Saturday 25 May 2013

शब्द




"ए काय मस्त दिसतेयस? एकदम फ़टाकडी?" अंजु जवळ जवळ माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाली. 
"ए बावळे हळू मार.." मी म्हणाले. 
मी छान दिसत होते हे मलाही माहीत होतं. तशी मी काही त्रिलोक सुंदरी वगैरे नाही. पण एरवी ऑफ़िसला येताना फ़ॉर्मल ड्रेस आणि नो मेकप. पण आज ऑफ़िसमधे दिवाळी सेलीब्रेशन होतं. त्यामुळे मी जरा साडी नेसून मेकप करून केसांचा फ़्रेंच रोल घालून (हे सर्व ब्युटी पार्लरमधे दोनशे रूपये खर्च करून मी आले होते.) त्यामुळे मी नेहमीपेक्षा वेगळी दिसत होते. अर्थात सर्वाच्या नजरा माझ्यावरच. 
"मग आजचा प्रोग्राम काय आहे?" आयटीमधला रुचिर माझ्याकडे बघत म्हणाला. 
"जास्त काही नाही. लंच आणि त्या दरम्यान थोडीफ़ार सरप्राईज गंमत... आणि मग..." 
"मॅडम, तुमचा प्रोग्राम विचारतोय.." तो गालातल्या गालात हसत म्हणाला. 
"ओह... माझा प्रोग्राम सरळ आहे. इथुन घरी जाईन. उद्या दिवाळी आहे. त्यामूळे मला रत्नागिरीला जायचं आहे. ट्रेनचं रीझर्वेशन झालेले आहे. माझा एक मित्र तिकीट घेऊन येईल संध्याकाळी पाचची ट्रेन आहे..." 
"मित्र??"त्याने भुवया उंचावत विचारलं. 
"हो.. मित्र. त्याचे वडील रेल्वेमधे आहेत. त्यामुळे माझ्या तिकिटाची जबाबदारी त्याच्याकडे असते. तो माझ्या कॉलेजमधे होता. बास्स.. अजून काही?" 
रुचिर हसला. मी त्याला व्यवस्थित ओळखून होते. एक नंबरचा फ़्लर्ट होता. पण कामालाही तितकाच चांगला होता. 
मी  अ‍ॅडमिनमधे होते. त्यामुळे आजच्या ईवेंटची सर्व जबाबदारी आमच्याकडे होती. तसं साडी नेसून काम करताना थोडं अवघडल्यासारखं होतं. मला तर सलवार सूटची पण धड सवय नाही. त्यात ही धावाधाव. दुपारचा एक होत आला होता. लंचची सर्व तयारी झाली होती. एम डी येऊन सर्वाना भाषण ऐकवणार होते. मी माईक टेस्टिंग वगैरे आवडीची कामं करून घेतली. तितक्यात अंजू परत आली. 
"तुझं रीझर्वेशन झालं?" तिने मला हळूच विचारलं. 
"आयला. विसरलेच मी. थांब जरा. " 
मी माझ्या मित्राला फोन लावला. 
सकाळपासून तो फोन उचलत नव्हता. पाचची ट्रेन आणि अजून माझ्या हातात तिकीट नव्हतं. तशी जास्त काळजी नव्हती. तिकीट त्याने आणून दिलंच असतं. 
"छी!! हा गधा आताच फोन उचलत नाहिये..." मी मनातल्या मनात त्याला शिव्या घातल्या. 
लंचला सर्वजण आले. आणि माझं काम सुरू झालं. फोटोग्राफरकडून हवे तसे फोटो काढायला सांगणं. सर्व डीपार्टमेंटच्या लोकाशी बोलणं कुणाला काय हवं नको ते विचारणं. अशी एक ना दोन.. दुपार कशी संपली ते समजलंच नाही. घड्याळ पाहिलं तेव्हा अडीच वाजले होते. 
"ओह माय गॉड.... " मी जवळ जवळ ओरडलेच. परत एकदा त्याचा नंबर ट्राय केला. त्याने यावेळेला मात्र फोन उचलला. 
"माझ्या तिकिटाचं काय झालं?" मी हेलो वगैरेच्या भानगडीत न पडता विचारलं. 
"क्या? कौनसा तिकीट?" त्याच्या या उत्तराने मला चक्कर यायचीच शिल्लक होती. 
"मेरा तिकीट,, रत्नागिरीका.. पाच वाजताची ट्रेन आहे. " मी जवळ जवळ ओरडतच विचारलं. 
"ओह शिट.. मी विसरलोच.. डॅडला सांगायला. नेमका तो पण आता टाऊनमधे नाहिये.. सॉरी यार.." तो म्हणाला. 
"उद्या नरक चतुर्दशी आहे. मला पहाटेच्या आत घरी पोचायचं आहे." 
माझ्या डोळ्यासमोरून मला तुडुंब भरलेल्या ट्रेन्स, ओसंडून वाहणार्‍या बसेस आणि त्याच्या पाठीमागून धावणारी मी असं काहीबाही दिसायला लागलं. 
"सॉरी. रीअली सॉरी. मी काहीतरी व्यवस्था करतो. एक अर्ध्या तासात तुला कळवतो. प्लीज.. आय प्रॉमिस" 
"एशान... I am going to kill you. " मी ओरडले.

खरं तर मला काहीच सुचत नव्हतं. आतापर्यंत कधीही मला तिकीट हवं असलं की एशान तिकीटची व्यवस्था करायचा. माझीच काय पण अख्ख्या ग्रूपची ट्रेनची तिकिटं तो द्यायचा. आता जरी कॉलेज संपलं तरीदेखील तो आम्हाला मदत करायचाच. त्याचे वडील रेल्वेमधे खूप मोठे ऑफ़िसर होते. 
त्याला दिवाळीच्या आधी चांगले पंधरा दिवस आधी फोन केला तरी त्याने आयत्यावेळ घोळ घातला होता. ऑफ़िसमधल्या एका कलीगला मी निघते म्हणून सांगितलं आणि सरळ रिक्षा पकडून रूमवर आले. डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलं. ताई काल सकाळीच घरी पोचली होती. तिचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण. भावोजी पहिल्यांदा घरी येणार होते. आजी आजोबा, दादा ,काका काकू सर्व नातेवाईक पोचले होते. फ़क्त मीच एकटी उशीरा जाणार होते. आणि त्यात हा तिकीटाचा घोळ झाला होता. आयत्यावेळेला जनरलमधे सुद्धा चढायला जागा मिळाली नसती. 
रूमवर गेल्यावर तर अजूनच रडायला यायला लागलं. कारण माझी रूममेट सकाळची ट्रेन पकडून हैद्राबादला गेली होती. रिकाम्या रूममधे मी सकाळी भरून ठेवलेलं माझं सामान मलाच टूक टूक करायला लागलं. 
एक कप चहा करून घेतला. साडी बदलली. केव्हाचे घट्ट बांधलेले केस मोकळे सोडल्यावर जरा बरं वाटलं. शॉवर घेऊ या आणि सामान घऊन निघू या, मिळेल त्या गाडीने जाऊ. वाटल्यास वाटेत एसटी बदलू. असा विचार मी करत होते. तेवढ्यात मोबाईल वाजला. 
एशानचा फोन. 
"हा शान. बोल पटकन." देवा... काहीतरी चांगली बातमी असू दे रे.. 
"यार.. लोचा झालाय. एकापण ट्रेनचं तिकीट मिळत नाहीये. मी झाअंकलना पण फोन केला. व्ही आयपी कोटा पण फ़ुल्ल आहे." 
मी मटकन खुर्चीत बसले. 
"आता...?" एवढाच प्रश्न मला सुचला. 
"एक काम कर. तू पंधरा मिनिटे थांब, मी फोन करतो तुला.." 
"आणि परत हेच सांगतो की काही होऊ शकत नाही. त्यापेक्षा मीच काहीतरी व्यवस्था करते. " 
"अगं पण..." त्याला काही न बोलायचा चान्स न देता मी फोन ठेवून दिला. 
अस्सा राग आला होता मला. परत एकदा मोबाईल वाजला. उचलावासा वाटतच नव्हता. पण घरचा नंबर होता. 
"काय बेटा कधी निघतेयस?" 
बाबानी विचारलं आणि मला अजूनच रडू फ़ुटलं. 
"काय झालं?" त्याचा आवाज घाबरलेला. 
मी मुसमुसत रडत झालेलं सर्व सांगितलं, मग आईन फोन घेतला. 
"हे बघ, हातात तिकीट नसेल तर निघू नकोस. उगाच कुठे काय झालं म्हणजे.... त्यापेक्षा उद्याचं वगैरे तिकीट मिळतय का ते बघ.. आणि ये," तिची काळजी मला समजत होती. पण दिवाळीला असं घरी न जायला मिळणं म्हणजे...... 
मी "ठिक आहे" असं बोलून फोन ठेवला. सामान परत एकदा चेक केलं. तीन बॅगा होत्या. थोडेफ़ार इकडचे तिकडचे कमी करत करत दोनच सुटसुटीत बॅगा केल्या. 
रूमबाहेर आले तेव्हा चार वाजत आले होते. रिक्षा पकडली. आणी हायवेवर आले. आता इथून पनवेल गाठायचं. मग मिळाली तर एसटी किंवा प्रायव्हेट बस.. 
घरी सांगितलं असतं तर नक्की फ़टके पडले असते. त्यापेक्षा घरी जाऊन काय ते सांगू या हा विचार केला. 
तेवढ्यात परत मोबाईल वाजला. एशानचा नंबर. एकदा वाटलं फोन घेऊयाच नको.. मग वाटलं कदाचित त्याने तिकीटाची काहीतरी व्यवस्था केली असेल. 
"काय झालं?" 
"हे बघ डीअर.. तिकीट तर मिळत नाही आहे. आता चार वाजले आहेत. बाय ड्राईव्ह पोचायला तुला पाच सहा तास लागतील. म्हणजे तु आता जरी निघालीस तरी मध्यरात्रीपर्यंत पोचशील.. आणि.." 
"मूर्ख.. साल्या एक तर मला लटकावतो वर लेक्चर देतो.. तू गाढवपणा केलास. तुझ्यावर विसंबून मी पण केला. आता माझं मी निस्तरते. परत तुला माझं काही काम सांगणार नाही..." मी बडबडतच होते. 
"ए तू मूर्ख आहेस. आणि दीडशाणी पण. " तो नेहमीप्रमाणेच माझ्यावर खेकसला. "आता मुकाट कुठे आहेस ते सांग. मी कार घेऊन इथून निघालोय. अर्ध्या तासात तिथे पोचेन. तुला घरापर्यंत सुखरूप सोडायची जबाबदारी माझी." 
"काय? तुझ्यासोबत कारमधून येणार? काय दारू पिऊन बोलतोयस का?" मी शान असला काही मार्ग काढेल याचा विचारच केला नव्हता. 
"मॅडम, मी शब्द दिलाय. शेवटपर्यंत माझा शब्द पाळेन. तुला तुझ्या घरी न्यायची जबाबदारी माझी. क्या समझे?"

