Friday, 23 September 2016

शब्द- माहेरवारी

एशानची ही कथा मी पहिल्यांदा मायबोलीवर लिहिली होती. त्यानंतर याच जोडीच्या अजून काही प्रेमकथा लिहिल्या आहेत, त्यापैकी  एक दोन मासिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत.. त्या हळूहळू इथे माझ्या ब्लॉगवर टाकेन. ही कथा मात्र अप्रकाशित आहे, पहिल्यांदाच ब्लॉगवर टाकत आहे. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. :) 


तू आधी प्रॉमिस कर. काहीही आगाऊपणे वागणार नाहीस. अजिबात पुढेपुढे बोलणार नाहीस. विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देशील. कुणालाही काहीही स्वत:हून बोलायला जाणार नाहीस. एखादी गोष्ट पटली नाही तरी उलट उत्तरं देणार नाहीस. खायला प्यायला जे देतील ते गुपचुप खाशील. रेसिपी विचारत बसणार नाहीस..” माझं लेक्चर अजून चालू राहिलं असतं, पण एशाननं माझ्या तोंडावर हात ठेवला.
समजलं!! समजलं!! किती वेळा तेच तेच सां गशील? सासरी जाणार्‍या सुनेला इतके उपदेश दिले जात नसतीलजितके जावयाला देते आहेस.. सकाळपासून तेच पुराण चालू आहे
काय करू? लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात होते.. माझ्या गावाला लग्न ठरवायला म्हणून एशान आईबाबांसोबत आला होता, तेव्हाही कही फार चांगलं वातावरण नव्हतं. लग्न रजिस्टर हवं हा त्याचा हट्ट, धार्मिक पद्धतीनं व्हायला हवं असा माझ्या आजोबांचा हट्ट. शेवटी वैदिक पद्धतीनं पण अगदी साध्या पद्धतीनं लग्न असा तोडगा निघाला. माझ्या घरी हा जावई जातीबाहेरचा वगैरे म्हणून जरा नापसंतीचाच, शिवाय एशानच्या वडलांनी लग्न अगदी साधेपणानं हवं असं सांगितल्यानंतर आईवडलांनी फार काही नातेवाईकांना बोलावलेलं नव्ह्तं, जे आले होते ते लग्नाच्या दिवसाभरात असं कितीसं बोलणार? त्यामुळं लग्नाला सहा महिने झाले तरी एशान माझ्या नातेवाईकांना खर्‍या अर्थानं पहिल्यांदाच भेटणार होता. माझ्या घरामध्ये त्याचे उच्च विचारऐकून काहीतरी गडबड व्हायची शक्यता जास्त होती. मीच काय, पण कंचन- म्हणजे एशानची आईसुद्धा इतकीच धास्तावलेली होती. तिनं पण त्याला अमुक बोलू नकोस तमुक विचारू नकोसअसल्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. खरंतर माझी जायची इच्छा नव्हतीच पण यंदाच्या कुलदेवाच्या पूजेला यायचंच असा आजोबांकडून सज्जड दम आलेला. आमच्या घराण्यामधलं हे पूजेचं प्रस्थ फार मोठं. चांगले साताठ दिवस कार्यक्रम चालायचे. आमचं गावचं घर भलंमोठं. सगळे नातेवाईक जमले की पन्नाससाठ माणसं सहज जमायची. तसं फारसं काही अडलं नसत त्यानं व्यवस्थित जुळवून घेतलं असतं. मला एकत्र कुटुंबाची चांगलीच सवय, पण एशान एकुलता एक. त्याला असं एकत्र रहायची वगैरे अजिबत सवय नाही पण त्याहून जास्त भिती याचे भलतेसलते क्रांतीकारी विचार ऐकून घरात काय महाभारत होइल याची. आणि एशानचे विचार म्हणजे काय साधंसरळसोपं काम नाहीच. बघू. जे काय होइल ते होइलच
मुंबईवरून पहाटेच कारने निघालो होतो, त्यामुळे ट्राफिकचा कसलाही त्रास न होता दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत गावात पोचलो. बरेचसे नातेवाईक माझ्याआधीच आले होते. घरी गेल्यावर काय गं कशी आहेस? जाड झालीस. बारीक झालीस. कसा झाला प्रवास? ही आली नाही का? तो कधी येणार आहेअसल्या निरर्थक प्रश्नोत्तरांमध्ये वेळ गेला. अगदी ठरवून असं नाही, पण पद्धतच म्हणायला हवी, पण घरात गेल्यापासून मी आतल्या खोल्यांमध्ये माजघरात नाहीतर किचनमध्ये आणि एशान इतर पुरूषमंडळींसोबत बाहेर हॉलमध्ये. मी पण खूप दिवसांनी घरी आल्याने आईसोबत किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. एशान बाहेरच रमला होता.
जेवायच्या पंगती बसायला सुरूवात झाली आणि आम्ही बाया माणसं वाढायला. घरामध्ये आईला आणि काकूला या जावयाला जमीनीवर मांडी घालून बसता येईल की नाही की टेबल खुर्चीची काहीतरी सोय करायची असा प्रश्न पडला होता. एकंदरीत  घरामधल्या इतर बायकांना एशान मिरचंदानीचं जरा टेन्शनच आलं होतं ते बघून मला मज्जा वाटत होती. “त्याला आपलं जेवण नीट होइल ना? वेगळं काहीतरी करायला हवंय का? तूच बघ बाई त्यांना वाढायचं, काय आणि कसं हवं ते. त्याला वेगळं त्याच्या पद्धतीचं काही बनवयाचं असेल तर बनव हांइत्यादि सूचना माझ्यापर्यंत येत होत्या. मी निर्धास्त होते. मी काही बनवतेय म्हटलं असतं तर त्यानं सरळ उपास आहे असं जाहीर केलं असतं.  एक तर किचनकामाला मेड होती शिवाय इतरवेळी ते डीपार्टमेंट तोच सांभाळत होता. माझ्या कूकिंग स्किलची कमाल मर्यादा त्याला आधीपासून माहित होती. उलट किचनमधला त्याचा इंटरेस्ट माहेरी समजला वगैरे तर काय म्हणतील याची चिंता जास्त! रोज पहाटे तासभर प्राणायाम वगैरे भानगडी करत असल्याने मांडी घालूनबसेल का?” वगैरे चिंता तर अजिबात नव्हती. पण त्याला माझी बरीच काळजी लागली असणार कारण मी जेवण वाढताना मात्र त्यानं अचानक मला सगळ्यांसमोर तुझं जेवण झालं?” असं विचारलं. पंगतीमधले इतर सगळे हसायलाच लागले. “का हो जावईबापू? बायकोची फार चिंता लागली आहे?” कुणीतरी चेष्टेने म्हणालं. “बायकोला उपाशी ठेवलं तर जगणं मुश्किल व्हायचं!!त्यानं लगेच उत्तर दिलं. आजूबाजूला बसलेले खिदळायला लागलेच. त्यातल्या त्यात सभ्य सोज्वळ उत्तर. हुश्श!!
