दिवस जात गेले
तसं अरिफ गेलाय यावरचा विश्वास उडत चालला. हो! पहिले थोडे दिवस कुणीना कुणीतरी
भेटायला येत होतं... सतत गर्दी असायची. चाचींच्या डोळ्यांतलं पाणी थांबलं नव्हतं.
तेव्हा अरिफचा मृत्यू फार खरा वाटायचा. मग हळूहळू भेटायला येणारे लोक कमी झाले.
पुण्यामुंबईवरून आलेले सगळे नातेवाईक परत गेले. त्या भल्या मोठ्या घरात चाची आणि
आफताब दोघंच राहिले. मग वाटलं अरिफ येईलच की परत. कुठं जाईल?
अझरभाईला फोनवरून
सर्व सांगितलं होतं, पण त्याला यायला जमलंच नाही. येऊन तरी काय उपयोग?
नंतर कधीतरी
पंधरा दिवसांनी मला जादू ऑनलाईन भेटला. थोडावेळ इकडतिकडच्या गप्पा मारल्या, मला
डायरेक्टली बोलायचे काही सुचेना, त्यालाही हाच प्रश्न पडला असावा. शेवटी त्यानं
माझ्या अभ्यासाचं विचारताना विचारलं. “आफताब कसा आहे?”
“ठिक आहे!” मी द्यायचं म्हणून उत्तर दिलं. पण मला नक्की माहित होतं, आफताब ठिक नाही. अरिफ गेल्याची बातमी आली तेव्हा तो मामींवर काय जोरात ओरडला असेल तेवढंच. त्यानंतर त्याचं बोलणंच कमी झालं. म्हणजे आधी तो बडबड्या नव्हताच, पण आता अगदी कामापुरतंदेखील बोलायचा नाही. कुणी भेटायला आलं की सलाम करायचा, दोन सेकंद बसल्यासारखा करायचा आणि खोलीत निघून जायचा. चाची मला एकदा बोलावून म्हणाल्या की अभ्यासाला तुझ्याकडे येऊ देत. घरात त्याचं लक्ष लागणार नाही. तर ते ऐकल्यावर खोलीच्या दाराशी आला आणि म्हणाला, “माझ्या अभ्यासाची चिंता करू नकोस. मी नीट पेपर देईन” एकच वाक्य पण बर्फात बुडवल्यासारख्या थंड आवाजात.
“ठिक आहे!” मी द्यायचं म्हणून उत्तर दिलं. पण मला नक्की माहित होतं, आफताब ठिक नाही. अरिफ गेल्याची बातमी आली तेव्हा तो मामींवर काय जोरात ओरडला असेल तेवढंच. त्यानंतर त्याचं बोलणंच कमी झालं. म्हणजे आधी तो बडबड्या नव्हताच, पण आता अगदी कामापुरतंदेखील बोलायचा नाही. कुणी भेटायला आलं की सलाम करायचा, दोन सेकंद बसल्यासारखा करायचा आणि खोलीत निघून जायचा. चाची मला एकदा बोलावून म्हणाल्या की अभ्यासाला तुझ्याकडे येऊ देत. घरात त्याचं लक्ष लागणार नाही. तर ते ऐकल्यावर खोलीच्या दाराशी आला आणि म्हणाला, “माझ्या अभ्यासाची चिंता करू नकोस. मी नीट पेपर देईन” एकच वाक्य पण बर्फात बुडवल्यासारख्या थंड आवाजात.
