Sunday 22 March 2015

इश्क विश्क (भाग १)

“सो इट्स ऑफिशीअल” 
“यप्प”
“लाईक, इट्स रीअली हॅपनिंग?” तिनं आभाच्या हातातली सिगरेट घेत परत विचारलं. 
“इट्स रीअली हॅपनिंग.” आभा परत शांतपणं उत्तरली. 
“हाऊ?” हर्षूनं विचारलं. 
“आय डोन्ट नो. साला, मलाच काय कळत नाहिये. हाऊ द हेल दिस हॅपन्ड. व्हाय इट हॅपन्ड....” आभानं हर्षूच्या हातातली सिगरेट परत घेतली. एक झुरका मारला. “अख्खं आयुष्यच बदललंय”
हर्षू काही न सुचल्यासारखी आभाकडं एक मिनिट बघत राहिली. तिच्या नजरेत नजर मिळवायची आभाची हिंमत नव्हतीच. हर्षू आल्यापासूनच ती केवळ तिची नजर चुकवत होती. हर्षू समोरून उठली. आभाच्याजवळ येऊन तिनं खाडकन मुस्काटात मारली. हर्षूच्या त्या अचानक हल्ल्यानं आभा कोलमडली. पण ती उठायची किंवा काही म्हणायचीदेखील वाट न बघता हर्षू सरळ खोलीबाहेर पडली. 


“हर्ष, ऐकून तर घेना” आभाचा आवाज ऐकू आला तरी ती थांबली नाही. पुढं जातच राहिली. खोलीबाहेर  आल्याच किचनमध्ये काम करत असलेली आभाची आई तिला दिसली. “येते काकू” अतिशय शांतपणं तिनं सांगितलं. 
“अरे निघालीस पण. आता तरी आली होतीस ना. बस थोडावेळ! खायला गरमगरम इडल्या करतेच आहे.” विनिताकाकी म्हणाली तरी हर्षूचा थांबायचा बिल्कुल इरादा नव्हता. “नको. ते बेंगलोरात इडल्या खाऊन वैताग आलाय.” ती तुटकपणे म्हणाली. 


आभा अजून खोलीमध्येच होती. हर्षूनं मारलं त्याहून जास्त तिनं आपलं ऐकूनसुद्धा घेतलं नाही याचं तिला जास्त वाईट वाटलं होतं. हर्षू गेल्यावर तिनं उठून बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं. डोळ्यांतलं पाणी मघापासून वाहतच होतं. ते अजून वाहत राहिलं. टेबलावर ठेवलेली मिंटची गोळी तिनं खाल्ली, आणि ती खोलीबाहेर आली. जणू आईपर्यंत सिगरेटचा वास अजून पोचलाच नव्ह्ता. 


वनिता अजून किचनमध्येच होती. “काय गं? हर्षाचं आणि तुझं परत भांडण झालं की काय?” तिनं सहज विचारलं. आभानं नुसती मान हलवली. 

“ती उद्या निघतेय ना बंगलोरला. आज रात्री जेवायला बोलावू का?” वनिता तिच्याच विश्वामध्ये मश्गुल होती. 
“ती येणार नाही” आभा हळूच म्हणाली. “आई, मी जरा बाहेर जातेय. रात्री परत यायला उशीर होइल” एवढंच म्हणून तिनं भिंतीवरची बाईकची चावी घेतली. 

“आता कूठं निघालीस तिन्हीसांजेची?” पण आभा तोपर्यंत बाईक स्टार्ट करत होती. बाईक गेटमधून काढत असताना समोरच्या गेटमध्ये उभी असलेली हर्षू तिला दिसलीच. हर्षू अगदी थंडपणं तिच्याकडं बघत होती. आभा बाईकवरून खाली उतरली. हर्षूशी काहीतरी बोलण्यासाठी दोन पावलं पुढं जात असतानाच हर्षूच्या बाजूच्या बंगल्याचं गेट उघडलं. अरमान तिच्याकडं बघून हसत होता आणि तिच्याचकडे चालत येत होता. बाजूच्या गेटमध्ये उभी असलेली हर्षू त्याला दिसलीच नव्हती. आभानं काही बोलायच्या आत अरमान तिच्याजवळ आला. 
“कुठं निघालीस?” त्यानं तिच्या गळयांत हात टाकत प्रेमानं विचारलं. अरमान सामोरं आलेलं बघताच हर्षू फणकार्‍यानं आत घरात निघून गेलेलं आभाला दिसलं होतंच. 