मी किचनमध्ये आले. “बोलायला भारीच चाप्टर दिसतात हां तुझे यजमानताईनं चिडवलं. याचा चाप्टरपणा सांगायला पुस्तकांची चाप्टरं कमी पडतील. म्हणून तर इथं यायला निघाल्यापासून त्याला काय काय उपदेश देत आणलं होतं ते माझं मला माहित.  गप्प आहे तोपर्यंत परवडला, एकदा बोलायला लागला की समोरच्याला तोंडाला फेस आणणारच.

खरं तर सर्वात महत्त्वाची भिती वेगळीच. इथं कुणीतरी देवाधर्माचा विषय काढला की संपलंच. एशानचे डॅड आणि कंचन दोघेही पक्के नास्तिक. देवधर्म, पूजापाठ, सणवार असल्या गोष्टींना अजिबात थारा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी एशानला माहितच नव्हत्या, आणि त्यामध्ये त्याला फारसा इंटरेस्टही नव्हता. त्याउलट माझं घर. अख्खं घर दिवसभर हलायचं ते केवळ देवाधर्मासाठी. घरात पाणी भरायचं देवांसाठी. जेवण करायचं नैवेद्यासाठी. अंघोळी करायच्या पूजेसाठी. आजोबा म्हणजे कर्मठपणाचा परिपाक. बाबा आणि काका तेवढे देवदेव करणार्‍यांतले नव्हते, पण आई काकू आत्या वगैरे सर्व आजोबांच्या हाताखाली तयार. पाळीच्या वेळेला चार दिवस बाजूला बसायचं, अंघोळ केल्याखेरीज स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही, देवाचा स्वयंपाक करताना साडीच नेसायची, अमुक व्रत तमुक उपास असले नियम घरात असोशीनं पाळले जात होते. मी लहानपणापासून यातच वाढलेली त्यामुळे वाण नाही तर गुण लागला या नात्यानं मी पण थोडीफार कर्मठच. लग्नानंतर मी एशानच्या फ़्लॅटवर छोटंसं देवघर बनवून घेतलं. एशानचा सोवळंओवळं वगैरेशी दूरान्ययेही संबंध नाही. एखाद्याचा देवावर विश्वासच नसू शकतो, याची सुरूवातीला मला जरा गंमतच वाटायची.. तसा त्याचा नास्तिकपणा मला फारसा त्रास देणारा नव्हता. माझ्यापुरतं काही केलं तरी त्याचं काही म्हणणं नसायचं. तशीही मी काही घरातल्यांसारखी अतिदेवभक्त नव्हते, पण तरी रोजच्या रोज दिवा लावणे वगैरे इतकेच. मला सासरचे कुलाचार वगैरे काहीच भानगडीच नसल्यानं उलट बरं होतं. ताईच्या सासरी गणपती-नवरात्रीमधून तिचा अक्षरश: पिट्ट्या पडायचा, त्यामानानं आपल्याला काही टेन्शन नाही.
दुपारची जेवणं झाल्यावर मी सगळ्या बायांसोबत आतल्या खोलीतच लवंडले होते. एशान एका बाबतीत प्रचंड सुखी आत्मा आहे, कुठंही पडल्यापडल्या पाचव्या मिनिटाला त्याला झोप लागू शकते. गादी-उशी वगैरे काही हवंच असं नाही. त्यामुळे त्यानं हॉलमध्येच किंवा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीमध्ये पथारी पसरली असणार.

आता आलेल्या बहुतेक बायांनी माझी उलटतपासणी चालू केली होती. नवरा नक्की काय करतो? किती कमावतो? मग तरी मी नोकरी का करते? त्याचा बिझनेस आहे मग मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम का करत नाही? मी ईव्हेंट मॅनेजमेंट करते म्हणजे नक्की काय करते? आम्ही सासूसासर्‍यांसोबत का राहत नाही? घरात स्वयंपाकाला बाई का ठेवली? दोघांचंच करायला तुला कितीसा त्रास होतो? किती दिवस प्लानिंग करणार? लवकर काय ते होऊ द्यात. एक ना दोन अनेक प्रश्न. मी शक्य होइल तितक्या शांतपणे उत्तरं देत होते. पण नंतर कंटाळा आला. सरळ डोळे मिटून झोपायचं नाटक केलं, मग त्यांनी चर्चा करायला दुसराच कुठलातरी विषय घेतला.
आतापर्यंत बरेचसे नातेवाईक येऊन पोचले होते. संध्याकाळी भावोजी आलेले बघताच ताईनं लगेच त्यांना चहा नको, कॉफीच लागते बैम्हणत गरमागरम कॉफी केली. ते बघून आईनं मला लगेच बघ तिला किती काळजी आहे नाहीतर तू टोणगी असा एक कटाक्ष टाकलाच. मी लगबगीनं चहा करतेय, एशान हॉलमध्ये निवांत बसलाय आणि मी त्याच्या हातात चहाचा कप देतेय वगैरे स्वप्नरंजन ठिक आहे. प्रत्यक्षात  शानमहाराज चहात आलं का नाही घातलंस? साखर कमी घातलीस! चहा कितीवेळ उकळलासवगैरे चालू करतात, मी त्याला उलट काहीतरी ऐकवणार. तो मला काहीतरी बोलणार. मग आम्ही रीतसर भांडणार. त्यापेक्षा तुझा चहा तूच करून घे. मला बापडीला तुझ्याच कपामधले दोन-तीन घोट चहा पुरे अशी आमची रोजची मांडवली परवडली.

नेहमीसारखे दुपारची झोप आटोपून बरोबर साडेचार वाजता आजोबा खाली आले. मघाशी जेवणाआधी त्यांनी एशानकडे फारसं लक्ष दिलं नव्हतंच. आता मात्र, भावोजींना आवर्जून कसा प्रवास झाला वगैरे प्रेमानं विचारलं. हा नातजावई आजोबांचा फार आवडता. त्यांनी स्वत: पसंत केला होता ना!
चहा झाल्यावर आजोबांनी घरातल्या सर्वांना एकत्र बोलावलं. सर्व बायकांना उद्या काय स्वयंपाक करायचा, काय नाश्ता करायचा वगैरे सूचना दिल्या. घरामध्ये पाहुणे जास्त झाल्यानं झोपण्यासाठी काय काय व्यवस्था तेही सांगितलं. पूजेचा कार्यक्रम संपेपर्यंत हे रोजचंच लेक्चर. आम्हाला दरवर्षीचं माहितच असलंतरी सगळेजण लक्ष देऊन ऐकायचं काम करत होते. आजोबांचं बोलून झाल्यावर माझा मोठा चुलत भाऊ काहीही गरज नसताना एशानला म्हणाला. “जिजू, आपण जेन्ट्स लोकं वरच्या मजल्यावर आणि लेडीजबायका इथं खाली हॉलमध्ये? तुम्हाला चालेल ना?”
