक्षात
आलं की त्याचा पट्टा थोडा उसवलाय. आता ही पर्स बदलून आणायची तर आजच जावं लागणार
होतं कारण प्रदर्शन संपणार होतं. पर्स मलाच हवी असल्यानं मलाच बदलून आणावी
लागणार. तेही संध्याकाळची गर्दी व्हायच्या
आत पण दुपारचं ऊन चढायच्या आत. असा माझा हिरण्यकशिपु झाला होता. लवकर आवरलं
पाहिजे.
बाबा स्कूटी घेऊन दुकानावर गेला होता, त्यामुळे
मला कार घेऊन जावं लागलं. प्रदर्शनामध्ये सकाळी दहा वाजता पण बर्यापैकी गर्दी
होती. आईनं सांगितलेल्या सूचनांप्रमाणे त्या पैठणी वस्तूंच्या स्टॉलवर जाऊन
त्यांना ही पर्स बदलून द्या, अहो मीच तुमच्याकडून घेतली आहे, काल आठशेमध्येच दिली
होती की, आज नऊशे काय म्हणताय, साडे आठशेमध्ये आम्हाला नको का परवडायला, मला हा
रंग नकोय, पट्टापण उसवलाय काल गर्दीत नीट पाहिलं नाही आता बदलून द्या सेम रंगाची
नकोय जरा हटके रंग दाखवा वगैरे मंत्रोच्चार करून वेगळी पर्स घेतली, शिवाय आवडला
म्हणून एक पैठणी स्टाईलचा स्टोलपण घेतला. फॉर्मलस वर असे एथनिक स्टोल्स मस्त
दिसतात.
त्यानंतर घरीच जायचं असं
काही नव्हतं, म्हणून थोडावेळ प्रदर्शनामध्ये इकडे तिकडे फिरले. दोन चार कुर्ती,
कानातले, ब्रेसलेट वगैरे काहीबाही खरेदी केली. प्रदर्शनाच्या शेवटी खाऊपिऊचे स्टॉल्स
होते. सध्या अजिबात गर्दी नसल्याने हे सर्व लोक अगदी निवांत बसले होते. मी
पाणीपुरीवाल्याला एक प्लेटची ऑर्डर दिली. पनवेलला गेल्यापासून रोजच्या रोज पाणी
पुरी खाणं व्हायचंच नाही. हॉस्टेलवर असताना लतिकाचे डायेट सूचना कंप्लीट झिडकारून
मी एकदातरी पाणीपुरी खायचेच. पण नोकरी सुरू झाल्यावर मार्त रोज जमायचं नाही.
आता पाणीपुरीचा स्टॉल
दिसल्यावर राहवलं नाहीच. मस्त चव होती, कधी नव्हंते पाणीपुरीचं पाणी केवळ तिखट
झणझणीत नाहीतर आंबट-तिखट-गोड असं परफेक्टली बॅलन्स केलं होतं. पण पैसे देताना उगाच
घेतली पाणीपुरी म्हणायची वेळ आली.
“तेरा रूपये असा कधी रेट
असतो का? सरळ दहा-पंधरा असा रेट का ठेवत नाही? आणि ठेवला तर सुट्टे पैसे ठेवा ना”
मी त्या स्टॉलवाल्यावर खेकसलेच. नेमकी माझ्याकडची चिल्लर संपली होती, दहा
रूपयाच्या दोन नोटा होत्या तर हा बाब्या म्हणे, सुट्टे नाहीयेत. मी पर्समध्ये
इकडेतिकडे शोधाशोध करून एक-एक रूपयाची दोन नाणी काढली. तर तो म्हणे, अजून एक रूपया
द्या.
“अरे नाहीये. दहाची नोट
आहे तर उरलेले पैसे परत दे, नाहीतर हे बारारूपये ठेवून घे. नाहीतर मला अजून सात
रूपयाची पाणी पुरी दे. विषय खतम.” त्या मठ्ठाडाच्या डोक्यात गणित शिरतच नव्हतं.
एका रूपयाने असा काय फरक पडला असता? बरं, ठिक तो रूपया मी द्यायला हवा, पण आता
सुट्टे नाहीत तर काहीतरी कर ना. बरं मी जाऊन आणते म्हटलं तर तेही नको. “मग तुम्हाला
आम्ही कसे शोधणार?” जणू याचा एक रूपया घेऊन मी पळून जाणारे.
