निधीच्या लग्नाची तारीख
मला पक्कीच माहित आहे. एकवेळ ती किंवा तिचा नवरा विसरेल पण मी विसरणार नाही.. कारण
त्या रात्री आफताब पहिल्यांदा माझ्या फ्लॅटवर आला. अर्थात त्या रात्री आमच्यामध्ये
काहीच फिजिकल घडलं नाही. त्याला मैत्रीच्या आधाराची गरज होती, माझ्यासाठी माझ्या
प्रेमापेक्षाही मैत्रीचं नातं जास्त महत्त्वाचं होतं. पण तरी त्यानंतर तो सतत येतच
राहिला. कधी वीकेंडला तर कधी सुट्टी आहे म्हणून सहज. मग कधीतरी माझी आठवण आली
म्हणून. हक्कानं तो येत राहिला आणि आमचं नातं तसंच वाढत गेलं.
नातं म्हणायला गेलं तर
फार मोठी कन्सेप्ट होईल. मी आणि आफताब एकमेकांना ओळखतच होतो, अरिफच्या बर्थडेदिवशी
एकमेकांना शरीरानंदेखील व्यवस्थित ओळखू लागलो आणि मग हळूहळू हीपण ओळख अधिकाधिक दृढ
गेली. मला कधीतरी हे खरंच वाटायचं नाही की इतक्या वर्षांनी आफताबच्या ओठांवर
निधीचं नाही तर माझं नाव होतं. माझी निधीसोबत काही इर्षा नव्हती. म्हणजे किमान
सुरूवातीला तरी, नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की मीच आफताबच्या प्रेमात पडले
आहे, त्तेव्हा कळत नकळत का होईना निधीचा जाम राग यायचा. ते साहजिकही होतं. निधीनं त्याच्याशी
लग्न न करायला धर्म हे एकमेव कारण होतं (म्हणे!). गेली सात वर्षं त्याच्यासोबत
फिरताना, झोपताना तिला या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही का? मला ती लग्नानंतर
एकदा फक्त भेटली. गावी आली होती तेव्हा आमच्या दुकानामध्ये येऊन गेली.. त्यावेळी
तिच्यासोबत तिचा नवरा होता, त्यामुळे मला आफताबबद्दल काही बोलणं शक्य झालं नाही.
तरीही “कशी आहेस? लग्नाचं काय ठरलं?” या तिच्या खवचट प्रश्नाचं उत्तर देताना मी पण
तितक्याच खवटपणे सांगितलं “लवकरच ठरतंय, आमचे नेबर आहेत सुर्वे. त्यांच्याच
धाकट्या मुलासोबत. तू पाहिलंयस ना त्याला? सीए झालाय तो?” मी बोलत असताना निधीचा
चेहरा काय रंगला होता हे इथं लिहून मजा येणार नाही. त्यादिवशी हे उत्तर देऊन मी
माझ्यापरीनं सूडाला पूर्णत्त्वाकडे नेलं होतं. पण तरी अखेर निधीचीच सरशी झाली!!! मला
आणि आफताबला तिनं वेगळं केलंच.
पण ते फार नंतर!
महत्त्वाचं काय तर अखेर, आफताब अंधेरीच्या फ्लॅटमधलं त्याचं सर्व सामान घेऊन
माझ्या फ्लॅटवर रहायला आला. सामान म्हणायला होतं काय, ढीगभर पुस्तकं आणि दोन
कपड्यांच्या बॅगा. हे पुरूषांचं एक बरं असतंय, आमचं झालं तर कपड्यांच्याच दहाबारा
बॅगा भरतील. त्याला आता पुढची सीएफएची परीक्षा द्यायची होती. त्यासाठी चिक्कार
अभ्यास करायचा होता आणि म्हणून त्यानं नोकरीमधून वर्षभर ब्रेक घेतला होता. परीक्षेशिवाय
मुख्य कारण म्हणजे, निधी प्रकरणामधून आलेलं डिप्रेशन होतं. हे त्याला स्वत:लाही
नीट माहिती होतं. त्याला पैशाचा तसा काही प्रश्न नव्हता. सीए म्हणून काही छोटीमोठी
रीटर्न्स भरायची वगैरे कामं करून चाललं असतं. आता अभ्यास करण्यासाठी माझा फ्लॅट
अतिशय निवांत म्हणून तो इकडे रहायला आला. म्हणजे,
खरंतर मीच त्याला तसं सुचवलं. आमच्या बिल्डिंगजवळ असलेल्या एका अतिशय महागड्या
क्लासमध्ये सीए इंटरच्या मुलांना शिकवण्यासाठी त्याला जॉब आला. एखाद्याला “शिकवणे”
याची त्याला इतकी आवड होती की, त्यानं पगार वगैरे कसलाही विचार न करता डायरेक्ट हो
म्हणून सांगितलं. अर्थात पगार जबरदस्तच होता.
