Sunday, 20 November 2016

रहे ना रहे हम (भाग २१)

निधीच्या लग्नाची तारीख मला पक्कीच माहित आहे. एकवेळ ती किंवा तिचा नवरा विसरेल पण मी विसरणार नाही.. कारण त्या रात्री आफताब पहिल्यांदा माझ्या फ्लॅटवर आला. अर्थात त्या रात्री आमच्यामध्ये काहीच फिजिकल घडलं नाही. त्याला मैत्रीच्या आधाराची गरज होती, माझ्यासाठी माझ्या प्रेमापेक्षाही मैत्रीचं नातं जास्त महत्त्वाचं होतं. पण तरी त्यानंतर तो सतत येतच राहिला. कधी वीकेंडला तर कधी सुट्टी आहे म्हणून सहज. मग कधीतरी माझी आठवण आली म्हणून. हक्कानं तो येत राहिला आणि आमचं नातं तसंच वाढत गेलं.
नातं म्हणायला गेलं तर फार मोठी कन्सेप्ट होईल. मी आणि आफताब एकमेकांना ओळखतच होतो, अरिफच्या बर्थडेदिवशी एकमेकांना शरीरानंदेखील व्यवस्थित ओळखू लागलो आणि मग हळूहळू हीपण ओळख अधिकाधिक दृढ गेली. मला कधीतरी हे खरंच वाटायचं नाही की इतक्या वर्षांनी आफताबच्या ओठांवर निधीचं नाही तर माझं नाव होतं. माझी निधीसोबत काही इर्षा नव्हती. म्हणजे किमान सुरूवातीला तरी, नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की मीच आफताबच्या प्रेमात पडले आहे, त्तेव्हा कळत नकळत का होईना निधीचा जाम राग यायचा. ते साहजिकही होतं. निधीनं त्याच्याशी लग्न न करायला धर्म हे एकमेव कारण होतं (म्हणे!). गेली सात वर्षं त्याच्यासोबत फिरताना, झोपताना तिला या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही का? मला ती लग्नानंतर एकदा फक्त भेटली. गावी आली होती तेव्हा आमच्या दुकानामध्ये येऊन गेली.. त्यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा होता, त्यामुळे मला आफताबबद्दल काही बोलणं शक्य झालं नाही. तरीही “कशी आहेस? लग्नाचं काय ठरलं?” या तिच्या खवचट प्रश्नाचं उत्तर देताना मी पण तितक्याच खवटपणे सांगितलं “लवकरच ठरतंय, आमचे नेबर आहेत सुर्वे. त्यांच्याच धाकट्या मुलासोबत. तू पाहिलंयस ना त्याला? सीए झालाय तो?” मी बोलत असताना निधीचा चेहरा काय रंगला होता हे इथं लिहून मजा येणार नाही. त्यादिवशी हे उत्तर देऊन मी माझ्यापरीनं सूडाला पूर्णत्त्वाकडे नेलं होतं. पण तरी अखेर निधीचीच सरशी झाली!!! मला आणि आफताबला तिनं वेगळं केलंच.
पण ते फार नंतर! महत्त्वाचं काय तर अखेर, आफताब अंधेरीच्या फ्लॅटमधलं त्याचं सर्व सामान घेऊन माझ्या फ्लॅटवर रहायला आला. सामान म्हणायला होतं काय, ढीगभर पुस्तकं आणि दोन कपड्यांच्या बॅगा. हे पुरूषांचं एक बरं असतंय, आमचं झालं तर कपड्यांच्याच दहाबारा बॅगा भरतील. त्याला आता पुढची सीएफएची परीक्षा द्यायची होती. त्यासाठी चिक्कार अभ्यास करायचा होता आणि म्हणून त्यानं नोकरीमधून वर्षभर ब्रेक घेतला होता. परीक्षेशिवाय मुख्य कारण म्हणजे, निधी प्रकरणामधून आलेलं डिप्रेशन होतं. हे त्याला स्वत:लाही नीट माहिती होतं. त्याला पैशाचा तसा काही प्रश्न नव्हता. सीए म्हणून काही छोटीमोठी रीटर्न्स भरायची वगैरे कामं करून चाललं असतं. आता अभ्यास करण्यासाठी माझा फ्लॅट अतिशय निवांत म्हणून तो इकडे रहायला आला. म्हणजे,  खरंतर मीच त्याला तसं सुचवलं. आमच्या बिल्डिंगजवळ असलेल्या एका अतिशय महागड्या क्लासमध्ये सीए इंटरच्या मुलांना शिकवण्यासाठी त्याला जॉब आला. एखाद्याला “शिकवणे” याची त्याला इतकी आवड होती की, त्यानं पगार वगैरे कसलाही विचार न करता डायरेक्ट हो म्हणून सांगितलं. अर्थात पगार जबरदस्तच होता.