“ताई, पैसे द्या हो” तो
ओरडला.
“अरे पण नाहीयेत ना.
कुठून आणू?” मी पण आवाज चढवला. चढलेला आवाज ऐकून आजूबाजूचे आमच्याकडे वळून बघायला
लागले.
“पैसे नाहीत तर खाता
कशाला?” त्याच्या बाजूचा एक माणूस काहीही माहित नसताना मध्ये पडत म्हणाला.
“पैसे आहेत, पण त्याच्याजवळ
सुट्टे नाहीत.” मी हातामधले बारा रूपये त्याच्या काऊंटरवर ठेवले. “अजून एक रूपया
हवा असेल, तर मला चिल्लर परत दे. तुझ्याशी इथं वाद घालत बसायला मला वेळ नाहीये.
सुट्टे पैसे नसतील तर दुकानं उघडता कशाला? आणि एका एका रूपयासाठी इतका वाद घालताय!
मूर्ख!”
तितक्यात माझ्या बाजूला
आलेल्या कुणीतरी त्या पाणीपुरीवाल्याच्या हातात एक रूपया ठेवला. “हे घे, झाले ना?
हिशोब पूर्ण? आता आवाज बंद!” मी वळून त्या माणसाकडे पाहिलं. खरंतर एका क्षणासाठी
विश्वासच बसला नाही. केदार! केदार उभा होता. “सॉरी! हा स्टॉलवाला खरंच मूर्ख आहे,
संध्याकाळी याचा मालक आला की त्याला सांगतोच. वागायची पण अक्कल नाही या पोरांकडे”
“इट्स ओके. पण थॅंक्स आणि
तू इथे कसा काय? खरेदीला?” मी बडबडत सुटले. खूप नर्व्हस झालं की मला असंच होतं. “नाही
गं! मी ऍक्चुअली आयोजकांमध्ये आहे. म्हणून तर सकाळपासून आहे. तू इथं कशी? ते ही
इतक्या सकाळी?”
मी गेल्या कित्येक
वर्षामध्ये केदारला भेटले नव्ह्ते, एक दोनदा गावात आल्यावर त्याला पाहिलं होतं,
तेही दुरून. आज मात्र अगदी अनपेक्षितरीत्या तो माझ्यासमोर उभा होता. अगदी जवळच. त्याच्या
हातामध्ये दोन अडीच वर्षाचं बाळ होतं. काहीतरी हिशोब चुकलाय माझा किंवा ते बाळ
लहान असावं. मला अशी बाळांची नक्की वयं ओळखता येत नाहीत.
“एक पर्स बदलून घ्यायची
होती, मग नंतर गर्दी होते म्हणून आताच आले.”
“पर्स
बदलण्याव्यतिरीक्तही इतर बरीच खरेदी झालेली दिसतेय!” तो माझ्या हातामधल्या बॅगच्या
ढिगार्याकडे बघत म्हणाला. “स्कूटीवरून इतकं नेणार आहेस की... रिक्षा करून देऊ?”
“नको, कार आणलीये.”
त्याच्या कडेवरचा बाळ काहीतरी हात पुढे करून सांगत होता. “तुझा?”
“नाही गं, ताईचा. आयुष
नाव आहे. तुझं काय चालू आहे?” केदारचं नक्की काय चालू आहे हे जसं मला माहित होतं
तसंच, माझं काय चालू आहे ते त्याला माहित असेलच ना पण तरी विचारायची पद्धत असते. हां!
आठवलं या कडेवरच्या बाळाच्या डीलीव्हरीसाठी केदारची आई तेव्हा कॅनडाला जाणार होती.
मेंदूच्या कप्प्यांमध्ये आपण किती क्षुल्लक माहिती गोळा करून ठेवलेली असते. नको तेव्हा
ती माहिती अचूक आठवते कशी!
“मुंबईला आहे, जॉब करतेय.
तुझा बिझनेस कसा चालू आहे?”
“तो जर धड चालू असता, तर
अशी प्रदर्शनं वगैरे केली असती का?” तो किंचित हसत म्हणाला. केदार खूप बदलला होता.