रिक्षेमधून खाली उतरले पण मला काहीच समजेना.शान ऑलरेडी निघाला होता. पण घरी जर हे समजलं असतं की मी अशी एखाद्याच्या कारमधून आलेय तर चांगलेच फ़टके पडले असते. बाबाना तर मी एखाद्या मुलाशी बोलतेय हे समजलं तरी राग यायचा. त्यामुळे घरी गेलं की मी मोबाईल बंदच ठेवायचे. 
त्यात हा येडचॅप म्हणे मी तुला घरापर्यंत सोडतो, दिवाळीच्या दिवशी माझ्या घरात शिमगा झाला असता... 
परत त्याचा फोन आला. 
"अरे कुठे आहेस तु? मी वाशीच्या पुढे आलोय." 
आता काय कप्पाळ बोलणार मी. 
"मी हायवेवर उभी आहे" 
"ओके जान..." 
काहीही करून घरी जाणं गरजेचं होतं. एशान तसा चांगला मुलगा होता. त्याची एक गर्लफ़्रेंड पण होती. अर्थात त्याची आर्थिक परिस्थिती आमच्या अख्ख्या ग्रूपमधे चांगली होती. त्याच्यासोबत जाण्यात तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. घरी सांगितलं असतं की मी प्रायव्हेट बसमधून आले. घरी असं खोटं बोलायचं की एशानला मला बसमधे बसवून दे असं सांगायचं तेच मला समजत नव्हतं. 
तितक्यात एशानची कार येताना दिसली. कॉलेजमधे असल्यापासून ही त्याच्या पाचवी की सहावी कार. ही बहुतेक होंडा सीटी होती. माझं कारविषयी ज्ञान जरा कमीच होतं. 
"चल स पटकन." त्याने सामान पाठीमागे ठेवलं. 
"काय जड बॅगा आहेत? घरी काय दगड धोंडे घेऊन चालली का?" त्याने वैतागत विचारलं. 
"तु हमाल म्हणून आहेस हे माहीत असतं तर अजून चार पाच लगेज वाढवलं असतं" मी पण हसत उत्तर दिलं. 
एशान तसा दिसायला मस्त होता. मूळचा गोरा रंग पण उन्हाने रापलेला. अस्ताव्यस्त विंचरलेले केस. भरपूर उंची आणि लहानपणापासून स्पोर्ट्समधे असल्यामुळे lean body . आणि कायम ओठावर मिश्किल स्मित. 
तो माझ्या चेहर्‍याकडे निरखून बघत होता. एकटक. 
"काय झालं?" मी विचारलं. 
"यार... काय पण फ़ॅशन करतात ना हल्ली..." तो शांतपणे म्हणाला. आणि त्याचे गाडी स्टार्ट केली. मी सहज चेहर्‍यावरून हात फ़िरवला. आई गं.. साडी बदलली होती. पण कानातले झुमके, गळ्यातला नेकलेस आणि कपाळावरची बिंदी काढलीच नव्हती. खाकी टी शर्ट आणी निळी केप्रीज. काय ध्यान दिसत असेल मी? मेकप वॉटरप्रूफ़ होता. त्यामुळे तोही तसाच. वर मघाशी रडल्यामुळे डोळे सुजलेले. 
माझं मलाच हसू आलं. पटापट ती आभुषणं उतरवली आणि पर्समधे टाकली. 
"शान, कुठेतरी चांगल्या ठिकाणी कार थांबव. मला मेकप काढायचा आहे." घरी जर या मेकपसकट गेले असते तर वेगळीच पूजा बांधली असती... 
"मॅक्डोनाल्ड्स्ला थांबू." त्याने उगाच सीरियसली उत्तर दिलं. मघासपासून तो हसू आवरण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात मला ते  समजलंच होतं. उद्या ग्रूपमधे प्रत्येकाला त्याने फोन करून त्याने माझं वर्णन केलंच असतं. आणि जर कधी एकत्र भेटलोच तर मग माझ्या नक्कलसकट हे सर्व काही. 
"शान प्लीज. कामतमधे थांबू. तिथले वॉशरूम्स चांगले आहेत." 
"जशी तुमची मर्जी.. मी काय सध्या तुमचा ड्रायव्हर.." त्याने नाटकी अदबीने उत्तर दिलं. 
"व्यवस्थित तिकीट काढलं असतंस तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. आण काय रे? गेल्या चार वर्षात तु एकदाही माझं तिकीट विसरला नाही मग आजच कसं काय??" माझा मघाचा राग परत उफ़ाळून आला. 
"अगं कॉलेजमधे असताना रोज दिसायचीस त्यामुळे लक्षात रहायचं नेमका या वेळेला विसरलो." 
"हो ना, त्यामुळे ही ड्युटी करावी लागतेय." मी त्याला परत टोमणा मारलाच. तो हसला. 
"शान. सॉरी. माझ्यामुळे तुला दिवाळीच्या दिवशी यावं लागतय." 
"सॉरी काय त्यात? तसंही आमच्या घरी दिवाळी नसते. वर्ष झालं कॉलेज सोडून. इतक्यात विसरलीस पण?" 
अचानक मला आठवलं. एशानचे बाबा पक्के नास्तिक होते. त्याच्या घरी कुठलेच सण साजरे व्हायचे नाहीत. 
एशानचे आई बाबा हा आमच्या ग्रूपमधला गॉसिपिंगचा अतिशय आवडता उद्योग. एशान एकदा कॉलेजच्या कार्यक्रमाला एका छान मुलीला घेऊन आला होता. कुरळ्या केसाची. काळ्या डोळ्याची एकदम मस्त मुलगी होती. सर्वाशी त्याने पण ओळख पण करून दिली. मुलीचं नाव कांचन होतं. असेल पंचवीस सव्वीस वर्षाची. शेवटी कुणीतरी "ही तुझी कोण लागते रे?" 
हा शांतपणे. "माझी सख्खी आई आहे ती." 
ही मुलगी नसून बाई आहे आणि चाळीस वर्षाची आहे यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. इतका वेळ आम्ही सर्व जण त्याना नावानेच हाक मारत होतो. खुद्द एशानपण. भारीच इब्लिसपणा केला होता त्याने हा. अर्थात काकूही त्याला सामिल होत्याच. त्यादिवशी ग्रूपमधे सर्वानुमते ठराव पास झाला.."आई असावी तर अशीच.." 
गंमत म्हणजे त्या स्वत्: न्युरोसर्जन होत्या. पण त्याच्याकडे पाहिल्यावर इतकी कठीण ऑपरेशन्स त्या करत असतील असं वाटायचंच नाही. मी एशानच्या बाबाना मात्र कधीच भेटले नव्हते. तो त्यानासुद्धा एकेरी हाक मारायचा. मला या गोष्टीचं कायम अप्रूप वाटत आलं होतं. एशानच्या एकंदर बोलण्यावरून वाटायचं की त्याची आई जितकी मनमोकळी होती तितकेच त्याचे बाबा कठोर होते. 
कार पनवेलच्या पुढे आली होती. नॅशनल हायवे पकडला होता. ट्रॅफ़िकपण आता जरा कमी झालं होतं. एशानने जुन्या गाण्याची सीडी लावली होती. 
"तुला जुनी गाणी केव्हापासून आवडायला लागली?" मी विचारलं. 
"अगं, घाई गडबडीत निघालो ना. माझ्या सीडीज घेतल्याच नाहीत. परवा डॅड ही कार घेऊन गेला होता. त्याच्याच आहेत या सीडीज. पण बरं झालं ना तुला जुनी गाणी आवडतातच..." 
"हं.. नाहीतर तुझ्याबरोबर पाच सहा तास तो धांगडधिंगा ऐकायचा म्हणजे वैताग आलाच असता ना.. " 
तो नुसतंच हसला. 
"रिचा कशी आहे?" 
"कोण रिचा?" 
"शान, तुझी गर्लफ़्रेंड.." 
"माहीत नाही... गेल्या वर्षभरात आम्ही भेटलो नाही.." 
"काय सांगतोस? मला कायम वाटायचं की तु तिच्याबद्दल खूप सीरीयस आहेस म्हणून," 
"रिचा?? आणि मी तिच्याबद्दल सीरियस?? नो वे.." 
"ओह.. बिच्चारी," 
"बिचारी कशाला? तिला आधीपासून माहित होतं. इन फ़ॅक्ट तिलाच मी पहिल्यादा सांगितलं की मी कुणाबद्दल सीरियस अहे ते.,," 
"कुणाबद्दल??" 
"तुला माहीत नाही??" 
"नाही..." 
"अख्ख्या ग्रूपला मीहीत आहे आणि तुला माहीत नाही?" 
"शान, खरंच माहीत नाही.. सांग ना कोण आहे ती.." 
तो माझ्याकडे बघुन हसला. तितक्यात ओम शांति ओम वाजायला लागलं. 

"ओह आईचा फोन.." त्याने मोबाईल उचलत म्हटलं. 
"हा आई बोल.. नाही... पनवेलला आहे. पुण्याला कशाला जाऊ मी? नाही एका फ़्रेंडकडे चाललोय. बॉय असेल नाहीतर गर्ल... फ़्रेंड आहे हे महत्वाचं... नाही उद्या परत येईन.... ओके.. हा... हेल्मेट कशाला? कार चालवत असताना पोलिस कशाला पकडेल? हो बाई... सीट बेल्ट टाकलेत गाडीत.. तु कुठे आहेस?... हो आपण नंतर बोलू.. चल बाय,, हो गं बाई हेड फोन घालुनच बोलतोय," त्याने मोबाएल ठेवला. 
"तुझी आई फ़ार काळजी करते ना तुझी?" मी सहज विचारलं. 
"हो तिला मी अजून पण कुकूलं बाळ वाटतो." 
वडखळ नाका गेलं आणी एशानने गाडी कामतच्या समोर लावली. मी वॉशरूमधे जाउन फ़्रेश झाले. चेहर्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटत होत. तोवर त्याने कॉफ़ी मागवली होती. माझ्यासाठी. आणि स्वत्:साठी लाईम सोडा. 
सहा वाजून गेले होते. आता हळू हळू हायवेवरचं रात्रीचं ट्रॅफ़िक वाढलं असतं. 
"अकरा वाजेपर्यंत आपण घरी पोचू." मी त्याला म्हटलं. 
"पण दिवाळी उद्या सकाळी असेल ना?' 
"सकाळी नाही पहाटे. उद्या साडेचारला पहिली अंघोळ." 
"ओह.. मग अजून आठ नऊ तास आहेत आपल्याला घरी पोचायला." 
"अरे पाच तासात घरी पोचू.." 
"नो.. उद्या साडेतीनला तू घरी पोचशील. मी शब्द दिलाय.." मला तो काय म्हणतोय हे समजतच नव्हतं. 
"आणि आपण इतका वेळ करणार काय आहोत?" 
उत्तरादाखल एशान फ़क्त गालातल्या गालात हसला.
त्याच्या बोलण्याचा मला अर्थच कळत नव्हता. 
"चल, पटकन आटप. उशीर होतोय.." एवढं बोलून तो उठला सुद्धा. 
"आता तर म्हणत होतास ना की पहाटे घरी पोचू, मग लगेच उशीर होतोय काय?" 
माझ्या बोलण्याकडे साफ़ दुर्लक्ष करत तो गाडीकडे निघाला. 
"काय विचित्र माणूस आहे..." मी पण वैतागले. तसाही एशान त्याच्या उलट सुलट वागण्यासाठी प्रसिद्ध होता. मनमानीपणा असाच त्याचा स्वभाव होता.
 
कारमधे काहीतरी सोबत असावं म्हणून मी दोन चिप्सचं पाकिट आणि पाण्याची बाटली घेतली. 
"कशाला? गाडीत पाणी आहे. आणि आईने सॅंडविचेस दिली आहेत दोघासाठी. ती कोण खाणार?" एशानने मला विचारलं. 
"शान, तुझ्या आईला माहीत होतं की तू मला न्यायला येतोयस ते..." मी अजूनच चाट पडले. 
"तिला हे माहित होतं की मी लॉंग ड्राईव्हला चाललोय." 
त्याने गाडी हायवेवर आणत उत्तर दिलं.
 
