इश्क विश्क (भाग २)
अंधार्या कॉन्फरन्सरूममध्ये कृष्णन एकटाच बोलत होता. “इफ वी लूक ऍट दिस ग्राफ, व्हेर टोटल ब्रॅण्ड व्हॅल्यु ऑफ टॉप टेन ऍक्टर्स, वी गेट अ टेन पर्सेण्ट ऑफ मार्ज्जिन आबाऊट ऍक्ट्रेसेस ऍज वेल ऍड देन वी कंबाईन दिस ग्राफ विथ क्रिकेटर्स ऍन्ड अदर सेलीब्रीटीज, वी अंडरस्टॅण्ड दॅट...”
“वन सेकंड!” गौरव खन्नाचा आवाज आला. “लाईट्स प्लीज” कृष्णननं प्रेझेंटेशन पॉज केलं. कुणीतरी दिवे लावले. प्रेझेण्टेशन चालू होऊन दोन मिनिटं पण झाली नव्हती. कृष्णन आताशी ब्रॅण्ड इमेजसंदर्भामध्ये बोलायला सुरूवात करत होताच की गौरवनं मध्येच थांबवलं होतं. “सॉरी टू डिस्टर्ब. बट आय नीड अ ब्रेक” गौरव म्हणाला.
कुणी काही म्हणायचा प्रश्नच नव्हता. गौरव खन्ना सेलीब्रीटी होता, शिवाय क्लायंट म्हणून या एजन्सीकडे पहिल्यांदाच येत होता. जोपर्यंत तीन वर्षासाठी कॉन्ट्राक्ट साईन करत नाही तो पर्यंत तो म्हणेल ती पूर्व दिशा!
दोन मिनिटांनी गौरव त्या ऑफिसच्या बाल्कनीमध्ये उभं राहून सिगरेट ओढत होता. काहीतरी आठवल्यासारखं त्यानं कृष्णनला हाक मारली. “ती कॉन्फरन्सरूममध्ये मुलगी बसली होती ना, ऑफव्हाईट ड्रेसमध्ये, तिला जरा पाठवशील. एक छोटंसं काम होतं”
“यास्सर, एनिथिंग एल्स सार?” कृष्णननं विचारल.
“नथिंग”
आभा टीममधली सर्वात ज्युनिअर होती, तिचं काम कॉन्फरन्सरूममध्ये बसून मीटींगची मिनट्स बनवणे वगैरे तसलं. क्लायंट हॅण्डल करणं तिचं कामच नव्हतं. आता या हीरोनं तिलाच भेटायचं म्हटल्यावर कृष्णननं तिला लगेच बोलावून घेतलं.
“हॅलो सर” ती बाल्कनीमध्ये येत म्हणाली.
“हाय, गौरव खन्ना” आपलं नाव जणू तिला माहितीच नसावं अशा पद्धतीनं तो हात पुढं करत म्हणाला, तिनं हात घेऊन हसून लगेच सांगितलं. “हॅलो, मायसेल्फ आभा”
“ओह,” त्याच्या चेहर्यावर आश्चर्य आलं. “मला वाटलेलं ते माणसाचं नाव असतं. मुलीचं पहिल्यांदा ऐकलं”
“सर, इट्स आभा! भ फॉर....”
“ओह ओके.. ओके. गॉट इट! गॉट इट.” तो हसत म्हणाला. “यु स्मोक?”
“नो, सर! यु वॉन्टेड समथिंग एल्स?”
“आभा, तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काये?” त्यानं विचारलं.
“सर, एम बी ए, मार्केटींग”
“हा कृष्णन तुझा बॉस आहे?”
“येस सर”
“तो प्रेझेण्टेशनमध्ये जे काय बोलत होता ते तुला समजतं?”
“ऑफ कोर्स सर”
“ग्रेट! मग माझं एक काम करशील? प्लीज तो जे काय बोलत होता ते जरा एका दहावी नापास माणसाला समजू शकेल अशा भाषेत समजावून सांगशील??”
