Monday, 5 September 2016

रहे ना रहे हम (भाग १७)

मी फोनवर काय बोलतेय याकडे लतिकाचं खूपच लक्ष होतं. खरंतर तिला माझी इतकी काळजी करायची गरज नव्हती. पण तिला माझा मित्र हा विषय गॉसिपिंगसाठी फार मजेदार वाटला होता.  आफताबचा फोन मी दरवेळेला कट करू शकत नव्हते.
“आज पण भाई गेला होता” तो पलिकडून मला सांगत होता. “माफी मागून झाली. मौलवी तर म्हणाले की रागाच्या भरात दिलेला तलाक कधीच मान्य होत नाही. पण ती आणि तिच्या घरचे ऐकत नाहीत” मला हॉस्टेलवर येऊन पंधरा दिवस झाले होते. त्या रात्रीनंतर दोन तीन दिवसांतच मी इकडे आले. आफताब लगेच निघणार होता, पण मीच त्याला जाऊ नको म्हटलं. अझरला आता कुणाच्यातरी आधाराची गरज होती. अझरने परत एकदा नूरीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला अण ती ठाम होती. तिच्यामते, एकदा तलाक देऊन झाला की रिश्ता खतम. अझरने माफी मागून किंवा अजून काहीही करून नातं परत जोडता येणार नाही. “परवा घरी येऊन तिचं सगळं सामान घेऊन गेली. मी त्र खोलीबाहेर आलोच नाही. यु वोंट बीलीव्ह, स्वप्निल, ती घरात चक्क बुर्खा घालून फिरत होती. आय मीन चेहरा झाकून का तर अझर आता तिच्यासाठी परका पुरूष झाला.”
नूरी आणि अझरच्या भांडणाम्ध्ये बुरख्याचा विषय कायम असायचा, त्याला आवडायचं नाही आणि तिला बुरखा घालणं म्हणजेच धर्मपालन वाटायचं. “माझ्यासोबत येताना बुरखा घालू नकोस” असं त्यानं म्हणायचा अवकाश की हिचं किंचाळणं चालू.
“तीन महिने आता हे तलाकचं काम चालेल. दर महिन्याला तिच्या घरी जाऊन अझर तलाक देईल. साक्षीदार असतील आणि अजून काहीबाही. मी त्याला याबद्दल फारसं विचारत नाही. त्यालाही खूप मनस्ताप झालाय, शिवय काही झालं तरी या संपूर्ण भानगडीमध्ये माझीच चूक होती. मीच... माझ्यामुळे झालं हे सर्व.
“कमॉन, हे आज ना उद्या होणारच होतं. तिचं वागणं तुला माहित आहे”
“हो, पण भाईला असं वाटत नाही ना. तिला थोडा मानसिक प्रॉब्लेम आहे ती हिस्टेरीक होते हे आपण समजून घ्यायचं असं आमचे समजूतदार भाईसाहेब म्हणतात. च्यायला, मी रीझल्टसाठी गावाला आलोच नसतो तर हे काहीही घडल नसतं.”
“आत्याबाईला मिश्या असत्या तर तिला काका म्हटलं असतं.”
तो हसला. “पण आमच्या आत्याबाईला मिश्या आहेतच. तू पाहिलंस का तिला? चालायला लागली की घर हादरतं” त्यानं विषय थोडासा बदलला. मग पाचेक मिनिटं आम्ही आमच्या नातेवाईकांची यथेच्छ टिंगल केली. अपवाद फक्त माझ्या काकूचा. आफताबला माझी काकू फार आवडायची, मला पण तिच्याबद्दल आदर होताच. पण काकू आफताबचा क्रश होती!! चक्क!!! 

आम्ही बोलत अस्तानाच पाठीमागून फार ओळखीचा आवाज आला. त्यानं फोन होल्डवर टाकला. त्या आवाजासोबत त्याचं काहीबाही बोलणं चालू असणार. त्यानं लगेच अनहोल्ड केला. “आफताब, तू कुठं आहेस?” मी त्याला विचारलं.
