या सर्व गडबडीमध्ये
माझ्या हेल्थचे तीन तेरा चालूच होते. महिन्यातून दोन तीन वेळा ब्लीडींग व्हायचंच.
बाबा परत एकदोनदा डॉक्टरकडे जाऊया म्हणत होता, पण मला बाबाशी बोलायचंच नव्हतं. तो
घरात असला की मी खोलीच्या बाहेरच पडायचे नाही. आईनं मला इतकी का सारखी त्याच्यावर
चिडतेस असं विचारलं. मी उत्तर दिलं नाही. काय सांगणार?
दहावीची प्रीलिम तोंडावर
आली होती तेव्हा आमच्या आज्जीनं नवीनच खेळ सुरू केला. आज्जी म्हणजे बाबाची आई.
हिला एरवी आमच्या घरी यायला आवडत नाही. आईसोबत एक मिनिट तिचं पटत नाही. ती
काकाकाकूसोबत मुंबईलाच राहते. आमच्याकडे गेली चार पाच वर्षं आलेली पण नाही. पण आता
मात्र दर दोन दिवसांआड फोन करत होती. का तर माझे पहिले पीरीयड्स आल्यावर फंक्शन
करायचंय म्हणून. आधी मला वाटलं की घरगुती काहीतरी असेल. पण एकदा फोनवर तासभर बोलून
झाल्यावर आई बाबाला सांगत होती ते मी ऐकलं. आई म्हणे, “काकूला पण बोलवावं लागेल.
शिवाय केटरर बूक करावा लागेल. मग मांडववाल्याचं बघून घे”
मी उडालेच. हायला काय
लग्नाचं ठरवताय की काय?
आईला विचारलं तर म्हणाली,
हो. अशी पद्धत आपल्यात असते. पण इकडं कुणी करत नाही म्हणून मी करणार नव्हते. पण
आज्जी म्हणतेय तर करावंच लागेल. म्हटलं, पण इतकं मोठं कशाला?
“कारण, गावातली इकडची
तिकडची नातेवाईक म्हणजे शंभर लोकं होणार. तितक्यांचा
स्वयंपाक मला जमणार नाही, इतकी लोकं जेवायला कुठे वाढणार?”
“पण इतक्यांना बोलावतेस
का?”
“तुझ्या आज्जीची आज्ञा
झाली आहे. एकुलतीच नात आहेस.”
माझ्या काकाला दोन्ही मुलगेच. आत्याला पण एक मुलगा.
मुलगी तशी मी एकटीच.
“पण कशाला?” माझा वैताग
मीटर क्षणाक्षणाला वाढतच होता.
“मी तरी काय करू? मला पण
काही हौस नाही. तसंही या अख्ख्या कार्यक्रमात मला आतच थांबावं लागेल.”
“ते का?”
“परत, तुझ्या आज्जीची
आज्ञा” सगळाच वैताग. एरवी मी बाबाकडे मोर्चा वळवून मला हवं तसं करवून घेतलं असतं
पण आता मला बाबाशी बोलायचं नव्हतं.
एक गंमत मात्र वाटली,
पीरीयड्स आलेत याबद्दल कुणाकडे काही बोलायचं नाही, देवाकडे जायचं नाही, इतर
कुणाच्या घरी जायचं नाही. पण हेच पीरीयड यायला लागले म्हणून शंभर लोकांना
बोलवायचं.. मग ते आपली ओटी भरणार- ते मात्र जगजाहीरपणे सर्वांना बोंबलून सांगायचं.
वर्गामधल्या काही
मैत्रीणींच्या माता माझ्या मातेच्या मैत्रीणी होत्या. त्यांना पण आई बोलावणार...
मग नववीमध्ये ती अर्चू आहे ती तर माझी दूरची नातेवाईक लागते, तिच्या आईला पण
बोलावणार आणि कोएडमध्ये दहावीलाच तो अभिषेक आहे तो तर माझा मावस-चुलत भाऊ. म्हणजे
राधाकाकूला आई बोलावणार... म्हणजे माझा हा जो काही प्रोग्राम आहे तो शाळाभर
सगळ्यांना कळणार. इतर मुलींचे असले फंक्शन फार आधी आटोपलेले, तेव्हा त्यांना काय
इतकी लाज वाटलेली नसणार. आता माझे पीरीयड्सच लेट आले. आणी ती आता अशी सर्वांसमोर
बोलायची गोष्ट.. त्यात परत आईबाबा घरासमोर मांडव वगैरे घालायच्या वार्ता करतायत...
म्हणजे अख्ख्या गल्लीला समजणारच! शेजारीच इतकं मॊठं फंक्शन आहे, लोकांची कलकल
होतेय, म्हणून आफताब वैतागणार!
