फिरूनी नवी (भाग 2)
तिच्यासमोर
बसून तिला काहीतरी विचारत होता, पण तिचं लक्षच
नव्हतं. राजची झोपमोड झाली होती. तो टक्क डोळ्यांनी इकडेतिकदे बघत होता. राजला
घरात तिसरं कुणी आलं की फार भिती वाटते. लाईटबंद करण्यासाठी ती जागची उठलीसुद्धा, पण त्यानं तिला घट्ट धरलं.
“तुला काय
झालंय, अनी?” त्यानं परत विचारलं. त्याच्या आवाजामधली काळजी तिच्यापर्यंत पोचली.
“मी ठीक आहे, जॉब करतेय. पगार आहे. मी आणि राज दोघंच राहतो. खुश आहोत” ती
म्हणाली. बोलताना तिला जांभई आली. “आय शूड स्लीप” ती
पुटपुटली.
“येस, यु शूड.” तो जागचा उठला. “आपण उद्या किंवा परवा भेटूया.
चालेल?” त्यानं बाजूला पडलेली
त्याची सॅक उचलली. “इतक्या रात्री तुझ्या घरी येणं चुकीचं होतं, सॉरी”
“कितीवेळा आणि
कशाकशासाठी सॉरी म्हणणार आहेस? गेली पाच वर्षं
सॉरी म्हणतोच आहेस. काही फरक पडला का त्या ढीगर्भर सॉरीनी?”
“अनीशा… तुला कसं माहित…?”
“तुझे ईमेल्स
वाचले होते. मेसेजेस वाचले होते. कश्शालाही उत्तर द्यायची तेव्हा हिंमत नव्हती.
आजही नाही.”
“मी घरी
कित्येकदा तुझ्याबद्दल विचार्लं. कुणीच मला का सांगितलं नाही की तू इथं अशी
एकटीच…” त्याची नजर तिच्या शॅबी फ्लॅटवर फिरली.
“पसारा बघू
नकोस. मी इथं रात्री झोपण्यापुरतीच येते. दिवसभर ऑफिसात जातो. वीकेंडला रमाकडे
जाते.”
“ओके”
“मला वेडबिड
नाही लागलंय….”
त्यानं ताडकन
नजर वर करोन तिच्याकडे पाहिलं. “आय नो, तुला काय
वाटतंय! माझ्याबद्दल गावामध्ये काही लोकं असं चक्क म्हणतातसुद्धा. म्हणून तर मी
हल्ली तिकडे येत नाही. पण मला वेड लागलेलं नाही. मला अजूनही इतक्या वर्षांनीसुद्धा निहाल दिसल्याचे भास होतात. दिवसातून
अनेकदा होतात, पण ते परफेक्टली नॉर्मल आहे कारण मला माहित
अस्तं की ते भास आहेत. आजही…. आजही.. पाच वर्षं होत आली तरीही, तो दिसतो. त्याला मी काही नाही करू शकत… पण.. मला माहित
आहे. मी रोज वारंवार स्वत:ला हे सांगत असते की, तो भास आहे.”
बोलताना तिच्या डोळ्यांतून पाणी आलं. त्यानं हातात उचलून घेतलेली सॅक परत खाली
टाकली आणि तो तिच्या समोर बसला.
“अनी, यार सॉरी. त्या रात्रीनंतर मी तुझ्याशी कधी बोललोच नाही.
कित्येकदा प्रयत्न केला, पण… आणि जेव्हा
मी महिन्याभरानंतर परत आलो तेव्हा तू गाव सोडून गेली होतीस. सगळ्यांना तुझ्याबद्दल
विचारलं पण.. कुनीच सांगेना”
“आपले घरवाले
आपल्याबद्दल किती प्रोटेक्टिव होऊ शकतात हे तुला माहित आहे ना.” तिनं हातानंच तिचे
केस सारखे केले आणि ती कॉटवरून उठली. “इतक्या वेळच्या या इमोशनल ड्रामासाठी मीच
तुझी माफी मागते. सॉरी, यार… तू
जेवलायस का? माझ्याकाडे आता काही रेडी नाही पण बाजूच्या
हॉटेलवाल्याला फोन केला तर तो लगेच ऑर्डर आणून दीएल.”
“नको, मी निघतो. परत भेटू.” चार्जिंगला लावलेला तिचा मोबाईल
त्यानं उचलला, स्क्रीनवर असलेला निहालचा फोटो पाहून तो क्षणभर
परत थबकला. त्यानं स्क्रीन स्वाईप करून त्याचा नंबर डायल केला. एक रिंग झाल्यावर
कट करून लगोलग तिच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर सेव्ह केला.
पाच
वर्षांपूर्वीचा त्याचा नंबर अजूनही तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता. तिचा नंबर
बदललेला होता, कारण त्या आधीच्या नंबरवर त्याने अनेकदा फोन
लावून केवळ स्विच ऑफ हेच उत्तर ऐकलं होतँ.
“बाय” म्हणून
तो तिच्या फ्लेटच्या दाराबाहेर पडला. बाहेर पडून त्यानं पुन्हा एकदा मागे वळून
पाहिलं ती तिथंच उभी होती.
“साडेअकरा
वाजलेत, अनी. दार लॉक कर” तो म्हणाला. तिनं पुढे येऊन
दार बंद केलं. आतमधल्या कडीचा आवाज ऐकू येईपर्यंत तो थांबला आणि धडाधड जिना उतरत
खाली आला.
माघसचा
टपरीवाला आता दुकान बंद करायच्या नादात होता. “भई, गोल्डफ्लेक दे”
“क्या हुआ
भाईसाब. मिल गयी आपकी बहन?” टपरीवाल्यानं विचारलं. मघाशी टपरीवाल्याकडून अनीशाची माहिती काढत असताना
ती आपली नात्यातली दूरची बहीण असल्याचं त्यानं सांगितलं होतं.