“काल पुण्य़ाला आलोय. भाई म्हणाला किती दिवस इथे राहशील? नोकरी शोधायला नको? म्हणून...”
“निधी?” पलिकडून एकदम शांतता पसरली. “आफताब! निधी... परत?”
“काय करू? मीच तिला फोन केला. खूप एकटं एकटं वाटायला लागलं. अझरभाईचं हे सर्व झाल्यावर...”
“आय डोंट बीलीव्ह दिस.. तू मागे म्हणाला होतास की,..”
“येस्स, मी बरंच काही बोललो होतो. पण सत्य परिस्थिती हीच आहे की, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. नाही राहवत गं. कधीकधी स्वत:चीच लाज वाटते. दरवेळेला जाऊन सॉरी म्हणायला..”
“कमॉन, तुला तिचा स्वभाव माहित आहे. तिला तुझी काहीही गरज नाही हेही तुला माहित आहे. तुलाच काय गरज आहे ते मला समजत नाही. आय ऍम सॉरी, मी कदाचित जास्त बोलत असेन...”
“नाही, स्वप्निल. तू म्हणतेस ते मलाही पटतं पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. माझी कमजोरी समज किंवा अजून काही. पण जमत नाही” आफताबचा मला याबद्दल कायम आदर वाटलाय, त्याला त्याच्या स्ट्रॉंग पॉइंट्सची जितकी माहिती होती, तितकीच वीकनेसचीही होती. खरं सांगायचं तर मला त्याचं हे सारखं निधीकडे जाणं कधीच पटलं नाही. मनामधून एखाद्याला तोडून टाकल्यावर मला त्या व्यक्तीबद्दल अगदी तटस्थपणे विचार करणं शक्य होतं. केदारच्या बाबतीत मी तसंच केलंही होतं. पण आफताबला ते कधीही शक्य झालं नाही. ना निधीच्या बाबतीत, ना माझ्या बाबतीत.
माझा एम एस्स्सीच्या सेमीस्टरचा निकाल मस्तच लागला. विषय सगळेच माझ्य आवडीचे होते. वाचन भरपूर चालू होतं. सर्वच प्रोफेसर अगदी मनापासून शिकवायचे. त्यातही मला दोन सब्जेक्टमध्ये कॉलेजमध्ये हायेस्ट मार्क्स  होते. “यु शूड थिंक अबाऊट पीएचडी इन स्टेम सेल” आमचे सुब्रह्यमणम सर मला दोनतीनदा म्हणाले. हे सर तसे नवीनच होते. कॉलेजमध्ये नुकतेच आले होते. त्यांच्या साऊथ इंडीयन उच्चारांमुळे सर्व त्यांची चेष्टा करायचे. पण मला त्यांचे उच्चार समजायचे, शिवाय त्यांचं शिकवणं आवडायचं. अगदी प्रेमानं आणि तळमळीनं शिकवायचे. शाळेत असताना मला एखादी कन्सेप्ट समजली नाही की आफताब कसा अगदी हताश होऊन बेसिकपासून समजवायला सुरू करायचा, तसंच सुब्रह्मण्य़मसर वर्गामध्ये शिकवायचे. माझे मार्क्स बघून त्यांना मनापासून आनंद झाला होता.



<<<<<< 
“जब देखो तब फोन पे रहती है तो स्टडी कब करतीहै?” लतिकाने मला मार्क लिस्ट पाहून चिडवलं, हे वरवर चिडवण्यासारखं असलं तरी बरंच खोचक होतं. लतिका तीन सबजेक्ट्समध्ये कंप्ल्लीट फेल झाली होती. शिवाय अटेंडन्स कमी असल्यामुळे तिच्या घरून पालकांना लेटरसुद्धा गेलं होतं. नेक्स्ट सेमीस्टरला बसण्यासाठी तिला परवानगी मिळाली नव्हती. याचा तिच्यावर फार काही परिणाम झाला नव्हता. तिला अजून दोन तीन फोटो शूट मिळाले होते आणि त्यामध्येच ती खुश होती. मला तिच्या फिल्डबद्दल फार काही माहित नव्हतं, पण मी तिला एकदोनदा म्हट्लं की असे छोटे मोठे प्रोजेक्ट्स करण्यापेक्ष मॊठी सीरीयल किंवा फिल्म्स मिळण्यासाठी प्रयत्न कर, तेव्हा ती माझ्यावर चिडली. “तुमको क्या मालूम स्ट्रगल क्या होता है? तुम छोटे गांव के लोगोंको लगता है सब कुछ रेडीमेड मिलता है!” म्हणून माझ्यावर डाफरली. मरेनात का. मी तिचा नाद बराच कमी केला.
