शाळेत चित्रकलेच्या तासाला
तास संपत आला की आम्ही टवाळखोर मुलं एक खेळ कायम खेळायचो. जेवढे रंग कालवलेले असतील
नसतील त्यामधे एक एक करून ब्रश बुडवायचा, आणि वहीच्या शेवटच्या पानावर त्या ब्रशचे
फ़टकारे ओढायचे. आधीच आमची चित्रकला दिव्य. त्यात परत तास संपत आलेले असताना ओढलेले
हे फ़टकारे!!! पण एकंदरीत कसंही काढलेलं हे चित्र दिसायचे मात्र एकदम सुंदरच. एकदम
चित्ताकर्षक वगैरे!! नुकतेच श्याम मनोहर यांचे “शंभर मी” हे पुस्तक वाचून संपवताना
मला या अश्या फ़टकार्यांच्या चित्राचीच आठवण आली होती.. या पुस्तकाला कादंबरी असं
म्हटलंय खरं. पण पूर्ण पुस्तक वाचल्यावर, याला कादंबरीच असे का म्हणावे हे अद्याप
लक्षात आलेले नाही. वास्तविक पाहता, हे पुस्तक म्हणजे अशाच विविध फ़टकार्यांनी
भरलेले असे एक चित्र आहे. त्यातले काही प्रकरणे उत्तम आहेत, काही सर्वसाधारण आहेत
आणि काही अगदी एकाच ओळीची आहेत.
श्याम मनोहर हे एक
प्रयोगशील लेखक आहेत, त्यांच्या लेखनामधे विविध प्रयोग सतत दिसत राहतात, याच
प्रयोगामधील एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग म्हणजे शंभर मी. हे पुस्तक आत्मनिवेदनातून
उभे राहते. इथे सांगणारा प्रत्येक जण “मी” आहे, पण त्या एका “मी” चा दुसर्या “मी”
शी काही संबंध नाही. प्रत्येक “मी” स्वतंत्रपणे येतो आणि सांगून निघून जातो. “मी
कोण?” हा भल्या भल्यांना पडलेला प्रश्न इथे लेखकालादेखील पडला आहे, मात्र स्वत:मधे
त्याचे उत्तर न शोधता लेखक “कथात्मसाहित्याच्या” मार्गाने सृष्टीतील अचेतनापासून
ते सचेतनापर्यंत सर्वत्र स्वत:ला “मी” कल्पून पाहतो, तिथून स्वत:ला शोधू पाहतो,
विश्वाच्या निर्मीतीपेक्षाही या “मी” ची निर्मिती लेखकाला अधिक भावताना दिसत
राहते. यातले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या शंभर मी पैकी कुणाचेच निवेदन पूर्ण
नाही, जे काही सांगितले आहे ते अर्धवट आहे. त्याला ठराविक सुरूवात नाही, ठराविक
शेवट नाही. आणि कित्येकदा तर काही निवेदनच नाही. पुस्तकाच्या ब्लर्बवर सलिल वाघ
यांनी उल्लेख केला आहे की, “इथे बर्याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट
केला आहे, आणि केवळ कथनपूर्वक मजकूर आणि कथनोत्तर मजकूर वाचकांच्या हाती सोपवलेला
आहे. कित्येक वेळा टेक्स्टलेसनेसचा चक्रावून टाकणारा अनुभव वाचकाला देणारा
मराठीतला हा एक अनोखा प्रयोग आहे.”
अनोखा प्रयोग आहे हे मान्य
आहे, पण या पुस्तकामधे (पुन्हा एकदा, मला कादंबरी म्हणवत नाहीये) हा
टेक्स्टलेसनेसचा अनुभव काहीवेळा येतच नाही- इतका काही मजकूर शब्दबंबाळ आहे, आणि
काही वेळा अगदी शब्दश:रीत्या येत राहतो. उदाहरणसाठी: मग काय करायचे? हे पृष्ट क्रमांक
३१४ वरील प्रकरण बघा. कॉपीराईटची भानगड नको म्हणून इथे ते अख्खे प्रकरण देत नाही,
अन्यथा लिहूनच टाकते आता ते अख्खं प्रकरण. या पुस्तकामधील काही निवेदने वाचकाला
खरोखर गुंतवून ठेवतात, पण त्या निवेदनांचा इतर प्रकरणांशी काहीच संबंध लागत नाही,
बरं तसा संबंध नसावा अशी अपेक्षा नसली तरी काही निवेदने स्वतंत्ररीत्या एक उत्तम
लघुकथा अथवा स्फ़ुटे आहेत. आणी काही निवेदने म्हणजे अवघे एखादे वाक्य अथवा
परिच्छेद. त्यामुळे वाचताना सतत काहीतरी तुटक असल्याचा भास होत राहतो.
हे पुस्तक बर्याच वेळा
वाचकाला वाचकाकडून फ़क्त वाचनाची भूमिका करण्याची अपेक्षा ठेवत नाही. कित्येकदा
लेखक कसल्याही स्पष्टीकरणाला बांधील राहत नाही, त्याचे एक एक “मी” येत राहतात,
आपापले संवाद म्हणतात आणि निघून जातात. त्यांची सांगड घालायची ती वाचकांनीच. एखाद्या पेन्ड्युलमप्रमाणे वाचक एक तर या टोकाला
नाहीतर त्या टोकाला भिरभिरत राहतो. त्यामधील परस्परसुसंगती वाचकाने शोधायची
असल्याने जोवर ही सुसंगती सापडत नाही, तोपर्यंत पुस्तक अजिबात समजत नाही. एकदा का,
तिळा तिळा दार उघड हा मंत्र सापड्ला, की मग या पुस्तकाची गुहा खर्या अर्थाने
उघडते. हा मंत्र प्रत्येक वाचकासाठी वेगळा असू शकतो बरं का!! आणि पहिल्या वाचनांत
सापडेल असेदेखील नाही. पण एकदा का लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे ते लक्षात आले
की मग हे विविध “मी” जिवंत होतात.
