Monday, 11 July 2016

रहे ना रहे हम (भाग १२)

शहराबाहेर अनेक नवीन बिल्डिंग बांधल्या जात होत्या. तशाच एका कॉलनीमधल्या छोट्या पण नवीन बिल्डिंगसमोर केदारने गाडी थांबवली.
“माझ्या मित्राचा फ्लॅट आहे.” तिसर्‍या मजल्यावरच्या एका दाराचं कुलूप उघडत तो म्हणाला. “तो दोन वर्षासाठी युएसला गेलाय. मला म्हणाला कुणी भाडेकरू मिळाला तर बघ. एकदम नवीन आणि फुली फर्निश्ड फ्लॅट आहे. म्हटलं, मलाच भाड्यानं दे.”
“म्हणजे?”
“तुझं आणि माझं कधीही होऊ देत. महिन्याभराने किंवा तुझी डिग्री झाल्यावर. आपण इथंच रहायचं. जॉइंट फॅमिलीमध्ये तुला टोचून हैराण करतील. तुझ्याच्याने ते निभवणार नाही. त्यापेक्षा आपण आधीपासून वेगळं राहूया” केदार उत्साहानं नुसता फसफसत होता. “तुझा आणि माझा संसार. काऊ, आपला संसार”
“आता मी बोलू? बाबा तयार झाला. जूनमध्ये लग्नासाठी” केदार आधी खुश दिसत होता, मी हे सांगितल्यावर तो जे काय दिसायला लागला त्यासाठी जगामध्ये शब्दच नाहीत.
“खरंच.” त्यानं मला जवळ ओढून मिठीत घेतलं. वेल, फ्लॅट मस्तपैकी फर्निश्ड होताच. आम्ही सेलीब्रेशन अगदीच दणक्यात केलं. रात्री जवळजवळ दहा वाजता मी घरी गेले. मी उशीर होइल म्हणून फोन केलाच होता. केदार मला सोडायला घरी आला तेव्हा आईनं त्याला आत बोलावलं. “जेवूनच जा” बाबा म्हणाला.
उशीर होइल सांगण्यासाठी त्यानं घरी फोन केला. फोनवरचा निरोप ऐकताच त्याचा चेहरा एकदम बदलला. “मी लगेच निघतो. घरी प्रॉब्लेम झालाय.” इतकंच म्हणून तो निघाला.


यानंतर जे काय घडलं ते मला सरळपणे कधीच समजलं नाही. तुकड्यातुकड्यांत थोडं याच्याकडून त्याच्याकडून. केदारच्या त्या काकींना हे लग्न मोडण्यासाठी अखेर अतिशय परफेक्ट कारण त्याच दिवशी मिळालं होतं. आधीसारखं त्यांनी केवळ केदारच्या आजीआजोबांना वगैरे न सांगता सरळ घरामध्येच सर्वांना एकत्र बोलावलं. केदार तेव्हा दुकानात असणार हे त्यांना माहित होतं. त्यामुळे त्याला ही सर्व भानगड माहितच नव्हती. सर्वांसमोर काकीनं अखेर आपलं अमोघास्त्र फेकलं. हे लग्न आता मॊडायलाच हवं होतं.
काकीला कुठूनतरी आईच्या कॅन्सरबद्दल समजलं होतं. काकीच्या मते, इतकी मह्त्त्वाची गोष्ट आम्ही त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. काकीने कुठल्यातरी मॅगझिनमधलं आर्टीकल शोधून हा कॅन्सर अनुवंशिक असतो आणि मला होण्याचे कितीतरी टक्के चान्सेस आहेत वगैरे भाषणबाजी केली. शिवाय सोबत कुठंही लिहिलें नसताना उद्या हा कॅन्सरसारखा आजार केदारला झाला तर काय असा बिनडोक सवालही केला. हा कॅन्सर केवळ आणि केवळ “भानगडी” केल्याने होतो, म्हणजे माझा बाबा आणि माझी आई दोघंही वाईट चारित्र्याचे आहेत हा निष्कर्ष काढला.


