बाबानं मला एकदोनदा आडून विचारलं की मी कॉलेजसाठी मुंबईला गेलं तर मला आवडेल
का? मुंबईला माझा काका होता. शिवाय बाबानं याच वर्षी पनवेलला एक नवीन फ्लॅट घेतला
होता. आईनं तितक्याच स्पष्टपणे मला सांगितलं की मी दूर गेले तर तिला करमणार नाही.
मला तरी आईबाबाशिवाय कुठं करमलं असतं.
कॉलेज चालू झालं म्हणण्यापेक्षा माझ्या मरणयातना पुन्हा एकदा चालू झाल्या.
गेल्या दोन वर्षामध्ये मी आणि केदारनं आमचं नातं कधी लपवलं नव्हतं. आम्ही काय
प्रोफेसरांच्या समोरून गळ्यात गळे घालून फिरलो नव्हतो. सेक्स वगैरे गोष्टी आम्ही
आमच्यापुरत्याच ठेवल्या होत्या. तरीही लोकांना यांचं लफडं आहे हे समजलं की पुढची
गणितं आपोआप जुळवता येतात. आम्ही या सर्वांमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंय अशातलाही
भाग नव्हता. केदारला फायनलला फर्स्ट क्लास होता. मी तरी एस वायला चक्क डिस्टींक्शन
मिळवलं होतं. तरीही निर्भीडपणे माझं नातं समोर ठेवण्याचे इतके गंभीर परिणाम होतील
असं मला वाटलं नव्हतं. कॉलेजमध्ये अगदी अकरावीची
टुल्ली पोरं पण मला बघून घाणेरड्या कमेंट्स मारायला लागली. जणू काही ही पोरगी
अव्हलेबलच आहे असं प्रत्येक मुलाला वाटत होतं.
आमच्या वर्गात
जाह्नवी म्हणून एक मुलगी होती. बारावीनंतर तिचं लग्न झालं पण महिन्याभरातच नवरा
वारला. सासरची माणसं चांगली होती. त्यांनी जाह्नवीला पुढे शिकायला परवानगी दिली.
या जाह्नवीची काळजी अख्खं कॉलेज घ्यायचं. अगदी तिनं असाईनमेंट केली नाही तरी तिला
कुठलाही प्रोफेसर काही म्हणायचा नाही. कारण ती बिच्चारी होती. माझ्याच वर्गात राधा
होती. तीपण लग्नानंतर शिक्षण पूर्ण करत होती. तिला सर्व मैत्रीणी फार मान
द्यायच्या. “घरचं सर्व व्यवस्थित करून मग ती कॉलेजला येते.” चुटपुट सणांसाठी ती
रजा राहिली तरी तिचं प्रॅक्टिकल दुसर्या बॅचसोबत नंतर करवून घेतलं जायचं.
जाह्नवी, राधा आणि मी. काय फरक होता. जाह्नवीचं लग्न केवळ नावापुरतं झालं होतं.
महिन्याभरात तिला असा कितीसा नवरा कळणार होता. राधा सासुरवाशीण होती, तरी शिकत
होती. पण तिचं प्राधान्य केवळ घराला आणि नवर्याला आधी होतं. मी? माझं केदारवर
प्रेम होतं. आम्ही अजून लग्न केलं नव्हतं, तरी एकत्र होतो. या तिघींमध्ये मीच वाईट
होते. फरक होता तो गळ्यामधल्या मंगळसूत्राचा आणि कपाळावरच्या कुंकवाचा. आय हॅड अन
अफेअर आणि ते प्रक्ररण यशस्वी ठरलं नव्हतं.
केदारने मला “युज”
करून मग सोडलं असंही काही लोकं म्हणाली. मी अर्थात त्याच्याशी कधीच सहमत नव्हते.
जेव्हा सेक्समध्ये आमेहे दोघंही पुरेपूर एकत्र आनंद घेत होतो, तेव्हा तोच एकटा
काही मला “युज” करत नव्हता, मग आता त्याला दोष का द्यायचा? काही लोकं असंही
म्हणाले की, मी लग्नाआधीच सेक्स केल्याने केदारनं मला सोडलं. हेही काही खरं नाहीच.
केदारने हे लग्न अतिशय मनाविरूद्ध केलं होतं हे मला चांगलंच माहित होतं. त्याच्या
लग्नानंतर आईच्या एका मैत्रीणीने आम्हाला सर्व काही घडलेला किस्सा सांगितला.
