बॅण्डस्टॅण्डवरून एरवी दिसणारा सूर्यास्त खूप सुंदर. आज मात्र तोच सूर्यास्त तिला भेसूर दिसत होता. गेल्या दोन तासामध्ये एकही क्षण तिच्या डोळ्यांमधलं पाणी खळलं नव्हतं.
आलोक तिच्या बाजूला शांत बसला होता. गौरवच्या फ्लॅटमधून निघाल्या निघाल्या तिनं आलोकला फोन केला. फोनवर तिच्या रडणार्य हुंदक्यांव्यतिरीक्त त्याला काहीही समजलं नव्हतं. ऑफिसची वेळ नाहीतरी संपत आलीच होती, तो सरळ तिला भेटायला इथं आला होता.
“त्याचा असा गैरसमज होऊ तरी कसा शकतो? मी प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर इतकी नीट वागत होते, चुकूनही कधी मी त्याला असं काही वाटू दिलं नाही” ती म्हणाली. आलोकनं वळून तिच्याकडं पाहिलं. केशरीशेंदरी सूर्यप्रकाशांत उडणारे तिचे भुरे केस, मघापासून रडून रडून लाल झालेले नाकडोळे... त्यानं किंचित हसून तिला थोडं जवळ घेतलं. “आभा, तुला अजून कसं कळत नाही.. इतकी वेडी आहेस का? तू त्याला काही वाटू दिलं वगैरेंचा प्रश्नच येत नाही. कुणीही सहजपणं तुझ्याकडे खेचला जाऊ शकतो...”
“आलोक, नाही. मी असं कधीच काहीच केलं नाही...”
“आभा, लूक ऍट मी.. मी कसा तुझ्या प्रेमात पडलो असेन... तसाच तोही..”
“नाही, तू अशी तुलना करूच कशी शकतोस.. आपलं लग्न झालंय. घरच्यांनी ठरवून. यु डोण्ट नो दीज पीपल. एखादा हट्ट किंवा खेळणं म्हणून मी त्याला हवी आहे. कमीटमेंट, लाईफलॉंग रिलेशनशिप म्हणून नाही. आज किती शब्दांचे भोपळे बनवत असला तरी मला माहित आहे... याच्या आईवडलांनी तीस वर्षांनी घटस्फोट घेतला. कॅन यु इमॅजिन? हे असं आपल्याबाबतीत...”
“आभा, तुला एक गोष्ट सांगू? आपण त्या दिवशी गौरवच्या घरी डिनरला गेलो होतो, तेव्हाच मला हे जाणवलं होतं, पण वाटलं. हे फिल्मी लोकं आपण यांना जास्त ओळखत नाही.. पण तरीही मला हे समजलं होतं की.. त्याला तू आवडतेस. वरकरणी त्यानं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही तो खूप दुखावलेला होता. समहाऊ, आय नो दॅट फीलिंग....”
“आलोक, तो मूर्ख आहे... काय वाट्टॆल ते बोलत होता. मला म्हणे मी आत्महत्या करेन. तू माझ्याशी लग्न कर काहीही.. मला खूप भिती वाटतेय...”
“कशाला घाबरतेस... काही होणार नाही...” त्यानं तिचे डोळे पुसत म्हटलं. “आभा, एक गोष्ट बोलू?”
तिनं त्याच्याकडे पाहिलं. “मला वाटतं, तू फार चुकीचा विचार करते आहेस. गौरवनं तुला प्रपोज केलंय.. तुला जर त्याला हो म्हणायचं असेल तर...”
“आलोक, हे कसं काय..” आभा बोलत असताना त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प केलं. “प्लीज! मला जे बोलायचं आहे ते पूर्णपणे बोलू देत. गेल्या कित्येक दिवसांमध्ये ही गोष्ट मला सांगायची होती. आज एकदाच बोलू देत. हा निर्णय तुला घ्यायचा आहे. कारण, प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. माझ्याशी लग्न केलंस म्हणजे आयुष्यभर माझी गुलाम झाली नाहीस. तू अजूनही स्वतंत्र आहेसच. तुला जर या लग्नाच्या बंधनामधून मोकळीक हवीच असेल तर मी देईन. तुझ्या आईवडलांना काय सांगायचं ते मी बघेन. आभा, गौरव तुझ्यावर खरं प्रेम करतो. माझ्यासारखं खोटं खोटं दिखाव्याचं प्रेम नाही”
“आलोक, आता खरंच बास. मला काही ऐकायचं नाही”
“नाही, आभा. नीट ऐक. तुला असं कधीच वाटत नाही का मी जरूरीपेक्षा जास्त चांगला वागायचा प्रयत्न करतोय? कारण मी हा कर्तव्यनिश्ठ प्रेमळ नवर्याचा मुखवटा चढवलाय. तुला आजवर तो कधीच जाणवला नाही का? मला तुझं स्थळ आलं तेव्हा आज्जी खूप आजारी होती, माझं लग्न बघणं हीच तिची अंतिम इच्छा म्हणून घरातल्यांनी मला लवकरात लवकर लग्न करायला लावलं हेच एक व्हर्जन तुला माहित आहे. आज्जी वर्षभर अंथरूणाला खिळलेली होती. तेव्हाही माझ्या लग्नाचे असेच पडघम घरभर वाजत होते, पण मी बधलो नाही. कारण, मी दुसर्याच एका मुलीच्या प्रेमात होतो. आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं”
“तू याहीआधी मला तुझ्या त्या गर्लफ्रेण्डविषयी सांगितलं आहेस.”
