Thursday, 21 August 2014

दरवाजा (भाग ३)

आई, मला बोलावलंय, तासाभरात जाऊन येतो. कुठे बाहेर पडू नकोस.” असिफने आरतीला आवाज दिला. आरती हातातली जुनी साडी केव्हाची फाडत बसली होती. जुनी म्हणजे अशीच कुणीतरी दिलेली साडी. देतानाच त्याला एवढी ठिगळं लावली होती की पोतेरं म्हणून देखील वापरता आली नसती. म्हणून असिफने तिला खेळायला दिली होती.
“मी येते” ती अचानक म्हणाली.
“नको. तुला परत काहीतरी म्हणतील. रात्रीचे आठ वाजलेत. भूक लागली तर जेवून घे.” तो शांतपणे म्हणाला आणि खोलीबाहेर पडला. तरी आरती त्याच्या मागोमाग आलीच. “नको म्हटलं ना..” तो ओरडला, तरी ती येत राहिली. शेवटी वैतागून तो मागे फिरला. तिच्या हातातली ती साडी काढून खोलीत ठेवली. तिचे विस्कटलेले केस सारखे केले. चेहर्‍यावर पावडर कुंकू लावलं. त्याच्या या लाडानं ती खुश झाली. “कशाला जातेस त्यांच्या घरी. तू आलेलं आवडत नाही. मला बोलावलंय म्हणजे काहीतरी काम असणार...” तो बडबडला. “फुकट तर बोलावणार नाहीत...”
“रेश्मा... रेश्मा” आरती तोंडात पुटपुटली.
असिफ हसला. “तिचा निरोप नाही आलाय, तिच्या बापाचा आलाय. मागच्या महिन्यांत रिक्षाची रोजंदारी वाढवून हवी होती त्याच्या बहिणीला. म्हणून बोलावलं अस्णार.”
रेश्माच्या घरी असिफ आणि आरती आले तेव्हा रेश्माच्या घरामध्ये स्मशानशांतता होती. एरवी ऐकू येणारा कसलाही गडबड गोंधळ दिसत नव्हता. पडवीमध्ये काम करणारे गडीमाणसं पण नव्हती. पडवीतून उभं राहून त्यानं आवाज दिला. रेश्माचा मोठा भाऊ बाहेर आला. त्याच्या चेहर्‍यावरचा संताप आणि तिरस्कार लपत नव्हता.
“काय रे ए? ज्यास्त माज आलाय?” तो वसकला. त्याच्यामागोमाग रेश्माचा बाप बाहेर आला. “रवी, तू बोलू नकोस. आत जा” त्यानं डबल गुर्मीत ऐकवलं.
“काय झालं?” असिफने विचारलं.
“भडव्या, मलाच विचारतोस काय झालं?” रेश्माचा बाप समोर आला आणि काडकन असिफच्या मुस्काटीत मारून ओरडला. “दोन वर्षं माझ्या पोरीला नासवत होतास.. आणि आता विचारतोस काय झालं?”
आरतीनं पुढे येऊन असिफला घट्ट धरलं. “मारू नकोस” ती कशीबशी म्हणाली.
“आई, तू घरी जा” असिफ हळू आवाजात म्हणाला.
“नको.. ते मारतात. खूप मारतात” भेदरल्या आवाजात आरती म्हणाली.
“काका, जे काय बोलासांगायचंय ते नंतर... आधी आईला घरी पोचवून येतो. तिच्यासमोर हे सगळं सहन होत नाही...तुम्हाला माहित आहे ना?”
“का सहन होत नाही? वेडीच तर आहे. अजून काय वेड लागायचं शिल्लक आहे. नंतर वगैरे काही नाही. आज आता इथं मी अख्खा चिरेन. माझी पोरगी म्हणजे काय रस्त्यावरचा माल वाटला? तुझी हिंमत तरी कशी झाली तिच्याकडे बघायची?” तो अजून जोरात खसकला. आरती अजूनच भेदरली. चढलेला आवाज ऐकून आतमधून रेश्माची आई बाहेर आली. “अहो, हळू बोला. शेजारीपाजारी कुणी ऐकलं तर चर्चा नको. घरात घेऊन काय ते बोला” नवर्‍याच्या जवळ जाऊन ती खुसफुसली.
काय चालू असावं याचा अंदाज असिफला थोडातरी आलाच होता. आजनाउद्या हा दिवस येईल याची भिती होतीच. घरात गेल्यावर नेहमीच्या सवयीनं आरती जमिनीवरच फतकल मारून बसली. असिफ तिच्या बाजूला उभा राहिला.
“काल मी माझ्या सोत्ताच्या डोळ्यांनी तुला बघितलंय.” रवी पुन्हा एकदा अंगावर धावून आला. “रेश्मासोबत तुझ्या खोलीमध्ये. खोटं बोलू नकोस. जीभ हास्टून देईन” असिफ काही बोलायच्या आधीच तो ओरडला. “काय केलंस तिच्यासोबत? लाज नाही वाटली? ज्या घरात भाकरी खातोस त्याच घराच्या इज्जतीवर हात मारतोस? भडव्या, तुझ्या बापाला जसा गाववाल्यांनी तुडवून मारला होता, त्याहून जास्त तुला तुडवून मारेन!”
“रवी, शांत हो.” पुन्हा एकदा रेश्माची आई आली. “असिफ, मी आजवर तुला कधीही नोकर मानलेलं नाही. घरच्या लेकासारखंच मानलंय. आरतीवहिनीच्या प्रत्येक दुखण्याखुपण्यामध्ये मदत केली आहे. तुला शिक्षणामध्ये कायम मदत केली आहे.” म्हणत त्यांनी अतापर्यंत केलेला प्रत्येक उप्कार घडाघडा बोलून दाखवला. असिफ शांतपणे हाताची घडी घालून ऐकत होता. आरती खाली बसून फरशी नखानं कुरतडत राहिली. रवी आणि रेश्माचा बाप धुमसत राहिले. “काल रवीने तुला रेश्मासोबत तुझ्या खोलीमध्ये एकत्र पाहिलं. कुठल्या अवस्थेमधे ते मी बोलायला हवं का?” एवढ्या वेळामध्ये तिचा आवाज अजिबात चढलेला नव्हता.