शिवाय माझं कसलं काय
फंक्शन आहे तेसुद्धा त्याला समजणार. देवा! त्या सीतामाईनं नक्की कुठल्या जपाचा
वापर करून धरणीमातेच्या पोटात गुडूप व्हायचे स्पेशल ट्रीक केले होते... तसंच
काहीतरी करायला हवं होतं.
मला आता प्रीलीमचं काही
टेन्शन आलं नव्हतं. मी पास होईनच याची खात्री झाली होती. आफताबनं माझ्याकडून
अभ्यासच तसा करवून घेतला होता. रोजचे क्लासेस ट्युशन शाळा वगैरेंचा वेळ वगलता सलग
तीन तास बसून आम्ही हल्ली पेपर सोडवत होतो. त्याच्याबरोबर लिहून माझे कित्येक विषय
खरंच सोपे झाले होते.
पण आमचं बोलणं क्वचित
अभ्यासाव्यतिरीक्त इतर काहीतरी.
“हे बघ, सेव्हटीटूचे
फॅक्टर्स पाड आणि मग एक्सची किंमत इथं अशी.... लक्ष आहे की नाही तुझं?” आफताब
माझ्यावर ओरडला. मी खाली मान घालून तेच गणित सोडवत होते, खरंतर. पण त्याला आज
चिडचिड करायची हौसच आली होती. मघापासून माझ्यावर दोन तीनदा ओरडला होता. “तेच
लिहितेय ना... तुझ्यासारखी तोंडी गणितं येत नाहीत. कागदावर सोडवतेय. दोन मिन्टं
धीर धर की” मी पण आता वैतागले. च्यायला, आई बाबा पुण्याला जाऊन साडी आणूया (तेच ते
माझ्या त्याच फंक्शनसाठी) वगैरे ठरवत होते. मोठ्या मिनतवारीनं आईनं दहावीची बोर्ड
एक्झाम झाल्यावर फंक्शन करू असं आज्ज्जीच्या गळी उतरवलं होतं. पण इतर तयारी चालूच
होती.
“सॉरी,” माझ्या ओरडण्यावर
तो एकदम वरमून म्हणाला. “खरंतर आज सकाळपासून माझाच मूड ठिक नाहीये...”
“काय झालंय?”
“अझरभाई येतोय. पुढच्या
महिन्यात.”
“हायला, मस्तच” मी
अभावितपणे बोलून गेले. आणि मग लक्षात आलं... जी जखम नुकतीच कुठं भरत आली आहे,परत
त्याच्यावरची खपली निघणार. अझर आला की घरात परत येणारेजाणारे लोक. त्यात परत
अरिफचा विषय.
“बोर्ड एक्झाम जवळ आली.
मीच त्याला मागे म्हटलं होतं...
परीक्षेच्या दरम्यान ये, त्यानुसार त्यानं सुट्टी
अरेंज केली... पण आत्ता”
तो पुढं बोलला नाही.. पण
मला समजलं. गेल्या दोनतीन महिन्यांत हळूहळू का होइना पण आम्ही अरिफच्या जाण्याला
विसरत चाललो होतो. आठवण यायची, पण तेवढ्यापुरतीच. अझर आल्यावर मात्र परत ते
सर्वच... “तू तुझ्या मामांकडे का जात नाहीस? थोडे दिवस? म्हणजे अभ्यासाच्या...”
त्यानं चिडून माझ्याकडे
पाहिलं. “तुम्हाला सर्वांनाच मी इतका कोल्ड हार्टेड वाटतो का? इतकं सर्व झाल्यावर
पण मला अभ्यासाचीच चिंता असेल?”
“मी तसं म्हटलंय का? तुला
इथं त्रास होइल... आय नो, व्हॉट यु हॅव गॉन थ्रू”
“नो.. स्वप्निल, यु डोंट
नो. कुणालाच माहित नाही. लोकांसाठी फक्त माझा सावत्र भाऊ गेलाय. माझ्यासाठी माझा
बेस्ट फ्रेंड आणि आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती गमावली आहे... आणि हे
गमावणं दुसर्या कुठल्याही गोष्टीनं भरून निघणारं नाही.... माझं जाऊ देत, पण
त्याचं काय?.. मी किंवा अम्मी त्याला काय सांगणार आहोत? त्याची सख्खी आई गेली,
सख्खे बाबा गेले. सख्खा भाऊ गेला. कुटुंब म्हणून राहिलो कोण तर मी आणि अम्मी...
त्याचा लॉस फार मोठा आहे. माझ्यामध्ये त्याला फेस करायची हिंमत नाही.”
अशावेळेला नक्की काय
बोलून समोरच्याला कंफर्ट करायचं असतं याचे कुठं क्लासेस वगैरे असतात का? कारण,
त्यानं पुढं काही बोलण्याआधी मीच घळाघळा रडायला लागले. आफताबनं त्याचं शाईचं पेन
बंद केलं. वही पुस्तकं उचलून बॅगमध्ये ठेवली.
