Wednesday, 22 May 2013

त्रिकोणाचे तीन कोन

ऑफिसमधे येऊन अर्धा तास पण झाला नव्हता पण कंटाळा शुक्रवार संध्याकाळ इतका आला होता. जुलैचा महिना त्यात बाहेर तूफान पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेन उशीरा धावत होत्या. मध्य रेल्वे तर कधीही बंद पाडायच्या मार्गावर होती. आज ऑफिस अगदी सुनसान होते. सीक्युरीटी गार्ड बसल्याबसल्या चक्क पेंगत होता. बहुधा ऑफिसमधे मीच एकटी वेळेत आले होते. दुसरे कुणीच दिसेना. मेलबॉक्स चेक करून बघितला तर काही नविन मेल नव्हतं. मग उगाच फेसबूक वगैरे उघडून बसले. पण वेळ जाता जात नव्हता. तसं आजच्या दिवसाभराच्या कामाचं माझं काहीच जास्त टारगेट नव्हतं.  माझा बॉस ठाण्याला रहायला होता, इतका मुसळधार पाऊस बघता आज बहुतेक त्याने सुट्टीच टाकली असावी. त्याला फोन ट्राय केला तर पठ्ठ्याने तो बंद ठेवला होता.


कुणीच दिसेना तेव्हा वाटलं, आयला सर्वानी संगनमत करून सुट्टी घेतलीये की काय. पण हळूहळू दुसर्‍या डीपार्टमेंटमधे पण माझ्यासारखे काही एकांडे शिलेदार आलेले दिसले. शेवटी वैतागून कॅन्टीनमधे जाऊन बसले. सुदैवाने कँटीनवाला हजर होता. एका कॉफीची ऑर्डर दिली. तेवढ्यात मोबाईल वाजला म्हणून बघितला तर चक्क पाच एसेमेस. बहुतेक स्टाफ रजेवर गेला होता, आणि ते कळवण्याचं पुण्यकर्म मात्र केलं होतं. पण त्यामधे एक मेसेज निधीचा पण होता. आज हिला कशी काय आठवण आली म्हणून बघितलं तर कॉल मी इतकाच तुटक मेसेज.


तसं मला काम काहीच नसल्याने मी लगेच तिला फोन लावला. निधी माझी कॉलेजमैत्रीण. फॅशन डीझायनिंगच्या एका कोर्सला आम्ही एकत्र होतो. तसा आमचा फार् मोठा ग्रूप होता, पण मी,निधी, गझल आणि सायली अशा आम्ही एकदम घट्ट मैत्रीणी होतो. कॉलेज संपलं आणि आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. मी फॅशन डीझायनिंगनंतर अजून एक दोन कोर्स केले आणि एका मासिकामधे फॅशन रीपोर्टर म्हणून काम सुरू केलं. गझल लग्न करून लंडनला गेली. सायली बॉलिवूडमधे छोट्यामोठ्या असाईनमेंट्स करत होती. निधीला काही करण्याची गरजच नव्हती. तिच्या वडलांची रेडीमेड कपड्यान्ची मोठी फॅक्टरी होती. ती एकुलती एक मुलगी. जुहूला बंगला होता. आलिशान गाड्या होत्या. निधी आमच्या ग्रूपची राजकुमारी होती.


रिन्ग पूर्ण वाजली तरी निधीने फोन उचलला नाही. बहुतेक ती काही कामामधे बिझी असेल असा विचार करून मी माझ्या डेस्कवर परत आले. निधीचे वडील मागच्याच महिन्यामधे वारले होते. अगदी अचानक हार्ट अ‍ॅटॅकचे निमित्त होऊन. निधी सध्या घरच्या बिझीनेसमधे लक्ष घालायचं ठरवत होती.  तसे तिचे दोन काका होतेच पण तरी आता तिला वडलानंतर कंपनीमधे लक्ष घालणे जरूरीचे आहे, असे मागच्या वेळेला एकदा फोनवर म्हणाली होती. हल्ली आमचं बरंचसं बोलणं एक तर चॅटवरती व्हायचं नाहीतर फोनवर. माझ्या ऑफिसपासून तिचं ऑफिस अगदी चालत जायच्या अंतरावर होतं.


डेस्कवर बसून या महिन्याच्या एका रीपोर्टवर नजर टाकत होते, तितक्यात मोबाईल वाजला. रफीच्या अगदी खोडकर आवाजातलं गाणं.. 'जाने कहा मेरा जिगर गया जी'. ही रिंगटोन अगदी सुरूवातीला मोबाईलवर घेतली तेव्हा तर पूर्ण रिंग वाजली तरी मी फोन घ्यायचेच नाही. आता मात्र लगेच उचलला.  निधीचाच फोन होता. दोघीच्या कामाच्या वेळा बघून  आज दुपारी एक वाजता लंचला कॉपर चिमनीमधे भेटायचं ठरलं.


मी ओके म्हणून उत्तर पाठवलं. एरवी कधीतरी नंतर बघूया म्हणून ठेवलेले फोल्डर्स काढले आणि थोडंफार वाचन करत बसले. दहानंतर पाऊस जरा कमी झाला आणि ऑफिसमधले एक एक तारे उगवायला लागले. तरी पावसाची मरगळ असल्याने सर्व काम कसं अगदी हळूहळू चालू होतं. साडेबाराला पीसी बंद केला आणि मी टॅक्सी पकडली. मी हॉटेलमधे पोचले तरी निधीचा पत्ता नव्हता.
तिला फोन करत होते इतक्यात तिची हाक ऐकू आली.


"जोई, इधर देख" मी वळून बघितलं. निधी माझ्याचकडे येत होती. गेल्या महिन्याभरात कितीतरी बदलली होती. पूर्वीची निधी म्हणजे ट्रेंडसेटर होती. तिला जे आवडेल ते ती घालायची. अगदी हिल रोड किंवा कुलाबा कॉजवेवरची अ‍ॅक्सेसरी ती परफेक्टली कॅरी करायची, तेही एखाद्या परदेशी ब्रँडसोबत. ती कुठल्याच ब्रँडची भक्त नव्हती आणि मिक्सअ‍ॅन्मॅच तिच्या इतकं परफेक्ट कुणालाच जमायचे नाही. तिच्याइतकी चपखल नजर कुणाचीच नव्हती. निधी फॅशन डिझायनिंगमधेच राहिली असती तर आतापर्यंत कितीतरी पुढे गेली असती. निधी वडलांच्या कंपनीमधे डीझायनिंग करत होती. पण ते काम म्हणजे काही क्रीएटीव्ह काम थोडीच.


