Tuesday 12 November 2019

फिरूनी नवी.... (भाग 1)

ब्लॉग अपडेट तर करतेय. नवीन कादंंबरी सुरू करतेय. किती जणांपर्यंत ही पोचेल माहित नाही. गेले काही दिवस मी व्हॉट्सॅप आणि फेसबुकपासून दूर आहे. म्हणून आता ही विनंती वाचकांनाच आहे. कृपया ब्लॉगची लिंक तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आणि फेसबुकवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वाचून झाल्यावर कमेंटमध्ये तुमचे मत अवश्य नोंदवा, जेणेकरून मला नक्की समजेल की कुणीतरी हे वाचत आहे.


धन्यवाद,
- नंदिनी देसाई.

>>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<


फिरूनी नवी... (भाग 1) 


स्टेशनवरून चालत आल्यामुळे अनिशा घामेघूम झाली होती. तिसर्‍या मजल्यावरच्या तिच्या फ्लेटवर जाण्याआधी  बिल्दिंगखालच्या टपरीवाल्याला तिनं आवाज दिला. भईया ठंडा देना”
दहा रूपयांचा तो थंड जळजळीत काळ्याशार द्रावणाचा घोट घेत ती जिना चढली. दरवाजा उघडताच दिवसभर बंद असलेल्या घराचा कुबटसा वास तिच्या नाकावर आदळला. तिनं सर्वात आधी बेडरूमची खिडकी उघडली. बेडवर बसताच तिची नजर राजवर पडली.
“दिवसभर माझी वाट बघत होतास ना?” तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं.
राजनं नेहमीप्रमाणे तिला काहीही उत्तर न देता मान फिरवली. “साहजिक आहे म्हणा तुझं रागवणं. मी तरी काय करू… किती नाही म्हटलं तरी उशीर होतो” बोलत बोलत तिनं दिवसभराचा घामामध्ये  थिजलेला ड्रेस काढला. बेडवर पडलेला जुनासा ढगळ गाऊन तिनं उचलून नाकाजवळ आणला. “राज, हा परवाच धुतलाय ना? अजून दोन दिवस घालता येईल” म्हणत तिनं तोच घामट गाऊन परत अंगावर चढवला. किचनमध्ये जाऊन फ्रीझमधला व्हेज जयपुरीचा तीन चार दिवसांपूर्वी स्टेशनजवळच्या हॉटेलमधून पार्सल आणलेला डबा बाहेर काढला. त्यामधली दोनेक चमचे इतकीच भाजी बाहेर काढून तिनं प्लास्टिकच्या प्लेटवर ठेवली. “उद्या एक दिवस पुरेल रे भाजी. परवाला ऑर्डर करेन. पण यावेळी कोल्हापुरी ऑर्डर करू. ही जयपुरी फार गोड मिळमिळीत लागते. कोल्हापुरी पण त्याला जरा एक्स्ट्रा झणझणीत करायला सांगते” भाजीची ती प्लेट मायक्रोवेव्हमध्ये तीस सेकंदासाठी पिवळ्या प्रकाशामध्ये गोल गोल फिरत असतानाच तिनं मोबाईल चार्जिंगला लावला. राज, ऐक ना रे. दिवसभराचं तुला इतकं काही सांगायचं असतं.” ती राजसमोर उभं राहून म्हणाली. “पण तुला ऐकायचं नसतं. तुला सोडून जायला मलाही आवडत नाही रे. पण काय करणार सांग… मजबूरी आहे बाळा. तुझा माझा आपला खर्च चालायला नको का? नोकरी करायला नको का? त्यात ऑफिस पॉलिटिक्स काय सांगू रे… आज पण त्या जोशीणीची सुट्टी. हरामखोर मंगळागौर करतेय म्हणे. च्यायला, तो पंजाबी पोरगा गटवला तर आता, करवा चोथ पण आणि मंगळागौर पण. मला बॉस म्हणे, तिचा रिपोर्ट तूच बनव. उशीर झाला तर ओला करून जा, पण काम संपव. मी सरळ रिपोर्ट पेन ड्राईव्हमध्ये घेतला. तुला सोडून उशीरापर्यंत कशी राहेन रे सोन्या” मायक्रोवेव्हचे दोन बीप्स ऐकू आल्यावर ती किचनमध्ये