मघासपासून का कुणास ठाऊक मला भिती वाटत होती. तसा एशान चांगला मुलगा होता. पण तरीही त्याचं बोलणं मात्र मला गोंधळात टाकत होतं. तसंही साडेसहा वाजत आले होते. थंडीचे दिवस असल्याने अंधार पडायला लागला होता. 
"एक मिनिट... तुला माझी भिती वगैरे वाटतेय का?" त्याने माझ्याकडे न बघता विचारलं. 
"भिती कसली? गेली चार वर्षे ओळखते मी तुला.. " मी हसत उत्तर दिलं.. स्वत्:च्या समाधानासाठी. 
"घाबरू नकोस. माझ्या मनात काहीही वावगं नाहिये.." त्याने मघासारखे सीरियसली उत्तर दिलं. मला मात्र एकदम हसू आलं. 
"काय झाले?" त्याने विचारलं. 
"शान, एक तर तू माझी मदत करतोयस. मला घरी घेऊन जातोय. आणि वर हे विचारतोस की मला तुझी भिती वाटते का? जर तुझी भिती वाटली असती तर तुझ्यासोबत आलेच नसते. घरी खोटं सांगणार आहे मी... इतका विश्वास आहे माझी तुझ्यावर.." 
"घरी काय सांगणार आहेस?" 
"हेच की मी बसने आले... तुझ्यासोबत आले म्हणून सांगितलं तर वाट लागेल माझी," 
"अं हं.. प्लान चेंज कर.. तू मला घरी घेऊन जाणार आहेस." 
"याड लागलय का तुला? बाबा बदडतील मला चांगलेच." 
"नाही बदडणार. मी सांगतो." 
"शान, माझ्या बाबाना मी नीट ओळखते. समजलं.? तू मला हायवेवर सोडणार आहेस. तिथून मी घरी फोन करेन बाबा नाहीतर दादा येऊन मला घेऊन जातील.. उगाच हीरो बनू नकोस. आजच्या दिवसात माझी वाट लावलीस तितकं पुष्कळ आहे.." 
"ओके. लेट्स सी, आगे आगे क्या होता है.." 
एक बैलगाडीवाला येऊन आम्हाला ओव्हरटेक करून गेला, इतकी आमची गाडी जोरात धावत होती. 
"शान. हायवेवर जरा स्पीडने चालव ना गाडी. सीटीमधे नाही आहेस आता..." 
"चिल यार.. काय गडबड आहे. उद्या पहाटे साडेतीनला पोचायचं आहे." 
आता मात्र मी शांत बसले. रफ़ीचं "अभी न जाओ छोडकर" चालू होतं. मी खिडकीमधून बाहेर बघत बसले. 
रात्रीचे आठ वाजून गेले होते. आम्ही पोलादपूरच्या पुढे आलो होतो. ट्रॅफ़िक अपेक्षेप्रमाणे चालू झालं होतं. त्यातच शान कुणाचीही पर्वा नसल्यासारखा हळू हळू कार चालवत होता, 
"ही होंडा सीटी इतक्याच हळू जाते का?" मी विचारलं. 
"होंडा सीव्हीक आणि हिचा टॉप स्पीड २०० आहे. बघायचाय?" 
"नको.. अजिबात नको. चालव इतक्याच हळू चालव." 
मला अचानक कॉलजमधे त्याने नवीन गाडी चालवून दाखवलेली आठवलं. जवळ जवळ गाडी उडवलीच होती त्याने. 
आता रफ़ीची गाणी संपून मुकेश ची चालू झाली होती. "सुहानी चांदनी राते. हमे सोने नही देती...." 
"चांदणं तर कुठे दिसतच नाही.." 
"गधड्या आमवस्या जवळ आली.. " 
"अरे पण उद्या दिवाळी आहे ना.." 
"शान, दिवाळी अमावस्येच्याच रात्री असते. " 
"हो का? मला काय माहीत. आम्ही मिशनर्‍याच्या शाळेत शिकलेले." 
"शान, प्लीज.." 
"अगं चिडतेस काय? माझ्या आईच्या घरी दिवाळी वगैरे करतात. पण तिथे आम्हाला कुणी बोलवत नाही. आणि डॅडकडे तर कायमचीच दिवाळी आहे" 
"शान तुझी आई मराठी आहे ना?" 
"मग काय मजा म्हणून इतकं चांगलं मराठी बोलतो का? कंचन पुणेरी मराठी आहे. म्हणून तर..." 
मला कॉलेजमधे कुणीतरी सांगितलेलं आठवलं.. 

एशानचे आई बाबा ते दोघं कॉलेजमधे असल्यापासून एकत्र होते. तेव्हाच त्याचं प्रेम जमलं होतं. एशानची आई अवघी अठरा वर्षाची होती तेव्हा त्यानी लग्न केलं अर्थात कारणही तसंच होतं. लग्नानंतर सहाच महिन्यानी एशानचा जन्म झाला. त्याला संभाळून नवर्‍याची फ़िरतीची नोकरी सांभाळत त्याच्या आईने मेडिकल पूर्ण केलं होतं. पण त्याच्या आईचं तिच्या घराशी संबंध सुटला ते कायमचं.... 
"कसला विचार करतेयस?" त्याने मला विचारलं. 
"काही नाही. तुझ्या आईने तुला कसं संभाळलं असेल त्याचा विचार करतेय." 
"कधीतरी आईला विचार. ती सांगेल तुला बसून. ती एमडीचा अभ्यास करायची आणि मी स्कूलचा होमवर्क. डॅड सांगत होता की मला बोर्डिंग स्कूलला पाठव म्हणून.. पण तिने कधीच ऐकले नाही.. I am so proud of her."
मी त्याच्याकडे बघून हसले. आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. एकदम छोटा, एकेरी रस्ता. एकसुद्धा गाडी रस्त्यावर नव्हती. 
"शान, आपण रस्ता चुकलोय. हायवे नाहिये हा.." मी ओरडले. 
"मी बरोबर रस्त्यावर आहे. डोंट वरी... " तो म्हणाला, 
"अरे शान पण बाहेर बघ ना." 
"काही नको, मला माहीत आहे आपण कुठे चाललोय ते." 

मला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. माझ्या मोबाईलला रेंज नव्हती. 
बाहेर मिट्ट काळोख होता. रस्ता कुठे चाललाय हे समजत नव्हतं. 
आता मला मात्र भिती वाटायला लागली. शान काहीच बोलत नव्हता. मी परत एकदा मोबाईल पाहिला. रेंज नव्हतीच. तरीही घरी कॉल लावला. 
"घाबरू नकोस. मी तुला व्यवस्थित घरी पोचवेन. माझं प्रॉमिस आहे तुला." 
एशानने बाजूला गाडी थांबवत सांगितलं. 
"पण आपण इथे का थांबलोय? आजूबाजुला तर काहीच नाही.." 
"चल बाहेर उतर.." 
"नको.. मी नाही. चल परत जाऊ या.." मी फ़क्त रडायची शिल्लक होते. 
"मूर्ख... खाली उतर. आणि बाहेर ये." एशान परत एकदा खेकसला. त्याच्या या ओरड्यावरून का कुणास ठाऊक मला सर्व काही नीट असल्याची खात्री पटली. कारच्या बाहेर आले तर थंड वारा अंगाला लगेच झोंबला. इकडे तिकडे नजर फ़िरवली... 
आमची गाडी एका दरीच्या टोकाला उभी होती. समोर डोंगरच डोंगर दिसत होते. अंधारामधे काळे काळे. मधेच कुठेतरी लकाकणारा एकाद दिवा. वर आकाशात चंद्र दिसत नव्हता. त्यामुळे शाळा सुटल्यासारख्या चांदण्या धावत होत्या. त्याचा मंद प्रकाश वेगळाच वाटत होता. आमच्या कारचे हेडलाईट्स सुद्धा बंद होते. त्या अंधुकशा प्रकाशात एकदम वेगळंच वाटत होतं. 
"मागच्या वर्षी आम्ही इथे ट्रेकला आलो होतो तेव्हा अडकलो होतो. खूप आवडली ही जागा मला. म्हणून तुला घेऊन आलो. आता पण माझी भिती वाटतेय का?" 
एशानने हळूच विचारलं. 
मी त्याच्याकडे पाहिलं. "सॉरी," मी इतकंच म्हटलं. 
"अंहं इतक्या ईझीली नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे."
 
