Monday 23 March 2015

इश्क विश्क (भाग २)



इश्क विश्क (भाग १)


हर्षूच्या गच्चीवर नुसता हलकल्लोळ चालू होता. सायली गरमगरम बटाटेवडे घेऊन जिन्यामधून वर यायच्याही आधी अरमान पुढं आला, वड्यांचं ताट त्यानं घेतलं आणि पुढच्याच दोन मिनिटांत रिकामं ताट सायलीकडे दिलं. 
“अरे गरम आहेत. सावकाश खा रे मुलांनो” सायली हसून म्हणाली. पण कुणी ऐकायच्या मन:स्थितीमध्ये नव्हतं. सायली शांतपणे उभं राहून खिदळणार्‍या सर्वांकडे बघत राहिली. अख्ख्या सोसायटीमधली मिळून वीसबावीस मुलांची ही पार्टी. एकेकाळी आपल्यासमोर शाळेत युनिफॉर्म घालून जाणारी ही चिल्लीपिल्ली. आज सगळीच कॉलेजकुमार-कुमारी बनल्या होत्या. शेजारचा अरमान इंजीनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला. देशपांड्याची तेजल  कमर्शिअल आर्ट्स. काझीच्या दोन्ही जुळ्या लेकी बीएससीला, सगळ्यांत मोठा असलेला राहुल तर चक्क पीएचडी करत होता. अगदी कालपरवापर्यंत आपल्याच समोर फिरणारी आपली हर्षू.... तिची पण इंजीनीअरिंगची ऍडमिशन झाली. दोन दिवसांनी ती पण हॉस्टेलला जाणार. मग आपण एकटेच उरणार. घरट्यामधून पक्षी उडावेत तशी ही सगळीच बाळं आपापल्या पंखांचं बळ आजमावून बघायला बाहेर पडणार. 
उभ्या उभ्या सायलीचे डोळे भरून आले. किचनमधून अरूणची हाक ऐकू आली म्हणून ती भानावर आली. जिन्यामधून खाली उतरताना अचानक आठवलं, या सर्वांमध्ये आभा आली नव्हती. तिनं किचनमध्ये गेल्यावर वनिताला हाक मारून आभाला पाठवायला सांगायचं ठरवलं. 
गच्चीवर मुलांच्या चेष्टामस्करीला ऊत आलेला. काहीबाही चिडवाचिडवी चालू होतीच. त्यातही राहुलचं नुकतंच समजलेलं प्रकरण हा आजच्या पार्टीचा मुख्य करमणूक कार्यक्रम होता. रात्रीचे नऊ वाजले तशी एकादोघांनी निघायला सुरूवात केली. तसं सोसायटीमध्येच असल्यानं कुणाला फारशी चिंता नव्हती. तरीही दहानंतर राहुल, आकृती, हर्षू, अरमान आणि आर्शिया एवढीच शिल्लक राहिले. 
या सर्वांमध्ये फक्त आर्शियालाच काहीतरी गडबड वाटत होती, शेवटी अरमान आणि राहुल सर्वांच्या डिशेस आणि पाण्याचे ग्लास घेऊन खाली गेलेलं बघून तिनं हर्षूला विचारलं. “नक्की काय चालूये?”
“कशाबद्दल म्हणतेस?”
“कालपासून बघतेय. इथं पार्टीमध्ये आल्यापासून तर खात्रीच पटलीये. तुझं आणि अरमानचं काही....”
“चल!” हर्षू ताडकन म्हणाली. अर्थात हे म्हणणं किती खोटं होतं हे आर्शियाला समजायला वेळ लागला नाही. तितक्यात अरमान आणि राहुल परत वर आले त्यासरशी तिनं हर्षूला कोपरखळी मारली. हर्षू नुसतीच हसली आणि हळूच अर्शियाच्या कानांत कुजबुजली. “येस्स, पण आम्ही सध्या हे कुणालाही सांगणार नाही असं ठरवलंय, तुला आज लक्षात येतंय पण तसं आमचं खूप दिवस झाले चालू आहे.” आर्शिया आणि हर्षू नंतर बराच वेळ खुसखुसत बसल्या... 
गच्चीवरून अरमानला कुणाचीतरी बाईक येताना दिसली. त्यानं वाकून पाहिलं तर बाईक समोरच्या बंगल्याजवळ थांबली. बाईकवरून उतरलेली आभा त्याला दिसली. 
“आभाला बोलावलं नव्हतंस?” त्यानं वळून हर्षूला विचारलं. 
“न बोलवायला काय झालं? ती येणार नाही हे माहित असूनही दोनदा बोलावलं. आईनं पण वनिताकाकीकडे निरोप दिलाच होता” 
“ती आता कुठून आली? इतक्या रात्री?” 
“माहित नाही. ती हल्ली आपल्यापैकी कुणाशीच बोलत नाही” यावेळी राहुलनं उत्तर दिलं. “तिची सध्याची संगत चांगली नाही.”
अरमान अजूनही गेट्जवळ उभ्या असलेल्या आभाकडं बघत होता. त्याच्या आजूबाजूला अर्शिया हर्षू सगळेच उभे राहून खाली बघत होते. “पाहिलंस, ती दारू पण पिते. हा तिचा खास मित्र. विजय म्हणे. एक नंबरचा गुंड आहे.” हर्षू म्हणाली. 
“आभाला नक्की झालंय काय? किती चांगली हुशार मुलगी आहे.”
“तू सहासात महिन्यानंतर गावात आलास म्हणून असं वाटतंय. आम्हाला रोजचंच झालंय. एकदोनदा तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या बाबांनी तिला मारलं तर तिनं लगेच या मित्राला फोन केला. दहा मिनिटांत गुंडं पोरं सगळी सोसायटीमध्ये. कसल्या धमक्या देत होती, आणि काय घाण बोलत होती. वनिताकाकी तर तिला घाबरूनच असतात. कधीपण येते कधीपण जाते. काय वाट्टॆल तसे कपडे घालते” आकृतीनं माहिती पुरवली. 
“आणि कॉलेज?” अरमाननं विचारलं. 
“डोंबल. सहा महिन्यांत सोडून आली. हॉस्टेलवर जमत नाही म्हणून” 
आभा गेटमधून आत गेली. वनितानं दरवाजा उघडेपर्यंत टणाटणा बेल मारत राहिली. ती घरात गेल्यावर मग तिचा तो बाईकवाला मित्र निघून गेला. आभा शुद्धीत नव्हती हेतर इथूनपण सर्वांना दिसत होतंच. 
“इतकी कशी वाया गेली?” अरमाननं विचारलं. 
“जाऊ देत ना” आर्शिया पहिल्यांदाच बोलली. “फालतू मुलगी आहे. तिचा इतका विचार काय करतोस? आपण इथं पार्टीसाठी आलोय की तिच्याबद्दल बोलायला? या एका मुलीमुळे सोसायटीचं नाव बदनाम होतंय.. पण काय करणार?” 
तितक्यात राहुलचा मोबाईल वाजला. हा फोन त्याच्या “खास मैत्रीणीचा” असल्यानं यापुढं चेष्टामस्करीचा विषय राहुलकडे वळाला आणि आभाचा विषय बाजूला पडला. पण अरमानच्या मनामधून विषय गेला नाहीच. 