“हाँ, थोडं जरा आमचं गावाकडचं घर विकायचं होतं त्यासाठी ताईची सही
हवी होती” तो बोलून गेला. वयाच्या
अकराव्या की बाराव्या वर्षी त्याच्या एका काकांनी त्याला डायग्नोज केलं होतं.
पेथॉलऑजिकल लायर. प्रोफेशनल सराईत अट्टल खोटारडा. अगदी डोळेसुद्धा न मिचकावता
कसलंही खोटं तो सहज बोलून जायचा.
सांगायची
अभिमानाची गोष्ट अशी की त्यानं एकदा लाय डिटेक्टर टेस्टलाही फसवलं होतं. तर मग हा
अनीशाच्या बिलिडंग़समोरचा टपरीवाला क्या चीज है.
खिश्यामधून
लायटर काढून त्यानं सिगरेट पेटवली. पुन्हा एकदा त्यानं तिच्या खिडकीकडे नजर टाकली.
परत सारे लाईट्स बंद होऊन तिचा फ्लॅट अंधारात बुडाला होता. पण ती झोपली नव्हती.
ती खिडकीमध्ये
उभी होती. पलिकडच्या रस्यावर उभं राहून सिगरेट ओढत असलेल्या त्याच्याकडे बघत. ती
मिट्ट काळोखामध्ये तशीच शांत उभी होती.
तो स्टेशनच्या
दिशेने चालत निघाला.
चालता चालता त्यानं
मोबाईल काढून आईच्या मोबाईलवर फोन लावला. इतक्या रात्री आई झोपलेली असणार हे माहित
असूनही…
“हॅलो, कोण बोलतंय?” पलिकडून आईचा नुकताच झोपेतून जागा झालेला आवाज आला.
“आई!”
“तू?” त्याची आई- पूजा एकदम जागी
झाली होती. “इतक्या रात्री का फोन केलास?” तिनं विचारलं. तिच्या आवाजामधला संताप त्यालाही जाणवला.
“अनीशा कुठाय?” त्यानं विचारलं.
“ही काय आता
फोन करायची वेळ झाली का? दारू पिऊन
बडबडतोयस का? अनीशाशी तुझा काहीही संबंध नाही. कळ्ल?”
“आई, अनीशा कुठाय?” त्यानं परत तोच प्रश्न विचारला.
“ती युएसला
आहे. एकदा सांगितलं ना. ती देशाबाहेर आहे. तिच्या आईबाबांनी लगेच तिचं लग्न लावून
दिलं. गावामध्ये कुणालाही काहीही सांगायची सोय नव्हती… ते लोक तरी काय करणार होते.
आमच्याच पोरानी तिचं आयुष्य बरबाद केलेलं…” आई एरवी त्याच्याशी दोन वाक्यंही बोलली
नसती, पण अनीशाचा विषय काढताक्षणी मात्र आजवर झालेल्या
सार्या चुकांची उजळणी करायला तिनं कधीच मागे पुढे पाहिलं नस्तं.
अनीशा कुठे आहे? हा प्रश्न त्यानं आज तिला पहिल्यांदा विचारला नव्हता.
कितीतरी वेळा त्यानं आईला, बाबांना, अमितकाकाला, अनुजाकाकीला
अनीशाविषयी विचारलं होतं. अमित आणि अनुजा दोघांनीही त्याला त्यांची मुलगी कुठे आहे
त्गे सांगितलं नव्हतं. अनिकेतने पूर्वाशी लग्न केल्यापासून त्याच्याशीही बोलणं
बंदच झालं होतं. अखेर कधीतरी आईनंच त्याला सांगून टाकलं. “ती युएसला आहे”
आणि आजवर तो
तिचं हे म्हणणं खरं मानत आला होता. खुश असेल ती तिकडे म्हणून. पण जेव्हा आज तिला
स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाहेपर्यंत.
ती युएसला गेली
नव्हती. इथं त्यच्याच आजूबाजूला कुठंतरी वावरत होती. नोकरी करत होती. एकटी रहात
होती. आणि त्याला हे माहितच नव्हतं.
पुन्हा एकदा
पाच वर्षांतला सारा पश्चाताप त्याच्या मनामध्ये लाव्ह्यासारखा खळखळला.
“आई मी पुन्हा
एकदा विचारतोय. खरं सांग, अनीशा कूठाय?” कदाचित् माझ्याऐवजी आईच सराईत खोटारडी असू शकेल. इतकी वर्षे
सतत ती आपल्यासोबत खोटं बोअल्त राहीली त्याच्या मनात विचार येऊन गेक्ला.
“एकदा सांगितलं
ना?
ती तुझ्यापासून दूर आहे. खूप दूर. आणि कृपा कर. दारू पिऊन
रात्रीअपरात्री फोन करत जाऊ नकोस. सभ्य माणसांचं घर आहे हे. तुझ्यासारख्या नालायक
आणि घरबुडव्या लोकांच नव्हे. या घरामधली माणसं दिवसभर काम करतात. आणी रात्री
आपल्या घरी येऊन जेवून खाऊन झोपतात. तुझ्यासारखी उंडगेगिरी करायचे पैसे मिळत नाहीत
आम्हाला.”
“आई, मी तुला फक्त एक प्रश्न परत विचारतोय. अनीशा कूठ आहे?”
“कितीही वेळा
विचार!! माझं उत्तर तेच असेल. तुझ्यापासून खूप दूर आहे ती. आणि जरी चुकूनमाकून ती
दिसलीच ना तरी तिच्याजवळ जाऊन बोलू नकोस. त्या माझ्या लेकरानं काय भोगलंय
तुझ्यापायी…. अरे. निलाजर्या लाज कशी नाही रे वाटत तुला? तोंड वर करून मला विचारतोयस अनीशा कुठाय? त्या रात्री हा प्रश्न तुझ्या मनात का नाही रे आला? अनीशाचा विचार कसा नाही आला तुझ्या डोक्यात? निहालचा जरातरी विचार केला होतास का? हातात फोन होता म्हणून असाच…इतक्याच वाजता फोन केला होतास.