"आता तू काय माझी घटक चाचणी घेणार आहेस का?" 
"नाही. एकच प्रश्न आहे.. पण मला खरं खरंउत्तर हवय.. " तो हसला आणि हळूच म्हणाला. 
"माझ्याशी लग्न करशील?"
माझा क्षणभर कानावर विश्वासच बसेना.. 
"काय?" मी विचारलं... जवळ जवळ ओरडलेच त्याच्यावर. 
"किंचाळतेस काय? लग्न करशील का म्हणून विचारलय.." तो हसला. 
"अंगठी वगैरे काही आणली नाही का?" मी विचारलं. मला पक्कं माहित होतं की तो माझी गंमत करतोय. मघाशी मी घाबरलेली बघून तो माझी अजूनच खेचत असावा. 
"अंगठी?? ओहो.. ती नंतर देईन मी तुला. आधी तू "हो" तर म्हण," तो हसत म्हणाला. 
"शान, पुरे झाली आता थट्टा.. चल निघु या इथून उशीर होतोय." 
"थट्टा?? आय ऍम सीरियस.. मी मजा नाही करत आहे. " 
"शान मस्ती पुरे आता.. अरे, रात्र फ़ार झाली आहे. घरी चल आता." 
"तू आधी हो का नाही ते सांग." 
"शान.. प्लीज खूप झाली मस्करी." 
"मस्करी? थट्टा? गंमत वाटतेय तुला? सकाळपासून तुझा फोन घेतला नाही. मुद्दाम... हो मुद्दाम तुझं तिकीट काढलं नाही. तुला नेण्यासाठी दुपारपासून वाशी नाक्याला वाट बघत बसलो... या इथे घेऊन आलो आणि तुला गंमत वाटतेय.. छी... दहा वेळा तरी मनातल्या मनात हा सीन रीहर्स केला होता. पण तू अशी री ऍक्शन देशील असं मात्र वाटलं नव्हतं." तो खरंच वैतागला होता. 
"शान, you cant e serious ." मी शांतपणे म्हटलं. 
"का? का मी तुझ्याबाबतीत सीरियस असू शकत नाही?" 
"पण शान.. " मला काय बोलायचं ते समजत नव्हतं. एशान कॉलेजमधे फ़क्त माझा मित्र होता. तो पण काही बेस्ट फ़्रेंड वगैरे नाही. त्याची इकडे तिकडे अफ़ेअर्स चालूच असायची. पण तो माझ्याबाबतीत पण असला विचार करेल आणि ते पण लग्नासाठी.. हा सीन मी माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन केला नव्हता.. 
"हो की नाही?" 
त्याने परत एकदा विचारलं.. अंधारामधे मला त्याच्या चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याच्या चेहर्यावरचे अधीर भाव पण दिसत होते. तो खोटं बोलत नव्हता. तो माझी मस्करी करत नव्हता.. खरोखर मला प्रपोज करत होता. एका क्षणामधे एक आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. 
कॉलेजमधे पहिल्याच दिवशी भेटलेला एशान, घरची श्रीमंती असून आणि पाच हजार रूपये पॉकेटमनी असून सुद्धा आमच्याबरोबर वडापाव खाणारा. सगळे लेक्चर्स चुकवून वर्षाच्या शेवटी अभ्यासासाठी रात्रभर जागणारा.. आणि रात्री अपरात्री फोनवर डिफ़िकल्टीज विचारून सर्वाना हैराण करणारा. स्वत्:च्याच आईला नावाने हाक मारणारा. तिच्या क्लिनिकमधे पडेल ते काम करणारा. मास कॉम झाल्यावर स्वत्:ची ऍड एजन्सी चालू करून वर्षभरात फ़्लॅट घेणारा. ग्रूपला घरी बोलावून सगळ्याना "बेस्ट कुरकुरीत डोसे" करून खायला घलणारा. एशान. माझा मित्र. मला चक्क लग्नासाठी विचारत होता. ..काय बोलू तेच सुचेना. तो एकटक माझ्याकडे बघतच होता. मी हैराण होते. गोंधळले होते. आणि खुश होते. शानसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. ग्रूपमधल्या सर्वच मुलीचं एकमत होतं. 
"हो की नाही?" त्याने परत विचारलं. 
"शान, जर मी नाही म्हटलं तर.." 
"काही नाही. मी गाडी घऊन मुंबईला जाईन. तशीपण तुला अंधाराची भिती वाटतेच. ये चालत इथून. हायवेपासून जास्त नाही.. फ़क्त अठरा किलोमीटर आत आहोत. 
"शान.." 
"प्लीज.. हो म्हणशील याची मला खात्री आहे." 
"कशावरून?" 
"गेली चार वर्षे खात्री आहे. पहिल्यादा तुला पाहिलं त्या दिवसापासून. त्या क्षणापासून.. तुला आठवत पण नसेल. तू क्लासमधे पहिल्यादा आलीस तेव्हा.काळा सल्वार कमीज. व्हाईट ओढणी. मोकळे सोडलेले केस. आणि ब्लॅक चप्पल.. आधी क्लासमधे सगळ्याकडे एकदम घाबरत घाबरत पाहिलंस आणि कुणीतरी तुझ्यावर कमेंट केली तेव्हा त्याच्याकडे हसून पाहिलंस. एकदम निर्धास्तपणे. जणू आधीची घाबरी मुलगी तू नव्हतीसच. तेव्हाच ठरवलं, आयुष्य काढायचं तर याच मुलीबरोबर. तेव्हापासून ते आजपर्यंत हा प्रश्न तुला विचारायचा होता. तू हो म्हणशील ना?" 
"शान, मला माहीत नाही.." 
"वा.. मला माहीत नाही. मॅडम, तुम्हाला माझ्याबरोबर आयुष्य काढायला आवडेल का? हे विचारलंय.. आणि म्हणे माहीत नाही." 
"शान, मला थोडा वेळ देशील?" 
"हो. का नाही? हवा तेवढा वेळ घे. उद्या पहाटे साडेतीनला घरी जायचय तुला." 
"शान, चल निघू या. उशीर होइल." 
"मला उत्तर हवय." 
"आत्ता?? लगेच?" 
"हो.." 
"मग ऐक.. नाही. मला शक्य नाही" 
त्याच्या चेहर्यावर अंधार पसरल्यासारखं मला उगीच वाटलं. 
तो काहीच बोलला नाही. मी दरीकडे बघत उभी होते. तो कारमधे जाऊन बसला. तरी माझं लक्ष नव्हतं. त्याने हॉर्न मारला. "आता चल" या अर्थाचा. 
मी निमूटपणे कारमधे जाऊन बसले. त्याने रीव्हर्स मारला. सीडी चालू झाली. "आंसूभरी है जीवन की राहे..." 
मी न राहवून गाणं बंद केलं. 
शान काहीच बोलला नाही. 
"आय ऍम सॉरी" मीच बोलले. त्याची शांतता मला खूप त्रास देत होती. माझ्या नकाराचं त्याने कारण तरी किमान विचारावं असं वाटत होतं. 
त्याचा मोबाईल वाजला. बहुतेक त्याला रेंज असावी. 
"बोल... हो.. अं?? नाही... माहीत नाही... नंतर बोलतो मी. हा.. डॅड.. बादमे फोन कर दूंगा. ड्राईव्ह कर रहा हू.. ह्म्म.. प्लीज... ओके. टेक केअर.. " त्याने फोन कट केला. 
"आई होती का?" मी विचारलं. त्याने फ़क्त मान डोलावली. 
"एशान.. प्लीज. तू चिडू नकोस." 
"मी चिडलोय असं तुला वाटतय का?" त्याने मला विचारलं. 
"हा प्रश्न आहे का?" 
"तुझं उत्तर काय आहे ते बघ ना...." 
"शान, तू जरा माझा विचार कर. तुला माझ्या घराबद्दल काहीच माहीत नाही." 
"लग्न तुझ्याशी करायचय. तुझ्या घराशी नाही," 
"शान, माझ्या घरचे कधीच तयर होणार नाहीत. माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेला मी पाहिलय.. आजोबानी प्रत्येक मुलाविषयी कशी चौकशी केली होती. ते तुला कधीच तयार होणार नाहीत." 
मला घरातले निष्कर्ष समोर दिसत होते. कर्मठ कुटुंबातली मी. संस्कार, शील कुल असल्या गोष्टीचं बाळकडू घरात मिलालेलं. त्याच्या उलट एशानचं घर. देवब्राह्मण नाही. नास्तिकता. त्याची आई अजून जीन्स घालते. त्याच्या घरात कसले संस्कार नाहीत. वागण्याची पद्धत नाही. कुटुंब नाही. 
माझ्या घरात सुरू झालेला संघर्ष माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. अख्ख्या घरासाठी खपून स्वयंपाक करणारी आणी तरीही सर्वात शेवटी जेवणारी स्त्री हे आमच्या गृहिणीपणाचे आदर्श होतं. आणी कितीही शिकलेलं नोकरी केलेलं असलं तरी त्यात काहीच बदल स्विकारला जानार नव्हता. त्यामधे स्वत्:ला मेंटेन करणारे, जिममधे जाणारी डॉक्टर कांचन कुठेच बसत नव्हती. एशानमधे त्याच्या आईवडीलामधे चूक काहीच नाही, हे मला समजत होतं. पण आजोबाना आणि बाबाना कोण सांगणार? 
"शान, माझ्या घरी असं चालणार नाही. तुझी आई मराठी आहे, पण डॅड पंजाबी आहेत. आजोबा ऐकूनसुद्धा घेणार नाहीत." 
"सिंधी. एशान मीरचंदानी. दॅट मेक्स मी सिंधी." 
"सॉरी, पण तरी घरी..." 
"तुझं उत्तर हवं होतं मला. ते जर नाही असेल तर मग पुढचं बोलायचं कशाला?" 
"शान.. पण अरे.." 
"एकदा.. फ़क्त एकदा हो म्हण. तुझ्या घरच्याना समजवायची जबाबदारी माझी. मी चांगला पैसा कमावतो. निर्व्यसनी आहे. बीअर घेतो ते दे सोडून. पण तुला आयुष्यात खूप सुखी ठेवीन, कधीच कसला त्रास होऊ देणार नाही... बिलिव्ह मी." 
"शान, मला सर्व पटतय. पण घरी..." 
"परत तोच विषय का काढतेस? तुझ्या घरचे तयार होतील... मी मनवेन त्याना." 
"नाही.. एशान, आजोबा कधीच ऐकणार नाहीत. मी ओळखते त्याना. उगाच हे असं काही समजलं तर मला नोकरी सोडून घरी बसवतील.." 
"हे असं काही म्हणजे?" 
"शान, प्रेम विवाह तुझ्या इथे चालत असतील. माझ्या घरी त्याला थिल्लरपणा समजतात." 
"ओह, माझ्या आईवडीलानी पण केला होता ना प्रेम विवाह.. म्हणून आम्ही थिल्लर माणसं. तुमच्यासारखे खानदानी नव्हे, बरोबर ना?" त्याच्या आवाजातला उपरोधपणा माझ्या जीवाला अक्षरश्: कापून गेला. दातानी माझेच ओठ घट्ट दाबले. 
"शान सॉरी." 
"तीनदा की चारदा तेच ऐकवलेस. आता बास, मला समजलं की तुला काही प्रॉब्लेम नाही. घरी प्रॉब्लेम आहे, तरीही.... मला तुला काहीतरी सांगायचय.." 
गाडी हायवेवर आली होती. 
"मी तुला आयुष्यात खूप सुखी ठेवेन. कधीही काहीही वेळ आली तरी तुझा हात सोडणार नाही, हा मी दिलेला शब्द आहे. जगातल्या कुठल्याही रिती रिवाजापेक्षा, नात्यापेक्षा आणि संस्कारापेक्षा महत्वाचा. माझा शब्द... माझं वचन. असंच एक वचन डॅडने आईला दिलं होतं आणि पंचवीस वर्षापर्यन्त निभवलय. सात फ़ेरे त्यानी कधीच घेतले नाहीत. सप्तपदीपण चालले नाहीत. "नातिचरामि" अशी शपथ कधीच घेतली नाही. पण त्याचं पालन मात्र केलं." 
बोलता बोलता त्याचा आवाज हळूवर झाला होता. अलगद फ़ुंकलेल्या बासरीसारखा वारा खेळत होता. दूरवर कुठल्यातरी गावामधे फ़टाके उडत होते. समोरून येनार्या गाडीच्या हेडलाईटचा उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. बहुतेक कशेडी घाट सुरू झाला होत्ता. ट्रॅफ़िक तसं कमी वाटत होतं. 
शान पुढेही काहीतरी बोलत होता. माझं लक्षच नव्हतं. मी मनाने केव्हाच दुसर्या कुठल्यातरी जगात पोचले होते. बाबा, आजोबा चिडतील ओरडतील कदाचित मारतील सुद्धा. पण शान त्याची आई त्याना समजावतील. माझं भलं कशात आहे ते नीट सांगतील. त्याचं म्हणणं माझ्या घरचे आधी ऐकणार नाहीत. मग हळू हळू तयार होतील. एशान चांगला पैसा कमावतो. व्यसनी नाही. आणि हुंडा मागणार नाही. हे त्याना पटायला लगेल. आणि मग ते तयार होतील.... 
"मग काय विचार आहे?" शान मला विचार होता. 
"कशाबद्दल?" मी पटकन बोलून गेले. अर्थात चूक लक्षात आल्यावर जीभ चावली. 
"शोएब अख्तर बॉल फ़ेकतो की टाकतो याबद्दल.." 
"काय??" 
तो हसला.. मी पण हसले. 
"शान एक विचारु?" 
"विचार ना.." 
"तू खरंच गेल्या चार वर्षापासून माझ्यावर प्रेम करतोस?" 
"का? अजून शंका आहे तुला? " 
"ग्रूपमधे कुणाला माहित होतं?" 
"जास्त कुणाला नाही. पण मी माझ्या प्रत्येक गर्लफ़्रेंड्ला सांगायचो." 
मी खुदकन हसले. 
"काय झालं?" 
"तू तुझ्या गर्लफ़्रेंडला सांगितलेस. आणी मला कधीच नाही सांगितलं.." 
"तुला सांगितलं कित्येकदा... तुला समजलंच नाही," 
खरं खरं सांगते.. शानच्या या वाक्याचा अर्थ मला आजतागायत समजलेला नाही. विचारलं तर तो सांगतही नाही. उत्तर म्हणून परत हेच वाक्य असतं. 
"कॉलेजमधे किंवा त्यानंतर तुला कधी वाटलं नाही की माझ्या आयुष्यात कुणीतरी येईल म्हणून.." 
"मी चान्सच ठेवला नव्हता. कॉलेजमधे असल्यापासून... हमारे जासूस तुम्हारे इर्द गिर्द हमेशा घूमते रहे है.." 
"उगाच फ़िल्मी वाक्यं फ़ेकू नकोस." 
"का आपल्या कॉलेजमधलं कोणच नाही तुझ्या ऑफ़िसमधे." 
"आहे.. पण तो तर.. ओह नो... रुचिर आपल्याला दोन वर्षं सीनायर होता..." 
शान माझ्याकडे बघून फ़क्त हसला. अगदी लहान मुलासरखा गोड. 
"मी कधीही.. म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं.... माय गॉड.. मी खरंच इतकी स्पेशल आहे का रे?" 
"माहीत नाही.. पण आई म्हणते की तू तिच्यासारखी आहेस म्हणून.." 
"आई? तुझ्या आईला माहीत आहे हे सर्व..." 
"पहिल्या दिवसपासून.." 
"आणि ही सर्व आयडीया तिचीच. बरोबर?" 
"नाही. ही डॅडची. अगदी गाडीत गाणी कुठली लावायची इथपासून ते कुठे थांबायचं इथपर्यंत..." 
"शान, आय डोंट बिलिव्ह दिस" 
"परत एकदा विचारू?" 
"काय?" 
"तेच..." 
मीपण मुद्दाम खोडकरपणे विचारलं "काय ते नीट सांग" 
"मी तुझ्या निर्ढावल्या डोळ्यांत तेजाळू किती? 
उत्तरे देशील म्हणुनी प्रश्न ओवाळू किती?"
 
"काऽऽऽय?" मला चक्कर यायचे बाकी होते. म्हण्जे शान मला प्रपोज करतोय वगैरे ठिक होतं.पण कविता बिविता म्हणजे. मामला भयानक रित्या गंभीर होता. 
"तुला.. ना रीऍक्शन कशी द्यायची तेच समजत नाही.. मी काय भूत आहे असं किंचाळायला..." 
"अरे पण कविता?" 
"माझी नाही. वैभव जोशीची आहे. सिच्युएशनला फ़िट बसत होती म्हणून...." 
"बाप रे.." 
"परत चुकीची रीऍक्शन.." 

रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्र उद्याच्या पहाटेच्या तयारीला लागली होती. घाटातला वळणावळणाचा रस्ता सुरू होता. 
"ए शान.. परत एकदा बोल ना..." 
"काय? कविता?" 
"नाही रे.. ते मघाशी म्हणालास ना.. मी तुला शब्द देतो वगैरे.. वचन वगैरे.." 
"ए मी काय ते पाठ करून नाही म्हणालोय. हा... आईने थोडी मदत केली होती. पण तरीही..." 
"तरीही काय?" 
"तुला ते शब्द महत्वाचे आहेत की भावना महत्वाच्या?" 
मी काहीच बोलले नाही. खरं तर गरज नव्हती. आणि का ते मला माहीत नाही. पण माझ्या डोळ्यत पाणी आलं. 
त्याने हलकेच माझा हात धरला. 
"आय प्रॉमिस. मी शब्द दिलाय तुला. आयुष्यात कधीही तुला दु:ख देणार नाही. हा धरलेला हात कधीच सोडणार नाही. 
मी त्याच्याक्डे बघितलं. जगातले सगळे शब्द संपल्यासारखे वाटले. काहीच बोलायची गरज नव्हती. या एका क्षणापुरती का होईना.. मी या जगातली सर्वात सुखी होते. 
अंधार होता. रस्ता वळणावळणाचा होता. तो माझ्याकडे बघत होता. गाडी वार्याशी स्पर्धा केल्यासारखी पळत होती. आणि मझं मन गाडीपेक्षा वेगाने... आणि माझा हात त्याच्या हातात होता..... 
मला पुढचं काहीच आठवत नाही.. दिसत नाही.. समजत नाही. फ़क्त एवढंच माहीत आहे... त्याने आयुष्यभर माझा हात सोडला नाही. दिलेला शब्द त्याने शेवटपर्यंत पाळला. 