“पण पूर्ण नाही सांगितलं. तिनं लग्नाला अचानक नकार दिला. आणि मग मी चिडून, संतापून, इरेला पेटून दोन आठवड्यांत लग्न केलं. जस्ट टू प्रूव्ह समथिंग. काय ते मलाही माहित नाही. पण माझ्या या इर्ष्येमध्ये तुझी काहीच चूक नव्हती. आईवडालांनी सांगितलं, सगळी चौकशी केली म्हणून तू अक्षरश: माझ्यावर विश्वास टाकून माझ्या घरी आलीस. या लग्नाचं हे सत्य फक्त मला एकट्याला माहित होतं. तुला सांगायचं ठरवलं होतं. पण जमलंच नाही. आज ती संधी मिळाली आहे. आभा, हे लग्न सच्चं नाही, या लग्नांमध्ये आपल्या संसारापेक्षाही जास्त तिचा द्वेष होता. म्हणून तुला सांगतोय, तुला जर या लग्नामधून मोकळीक हवी असेल. तर खरंच...जा”
आभा काही न बोलता त्याच्याकडे केवळ पाहत होती. “आय ऍम सॉरी.” तोच पुढं म्हणाला. “गौरव तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहशील. माझ्या नाटकी प्रेमापेक्षा त्याच्या भावना जास्त प्रामाणिक आहेत. ऍण्ड यु डीझर्व इट! आभा तुझ्यासारख्या मुलीवर असंच कुणीतरी इतकं निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करणारं हवं, माझ्यासारखं खोटं बोलून आणि फसवून नाही”
“म्हणजे आलोक गेले सात महिने हे लग्न तुझ्यासाठी फक्त एक नाटक आहे..”
“होतं. पण नंतर कधीतरी नाटक राहिलंच नाही, मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो. पण तरी ही टोचणी कायम राहिली की मी तुला फसवतोय. मी त्या मुलीवर आजही प्रेम करतो. कदाचित आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहीन.... कितीही ठरवलं तरी मी तिला मनातून काढू शकत नाही. हे खरं आहे. मला माझं सच्चं प्रेम कधीच मिळालं नाही, यापुढे मिळणारही नाही. पण ती संधी तुला मिळाली आहे. प्रेम ही जगामधली सर्वात सुंदर भावना असते, त्याहून सुंदर असतं तुमच्यावर असं कुणी वेड्यासारखं प्रेम करणारं. गौरव तुझ्यावर प्रेम करतो, कर्तव्य म्हणून नाही, लग्न झालं म्हणून नाही. तर मनाच्या आतल्या कुठल्यातरी एका अनामिक कोपर्यापासून त्याला वाटतं म्हणून...”
“आलोक, चल! घरी जाऊया” आभा अचानक उठत म्हणाली.
“का? काय झालं?”
“काय झालं? समजतोस काय मला? एखादी वस्तू? विकत आणली, वापरली आता तीच वस्तू दुसर्या कुणाला हवी आहे म्हणून तू उदारतेनं देऊन टाकणार? हा निर्णय माझा आहे, आणि माझाच राहिल. सॉरी, तुम्ही दुसर्या कुण्या मुलीवर प्रेम करत असाल, आय डोण्ट केअर. पण कायद्यानं आणि देवाधर्माच्या साक्षीनं तुम्ही मला पत्नी मानलेलं आहे, आणि ते आयुष्यभरासाठी आहे. टिल डेथ डू अस पार्ट. तोवर हे नातं तुला निभवावंच लागेल. मला ना तू आणि गौरव हे जे काय बोलता ना तेच समजत नाही. म्हणे, प्रेम आहे. माय फूट!! एखादी व्यक्ती आवडते, हवीहवीशी वाटते म्हणजे लगेच प्रेम आहे? काय असतं काय हे प्रेम? मला माहित नाही, आणि त्याहून जास्त जाणून घ्यायची इच्छा पण नाही. आय ऍम मॅरीड टू यु आणि म्हणून मी तुज्झ्यावर प्रेम करते. इतकं आणि एवढं सिंपल आहे. गौरवला जर मी आवडत होते, तर त्यानं माझ्या लग्नाआधी मला सांगायला हवं होतं. मी कदाचित हो म्हणाले असते. पण आता गेली सात महिने तुझ्यासोबत राहून, तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं हे ठरवून मी मागे हटू शकत नाही. तुला मागे हटायचं तर तुझी मर्जी. मी या नात्यामध्ये आज जिथं उभी आहे तिथंच शेवटच्या क्षणापर्यंत उभी राहेन. तुझं माझ्यावर प्रेम असलं तरी आणि नसलं तरीही...”
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सकाळी साडेसातवाजता रिक्षेवाल्याला पैसे देऊन आभानं बॅगा खाली उतरवल्या. गेट उघडून आत गेली, तर दरवाज्याला भलेमोठे कुलूप. बंगल्याच्या आजूबाजूनं फिरत तिनं आईला फोन लावला. बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवलेला फोन वाजल्यावर तिनं कपाळावर हात मारून घेतला. परत गेटबाहेर आली अणि तिनं स्वत:लाच दोन शिव्या घातल्या. समोरच्या गेटमध्ये अरमान उभा होता, एकच नजर तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि मान वळवली. हा इथे आलेला तिला कसं माहित नव्हतं. “काय झालं?” त्यानंच हाक मारून विचारलं.
“आईबाबा घरात नाहियेत” जवळजवळ चार वर्षांनी ती त्याच्याशी बोलली.
“तुला सरप्राईझ द्यायला स्टेशनवर गेलेत. सकाळी नऊच्या ट्रेनने येणार होतीस ना?”
तिनं नेहमीच्या सवयीनं रागानं मुठी आवळल्या. “मी बसनं आले, त्यांना सरप्राईझ द्यायला!! म्हटलं तासभर आधी येईन..”
तो किंचित हसला. त्याच्या हातामधलं दोन वर्षाचं बाळ मघापासून खाली उतरायला नुसत्या उसळ्या मारत होतं. त्यानं घरामध्ये कुणालातरी हाक मारली. “चावींचं गिटार ठेवलंय ना, तिथं एक टेडीबेअरच्या कीचेनची चावी आहे, ती आण!” दोनच मिनीटांनी वाट्टेल त्या रंगाचं मिश्रण केलेली साडी नेसलेली, आणि तोंडावर हातभर घुंघट ओढलेल्या एका बाईनं बाहेर येऊन अरमानच्या हातात चावी दिली. “विजय स्टेशनवर जायला निघत असेल तर त्याला सांग, वनिताकाकीला निरोप द्यायला, आभा घरी पोचली. याला आत घेऊन जा, रस्त्यावर पळायला सोकावलाय!” अरमाननं ते बाळ त्या बाईच्या हातात दिलं. आभा रस्त्यावरून थोडीपुढे आली, तोपण गेटबाहेर आला. “नशीब, तुमच्या घराची एक स्पेअर चावी आमच्याकडे कायम असते”
“कधी आलास?” तिनं चावी घेताना विचारलं.
