Saturday, 29 December 2018

तो आणि ती. (लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित)


तो आणि ती
नंदिनी देसाई


तो आणि ती... जिथे तिथे दिसणारे. सर्वत्र असणारे. एकमेकापासून पूर्ण भिन्न आणि तरीही सतत एकमेकाच्यासोबत..
ते म्हणतात ना "तुझ्यावाचून करमेना आणि तुझ्याशिवाय राहवेना.." अगदी तीच गत. तुम्हालाही कुठेतरी भेटलेच असतील तो आणि ती.. बघा बरं आठवतायत का?

++++++++++++++++++++
तो रस्त्यावरून एकटाच बोलत चाललाय. अर्थात ती पलीकडे मोबाईलवर आहेच. तो तिला भेटायला तिच्या घरी निघालाय. तिच्या घरी तिला भेटायला. तिच्या घरी कुणीच नाही.. तिच्याशिवाय..
ती त्याला पत्ता सांगतेय. थोडा बरोबर थोडा चूक. तिला त्याने घरी यावंसं वाटतय आणि भिती पण वाटतेय. तशी फ्रीजमधे सर्व जेवण तयार आहे. खास त्याला आवडणार्‍या फ्रूट कस्टर्डसकट. तिने घर केव्हाच आवरून ठेवलय. तरीही त्याला पत्ता चुकीचा सांगतेय.

तो त्याच भागात केव्हाचा फिरतोय. ती त्याला "हे दुकान दिसलं की उजवीकडे वळ" वगैरे टाईप सूचना करतेय. आईबाबाच्या बेडरूममधून तो रस्त्यावर फिरताना दिसतोय. उन्हात पार घामेजलाय. तिने त्याला सांगितलय "कुणाला पत्ता विचारू नको. कुणीतरी घरी आईला सांगेल."

तो बिचारा आता वैतागलाय. हातातला फुलाची वाट लागलेय. ती फक्त मोबाईलवर बोलतेय. दिसत नाहीच. तितक्यात तो चालता चालता थबकतो. काहीतरी आठवल्यासारखा. डाव्या हाताकडच्या बिल्डिंगमधल्या तिसर्‍या मजल्यावर. तो सर्रकन बघतो. पडद्याची हालचाल होते. तो गालातल्या गालात हसतो. येणार्‍या रिक्षेला हात करतो. ती फोनवर ओरडते.
"अरे कुठे चाललास.."
त्याला तिची बिल्डिंग कुठली हे समजलय. तिला तो येतोय हेही समजलय.
=======================================================

हार्बर लाईनचा प्लॅटफॉर्म. दुपारी दोनची वेळ. स्टेशन बान्द्रा. अजिबात गर्दी नाही. तिथे ती दोघं येतात. सोबत अख्खं खानदान. ती असेल सोळा सतरा वर्षाचा. तोही तितकाच. ती नवीन ड्रेसमधे अवघडलेली. त्यात वर तो कधी न घातलेला बुरखा. अम्मीने आणि नानीने तिला आज सजवलय. एखाद्या बाहुलीसारखं. ती दिसतेय पण तशीच नाजुक. तिला आज "पसंतीसाठी" आणलं होतं. ती कुणालाही आवडेल अशी. पहिल्याच नजरेत तिकडच्याच्या नजरेत भरलेली.

ती गप्प बसलेय. ट्रेनचची वाट बघत. आणि त्याच्या चिडवण्याला नुसता उत्साह आलाय. एरवी असतं तर तिने त्याला चांगलंच झोडलं असतं. पण आता सोबत अब्बा आहेत नाना आहेत चाचा आहेत सगळेच मोठे आहेत. आता कसं काय बोलणार?

तो बोलतच चाललाय.. गाणं म्हणतोय. "ये चांदसा रोशन चेहरा.. जुल्फोका रंग सुनहरा.."
तिला खूप राग येतोय. पण काही बोलता येत नाहीये. आता त्या होणार्‍या नवर्‍याचं नाव रोशन आहे.. म्हणून काय मामाने या गाण्यानेच चिडवायचं.?
घरी गेल्यावर बघते तुला.. ती त्याला खुणेनेच म्हणते. तो अजूनच जोरात हसतोय. तिच्याच वयाचा आहे पण तिचा मामा आहे ना... नात्याने मोठा. म्हणूनच...
ती आतल्या आत लाजतेय. आणि हसतेय. वर वर राग दाखवतेय पण तिला त्याचं ते चिडवणं आवडत॑य. त्याला तिचं खुश होणं दिसतय. ती दूर जाणार हेही जाणवतय. म्हणून्च तो अजून तिला चिडवतोय.
"ये चांदसा रोशन चेहरा...