आताची ही निधी मात्र डोक्यापासून पायापर्यंत कॉर्पोरेट वाटत होती. फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, सोबत एक बॅग. राल्फ लॉरें, लुई व्हितों आणि बरबेरी- मी फॅशन रीपोर्टरच्या कौशल्याने सर्वच ब्रँड्स ओळखले. तिच्या पिंगट केसांचा पोनीटेल बांधला होता. हातामधे महागडा भलामोठा सेलफोन. हलकासा पण जाणवणारा मेकप. आणि करड्या रंगाच्या काँटॅक्ट लेन्स.


"हेलो." मी हसत म्हटलं. निधीच्या समोर मी म्हणजे गबाळशिरोमणी. फॅशनजगताशी इतका जवळचा संबंध असूनपण मी अजून सुधरले नव्हते. जीन्स कुडता आणि मोकळे सोडलेले कुरळे केस हेच माझं जागतिक स्वरूप होतं. निधी माझ्या टेबलवर येऊन बसली.


"काय ऑर्डर केलंस?" तिने मेनू वाचत विचारलं. मी फक्त स्टार्टर्सची ऑर्डर दिली होती, निधीने पुढची ऑर्डर दिली. वेटर निघून गेल्यावर थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग अचानक निधी मला म्हणाली.


"तुला खास कामासाठी बोलावलं आहे, जोई. आता मी जे तुला सांगणार आहे ते तू कुणालाही चुकूनसुद्धा बोलू नकोस."

निधीचं इतकं काय खास काम असावं माझ्याकडे?

"हे बघ निधी. आपण एकमेकीना चार पाच वर्षे ओळखतो. जे काही असेल ते बिन्धास्त सांग. माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करेनच."

"ते माहित आहे मला, म्हणून तर मुद्दाम हे काम मी फक्त तुला सांगणार आहे."

वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. खाण्यामधे निधीचे लक्षच नव्हते.प्लेटमधले सॅलड नुसते चिवडत होती. तिला नक्की काय सांगायचे आहे मी याचा अंदाज बांधत होते. काहीतरी बिझनेस रीलेटेड असे वाटत होते.


"जोई.... मला जिगरशी लग्न करायचं आहे." निधीने शेवटी हा बॉम्ब टाकला. मी जवळ जवळ उडालेच. माझ्या हातातला चमचा खालीच पडला. पण अर्थात ही काही तशी ब्रेकिंग न्युज नव्हती. जिगर निधीचा लहानपणापासूनचा मित्र. मित्र म्हणण्यापेक्षा काहीतरी अतिदूरचा नातेवाईक होता. कॉलेजमधे असताना आम्ही त्याला कित्येकदा भेटलो होतो. पण तेव्हा कधी जिगर आणि निधी कपल असतील असे वाटले नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी हे ऐकून मी अगदीच भंजाळले.


"कॉन्ग्रॅट्स निधी" मी स्वत:ला सावरत म्हटलं.

"क्या कॉन्ग्रॅट्स? मेरी पूरी बात तो समझ यार. मला जिगरबरोबर लग्न करायचे आहे. अजून जिगरला यामधले काहीही माहित नाही.. आणि जिगरला पटवायचे काम तुला करायचे आहे."


आता मात्र हे माझ्यासाठी सर्वच बाऊन्सर्स होते. मला खरंच काहीही समजेनासं झालं होतं.

"निधी, अगदी शांतपणे मला व्यवस्थित समजाव, आय अ‍ॅम कन्फ्युज्ड."

निधी त्यानंतर जवळजवळ अर्धा तास बोलत होती. तिचा प्रॉब्लेम मला लक्षात आला. आणि त्या प्रॉब्लेमवर शोधलेले तिने सोल्युशन देखील जबरी होते.


निधीच्या वडलांच्या मृत्यूनंतर घराची आणि कंपनीची सर्व जबाबदारी तिच्या काकांनी उचलली होती. त्याचबरोबर निधीच्या लग्नाचे वय झाल्याने तिच्यासाठी स्थळे शोधायची जबाबदारीदेखील आपखुशीने घेतली होती. निधीची अणि तिच्या आईची लग्नासाठी अजिबात इच्छा नसताना.. त्यांचा हेतू स्पष्ट होता,  निधीच्या वडलानी स्वतःच्या मृत्यूपत्रामधे निधीला वारस केले होते पण एकदा का निधी लग्न करून आपल्या घरी गेली की बिझनेसमधे तिचा संबंध येणार नाही. आपखुशीने ती बिझनेस सोडून देइल. तिला दहेज वगैरे भरपूर दिलं की नंतर ईस्टेटीमधे वाटा द्यायला नकोच किंवा दिला तरी मामुली देऊन चालेल. यासाठी तिच्या काकांनी एन आर आय आणि अतीश्रीमंत खानदानामधले मुलगे शोधायला सुरूवात केली होती. निधी परदेशात गेली असती म्हणजे उत्तमच झाले असते. निधीच्या समाजामधे पैसा कितीही असला तरी मुलीसंदर्भातली मानसिकता अजून पुरातनकाळातलीच होती.


"म्हणजे बघ, मला काही बोलता येणार नाही. कारण त्यांचा हेतू खूप चांगला असंच सर्वाना वाटेल.  मला मुंबई सोडून जायचं नाही तरी हे नातेपण तोडता येणार नाही. कंपनी चालवायला मला त्यांची मदत लागेलच. मला ही कंपनी सोडायची नाही. माझा डॅडनी खूप कष्ट केले आहेत. शिवाय मी आयुष्यात चूल आणि मूल न करता काहीतरी करावं हे त्यांचं स्वप्न होतं. माझे काका मला दूर सारून सर्व कंपनी स्वतःकडे घ्यायला बघत आहेत. आय हॅव टू डू समथिंग"


निधीचा प्रॉब्लेम समजत होता, पण या सर्व झमालझोल्यामधे जिगरशी लग्न हा उपाय कसा काय बसत होता हे मला अजून उमगलं नव्हतं."जोई, जिगर आमच्याच जातीतला आहे. शिकलेला आहे, मुख्य म्हणजे इथलाच आहे. त्याच्याशी लग्न केल्यावर मला मुंबई सोडून जायची गरज नाही. त्याचा ग्राफिक डीझायनिंगचा बिझनेस आता कुठे सुरू होतोय. तो त्याच्या बिझनेसमधे आणि मी माझ्या बिझनेसमधे लक्ष देऊ शकतो.."