“दहा दिवस झाले, अजून महिनाभर मुक्काम आहे..” तो सहज म्हणाला. तिनं रस्त्यावर ठेवलेली एक बॅग उचलली. त्यानं उरलेल्या दोन बॅगा घेतल्या. “माय गॉड! काय दगडं भरली आहेस?”
“पुस्तकंच आहेत. माझ्या सामानांत अजून काय असणारे?” तिनं दरवाजा उघडत विचारलं. “इथं पॅसेजमध्ये आणून ठेवलंस तरी चालेल. मी नंतर सावकाश आत घेईन. मुलगा छान आहे, तुझ्यासारखाच दिसतो. काय नाव ठेवलंस?”
“तू आणि मी मिळून ठरवलं होतं तेच” तो दोन्ही बॅगा आत हॉलमध्येच नेऊन ठेवत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर ती किंचित घुटमळली. “कशी आहेस?” त्यानंच पुढं विचारलं.
“ठिक आहे! तू कसा आहेस?”
“कसा दिसतोय?”
“जाड! काही नाही तर पंचवीसेक किलो वजन सहज वाढलंय. युएसला गेलेली सगळी लोकं जाड का होतात यावर शोधप्रबंध लिहयला हवाय. तू चहा घेणार?”
“तुझ्या हातचा चहा! इतकी मोठी शिक्षा कशासाठी?” त्यानंपण तिला चिडवलं. तिनं काही न बोलता सिगरेट पेटवली. “ही सवय आहेच का अजूनही?”
“माझ्यासारख्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, आम्ही झटकन बदलत नाही. वर्षानुवर्षे तसेच राहतो. मग ती एखादी सवय असो वा एखादी व्यक्ती!”
“किती दिवस आहेस?” त्यानं विषय बदलत विचारलं.
“माहित नाही. ज्या दिवशी बाबांबरोबर वादावादी होइल, त्या दिवशी निघायचं. तोपर्यंत रहायचं. नेहमीचंच आहे. मला काही सुट्टीचा वगैरे प्रॉब्लेम नाही. तुमच्यासारखा. कभीभी आओ कभीभी जाओ. धंदा करत असलं की ते सर्वात बेस्ट!”
“हे असलं बोलतेस म्हणून अंकल इतके चिडतात...जरा नीट बोलत जा!! बाकी तू काय काम करतेस? वनिताकाकीला म्हणाली कोच वगैरे आहेस. जिममध्ये इन्स्ट्रक्टर वगैरे आहेस का? तिथं हवी तशी सुट्टी मिळते?”
आभा शांतपणे सोफ्यावर बसली. हातातली सिगरेट विझवली. “इकडे ये. बस. असा माझ्यासमोर बस” तिनं अरमानचा हात हातात घेतला. “हे बघ, आयुष्यामध्ये प्रत्येकाला बंधनं असतातच, उद्या मोराला कितीही कंटाळा आला तरी त्याला पिसारा फुलवावाच लागेल. श्रावण आल्यावर नाचावंच लागेल. तसंच, तू नोकरी करतोस. म्हणजे तुला वेळेत ऑफिसला जावंच लागेल. हवी तेव्हा सुट्टी घेता येणारच नाही. तुझ्यावर जबाबदारी आहे, माझं तसं नाही. मोर तर तू आहेसच पण आता फोटोशॉप व्हायचा प्रयत्न कर. म्हणजे तुला हव्या त्या रंगाचा पिसारा घेता येईल. माझ्यासारखं स्वत:चा व्यवसाय स्वत: सुरू कर म्हणजे तुला हवी तेव्हा सुट्टी घेता येईल. आणि तुला ते जमेल.. मिस्टर अरमान शहा. स्वत:वर विश्वास ठेव. तुला ते जमेल”
“हे काये?” त्यानं भांबावून विचारलं.
“माझा धंदा” तिनं त्याचा हात सोडून दिला आणि ती उठली. “लाईफ कोच. आईला विचारलं तर ती काय भलतंच सांगते. मी लोकांना त्यांच्या आयुष्याबद्दल शिकवते”
“म्हणजे लोक तुझ्याकडे पैसे देऊन त्यांच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम डिस्कस करतात आणि तू त्यांना उपाय सुचवतेस?”
“च्च्क्क! बहुतेकवेळा मी त्यांना त्यांच्या आयुष्यापेक्षा माझं आयुष्य किती कॉम्प्लीकेटेड आहे ते सांगते. मग बिचारे माझी दया करतात. पण पैसा चांगलाय.”
“पण तू कॉलेज...”
“यासाठी एज्युकेशनल डिग्री लागत नाही. समोरच्याला समजून घेणं, त्याला धीर देणं वगैरे गोष्टी लागतात. आणि मला ते चांगलं जमतं. मोस्टली सेलीब्रीटी क्लायंट्स आहेत, त्यांची सुखदु:खं म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली कागदाची फुलं. सगळंच कसं बेगडी खोटंनाट”
“तुझ्यासारखंच” तो अचानक म्हणाला. “आभा, खरंच खुश आहेस की नुसता आभास निर्माण करतेस?”
“आभास! म्हणजे आभासाठी.. आभानं निर्माण केलेलं खोटं!”
“सांग ना. खुश आहेस? आनंदात आहेस?”