“डेफिनेटली सर. प्रेझेण्टेशन संपल्यावर...”
“नो. आय हेट दोज. साले हरामखोर दोन स्लाईडनंतर पाय चार्ट दाखवतात आणि मग मला भूक लागते. डायेट बोंबलतं सो आय थिंक आय डोण्ट नीड दोज प्रेझेण्टेशन्स.”
“सर, तुमच्या ब्रॅण्ड इमेज डेव्हलपमेंटसाठी ते सगळं गरजेचं आहे. आय मीन... शेवटी यात फायदा तर तुमचाच आहे ना! कॉन्ट्राक्ट साईन करण्याआधी आम्ही काय करू शकतो, आमचे डीलीव्हरेबल्स काय आहेत आणि आमच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत ते क्लीअर व्हायला नको. करोडो रूपयांची बात आहे!”
“आभा, बात करोडो रूपयांची नाही, बात मला जगासमोर तुम्ही कशापद्धतीनं विकणार आहात त्याची आहे. फ्रॅंकली स्पीकिंग, मला अशी एजन्सी हवी, जी केवळ मला विकण्यसाठी नाही तर माझ्या समाधानासाठीसुध्दा काम करेल. मला समजून घेऊन, माझ्या परीनं काम करणारी”
“नक्कीच सर, ऍट दिस एजन्सी वी गिव्ह सो मच अटेन्शन टू युअर पर्सनल इंटरेस्ट्स..आणि...”
“आभा, आय डोण्ट नीड ऍन एजन्सी, आय नीड अ पर्सन. गूड पर्सन टू वर्क विथ. विल यु हॅण्डल माय अकाऊंट?”
“सर, आय ऍम व्हेरी ज्युनिअर... आय कान्ट से”
“एक्झाक्टली माझ्याच वयाची आहेस. जर तू अकाऊंट हॅण्डल करणार असलीस तर मी आता लगेच कॉन्टाक्ट साईन करेन...पण कायम लक्षात ठेव. तुला माझ्यासोबत काम करावं लागेल. एजन्सीसाठी नाही तर गौरव खन्नासोबत.”
हे ऐकल्यावर कृष्णन आनंदानं नाचायचाच शिल्लक राहिला होता. चार महिन्यांपूर्वी जॉइन झालेल्या आभानं एका तासांत इंडस्ट्रीचा सुपरस्टार एजन्सीच्या पोर्टफोलिओमध्ये आणून ठेवला होता.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
“हा भातुकलीचा खेळ वाटतोय का तुला?” अरमाननं तिला चिडून विचारलं. “तू असा निर्णय घेऊच कसा शकतेस?”
“अरमान, ट्राय टू अंडरस्टॅण्ड. हे माझ्यासाठी पण फार सोपं नाहीये” आभा त्याला समजावत म्हणाली.
“मी आता रात्रीच्या ट्रेनने घरी निघतोय. गावाला जाऊन मला आईबाबांना, तुझ्या आईबाबांना सांगायचं आहे, लग्नासाठी तयारी करायची आहे. आणि आता तू म्हणतेस की आपण हे नातं संपवू या. आय डोण्ट अंडरस्टॅण्ड ऍट ऑल.”
ती काही न बोलता तशीच सोफ्यावर शांत बसून राहिली. तो काही न सुचून मोबाईलमधले मेसेजेस वाचत राहिला. थोड्या वेळानं त्यानंच विचारलं. “का? काय कारण?”