खरंतर आईला कॅन्सर झाला होता ही गोष्ट काही कुणी लपवली नव्हती. माझ्या जन्माच्या आधी जी लोकं आईबाबाला ओळखत होती त्यांना ही गोष्ट माहित असणार. आईचं युटेरस काढून टाकलंय हे तर बहुतेकांना माहित होतं. यानंतर आईला अर्थात मूल झालंच नसतं. मीच एकटी हेही माहित होतं. पण काकीबाईनं सर्व फॅक्ट्स तिच्या मनाला येईल तसे उलट सुलट करून वापरले. शिवाय स्वत:ला मूल झालेलं नसल्याचं दु:ख त्यात मिसळलं. आणि उद्या केदारच्या बायकोच्या बाबतीत असंच झालं तर घराण्याचं काय? असं विचारलं. जितकं मी ऐकलंय त्यावरून तरी काकीचा हा एकपात्री प्रयोग फारच परिणामकारक झाला असणार. कारण, लगेच केदारच्या आजोबांनी हे लग्न कुठल्याही परिस्थितीत होणार नाही हे सांगितलं. त्यावर केदारची आई काही बोलायला गेली तर लगेच इतरांचे आवाज वाढले. घरामध्ये इतका आरडाओरडा आणि गोंधळ झाला की केदारच्या पणजीचं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून त्यांना ताबडतोब नेऊन आयसीयुमध्ये ऍडमिट करावं लागलं. तिथे नेताना पणजींनी “माझी इच्छा आहे की केदारचं लग्न त्या मुलीबरोबर करू नका” असं सांगितलं. इथं केदारच्या आईंनी पण आमच्या नात्याचा हात सोडून दिला. नव्वद वर्षांच्या म्हातारीच्या अखेरच्या इच्छेचा मान म्हणून एका विशीमधल्या मुलीच्या भविष्याचा खून करण्यात आला.


हे सर्व असं काही घडलंय याची मला कल्पनाच नव्हती. बाबा तयार झालाय याच आनंदात मी होते. नेटवर इमेजेस सर्च करत होते. शालू कसला घ्यायचा. घागरा घ्यायचा का? हनीमूनला कुठं जायचं? केदारला सूट छान दिसेल की शेरवानी. करवली म्हणून निधीला सांगायचं. तिला मस्त डीझायनर साडी आहेरात द्यायची. माझ्या लग्नात मला बुफेचं जेवण नको. छान पंगत मांडायची. रिसेप्शनला मात्र चाटचे वेगवेगळे स्टॉल्स हवेतच. तेव्हा टिपिकल जेवण नको. आईचे सगळे दागिने जुन्या स्टाईलचे आहेत.. मला नेकलेस वेगळ्या स्टाईलचे हवेत. कानातले मोराच्या डीझाईनचा एक हवाच. बांगड्यांना देवदास स्टाईलचे झुमके हवेत. देवदासवरून  आठवलं, मला वेणीमध्ये घालायला ते हेअर ऍक्सेसरीजचे पिसेस हवेत.
दुसर्‍या दिवशी बाबा केदारच्या घरी जाणार होता. पुढची बैठक कधी करायची म्हणून विचारायला. पण त्याआधीच  सकाळी दुकानांत गेल्या गेल्या त्याला केदारची पणजी सीरीयस असल्याची खबर मिळाली. आईला त्यानं फोन करून सांगितलं म्ह्णून आई पद्धतीनुसार हॉस्पिटलामध्ये बघायला गेली. तिथे काकीबाईंनी आईला हवंनको ते सर्व काही आयसीयुच्या दारात ऐकवलं. तेव्हा केदारची आई तिथं नव्हती.