“त्याआधी तुझी आनंदाची व्याख्या काय आहे ते कळू देत! अरमान, मी आयुष्यात दु:खी कधीच नव्हते रे. स्वत:वर.. हर्षूवर.. तुझ्यावरच चिडले असेल, संतापले असेन. पण दु:खी कधीच नाही. डोळ्यांसमोर तुझी आणि हर्षूची वाढत जाणारी लव्हस्टोरी बघतानाही नाही, आणि तुझ्या लग्नाची निमंत्रणपत्रिका आल्यावर पण नाही. मला कधीच कशाचं दु:ख वाटत नाही”
“मग अशी का वागलीस?”
“कशी? हा!!!! हे दारू पिणं वगैरे रीबेल प्रकार. ते घडलेच असते. तू किंवा हर्षू नसता तरीही. कारण मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून दारू पित नव्ह्ते, तर मला त्यावेळी दारू प्यावी वाटत होती. बस्स इतकंच.”
“अजूनही माझ्यावर प्रेम करतेस?” त्यानं तिच्याजवळ येत विचारलं.
“याहून मूर्ख प्रश्न मी आजवर ऐकला नाही. ऑफकोर्स मी तुझ्यावर आजही प्रेम करते. कायम करत राहीन.”
“म्हणून आजही एकटीच आहेस?”
“नाही, तुझ्यावर प्रेम करत असले नसले तरीही मी एकटीच असते. तू मिळत असताना तुला नकार दिला... कारण मी अशीच आहे. प्रेमाच्या संपूर्णतेपेक्षाही मला त्यामधली अपूर्णता जास्त हवीहवीशी वाटली, तसंही तू माझ्यावर प्रेम कधी केलंच नाहीस...”
“आभा, दोन वर्षं”
“चूक. २४८ रात्री. आणि थोडेफार दिवस. तू माझ्या फ़्लॅटवर आलास किंवा मी तुझ्या रूमवर आले. आपण एकत्र बसलो, बोललो, दारू प्यायलो ऍण्ड वी हॅड सेक्स. त्याला प्रेम म्हणत नाहीत... मी तुझ्यासाठी तेव्हा एक गिल्टी फीलींग होते. हर्षला सोडल्यानंतर तुला अचानक वाटलं, अरे आपल्यामुळे आभाचं लाईफ बरबाद झालंय. अरमान इज रीस्पॉन्सिबल. म्हणून तू माझ्यावर एक जबाबदारी म्हणून प्रेम केलंस. म्हणून आपण एकत्र आलो. मीसुद्धा त्यात वहावलेच. वाटलं साला लाईफ चेंज झालं. अक्खं आयुष्य बदललंय. पण मी हे विसरले की तू आणि मी मुळातच एका विश्वात नाही. तू तुझ्या जगात आहेस आणि मी माझ्या जगात. आपण एकत्र कधीच राहू शकलो नसतो... दोन वेगळ्या जगावरच प्राणी होतो.”
“म्हणजे आपल्या लग्नामुळे नंतर काहीतरी ऍडजस्टमेंट किंवा तडजोडी कराव्या लागतील म्हणून तू नातंच तोडलंस? तुला हे सगळं फार सोपं वाटलं ना? कधी माझा विचार केलास? एके दिवशी रात्री मला रडत म्हणालीस की आय लव्ह यु, मग म्हणालीस की मी खोटं बोलले, मग जेव्हा मी तुझ्यापायी इतका वेडा झालो की...” त्यानं तिच्या उजव्या दंडावरच्या जखमेवरून हात फिरवला. “तेव्हा तू मला सोडून दिलंस. एकाकी करून. तुझ्या या प्रेमापायी माझी किती आणि कशी धूळधाण उडाली...”
“काय धूळधाण? यु आर हॅपीली मॅरीड. सगळं आयुष्य तुझं सुखाचं चालू आहे...”
“का असू नये?? त्याआधी मी काय भोगलंय हे तुला माहित आहे... ती माझी बायको आहे ना... तिला मी सगळं सांगितलंय. तिनं सावरलं मला, तुझ्या या असल्या पुचाट प्रेमाच्या तत्त्वज्ञानापेक्षा तिनं आधारासाठी धरलेला हात मला महत्त्वाचा वाटतोय. म्हणे प्रेमामधली अपूर्णता हवीहवीशी वाटते... अरे हेच हवं होतं तर माझ्यावर प्रेम करायचंच नाही ना? गेली कित्येक वर्षं... आभा, तुझ्यासाठी, तुझ्यामुळे, तुझ्यापायी!!!! तुझ्यामुळे मी स्वत:ला अपराधी कितीवेळा वाटून घेऊ?”
“अरमान, अपराधी वाटून घेऊच नकोस ना. आनि मी काय ठरवून तुझ्या प्रेमात पडले न्नाही. इट जस्ट हॅपन्ड. तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालेलं नाही. जिनं खरोखर माझं तेव्हा नुकसान केलं ती हर्षू तिसर्याच बरोबर सुखात आहे.”
“आभा, मला एक दिवस तुला अशाच सुखात बघायचंय... लग्न कर करू नकोस, तुझा प्रश्न आहे. पण अशी भरकटल्यासारखी जगू नकोस.”