“चल, आज खूप अभ्यास केला.
स्कूटीची चावी घेऊन ये. आपण इथंच कुठंतरी फिरून येऊ”
“तू जा फिरायला. मी नाही
येत” मी डोळे पुसत उत्तर दिलं.
“काय झालं?” तोच मला
कंफर्ट करत म्हणाला. “तू ना हल्ली फार चिडचिड करतेस.”
एकदा वाटलं त्याला
सांगावं बाबाबद्दल जे काय समजलंय ते, मग लक्षात आलं की कदाचित माझ्याही आधी ही
गोष्ट त्याला समजलेली असणारच. तो शेवटी आफताब होता. माझ्याइतका बुद्दू नव्हता.
“जास्त टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडं बघ. तुझ्याहीपेक्षा माझी परिस्थिती वाईट आहे.
बट आय ऍम कोपिंग अप. दॅट्स व्हॉट लाईफ इज, कोपिंग अप” माझ्या खांद्यावर हात ठेवून
तो मला समजावत म्हणाला.
पुढं आफताब म्हणाला तसा
परीक्षेच्या वेळी अझर आला, पण मला भेटलाच नाही. दोन दिवस इथं राहून तो पुण्याला
गेला. तो आल्यापासून चाचींच्या डोळ्यांना सुमार नव्हता. सारख्या रडायच्या.
दहावीचे पेपर सुरू झाले
आणि संपले. मला मार्क चांगलेच मिळतील याची खात्री होती. शेवटचा पेपर हिस्ट्रीचा
होता, घरी आले तर आईनं खास माझ्यासाठी कलाकंद बनवला होता. “आफताबकडे पण देऊन ये”
मी खायला घेण्याआधी मला ऑर्डर मिळाली.
आईनं समोर ठेवलेली वाटी
घेऊन मी गडग्यावरून उडी मारून पलिकडे गेले. स्वागतालाच उभे असल्यासारखा जादू उभा
होता.
“कसे गेले पेपर?”
“मस्तच गेले”
“उद्यापासून सुट्टी ना?”
“हो, आफताब घरी आला
नाही?” दोघांनाही अरिफचा विषय बोलायचा नव्हता, इकडचे तिकडचेच विषय बोलणं गरजेचं.
“अजून नाही. आज काहीतरी
मित्रांसोबत पिक्चर बघायला जाईन म्हणालेला”
“ओह. मी येऊ? आई वाट बघत
असेल!” मी हातातली वाटी त्याच्याकडे दिली. अरिफबद्दल मी त्याच्याशी तेव्हाच काय
नंतरही कधी बोलू शकले नाही. मी आणि आफताब कित्येकदा अरिफच्या आठवणींबद्दल बोलायचो.
कित्येकदा तरी त्या आठवणी आम्हाला हसवायच्याच. क्वचित रडू यायचं, पण तरीही आरिफ
माझ्या आणि आफताबच्या आयुष्यामधला एक अलिखित दुवा बनून राहिला. पुढे आम्ही दोघं
खूप जवळ आलो त्यामागेही अरिफच्याच आठवणी होत्या. आणि कितीही भांडून एकमेकांपासून
लांब गेलो तरी दोघांना सांधणार्या अरिफच्याच आठवणी होत्या.
जादूचं मात्र तसं कधीच
नाही. त्यानं नंतर आयुष्यात कधीही अरिफचं नावसुद्धा काढलं नाही...जणू काही अशी
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसावीच असा तो वागत राहिला. पण एखाद्याला असं डीलीट
करताच कसं येऊ शकतं. जादूला जमतं ते. अरिफच्या बाबतीत नाही तर प्रत्येक वेळी. नूरीभाभीच्या
वेळी. शाहीनच्या वेळी. परीच्या वेळी. चाचींच्या वेळी. प्रत्येक् वेळी तो या
सर्वांना डीलीट करून जगत राहिला. डोळ्यांत दु:खाचे अश्रू आले पण ते तेवढ्यापुरते.
मनात कडवटपणा कधीच नाही.
आमचा रफी साहिरच्या
शब्दांत म्हणतो, तसाच हा जादू...
जो मिलगया उसीको मुकद्दर
समझ लिया...
जो खो गया मै उसको भुलाता
चला गया..
मै जिंदगी का साथ निभाता
चला गया..
चला, दहावीची परीक्षा
संपली. आयुष्यातला एक मोठा टप्पा पार पडला, असं घरी आल्यावर कितीतरी वेळ वाटत
राहिलं. तेव्हा कुठं माहित होतं, आयुष्याच्या लढाईमध्ये दहावीची परीक्षा वगैरे
सर्व केवळ चकमकी असतात, खरी युद्धं तर अजून खेळायचीच आहेत.