मला कुठंही चालेल.” एशाननं उत्तर दिलं.
नाही म्हणजे, मधु इथं आणि चंद्र तिथं अशी अवस्था. तुम्हाला मुंबईच्या घरात सवय नसेलच..तिथं काय तुम्ही दोघंच.” उगाचच परत चिडवत त्यानं तोच विषय काढला. हा आता गप्प बसला तर बरं होइल असं वाटलं... पण एशान? एवढा फ़ुलटॉस मिळाल्यावर सोडणार आहे?
सवयीचं काय? आम्ही तिथंही वेगळे झोपतो.अतिशय शांतपणे तो म्हणाला आणि अख्ख्या घरावर शांतता पसरली. “म्हणजे?” कुणालातरी आवाज सापडला.
हो. काय करणार? तिला एसी सहन होत नाही. मला एसीशिवाय झोप येत नाही. मग  वेगळ्या खोल्यांमध्ये झोपणं बेस्ट नाही का?” एशान अजूनही आधीच्याच शांत टोनमध्ये बोलत होता. घरामधला प्रत्येकजण हे काय भलतंच विचित्र?” असा चेहरा करून होतं. आई दचकून माझ्याकडे बघायला लागली होती. आजोबा रागानं इकडंतिकडं बघत होते. चेष्टामस्करीचा हा विषय त्यांना अजिबात आवडलेला नव्हता. एशानला जेव्हा अनंत सूचना दिल्या तेव्हा हे वेगळ्या खोलीत झोपतोय वगैरे बोलू नकोस, हे सांगायला विसरले होते. पण नेमका हाच विषय येईल असं वाटलंही नव्हतं.. “रीलॅक्स. वेगळ्या खोलीत झोपतो म्हणजे एकमेकांच्या खोलींमध्ये जायला काय बंदी वगैरे नाही. बाकीचं सर्व व्यवस्थित चालू आहे. एकदमच जोशात!” शेवटचे शब्द बोलत एशान उठला.
घरातली सगळी पोरंपोरी लगेच खिदळायला लागली. मागे उभ्या असलेल्या बायकापण खुसखुसायला लागल्या. मी किचनमध्ये येऊन चहा गरम करायला ठेवला. “काय गं? तुझ्या नवर्‍याला काही अक्कल वगैरे आहे की नाही?” धाकट्या आत्यानं येऊन मला विचारलं.
आंद्याला अक्कल आहे का? कशाला कायपण चिडवायला गेला?” मी चूक लगेच भावावर ढकलत म्हटलं. आई आणि काकू अगदी गडबडीनं आत आल्या. “काय गं? जावईबापू हे काय म्हणत होते? वेगळ्या खोल्यांमध्ये वगैरे!!काकू एकदम भोचक मोडामध्ये. आई तिच्या टिपिअकल अतिधास्तावलेल्या मोडमधे. “पाहिलंत वन्सं! मी आधीपासून म्हणत होते. काहीतरी गडबड आहे! उगाच का एवढा श्रीमंत असूनपण इतक्या लांबची मुलगी केली...” काकू आत्याला म्हणाली. आईच्या डोळ्यांत पाणी.
आई, उगाच ड्रामेबाजी करू नकोस. काही गडबड नाही. त्यानं सांगितलं ते ऐकलं नाहीस का? एसीचा मला त्रास होतो. सर्दी होते तसंही घरामध्ये दोन बेडरूम आहेत, म्हणून!”  याहून जास्त आईला काय सांगणार?
आईवर डाफरून मागच्या अंगणात आले खरी. पण मग अचानक एक जाणवलं. तरीच सगळे आल्यापासून माझ्याकडे असे बघत होते. एशानसारख्या श्रीमंत देखण्या आणि सर्वगुणसंपन्न माणसानं माझ्याशी लग्न काय म्हणून केलं असावं हा प्रश्न प्रत्येकाच्या नजरेमध्ये होताच, तो मला आता नीटच समजला. मी रंगानं सावळी. घरातल्यांच्या लेखी काळीच. त्यात परत बाकीचे मेडिकल, इंजीनीअरिंग असा रस्ता पकडून गेलेले, मीच एकटी मास कम्युनिकेशनसारख्या अगम्य करीअरची वाट पकडलेली. बाकीचे जेव्हा ऑनसाईट-ऑफसाईट करत देशपरदेश फिरत होते तेव्हा माझं अजून स्ट्रगल चालूच होतं. अशावेळी एशानसारख्यानं मला लग्नासाठी विचारणं, तेही स्वत:हून म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणारच ना?
मला खरंतर मनापासून या सर्वांचं हसू आलं. मी एशानला कॉलेजपासून ओळखत होते. त्यानं लग्नासाठी मला विचारणं हे कितीही आश्चर्याचं असलं तरी त्याच्या प्रेमाच्या सच्चेपणाची मला खात्री होती. त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त त्याच्या प्रेमाच्या शब्दांवर पण माझ्या घरातल्यांना कोण समजावणार? त्यांचे स्वत:चे वेगळेच आडाखे होते. आधी मुळात मी प्रेमविवाह करून खड्ड्यात पडले होते, आता बरेचसे नातेवाईक माझी फजिती बघायला उत्सुक!!!
माझ्या माहेरपणाचे पहिले दोन- तीन दिवस असेच गेले. सगळीच गडबड चालू असायची. मी अर्ध्याहून जास्त वेळ स्वयंपाकघरात नाहीतर वरच्या खोलीमध्ये काहीतरी कामात. एशान माझ्या चुलत भावांसोबत काहीतरी टंगळमंगळ करण्यामध्ये गुंग. गेल्या दोन दिवसामध्ये त्याच्याशी दोन वाक्यंपण बोलले नसेल. एकाच घरात राहूनपण लांब राहणं. आंद्या म्हणाला तशी खरंच मधु इथं आणि चंद्र तिथं असली सिच्युएशन.
त्यादिवशी खालच्या हॉलमध्ये आम्हा सर्व भावंडांचा दंगा चालू होता. खूप दिवसांनी असे निवांत एकत्र आलो होतो. त्यामुळे लहानपणाच्या गमतीजमती, आठवणी असंच काहीसं चालू होतं. एशान आमच्या सर्वांमध्ये अगदी आरामात गप्पा मारत होता. ताईच्या लग्नाला दोन-तीन वर्षं होऊनसुद्धा भावोजी असे कधीच मिक्स झाले नाहीत, पण एशान मात्र वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखा आमच्यामध्ये कधीचाच सामील झाला होता. त्यानं त्या दिवशी आंद्याला ऐकवलेलं एकदम जोशातहे वाक्य आमच्या घरात एकदम जगप्रसिद्ध!!!.