दुसर्‍या दिवशी सहज कसलंतरी पुस्तक देण्यासाठी तो आभाच्या घरी गेला. वनितानं त्याला आत बोलावलं. त्याला कॉलेज कसं चालू आहे, हॉस्टेल लाईफ कसं आहे वगैरे विचारलं. पण काकी आभाबद्दल काही बोलेनात. शेवटी त्यानं विचारलं. “काकी, आभा कुठाय?”
वनिता किंचितशी गडबडली. “आहे, घरातच” 
“जरा बोलावता का? मला थोडंसं बोलायचं होतं. मी उद्या निघून जाईन. तेव्हा बोलायला वेळ मिळणार नाही”
“अरमान, ती आता बाहेर येणार नाही. मी संध्याकाळी तुझ्या घरी यायचा निरोप देईन. ठिक आहे?”
“काय झालंय काकी? आभा अशी का वागतेय?”अरमाननं थेट विचारलं. 
“काही माहित नाही” वनिता हताशपणे उद्गारली. “गेल्या वर्षीपर्यंत सर्व नीट होतं. बारावीला किती चांगले मार्क्स घेतले. बारावीची परीक्षा झाली आणि मग हे असलं सर्व चालू झालं. मेडीकलला सीट मिळाली म्हणून इतक्या लांब शिकायला ठेवली तर पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत परत आली. काय करू?” 
“मी बोलू का तिच्याशी? कदाचित मी थोडंफार समजावेन” अरमान शांतपणे म्हणाला. 
“आता ती खोलीमध्ये आहे, पण बोलण्यांत काही अर्थ नाही, डोळ्यांसमोर हे सगळं घडताना. काय  करावं?....” वनिताच्या डोळ्यांत आता पाणी आलं. 
“एक काम करा, ती जागी झाली की मला हाक मारा. मी येईन आणि तिच्याशी बोलेन” तो हलकेच म्हणाला आणि बाहेर पडला. 