***समाप्त्*** 


Wednesday 22 May 2013

त्रिकोणाचे तीन कोन

ऑफिसमधे येऊन अर्धा तास पण झाला नव्हता पण कंटाळा शुक्रवार संध्याकाळ इतका आला होता. जुलैचा महिना त्यात बाहेर तूफान पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेन उशीरा धावत होत्या. मध्य रेल्वे तर कधीही बंद पाडायच्या मार्गावर होती. आज ऑफिस अगदी सुनसान होते. सीक्युरीटी गार्ड बसल्याबसल्या चक्क पेंगत होता. बहुधा ऑफिसमधे मीच एकटी वेळेत आले होते. दुसरे कुणीच दिसेना. मेलबॉक्स चेक करून बघितला तर काही नविन मेल नव्हतं. मग उगाच फेसबूक वगैरे उघडून बसले. पण वेळ जाता जात नव्हता. तसं आजच्या दिवसाभराच्या कामाचं माझं काहीच जास्त टारगेट नव्हतं.  माझा बॉस ठाण्याला रहायला होता, इतका मुसळधार पाऊस बघता आज बहुतेक त्याने सुट्टीच टाकली असावी. त्याला फोन ट्राय केला तर पठ्ठ्याने तो बंद ठेवला होता.


कुणीच दिसेना तेव्हा वाटलं, आयला सर्वानी संगनमत करून सुट्टी घेतलीये की काय. पण हळूहळू दुसर्‍या डीपार्टमेंटमधे पण माझ्यासारखे काही एकांडे शिलेदार आलेले दिसले. शेवटी वैतागून कॅन्टीनमधे जाऊन बसले. सुदैवाने कँटीनवाला हजर होता. एका कॉफीची ऑर्डर दिली. तेवढ्यात मोबाईल वाजला म्हणून बघितला तर चक्क पाच एसेमेस. बहुतेक स्टाफ रजेवर गेला होता, आणि ते कळवण्याचं पुण्यकर्म मात्र केलं होतं. पण त्यामधे एक मेसेज निधीचा पण होता. आज हिला कशी काय आठवण आली म्हणून बघितलं तर कॉल मी इतकाच तुटक मेसेज.


तसं मला काम काहीच नसल्याने मी लगेच तिला फोन लावला. निधी माझी कॉलेजमैत्रीण. फॅशन डीझायनिंगच्या एका कोर्सला आम्ही एकत्र होतो. तसा आमचा फार् मोठा ग्रूप होता, पण मी,निधी, गझल आणि सायली अशा आम्ही एकदम घट्ट मैत्रीणी होतो. कॉलेज संपलं आणि आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. मी फॅशन डीझायनिंगनंतर अजून एक दोन कोर्स केले आणि एका मासिकामधे फॅशन रीपोर्टर म्हणून काम सुरू केलं. गझल लग्न करून लंडनला गेली. सायली बॉलिवूडमधे छोट्यामोठ्या असाईनमेंट्स करत होती. निधीला काही करण्याची गरजच नव्हती. तिच्या वडलांची रेडीमेड कपड्यान्ची मोठी फॅक्टरी होती. ती एकुलती एक मुलगी. जुहूला बंगला होता. आलिशान गाड्या होत्या. निधी आमच्या ग्रूपची राजकुमारी होती.


रिन्ग पूर्ण वाजली तरी निधीने फोन उचलला नाही. बहुतेक ती काही कामामधे बिझी असेल असा विचार करून मी माझ्या डेस्कवर परत आले. निधीचे वडील मागच्याच महिन्यामधे वारले होते. अगदी अचानक हार्ट अ‍ॅटॅकचे निमित्त होऊन. निधी सध्या घरच्या बिझीनेसमधे लक्ष घालायचं ठरवत होती.  तसे तिचे दोन काका होतेच पण तरी आता तिला वडलानंतर कंपनीमधे लक्ष घालणे जरूरीचे आहे, असे मागच्या वेळेला एकदा फोनवर म्हणाली होती. हल्ली आमचं बरंचसं बोलणं एक तर चॅटवरती व्हायचं नाहीतर फोनवर. माझ्या ऑफिसपासून तिचं ऑफिस अगदी चालत जायच्या अंतरावर होतं.


डेस्कवर बसून या महिन्याच्या एका रीपोर्टवर नजर टाकत होते, तितक्यात मोबाईल वाजला. रफीच्या अगदी खोडकर आवाजातलं गाणं.. 'जाने कहा मेरा जिगर गया जी'. ही रिंगटोन अगदी सुरूवातीला मोबाईलवर घेतली तेव्हा तर पूर्ण रिंग वाजली तरी मी फोन घ्यायचेच नाही. आता मात्र लगेच उचलला.  निधीचाच फोन होता. दोघीच्या कामाच्या वेळा बघून  आज दुपारी एक वाजता लंचला कॉपर चिमनीमधे भेटायचं ठरलं.


मी ओके म्हणून उत्तर पाठवलं. एरवी कधीतरी नंतर बघूया म्हणून ठेवलेले फोल्डर्स काढले आणि थोडंफार वाचन करत बसले. दहानंतर पाऊस जरा कमी झाला आणि ऑफिसमधले एक एक तारे उगवायला लागले. तरी पावसाची मरगळ असल्याने सर्व काम कसं अगदी हळूहळू चालू होतं. साडेबाराला पीसी बंद केला आणि मी टॅक्सी पकडली. मी हॉटेलमधे पोचले तरी निधीचा पत्ता नव्हता.
तिला फोन करत होते इतक्यात तिची हाक ऐकू आली.


"जोई, इधर देख" मी वळून बघितलं. निधी माझ्याचकडे येत होती. गेल्या महिन्याभरात कितीतरी बदलली होती. पूर्वीची निधी म्हणजे ट्रेंडसेटर होती. तिला जे आवडेल ते ती घालायची. अगदी हिल रोड किंवा कुलाबा कॉजवेवरची अ‍ॅक्सेसरी ती परफेक्टली कॅरी करायची, तेही एखाद्या परदेशी ब्रँडसोबत. ती कुठल्याच ब्रँडची भक्त नव्हती आणि मिक्सअ‍ॅन्मॅच तिच्या इतकं परफेक्ट कुणालाच जमायचे नाही. तिच्याइतकी चपखल नजर कुणाचीच नव्हती. निधी फॅशन डिझायनिंगमधेच राहिली असती तर आतापर्यंत कितीतरी पुढे गेली असती. निधी वडलांच्या कंपनीमधे डीझायनिंग करत होती. पण ते काम म्हणजे काही क्रीएटीव्ह काम थोडीच.


आताची ही निधी मात्र डोक्यापासून पायापर्यंत कॉर्पोरेट वाटत होती. फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, सोबत एक बॅग. राल्फ लॉरें, लुई व्हितों आणि बरबेरी- मी फॅशन रीपोर्टरच्या कौशल्याने सर्वच ब्रँड्स ओळखले. तिच्या पिंगट केसांचा पोनीटेल बांधला होता. हातामधे महागडा भलामोठा सेलफोन. हलकासा पण जाणवणारा मेकप. आणि करड्या रंगाच्या काँटॅक्ट लेन्स.


"हेलो." मी हसत म्हटलं. निधीच्या समोर मी म्हणजे गबाळशिरोमणी. फॅशनजगताशी इतका जवळचा संबंध असूनपण मी अजून सुधरले नव्हते. जीन्स कुडता आणि मोकळे सोडलेले कुरळे केस हेच माझं जागतिक स्वरूप होतं. निधी माझ्या टेबलवर येऊन बसली.


"काय ऑर्डर केलंस?" तिने मेनू वाचत विचारलं. मी फक्त स्टार्टर्सची ऑर्डर दिली होती, निधीने पुढची ऑर्डर दिली. वेटर निघून गेल्यावर थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग अचानक निधी मला म्हणाली.


"तुला खास कामासाठी बोलावलं आहे, जोई. आता मी जे तुला सांगणार आहे ते तू कुणालाही चुकूनसुद्धा बोलू नकोस."

निधीचं इतकं काय खास काम असावं माझ्याकडे?

"हे बघ निधी. आपण एकमेकीना चार पाच वर्षे ओळखतो. जे काही असेल ते बिन्धास्त सांग. माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करेनच."

"ते माहित आहे मला, म्हणून तर मुद्दाम हे काम मी फक्त तुला सांगणार आहे."

वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. खाण्यामधे निधीचे लक्षच नव्हते.प्लेटमधले सॅलड नुसते चिवडत होती. तिला नक्की काय सांगायचे आहे मी याचा अंदाज बांधत होते. काहीतरी बिझनेस रीलेटेड असे वाटत होते.


"जोई.... मला जिगरशी लग्न करायचं आहे." निधीने शेवटी हा बॉम्ब टाकला. मी जवळ जवळ उडालेच. माझ्या हातातला चमचा खालीच पडला. पण अर्थात ही काही तशी ब्रेकिंग न्युज नव्हती. जिगर निधीचा लहानपणापासूनचा मित्र. मित्र म्हणण्यापेक्षा काहीतरी अतिदूरचा नातेवाईक होता. कॉलेजमधे असताना आम्ही त्याला कित्येकदा भेटलो होतो. पण तेव्हा कधी जिगर आणि निधी कपल असतील असे वाटले नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी हे ऐकून मी अगदीच भंजाळले.


"कॉन्ग्रॅट्स निधी" मी स्वत:ला सावरत म्हटलं.

"क्या कॉन्ग्रॅट्स? मेरी पूरी बात तो समझ यार. मला जिगरबरोबर लग्न करायचे आहे. अजून जिगरला यामधले काहीही माहित नाही.. आणि जिगरला पटवायचे काम तुला करायचे आहे."


आता मात्र हे माझ्यासाठी सर्वच बाऊन्सर्स होते. मला खरंच काहीही समजेनासं झालं होतं.

"निधी, अगदी शांतपणे मला व्यवस्थित समजाव, आय अ‍ॅम कन्फ्युज्ड."

निधी त्यानंतर जवळजवळ अर्धा तास बोलत होती. तिचा प्रॉब्लेम मला लक्षात आला. आणि त्या प्रॉब्लेमवर शोधलेले तिने सोल्युशन देखील जबरी होते.


निधीच्या वडलांच्या मृत्यूनंतर घराची आणि कंपनीची सर्व जबाबदारी तिच्या काकांनी उचलली होती. त्याचबरोबर निधीच्या लग्नाचे वय झाल्याने तिच्यासाठी स्थळे शोधायची जबाबदारीदेखील आपखुशीने घेतली होती. निधीची अणि तिच्या आईची लग्नासाठी अजिबात इच्छा नसताना.. त्यांचा हेतू स्पष्ट होता,  निधीच्या वडलानी स्वतःच्या मृत्यूपत्रामधे निधीला वारस केले होते पण एकदा का निधी लग्न करून आपल्या घरी गेली की बिझनेसमधे तिचा संबंध येणार नाही. आपखुशीने ती बिझनेस सोडून देइल. तिला दहेज वगैरे भरपूर दिलं की नंतर ईस्टेटीमधे वाटा द्यायला नकोच किंवा दिला तरी मामुली देऊन चालेल. यासाठी तिच्या काकांनी एन आर आय आणि अतीश्रीमंत खानदानामधले मुलगे शोधायला सुरूवात केली होती. निधी परदेशात गेली असती म्हणजे उत्तमच झाले असते. निधीच्या समाजामधे पैसा कितीही असला तरी मुलीसंदर्भातली मानसिकता अजून पुरातनकाळातलीच होती.