आई परत आली तीच डोळे पुसत. मी केदारला दुकानात फोन लावला, घरी फोन लावला. अगदी तो ज्या इन्स्टिट्युटमध्ये हार्डवेरचा कोर्स करत होता तिथेही फोन केला. केदार कुठेही नव्हता.
तीनचार दिवस याच भानगडीमध्ये गेले. माझा निरोप केदारपर्यंत पोचत नव्हता. बाबा एकदा केदारच्या घरी जाऊन आला. तिथे केदार कामानिमित्त गोव्याला गेलाय म्हणून सांगितलं. लग्न मोडलंय हे तर आता स्पष्टपणेच ऐकवलं.

मला त्या घरातल्या इतर लोकांबद्दल काहीही देणंघेणं नव्हतं. मला फक्त केदारचा आवाज ऐकायचा होता. त्याला बघायचं होतं. भेटायचं होतं. बाबा म्हणाला “त्या म्हातारीला डिस्चार्ज देऊन घरी आणलं की मगच जाईन. घरात काय पाताळात कुठे असेल तिथून शोधून आणीन. दोन तासांत नाय रजिस्टर मॅरेज लावलं तर बघ. घाबरू नकोस”

मला रात्रभर झोपच येत नव्हती. एकदा अशीच या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते तेव्हा फोन वाजला. रात्रीचा दीड वाजला होता. इतक्या रात्री कुणाचा फोन असेल म्हणून मी दुसर्‍याच रिंगला फोन उचलला.
“हॅलो. झोपली होतीस?” पलिकडून आवाज आला.
“केदार! केदार....” माझ्या आवाजावरून मी झोपले नव्हतेच हे त्याला समजलं असेलच.
“काऊ! आय मिस यु” त्याचा आवाज खूप खोलवर आणि दमलेला वाटत होता. “आय रीअली मिस यु” तो दारू प्यायला होता का? बहुतेक हो.
“केदार, कुठे आहेस? किती फोन केले. तुझ्या दुकानात पण मी येऊन गेले. आई पण हॉस्पिटलमध्ये..”
“माहित आहे गं. सगळं माहित आहे. तू इकडे ये. आता. ताबडतोब”
“रात्रीचा दीड वाजलाय. केदार, तू आहेस कुठं? मी उद्या सकाळी येते. तुझ्या घरचे नाही म्हणतात ना लग्नाला. नक्को तर ठिक आहे. तू आणि मी लग्न करू. मला तुझं घर नकोय. फक्त तू हवायस”
“मला फक्त तू हवीस. काऊ, आज आईला ऍडमिट केलंय.. गेले चार दिवस ती काही खातपित नाहीय. अडकलोय गं मी. मला म्हणते मी तुझा नाद सोडून द्यायचा. कसं शक्य आहे? मी तुझा नाद सोडून द्यायचा...” नक्कीच केदार प्यायलेला होता.
“हे काय चालूये? केदार, तुझ्या घरामध्ये मला आणि माझ्या घरच्यंना बरंच काही बोललं गेलंय. मी ते सर्व इग्नोर करेन. पण तू.. तू माझा साथ देशील ना? सांग ना?”
“आईचा बीपी खूप कमी झालाय. सलाईन लावलं तर तेही तिनं काढून टाकलंय. कावेरीताईचा फोन आला. मलाच ओरडली. आईची किंमत नाही. मी वाईट आहे. मुलीचा नादासाठी आईला, पणजीला मारायला उठलोय. मी या घराण्याचा एकमेव वारस. मीच घरातल्यांना मारतोय.. मी काय करू?”
रात्री दीड वाजत त्या अंधारामध्ये मी कानाला रीसेव्हर लावून जागच्याजागी बर्फ होत गेले. दिस कान्ट बी हॅपनिंग. केदार, माझा केदार मला सोडू शकत नाही. नो. मी आजपर्यंत आयुष्यात काही वाईट काम केलेलं नाही. कुनालाही दुखावलेलं नाही. माझ्याबाबतीत असं घडू शकत नाही. प्लीज. देवा. प्लीज. प्लीज.