मग मीच माझ्या पद्धतीनं एक आयडीया लढवली. मला काय काय अडलंय, ते समजावून सांग असं करून
त्याला बोलवायचे किंवा मग त्याच्या घरी जायचे. आफताब एखाद्या
टीचरपेक्षाही छान समजावून सांगायचा. त्यानिमित्तानं भरपूर बोलायचा. माझ्या
नारळासारख्या डोक्यात काही घुसलंच नाही तर नेटवरून माहिती शोधून वाचायला द्यायचा. पण आम्ही अभ्यासाव्यतिरीक्त कुठल्याही गोष्टीबद्दल मात्र कधीच बोलायचो नाही. कारण कुठला विषय अरिफपर्यंत जाऊन
पोचायचा याला काही नेम नसायचा. एकदा आफताब मला मराठीच्या धड्यामधलं काहीतरी समजावत
होता. बोलताना अचानक म्हणून गेला, “स्वप्निल, हे माझ्यापेक्षा अरिफला विचार. तोच
चांगलं शिकवेल” भाषा हा अरिफचा एरिया होता, मराठीमध्ये त्यानं बोर्डात पण
चांगले मार्क घेतले होते. तरी दोनेक सेकंद मी
गप्पच झाले. त्याच्याही लक्षात आलं, “अझरभाईला विचार. ऑनलाईन का होइना, तो भेटेल”
तो पुढं म्हणाला पण मला एकदम रडूच यायला लागलं, पण आफताबनं हातातली वही बॅगमध्ये
ठेवली आणि म्हणाला, “लॅंग्वेजचे सब्जेक्ट राहू देत, मॅथ्स वर लक्ष दे, ते
इम्पोर्टंट आहे” मी तसेच डोळे पुसले आणि बॅगमधून मॅथ्सचं पुस्तक काढलं.
प्रत्येक वेळेला त्याचा विषय यायचाच. किती अव्हॉइड करणार? अरिफ गेलाच
अचानक होता, जसा “वीकेंडला पुण्याला जाऊन येतो” म्ह्टल्यासारखा. गेला, पण आता
येणार नव्हता. सगळ्यांत कठिण गोष्ट तीच. वाटायचं चार पाच दिवसांत अरिफ येईल. इथंच कुठंतरी गेला असेल. घरामध्ये तर
प्रत्येक गोष्टीत त्याचं अस्तित्व होतंच. त्याची खोली, त्याचा कंप्युटर, त्याची
पुस्तकं, त्याची जर्नल्स, त्याची ताट वाटी. चाची आठवतील तशा वस्तू काढायच्या, आणि
कुणाला तरी देऊन टाकायच्या. “त्याला काय तोंड दाखवू? याच्या अब्बांना सांगितलं होतं—तिन्ही
पोरं पोटच्या पोराच्या मायेनंच वाढवेन. कशात कमी पडू देणर नाही? मोठा शिकायचं
सोडून नोकरीला गेला, तर त्याला सांगितलं, अरिफची फिकीर करू नकोस. आता त्याला काय
सांगू? त्याचा भाऊ कसा हरवला हे सांगू. कसं सांगू... माझ्याच हातून घडली ही चूक.”
चाची एके दिवशी आईला सांगत होत्या. “सारखं म्हणत होता, डोकं दुखतंय. खूप डोकं
दुखतंय, म्हटलं आफताबसारख्या ढापण्या लागल्या असतील. डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा. तर
गेला नाही. दिवसभर घरात होता, काही सुचत नाही म्हणाला. कधी नव्हते ते डोळ्यांत
पाणी आलं, इतकं डोकं दुखत होतं. मी डॉक्टरचा दुसर्या दिवशीचा नंबर काढला. सकाळी
स्वत: घेऊन जाणारच होते” त्यांचं बोलणं ऐकताना आई पण रडत होतीच. काहीबाही धीराचे
शब्द सांगत होती. पण नुसत्या शब्दांनी माणसं परत येत नसतात.
“तू लवकर येना प्लीज” मी जादूला मेसेज केला.