अक्षरश: केदारनं त्या मुलीच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधेपर्यंत त्याचे घरवाले
त्याच्या आजूबाजूला बॉडीगार्डसारखे उभे होते. लग्न लावल्यानंतर त्याच्या आईनं
पाण्याचा पहिला घोट घेतला. केदारसाठी ही सर्व जबरदस्ती होती. आपल्या घरचे इमोशनल
ब्लॅकमेलिंग करत आहेत हे त्याला चांगलंच माहित होतं. लग्नानंतरही त्यानं त्या
मुलीसोबत कसलेही संबंध जाऊदेत अगदी बोलायलाही नकार दिला होता. एकाच घरामध्ये
असूनही केदार तिच्यापासून दूर रहायचा. आईला वडलांना, काकाकाकीला वाट्टेल ते बोलून
दाखवायचा. वर्षभरात घटस्फ़ोट देईन असंही म्हणायचा वगैरे. आई कायम शेजार्यांविषयी अथवा
आमच्या काही नातेवाईकांविषयी असले काही किस्से सांगताना जितक्या निर्विकारपणे मी ऐकायचे तितक्याच
निर्विकारपणे मी हा किस्सा ऐकला. घटस्फोट काही झालाच नाही. पुढे काही वर्षांनी
केदारला त्याच पत्नीकडून मुलगा झाल्याचंही समजलं तेही तितक्याच निर्विकारपणे मी
ऐकलं. एका क्षणासाठीही मला तेव्हा वाईट वाटलं नाही. इर्ष्या वाटली नाही. जे झालं
ते झालं. खूप वर्षांनी ते फेसबूकवर गेम अस्तात ना तशाच एका “व्हॉट इज सुपरपॉवर”
वाल्या गेमवर तो बावा मला म्हणे युयर सुपरपॉवर इज विस्डम” म्हटलं पूर्णपणे गंडलास.
माझी सुपरपॉवर असलीच तर ती विसरण्याची आहे. मी काही गोष्टी साफ विसरते. याही
प्रकरणामध्ये मी महत्त्वाचा व्हिलन कोण आहे ते पूर्णपणे विसरून गेले होते.
असंच एकदा
वैतागले होते तेव्हा जादू मला सहज म्हणाला. “वेळेचा प्रश्न असतो गं. जसा काळ जातो
तसं सर्व काही धूसर होतं. आठवणीसुद्धा.”
“तू अश्विनीला
असाच विसरलास?”
“क्कोण? ओह.
अश्विनी.” तो जरा हसला. “असाच विसरलो. किती वर्षं झाली कुणास ठाऊक. त्या दिवशी
जेव्हा समजलं तेव्हा तुझी आता जी हालत आहे तीच माझी झाली होती पण आता तिचा चेहराही
नीट आठवत नाही...”
“खोटं बोलतोयस.
अशा आठवणी डीलीट करता आल्या अस्त्या तर बरं झालं अस्तं ना?”
“पण मग जगायची
मजाच कसली? आठवणी तर आपल्याला जिवंत ठेवतात. खरं सांगू? आठवणी डीलीट करायच्याच
नाहीत. त्या एकतर कंट्रोल डीलीट करायच्या शक्य असेल तर नाहीतर सरळ हिडन
फोल्डरमध्ये नेऊन ठेवायच्या. असा हिडन फोल्डर जो आपल्यालाही कधी सापडणार नाही.”
“मला आयुष्यात
कधीही शक्य होणार नाही.”
“अजून पाच
वर्षांनी मी हाच प्रश्न तुला विचारेन. तेव्हा उत्तर दे. पण आता माझं सर्वात
महत्त्वाचं काम कर.” त्यानं खिशामधून एक व्हिजिटींग कार्ड काढून माझ्या हातात
दिलं. “कसं आहे डीझाईन?”
“हे काये? उर्दूत
लिहिलंय”
“पलटून बघ”
पलटलं तर त्यावर
“अरिफ इलेक्ट्रीकल्स” असं मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. खाली जादूचा नंबर
पत्ता वगैरे.
“नवीन बिझनेस
चालू करतोय. इलेक्ट्रीकल फिटींगचा. त्याचीच सर्व धावपळ गेली महिनाभर चालू होती.
आफताबने रजिस्ट्रेशन वगैरेसाठी खूप मदत केली.. आणि हे कार्ड अजून फायनल केलं नाही.
तुझा जरा डीझाईनचा सेन्स चांगला आहे म्हणून तुला विचारतोय. काही चेंजेस हवेत का?”
“कार्ड छानच आहे,
पण उर्दूमध्ये कशाला?”
“असंच. मला छान
वाटतं शिवाय या गावात तसा मी नवीनच आहे, अम्मीच्या नातेवाईकांपैकी थोडेफार लोकं
ओळखतात आणी नूरीचे माहेरवाले. त्यामुळे कसं जरा बिरादरीमध्ये अपनापन येईल ना? म्हणून.”
