फिरूनी नवी (भाग 3)
“तू हॅलो वगैरे म्हणण्यापेक्षा हे स्टायलिश काय अजूनही वापरतोस काय रे?”
“मग काय करू? आता पहाटे तुझ्याशी वाद घालत बसू का? आणि तू तरी वेगळं काय करतेस गं? किती वेळा तुला सांगितलं, सोड ती मुंबईमधली नोकरी, ये इकडे पुण्यात. इकडं काय नोकर्या नाहीत. आमच्यासोबत रहा. तू ऐकतेस?”
सगळे गेल्यावर रूम एकदम रिकामीशी झाली. नर्स येऊन बाळीला अंघोळीला घेऊन गेली. मग पूर्वानं तिला थोडावेळ फीड केलं. बाळी झोपली, पूर्वा झोपी गेली, आणि काहीही काम नसल्याने अनिशापण झोपली.
(क्रमश:)
सकाळी तिला उठायला थोडा उशीरच झाला. काल रात्रीच्या प्रसंगाची आठवण अजून तिच्या
मनामध्ये नाचत होती.
शॉवर घेऊन तिनं कपभर चहा करून घेतला. राजला त्याचा ब्रेकफास्ट दिला. ऑफिसला
निघण्यासाठी नेहमीचाच एक ड्रेस तिनं काढला. मग अचानक, काय जाणवलं कुणास ठाऊक! कधी नव्हे ते, कपाटभर हुडकून
हुडकून एक बर्यापैकी धुतलेला स्वच्छ ड्रेस काढला.
“राज, इतकं टकामका
बघायची काही गरज नाहिये हां. घेतला तेव्हा छान
बसत होता पण आता बराच ढिगळ झालाय. तुला
माहितीये, मला आधी फार आवडायचं शॉपिंग करायला. तेव्हा
ना, दर महिन्याला दोन ते तीन नवीन ड्रेस घेत होते. बाबा तर
म्हणायचे टेलरचं बिल देत बसण्यापेक्षा, निहाल, तूच एखादा टेलरिंगचा कोर्स कर रे बाबा. आणि तो फक्त हसायचा, आणि मग बाबांचं लक्ष नसताना हलकेच म्हणायचा, तू माझी प्रिंसेस आहेस. म्हणशील ती सारी हौस करेन.”
हातामधला घेतलेला ड्रेस तिनं परत बेडवर फेकून दिला.
“पण मग निहाल मेला. आता मग हौस करायची तरी
कुणासाठी. ते राहू देत. आज संध्याकाळी आल्यावर कपडे धुवायलाच हवेत.. घालायला एकही
ड्रेस नाहीये. तुझं बरंय, पाण्यात राहून
असाच नंगू पंगू फिरतोस”
ती ऑफिसमध्ये पोचली, तेव्हा तिच्या
बॉसचा मेल आला होता, आजच्या कामांची लिस्ट देणारा. तो तिनं सवयीनं नजरेखालून
घातला. फारसं काही काम नव्हतंच. तसंही या न्युजपेपरच्या ऑफिसमध्ये ती या
डिपार्टमेंटमध्ये एकटी. वर्तमानपत्रांच्या वेगवेगळ्या आवृत्ती सेव्ह करणं, त्या जुळवून ठेवणं वगैरे रेकॉर्ड कीपिंगची कामं. फार कधीतरी या
कोनाड्यातल्या ऑफिसला कुणीतरी मॉर्ग नाव दिलं होतं. अजूनही तेच चालू होतं.
मोबाईल पर्समधून काढून चार्जिंगला लावताना तिनं त्यावर आलेला त्याचा मेसेज
पाहिला. निमिषचा मेसेज.
“ऑफिस?”
तिला आठवलं. तो सध्या काय करतोय हे तिनं विचारलंच नव्हतं. काही ना काही तरी
नक्की करत असणार. अभ्यासात तो कधीच निहालसारखा हुशार नव्हता, पण स्टीट स्मार्ट तर नक्कीच होता.
“नोप. मॉर्ग” तिनं उत्तर टाईप करून
पाठवलं. लगेचच ग्रे टिकच्य ब्लू टिक्स झाल्या आणि पुढच्याच क्षणाला त्याचं नाव
स्क्रीनवर झळकलं. कॉलिंग.