“झालं तुमचं बोलून? मी बोलू?” असिफ म्हणाला.
“बोलण्यासारखं काय आहे काय तुझ्याकडे भोसडीच्या?” रवी परत उसळला.
“शिव्या देऊ नकोस.” असिफ पहिल्यांदाच त्याच्याकडे बघत म्हणाला. “जे काही काल पाहिलंस त्याची बापाकडे येऊन चुगली करण्याआधी मला विचारायची हिंमत नव्हती? काल विचारलं असतं तर सांगितलं असतं...”
“काय सांगितलं असतं? माझ्या बहिणीवर जबरदस्ती करतोस... तिला नादाला लावतोस.” तो मध्येच ओरडला.
“अडीच वर्षापूर्वी लग्न केलंय. कसली जबरदस्ती केलेली नाही.. खोटं वाटत असेल तर बोलाव . लग्नाची कल्पनासुद्धा तिचीच होती. फक्त माझं शिक्षण पूर्ण होऊन कुणाला याबद्दल सांगणार नव्हतो”
“असिफ, बोलताना तोंडाला आवर घाल” पहिल्यांदा रेश्माच्या आईचा आवाज जरबेचा झाला होता. “तुझी औकात काय आहे ते बघ”
“औकात माहित आहे म्हणूनच इतके दिवस लपवून ठेवलं होतं ना? कुणालाही फसवायचा किंवा नासवायचा इरादा नव्हता. जोपर्यंत मी माझ्या स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभं राहत नाही, तोपर्यंत याबद्दल सांगणार नव्हतो. नोकरी मिळाल्यावर सर्वांना खरं काय ते सांगणार होतोच,”
“तू तोंड वर करून बोलू नकोस.” रवी परत एकदा किंचाळला... “भोळ्या पोरीला फसवतोस. नादाला लावतोस. आणि वर खोटं बोलतोस...”
“काय खोटं बोललोय? रेश्माला बोलवा इथे. तिलाच विचारा ना.”
“असिफ, मी स्वत: तिला विचारलंय. तिच्या वडलांनी काल किती मारलंय ते बघ. पोर एवढी भेदरली होती की कालपासून तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. आता संध्याकाळी देवाच्या मूर्तीवर हात ठेवून तिनं खरं काय ते सांगितलं. तू तिला भुलवलंस... नादाला लावलंस आणी तिच्यावर जबरदस्ती करून गेली दोन वर्षं तिला भोगत राहिलास. याबद्दल कुणासमोर काही बोलशील तर तिचे कॅमेयामध्ये नागडे फोटॊ सर्वांसमोर दाखवशील अशी धमकी दिली होतीस ना... अरे, लेकासारखा पोसला तुला आणी तू हे पांग फेडलेस. बिनाबापाचा आणि वेड्या आईचा म्हणून सगळे नखरे केले. हे दिवस दाखवलेस?”
“हे बघा, तुम्ही तिला बोलवा. माझ्यासमोर समक्ष काय ते सांगू देत. माझ्याकडे दोन वेळेला जेवायला पैसे नाहीत. कॅमेरा कुठून असेल आणि तिनंच मला प्रेम असल्याची कबूली दिली होती. बोलवा तिला. काय खरं आणि काय खोटं ते होऊन जाऊ देत.”
“काही गरज नाही” एवढा वेळ शांत बसलेला रेश्माचा बाप कडाडला “यापुढे तुला रेश्माच काय तिचं नखसुद्धा दिसणार नाही. खूप झाली बोलाबाली. आपले हात एवढे वरपर्यंत पोचलेत की तुला आणि तुझ्या आईला एका दिवसांत गायब करेन. गावातून हाकलून देईन. एक तर तुम्ही खालच्या जातीतले असूनसुद्धा आम्ही घरात घेत होतो. तेच चुकलं. फार मोठ्या समाजसुधारकाचा पोरगा आहेस ना? आता कळली तुमची लायकी...”
“नाही... ओरडू नकोस.” आरती मध्येच म्हणाली. “लग्न झालं. मी पाहिलं. मला रेश्मानं सांगितलं. मला लाडूपण दिला.. हो ना शेखर.. बोल. सांग”
आरतीच्या या बोलण्यावर पहिल्यांदाच रेश्माची आई गप्प बसली. रेश्माचा बाप काही न सुचून बायकोकडे बघायला लागला. “मी खोटं बोलत असेल. पण माझी आई... वेडी आहे.. ती का खोटं बोलेल? रेश्माला इथं बोलवा. तिनं आणि मी दोन वर्षापूर्वी गावाबाहेर जाऊन देवळांत लग्न केलंय. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मला अजून एक वर्ष द्या. चांगली नोकरी मिळाली की मी रीतसर लग्न करेन. तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेन. विश्वास ठेवा” असिफ हात जोडून म्हणाला.
पण त्याच्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. त्या रात्रीपासून रेश्मा त्याला कधीच दिसली नाही. रेश्माच्या बापानं त्याच्यासमोर गाव सोडून जायचं हीच एक अट ठेवली होती. रवीने आरतीचा हात धरला आणि तिला ओढत नेऊन गेस्ट हाऊसमध्ये बंद केलं. “रेश्माचं लग्न होइपर्यंत ती इथेच राहील. व्यवस्थित खायलाप्यायला देऊ. पण जर तू तुझं तोंड कुठं उचकटलंस तर तिचा मुडदाच हातात देईन. रवीला खोलीवर घेऊन जा, ते फोटो काय आहेत ते त्याचा ताब्यात दे”
“फोटो नाहीत. लग्नासाठी घेतलेली एक दोनशेदहा रूपयाची साडी आणि एक ग्राम सोन्याचं मंगळसूत्र आहे, ते धाडून देतो.” असिफ शांतपणे म्हणाला आणि परत खोलीवर आला. कोपर्‍यातली पहार उचलली आणि त्याच्या आईवडलांनी बांधलेली ती खोली रात्रभर पाडत राहिला. गावातल्या प्रत्येकानं “आसं का करतोस?” हे विचारलं. त्याच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. रेश्मा खोटं बोलली होती. तिच्या घरी कधीही समजलं असतं तरी त्यानं समजावलं अस्तं. तिला सुखात ठेवलं असतं, पण ती खॊटं बोलली होती. “आपण लग्न करू या?” हे तिनंच उच्च्चारलेलं वाक्य आणि त्यानं वेड्यासारखं ते कबूल केलं होतं. आणि आज त्याच रेश्मानं त्याला बलात्कारी ठरवलं होतं.