अवघ्या तीन वर्षापूर्वीचा केदार आणि हा समोर उभा असलेला केदार यामध्ये बराच फरक
होता. आधीसारखा उत्साही नव्हता तर जबाबदारीच्या अणि एकंदरीत परिस्थितीमुळे दबला
गेला होता. किंवा कदाचित मला तसं वाटत असेल. दृष्टीकोनाचा फरक. “मी येऊ का तुझ्यासोबत? कारपर्यंत? एवढं सामान
घेऊन जाशील ना?”
“नो, थॅंक्स. मी जाईन.”
तितक्यात त्याला कुणीतरी
आवाज दिला, प्रदर्शनाच्या दुसर्या बाजूकडून ती आली. मला तिचं नाव माहित नव्हतं,
पण ही केदारची बायको इतकं नक्कीच समजलं. ती आमच्या अगदी समोर आली. खरंतर ती
येण्याआधी मी तिथून जायला हवं होतं. पण आता तिच्यासमोरून लगेच निघून गेले असते तर ते
अगदीच वाईट दिसलं असतं. हा तरी बायकोसोबत इकडे आलाय हे मला कसं माहित असणार!
“सौम्या, ही स्वप्नील!
स्वप्नील, ही सौम्या.” केदारने ओळख करून देण्याचा क्षीण प्रयत्न केला. खरंतर ती
काय आणि मी काय एकमेकींना माहित होतोच. चेहर्यानं आज ओळख झाली असेल, पण याआधी ती
आल्यामुळे माझं आयुष्य किती उद्ध्वस्त झालं म्हणून तिला शिव्या घातल्या, आणि तिच्या
नवर्याच्या आयुष्यात तिच्याआधी मी आलेली असल्यामुळे तिनं मला किती शिव्या घातल्या
असतील...
मात्र एक गंमत झाली हां.
मी कोण आहे हे समजल्याबरोबर ती एकदम नवर्याच्या बाजूला सरकली आणि अल्मोस्ट तिनं
केदारचा दंडच पकडला. जणू काही ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं मला
सांगितल्यासारखं. मला हे बघून खरंच हसू आलं. अरे, ही काय मला नवराचोर समजते की
काय. जणू हिचा नवरा मी पळवून नेणार आहे. आणि पळवून करणार काये? मी याआधी केदारचा
मनसोक्त उपभोग घेतला होत्ता. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आफताब आला होता. आता
तीन वर्षानंतर मी परत याला घेऊन काय करणार होते? त्याचे आणि माझे रस्ते वेगळे झाले
होते. हे त्याला माहित होतं. मला माहित होतं.
एकमेकांसमोर येऊन कितीहीवेळा भेटलो, तरीही आता आम्ही अनोळखी म्हणूनच
जगणार होतो. काही नाती तुटली की मरतात.
त्यानंतर त्याचं फक्त श्राद्ध घालता येतं. बाकी काही नाही.
पण तिच्या या पझेसिवपणावर
हसणारी मी कोण? तिच्याकडे तर सबळ कारण होतं. मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे तिचा नवरा
कित्येक दिवस तिच्याशी बोलत नव्हता, नुकतीच कुठेतरी त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली
होती, आता कुठे तिला बायकोपणाचं सुख मिळत होतं. अशावेळी मी म्हणजे नवर्याची एक्सगर्लफ्रेंड
भेटली म्हणून तिला थ्रेटनिंग वाटणं सहज आहे. मला निधीमुळे किती इन्सीक्युअर वाटलं
होतं, माझ्याबाबतीत तर आफताब तिला स्वत:हून सोडून माझ्याकडे आला होता, तरीही
निधीचा संशय माझ्या मनामध्ये कायम राहिलाच. अगदी माझं आणि आफताब दोघांचंही आयुष्य पाचोळ्यासारखा
उडवून गेला तो संशय!
मी काय अथवा सौम्या काय...