“काय?” त्यानं
विचारलं. तिला नकळत हसू आलं.
“तू हॅलो वगैरे म्हणण्यापेक्षा हे स्टायलिश काय अजूनही वापरतोस काय रे?”
“अनी, कुठे आहेस?” त्याच्या आवाजामधील काळजी तिच्यापर्यंत पोचली.
“अरे, मी ऑफिसमध्ये आहे” तिनं
थोडक्यात त्याला तिच्या कामाचं स्वरूप सांगितलं.
“फक! मजाक की भी हद होती है” तो
म्हणाला.
“सॉरी. खरंतर माझ्या लक्षातच आलं नाही… दरवेळी बोलताना सवय झालेली आहे आणि
आता…”
“इट्स ओके, बरं ऐक ना. तुला आज वेळ आहे? लंचला भेटूया?”
“चालेल” पण मग लगेच तिच्या लक्षात आलं की, आज तिनं जो ड्रेस घातलाय तो अलमोस्ट सात वर्षं जुना आहे. केस
तर विंचरलेले नव्हतेच आणि… निमिषच्या
भाषेत सांगायचं तर आज ती अजागळासुराचा अवतार झालेय. “अरे,
ऐक ना, बॉस सोबत नेमकी लंच मीटिंग आहे.
उद्या भेटूया?”
“चालेल. मी तुझ्या ऑफिसजवळ आलो की फोन करतो” त्याचा वरमलेला आवाज तिच्याही
लक्षात आला. निहालसमोर अनेकदा ती खोटं बोलून जायची, पण निमिष मात्र हमखास तिचं खोटं पकडायचा.
“ओके” ती तरी म्हणाली.
“अनी….” तो काहीतरी विचारत असल्यासारखा
म्हणाला, पण पुढं काही बोलण्याऐवजी शांत राहिला.
“निमिष?”
“अनी, यार! आय अॅम सॉरी… काल अचानक
तुझ्या घरी आलो आणि आता कदाचित तुला असं फोन करून वगैरे…. लिसन, आय कॅन अंडरस्टेंड… जर तुला
भेटायचंच नसेल तर… स्पष्ट सांग”
“निमिष, उद्या लंचला भेटू, तेव्हा बोलू. भेटायचं नसतं तर मी तुझा कॉल घेतलाच नसता.”
काही न बोलता त्यानं फोन कट केला.
जवळजवळ पाच वर्षांनी. निहाल मेल्यानंतर पाच वर्षांनी निमिष मला भेटला होता. निहाल
मेला त्या रात्री त्याचा फोन आला होता. त्यावेळी ती स्वत: त्याच्याशी बोलली होती. त्याच
रात्री निहालच्या आईनं निमिषला
घराबाहेर काढलं होतं. फक्त एकदच परत आला होता. निहालच्या चौदाव्याला फक्त नमस्कार
करण्यापुरता.
दुपारी लंचच्या नावाखाली दोन वडापाव आणि कपभर चहा ढोसून ती परत जागेवर येऊन बसली.
तेवढ्यात आईचा फोन आला, “अनूबाळा,
आत्या होणार आहेस हो लवकरच. पूर्वाला एडमिट केलंय”
“ग्रेट! कधीपर्यंत होईल डिलीव्हरी?”
“अजून काही सांगता येत नाही. पण डॉक्टर म्हणाल्यात की, रात्रीपर्यंत होइल नाहीतर सी सेक्शन करू. तुला फोन करेनच.”
“काही गरज नाही. मी निघाले.” ती अत्यंत उत्साहात म्हणाली.
लगोलग तिनं बॉसला मेल टाकला की फॅमिली इमर्जन्सी आहे. एव्हीतेव्ही आज बुधवार
होता. गुरूवार शुक्रवार दोन दिवस सुट्टी टाकली म्हणजे वीकेंड धरून पाचेक दिवस घरी
राहता आलं असतं.
प्रश्न आला असता तो राजचा. पण तो काही इतका मोठा इशू नव्हता. राज गेला असता तर
त्याच दिवशी दुकानामधून नवीन घेऊन आली असती. मेलेली माणसंच तेवढी दुकानामध्ये मिळत
नाहीत.