तो माझ्या घरी रहायला येईपर्यंत आईबाबाला यातलं काहीच माहित नव्हतं म्हणजे अधूनमधून येतो तेसुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे आमचं काही फिजिकल आहे हे समजायचा प्रश्नच नव्हता. केदारच्या वेळेला आईला सर्व समजल्यावर तिनं माझी बरीच खरडपट्टी काढली होती. त्यात नेहमीचे “स्त्रीची अब्रू काचेचं भांडं” वगैरे फिल्मे डायलॉग तर होतेच. त्यामुळे मी हा मामला तिच्यापासून जरा लांबच ठेवला. तसे हल्ली आईबाबा इकडं जास्त यायचे नाहीत. बाबा स्थानिक राजकारणामध्ये बरा रमला होता, दिवसामध्ये दोन चार दुकानांमध्ये महागडा माल विकून झाल्यावर उरलेला वेळ तो पक्षाच्या कामामध्ये गुंतला होता. कॉलेजच्या गुंडागर्दीनंतर राजकारणामध्ये जायला बाबाला तसा उशीरच झाला म्हणायचा. आईनं वेळ जायला म्हणून अनेक उपद्व्याप लावून घेतले होते. कुठे बालसाक्षर वर्ग, कुठे महिला बचतगटांना मार्गदर्शन, तर कुठे काय कसलं! हे उद्योग वेळ खायला उठू नये म्हणून केले पण आता मलाच खायलासुद्धा वेळ नाही असं तिनं मला ऐकवलं होतं. शाब्दिक कोट्या म्हणून ठिकच आहे तरीही हे खरं की माझे आईबाबा आता अतिशय बिझी झाले होते. खरंतर मी आईला किंवा बाबाला आफताबबद्दल सांगायला हरकत नव्हती. पण मी सांगितलं नाही. काय सांगणार? या नात्याला काहीही भविष्य नव्हतं. मुळात त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं!
ही गोष्ट कितीही कडू वाटली, अप्रिय वाटली तरीही खरी होती. तो माझ्यासोबत होता. फिजिकली वी वेर ग्रेट! इमोशनलीही आम्ही एकमेकांचा आधार होतोच पण तरीही मी आफताबचं “प्रेम” नव्हते. हे त्यानंच मला सांगितलं होतं. निधीच्या लग्नादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला त्याच्या दुसर्‍या दिवशी.
“स्वप्निल, मला अजून कॉम्प्लिकेशन्स नकोयत. मी निधीला अजून विसरलो नाही. विसरेन असंही वाटत नाही. मला तू आवडतेस, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, पण याहून अधिक दुसरं नाव मी या नात्याला याक्षणी देऊ शकत नाही. जर हे तुला मान्य नसेल तर मी निघून जाईन. पण मी तुला कसलीही कमिटमेंट देऊ शकत नाही.”
मला नात्याला नाव, कमिटमेंट वगैरे गोष्टी हव्याच कुठे होत्या? मला केवळ तो हवा होता. निधीला अजून विसरू न शकलेला तरीही माझ्यासोबत राहणारा असा हा बॉयफ्रेंड मीच स्विकारला होता. त्यामुळे त्याबद्दल नो रीग्रेट्स! ही गोष्ट आईबाबाला अजिबात न सांगता निभावणं हे अतिशय रिस्की होतं. जर चुकून त्यांना बाहेरून कूठंतरी समजलं तर आजवर त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिंध्या उडाल्यासारखं झालं अस्तं. हे नातं अतिशय क्षणभंगुर होतं याची मला कायमच जाणीव होती आणि म्हणूनही असेल पण हे नातं जितके दिवस टिकतंय तितके दिवस का होईना मला आसुसल्यासारखं जपायचं होतं. त्याच्याकडून मला याहून दुसरी काहीही अपेक्षा तेव्हा नव्हती.