“जितक्या लवकर
होइल तितक्या लवकर नक्की येईन, पण आफताबची काळजी घ्या! त्याला संभाळ!” तो रोजच हेच
सांगायचा, पण त्याची काळजी घ्यायची म्हणजे काय? त्यानं आठवडाभरात शाळेला जायला
सुरूवात केली, स्वत:च्या
अभ्यासाचं शेड्युल हवं तसं बदलून घेतलं. शाळावाले सिलॅबस संपवत होते तेव्हा
आफताबनं क्वेश्चन पेपर सोडवायला सुरूवात केली होती. रोज एक पेपर सलग तीन तास बसून
लिहायचा. गाड्यामागोमग नळ्याची यात्रा म्हणून त्याच्याबरोबर मीपण पेपर सोडवायला
बसायचे. अभ्यास काही झालाच नव्हता. पण हे केवळ प्रॅक्टिस पेपर असल्यानं सुदैवानं
पुस्तकांमधून उत्तरे बघून लिहिली तरी चालत होतं. लिहून लिहून माझे हात
दुखून यायचे. आफताबचे पण! आम्ही अभ्यासाला बसलेलो असलो की चाची तिथंच कुराण वाचत
बसायच्या. त्यांचं ते संथ एकलयीतलं वाचन मला अजून आठवतं. मधेच मी कधीतरी एकदा मला
अरेबिक लिहायला शिकव असं सांगितलं. “पेपर सोडव. दहावीची परीक्षा संपल्यावर वेळच
वेळ असेल” त्यानंतर कित्येकदा वेळ असूनही त्यानं मला शिकवलं नाहीच. जादूनं मात्र
मध्यंतरी माझी उर्दूची शिकवणी घ्यायला वायफळ प्रयत्न केला.
इतके दिवस आफताब “अभ्यास करायचा” असतो म्हणून अभ्यास
करायचा. आता तसं नव्हतं. अख्ख्या घरामध्ये अरिफच्या आठवणी होत्या. त्या
आठवणींपासून कुठंतरी दूर जायला म्हणून आफताब पुस्तकांत डोकं खुपसून बसायचा.
चाचींनी थोडे दिवस त्याला हवं असेल मामाच्या घरी रहायला जा म्हणून सांगितलं,
त्यानं ठाम नकार दिला. त्याला इथंच रहायचं होतं.
घरी आई बाबा हल्ली माझं जरा जास्तच कौतुक करायचे, म्हणजे आई
आधी करायचीच, पण बाबाचं माझ्याकडे जास्त लक्ष असल्यासारखं. आधीसारखा संध्याकाळी
दुकानांवरून परत आला की रात्री कुठे तो जायचा नाही. घरीच थांबायचा. माझा अभ्यास
कसा चाललाय विचारायचा. मला ट्युशनपर्यंत सोडायला यायचा. आईसुद्धा बाबाशी जरा जास्त
बोलताना दिसायची. याआधी आई आणि बाबा फक्त गरज असेल तर बोलायचे. आता मात्र आई
त्याला प्रत्येक छोटीमोठी गोष्ट “आज स्वप्निलनं दूध प्यायलं नाही” वगैरेसुद्धा
बाबाला सांगायची. “निल्या, कशाला आईला त्रास देतोस?” बाबा उगाच मला ओरडल्यासारखा
म्हणायचा. मी लक्ष द्यायचे नाहीच.
एके दिवशी शाळा संपवून आम्ही सर्व मुली ट्युशनला निघालो
होतो, आईनं मला दुसरा डबा भरून दिला होता, पण असले डबे खाण्यापेक्षा आम्ही
सदानंदाच्या टपरीवर वडापाव खाणं प्रेफर करायचो. असाच वडापाव हातात घेऊन रस्त्यानं
आम्ही तीन चार जणी चालत (अरिफच्या भाषेत मिलीटरी मार्च करत... आलीच शेवटी त्याची
आठवण! ती अधूनमधून येत राहणारच) ट्युशनला जायचो. असंच मी, पूर्वी, वेदा आणि जॉयस
चालत जात होतो. चालताना अचानक वेदा ओरडली, “ती बघा स्वप्नीलची आई” मी ती ओरडली
त्या दिशेनं पाहिलं. आई कुठंच दिसली नाही. पलिकडे कोणतरी एक बाई चालली होती. मला
तिचं तोंडसुद्धा दिसलं नाही पण ती आई नक्कीच नव्हती.