ऑफिसमधूनच तिनं टॅक्सी बूक केली, तिथूनच घरी जाऊन सामान कोंबून एका बॅगेत भरलं आणि ताबडतोब ती पुण्याला
निघाली.
“राज, सोडून जातेय म्हणून रागावू नकोस हां. माझ्या
भावाला बाळ होणार आहे आणि काहीही करून मला त्या क्षणाला तिथं हजर रहायला हवं”
ती पुण्याला पोचली तेव्हा अलमोस्ट आठ वाजले होते. घरी वगैरे जायच्या भानगडीत न
पडता ती सरळ हॉस्पिटलमध्येच थडकली. “सीसेक्शन करयची गरज नाही, डॉक्टर म्हणतायत की तासाभरात डिलीव्हरी होईल. वेळेत आलीस हो”
आई तिला पाहताच म्हणाली.
“काय हे? दिदी, किमान ड्रेस तरी चांगला घालायचा.” अनिकेत तिच्या घामेजलेल्या ड्रेसकडे बघून
कपाळावर आठी घालत म्हणाला.
“अनिकेत, बोलताना सांभाळून” आई त्याला
दरडावणीच्या स्वरात म्हणाली. “बाप व्हायला आलास तरी तुला अक्कल कशी नाही?”
अनीशा दिवसाभराच्या धावपळीने थकून हॉस्पीटलमधल्या वेटिंगरूमच्या त्या
स्टीलच्या थंडगार खुर्चीवर बसली. तिला माहित होतं, अनिकेत हे असंच काहीतरी बोलणार. हे आताचं नाही, खूप
आधी पासूनच आहे. अनिकेत खरंतर तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान, पण तरीही तिनं काय वागावं कसं वागावं यावर तिच्या आईवडलांनी घातली नसती
तितकी बंधनं तो घालायला बघायचा.
डोळे मिटून शांतपणे भिंतीला डोकं ठेवून ती बसली आणि तिला आठवलं. निहालचं आणि
त्याचं यावरून कित्येकदा वाजायचं. निहालनं आजवर कधीही तिला कुठलाही ड्रेस घालू
नकोस. किंवा असं वागू नकोस हे सांगितलं नव्हतं पण अनिकेत….
“साल्या, तुला ना आयुष्यात पाच पाच पोरीच व्हायला पाहिजेत. मग कळेल पोरीचा बाप किंवा भाऊ असणं काय असतं,” अनिकेत एकदा चिडून त्याला म्हणालेला.
“साल्या, तुला ना आयुष्यात पाच पाच पोरीच व्हायला पाहिजेत. मग कळेल पोरीचा बाप किंवा भाऊ असणं काय असतं,” अनिकेत एकदा चिडून त्याला म्हणालेला.
“पहिली गोष्ट, तू माझा साला
आहेस, नॉट द अदर वे अराऊंड. आणि दुसरी गोष्ट- पोरीचा बाप
किंवा भाऊ म्हणजे इतकंही काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अनिशा स्वत:ची काळजी
घ्यायला समर्थ आहे. तू तुझं तुझ्यापुरतं बघ”
निहालच्या त्या शांत उत्तरावर अनिकेत काहीच न बोलता निघून गेला होता.
“राज, गंमत माहिताय का? माझ्यावर
इतकी बंधनं घालणारा हा प्राणी बायकोला मात्र एका शब्दानं काही बोलू शकत नाही.
पूर्वा अर्थात ऐकूनही घेत नाही ते सोडा” ती हळूच पुटपुटली. राजला आपला आवाज इथून
ऐकू जाणार हे लक्षात आल्यावर मात्र ती गप्प बसली.
दिवसाच्या शेवटी अखेर साडेअकरा वाजता पूर्वाला मुलगी झाली. आईच्या मांडीत
झोपलेली छोटी गोडशी बाळी बघताना तिला जाम मजा वाटत होती.
“सेम तुझ्यासारखी दिसतेय आई पण रंग मात्र पूर्वाचा घेतलाय.” ती एकदोनदा
म्हणाली. खरंतर त्या मिटलेल्या इवल्याश्या डोळ्यांचा रंग सेम तिच्यासारखाच बदामी
होता, पण तसं पूर्वा किंवा अनिकेत एकदाही असं म्हणाले
मात्र नाहीत.