परत आली. प्लेट काढून तिनं ओट्यावर ठेवली. “आता रात्री उशीरापर्यंत काम करेन. बॉसच्या मेलबॉक्समध्ये सकाळी तो ऑफिसात उगवल्यावर रिपोर्ट असल्याशी कारण. भडवा, एक तर… अरे, हसतोस काय. अच्छा, भडवा म्हटलं म्हणून. अरे, शिव्या द्यायला कुणाच्या बापाला घाबरत नाही मी. ऑफिसमध्ये सगळे मला शांत सज्जन समजतात. पन अपन कैसे वो अपनेको हीच मालूम क्या?... हे निहालचं खूप आवडतं वाक्य होतं. त्याला ना अशी बोलता बोलता मध्येच टपोरी बोलायची सवय होती..ओअक्का संहय दत्त फॅन ना तो..” बोलताना तिचा आवाज हळूवार झाला. राज, एक सांगू. रागावू नकोस. मला ना आज परत निहाल दिसला… मी अशी ठाणा स्टेशनमध्ये.. प्लॅटफॉर्मवर चढत होते, आणि पलिकडे पनवेलच्या प्लेटफॉर्मवर तो उभा होता. राज, मी खरं सांगते, निहालच होता. त्याला मी इतक्या गर्दीतही सहज ओळखेन. पण ना.. आज वेगळीच गंमत झाली. आज चक्क तो माझ्याकडे बघत होता. एरवी मला असातसा दिसतो ना. तेव्हा माझ्याकडे कधीच बघत नाही, चुकूनही नाही. आमच्या श्रेया मॅडम म्हणतात की तो मुळात मला दिसतच नाही. तो माझा भास असतो. हेल्युसिनेशन. असेलही. मान्य आहे मला. राज, तुला मी कधी सांगितलं का रे? निहाल ना… रात्रीचे असेच दीड की दोन वाजले होते. बाईक घेऊन येत होता. पाऊस खूप होता आणि… रस्ताही सुनसान होता. ट्रक असावा किंवा बस. कोण ते कधीच कळालं नाही. पण त्याच्या बाईकला उडवलं. तो असा रस्त्याच्या बाजूला अलमोस्ट दोन तीन तास पडून होता म्हणे. पोस्ट मार्टम वगैरे केलं ना. त्यानंतर त्याला घरी आणलं आणि तिरडीवर घालून स्मशानात नेऊन जाळून टाकलं. कायमचं. कायमचं त्याला जाळून टाकलं. पण तरी तो मला रोज दिसतो. कायम. इथं तिथं जळी स्थळी काष्ठी पाषाणी. ठाण्याच्या ट्रेनमध्ये. दिसतोच तो. त्याला काय करणार? दिसू नकोस म्हणून सांगितलेलं तो ऐकत नाही. ऐकेल कसा, मी काही बोलेपर्यंत तो थांम्बतच नाही. पण आज मात्र ही गंमतच झाली. तो चक्क माझ्याकडे बघत होता. अस्से मोठे मोठे डोळे करून. जणू मला तो दिसला म्हणून मला आश्चर्य वाटण्याऐवजी मलाच बघून त्याला आश्चर्य वाटलं होतं, काय तर गंमतच म्हणायची. पण ना राज. निहाल थोडा बदललाय, म्हणजे किंचित बारीक झालाय. तू पाहिलं नाहीस ना त्याला? नंतर त्याचा एखादा फोटो दाखवते. माझ्याकडे ना त्याचे लहानपणचे खूप फोटो आहेत. पण बहुतेक फोटोमध्ये तो आणि निमिष एकत्रच आहेत. माझे बाबा त्या दोघांना एकावर एक फ्री म्हणायचे. तरी तुला निहाल ओळखू येईल. गुबगुबीत गोरासा. पण आज वजन बर्‍यापैकी कमी झालंय रे त्याचं. केस पण कसे विचित्र वाढवलेले. खरं त्याला वाढवलेले केस कधी आवडायचे नाहीत. आणि चक्क चष्मा नव्हता, हे एक भलतंच हां. त्याला चष्म्याशिवाय पहायची मला कधी सवयच नाही.”
ती बोलत राहिली. मोबाईलवर दोन तीनदा वाजलेली रिंगही तिच्या लक्षात आली नाही. ओट्यावर मघाशी काढून ठेवलेली भाजी अजून तशीच होती. आणि ती बेडच्या एका टोकावर बसून राजसोबत बोलत होती. “पण निहाल माझ्याकडे असा का बघत होता ते कळालंच नाही. मी प्लॅटफॉर्मवर येता येता त्याची ट्रेन निघाली, आणि… तो ट्रेनमधून कुठं गेला असेल रे?”