तो माझ्या घरी रहायला
येईपर्यंत आईबाबाला यातलं काहीच माहित नव्हतं म्हणजे अधूनमधून येतो तेसुद्धा माहित
नव्हतं. त्यामुळे आमचं काही फिजिकल आहे हे समजायचा प्रश्नच नव्हता. केदारच्या
वेळेला आईला सर्व समजल्यावर तिनं माझी बरीच खरडपट्टी काढली होती. त्यात नेहमीचे
“स्त्रीची अब्रू काचेचं भांडं” वगैरे फिल्मे डायलॉग तर होतेच. त्यामुळे मी हा
मामला तिच्यापासून जरा लांबच ठेवला. तसे हल्ली आईबाबा इकडं जास्त यायचे नाहीत.
बाबा स्थानिक राजकारणामध्ये बरा रमला होता, दिवसामध्ये दोन चार दुकानांमध्ये
महागडा माल विकून झाल्यावर उरलेला वेळ तो पक्षाच्या कामामध्ये गुंतला होता. कॉलेजच्या
गुंडागर्दीनंतर राजकारणामध्ये जायला बाबाला तसा उशीरच झाला म्हणायचा. आईनं वेळ
जायला म्हणून अनेक उपद्व्याप लावून घेतले होते. कुठे बालसाक्षर वर्ग, कुठे महिला
बचतगटांना मार्गदर्शन, तर कुठे काय कसलं! हे उद्योग वेळ खायला उठू नये म्हणून केले
पण आता मलाच खायलासुद्धा वेळ नाही असं तिनं मला ऐकवलं होतं. शाब्दिक कोट्या म्हणून
ठिकच आहे तरीही हे खरं की माझे आईबाबा आता अतिशय बिझी झाले होते. खरंतर मी आईला
किंवा बाबाला आफताबबद्दल सांगायला हरकत नव्हती. पण मी सांगितलं नाही. काय सांगणार?
या नात्याला काहीही भविष्य नव्हतं. मुळात त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं!
ही गोष्ट कितीही कडू
वाटली, अप्रिय वाटली तरीही खरी होती. तो माझ्यासोबत होता. फिजिकली वी वेर ग्रेट!
इमोशनलीही आम्ही एकमेकांचा आधार होतोच पण तरीही मी आफताबचं “प्रेम” नव्हते. हे
त्यानंच मला सांगितलं होतं. निधीच्या लग्नादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला त्याच्या
दुसर्या दिवशी.
“स्वप्निल, मला अजून
कॉम्प्लिकेशन्स नकोयत. मी निधीला अजून विसरलो नाही. विसरेन असंही वाटत नाही. मला
तू आवडतेस, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, पण याहून अधिक दुसरं नाव मी या नात्याला
याक्षणी देऊ शकत नाही. जर हे तुला मान्य नसेल तर मी निघून जाईन. पण मी तुला कसलीही
कमिटमेंट देऊ शकत नाही.”
मला नात्याला नाव,
कमिटमेंट वगैरे गोष्टी हव्याच कुठे होत्या? मला केवळ तो हवा होता. निधीला अजून
विसरू न शकलेला तरीही माझ्यासोबत राहणारा असा हा बॉयफ्रेंड मीच स्विकारला होता.
त्यामुळे त्याबद्दल नो रीग्रेट्स! ही गोष्ट
आईबाबाला अजिबात न सांगता निभावणं हे अतिशय रिस्की होतं. जर चुकून त्यांना बाहेरून
कूठंतरी समजलं तर आजवर त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिंध्या
उडाल्यासारखं झालं अस्तं. हे नातं अतिशय क्षणभंगुर होतं याची मला कायमच जाणीव होती
आणि म्हणूनही असेल पण हे नातं जितके दिवस टिकतंय तितके दिवस का होईना मला
आसुसल्यासारखं जपायचं होतं. त्याच्याकडून मला याहून दुसरी काहीही अपेक्षा तेव्हा
नव्हती.