आठवतंय का रे? त्या रात्री माझा मुलगा मेला. तुझ्यामुळे. तू
त्याला फोन करून बोलावलंस आणि मरणाच्या दारात लोटलंस. आज विचारतोय अनीशा कुठाय? अरे ज्या घरामध्ये तोरणं सजत होती तिथं तू मरण आणलंस.
हरामखोरा. तू का नाही मेलास रे त्या दिवशी? तू का नाही
मेलास?” आईच्या आवाजामधले ते
हुंदके. तो शांतपणे ऐकत राहिला.
दोनेक
मिनिटांनी काही न बोलता त्यानं कॉल कट केला.
आईचा आवाज
मात्र त्याच्या डोक्यामध्ये घुमत राहिला… तू का नाही मेलास.. तू का नाही मेलास.
गेली चार वर्षे
दहा महिने दररोज हा प्रश्न मी स्वत:लाही विचारतोय आई. त्या रात्री मी का नाही
मेलो.
>>>>>
खिडकीमधून
बाहेर बघत असताना तिला रस्त्यावर उभा असलेला तो दिसत होता. इतक्या दुरून पाहताना
परत तिला तोच भास झाला. निहालचा…
क्षणभर ती
थबकली. पण नाही. तो निहाल नव्हता, तिच्या रॅशनल
मनाला हा विचार पटत होता, पण मनामध्ये
कूठेतरी असणरा वेडेपणा मात्र निहालची आठवण करून देत होता. पूर्ण अंधारामध्ये
टपरीच्या उजेडामध्ये मोबाईलफोनवर बोलत सिगरेट ओढत असलेला हा माणूस निहाल असूच शकत
नाही हे तिला पक्कं माहित होतं. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून. तिचा चौदावा
वाढदिवस नुकताच झाला होता. बाबांची बदली या गावामध्ये झाली होती. लहानपणापासून दर
तीन वर्षांनी बदली होण्याची तिला सवयच झाली होती. पण तिची नववी, पुढच्या वर्षी येणरी दहावी आणि बारावी त्यामागोमाग अनिकेतची
दहावी असा हिशोब धरून बाबांनी आधीच या गावमध्ये सलग किमान सहा वर्षे सर्विस मिळावी
म्हणून अर्ज केला होता आणि तो चक्क मंजूरही झाला होता.
दर तीन
वर्षांनी शाळा न बदलता याच गावामध्ये आपण सहावर्षे राहणार म्हणून ती आनंदातच होती.
नवीन शाळा, नवीन मैत्रीणी यांचं तिला फार काही वाटायचं नाही.
सवयच होऊन गेली होती. अभ्यासात बरीच हुशार असल्याने तिला तशी कधीच काहीच अडचण आली
नाही.
सुदैवाने
बँकेकडून मिळालेला बँगला चांगल्या वस्तीमध्ये होता, आणि बाजूला असलेल्या अधिकारी कुटुंबाची व्यवस्थित ओळखही झाली.. मोठा मुलगा
अकरावीला आणि धाकटा दहावीला.
मोठा निहाल
मागच्यावर्षी बोर्डात आला होता. बारावीलाही तो बोर्डात येणार याची सर्वांनाच
खात्री होती. सकाळपासून ते संध्याकाळ्पर्यंत कसल्या ना कसल्या क्लासेसमध्ये अडकलेल्या
निहालशी तिच्या आईनं खास ओळख करून दिली ती “अभ्यासात याच्याकडून काही लागली तर मदत
घे” असं सांगत.
ती निहालशी
झालेली पहिली ओळख.
रविवारी सकाळी
अकरा वाजता तबल्याचा क्लास आटोपून तो घरी आल्याआल्या पूजाकाकीनं – निहालच्या आईनं
त्याला बाजूच्या घरी पिटाळलं होतं. विस्कटलेले केस, घामेजलेला चेहरा आणि डोळ्यांवरचा सोनेरी काड्यांचा चष्मा. निळी जींस आणि त्यावर चौकड्यांचा पूर्ण बाह्यांचा शर्ट.
स्कॉलर बॉयची
सगळी डेफिनेशन्स पूर्ण करणारा निहाल.
रविवारी सकाळी
सहज गप्पा मारायला म्हणून तो आला खरा. पण त्यादिवशी अनुजाकाकीच्या हातची इडली
सांबार खात खात तो तिला अभ्यासाबाबत काहीबाही सांगत राहिला.
जवळजवळ तासभर
गप्पा मारत बसलेल्या निहालला आईनं जेवायला हाक मारली तेव्हा तो अगदी नाईलाजानं
निघाल्यासारखा निघाला. “मी तुलानंतर माझ्या जुन्या नोट्स झेरॉक्स मारून देईन. माझ्या
भावाने अर्थात शिल्लक ठ्वल्या असतील तर..”
“त्याची पण
दहावी आहे ना? त्याला अभ्यासाला हव्या असतील तर…”
“अभ्यासाला? आणि त्याला? मागे महिन्याभरापूर्वी त्यानं माझ्या निबंधाचे नमुने पंचवीस
रूपयाला एक प्रमाणे विकून टाकले…” तो केसांमधून हात फिरवत म्हणाला. “वेळ आलीतर हे
बंधुराज मलाही विकून टाकतील.”
ती हसली. “माझाही
भाऊ अनिकेत पण तसलाच आहे. इन फॅक्ट, भाऊ लोक हे
अत्यंत वैतागवाणे प्रकार आहेत.”
त्यावर तोही
हसला.