पण वनितानं दिवसभर काही त्याला हाक मारली नाही. नंतर खरंतर त्याच्याही लक्षात राहिलं नाही. उद्या हॉस्टेलवर जायचं म्हणून त्यानं आणि हर्षूनं पिक्चरचा प्लान बनवलेला होता. त्यामुळं संध्याकाळी तोही घरी नव्हताच. रात्री नऊ वाजता घरी आल्यावर सगळावेळ पॅकिंग आणि आईच्या सूचना ऐकण्यांतच गेला. तरी साडेदहा वाजता आईला अचानक आठवलं. 
“अगं बाई, घरात विरजण नाहीये, उद्या तुला दहीसाखर कशी देणार?” यापुढं आपल्याला आईची काय आज्ञा असेल ते आधीच लक्षात येऊन तो म्हणाला. “आई, नाही दिलंस तरी चालेल. मी आता रात्रीचं बाहेर दुकानात जाणार नाहीये” 
“अरे असं काय करतोस बाळा? सज्जादचं दुकान अकरापर्यंत चालू असतं, जा ना” आई अगदी प्रेमानं त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली. “उद्या तू हॉस्टेलला गेल्यावर कुणाला अशी कामं सांगेन. तू नस्लास तर माझं किती अडतं माहिताय. प्लीज ना रे राजा!!”
“दुकानात जातो पण तुझे इमोशनल अत्याचार आवर.” तो हसत म्हणाला. “अजून काय हवंय ते आताच सांगून ठेव. मी उद्या पहाटे दुकानांत जाणार नाहीये. सकाळी सातची ट्रेन आहे” 
गेटमधून बाहेर पडताना त्यानं हर्षूच्या घराकडं नजर टाकली. हर्षूच्या खोलीचा दिवा बंद होता, नाहीतर तिला हाक मारून बोलावलं असतं. तेवढीच उद्या जायच्या आधी परत चोरून एखादी भेट. तीपण अश्या चांदण्यारात्री वगैरे. त्याच तंद्रीमध्ये कसलंतरी गाणं गुणगुणत तो चालत राहिला. 

