केदारने मला कितीही समजावलं तरी मनामध्ये भुंगा लागून राहिलाच. त्याच्या
घरात तर रोज एक एपिसोड चालू होता. काकीने आजोबांना कुठूनही मिळवलेली माहिती
सांगायला सुरूवात केली होती. त्यामध्ये माझे मित्र, माझं शिक्षण, माझे कपडे, माझं
वाह्यात वागणं हे सर्व सामिल होतंच. शिवाय काकीला मिळालेला सर्वात मोठा जाळ म्हणजे
माझ्या बाबाचं बाहेर असलेलं लफडं. माझ्या आईबाबाने कॉलेजात असताना पळून जाऊन लग्न
केलं होतं. त्याही नंतर माझ्या जन्मानंतर बाबानं बाई ठेवली होती.
आता या गोष्टी काय केदारच्या घरात कुणाला माहित नव्हत्या अशातला भाग नव्हता.
समोरसमोर तर गेली पंचवीस वर्षं त्यांची दुकानं होती. त्या बाईबद्दल केदारच्या
वडलांना इत्यंभूत माहिती होती. पण काकीला हा विषय समजल्यापासून तिनं घरात तोच धोषा
लावला होता. बाप असला तर लेक तसलीच असा
तिचा मुद्दा होता. हो नाही करत करत तिनं केदारच्या आजोबांना माझ्या विरूद्ध केलंच.
केदार घरात नसला की या गप्पा व्हायच्या. तरी त्यानं कितीतरी वेळा घरात माझ्याबद्दल
सांगितलं. त्यावर “तुला काय समजतंय? तुम्ही लफडी करा आम्ही निस्तरतो” असा आहेर
मिळाला म्हणे. एकंदरीत काकीबाईंचा डाव क्लीअर होता. केदारचं भलं कशात आहे ते सांगत
स्वत:च्या माहेराचं भलं करायचं. आता तुम्ही म्हणाल की हे केदारच्या घरामध्ये इतरांच्या
लक्षात कसं आलं नाही. तर मग तुम्हाला किचन पॉलिटिक्स नावाच्या गोष्टीचा तुम्हाला
काही अनुभव नाही. अगदी पोटतिडीकीने बोलत बोलत तिनं घरामध्ये सर्वांच्या घशाखाली
स्वप्निल वाईट आहे हे उतरवलं. केदारची दोन नंबरची काकी देखील हळूहळू या विरोधाला
सामिल झाली. तिचा युक्तीवाद बेफाम होता. उद्या मी सून म्हणून आले तर केदारच्या
आईचं पारडं जड होणार. आफ्टर ऑल मी एकुलती एक होते आणि भल्यामोठ्या इस्टेटीची
मालकिण होते. आज ना उद्या बाबाचं सर्व काही मलाच मिळणार होतं की.
यादरम्यान मी आणि केदार जवळजवळ रोज भेटत होतो. घरात काय घडतंय ते मला
तपशीलवार सांगायचा, माझ्याइतकाच तोही भंजाळला होता. इतका प्रखर विरोध होइल असं आम्हाला कधी वाटलंच
नव्हतं. त्याच्या आईबाबांपेक्षा इतर चुलत्यांनीच अधिक विरोध चालू केला होता. केदार
आणि मी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा चुकूनही हे इतकं विचित्र होइल असं आम्हा
दोघांनाही वाटलं नव्हतं.
आमच्या घरात केवळ एकच मोठा प्रश्न होता. इतक्या लवकर लग्न करायचं का? आई
तयार झाली, पण बाबा अजिबात तयार नव्हता.
“डिग्री झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही” हे त्याचं घोषवाक्य बनलं होतं.
“हे पंचवीस वर्षापूर्वी मला बोलायचं होतंस. तेव्हा बरा लग्नाला तयार झालास.
आणि आता तुला हे नखरे सुचतायत. चांगलं स्थळ आहे. तिला मुलगा पसंद आहे. डिग्री
लग्नानंतर करेल की”
“गौरी, मुलगा चांगला आहे म्हणून मी लगेच लग्न करून देऊ का? पसंद आहेत ना, मग
थांबू देत की अजून एक वर्ष. परीक्षा होऊ देत, त्याच्या दुसर्या दिवशी लग्न लावून
देतो.” हे आणि असेच संवाद अदलून बदलून आमच्या घरात ऐकू येत होते. एकदा तर बाबा
आईला चिडून म्हणाला. “तिचं लग्न करून दिल्यावर आपण काय करायचं? एकच मुलगी आहे
तिलापण इतक्या लवकर पाठवू का?”
अझरभाई मला एकदा म्हणाला. “सालं आमचं अरेंज मॅरेज असून दोन तासात सर्व फायनल
झालं होतं. तुमचं लव्ह मॅरेज असून इतके घोळ चालू आहेत.” अर्थात त्या लग्नामध्ये
अझरभाईला काही म्हणायचा हक्क नव्हताच. मला मात्र, बाबानं दोनतीनदा विचारलं. सध्या
काहीच सुचत नव्हतं. एकीकडे शिक्षण फारसं महत्त्वाचं वाटत नव्हतं. तर दुसरीकडे
इतक्या लवकर लग्न करायचंसुद्धा नव्हतं. मला केदारमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता.