तिचे डोळे पाण्यानं भरले होते. “आपण कधीच एकत्र खुश राहू शकणार नाही. शी विल मेक इट शुअर”
“आभा, तू हर्षदा नावाच्या मुलीबद्दल बोलत असलीस तर मी तिला ओळखत नाही. माझ्या लाईफमध्ये अशी कुठलीही मुलगी कधीच नव्ह्ती”
“हे असं बोलणं फार सोपं असतं. पण प्रत्यक्षात....” त्यानं हातातला मोबाईल खाली ठेवला आणि तिचे खांदे धरले. “काय प्रत्यक्षात? काय... गेली दोन वर्षे आपण एकत्र आहोत. दोन वर्षं. त्या दोन वर्षांमध्ये आपण कधीच खुश नव्हतो? शी इज जस्ट मेसिंग विथ यु”
“अरमान, प्रश्न तिचा नाहिये. ती जरी तुझ्या आयुष्यामधून गेली तरी ग्रहण बनून कायम आपल्या दोघांमध्ये येत राहणार. तू जितक्या ईझीली म्हणतोस की तू तिला विसरलास... खरंच असं विसरणं शक्य असतं का?”
“मी आजमध्ये जगणारा माणूस आहे. ती माझ्यासाठी फक्त भूतकाळ आहे. मी कॉलेज संपताना तिच्यासोबत असलेलं प्रत्येक नातं संपवलं होतं. मी तिला विसरलो. त्यानंतर तू मला इथं भेटलीस. आपलं नातं नव्यानं चालू झालं. आणि मी या नात्यामध्ये प्रचंड समाधानी आहे, माझं आयुष्य मला तुझ्यासोबत काढायला आवडेल. मला तू लाईफ पार्टनर म्हणून हवीस. हे मी तुला आज पहिल्यांदा सांगतोय असं नाही. याहीआधी कित्येकदा सांगितलंय. ते तुला तेव्हा मान्य होतं.... मग आज अचानक तू एकतर्फी हा निर्णय का घेतेस? अशी कूठली इनसीक्युरीटी तुझ्या मनात आहे ते तरी समजू देत.”
“अरमान, हर्षू....”
“मला ते नाव खरंच ऐकायचं नाही. हो! माझं तिच्यासोबत तीन साडेतीन वर्षं अफेअर होतं. येस्स, आम्ही एकत्र आयुष्याची स्वप्नं रंगवली होती. पण जेव्हा ते नातं मोडलं तेव्हा ती स्वप्नं पण मोडली. आता या क्षणाला माझ्या आयुष्यात तू आहेस. यापुढेही तूच रहावीस असं वाटतंय. प्लीज, असा आततायी निर्णय घेऊ नकोस” तो तिला विनवत म्हणाला.
“अरमान, अता मला यावर काहीच बोलायचं नाही... मी निर्णय घेतलाय. माझ्यापरीनं तो निर्णय बरोबर आहे. आता त्यात बदल होणार नाही...”
“तुझ्या या निर्णयामुळे कितीजणांचं जीवन बरबाद होइल याची तुला कल्पना तरी आहे? माझं तर नक्कीच. तूतरी सुखी होशील? आभा, मी प्रेम केलंय तुझ्यावर. टीनेजमधलं भानगडीवालं प्रेम नाही. जे मनाच्या असं आतपासून वाटतं ते प्रेम. तू जर असं मध्येच मला सोडलंस तर...” तिनं त्याचं वाक्य मध्येच सोडलं. “तू माझ्यावर प्रेम केलंस? कधी? अरमान, तू माझ्याजवळ आलास ते हर्षूवर सूड घेण्यासाठी. तिला हे दाखवून द्यायला की तिला सोडून पण तू किती खुश आहेस.”
“हे तुला कुणी सांगितलं? आभा, हर्षू जे सांगते ते ऐकू नकोस. स्वत:च्या अकलेनं काम घे”
“नोप! मला मूर्खाला अक्कलच नाही ना. बावळट, बावळट आहे मी. जरा अक्कल असती तर त्या दिवशीच तुला सांगितलं असतं, अरमान परत निघून जा. पण नाही, तुझा ब्रेकप झाला म्हणून तुझ्याबरोबर दारू पित बसले. तुझं रडगाणं ऐकत राहिले.... तेव्हाच चुकलं माझं”
“काही चुकलेलं नाही आणि काहीच बदललेलं नाही. हा जो गैरसमज तुझ्या मनात आहे तो काढून टाक. आभा, यु नो मी.. प्लीज! पुन्हा एकदा सांगतोय. हर्षू तुझ्या मनामध्ये विष कालवतेय”
“आर यु शुअर... हर्षूच विष कालवतेय?”