चुलीतल्या निखार्‍यासारखा दोन दिवस धुमसत राहिला. एसटीस्टॅण्डजवळच्या बारमध्ये जाऊन चिक्कार प्यायला. गावभर विनाकारण फिरत राहिला. पण डोक्यातला अंगार थंड होइना. प्रचंड संताप आला होता. आरतीची काहीही खबरबात नव्हती. एक दोनदा रवीला भेटून त्यानं आरतीबद्दल विचारलं तेव्हा त्यानं झुरळासारखं झटकून टाकलं होतं.
अखेर त्यानं स्वत:लाच समजावलं. खूप झालं असिफ एका मुलीसाठी स्वत:ची कीव करणं. तिच्यामुळं तुझं आयुष्य का बरबाद करतोस.... तुला यातून बाहेर पडायलाच हवं. आपण इतके मूर्ख कसे काय ठरलो. रेश्माला लग्न करायचंच नव्हतं, त्यानं वारंवार नकार दिल्यावर त्याला अंथरूणात ओढण्यासाठी तिनं हे लग्नाचं टुमणं काढलं होतं. आपण ज्याला प्रेम समजत होतो ते दोघांसाठी पण केवळ वासनेचंच रूप होतं. त्याला “लग्न” असं गोंडस नाव देऊन रेश्मानं तिला जे हवं ते मिळवलं होतं आणी त्याला जे हवं होतं ते दिलं होतं. पण आता ते नातं संपलं होतं. ती गरज संपली होती. रेश्माच्या दृष्टीनं हे लग्न संपलेलं होतं. असिफच्या दृष्टीनं रेश्माच संपली होती.
शेवटी तो रेश्माच्या बापाकडे गेला. “मुंबईतला पोरगा बघितलाय ना? मला त्याचा फोननंबर मिळालाय. फोन करून तुमच्या लेकीची खरी हकीकत सांगू?” अत्यंत थंड आवाजात तो म्हणाला.
“हे बघ, आरती माझ्या ताब्यात आहे..”
“मारून टाका. मला फरक पडत नाही. नाहीतरी वेडी आई माझ्या पायातली बेडी झाली आहे. ती गेली तर मी गावाबाहेर तर जाऊ शकेन... होणार्‍या जावयाला तुमच्या मुलीचे सगळे किस्से रंगवून रंगवून सांगेन. तुझ्या पोरीच्या अंगावरच्या प्रत्येक तीळाचा हिशोब सांगेन. मी म्हणतो आम्ही लग्न केलं होतं, म्हणून त्या हक्कानं मी तिच्याबरोबर झोपत होतो. ती म्हणते मी जबरदस्ती केली, बलात्कार केला. कुठलंही व्हर्जन तुमच्या जावयाला सांगितलं तरी परिणाम काय होइल ते चांगलंच माहित आहे. गावामध्ये ही खबर उडवायला मला पाच मिनीटं लागणार नाहीत.... बोला काय करायचं?”
रेश्माचा बाप गडबडला. साध्याभोळ्या असिफकडून ही अपेक्षा त्यानं चुकूनही केली नव्हती. “पाच लाख रूपये. कॅशमध्ये” असिफ पुढे म्हणाला. “दोन दिवसांमध्ये आणून द्या. मी आणि माझी आई तुम्हाला या गावात परत दिसणार नाही. परत तोंडातून रेश्माचं नाव काढणार नाही...”
“आणि पैसे घेऊन शब्दाला फिरलास तर...”
“मी शेखरचा मुलगा आहे. बाकी, माझाबाप कसाही असला तरी शब्दाला मागे फिरणारा नव्हता हे तुम्हीच सांगितलं होतं ना? तुमच्या मुलीच्या सुखाआड मी येणार नाही पण मला पैसे द्या!” म्हणून तो मागे वळला.
दोन पावलं गेलेला पाठी आला आणि म्हणाला, “रेश्मासाठी एक निरोप आहे. तिला माझ्यातर्फे धन्यवाद द्या. आयुष्यामध्ये कुठलीही व्यक्ती स्वत:पेक्षा महत्त्वाची नसते हा धडा तिच्यामुळे मिळाला. शंभर बूकं वाचली असती तरी हे ज्ञान इतक्या सहज मिळालं नसतं”
दोन दिवसांनी असिफ आणि आरतीनं गाव सोडलं. पैसे घेऊनच. इतर कुणालाच हे माहित नव्हतं. रेश्मा तेव्हा स्वत:च्याच लग्नाच्या तयारीमध्ये अडकली होती. आता तिच्या स्वप्नांचा राजकुमार मोहित झाला होता.
_++++++
“आता अजून एकच जिना राहिला” स्वत:लाच म्हणत रेश्मा धापा टाकत उभी राहिली. कशीबशी एक एक पायरी चढत ती दरवाज्याजवळ आली. कुलूप उघडणार इतक्यात समोरच्या फ़्लॅटचा दरवाजा उघडला. रेश्माला वाटलं, माही आली. पण असिफला समोर आलेला पाहताच ती गडबडली. त्याचं लक्ष नव्हतं, तो मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. तिनं कुलूप उघडल्याचा आवाज आल्यावर त्यानं मान वर करून पाहिलं. एका निमिषांत त्यानं मान परत मोबाईलमध्ये घातली.
ती जागच्या जागी थिजली होती. शेवटी हिंमत करून हाक मारली. “असिफ..” तो लिफ्टची वाट बघत उभा होता. “कसा आहेस?”
तिच्या अचानक आलेल्या प्रश्नावर तो गालातच हसला. किती वर्षांनी तिनं असिफला असं हसताना पाहिलं होतं.
“कसा दिसतोय?”
“माही दिसली नाही, दोन तीन दिवसांत” ती म्हणाली. बोलताना घश्याला कोरड पडत असलेली तिला जाणवत होती. असिफ तिच्यापासून अवघ्या दहा फुटांवर उभा होता. तिची नजर त्याच्या चेहर्‍यावरच थबकून राहिली होती. कितीप्रयत्न केला तरी नजर हटेचना.