"म्हणजे बघ, मला काही बोलता येणार नाही. कारण त्यांचा हेतू खूप चांगला असंच सर्वाना वाटेल.  मला मुंबई सोडून जायचं नाही तरी हे नातेपण तोडता येणार नाही. कंपनी चालवायला मला त्यांची मदत लागेलच. मला ही कंपनी सोडायची नाही. माझा डॅडनी खूप कष्ट केले आहेत. शिवाय मी आयुष्यात चूल आणि मूल न करता काहीतरी करावं हे त्यांचं स्वप्न होतं. माझे काका मला दूर सारून सर्व कंपनी स्वतःकडे घ्यायला बघत आहेत. आय हॅव टू डू समथिंग"


निधीचा प्रॉब्लेम समजत होता, पण या सर्व झमालझोल्यामधे जिगरशी लग्न हा उपाय कसा काय बसत होता हे मला अजून उमगलं नव्हतं.



"जोई, जिगर आमच्याच जातीतला आहे. शिकलेला आहे, मुख्य म्हणजे इथलाच आहे. त्याच्याशी लग्न केल्यावर मला मुंबई सोडून जायची गरज नाही. त्याचा ग्राफिक डीझायनिंगचा बिझनेस आता कुठे सुरू होतोय. तो त्याच्या बिझनेसमधे आणि मी माझ्या बिझनेसमधे लक्ष देऊ शकतो.."


"निधी, तू एक विसरतीयेस. जिगर तुझ्यापेक्षा गरीब आहे, तुझा बंगला जुहूला आहे आणि त्याचा वन बीएचके फ्लॅट बोरीवलीला. तुझे काका या लग्नाला तयार होतील?"


"अरे यार, आधी जिगर तरी हो म्हणू दे. मग दोन्ही काका-काकी-दादा-दादी सर्वाना तयार करू, प्रेम विवाह आहे म्हटलं की थोडे नाराज वगैरे होतील, पण शेवटी ऐकावंच लागेल त्यांना, मुख्य प्रॉब्लेम जिगरला कसे विचारू हा आहे. आणि त्यासाठी तुझी मदत हवी आहे. प्लीज... तू माझ्यासाठी जिगरला विचारशील? त्याला सर्व काही सांगितलेस तरी चालेल. पण प्लीज त्याला या लग्नासाठी तयार कर. माझ्याकडे वेळ फार थोडा आहे. काकीने ऑलरेडी युएसमधले रिश्ते शोधायला सुरूवात केली आहे."


वेटर येऊन प्लेट्स घेऊन गेला. दुसर्‍या एका वेटरने डेझर्ट आणून ठेवले. मी आणि निधी शांतपणे त्या डेझर्टच्या प्लेटकडे बघत होतो. दोघीच्याही मनात कॅलरीचे पाढे चालू असणारच.


वेटर निघून गेल्यावर मी म्हटलं. "तूच का नाही विचारत सरळ त्याला? तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना?"


"एक्झॅक्टली. तो माझा फक्त मित्र आहे. अगदी नर्सरीमधे असल्यापासून आम्ही एकमेकाना ओळखतो. मैत्री आहे आमची. आणि एका दिवशी अचानक मी त्याला "जिगर माझ्याशी लग्न करशील का?" हे विचारू? कसं वाटेल ते? नको. त्यापेक्षा तू विचार."


"मग मी नक्की काय करू? त्याला जाऊन भेटू आणि म्हणू. "जिगर तू निधीशी लग्न कर. तिला तिची कंपनी चालवायची आहे." ते कसं वाटेल??"


"म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे की. तूच सजेस्ट कर आता पुढचा गेम प्लान"


"ओके. मी तुला एकदोन दिवसात फोन करते आणि मग सांगते. तू मात्र तुला व्यवस्थित सांभाळ, सर्व ठिक होइल." निधीला जर जिगरशी लग्न करायचं असेल तर माझ्याकडून होईतो मदत मी केली असती, माझ्याकडून किमान तेवढंच करून झालं असतं.

"होप सो" निधी म्हणाली.

लंचचे बिल मीच पेड केले. मॅगझिनमधे काम करण्याच्या अनंत फायद्यापैकी एक. माझ्या पब्लिकेशनने "बिझनेस मीटिंग" म्हणून मला पैसे रीईम्बर्स केले असते.


ऑफिसमधे परत आले तरी जिगर-निधी हा विषय डोक्यातून काही केल्या जात नव्हता. जिगरला आज रात्री फोन करायचा आणि उद्या परवा भेटायचे हे मनात ठरवलेच होते. पण भेटायला काहीतरी ठोस कारण हवे होते. त्याचा विचार करता करताच मी मेलबॉक्स चेक करत होते. काय करायचे ते नक्की ठरत नव्हते. जिगरला आधी दोन तीनदा नुसतं भेटून मग त्याच्याशी जरा ओळख अजून वाढवून मग एके दिवशी त्याला निधीबद्दल सांगावं असं मला वाटत होतं. जरी कॉलेजमधे त्याला भेटलेले असले तरी गेल्या दोन तीन वर्षात अजिबात भेटले नव्हते. असंच विचार करत करत मेलबॉक्समधले मेल चेक बघत होते. एक  अनपेक्षित मेल अचानक माझ्या नजरेला पडला, आता काम सोपं झालं होतं मी स्वत:शीच हसले. त्या मेलला लगोलग रीप्लाय केला. आता जिगरला फोन करण्यासाठी खास कारण हातात होते.


"हेलो. जुई बोलतेय" 


"कौन जुई?" पलिकडून पंचामृतासारखा गोडमिट्ट आणि हृदयाचे ठोके चुकवणारा आवाज आला.


मी एक सुस्कारा सोडला. कॉलेजच्या ग्रूपमधे आणि त्यामधून झालेल्या माझ्या सर्व ओळखीमधे माझे नामकरण जोई ट्रीबियानी असे झाले होते. तिथे जुई नावाने ओळखणारे कुणीच नव्हते. जिगर निधीचा मित्र असल्याने त्यालापण जुई माहितच नसणार. आणि ही गोष्ट जर फोन लावल्या लावल्या माझ्या लक्षात आली असती तर माझे नाव जोई ठेवायची कुणाला गरजच नसती..


"जोई, निधी की दोस्त" मी आवाज शक्य तितका प्रोफेशनल ठेवत म्हट्लं.

"ओह, कैसी हो?" यानंतर आमचं एकमेकाना 'तू मजेत मी मजेत' हे विचारून झालं. शेवटी मी ज्या विषयासाठी जिगरला फोन केला होता त्या विषयाबद्दल बोलायला सुरूवात केली. सायलीचा एक बॉलीवूडी फ्रेंड नविन टीव्ही सीरीयल काढत होता. त्या सीरीयलच्या व्हिज्युअल्ससाठी कुणाची तरी गरज होती. नविनच प्रोजेक्ट असल्याने "कमीतकमी पैशात काम" ही प्रमुख अट असणार. सायलीने हा मेल निधीलासुद्धा पाठवला होता. निधी आणि जिगरची फ्रेंडशिप लेव्हल लक्षात घेता निधीनेपण या विषयावर त्याला माहिती दिली असण्याची शक्यता होती.


तरीपण मी त्याला "तुला भेटायचं आहे कारण एक महत्त्वाचं काम आहे." हे सांगितलं. मात्र भेटण्यासाठी त्याने "मेरे ऑफिस आ जाओ" हे ऐकवलं तेव्हा मी बेशुद्ध पडता पडता राहिले. त्याचं ऑफिस बोरीवलीला होतं. एवढ्या लांब जाणं तेही पावसातून ट्रेन उशीरा असताना. त्यापेक्षा निधी जिगरचे लग्न लावणे सोपे काम वाटलं. शेवटी त्याला "नको नको तूच बांद्र्याला ये" हे विनवून सांगितलं.


लगोलग निधीला फोन केला आणि सायलीच्या या ईमेलबद्दल तू जिगरला काही बोलू नकोस हे ऐकवलं. तिचे आणि जिगरचे दिवसातून वीसेकवेळा बोलणं असतं असं तिनेच सांगितलं होतं. नशिबाने या विषयावर त्यांचं काही बोलणं झालं नव्हतं. जगाच्या गावगप्पा मारता येतात मग स्वतःच्या लग्नाचं बोलायला काय धाड भरते कुणास ठाऊक? मी सायलीला फोन केला आणि त्या बॉलीवूड मित्राला घेऊन संध्याकाळी बांद्र्यामधे बोलावलं.


हे सर्व करून झाल्यावर मनात पुन्हा एकदा विचार आलाच, "हे सर्व का करतेय मी? मीच हे करायची काही गरज आहे का?"

मी जिगरला फार व्यवस्थित ओळखत नव्हते. निधीचा हँडसम मित्र इतकीच ओळख. तीही कॉलेजपुरतीच. कॉलेज संपल्यावर त्याला फार तर एक दोनदा भेटले असेन. त्यामुळे आता लगेच भेटल्या भेटल्या लगेच "तू निधीशी लग्न कर" असं आचरटासारखं बोलणं अगदीच विचित्र दिसलं असतं. म्हणून आधी तीनचारदा त्याला काहीतरी कामानिमित्त भेटावं आणि नंतर हळूहळू "तुझं निधीवर प्रेम आहे" असं त्याचं ब्रेनवॉशिंग करावं प्लान डोक्यात तयार होता. 


निधीने आधीच जिगरची "सध्या" कुणीही गर्लफ्रेन्ड नाही हे मला सांगितलं होतं. यातला सध्या शब्द महत्त्वाचा. ती व्हेकन्सी भरून येण्याआधी मला तिथे निधीचा वशिला लावायचा होता.


संध्याकाळी ऑफिसमधून लवकरच निघून मी बांद्र्याला गेले. सायली आणि तिचा मित्र आयुष्मान (याचे आडनाव भव असेल का?) अर्ध्या तासात येणार होते. तितक्यात जिगर बाईकवरून उतरताना दिसला.


काही काही माणसं अशी असतात की त्याना बघितल्याबरोबर तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. अशांपैकी एक जिगर होता. फॅशनविश्वाशी संबंधित असल्याने तथाकथित हँडसम हंक्स रोज बघायचेच. पण जवळ जवळ सहा फुटाची उंची, शांपूच्या अ‍ॅडमधे दाखवतात तसे सरळ आणि सिल्की केस, पिंगट डोळे. आणि चेहर्‍याच्या मानानं छोटंसं पण सुंदर नाक. जिममधे पैसे घालवून मिळवलेली बॉडी आणि पांढरा शर्ट आणि निळी जीन्स. या सगळ्या हॉटपणाला छेदणारा डोळ्यावरचा सोनेरी चष्मा. बॉय नेक्स्ट डोअर. निधीच्या "डिवा इमेजपेक्षा" याची अगदी उलट याची इमेज. जिगरला बघितलं की माझ्या हृदयात धकधक सुरू व्हायचं अगदी कॉलेजात त्याला पहिल्यांदा बघितल्यापासून.



"हाय, कैसी हो?"  तोच गोडमिट्ट आवाज. फोनपेक्षा प्रत्यक्षात ऐकताना तर अजूनच.

"मी ठिक." काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेले. सायली येईपर्यंत आम्ही कॉफीची ऑर्डर दिली आणि उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो.

"निधी कशी आहे?" मी उगाचच विषय काढायचा म्हणून विचारलं.

"मी परवाच एकदा भेटलो होतो तिला. बिचारी टेन्शनमधे आहे. आधीच तिचे पपा गेले. खूप वाईट झालं त्यात परत तिच्या त्या काकानी वैत्ताग आणलाय. लग्नासाठी."


"ओह, म्हणजे नक्की काय ते मला समजलं नाही" मी मुद्दाम काही माहित नसल्यासारखं बोलले.

मग जिगरने सकाळी निधीने मला ऐकवलेली टेप परत ऐकवली. अर्थात निधीचा तो महाभयानक लग्नाचा प्लान सोडून.

"मग तुला काय वाटतं? तिने काय करायला हवं?" पाहुण्याच्या चपलेने विंचू मारून बघू या.


"मला वाटतं तिने सरळ लग्न करावं. आय मीन, बिझनेस वगैरे सर्व ठिक आहे. पण कधीनाकधी तिला लग्न करावंच लागेल ना? मग आताच का नको? बिझनेसमधली समझबूझ असणारा मुलगा बघायला हवा तिने. कारण लग्नासाठी बिझनेस सोडणं पण मला पटत नाही. त्याचसोबत तिच्यावर भरपूर प्रेम करणारा पण हवा. आफ्टर ऑल, प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. " त्याने हे बोलून झाल्यावर एक क्षणभर विचार केला आणि अचानक मला म्हणाला. "जोई, तुझ्या आयुष्यात कुणी स्पेशल आहे का?"  