राजनं काहीही उत्तर न देता परत मान फिरवलेली पाहून मात्र ती अचानक उठली. “काय वेडी आहे रे मी? बोलत बसलेय निवांत. तुलाही भूक लागली असेल ना?” बोलत बोलत तिनं तिच्या ड्रेसरवर ठेवलेली डबी उघडली. त्यामधले रंगीबेरंगी चार पाच दाणे काढून तिनं समोरच्या फिशबोलमध्ये टाकले. सॉरी रे राज. आणी तू ही कसला वेडसर आहेस. भूक लागली तर सांगता येत नाही का? सावकाश्. चावून चावून खा. अधाशीपणा करू नकोस. अजून भूक असली तर देईन.” किचनमधून मघाशी ओट्यावर ठेवलेली प्लेट ती घेऊन आली. त्या केशरी पांढरट भाजीमधला बीन्सचा एक तुकडा उचलून तिनं बोटांनी कुसकरला आणि तोंडात टाकला. राजला ते दाणे गपागपा गिळताना बघत ती तोंडामध्ये तो बेचव तुकडा फिरवत राहिली. दोनेक मिनिटं अशीच शांततेमध्ये गेली. परत एकदा तिचा मोबाईल पूर्ण रिंगटोनभर वाजून गेला. पण तो आवाज तिच्या कानांपर्यंत पोचलाच नाही.
रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. अनिशा तिच्या या वन बीएचकेच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण अंधारामध्ये बसून चार दिवसांपूर्वी आनलेली पार्सल भाजी चिवडत बसली होती. नजरेसमोर संध्याकाळी दिसलेला निहालचा चेहरा अजूनही तिला आठवत होता.
अजून दोन महिने. दोन महिन्यांनी निहालच्या मरणाला पाच वर्षं होतील. पाच वर्षांपूर्वी याचदरम्यान ती इंटरव्युसाठी मुँबाईला आली होती. मुलाखत घेणार्‍याने टिपिकल प्रश्न तिला विचारलेला. Where do you see yourself in the next five years.
पाच वर्षापूर्वीच्या अनिशाने या अपेक्षित पर्शनाला त्या माणसाला अपेक्षित होतं तेच उत्तर धडाधड ऐकव्लं होतं, पण खरं उत्तर तिला माहित होतं… पाच वर्षाँत ती मिसेस निहाल होणार. त्याची बायको, त्याच्या मुलांची आई, त्याच्यासोबत.
ती नोकरी तिला मिळाली. पाच वर्षांमध्ये करीअरवाईज तिनं तिचं उत्तर खरंही करून दाखवलं होतं. पण ऑफिसमधली अनिशा आणि आता घरी बसलेली अनिशा यात जमीन अस्मानाचा फरक होता.
सुमारे तासभर ती दोनच चमचे भाजी खात तिनं घालवले. मघाशी बिल्डिंगच्या समोर टपरीवर घेतलेला कोकाकोला आता कोमट झाला होता. तरी तो तिनं घशाखाली उतरवला.
तरीही, किंचित का होईना भूकेची जाणीव राहिलीच. राजला परत दोन चार दाणे खायला दिले, पण तो काही पाण्याच्या टोकाशी येऊन जेवला नाही. “नंतर रात्री भूक लागली तर खा हं बाळा,” ती त्याला म्हणाली.
तितक्यात दारावरची बेलवाजली. “आता इतक्या रात्री कोण मरायला आलं?” पुटपुटर तिनं दार उघडलं.
जिन्यासमोरच्या अंधार्‍या भागामध्ये तो उभा होता. मघाशी दिसलेला.
निहाल.
तू?” तिनं कसं बसं विचारलं. तिला हे नक्की माहित होतं की हा भास नाही. निहाल गेला तेव्हा तिला हा असा भास सतत व्हायचा. तो जस्ट कोपर्‍यावर निमिषला सोडायला गेलाय आणि लगेच परत आलाय. तो ऑफिसमध्ये तिला सरप्राईझ द्यायला आलाय. तो रात्री नेहमीसारखा कामावरून घरी परत आलाय, तिला भेटायला. पण हळूहळू ते भास कमी होत गेले होते.