“मग दुसर्या कुणाचा यामध्ये संबंध आहे का? हर्षू आपल्यामध्ये येतेय हे तुला अजून समजत कसं नाही..”
“अरमान, फक्त आजच्या प्रसंगाचा विचार करू नकोस. सगळ्याच घटना लक्षात घे....कदाचित हर्षू खरं बोलत असेल आणि मी खोटं सांगितलं असेल!”
“कसल्या घटना? आभा, वी आर गेटींग मॅरीड. यापलिकडे मला कसलाही विचार करायचाच नाहीये. तू हे असले बुद्धीभेद करणं बंद कर! काय हर्षू खरं सांगते की तू खोटं त्याच्याशी मला देणंघेणं नाही. मला फक्त एक गोष्ट माहित आहे.. आय लव्ह यु. बास्स. आणि हे तुलाही चांगलंच माहित आहे की यु लव्ह मी. बरोबर ना?”
“अरमान, हे इतकं सोपं नाहीये. हर्षूच्या कॉलेज ऍडमिशनच्य आधी मी तुला खोटं सांगितलं होतं... माझ्याबद्दल हर्षूबद्दल आणि एकंदरीतच. तू दोन तीनदा घरी येऊन मला शहाणपणाच्या चार गोष्टी शिकवाय्च्य बाता करायला लागलास... म्ह्णून मीही म्हटलं थांब तुझी बोलतीच बंद करते. आणि तेव्हाच खोटं सांगितलं तू आवडतोस वगैरे. पण माझ्या त्या खोट्यामुळं तुझ्यात आणि हर्षूमध्ये भांडणांना सुरूवात होइल असं चुकूनही वाटलं नव्हतं... तरी तुम्ही नंतर दोनेक वर्षं रिलेशनशिपमध्ये होतात....”
“हो, लॉंग डिस्टन रिलेशनशिपचा तो एक तोटा असतो. ब्रेकप पटकन होत नाही...पण ते कारण खचितच नव्हतं. तू मला सांगितलंस आणि मग नंतर..”
“मी ते विसरून गेलो. बरोबर ना? अरमान, मी माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी गोष्ट तुला सांगितली आणि तू वि स रू न गेलास?”
“आभा, ते पाच वर्षांपूर्वी. मी आजबद्दल बोलतेय. तेव्हा तू काय बोललीस आणि मी काय केलं ते जरा बाजूला ठेवू. हे हर्षू नावाचं कॅरेक्टर बाजूला ठेवू... आणि फक्त आपल्या दोघांबद्दल बोलू...”
“फक्त आपल्या दोघांबद्दल? व्हॉट डू यु मीन बाय दिस?”
“एक मिनिट... आभा, त्या रात्री तू मला दोन व्हर्जन सांगितली होतीस. म्हणजे आता तुला असं म्हणायचं आहे की... आय ऍम अ बिट कन्फ़्युज्ड... कुठलं व्हर्जन खरं आहे?”
आभानं बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि अरमानच्या अंगावर फेकला. “साल्या, दोन वर्षं माझ्यासोबत झोपतोस तरी अजून विचारतोस कुठ्लं व्हर्जन खरं आहे.” त्यानं तिचा नेम चुकवला तरी तिच्या या संतापाचं त्याला इतक्या बिकट क्षणी पण हसू आलं.