पण, आशा अपेक्षा आणि नाती अशी कायमच एकसारखी राहत नाहीत. पेट्रीडिशमध्ये ठेवलेल्या फंगससारखी ती सतत बदलत राहतात. पण ते पुढे. सध्यातरी माझा बॉयफ्रेंड माझ्या घरी मूव्ह झालाय. आम्ही म्हणजे अगदी न्युएज लिव्ह इन कपल आहोत असं माझ्या ग्रूपमधल्या प्रत्येक फ्रेंडचं मत पडलंय. काहीतरी भयंकर परंपरा वगैरे मोडल्याचा फील तेव्हा निमिषभर का होईना पण येऊन गेला होता.
आम्ही दोघं एकत्र रहायला लागल्याचा साईड इफेक्ट म्हणजे, माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स एकदम सुधारला. आता हे काय कॉज आणि इफेक्ट इतकंसाधं सोपं नाहीये. मी रोज ऑफिसमधून आल्यानंतर सर्व घडामोडी सविस्तरपणे त्याला सांगायचे, दोघांमध्ये बोलायला रोज काहीतरी विषय नको! त्यानंतर मग एक्स्पर्ट कमेंट चालू व्हायच्या, “तू त्याला मेल करायचं ना. आणि फोनवर हे टॉपिक कधी डिस्कस करायचे नाहीत. मिनट्समध्ये हा पॉइंट मेन्शन का केला नाहीस, सरांना सांग, हे माझ्या कामात बसत नाही तरीही मी केलंय. आणि अगदी बेस्ट वेने केलंय” वगैरे वगैरे. कॉलेजं संपली तरी आमच्या घरात लेक्चर्स चालूच राहिली पण हळूहळू ऑफिसच्या कामाला शिस्त आली, प्रोफेशनल अप्रोच बदलू लागला.
घरातही बरेच बदल झाले. पहिली गोष्ट म्हणजे, माझं ऊठसूट हॉटेलमध्ये ऑर्डर करणं बंद झालं. घरामध्ये ओट्स कॉर्नफ्लेक्स, मुसली वगैरे हेल्दी (आणि भयंकर बेचव गिळगिळीत) वस्तू आल्या. आपल्या रोजच्या आहाराचे तीन भाग असतात. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे लहानपणी पहिली दुसरीमध्ये ईव्हीएसमध्ये शिकवलं होतं. आता इतक्या वर्षांनी त्याचा पुढचा धडा शिकले, ब्रेकफास्टला केलेले पोहे दुपारी दोन वाजता गरम करून खाणे म्हणजे लंच नव्हे आणि तेच पोहे रात्री परत (वर शेवकांदा घालून) खाणे म्हणजे डिनर नव्हे. मुळात पोहे एकदा खाण्यापुरतेच बनवावेत. अर्धा किलो पोहे हे महिन्यातून तीन चार वेळेला बनवता येतात एक्दाच सर्व करायची गरज नसते. शिवाय एकावेळेचे पोहे करून झाल्यावर नीट डब्यात भरून ठेवावेत. पिशवीला स्टेपलरच्या पिना मारून सापडेल त्या डब्यात टाकू नये. वगैरेवगैरे. चाचींनी तिन्ही मुलांना सगळा स्वयंपाक शिकवला होता. त्यात इतकी वर्षे तो एकटा राहत असल्यानं सर्व करायची सवय लागली होती. त्यामुळे सकाळी मी ऑफिसला जाण्याआधी ब्रेकफास्ट. दुपारी स्वत:पुरतं लंच, आणि रात्री दोघांसाठी ताजं गरमागरम डिनर इतकं तोच करत होता. पुढं नंतर अभ्यास वाढल्यानंतर महिन्याभरानं त्यानंच सोसायटीमध्ये शोधाशोध करून पोळ्यांना बाई लावली. त्यात मला काय प्रॉब्लेम असणारे! रोज सकाळी त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करून मी ऑफिसला बाहेर पडायचे. रात्री गरमगरम् भाजी वरण आणि पोळ्या आयत्या मिळायच्या, म्हणजे मी काहीच करत नव्हते अशातला भाग नाही, पण माझ्यापेक्षा त्याला कूकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. अभ्यासामधून ब्रेक म्हणून कूकिंग करायचा म्हणे!!  नाहीतर आम्ही... अभ्यासामधून ब्रेक म्हणून ऑक्रुट नाहीतर नवीनच आलेल्या फेसबूकावर बागडायचं!