>>>>>>>>>
“एवढे मार्क मिळाल्यावर
तू कॉमर्सला का जाणार?” मी राहून राहून आफताबला दोनदा हा प्रश्न विचारला.
एकोणनव्वद टक्के. शंभराला फक्त अकरा टक्के कमी. मार्कलिस्ट बघून तरीही आफताब
नाखुशच होता. जेवढे मिळालंय त्याहून जे मिळालं नाही त्याबद्दल कुढत बसायचा त्याचा
हा स्वभावच.
“आधीच ठरलंय. मी आयदर लॉ
करेन किंवा सी ए - सी एस. सायन्सला जाऊन मला काही उपयोग नाही” त्यानं वैतागून
उत्तर दिलं.
“पण तुला बारावीला पण
इतकेच मार्क पडले तर तू मेडीकल इंजीनीअरिंग करशीलना.. ते जास्त...” मी माझं लॉजिक
पुढं चालवलं. रीझल्ट लागून दोन दिवस झाले होते. घरात आणि इतर नातेवाईकांमध्ये मला
सत्त्याहत्तर टक्के मिळालेत याचं खूप कौतुक सुरू होतं. आईनं तेव्हापासून
पंचपक्वान्नांचा धडाका लावला होता. बाबानं तर त्याच्या दुकानात पेढ्यांचा रतीब
लावला होता. येईल त्या गिर्हाईकाला पाव किलो पेढ्याचा खोका. लेक पास झाली, तेपण
चांगल्या मार्कांनी. इतके मार्क पडतील असं कुणालाही वाटलं नव्हतं- मलाही. पण याचं अर्ध्याहून जास्त श्रेय खरंतर आफताबचं
होतं. माझ्या मार्कांवरून इतकी दिवाळी चालू अस्ताना आफताबचे मात्र नुसते हाल चालू
होते.
रीझल्ट लागला त्या दिवशी
चाचींना बरं नव्हतं म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. चाचींची तब्बेत कायमच खराब
असायची. महिन्यातून एकदा तरी ऍडमिट करावं लागायचं. अशावेळी सगळं घर एकटा आफताब
सांभाळायचा. रीझल्ट घेऊन आफताब एकटाच घरी आला. तेव्हा तोंडभरून त्याचं कौतुक
करायलाही घरी कुणी नव्हतं. आईनंच त्याला खीर केली म्हणून जेवायला बोलावलं. त्याचा
अगदी थोडक्यासाठी बोर्ड चुकला होता म्हणून नाराजी होतीच. अझरभाईचा दुपारी फोन येऊन
गेला एवढ्यापुरता आफताब हसला. पण दिवसभर इवलालं तोंड करून बसला होता.
अरिफ असता तर एव्हाना
आफताबला घेऊन घरभर नाचला असता... अरिफ असता तर...
रीझल्ट लागल्यावर बाबानं
माझी ऍडमिशन लगेच दुसर्या दिवशी करवून टाकली. इतके मार्क म्हटल्यावर प्रशनच
नव्हता, सायन्स. पण आफताबनं कॉमर्सचा
फॉर्म भरला.
“मेडीकल इंजीनीअरिंग
शिकण्याइतके पैसे नाहीयेत. अझरभाईंचं कॉंट्रॅक्ट पुढच्यावर्षी संपेल. इतकी पाच
वर्षं त्यानं काम केलंय ते आम्हाला पोसायलाच. अजून किती घेणार त्याच्याकडून. सी ए
वगैरे करायला बरंय”
“पण परीक्षा फार कठीण
असते ना?”
“हो. अभ्यास खूप असतो. पण
तो काय प्रॉब्लेम नाही” आयुष्यात आफताबला एकाच गोष्टीचा कधीही काहीही प्रॉब्लेम
नव्हता. अभ्यास करणे.
इथून माझ्या आणि त्याच्या
वाटा वेगळ्या व्हायला सुरूवात झाली. कितीही वेगळ्या वाटा झाल्या तरी आम्ही
एकमेकांना या ना त्या नात्यामध्ये भेटत राहिलोच.
... अकरावीचं कॉलेज चालू
झालं. आफताबची मॉर्निंग शिफ्ट आणि माझं कॉलेज दहाचं. पहिल्या दिवसापासूनच
वेगवेगळ्या टायमिंगमुळे आमची भेट होणं मुश्किल. इतके दिवस माझ्या अभ्यासाच्या
शंकांमुळे तरी आम्ही एकत्र बोलायचो. आता तर तेही नाही. केवळ भाषेचे विषय कॉमन.
मार्क चांगले पडतात म्हणून त्यानं संस्कृत ठेवलं होतं. हिंदी किंवा मराठी मध्ये
उत्तरं फार लिहावी लागतात म्हणून माझं संस्कृत.
दरम्यान घरी आई-बाबांशी
माझं आधीइतकं नसलं तरी थोडंफार भांडण चालूच होतं. बाबाशी तर जास्त बोलायचेच नाही.
