Monday, 14 October 2013

समुद्रकिनारा (३)

आश्रमापाठीमागच्या बागेमधे मी अभ्यास करत बसले होते.  कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. माझी बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेषा लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबण्यापेक्षा आपलं आपण समजून घेता आलं तर बरं कारण गणित हा माझा नंबर एकचा शत्रू होता.  भाषा इतिहास भूगोल कधी समजायला अडचण यायची नाही, पण गणित विद्न्यान हे मात्र गेल्या जन्माचे वैरी होते माझ्या.
आश्रमामधे आज रविवारचा दिवस म्हणजे सर्वांचा गोंधळ घालायचा दिवस. लेलेआजीची तब्ब्येत हल्ली बर्‍याचदा ठीक नसायची. त्यामुळे आश्रमामधे कुणीही त्यांचं ऐकायचं नाही. इथे मला हवी तसी शांतता होती.
हनुवटीवर हात ठेवून हातातले गणित वाचत होते.अचानक कुठल्यातरी गणितातल्या कसल्यातरी आकड्याने मला आठवण करून दिली. अजून पंधरा दिवसांनी आपला वाढदिवस. .. कुणाच्याच लक्षात नसेल, नाही नाही.. माझ्याशिवाय कुणालाच माहीत नव्हतं. इतक्या मोठ्या जगात मीच एकटी. काकाकाकूंनी कधी वाढदिवस साजरा केलाच नाही माझा. किंबहुना त्यादिवशी “ही आमच्या मढ्यावर आणून ठेवलेली अवदसा आहे” हे ऐकवणं मात्र काकूचं खास काम असायचं. काकूच्या, घरच्या सगळ्या आठवणी मनामधे गर्दी करून नाचायला लागल्या. अभ्यासात लक्ष लागेना. विचार इकडे तिकडे फ़िरायला लागल्यावर मी ते पुस्तक बंद करून ठेवलं. आणि पिशवीतून दुसरं पुस्तक काढलं. शाळेच्या वाचनालयातली जवळ जवळ सगळी पुस्तके वाचून संपली होती. पण मोठे सरांनी खास शिक्षकासाठी असलेल्या भागात मला प्रवेश मिळवून दिला होता, तिथली आवडती पुस्तके वाचण्यासाठी. त्यातूनच  शेक्सपीअरच्या नाटकाची भाषान्तरे घेऊन आली होती. Comedy of Errors मला विशेष आवलं होतं. कधीनाकधी तरी याचं मूळ इंग्रजी पुस्तक नक्की वाचायचंच अशी मी स्वत:लाच बजावून ठेवलं होतं.


बागेत त्यावेळेला माझ्याशिवाय कुणीच नव्हतं, मोहोर आला की बागा धरायला बाहेरच्या माण्सांची वर्दळ चालू व्हायची, नेपाळी गुरख्यांच्या झोपड्या बागेत पडायच्या, पण इतर वेळी बाग अगदी एकाकी..

"

हॅलो.." थोड्या वेळाने एक आवाज आला. मी पुस्तकातलं डोकं वर करून पाहिलं. समोर एक तरूण उभा होता. सतरा अठरा वर्षाचा. पिंगट केस. गोरापान, उंच, निळे डोळे.

मी कधीतरी याला कुठेतरी पाहिलं होतं. कधी आणि कुठे ते आठवेना. माझ्या  चेहर्यावरचे गोंधळलेले भाव त्याने ओळखले असावेत. तो दोन पावलं पुढे आला.
"
हॅलो म्हटलं मी.." तो किंचित हसत म्हणाला. एखाद्या शांत पहाटे वार्‍याने फ़ुंकर घालावी तसं त्याचं स्मितहोतं. निळ्या डोळ्यात एक असीम खोली होती. काही न बोलता पापणीदेखील न मिटता मी फ़क्त त्याच्याकडे बघत होते.

"
पहले कभी नही देखा आपको यहा पे.." तो परत म्हणाला. त्याने अंगात पांढरा शुभ्र शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. मला आश्रमात रहायला येऊन दोनेक वर्षे झाली होती. आजूबाजूला रहाणार्‍या सर्वांना मी ओळखत होते, पण या मुलाला आधी कधीच पाहिलं नव्हतं..