यावेळी गावी गेले होते तेव्हा आईनं मला आठवणीनं गौतमीच्या लग्नाची पत्रिका दिली होती. बीएससीनंतर तिनं एक वर्ष डीएड केलं होतं. डीएडची फायनल व्हायच्या आतच तिचं लग्न ठरलं होतं. मा्झ्या घरी येऊन तिनं पत्रिका आणि तिचा मोबाईल नंबर दिला होता. लग्नाला जाणं काही मला जमलं नाही, मी तिच्या नंबरवर फोन केला. पण नंबर सतत नॉट रीचेबल येत राहिला.
माझं एमएससीचं सेकंड इयर चालू झालं आणि आफताबला मुंबईमध्ये जॉब लागला. हे म्हणजे अगदीच बंपरडंपर झालं. कारण. निधीचं पुण्यामध्ये मास्टर्सचं अजून एक वर्ष शिल्लक होतं. त्यामुळे त्यानं पुण्यातच जॉब करावा असं तिचं म्हणणं होतं. पण त्याला मुंबईमधलं पॅकेज अगदीच भरभक्कम होतं. काही झालं तरी आफताबला पैशांची छनछन कायमच समजली होती. त्यामुळे त्यानं इथला जॉब घेणं साहजिक होतं. पगार पाच आकडी म्हणण्यापेक्षा सहा आकडीच्या जवळपास जाणारा होता. त्यानं अंधेरीमध्ये वनबीएचके फ्लॅट भाड्यानं घेतला. सोबत ऑफिसमधलेच दोन तीन कलीग्ज होते म्हणे. माझ्या हॉस्टेलपासून त्याचं घर फार लांब नव्हतं.
अझरभाईच्या तलाकचं सर्व काम पूर्ण झालं. मध्ये कसल्यातरी सुट्टीला घरी गेले होते तेव्हा त्यानंच मला हाक मारली.  “तुला दुकानामधल्या शिंदेकाकांनी निरोप दिलाय, काय गंमत केलीस माहित नाही, पण गावामधलं कंप्युटर्सचं एक दुकान व्यवस्थित चालतंय म्हणे. दिवाळखोरी तर होणार नाही”
“शिंदेकाकांना धन्यवाद सांग”
“मी इतकी निरोपानिरोपी करण्याऐवजी तूच दुकानात येऊन जा की. तितकंच यतीन काकांना बरं वाटेल. दोनच दिवस आहेस ना?”
“होय. तू कसा आहेस?”
“बस्स, जी रहे है” तो नेहमीच्या स्टाईलने हसत म्हणाला.
“जादू. जे घडलं त्यासाठी....”
“त्यासाठी... कुणीही स्वत:वर दोष घ्यायची जरूर नाही. दोष असलाच तर तो केवळ माझा आहे. केवळ माझा...”
“नाही, जादू. तुझ्यासारख्या माणसासोबत असं घडायला नको..”