गरज असेल तितकंच. एक गोष्ट मात्र जाणवली होती. बाबा हल्ली रात्रीचा बाहेर जायचा
नाही. घरीच असायचा. मी नाराज आहे हे त्याला बहुतेक समजलं होतं. आईशीसुद्धा
आधीपेक्षा जास्त गप्पा वगैरे मारत असलेला दिसायचा. रात्री तर आईऐवजी कित्येकदा तोच
स्वयंपाक बनवायचा. पहिल्यांदा आफताबनं त्याला पोळ्या लाटताना पाहिलं तेव्हा मज्जाच
वाटली होती.
“अरे, काय सांगू राजा!” बाबानं त्याच्या नेहमीच्या
स्टाईलमध्ये सुरूवात केली. “माझ्या आईला आम्ही दोनच मुलगे. तेव्हा ती बाजूला
बसायची पद्धत होती. आता कुणी पाळत नाही... पण पूर्वी फार असायचं.” मी आणि आई
कपाळावर हात मारून एकमेकांकडं पाहिलं. ही काय बोलायची गोष्ट असते का...पण बाबाचं
काय... “मग स्वयंपाक करणार कोण? तर मी आणि यमराज.” यमराज हे काय माझ्या काकाचं नाव
नाही. बाबा त्याला यमराज म्हणतो. तो मुंबईमध्ये डॉक्टर आहे म्हणून. “मग काय! शिकलो
दोघं सगळा स्वयंपाक करायला”
“अझरभाई पण करतोच. पण
पोळ्या वगैरे त्यानंही कधी केल्या नाहीत” आफताब तव्यावर टम्म फुगलेली पोळी पाहून
पुरेशा आदरानं म्हणाला.
“तुझे बाबा ग्रेट आहेत”
तो माझ्याकडे वळून म्हणाला. माझ्या बापाच्या ग्रेटपणाचे किस्से तुला काय सांगू!
तर असा हा बाबा.
परीक्षा झाल्यावर आई आणि
मी काकाकडे मुंबईला गेलो होतो. खास शॉपिंगसाठी. नवनवीन फॅशनचे कपडे, बॅग शूज काय
वाट्टेल ते. तिथंच आज्जीचं फार चालू होतं म्हणून माझं ते साडीचोळीचं छोटंसं फंक्शन
करून टाकलं. काका काकी आणि साहिल-सागर हे दोन चुलत भाऊ सोडल्यास ओळखीचं कुणीच
नव्हतं. त्यामुळे मला जरा तरी बरं वाटलं. घरी मांडव वगैरे घालण्यापेक्षा हे बरंय.
त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे
आज्जीनं मला सोन्याचा नेकलेस गिफ़्ट दिला. “पीरीयडस येण्याचे फायदे” मध्ये
हे नमूद करून ठेवायला हवंय.
कॉलेज चालू झाल्यावर आमचा
दहावीचा ग्रूप पुन्हा एकाच वर्गात आला होता. आता धमाल होतीपण. अकरावीच्या
वर्गामध्ये मी जॉयस, वेदा, पूर्वी शिवाय दुसर्या शाळेंमधून आलेली निधी, रझिया आणि
यशस्वी असा आमचा मॊठा ग्रूप झाला होता. कॉलेजमध्ये आम्हाला रेनबो म्हणून
ओळखायचे. अकरावी अर्धी होण्याआधीच आमची
मैत्री खूप घट्ट झाली होती.
कॉलेजला सकाळी निघायच्या
अधी आम्ही एकमेकींना फोन करून तू कुठल्या रंगाचा ड्रेस घातलास याची सखोल चौकशी
करायचो. अकरावी बारावीच्या दोन वर्षात एकदाही आम्ही सातजणींपैकी कुणीही सेम रंगाचे
ड्रेस घातले नाहीत. माझा तर काही प्रश्नच नव्हता. आमचंच कपड्यांचं दुकान होतं. मी
म्हणेल तो फॅशनचा ड्रेस बाबा माझ्यासाठी आणि माझ्य मैत्रीणींसाठी मागवून द्यायला.
गावामध्ये कुणाहीकडे कहोनाप्यार है स्टाईल ड्रेसेस आले नव्हते तेव्हा आम्ही तसले
ड्रेस वापरायचो.
अकरावीत आल्यावर
आयुष्यातल्या बर्याच गोष्टी पहिल्यांदा केल्या. लेक्चर बंक करून पिक्चर पाह्यला.
इतके दिवस स्कूल युनिफॉर्ममध्ये स्कूटी चालवताना दिसली की नवीन पोलिस हमखास
पकडायचा, मग बाबाला फोन करून बोलावून घ्या वगैरे भानगडी. पण आता स्कूल युनिफॉर्म
नसल्यानं कुणीही अडवायची भिती नव्हती. आधी
युनिफॉर्ममध्ये फिरत असल्यानं शाळा ते घर सोडल्यास इतर कुठं फिरता यायचं नाही. पण
आता तेही बंधन नव्हतं. मज्जा!!