“काहीतरीच. तुझी आई नव्हे.” पूर्वी मला म्हणाली “वेदा, तुझं
इंग्लिश स्पेलिंगनुसारच नाव हवंय. वेडा!”
“का? काय झालं? मला माझ्या आईनंच सांगितलंय म्हणजे आई कुणालातरी सांगताना मी ऐकलंय. ती बाई स्वप्निलची आईच आहे”
“इथं स्वप्निल उभी आहे ना, मग मी सांगते, माझी आई नाहिये”
मी उत्तर दिलं.
“आता तुला वेडा म्हणायला हवं, तुझी आई म्हणजे सख्खी आई
नव्हे, सावत्र!” वेदानं आपला मुद्दा पुढं
दामटवला. कधीकधी काही गोष्टी आपल्याला माहित असतात, पण त्यांचं नक्की स्वरूप माहित
नसतं. ही त्यातलीच एक गोष्ट.
“श्श!” पूर्वी परत ओरडली. “आता बास. सावत्र आई वगैरे काही
नाहिये. काकांनी काही तिच्याशी लग्न केलेलं नाहीये. ठेवलेली बाई म्हणतात त्यांना”
तेवढ्यात पाठीमागून एक सुमोवाला आला, आणि इतका मोठा रस्ता रिकामा दिसत असूनही
आमच्या नावानं ठणाणा हॉर्न मारायला सुरूवात केली. शेवटी त्या सुमोवाल्याला रस्ता
देण्याच्या मिषानं आमचं बोलणं थांबलंच.
संध्याकाळभर ट्युशनमध्ये लक्ष लागत राहिलं नाही. बाबा रोज
कुठं जातो हे लहानपणी कधी कळायचं नाही. तेव्हा वाटायचं, दुकानावर कामासाठी जात
असेल. पण हळूहळू अक्कल आली, आपला बाबा बाहेर कुणाकडे तरी जातो ते समजलं. आज
कुणाकडे जातो तेही दिसलं.
घरी आले तेव्हा आई माझ्यासाठी डोसे करत होती. बाबा नुकताच
घरी आला होता. “काय निल्या कसा गेला दिवस?” त्यानं विचारलं. मी हातातलं दप्तर
त्याच्या अंगावर फेकून दिलं आणि येऊन माझ्या खोलीत रडत बसले.
आई बाबा चाची आफताब अझर कुणाशीच कुणाशीच मला बोलायचं
नव्हतं, ज्याच्याशी बोलायचं होतं, तो फार फार दूर निघून गेला होता.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
“मी काय सांगतेय
ते जरा ऐकशील?” आई मला म्हणाली. “आपल्या वडलांशी बोलायची ही पद्धत आहे का?” आईचा
आवाज जरबेचा होता.
“मग का मला सारखा
विचारतो... अभ्यास केला का? एकदा सांगितलं ना, केलाय. सगळा अभ्यास केलाय! दहावीला
नापास होणार नाहिये. अजून करतेच आहे” मीपण
तितक्याच जोरात ओरडून उत्तर दिलं. खरंतर मला माझ्याच खोलीमध्ये जाऊन दार बंद करून
बसायचं होतं. पण प्रचंड संताप आला होता. काही म्हणजे काही सुचत नव्हतं. चुकून
तरातरा हॉलमधून बाहेर आले आणि गेटमधून समोरच्या बागेकडे चालायला लागले. रोजचं झालं
होतं हे. मला बाबाशी अजिबात बोलायचं नसतं हे त्याला एव्हाना समजलं नव्हतं का? मग
तरी कशाला सारखा मला प्रश्न विचारायचा.