“अरमान, कुणी  बघेल.” आभा हळूच म्हणाली. अरमानला हर्षू आलेली माहित नव्हतं का? आणि माहित नसलं तरी सोसायटीमध्ये कुणीतरी बघेल याची जरातरी काळजी नको का? 

“बघू देत. आय डोण्ट केअर. पण तू निघालीस कुठं? त्यानं तिच्या गालावरून हात फिरवत विचारलं. अचानक त्याला तिच्या गालावर उठलेले व्रण दिसले. 

“हे काय? हू डिड दिस?”  

“काही नाही. असंच!” ती त्याचा हात दूर करत म्हणाली. “अरमान, मला थोडंसं काम आहे. दुकानामध्ये सामान घ्यायचंय. साडेआठला दुकानं बंद होतील. मी त्या आधी जाऊन येते. बाय” तिचा नर्व्हसनेस त्याला जाणवून गेला. 
गेल्या अडीच वर्षांत ते नाव पहिल्यांदाच उच्चारत तो म्हणाला. “तू हर्षूला सांगितलंस?”

“हं” ती इतकंच म्हणाली. 

“काही गरज होती का? इथं मला शपथा घालून ठेवल्यास कुणाला बोलू नकोस म्हणून. आणि स्वत: मात्र.....” तो चिडला. “तिनं मारलं तुला? तुझे हात काय पावभाजी बनवत होते? तुला एक ठेवून देता आली नाही. हक्क काये तिचा?”


आभा काही न बोलता खाली मान घालून ऐकत राहिली.  


बेडरूमच्या खिडकीमधून रस्त्यावर उभ्या असलेल्या अरमान आणि आभाकडे बघून हर्षूचा संताप संताप होत राहिला. तिला खांद्याला धरून तो काहीतरी बोलत होता. मग त्यानं तिला जवळ घेतलं. तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचे डोळे पुसले. आणि हे सगळं भर रस्त्यात. कुणाचीही कसली तमा न बाळगता. 

हर्षूनं बेडरूममध्ये येईल ते सामान उचलून फेकायला सुरूवात केली. तिच्या बेडरूममधून होणारे आवाज ऐकून अरूण  धावत  आला. “काय गं?” त्यानं बेडरूमचा दरवाजा उघडत विचारलं. 

“बिच, दॅट्स व्हॉट शी इज. कुत्री साली. हरामखोर.” हर्षू ओरडत राहिली. अरूण काही न सुचून तसाच दाराशी उभा राहिला. गेल्या कित्येक वर्षमध्ये हर्षूचा हा संतापी अवतार त्यानं पाहिला नव्हता. नेमकी सायली घरात नव्हती, नाहीतर तिनंच समजावून शांत केलं असतं. मुळात अरूणला ती कशावरून चिडली आहे तेच समजलेलं नव्हतं. ती कुणाबद्दल बोलत होती तेही समजलं नव्हतं. 


चिडून ओरडून हर्षू दमल्यासारखी बेडवर बसून राहिली. गप्प पणं हुंदके देत. अरूण खोलीत आला, त्यानं हलकेच लेकीच्या पाठीवरून हात फिरवला. “शांत हो बेटा! काय झालंय?”


हर्षूनं डोळे पुसले. “डू यु नो, अरमान आणि आभा लग्न करतायत? दे आर गेटींग मॅरीड” ती एक एक शब्द अत्यंत थंडपणे उच्चारत म्हणाली. अरूणला खरंच यामधलं काही माहित नव्ह्तं, आपल्या सोसायटीमध्ये राहणार्‍या मुलांचं आपापसांत काय चालतं ते त्याला थोडीच माहित असणार? 


“नाही, बट दॅट्स अ गूड न्युज. आय मीन, दे बोथ आर गूड” हर्षूनं पाठीवरचा हात झिडकारला. 
“व्हॉट गूड न्युज? इट्स अ व्हेरी बॅड न्युज. तुमच्या लेकीच्या प्रेमाचं श्राद्ध घालून दोघं लग्न करतायत.” ती स्वत:शी बोलत असल्यासारखी पुटपुटली. “आय विल मेक ईट शुअर, हे लग्न होणार नाही. तिनं माझं आयुष्य बरबाद केलं. मी तिचं करेन.” अरूणला आपण काय ऐकतोय त्याचाच विश्वास बसेना. इतक्या वर्षांमध्ये हर्षूचं कुणाह्हीबरोबर प्रेम वगैरे असेल असं त्याला वाटलंच नव्हतं. तेही अरमानबरोबर? पण हर्षू अशी चिडलेली असताना तिच्याशी काही बोलण्यांत अर्थ नव्हता, त्यापेक्षा सायली आल्यावर काय ते बोलेल. 