अर्थात कितीही
स्वातंत्र्य म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ नव्हता कारण आम्ही लेक्चर बंक करून
पिक्चरला गेलो हे बाबाला समजणारच. गावच तसलं छोटंसं होतं. पण तरी या गावात लपून
छपून चालणार्या बर्याच गोष्टी होत्या. आम्ही रेनबो ग्रूपमध्ये एकमेकांपासून
काहीही लपवायचं नाही अशी फ्रेंडशिपडेच्या दिवशी शपथ घेतली होती... ती शपथ फार दिवस
काही टिकली नाही.
आफताब म्हणायला आमच्याच
कॉलेजमध्ये होता, पण मला क्वचित दिसायचा. दिसला तरी जास्त करून लायब्ररीमध्ये.
लायब्ररीमध्ये तसंही माझं फारसं काम नसायचंच. घरी रविवारी वगैरे असला तर अधूनमधून
बोलायचा. चाचींची तब्बेत दिवसेंदिवस खराब झाली होती. दोनदा मुंबईला नेऊन आणलं एकदा
पुण्याला नेऊन ऍंजीओग्राफी केली. बायपास सर्जरी करायचं डॉक्टर म्हणत होते.
त्यासाठी पैशाची जमवाजमव चालू होती. नाही म्हटलं तरी घरामधल्या आजारपणाला तो
कंटाळलाच होता. चाचींना फारसं काम झेपायचं नाही. सकाळी लवकर उठून केर काढणं वगैरे
कामं आफताब करायचा. कविताला – कामवालीला सगळ्याच कामाला ठेवण्यासारखं परवडलं नसतं.
गेले काही दिवस माझं आणि
अझरचं चॅटींग पण जरा कमीच झालं होतं. त्याला बर्याचदा वेळ नसायचा. क्वचित ऑनलाईन
दिसायला आणि दुसरं त्याहून जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्याकडे आता बोलायला
फारसे विषयच नव्हते. जुन्या गाण्यांवर वगैरे बोलायचो, पण आता मलाच त्यात जास्त रस
नव्हता. म्हणजे गाणी ऐकायचे, पण त्यावर त्याच्यासोबत बोलावंसं वाटायचं नाही.
एकदा कॉलेज कॅण्टीनमध्ये
मी आणि आफताब समोर आलो तर तो माझ्याकडे पाहून सहज हसला आणि हॅलो म्हणाला.. मी पण
हसले. बघायला गेलं तर किती क्षुल्लक बाब. पण यशस्वी आणि रझियानं दिवसभर माझा नुसता
पिट्टा पाडला. “आमच्या शेजारी राहतो, आम्ही मित्र आहोत” हे हज्जारदा सांगून झालं
तरी त्यांना पटेनाच. पूर्वी आणि वेदापण त्यांचं बघून चिडवायला लागल्या. निधीतर
सारखी “एक लडका और एक लडकी कभी दोस्त हो नही सकते” हे वाक्य तर्हेतर्हेच्या
आवाजामध्ये मला ऐकवून दाखवत होती.
त्यानंतर आफताब चुकूनजरी कॉलेजमध्ये दिसला की मी तोंड फिरवायला लागले. हे
त्याच्या बहुतेक लक्षात आलं असणार कारण, मी एकदोनदा त्याच्या घरी गेले तेव्हा मी
आलेलं पाहून तो सरळ उठून स्वत:च्या खोलीत निघून गेला.
अकरावीची परीक्षा जवळ आली
होती, आमचा अभ्यास यथातथाच चालू होता. आई कसल्याशा फंक्शनसाठी बाहेर गेली होती. मी
घरात एकटीच टीव्ही बघत बसले होते. दुपारचे तीन साडेतीन वाजले असावेत. गेटचा आवाज
झाला म्हनून पाहिलं तर बाबा घरी आला होता.
“इतक्या लवकर?”
“बाजारांत राडा झालाय,
निवडणुका जवळ आल्यात ते कुणाचीतरी कुणासोबततरी मारामारी झाली. म्हणून दुकानं बंद
केली. गौरी कुठाय?”
“आठलेकरांकडे गेलीये.
उशीरा येईल.” मी टीव्हीचं चॅनल बदलत उत्तर दिलं.
बाबा त्याच्या खोलीमध्ये
जाऊन फ्रेश वगैरे होऊन आला. “निल्या, चहा घेतोस?” त्यानं किचनमधून हाक मारून मला
विचारलं.
“आईनं करून ठेवलाय. तुला
हवा असेल तर गरम करून घे”
“छी! करून ठेवलेला चहा
बेक्कार लागतो. मीच गरम चहा बनवतो. तुझ्यासाठी पण.” मी काहीच उत्तर दिलं नाही.