“एकच वर्ष काय... स्वप्नील.. अख्खं आयुष्य घेऊन टाक. पण सोडव मला या द्विधेमधून ... तूच सांग मी काय करू?”
 “केदार, मी आता काय करू?” अखेर मी बोलले.
“आता इकडे ये. ताबडतोब. मला घेऊन चल. माझ्यात एकट्यानं हिंमत नाही. पण तू सोबत असशील तर मी येईन. तू म्हणशील तिथं. ये ना”
“येते, मी आता लगेच येते. डोन्ट वरी. तुझ्या आईला पण काही होणार नाही..”
“आईनं माझ्या कानाखाली मारली. मला विचारलं. तुझे तिच्यासोबत काही शारीरीक होतं का? म्हटलं हो. तर म्हणाली किती दिवस. म्हटलं गेले दोन वर्षं. मग काकी म्हणाली की पाहिलंत दोन वदर्षांत तिला काही झालं नाही म्हणजेच ती वांझा आहे. मी म्हटलं तसं नाही. वी युज प्रोटेक्शन. तर आईनं मला थोबाडीत मारली. पुढं बोलू नको”
“हे सगळं आता बोलायची वेळ नाही. तू कुठे आहेस? मी येऊ ना?”
“मला कोंडून ठेवलंय, काऊ. मला या खोलीत बंद केलंय. माझ्या काकांनी. मी बाहेर जाऊ नये म्हणून. बहिणीनं फोन आणून दिला म्हणून मी फोन केला. तुला. तुझी खूप आठवण येते. माझ्यात हिंमत नाहीये काऊ. तुला आठवतं मी त्या दिवशी तुला म्हणालो मित्रांसोबत पैज लावली. काही पैज लावली नव्हती.”
“माहिताय रे”
“नाही माहित तुला. रोज बघायचो. कॉलेजमध्ये. खूप आवडायचीस. पण बोलायची हिंमत नव्हती. निधीकडून तुझी माहिती काढली. अखेर एके दिवशी हिंमत केली. तू पण बोललीस. पन तरी मी.... घाबरलो होतो. काऊ, माझ्यात हिंमत नाहीये”
“आपल्याला काय लढायला युद्धावर जायचं नाहीये. तुझं आणि माझं आयुष्य आहे. मी येते. आता लगेच तुझ्या घरी. तुझ्या घरातलेच काय स्वर्गातले देव पण मला अडवू शकणार नाहीत. कळलं?”
मी बोलत राहिले पण पलिकडून काही आवाज आला नाही. फोन कट झाला होता. आमचा कॉलर आयडी तेव्हा बंद पडला होता, त्यामुळे फोन कूठून आलाय ते समजेना. मी त्याच्या घरचा फोन फिरवला. रिंग वाजत राहिली.
माझा फोनवरचा आवाज ऐकून आई उठून बाहेर आली होती. काय बोलणं झालं ते मी सर्व तिला सांगितलं. बाबा पण उठला. मला म्हणे, चल आता त्याच्या घरी जाऊ. आई त्यालाच ओरडली. रात्रीच्या वेळी काय तमाशे करायचेत का? उद्या सकाळी जाऊया.
सकाळ उजाडली तेव्हा केदारच्या भल्यामोठ्या घरात कुणीही नव्हतं. दुकानही बंद होतं. दुकानामध्ये काम करणार्‍या लोकांनापण काही माहित नव्हतं. केदार म्हणाला होता की आई ऍडमिट आहे म्हणून बाबानं हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. पण केदारची आई गावामधल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नव्हती.
चार दिवसांनी निधीनं मला केदारच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका आणून दिली. तिच्याकडे कुणीतरी आणून दिली होती म्हणे. अजून पंधरा दिवसांनी केदारचं लग्न होतं. त्या काकीच्या भावाच्या लेकीसोबत.
>>>>>> 