“आभा, दिस इज यु, दिस क्रेझी गर्ल. जे मनात आलं ते केलं, पश्चातबुद्धीला तिथं स्थानच नाही. आयुष्यात इतका वेडेपणा केलास. कधीच कुणाचंही ऐकलं नाहीस मग आताच का बिचकतेस?” तो अचानक गंभीर होत म्हणाला. “तू आता काहीही म्हण पण उद्या मी वनिताकाकीशी बोलणार आहे. तुझ्या घरामध्ये कुणीही विरोध करणार नाही. माझ्या घरामध्ये थोडासा झाला तर..”
“थोडासा? अरमान शहा. तुमचा आणी माझा धर्म वेगळा. खाणंपिणं वेगळं. शिवाय प्रेमाभाभींना मी काय आहे आणि काय काय केलंय याचा सगळा रेकॉर्ड माहित आहे...”
“द पॉईण्ट इज, मी आईला कसंही करून कन्व्हिन्स करेन. तुझा काय इतिहास असेल त्यासकट आणि धर्म वगैरे ते नंतर बघू. अगदीच वेळ आली तर...”
“अरमान, माझा निर्णय अंतिम आहे. त्यात बदल होणार नाही. आपलं नातं संपलं” ती ठामपणे म्हणाली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अचानक ऐकू आलेल्या किंकाळ्यांनी आलोकला जाग आली, दोनेक सेकंद त्याला काहीच उमजेना. धडपडत त्यानं झोपमध्येच खोलीमधला दिवा लावला. त्याच्या बाजूला झोपलेली आभा किंचाळत होती. त्यानं तिला हलवून हलवून जागं करायचा प्रयत्न केला. पण स्वत:चा उजवा दंड डाव्या हातानं घट्ट धरून ती ओरडतच राहिली. शेवटी त्यानं ग्लासमधलं पाणी तिच्या तोंडावर मारलं, तेव्हा कुठं तिला जाग आली.
“आभा, स्वप्न पडलं का?” त्यानं विचारलं. ती अजूनही त्या वाईट स्वप्नामध्येच जगत असल्यासारखी घाबरलेली होती. दचकून तिनं स्वत:चाच उजवा दंड परत परत चाचपून पाहिला. “आर यु ओके?” आलोकनं विचारलं. ती किंचित सावरली. आपल्या बाजूला बसलेला माणूस कुणी परका अनोळखी नसून महिन्याभरापूर्वीच लग्न झालेला आपला नवरा आहे हे हळूहळू तिच्या लक्षात आलं.
“फार वाईट स्वप्नं पडलं” ती सावकाश म्हणाली. “मी घरात होते, कुणीतरी दार वाजवलं, आय होलमधून पाहिलं तर ओळखीची व्यक्ती होती. कोण ते आठवत नाही. पण मी दरवाजा उघडला. आणि मग त्या माणसानं हातातला कोयता माझ्यावर मारला. नशीब इतकंच की त्याचा हल्ला झाल्यावर लगेच मी आत जायला पळाले आणि तो कोयता असा... इथे.... इथे माझ्या दंडावर बसला. सगळं रक्त उडालं...”
आलोकनं तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. “डोण्ट वरी. कधीकधी फार टेन्शनमध्ये असलं की अशी वाईट स्वप्नं पडतात. त्यात तुला हे घर नवीन.. सगळंच नवीन..इट्स ओके”
“आय ऍम सॉरी, माझ्यामुळं तुझी झोपमोड झाली. किती वाजलेत?”
तिच्या कपाळांवर आलेला घाम हलकेच पुसत तो म्हणाला. “अडीच वगैरे झाले असतील आणि माझी झोपमोड वगैरे काही नाही. आता निवांत झोप. घाबरू नकोस. मी आहे ना?” तिला जवळ कुशीत घेऊन थोपटत तो म्हणाला.
“मला याआधी असली स्वप्नं कधीच पडली नाहीत” ती सावकाश म्हणाली. “स्वप्नं वाटतच नाही, असं वाटतंय की खरंच कुणीतरी..”