=====================

ती जबरदस्त घाबरलेली आहे. तरी त्याचा हात धरून उभी आहे,
"अगं आई घाबरतेस काय? ती बघ ती इतकीशी लहान मुलगी जातेय. आणि तू उगाच घाबरतेयस.."
ती त्याच्याकडे पाहते. कधीतरी एकदा ती या सरकत्या जिन्यामधे अडकून पडली होती. अजूनपण तिला या जिन्याची भिती वाटते. इतके दिवस ती ना ना कारण. देऊन लिफ्टने नाहीतर जिन्याने जायची, आता मात्र इलाजच नाही. साक्षात कॉलेजकुमार मुलगा तिला घेऊन आलाय या मॉलमधे आणि...

"आई, मी हात धरतोय ना तुझा?" त्याने तिचा हात हलकेच धरत विचारलय...
तोच स्पर्श, गेल्या सतरा वर्षाचा, कधीतरी तिने त्याचा हात धरला होता. चालताना आधार द्यायला. आज त्याने तिचा हात धरलाय. तेव्हा तो जस्सा घाबरला होता तशीच ती आज घाबरली आहे. पण तो तिला सावरतोय. आज जरी ती धडपडली तरी तो तिला नक्की धरेल. तेवढं बळ त्याच्यामधे नक्कीच आहे तिला अलगद उचलण्याइतकं.. ती विचार करतेय.. आठवतेय. लहानपणी फुलपाखराला घाबरणार्‍या त्याला. त्याचं बाळपब तिच्यानजरेसमोरून तरळतेय. डोळ्यासमोरून एक धुकं उभं राहत चाललय.

तो गालातल्या गालात हसतोय. त्याची आई इतक्या वर्षात सरकत्या जिन्यावर कधीच चढली नव्हती. आज ती चढलीये. अजून दोन पावलं बास.. पण त्याचे डोळे का भरून आलेत तेच समजत नाही त्याचं त्याला.

===========================================
 “बाई!” आलेल्या हाकेनं ती वाटेत चालतानाच थांबते. तिला सवयच आहे. आयुष्याची पस्तीस वर्षाहून अधिक तिची ओळख हीच आहे. शिक्षिका, शिक्षण सेविका, मॅडम, मॅम, मिस वगैरे नामाभिधानं खूप नंतरची. त्या आधी एकेकाळी तिची ओळख फक्त आणि फक्त “आमच्या बाई” अशीच होती.
आता रीटायर होऊनच दहा वर्षं झाली. शाळा संपली. साडेदहा ते साडेपाच गुंतून रहायची जागा संपली. शिक्षणाचं दान देता देता तिनं बरंच पुण्य कमावलं असणार कारण, एकुलता एक मुलगा खूप शिकला, परदेशात गेला. सूनही चांगली मिळाली. त्याच्या परदेशामध्ये जाण्याचं तिला फारसं वाईट वाटलं नाही. क्वचित कुणी भेटणारं तिला टोमणा मारायचं, “मुलगा आईला टाकून गेला.”
ती हसून उत्तर द्यायची. “त्याच्या विषयासाठी भारतात खरंच संधी नव्हती, तशी संधी मिळाली तर परत येईलही. आणि मी एकटी कुठं आहे? तुम्ही सारे आहातच की मला सांभाळायला.” शाळेत शिकवत असताना किंचितही आवाज न चढवता विद्यार्थ्यांना त्यांची चूक् दाखवून द्यायची करामत तिनं साधली होती. आताही तीच कामी येत होती.
“बाई!” परत आलेल्या आवाजानं ती मागं वळून पाहते.  समोर तिशी पस्तीशीचा वाटावा असा मुलगा उभा आहे. तिला नाव आठवत नाही. चेहराही ओळखीचा भासत नाही. पण त्याच्या नजरेमधली ओळख सांगून जाते की हा आपला कधीकाळचा विद्यार्थी.
ती हसते. नाव विचारते. तोही शाळेत असताना तिनं शिकवल्यासारखं संपूर्ण नाव म्हणून दाखवतो.
तिला अचानक आठवतं, हा तोच विद्यार्थी. दर वर्षी तिच्या वर्गात याच्यासारखा एकतरी असणारच. शिकण्यात रस नाही. अभ्यासात लक्ष नाही. घरी अभ्यास करवून घेणारं कुणी नाही. तिचा जीव असल्या मुलांसाठी कळवळायचा. हजारोंनी पैसे भरून ट्युशनला जाणार्‍या मुलांची तिला चिंता नसायची, ती मुलं आयुष्याच्या शर्यतीमध्ये कशीही तरली असती.
याच्यासारख्यांचं काय? याला गणीताचा जाम कंटाळा. एक बेरीज वजाबाकी धड करायचा नाही.
ती तरीही विचारते. “सध्या काय करतोस?” तो एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करत असल्याचं सांगतो.
ती तरीही सुखावते. काही का असेना, पोरगं धड नोकरीला लागलं. “तिथं काय म्हणून काम करतोस?” ती पुढं विचारते.
आता मात्र तो जरा चुळबुळतो. तिला वाटतं उगाच विचारलं.
त्त्याच्याकडून उत्तर येण्याआधीच ती म्हणून प्रश्नच बदलते. “बाकी, घरी सगळे कसे आहेत?”
बाई, ते हॉटेल माझं आहे” तो मात्र उत्तर देतो. “तुम्ही मला वर्गात एकदा म्हणाला होतात की, अभ्यास केला नाहीस तर आयुष्यभर चहाच्या टपरीवर कपबश्या विसळशील. दहावीला नापास झालो आणि खरोखर एका वडापावच्या गाडीवर हेल्पर म्हणून लागलो. कित्येक दिवस तेच काम करत होतो. एकदा मालकानं पगाराचा हिशोब करताना मुद्दाम कमी पैसे दिले. त्यादिवशी आयुष्यामधलं गणिताचं महत्व समजलं” तो घडाघडा बोलत जातो. “मग बाई, मी खूप अभ्यास केला. मार्क मिळावेत म्हणून नाहीतर गणित यावं म्हणून.”
तो भर बाजारामध्ये तिला त्याच्या आयुष्यामधल्या संघर्षाची कहाणी ऐकवत जातो. ती ऐकत जाते. त्याच्या तोंडून तिला इतक्या वर्षांच्या कष्टाची, घसा फोडून सांगितलेल्या शिकवणीची पावती मिळत जाते.
तो तिथं रस्त्यातच वाकून तिच्या पाया पडतो. ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते. तो वर बघतो, तेव्हा त्याचे डोळे डबडबलेले असतात. आयुष्यामधलं एखादं सर्वात मोठं गणित सुटल्यासारखा आनंदानं तो हसत मात्र असतो.