"निधी, तू एक विसरतीयेस. जिगर तुझ्यापेक्षा गरीब आहे, तुझा बंगला जुहूला आहे आणि त्याचा वन बीएचके फ्लॅट बोरीवलीला. तुझे काका या लग्नाला तयार होतील?"


"अरे यार, आधी जिगर तरी हो म्हणू दे. मग दोन्ही काका-काकी-दादा-दादी सर्वाना तयार करू, प्रेम विवाह आहे म्हटलं की थोडे नाराज वगैरे होतील, पण शेवटी ऐकावंच लागेल त्यांना, मुख्य प्रॉब्लेम जिगरला कसे विचारू हा आहे. आणि त्यासाठी तुझी मदत हवी आहे. प्लीज... तू माझ्यासाठी जिगरला विचारशील? त्याला सर्व काही सांगितलेस तरी चालेल. पण प्लीज त्याला या लग्नासाठी तयार कर. माझ्याकडे वेळ फार थोडा आहे. काकीने ऑलरेडी युएसमधले रिश्ते शोधायला सुरूवात केली आहे."


वेटर येऊन प्लेट्स घेऊन गेला. दुसर्‍या एका वेटरने डेझर्ट आणून ठेवले. मी आणि निधी शांतपणे त्या डेझर्टच्या प्लेटकडे बघत होतो. दोघीच्याही मनात कॅलरीचे पाढे चालू असणारच.


वेटर निघून गेल्यावर मी म्हटलं. "तूच का नाही विचारत सरळ त्याला? तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना?"


"एक्झॅक्टली. तो माझा फक्त मित्र आहे. अगदी नर्सरीमधे असल्यापासून आम्ही एकमेकाना ओळखतो. मैत्री आहे आमची. आणि एका दिवशी अचानक मी त्याला "जिगर माझ्याशी लग्न करशील का?" हे विचारू? कसं वाटेल ते? नको. त्यापेक्षा तू विचार."


"मग मी नक्की काय करू? त्याला जाऊन भेटू आणि म्हणू. "जिगर तू निधीशी लग्न कर. तिला तिची कंपनी चालवायची आहे." ते कसं वाटेल??"


"म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे की. तूच सजेस्ट कर आता पुढचा गेम प्लान"


"ओके. मी तुला एकदोन दिवसात फोन करते आणि मग सांगते. तू मात्र तुला व्यवस्थित सांभाळ, सर्व ठिक होइल." निधीला जर जिगरशी लग्न करायचं असेल तर माझ्याकडून होईतो मदत मी केली असती, माझ्याकडून किमान तेवढंच करून झालं असतं.

"होप सो" निधी म्हणाली.

लंचचे बिल मीच पेड केले. मॅगझिनमधे काम करण्याच्या अनंत फायद्यापैकी एक. माझ्या पब्लिकेशनने "बिझनेस मीटिंग" म्हणून मला पैसे रीईम्बर्स केले असते.


ऑफिसमधे परत आले तरी जिगर-निधी हा विषय डोक्यातून काही केल्या जात नव्हता. जिगरला आज रात्री फोन करायचा आणि उद्या परवा भेटायचे हे मनात ठरवलेच होते. पण भेटायला काहीतरी ठोस कारण हवे होते. त्याचा विचार करता करताच मी मेलबॉक्स चेक करत होते. काय करायचे ते नक्की ठरत नव्हते. जिगरला आधी दोन तीनदा नुसतं भेटून मग त्याच्याशी जरा ओळख अजून वाढवून मग एके दिवशी त्याला निधीबद्दल सांगावं असं मला वाटत होतं. जरी कॉलेजमधे त्याला भेटलेले असले तरी गेल्या दोन तीन वर्षात अजिबात भेटले नव्हते. असंच विचार करत करत मेलबॉक्समधले मेल चेक बघत होते. एक  अनपेक्षित मेल अचानक माझ्या नजरेला पडला, आता काम सोपं झालं होतं मी स्वत:शीच हसले. त्या मेलला लगोलग रीप्लाय केला. आता जिगरला फोन करण्यासाठी खास कारण हातात होते.


"हेलो. जुई बोलतेय" 


"कौन जुई?" पलिकडून पंचामृतासारखा गोडमिट्ट आणि हृदयाचे ठोके चुकवणारा आवाज आला.


मी एक सुस्कारा सोडला. कॉलेजच्या ग्रूपमधे आणि त्यामधून झालेल्या माझ्या सर्व ओळखीमधे माझे नामकरण जोई ट्रीबियानी असे झाले होते. तिथे जुई नावाने ओळखणारे कुणीच नव्हते. जिगर निधीचा मित्र असल्याने त्यालापण जुई माहितच नसणार. आणि ही गोष्ट जर फोन लावल्या लावल्या माझ्या लक्षात आली असती तर माझे नाव जोई ठेवायची कुणाला गरजच नसती..


"जोई, निधी की दोस्त" मी आवाज शक्य तितका प्रोफेशनल ठेवत म्हट्लं.

"ओह, कैसी हो?" यानंतर आमचं एकमेकाना 'तू मजेत मी मजेत' हे विचारून झालं. शेवटी मी ज्या विषयासाठी जिगरला फोन केला होता त्या विषयाबद्दल बोलायला सुरूवात केली. सायलीचा एक बॉलीवूडी फ्रेंड नविन टीव्ही सीरीयल काढत होता. त्या सीरीयलच्या व्हिज्युअल्ससाठी कुणाची तरी गरज होती. नविनच प्रोजेक्ट असल्याने "कमीतकमी पैशात काम" ही प्रमुख अट असणार. सायलीने हा मेल निधीलासुद्धा पाठवला होता. निधी आणि जिगरची फ्रेंडशिप लेव्हल लक्षात घेता निधीनेपण या विषयावर त्याला माहिती दिली असण्याची शक्यता होती.