माझ्या चेहर्यावरचे भाव बघून तोही एकदम बावरला. “माझी नाहीय...ही आफताबची आयडीया
आहे. त्यानंच सांगितलं. उर्दू, देवनागरी आणि रोमन अशा तीन स्क्रीप्टमध्ये नाव
लिहायचं” ते ऐकून मला फार हसू आलं. हे असे इतके मायन्युट डीटेल आफताबच सांगू शकतो.
आमच्यासारखे सामान्य लोकं मराठी इंग्लिश उर्दू म्हणून मोकळे झाले अस्ते.
“आपल्याच घरामध्ये
एक खोली ऑफिस म्हणून चालू करतोय. बाकी बराच वेळ साईटवर जाईल. ओपनिंग फार आधी करणार
होतो. पण तुझे हे सर्व प्रॉब्लेम्स चालू होते.. म्हणून म्हटलं निवांतच करू या. जून
फर्स्ट वीकमध्ये करूया?”
“माझ्या
प्रॉब्लेममुळे तू का थांबलास. आफ्टर ऑल तुझा बिझनेस आहे....” जादू काही न बोलता
हसत उठला. त्यानं मला सांगितलं नसलं तरी थोड्या दिवसांनी आफताबने सांगितलं. जादूला
नवीन बिझनेससाठी बाबानं पैसे दिले होते. जास्त नाही, जितके कमी पडत होते तितकेच.
पण नंतर जादूनं कधीही ते पैसे परत करायचा प्रयत्न केला तेव्हा बाबानं ते घेतले
नाहीत. “कधी मला गरज लागली तर तुझ्याकडून हक्कानं घेईन” असं त्याला म्हणायचा.
बाबाचा एरवी मला फार राग येतो. पण त्याच्याबद्दल असं काही आठवलं ना की फार
अभिमानही वाटतो.
थर्ड इयर म्हणजे
स्पेशलायझेशनचं वर्ष. माझ्यासमोर झूलॉजी किम्वा बॉटनी असे दोन पर्याय होते. मी
बॉटनी निवडला. कारण केदारचं झूलॉजी होतं म्हणून मी आधी तेच करणार होते. पण आता
परिस्थिती बदलली होती, सर्वच ऑप्शनचा सुरूवातीपासून विचार करणं गरजेचं होतं.
मला तसंही बॉटनी
आवडायचं. फिजिक्स केमिस्ट्री बरोबर माझी यारीदोस्ती कधी झालीच नाही. बॉटनीमधली
झाडंपानंफळंफुलं आवडायची. पण त्याहून आवडायची ती सेल बायोलॉजी. शरीराचं काय
झाडांचं काय प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग डोळ्यांना जसा आणि जितका दिसतो तो बाजूला
करायचा. आपली दृष्टी अधिकाधिक सूक्ष्म करत जायचं आणि पोचायचं एकेका पेशींपर्यंत. जीवनाचा
असलेला सर्वात बेसिक सोर्स. त्याही सोर्समध्ये असलेले भाग न्याहाळायचे. पेशींना
दु:खं होतात का? पेशींना आनंद जाणवतो का? आपण सर्व बनलोय या पेशींपासून. मग एकेका
सूट्या सुट्या पेशींना नक्की काय अस्तित्व असतं. या बेसिक युनिट ऑफ लाईफ पासून आपण
तयार होतो. मग आपण नक्की कोण आहोत? अर्थात हे प्रश्न काही अभ्यासक्रमामधले नव्हेत.
असंच मला रिकामं बसलं की पडणारे प्रश्न. त्यांना फारस काही अर्थ नाही.
सेल् बायोलॉजीचं
प्रॅक्टीकल माझ्या कायम आवडीचं. बाकीच्या मुली कुरकुरायच्या, त्या
मायक्रोस्कोपमध्ये डोळे घालून डोकं दुखतं, कंबर अवघडते. मला तसं कधी वाटायचं नाही.
उलट कितीही वेळ मी त्या मायक्रोस्कोपखाली दिसणार्या पेशींना मी पाहत बसले असते. दिस
इज वंडरफुल. माझ्या शरीरामध्येही अशाच पेशी आहेत. लाखो करोडो, मोजताही येणार नाहीत
इतक्या. या सर्व पेशी “स्वतंत्र” आहेत. त्यांना त्यांचं जीवनमान आहे, आयुष्य आहे,
जन्म आहे मृत्यू आहे. या सर्व पेशींचा समुच्चय म्हणजे मी. मग स्वतंत्र कोण? मी की
पेशी?