Wednesday, 2 November 2016

रहे ना रहे हम (भाग २०)

नोकरीमधलं पहिलंच परफॉर्मन्स अप्रेझल काही खास गेलं नाही, मला सुब्रमण्यम सरांनी याची वॉर्निंग दिलीच होती. माझा परफॉर्मन्स (एच आरच्या दृष्टीनं) फार खास नव्हता. मला त्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम नव्हता, फार काय पगारवाढ जास्त होणार नाही, की फरक पेंदा है! बाप नावाचं एटीएम अजून कमावत होतंच. मी वेळेत ऑफिसला जात होते आणि दिलेली सर्व कामं करत होते हेच माझ्या दॄष्टीनं भारी होतं. आमच्या घराण्यामध्ये “नोकरी” करणारं कुणी नव्हतंच. आजोबांचा आंब्यांच्या कलमांचा धंदा, बाबाचे तर अनेकोनेक वेगवेगळे धंदे, काकाकाकूंचा दवाखाना म्हणजे स्वतंत्र बिझनेसच. नोकरी करणारी मी पहिलीच. त्यामुळे हे सर्व तसं नवीनच. माझे रिपोर्ट्स वेळेवर जायचे, लॅंग्वेज कमांड चांगली होती, त्यामुळे चुका फारश्या असायच्या नाहीत. परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे काय आणि त्याचा एकंदरीत करीअरवर कितपत परिणाम होतो वगैरे गोष्टी समजल्याच नव्हत्या. त्यात मी कॉलेजामधून डायरेक्ट आले ती नोकरीमध्ये. तेपण फारशी शोधाशोध न करता. माझ्यासाठी हे कॉलेजचंच एक्स्टेन्शन असल्यासारखं. रॉय आणि मी तर एकाच वर्गात होतो. पण इतरही बरेच जण, माझ्यासारखे कॉलेजामधून आलेले होते. आमचा एक भलामोठ्ठा ग्रूप तयार झाल्यासारखंच होतं. सगळेच अनमॅरीड त्यातही बहुतेकजण सिंगलच होतो, त्यामुळे ऑफिस म्हणजे कॉलेजच्या कॅंटीनसारखं कायमच हॅपनिंग होतं. कॉलेजच्या रंगीबेरंगी कपड्यांमधून एकदम टकाटक फॉर्मल्समध्ये आलो इतकाच काय तो फरक.