तरीपण मी त्याला "तुला भेटायचं आहे कारण एक महत्त्वाचं काम आहे." हे सांगितलं. मात्र भेटण्यासाठी त्याने "मेरे ऑफिस आ जाओ" हे ऐकवलं तेव्हा मी बेशुद्ध पडता पडता राहिले. त्याचं ऑफिस बोरीवलीला होतं. एवढ्या लांब जाणं तेही पावसातून ट्रेन उशीरा असताना. त्यापेक्षा निधी जिगरचे लग्न लावणे सोपे काम वाटलं. शेवटी त्याला "नको नको तूच बांद्र्याला ये" हे विनवून सांगितलं.


लगोलग निधीला फोन केला आणि सायलीच्या या ईमेलबद्दल तू जिगरला काही बोलू नकोस हे ऐकवलं. तिचे आणि जिगरचे दिवसातून वीसेकवेळा बोलणं असतं असं तिनेच सांगितलं होतं. नशिबाने या विषयावर त्यांचं काही बोलणं झालं नव्हतं. जगाच्या गावगप्पा मारता येतात मग स्वतःच्या लग्नाचं बोलायला काय धाड भरते कुणास ठाऊक? मी सायलीला फोन केला आणि त्या बॉलीवूड मित्राला घेऊन संध्याकाळी बांद्र्यामधे बोलावलं.


हे सर्व करून झाल्यावर मनात पुन्हा एकदा विचार आलाच, "हे सर्व का करतेय मी? मीच हे करायची काही गरज आहे का?"

मी जिगरला फार व्यवस्थित ओळखत नव्हते. निधीचा हँडसम मित्र इतकीच ओळख. तीही कॉलेजपुरतीच. कॉलेज संपल्यावर त्याला फार तर एक दोनदा भेटले असेन. त्यामुळे आता लगेच भेटल्या भेटल्या लगेच "तू निधीशी लग्न कर" असं आचरटासारखं बोलणं अगदीच विचित्र दिसलं असतं. म्हणून आधी तीनचारदा त्याला काहीतरी कामानिमित्त भेटावं आणि नंतर हळूहळू "तुझं निधीवर प्रेम आहे" असं त्याचं ब्रेनवॉशिंग करावं प्लान डोक्यात तयार होता. 


निधीने आधीच जिगरची "सध्या" कुणीही गर्लफ्रेन्ड नाही हे मला सांगितलं होतं. यातला सध्या शब्द महत्त्वाचा. ती व्हेकन्सी भरून येण्याआधी मला तिथे निधीचा वशिला लावायचा होता.


संध्याकाळी ऑफिसमधून लवकरच निघून मी बांद्र्याला गेले. सायली आणि तिचा मित्र आयुष्मान (याचे आडनाव भव असेल का?) अर्ध्या तासात येणार होते. तितक्यात जिगर बाईकवरून उतरताना दिसला.


काही काही माणसं अशी असतात की त्याना बघितल्याबरोबर तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. अशांपैकी एक जिगर होता. फॅशनविश्वाशी संबंधित असल्याने तथाकथित हँडसम हंक्स रोज बघायचेच. पण जवळ जवळ सहा फुटाची उंची, शांपूच्या अ‍ॅडमधे दाखवतात तसे सरळ आणि सिल्की केस, पिंगट डोळे. आणि चेहर्‍याच्या मानानं छोटंसं पण सुंदर नाक. जिममधे पैसे घालवून मिळवलेली बॉडी आणि पांढरा शर्ट आणि निळी जीन्स. या सगळ्या हॉटपणाला छेदणारा डोळ्यावरचा सोनेरी चष्मा. बॉय नेक्स्ट डोअर. निधीच्या "डिवा इमेजपेक्षा" याची अगदी उलट याची इमेज. जिगरला बघितलं की माझ्या हृदयात धकधक सुरू व्हायचं अगदी कॉलेजात त्याला पहिल्यांदा बघितल्यापासून."हाय, कैसी हो?"  तोच गोडमिट्ट आवाज. फोनपेक्षा प्रत्यक्षात ऐकताना तर अजूनच.

"मी ठिक." काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेले. सायली येईपर्यंत आम्ही कॉफीची ऑर्डर दिली आणि उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो.

"निधी कशी आहे?" मी उगाचच विषय काढायचा म्हणून विचारलं.

"मी परवाच एकदा भेटलो होतो तिला. बिचारी टेन्शनमधे आहे. आधीच तिचे पपा गेले. खूप वाईट झालं त्यात परत तिच्या त्या काकानी वैत्ताग आणलाय. लग्नासाठी."


"ओह, म्हणजे नक्की काय ते मला समजलं नाही" मी मुद्दाम काही माहित नसल्यासारखं बोलले.

मग जिगरने सकाळी निधीने मला ऐकवलेली टेप परत ऐकवली. अर्थात निधीचा तो महाभयानक लग्नाचा प्लान सोडून.

"मग तुला काय वाटतं? तिने काय करायला हवं?" पाहुण्याच्या चपलेने विंचू मारून बघू या.


"मला वाटतं तिने सरळ लग्न करावं. आय मीन, बिझनेस वगैरे सर्व ठिक आहे. पण कधीनाकधी तिला लग्न करावंच लागेल ना? मग आताच का नको? बिझनेसमधली समझबूझ असणारा मुलगा बघायला हवा तिने. कारण लग्नासाठी बिझनेस सोडणं पण मला पटत नाही. त्याचसोबत तिच्यावर भरपूर प्रेम करणारा पण हवा. आफ्टर ऑल, प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. " त्याने हे बोलून झाल्यावर एक क्षणभर विचार केला आणि अचानक मला म्हणाला. "जोई, तुझ्या आयुष्यात कुणी स्पेशल आहे का?"  मी काहीतरी बोलायला हवं होतं. पण नाही बोलू शकले. गरम गरम कॉफी एकदम प्यायली की जीभ असली भाजते. बोलायला काहीच सुचत नाही, दोन तीन सेकंद मी अशीच त्याच्याकडे बघत होते..
शेवटी तोच म्हणाला, "आय मीन, तुला राग नाही ना आला?"