खरंतर आई घरी नाही, म्हटल्यावर मी निवांत टीव्ही बघणार होते, नंतर जमलंच तर तासभर
गेम्स खेळता आले असते. आत्ताच या बाबाला घरी यायची गरज होती... आणि आलाच होता तर
इकडे कशाला आला? जायचं होतं त्या बयेकडे. ती “ठेवलेली” बाई होती ना... मग
तिच्याकडे अचानक जाऊन तिच्या ठरलेल्या प्रोग्रामची वाट लावायची. पुन्हा एकदा मनाचा
संताप झाला. हातातला रिमोटे मी अचानक फेकून दिला.
त्या आवाजानं बाबा
किचनमधून बाहेर आला.
“काय झालं रे?”
“तुला मुलगा हवा होता!”
मी ओरडले. अचानक. काहीच न ठरवता. “पण मी झाले. मुलगी. म्हणून तू मला मुलग्यासारखी
हाक मारतोस. मी तुला नको हवी होते. मी तुझ्या घरात जन्मून चूक केली. होय ना?” मी
बडबडत सुटले. बाबा किचनच्या दारामधून समोर माझ्याकडे आला, आणि त्यानं फाडकन माझ्या
मुस्काटात मारली.
“काय बोलतोस तुला समजतं तरी का?” तो माझ्यावर
जोरात ओरडला. इतक्या दिवसांत पहिल्यांदा बाबानं मला मारलं होतं. इतक्या जोरात की
मी जागच्या जागी भेलकांडले होते. खाली पडतच होते तेव्हा बाबानंच धरलं. “काय झालंय
स्वप्नील? मला सांग.” त्याचा आवाज थोडा
कमी झाला होता.
मी काही न बोलता
डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि माझ्या खोलीमध्ये येऊन दार लावून रडत बसले. बाबाचा तर
खूपच राग आला होता, तितकाच राग आईचापण आला होता. मला एकटीला सोडून गेली म्हणून- खरंतर ती चल म्हणत होती पण
मलाच कंटाळा आला होता. त्यात हा बाबा घरी लवकर आला.
“दार उघड!” बाबाचा आवाज
बाहेरून ऐकू आला.
“नाही” मी हुंदके देतच
उत्तर दिलं.
“निल्या, दोन मिनिटांत
दार उघड नाहीतर मी दार मोडून टाकेन. उघड” मघाशी त्याहून जास्त आता त्याचा आवाज
संतापलेला होता. बाबाचा असला आवाज मी आजवर कधीच ऐकला नाही. त्याची भितीच वाटायला
लागली. मी उठून दरवाजा उघडला.
बाबा आत आला. माझ्या
गालावर त्याची बोटं उठली होती. गाल सुजलेपण असणार. रडून रडून डोळे तर हमखास सुजले
होते. माझ्या गालावर त्यानं कसलंसं क्रीम लावलं. बोलला मात्र काहीच नाही. मी अजून
रडतच होते.
“गौरीला फोन केलाय. ती
अर्ध्या तासात येईल” तो खोलीबाहेर पडताना मला म्हणाला. मी अजूनच जोरात रडायला
लागले. आई घरी येणार म्हणून नाही, असंच जोरात रडू आलं म्हणून.
माझं रडणं बघून बाबा दोन
क्षण थांबला. “स्वप्नील, वर माझ्याकडे बघ” तो म्हणाला. मी मान वर करून त्याच्याकडे
पाहिलं. “आजवर कधीही मी मला मुलगा हवा असं म्हटलेलं नाही. माझ्या बायकोला मूल
व्हायलाच हवं असं मला कधीही वाटलं नाही. तुझ्या जन्माआधी काय काय घडलंय हे तुला
माहित नाही. पण मला त्यावेळी तू नसतीस झाली तरी चाललं असतं. तू झालीस. बरं वाटलं.
तू गौरीला आणि मला कायम एकत्र बांधून ठेवलंस. तू झाली नसतीस तर...”
“तू आईला सोडलं असतंस.
दुसरं लग्न केलं असतंस... होय ना? मी झाल्यावर पण मग तू तेच केलंस ना... आईला
सोडून दुसरी बाई...” मी मुसमुसत उत्तर दिलं.
बाबा एकदम गप्प बसला. दोन
मिनिटांनी तो म्हणाला.. “ओह, ती गोष्ट समजली आहे. म्हणून तुझी ही अशी चिडचिड चालू
आहे? म्हणून माझ्याशी बोलत नाहीस...”
“मला मागच्याच वर्षी
समजलं होतं. तू असं का केलंस?”
बाबा माझ्या डोक्यावर हात
फिरवून बाजूला बसला. “मी गौरीला आधीही म्हटलं होतं, स्वप्नीलला सगळं सांगून टाक.