आमचं वागणं काही फार वेगळं नव्हतं. अगदी टिपिकल म्हणावं असंच आम्ही वागलोय. पण
अशावेळी शाहीन मला हमखास आठवते. ती खरंच अतिशय प्रगल्भ विचारांची. माझं आणि
आफताबचं नातं तिला माहित असूनही ती किती समजूतदारपणे सर्व निभावू शकली. “मी
त्याच्या आयुष्यांमधून तुम्हाला वजा करू शकत नाही, हे मला माहित आहे, म्हणून मी
तसा प्रयत्नही करणार नाही. पण यापुढे भविष्यामध्ये केवळ मीच असेन यासाठी प्रयत्न
करू शकते, हो ना?” साधंसोपं सरळ सुटसुटीत आयुष्य! शाहीनला ते अगदी प्रांजळपणे
जमलं! मला कधीच नाही. आजवर नाही. विनाकारण गोष्टी कॉम्प्लीकेट करून ठेवायची सवयच.
त्यादिवशी केदारला
भेटल्यानंतर नक्की काय वाटलं ते सांगणं अशक्य आहे. त्याचा राग आला, तो बाय डीफॉल्ट
येणारच होता. वाईटही वाटलं, त्याचवेळी बरंदेखील वाटलं. त्याचा संसार व्यवस्थित
चालू होता. कदाचित अजून वर्षभरात मुलं होतील (आपल्याकडे नै.... संसार व्यवस्थित म्हणजे
मुलं असा नियमच आहे. नवरा बायको एकत्र नांदत नसतील, तर एखादं मूल होऊ द्यासर्व नीट
होईल असा आचरट सल्ला आपल्याचकडे मिळू शकतो.) पण आज बघताना तरी दोघं एकमेकांशी
व्यवस्थित बोलताना दिसत होते. मी त्याला बाय म्हणून पुढे निघाले. त्यानं हातातलं
बाळ तिच्याकडे दिलं आणि माझ्या हातातली पिशवी घेतली. “मी येतो कारपर्यंत. इतकं ओझं
घेऊन एकटीच कशाला चालतेस?”
मिस्टर केदार, केवळ दोन
कुर्ती आणि असल्या सटरफटर सामानाच्या वजनाला तुम्ही “इतकं ओझं” म्हणताय, मग
मनामध्ये जो इमोशनल बॅगेज तुम्ही दिला आहे त्याचं काय? अर्थात हे मी त्याला काही
म्हटलं नाही. दोन जुने प्रेमी खूप वर्षांनी भेटल्यानंतर लंबेलंबे फिलॉसॉफिकल डायलॉग
मारतात हे गुलझारच्या पिक्चरांमध्येच होतं. प्रत्यक्षामध्ये आपण बोलत राहतो.
एकमेकांची चौकशी करतो वगैरे. पण संवाद काही साधला जात नही. तो दुवा निखळतोच.
कारमध्ये बॅग ठेवताना तो
सहज म्हणाला. “कधीतरी घरी ये. आहेस ना दोन चार दिवस?”
“नाही. परवा निघेन. जास्त सुट्टी नाहीये.”
“जॉब कसा चालू आहे?”
“एकदम इंटरेस्टिंग.”
त्याला यानंतर पुढे
काहीतरी बोलायचं होतं, पण त्याआधीच मी कार स्टार्ट केली. मला काहीच बोलायचं
नव्हतं, काहीच सांगायचं नव्हतं. जे घडलं तो सर्व भूतकाळ. आता मला ते गढे मुर्दे
खणायचे नव्हते. केदार या व्यक्तीखेरीज माझ्या आयुष्यामध्ये बरंच काही होतं. तो एक
रूपया त्याच्यावर उधार राहिलाच, पण त्यानं केलेल्या इतक्या सार्या गुन्ह्यांचं
काय?
संध्याकाळी नेहमीप्रमाणे
अझर घरी आला. हल्ली तो संध्याकाळीपण रोज बाबांसोबतच जेवायचा. बाबांना डॊक्टरांनी साडआठपयंत
जेवायला सांगितलं होतं. अझर आणि त्याच्या “कार्यक्रमावर बंदी आणून” आईनं हा टाईम
कंपलसरी डिनरसाठी केला होता. एकटंच कुठं जेवायचा म्हणून अझरभाईपण आमच्याकडे यायचा.
येताना काहीतरी भाजी नाहीतर चटणी वगैरे बनवून आणायचा.