"
लगता है आपको सुनाई नही देता.." त्याने उजव्या हाताचा अंगठा हलवून नाही अशी खुण केली. एखाद्या चित्रकराची असावी तशी त्याची बोटे निमुळती होती.

एखद्याने संमोहित करावं असं मी त्याच्याकडे बघत होते.  
"
हाय..." मी बोलण्याचा प्रयत्न केला पण आवाज घशातच कुठे तरी हरवला. "हाय,," यावेळेला जरा जोरात, त्याला ऐकू जाईल अशा बेताने.

"
ओह.. तो आप सुन सकती है और बोल भी सकती है..." त्याच्या हातामधे एक चांदीचं कडं होतं आणि पायात काळे शूज.

मला काय बोलावं तेच सुचेना, मी शांतपणे हातातली पुस्तकं पिशवीत ठेवायला सुरुवात केली. दूरवर एक कावळा केकाटत होता. तेवढाच काय तो आवाज येत होता. तो शांतपणे फ़क्त माझ्याकडे बघत होता.

“इंटरेस्टींग " त्याच्या आवाजातला मिश्किलपणा लपत नव्हता.  

मी मान वर करून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं.

"
आय मीन... दहावीचं गणिताचं पुस्तक आणि शेक्सपीअर एक साथ." तो म्हणाला.

माझ्या नकळत ओठांवर एक हसू आलं.

"

तुला हसता पण येतं... इथे कधी पाहिलं नाही तुला.." त्याने त्याच्या केसातून हात फ़िरवला आणि आधीच विस्कटलेले केस अजून विस्कटले.

"

त्या आश्रमात राहते." मी हातानेच आश्रमाची बिल्डिंग दाखवली. अचानक मला जाणवलं, आपण कोण आहोत ते... इथे मला कुणाशी ओळख नको होती. एखाद्या मुलाशी तर बिल्कुल नको.
"
ओह.. म्हणजे तू आय मीन,," त्याला कदाचित नक्की शब्द सापडेना..
"
हो. मी अनाथ आहे. दहावीला शिकते आणि अभ्यासाला इथ आले होते, अजून काही?" मी थंड आवाजात विचारलं.
"अनाथ? कोई अनाथ नही होता. सबको देखनेवाला खुदा उपर बैठा है. वही सबका मालिक है, परत अनाथ म्हणू नको." तो शांतपणे म्हणाला. त्याच्या गळ्यात एक काळा ताईत होता.

मला ताबडतोब तिथून निघायचं होतं. संतापाची एक लाट अंगातसळत होती. तो परत पुढे अजून काही बोलला असता तर नक्कीच हा ज्वालामुखी भडकला असता. त्याच्या आत मला तिथून निघायचं होतं.
तो मात्र फ़क्त माझ्याकडे बघत होता.
"
मी कधी या जागेचा स्टडीसाठी विचारच केला नाही. पण मला निवांतपणे इथे येऊन बसायला आवडतं " तो परत हसत म्हणाला.


मला त्याच्याशी बोलण्यात आता काडीचाही इंटरेस्ट नव्हता. ताबडतोब इथून निघून जायचं होतं. आश्रमातल्या कुणी मला असं एखाद्या मुलाशी बोलताना पाहिलं असतं तर गहजब उडाला असता. पण एकच प्रॉब्लेम होता. हा मुलगा नेमका रस्त्यात उभा होता.
"
मला निघायचं आहे." मी सांगितलं.
"
ओह.. झाला स्टडी? परत भेटूच. मी अजून महिनाभर आहे इथे. नाव काय तुझं?"

खरंतर मला त्याला नाव सांगायचं नव्हतं. त्याच्याशी बोलायचं पण नव्हतं. तरीपण त्याच्या चेहर्‍याकडे खास करून तळ्यासारख्या नितळ डोळ्यांकडे बघण्याचा मोह सोडवत नव्हता. तरी त्याची नजर चुकवत मी म्हटलं, .
"
सरस्वती..."
"
नाईस नेम... " तो हसला आणि रस्त्यावरून बाजूला झाला.