त्या दिवशी ओनियन
रूट टिपचं प्रॅक्टीकल होतं. फर्स्ट इयरपासूनच माझ्या स्लाईड्स कायम चांगल्या
बनायच्या. पण त्याबद्दल माझं कधी प्रोफेसर लोकांनी फारसं कौतुक केलं नाही. मी
वर्गामधल्या सर्वात हुशार मुलींच्या ग्रूपमधली नव्हते ना. खरंतर मी सध्या कुठल्याच
ग्रूपमध्ये नव्हते. हुशार नाही. मठ्ठ नाही. मी सर्वसाधारण होते. माझ्याकडून माझ्या
शिक्षकांना तशाही फार काही अपेक्षा नव्हत्या. त्या दिवशी मायटोसिसची प्रक्रिया अभ्यासायची
होती. मायटोसिस या ना त्या रुपांत अकरावीपासून कुठेना कुठे भेटत आलेलाच होता.
पेशींच्या
केंद्रामधला क्रोमोझोमचं रूपांतर दोन स्वतंत्र एकसारख्या क्रोमोझोममध्ये होतं आनि
त्यांना स्वत:चं स्वतंत्र केंद्रक मिळतं. पण अकरावीला शिकलेला हा इतकुलासा मायटोसिस
थर्ड इयरला फारच डीटेलमध्ये स्टडी करायचा होता. प्रोफेसर बाईंनी सांगितल्याबरहुकूम
मी कांद्याच्या मुळाचा एक सेंमीचा तुकडा काढला. तो व्यवस्थित धुवून घेतला. त्यावर
हायड्रोक्लोरिक ऍसिड घालून त्याला बारा मिनिटं वॉटर बाथमध्ये ठेवला. परत पाण्याने
सर्व ऍसिड धुवून त्यावर फेलुजेन स्टेन घातला. यामुळे पेशींच्या डीएनएला कलर येतो.
नंतर परत ते रूट धुवून त्याला मायक्रोस्कोप स्लाईडवर ठेवला. नंतर कव्हर टिप ठेवून
किंचित ठेधून त्या मुळाचा पापुद्रा बनवला. मायक्रोस्कोप ऍडजस्ट करून पाहिलं तर
माझी स्लाईड व्यवस्थित दिसत होती. मॅडम लॅबमध्ये इकडे तिकडे फिरत सर्वांच्या
स्लाईड्स बघत होत्या. माझी स्लाईड बघून त्या म्हणाल्या. “व्हेरी गूड! लिसन क्लास!
स्वप्निलची स्लाईड येऊन बघा. इथं सेलच्या सर्वच स्टेजेस अगदी क्लीअर दिसत आहेत”
प्रॅक्टीकलच्या बॅचमधला प्रत्येकजण येऊन माझी स्लाईड बघून गेले. “स्लाईड कशी
बनवायची ते स्वप्निलकडून शिकून घ्या. किती नीट नाजुकपणे तिनं हे काम केलंय बघा.”
मॅडम सर्वांना म्हणाल्या.
मॅडमनी
सांगितल्याप्रमाणे मी स्केचेस रेडी करून घेतली. आजचा दिवस खरंच खूप मस्त होता.
जुलैचा रात्रभर पाऊस पडून गेलेला दिवस कसा प्रसन्न असतो. आमच्या तिसर्या
मजल्यावरच्या बायोच्या लॅबमधून दूरवर असलेला समुद्र दिसायचा. करड्या रंगाचा समुद्र
त्यावर करडं आकाश. मध्ये पसरलेलं हिरवंगच्च माळरान. थोड्या दिवसांनी श्रावण आला की
त्या माळरानावर रंगीबेरंगी फुलंच फुलं यायची. मॅडम वर्गामध्ये काहीबाही सांगत
होत्या. कुणी लिहून घेत होतं. माझं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. मी नजर परत
मायक्रोस्कोपकडे वळवली. इवलाल्या त्या चिमुकल्या पेशी. यांचा आकार किती तर ०.७५
मिमी. एका मिमीनेही कमी असणाया या पेशी
बघण्यासाठी माझ्या नजरेपेक्षा हजारपटीने सूक्ष्म पाहू शकणारा मायक्रोस्कोप हवाच.
मी मायक्रोस्कोप ऍडजस्ट केला. डोळ्यांनाही न
दिसणार्या अशा पेशींमधले क्रोमोझोम्स. गुणसूत्रं. कुठल्याही जिवंत गोष्टीची
सुरूवात जिथून होते ते हे क्रोमोझोम्स. आय वॉज वॉचिंग लाईफ. सजीवाला निर्जीव आणि
निर्जीवाला सजीव बनवतात ती ही गुणसूत्रं. आणि माझ्या डोळ्यांसमोर या इवलाल्या
अर्ध्या सेंमीच्या पापुद्र्यामधली क्रोमोझोम्स चक्क एकाचे दोन बनत होते. लाईफ
मूव्ह्ज ऑन. जरी त्याला भविष्य नसलं तरीही... जीवन पुढे जात राहतं. किंबहुना भविष्याची
पर्वा न करता ते पुढे जात राहतं. त्याच्या वेगाप्रमाणे. त्याच्या गतीने, त्याच्या
कुवतीने. म्हणून तर सजीव जगतो. “जगणं” म्हणजे केवळ जगणंच असतं का? मी आयुष्याची वीस
वर्षे जगली आहे. पण इतकी वर्षं जगताना अशा कित्येक अब्जो खरबो पेशी मेल्यात. यापुढेही
मी जगेन ते या पेशींच्या जन्मानं पेशींच्या मृत्यूनं. अख्खं प्रॅक्टीकल संपेपर्यंत
मी माझ्य स्लाईडमधले ते क्रोमोझोम्स बघत होते. एक विक्षिप्त आणि शांत वलय मनामध्ये
तयार होत होतं.