पण ऑफिसमध्ये कितीही मज्जा येत असली तरी मला काहीतरी खुपत होतं, हे मला करायचं नव्हतं, असं सतत वाटायचं. मला प्युअर रीसर्च मध्ये रस होता, आता जरी मी रीसर्च असिस्टंट असले तरी माझं मुख्य काम माझ्या फिल्डमधल्या सायंटिफिक रीसर्चचा डेटा कोलेट करून त्याची समरी आणि रिपोर्ट बनवणे इतकंच होतं. हे इतकं पण काही इंटरेस्टिंग वाटत नव्हतं, थोड्या दिवसांनी तर मोनोटोनस वाटायला लागलं. पण आता जॉब प्रोफाईल बदलून मिळाला नसता, त्यामुळे आहे तेच काम ओढत राहिले. रॉय अजूनही युएसमध्ये पीएचडी साठी ट्राय करत होता. त्याच्या नेट सर्चमध्ये मी थोडीफार मदत करत होते. तिकडच्या युनिव्हर्सिटीचे डीटेल्स आणि रीसर्चसाठी मिळत असलेले सब्जेक्ट्स बघून एकदम भारी वाटायला लागलं होतं. हळूहळू रॉयसोबत मीही डीसीजन घतला. आपणसुद्धा अप्लाय करायचं, सिलेक्ट झाल्यावर आईबाबा “नाही” म्हणणार नाहीत. आधीच सांगितलं तर कदाचित ते नको म्ह्णतील. पण ऍडमिशन हातात असेल तर मला सपोर्ट करतील. अगदी लहान असताना तुम्हाला काय हवंय ते आईबापाला लगेच समजतं, टीनेजमध्ये तुम्हाला काय हवंय ते त्यांना समजू शकतच नाही असं तुम्हाला वाटत असतं, मग त्यामधून केवळ भांडणंच होत राहतात. त्याहून थोडं मोठं झालं की आपल्याला जे हवंय ते आईबापाला नक्की कसं गळी उतरवता येईल याचा बरोब्बर अंदाज आलेला असतो. त्याहून पुढची काही स्टेज असली तर मला माहित नाही, मी अजून तिथं पोचलेले नाहीये.
एकूणात मला नोकरीमध्ये महिन्याच्या अठ्ठावीस  तारखेला बॅंकेत जमा होणार्‍या पॉकेटमनीइतकाच मला रस होता. आफताबसारखं फार करीअर ओरिएंटेड वगैरे वागणं जमलंच नस्तं.
त्या रात्रीनंतर मी आफताबला स्वत:हून कधीही फोन केला नाही, त्यानंही मला कॉल केला नाही. आधी पण आम्ही काय दररोज फोन करत होतो अशातला भाग नाही, पण आता तर पूर्णच संवाद बंद होता. मी निधीलाही फोन केला नाही, मला अजूनच कॉम्प्लिकेशन्स नको हवी होत्ती. आय लव्ह्ड आफताब. आय स्लेप्ट विथ हिम. मला तो कधीतरी एका क्षणापुरता का होइना “माझा” म्हणून हवा होता, तसा मिळाला. याहून जास्त अपेक्षा माझीच कधी नव्हती. पण माझ्याबाबतीत अपेक्षांची गणितं  कायम चुकत आलीत.

त्या रात्री टीव्हीवर क्युंकि सांसभी कभी बहु थी बघत हॉलमध्येच अस्ताव्यस्त पडले होते. खरंतर मला आता या सीरीयलमध्ये कोण कुणाचं काय लागतं ते काही केल्या कळायला मार्ग नव्हता, पण सवय म्हणून मी रोज की सीरीयल बघत होते. मुळात तुलसीचा नवराच इतक्यांदा बदलला होता की मला तिचं कन्फ्युजन कसं होत नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
लतिकानं एकदा भन्नाट किस्सा सांगितला, ती एका मित्राबरोबर अलिबागला गेली, तिथं अतिशय चुकीच्या क्षणी, तिनं या मित्राऐवजी  तिच्या कास्टिंग एजंटचं नाव घेतलं होतं. तो मित्र पण असला की, त्यानं चालू क्रिया ताबडतोब थांबवून तिच्याशी कडाकडा भांडायला सुरूवात केली. आय मीन, आधी काम पूर्ण करावं मग ते काय भांडत बसावं! लतिका म्हणे, “मै तो कन्फ़्युज हो जाती हू! सामने कौन है वो हरबार याद रखना पडता है. अच्छा है के हम  गॉड गॉड कहते रहे. भगवान किसी काम तो आये” लतिका इतकी अचाट होती.
हा किस्सा आठवून आता मी आता एकटीच हसत होते. इतक्यात फोन वाजला. पलिकडे आफताब होता. आमच्या त्या रात्रीनंतर जवळजवळ वर्षभरानंतर आलेला हा त्याचा पहिला कॉल.
“काय वैताग आहे” हॅलो वगैरे काही म्हणायच्या भानगडीत न पडता त्यानं सरळ मुद्दा मांडला.
“कुणाचा?”