मी हसले आणि पुढे निघाली.
"
बाय द वे, मी साहिल.."

मी वळून त्याच्याकडे पाहिलं. जोरात कुठूनतरी वारा आला. साहिल... कोण होता हा साहिल. खूप ओळखीचा आणि तरीही अनोळखी वाटणारा... नक्की कोण होता हा साहिल?
आश्रमात परत आल्यावर पण मी त्याचाच विचार करतेय. आता मला असं का वाटतंय की मला साहिल तिथे भेटणार हे मला आधीपासून माहित होतं??
आयुष्यात आपण एकाच क्षणाला कितीतरी नवीन माण्सांना भेटत असतो, मग तरी साहिल भेटल्यावर मला असं वेगळंच का वाटत राहिलं? नक्की कशामुळे?
वीरने हातातली डायरी मिटून परत ठेवून दिली. का वाचतो मी हे सतत, नक्की काय शोधतोय मी? त्याने स्वत:लाच पुन्हा एकदा विचारलं. सारा ऑफ़िसला निघून गेल्यावर विचित्र एकटेपणा जाणवायला लागला, पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामधे साराचं स्थान काय आणी साराच्या आयुष्यामधे आपलं स्थान काय असे प्रश्न त्याला छळत होते. कदाचित याच प्रश्नांच्या उत्तरासाठी तो साराच्या जुन्या डायर्‍या काढून वाचत बसला होता.
 
सारा स्टेशनवर आली तेव्हा साडेदहा वाजून गेले होते. लोकल बर्‍यापैकी रिकामी होती. त्यामुळे आरामात बसता तरी आलं. स्टेशनवर बांधून घेतलेला वडापाव बसून ती खात होती तेवढ्यात मोबाईल वाजला.
रिंगटोन ऐकूनच हा फोन नक्की कुणाचा हे तिला समजलं होतं. तिने लगेच हातातला वडापाव खिडकीतून बाहेर भिरकावला आणि फोन घेतला.
“बोलो.. कबसे तुम्हारे फोन का वेट कर रही थी.. कल रात को क्यु फोन नही किये... इत्ता भी कैसा काम होता की मेरी याद तक नही आती......  अच्छा.. अभी ऑफ़िस जा रही हू... हां... थोडा मीटींग वगैरा... वो तो चलता रहता है... आज है ना एक बायलाईन... अपने वीर कपूरकी... उसकी कल शादी कॅन्सल हो गयी... पता नही... कैसा बंदा है!! उसको खुदको नही मालूम क्यु नही करता शादी... अच्छा सुनो... स्टेशन आ गया.. मै ऑफ़िस खतम करके तुमको कॉल देती हू... बाय.... आय मिस यु टू!!” म्हणत साराने फोन कट केला.
 