मी या कहाणीमध्ये केदारला व्हिलन करू शकते का? नक्कीच. त्यानं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. लग्नाची आमिषं दाखवली. माझा उपभोग घेतला. नंतर वेळ आल्यावर मला सोडून घरच्यांच्या पसंतीनं लग्न केलं. केदार टिपिकल व्हिलन कधीही होऊ शकतो. पण मी करणार नाही. कारण, मला त्याची बाजू माहित आहे. हे लग्न त्यानं मनाविरूद्ध केलं होतं. हे सर्व घडलं तेव्हा तो काही फार मोठा नव्हता. अवघा बावीशीचा तर होता. तसं अरेंज मॅरेजवाल्यांच्या दृष्टीने लग्नासाठी “जरा लवकरच”. त्यानं काय करणं अपेक्षित होतं? माझ्यासोबत पळून जाणं. घरच्यांसोबत भांडणं, घरच्यांशी संबंध तोडणं.... यापैकी काहीही केलं असतं तरीही आमचं लग्न झालंच असतं का? तो मला चल पळून जाऊ असं तीन चारदा म्हणाला. मीच नको म्हटलं. आईनं पळून जाऊन लग्न केलं होतं आणि वीस वर्षानंतरही तिला यावरून टोमणे ऐकावे लागत होते.


केदार स्वत:हून म्हणाला की त्याच्यामध्ये हिंमत नाही. पण हिमतीचा प्रश्न का येतो? त्यानं माझ्यावर प्रेम केलं.. मी त्याच्यावर प्रेम केलं. सिंपल. त्यासाठी आम्हाला इतकी यातायात का करावी लागली? आम्चं लग्न होऊच नये म्ह्णून इतका आटापिटा का केला? आज कित्येक वर्षांनी मी जेव्हा कधी या संपूर्ण प्रकरणाचा विचार करते तेव्हा मला एकच कारण जाणवतं. इगो. केदारच्या घरामधल्या लोकांचा इगो दुखावला गेला होता. कारण त्यानं स्वत:हून लाईफ पार्टनर निवडली. ही त्याची सर्वात मोठी चूक. त्यानं मीच काय माझ्याऐवजी दुसरी कुठलीही सद्गुणी सुशील पोरगी आणली असती तरी तिला हेच ऐकावं लागलं असतं.. आमच्या लोकांचा ना एक प्रॉब्लेम असतो. आम्हाला आमच्या पोरांच्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा हवा असतो. त्यापैकी लग्न हा तर सर्वात मोठा कोपरा. मुलाने स्वत:हून मुलगी निवडली की ती “वाईट्ट” असणार हे आम्ही आपलं आपण ठरवून मोकळे होतो. वयाच्या अडनिड्या कोपर्‍यावर त्याला कुणीतरी “आवडतं” तो धीर करून तिच्याशी बोलतो. ती त्याला प्रतिसाद देते, दोघं एकमेकांना आवडतात. जाणून घेतात. शरीराच्या, मनाच्या, भावनेच्या प्रत्येक पायरीवर एकमेकांच्या जवळ येतात. हळूहळू एकमेकांमध्ये गुंततात. भविष्याची स्वप्नं पाहू लागतात. एकमेकांच्या व्यक्तीमत्त्वामधले दोषसुद्धा त्यांना जाणवतात, पण ते दोष स्विकारण्याची मानसिकता त्यांची तयार होते. या सर्व क्रियाप्रक्रियांशी या लोकांना काही देणंघेणं नस्तं. त्यांच्या मते, तरूण पोरं प्रेमं करतात ते केवळ सेक्ससाठीच. सेक्स त्या वयात फार महत्त्वाचा असतो. नाही कोण म्हणतंय? पण अशावेळी ती मुलगी मात्र लगेच बदफैली होते. मुलगा “नादाला” लागतो. अरेंज मॅरेजमध्ये कसं सर्व काही सुरळीत समाजमान्य पद्धतीने. लग्नाच्या मांडवात एकमेकांना पाहिलेले नवरा बायको अजून काही तासाभरातच एकमेकांच्या अंथरूणात असतात. आता त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र असतं त्यामुळे तिच्यासोबत त्याच मुलानं काहीही केलं तरी ते चालू शकतं. किंबहुना “काहीही” करावं हीच अपेक्षा असते. मग ते नवरा बायको स्वत: कितीका ऑकवर्ड असेनात का. सेक्सची क्रिया तीच, पण आता ती लफडेबाज नसते. “पवित्र” असते. दांभिकपणाच कळस असतो हे सर्व काही. हरतालिकेच्या नावानं उपास करायचा चांगला नवरा मिळावा म्हणून. पण त्या पार्वतीनं नवरा आपल्या मनानं निवडला होता याकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करायची.