मी त्याला घडलेला सगळा
प्रसंग सांगितला. माझं ना हेच असतं, मला कुणालातरी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही.
निधी तिचं आणि आफताबचं अफेअर आहे हे वर्षानुवर्षे कसं काय लपवून ठेवू शकते कुणास
ठाऊक. त्यारात्री मी त्याच्या समोर माझ्या भावना लपवू शक नाही... केदारला मी
आफताबबद्दल सांगायला हवं होतं का? त्यानं काय फरक पडला असता म्हणे... तर ते एक
असोच.
“मग? कधी जातेस त्याच्या
घरी?” माझं भडाभडा बोलून झाल्यावर अझरभाई मला चिडवत म्हणाला. जेवणं झाल्यावर आम्ही
घरासमोरच्या बागेमध्ये गप्पा मारत बसलो होतो. या बागेला सोसायटीनं नुकतंच नाव दिलं
होतं. अरिफ गार्डन!!
“जादू! चेष्टा करू नकोस.
मी इतक्या सीरीयसली सांगतेय..”
“मग मी पण सीरीयसलीच
विचारतोय. म्हणाला ना, कधीतरी घरी ये. आपण जायचं बिनधास्त. त्याच्या घरचे काय
एक्स्प्रेशन्स देतील?”
“मला त्याच्या घरी
जाण्यात काही इंटरेस्ट नाही. तसंही तो आता जॉइंट फॅमिलीमध्ये राहत नाही. वेगळं घर
भाड्यानं घेतलंय” हे वाक्य बोलताना किती नाही म्हटलं तरी नजरेसमोर तो केदारच्या
मित्राचा फ्लॅट “तुझंमाझं” घर तरळून गेलंच. क्षणभरासाठी का होईना पण तरीही.
“बरीच माहिती आहे की. एकीकडे
म्हणायचं आता माझा काही संबंध नाही आणि तरी इतकी माहिती!”
“जादू, तू मला काय क्रॉस्
एक्झामिन करतो्यस? मी त्याच्याबद्दल कुणाला विचारत नाही. लोकं सांगतात, मी ऐकते.
मनामधून मी कितीहीवेळा त्याला काढून टाकलं तरी आठवणी नावाची चीज असते. ती तुम्ही
डीलीट करू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी. मी मागेही तुला सांगितलं होतं.”
“तेव्हाही मी हेच
सांगितलं होतं आठवणी डीलीट करायच्या नाहीत. पण आपल्यापासून दूर नेऊन ठेवायच्या. अशा
ठिकाणी जिथं काही घडलं तरी आपल्यावर परिणाम होणार नाही.”
“माझ्यावर काही परिणाम
झालाय का? मी फक्त तुला काय घडलं ते सांगतेय. आणि मला एक सांग! तू नूरीला असा
विसरलास? सोपं असतं का? सांग ना?”
“मी नूरीला विसरणार नाही.
माझं तिच्यावर प्रेम वगैरे काही नव्ह्तं. पत्नीचा दर्जा होता आणि मी त्यासाठी कधीही
तिचा अपमान केला नाही. पण तिनं मला कधीही समजून घेतलं नाही हे खरंय. नको असलेलं
नातं केवळ पुढं रेटायचं म्हणून रेटत होतो. एनीवेज, आता मी एकटाच आहे आणि खर्ंच ही
फेज खूप एंजॉय करतोय.”
“आय नो! मी पण ही फेज खूप
एंजॉय केली होती.” प्रेमभंग झाल्यानंतर जो एकटेपणा येतो त्याला लोकं उगाच दु:खाची
वगैरे किनार देतात, दु:ख असतंच पण त्याहून अधिक स्वातंत्र्याची एक वेगळीच जाणीव पण
असते. हे असलं एकटेपणा तुम्हाला फार स्ट्रॉंग बनवतं. तुमच्या आयुष्याला एक वेगळीच
दिशा देतं.
“केली होती? म्हणजे आता
अजून एका हीरोची एंट्री झालीये का?”
“ते मी तुला का सांगू?”
“मग कुणाला सांगणार?”
“तो हीरोच सांगेल की तुला!”
“वाट बघतो”
“वाटच बघ तू”
(क्रमश:)