तिला तेव्हाही माहित होतं की हे भास आहेत. सत्य नाही. पण आता दारापलिकडे अंधुक प्रकाशामाध्ये उभा असलेला माणूस भास खचितच नव्हता. तिच्या मनाचा खेळ नव्हता. ही वॉज रीअल.
“तू इथं कसा काय?” तिनं परत विचारलं. तिच्याइतकंच आश्चर्य त्याच्या नजरेमध्ये होतं. जणू खूप दिवसांपासून तो तिला शोधत होता आणी आज ती त्याला सापडली होती.
आणि तेच सत्य होतं. त्यानं तिला शेवटची पाहिली होती निहालच्या चौदाव्याला.
>>>
“तू अजून गेला नाहीस?” त्याच्या आईनं तो दारात दिसताक्षणी विचारलं.
“जेवणं झाली की निघतोय”  तो आईची नजर चुकवत म्हणाला. घरामध्ये सारे पाहुणे जमलेले होते. झालेली घटना अनपेक्षित होती तरीही, गावाकडचे बरेचसे नातेवाईक आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले होते. सकाळपासून चालू असलेले भटजींचे विधी आता कुठे संपले होते. बाबा खोलीमध्ये आत जाऊन पडले होते. आजी कोपर्‍यामध्ये बसून शांतपणे खिडकीतून बाहेर बघत होती. आई त्याच्याकडे बघत सोफ्यावर बसली होती. आणि आईच्या बाजूला ती बसली होती.
भकास वाळवंटी नजरेनं. रडून रडून डोळ्यांतलं सारं पाणी सुकलेलं. तिचे लांबसडक कंबरेपर्यंत पोचणारे केस असेच मोकळे सोडलेले होते. एरवी आई तिला सारखी केस मोकळे सोडू नको गं दृष्ट लागेल म्हणून ओरडायची. आज मात्र नाही. त्याच्या येण्याकडे, बोलण्याकडे कशाकडेही तिचं लक्ष नव्हतं, समोर ठेवलेल्या निहालच्या फोटोकडे एकटक बघत ती स्थिर बसली होती.
दोनच क्षण तो तिच्या त्या नजरेकडे बघत राहिला आणि प्रचंड अस्वस्थता त्याच्या मनामध्ये दाटून आली. तिच्या नजरेमधला तो भकासपणा अपेक्षितच होता. तिचं रडणं आक्रोशणं सारं अपेक्षित होतं. अनपेक्षित होता तो तिचा हा मूकपणा.  ती रडली. निहालला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा. आणि त्याची राख सावडून नदीत सोडली तेव्हा. पण ती रडली मूकपणानं. गेल्या चौदा दिवसामध्ये तिच्या तोंडून एक शब्द निघाला नव्हता. डोळ्यांमधून पाणी वाहत राहिलं होतंपण घशामधून एकही हुंदका फुटला नव्हता.
एका शब्दानं ती त्याच्याशीही बोलली नव्हती. ते आजपर्यंत.
आज त्याला तिच्या दारात उभं राहिलेलं पाहून तिनं त्याला विचारलं होतं.. “तू इथं कसा काय?”
मघाशी संध्याकाळी पनवेल प्लेटफॉर्मवर उभी असलेली ती दिसली, तेव्हा त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. क्षणभर त्याचा विश्वास बसेना, पण कापलेले छोटे बॉबकट का काय म्हणतात तसले केस कापलेली, ढगळसा पिवळट वाटणारा पांढरा सलवार कमीझ घातलेली, पाठीला भलीमोठी लॅपटॉपची सॅक अडकवलेली. ही अनिशाच होती. मागचापुढचा कसलाही विचार न करता त्यानं चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली होती.  तो प्लॅटफॉर्म क्रॉस करून इकडे येईपर्यँत तिची ट्रेन आली होती. तो सामोर्‍या आलेल्या डब्यामध्ये सरळ घुसला होता. ती पनवेल स्टेशनवर उतरली तेव्हा तोही उतरला. तिच्या मागोमाग चालत राहिला. तिचं लक्ष नव्हतं, ती स्वत:च्याच विश्वात मग्न होती.