>>>> 
 ती आज येणार म्हणून सगळं घर गजबजून गेलंय. त्याच्या खोलीमध्ये तो केव्हाचाच एकटा बसून आहे. एरवीही त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो, आज तर काय हक्काचं कारण.
मध्येच कधीतरी सूनबाई येऊन डोकावून “चहा हवा का?” विचारते. तो मानेनंच नाही म्हणून सांगतो.
“किती वाजता ट्रेन येईल?” सूनबाई मागे वळायच्या आत तो अधीरतेनं विचारतो.
“ट्रेन मघाशीच आली. आता पाचेक मिनिटांत घरी पोचतीलच” सूनबाई कामाच्या लगबगीमध्ये इतकं सांगून निघून जाते. तो कसाबसा आधार घेत उठतो. खोलीच्या दारापर्यंत येतो. त्याला तिथं आलेला पाहताच साठीला पोचलेला लेक त्याच्या वयाच्या मानानं नव्वदीच्या बापाला आधार द्यायला उठतो.
“तुम्ही कशाला इथं आलात? सगळे आले की आम्ही सर्वात अधी तुम्हाला भेटायलाच येणार की.” लेक उत्तरतो.
तो काहीच बोलत नाही. तितक्यात हॉर्नचा आवाज येतो. गेटमधून गाडी आत आलेली दिसताक्षणी बापलेक दोघंही दाराकडेच जातात. गाडीमधून त्याची पाच वर्षाची पणती खाली उतरते. पहिल्यांदाच भारतात आलेली, विमान आणि रेल्वे प्रवासानं दमलेली, भांबावलेली, आणि तरीही निरागस डोळ्यानी टकामका पाहणारी.
पिढ्यानपिढ्याचं संचित त्याच्या डोळ्यांसमोर उभं आहे. तिच्या रूपामध्ये त्याला कधीकाळी मागच्या शतकामध्ये जन्मलेली त्याची लहानगी बहिण दिसते, आणि तिला मात्र समोर उभा असलेला वास्तुपुरूष. या घराण्याचा पूर्वज.
हलकेच एक पाऊल उचलून ती त्याच्याकडे येते, त्याच्या थकावलेल्या गात्रांकडे बघत, आणि बोळक्या झालेल्या तोंडामधल्या हसण्याची नक्कल करायचा प्रयत्न करत, ती सामोरी येते. तो किंचित खाली झुकतो.
आजोबा?” ती विचारते.
तिच्यामागे उभा असलेला नातू आणि नातसून, लेक आणि सून हा सारा सोहळा पाहत उभे आहेत.
नाही गं. तो तिकडं उभा म्हातारा आहे ना, तो तुझा आजोबा. मी तर तुझा दोस्त आहे” तो त्याच्या सावकाश आवाजात उत्तर देतो. ती खुदकन हसते. तोही हसतो.
अख्खं घर त्या चार पिढ्यांच्या मधल्या अंतराला मिटताना पाहून खुळावत जातं.