“श्श!! जास्त विचार करू नकोस. ते स्वप्नंच होतं. मी इथं असताना कुणी तुला काही करू शकणार नाही”
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
“अरमान, वेड लागलंय तुला? वेड?” राहुल त्याच्यावर ओरडला. इतक्या रात्री अरमानचा फोन आल्यावर त्याला दोनेक मिनिटं काहीच सुचलं नव्हतं. मुळात अरमानला नक्की काय म्ह्णायचं आहे तेच त्याला समजत नव्हतं. पण अरमाननं फोन आभाच्या हातात दिला... आभाचा तो आवाज ऐकल्या ऐकल्या राहुल त्याच्या फ़्लॅटवरून निघाला होता. अवघ्या पंधरा मिनिटांत टॅक्सी पकडून तो हॉस्पिटलमध्ये पोचला होता.
“अरे गाढवा, सहा टाके पडलेत तिच्या हाताला. काय केलंस तू नक्की?” राहुलनं भांबावून विचारलं.
“आय डोण्ट नो... मला माहित नाही...” अरमान कसाबसा म्हणाला. गेल्या दीड तासामध्ये त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. अंगातला शर्ट रक्तानं भरला होता.
“अरमान, कोयता! अरे, तिचा जीव गेला असता. रात्री दोन वाजता मालाडवरून वाशीला गेलास; तिच्या खोलीवर आणि तिला मारलंस? कशाला? आता म्हणतोस माहित नाही!!!” राहुलचा अजून हे सगळं खरंच घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. “अरमान, काय झालंय?” अरमान काही न बोलता शून्यामध्ये टक लावून बसल्यासारखा होता. बाजूच्या खोलीमधून आभानं राहुलला आवाज दिला. तो आत गेला. नर्स कसली तरी औषधं घेऊन मघाशीच बाहेर गेली होती. डॉक्टर अजून अर्ध्या तासानं परत चेकपला येणार होते.
“काही हवंय आभा?”
“तो अजून इथंच आहे?” तिनं विचारलं.
“हो, बाहेर बसलाय. काय चालू आहे आभा? मला जरा प्लीज सांगशील का?”
“रोजचं झालंय राहुल. रोज मला फोन करतो. धमकावतो. शिव्या देतो. ब्लॅकमेल करेन म्हणतो..”
“कोण? अरमान.. आपला अरमान? असं का करतोय?” राहुल पूर्णच गोंधळला.
“आम्ही गेले दोन वर्षं रिलेशनशिपमध्ये आहोत.. कुणालाच माहित नाही. गावी कुणालाच सांगितलेलं नाही. आता अरमान म्हणतोय की लग्न करू या. मी तयार नाही... म्हणून...” तिनं दंडावरच्या जखम दाखवली. “हे पाहिलंस? जरा मी गाफील असते तर दंडाऐवजी माझा गळा चिरला असता”
राहुलनं केसांत हात खुपसला. “अनबिलीव्हेबल. कशाकशावर विश्वास ठेवू मी? तू आणि अरमान... लग्नाच्या गोष्टी करताय. तू नाही म्हणतेस. म्हणून तो येऊन तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करतो”
“मी जीव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही...” बाहेर बसलेला अरमान अचानक खोलीत येत म्हणाला. “आभा, तुला काही करावं असं मला चुकूनही वाटत नाही गं. तसं असतं तर तुला लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं असतं का?” अरमान खोलीत आलेला बघून आभा बसल्या जागीच मागे सरकली. तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड भिती दाटून आली. ते पाहून राहुल पुढे आला. “अरमान, बाहेर जा. ती आधीच शॉकमध्ये आहे. आपण नंतर बोलू”
“राहुल, तूच सांग तिला प्लीज, समजाव ना” अरमान काकुळतीनं म्हणाला.