“गावाला गेलीये. तिच्या आईची तब्बेत बरी नाही. आठ दिवसांनी येईल” असिफ अजूनही तिच्याकडे बघत नव्हता, नजर मोबाईलमध्येच होती.
“आरती काकी...”
"दहा वर्षापूर्वी गेली.” तो तितक्याच शांत आवाजात म्हणाला. लिफ्ट येऊन गेली, तरी त्याचं लक्ष नव्ह्तं.
“ऐकून वाईट वाटलं.... त्यांची मध्येच कधीतरी खूप आठवण येते.”
असिफने पहिल्यांदाच वर मान करून तिच्याकडे सरळ रोखून पाहिलं. इतका वेळ अनोळखी असणारी त्याची नजर अचानक संतापी बनली. “नावसुद्धा घेऊ नकोस.” तो पुटपुटला.
“आय ऍम सॉरी!” ती हळूच म्हणाली. “त्यावेळेला खरं सांगते, तुला संपर्क करायचा खूप प्रयत्न केला. पण…..”
असिफने काही न बोलता पुन्हा एकदा लिफ्टचं बटण चारपाचवेळा दाबलं. लिफ्ट ग्राऊंड फ़्लोअरलाच थांबली होती. “असिफ, प्लीज मला माफ कर…मी तेव्हा चुकले. पण प्लीज हात जोडते. यासंदर्भात यांना काही बोलू नकोस.” रेश्मा अचानक म्हणाली.
“कशाबद्दल?” असिफनं परत शांतपणे विचारलं. रेश्माच्या घश्यामध्ये हुंदका दाटून आला. डोळ्यांतून पाणी आलं. ते पाहताच असिफ तिच्या एकदम जवळ आला. दोन्ही हातांनी तिचे दंड घट्ट धरले. तिच्यात आणि त्याच्यात केवळ काही श्वासांचं अंतर उरलं होतं. “फक्त तुझा स्वत:चा विचार कर. अजून कुणाचा करू नकोस” तो कुजबुजला. “मी वाटलो काय तुला? आं? हे असं करायचंच असतं ना तर फार आधी केलं अस्तं. तुझा जीवसुद्धा घेतला असता.. पण मला गरज वाटली नाही. कारण, माझ्यासाठी तू तितकी महत्त्वाची नाहीस” त्यानं धरलेला दंड सोडला. त्याच्या नजरेमधल्या रागाचा तिरस्काराचा चटका तिला जाणवला.
असिफ धाढधाड जिना उतरून खाली निघून गेला. रेश्मा तिथंच दरवाज्यात खाली मटकन बसली. असिफने जिथं तिचा दंड धरला होता, तिथं त्याची बोटं उमटली होती. लालगुलाबीसर रंगाच्या असिफच्या खुणा. कितीतरी वेळ ती तो स्पर्श परत परत अनुभवत राहिली. कितीतरी वेळ ती असिफच्या अंगाचा वास श्वासांत भिनवत राहिली. कितीतरी वेळ ती त्याच्या शब्दांच्या प्रत्येक नादाला गुणगुणत राहिली.
पुन्हा एकदा शरीराच्या नसेनसेतून “असिफ हवाय” याचा गजर झाला. असिफ हवाच होता. कसंही करून!!



दरवाजा (भाग 4)

Tuesday, 5 August 2014

दरवाजा (भाग २)

थ्री सिक्स्टी” मानदेखील वर न करता तो म्हणाला. ती हॉलच्या दाराशी तशीच उभी राहिली. समोर असिफच उभा आहे, यावर तिचा विश्वासच नव्हता. गेल्या महिन्याभरामध्ये आज ना उद्या असिफ समोर दिसणार याची तिला खात्री होती. जेव्हा माहीने असिफबद्दल सांगितलं, तळमजल्यावर जेव्हा “असिफ-माही” अशी नवीकोरी पाटी दिसली, जेव्हा गीताने नवीन शेजार्‍यांच्या घरामध्ये भिंतभर चित्रं लावलेली आहेत असं सांगितलं, तेव्हाच समजलं होतं- आज ना उद्या असिफ आपल्याला इथे भेटणार. तो इथेच आपल्याच आसपास कुठेतरी वावरत असणं हेच कठिण जात होतं.. तो समोरासमोर येऊ नये अशी रोजच तर प्रार्थना करत होती, पण आज तर असिफ चक्क समोर उभा होता.
“मीरा, पैसे आण” मोहितच्या आवाजाने भानावर आली. स्वत:वर कसातरी ताबा मिळवून ती आत बेडरूममधे आली.
असिफने हातातली पावती मोहितच्या हातात दिली आणि समोरच्या फ़्लॅटची बेल वाजवली. “वो नेहमी आता है वो लडका नही आया आज?” मोहितने विचारलं.
“नाही. त्याची प्रीलिम चालू आहे” असिफने हातातल्या कागदावर काहीतरी लिहत सांगितलं. तितक्यात समोरचा दरवाजा उघडून माही बाहेर आली.
“येस्स?”
“पेपर बिल. सातशे वीस रूपये” त्याने हसत उत्तर दिलं.
“ऍन्ड विल इट बी इन कॅश ऑर काईन्ड?” माही असिफच्या अगदी जवळ येत म्हणाली. नक्की काय चाललंय ते अजिबात न समजल्याने मोहित पूर्णपणे गांगरला आणि सरळ आत निघून आला.
“काहीतरी गडबड आहे.” हे त्याचं वाक्य ऐकताच रेश्मा बावरली. कपाटामधून काढलेली पाचशेची नोट तिने मोहितच्या हातात दिली आणि चेहर्‍यावरचा गोंधळ त्याला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करत ती म्हणाली, “काय झालं?”
“या पेपरवाल्या माणसाबरोबर ती समोरची मुलगी कशी बोलतेय ते बघ” मोहित विनाकारण कुजबुजला.
“अहो, तो पेपरवाला नाही. समोरच्या फ्लॅटचा मालक आहे.”
“मग तो पेपरबिल कशाला गोळा करतोय? साईडबिझनेस म्हणून?” मोहित बोलत असतानाच पुन्हा एकदा बेल वाजली. दोघे बेडरूममधून बाहेर आले तेव्हा असिफ अजून दारातच उभा होता. माही रेश्माला बघताच पुढे आली. “मीरावहिनी! किती दिवसांपूर्वी म्हटलं होतं की ओळख करून देईन. हा असिफ. असिफ, ही मीरावहिनी आणि हे मोहितदादा. आपण इथे राहायला आल्यापासून यांनी आपली खूप मदत केली.”