नंतर रोज तो
क्लासला येताना किंवा जाताना तिला भेटायला येऊन जायचा. पूजाकाकी तर कौतुकानं
तिच्या आईला म्हणाली सुद्धा. “काही म्हण. तुझी लेक फार गोड आहे. आमचं माणूसघाणं
पोरगं पण तिच्याशी किमान बोलतंय. शाळेमध्ये इतक्या वर्षात कुणाशीही त्यानं मैत्री
अशी कधी केलीच नाही”
त्यानंतरही निहालनं कधीच कुणाशी मैत्री केली नाही. ती त्याची गर्लफ्रेंड
खूप नंतर झाली, त्या दोघांनी लग्न करायचं तर त्याहून नंतर
ठरवलं. पण त्याआधी ती त्याची बेस्ट फ्रेंड होती… आणि तो तिचा बेस्ट फ्रेंड.
खिडकीचा पडदा
परत सारून ती बेडजवळ आली. चार्जिंगला लावलेला मोबाईल तिनं उचलला, पहिला डायल केलेला नंबर त्याचा होता. त्यानं स्वत:चा नंबर
सेव्ह करताना “एसआरके” म्हणून केला होता. ती त्याला कधीतरी वैताग द्यायला या
नावानं हाक मारायची. शाहरूख खान तिचा अत्यंत आवडता आणि म्हणून त्याचा फार नावडता.
तिनं त्याला
मेसेज केला. “घरी पोचलास की कळव”
त्याचं घर
कुठाय हेही तिला माहित नव्हतं. तो सध्या काय करतो हेही माहित नाही.ती स्वत:शीच
हसली. इतक्या वर्षानंतर निमिष भेटला तरी त्याला आपण अगदी साधे बेसिक प्रश्नही
विचारले नाहीत. कितीतरी वेळ बेशुद्ध पडून राहिलो आणि नंतर रडत.
तिनं आईला परत
कॉल लावला. आईनं लगेचच उचलला.
“झोपली नाहीस?” तिनं पहिला प्रश्न विचारला.
“झोपलेच होते, पण तुझी रिंगटोन वाजली म्हणून…” पुढं आईनं काही बोलायची
गरजच नव्हती. साधं सोपंच होतं, तिचा असा
रात्री अपरात्री फोन आला की आई दचकून जागी होत असणार.
आपल्याला वेड
लागलंय असं सर्वांचं साहजिक् मत आहे आणि गेली पाच वर्षं त्या मतामध्ये अजून तरी
फरक पडलेला नाहीये.
“सहज फोन केला…
झोप येईना, पूर्वा कशी आहे?” तिनं विचारलं. अनिकेतच्या बायकोची ड्यु डेट जवळ आली होती. पहिलंच बाळंतपण
असूनही आईनं तिला माहेरी पाठवलं नव्हतं, इकडंच करू
म्हणाली.
“ठीक आहे, जरा मलूल वाटतेय. एक दोन दिवसांत डिलीव्हरी होईल.”
“मला फोन कर मी
नक्की येते” ती म्ह्णाली. “बाबा कसे आहेत?”
“झोपलेत.
बोलायचंअय का?”
“नको, उठवू नकोस. सहज फोन केला होता.”
“ठीक गूड नाईट”
म्हणून आईनं फोन ठेवून दिला. खिडकीमधून परत बाहेरबघितलं तर तो निघून गेला होता.
जसा अचानक आला, तसाच.
तिच्या
मोबाईलवर मेसेजच टोन वाजला, उघडून पाहिला
तर त्याचाच मेसेज. “पोचलोय”
कुठे? ते मात्र त्यानं लिहिलं नव्हतं. खंतर पाच वर्षांत किती काय
गोष्ती बदलेल्ल्य असतील, पण त्याच्या
बाबतीत ही तुटक बोलायची सवय मात्र आजही बदलली नव्हती. कित्येकदा ती त्याचयवर
चिडायची ती यासाठीच.
निहाल
स्पष्टवक्ता होता, कसलीही भीडभाड
न ठेवता, सरळ तोंडावर जे वाटेल्ते बोलून मोकळा व्हायचा.
एके दिवशी ती दुपारी
ट्युशनवरून परत येत होती. रविवारचा दिवस होता, त्यात भर
दुपारी तीनची वेळ. त्यामुळे रस्ता सुनसान होता. सायकलवरून रमत गमत घरी येत असताना
तिला चालत जात असलेला निहाल दिसला.
तिनं एकदोनदा
त्याला हाक मारली, पण तो थांबला
नाही. भराभरा पेडल मारत ती त्याच्याजवळ पोचली. अंगामध्ये नेहमीसारखी जीन्स आणि
शर्ट न घालता आज त्यानं बर्मुडा शॉर्ट्स आणि कसलासा चित्रविचित्र खुनी चेहरे
असलेला टीशर्ट घातला होता. भलंमोठं शाळेचं दप्तर पाठीला अडकवून मान खाली घालून आपल्याच तंद्रीमध्ये तो चालत
होता.
“केव्हाची हाक
मारतेय. थांबला का नाहीस?” सायकलवरून उतरत
ततिनं विचारलं.
“काय?” त्यानं वर तिच्याकडे बघत विचारलं.
“तुझा आज
कँप्युटरचा क्लास होताना? मग इतकं मोठं
दप्तर घेऊन कुठं निघाला होतास?”
“काय?” परत त्यानं तोच प्रश्न विचारला. त्याच्या चेहर्यावर भलतेच
गोंधळल्यासारखे भाव होते. ती क्षणभर थबकली.
“निहाल, बरा आहेस ना? असा का बघतोयस?”
“ओह!” तो
किंचित हसला, ओठ किंचित दुमडत. “हेलो! कशी आहेस?”
“मी ठीक आहे.
आय मीन सकाळी तुला भेटले तेव्हाही ठीकच होते की.”
“बरोबर. आपण
सकाळी भेटलो होतो की. कालही भेटलोच होतो ना? बरोबर?”