>>>>
त्या दिवशी अनिकेत हॉस्पिटलमध्ये पूर्वासोबत थांबला, म्हणून अनिशा आईबाबांसोबत घरी आली. तसेही पहाटेचे जवळजवळ चार
वाजलेच होते. दोन रात्रीँच्या जागरणाने ती दमली होतीच. अनिकेतला पॅटर्निटी लीव्ह
म्हणे महिन्याभराची मिळाली होती. त्यामुळे, त्याला सुट्टीची काही
काळजी नव्हती.
“आई गं, त्याला सुट्टी मिळालीये ना.
आता तू जरा आराम कर. त्याला आणि पूर्वाला साम्भाळू देत. मग ते दोघं जॉबला गेले की
तुझी पिटप्पिट आहेच” घरात आल्याआल्या लगेच तिनं आईच्या कानावर विषय घातला. आईनं घरी
आल्या आल्या चहा सगळ्यात आधी चहा ठेवला होता. चहाला वेळ नसते वगैरे फालतू वाक्यं तशीही
त्यांच्या घरात चालत नाहीत. चहा कधीही चालतो!!
“होय गं राणी” आई तिच्या हातामध्ये कप देत म्हणाली.
“तू आता नुसती हो ला हो मिळवशील आणि नंतर काहीच बोलणार नाहीस. वागायचं तसंच
वागशील” ती पुढे तणतणून म्हणाली.
“मग काय करू? आता पहाटे तुझ्याशी वाद घालत बसू का? आणि तू तरी वेगळं काय करतेस गं? किती वेळा तुला सांगितलं, सोड ती मुंबईमधली नोकरी, ये इकडे पुण्यात. इकडं काय नोकर्या नाहीत. आमच्यासोबत रहा. तू ऐकतेस?”
“आई, नको ना परत परत तोच विषय” तिनं कप उचलून
तोंडाला लावला.
“काय तोच तोच विषय? अनू, अगं पाच वर्षं झाली. आम्ही काय आज आहोत उद्या नाही. आमच्यानंतर तुला कोण
बघणार आहे?”
“मला कुणी बघाबिघायची काही गरज अनही. एकटीच आहे ना. तेवढंच पुरेसं आहे”
“बाळा, तुझी सारी अवस्था मला समजते रे” आई
तिच्या बाजूला येऊन बसली. “पण अनिकेतला त्याचा संसार आहे. प्रत्येकजण आयुष्यामध्ये
सगळं काही विसरून सेटल होत जातोच की. मग तूही…”
मी काही न बोलता तिनं परत चहाचा घोट घेतला.विसःअय पहिल्यांदा निघाला नव्हता, आणि शेवटचाही नव्हता. निहालचं नाव न घेता कित्येकदा तिच्या आईनं
हे तिला सुचवलंच होतं, आता त्याला विसरून परत डाव मांडायला हवा.
संसार आणि लग्न! याशिवाय आयुष्याला काही अर्थ असतो का? भले तुम्ही कितीही मोठं दु:ख सोसलं असेनात का. भले तुमचा
होणारा नवरा आणि बेस्ट फ्रेंड लग्नाआधी फक्त पंधरा दिवस मेलेला असो- ती मनातल्या मनात
राजला म्हणाली.
तरीही, हे सारं विसरून परत जगायलाच
हवं ना?
मूव्ह ऑन, अनीशा! – हे आतापर्यंत किती
जणांनी तिला सांगितलं होतं?
हातामधला रिकामा कप तिनं समोरच्या टीपॉयवर ठेवला आणि शांतपणे काही न बोलता
आईच्या मांडीमध्ये डोकं ठेवलं. आई हलक्या हातानं तिला थोपटत राहिली. डोळ्यामध्ये
येणारं पाणी मोठ्या मुश्किलीनं आवरून ठेवत ती पडून राहिली. मग असाच दोनेक मिनीटात तिचा
डोळा लागला. आईनं तिला हलके जागं केलं खोलीत जाऊन झोपायला सांगितलं.