“हॅलो” असिफने हसून मोहितशी हात मिळवला. रेश्माकडे मात्र त्याने अजिबात पाहिलं नव्हतं. अर्थात पहावं अशी तिची अपेक्षाही नव्हती.
“हॅलो. ही पेपर बिलाची काय भानगड?” मोहितने विचारलं.
“काही नाही, असंच!” असिफ हातातल्या कागदाची घडी करत म्हणाला.
“मोहितदादा, मी सांगते. तुम्हाला हा असिफ नमुना माहित नाही. त्या सेंतिलची परीक्षा आहे.. अभ्यासाला वेळ नाही, असं सांगत होता. त्यातून आज रविवारी अख्ख्या सोसायटीभर बिलं गोळा करायचं काम असतं म्हणाला. म्हणून असिफमहाराज ... इतकंच ना... मी बिलं गोळा करून देतो. आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून सोसायटीभर फिरत आहेत. आज रविवार आहे, लोकं उशीरापर्यंत झोपतात. आपल्याला शिव्या घालतील याचं काहीही भान न ठेवता हे काम चालू आहे.” माही तिच्या नेहमीच्या उत्साहाने बडबडत राहिली. असिफकडे बघून म्हणाली, “अजून किती बाकी आहे?”
“ही लास्ट बिल्डिंग. आणि लास्ट घर.. झालंच”
“दॅट इज रीअली कमेंडेबल” मोहित म्हणाला, “मला असा लोकांना मदत करायचा स्वभाव फार आवडतो” असिफच्या हातात पैसे देत तो म्हणाला. असिफने खिश्यातून सुट्टे काढून दिले आणि तो हसला. “थॅंक्स”
“या आतमध्ये तरी या... मीरा! जरा चहा वगैरे बघ” मोहित रेश्माकडे बघून म्हणाला.
“नको, चहा नको...” असिफ म्हणाला, “निघतो”. एकच क्षणभर त्याची नजर रेश्मावर पडली. पूर्णपणे अनोळखी नजर. रेश्माला तो क्षणसुद्धा असह्य झाला, ती लगोलग आत निघून आली.
“असिफ, मीरावहिनींच्या हातचा चहा पिऊन तर बघ. कसला फक्कड असतो. मीरावहिनी, मला चालेल कपभर चहा” माही नेहमीच्या मोकळेपणाने आत सोफ्यावर येऊन बसली. असिफचा जवळ जवळ हात ओढून तिने त्यालापण बसवलं.
“आपण काय करता?” मोहितने असिफला विचारलं.
“बिझनेस आहे”
“अच्छा, मी बॅंकेमध्ये आहे. मॅनेजर” मोहित म्हणाला. “तुम्ही मूळचे कुठले?”
या प्रश्नासोबत रेश्माचं अंग थरथरलं. असिफने गावाचं नाव घेतलं जरी असतं तरी लगेच “मग तुम्ही माझ्या मिसेसला ओळखत असाल. गावामध्ये फार फेमस लोक आहेत.” असं मोहित म्हणणार. नक्कीच. पण हेच असिफ असं करणार नाही..
“इथलाच” असिफने उत्तर दिलं. रेश्माने जवळजवळ सुटकेचा नि:श्वास टाकला. समोरचं पाणी ढणाढण उकळत होतं. थरथरत्याच हातांनी तिने त्यामध्ये चहा साखर घातली.
“तुम्ही शेजारी म्हणून आलात ते बरं झालं, त्या आज्जी वारल्यावर घर सहा महिने बंदच होतं. मीराला कुणाचीच सोबत नाहीना. आज्जींचा जरा लळा पण लागला होता. चैत्रा अश्विनचे फार लाड करायच्या” मोहित बोलत होता.
“आम्हाला पण बरंच आहे ना” माही म्हणाली, “मीरावहिनींची खूप सोबत होते, चैत्रा अश्विन कुठे आहेत?”
आतमध्ये कापात चहा गाळत असलेल्या रेश्माला अचानक आठवलं.... “अहो!!” तिने हाक मारली, “काय गं?” मोहित आत येत म्हणाला. “त्यांना चहामध्ये दूध हवंय की नको ते विचारा”
“काय बावळट आहेस? ही काय विचारायची गोष्ट झाली. साधा नेहमीसारखा तर चहा कर. बिनादुधाचा चहा कोण पितं?” म्हणून तो बाहेर गेला. पण तेवढ्यात माहीचा आवाज आला, “मीरावहिनी, असिफचा चहा विदाऊट मिल्क!” रेश्माला स्वत:शीच हसू आलं आणि त्याचबरोबर डोळ्यांत पाणीसुद्धा. स्टॅण्डजवळच्या चहाच्या टपरीमधून वापरलेल्या चहा पावडरीचा तो चिकट गोळा असिफ घेऊन यायचा, पाच रूपये देऊन. पातेलंभर पाण्यामध्ये तो चहा उकळायचा, असली तर साखर घालायची पण ती नसायचीच. ते चहाचं ग्लासभर पाणी आणि शिळा पाव किंवा बिस्कीटं एवढा त्याचा नाश्ता. उरलेलं पातेलं झाकून ठेवायचा. आरतीकाकी कधी खोलीत आलीच तर तो चहा प्यायची, कधी ओतून द्यायची. एकदा ते पातेलं बर्‍यापैकी गरम असताना चक्क अंगावर ओतून घेतलं होतं. जास्त भाजलं नव्हतं.. तरी असिफला शाळेत कुणीतरी निरोप दिल्यावर लगेच धावत आला होता. आरतीकाकी काहीच न झाल्यासारखी परत घर सोडून कुठेतरी गेली होती. असिफ ती संपूर्ण दुपार तिला गावभर शोधत राहिला. ती सापडल्यावर तिच्या भाजल्याच्या जखमेवर लावायला चमचाभर तूप मागत तिच्या घरी आला होता.
माहीच्या हसण्याच्या आवाजाने ती पुन्हा भानावर आली. मोहित आणि माही कशावर तरी बोलत होते. असिफ शांत होता. मागच्या घटना आठवत बसायची ही वेळ नव्हे, तिने स्वत:लाच समजावलं.