"छे छे!!!" जमलं एकदाचं बोलायला... "त्यात रागावण्यासारखं काय? सध्या माझ्या आयुष्यात कुणीच स्पेशल नाही. असण्याची सुतराम शक्यतापण नाही. कामात इतकी बिझी आहे की विचारू नकोस"

"सेम हीअर"

तेवढ्यात सायली आणि तिचा तो आयुष्मान आले. थोड्याफार कामाच्या गप्पा झाल्या. बहुतेक जिगरला हे काम मिळेल असे वाटत होते. पण पूर्ण मीटिंग संपेपर्यंत मी थांबले नाही. कारण पाऊस परत सुरू झाला होता. हार्बर लाईन सकाळपासून चालू होती. त्यामुळे आता ती कधीही बंद पडली असती. आणि बंद पडल्यावर चालू व्हायला किती वेळ लागला असता कुणास ठाऊक. ट्रेन्स बंद झाल्या तर बांद्यावरून माझगांवला येणं मुश्किलच होतं. मी घरी आले तेव्हा जवळ जवळ आठ वाजून गेले होते. जिगरला भेटल्यामुळे सातव्या आसमानात वगैरे तर होतेच मी.


घरी आल्यावर लगेच निधीला फोन केला. म्हटलं काय घडलं ते तिला सांगू या.

निधीने फोन उचललाच नाही. त्यानंतर दोन तीनदा फोन केला तरी तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. मधेच एक दोन एस एम एस जिगरचे आले होते. व्यवस्थित पोचलीस का वगैरे.  सायलीने "लक्की यु" असा मेसेज पाठवला. ती संध्याकाळच्या पावसात अडकली असावी बहुतेक असं मला वाटलं... पण तसं नव्हतं.


शेवटी अकरा वाजता निधीचा फोन आला. तिचा आवाज एकतर खूप रडल्यासारखा होता किंवा खूप चिडल्यासारखा.

"जोई. काय केलंस तू?" हे एकच वाक्य दोन तीनदा म्हणाली तेव्हा वाटलं हिने काय दारू वगैरे प्यायली आहे की काय...

"निधी, तू काय बोलतेस ते समजत नाहीये? नीट सांग"

"नीट काय सांगू? जिगरचा मेसेज आलाय. थांब तुला फॉरवर्ड करते" इतके म्हणून तिने फोन कट केला.


दोन मिनीटानी निधीकडून एक फॉरवर्डेड मेसेज आला.

"निधी, आय लाइक युअर फ्रेंड जोई. उससे बात आगे बढाने के लिये मेरी कुछ मदद करोगी क्या?"माझ्या हातातून फोन खाली पडला. जिगर लाईक्स मी? दॅट हँडसम बॉय लाईक्स मी? उड्या मारायच्याच शिल्लक होत्या माझ्याकडून. मोबाईल हातात घेऊन तो मेसेज दोन तीनदा परत मोठ्याने वाचला.
अणि नंतर पाच मिनिटांनी भानावर आले. वस्तुस्थिती काय आहे ते लक्षात आलं आणि जिगरचा मनापासून राग आला. हा चक्क मूर्खपणाचा कळस होता. या जिगरला जरा तरी अक्कल हवी होती की नाही?

मी निधीसाठी त्याच्याकडे सेटिंग लावत होते आणि हा माझ्याकडे बात आगे करायला बघत होता. की याच्याशी बोलताना माझ्याकडूनच  काही गडबड झाली का? मी त्याच्यामधे इंटरेस्टेड असेन असं त्याला का वाटलं असेल? माझ्यातर्फे  मी काही चुकीचे बोलले होते का? मनातल्या मनात त्याच्या आणि माझ्या भेटीचे सर्व संवाद मी आठवून पाहिले. पण तसं काही जाणवलं तर नाही. पण एकूणातच सगळाच घोळ झाला होता.


मी खुर्चीवरून उठले आणि रूमचे लाईट बंद केले. झोप तर येतच नव्हती. आज दिवसभर माझा अक्षरशः रोलरकोस्टर झाला होता. निधीला दुपारी भेटले तेव्हा तिने हा लग्नासाठीचा बॉम्ब टाकला. बॉम्ब नव्हे माझ्यासाठी तर परमाणूबॉम्ब होता. तो धक्का सहन करून जिगरला भेटायला गेले तर जिगरने हा दुसरा बॉम्ब टाकलेला.
 मी सध्या स्वतःवरतीच खूप  चिडले होते. खरंतर काहीच गरज नव्हती. पण मी चिडले होते हे मात्र खरं. याआधी किती वेळ जिगरला भेटले असेन. कितीवेळा बोलले असेन. पण तेव्हा त्याला माझ्या मनात काय आहे ते अजिबात समजू दिलं नव्हतं. आज असं नेमकं काय झालं की इतक्या वर्षानी जिगरला मी आवडले. मी काय रूपसुंदरी नव्हे की हॉट चिक नव्हे. निधीच्या बाजूला मी म्हणजे करीना कपूरच्या बाजूला कंगना रानावत. ती कंगना जरातरी परवडली, मी म्हणजे, जाऊ दे आता आत्मनिर्भत्सना तरी किती करायची? या जिगरला  कॉलेजमधे असताना किंवा त्यानंतर कधी मी दिसले नव्हते? मग आजच का?मला निधीला जाणूनबुजून काय अजाणतेपणी पण दुखवायचे नव्हते. नुकतीच ती तिच्या वडलांच्या निधनातून सावरत होती. त्यानंतर बिझनेसचे टेन्शन. त्यातून आता हे? असलं प्रकरण.


  जिगरने हाच मेसेज जर आधी पाठवला असता तर... कदाचित निधीने लग्नासाठी जिगरचा विचार केला नसता, कदाचित माझ्या आयुष्यामधे जिगर आला असता... पण आता या जर तरला काहीच अर्थ नव्हता. निधीला जिगरशी लग्न करायचे होते. प्रेम्-अफेअर्-भानगड नव्हे. लग्न. शेवटचा शिक्का मोर्तब. आणि मी निधीला पुरेपूर ओळखून होते. तिच्या मनात एकदा एखादी गोष्ट बसली की ती काही केल्या स्वस्थ बसण्यातली नव्हती. तिच्यासाठी जिगरशी लग्न हा कंपनीसाठी आणि नातेवाईकांना कटवण्यासाठी योग्य निर्णय होता, कुणी कितीही मनवलं तरी ती बधली नसती.