मी वेदाला
मुद्दाम लंचब्रेकमध्ये वेगळी नेऊन विचारलं. तिला जेवढं माहित होतं तेवढं तिनं
सांगितलं. तिचं नाव संध्या. तिचा नवरा बाबाच्या दुकानांतच हेल्पर म्हणून होता. आता
तो कुठं आहे ते माहित नाही, पण त्यानं बायकोला सोडलं होतं. मग बाबानं तिला आधार
दिला. गावाच्या दुसर्या टोकाला मच्छिमार वस्ती सुरू होते, तिथं त्यानं तिला घर
बांधून दिलं होतं. या अफेअरला किमान दहाबारा वर्षं झाली होती म्हणे. म्हणजे मी
लहान असल्यापासूनच. मी इतकी बावळट की मला आजवर कधी समजलंच नाही.
तेव्हापासून मला
खूप राग यायला लागला. बाबाच तर आलाच, पण त्याहून जास्त आईचा आला. आईला हे सर्व
माहित नव्ह्तं का? मग तरीही ती बाबासोबत का रहात होती? आईबाबाचं लव्ह मॅरेज.
प्रेमात पडले म्हणून घरून विरोध असताना पण बाबानं आईशीच लग्न केलं होतं. मग
लग्नानंतर पाच-सहा वर्षांतच बाबानं अशी बाहेर बाई ठेवावी... आई साधीभोळी आहे वगैरे
ठिक आहे, पण इतकी बावळट पण आहे का?
तिन्हीसांज होऊन
गेली होती. काळोख बर्यापैकी पडला होता.. मी माझ्याच धुंदीत चालत असल्यानं कुणी
मला दिसलंच नाही. माझ्या आणि अरिफच्या आवडत्या जागेवर जाऊन बसले. तेव्हा जाणवलं,
आपण इथं एकटेच नाही आहोत. बाजूला पाहिलं माझ्याच अगदी बाजूला हातात डोकं खुपसून
बसलेला.....“अरिफभाई” मी अविश्वासानं पुटपुटले. त्यानं मान वर करून पाहिलं. समोर
पिंगट केसांचा आणि हसर्या चेहर्याचा अरिफ नव्हता, काळ्या केसांचा आणि थकल्या
डोळ्यांचा आफताब होता.
“काही म्हणालीस?”
त्यानं विचारलं.
“काही नाही... तू
इथं अंधारात काय करतोस?” नशीब... मी हाक मारलेली त्यानं ऐकली नव्हती.
“असंच आता
ट्युशनवरून आलो. जरा कंटाळा आला.” तो उठत म्हणाला. “तुझं काय?”
“मलापण कंटाळा
आला. आता अभ्यास पूर्ण करायचाय.” आफताबसोबत बोलतच रहायचं असेल तर तो विषय
अभ्यासाशी संबंधित असायला हवा, हे कायम लक्षात ठेवायचं. “आपण आज जरा इकॉनॉमिक्स करू
या, पंचवीस मार्कांचा पेपर आहे, आधी त्याचा सिलॅबस पूर्ण करू. मग नंतर थोडावेळ
इंग्लिश”
“चालेल, मी येऊ
तुझ्याकडे?”
“नको!” घरात
आईबाबा दोघांचंही तोंड बघायचं नव्हतं. जितका उशीर होइल तितका अभ्यासात घालवून घरी
येऊन गुपचुप झोपायचं होतं. “मीच तिकडे येते. चाचींना सांग, डिनर पण तुमच्याकडेच
करेन. तेवढ्या अर्ध्या तासात आपण लेटर रायटिंग डिस्कस करू”
“ओके!” त्यानं
हात पुढे केला, त्याचा हात धरून मी उठले. “बूक्स घेऊन ये.. आणि घरात ओरडताना आवाज
जरा कमी ठेव. अख्ख्या गल्लीला ऐकू जातंय”
तो शांतपणे म्हणाला. मला हा विषय त्याच्यासोबत बिल्कुल बोलायचा
नव्हता. “तुला माहित नाही....” मी काहीतरी
बोलून विषय बदलायचा प्रयत्न केला.