पण तिचं आपलं एकच टुमणं. ती लहान आहे रे...”
“मी इतकी पण लहान नाहीये”
“ते दिसतंच आहे. निल्या,
परत एकदा सांगतो. विश्वास ठेव. मी तुला मुलग्यासारखी हाक मारतो ती गंमत म्हणून.
गौरीनं तुझं नाव स्वप्नील ठेवलं म्हणून सुरूवातीला मजा म्हणून मी तुला निल्या
म्हणायला लागलो. नंतर तीच सवय पडली. तू चार पाच वर्षाचा झालास तेव्हा तुला कधी मी
स्वप्नील म्हटलं तर तू रूसायचीस. “मी निला अये” असं म्हणून भांडायची. आठवतं का
तुला? बास. त्यामध्ये तुझा मुलगी असण्याचा अथवा मुलगा नसण्याचा काहीच प्रश्न
नव्हता आणि आजही नाही.”
“पण मग तू... तुझं आईवर
प्रेम नाही का?” सतरा वर्षाच्या माझ्या मेंदूमध्ये त्यावेळी नात्यांचे अनेक पदर
अथवा वेगळी रूपं समजून घेण्याची कुवत नव्हतीच. बाबानं दुसरीकडे भानगड केली म्हणजेच
दुसरीकडे कुठंतरी प्रेमच केलं आणि आता त्याचं माझ्या आईवर प्रेम नाही असं काहीतरी
एक लीनीअर गणित डोक्यामध्ये तेव्हा फिट्टं बसलं होतं.
“मी हे असं का केलं ते
मला तुला सांगता येणार नाही... कदाचित गौरी नीट समजावेल. पण मी आयुष्यात फक्त दोन
मुलींवर प्रेम केलंय. तुझ्या आईवर. आणि दुसरी तू...बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे
लफडी किम्वा भानगडी, तितकंच त्यांचं महत्त्व!”
मी अजून रडतच होते.
बाबानं माझे डोळे पुसले. “तोंड धू. गौरी घरी येईल. तुला असं रडताना बघून मला फाशीवर
चढवेल. मग मी तिला सांगितलं की मी तुला मारलंय तर फासावरून काढून मला परत फाशीवर
चढवेल. आज माझी काही धडगत नाही गं बायो. खूप संतापलो म्हणून हात उचलला, सॉरी”
पण बाबानं मला केवळ सॉरी
म्हणून काही उपयोग झाला नाही. खरंच दहा मिनिटांत आई घरी आली. काय झालं ते सगळं
बाबानंच सांगितलं. त्यानंतर जे काय घडलं ते मी आजवर विसरणार नाही.
आई हॉलमधल्या सोफ्यावर
बसून बाबाचं बोलणं ऐकत होती. त्याचं बोलून झाल्यावर आईनं त्याच्याकडे असल्या
रागानं बघितलं. ते देवीच्या वगैरे नजरेमध्ये आग दाखवतात ना.. तसली आईची नजर दिसत
होती. “मी रागावलो, मी मारायला नको हवं होतं” असं काहीतरी बाबा म्हणत होता. “यतीन,
परत हे घडता कामा नये.” एकच वाक्य पण कसल्या सॉलिड ताकदीनं.
मघाशी आयुष्यात
पहिल्यांदा बाबाचा इतका संतापलेला आवाज ऐकला होता. आता आईचा इतका निर्धारी आवाज
ऐकला. बाबा शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेत होता. चुकूनही एकदासुद्धा तो तिला काही
म्हणाला नाही... आईनं उठून मलाच जवळ घेतलं. पण बोलली काहीच नाही. नंतर किचनमध्ये
जाऊन ती कामाला लागली. बाबा त्याच्या खोलीत गेला, मी कंप्युटरवर गेम खेळत बसले.
नंतर दिवसभर आई आणि बाबा एकमेकांशी एक शब्द बोलले नव्हते. आई माझ्याशीपण फक्त
कामाचं तेवढंच बोलत होती. मी पण फार खोलीबाहेर गेलेच नाही.
मी नववीत असताना बाबानं
माझ्यासाठी कंप्युटर घेतला. खरंतर कंप्युटरचा मला फारसा काही उपयोग नव्हता, पण
बाबाची हौस होती!
बाबाची हौस. माझ्यासाठी.
आणि आज मी त्याच बाबाला वाट्टेल तसे बोलले होते. बाबा वाईट नव्हता. माझे तर खूप
लाड करायचा. तरीपण गावाच्या दुसर्या टोकाला राहणारी ती काळीसावळी संध्या नावाची
बाई काय माझ्या नजरेसमोरून जाईना. आणी ते जेव्हा जेव्हा नजरेसमोर आली की माझा केवळ
संताप संताप होत होता. केवळ संताप संताप.