जुलै महिन्याच्या
त्या दुपारी लॅबमधून बाहेर पाहत असताना हलकेच पावसाला सुरूवात झाली तेव्हा मला
जाणवलं—आपल्याला काय करायचंय.
मला जगायचंय ते
मी स्वतंत्र अस्तित्व म्हणून. पण माझं आधीचं अस्तित्व पुसून न टाकता. एका पेशीच्या
दोन पेशी होण्यासाठी आधीची पेशी मारावी लागत नाही. नवीन स्वप्निल तर जन्मली
पाहिजे, पण जुनी स्वप्निल मरता कामा नये.
एमएससीला जायचा
निर्णय असो किंवा चांगली नोकरी सोडून पीएचडी करायचा निर्णय असो, या सर्वांमागे
जुलै महिन्यामधली ही दुपार आहे. त्या दृश्यानं मला माझं अस्तित्व शोधून दिलंय.
>>>>>>>>>>>
“बहोत घुमाया
आपने हमे! चले, आज हम आपको घुमाये” आफताब उगाचच अदबीनं झुकून मला म्हणाला. त्यानं
नवीन कार घेतली होती. पैनपै वाचवून केलेली ही आयुष्यामधली सर्वात मोठी खरेदी.
खरंतर अझरभाईचा बिझनेस अजून इतका पण नीट बसला नव्हता पण कायम बाईकवरून फिरायचा
म्हणून आफताबनं ही कार घेतली. घेताना “मला कार घ्यायचीच” असा हट्ट केला आणि घरी
आणल्यावर मात्र, पुण्य़ाच्या ट्राफिकमध्ये काय नीट चालवणार? त्यापेक्षा इथं गावातच
राहू देत असा लकडा लावला. म्हणजे घेतली ती मुळातच अझरभाईसाठी...
पण स्वत:ची कार
हे त्याचं खूप आधीपासूनच स्वप्न होतं. मी सातवीत असताना आम्ही मारूती घेतली होती. तो
आणि मी बारावीनंतर एकत्र त्याच कारवर ड्रायव्हिंग शिकलो. ती कार तर त्याच्या हातात
एकदम रूळली होती. बाबापेक्षा जास्त त्यानं चालवली असेल. मी अजूनही बिचकत चालवायचे,
पण आफताब एकदम प्रो होता.
चार दिवसांच्या
सुट्टीला आलेला आफताब आज परत निघाला होता. आईनं केलेलं भाज्यांचं लोणचं त्याला
देण्यासाठी मी गडग्यावरून उडी मारून आले होते. अझरभाई घरात नव्हता. नूरीभाभी किचनमध्ये काहीतरी करत होती. तिला इथं येऊन इतके
दिवस झाले तरी ती माझ्याशी जास्त बोलायची नाही. मी तरी कशाला मुद्दाम बोलायला जाऊ!
आफताबच्या इंटर्नशिपचे थोडेच दिवस शिल्लक राहिले होते. फायनलच्या परीक्षेआधी तो
परत एकदा पुणं सोडून गावी अभ्यासाला येणार होता.
“चल, रहने दे. मला
नवीन कारमधून अझरभाई फिरवेल” मीपण त्याला चिडवलं. नूरीभाभीच्या हातून किचनमध्ये
ताट पडलं.
“भाभी, कुछ हेल्प
चाहिये क्या?” आफताबनं बसल्या जागी ओरडून विचारलं. आतून काहीच आवाज आला नाही.
“मुद्दाम करतेय”
माझ्याकडे वळून तो कुजबुजत्या आवाजांत म्हणाला. “कार घेतली ना, ते आवडलं नाही”
“त्यात न
आवडण्यासारखं काय आहे? अझरभाईला फिरायला बरी पडेल.” मी पण आवाज कमी ठेवला.