“काय समजावू?” राहुलचा संयम आता संपला. तो ओरडलाच. “समोर दिसतंय ना? हे हाताला झालेली जखम दिसतेय ना? कुणी केलं हे? मी? तिनं? का कुण्या भुतान? म्हणे जीव घ्यायचा प्रयत्न केला नाही. लूक व्हॉट यु हॅव्ह डन... ही गोष्ट वनिताकाकीला किंवा तुझ्या आईला कळलं तर काय होइल? तिनं जर पोलिस तक्रार केली ना तर बाराच्या भावात जाशील. इडियट. आता उपकार कर आणि बाहेर बस. तिला अजून घाबरवू नकोस”
“आय ऍम सॉरी, आभा.” अरमान अचानक आभाच्या एकदम जवळ आला. “आय ऍम रीअली सॉरी.” तिचा चेहरा हातात घेऊन तो म्हणाला “मी असं का केलं ते मला माहित नाही. मला फक्त तुला घाबरवायचं होतं, मारायचं नव्हतं. फक्त तुला “लग्नाला हो म्हण नाहीतर मी जीव देतो” असं सांगून घाबरवायचं होतं. तुला नव्हतं मारायचं.” बोलता बोलता तो रडायला लागला. “आभा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.. खरंसांगतो. गेले दोन महिने तू मला भेटत नाहीस. माझ्याशी बोलत नाहीस.. प्लीज, असं नको ना करूस... प्लीज. मला सोडून जाऊ नकोस.. मी तुझ्याशिवाय काहीच नाहिये” आभा काहीच न बोलता घाबरून त्याच्याकडे बघत राहिली. राहुलनं त्याला पाठी ओढलं.
“अरमान, ऐक माझं. इकडे बघ” आभाकडेच एकटक बघत असलेल्या अरमानचा चेहरा त्यानं वळवला. “आपण नंतर सगळे बसून डिस्कस करूया. आता तिला थोडा वेळ दे. रक्त किती वाहिलंय. थोडातरी अशक्तपणा असेल... थोडावेळ बाहेर बस. आपण सकाळी बोलू” कसंबसं त्याला समजावत तो बाहेर घेऊन गेला. खोलीबाहेरच्या बाकावर त्याला बसवलं आणि तो परत आत आला. आभा हमसून हमसून रडत होती.
“रडू नकोस, मी आहे ना. हे असं काय वागतोय?” आभासारखी धडाडीची मुलगी इतकी कोसळू शकेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
“त्याची चूक नाहीये राहुल. आय नो... त्यानं मुद्दाम केलं नाही”
“म्हणजे?” राहुल आता परत एकदा भांबावला.
“हे सगळं हर्षदा करवते. तिला ब्लॅक मॅजिक येतं. मागे मी मेडीकलला गेल्यावर तिनं माझ्यासोबत पण असंच केलं होतं” आभा डोळे पुसत म्हणाली. “आम्हा दोघांना ती कधीच खुश राहू देणार नाही... कधीच एकत्र राहू देणार नाही. अरमानच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष कालवता येणार नाही हे तिला माहित आहे. म्हणून आता माझ्या मनामध्ये अरमानबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी ती हे सगळं करतेय. अरमानला मी मागेही ही गोष्ट सांगितली आहे. पण त्याचा विश्वास नाही....”
राहुल एका रात्रीमध्ये आपण किती धक्के पचवू शकतो याचा अजून अंदाज घेत होता. येणारं प्रत्येक वाक्य नवीन ट्विस्ट घेऊन येत होतं... देवाधर्मावर कसलाही विश्वास नसलेली आभा काळ्या जादूबद्दल सांगत होती.
“आभा, असं काही नसतं. उद्या तुला गावाला मीच घेऊन जाईन. घरी गेल्यावर आईबाबा तुला काय ते सांगतील शिवाय अरमानला आपण एखाद्या चांगल्या सायकियाट्रीस्टला दाखवूया. ही वील बी बेटर”
“नाही. मी त्याच्यापासून खूप लांब खूप दूर गेले तरच आम्ही दोघं जगू शकू. नाहीतर ती हर्षू आमचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही” आभा शांतपणे म्हणाली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
No comments:
Post a Comment