“काल? काल तू तबल्याच्या क्लासला आणि मी रमाकडे नोट्स आणायला
म्हणून एकत्रच गेलो ना?”
“करेक्ट! तुझी
स्मरणशक्ती किती तल्लख आहे ते बघत होतो”
“हे इतकं मोठं
गाठोडं घेऊन कुठे निघाला होतास?”
“ट्युशनवरून
परत येत होतो. सायकलला लावू का?” तिनं मान
डोलावली तसं त्यानं पाठीचं दप्तर काढून तिच्या सायकलच्या कॅरीअरला लावलं. तिच्या
हातून सायकलचं हॅंडल त्यानं घेतलं आणि दोघं चालू क्लागली.
“तू इतक्या
दुपारची कूठे निघाली होतीस?”
“ट्युशन होती
माझी.”
“अमिशा, तुला इथं येऊन किती दिवस झाले?”
“अनीशा.”
सीरीय्सली या मुलाला आज झालंय तरी काय…. असा का वेगळाच वागत होता.
“काय?”
माझं नाव अनीशा
आहे”
“ओह. अनी, बरोबर?”
ती काही न
बोलता चालत राहिली. घर तसं जवळ आलेलं होतं हे वळण घेतलं की पहिलं घर अधिकार्याँचं
नंतर अजून दोन घरं झाल्यावर तिचं घर.
“किती दिवस
झाले? इथं येऊन?”
“महिना झाला
असेल” ती म्हणाली.
“महिन्याभरामध्ये
ट्युशन चालू पण केलीस. तू फारच अभ्यासू दिसतेस”
“उगाच चिडवू
नकोस. तुझ्याइतकी हुशार आणि मार्क्स मिळवत नसले म्हणून आम्हाला इतकी मेहनत करावी
लागते. कळलं?”
तो परत तसाच
किंचितसा हसला. घर अजून दोन तीन मिनीटांवर होतं. त्यानं सायकल स्टॅँडवर लावली.
“सो, अमीशा… सॉरी सॉरी. अनिशा. अनी! टेल मी वन थिंग. आपण गेले महिनाभर
अभ्यासासाठी भेटतोय. ट्युशनला जातोय. मला तुझं आणि तुला माझं शेड्युल परफेक्टली
माहित आहे. सो… आर वी लाईक.. टूगेदर?”
“तू काय
विचारतोयस ते मला कळत नाहीये”
“ओह, तुला परफेक्टली कळतंय. पण….”
“पण काय?”
“सो तू निहालची
गर्लफ्रेंड आहेस ना?”
“आपण फक्त
फ्रेंड्स आहोत, निहाल.”
“म्हणजे, आपण अजून एकमेकांना किसही केलेलं नाही? राईट?”
“काय बडबडतो
आहेस? वेड लागलंय का? मघापासून असा काय विचित्र बोलतोयस आणि…” ती बोलत असताना त्याचा चेहरा एकदम
तिच्याजवळ आला. हळूवारपणे तिच्या गालावरून त्यानं हलकेच एक बोट फिरवलं. त्या किंचितशा
स्पर्शानं ती शहारली. निहाल आणि ती याआधी एकमेकांना कितीतरी वेळा बोलता बोलता
स्पर्श केला होता. पण आजचा त्याचा स्पर्श वेगळाच होता. तिच्या तोंडून हलकाच
सुस्कारा निघाला.
“अनीशा!” तो
हलकेच कुजबुजत म्हणाला. “यु आर ब्युटीफुल. अॅंड ही इज स्टुपिड” तो अधिकच
तिच्याजवळ आला, त्यासरशी ती दोन पावलं मागे सरकली. “प्लीज
स्टॉप” ती अलमोस्ट किंचाळली.
गेल्या
महिन्याभरामधला निहाल आज असा का वागत होता ते तिला समजेनासं झालं होतं. तिची सायकल
तशीच्या त्याच्या हातामध्ये ठेवून ती घरी पळत निघाली. घरात येऊन लगेच तिच्या रूममध्ये
गेली आणि तिनं दार लावून घेतलं. आई तिला काहीतरी सांगत होती पण तिचं लक्षच नव्हतं.
पाचेक मिनिटांनी आईनं दार वाजवून ककाही खायलाप्यायला हवं का विचारलं. तिनं नाही इतकंच
सांगितलं. आईनं ती पूजाकडे चहाला जातेय. भूक लागली तर चिवडा खा म्हणू सांगितलं. ती
मात्र उशीमध्ये मान खुपसून ती रडत राहिली.
सुमारे दहा
मिनीटांनी परत तिच्या दारावर टकटक झाली. अनिकेत तिला सतवायला आला असावा.
तिनं दार उघडलं
नाही.
“अनीशा”
निहालचा आवाज आला. “प्लीज दार उघड”
“ताबडतोब इथून
जा. मला तुझ्याशी एक शब्द बोलायचा नाही”
“तू दार उघड
प्लीज. हे बघ… तुझा काहीतरी गैरसमज होतोय… मी आज….” त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या
आत तिनं दार उघडलं.
“माझा? माझा गैरसमज होतोय? तू
स्किझोफ्रेनिक आहेस का रे? की तुला मेंटली
काही प्रॉब्लेम आहे? की तू चक्क
तिथं रस्त्यात उभं राहून मला किस करायच्या बाता करत होतास. मवाली आहेस? बोर्डात आलेला होतास ना? हुशार
म्हणवतोस. आय आयटीमध्ये जायची तयारी क्क़रतोस? आणि मला
अभ्यासाची मदत म्हणत असले धंदे करतोस? नशीब समज मी
आईला काही सांगितलं नाही… बाबांना जर सांगितलं ना…” ती थडाथडा बोलत सामोरी चालत
आली. तिच्या एकेका शब्दाच्या वारासरशी तो एक एक पाऊल मागे जात होता आणि ती पुढे
येत होती.