ऑफ़िसची पूर्ण रिपोर्टींग टीम हजर होती, म्हणजे काहीतरी सीरीयस मॅटर होता. धवन ऑलरेडी चिडला होता, त्यात साराला उशीरा आलेली बघून त्याचा राग अजूनच वाढला.
“ये भी कोइ टाईम है?” आल्या आल्या त्याने फ़ैरी झाडली. वास्तविक साराचा ऑफ़िस टाईम एक वाजताचा होता पण आता ते त्याला सांगत बसायची वेळ नव्हती.
“आय थिंक, सारा आणि नेत्रा दोघी फ़िल्डवर जाऊ देत. इथे त्यांचं फ़ारसं काम नाही” देशमुख म्हणाले.
“दॅट्स अ गूड आयडीया.” धवन म्हणाला. “सारा, देशमुख आपको इन्फ़ो देंगे. जल्दी काम पे लगो. मुझे शामको छे बजे से पहले रिपोर्ट चाहिये, कम्प्लीट रिपोर्ट. ऑनलाईन स्निपेट्स हर आधे घंटेमे. ओके?”
नक्की काय चाललंय ते तिला अजिबात माहिती नसल्यामुळे मान हलवण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता तिच्याकडे.
धवनच्या केबिनबाहेर आल्याबरोबर तिने देशमुखना लगेच विचारलं, “काय भानगड आहे?”
“सिंपल, तुला खूप दिवसापासून पॉलिटिक्स करायचं होतं ना... हीअर इज युअर चान्स! तुझा रोहित कपूर आज दुपारी राजकीय पक्षात प्रवेश करतोय. आज एक मोठी सभा आहे तिथे हे कदाचित अनाऊन्स केलं जाईल. आपली पूर्ण टीम सभेच्या कव्हरेजमधे बिझी आहे-. चार पेजची सप्लीमेंट निघेल उद्या त्यामुळे पॉझिटिव्ह कव्हरेज. तू फ़िल्म ऍंगल घेऊन काम करशील, नेत्रा तुला असिस्ट करेल. आय नीड ऍट लीस्ट थ्री स्टोरीज ऑन दिस! रोहित कपूर अचानक कसा काय राजकारणाकडे वळला? त्याची आधीची फ़िल्म हिस्ट्री. त्याचे आधीचे सर्व लफ़डी.. येस्स, दॅट विल इन्क्लूड रसिका ऍज वेल. ब्रेकिंग न्युज ही आहे की, रसिका याच पक्षासाठी ऑलरेडी काम करतेय. नेस्क्ट इलेक्शनमधे तिला टिकीट मिळणार हे जवळ जवळ कन्फ़र्म आहे. रोहित कपूर आणि रसिका एकत्र स्टेजवर येतील का? हा सगळ्यांत मोठा ऍंगल असेल तुझ्याशिवाय अजून कुणाला रसिकाच्या इनर सर्कलमधे ऍक्सेस नाही. तुझे सर्व कॉन्टॅक्ट्स पणाला लाव, पण काहीतरी खास घेऊन ये.. शिवाय, जमलंच तर इतर फ़िल्मवाल्यांचे स्निपेट्स घे. बॉलीवूड रोहित कपूरला नक्की कसं सपोर्ट करतंय वगैरे हे सर्व तुला बघायचं आहे.. ऍम आय क्लीअर?”
“येस्स सर!! काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हालाच कॉल करेन. निघू का मी?”
“तू एकटी नाहीस, नेत्राला पण घेऊन निघ. धवनची ऑर्डर आहे.”
खरंतर साराला नेत्राचं  लटांबर सोबत नको हवं होतं, पण डायरेक्ट धवनची ऑर्डर म्हटल्यावर काही बोलता आलं नसतं.
नेत्रा उत्साहाने नुसती फ़सफ़सत होती. “सारा, आय थिंक तुझे कॉन्टॅक्ट्स चांगले आहेत तर तू फोनवरून बोलशील का सर्वांशी? मी लगोलग कॉपी बनवत जाईन.”
“सध्या नाही, आधी ऑफ़िसमधून बाहेर पडू या” सारा बॅग उचलत म्हणाली.
“कुठे आझादमैदानला जायचं का?”
 
“तिथे जाऊन तुला सतरंज्या घालायच्या असतील तर जा.” सारा लिफ़्टमधे जात म्हणाली. नेत्रा तिच्या पाठून लगबगीने धावत आली.
“म्हणजे? धवनने फ़िल्डवर जायचं म्हणाला ना?”
“नेत्रा, आधी आपण समोरच्या हॉटेलमधे जाऊन लंच करूया, स्टोरी ऍन्गल ठरवू आणि मग काम डीव्हाईड करू” सारा तुटकपणे म्हणाली.
नेत्राला खरंतर खूप प्रश्न विचारायचे होते, पण साराला बोलण्यामधे काहीही इंटरेस्ट नसल्याचं बघून ती गप्प बसली. साराने हॉटेलमधे जाऊन दोन व्हेज थाळीची ऑर्डर दिली आणि नेत्राच्या चुळबुळीकडे पूर्ण दुर्ल़क्ष करून  लगेच डायरी काढून काहीबाही लिहायला सुरूवात केली.
 