तेवढ्यात आजोबांची दणदणीत आवाजात हाक आली. त्यांनी मला आणि एशानला वरच्या मजल्यावरच्या खोलीत बोलावलं होतं. एशान बिनधास्त होता- असणारच त्याचं लहानपण काय आजोबांच्या शिस्तीमध्ये गेलेलं नाही. मी मात्र मनातून घाबरलेले होते.
तुमच्या लग्नाला सहाएक महिने झाले असतील ना?” खोलीत गेल्यावर आजोबांनी मला विचारलं. मी नुसती मान डोलावली. “लग्न झाल्यावर यांच्याकडे काही सत्यनारायण वगैरे झाला नसेलच!” आजोबा म्हणाले.
त्यांच्यात तसली काही पद्धत नसते. बाकी गृहप्रवेशाचे विधी झाले होते.” मी उत्तर दिलं. खरंतर आजोबांना अपेक्षित असलेले धार्मिक वगैरे काहीच विधी झाले नव्हते, फक्त एशानच्या काही नातेवाईकांसाठी एक भलीमोठी पार्टी तीपण हॉटेलात इतकंच काय ते. पण आता ते सांगत बसायची काही आवश्यकता नव्हती.
हरकत नाही. त्यांच्यात नसली तरी आपल्यांत पद्धत असते, त्यामुळे उद्या घरात सत्यनारायण होणार आहे. तुम्ही जोडीनं करायचाय. तुमच्या यजमानांना सोवळं वगैरे नेसता येतं ना?” मी हो-नाही-माहित नाही टाईप मान हलवली. “नाहीतर तुझ्या बाबांना सांग, तो नेसवेल. उद्या सकाळी नऊ वाजता गुरूजी येतील. तूपण साडी नेसून तयार रहा. आज संध्याकाळी जाऊन हातभर बांगड्या भरून ये. सवाष्णीनं एवढ्या भुंड्या हातानं फिरू नयेआजोबा करवादले.
एक्स्युजमी,” एशान हळू आवाजात म्हणाला. “सत्यनारायणाचं काय म्हणालात?”
आजोबांनी त्याच्याकडे एकवार पाहिलं. “उद्या  सत्यनारायणची पूजा आहे. नवदांपत्य म्हणून ती पूजा तुम्हाला करायची आहे
कशाबद्दल?”
सत्यनारायण कशाबद्दल करतात? लग्न झालं की सर्व सुखसमृद्धी लाभू देत, वंश वाढू देत म्हणून. गुरूजी सांगतात तसं करायचं.”
सॉरी. पण मी पूजा करणार नाही.” एशाननं बॉम्ब टाकला. आजोबांना असं कुणी आपल्याला उत्तर देऊ शकतं यावर विश्वासच बसेना. “का करणार नाही?”
कारण माझा देवावर विश्वास नाही. त्यामुळे मी कसलीही धार्मिक विधी, पूजा वगैरे करणार नाही. विधीवत लग्नाला तयार झालो ते हिच्यामुळे. तेव्हा तुमच्या विनंतीला मान दिला होता, पण आता शक्य नाही. एस्पेशली हे वंश वाढू देत म्हणून तर बिलकुल नाही. सॉरी!” तो नजर ताठ ठेवत शांतपणे म्हणाला. एशानचा हा थंड आवाज म्हणजे दगडाचा आवाज. आजोबांना काही समजावणं शक्य नव्हतं, एशानकडून थोडीफार तडजोडीची अपेक्षा होती ती त्याच्या एकंदर या अविर्भावाकडे बघता फोल. मुंबईहून निघाल्यापासून मला सर्वात जास्त भिती होती तेच घडत होतं. मी मध्ये काही बोलायचा प्रयत्न केल्यावर आजोबांनी मला हातानंच थांब म्हणून इशारा केला. “तुमचा विश्वास नसला तरी आमचा आहे. तुम्ही या घरचे जावई आहात. आमच्या नातीचे अर्धांग आहात. त्यामुळे उद्या ही पूजा करायलाच हवी.”
पण मी कसल्या धार्मिक कार्यात भाग घेणार नाही हे तुम्हाला माहित आहे.. पूजा वगैरे मेरे बस की बात नही! इथं केवळ तुम्हा सर्वांना भेटायच्या निमित्तानं मी आलोय.” एशान जितक्या शांतपणे हे बोलत होता, त्याच वेगानं आजोबांचा पारा चढत होता, हे असं उत्तर देणारा त्यांचा नातवंडं, मुलगा किंवा सून वगैरे कुणी असतं तर एव्हाना दोन खणखणीत थोबाडावर बसल्या असत्या. पण हा काही झालंतरी जावई होता. “मी तुमचा मान राखण्यासाठी घरामधलं कुठलंही काम करेन. पण पूजा वगैरे करणार नाही.”
हे बघा,” आजोबा आवाजावर शक्य तितकं नियंत्रण ठेवत म्हणाले. “तासाभराचा प्रश्न आहे. तुमचा विश्वास नसला तरी पूजा करायला काय हरकत आहे? काय गं?” त्यांनी माझ्याकडं बघत विचारलं. मी परत एकदा हो-नाही-माहित नाही टाईप मान डोलावली. “तिथं मुंबईत काय करता ते आम्ही बघायला येत नाही. इथं किमान आमच्या सर्वांच्या समाधानासाठी तरी...”
शक्य नाही. माझा विश्वास नाही, मी पूजा करणार नाही.” तो निर्धारानं इतकंच म्हणाला आणि सरळ मागे वळून खोलीबाहेर पडला. नक्की काय करावं ते न सुचल्यानं मी तिथंच उभी राहिले.
सांग तुझ्या नवर्‍याला.” आजोबांनी माझ्याकडं मोर्चा वळवला. “उद्या गुरूजी येतील. घरभर पाहुणे आहेत. भलते तमाशे नकोत. तुझ्या मर्जीनं लग्न करायची परवानगी दिली म्हणजे इथं घरात पण हवं तसं वागायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. नवीन जावई म्हणून घरचा सत्यनारायण त्याच्या हातून करावं म्हणून कौतुक करायला गेलो तर मलाच विश्वास नाही म्हणून ऐकवून गेलाय. हल्लीच्या पोरांना शिस्तच नाही.मी परत नुसती मान डोलावली आणि खोलीबाहेर आले. एशान खोलीबाहेरच्या बाल्कनीमध्येच उभा होता.
एशान, असं काय करतोस? प्लीजमी त्याच्याजवळ जात हळूच म्हणाले. “मी तुला मुंबईमधून निघतानाच काय सांगितलं होतं?”