“त्याची बहुतेक
कामं खेड्यांतून आहेत. बाईकवर उन्हापावसांतून किती फिरणार? तर म्हणे उगाच खर्च
केला. त्यापेक्षा तेवढेच पैसे घालून बाजारपेठेंत फ़्लॅट घेऊ”
“तिकडे कशाला?”
“इकडे सर्व हिंदू
आहेत. आपल्यातलं कोणच नाही. तिला एकदम एकटं पडल्यासारखं होतं. भिती वाटते म्हणे.”
“उगाचच. काझी
फॅमिली किती वर्षं राहतेय की”
मी शाळेत असताना
कुठंतरी मशिद पाडली म्हणून आमच्या गावांत दंगे झाले होते तेव्हादेखील बाबा आणि
शास्त्री आजोबांनी आमच्या परिसरामधल्या सर्वांच्या घरी जाऊन शांत रहायला सांगितलं
होतं. काझी अंकल इथे नव्हते काझीआंटी आणि त्यांची तीन मुलं होती तरी त्यांना
कसलाही त्रास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये दंगे झाले तेव्हाही
गावामध्ये कसलेही दंगे होऊ न देता सर्व काही सुरळीतपणे चालू होतं.असल्या ठिकाणी या
नूरीला कसली भिती वाटतेय?
आम्ही पुढे काही
बोलायच्या आधीच किचनमधून खाण्णकन काच फुटल्याचा जोरात आवाज आला. दोघंही धावतच
किचनमध्ये गेलो तर मी आताच आणलेली लोणच्याची बाटली खाली पडून फुटली होती. ती बाटली
मघाशी मी डायनिंग टेबलावर व्यवस्थित सरकवून ठेवली होती. “कैसे एकदम कोपरेपे रख्खे.
मै जरा गलतीसे हाथ लगाया तो गिर गयी” ती आमचयवरच वसकत म्हणाली.
आईनं सकाळीच
बाबाला आठवडा बाजारात पिटाळून कितीतरी भाज्या मागवल्या होत्या. त्या धुवून चिरून
त्याचं लोणचं मुद्दाम घातलं होतं. आमच्यासाठी अगदी वाटीभरच बाजूला ठेवलं आणि
उरलेलं सगळं तिनं आफताबसाठी दिलं होतं. पुण्यात तो आणि तीन मित्र मिळून भाड्यानं राहत होते. जेवणासाठी
त्यानं मेसचा डबा लावला होता, त्यामधली भाजी काहीवेळा खराब व्हायची म्हणून चवीसाठी
आईनं केलेलं सगळं लोणचं आता फरशीवर पडून खराब झालं होतं. भरीसभर बाटली फुटल्याने त्यात
काचा मिसळल्या होत्या.
“साफ तो करना
होगा” नूरीभाभी वैतागून म्हणेपर्यंत आफताबनं हातात खराटा घेतला होता. “रहने दो
भाभी, मै कर दू.” म्हणत त्यानं झाडायला सुरूवात पण केली. मला खरंतर इतकं वाईट
वाटलं होतं. पण नूरीभाभीला विशेष काही वाटलं नव्हतं. आफताबनं सगळ्या काचा काढून
फरशी साबणानं पुसून घेईपर्यंत ती हॉलमध्ये बसून सीरीयल बघत होती.
“आईला सांगते
घरामध्ये आहे तितकं...”
“अजिबात नाही”
आफताब माझ्यावर डोळे वटारून म्हणाला. “काकींनी इतक्या कौतुकानं केलं होतं ते असं
वाया गेलं म्हणून सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल. काहीच बोलू नकोस. असं समज
की बरणी घेऊन मी पुण्याला गेलो. कुणालाही काही बोलू नकोस. तिला असा दुसर्याचा
हिरमोड करायला फार आवडतं” मी एक क्षण आफताबकडे बघतच राहिले. इतका बदलला हा? दुसर्याचा
इतका विचार त्याला करता येतोय?
“चुकून पडली
असेल”
“स्वप्निल,
टेबलावरची बरणी चुकून जमीनीवर पडेल? हात लागला तर जागच्या जागी कलंडेल. डायरेक्ट
फरशीवर येऊन कशी फुटेल? कोपर्यावर ठेवली नव्हती हे मलाही माहित आहे. तिनं मुद्दाम
केलंय. तिचा माझ्यावर फार राग आहे.”
“पण का? तू तर
इथं नसतोस”
बोलत असताना
आफताबनं कचरा पिशवीत भरून फेकला (गंमत म्हणजे पाचच मिनिटांपूर्वी जी वस्तू खायची
होती ती लगेच आता कचरा बनली. अशावेळी मला अरिफची आठवण येतेच!)