“काय घडायला नको.. मला माहित होतं की तिला मानसिक प्रॉब्लेम आहे. त्यासाठी औषधोपचार लागतील. पण हे तिला सांगण्याची हिंमत नव्हती. लग्नाला इतकी वर्षं होऊनही मी मूल होऊ दिलं नाही यामागे तिचा मानसिक आजार हे कारण आहे हे मी तिला सांगितलं नाही. आज नाही उद्या सांगू, परवा सांगू. करत दिवस ढकलत राहिलो. आपणच तिला समजून घ्यायला हवं असं स्वत:ला बजावत राहिलो. एके दिवशी या सर्व समजूतदारपणाचा ढोंगीपणा झाला आणि उरलं काय तर तिच्याहूनही प्रचंड संतापीपणा. ती केवळ चिडून ओरडायची, किंचाळायची. मी काय केलं तर ज्या प्रथेची मला मनस्वी चीड आहे त्याच प्रथेचा माझ्यासाठी वापर करून घेतला. नातं केवळ शब्दांनी तोडता येत नाही हे कायम इतरांना सांगत राहिलो आणि वेळ आली तेव्हा त्याच शब्दांचा आधर घेऊन माझं लग्न मात्र मी मोडून घेतलं. मग दोष कुणाचा उरतो? नूरीला जेन्युईन प्रॉब्लेम होता, मला नव्हता. तिच्यापेक्षा माझा गुन्हा मोठा आहे”
“जादू. तू तिला सांभाळून घेतलंस तरी ती तुझ्यासोबत जी काही वागली...”
“त्या प्रत्येक वागण्याचं जस्टीफ़िकेशन आहे, स्वप्निल. तिच्या प्रत्येक वागण्याचं जस्टिफिकेशन आहे. माझ्यासोबत ती जे वागली त्यासाठी. माझ्या वागण्यासाठी काय!!! आफताब हा माझा हळवा कोपरा आहे. तू त्या दिवशी तिथेच होतीस. तू जे ऐकलंस..” मला त्या रात्रीचे नूरीचे शब्द परत आठवले. त्या रात्रीनंतर मी त्याचा विचार कधीच केला नाही, जर नूरी म्हणते ते खरं असेल तर अझर आणि आफताब सावत्रच काय रक्ताच्या नात्याचे भाऊच नव्हते.
“ते खरं आहे,” अझर सावकाश म्हणाला. “माझी अम्मी अरिफ झाल्यानंतर सहाच महिन्यांत गेली. अब्बांनी आईसोबत लग्न केलं तेव्हा ती ऑलरेडी प्रेग्नंट होती. कुणीतरी फसवलं होतं. तेव्हा त्या वयामध्ये मला हे सर्व काही माहित नव्हतं. नंतर मोठं झाल्यावर आईनं स्वत:हून मला सर्व काही सांगितलं. अरिफ आणि आफताबला यातलं काहीच माहित नाही. अरिफला सांगण्याआधीच तो निघून गेला आणि आफताबला मी आजना उद्या सांगणार आहे. पण नूरीला हे कुठूनतरी समजलं तेव्हापासून तिचा आफताबवर फार राग होता. तुला हे सर्व नकळत समजलंय तर..”
“डोण्ट वरी. मी आफताबला काही बोलणार नाही...”
“थॅंक्स. माझी हिंमत झाली की मी स्वत:हून सांगेन. तोपर्यंत तिसयाच व्यक्तीकडून समजलं तर कदाचित!!! नाती इतकी वाईट गुंतागुंत कशाला करतात ना! एखाद्याला तुझं माझं रक्ताचं नातं आहे हे सांगणं फार सोपं आहे गं, पण आपल्याच भावाला काहीही रक्ताचं नातं नाही हे सांगणं फार कठीण आहे”
“सांगायची खरंच गरज आहे का? सध्या इतकं काही चालू आहे की...”
“जे सत्य आहे ते त्याला समजलं तर पाहिजेच. तो त्याचा अधिकार आहे. या सत्यामुळे माझ्या मनामध्ये असलेल्या भावना कधीही बदलणार नाहीत. आजवर बदलल्या नाहीत. तो माझा भाऊ आहे आणि भाऊच राहील. अल्लाकडे दुआ फक्त इतकीच त्याच्याही मनामध्ये हीच भावना त्याला खरं काय ते समजल्यावरही कायम राहूदेत. तेवढं झालं तरी मी भरून पावलो. एनीवेज, आता रहायला तुझ्याजवळच आहे ना. अधेमध्ये आमच्या मजनूवर जरा लक्ष ठेव.”