आणि का बरे तिला कुणा मनवावे? जिगर तिचा बेस्ट फ्रेंड होता. माझा नव्हे. जिगर आणि निधी एकमेकासोबत आयुष्य घालवू शकत होते. निधीला तिच्या बिझनेसच्या दृष्टीने पण हा सौदा अति फायद्याचा होता. शिवाय जिगरच्या मनात निधीबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असणारच. मी म्हणजे जिगरसाठी सध्याचा एक टाईमपास असणार. नक्कीच.


सगळं आयुष्य म्हणजे टिपिकल बॉलीवूड लव्ह ट्रँगल झाल्यासारखंच.
तेवढ्यात मोबाईल पुन्हा वाजला.  

निधीचा एसेमेस. "सॉरी". मी पण तिला "आय अ‍ॅम अल्सो सॉरी. कल बात करेंगे" असा मेसेज पाठवून टाकला. बिचारी, तिची तरी यामधे काय चूक? जिगर आणि त्याच्या या सर्व गर्लफ्रेंड्स हे सगळं निधीला आधीपासून माहित होतं की. त्यात नवीन काय? जिगर किती मोठा चालू आहे हे तिनेच मला कितीदातरी सांगित्लं होतं. तरी आता त्याच जिगरशी ती लग्नाचा विचार करत होती. बिझनेससाठी.... झोप तर येतच नव्हती. बेडवर नुसती बसून होते. डोक्यात विचारचक्र चालू होतेच. अचानक दिवा पेटला. रूममधला नव्हे. डोक्यातला. ही एवढी साधीसरळ गोष्ट माझ्या डोक्यात का आली नाही? मी डोक्यात इतकी राख का घालून घेत होते. जिगर मुळातच भानगडीबाज होता. त्याला मी आवडले काय, आणि सायली आवडली काय दोन्ही सारखंच. पण निधीच्या बाबतीत इतकी छोटी आणि महत्त्वाची बाब माझ्या नजरेत का आली नाही हे समजलं नाही. शेवटी एकदा "धिक्कार हो तुम्हारी दोस्तीका" असं मीच स्वतःला ऐकवलं. या सर्व प्रकरणाचा काय छडा लावून निकाल लावायचा हे मनाशी पाच मिनीटात ठरवून पण टाकलं. त्यानंतर निवांत झोपून गेले.

सकाळी उठले तर पावसाचा नामोनिशाण नव्हता. मलापण मनावरचं मळभ दूर झाल्यासारखं वाटत होतं. टीव्हीवरती चॅनलवाला ओरडून ओरडून पाणी कुठेकुठे भरले आहे ते सांगत होता.

शांतपणे ब्रेकफास्ट उरकला आणि निधीला फोन केला.

"निधी, काल रात्री..."

"जोई, आय अ‍ॅम सॉरी, खरंच. मी तुला असं काही म्हणायला नको हवं होतं. जिगरचा स्वभाव मला माहित आहे. तुझी यामधे काहीच चूक नसणार."

बरोबरे, जिगरला मी आवडले यात माझी काहीच्च चूक नाही, त्याला आवडले नसते तरी काहीच्च चूक नव्हतं... पण हे निधीला बोलून काय उपयोग?


"ते सर्व जाऊ दे. एवढी पण काही मोठी गोष्ट नाही. साधं त्याने "मी आवडते" एवढंच म्हटलय ना. लग्नाची मागणी नाही घातलीये. आपण दोघी काल यावर ओव्हर रीअ‍ॅक्ट झालो"


"हो म्हणून तर...सॉरी.. "


"हे बघ ते बाकीचं सर्व राहू दे. आता शांतपणे ऐक. मी काय सांगतेय ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातलं काहीही जिगरला सांगू नकोस"

"ओके"

मी बोलत असेपर्यंत ती शांतपणे ऐकत राहिली. माझे म्हणणे तिला पूर्णपणे पटले असेल किंवा कदाचित नसेल. पण ती मला काहीच म्हणाली नाही.


फोन झाल्यावर मी ऑफिसची तयारी करायला लागले. तितक्यात मेसेज आला. जिगरचा मेसेज.


"आज मी टाऊनमधे आहे. आपण आज दुपारी लंचला भेटू या का?" अर्थात, आजच मला तुला भेटायचंच आहे रे बाबा. मी घराबाहेर पडून टॅक्सी केली आणि जिगरला मेसेज पाठवला. सिल्क रूट. दोन वाजता. जिगरचं अगदी आवडतं रेस्टॉरंट. निधीने मला सांगितलं होतं. त्याने स्वतःहून लंचला भेटायचं ठरवल्याने एक काम चांगलं झालं होतं. मला त्याला भेटण्यासाठी बोलवावं लागणार नव्हतं.


रात्रीपासून पाऊस जरा कमी झाला होता. मी घरातून बाहेर पडले तेव्हा जरासा रिपरिपत होता. म्हणजे अजूनच वैताग. या पावसाचं एक असत, जेव्हा मुसळधर कोसळत असतो  त्यावेळेला भिजत जायला काही वाटत नाही. असा रिपरिपत असला की अगदी नकोसा वाटतो.


काल दिवसभर ऑफिस अगदी निवांत होतं. आज मात्र सर्वांना अंगात आल्यासारखं काम करायचं होतं. बॉसने मला खंडीभर फोटो सॉर्टिंगसाठी दिले. नजर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असली तरी मनामधे निधीचे आणि जिगरचेच विचार चालू होते. मी काय बोलणार कसं बोलणार याची मनातल्या मनात उजळणी करत होते. शाळेत असताना भाषण पाठ करायचे अगदी तशीच. डोक्यात फारच घोळ व्हायला लागला तसं सगळं कागदावर लिहून काढलं. आणि मग तो कागद वाचत बसले. मधेच एकदा रेस्टॉरंटला फोन करून रीझर्वेशन कन्फर्म करून घेतलं.