“मी इथं असलो
नसलो तरीही... स्वप्नील,” त्यानं मला अंगणातच थांबवलं, “ही बाई वेडी आहे. कंप्लीट
सायको”
“काहीही”
“आजवर कुणालाच
बोललो नाही. पण भाई आणि हिच्यामध्ये सर्व काही आलबेल नाहीय. रोज दोघांची भांडणं
होतात. भांडणं म्हणजे.. ही बोलत असते आणि भाई ऐकतो. चुकूनमाकून त्यानं काही उत्तर
दिलंच तर ही अजूनच आरडाओरडा करते”
“आमच्याही घरी
कधी ऐकू येतो. पण त्यात..”
“हे बघ,” त्यानं
पाठी अंगणात वाळत घातलेले कपडे दाखवले. “माझ्या शॉर्ट्स. इथं आलो की कायम अशा
कापलेल्या असतात. तीच कापते. तिला मी थ्रीफ़ोर्थ घातलेल्या आवडत नाहीत. धर्माच्या
विरूद्ध आहे म्हणते”
“क्काय्य? आफताब,
तू काहीही बोलतोयस आता”
“मी खॊटं सांगतोय
का? सीरीयसली, ती घरात सायकोसारखी वागते. आता तुझ्यासमोर लोणच्याची बरणी फोडली. हे
माझे कपडे कापलेले दिसत नाहीत का? भाई व्हेज खातो म्हणून कित्येकदा त्याच्या भाजीत
चिकनचे तुकडे टाकते. मी पाहिलंय. विचारलं की म्हणते गलतीसे गिर गया. भाई रोज नमाझ
पढत नाही त्यावरून तर इतकी किटकिट करते. भाईला म्हणते हे घर विकून आपल्या
एरियामध्ये जाऊन रहायचं. इथं राहिलं तर आपली मुलं पण तुमच्यासरखीच काफिर होतील”
“म्हणजे?”
“आम्ही फार
रीलीजीयस नाहीये. नूरी एकदम कर्मठ आहे. घरामध्ये बर्याच गोष्टी तिला आवडत नाहीत. भाई
तर तुला माहिताय, सगळ्यावरून ओवाळून टाकलेला आहे. फ्रायडेची नमाझ मुश्किलीने पढतो.
तिला लवकर बाळ हवंय. लग्नाला दोन वर्षं झाली पण भाई म्हणतो की जोपर्यंत सर्व काही
ठिक होत नाही तोपर्यंत नको. मग परत दोघांत वादावादी. आय गेस, भाईला हे लक्षात
आलंय. तिचं वागणं, तिला मेंटली प्रॉब्लेम आहे ते, म्हणूनच तो बेबीसाठी...” आम्ही
बोलत असतानाच काहीतरी कामाचं निमित्त काढून नूरी मागे अंगणात आली. ती अलेली बघून
आफताब एकदम गप्प झाला. मी पण काहीच बोलले नाही. तरी तिला एकंदरीत तिच्यावरूनच विषय
चालू असेल हे समजलं होतं. ती परत आत गेल्यावर मी म्हटलं. “शॉर्ट्स घालू नको! धर्माविरूद्ध
आहे”
“डोण्ट आस्क,
तिच्या मते, माझं सी ए शिकणं पण धर्माविरूद्ध आहे. तिच्या सांगण्यानुसार आम्ही
वागलो ना तर कंप्लीट वेडे होऊ. भाईची तर हालत खराब करून ठेवली आहे. तुला माहित
नाही. तो हल्ली रोज पितो.”
“तो उगाच
सांगतोस. बाबासोबत महिन्यातून कधीतरी.”
“स्वीटहार्ट,
माझ्या खोलीत त्यानं बाटल्या लपवल्यात. यतीनकाकासोबत प्यायला बसतात ते वेगळंच. हे
घरात वेगळंच. त्यावरूनसुद्धा नूरी भडकते. प्यायलेला असेल तर त्याला बेडरूमममध्ये
येऊन देत नाही. म्हणून तो रोज पितो. कळ्ळं? लिसन, तिची चर्चा पुरे. संध्याकाळी
रेडी रहा. आपण नवीन कार घेऊन फिरायला जाऊ”
“निधीपण येणारे?”
“निधी चारचौघांत
माझ्यासोबत कुठे येते का? आज तर बिलकुल येणार नाही. तिची कायतरी एक्झाम आहे.
त्यामुळे आज तू आणि मी. तू म्हणशील तिथं जाऊ. चालेल?”
“तुला रात्री परत
पुण्याला जायचंय तेवढं लक्षात ठेव. खूप दूरवर नेऊ नकोस” त्या संध्याकाळी आम्ही
गावाच्या जवळच फिरायला गेलो.
“तुला ड्राईव
करायचंय?” परत येताना आफताबनं विचारलं.
“नको. तू मस्त
चालवतोयस. नवीन कार असूनपण”
“कित्ती आळशी
आहेस गं तू” त्यानं मला चिडवलं. “मला ना लहानपणापासून ड्रायवर व्हयचं होतं.