चहा घेऊन बाहेर आली, तेव्हा मोहित लगेच म्हणाला, “नुसता चहा काय? सोबत खायला आण” रेश्माने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. ’थालिपीठं मघाशीच संपली आहेत. बिस्कीटं आणणं बरं दिसत नाही’ वगैरे सर्व काही त्या डोळ्यांमध्ये मोहितला बरोबर समजलं. चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवून रेश्मा परत किचनमधे निघून आली.
“तुम्ही असं करा, आज लंच आमच्याकडे.” मोहित कप असिफच्या हातात देत म्हणाला. “माहीला विचारून घ्या, आमची मिसेस चिकन बिर्यानी अशी फर्मास बनवते... दर संडेला आमचा तोच बेत असतो. आज तुम्हीपण या”
“थॅंक्स फॉर द इन्व्हाईट. पण आज बाहेर जेवायला जायचा प्लान आहे. आणि तसंही मी नॉनव्हेज खात नाही.” असिफ शांतपणे म्हणाला.
“पाहिलं!! मग याच्यासोबत राहताना मलाही पूर्ण शाकाहारी रहावं लागतं” माही म्हणाली. किचनमध्ये कट्ट्याच्या जवळ उभ्या असलेल्या रेश्माच्या चेहर्‍यावर परत एक हसू आलं. जणू गेल्या पंधरा वर्षात असिफ बदललेलाच नव्हता.
“अरेच्चा, पण असं कसं, आय मीन तुम्ही कधीपासून नॉन व्हेज खात नाही?” मोहितच्या चेहर्‍यावरचा गोंधळ बघून असिफ किंचित हसला.
“जन्मापासूनच.. मी मुस्लिम नाही. वडलांचं नाव शेखर. मी दोन दिवसाचा असताना एका अपघातामध्ये तो आणि त्यांचा सख्खा मित्र असिफ दोघंही वारले. म्हणून आईने त्या दोघांची आठवण म्हणून माझं नाव असिफ शेखर ठेवलं. मग हळूहळू लोक फक्त असिफ एवढंच म्हणायला लागले.” तो सोफ्यावरून उठत म्हणाला. “तसं मी जात-पात-धर्म वगैरे काही मानत नाही. पण लहानपणापासून खाण्यापिण्याच्या सवयी मात्र अजून बदलल्या नाहीत.. चला, निघतो. थँक्स फॉर द टी. मिसेसना सांगा, चहा उत्तम झाला होता” म्हणून तो दरवाज्याबाहेर निघून गेला.
“येते हां, मीरावहिनी. बाय” म्हणत माहीपण गेली.
“फार इंटरेस्टिंग शेजारी आहेत” मोहित किचनमध्ये येत म्हणाला. “ही माही म्हणजे नुसता सोड्याच्या बाट्लीसारखी फसफसत असते, आणि तिचा नवरा एकदम शांत. सकाळी लोकांच्या घरी पेपरचे पैसे काय मागत फिरतोय? एवढ्या मोठ्या टूबीएचके फ्लॅटचा मालक आहे. त्या माहीसोबतच कॉल सेंटर चालवत असेल ना?” रेश्मा काही न बोलता काम करत राहिली. इतक्या दिवसांत तिने माहीला असिफ काय करतो ते विचारलं नव्हतं. असिफबद्दल जितकं कमी समजेल तितकं उत्तम... तिने मोहितला अजून त्यांचं लग्न झालेलं नाही हेदेखील सांगितलं नाही. “त्या माहीसोबत कसं पटतं तुझं? किती बोलते! तिच्याकडून जरा कम्युनिकेशन स्किल्स शिक” फ्रीजमधून कोल्ड्रिंकची बाटली काढून घेत मोहित म्हणाला. आणि नेहमीसारखा टीव्हीसमोर जाऊन स्थानापन्न झाला.
रेश्मा किचनमध्ये काम करत राहिली, पण डोळ्यांसमोरून असिफची ती अनोळखी नजर काही हटेना.
=======
माहीनं किचनमधून दोनदा आवाज देऊन पण असिफचं काही उत्तर आलं नाही म्हणून ती बाहेर हॉलमध्ये आली. तो लॅपटॉपसमोर स्वत:चीच तंद्री लावून बसला होता. “अरे, चारचारदा हाका मारल्यात. लक्ष कुठाय?” ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तेव्हा तो भानावर आला. “काही नाही. असंच! तुला किचनमध्ये काही मदत हवी आहे का?”
“काही नको. सगळं आवरून ठेवलंय. सकाळपासून बघतेय, कसल्या विचारांत आहेस?”
असिफने लॅपटॉप बंद केला आणि डोळे चोळत उठला. “उद्या फार महत्त्वाची मीटींग आहे. त्याचा विचार करत होतो.”
“कमॉन. खोटं बोलायचं असेल तर धडपणे बोल. काहीतरी वेगळंच चालू आहे. दिवसभर बघतेय. सकाळी पेपरचं बिल कलेक्ट करत होता, तेव्हा कोणी काही म्हटलं का? काही...”
“नाही. तेव्हा कुणी अपमान वगैरे केला नाही. आणि केला असता तरी वाईट वाटलं नसतं. आफ़्टर ऑल, सातवी ते दहावी गावभर पेपर वाटण्यातच माझी प्रत्येक पहाट गेली आहे. त्यामुळं जे काही ऐकून घ्यायचं ते तेव्हाच ऐकून घेतलंय. आता कशाचंच काही वाटत नाही. क्लायंट दोन्ही मूठी तोंडावर घेऊन बोंबलत असतो, तरी मला फरक पडत नाही..” असिफ हसत म्हणाला, “एनीवेज, झोपायचं का... की टीव्ही बघणार आहेस थोडावेळ?”
“तू विषय बदलू नकोस. काय झालंय ते सांग”
“काऽऽही झालं नाही.” असिफ खोट्या नाटकीपणानं म्हणाला. “खरंच... उद्या मला लवकर उठायचंय, त्यामुळे मी आता गूड नाईट.” माहीच्या कपाळावर ओठ टेकवून तो म्हणाला.
“गूड नाईट” आणि ती टीव्हीवर कुठलातरी तमिळ सिनेमा लावून बसली.