आता तिच्या
रूमसमोरून ते दोघं हॉलमध्ये आले होते. “बाबा तर तुझं… कच्चा रायताच करतील. समजतोस
कोण स्वत:ला?”
“हॅलो!”
हॉलमधल्या सोफ्यावरून आवाज आला तशी ती बोलायची अचानक थांबली. त्या दिशेनं पाहिलं
तर सोफ्यावर निहाल बसलेला होता.
तिनं मान वळवून
पाहिलं तर निहाल तिच्या समोर उभा होता. सेम तोच लाल शर्ट तीच निळी जीन्स. तिनं परत
मान वळवून पाहिलं. तोच मघासचा बर्मुडा शॉर्ट्स. तोच चित्रविचित्र टीशर्ट.
“इसे कहते है….
जुडवा” सोफ्यावर बसलेला निहाल तिच्याकडे बघत म्हणाला. तिनं मान वळवून परत निहालकडे
पाहिलं. “काय?”
“हा माझा भाऊ.
जुळा भाऊ निमिष!”
“कसं शक्य आहे? तू तर त्याच्यापेक्षा मोठा आहेस” ती पुटपुटली.
“रॉंग. मी मोठा
आहे. त्याच्यापेक्षा तब्बल चार मिनिटांनी” निमिष म्हणाला.
“”पण मग तू..”
“हा जुनिअर
कॉलेजमध्ये पोचला तरी मी अजून शाळेत कसा. बरोबर? सिम्पल. मी मागच्या वर्षी दहावीचे पेपर दिले नाहीत. म्हणजे शाळावाल्यांनी मला फॉर्मच भरू दिला
नाही. मी नापास होईन आणि शाळेचा ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल म्हणून. मी यावर्षी
दहावी रीपीट करतोय”
“ओह माय गॉश”
ती खुर्चीवर बसत म्हणाली. “तुम्ही दोघं सेम टू सेम दिसता. मला फरक लक्षातच आला
नाही”
“तुझ्या काय, आमच्या शिक्षकांच्या कित्येकदा येत नाही. बाबा आत्त्ता
आत्ता आम्हाला वेगळो ओळखू शकतात. नाहीतर कितीक वेळा याच्या खोड्यांसाठी मी उगाच
मार खाल्लाय” निहाल तिच्या बाजूला बसत म्हणाला.
“मघासच्या
चेष्टेसाठी सॉरी बरं का!” निमिष म्हणाला. त्याच्या आवाजामध्ये मात्र त्या सॉरीचा
लवलेशही नव्हता. तिनं रागावून त्याच्याकडे पाहिलं. “अरे, तू मला निहाल
समजून बोलायला लागलीस म्हणून मी जरा उगाचच थोडावेळ मस्करी केली. तुला खरं काय ते
सांगण्याआधीच तू तिथून पळालीस”
“तू मला किसिंग
बद्दल विचारतोस ही थोडावेळ मस्करी?”
“आता ही
किसिंगची भानगड काय?” निहालनं
विचारलं.
“भानगड काही
ग्रेट नाही.” निमिष तिच्यावरून नजरही न हटवता त्याला उत्तर देत म्हणाला. “गेले
महिनाभर तुझ्या तोंडून अनीशापुराण ऐकून विटलो होतो. तुला विचारलं तर तू म्हणे फक्त
मैत्रीण आहे. म्हणून म्हटलं आपणच जरा स्पायगिरी करून काही खास बातमी हाती लागाते
का पहावं तर तिनं पण हीच टेप लावली. फ्रेंड्स आहोत म्हणे. च्यायला मी काय
फिल्मफेअरमधून मुलाखत घ्यायला आलोय का? तीच तीच
घिसीपीटी उत्तरं देताय ते” तो सहजपणे म्हणाला.
“तू हरामखोर
आहेस” निहाल त्याला म्हणाला.
“थॅँक यु”
निमिष उठून उगाच खोट्या आदबीनं म्हणाला. “मी निघतो. संध्याकाळी येईन”
“निमिष, तुला आज पेपर सोडवायचे आहेत. सबमिशन करायचे आहेत. यावर्षी
तुझ्याऐवजी मी अजिबात लिहीणार नाहीये” निहाल म्हणाला.
निमिष अनिशाकडे
बघत म्हणाला. “पाहिलंस? धाकटा भाऊ म्हणून जराही मदत करत नाही.”
“पण तुझे पेपर जर
त्यानं लिहिले तर टीचरना अक्षर समजणार नाही का?”
तिच्या या
प्रश्नावर दोघेही हसले. निमिष निहालच्या बाजूला उभं राहत म्हणाला.
“अनी! लूक एट
अस. आम्ही दोघं सामोरं असताना तू आमच्यामध्ये फरक करू शकत नाहीस. तर बिचारे शिक्षक
आमच्या अक्षरामध्ये काय फरक करणार आहेस. आणि फ्रीकीशली आमचं अक्षर अगदी सारखं आहे”
“बाप रे. आणि
तुम्ही दोघं सतत माझी अशी चेष्टा केलीत तर… कठीण आहे!!”
“डोँट वरी
अनीशा. लेट मी टेल यु अ सीक्रेट. मी आणि निहाल वेगवेगळे ओळखायची खूप सोपी खूण आहे.
गेल्या वर्षीच त्याला चष्मा लागलाय. मला नाही. सो, चष्मा लावलेला तो निहाल आणि नाही तो मी” निमिष हसत म्हणाला.
>>>>
त्यानं
डोळ्यामधली कॉन्टेक्ट लेंस काढून डबीमध्ये ठेवली. चेहर्यावर पाण्याचा हबकारा मारला
आणि बाजोला ठेवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला. समोरच्या आरश्यामध्ये त्याला स्वत:चा
चेहरा पाहत त्यानं केसांमधून हात फिरवला.