“नाही, अरमान. सॉरी टू बर्स्ट दिस बबल, पण मी अजिबात भरकटलेली नाही. माझ्याकडे कॉलेज डिग्री नाही, तुमच्यासारखी नोकरी नाही,पण याचा अर्थ मी आयुष्यात काहीच करायला सक्षम नाही असा काढू नकोस. माझ्यापरीनं मला माझ्या आयुष्याचा अर्थ केव्हाच सापडलाय. तुझ्यावर मी करत असलेल्या प्रेमाहूनही जास्त महत्वाचा तो अर्थ आहे. तुला माहिताय, गावामध्ये चार लायब्ररी आहेत आणि चारही लायब्ररीमधलं प्रत्येक पुस्तक मी वाचलंय... हा रेकॉर्ड होता. तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा मी इथं बागेत बसून चरस पित नव्हते. म्हणजे... अधूनमधून्पित होते पण त्याहून जास्त हा वेळ माझा माझ्यासाठी होता... मी स्वत:ला शोधत होते. आता इतक्या वर्षानंतर कुठं मला मी सापडतेय. हा सगळा प्रवासच एकाकी होता. कुणी सोबत असायची अपेक्षाच नव्हती. कॅन यु इमॅजिन, हातात काही नसताना मी एके दिवशी घर सोडून बाहेर पडले, गाव सोडलं. तेव्हापासून आजतागायत वडलांकडून एकही पैसा घेतलेला नाही. वेळ आली तर चार पोरांच्या शिकवण्या घेतल्या, पण स्वत: कमावलं. भरकटल्यासारखी? मी तरी नाही. अरमान शहा, प्रेम माणसाला आंधळं करतं, मूर्ख करतं, अक्कलशून्यही करतं, पण माझ्या प्रेमानं मला एकाकी केलं आणि तो एकटेपणा मी पुरेपूर उपभोगला, सो प्लीज कशाहीबद्दल गिल्टी वाटून घेऊ नकोस”
“आभा, खरंच सांगतेस की परत नेहमीसारखं तुझं बुद्धीभेद करणं चालू आहे? तुला आयुष्यात कसलीच कमतरता नाही? सगळंच मिळालंय तुला?”
“अरमान, आयुष्य आहे!! हिंदी पिक्चर नव्हे. सगळंच मिळायला. जितक्या असोशीनं आणि जीव मोडून मी तुझ्यावर प्रेम केलं तसं माझ्यावर प्रेम करणारं कुणी मिळालंच नाही ही कमतरता आहेच ना. मिळेलही, आणि तोपर्यंत वाट बघायला मी तयार असेन..”
“मी खरंच तुझ्यावर तितकं प्रेम करतो होतो. तू कितीही डीनायलमध्ये जगलीस तरीही... हीच गोष्ट सत्य आहे.”
“एखादी गोष्ट वारंवार सांगितली म्हणून ती सत्य होत नाही. आता मघाशी जितक्या प्रेमानं तू तिला हाक मारलीस ना... त्याच्या एक दशांशसुद्धा माझ्यावर प्रेम केलं नाहीस. हे मला चांगलंच माहित आहे. गमतीची गोष्ट अशी की, की मी हे सत्य आरामात स्विकारू शकते. अरमान डझ नॉट लव्ह मी. हे मला पटतंय. ऍण्ड आय ऍम ओके विथ इट. मी ज्याच्यावर इतकं आणि असं प्रेम करू शकते... त्यानं उलट माझ्यावर तितकंच प्रेम करावं अशी अपेक्षाच अवाजवी आहे हे मला माहित आहे. फक्त तुला त्यामध्ये चूक दिसतंय...”
“आय डोण्ट नो, मला फक्त आणि फक्त तुला आयुष्यात सुखी बघायचंय.”
“गेली कित्येक वर्षं बघतोच आहेस. आताही बघ. सुखी मी आहेच. आणि राहीन. उलट आज तुला पाहून.. तुझ्याशी इतकं बोलताना... मी अजून सुखी झालेय. तू परत भेटायची अजिबात आशा नव्हती. आपण ते क्षणभंगुर नातं इतक्या वाईट अवस्थेमध्ये सोडलं होतं.... परत एकदा तुला भेटून धन्यवाद द्यायचे होते. तुला सॉरी म्हणायचं होतं... तुला खूप जखमा दिल्यात, त्या जखमांची भरपाई करायची होती..”
“मघापासून एकदाही सॉरी म्हणाली नाहीस.”
“म्हणायची गरजच उरली नाही. तुझ्या जखमा भरल्यात. अगदी खपलीसुद्धा निघाली. काही व्रण शिल्लक आहे. जाणार्या काळासोबत तेही फिके पडतील. चार वर्षांपूर्वी जे ठसठसत होतं ते आज केवळ एक आठवण बनून राहिलंय. थोड्या दिवसांनी ही आठवणदेखील तुझ्यासाठी धूसर बनत जाईल. आभा म्हणजे दुधाळ काचेमधून दिसणारं एक प्रतिबिंब इतकंच राहील. त्यादिवशी तुला मी आज जे काय म्हणतेय ते मनापासून जाणवेल.”
“आणि तू?”
“तू माझी चिंता करूच नकोस. म्हटलं ना, कुठल्यातरी विश्वात माझ्यावर असंच आणि इतकंच प्रेम करणारं कुणीतरी असेल. असायलाच हवं!”
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
गौरव प्रचंड कंटाळलेला होता. गेले तीन तासभर सतत कुणीतरी त्याच्या खोलीमध्ये येत होतं आणि सर एक ऑटोग्राफ, सर इक फोटोग्राफ म्हणत अर्धा तास पकवून जात होतं. एक तर जेटलॅगमुळे झोपेचं खोबरं झालं होतं त्यात संध्याकाळी डान्स परफॉर्मन्स असल्यानं बन्नीनं स्ट्रीक्टली नो दारू असं सांगून ठेवलं होतं. अगदी कफ सिरपसुद्धा प्यायला दिलं नाही. भरीसभर नवीनच चालू केलेल्या या डायेटनं जीव मेटाकुटीला आलेला. इवलालेसे चार घास खाऊन पोट भरल्यासारखंच वाटायचं नाही आणि बन्नी इतर काही खाऊ द्यायचा नाही. पण स्वत:ला कितीही वैताग असलातरी फॅन्सना हिरमुसलं पाठवलेलं त्याला आवडायचं नाही. बिचारे पैसे देऊन आपले पिक्चर बघतात (काही इंटरनेटवर फुकट बघणारे सोडल्यास) मग त्यांना आपण दोन मिनिटं हसून बोलू शकत नाही का? असा त्याचा साधा सरळ प्रश्न असायचा, पण आज जरा जास्तच वैताग आलेला होता. मनामधली अस्वस्थता बन्नीला बरोबर समजलेली असणार, सारखा त्याच्यावर पाळत ठेवल्यासारखं आज वागत होता.
आता परत दारावर टकटक झाली, तेव्हा तो काहीतरी वैतागून “थोड्यावेळानं वगैरे या” असं काहीतरी म्हणणार होता. पण दारात बन्नी उभा होता.