चाळीसेक बंगल्यांची ही सोसायटी जिथं संपत होती, तिथं आंब्याची चार पाच झाडं लावली होती, शिवाय मुलांना खेळयला म्हणून गार्डन एरिया. आता त्या गार्डन एरियाचं गेट उघडं होतं. आतमध्ये लाईट वगैरे काही नसल्यानं पूर्ण अंधार होता. रस्त्यावरून चालताना अरमानला आतमध्ये कुणीतरी बसलंय असं वाटलं. हातातल्या मोबाईलचा उजेड त्यानं अंधारामध्ये मारून पाहिला. “आभा? इतक्या अंधारात एकटीच का बसली आहेस?” दोन पावलं पुढं येत त्यानं विचारलं. 
“माझा फ्रेण्ड येणार आहे. त्याची वाट बघतेय” ती एखाद्या अनोळखी माणसाशी बोलावं इतक्या तुटकपणे म्हणाली. 
“इतक्या रात्री?” तो तिच्या जवळ आला. “इथं भिती वाटत नाही का?” 
“कुणाची?” तिनं उलट प्रश्न केला. 
“भटक्या कुत्र्यांची! अजून कुणाची? मला तरी रात्री रस्त्यावरून फिरताना त्यांचीच भिती जास्त वाट्ते” ती काहीच बोलली नाही. त्यानं तिच्याच बाजूला बसकण मारली. तिच्या हातातली सिगरेट काढून मातीमध्ये विझवली. 
“हा काय मूर्खपणा आहे?” तिनं चिडून विचारलं. 
“सेम प्रश्न मी तुला विचारू? हा काय मूर्खपणा आहे?” 
“माझ्या पर्सनल बाबतीत बोलायचं तुझं काम नाही. सांगून ठेवते” तिचा आवाज अजून चढला. 
“काय करशील? तुझे ते गुंड मित्र बोलावशील? माझे हातपाय तोडायला?” त्याचाही आवाज तितकाच चढला. “आठ दिवस झाले, रोज तुझे हे नखरे बघतोय. काय चालवलं आहेस? थोडीफार मित्रमैत्रीणींबरोबर मस्ती हे एकवेळ ठिक आहे. पण तू जे करतेयस ते अति आहे” 
“मला जास्त बोलायचं नाही, परत तेच सांगतेय. माझ्या पर्सनल बाबतीत बोलू नकोस” अंधारात तिचा चेहरा दिसत नसला तरीही तिच्या डोळ्यांतला संताप त्याला जाणवला. “तुमच्यासारखी गूड गर्ल नाहीये मी. मला तसं रहायचं पण नाही. गेट लॉस्ट!” 
“आभा, पर्सनल असं काय असतं गं! इतकी वर्षं एकमेकांना ओळखतोय. तुझं हे असं बेफाम वागणं जरातरी चांगलं आहे का?” त्याचा आवाज प्रचंड शांत होता. “सकाळी मी तुझ्या घरी आलो होतो. याच विषयावर तुझ्याशी बोलायला. तुला माहित तरी आहे का?” 
“तेव्हा झोपले असेन... सॉरी” 
“सॉरी म्हणू नकोस. फक्त मला सांग, काय झालंय. कशामुळं इतकं बिनसलंय. रोज तुला बघतोय. मला माहित असलेली आभा असं वागेल हे पटतसुद्धा नाही.” तो परत तितक्याच शांतपणे म्हणाला. 
“काहीही  बिनसलेलं नाही”
“कॉलेज का सोडलंस?” 
“ते मेडीकल मला जमत नव्हतं. डेड बॉडीज वगैरे. माझ्याच्यानं तसलं झालं नसतं” 
“ठिक आहे, मग दुसरं काही शिक्षण? कॉलेज पूर्ण करायला नको का?” 
“कंटाळा येतो... नकोसं वाटतंय.” ती तुटकपणे म्हणाली. 
“असं करून कसं चालेल? आपल्याला शिक्षण हवंच. आयुष्यात पुढं जायला हवं ना? तिथंच थांबायचं आहे का? तुझ्या अश्या वागण्याचा वनिताकाकीला किती त्रास होतोय याचा विचार केलास का?”
ती यावर काहीही बोलली नाही. “हे बघ, शिकू नकोस. ड्रॉप घे. एक वर्षं दोन वर्षं तुला वाटेल तितके दिवस. पण किमान हे असं वागू नकोस ना. दारू पिणं... हे असं मित्रांबरोबर रात्रबेरात्र भटकणं, चांगलं वागणं आहे का?”