हर्षू बेडवरून उठली. तिनं मघाशी फेकलेला मोबाईल उचलला आणि ऑन केला. मेलबॉक्स उघडून तिनं ऑफिस मध्ये बॉस आणि एच आरला अजून आठ दिवस येणार नसल्याचं मेल केलं. उद्या असलेलं ट्रेनचं तीकीट कॅन्सल केलं.

टाईप करत असताना तिचं लक्ष सहज रस्त्यावर गेलं. अरमान आणि आभा अजूनही रस्त्यावर तिथंच उभे होते. आभा हसत होती, अरमान तिला काहीतरी सांगून हसवत असणार. म्हणजे गेला अर्धा तास ही दोघं अख्ख्या जगाचं भान विसरून इथं रंगरलिया रंगवत होते. रात्रीच्या अंधारामध्ये बाईकच्या बाजूला स्ट्रीट लाईटच्या उजेडामध्ये एकमेकांशीच गप्पा मारत असलेल्य त्या दोघांना बघून हर्षू कोसळली. मघाशी आभानं  सांगितल्यापासून रोखून धरलेले अश्रू आता मात्र तिचं अजिबात ऐकेनात. खिडकीच्याच बाजूला गुडघ्यावर बसून हर्षू कितीतरी वेळ रडत राहिली. 



<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


“यु नो आभा, आय रीअली हेट दिस” गौरव खन्नानं तिच्या हातामध्ये त्याची बॅग देत सलामीचं वाक्य ठोकलं. 
“सर, हाफ़ ऍन अवर, ऍट मॅक्स. उससे ज्यादा एक मिनिट नही” आभानं त्याच्या हातातली बॅग  घेतली. प्रायोजकाकडून आलेला टीशर्ट त्याच्या हातात दिला. त्यानं तिच्यासमोरच अंगातला शर्ट काढून तो टीशर्ट घातला. “दुसरा कलर मिळाला नाही का?” त्यानं तेवढ्यातच कुरकुर करून घेतली. ती केवळ हसली. 

“तुम्हाला टचअप हवाय?” तिनं विचारलं. 

“नक्को. उन्हात तर फिरायचंय.  कुठल्या गाढवाच्या डोक्यांतून या असल्या रोड शोच्या आयडीया निघतात. आर यु शुअर अर्धा तास लागेल? बाहेर क्राऊड प्रचंड आहे.”

“गौरव, अर्ध्या तासानंतर तुम्हाला या व्हॅनमध्ये परत घेऊन यायची जबाबदारी माझी” तिनं हसत पुढं येऊन त्याचे केस सारखे केले. बॅगमधला  गॉगल काढून त्याच्या हातात दिला. तितक्यात व्हॅनच्या दारावर टकटक झाली. तिनं दार उघडलं बाहेर ईव्हेंट मॅनेजमेंटपैकी कुणीतरी अजून थोडा वेळ लागेल म्हणून निरोप घेऊन आलं होतं. ते ऐकून गौरव वैतागला. “पाहिलंस, नेहमीचं आहे. म्हणून मी या पीआर वाल्यांना सांगतो फिल्म प्रमोशनला दुसरं काहीतरी ठरवा पण हे असलं नको. सगळा वेस्ट ऑफ टाईम” 

“सॉरी सर. ऍक्च्युअली, सीक्युरीटी चेक साठी उशीर होतोय. मला लक्षात आलं नाही, अन्यथा मी तुम्हाला अजून दहा मिनिटं उशीरा यायला सांगितलं असतं.” ती वरमून म्हणाली. 

“सॉरी काय त्यात? तुझी चूक थोडीच आहे.” तो बोलत असताना तिचा फोन सायलेंटवर चमकला. तिनं फोन कुणाचा आहे ते पाहिलं आणि कॉल कट केला. 

“कुणाचा फोन आहे?” त्यानं सहज विचारलं. 

“पर्सनल कॉल आहे...” ती म्हणाली. “तुम्हाला कॉफी ज्युस वगैरे काही सांगू?” 