“गौरव, शी हॅज कम” तो अतिशय गंभीरपणे म्हणाला. इतक्या वर्षांमध्ये बन्नीनं ते नाव चुकूनही कधी घेतलं नव्हतं. “तिला भेटायचंय. येऊ देत?”
“ओके” तो कसाबसा म्हणाला. दारामधून आभा आत आली.
“हॅलो सर” पाच वर्षांपूर्वी त्याच्या फ़्लॅटमधून रडत बाहेर पडणारी आभा जशी दिसत होती, तशीच आजची आभासुद्धा. “कसे आहात?” तिनं विचारलं.
“फाईन” ती खोलीत आल्यापासून त्यानं एकदासुद्धा डोळे बंद केले नव्हते, न जाणो हे स्वप्नं असलं तर... पण हे स्वप्न खचितच नव्हतं. “तू कशी आहेस?” त्यानं विचारलं.
“मी ठिक.” ती अजूनही दारापाशीच उभी होती.
“आत ये. तुझ्या गावात शो असल्यामुळे तू भेटशील असं का कुणास ठाऊक वाटतच होतं. कॉफी घेशील? आणि प्लीज हो म्हण. तुझ्यासोबत मलाही एक कप घेता येईल. नाहीतर बन्नी माझा जीव खाईल” तो सहजपणे म्हणाला. काही झालं तरी अभिनेता होता, अभिनय करता आलाच पाहिजे. प्रत्यक्ष मनामध्ये ती समोर आल्यावर कितीही भूकंप झाले तरी वरकरणी चेहरा शांत ठेवायलाच हवा.
“ओके, अर्धा कप चालेल, बाय द वे, तुमची ती नवीन कॉफी ब्रॅण्डची ऍड पाहिली. डिड नॉट एक्स्पेक्ट दिस फ़्रॉम यु” ती आत येऊन खुर्चीवर बसत म्हणाली. गौरव खन्नाच्या त्या जाहिरातीनं रीलीज झाल्यावर तीन तासांत “ब्रेक द इंटरनेट” पराक्रम केला होता. इतके दिवस क्युट, स्वीट, गोंडस असणारा गौरव या जाहिरातीमध्ये चक्क अर्ध्याउघड्या कपड्यांमध्ये तीन चार मॉडेलसोबत बर्याच आक्षेपार्ह कृती करताना दिसला होता. आयुष्यात पहिल्यांदा आशिष खन्नाला त्यानं “प्लीज काही झालं तरी ही ऍड पाहू नका,” असं सांगितलं होतं.
“नवीन इमेज कन्सल्टंट म्हणाला की ईट्स टाईम टू ब्रेक युअर इमेज.. पर्सनली, मलाही ते फारसं आवडलेलं नाही” थर्मासमधली कॉफी मगात ओतत तो म्हणाली.
ती हसली, किंचितशीच. “मग करायचं नाही ना, ब्रेक युअर इमेज म्हणजे तुम्हाला जे सूट होत नाही ते उगाच करायचं का? तुम्ही म्हणजे दावणीला बांधलेलं जनावर नव्हे, इन फॅक्ट त्या जाहिरातीमध्ये तुम्ही किती ऑकवर्ड दिसताय...” ती म्हणाली अणि जरा जास्तच बोललोय हे समजून अचानक गप्प बसली.
“आलोक कसा आहे?” त्यानंच विचारलं. “तुझा छोकरा गोड आहे. त्याला सोबत आणलं नाहीस?” तिनं अचानक चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं मग तिच्या हातात दिला. “फेसबूकवर फक्त ४५८ फ्रेन्डस आहेत तुझे. त्यात एक मी पण आहे. ऑब्व्हियसली गौरव खन्ना नावानं नाहीये! फेक अकाऊंटवर आहे. पण तुझी बर्यापैकी खबरबात ठेवली आहे.”
तिच्या मनांत झालेली चलबिचल त्याला दिसली. “डोन्ट वरी..स्टॉकिंग वगैरे करत नाहीये. कधीमधी तुझे आणि आलोकचे फोटो बघतो. बिरबलाच्या खिचडीच्या गोष्टीमधला तो माणूस कसा रात्रभर थंडीत कुडकुडत राहतो, पण दूरवर असलेल्या शेकोटीकडे नजर लावून बसतो. इथं ऊब नाही, पण किमान तिथं तरी आहे. तू तुझ्या संसारात खूप सुखी आहेस, हे बघून माझंच मला बरं वाटतं. माझ्यासोबत नाही... किमान त्याच्यासोबत तरी”
“गौरव, मी त्याही दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की...”
“आभा, तू सांगायच्याहीआधीपासून मला माहितच होतं की. अन्यथा माझ्याकडे काय दुसरे पर्याय नव्हते. बन्नी तर वेडाच झाला होता, म्हणे दोन दिवसांत निकाल लावेन- तिला काहीही करून तुमच्यापर्यंत आणेन. म्हट्लं नको, ती स्वत:हून माझी झाली तर माझी. जबरदस्तीनं, फसवून किंवा अजून कसल्या मार्गानं मला फक्त तिचं शरीर मिळेल.. ती कधीच नाही”
“तुम्हाला इतक्या वाईट रीतिनं दुखवण्याचा माझा कधीच इरादा नव्हता...”
“आय नो. या गोष्टी कुणाच्याही हातात नसतात.. इट जस्ट हॅपन्स.”
“सो एनीबडी स्पेशल इन युअर लाईफ?”
“स्पेशल अशी आभा एकटीच होती. त्या आधी खूप लफडी केली. तिच्यानंतर मात्र कधीच नाही. सध्या एकटाच आहे. कमॉन, डोण्ट टेल मी, की तू माझ्या न्युज फॉलो करत नाहीस...”