“मलाच काय
अख्ख्या गल्लीला माहित आहे. एनीवेज, लेट्स नॉट डिस्कस अबाऊट इट!” तो मागे वळून
घराकडे निघालासुद्धा. आफताबला नक्की काय माहित होतं ते मला आता ऐकायचं नव्हतं. मी
मागोमाग घरी येऊन दप्तर उचललं. बाबा बेडरूममध्ये होता, मी त्याच्याकडं लक्ष दिलं
नाही. सुदैवाने त्यानंपण माझ्याकडं लक्ष दिलं नाही. आई किचनमध्ये काम करत होती. या
आईला अजून काही लाईफ नाहीच आहे का? बघावं तेव्हा किचनमध्ये नाहीतर बागेमध्ये काम
करत असते... परत एक संताप संताप होऊन गेला.
“मी जेवायला
नाहीये” मी पाठच्या दारानं बाहेर पडता पडता सांगितलं. “तुझ्यासाठी वांग्यांचं भरीत
केलंय” आई म्हणाली.
तुझ्या
बाहेरख्याली नवर्याला खाऊ घाल, त्यालाच फार आवडतं, मी तोंडातच पुटपुटले.
उडी मारून गडगा ओलांडताना जाणवलं, एक चिरा डुगडुगतोय. हे चिरे लावायचं काम अरिफचं. आता हा डुगडुगणारा चिरा मात्र आम्हालाच नीट करायला लागेल. सगळीच कामं कशी अर्धवट टाकून गेला.
आफताब
संध्याकाळची नमाझ पढत होता. अरिफ गेल्यावर आफताबमध्ये झालेला हा एकमेव बदल. आधी
सटीसमाशी नमाझ पढायचा, आता मात्र रोज न चुकता सकाळी- संध्याकाळी नमाझ पढायचा. शांत
बसून अरबी भाषेमधली कुराणामधली आयत पुटपुटत बसलेला आफताब बघायला मला तेव्हाही खूप
आवडायचं, नंतर मी आणि आफताब एकत्र रहायला सुरूवात केल्यावरही ्त्याला नमाझ पढताना
बघणं फार आवडायचं. तेव्हा माझा देवावर फारसा विश्वास नव्हताच, आज तर बिलकुल
नाही. पण आफताब नमाझ पढताना किती शांतपणे
देवाशी संवाद साधताहेत असं वाटायचं—प्रार्थना करायची म्हणून केली तर ते नुसतं
कर्मकांड होतं, पण असं मनापासून भळभळणार्या वेदनेला शांत
करण्यासाठी जेव्हा
देवाकडे आळवणी केली जाते, तेव्हा देव अस्तित्त्वात आहे की नाही हा प्रश्नच उरत
नाही. त्या प्रार्थनेमधून वेदनेचं हळूहळू नष्ट होणारं अस्तित्व हाच त्या देवाच्या
अस्तित्वाचा पुरावा. हा संवाद जितका त्या देवासोबत त्याहून जास्त त्या वेदनेशी.
माझ्यासारख्या करंट्यांना असल्या वेदनाच
माहित नाही... मग हा संवाद घडणार कसा? मग दुसर्याच्या धर्मभोळेपणाची चेष्टा
मस्करी करणं एवढंच आमच्या हाती. नमाझ पढताना आफताब जितका शांत वाटायचा, तितकीच
शांत आई रोज तुळशीपुढे दिवा लावून स्तोत्रे म्हणताना दिसायची. आजवर ती नक्की काय
स्तोत्रं म्हणते ते मला माहित नाही, पण आजही तुळस दिसली की मला तिचा शांत तेजाळ
चेहरा आपोआप नजरेसमोर येतो.
“स्टार्ट करे?”
मी विचारात गढलेली असताना आफताबनं मला हलवून विचारलं. नंतर दीडेक तास मी त्या
इकॉनॉमिक्स नावाच्या घाणेरड्या विषयाला समजून घेण्यात घालवली. आता तर काय सिलॅबस
होता तेही आठवत नाही. मला तेव्हाही कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता, पण आफताब
बहुतेक पंचवीसपैकी पन्नास मार्क घेणार याची मला तेव्हाच खात्री पटली. त्याला
माझ्यासारखी उत्तरे पाठ नव्हती, तर त्याला उत्तरे माहित होती. मुळात प्रश्न समजले
होते. माझा मेंदू अजून अंधारगृहातच चाचपडत होता.