मी यावर नुसतीच हसले. आफताब वर मी काय लक्ष ठेवणार? पक्षी जरा घरट्यांतून उडतो तसा झूम्मकन आफताब उडाला होता. सॅलरी झाल्यावर पहिल्याच महिन्यांत लॅपटॉप आणि वीस हजारांचा मोबाईल घेतला. इतर बरेचसे महागडे खर्च चालू होतेच. ही एक गंमतच म्हणायची, जेव्हा मी खूप ऍकेडेमिक बनायला निघाले तेव्हा आफताब कंप्लीट “पैसेवाला” झाला होता.

एमएसस्सीच्या सेकंड इयरची सुरूवात बरीच शांतपणे झाली. लतिकाच्या घरून तिला बरीच स्ट्रीक्ट वॉर्निंग मिळाली होती, त्यामुळे ती यावर्षी बराच सीरीयस मूड ठेवून अभ्यास करणार होती म्हणे, मॉडेलिंगवर अजिबात लक्ष देणार नव्हती पण जर.. जर चांगली फिल्म अथवा सीरीयल मिळाली तर त्याचा विचार करणार होती. मला खरं सांगायचं तर यामध्ये आता काहीच इंटरेस्ट राहिला नव्हता. पण तरीही ती जे म्हणेल ते मी रोज ऐकून घेत होते. सेकंड इयर फारच घोळदार असल्याने माझा बराचसा वेळ लॅबमध्ये नाहीतर लायब्ररीमध्ये जायचा. रोजचा आईचा फोन सोडल्यास इतर कुणाशीही फारसं बोलणं व्हायचं नाही. एम एससी करायला घराबाहेर येणं, गाव सोडून मुंबईला येणं हे माझ्या आयुष्यामधल्या बेस्ट निर्णय झाला होता. (म्हणजे मला तोपर्यंत तसं वाटत होतं.)
त्याचवर्षी बारावी झालेल्या माझ्या चुलतभावाचा साहिलचा नंबर मेडीकलला लागला. त्यादिवशी काकाच्या घरी जमून आम्ही सर्वांनी मस्त सेलीब्रेट केलं. तेव्हा काकू म्हणाली, “बरं झालं, आता आमच्यानंतर पण या घराण्यात एक का होइना डॉक्टर होइल” सागरदादा सुट्टीसाठी आला होता, तो लगेच म्हणाला. “असं काही नाही, स्वप्निल पण डॉक्टर होणारे” यडाय का!! असं मला एक क्षणभर वाटलं. पण तोच पुढं म्हणाला. “साहिल तर मेडीकल डॉक्टर होणार. पण स्वप्निल पीएचडी करणार”
“तुला कुणी सांगितलं?” मी त्याला विचारलं.
“सांगायला कशाला हवंय? एमएससीनंतर घरी थोडीच बसशील! यानंतर नोकरी तर काय मिळाणारे! पीएचडी केली तर अर्थ आहे.” त्याचं हे वाक्य मला फार मनापासून लागलं पण उगाच रंगाचा विचका व्हायला नको म्हणून मी गप्प बसले. पण त्या दिवशी हॉस्टेलवर आल्यानंतर डोक्यात पुन्हा नेहमीचंच चक्र फिरायला लागलं. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीच्या संधी होत्या. मला करता आलं असतं, आईबाबा तर आनंदानं तयार झाले असतेच. पण नेमकं कशासाठी?  केवळ शिकायचंय म्हणून मी एमएस्सी केलं नाही, मला या विषयाची आवड होती म्हणून मी इथं आले, पण आता केवळ “आवड” या गोष्टीला महत्त्व देऊन चालणारं नव्हतं. सागरचं म्हणणं फारसं चूक नव्हतं. एमएस्सीला तसा स्कोप कमीच होता. तरीही मला आता वर्षभरानंतर नोकरी करायची की पीएचडी करायची हा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानुसार तयारी करणं गरजेचं होतं. नोकरी केली तरी मला पैशांसाठी करायची नव्हती. घरचं चिक्कार होतं. किंबहुना मी गावी परत जाऊन दुकानं सांभाळते म्हटलं असतं तरी प्रॉब्लेम नव्हता. पण मला गावी परत जायचं नव्हतं, एकतर दुकानांमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता आणि दुसरं म्हणजे, माझं स्वातंत्र्य मला गमवायचं नव्हतं.