“काय लिहितेस?” दोन तीन मिनिटांनी नेत्राने न राहवून विचारलं.
“एक मिनिट सांगते... आधी एक काम कर. तुझ्या मोबाईलवरून मी सांगते त्या नंबरला फोन लाव. फोन उचलला की मोबाईल माझ्याकडे दे.”
पलिकडून हॅलो असा आवाज आल्यावर नेत्राने लगेच साराकडे फोन दिला.
“हॅलो. सारा व्ही के. क्या यार... इतनी बडी न्युज हमसे छुपाके रखते हो... कभी तो ब्रेकींग दे दिया करो...” साराचा आवाज कमालीचा खेळकर आणि उत्साही होता. “..फोन पण घेत नाही हल्ली तुम्ही आमचा.. बॉस के स्ट्रिक्ट ऑर्डर्स है क्या??? ते सगळं राहू दे, पर्सनल गोष्टी पर्सनलच राहू द्याव्यात. मग? मीटींगमे क्या डीसाईड हो रहा है वो तो बोलो. अरे कमाल करते हो. रोहित कपूरचा पर्सनल मॅनेजर असून तुम्हाला माहित नाही??... अरे तुम्ही फ़क्त बोला आज. एडिटरने अख्खं पान रोहित कपूरसाठी ठेवलंय... हा.. मग त्याचं काय??” अचानक साराच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला. “ये खबर पक्की है?? सोच के बोलो.” तिचा आवाज एकदम बदलला. “ठिक है. अर्ध्या एक तासाने मी परत फोन करेन तुम्हाला. माझ्याच नंबरवरून फोन करेन. कृपा करून तेव्हा फोन उचला”  
 
“काय झालं सारा?” नेत्राने मोबाईल परत घेत म्हटलं, तोपर्यंत वेटर जेवणाच्या थाळी घेऊन आला होता.
“नेत्रा, जेवण आटप. मी जरा एका मिनिटांत येते” म्हणत सारा उठून बाहेर निघून गेली. नेत्राच्या कानांपासून पुरेसं लांब आलेलं पाहून तिने खिशातला तिचा मोबाईल काढला आणि लगोलग वीरला फोन केला.
 
“हा सारा.. झाली मीटींग?” त्याने पहिल्याच रिंगला फोन उचलला.
“वीर, रसिका कुठाय?” साराने विचारलं.
“ती पुण्याला आहे. का? काय झालं?” साराच्या आवाजातला गंभीरपणा जाणवून तो म्हणाला.
“वीर, तुला माहित आहे का? आज रसिका ज्या पक्षासाठी काम करते त्याची एक हाय लेव्हल मीटींग मुंबईमधे चालू आहे..”
“मला कसं माहिती असेल... तिच्या असल्या कुठल्याच कामाची मला खबरबात मला नसते...”
“वीर, रोहित कपूर पक्षात प्रवेश करतोय. आज संध्याकाळी आझाद मैदानवर सभा आहे. सभेबद्दल मीडीया अवेअर आहे, पण या रोहित कपूर ऍंगलबद्दल फ़ार कमी जणांना माहिती आहे. मी आता राकेशला फोन केला होता, त्याने न्युज कन्फ़र्म केलीये. रोहित जर या पार्टीमधे आला तर....”
“साल्याने रसिकाची फ़िल्म  करीअर बरबाद केली, आता पोलिटिकल करीअर पण बरबाद करून ठेवेल.. थॅन्क्स फ़ॉर दिस इन्फ़र्मेशन. मी लगेच रसिकाला फोन करतो..”
“खरंतर मीच तिला फोन करणार होते, पण मागच्या वेळेला आमची बोलाचाली जरा.....”
“आय नो. ती जरा जास्तच बोलली होती तुला, तरी मी सांगतो तिला... घरी कधी येशील?” त्याने विचारलं.
“आज खूप उशीर होइल वीर, सभा साडेपाचला चालू होइल. संपायला दहा वाजणार, नंतर स्टोरी फ़ाईल... उशीर होइल..” सारा अपराधिक स्वरांत म्हणाली.
“डोन्ट वरी.. मी आज पूर्ण दिवस इथेच आहे. कुठेही जात नाही. राजन दोन स्क्रीप्ट्स घेऊन आलाय, त्या वाचत बसलोय. काही इंटरेस्टींग, शॉकिंग, वगैरे असलं तर मला फोन कर...”
 “बाय... टेक केअर... “ म्हणत साराने फोन ठेवला.
टेबलकडे ती परत आली तेव्हा नेत्राने अजून जेवायला सुरूवात पण केली नव्हती, “अगं काय हे? लवकर जेवून घे. आपल्याला अजून काम करायचंय” सारा वैतागून म्हणाली.
“सारा, आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल तर प्लीज असं सीक्रेटीव्ह काम करू नकोस. आय रीअली ऍडमायर युअर वर्क म्हणू धवनच्या मागे लागून तुझ्यासोबत आली आहे. पण जर तू असं माझ्यापासून लपत काम केलंस तर काय उपयोग?”
“काय लपवून काम केलंय. तुझ्यासमोर राकेशला- रोहित कपूरच्या पर्सनल मॅनेजरला फोन लावलाय. त्याने दिलेल्या इन्फ़ोवर जेवण झालं की स्टोरी फ़ाईल करायची आहे, नंतर परत इतर ऍंगल्स वर काम करायचंच आहे..”
“मग तू आता इथून बाहेर जाऊन कुणाला फोन केलास? ते काय होतं?” नेत्राने चिडून विचारलं त्यासरशी सारा हसली.
“मुली, अगं माझ्या बॉयफ़्रेंडला फोन केला होता, आज यायला उशीर होइल म्हणून.” सारा हसत म्हणाली “जेवून घे. चिक्कार काम आहे आज.” जेवता जेवता तिने मोबाईलमधले मेसेजेस, मेल्स पाहणं चालूच ठेवलं होतं.