पण झोप खूप गाढ लागली असावी कारण, जाग आली तेव्हा नऊ वाजून गेले होते. बाबा पूर्वासाठी चहा- नाश्ता घेऊन
हॉस्पिटलला गेले होते. ते तिथे गेल्यावर अनिकेत घरी आला, अंघोळ
वगैरे आवरून दोघींना घेऊन हॉस्पिटलला आला.
वाटेत कारमध्ये त्यानं विचारलंच, “तू आज संध्याकाळी बसने निघतेयस की, ट्रेनने जाशील?”
आपण पाच दिवसांची सुट्टी टाकून आलोय हे सांगायचं आता तिला जीवावर आलं. “मी कॅब
करूनच जाईन” ती म्हणाली.
“कशाला?” तो पुढे म्हणाला. “एकटीच जातेयस
ना? बसमध्ये बसवून देतो की. वाशीला तर उतरायचंय तुला!!”
“नको, मी प्रायव्हेट कॅबने जाईन”
“दिदी, ते रिस्की असतं”
पण वाद घालायची तिची इच्छा नव्हती. ती गप्प बसून राहिली.
हॉस्पिटलमध्ये बाळी अजून झोपलेलीच होती. परत सर्वांच्या मांडीवर तिला घेऊन
तिचं कौतुक करून झालं. तिनं जेव्हा मांडीवर घेतलं तेव्हा मात्र पूर्वा लगेच
म्हणाली.
“अनीशादिदि, सांभाळून. तुम्हाला लहान मुलांची सवय नाहीये
ना”
“पूर्वा, अगं तू एकुलती एक. पण मला लहान भाऊ आहे बरं का. आणी त्याला
लहानपणी मीच सांभाळलाय. पार अगदी ढुंगण धुण्यापासून ते कपडे घालेपर्यंत.” तिनं लगेच
उत्तर दिलं.
यावर आईबाबा किंचितसे हसले, पण पूर्वा
आणि अनिकेतची नजरानजर झाली.
आणि दुर्दैवानं ती न समजण्याइतकं तिला वेड लागलं नव्हतं.
पूर्वानं निहाल मेल्यापासून लगेचच “डोक्यावर परिणाम झाल्याची, वेड लागल्याची, आणि मानसिक संतुलन
बिघडल्याची ( ते कुणासमोर बोलत आहे यावरून हे वाक्य बदलणार) भुणभुण चालू केली
होती. बाबांच्या नोकरीचं एकच वर्षं शिल्लक होतं त्यामुळे आईबाबा तेव्हा
कोल्हापूरला होते. ती, अनिकेत आणि पूर्वा असे तिघेच पुण्यात
होतो. अनिषा घरात असली की, तिला आणि अनिकेतला प्रायव्हसी
मिळत नव्हती.
मग दोन तीन महिन्यात तिच्या बडबडीला कंटाळून तिनं मुंबईला जॉब घेतला, आणि वेगळं घर केलं. – तेव्हा मात्र पूर्वाला तिच्या वेडाची,
मानसिक संतुलनाची अजिबात काळजी वाटली नव्हती ही बाब चाँगलीच लक्षात राहिली
होती.
सकाळी पूर्वाचे आईवडील पण नाशिकवरून आले होते. आता त्यांचा कौतुक सोहळा चालू
झाला, इतकावेळ बाळी तिच्यासारखी, अनिकेतसारखी वगैरे दिसत होती. आता अचानक पूर्वाच्या मावसबहिणीसारखी,
तिच्या आज्जीच्या मामासारखी वगैरे दिसायला लागली. यात पूर्वाचा काही
दोष नाही. तिच्या साईडकडे प्रचंड मोठी फॅमिली. तिच्या बाबांनाच काही सात की आठ भाऊ
होते.
दहानंतर सगळ्यांना घेऊन अनिकेत घरी गेला. अनिकेत दुपारचा डबा घेऊन येईल आणि ती
तोवर पूर्वासोबत थांबेल असं ठरलं. संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊन सगळे परत हॉस्पिटलला
आले की, ती मुंबईला जायला निघाली असती.
तिचं हॉस्पिटलमध्ये थांबणं पूर्वाला फारसं आवडलं नव्हतं पण इलाज नव्हता.