“ट्राफिकचा. पुण्यामधून केव्हाचा निघालोय. अजून पनवेलमध्येच आहे” त्याचा आवाज वैतागवाणा कमी आणि चिवचिवणार्‍या चिमणीइतका उत्साही जास्त वाटत होता.
“हे सांगायला फोन केलास”
“केव्हाचा या रस्त्यावर अडकून पडलोय. सहज आठवलं तू इथंच राहतेस म्हणून तुला कॉल केला. आय होप मी तुला डिस्टर्ब करत नाहीय. बिझी आहेस का?”
“मी क्युंकी बघतेय”
“ओह, इतक्या महत्त्वाच्या कामामध्ये मी तुला त्रास देतोय का? ओके, जास्त वेळ घेत नाही. मला फक्त जरा चांगल्या हॉटेल्सची नावं सांग. इथंच कुठंतरी डिनर करेन. असल्या ट्राफिकमध्ये घरी पोचायला दीड दोन वाजतील”
“हॉटेलची नावं आणि नंबर मेसेज करते. पण जर इतका उशीर झाला असेल, आणि अंधेरीमध्ये तुझा कुणी बेइंतिहा इंतजार करत नसेल, तर तू माझ्याकडे येऊ शकतोस. डाळभात रेडी आहे.”
“तुझ्याकडे! आए यु शुअर? स्वप्नील, कदाचित माझी नियत ठीक नसेल” तो हसत म्हणाला.
“कदाचित म्हणूनच मीही तुला बोलवत असेन” मी पण हसतच उत्तर दिलं. इतकं खोटं मी आजवर कधी हसले नसेल. तो इतक्या रात्री कशासाठी फोन करत होता आणि इकडेच का येत होता हे न समजायला मी काय साठच्या दशकांची हिरॉइन नव्हते. तरीही मीच स्वत: त्याला बोलावलं. कौन कंबख्त कहता है के प्यार अंधा होता है... प्यार टोटली कंप्लीट स्टुपिड होता है.
अर्ध्या तासांनी तो माझ्या घरी आला. बिल्डिंगच्या सेक्युरीटीला इतक्या रात्री माझ्याकडे कुणीतरी आल्याचं बघून फारच आश्चर्य वाटलेलं. वॉचमननं लगेच इंटरकॉमवर फोन केला.
“पता है भैय्या, वो मेरा ब्रदर लगता है. अंदर भेज दो और कार पार्किंगमे आज् रातके लिये जगह देदो” मी त्याला सांगितलं. त्या रात्रीनंतर आम्ही परत पहिल्यांदाच भेटत होतो. मला वाटलं की फारच ऑकवर्डनेस असेल, पण त्याच्या वागण्यामध्ये तसं काहीच वाटलं नाही. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. येतानाच त्यानं चायनीझ फ्राईड राईस आणि आईस्क्रीम पार्सल आणलं होतं. हे आणायला हॉटेल बरं सापडलं होतं याला. मी त्याला राईस मायक्रोवेव्हमध्ये गरम करून दिला, तसं माझं जेवण आधीच झालं होतं, पण आईस्क्रीमला सर्व गुन्हे माफ असतात.
“तुझे पता है, आईस्क्रीम दूधसे बनती है” माझ्या बाजूला बसत तो म्हणाला.
“थॅंक्स फॉर द जनरल नॉलेज अपडेट” मी टीव्हीचं चॅनल बदलत म्हटलं. सेट मॅक्सवर सूर्यवंशम लागला होता. म्हणजे जगामध्ये सर्व काही नॉर्मल चालू असावं.
“तू दूध पित नाहीस, मग आईस्क्रीम चालतं?”
“आईस्क्रीम चालत नाही आफताब! ते विरघळतं. तसंपण मी आईस्क्रीम खाते कारण मला ते आवडतं. दूध पित नाही कारण ते मला आवडत नाही. जरी दुधापासून आईस्क्रीम बनवत असले तरीही दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. फिजीकल प्रॉपर्टीज वगळ्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, त्यामुळे यु कान्ट कंपेअर”
“मी कंपेअर करतच नाहीय फक्त मला कधीकधी तुझी मजा वाटते.”