मी काहीतरी बोलायला हवं होतं. पण नाही बोलू शकले. गरम गरम कॉफी एकदम प्यायली की जीभ असली भाजते. बोलायला काहीच सुचत नाही, दोन तीन सेकंद मी अशीच त्याच्याकडे बघत होते..
शेवटी तोच म्हणाला, "आय मीन, तुला राग नाही ना आला?"


"छे छे!!!" जमलं एकदाचं बोलायला... "त्यात रागावण्यासारखं काय? सध्या माझ्या आयुष्यात कुणीच स्पेशल नाही. असण्याची सुतराम शक्यतापण नाही. कामात इतकी बिझी आहे की विचारू नकोस"

"सेम हीअर"

तेवढ्यात सायली आणि तिचा तो आयुष्मान आले. थोड्याफार कामाच्या गप्पा झाल्या. बहुतेक जिगरला हे काम मिळेल असे वाटत होते. पण पूर्ण मीटिंग संपेपर्यंत मी थांबले नाही. कारण पाऊस परत सुरू झाला होता. हार्बर लाईन सकाळपासून चालू होती. त्यामुळे आता ती कधीही बंद पडली असती. आणि बंद पडल्यावर चालू व्हायला किती वेळ लागला असता कुणास ठाऊक. ट्रेन्स बंद झाल्या तर बांद्यावरून माझगांवला येणं मुश्किलच होतं. मी घरी आले तेव्हा जवळ जवळ आठ वाजून गेले होते. जिगरला भेटल्यामुळे सातव्या आसमानात वगैरे तर होतेच मी.


घरी आल्यावर लगेच निधीला फोन केला. म्हटलं काय घडलं ते तिला सांगू या.

निधीने फोन उचललाच नाही. त्यानंतर दोन तीनदा फोन केला तरी तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. मधेच एक दोन एस एम एस जिगरचे आले होते. व्यवस्थित पोचलीस का वगैरे.  सायलीने "लक्की यु" असा मेसेज पाठवला. ती संध्याकाळच्या पावसात अडकली असावी बहुतेक असं मला वाटलं... पण तसं नव्हतं.


शेवटी अकरा वाजता निधीचा फोन आला. तिचा आवाज एकतर खूप रडल्यासारखा होता किंवा खूप चिडल्यासारखा.

"जोई. काय केलंस तू?" हे एकच वाक्य दोन तीनदा म्हणाली तेव्हा वाटलं हिने काय दारू वगैरे प्यायली आहे की काय...

"निधी, तू काय बोलतेस ते समजत नाहीये? नीट सांग"

"नीट काय सांगू? जिगरचा मेसेज आलाय. थांब तुला फॉरवर्ड करते" इतके म्हणून तिने फोन कट केला.


दोन मिनीटानी निधीकडून एक फॉरवर्डेड मेसेज आला.

"निधी, आय लाइक युअर फ्रेंड जोई. उससे बात आगे बढाने के लिये मेरी कुछ मदद करोगी क्या?"



माझ्या हातातून फोन खाली पडला. जिगर लाईक्स मी? दॅट हँडसम बॉय लाईक्स मी? उड्या मारायच्याच शिल्लक होत्या माझ्याकडून. मोबाईल हातात घेऊन तो मेसेज दोन तीनदा परत मोठ्याने वाचला.
अणि नंतर पाच मिनिटांनी भानावर आले. वस्तुस्थिती काय आहे ते लक्षात आलं आणि जिगरचा मनापासून राग आला. हा चक्क मूर्खपणाचा कळस होता. या जिगरला जरा तरी अक्कल हवी होती की नाही?

मी निधीसाठी त्याच्याकडे सेटिंग लावत होते आणि हा माझ्याकडे बात आगे करायला बघत होता. की याच्याशी बोलताना माझ्याकडूनच  काही गडबड झाली का? मी त्याच्यामधे इंटरेस्टेड असेन असं त्याला का वाटलं असेल? माझ्यातर्फे  मी काही चुकीचे बोलले होते का? मनातल्या मनात त्याच्या आणि माझ्या भेटीचे सर्व संवाद मी आठवून पाहिले. पण तसं काही जाणवलं तर नाही. पण एकूणातच सगळाच घोळ झाला होता.


मी खुर्चीवरून उठले आणि रूमचे लाईट बंद केले. झोप तर येतच नव्हती. आज दिवसभर माझा अक्षरशः रोलरकोस्टर झाला होता. निधीला दुपारी भेटले तेव्हा तिने हा लग्नासाठीचा बॉम्ब टाकला. बॉम्ब नव्हे माझ्यासाठी तर परमाणूबॉम्ब होता. तो धक्का सहन करून जिगरला भेटायला गेले तर जिगरने हा दुसरा बॉम्ब टाकलेला.
 मी सध्या स्वतःवरतीच खूप  चिडले होते. खरंतर काहीच गरज नव्हती. पण मी चिडले होते हे मात्र खरं. याआधी किती वेळ जिगरला भेटले असेन. कितीवेळा बोलले असेन. पण तेव्हा त्याला माझ्या मनात काय आहे ते अजिबात समजू दिलं नव्हतं. आज असं नेमकं काय झालं की इतक्या वर्षानी जिगरला मी आवडले. मी काय रूपसुंदरी नव्हे की हॉट चिक नव्हे. निधीच्या बाजूला मी म्हणजे करीना कपूरच्या बाजूला कंगना रानावत. ती कंगना जरातरी परवडली, मी म्हणजे, जाऊ दे आता आत्मनिर्भत्सना तरी किती करायची? या जिगरला  कॉलेजमधे असताना किंवा त्यानंतर कधी मी दिसले नव्हते? मग आजच का?



मला निधीला जाणूनबुजून काय अजाणतेपणी पण दुखवायचे नव्हते. नुकतीच ती तिच्या वडलांच्या निधनातून सावरत होती. त्यानंतर बिझनेसचे टेन्शन. त्यातून आता हे? असलं प्रकरण.


  जिगरने हाच मेसेज जर आधी पाठवला असता तर... कदाचित निधीने लग्नासाठी जिगरचा विचार केला नसता, कदाचित माझ्या आयुष्यामधे जिगर आला असता... पण आता या जर तरला काहीच अर्थ नव्हता. निधीला जिगरशी लग्न करायचे होते. प्रेम्-अफेअर्-भानगड नव्हे. लग्न. शेवटचा शिक्का मोर्तब. आणि मी निधीला पुरेपूर ओळखून होते. तिच्या मनात एकदा एखादी गोष्ट बसली की ती काही केल्या स्वस्थ बसण्यातली नव्हती. तिच्यासाठी जिगरशी लग्न हा कंपनीसाठी आणि नातेवाईकांना कटवण्यासाठी योग्य निर्णय होता, कुणी कितीही मनवलं तरी ती बधली नसती.


आणि का बरे तिला कुणा मनवावे? जिगर तिचा बेस्ट फ्रेंड होता. माझा नव्हे. जिगर आणि निधी एकमेकासोबत आयुष्य घालवू शकत होते. निधीला तिच्या बिझनेसच्या दृष्टीने पण हा सौदा अति फायद्याचा होता. शिवाय जिगरच्या मनात निधीबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असणारच. मी म्हणजे जिगरसाठी सध्याचा एक टाईमपास असणार. नक्कीच.


सगळं आयुष्य म्हणजे टिपिकल बॉलीवूड लव्ह ट्रँगल झाल्यासारखंच.
तेवढ्यात मोबाईल पुन्हा वाजला.  

निधीचा एसेमेस. "सॉरी". मी पण तिला "आय अ‍ॅम अल्सो सॉरी. कल बात करेंगे" असा मेसेज पाठवून टाकला. बिचारी, तिची तरी यामधे काय चूक? जिगर आणि त्याच्या या सर्व गर्लफ्रेंड्स हे सगळं निधीला आधीपासून माहित होतं की. त्यात नवीन काय? जिगर किती मोठा चालू आहे हे तिनेच मला कितीदातरी सांगित्लं होतं. तरी आता त्याच जिगरशी ती लग्नाचा विचार करत होती. बिझनेससाठी.... 



झोप तर येतच नव्हती. बेडवर नुसती बसून होते. डोक्यात विचारचक्र चालू होतेच. अचानक दिवा पेटला. रूममधला नव्हे. डोक्यातला. ही एवढी साधीसरळ गोष्ट माझ्या डोक्यात का आली नाही? मी डोक्यात इतकी राख का घालून घेत होते. जिगर मुळातच भानगडीबाज होता. त्याला मी आवडले काय, आणि सायली आवडली काय दोन्ही सारखंच. पण निधीच्या बाबतीत इतकी छोटी आणि महत्त्वाची बाब माझ्या नजरेत का आली नाही हे समजलं नाही. शेवटी एकदा "धिक्कार हो तुम्हारी दोस्तीका" असं मीच स्वतःला ऐकवलं. या सर्व प्रकरणाचा काय छडा लावून निकाल लावायचा हे मनाशी पाच मिनीटात ठरवून पण टाकलं. त्यानंतर निवांत झोपून गेले.

सकाळी उठले तर पावसाचा नामोनिशाण नव्हता. मलापण मनावरचं मळभ दूर झाल्यासारखं वाटत होतं. टीव्हीवरती चॅनलवाला ओरडून ओरडून पाणी कुठेकुठे भरले आहे ते सांगत होता.

शांतपणे ब्रेकफास्ट उरकला आणि निधीला फोन केला.

"निधी, काल रात्री..."

"जोई, आय अ‍ॅम सॉरी, खरंच. मी तुला असं काही म्हणायला नको हवं होतं. जिगरचा स्वभाव मला माहित आहे. तुझी यामधे काहीच चूक नसणार."

बरोबरे, जिगरला मी आवडले यात माझी काहीच्च चूक नाही, त्याला आवडले नसते तरी काहीच्च चूक नव्हतं... पण हे निधीला बोलून काय उपयोग?


"ते सर्व जाऊ दे. एवढी पण काही मोठी गोष्ट नाही. साधं त्याने "मी आवडते" एवढंच म्हटलय ना. लग्नाची मागणी नाही घातलीये. आपण दोघी काल यावर ओव्हर रीअ‍ॅक्ट झालो"


"हो म्हणून तर...सॉरी.. "


"हे बघ ते बाकीचं सर्व राहू दे. आता शांतपणे ऐक. मी काय सांगतेय ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातलं काहीही जिगरला सांगू नकोस"

"ओके"

मी बोलत असेपर्यंत ती शांतपणे ऐकत राहिली. माझे म्हणणे तिला पूर्णपणे पटले असेल किंवा कदाचित नसेल. पण ती मला काहीच म्हणाली नाही.


फोन झाल्यावर मी ऑफिसची तयारी करायला लागले. तितक्यात मेसेज आला. जिगरचा मेसेज.


"आज मी टाऊनमधे आहे. आपण आज दुपारी लंचला भेटू या का?" अर्थात, आजच मला तुला भेटायचंच आहे रे बाबा. मी घराबाहेर पडून टॅक्सी केली आणि जिगरला मेसेज पाठवला. सिल्क रूट. दोन वाजता. जिगरचं अगदी आवडतं रेस्टॉरंट. निधीने मला सांगितलं होतं. त्याने स्वतःहून लंचला भेटायचं ठरवल्याने एक काम चांगलं झालं होतं. मला त्याला भेटण्यासाठी बोलवावं लागणार नव्हतं.


रात्रीपासून पाऊस जरा कमी झाला होता. मी घरातून बाहेर पडले तेव्हा जरासा रिपरिपत होता. म्हणजे अजूनच वैताग. या पावसाचं एक असत, जेव्हा मुसळधर कोसळत असतो  त्यावेळेला भिजत जायला काही वाटत नाही. असा रिपरिपत असला की अगदी नकोसा वाटतो.


काल दिवसभर ऑफिस अगदी निवांत होतं. आज मात्र सर्वांना अंगात आल्यासारखं काम करायचं होतं. बॉसने मला खंडीभर फोटो सॉर्टिंगसाठी दिले. नजर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असली तरी मनामधे निधीचे आणि जिगरचेच विचार चालू होते. मी काय बोलणार कसं बोलणार याची मनातल्या मनात उजळणी करत होते. शाळेत असताना भाषण पाठ करायचे अगदी तशीच. डोक्यात फारच घोळ व्हायला लागला तसं सगळं कागदावर लिहून काढलं. आणि मग तो कागद वाचत बसले. मधेच एकदा रेस्टॉरंटला फोन करून रीझर्वेशन कन्फर्म करून घेतलं.