केदारच्या बाबतीत हेच तर घडलं. त्यानं मुलगी निवडली हा राग सर्वात मूळचा. इतर सर्व त्यावर नुसती पुटं चढवलेली. अर्थात हे मला तेव्हा सुचलेलं शहाणपण नाही. आज कित्ये्क वर्षांनी विचार करताना जाणवतं. आता जाणवून तरी काय उपयोग आहे. तीर कमानसे निकल चुका. तसा मी फारसा केदारचा विचार करतच नाही. केला तरी त्या सर्व आठवणींचा पूर येतो.


अरिफने मृत्यूशी माझा परिचय करून दिला होता. केदारमुळे मृत्यूशी मैत्री झाली. मृत्यू काय असतो? शेवटचा श्वास घेणं? शरीराचं कुजणं? प्रेताची आग होणं? नाही, मृत्यु केवळ इतकाच नसतो. मृत्यू असतो आपल्याच मनामध्ये आपण मारून टाकलेलं कुणीतरी. मी मनातल्या मनात केदारला कितीतरीवेळा मारलं. प्रयत्न केला. कितीतरी दिवस मी स्वत:ची समजूत घातली की केदार मेला. त्यानं मला धोका दिला नाही. मृत्यु त्याला ओढून घेऊन गेला. तो घरामध्ये असाच गप्पा मारत होता. अचानक चक्कर येऊन पडला आणि तो गेला. अगदीच अचानक. मी त्याच्या प्रेताला गेले होते. त्याची आईबाबा काकी काका सर्व खूप रडत होते. केदार तिरडीवर झोपला होता. मी त्याला बघून खूप रडले. आई मला सांभाळत होती तरी मी धाय मोकलून रडत होते. इतकी रडले की अखेर डोळ्यांतून वाहण्यासाठी अंगात पाणीच शिल्लक राहिलं नाही. 
मग नंतर मला त्याचा कंटाळा आला. मग मी मनातल्या मनात दोन तीनदा त्याचा खून केला. मग तेही बोरींग झालं. मग मी सरळ केदारला परदेशांत पाठवलं. मग मी केदार आणि निधीचं अफेअर आहे असं मला समजलं म्हणून मी त्याला सोडलं असंही करून पाहिलं. मनाचे कितीही खेळ केले तरी सत्य परिस्थिती काही बदलत नव्हती.