“मैद्याच्या
पोत्यामध्ये थोडीतरी अक्कल असायला जागा आहे का?” शेवटी तो वैतागून म्हणाला. “इतकी
कशी तू बावळट? इथे पासिंग पुरते मार्क्स मिळवून उपयोग नाहीये, हे सगळे स्कोरिंग
सब्जेक्ट्स आहेत. टोटल परसेंट वाढतील.”
मी मान डोलावली.
आपल्याला साठ टक्के मिळाले तरी सायन्सच मिळणार आणि नव्वद टक्के मिळाले तरी सायन्सच
हे जेव्हापासून लक्षात आलं तेव्हापासून साठच मिळवणे हे माझे लक्ष्य. वरचे तीस
टक्के नंतर बारावीला वगैरे मिळवू. पण हे आफताबला सांगून उपयोग नाही.
चाचींनी खास
आमच्यासाठी मुगाची खिचडी केली होती. रात्रीचा आहार हलका असावा असं आफताब सांगायचा,
म्हणून. नंतर रात्रभर थर्मासभर कॉफी आणि चॉकलेटं गिळायचा तेव्हा हलका आहार
टाईमप्लीजवर गेलेला असायचा. आम्ही अभ्यास करत असताना आई मध्येच कधीतरी येऊन
चाचींकडे भरीत देऊन गेली होती. मला आवडतं म्हणून!
जेवणानंतर
म्हटलं, “थोडावेळ गेम खेळूया, जेवल्यावर लगेच अभ्यास केला तर मला झोप येईल”
“मोजून पंधरा
मिनीटं! त्याहून जास्त नाही” मागे एकदा असंच थॊडावेळ टीव्ही बघत बसलो ते
केबलवाल्यानं जुडवा लावलेला. सलमान खान म्हणजे काय बोलायचं कामच नाही. माझा आवडता
हीरो. आफताबला बिल्कुल आवडत नाही तरीपण अजून एक सीन, हे एक गाणं करत संपूर्ण
पिक्चर बघून मगच उठलो. मग आठ दिवस आफताबनं त्या दिवशी सगळा अभ्यासाचं शेड्युल
चुकलं म्हणून डोकं उठवलं.
पीसी अरिफच्या
खोलीमध्ये होता, आता तिथं बरंचसं सामान काढून ठेवलं होतं, पण पीसीचा कोपरा तिथंच
होता. “तू पीसी ऑन कर. मी चाचींना थोडी
मदत करते” मी त्याला म्हटलं. चाची किचनमध्ये आवरत होत्या. “कशाला गं? मी
करते. तुम्ही अभ्यास करा जा” तरीपण मी इकडे तिकडे त्यांना थोडी मदत केली..
मी अरिफच्या
रूममध्ये आले तेव्हा आफताब एकटक स्क्रीनकडे बघत उभा होता. कॉण्ट्राचा गेम चालू
करून नेहमीच्या सवयीनं त्यानं दोन प्लेअरचा ऑप्शन सीलेक्ट केला होता. अरिफ आणि
आफताबचा गेम. कायम दोघं खेळत असायचे. मी
क्वचित कधीतरी अरिफबरोबर खेळले असेन. आता मी त्याच्या मागे गप्प उभी राहिले. गेम
चालू झाला होता, समोर स्क्रीनवर आरिफ आफताब अशी नावं दिसत होती. आफताब तिथं उभा
होता पण त्याच्या बाजूला कायम असलेला अरिफ आता नव्हता. आफताबनं अरिफचं नाव डीलीट
केलं.
अरिफ गेल्यानंतर
जवळजवळ महिन्याभरानं पहिल्यांदा आफताबचे डोळे भरून वाहत होते.
(क्रमश:)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा:
(क्रमश:)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा:
No comments:
Post a Comment