“कशाला? बाहेर पब्लिकसमोर ते घाणेरड्या चवीचं एनर्जी ड्रिंक प्यायला देशीलच” गौरवनं व्हॅनमधेच इकडे तिकडे फिरकत म्हणाला. “आभा, नेक्स्ट टाईम मला हे फिटनेसवाले ब्रॅन्ड्स अजिबात नकोत. काय चांगलं आईस्क्रीम, चॉकलेट वगैरे टेस्टी ब्रॅण्ड्स बघ ना. बोरींग ब्रॅण्ड पोर्टफोलिओ झालाय. काहीतरी एक्सायटिंग हवंय़” 

ती नुसती हसली. गौरव खन्ना इंडस्ट्रीचा रोमान्स आयकॉन होता. सुपरस्टार आशिश खन्नाचा हा एकुलता एक मुलगा. इतर स्टारसनसारखा कसलेही इकडतिकडचे नखरे न करता वयाच्या सतराव्या वर्षी एका कॉलेज युथ मूव्हीमधून हीरो म्हणून लोकांसमोर आला. आज आठ वर्षांनी तो इंडस्ट्रीचा सुपरस्टार झाला होता.  त्याचे गोंडस लहान मुलांसारखे लूक्स आणि इतर हीरोंसारखी जिममध्ये जाऊन कोरून न घेतलेली तरीही सडपातळ बॉडी हे त्याचे युएसपी होते. नृत्याचं कौशल्य होतंच, अभिनयदेखील बर्‍यापैकी जमायचा. आभा गेली दोन वर्षं त्याची सेलीब्रीटी मॅनेजर म्हणून काम करत होती. पुन्हा एकदा तिचा मोबाईल चमकला. तिनं परत कट केला.

“मी तुझ्यासमोर एखादा खास कॉल घेतला नाही, तर एक वेळ ठिक आहे. पण मी निर्लज्जपणे सगळे कॉल्स घेतो. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? असा कुठला खास कॉल येतोय?” त्यानं तिला चिडवत विचारलं. 

“नथिंग इम्पोर्टंट.” आभा कामावर असताना पर्सनल कॉल्स घेत नाही हे त्याला चांगलंच माहित होतं. पण इतक्या दिवसांत तिच्या मोबाईलवर पर्सनल कॉलपण कधी आला नव्हता. आज मात्र मोबाईल सलग चमकत होता. 
“गो अहेड, दिस मे बी युअर बॉयफ्रेण्ड!” त्यानं परत चिडवलं. “आता परत कॉल कट केलास तर मी तो मोबाईल घेऊन कॉल अटेण्ड करेन...” 

“गौरव, नॉट माय बॉयफ्रेन्ड...” ती हसत म्हणाली. परत मोबाईल चमकलाच, तिनं यावेळी मात्र कॉल रीजेक्ट न करता कॉल घेतला. “येस.. बोल! मला इथे उशीर होइल. ईव्हेंट चालू आहे. हो... मी फ्री झाले की कॉल देईन.... ओके. बाय लव्ह यु” जेवढ्यास तेवढं बोलत तिनं फोन कट केला. 

“लव्ह यु.. आणि वर म्हणे नॉट माय बॉयफ्रेण्ड?” गौरव सहजपणं तिला म्ह्णाला. 
“गौरव, दॅट वॉज माय हजबण्ड. रत्री डिनरला बाहेर जायचं का म्हणून विचारत होता.” 
“व्हॉट, यु आर मॅरीड. सिन्स व्हेन?” 
“सहा महिने झाले....”
“ओ गॉश, आणि तू मला लग्नासाठी इन्व्हाईट पण केलं नाहीस. काय करतो तुझा नवरा? इंडस्ट्रीमधला आहे?”
“नाही. तो सॉफ्टवेअरमध्ये आहे.. तुमच्यासाठी काही स्नॅक्स वगैरे मागवू का?” तिनं परत विषयाचा रोख त्याच्याचकडे वळवत म्हणाली. आफ्टर ऑल, सेलीब्रीटी तो होता. 

“खरंच नकोय. आभा, सीरीयसली. दोन वर्षं झाली तू माझी मॅनेजर आहेस. आणि मला तुझ्याबद्दल काहीही माहित नाही. असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा तू सुट्टी घेतली असशील.... तुझं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं आणि तू मला सांगितलंही नाहीस.” तो उठून तिच्या अगदी जवळ आला. “मी तुला इतका स्वत:च्या कोशामध्ये जगणारा माणूस वाटतो का? इतके दिवस सोबत काम करूनही तू मला अजून फ्रेण्ड मानत नाहीस का?” 
“तसं काही नाहिये.  पण लग्न हा पर्सनल मामला असताना...”