तिच्या आईबाबांचा आराम अधिक महत्त्वाचा होता.
सगळे गेल्यावर रूम एकदम रिकामीशी झाली. नर्स येऊन बाळीला अंघोळीला घेऊन गेली. मग पूर्वानं तिला थोडावेळ फीड केलं. बाळी झोपली, पूर्वा झोपी गेली, आणि काहीही काम नसल्याने अनिशापण झोपली.
अचानक मोबाईलची रिंग वाजली तेव्हा तिला जाग आली.
कुणाचा नंबर आहे ते न बघता पूर्वाची झोपमोड होऊ नये म्हणून तिनं लगेच कॉल
एक्सेप्ट केला.
“व्हेअर आर य?” पलिकडून आवाज
आला.
“हॉस्पिटलमध्ये.” ती अजून झोपेतच होती.
”अनी, इट्स नॉट फनी. व्हेअर आर यु?”
त्यानं परत विचारलं.
झोपेमधून मेंदू किंचित किलकिला झाला आणि तिला आठवलं, निमिष! आज आम्ही लंचसाठी भेटणार होतो!
<<<<<
“”निमिष?” तिनं विचारलं.
“अरे यार! मी खरंच हॉस्पीटलमध्ये आहे?”
“कुठल्या? काय झालंय? मला नाव सांग, मी लगेच पोचतो. तू ठीक आहेस ना?
अनी, तू ठीक आहेस ना?”
“निमिष, प्लीज! अरे इतका काय पॅनिक
होतोयस? मी पुण्यात आहे रे.”
“तू ठिक आहेस ना?”
“मला काय धाड भरलीये रे. अरे, ऐक ना.
गूड न्युज आहे. अनिकेतला काल मुलगी झाली”
“तुझ्या भावाला?” त्याचा आवाज आता
थोडा शांत झाला होता. हॉस्पिटल आणि अनीशा हे दोन शब्द एकत्र ऐकल्यावर त्याला खरंच पॅनिक
अॅटॅक आलेला होता.
“येस. मस्त गोरी आहे. एकदम पूर्वासारखीच”
“ओके! ग्रेट. मावशी झाल्याबदल अभिनंदन”
“मावशी नाही रे, आत्या”
“ओके, ग्रेट!”
“”निमिष, सॉरी तुला
मेसेज करणार होते पण विसरूनच गेले. आणि
काय झालं माहित आहे का…..”
“हरकत नाही, आपण नंतर कधीतरी भेटू. चल
बाय” त्यानं फोन कट केला.
तिनं फोन बाजूला ठेवला आणि…..
समोर इतकावेळ झोपलेली पूर्वा जागी होऊन बसली होती. तिच्याकडे मोठमोठ्या डोळ्यांनी
बघत.
“निमिष? निमिष अधिकारी?”
निमिष आणि पूर्वा हे कॉम्बिनेशन आधीपासूनच डेंजर होतं. पूर्वाची बेस्ट फ्रेंड
ऐश्वर्या.. आणि निमिष!! कॉलेजमध्ये त्यांचं अफेअर बरंच गाजलं होतं. मग एके दिवशी
पूर्वानं निमिषला नरकेंच्या प्रियासोबत काही आक्षेपार्ह चाळे करताना ( हे सेंसर्ड
व्हर्जन, अधिक स्पष्टपणे सांगायचं तर एकाकी
क्लासरूममध्ये तिच्या स्कर्टमध्ये हात घालून तिला जन्नत की सैर घडवून आणताना)
पूर्वानं पाहिलं, मग तिनं जाऊन ऐश्वर्याला सांगितलं.
पण मग निमिष-ऐश्वर्याऐवजी लोकांना पूर्वा आणि एश्वर्या असा जंगी सामना भर कॉलेजमध्ये
बघायला मिळाला होता.
कारण, पूर्वाने तिला काहीतरी सांगण्याआधीच
निमिषने ऐश्वर्याला फोन करून “पूर्वा माझ्यावर लाईन मारतेय. तिला तुझं माझं ब्रेक
करायचं आहे” वगैरे कहाणी ऐकवली होती.
सो पूर्वा हेट्स निमिष.
अॅएक्चुअली एव्हरीवन हेट्स निमिष.