आता कदाचित तुम्ही मला स्वार्थी म्हणाला, इतके लाड करणारे आईवडील असताना मला त्यांचा असा काय जाच होणार होता हेही विचाराल. मला आईबाबाचा जाच कधीच जाणवला नाही, आजवर नाही. पण गावातल्यांचं वचावचा बोलणार्‍या  तोंडांचं काय. इथं मुंबईमध्ये मला कुणीही ओळखत नव्हतं. मी रात्री तीन वाजता टॅक्सीमधून भटकले तरी कुणी मला विचारणार नव्हतं.
अर्थात, मला केवळ हे असं अमर्याद स्वातंत्र्यच हवं होतं असं नाही. मला काय लतिकासारखे फिल्मी पार्ट्यांत फिरायचं नव्हतं की आमच्या वर्गामधल्या आरोहीसारखं भर कॉलेजामध्ये पिऊन तमाशा करायचा नव्हता. मला माझं स्वातंत्र्य माझ्यासाठी हवं होतं. त्याहूनही जास्त, या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीची धारदार जाणीव होत राहते, मला ती जाणीव कायम हवी होती. रात्री तीन वाजता भटकताना आपली सुरक्षितता ही आपली प्राधान्यता आहे हे तेव्हाच समजतं जेव्हा तुम्ही एकटे बाहेर असता. हे एकटेपण तुम्हाला फार स्ट्रॉंग बनवत. अन्यथा, आमच्या गल्लीमधल्या कुलकर्ण्यांच्या सुनेसारखं. तिला एकटीला झोपायला भिती वाटायची. कुलकर्ण्यांचा विक्रम सतत फिरतीच्या नोकरीवर. मग काय सूनबाईंची पथारी काकाकाकूंच्या बेडरूममध्ये काकूंसोबत. आणि काका हॉलमध्ये. काकाकाकूंना कुठंही फिरायला जाता येत नाही,  जायचं झालं तर विक्रमदादा फिरतीवर जाऊ शकत नाही. वाटताना ही गोष्ट फार क्षुल्लक वाटते. पण याच गोष्टींवरून त्यांच्या घरात गेली चार महिने भांडणं चालू आहेत. एकट्यानं राहताच न येणं, सतत कुणाचाना कुणाचा तरी आधार घेऊन जगणं हे किती पथेटीक आहे! कुलकर्ण्यांची सून बाजारात जाऊन भाजीपण आणत नाही, म्हणजे तिला आणताच येत नाही. आणली तर किडकीमाडकी भाजी आणते. जगण्यासाठी आपलं आपल्याला स्वतंत्रपणे काहीतरी करता आलं पाहिजे की नाही. अशावेळी मला माझ्या बापाचं कौतुक वाटतंय, केदारसोबत लग्न करताना त्यानं “डिग्री पूर्ण करायचीच” असा जो हट्ट धरला होता, तो आता मलासुद्धा पटायला लागलाय. वास्तविक तेव्हा बाबाचा राग यायचा, पण आता वाटतंय केवळ नावापुढे बीएसस्सी इतकी तीन अक्षरं लावणं इतकंच त्याला अभिप्रेत नव्हतं! किंबहुना, लग्नाच्या आधी प्रत्येक मुलीला आणि मुलालासुद्धा हे असं शहराबाहेर कुठंतरी एकटं रहाणं कंपल्सरी केलं पाहिजे. संसार निभवायच्या आधी आपलं आयुष्य निस्तरता आलं पाहिजे. प्रत्येकालाच.