तिच्या मागोमाग तो बिल्डिंगपर्यंत आला, तिला कोकाकोला घेऊन जिन्यावरून वर जाताना त्यानं पाहिलं. पण मग तिच्या मागोमाग फ्लॅटपर्यंत मात्र तो गेला नाही.
जवळजवळ तासभर तो त्या टपरीवर सिगरेट ओढत आणि टपरीवाल्याशी गप्पा मारत उभा राहिला.
अखेर, रात्रीचे साडेनऊ वाजले तसं त्याला काहीतरी करणं भाग होतं.. इतका वेळ तो तिला भेटायला गेला नाही, कारण तिच्या सोबत कुणी राहत असलं तर ते अगदीच विचित्र वाटलं असतं… पण तासाभरात त्याला कळून चुकलं की असं काहीही नाहिये.  टपरीवाल्याशी मारलेल्या गप्पांमध्ये त्याला काही गोष्टी समजल्या होत्या. ती एकटी राहते. सकाळी लवकर बाहेर पडते आणि रात्री याच वेळेला परत येते. ती कुठं राहते हे त्याला आता माहित झालं होतं, तो परत कधीही येऊन तिला भेटू शकत होता.
तो स्टेशनच्या वाटेनं परत निघाला. सहज त्याची नजर वर तिच्या बेडरूमच्या खिडकीकडे गेली. अचानक काहीतरी त्याला खटकलं. तो इथं तासभर उभा होता. ती तेवढा वेळ घरातच होती पण, त्या तासाभरामध्ये तिच्या घरामधला एकही लाईट लागला नव्हता. हॉलचा नाही, बेडरूमचा नाही. बाथरूमचाही नाही.
स्टेशनकडे वळालेली त्याची पावलं माघारी फिरली.
तो दोन दोन पायर्‍या एकदम चढत तिच्या पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटकडे आला. त्यानं तिच्या दारावरची बेल मारली.
संपूर्ण अंधारामधेच तिनं दार उघडलं. तिच्या आणी त्याच्यामध्ये जिन्यामधल्या बल्बच्या फिकट प्रकाशाची तिरीप होती.
“तू इथं कसा काय?” तिनं विचारलं. तिचा आवाज त्याला आठवत होता तसाच होता. गुलाबजामच्या पाकासारखा. मधाळ, किंचित गोड, किंचित इलायची.
पण सामोरी आली ती मात्र प्रचंड् बदलली होती. त्याला अगदी ओळखतादेखील न येईल अशी.
अनि!” त्याच्या तोंडून अस्फुटसा आवाज निघाला. त्या आवाजासरशी ती भानावर आल्यासारखी जागी झाली. किंचित दोन पावलं मागे सरकली.
तो दारात तसाच उभा राहिला. अचानक त्याला जाणवलं की अनिशा जागच्या जागी हलतेय, तिचे डोळे मिटले आणि ती खाली कोसळली.
त्यासरशी तो तिच्या घरात आला, दोन्ही हातांनी ती खाली पडण्याआधीच त्यानं तिला धरलं आणि स्वत:जवळ ओढलं.
“अनीशा, जागी हो” तो म्हणाला. पण तिचे डोळे मिटलेलेच होते. त्यानं दोन्ही हातांनी बाळाला उचलून घ्यावं तसं तिला उचलून घेतलं. पाच वर्षांपूर्वी ती सडपातळ होती. पण आज त्याच्या हातामध्ये असलेली कुपोषित म्हणावी इतकी हलकी होती. त्यानं इकडे तिकडे मान फिरवून फ्लॅटचा अंदाज घेतला, त्याच्या डाव्या हाताला एक उघडा दरवाजा आणि त्याच्या समोर किचन होतं. तो दरवाजा बेडरूमचा असणार म्हणून तो अनीशाला घेऊन तिथे गेला, इतका वेळ दरवाज्यामधला प्रकाशाची तिरीप मात्र आता गायब झाली होती, अख्खी बेडरूम अंधारामध्ये बुडालेली होती. अनी..” त्याच्या तोंडून कित्येक वर्षांनी तिचं हे लाडाचं नाव निघालं होतं. त्याच्याखेरीज कुणीही तिला या नावानं हाक मारली नव्हती… “अनीशा” तो परत म्हणाला. “लाईटचं बटण कुठाय?” त्यानं विचारलं. पण