पण, आशा अपेक्षा आणि नाती
अशी कायमच एकसारखी राहत नाहीत. पेट्रीडिशमध्ये ठेवलेल्या फंगससारखी ती सतत बदलत
राहतात. पण ते पुढे. सध्यातरी माझा बॉयफ्रेंड माझ्या घरी मूव्ह झालाय. आम्ही
म्हणजे अगदी न्युएज लिव्ह इन कपल आहोत असं माझ्या ग्रूपमधल्या प्रत्येक फ्रेंडचं
मत पडलंय. काहीतरी भयंकर परंपरा वगैरे मोडल्याचा फील तेव्हा निमिषभर का होईना पण
येऊन गेला होता.
आम्ही दोघं एकत्र रहायला
लागल्याचा साईड इफेक्ट म्हणजे, माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स एकदम सुधारला. आता हे काय
कॉज आणि इफेक्ट इतकंसाधं सोपं नाहीये. मी रोज ऑफिसमधून आल्यानंतर सर्व घडामोडी सविस्तरपणे
त्याला सांगायचे, दोघांमध्ये बोलायला रोज काहीतरी विषय नको! त्यानंतर मग एक्स्पर्ट
कमेंट चालू व्हायच्या, “तू त्याला मेल करायचं ना. आणि फोनवर हे टॉपिक कधी डिस्कस
करायचे नाहीत. मिनट्समध्ये हा पॉइंट मेन्शन का केला नाहीस, सरांना सांग, हे माझ्या
कामात बसत नाही तरीही मी केलंय. आणि अगदी बेस्ट वेने केलंय” वगैरे वगैरे. कॉलेजं
संपली तरी आमच्या घरात लेक्चर्स चालूच राहिली पण हळूहळू ऑफिसच्या कामाला शिस्त
आली, प्रोफेशनल अप्रोच बदलू लागला.
घरातही बरेच बदल झाले. पहिली
गोष्ट म्हणजे, माझं ऊठसूट हॉटेलमध्ये ऑर्डर करणं बंद झालं. घरामध्ये ओट्स
कॉर्नफ्लेक्स, मुसली वगैरे हेल्दी (आणि भयंकर बेचव गिळगिळीत) वस्तू आल्या. आपल्या
रोजच्या आहाराचे तीन भाग असतात. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे लहानपणी पहिली
दुसरीमध्ये ईव्हीएसमध्ये शिकवलं होतं. आता इतक्या वर्षांनी त्याचा पुढचा धडा
शिकले, ब्रेकफास्टला केलेले पोहे दुपारी दोन वाजता गरम करून खाणे म्हणजे लंच नव्हे
आणि तेच पोहे रात्री परत (वर शेवकांदा घालून) खाणे म्हणजे डिनर नव्हे. मुळात पोहे
एकदा खाण्यापुरतेच बनवावेत. अर्धा किलो पोहे हे महिन्यातून तीन चार वेळेला बनवता
येतात एक्दाच सर्व करायची गरज नसते. शिवाय एकावेळेचे पोहे करून झाल्यावर नीट
डब्यात भरून ठेवावेत. पिशवीला स्टेपलरच्या पिना मारून सापडेल त्या डब्यात टाकू
नये. वगैरेवगैरे. चाचींनी तिन्ही मुलांना सगळा स्वयंपाक शिकवला होता. त्यात इतकी
वर्षे तो एकटा राहत असल्यानं सर्व करायची सवय लागली होती. त्यामुळे सकाळी मी
ऑफिसला जाण्याआधी ब्रेकफास्ट. दुपारी स्वत:पुरतं लंच, आणि रात्री दोघांसाठी ताजं
गरमागरम डिनर इतकं तोच करत होता. पुढं नंतर अभ्यास वाढल्यानंतर महिन्याभरानं
त्यानंच सोसायटीमध्ये शोधाशोध करून पोळ्यांना बाई लावली. त्यात मला काय प्रॉब्लेम
असणारे! रोज सकाळी त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करून मी ऑफिसला बाहेर पडायचे. रात्री
गरमगरम् भाजी वरण आणि पोळ्या आयत्या मिळायच्या, म्हणजे मी काहीच करत नव्हते अशातला
भाग नाही, पण माझ्यापेक्षा त्याला कूकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. अभ्यासामधून
ब्रेक म्हणून कूकिंग करायचा म्हणे!! नाहीतर
आम्ही... अभ्यासामधून ब्रेक म्हणून ऑक्रुट नाहीतर नवीनच आलेल्या फेसबूकावर बागडायचं!