“सारा, तुझा बॉयफ़्रेंड म्हणजे साहिलला फोन केला होतास का? पण तो तर गल्फ़मधे असतो ना? ” नेत्राने अचानक विचारलं.
नेत्राच्या या प्रश्नाने सारा अचानक गडबडली पण लगेच सावरत ती म्हणाली. “हो... गल्फ़ला असतो पण सध्या सुट्टीवर आलाय!”
 
नेत्रा मनातल्या मनात हसली. साराचा बॉयफ़्रेंड साहिल आहे हे अख्खं ऑफ़िस जाणत होतं. पण गेल्या सहा-सात महिन्यापासून नेत्राला कायम वेगळाच संशय येत होता, सारा वाटते तेवढी साधीसरळ नाही हे तर तिला आधीपासून माहित होतं. त्यातही हे साहिल प्रकरण तिला फ़ारच वेगळं वाटत होतं, आजवर ऑफ़िसमधे कुणीही साहिलला भेटलं नव्हतं.
साराचं लक्ष नसताना नेत्राने एकदा तिचा मोबाईल चेक केला होता- साराचे कॉन्टॅक्ट डीटेल चोरण्यासाठी पण सारा ज्याला आपला “बेस्ट कॉन्टॅक्ट” म्हणायची अशा वीर कपूरचा नंबरच तिच्या मोबाईलमधे सेव्ह केलेला नव्हता. आता जेवून झाल्यावर सारा वॉशरूमला जाण्यासाठी गेल्यावर नेत्राने समोर ठेवलेला तिचा मोबाईल लगेच उचलला, आणि डायल केलेला पहिलाच नंबर पाहिला- साहिल.
नेत्राने वॉशरूमच्या दिशेने एकदा पाहिलं आणि धोका पत्करून तो नंबर तिने डायल केला.
दोन रिंग वाजल्यावर पलिकडून आवाज आला. “सारा... लगेच इतक्या लवकर फोन केलास?”
वीर कपूर!!! नेत्राच्या घशाला कोरड पडली आणि तिचे हात जवळ जवळ थरथरत होते. वीर कपूर म्हणजे साहिल.... इतके दिवस तिला फ़क्त संशय होता, आज ते नक्की झालं.
नेत्राने तो कॉल लगेच डीलीट केला आणि फोन होता तसा ठेवून दिला. नेत्रा स्वत:वरच प्रचंड खुश झाली, एक भलीमोठी ब्रेकिंग न्युज तिच्या हाताशी आली होती, फ़क्त ती न्युज कशी खेळायची हे मात्र तिला व्यवस्थित ठरवावं लागणार होतं.
 

No comments:

Post a Comment