बर्‍याच सूचना केल्या होत्यास. त्या सर्व मी पाळल्यात. पण त्यामध्ये तुला पोरं होण्यासाठी तासभर फुलं वाहत पूजा करावी लागेलहे सांगितलं नव्हतंस. सांगितलं असतंस तरी हेच उत्तर दिलं असतं. आय ऍम नॉट डूइंग इट. कळलं?” त्याचे निळेहिरवे डोळे माझ्यावर रोखत तो म्हणाला. माझा चेहरा बहुतेक फारच रडवेला झाला असावा कारण, एशान पायरीवरून उतरताना माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला. “कमॉन, इतकंपण वाईट वाटून घेऊ नकोस. एव्हरीथिंग विल बी ऑलराईट!” पण माझ्या चेहर्‍यावर काही हसू आलं नाही.
आई स्वयंपाक घरामध्ये खोबरं खवणत बसली होती. मी आजोबांचं आणि एशानचं बोलणं सगळं तिला जाऊन सांगितलं. “अगं पण, आजोबा आम्हाला कुणालाच काही बोलले नाहीत, अचानक स्वत:च असे निर्णय का घेतात कुणास ठाऊकआई आश्चर्यानं म्हणाली.
मला माहित नाही. पण तो म्हणतोय की पूजा करणार नाही. आजोबांचा इगो तुला माहित आहेआमचं खुसफुसत चाललेलं बोलणं ऐकून उरलेल्या सर्व बायका तिथंच आल्या. काय विषय झाला ते आईनं लगेच सांगूनपण टाकलं. या बायका चर्वितचर्वण करायचा एवढी चांगली संधी सोडणार आहेत?  ऊतच आला म्हणायला हरकत नाही.
त्यांच्यात नसेल पद्धत म्हणून माहित नसेल. तू सांग त्याला
बंगालात पण करतात सत्यनारायण
हो, पण हिचा नवरा  सिंधी आहे
मग काय झालं? पंजाबी लोकं देवीची जगराता करतात की, आमच्या कॉलनीमधले खत्रा तर नवरात्रपण करतात
हो, पण एशान सिंधी आहे
असू देत ना, लग्नाच्या दिवशी एवढे सगळे विधी केलेच होते ना. तेव्हा काही म्हणाला नाही.”
कारण, लग्न माझ्यापद्धतीने असं ठरलं होतं ना
मग आतापण लग्नाचाच एक विधी राहीलाय म्हणून सांग आणि पूजेला बसव
अगं, पण तो हिंदूच आहे ना
“अगं तो सिंधी आहे”
मला माझं कपाळ कुठंतरी नेऊन थडाथडा आपटावंसं वाटलं. आईशी बोलून आता काही उपयोग नव्हता, सरळ किचनमधून उठून मागच्या अंगणात जाऊन बसले.
परत किचनमध्ये आले तोपर्यंत हा सत्यनारायणाचा विषय आईकडून बाबांपर्यंत गेला होता. आता बाबांनी मला आणि एशानला बोलावून घेतलं. काहीतरी समजवण्यासाठीच वगैरे. बाबांच्या खोलीमध्ये मी, आई, मोठी काकू, बाबा आणि एशान.

हे बघबाबांनी एशानला समजावलं. “तुझा विश्वास नाही हे मला पटतंय. पण काय आहे. म्हातारं माणूस आहे. जेमतेम तासाभराचं काम. तितकंही नाहीच खरंतर. तुला सोवळं वगैरे नेसायचं नसेल तर झब्बा पायजमा घाल. चालेल की
बाबा, मला व्यवस्थित धोतर नेसता येतं! तुमच्या लेकीला साडी नेसायला मीच मदत करतो, पण प्रश्न तो नाही. मघाशी पण आजोबांना जे संगितलं तेच तुम्हाला सांगतो. मी पूजा करणार नाही. कारण माझा विश्वास नाही. सिम्पल
पण माझ्या विश्वासाचं काय?” मी तोंड उघडलं. “कायम म्हणतोस ना, वी आर लाईफ पार्टनर्स. एकमेकांना सांभाळून घेतलंच पाहिजे. एकमेकांचा आदर केलाच पाहिजे. मग माझा विश्वास असताना.... तू त्या विश्वासाचा एकतर्फ़ीच अनादर करून कसं चालेल?”
मी तुझ्या विश्वासाचा अनादर करण्याचा प्रश्नच कुठं येतोय?”
एशान, लग्नानंतर सत्यनारायण घालायची पद्धत असते. तुझ्या घरी आल्यावर पद्धत नाही म्हणून मी एका शब्दाने तुला काही बोलले नाही... पण आता जर आजोबा सांगत आहेत.. तर किमान मोठ्यांच्या मनाचा आदर राखण्यासाठी तरी....”
मला परत परत तेच सांगायचं नाहीये.. तुझा विश्वास आहे ना तर तू पूजा कर
असं करून कसं चालेल?” काकू म्हणाली. “सत्यनारायण जोड्यानं घालायचा असतो.
एशान क्षणभर माझ्याकडे रोखून बघत राहिला आणि मग बाबांना म्हणाला. “ठिक आहे. उद्या दोघं मिळून पूजा करू.” आईबाबांच्या चेहर्‍यावर एकदम हायसं का काय ते आलं.  मात्र काहीतरी नक्की गोची आहे, हे मला माहित होतं.“पण...” एशान पुढं म्हणालाच. “ही पूजा तुमची मुलगी करेल. मी तिच्या बाजूला बसेन. म्हणजे तिच्या विश्वासाचा अनादर होणार नाही आणि माझ्या विश्वासाचा प्रश्न उद्भवणार नाहीहे ऐकून काकूचा चेहरा हे काय भलतंच!!!
अरे, असं कसं चालेल?” आईला आवाज सापडला. बाबा आता काही बोलावं की नाहीया मन:स्थितीमध्ये होते.
का नाही चालणार? पूजा नवराबायकोनं मिळून करायची आहे. मग तिनं केली आणि मी तिच्या हाताला हात लावून ममम्हटलं तर काय बिघडतंय? आफ़्टर ऑल देवावर विश्वास तिचा आहे, मग तिनंच पूजा करणं योग्य ठरेल ना?” एशान आपला तर्क सोडायला तयार नव्हता. शेवटी सर्वांनी याला समजावण्यात काही अर्थ नाहीअसा निष्कर्ष काढला असणार कारण त्याच वेळी बाबांना कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. आई आणि काकू काहीतरी काम आठवलं म्हणून बाहेर पडल्या. खोलीमध्ये मी आणि एशान दोघंच राहिलो.
एशान व्हॉट्स रॉंग विथ यु? तुला कुणी मला उचलून शंभर पायर्‍या चढ किंवा दोन दिवस उपास कर म्हणत नाहीये. एक तासभराची पूजा. तेही आपल्या संसाराला आशीर्वाद मिळावा म्हणून. मोट्ठ्यांचं मन राखावं म्हणून... तुला माहित आहे ना... आपल्या लग्नासाठी आजोबा तयार नव्ह्ते... त्यांच्या मनाविरूद्ध लग्न झालंय म्हणून तरी किमान...”