गाड्यां तेव्हापासून आवडायच्या. आता फायनल झाली ना की मी हेवी व्हेइकलचं लायसन्स
काढणार आहे”
“आफताब – द ट्रक
ड्रायव्हर!”
“इन्शा अल्लाह,
तेही करून बघू.”
माझं फायनलचं वर्ष रडतखडतच सुरू झालं पण पहिलं
सेमीस्टर संपायच्या आधीच मी माझ्या नवीन आयुष्यात कंफर्टेबल झाले होते. इतके दिवस
कॉलेज इज इक्वल टू केदार असं समीकरण होतं ते बदलून कॉलेज इज इक्वल टू स्टडींग असं
नवीन समीकरण रूजवून घेतलं. गौतमीच्या नोट्स झेरॉक्स करून घेणे आणि त्या वाचणे
म्हणजे माझा अभ्यास असायचा. पण गेले महिनाभर मी गौतमीसोबत बसून नोट्स काढत होते.
त्यासाठी चारपाच पुस्तकं लायब्ररीमध्ये बसून वाचायची, समजून घ्यायची वगैरे करताना मला
आवडत होतं. आफताबला इतके दिवस बूकवर्म म्हणून चिडवायचे, पण आता जाणवलं की पुस्तकं
खरंच तुम्हाला किती कंफर्ट देऊ शकतात. रिकामं बसलं की डोक्यामध्ये वेगवेगळ्या
विचारांची गर्दी व्हायची, पुस्तकं वाचताना मात्र (भले ती अभ्यासाची असोत वा नसोत)
ते सगळे विचार बाजूला काढून टाकल्यासारखे व्हायचं. आफताबनं मला एका कधी न ऐकलेल्या
लेखकांचं पुस्तक वाचायला दिलं होतं. “वनवास” नावावरून मला हे फारच बोअर किम्वा रडकू
पुस्तक असेल असं वाटलं होतं. पण काय पुस्तक होतं ते!! सहज काय आहे म्हणून बघयाला
पहिलं पान उघडलं ते डायरेक्ट सगळं पुस्तक संपवून मगच उठले. दुपारी कधीतरी वाचायला
लागले होते. तिन्हीसांज झाली तरी मी वाचतच होते. आयुष्यात मी पहिल्यांदाच एखादं
पुस्तक असं सलग वाचलं होतं.
साधं सरळ आणि
तरीही एकदम गुंगवून ठेवणारं लिखाण. केदारप्रकरण झाल्यानंतर मी इररांसमोर खोटं खोटं
कित्येकदा हसली असेन, पण माझ्या खोलीत बेडावर पालथं पडून उशीवर हात ठेवून ते
पुस्तक वाचताना मी एकटीच अगदी खरंखुरं मनापासून हसले होते. नंतर झपाटल्यासारखी मी
प्रकाश संतांची उरलेली तीन पुस्तकं मागवली आणि अशीच सलग वाचली. एका नवीनच निरागस
पण खूप ओळखीच्या विश्वाची नव्यानं ओळख झाल्यासारखं वाटायला लागलं.
इतके दिवस
कॉलेजमधल्या प्रोफेसरांसाठी मी “जस्ट अनदर गर्ल” होते. माझ्याकडून त्यांना तशाही
काही अपेक्षा नव्हत्या, पण गेले काही दिवस मात्र माझं एकंदर प्रॅक्टीकलमधलं स्किल
बघून मला “तू नंतर एमएस्सी का करत नाहीस?” असा सल्ला मला दिला होता. वेल, पुढे
शिकायचंय हे मी कित्येक दिवस आधीच ठरवलं होतं. एम बी ए, मास कॉम, एम सी ए वगैरे
अनेक मास्टर्स कोर्स करता येण्यासारखे होते. माझ्या आवडीचं म्हटलं तर फॅशन
डीझायनिंग, ऍडव्हर्टायझिंग वगैरे कोर्सेसची माहितीपण मी काढायला सुरूवात केली
होती. यापैकी कुठलाही कोर्स आमच्या गावात नव्हताच. म्हणजे पुढं शिकायचं झालं तर
गावातच एम एस्सी करायची किंवा गाव सोडून पुण्यामुंबईला जायचं. केदार प्रकरण झाल्यामुळे आईबाबा मला गावाबाहेर
पाठवतील का याची मला खात्री नव्हती गावातच एम एस्सी करायचं म्हणजे “लग्न जमेपर्यंत
शिकत राहणे” याचं एक गोंडस नाव झालं असतं
आणि तेच मला करायचं नव्हतं.
अखेर काहीतरी
निर्णय घ्यावा लागणारच होता.