या नादामधे एक कधी वाजला ते समजलंच नाही. निधीचा कॉल आला तेव्हा एकदम आठवलं. मग लगेच सगळं काम आवरलं.  बॉसला काहीतरी गुळमुळीत कारण सांगितलं आणि लंचला बाहेर पडले. घड्याळात पाहिलं तेव्हा दीड वाजला होता. पाऊस अजिबात नव्हता त्यामुळे टॅक्सी पकडायच्या ऐवजी मस्त चालत जावंसं वाटलं.
रेस्टॉरंटला

पोचले तेव्हा जिगर दरवाज्यातच माझी वाट बघत होता.

त्याला बघितल्या बघितल्या मी काय बोलणार होते इत्यादि विसरूनच गेले. माझं हे असंच होतं कायम. त्यातून जिगरला बघितल्यावर तर..
.
असो. टेबलवर बसलो तेव्हा जिगर म्हणाला.

"जोई, तुला कॉलेजमधे बघितलं होतं तेव्हापासून आतापर्यंत तू जराही बदलली नाहीस"


काय वाट्टेल तो अर्थ घ्या या वाक्याचा. तू आधीसारखीच स्मार्ट आहेस, हुशार आहेस, सडपातळ आहेस, किंवा बावळट आहेस. कसाही अर्थ घ्या. उगाच बोलायचं म्हणून बोलायची जी वाक्य अस्तात त्यापैकी हे एक वाक्य.


मी नुसतीच हसले. मनातल्या मनात मघाशी लिहून ठेवलेला कागद डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात नजरेसमोर जिगर असताना अजून काही आठवणार कसं?


वेटर ऑर्डर घेण्यासाठी समंधासारखा फिरत होता. जिगरला ऑर्डर द्यायला सांगितली. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. "जाने कहा मेरा जिगर गया जी"


समोर बसलेला जिगर हसला. "माय फेवरेट सॉंग" मी कसंबसं पुटपुटले. सकाळी मोबाईलची रिंग टोन बदलायचीच असं ठरवलं होतं तरी विसरले. उगाच नाही माझं नाव जोई पडलं.


निधीचा फोन होता. तिला अगदी एक दोन शब्दांत काहीतरी सांगून मी फोन ठेवला. जिगरने ऑर्डर दिली होती.


"जोई, मी काल दुपारपासून फक्त तुझाच विचार करतोय." जिगर माझ्या डोळ्यात (खरंतर लेन्समधे पण असो) बघत म्हणाला.


विषय भलतीकडे जायच्या आत मला माझं म्हणणं मांडायला हवं होतं.


"जिगर. एक मिनिट थांब. तुला काय म्हणायचं आहे ते मला माहित आहे. पण आज आपण भेटण्याचा उद्देश वेगळा आहे,"


जिगरच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसले


"निधी. जिगर, मी इथे निधीसंदर्भात बोलायला आले. काही बोलायच्या आधी मी जे सांगते ते नीट ऐक. जिगर, मला तुझ्यामधे काहीही इंटरेस्ट नाही. कारण, अगदी कॉलेजमधे असल्यापासून मला एक गोष्ट माहित आहे" खोटं बोलण्यासाठी कुणी ऑस्कर देणार असेल तर माझे नॉमिनेशन पाठवून टाका प्लीज.


"जोई, निधी तुला काही म्हणाली का? आय मीन.. मला तसं..."


"हे बघ जिगर, आधी मी बोलतेय ते ऐकून घे. निधीचे वडील अचानक गेले. तिच्यावर किती मोठी जबाबदारी येऊन पडली आहे ते स॑र्व तुला माहित आहे. मी परत तुला ते सांगत बसत नाही. पण मला एक सांग. तू निधीला किती दिवसांपासून ओळखतोस?"


"दिवसांपासून? जोई, मला माझ्या आयुष्यातला एकही असा दिवस आठवत नाही जेव्हा निधी माझ्या लाईफमधे नव्हती."


"आणि तरीदेखील ती तुझी "गर्लफ्रेंड"  होती का? " इथे गर्लफ्रेंड म्हणताना मीपण बर्‍याचदा मॉडेल्स करत असतात तसे कोट्स चे हातवारे केले. नंतर वाटलं उगाच!!! अगदी विचित्र दिसतं ते. आपल्याच डोक्यावर शिंगं काढल्यागत.


"काहीतरीच काय तुझं?" जिगर अगदी वैतागून म्हणाला. "निधी माझी फ्रेंड आहे. तिच्याबाबतीत मी असं कधी.. " त्याआधीच मी माझं बोलणं सुरू केलं.


"का नाही? जिगर, तू तिला इतक्या दिवसापासून ओळखतोस.. ती तुला ओळखते. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर का खुश राहू शकत नाही. आय मीन, तुमच्या लग्नामुळे किती तरी प्रॉब्लेम.."



जिगरचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला.

 
"लग्न? लग्नाबद्दल कोण बोलतय?" तो जवळजवळ किंचाळलाच. आजूबाजूची सर्व माणसं आमच्याकडे वळून बघायला लागली.


अरे देवा!! कुठे गेला तो कागद? त्याच्यावर मी कसं अगदी हळूवारपणे जिगरला सर्व समजवायचं, त्याच्या मनामधे निधीबद्दल प्रेम आहे हे त्यालाच पटवून द्यायचं, मग लग्नाविषयी बोलायचं  असं ठरवून ठेवलं होतं. सगळ्यावरती अक्षरश:.. सांगितलं ना, माझं हे कायम असंच होतं म्हणून. पण आता प्रसंग सावरायला हवा होता. अजून पंधरा मिनिटानी  निधी आली असती. तोपर्यंत तरी बाजी मारत रहायला हवं होतं.


"हे बघ, जिगर, निधीला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तिच्या मते, आयुष्यामधे तिला तुझ्याइतकं समजून घेणारा दुसरं कोणी नाही... " इथून पुढे मला माझ्या भाषणची लिंक मिळाली. "निधी तुझी फक्त मैत्रीण नाही. ती मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करते. फक्त हे प्रेम आहे हे तिला नुकतंच उमगलय."


"पण जोई, माझं तिच्यावर प्रेम नाही." जिगर अगदी शांतपणे म्हणाला.


"असं तुला वाटतं. पण कधीतरी स्वतःलाच विचार. जिगर, तासनतास तिच्याशी फोनवर बोलत असतोस. तिच्या प्रत्येक सुख दु:खामधे तू तिच्यासोबत असतोस. जगामधे तुला सर्वात जास्त काळजी तिची. हे प्रेम नाहीतर काय आहे?"


"जोई, याला मैत्रीसुद्धा म्हणता येइल ना? प्रेम आणि मैत्रीमधे फरक आहे."


"आहे ना... नक्कीच फरक आहे. प्रेमाची सुरूवात कधीही मैत्रीपासूनच होते. आणि जिगर निधी सारख्यांच्या मैत्रीचा शेवट हा प्रेमामधेच होतो. किंबहुना तो व्हायला हवा. आयुष्याचा जोडीदार निवडणे हे फार सोपे काम नाही. त्यातून आयुष्याचा योग्य जोडीदार निवडणे हे तर अजूनच कठीण. निधी आणि तू नशीबवान आहात आपलं आयुष्य कुणाबरोबर काढायचं हे एकदा ठरवून मग नात्याला सुरूवात केली की नुसतीच नाटकं होतात. तू निधीला आणि निशी तुला या मुखवट्याच्या पलिकडे एकमेकाना ओळखता."



"पण जोई, लग्नासारखा मोठा निर्णय प्रेम वगैरे.."


"काय असतो रे लग्नाचा मोठा निर्णय? आज ना उद्या तुला घ्यावाच लागेल. निधीला तर तिच्या काका लोकांमुळे सहासात महिन्यात लग्न करावे लागेल. तेव्हा हे असे निर्णय घेण्यासाठी वाट बघत बसणार आहात का? जिगर, कधीतरी निधी दुसर्‍या कुणाची झाली, तुझ्यापासून दूर गेली तर.. हा विचार करून बघितला आहेस?"


जिगरच्या चेहर्‍यावर॑चे रंग उडत जात होते. मी पण काही न बोलता गप्प बसून राहिले. वेटर येऊन काहीबाही टेबलावर ठेवून गेला.


"जोई, पण निधी माझ्यावर प्रेम करते. हे तिने मला का नाही सांगितलं?"


"कदाचित तिला भिती वाटली असेल किंवा तिला असं वाटलं असेल की तू नकार देशील. काहीही कारण असलं तरी निधीचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे. आणि मला असं मनापासून वाटतय की तुम्ही दोघं सुखाने एकत्र रहाल"


"सुखाने एकत्र रहायचा प्रश्न नाही जोई, निधीची आणि माझी अवस्था माहित आहे ना तुला? ती किती श्रीमंत आणि मी बोरीवलीत राहणारा.. हे लग्न कसं होइल?"


मला अत्यानंदाने टेबलवर चढून उड्या मारावाश्या वाटत होत्या. मिशन फत्ते झालं होतं. किमान जिगर "लग्न कसे होइल?" या प्रश्नापर्यंत आला होता. माझे काम निम्म्याने झाले होते. मुळात मला काल रात्रीपासून वाटत होतं तेच खरं होतं. निधी आणि जिगर एकमेकांवर प्रेम करत होते. पण त्याची त्यांना स्वतःलाच खबरबात नव्हती. माझं नशीब थोर म्हणून या असल्या टिपिकल बॉलीवूड लव्ह स्टोरीमधे मी तिसरा कोन म्हणून होते. या तिसर्‍या कोनाच्या मनात काय आहे ते मात्र या दोघांना माहितच नव्हतं, आता सांगूनदेखील उपयोग नव्हता.



"हे बघ जिगर, त्या सर्वाचा विचार तू आणि मी करून उपयोग नाही. तू निधीसोबत याची चर्चा कर. मी यापुढे यामधे काहीच बोलू शकणार नाही."


"जोई, हे सर्व फारच फास्ट घडतेय, आय मीन, मला काहीच समजत नाही"


"घाबरू नकोस." मी पुढे काही बोलणार तेवढ्यात निधी आमच्या टेबलजवळ आली. तिच्या चेहर्‍यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
मला मात्र आता कसलंच टेन्शन राहिलं नव्हतं. "जिगर, निधी, तुम्ही दोघांनी आता तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. माझं काम फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमाची ओळख करून देणे इतकंच होतं."
निधीच्या चेहर्‍यावर आता मात्र अचानक आश्चर्य उमटलं.


"हो निधी. तुम्हाला दोघांना अजून कदाचित समजलं नाही. मला मात्र समजलं. तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. फक्त इतके दिवस तुम्ही या प्रेमाला मैत्री समजताय. निधी बिझनेससाठी तुझ्या मनात जिगरशीच लग्न करायचा विचार आला तेव्हाच खरंतर तुलापण समजायला हवं होतं. पण नाही लक्षात आलं. हरकत नाही. कधीकधी आपलं प्रेम एखाद्या व्यक्तीवर आहे हे समजायला एखादा क्षण पुरेसा असतो आणि कधीकधी आयुष्यभराची असलेली संगत असूनसुद्धा आपल्या मनामधे काय आहे ते समोरच्याला ठाऊक नसतं. "



निधी हसली. "जोई, मला खरंच माहित नाही.. मी काय बोलू?"

"काही बोलू नकोस. तू आणि जिगर खुश रहा एवढीच इच्छा. आता मी निघते. "

निधी आणि जिगरने काही बोलायच्या आत मी तिथून उठले आणि बाहेर पडले.


जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. निधी आणि जिगर दोघं मेड फॉर ईच अदर होते, अशीच मनाची समजूत घालत टॅक्सीत बसले. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झाला होता. टॅक्सीवाल्याला ऑफिसचा पत्ता सांगितला आणि लगेच मोबाईल उघडून माझी रिंग टोन चेंज केली.  "जाने कहा मेरा जिगर गया जी" गेली पाच वर्षे माझी रिंगटोन होती. जिगरला कॉलेजमधे पहिल्यांदा भेटले त्या दिवसापासून.... इतक्या दिवसानंतर आजच बदलली.  "रूलाके गया सपना मेरा....."




(समाप्त)