तिच्याकडून काहीही उत्तर आलं नाही. डोळे काळोखाला किंचित सरावले तसं त्याला खिडकीमधून येणारी प्रकाश दिसला, तसंच अंधारामध्ये अंदाज घेत तो बेडजवळ गेला, त्यानं तिला बेडवर ठेवली आणि खिशामधून मोबाईल काढून त्यानं फ्लॅशलाईट लावला. त्या उजेडामध्ये त्यानं भिंतीवरचा लाईटबोर्ड शोधला, आणि सारी बटनं सटासट लावली. अख्खी बेडरूम पॉवर सेव्हरच्या फिकुटश्या उजेडामध्ये सामोरी आली. त्यानं भिंतीवरून् नजर फिरवली, ट्युबलाईटचा पत्ताच नव्हता. अनीशा अजून बेशुद्ध पडली होती. तो हॉलमध्ये आला, तिथले सारे लाईट्स लावले. इथंही चाळीस वेटचा पॉवर सेव्हर. किचनमध्येही तेच. हॉल आणि बेडरूम दोन्हीकडे फॅन नाहीच. हॉलमध्ये केवळ एक टेबल आणि प्लास्टिकची रंग उडालेली खुर्ची सोडल्यास इतर काहीही फर्निचर नव्हतं. बेडरूममध्ये केवळ एक कॉट, त्याच्या बाजूला एक लाकडी छोटंसं टेबल, त्यावर इतस्तत: फेकलेल्या वस्तू आणि कोपर्‍यामध्ये गोल्डफिशचा एक बोल.
कॉटवर अजूनही बेशुद्ध पडलेली अनीशा.
तो किचनकडे वळाला, सिंकमध्ये पडलेली भांडी, ओट्यावर कधीकाळचा उतू गेलेला चहा आणि दूध मिरवत काळा पडलेली गॅसची सिंगल शेगडी आणि एका प्लास्टिकच्या जगमध्ये ठेवलेलं पाणी सोडल्यास अजून काही नव्हतं. त्या जगमधलं पाणी किती दिवसांपूर्वी भरलं होतं माहित नाही, पण पाण्याचा तो कुबटसा वास आल्यावर त्यानं ग्लासमधलं ते पाणी ओतलं. दारात टाकलेली त्याची सॅक उचलून साईडच्या कप्प्यामधली बिसलेरी काढली.
ते पाणी पेल्यामध्ये ओतून त्यानं डोळ्यांवर किंचित लावलं. तिची एकेकाळची कोवळी मऊशार त्वचा आता निबर दिसत होती. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं तिच्या अपुर्‍या झोपेचे हिशोब दाखवत होते. डोळ्यांवर पाणी लागल्यानंतर ती किंचित सावरली, तिनं डोळे उघडले. डोळ्यांवर आलेल्या प्रकाशामुळे तिनं परत लगेच ते मिटून घेतले. तो तिच्या बाजूला बसला.
“अनीशा!” त्यानं परत आवाज दिला. “काय होतंय? बरं वाटत नाही का? बोल ना” तो तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला.
तू…” तिच्या तोंडून परत तोच प्रश्न आला..
अचानक त्याला तिच्या प्रश्नामधला खराखुरा प्रश्न जाणवला. तिला तू इथं कसा काय आलायस हे विचारायचंच नव्हतं. तिला तू माझ्या फ्लॅटपर्यंत कसा काय आलायस हेही विचारायचं नव्हतं. इतकी वर्षे ती कुठे होती हे तिला सांगायचं नव्हतं, इतकी वर्षे तो कुठे होता हेही विचारायचं नव्हतं.
तिला त्याच्याबद्दल काहीही विचारायचं नव्हतं.
तिला निहालबद्दल विचारायचं होतं.
निहाल. पाच वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या तिच्या होणार्‍या नवर्याबद्दल. निहाल. तिचा बालपणीचा मित्र. निहाल. तिचा प्रियकर.
तिच्या नजरेला समोर दिसणारा तो नव्हता, तर निहाल होता.
आता त्याला समजलं की त्याला पाहताच तिनं धाडकन दार का आपटून घेतलं नव्हतं. आता त्याला समजल की ट्रेन स्टेशनवरही तिची नजर त्याला पाहताच इतकी बदलली का होती…
शिट!! तो स्वत:शीच उद्गारला.