म्हणून मी माझ्या मनाविरूद्ध वागू? तासाभराच्या पूजेपुरतं का होइना मी माझी तत्त्वं गुंडाळून ठेवू??”
तुला जसं वागायचं तसं वाग. मी काही जबरदस्ती करू शकत नाही. इथं घरात कुणी काही बोलणार नाहीच. पण आता विषय बास. ज्या माणसाला माझ्या मताची श्रद्धेची विश्वासाची काडीमात्र काळजी नसेल त्याच्यासोबत मला रहायचं नाही. तू एकटाच परत जा.
तोंडाला येईल ते बडबडत सुटू नकोस.. आणि मी...” आईनं मला हाक मारली. “आता वाद घालू नका. उद्याचं उद्या बघू. आजोबांनी तुला हिरवा चुडा भरून यायला सांगितलंय. पटकन तयार होऊन जा. उगाच त्यांना बोलायला अजून एक निमित्त देऊ नकोस.” आई मला काकुळतीला येऊन म्हणाल्यासारखी म्हणाली.
मी बांगड्या भरायला निघालेलं बघून घरामध्ये अजून कुणाकुणाला काय काय कामं आठवायला लागली. कुणाला मेंदी घ्यायची होती, कुणाला मॅचिंग कानातले, कुणाचे ब्लाऊज आणायचे होते. तू येते मी जाते आम्ही निघतो तुम्ही थांबतो करत करत दहाबाराजण मिळून बाजारात जायला निघालो. बाजारातून परत येईपर्यंत मला काय एशानशी बोलता आलं नाही. बोलायचं काय होतं? मला त्याचा स्वभाव माहित होता, एकदा नाही म्हणजे नाहीच. तो उद्या सत्यनारायणाची पूजा करणार नाही, हे घरामध्ये एव्हाना इतरांना समजून चुकलेलं होतं. बाजारामध्ये त्यानं माझ्यासाठी आईस्क्रीम घेतलं, चॉकलेट घेतलं, पण किती लाडेगोडी लावायचा प्रयत्न केला तरी माझा मूड गेलेलाच होता. आम्ही परत येईपर्यंत आजोबांनी ताई आणि भावोजी पूजा करतील असं ठरवून टाकलेलं होतं. प्रश्नच मिटला.
पण असेच प्रश्न मिटत असतात का? माझी नुसती चिडचिड होत होती. तसंपण घरामध्ये भावोजींच्या कौतुकाला उधाण आलं होतं... त्यांचं शांत वागणं, सगळ्यांना आदर देऊन बोलणं, सगळ्या रीतभाती माहित असणं या सर्वांचं अगदी मनसोक्त कौतुक चाललं होतं. माझा नवरा मात्र पैसेवाला असला तरी अगदीच संस्कारहीन आहेया पदवीला पात्र झाला होता.
एकदोनदा वाटलं की आपल्या बॅगा भराव्या आणि मुंबईला निघून जावं. आजोबा काय बडबडतील ते बडबडतील. झक मारलं आणि या पूजेच्या निमित्तानं गावी आले. वास्तविक, ताईचं आणि भावोजींचं लग्न झाल्यावर ताई पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा तिचं कितीतरी कौतुक झालं होतं. माझ्या वाट्याला तितकं कौतुक आलंच नाही, उलट लग्नानंतर आम्ही दोघं पहिल्यांदाच आलो आहोत असंदेखील कुणी म्हणायला तयार होइना.
चार दिवसांनी गावामधले सगळे कार्यक्रम आटोपून आम्ही मुंबईला परत निघालो. निघताना आईने मला साडी आणि एशानच्या हातात पाच हजार रूपये ठेवले. “तुम्हाला काय घ्यायचं ते घ्याम्हणत. भावोजी आणि ताई पहिल्यांदा आले तेव्हा भावोजींना सोन्याचं ब्रेसलेट दिलं होतं, आमचे तसले काही चोचले नाहीत. प्रश्न दागिन्याचा नव्हता, कोडकौतुकाचा होता. माझा चेहरा तेव्हाच जो पडला तो पार अगदी पोलादपूर जाईपर्यंत. एशानसुद्धा काही बोलत नव्हता.
शेवटी वाट बघून बघून माझा उद्रेक झालाच. “पण तुला माझ्या मतानं जरा तरी वागायला काय धाड भरली होती?” एशान तरीही शांत बसून गाडी चालवत राहिला. मी तशीच धुसफुसत राहिले. पाचेक मिनिटांनी त्याला कुणाचा तरी फोन आला म्हणून त्यानं गाडी हायवेमधून बाजूला काढून उभी केली.  फोनवर पुढच्या आठवड्यात गोव्याचा प्लान ठरत होता, इतकंच मला समजलं. “हे गोव्याचं काय अचानक?” त्यानं फोन कट केल्यावर मी विचारलं.
आमचा एक मित्रांचा ग्रूप आहे. दरवर्षी सुट्टीसाठी गोव्याला जातो त्याचंच प्लानिंग चालू आहे
कोण मित्र? इतक्या दिवसांत गोव्याचं कधी बोलला नाहीस...”
तुला हे फ्रेण्ड सर्कल माहित नाही. फक्त मॅरीड लोकांची ही सुट्टी असते. आता माझंपण लग्न झालंय म्हणून या क्लबमध्ये मलाही सामिल केलं गेलंय. माझ्याबरोबर तुलाही... मला वाटतं दहा मिनिटं इथं रेस्ट घेऊ. थोड्यावेळानं ऊन चढेल..” म्हणतो तो गाडीखाली उतरला.. “हा मित्रांचा ग्रूप खूप एक्स्लिसिव्ह आहे. तुला आवडतील... आणि हां..  महत्त्वाचं सांगायचं राहिलं. ही गोव्याची ऍन्युअल ट्रीप खूप स्पेशल असते. तिथं सगळे मिळून वाईफ स्वापिंग करतात... मज्जा!” तो एक डोळा मारत हसत म्हणाला.
म्हणजे?” अर्थ समजूनपण मी हादरलेच होते.
चिठ्ठ्य़ा टाकून उचलायच्या. याची बायको त्याच्याकडे, हिचा नवरा तिच्याकडे. पूर्ण तीन दिवस दोन रात्री
एशान, गंमत करतोयस का? असले जोक अजिबात चांगले वाट्त नाहीत. रीडीक्युलसमी चिडून उत्तर दिलं.
यात रीडीक्युलस काय आहे? पद्धत आहे आमच्या ग्रूपमधे. इतके दिवस मी अनमॅरीड होतो तरी त्यांच्यासोबत जात होतो. आता लग्न झालंय तर माझी बायको त्यांना अव्हेलेबल...” एशानचं वाक्य संपायच्या आत माझा हात त्याच्या गालावर चालला होता.
मारतेस काय?” तो चिडून ओरडला. “तुला हे करावंच लागेल
एशान, मी असलं काहीही करणार नाही.”