“करते. पण गॉसिप न्युज नाही. तुम्ही नवीन प्रॉडक्शन कंपनी स्टार्ट केली तेव्हापासून त्या कंपनीच्या आणि तुमच्या न्युज.. तुमच्या आईवडलांबद्दल वाचलं”
“सीरीयसली, व्हॉट अ मेस! दे आर टूगेदर अगेन. हे म्हणजे माझ्याच आकलनापलिकडलं आहे. आधी लग्न, मग घटस्फोट, आणि अता एकत्र लिव्ह इन. आय मीन, मी सध्या त्या घरात राहतच नाहीये, लास्ट थिंग आय नीड टू हीअर इज दोज स्ट्रेंज स्क्रीम्स फ़्रॊम देअर बेडरूम.”
“मग कुठं? तुमच्या लपण्याच्या जागी?”
“नाही, वेगळं घर घेतलंय. वाचलं असशीलच... एनीवेज, इनफ अबाऊट मी, तुझं कसं चालू आहे?”
“परफेक्ट. जॉब आहे, मुंबईइतका एक्सायटिंग नाही, पण टुकूटुकू काम चालू आहे.”
“मी जर तो गाढवपणा केला नसता तर अजून माझ्याचसोबत काम करत राहिली असतीस ना?”
“वी विल नेव्हर नो. आलोकला तसंपण इकडचा चान्स आलाच होता. सो... कदाचित असंच घडलं असतं.”
त्यानं हातातला मग खाली ठेवला. “आय रीअली मिस यु” तो गंभीरपणं म्हणाला. तिच्या खुर्चीशेजारी खालीच तिच्या पायाशी बसत तो म्हणाला, “पर्सनल लेव्हलवर तर करतोच पण प्रोफेशनली खूप. तू जितक्या सहजपणं मला समजून घेऊन काम करायचीस... निर्धास्त होतो. आभा आपलं पोर्टफोलिओ बघतेय. अगदी शूटवर पोचेपर्यंत सुद्धा मला क्रीएटीव्ह बघावी लागायची नाहीत. तू निघून गेलीस, आणि करीअरमध्ये फार झटके बसले. सलग चार फिल्म्स फ्लॉप. काम करायचा उत्साहच नव्हता. बन्नी अक्षरश: मला सेटवर ओढत न्यायचा... आय वॉज बीकमिंग ड्रंक. मला ते कळत होतं, वळतही होतं. पण वागता येत नव्हतं. आय वॉज फिनिश्ड. तुझा प्रचंड राग होता.. एकतर माझं आयुष्य बरबाद करून गेलीस. सोबत करीअरपण. सगळंच चुकत होतं... कधीकधी वाटायचं साला, काय लायकी आहे या मुलीची? मनात आणलं तर कुठलीही मुलगी आपल्यासोबत आयुष्य घालवेल. कशासाठी आपण इतकं प्रेम करतो.. काय गरज आहे.. मग एके दिवशी अचानक जाणवलं. गरज आहे म्हणून मी प्रेम करतच नाही. मी प्रेम करतो कारण तो माझा स्वभाव आहे. आभा स्पेशल नाही, मी स्पेशल आहे. समोरच्याकडून नकारच मिळेल याची प्रचंड खात्री असतानासुद्धा वेड्यासारखा इतका जीव मोडणारा मी खास आहे. तुझ्या प्रेमानं मला बरबाद केलं... पण त्याच प्रेमानं मला समृद्ध केलं. माझ्या आयुष्याचा गाभा मला दिला. गौरव खन्ना हे एक पोकळ नाव राहिलं नाही. त्या नावाला एक वेगळं निरतिशय अस्तित्व या प्रेमानं दिला. जगासाठी मी काहीच बदललो नव्हतो, हा बदल झाला फक्त माझ्यापुरता. जी शंका तुला होती... तीच मलाही होती... इज दिस जस्ट इन्फ़ॆच्युएशन? हे केवळ आकर्षण आहे का? पण तू दूर गेलीस आणि मला उत्तर मिळालं. काळासोबत क्षीण होत जाते ती वासना, आणि त्याच काळासोबत वाढत जातं ते प्रेम. तू जितकी लांब गेलीस तितकंच माझं प्रेम सशक्त राहिलं. अधिकाधिक नितळ होत गेलं. त्या प्रेमाच्या आजूबाजूला वासनेचा जो काही दर्प होता, तोही कापरासारखा उडून गेला. राहिलं ते केवळ फक्त प्रेम. या प्रेमाची गंमत माहितीये? हा मामला एकतर्फीच असतो. एकतर्फीच असायला हवा. समोरून प्रतिसाद आला की हे प्रेम परत गढुळतं. ते चांगलं की वाईट मला माहित नाही कधी कळणार पण नाही, कारण तू कधीच प्रतिसाद देणार नाहीस.. पण तरीही आयलव्ह यु. तुझ्यावर प्रेम करण्याचा मला हक्क आहे आणि तो हक्क तू माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाहीस... “
ऐकताना तिचे डोळे भरून आले. “गौरव, कितीवेळा माझी परीक्षा घ्याल? क्षणभरासाठी वाटतं की तुमच्या या गोष्टी ऐकून...”
तो हसला, “मी इतकं जीव तोडून सांगत असताना तू त्याला गोष्टी म्हणतेस, यातच सर्व काही आलं आभा! तुझी परीक्षा वगैरे घ्यायचा काहीच उद्देश नाही. पाच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा तुम्ही दोघंच होता, आता तिघं आहात आणि माझं प्रेम कितीही महान उदात्त वगैरे असलं तरी माझ्या आईवडलांच्या मूर्खपणामुळे जे मला भोगायला लागलंय... एनीवेज. या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. आणि मला आता या जरतरमध्ये खरंच गुंतायचं नाही. स्वत:शीच खेळ करत राहिल्यासारखं होतं... भूलभुलैय्यामध्ये हरवल्यासारखं.”
“मी तुम्हाला परत एकदा सॉरी म्हणू?”