केदारने केवळ मला सोडून दिलं नाही, तर त्यानं लग्नदेखील केलं. खरंतर त्याला जबरदस्तीनं करावं लागलं. वैद्यकशास्त्र सांगतं की तुम्ही शरीराच्या वेदना थोड्या दिवसांनी विसरून जाता. ती वेदनांची तीव्रता नंतर आठवत नाही. पण मानसिक वेदना मात्र कधीच तश्या नसतात. कितीही दिवसांनी, कितीही वर्षांनी जरी त्या आठवल्या तरी त्या तितक्याच तीव्र असतात. तसंच या केदारच्या आठवणींचं आहे.
केदारच्या लग्नाचं समजल्यापासून बाबा केवळ धुमसत होता. काहीही करून त्यानं हे लग्न मोडलं असतं. लग्न नाहीतर केदारचे हातपाय नक्कीच. मीच सांगितलं नको म्हणून. काय उपयोग होता? ज्या रात्री केदारने मला फोन केला तेव्हा तो कारवारकडच्या कुठल्यातरी मूळगावी होता. ही लग्नाची भानगड त्यांनी तिथंच निस्तरली. लग्न लावून जवळ्जवळ चार दिवसांनी ते सर्व जण गावात परत आले. हे सगळे दिवस मी घरामध्ये बसून काढले.  अजून काय करणार होते? रोज जादू भेटायला यायचा. असंच काहीतरी गाणी अथवा पिक्चरची डीव्हीडी द्यायला. आला की तासभर गप्पा मारायचा. माझं मन हलकं करण्यासाठी तो येतोय हे मला समजत होतं. पण दोन तीनदा त्यावरून त्याचं आणि नूरीचं भांडण झालं. नूरी त्याच्याशी भांडताना मुद्दाम किचनच्या कट्ट्य़ाजवळ उभं रहून ओरडायची. म्हणजे तो आवाज माझ्याही खोलीपर्यंत पोचायचा. मीच मग जादू आला की “मला बाहेर जायचंय” असं सांगून कार घेऊन जायला लागले.
कॉलेजच्या फर्स्ट इयरला असल्यापासून मी वजन कमी करायच्या मागे लागले होते. तशी लहानपणापासून गुबगुबीत होतेच, पण एफवायपर्यंत पारच जाड झाले होते. जिम आणि एक्सरसाईझ चालू केला होता, डायेटिंगचे असफल प्रयत्नही चालू होते. पण या महिन्याभरात मी कसलाही व्यायाम न करता दहा किलो वजन कमी केलं. डोक्यावरचे केस पातळ झाले. सहज केसांतून हात फिरवला तरी गुंताच्या गुंता हातात यायचा. आईला बाबाला माझी फार चिंता होती. बाबा तर म्हणायला लागला चल, कुठंतारी फिरून येऊ. हिमालय नाहीतर दुबई सिंगापोर असं कुठंतरी लांब, मला कुठंही जायचं नव्हतंच.


मी केदारसाठी  रडत वगैरे होते का? तर नाही. मला एक गोष्ट समजली होती की आता केदार माझा राहिला नाही. केवळ लग्नामुळे आमचं नातं बदलत होतं का? माझ्या मनामध्ये एक प्रसंग मी कायम रंगवायचे. केदार परत आलाय. त्याचं लग्नं झालंय तरी तो परत आलाय. त्याचं अजून माझ्यावर किती प्रेम आहे तो सांगतोय. मीही त्याला तेच सांगतेय. “खड्ड्यात गेलं तुझं ते लग्न. आय डोंट केअर. तू अजूनही माझाच आहेस. माझाच राहशील. मी अशीच लग्नाशिवाय तुझ्यासोबत रहायला तयार आहे” पण मग तितक्यात केदारची बायको तिथं येते. मी तिला कधी पाहिलं नाही पण तिचा चेहरा सेम माझ्या आईसारखा. आणि आरश्यामधलं माझं प्रतिबिंब् थेट त्या काळ्यासावळ्या संध्यासारखं. मी चिडून तो आरसाच फोडून टाकते.