लेखकाने यामधे जातीय,
आरोग्यविषयक, सामाजिक, वांशिक, सेक्सविषयक असे अनेक विचार यामधे हाताळले असले तरी
लेखक कुठेही कसलेही ठोस प्रतिपादन करण्याच्या फ़ंदात पडत नाही. प्रत्येक विचार हा
एक स्वतंत्र निवेदनात्मक अनुभव म्हणून येतो आणि जातो. पण पूर्ण पुस्तकभर सतत नेहमी
येत राहणारा विषय म्हणजे “भाषा” स्त्री-पुरूष यांच्यामधील भाषेचा फ़रक, ग्राम्य
भाषेचे स्वरूप, विविध नात्यांमधली वीण, मानवी भावभावनांचे यस्थार्थ चित्रण हे सर्व
काही लेखक “भाषेच्या सर्जनशीलतेमधून” मांडण्याचा प्रयत्न या व्यक्तीरेखांकडून
करवून घेत राहतो. “जे आहे ते तसं नाही, आणि जे नाही ते तसं का नाही” हे विविध
व्यक्तीरेखा मांडताना दिसत राहतात पण या मांडणीमधे आपण पुरे पडत नाही आहोत, याची कबूलीदेखील
या व्यक्तीरेखा देऊन मोकळ्या होतात. या अशा व्यक्तीरेखांची निवेदने वाचायचा अनुभव
खरंच खूप वेगळा आणि भन्नाट आहे यात वाद नाही.
निपुत्रिकमधली “मूल न
होणारी बायको”, दहावीला बोर्डात येऊन मग बारावीला कविता करणार्या मुलाचे वडील,
लग्नानंतर वर्षभरात विधवा झालेली मारवाडी स्त्री, कामवालीच्या गप्पांमधून प्रश्न सोडवू
पाहणारी कॉलेजकन्यका, बायको आणि वडील यांच्या संबंधाचा संशय असणारा नवरा,
गर्भश्रीमंताचे स्थळ आलेले असताना “प्रतिभावंत म्हणजे काय?” असे प्रश्न पडलेली
मुलगी, अशा अनेक वेगवेगळ्या रंगांच्या आणि
ढंगांच्या व्यक्तीरेखांची ही एकत्र बांधलेली मोट आहे, यामधे प्रत्यक्षदर्शी पाहता
सामायिक धागा काहीही नाही, तरीदेखील ही सारी आत्मनिवेदने फ़ार जवळची वाटत राहतात. या
व्यक्तींखेरीज घाण, सेक्स, धर्मग्रंथ, मंदिर, मृत्यू, नितंब, प्रेत यांसारख्या
अचेतन सृष्टीमधील कित्येक पैलूंची आत्मनिवेदने देखील येत राहतात, व्यक्तीच्या
निवेदनाइतकी मोठी नाहीत ही निवेदने, पण तर्रीदेखील मनामधे रेंगाळत राहतात. या
अचेतन निवेदनांमधून लेखक कुठेतरी मानवी भावभावनांची, त्यांच्या आपापसांतील
संबंधाचे, आणि एकूणच जीवनाबद्दलच्या ओढीबद्दलचे कुतूहल मांडून दाखवतो. लेखकाने इथे
भाषेचा केलेला अघळपघळ आणि ऐसपैस वापर या सर्व निवेदनांना एक अनौपचारिक डूब देऊन
जातो. यातील काही निवेदने व्यक्तीपरत्त्वे माजघरातील गप्पांसारखी भासतात, तर काही
गावच्या पारावर केलेल्या गप्पांसारखी. काही निवेदनांना एक अत्यंत तरल असा भाव आहे,
तर काही ठिकाणी असंवेदनशीलरीत्या मांडलेली काही सत्ये. कित्येकवेळा लेखक या
निवेदनांमधल्या व्यक्तीरेखांना अलिप्तपणा देतो, एका दुपारीमधील स्वत:च्या जन्माजा
हिशोब मांडणार्या राहुलसारखा, तर काही वेळा अत्यंत शांत-संथ लयीत एखादी घटना
हळूवारपणे सांगत जातो.
अर्थात, सर्वच निवेदने
तेवढी भन्नाट नाहीत. काही काही ओळी तर केवळ पाने भरायची म्हणून लिहिल्यासारखे
आहेत. कित्येकवेळा “कंटेंटपेक्षा” टेक्निकचा सोस जास्त झाल्यासारखे सतत वाटत
राहते. तरीदेखील एक वाचनानुभव म्हणून हे
पुस्तक खरोखर वेगळे आहे हे नि:संशय.
शंभर मी- लेखक श्याम मनोहर.
पॉप्युलर प्रकाशन.
आय एस बी एन:
९७८-८१-७१८५-५४७-६
किंमत : रू. ३२५