या नादामधे एक कधी वाजला ते समजलंच नाही. निधीचा कॉल आला तेव्हा एकदम आठवलं. मग लगेच सगळं काम आवरलं.  बॉसला काहीतरी गुळमुळीत कारण सांगितलं आणि लंचला बाहेर पडले. घड्याळात पाहिलं तेव्हा दीड वाजला होता. पाऊस अजिबात नव्हता त्यामुळे टॅक्सी पकडायच्या ऐवजी मस्त चालत जावंसं वाटलं.
रेस्टॉरंटला

पोचले तेव्हा जिगर दरवाज्यातच माझी वाट बघत होता.

त्याला बघितल्या बघितल्या मी काय बोलणार होते इत्यादि विसरूनच गेले. माझं हे असंच होतं कायम. त्यातून जिगरला बघितल्यावर तर..
.
असो. टेबलवर बसलो तेव्हा जिगर म्हणाला.

"जोई, तुला कॉलेजमधे बघितलं होतं तेव्हापासून आतापर्यंत तू जराही बदलली नाहीस"


काय वाट्टेल तो अर्थ घ्या या वाक्याचा. तू आधीसारखीच स्मार्ट आहेस, हुशार आहेस, सडपातळ आहेस, किंवा बावळट आहेस. कसाही अर्थ घ्या. उगाच बोलायचं म्हणून बोलायची जी वाक्य अस्तात त्यापैकी हे एक वाक्य.


मी नुसतीच हसले. मनातल्या मनात मघाशी लिहून ठेवलेला कागद डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात नजरेसमोर जिगर असताना अजून काही आठवणार कसं?


वेटर ऑर्डर घेण्यासाठी समंधासारखा फिरत होता. जिगरला ऑर्डर द्यायला सांगितली. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. "जाने कहा मेरा जिगर गया जी"


समोर बसलेला जिगर हसला. "माय फेवरेट सॉंग" मी कसंबसं पुटपुटले. सकाळी मोबाईलची रिंग टोन बदलायचीच असं ठरवलं होतं तरी विसरले. उगाच नाही माझं नाव जोई पडलं.


निधीचा फोन होता. तिला अगदी एक दोन शब्दांत काहीतरी सांगून मी फोन ठेवला. जिगरने ऑर्डर दिली होती.


"जोई, मी काल दुपारपासून फक्त तुझाच विचार करतोय." जिगर माझ्या डोळ्यात (खरंतर लेन्समधे पण असो) बघत म्हणाला.


विषय भलतीकडे जायच्या आत मला माझं म्हणणं मांडायला हवं होतं.


"जिगर. एक मिनिट थांब. तुला काय म्हणायचं आहे ते मला माहित आहे. पण आज आपण भेटण्याचा उद्देश वेगळा आहे,"


जिगरच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसले


"निधी. जिगर, मी इथे निधीसंदर्भात बोलायला आले. काही बोलायच्या आधी मी जे सांगते ते नीट ऐक. जिगर, मला तुझ्यामधे काहीही इंटरेस्ट नाही. कारण, अगदी कॉलेजमधे असल्यापासून मला एक गोष्ट माहित आहे" खोटं बोलण्यासाठी कुणी ऑस्कर देणार असेल तर माझे नॉमिनेशन पाठवून टाका प्लीज.


"जोई, निधी तुला काही म्हणाली का? आय मीन.. मला तसं..."


"हे बघ जिगर, आधी मी बोलतेय ते ऐकून घे. निधीचे वडील अचानक गेले. तिच्यावर किती मोठी जबाबदारी येऊन पडली आहे ते स॑र्व तुला माहित आहे. मी परत तुला ते सांगत बसत नाही. पण मला एक सांग. तू निधीला किती दिवसांपासून ओळखतोस?"


"दिवसांपासून? जोई, मला माझ्या आयुष्यातला एकही असा दिवस आठवत नाही जेव्हा निधी माझ्या लाईफमधे नव्हती."


"आणि तरीदेखील ती तुझी "गर्लफ्रेंड"  होती का? " इथे गर्लफ्रेंड म्हणताना मीपण बर्‍याचदा मॉडेल्स करत असतात तसे कोट्स चे हातवारे केले. नंतर वाटलं उगाच!!! अगदी विचित्र दिसतं ते. आपल्याच डोक्यावर शिंगं काढल्यागत.


"काहीतरीच काय तुझं?" जिगर अगदी वैतागून म्हणाला. "निधी माझी फ्रेंड आहे. तिच्याबाबतीत मी असं कधी.. " त्याआधीच मी माझं बोलणं सुरू केलं.


"का नाही? जिगर, तू तिला इतक्या दिवसापासून ओळखतोस.. ती तुला ओळखते. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर का खुश राहू शकत नाही. आय मीन, तुमच्या लग्नामुळे किती तरी प्रॉब्लेम.."जिगरचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला.

 
"लग्न? लग्नाबद्दल कोण बोलतय?" तो जवळजवळ किंचाळलाच. आजूबाजूची सर्व माणसं आमच्याकडे वळून बघायला लागली.


अरे देवा!! कुठे गेला तो कागद? त्याच्यावर मी कसं अगदी हळूवारपणे जिगरला सर्व समजवायचं, त्याच्या मनामधे निधीबद्दल प्रेम आहे हे त्यालाच पटवून द्यायचं, मग लग्नाविषयी बोलायचं  असं ठरवून ठेवलं होतं. सगळ्यावरती अक्षरश:.. सांगितलं ना, माझं हे कायम असंच होतं म्हणून. पण आता प्रसंग सावरायला हवा होता. अजून पंधरा मिनिटानी  निधी आली असती. तोपर्यंत तरी बाजी मारत रहायला हवं होतं.


"हे बघ, जिगर, निधीला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तिच्या मते, आयुष्यामधे तिला तुझ्याइतकं समजून घेणारा दुसरं कोणी नाही... " इथून पुढे मला माझ्या भाषणची लिंक मिळाली. "निधी तुझी फक्त मैत्रीण नाही. ती मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करते. फक्त हे प्रेम आहे हे तिला नुकतंच उमगलय."