तो बेडरूममध्ये गेला, पण लगेच दोन मिनिटांनी परत बाहेर आला. “माही, मला काहीतरी सांगायचय”
“हं?” तिचं पूर्ण लक्ष सिनेमामध्येच होतं.
“तुला कदाचित राग येईल... किंवा वाईट वाटेल पण मला नक्की कसं सांगायचं ते समजत नाही”
“लवकर बोल” तिची नजर अजून टीव्हीवरच होती “आता लगेच क्लायमॅक्स चालू होइल. सॉलिड मारामारी आहे. तुमच्या हिंदी पिक्चरसारखी नाजुकसाजुक नव्हे. आमचे हीरो...” ती सवयीनं बडबडत राहीली. तो तिच्या बाजूला बसला, तिच्या हातातला रिमोट घेतला आणि टीव्हीचा आवाज बंद केला. “काय रे? कशाला कुजकेपणा करतोस?” ती वैतागून म्हणाली.
“ऐकशील का दोन मिनिटं? फक्त दोन मिनिटं” तो गंभीरपणे म्हणाला. “माही, माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना मी तुला सांगितलेली आहे. तुझ्यापासून काहीही लपवावं असं मला आजवर कधीही वाटलेलं नाही. मी जसा आजवर जगलोय, ते तुला माहित आहे”
“आता हा विषय कशासाठी?”
“माही, देअर इज समथिंग... जे मला सांगायचं नाहीये. आज ना उद्या तुला ती गोष्ट समजेल. माझ्याकडून नाही तर इतर कुणाकडून तरी. ज्यावेळेला तुला समजेल तेव्हा तुला माझा राग येईल, वाईट वाटेल किंवा दु:ख होइल. तेव्हा तू म्हणशील की मी तुला का सांगितलं नाही. पण मला खरंच तुला ही गोष्ट सांगायची नाही. लपवण्यासारखं काही खास कारण नाही, पण सांगण्यासाठी पण काही खास कारण नाही. प्लीज... एवढंच सांगायचं होतं.”
“मिस्टर असिफ शेखर, रात्रीचे साडेअकरा वाजलेत. आणि तुम्ही काय बडबडत आहात ते मला समजत नाही” ती हसत म्हणाली. “मला सांगायचंय, नाही सांगायचंय, एवढंच सांगायचंय. भाई, कहना क्या चाहते हो?”
तो वैतागून उठला. “मला खरंच समजत नाही. सगळं लाईफ गोंधळलंय” पायाने विनाकारण सोफ्याला लाथ घालत तो म्हणाला आणि बेडरूममधे गेला. माहीने टीव्ही लाईट बंद केले आणि तीपण बेडरूममध्ये आली. असिफ बेडवर चेहरा हातात खुपसून बसला होता. “असिफ, इकडे बघ” ती त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली. “स्पष्टपणे सांग. काहीतरी बिनसलंय हे समजण्याइतकी मी तुला ओळखते. तूच मला कायम सांगतोस ना... तुझ्या किंवा माझ्या भूतकाळामधल्या कुठल्याही घटनेबद्दल आपण कधीच बोलायचं नाही. मग आज काय झालंय... इतका अस्वस्थ का?”
" प्रश्न निव्वळ भूतकाळाचा नाही, वर्तमानाचा सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या जुन्या आयुष्यापासून लांब पळूच शकत नाही”
माही यावर काही न बोलता शांत बसून राहिली. “आय ऍम सॉरी, माही. रीअली. तू तुझ्या भूतकाळापासून किती लांब आली आहेस... तुला हर्ट करायचं नव्हतं... मी माझ्या भूताबद्दल आय मीन भूतकाळाबद्दल बोलत होतो.. साला, मला हे तुझ्यासारखं नेमकं बोलता का येत नाही?”
“मघाशी सांगायचंय शब्दापाशी गाडी अडकली, आता भूतकाळापाशी. असिफ, काहीही सांगू नकोस. तुझ्याबद्दल... तुझ्या वर्तमानकाळामधल्या कुठल्याही घटनेबद्दल काहीही समजलं तरी मला वाईट वाटेल, दु:ख होइल वगैरे शक्य नाही. कारण, तुझ्यावरती माझा कसलाही हक्क नाही... आपण एकत्र राहतोय, मी सोसायटीमध्ये सर्वांना उगाच सांगते तू माझा नवरा आहेस... पण मला या गोष्टीचा कधीच विसर पडत नाही, की आपण विवाहित नाही. मी तुझी पत्नी नाही...”
“माही, तू परत तोच विषय काढू नकोस. ऑलरेडी मी आज प्रचंड डिस्टर्ब्ड आहे. प्लीज....”
“मी फक्त विषय क्लीअर करतेय. तुझ्या भूतकाळाबद्दल, वर्तमानकाळाबद्दल बोलायचा मला काहीही अधिकार नाही. त्यामध्ये काहीही घडलं तरी मी बोलणार नाही. भविष्याबद्दलही तुला असंच चालू ठेवायचं आहे की नाही हा निर्णय तुझा!”
“माही, त्या विषयावर वाद आता नको ना... मी जरा बाहेर फिरून येतो”
ती प्रचंड वैतागली. “नेहमीचं आहे तुझं, मी बोलायला लागले की गाडी घेऊन बाहेर उंडगायचं, दारू ढोसायची आणि कुठंतरी रात्र काढायची. तोंड वर करून हसतोस काय?”
“तुझं मराठी माझ्याहीपेक्षा भारी झालंय. चल, उद्या खरंच आठ वाजता बाहेर पडायचंय. आता मी झोपतो.. तुमच्यासारखं आमचं युएस टायमिंग नाही” बेडवर आडवं होत तो म्हणाला. “उरलेलं भांडण पुढच्या वीकेंडला”
++++++
“अश्विनने होमवर्क कंप्लीट केलेला नाही. उद्या सकाळी करून टाक” मोहित बेडरूममध्ये येत म्हणाला. “ड्रेस इस्त्री केलेत. आणि बॅग भरून ठेवली आहे. पण होमवर्कची नोटबूक बाहेर आहे.”