मी आयुष्यात कधीही “दुसरी बाई” बनू शकले नसते. दुसर्‍याची कुठलीही वस्तू मला नको हवी होती. केदार चाप्टर मी माझ्यापुरता तरी संपवून टाकला. आईबाबाला माझी तडफड दिसत होती, समजतही होती. पण त्यांना हे समजत नव्हतं की मी आता केदारसाठी झुरत नाहीये. इट्स ओव्हर. संपलंय ते सर्व काही.
डिग्रीचं फायनल आता पूर्ण करायचंच होतं. त्यानंतर काय...
रात्र रात्र झोप लागत नव्हती ती या विचारानेच. या दिवसांमध्ये मी स्वत:ला खूप म्हणजे खूप प्रश्न विचारले. आपल्याला केवळ कुणाची तरी मिसेस इतकीच ओळख हवी आहे का? आपण काहीतरी केलंच पाहिजे. माझ्यासमोर भलीमोठी पोकळी होती, निर्वात होता. त्या पोकळीमध्ये मला माझं आयुष्य बसवायचं होतं. असंतसं अस्ताव्यस्त नाहीतर नीटपणे सुबक मांडून. केदारच्या लग्नाची तारीख उलटून चारपाच दिवस झाले असावेत. एके रात्री अकरा वाजता कुणीतरी माझ्या खोलीचं दार वाजवलं. मी कंप्युटरवर गेम खेळत बसले होते. समोर आफताब उभा होता.
“कशी आहेस?” त्यानं विचारलं. माझा एकंदरीत अवतार बघून तो बराच दचकलेला दिसत होता.
“ठिक, तू कसा काय आलास?”
“एक फोन सुद्धा केला नाहीस ना?” त्यानं दोन्ही हात पसरून माझ्या खांद्यावरून वेढून मला जवळ घेतलं. आमच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये पहिल्यांदाच आम्ही इतक्या जवळून एकमेकांना स्पर्श केला असेल. पण हा स्पर्श समजूतदारपणाचा होता. आश्वासकतेचा होता “आय कॅन अंडरस्टॅंड युअर पेन” हे सांगणारा हा स्पर्श होता. इतक्या घट्टपणे. पुढे आयुष्यामध्ये मी कितीतरी वेळा आफताबच्या मिठीत शिरले. पण याक्षणी त्याच्या स्पर्शात दिलासा आणि अनुभूती होती. त्यानं मला काही संगायची गरजच नव्हती. तो मला तसाच धरून कितीतरीवेळ उभा होता. माझ्या केसांमधून हलकेच हात फिरवत तो म्हणाला. “त्याच्याकडून सीरीयसली ही अपेक्षा नव्हती” मग तो म्हणाला.
“जे झालंय ते ऑलरेडी होऊन गेलंय. प्लीज. त्यावर आपण नको बोलूया.” मी त्याच्यापासून दूर होत म्हटलं. “अचानक कसा आलास?”  
“सहज दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणून आलो. थोडं इकडं भाईचं काम पण होतं.”
“ओके.” पुढं काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. एरवी आफताब कधीही आला तरी पिटपिट बोलायचा, मला चिडवायचा, चेष्टा करायचा. आज मात्र तो शांतपणे केवळ माझ्याकडे बघत उभा होता.  
दोन दिवसांनी आफताब परत गेला, जाताना केवळ मला एकदा हाक मारली. बाकी पूर्णवेळ तो घराबाहेरच होता. माझ्याशी फारसा बोललापण नाही. महिन्याभरानंतर कधीतरी तो माझं कॉलेज सुरू झाल्यावर एकाच दिवसासाठी आला.

केदार आठ दिवसांनी दुकानात रोज यायला लागला. बाबा दुकानांत असला की तो समोर यायचादेखील नाही. घाबरत होता किंवा कदाचित स्वत:चीच लाजदेखील वाटत असेल. पण शेवटी चुकून किती चुकवणार. अखेर स्वत:च एकदा बाबासमोर आला आणि “चुकलं. माफ करा” वगैरे काहीतरी बोलून गेला. “पुन्हा चुकूनही स्वप्नीलचं नाव घेऊ नकोस” असा दम बाबानं भरला. मी आधीच विनंती केली होती म्हणून त्यानं केदारवर हात उचलला नाही इतकंच.

पण हीच विनंती मी आफताबला केली नव्हती. तो एकदा केदारच्या दुकानात गेला. आधी दोन शब्द हसून “कसा आहेस?” वगैरे काहीतरी बोलला आणि नंतर दुकानाबाहेर पडण्याआधी एकच खचकचून त्याच्या कानाखाली मारली.




No comments:

Post a Comment