“मला माहिताय, मीच एकंदरीत तुझ्यासाठी मजेचा मामला आहे. हो ना?” मी अचानक गरज नसताना बोलून गेले.
“स्वप्निल, व्हॉट आर यु सेइंग? वाईट टोमणा मारतेस!” तो अचानक सावरून म्हणाला.
इतका वेळ दाबून धरलेला माझा धीरपण आता बाहेर पडला. “टोमणा नाही, सत्य तेच सांगतेय. त्या रात्रीपासून मला कॉल केला नाहीस. आणि आज अचानक मी तुला घरी बोलवेनच अशी काहीतरी कहाणी रचून मला सांगितलीस. आफताब, मी मूर्ख नाहीये. हे नातं तुझ्यासाठी केवळ फिजीकल रिलेशनशिपवर आहे हे मला माहित आहे तरीही...”
मी बोलत असतानाच त्यानं माझ्या ओठांवर त्याचा हात ठेवला. “काहीही बोलू नकोस. त्या रात्रीनंतर मी तुला काय फोन करणार होतो? वी गॉट ड्रंक, वी स्लेप्ट टूगेदर. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तू निघून गेली होतीस. मोबाईलवर तुझा “मी पनवेलला जातेय” इतकाच मेसेज. इतकं सारं घडल्यावर फोन करायची माझी हिंमत नव्हती. तू फोन करशील म्हणून खूप दिवस वाट पाहिली. अगदी अझरभाईला पण आडून आडून विचारलं. डोंट वरी. त्याला हे सगळे झोल काही माहित नाही. पण मी आज दिवसभर फक्त तुझाच विचार करतोय. तुला फोन करू का की नको. स्वप्निल, तुझ्या मनामध्ये अजून दुसरंच कुणीतरी आहे असं अझरभाई म्हणाला. त्यानंतर मला समजेना की...”
“तू यामध्ये माझी ढाल का वापरतोस? मला फोन करण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतो? मी त्यादिवशी निघून गेले, कारण जाग आल्यानंतर तुझ्या मोबाईलमध्ये मला निधीचा ती तुझ्या घरी येत असल्याचा मेसेज दिसला. त्याक्षणी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली, तुझ्यासाठी मी केवळ सेक्सटॉय असू शकते, पण मी इमोशनली अटॅच्ड आहे त्याचं काय? निधीशिवाय तू जगू शकत नाहीस हे सांगून माझे कान किटवले आहेस. मग त्यानंतर सर्वच इतकं कॉम्प्लिकेटेड झालं की मी तुझ्यासून दूरच रहायचं ठरवलं. पण ते जमत नाही. आजही तू फोन केलास मी तुला घरी ये म्हटलं. मी स्वत:ला पूर्ण ओळखून आहे, त्यामुळे कदाचित आजची रात्रही आपण एकाच चादरीत घालवू....बट दॅट डझ नॉट मीन दॅट...”
“नाही, स्वप्निल. मी इथं केवळ सेक्ससाठी किंवा... मजा मारण्यासाठी आलो नाहीय. मी.... मला सांगायचंय की, त्या रात्रीनंतर.... मला.... स्वप्निल.. हे फार कन्फ़्युझिंग आहे. आय डोंट नो...”
“इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा तुला असं अडखळताना बघतेय.”
तो क्षणभर माझ्याकडे रोखून बघत राहिला. “स्वप्निल, निधी चॅप्टर इज ओव्हर फ़ॉर मी. फॉरेव्हर”
“त्यात काय मोठी न्युज आहे. तुमचा ब्रेकप हजारदा होतो, हजार प्लस एक वेळेला पॅचप होतो”
आणि मग अचानक इतका वेळ त्यानं घेतलेला “नॉर्मलपणाचा” मुखवटा धाडकन गळून पडला. त्याचा फोन आल्यापासूनच काहीतरी गडबड असल्याच जाणवत होतं. त्याचं एकंदरीत वागणं उसनं अवसान आणल्यासारखं होतं. खाली मान घालून त्यानं एक एक शब्द उच्चारला. “निधीचं लग्न झालं. आज. दुपारी. साडेतीनवाजता”
ही बातमी खरंच फार शॉकिंग होती. निधीचं लग्न ठरलेलं मला कसं माहित नाही? मला आईपण याबाबतीत काही बोलली नव्हती. गावामध्ये अश्या बातम्या आईला खरंतर आधीपासून माहित होतात.