“अख्खा दिवस आत्याकडे बागडल्यावर अभ्यास राहणारच ना? चैत्राचा तरी झालाय का? तिचं गणित विद्न्यान मला काही समजत नाही. आपल्यावेळेला इतकं कुठे कठिण विषय असायचे” रेश्मा हातातली विणकामाचं सामान बेडवरून बाजूला सरकवत म्हणाली.
“नवीन जनरेशन आहे. नवीन अभ्यासक्रम. आपल्याला काय ते कम्प्युटर सायन्स वगैरे विषय असायचे का? बरं त्यावरून आठवलं, उद्या परवा तो सर्व्हिस सेंटरचा माणूस येईल. प्रिण्टरचा प्रॉब्लेम तपासायला.”
“चालेल, मी काय घरात असेनच.” रेश्मानं बेडवरचं सगळं सामान आवरायला घेतलं. रविवार म्हणजे घरभर नुसता पसारा करायचा हक्काचा दिवस. आज तिचं चित्त अजिबात थार्‍यावर नव्हतं. वरकरणी मुलांनाच काय मोहितलापण काही गडबड आहे हे जाणवलेलं नव्हतं. दिवसभर तिने आईची आणि पत्नीची भूमिका शंभर टक्के निभावली होती. वादळ चालू होतं ते आत खोल मनामध्ये. गेल्या पंधरा वर्षामध्ये असिफबद्दल तिनं नुसतं ऐकलंच होतं. गावी गेलं की काहीनाकाही समजायचंच. तिची आई कायम म्हणायची, “बघ, किती सुखात आहेस. गाडी आहे, मुंबईमध्ये फ्लॅट आहे. दोन सोन्यासारखी मुलं आहेत आणि तो.. भिकारी अजून गावोगाव फिरतोय. त्या आरतीला पण कुठे नेऊन टाकलंय परमेश्वरालाच ठाऊक!”
लग्नानंतर पहिल्याच दिवाळसणाला गावी गेली होती, तेव्हा तिची वर्गमैत्रीण शैलजा भेटायला आली होती. शैलजाकडे असिफचा नंबर होता. तिनं नंबर देऊ का विचारलं. नंबर लिहून घेतला. पण फोन करायची हिंमत नव्हती. तो गावात नव्हता. तिच्या लग्नानंतर असिफने गावातली खोली पाडून टाकली होती. एकट्याने. नंतर आरतीकाकीला घेऊन कुठेतरी गेला होता. कोण म्हणायचं पुण्याला गेला, कोण म्हणालं मुंबईला. काय करत होता, कुठे होता काही माहित नव्हतं. आता अचानक एवढ्या वर्षांनी आपल्याच दारासमोर कसा काय आला? मुद्दाम. ठरवून. बदला घ्यायला? कशाचा बदला? घ्यायचाच असता तर त्याने तेव्हाच काहीतरी केलं असतं. इतकी वर्षे गप्प कशाला राहिला असता...
सकाळी दरवाज्यात उभं अस्ताना क्षणभरच त्यानं तिच्याकडं पाहिलं होतं. पण त्या क्षणासाठी रेश्मा जणू जिवंत झाली. नक्की कशासाठी आपण त्याच्याकडे ओढले जातो कायम? गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित व्यक्तीची एकुलती एक मुलगी आणि अख्ख्या गावाने ज्याला दूर लोटलं होतं त्या शेखरचा हा मुलगा. आई किंचित वेडसर. दोन वेळची खायची भ्रांत असलेलं त्याचं घर. आणि गडीमाणसांसकट पन्नास माणसं जेवतील एवढं तिचं घर. दोघांच्या परिस्थितीमध्ये, घरामध्ये, जातीमध्ये फरक. तिच्यासाठी बाबांनी जवळजवळ प्रत्येक विषयाला प्रायव्हेट ट्युशन लावली होती तरी ती नववीलाच दोन वर्षं ठाण मांडून बसलेली, आणि सकाळपासून संध्याकाळी इकडची तिकडची कामं करत अभ्यास करणारा असिफ यावर्षी बोर्डात येणारच असा सगळ्या मास्तरांचा विश्वास. अवघ्या तीन मार्कांसाठी त्याचा मेरीट लिस्टमधला नंबर चुकला. बारावीला त्याने तीही कसर भरून काढली.
याचदरम्यान कधीतरी तिनं त्याला सांगितलं, “तू मला खूप आवडतोस”
तो नेहमीसारखाच हसला आणि निघून गेला. तिच्या आणि त्याच्या परिस्थितीमधली जाणीव त्याला होती, पण आता प्रश्न तिच्या इगोचा होता. ती रोज त्याच्या घरी यायची, आरतीकाकीसोबत बोलायच्या निमित्तानं. त्याच्यासाठी काहीतरी बनवून आणायची. त्याला आवडायचं नाही. पण त्याला ते स्पष्टपणे सांगता यायचं नाही. तिच्याशी बोलताना अडखळायचा. ते पाहून तिला अजून गंमत वाटायची. तिचं शरीर अजूनच त्याच्याकडे ओढलं जायचं. हे सगळं त्याला लक्षात येत होतं. पण तरी तो प्रतिसाद मात्र द्यायचा नाही.
बारावीच्या त्याच्या इतक्या मार्कांचा काहीच उपयोग नव्हता कारण पुढे कुठेही शिकायला जायचं तर आरतीकाकीकडे कोण बघणार? त्यानं गावातच डिप्लोमाला प्रवेश घेतला. शिवाय रोजंदारीवर तिच्याच एका नातेवाईकाची रिक्षा चालवायला घेतली. कशीबशी दहावी पूर्ण करून तिनं अकरावी आर्ट्सला प्रवेश घेतला, आणि रोज कॉलेजला उन्हातून चालत जाणार नाही, असं सांगून बाबांना रिक्षा लावायला सांगितली. अर्थातच असिफची.
आज असिफला एवढ्या वर्षानंतर पाहिल्यावर रेश्माच्या मनामध्ये त्या सगळ्या आठवणी परत नाचायला लागल्या.
“मीरा, जवळ येतेस?” मोहित विचारत होता. सवयीने ती त्याच्या कुशीत शिरली. तिचंच तिला हसू आलं. आपल्या नवर्‍याला लग्नाला पंधरावर्षं झाली तरी बायको अंथरूणामध्ये असताना फक्त आणि फक्त असिफचाच विचार करत असते हे त्याला अजून माहित नव्हतं.