तिनं उठून बसायचा किंचितस प्रयत्न केला, त्यानं हातानंच तिला रोखलं. “इट्स ओके, अनिशा…” तो पुढे काहीतरी म्हणणार होता. काय सांगणार होता… इथं आल्याबद्दल माफी मागणार होता की इतकी वर्षं तो कुठं होता हे विचारणार होता…
“लाईट बंद कर” ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
“असू देत, मी आहे ना..” तो म्हणाला.
“राजच्या डोळ्यांना त्रास होतो. रात्रीच्यावेळी त्याला लाईट झेपत नाही” ती परत पुटपुटली. त्यानं परत तिच्या केसांमधून हात फिरवला. “अ‍नीशा, राज कोण? इथं फक्त तू आणि मी आहोत” तो कुजबुजला.
“राज!” अनीशानं नजर कॉटच्या बाजूला असलेल्या टेबलाकडे वळवली. तिथं तिच्या केसांचे क्लिप्स, कंगवे आणि एक दोन औषधाच्या बाटल्या सोडल्यास काहीही नव्हतं. आणि एका कोपर्यात ठेवलेला गोल्डफिश.
त्याची नजर ओळखून ती पुढे म्हणाली. “माय गोल्डफिश!”
तो काही न बोलता त्या तरंगत्या केशरी सोनेरी माशाकडे बघत राहिला. असाच एक गोल्डफिश काही वर्षांपूर्वी त्याच्या रूममध्ये होता. काय बरं नाव होतं.. हां, गोल्डी. तिनंच बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेला. खोलीमधल्या एका सजावटीखेरीज त्यानं त्या बोलकडे कधी पाहिलं ही नव्हतं. एके दिवशी असंच दोघांमध्ये काहीतरी भांडण झालं, आणि त्यानं तो बोल हातानं उडवून टाकला होता. खन्नकन आवाजानं काचेचा चक्काचूर झाला होता, आणि अर्धा फूट उड्या मारून तडफडत गोल्डी हे जग सोडून गेला. त्यावेळी ते बघताना त्याला खरंच काही वाटलं नव्हतं. पुढे अनेक वर्षांनी निहालनं त्याच्यासमोर असाच तडफडत दम सोडला, तेव्हा मात्र गोल्डीची तडफड त्याला आठवली होती.
आज जवळजवळ दहा वर्षांनी त्याच टेबलावर… तेच टेबल जे त्याच्या खोलीमध्ये होतं, आणि तसल्याच बोलमध्ये गोल्डफिश तरंगत होता.
अनीशा.. आय एम सॉरी” त्याच्या तोंडून अचानक उद्गार बाहेर पडला. कशाची माफी मगत होता माहित नाही, पण मागत होता हे मात्र निश्चित. कॉटवर पडलेली अनीशा सावरून उठून बसली.
“तूच होतास ना…” तिनं विचारलं. “ठाणा स्टेशनवर.. आय मीन प्लेटफॉर्मवर…” तिचा किंचित तुटकसा आवाज आणि अडखळत बोलणं.
अनीशा, काय झालंय?” त्यानं तिच्या गालांवरून हात फिरवत विचारलं. “सांग ना मला… इतके दिवस कुठे होतीस? एकदाही घरी आली नाहीस. आईला बाबांना, पूजाकाकीला सगळ्यांना तुझ्याबद्दल किती विचारलं. कुणीही मला काहीही सांगत नव्हतं. अशी कशी गायब झालीस?” तो बोलत असताना जाणवलं की तिचं त्याच्याकडे लक्षच नाहीये. तिची नजर एकटक त्या गोल्डफिशवर होती…

(क्रमश:)
- नंदिनी देसाई. 

(फिरूनी नवी भाग 2) 

4 comments:

  1. What's Anisha's destination
    Is it Nihal's reincarnation
    Amongst all that total confusion
    Is mind's unique configuration.

    ReplyDelete
  2. Mi vachate ahe! please keep going.

    ReplyDelete
  3. Very grim and gripping tale. वाचते आहे.

    ReplyDelete
  4. Liked so far, but a bit confused. Continuing part 2..

    ReplyDelete