“अरमान, तुझं लेक्चर देऊन झालं की मला उठव. मी तोपर्यंत एक झोप काढते” ती म्हणाली. 
तो हसला. “मी लेक्चर देतोय का? तुझी काळजी आहे मला.”
त्याचं वाक्य अर्धवट तोडत ती म्हणाली. “करू नकोस.  जगामध्ये कुणाची वाट्टेल त्याची काळजी कर. पण माझी चुकूनही करू नकोस”
“याला काय अर्थ आहे?”
“काहीच अर्थ नाही. माझ्याप्रत्येक गोष्टीला काहीच अर्थ  नाही. मी अशी का वागते? इतकी कॅरेक्टरलेस का झाले? आईवडलांना इतका मनस्ताप का देते? या कुठल्यही प्रश्नाला काहीच अर्थ नाही. माझ्यातर साल्या जगण्यालाच काही अर्थ नाही. हरामी जगणं झालंय. एक दिवस संपवेन.. तेव्हा” 
“आभा, काय बोलतेस?” त्यानं हबकून विचारलं. “काय झालंय? मला सांग. प्लीज. तुला माझी शपथ आहे.... काय झालंय़?” त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. 
“सांगू? ऐकशील??? माझ्याकडे या कथेची दोन व्हर्जन आहेत. तुला कुठलं सांगू?”
“मला  फक्त खरं सांग. काय झालंय?”
“अरमान, मला एक मुलगा आवडतो. गेल्या काही वर्षांपासून. खूप आवडतो. अगदी ज्याला आपण प्रेम म्हणू शकतो इतक्या लेव्हलवर... मी ही गोष्ट त्याला स्वत: सांगणार होते. पण त्याआधी मी हीच गोष्ट माझ्या बेस्ट फ्रेण्डला सांगितली. ती म्हणाली, इतकंच ना. आता त्याला काही बोलू नकोस. मी योग्य वेळ येताच त्याला सांगेन. योग्य वेळ आली, आणि तिनं त्याला सांगितलं. फक्त माझ्या नावाऐवजी स्वत:चं नाव घालून” 
“आभा, कुणाबद्दल बोलतेस?” 
“अरमान, जगात अशा किती बेस्ट फ्रेण्ड आहेत मला?” 
दोन क्षण तो काहीच बोलला नाही. ती मान फिरवून दुसरीकडं अंधारात कुठंतरी बघत राहिली. “आय ऍम सॉरी, आभा!” तो हलकेच म्हणाला. “मला खरंच माहित नव्ह्तं” 
“वेल, आता समजलंय. हो ना? मग आता प्लीज मला विचारू नकोस, मी अशी का वागते. माझं काय बिनसलंय...”
“तू कधीच का बोलली नाहीस...”
“कधी बोलणार? तुझं आणि हर्षूचं ठरल्यावर? तुम्ही एकमेकांना चोरून भेटायला लागल्यावर? किस करायला लागल्यावर? मिठ्या मारल्यावर? कधी बोलणार?”
“आय डोण्ट नो व्हॉट टू से. ही गोष्ट हर्षूला माहित होती?”
“ही गोष्ट फक्त हर्षूला माहित होती. एनीवेज, तुम्ही दोघं एकत्र आहात, त्याबद्दल नो रीग्रेट्स. मी आज जे तुला सांगितलंय ते केवळ आपल्यामध्येच. प्रॉमिस कर” तिनं तळहात पुढं केला. त्यानं तो हातात घेतला. 
“आभा, आय प्रॉमिस. पण तूही एक प्रॉमिस कर. कुणीही... अगदी कुणीही आयुष्यात तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं असता कामा नये. मीसुद्धा. जे घडलं ते मी रोकू शकलो नाही. तुला दुखवायचं म्हणून मी जाणूनबुजून काहीच केलेलं नाही. तरीही माझ्यामुळं तू अशी वागलीस तर मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही. यापुढं असं करू नकोस. ऐकतेस ना आभा.” तो अगदी हळूवार पणे म्हणाला. तिनं त्याच्या हातातून हात सोडवून घेतला. 
“अरमान, सगळीच घडी विस्कटलीये. सगळंच कोलॅप्स झाल्यासारखं वाटतंय.” बोलताना तिचा आवाज भरून आला. “यापुढे काय कधीच माझं आयुष्य नीट होणार नाही- हे मात्र नक्की” 