लग्नाचाही प्रॉब्लेम नव्हता... पण एकंदरीत केदारच्या घरामधलं वातावरण फारसं
आशादायक नव्हतं.
केदार आधीसारखा मला रोज रोज भेटत नव्हता. फोन केला तरी दुकानामधून किंवा
बाहेरून कुठूनतरी. मलापण “अजिबात थोडे दिवस घरी फोन करू नकोस” हे सांगितलं होतं. तो पण बिचारा
अडकल्यासारखा झाला होता.
एके दिवशी संध्याकाळी गच्चीवर निवांत बसून होते. नुकताच सूर्य मावळला होता.
हलका अंधार पसरला होता. आई कुणाच्यातरी लग्नाला गेली होती. बाबा घरातच होता. नेमके
लाईट गेले होते. घरात मरणाचं उकडत होतं. गच्चीवर किमान वारा तरी मस्त येत होता.
घरासमोरच्या बागेमध्ये बरीच मुलं खेळत होती. मी शाळेत असताना आमच्या कॉलनीमध्ये
इतकी मुलं नव्हती पण आता पलिकडच्या रस्त्यावर दोन तीन अपार्टमेंट बांधल्या होत्या,
तिथे बरीच कुटुंबं आली होती.
“निल्या, खाली येतोस का? चहा केलाय” त्यानं हाक मारली.
“थोड्यावेळानं येते” इतक्या गर्मीमधून चहा नकोच झाला होता खरंतर. बाबानं
अजून दोनदा हाक मारली. तरी मी खाली येत नाही ते बघून तोच वर आला. “थंड चहा चांगला
लागत नाही रे”
“गरम होतंय म्हणून इथं बसलेय. लाईट कधी येणारेत?”
“येतील तासाभरात. आपण ना इन्व्हर्टर बसवून घेऊ. हल्ली इकडे लोड शेडींगचं
प्रमाण वाढलंय” बाबा माझ्याच बाजूला बसत म्हणाला. “आज कुठे बाहेर नाही का जायचं?
जावईबापूंना भेटायला?”
“जावईबापू? सीरीयसली बाबा! किती घोळ चालू आहे ते दिसतायत ना!”
“घाबरू नकोस गं. पुढच्या वर्षी आपण लग्न लावू. मस्त एकदम. अख्खं गाव काय
जिल्हा बघत राहील इतक्या थाटात लग्न करेन”
“पण डिग्री झाल्याखेरीज नाही. तुझा काय हट्ट आहे तेच मला कळत नाही”
“तुला काय कळायचं त्यात. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज मी लेकीचं लग्न लावणार
नाही. तुला तुझ्या मर्जीनं लग्न करायचं स्वातंत्र्य आहेच. फक्त त्यात मी नसेन. माझ्या लग्नांत तरी माझा
सासरा कुठे होता. लग्नाच्या तिसर्या दिवशी त्याच्या घरी गेलो तर आम्हाला
घराबाहेरच काढलं. झालं ते झालं. पण माझी मुलगी व्यवस्थित शिकलेली, आर्थिक आणि
प्रत्येकच बाबतीमध्ये स्वावलंबी हवी. कुणावरही कशावरही ती अवलंबून नको”
“अरे पण, केदार आहे. तू आहेस. आणि...”
“मी आणि गौरी काय आयुष्यभर पुरणार आहोत का? आज आहे तर उद्या नाही. आमच्या पश्चात
तुला कोण बघणार आहे? काका आणि त्याची पोरं काय बघणार? एकटीच राहिलीस तर कशी
राहशील? नवरा आयुष्यभर पुरतोच असं नाही. सासरचं कितीही इस्टेट असू दे, सुनेला
त्यात काडीही मिळत नाही. त्यासाठी मला तुझं शिक्षण पूर्ण हवंय. काही नाही तर किमान डिग्री तरी... तुझ्या
आईनं आणि मी हाच गाढवपणा केलाय. माझं जाऊ देत, मी अभ्यासात कधीच हुशार नव्हतो.
धंद्यात मात्र मी सगळी अक्कल वापरली. पण गौरीचं काय... दहावीला तुझ्यापेक्षा जास्त
टक्के होते. काय फायदा झाला? प्रेमात पडली लग्न केलं आणि घरी बसली.”
“पण तिला प्रॉब्लेम काही झाला का? शिक्षण अजिबात नको..”
“काही प्रॉब्लेम झाला का? निल्या! आता सांगतोच. तुला आठवत नसेल पण तू दोन
वर्षांची असताना माझं आणि गौरीचं भांडण झालं. खूप मोठं. मी बाहेर कुठंतरी लफडं
केलं आणि ते तिला समजलं होतं. चिक्कार भांडली. रडली आणि म्हणाली घर सोडून जाते.
नुसती धमकी दिली नाही तर गेलीसुद्धा. तुला घेऊन माहेरी गेली. मी पण तितकाच चिडलो
होतो. जातेय तर जाऊदेत. नंतर चारपाच दिवसांनी जाऊन आणली असती. पण ती वेळ आली नाही.