का?”
मला आवडत नाही, मला पटत नाही
कमॉन, मी तुला कुठं कायम कर म्हणतोय. फक्त तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. त्यानंतर परत नेहमीसारखंच...”
एशान, तुला समजतंय तरी का तू काय बोलतोस ते? पहिल्यांदा मी तुझ्या तोंडून् इतकं घाणेरडं काहीतरी ऐकतेय. आय डोण्ट बीलीव्ह की हे एशान मिरचंदानी बोलतोय. मी हे असलं काही करण्याऐवजी सरळ माहेरी निघून जाईन. मी फार जुन्या मतांच्या घरातली मुलगी आहे आणि असलं वागणं मला पटणं शक्यच नाही.”
पण आता तुझं माझ्याशी लग्न झालंय. वी आर लाईफ पार्टनर्स. मग एकमेकांच्या मताचा आवडीचा आपण आदर करायलाच हवा ना? मग माझी आवड म्हणून तू थोड्यावेळांसाठी तुझी ही तत्वं गुंडाळून ठेवू शकत नाहीस? तुला माझ्या मतानं वागायला जरातरी काय धाड भरतेय?”
मुंबई गोवा हायवेवर सकाळी साडेनऊ वाजता कुठल्यातरी एका झाडाच्या खाली गाडी थांबवून एशाननं मला शेवटी माझ्याच शब्दांची मलाच फास लावला.
सो दिस इज अबाऊट.....”
येस्स.. आता तुला समजलं असेल की माझ्या दृष्टीनं तासभर पूजेला बस हे किती  रीडीक्युलस असू शकेल? मला ते का पटलं नसेल?”
 तू या दोन गोष्टींची तुलनाच कशी करू शकतोस?”
मी तुलना करतच नाहीये. किंबहुना मी जे बोललोय ते चुकीचं आहे आणि म्हणूनच आय डीझर्व दिस थप्पड. आणि  सीरीयसली, माझा असल्या मित्रांचा काही ग्रूप नाही. एका क्लायंटसाठी गोव्याला जायचंय. पण यामध्ये एखादी गोष्ट तुला पटत नसताना केवळ माझ्या आवडीसाठी कर हे म्हणणं किती चुकीचं आहे तुझ्या लक्षात येतंय का?”
एशान, मी फक्त माझ्या आवडीसाठी कर म्हणून साम्गितलं नव्हतं. माझा देवावर विश्वास आहे. मला जेन्युइनली असं वाटतं की सत्यनारायणाच्या पूजेनंतर आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. ऍट लीस्ट पूजा केल्याचं समाधान मिळेल...”
त्यात मला काहीच म्हणायचं नाहीये. तुझा विश्वास, तुझी पूजा, तुझं समाधान यांत मी आजवर कधीच आलो नाही. यापुढेही येणार नाही. माझा नास्तिकपणा जसा मी तुला पटवायला जात नाही, तसाच तुझा अस्तिकपणा माझयवर लादू नकोस इतकं सिंपल माझं म्हणणं आहे
म्हणजे एकमेकांच्या मताची काहीच किंमत आपण ठेवायची नाही?”
किंमत ठेवणं इज सच अ रॉंग टर्म. आपल्याला एकमेकांच्या मतासाठी किती झुकायचं ते ठरवावं लागेल. त्याशिवाय या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. मी तुझ्या मताप्रमाणं किंवा तू माझ्या मताप्रमाणं राहत नाहीस, म्हणजे आपलं एकमेकांवर प्रेम नाही असा अर्थ होत नाही. तुला जसं हवं तसं वागायचं स्वातंत्र्य आहे, मलादेखील आहे. तू काय वागावं हे जसं मी ठरवत नाही तसं मी काय वागावं हे तूदेखील ठरवू शकत नाहीस. तुझा देवावर विश्वास आहे. फाईन. माझ्या दृष्टीनं विषय तिथं संपतो. मी आजवर तुझ्या विश्वासावर अथवा श्रद्धेवर कधीच काही प्रश्न उठवलेला नाही. मग तोच न्याय मलापण लागू व्हायला हवाय. माझा विश्वास नाही. तुझ्या दृष्टीनं विषय इथंच संपतो. तुला बरं वाटावं म्हणून आज सत्यनारायण करेन. उद्या दरवर्षी नवरात्रीच्या दर्शनाला जाऊ. परवा म्हणशील चालत सिद्धीविनायकाला चल. माझा विश्वास नसतानासुद्धा केवळ तुझ्या मताचा आदर म्हणून मी माझी तत्त्वे नक्की कूठल्या क्षणाला गुंडाळायची आणि कधी थांबायचं हे कसं ठरवणार? मग सुरूवातीपासूनच का नको?”
पण तुझ्या अजून लक्षात कसं येत नाहीये? आजोबांनी...”
त्यांना फक्त त्यांच्या मताप्रमाणं मी वागायला हवं होतं. दुसर्‍याच्या इगोसाठी आपल्या नात्यंमध्ये क्लॅशेस का यावेत?... सीरीयसली विचार करून बघ. मी मनाविरूद्ध त्या पूजेमध्ये बसणार. ते तुला जाणवणार. अर्ध्याहून जास्त वेळ तुझं लक्ष माझ्याकडे रहणार.. मी उगाच कठपुतळीसारखा बसणार. त्यात सतत तुझा राग येत राहणार. तुझ्यावर चडफडाट होत राहणार. यामधे तुझा देव आणि तुझ्या विश्वासाचा मजाक होइल नाही तर काय...”
एशान, तुला वादावादी करायचीच असेल तर चिकार पॉइण्ट्स आहेत. माझी फक्त एक छोटीशी मागणी होती. माझ्यासाठी केवळ तू ही पूजा केली असतीस तर...”
तर माहेरी माझी इज्जत वाढली असती. आता जे लोक मला हसत आहेत ते हसले नसते. कमॉन, तुला काय वाटतं हे माझ्या लक्षात आलं नसेल. त्यानं काय फरक पडतोय.. आपण दुसर्‍यासाठी लग्न नाही केलंय. तुझ्या आणि माझ्यासाठी केलंय. हे आपलं आयुष्य आहे, तुझे किंवा माझे नातेवाईक काय म्हणतील यावरून आपण कसं जगायचं ते ठरवू शकत नाही.”
उद्या आपल्या मुलांचं काय? त्यांना काय शिकवणार आहोत?”
जे तुला पटेल ते. जे मला पटेल ते. मुलं मोठे होतात, त्यांना जेव्हा अक्कल येईल तेव्हा त्यांना पटेल ते. त्याचा आतापासून विचार का करायचा?”
मी काही न बोलता हाताची घडी बांधून उभी राहिले. सांगितलं ना, एशानसोबत बोलण्यात कुणी जिंकूच शकत नाही. एशान माझ्या जवळ आला, वार्‍यानं उड्त असलेले केस माझे केस त्यानं हलक्या हातानं दूर केले.