घड्याळात दीड
वाजून गेला होता. त्यानं बेडच्या बाजूला पडलेला त्याचा टॅब्लेट उचलला आणि रीडरचं अॅप
उघडून कादंबरी वाचायला सुरूवात केली. कह्रंतर त्याचं अजिबात लक्ष नव्हतं… पण या क्लायंटला किमान पुढल्या आठवड्यामध्ये तरी काही
डिझाईंस करून हवी होती. त्यासाठी किमान एकदा तरी पुस्तक वाचायला हवं होतं. तसं
त्याला काही टेन्शन नव्हतं. आतापर्यंत वाचलेले पुस्तक पाहता त्याच्यामनामध्ये दोन
तीन डिझाईन्स ऑलरेडी तयार होते. पुढच्या आठवड्यापर्यँत त्यानं इमेज तयार करून
प्रकाशकाला पाठवल्या असत्या.
निमिष
अधिकारीला त्याच्या गावामध्ये आणि घरामध्ये अजूनही लोकं वाया गेलला कार्टं म्हणूनच
ओळखत होते. आई आणि बाबा “तो काय करतो?” या प्रश्नाचं उत्तर देताना चक्क वेब् डिझायनर म्हणून साँगायचे.
त्यानं एक
दोनदा त्यांना सुधरवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग
झाला नाही.
निहाल अधिकारी इंजीनीअर
होता. देशामधल्या टोपमोस्ट कॉलेजमधून त्यानं डिस्टींक्शन मिळवलं होतं. त्याला कॅम्पस
इंटरव्हुमधून चांगली नूकरी मिळाली होती. लाखोचं पॅकेज मिळालं होतं. त्याचं एका
अशाच हुशार आणी चांगल्या मुलीवर प्रेम होतं. त्याच्या किंवा तिच्या घरामध्ये
कुणालाही या प्रेमप्रकरणाबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. अजून वर्षभरानं तसंही
धडाक्यात लग्न लावून द्यायचे बेत चालूच होते.
तो मात्र कायम
“नालायक पोरगा” हीच पदवीपार्त राहिला.
त्यानं रीडर अॅप्
बंद केलं. टॅबेलेटमधला फोटोंचा फोल्डर उघडून त्यानं असाच बिनानावाचा न्यु फोल्डर
उघडला. त्यामध्ये निहाल आणि अनीशाच्या साखरपुड्याचे फोटो होते. एकमेव असा प्रसंग
ज्यामध्ये तो आणि निहाल एकाच फोटोमध्ये कधीच नव्हते. लहानपणापासून दोघांचे फोटो
कायम एकदम काढले गेले. अगदी निहालच्या ग्रेज्युएशनच्या फॉटोमधेही दोघं बाजूलाच उभे
होते. निहाल त्या विचित्र काळ्या कॅप आणि गाऊनमध्ये आणि तो बेसबॉल कॅपमध्ये.
पण साखरपुड्याच्या
फोटोमध्ये मात्र फक्त निहाल होता. गावामधल्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये झालेला
हा साखरपुडा अगदी बॉलीवूडच्या सिनेमात शोभेल इतकाच चमचमता होता. ती अख्खी
संध्याकाळ तो गळ्यामध्ये कॅमेरा अडकवून फोटो काढत होता. निहालनं एकदोनदा त्याला
स्टेजवर बोलावलं, पण त्यानं
दुर्लक्ष केलं. आलेल्या प्रत्येकानं अनीशानं घातलेल्या अबोली रंगाच्या घागर्याचं
कौतुक केलं. आईनं प्रत्येकाला “खास निहालने तिच्यासाठी आणलाय” म्हणत अजून कौतुक
केलं.
निहालनं त्या
घागर्यासाठी पैसे दिले होते, पण निवड मात्र
त्याची होती. अर्थात हे त्याला आणि
निहालला सोडल्यास कुणालाही माहित नव्हतं.
तो काय करतो
हेही कुणाला माहित नव्हतं.
निमिष अधिकारी आंतरराष्ट्रीय
दर्जाचा बूक कव्हर डिझायनर आहे. अनेक बेस्ट सेलर पुस्तकांची कव्हर्स त्यानं डिझाईन
केली आहेत. या कामामधून वेळ मिळाला तर अधूनमधून तो चित्रंही काढतो आणि अशी
रिकामटेकड्या वेळेमध्ये आलेली चित्रं तो लाखो रूपयांना विकतो हेही कुणाला माहित
नव्हतं. किंबहुना, कुणालाही ते
माहित करून घ्यायचं नव्हतं.
फोटोमधली अनिशा
आनंदानं चमकत होती. तिच्या डोळ्यांमधला ताजेपणा त्या निर्जीव टू डी फोटोतही दिसत
होता. त्या संध्याकाळी पार्टी संपल्यावर निहाल आणि तो त्या पार्टी हॉलक्च्याय एका
कोपर्यामध्ये गप्पा मारत बसले होते. सारे पाहूने निघून गेले होते. आता फक्त घरचीच
मंडळी होती. इतका वेळ खांद्यावरून घेतलेला तो जड दुपट्टा काढून तिनं बाजूला ठेवला
होता. निहालसाठी शेरवानी पण त्यानंच निवडली होती. त्याच्या अबोली घागर्याला शोभेल
अशा रहलक्या क्रीम आणि गोल्ड रंगाची. दोघंही गप्पा मारत असताना तो काही कॅँडीड
शॉट्स घेण्याच्या नादात होता.
“निमिष! आता
बास हाँ” ती त्याच्यावर वैतागत म्हणाली. “गेले दोन तास तू फक्त क्लिक क्लिक करत
फिरतो आहेस. धड जेवलाही नाहीस.”
त्यानं
डोळ्याला लावलेला कॅमेरा खाली केला. “तुला कसं माहित मी जेवलो नाही? तू तर स्टेजवर लोकांच्या गराड्यामध्ये होतीस?”