संध्याकाळी.. या अशाच तिन्हीसांजेच्यावेळी तुला घेऊन परत आली. दारात चपला काढल्या,
तुला माझ्यासमोर ठेवलं आणि किचनमध्ये कामाला गेली. एकही शब्द न बोलता. त्याआधी मला
गौरीवर कित्येकदा प्रेम आलं होतं, राग आला होता, पण त्यादिवशी पहिल्यांदा तिची दया
आली. माहेरामध्ये तिला जागा नव्हती. कारण हे लग्न तिचा स्वत:चा निर्णय होता. माहेर
सोडून दुसरीकडे कुठं रहायचं तर शक्य नव्हतं. दोन वर्षांची मुलगी, अर्धवट शिक्षण
आणि एकटी बाई. मुकाट परत आली. ती जर परत आली नसती ना तर मला इतकं वाईट वाटलं नसतं
जितकं तिच्या त्या निमूटपणामुळे वाटलं. त्यानंतर मी तिची माफी मागितली आणि आमचा
संसार आधीसारखाच चालू झाला. पण मी तो दिवस आजही विसरलो नाहीये. हेच मला माझ्या
मुलीबाबत घडायला नकोय. तिला स्वतंत्र जगता आलंच पाहिजे. वेळ आली तर ज्या चपला
घालून ती बाहेर पडलीये त्याच दारात तिनं त्या चपला काढता कामा नये. असं काही
तुझ्याबाबतीत होइल असं नाही पण माझं मन सर्व काही आलबेल होइल असंही मानत नाही.
तुझी डिग्री म्हणजे केवळ डिग्री नाहीय. शिक्षण पूर्ण असणं म्हणजे एका अर्थानं
स्वावलंबी असणं. गौरीच्या वेळी मी पण तितकाच मूर्ख होतो. मागेपुढे कसलाही विचार न
करता प्रेमात पडलो म्हणून लग्न केलं. त्या मानाने तू आणि केदार समंजस आहात. केदार
तर लाखपटीनं चांगला नवरा आहे. पण निल्या, माझी फक्त एकच इच्छा आहे रे. इतक्या लवकर
मी तुला परक्याची करणार नाही”
“बाबा, तुला असं का वाटतं रे? मी फायनल इयर पूर्ण करणारच आहे.. तसंही केदारशी
लग्न केलं तरी तुझी मुलगी म्हणून असेनच ना”
“होत नाही रे तसं निल्या. दुसर्यांकडे निघून गेलीस की आमची राहणार नाहीस. आणि
खरं सांगू का? देवानं एकच तर मुलगी दिलीये. तिला हे असं अगदीच वीसाव्या वर्षी दान दिलं तर...” बाबाला पुढे
बोलताच आलं नाही इतका त्याचा गळा भरून आला होता. “लहान आहेस अजून.. अजून थोडे दिवस
अशीच लहान रहा गं. इतक्यात नको जाऊस”
“बाबा, मी तुला आणि आईला सोडून कशी जाईन? पण माझं केदारवर प्रेम आहे. तो मला
सुखात ठेवेल. मी जरी लग्न करून गेले तरी तुला रोज भेटेन. आईशिवाय रहाण्याची तर
मीसुद्धा कल्पना करू शकणार नाही. तुला आणि आईला एकटं करून.... मी पण नाही राहणार.
पण या सर्वांमध्ये केदारचे फार हाल होतायत. बेक्कार भरडला जातोय. त्याह्च्या
घरामध्ये खूप विरोध होण्याआधी प्लीज लग्नाला हो म्हण. मी तुझ्या मनाविरूद्ध पळून
वगैरे जाणार नाही. पण तुझ्या परवानगीची वाट बघत जर..”
“ठिक आहे. मी उद्य बोलेन त्यांच्याबरोबर. पण डिग्री मात्र पूर्ण करशील असं मला वचन
दे....” तो बोलत असतानाच खाली हॉलमधला फोन वाजायला लागला. बाबा बोलायचा थांबला.
माझे डोळे कधीचे वाह्त होते तेच मला माहित नव्हतं. डोळे पुसत खाली आले आणि फोन
घेतला.
“काय करतेस?”
“केदार! आता पाच मिनिटांत तुलाच फोन करणार होते. ऐक ना”
“बोलू नकोस. अज्जिबात एक शब्द बोलू नकोस. मी तुझ्या घरी येतोय. गेटमध्ये
तयार होऊन रहा. कुठ जातोय असं सुद्धा विचारू नकोस. माझ्याकडे एक गूड न्युज आहे. मी
पाच मिनिटांत पोचतोय” इतकं बोलून त्यानं फोन ठेवला.
तो इतक्या भराभरा बोलला की मला काय सांगायचंय तेच राहिलं. बाबाला मी बाहेर
जातेय रे इतकंच सांगितलं आणि ड्रेस बदलला. केदारने सांगिताल्यासारखं पाचव्या
मिनीटाला तो माझ्या घरासमोर बाईक घेऊन उभा होता.
“चल”
“कुठे?”
“आपल्या घरी”
No comments:
Post a Comment