“काय सांगतोस? पुण्यामध्ये? तू तिच्या लग्नाला गेला होतास?” इतक्या सीरीयस क्षणी बावळट प्रश्न विचारायचे अनेक फायदे असतात. समोरचा स्वत:चं दु:ख विसरून लगेच आपली अक्कल काढायला धावतो. खासकरून समोरचा जर आफताब असेल तर
“वेडी आहेस का स्वप्निल? तिच्या लग्नाला मी जाणारे का? इथं मुंबईत झालं. मुंबईचाच मुलगा आहे पण जॉबसाठी युएसला असतो. टिपिकल आयटी वाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरलं. लगोलग झालं. निधीनं तिच्या घरी म्हणजे होणार्‍या नवर्‍याला सांगितलं की तिला एक मुसलमानाचा मुलगा फार त्रास देतो पार कॉलेजपासून, तो गावी हे लग्न सुखासुखी होऊ देणार नाही म्हणून लग्न मुंबईलाच करू या. त्या मुसलमानाच्या गुंडमवाली मुलाला कळू नये म्हणून गावी कुणाला खबर लागू दिली नाही. लकी गर्ल!” पण हे बोलताना आफताबचे डोळे भरून आले होते.
“मला हे आधी का नाही सांगितलंस?”
“मग मी इथं का आलोय? स्वप्निल, तुझ्याखेरीज कुणाला हे सांगू? मलाच आज सकाळी समजलं. काय करावं सुचेना, घरामध्ये स्वत:ला संपवायचे विचार यायला लागले. अझरभाईला फोन केला तर तो म्हणाला की कामासाठी गोव्याला गेलाय. आपण उद्या बोलू. मग मी काय करणार! सगळं जग हरल्यासारखं वाटतंय. निधी मला सोडून गेली याचं काही नाही. ते आजनाउद्द्या होणार होतं. मला पक्कंच माहित होतं. पण तरीही अखेर तिनं माझी किंमत गुंड पोरगा इतकीच केली. काय त्रास देणार होतो मी तिला? तोंडावर येऊन सांगायचं होतं ना, की ब्वा आफताब! माझ्यामध्ये वेगळ्या धर्मातल्या मुलाशी लग्न करण्याची हिंमत नाही. माझ्या आईवडलांची जगामध्ये जी काय नाचक्की होइल त्याची मला जास्त पर्वा आहे. तर आपलं जे काय नातं होतं ते ठिक, पण मी दुसर्‍याशी लग्न करतेय. इतकं कबूल जरी केलं असतं ना तरी मी मानलं असतं. खैर! जे घडलंय ते ऑलरेडी घडून गेलंय. माझ्याकडे आता मन मोकळं करायला कुणीही नाही. फ्रेंड्स नाहीतच. तूच एक होतीस. तुझ्याहीसोबत त्या रात्रीनंतर नात्यामध्ये विनाकारण कॉम्म्प्लीकेशन्स आलेत. आय नो, मी तेव्हा चुकलो.”
“आपण दोघंही चुकलो”
“तसं म्हण. पण सत्य हेच की, मी माझ्या आयुष्यामध्ये असलेली एकमेव मैत्रीण तेव्हा गमावली. मला तुला गमवायचं नाहीये, फ़रगेट फिजिकल रिलेशनशिप ऍंड ऑल दॅट. मला माझी बेस्ट फ्रेंड परत हवीये. मी इथं मजा मारायला आलो नाहीय स्वप्निल. माझ्या प्रेमभंगाच्या दु:खावर रडण्यासाठीही आलो नाहिये. मला फक्त एक आधार हवाय. स्वप्निल, शक्य झालं तर ती रात्र आपल्या आयुष्यामध्ये आलीच नाही असं समज किंवा त्या रात्री मी तुझ्या गैरफायदा घेतला असं समज. पण आज मी इथं आलोय ते केवळ एक मित्र म्हणून!”