"पण जोई, माझं तिच्यावर प्रेम नाही." जिगर अगदी शांतपणे म्हणाला.


"असं तुला वाटतं. पण कधीतरी स्वतःलाच विचार. जिगर, तासनतास तिच्याशी फोनवर बोलत असतोस. तिच्या प्रत्येक सुख दु:खामधे तू तिच्यासोबत असतोस. जगामधे तुला सर्वात जास्त काळजी तिची. हे प्रेम नाहीतर काय आहे?"


"जोई, याला मैत्रीसुद्धा म्हणता येइल ना? प्रेम आणि मैत्रीमधे फरक आहे."


"आहे ना... नक्कीच फरक आहे. प्रेमाची सुरूवात कधीही मैत्रीपासूनच होते. आणि जिगर निधी सारख्यांच्या मैत्रीचा शेवट हा प्रेमामधेच होतो. किंबहुना तो व्हायला हवा. आयुष्याचा जोडीदार निवडणे हे फार सोपे काम नाही. त्यातून आयुष्याचा योग्य जोडीदार निवडणे हे तर अजूनच कठीण. निधी आणि तू नशीबवान आहात आपलं आयुष्य कुणाबरोबर काढायचं हे एकदा ठरवून मग नात्याला सुरूवात केली की नुसतीच नाटकं होतात. तू निधीला आणि निशी तुला या मुखवट्याच्या पलिकडे एकमेकाना ओळखता.""पण जोई, लग्नासारखा मोठा निर्णय प्रेम वगैरे.."


"काय असतो रे लग्नाचा मोठा निर्णय? आज ना उद्या तुला घ्यावाच लागेल. निधीला तर तिच्या काका लोकांमुळे सहासात महिन्यात लग्न करावे लागेल. तेव्हा हे असे निर्णय घेण्यासाठी वाट बघत बसणार आहात का? जिगर, कधीतरी निधी दुसर्‍या कुणाची झाली, तुझ्यापासून दूर गेली तर.. हा विचार करून बघितला आहेस?"


जिगरच्या चेहर्‍यावर॑चे रंग उडत जात होते. मी पण काही न बोलता गप्प बसून राहिले. वेटर येऊन काहीबाही टेबलावर ठेवून गेला.


"जोई, पण निधी माझ्यावर प्रेम करते. हे तिने मला का नाही सांगितलं?"


"कदाचित तिला भिती वाटली असेल किंवा तिला असं वाटलं असेल की तू नकार देशील. काहीही कारण असलं तरी निधीचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे. आणि मला असं मनापासून वाटतय की तुम्ही दोघं सुखाने एकत्र रहाल"


"सुखाने एकत्र रहायचा प्रश्न नाही जोई, निधीची आणि माझी अवस्था माहित आहे ना तुला? ती किती श्रीमंत आणि मी बोरीवलीत राहणारा.. हे लग्न कसं होइल?"


मला अत्यानंदाने टेबलवर चढून उड्या मारावाश्या वाटत होत्या. मिशन फत्ते झालं होतं. किमान जिगर "लग्न कसे होइल?" या प्रश्नापर्यंत आला होता. माझे काम निम्म्याने झाले होते. मुळात मला काल रात्रीपासून वाटत होतं तेच खरं होतं. निधी आणि जिगर एकमेकांवर प्रेम करत होते. पण त्याची त्यांना स्वतःलाच खबरबात नव्हती. माझं नशीब थोर म्हणून या असल्या टिपिकल बॉलीवूड लव्ह स्टोरीमधे मी तिसरा कोन म्हणून होते. या तिसर्‍या कोनाच्या मनात काय आहे ते मात्र या दोघांना माहितच नव्हतं, आता सांगूनदेखील उपयोग नव्हता."हे बघ जिगर, त्या सर्वाचा विचार तू आणि मी करून उपयोग नाही. तू निधीसोबत याची चर्चा कर. मी यापुढे यामधे काहीच बोलू शकणार नाही."


"जोई, हे सर्व फारच फास्ट घडतेय, आय मीन, मला काहीच समजत नाही"


"घाबरू नकोस." मी पुढे काही बोलणार तेवढ्यात निधी आमच्या टेबलजवळ आली. तिच्या चेहर्‍यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
मला मात्र आता कसलंच टेन्शन राहिलं नव्हतं. "जिगर, निधी, तुम्ही दोघांनी आता तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. माझं काम फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमाची ओळख करून देणे इतकंच होतं."
निधीच्या चेहर्‍यावर आता मात्र अचानक आश्चर्य उमटलं.


"हो निधी. तुम्हाला दोघांना अजून कदाचित समजलं नाही. मला मात्र समजलं. तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. फक्त इतके दिवस तुम्ही या प्रेमाला मैत्री समजताय. निधी बिझनेससाठी तुझ्या मनात जिगरशीच लग्न करायचा विचार आला तेव्हाच खरंतर तुलापण समजायला हवं होतं. पण नाही लक्षात आलं. हरकत नाही. कधीकधी आपलं प्रेम एखाद्या व्यक्तीवर आहे हे समजायला एखादा क्षण पुरेसा असतो आणि कधीकधी आयुष्यभराची असलेली संगत असूनसुद्धा आपल्या मनामधे काय आहे ते समोरच्याला ठाऊक नसतं. "निधी हसली. "जोई, मला खरंच माहित नाही.. मी काय बोलू?"

"काही बोलू नकोस. तू आणि जिगर खुश रहा एवढीच इच्छा. आता मी निघते. "

निधी आणि जिगरने काही बोलायच्या आत मी तिथून उठले आणि बाहेर पडले.


जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. निधी आणि जिगर दोघं मेड फॉर ईच अदर होते, अशीच मनाची समजूत घालत टॅक्सीत बसले. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झाला होता. टॅक्सीवाल्याला ऑफिसचा पत्ता सांगितला आणि लगेच मोबाईल उघडून माझी रिंग टोन चेंज केली.  "जाने कहा मेरा जिगर गया जी" गेली पाच वर्षे माझी रिंगटोन होती. जिगरला कॉलेजमधे पहिल्यांदा भेटले त्या दिवसापासून.... इतक्या दिवसानंतर आजच बदलली.  "रूलाके गया सपना मेरा....."
(समाप्त)

No comments:

Post a Comment