“नको. उलट मी तुला थॅंक्स म्हणतो. थॅंक्स आभा. तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मला या भावनेची खरी किंमत कधी कळालीच नसती. तुझ्यामुळे ती जाणीव झाली. तू मला अधिक श्रीमंत केलंस. माझ्या ब्रॅण्ड व्हॅल्युपेक्षा जास्त... इथं.. मनामध्ये. तू मला एक नवीन ओळख दिलीस. वेळ आली तर मी स्वत:ला किती बरबाद करू शकतो आणि तशीच वेळ आली तर मी काय करू शकतो याची जाणीव तू दिलीस. तुझ्यानकळत. तुझ्यावरच्या प्रेमानं”
“गौरव, काय बोलावं ते समजत नाहीये...”
“मग बोलूच नकोस. फक्त अशी समोर बसून रहा. मी डोळे बंद करून जेव्हा कधी तुझा चेहरा नजरेसमोर आणेन, तेव्हा मला असाच चेहरा दिसू देत....” तो बोलत असतानाच परत एकदा दारावर टकटक झाली. तो झटकन उठून तिच्यापासून दूर गेला. तिनं डोळे पुसले. बन्नी परत आला होता. “एवरीथिंग ऑलराईट, गौरवबाबा?” त्यानं विचारलं.
“येस.” तो म्हणाला.
“मी निघतच होते,” आभा उठत म्हणाली.
“नको. थांब थोडावेळ. बन्नी जरा प्लीज सुजितला बोलावलंय़ म्हणून सांग, आभा कॅन गाईड हिम” गौरवच्या या वाक्यासरशी बन्नीच्य कपाळांवर आठ्यांचं जाळं पसरलं. “आभा, सुजित माझा इमेज कन्सल्टंट. ती कॉफीची ऍड त्याच्याच सजेशनवर केली. त्याला प्लीज जरा माझ्या ब्रॅण्डसंदर्भात थोडं सांगशील.. तुझ्याइतकं परफेक्ट मला ओळखणारं कुणीच नाही.”
“सर्टनली”
बन्नीचा नाईलाज झाल्यासारखा तो खोलीबाहेर निघून गेला. “बन्नीला माझी काळजी आहे. डिप्रेशनमध्ये त्यानं खूप सावरलं. कुणी काय काय उपाय सांगितले ते यानं केलं. सायकोलॉजिस्ट, नेचर थेरपी, अरोमा थेरपी, फ्लावर थेरपी, फ्रूट थेरपी काय नि काय. डाएट चेंज केलं. वास्तू चेंज केली. कुणी सांगितलं... अमक्या देवाला जा तर तेही सगळं झालं. मग मध्येच ते क्राफ़्ट थेरपी म्हणत मला लोकरीचे स्वेटर विणायला लावले. म्हटलं बावा, डिप्रेशन आवरतं घेतो, पण तुझी ही थेरप्यांची थेरं आवर. त्यात मध्येच एक मस्त किस्सा घडला... एक लाईफ़ कोच आहे...अगदी अतरंगी नमुना, यु शूड सी हर. बन्नी तिचे इतके गोडवे गात होता, म्हणून गेलो. तिच्याकडे जाऊन सगळी कर्मकहाणी ऐकवली. तर ती म्हणे, ये तो बॉलीवूड लव्हस्टोरी है. आप इसपे पिक्चर क्यु नही बनाते.. त्या दिवशी इतका हसलो... तू गेल्यानंतर पहिल्यांदा हसलो असेन. आपल्या आयुष्याचे धिंडवडे लोकांसाठी करमणूक वाटू शकते....”
“नॉट अ बॅड आयडीया!”
“हो. मी ते सजेशन खरंच विचारात घेतलंय. खूप झालं हे स्टारडम. प्रॉडक्शनला सुरूवात केलीच आहे. आता डिरेक्शनपण करेन. स्क्रीप्टींग वर काम करतोय, त्याच लाईफकोचसोबत स्क्रीप्टींग. शी इज गूड..”
“तुमच्या फिल्ससाठी स्टोरी?” तिनं विचारलं.
“सध्या करतोय ती आपली स्टोरी नक्कीच नाही. पण एक दिवस माझी प्रेमकथा नक्की करेन. महत्त्वाचं म्हणजे त्याचा एंड काय करायचा हे माझ्या हातात असेल... तेव्हा मी कुणाच्यातरी हातातली कठपुतळी नसेन, तर मी कठपुतळया नाचवणारा असेन.. शेवट माझ्या हाती..”
“मला ना तुमचं किंवा आलोकसारख्यांचं फार कौतुक वाटतं.. किती सहजपणे तुम्ही एखाद्यावर इतकं प्रेम करू शकता. कसं जमतं तुम्हाला? मी.. मला कधीच जमलं नस्तं... कधीतरी मला असं हे इतकं प्रेम करता येईल?”
“केलंही असशील! तुलाच माहित नसेल. आभा, आपल्या प्रत्येक अस्तित्वाचे हजारो तुकडे आहेत. प्रत्येक तुकड्याचं एक विश्व आहे. त्या कुठल्यातरी विश्वामध्ये आभा कदाचित माझ्यावर इतकंच वेड्यासारखं प्रेम करत असेल. असल्याच कुठल्यातरी विश्वामध्ये ती माझी झालेली असेल.. कुठल्यातरी विश्वामध्ये...”
त्याचं वाक्य तोडत ती म्हणाली. “कदाचित आभाला प्रेमाची ही अशी अधुरी आणि दुर्दैवी किंमत समजली असेल. आय होप, असंच घडलं असावं. कूठल्यातरी विश्वामध्ये हात पुढं केला तर आपलं प्रेम हाती येऊ शकतंय हे समजत असूनही हात पुढं न करण्याचं करंटेपण तिच्या नशीबात असेल. असं तरी किमान घडायला हवंय”
दारावर पुन्हा टकटक झाली. बन्नी आलेला असणार.
“माहित नाही. आभा! पण एक मात्र निश्चित आहे, कुठलंही विश्व असो, कुठलाही क्षण असो. तो जिवंत आहे. कारण कुणीतरी कुणावर इतकं प्रेम करू शकतं. त्याशिवाय ही सृष्टी टिकणारच नाही..”
(समाप्त)