मेंदीनं
रंगलेलं बोट त्याच्याकडे दाखवत ती म्हणाली. “मिस्टर निमिष
अधिकारी. प्लीज! मी तुमच्या त्या तथाकथित गर्लफ्रेंडसारखी बुद्धू नाही. मला
तुझ्याबद्दल सारी खबर बरोबर माहिती असते.” जवळून जाणार्या वेटरकडे हात दाखवत तिनं
त्य्ला बोलावून घेतलं. “आईस्क्रीम किंवा जे काही डेझर्ट असेल ते घेऊन ये. आमचा
फोटोग्राफर उपाशीपोटी फिरतोय केव्हाचा!” ती त्याच्याशी बोलत असताना त्यानं दोन तीन
फोटो काढले.
तिनं काही न
बोलता त्याच्याकडे फक्त एक जळजळीत कटाक्ष फेकला. त्यानं लगोलग कॅमेरा बाजूला ठेवला
आणि तिच्या बाजूच्या खुर्चीवर तो बसला.
दोघांची ही
विनाशब्दांची गँमत बघताना निहाल नुसता हसत होता.
“निहाल, कठीण आहे रे बाबा तुझं” तो हळूच पूटपुटला.
“ऐकलंय मी” ती
म्हणाली. निहाल आणि तो मात्र आता एकदम हसलेच. बाजूला बसलेले ते दोघं एकमेकांकडे
बघून हसत असताना अनीशानं तिच्या मोबाईलमध्ये दोघांचा फोटो काढला होता.
कितीतरी दिवस
तिच्या फेसबूकवर तो फोटो कव्हर फोटो होता. तिच्या कित्येक मित्रमैत्रीणींनी हा
ट्रीक फोटो आहे का विचारलं होतं. त्यावेळी त्या प्रत्येक कमेंटवर तो आणि निहाल
हसर्या स्मायली टाकून येत होते. निहाल तर कित्येकदा तिला म्हणाला की, हा त्याचा सर्वात आवडता फोटो आहे.
तो फोटो आता
शोधला तर सापडेल का? त्याच्या
मनामध्ये प्रश्न येऊन गेला.
इंटरनेटवर
सापडेलच.
निहाल मेला तरी
त्याचा फोटो साप्डेल. अनीशानं तिचं फेसबूक अकाऊंट डिलीट केलेला असला तरी फोटो
सापडेलच.
>>>
त्याच्या
मोबाईलवर नीलमचा मेसेज आला होता. कधीतरी साडेदहाच्या दरम्यान. उद्या ती त्याच्या
फ्लॅटवर येणार होती.
त्यानं तिचा
मेसेज दोन चारदा वाचला, आणि मग रीप्लाय केला. “प्लीज उद्या येऊ नकोस. मी बाहेर जातोय.
मीटिंग”
नीलम त्याची
गर्लफ्रेंड होती. म्हणजे, समाजाच्या नियमानुसार तसं म्हणता आलं असतं, प्रत्यक्षात हे नातं केवळ नावापुरतं आणि शरीरांपुरतं होतं. बिहारच्या
कूठल्याश्या गावामधून हीरॉइन बनायची स्वप्नं& घेऊन आलेली
नीलम गेल्या चार पाचवर्षांत मुँबापुरीला सरावली होती. इथं रहायचं टिकून रहायचं तर सोबतीला
भरभक्काम आर्थिक आधार हवा हे तिला माहित होतं. गेली दोनेक
वर्षं तिच्यासाठी हा आधार निमिष होता.
पन्नाशीला
टेकलेल्या एखाद्या म्हातार्या टकल्या बिझनेसमनपेक्षा अवघी तिशी उलटलेला देखणा
निमिष कधीही परवडला. भले त्यानं येऊ नको असं सांगून कितीहीवेळा कटवलं तरी. तो
कितीही तुटक्वागला तरीही.
तिनं लगोलग
त्याला ओके आणि किसवाल्या स्मायलीचे दोन चार इमोजी पाठवले.
खरंतर उद्या
अख्खा दिवस त्याचा काहीच प्लान नव्हता, नीलम आली असती तर किमान मन थोडं रमलं तरी असतं…
शक्यता तशी
कमीच होती.
गेल्या अनेक
दिवसांमध्ये अनीशाचा विचार आला की मनामध्ये एक विचित्रशी अस्वस्थता दाटून् येत
होती. आज तिला भेटूनही ही अस्वस्थता दूर झाली नाही. फक! शी वीज हीअर. ती इथंच या
शहरामध्ये इतकी वर्षं होती. आणि त्याला माहितच नव्हतं.
त्यानं केसांमधून
हात फिरवला. टेबलाच्या बाजूला ठेवलेला स्केच पॅड उचलून तो काहीबाही गिरमटत बसला.
थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की तो फक्त अनीशा हे नाव कितीतरी वेळ गिरवत
बसला आहे.
(क्रमश:)
Human mind is a concoction
ReplyDeleteOf intermingled configuration
And emotional confusion
This tale of confabulation.
Great!!!
ReplyDeleteWaiting for next part...
Keep writing Nandini!
ReplyDeleteI am waiting for next part.
अप्रतिम!
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDeleterangat jaanar aahe hee kathaa.. :) pudhachya bhagachi vaat pahate..
ReplyDeleteit is getting intriguing....
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteमाझ्या आईने कही दिवसांपूर्वी तिचा ब्लॉग तैयार केला आहे. या वर तीने कही सुंदर कविता, लेख पोस्ट केले आहेत. तरी आपन सर्वांनी एकदा खालील link वर क्लिक करावे आणि आपली प्रतिक्रिया सांगावी जेणेकरून ती आणखी साहित्य पोस्ट करेल.
https://kusumanjali2212.blogspot.com/?m=1