एक सांगू? सॉरी!!! मी इतक्या हट्टीपणानं वागायला नको हवं  होतं. थोडं तुझं ऐकलं असतं तरी चाललं असतं पण...”
आता घडून गेल्यावर बोलून काय उपयोग आहेनकळत डोळे भरून आले. “एशान, मला कुणी काही बोललं तर मला काहीच फरक पडत नाही. याआधी घरात सगळ्यांनी मला चिक्कार टोमणे मारून झालेत. रंगावरून, शिक्षणावरून... झालंच तर लव्ह मॅरेज केलं म्हणूनसुद्धा. आय रीअली डोण्ट केअर. पण तुला कुणी काही बोललं तर... तेही असल्या इतक्या फालतू कारणावरून
 त्यानं मला जवळ घेतलं. “अरे! आता तुझं तुलाच पटलं ना... की मुळात हे भांडणाचं कारणच फालतू आहे. मलासुद्धा कुणी काही बोललं तर काही फरक पडत नाही. पण जर तू अशी रडका चेहरा करून, चिडचिड करत राहीलीस तर मात्र मला फरक पडतो.. तू तुझ्या घरातल्यांच्या मनाविरूद्ध माझ्यासोबत आलीस ते मला माहित आहे. तुझ्या आनंदाची, तुला कसलंही दु:ख न पोचवण्याची जबाबदारी माझ्यावर. तू गावाला जाताना किती खुश होतीस पण माझ्या असल्या हट्टीपणामुळे तू चेहरा पाडलास.. प्लीज असं करू नकोस. माझ्यावर कितीही रागव, ओरड, त्रागा कर. पण माझ्या कसल्याही वागण्यामुळे तू दु:खी होऊ नकोस. प्लीज... हे नातं आपल्याला आयुष्यभर निभ्वायचं असेल तर आपले आनंद समाधान एकमेकांसाठी. पण एकमेकांमुळे दु:ख नको
म्हणजे किमान कबूल तरी कर की तुला मी दु:ख देतोय.”
येस. कबूल करतो” इतकावेळ चेष्टेत बोलणारा एशान अचानक गंभीर झाला. “इतक्या दिवसांत कधीच जाणवलं नाही, पण आज अगदी मनापासून जाणवतंय. तुला तुझ्या घरामधून माझ्या घरात घेऊन येणं, आणि या घरात तू अगदी पहिल्या दिवसांपासून घरचा मेंबरच होऊन रहा अशी अपेक्षा ठेवणं... दिस इज सो रॉंग. गेले चार दिवस मी तुझ्या घरात जावई म्हणून होतो... तेव्हा विचार केला हेच रोल जर रीव्हर्स असते.. तर.. कधी असा विचार केलाच नव्हता..”
“म्हणजे मला नक्की कळ्लं नाही.”
“बघ ना, तुझ्यासाठी हे एक्स्पेक्टेड आहे, तू लग्न झाल्यावर माझ्या घरी येणार. माझ्याच घरात सेट होणार. माझ्या घरच्या सवयींनुसार तू वागणार. मला एसी हवाच म्हणून मी वाद घालणार तुझं डोकं दुखलं तरीही माझी अपेक्षा अशी की, तूच ऍडजस्ट कराअला हवं.... मी आजवर हे कधी विचारात घेतलंच नाही की पंचवीस वर्षं तू ज्या घरात लहानाची मोठी झालीस, ज्या वातावरणात वाढलीस, तिथून पूर्णपणे एका दिवसांत उचलून मी तुला माझ्या घरी आणलं.”
“कमॉन तुज्या घरात ऍडजस्ट व्हायला काहीच त्रास झाला नाही. हॉस्टेलमुळे वगैर सवय होतीच मला...शिवाय आपण दोघंच होतो”
“.. आणि ज्यांना अशी सवय नसते त्यांचं काय? म्हणजे समजा तू मुलगा असतीस आणि मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या घरी आलो असतो तर चार दिवसांत पळून आलो असतो. कितीही प्रेम असो वा नसो. जमलंच नसतं मला, हे असं सारखं सतत “आमच्या घरात.. आमच्या पद्धतीमध्ये” ऍड्जस्ट करणं....”
“ट्रान्झिशन फेज असते.”
“तुझ्यासाठी! माझ्यासाठी नाही. मी फक्त आपल्याबद्दल बोलत नाहीये. एकूणातच या लग्न नावाच्या सिस्टीमबद्दल बोलतोय. अरेंज मॅरेजबद्दल बोलतोय. ज्यामध्ये एका मुलीनं टोटली अपरिचित घरामध्ये रहायला यावं आणि त्या घराचा मेंबर व्हावं अशी अपेक्षा केली जाते. माझ्यासाठी माझं घर बदलत नाही, नाव बदलत नाही, नाती बदलत नाहीत. तुझ्यासाठी मात्र अख्खं विश्वच बदलतं. दिस इज सो क्रूएल”
“एशान, तू कुठल्याही गोष्टीचा किती विचार करतोयस?”
“तुझ्या घरी चार दिवस राहिल्यावर मगच हे शहाणपण सुचतंय. आय ऍम सॉरी. आय ऍम रीअली सॉरी. मी कधी असा विचार केलाच नव्हता, पण तरीही कळतानकळत आपल्या लग्नानंतर जर मी कधी असा तुल गृहित धरून वागलो असेल तर मला माफ कर. यापुढे मात्र मी हे कायम लक्षात ठेवेन. माझ्या घरात.. नाही! परत सॉरी! आपल्या घरात तुला काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेईन.”
“आणि रात्री एसी बंद ठेवशील..” मी त्याचे केस विस्कटत म्हटलं.
“मी तुला काही त्रास होऊ देणार नाही असं म्हटलंय. मला त्रास करून घेईन असं म्हटलेलं नाही” तो हसत म्हणाला.
काय असतं खरंच लग्न करणं? एक सामाजिक सोय? एक धार्मिक बंधन? एक मानसिक गरज... या सर्वांहून वेगळं काहीतरी असणं म्हणजे खर्‍या अर्थानं नातं असणं. एशान परफेक्ट नवरा नाही, मी परफेक्ट बायको नाही. पण आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. कधी जमतंय तर कधी नाही. थोडेफार अडथळे येणारच, पण एकमेकांचा हात धरून ते अडथळे पार करणं म्हणजेच तर जगणं. या जगण्यात क्वचित कधीतरी समजतं, त्याची मतं भिन्न आहेत माझी भिन्न. मग असा काय फरक पडतो. दोन भिन्न विचारसरणीच्या लोकांनी एकत्र राहणं, तेही आनंदात इतकंसं कठीण असतं का?
.... त्या दिवशी त्या क्षणी तरी मझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं.
पण मग मला भविष्य समजत नाही हेही खरंच!!
 (समाप्त)  

No comments:

Post a Comment