एमएस्सीचं सेकंड इयर सुदैवानं निवांतपणे पार पडलं. लतिका घरच्या रट्ट्यामुळे का होइना माझ्यासोबत अभ्यास करत होती. मला अभ्यासाव्यतिरीक्त फारसं काम नव्हतं. नाही म्हणायला ग्रूपमधल्या एक दोन पोरांबरोबर मूव्हीडेट किंवा डिनरडेटला गेले होते, पण बात कुछ जमी नही. एक तर मला आता पुरूषांमध्ये मला नक्की काय हवंय ते माहित  झालं होतं. डिनरडेटला जाऊन किसिंगची संधी शोधणारे किंवा मूव्हीडेटला पिक्चर बघायचं सोडून इकडेतिकडे हात घालायला बघणारे बावळट पोरं मला खरंच किळसवाणी वाटायची. केदार बाकी काहीही असला तरी चीप कधीच वागला नाही. शिवाय, त्याच्यामाझ्यामध्ये एक ठराविक नातं होतं, भविष्य होतं- जरीनंतर ते पूर्ण झालं नाहीतरीही – तसं काहीही नसताना केवळ शरीराचे चोचले म्हणून मला हे असलं काही करायचं नव्हतं. हा झाला एक मुद्दा, दुसरा त्याहून महत्त्वाचा मुद्दा होता की, मला या असल्या मुलांसोबत इमोशनली कनेक्ट होताच यायचं नाही, बरेचसे विषय बोलताना त्यांना काही माहितच नसायचं किंवा इंटरेस्ट नसायचा.
 एम कॉम करत अस्लेल्या विशेषसोबत (हे त्याचं नाव होतं!!! गुज्जू लोकं काय पण नावं ठेवतात) गोब्लेट ऑफ फायर बघायला गेले होते. एक तर हॅरी पॉटर सीरीज माझी आवडती. त्यात नवीन आलेला पिक्चर. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेले होते. पिक्चर संपल्यावर विशेष म्हणाला डिनरला जाऊया. मी पिक्चरबद्दल भरपूर बोलत होते. विंकीचं कॅरेक्टरच दाखवलेलं नाही, रीटा स्कीटर ऍनीमॅगी असते ते दाखवलं नाही वगैरे वगैरे.
“एक मिन, तू ये सब कहांसे बोल रही है? पहले तीन पिक्चर्समेंभी नही था”
“अरे, बूक में तो था!” मी वैतागून म्हटलं. “हॅव्हण्ट यु रेड?”
“क्या तुमभी! बूक्स कौन पढता है! मै तो कभीभी फिल्म देखना प्रेफर करता हू. हजार पेजेस की बूक पढनेसे दो घंटेकी फिल्म देखो तो भी कंप्लीट स्टोरी समझ आती है. बूक्स पढना मतलब टाईम वेस्ट”
या वाक्यानंतर त्या विशेष नामक प्राण्याबद्दल मला काही प्रणयविषयक भावना राहू देत, काही मानवविषयक भावना तरी वाटू शकतील का? अख्खं डिनरभर आणि नंतर हॉस्टेलला येईपर्यंत छताला लटकलेल्या पालीकडे आपण ज्या नजरेनं पाहू त्याच नजरेनं मी विशेषकडे पाहत होते. पालीला झाडूने मारता येत नाही म्हणून आपण जिवंत सोडतो तसंच खून करणं हा गुन्हा आहे म्हणून मी विशेषला सोडून दिलं. नेक्स्ट डेटका तो सवाल ही नही उठता बॉस.
विशेषचा हा किस्सा केवळ उदाहरण म्हणून. हेच एरवी इतरत्र पण घडत होतं. टीनेजर वयामध्ये असताना मी जादूला फॅण्टसाईझ करत होते. आता मात्र आफताबला. हे माझंच मला जेव्हा जाणवलं तेव्हा एकदम अमेझिंग फीलिंग आलं.
आफताब अगदी माझ्या स्वप्नांतल्या आदर्श पुरूषासारखा होता (किंवा मग मी माझ्या स्वप्नांतला पुरूष आफ़ताबसारखाच रेखाटला होता की काय माहित नाही) पण एक मात्र खरं होतं. आय वॉज फॉलिंग इन लव्ह विथ हिम!!!

No comments:

Post a Comment