दोन मिनिटं तो शांत बसून राहिला. नंतर त्यानं सावकाश विचारलं. “आणि या कथेचं  दुसरं व्हर्जन काय आहे?”
तिनं डोळे पुसले. “सांगू? ते जास्त इंटरेस्टिंग आहे...इन  फॅक्ट, इतरांना सांगताना... एस्पेशली हर्शूला सांगताना हेच व्हर्जन सांग. आणि जेव्हा सांगशील तेव्हा तिचा चेहरा काय होइल तेही सांग.”
“आता एवढं सगळं सांगितलं आहेस तर तेही सांगच. आय ऍम शुअर तुझ्या तिरपागड्या डोक्यामधून काहीतरी विचित्रच येऊ शकेल” 
“दॅट आय ऍम इन लव्ह विथ हर्षू”. 
“काय?” तो क्षणभर हबकलाच. “आभा, हा जोक आहे का?”

ती जागेवरून उठली, गार्डनच्या गेटपर्यंत गेली. “तुला दोन्ही वर्जन सांगितली आहेत. एक खरं आणि एक खोटं. कशावर विश्वास ठेवायचा ते तूच ठरव” म्हणत ती अंधार्‍या रस्त्यावरून तरातरा निघून गेली. 


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

गुरफटलेल्या चादरीमधून हात बाहेर काढून आभानं वाजणारा मोबाईल घेतला. अपेक्षेप्रमाणं ऑफिसमधूनच फोन होता. उद्याच्या इव्हेंटच्या कन्फर्मेशनसंदर्भात काहीतरी पॉइन्टर्स हवे होते. तिचं फोनवर बोलून होइपर्यंत आलोक बेडरूममध्ये आला. “गूड मॉर्निंग” तिनं मोबाईलमध्ये किती वाजले ते पाहिलं. 
“बापरे, साडेनऊ वाजलेत. मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या उशीरापर्यंत झोपले असेन” ती ओरडलीच. 
“आयुष्यात पहिल्यांदा इतक्या उशीरापर्यंत जागलीही असशील...” तो तिच्या गालांवरून हलकेच हात फिरवत म्हणाला. ती लाजली. “आज तुला पूर्ण दिवस सुट्टी आहे ना?” त्यानं विचारलं. तिचं ऑफिस सोमवार ते शुक्रवार असलं तरी बहुतेक ईव्हेंट्स वीकेंडलाच असायचे, म्हणजे ते दोन्ही दिवस ती घराबाहेरच. 
“हो. आज एकही ईवेंट नाही.” 
“लग्नानंतर पहिल्यांदा एखाद्या वीकेंडला दोघंही घरी आहोत. बोल, काय प्लान? बाहेर जाऊया?” 
ती आळसावत उठली. “नको. कंटाळा आलाय. खरंच किती महिन्यामध्ये शनिवार रविवारी घरी राहिलेच नाहिये.”
“ऍज यु विश. मी ब्रेकफास्टसाठी अंडी उकडून ठेवली आहेत.” 
“अंडी? का?” तिनं विचारलं, “आज संकष्टी चतुर्थी आहे, अंडी कशी खाणार?” 
त्यानं सॉरी म्हणत कान पकडले. “मी कालच साबुदाणे भिजत घातलेत. पंधरा मिनिटांत खिचडी करते. ती अंडी तूच खा” ती हसत म्हणाली. 
“तुझा उपवास असतो?”
“हो.” ती चादरीच्या घड्या घालत म्हणाली. 
“सॉरी अगेन, मला माहितच नाही. आय मीन... लोकं हसतील मला.”
“ठिक आहे, तुला चालत असेल तर दुपारला एग करी बनवते. मला दिवसभर खिचडी पुरेल” तिनं विषय मिटवला. “आणि लोकं का हसतील?”
“लग्नाला इतके महिने झाले तरी बायकोचा उपास कधी असतो ते मला माहित नाही” 
“अरे, मी काय इतकीपण धार्मिक नाहीये. लहानपणापासून सवय आहे म्हणून उपास करायचा. आज समज जर ईव्हेंट  असता आणि तिथं उपासाचं काही अव्हेलेबल नसतं तर काय केलं असतं? बिनधास्त खाल्लं असतं. देवाला प्रत्येक गोष्ट माहित असतेच” 
“हो, पण मला किमान तुझ्याबद्दल थोड्यातरी गोष्टी माहित हव्यात की नाही... आय मीन. अर्ध्या एक तासासाठी भेटलो. थोड्याफार गप्पा मारल्या. आणि पंधरा दिवसांत लग्न केलं... तेपण अगदी साधेपणानं. आय मीन.. अगदी दागिनेसुद्धा तुला माझ्या मॉमचे घातले कारण ज्वेलरकडे जाण्याइतका वेळ नव्हता” 

“आलोक, अरे कितीवेळा त्याच एका गोष्टीवर बोलणार आहेस? लग्न गडबडीत झालं, साधेपणानं झालं, याबद्दल मला काहीही रीग्रेट्स नाहीत. उलट मला माझं लग्न असंच सिंपल व्हायला हवं होतं.... तेच जास्त आवडलं! भपकेबाजी वगैरे तर बिल्कुल नको. आणि दागिन्यांचं काये? कोण वापरतंय तसंही. तू प्लीज सारखा त्याच एका गोष्टीचा गिल्ट घेऊ नकोस” 
“तू माझ्यासोबत खुश  आहेस ना?” त्यानं हलकेच विचारलं. 
“आलोक, मी आयुष्यात इतकी खुश कधीच नव्हे, बीलीव्ह मी. तुला तासभर भेटल्यावर लग्नाचा निर्णय घेतला तो नक्की कशाच्या जोरावर हे मला माहित नाही. पण तो निर्णय फार अचूक होता हे मात्र मला समजलंय. आय ऍम रीअली हॅपी विथ यु... आणि येस्स.. आय ऍम इन लव्ह विथ यु. इतक्या वर्षांत कधीच कुणाच्या प्रेमात पडले नव्हते. पण आता असं वाटतंय की......” तिला पुढे बोलूही न देता आलोकने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. 