“आभा, आपल्या इंडस्ट्रीमध्ये काहीच पर्सनल आणि काहीच प्रोफेशनल नसतं, असं मागे तूच एकदा म्हणाली होतीस ना... मग तरी इतका अलिप्तपणा कशाला? टेल मी. टेल मी अबाऊट यु.”
ती हसली. हे हसणं नेहमीसारखं प्रोफेशनल हसणं नव्हतं, तर मनापासून आलेलं हसू होतं. “काय सांगू?” 
“लव्ह मॅरेज ऑर अरेंज मॅरेज?” त्यानं विचारलं. 
“अरेंज मॅरेज” 
“तू अरेंज मॅरेज केलंस?” त्यानं अविश्वासानं विचारलं. ती परत हसली. 
“हनीमूनला कूठं गेला होता?” 
“थायलंड” 
“खोटं. तू वर्षभरात एकही सुट्टी घेतली नाहीस.”
“तुम्ही दिलदाराच्या शूटींगासाठी महिनाभर युरोपमध्ये होता, तेव्हाच हनीमूनला गेलो होतो” 
“ओके. माझी चूक झाली पण आता माझी डायरी अपडेट कर. नेक्स्ट सॅटरडे, डिनर प्रोग्राम. माझ्या घरी. तू आणि तुझा नवरा. डन?” 
“नक्की डन!!” 


व्हॅनच्या दरवाज्यावर टकटक झाली. ईव्हेंटची तयारी झाली होती. ऑर्गनायझरचा निरोप आल्यावर ती त्याच्यापासून दूर सरकली. बाजूच्या टेबलवर ठेवलेला स्पीचच्या पॉइण्टसचा कागद तिनं त्याच्या हातात दिला. 
“हाफ ऍन अवर, आय प्रॉमिस.” सवयीच्या प्रोफेशनल पद्धतीप्रमाणे हसत ती म्हणाली. “चलो!” 
“तू पुढं हो! मी जरा वॉशरूम विजीट देऊन येतो” तो आरश्यात बघून केस सारखे करत म्हणाला. ती बाहेर गेल्यावर मात्र त्यानं इतका वेळ घेतलेलं अवसान गळून पडालं. 


सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं. आणि आपल्याला माहितच नाही. आपण आज सांगू उद्या सांगू म्हणत राहिलो. जगाच्या समोर वाटेल तितकी बडबड करत राहिलो, पण साधं तोंड उचकटून “आभा, आय लव्ह यु” म्हणता आलं नाही!!! सगळी दुनियाच गोल गोल फिरल्यासारखं व्हायला लागलं. इतके दिवस ती आजूबाजूलाच असण्याची इतकी सवय झालीये... पण जे आपल्या मनांत होतं ते आपण सांगितलं का नाही? बाथरूममध्ये जाऊन त्यानं तोंडावर सपासप पाणी मारून घेतलं. दोनेक मिनिटांनी आभाचा बाहेरून आवाज आला. “गौरव, दे आर वेटींग फॉर यु” त्यानं आरश्यात पाहिलं. तोंड पुसलं. डोळ्यांवर गॉगल चढवला, आता त्याचे रडके सुजलेले डोळे कुण्णालाही दिसले नसते. अगदी आभालासुद्धा!


ईव्हेंट संपवून टॅक्सीमध्ये बसल्यावर आभानं फोन लावला. “हां! आता ईव्हेंट संपलाय. आय नो. खूप उशीर झालाय, सॉरी. तू हॉटेलवर पोचलास का? मी कॅबमध्ये आहे. पोचतेच तिथं, येस्स बाय लव्ह यु” तिनं फोन कट केला. 
संध्याकाळच्या ट्राफिकमध्ये टॅक्सी अगदी निवांतपणे पुढं सरकत होती. तिनं मोबाईलवरचे  मेसेजेस मेल्स चेक करायला सुरूवात केली. कामाच्या बहुतेकशा मेल्सना लगेच रीप्लाय पण देऊन झाला. तेवढ्यात अरमानचा मेसेज आला. 

“किधर है?”
“काम खत्म. घरी  निघालेय. तू कुठं आहेस?”
“गूडमॉर्निंग तरी म्हण. आता उठलोय. आता नेटवर बघत होतो, त्या गौरव खन्नाचं लाईव्ह टेलीकास्ट दाखवत होते. त्याला दरादरा ओढून नेताना तुला पाहिलं म्हणून मेसेज केला”
“यप्प, ईव्हेंट होता.”
“हाऊज लाईफ?” 
“चालू आहे.”
टॅक्सी हॉटेलच्या बाहेर येऊन थांबली. तिनं अरमानला बायचा मेसेज केला आणि टॅक्सीचे पैसे दिले. 
समोर तिचा नवरा आलोक हातामध्ये फुलांचा बूके घेऊन तिची वाट बघत उभा होता. 

(क्रमशः) 


इश्क विश्क (भाग २)


No comments:

Post a Comment