दुपारी कसलंसं पुस्तक वाचत होती तेव्हा मोबाईलवर मेसेज आला. आलेला मेसेज वाचताच ती हसली. “या राहुलदादाच्याना... अजून चिडवतो” 
“काय झालं?” आलोकनं टीव्हीचा आवाज म्युट करत विचारलं. 
“अरे काही नाही. आम्ही स्कूलमध्ये होतो ना तेव्हा मला अभिषेक बच्चन खूप आवडायचा. कैच्याकैच. तर म्हणून मी हट्ट करून सगळ्या ग्रूपचा मै प्रेम की दिवानी हू बघायला लावलं होतं. असला पकाव पिक्चर होता, त्यावरून सगळे मला अजून चिडवतात. आता कुठल्याशा चॅनलवर लागलाय म्हणे तोच पिक्चर...” 
“तुमचा हा सोसायटीचा ग्रूप म्हणजे विचित्रच आहे. अजून किती क्लोजली कम्युनिकेट करता. अगदे डेटूडे लाईफ ऍक्टीव्हीटीपण” 
“साहजिक आहे ना. लहानाचे मोठे एकत्रच झालोय. दिवसभर हुंदडत असायचो. तशी आमची अख्खी सोसायटीच फार केरिंग होती. तरी तू अजून निम्म्याहून जास्त नमुन्यांना भेटला नाहीस. अरमान युएसला, आकृती जपानला, आणि अर्शिया दिल्लीला.... कधीतरी तुला भेटवेन.”
एरव्ही कधीही जास्त न बोलणारी आभा या ग्रूपचा विषय आला की मात्र अगदी मनमोकळेपणानं बोलायची. लग्नाच्या दिवशी आभाच्या नातेवाईकांपेक्षा जास्त गर्दी तिच्या मित्रमैत्रीणींची होती. परत आभाचा मोबाईल वाजला. “आता कोणे?” आलोकनं चिडवत विचारलं. 
“मिस्टर प्रोफेसर, अरमान शाह! हा कुठल्याही विषयावर एकदा लेक्चर द्यायला लागला की संपलं. समोरचा जागा आहे की नाही तेसुद्ध न बघता याचं चालूच.... सीरीयसली, स्टुपिड फ़ेलो” 
आभा बोलत असतानाच मोबाईलवर कॉल आला. “अयाईगं! ऑफिसमधून फोन. आता काही असलं तर वैताग आहे” म्हणत तिनं कॉल घेतला. 
पाचेक मिनिटं ती फोनवर बोलत राहिली. मामला केवळ कसल्यातरी ईव्हेंटचा नसून काहीतरी जास्त गंभीर  आहे हे आलोकच्याही लक्षात आलं होतं. आभानं कॉल बंद केल्यावर तो तिच्या जवळ गेला. “काय झालं?” 
“एजन्सीच्या एच आरमधून कॉल होता. गौरव खन्नानं एजन्सीशी टायअप कॅन्सल करायचं ठरवलंय”
“ओके, तू त्याची मॅनेजर आहेस म्हणून तुला कॉल केला होता...”
“हो. त्यानं मेलमध्ये लिहून दिलंय की हे टाय अप तो आभामुळे कॅन्सल करतोय.... माझ्या करीअरसाठी इतका मोठा सेटबॅक बसलाय.. आय ऍम शॉक्ड!”
आभाचा उतरलेला चेहरा पाहून आलोकनं तिला कुशीत घेतलं. “डोण्ट वरी. पण त्यानं असं का केलं... परवा आपण डिनरला गेलो तेव्हा तरी ठिक होता”
“माहित नाही.... एच् आर माझ्याकडे एक्स्प्लेनेशन मागतंय. आणि मला काहीच माहित नाही. गौरवनं असं का केलं”




 (क्रमशः) 


इश्क विश्क (भाग ३)

No comments:

Post a Comment