Monday 12 October 2015

MAD-रास ३

 हे साधारण कुठल्याही नवीन शहरामध्ये गेल्यानंतर होणारेच हाल आहेत. त्यात शहर स्पेसिफ़िक असं काहीच नाही. पण चेन्नईचे खास असे काही वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथला उन्हाळा (खरंतर इथं दुसरा ऋतू नाहीच तरीही मे महिना सर्वात कठीण) आणि दुसरं म्हणजे प्यायचं पाणी. चेन्नईचं पाणी हे खारं पाणी आहे. इथे तसेही पाण्याचे स्त्रोत फार कमी आहेत. बघायला गेलंतर शहरामधून तीन नद्या वाहतात पण त्यांची अवस्था भलीमोठी गटारं अशीच आहे. परिणामी पाण्यासाठी असलेले तीन मोठे तलाव आणि बोरवेल यावरच मुख्य भिस्त आहे. लहरी पावसामुळे पाण्याची टंचाई आधीपासूनच होती.




त्यातही गेल्या दशकामध्ये पाण्याची इथं अतिप्रचंड टंचाई जाणवली होती. जवळ्जवळ दोनशे किमीवरून पाणी वाहून आणावं लागत होतं. त्यानंतर शहरातला पहिला डीसलायनेशन वॉटर प्लाण्ट चालू केला. हा प्लाण्ट आम्ही राहत असलेल्या गावापासून अवघ्या दहा किमीवर मिंजूर इथं आहे. शहराकडे जाणारा पाण्याचा साठा आमच्याच गावावरून जात असल्याने आम्हाला पाण्याची टंचाई कधीही जाणवत नाही. अगदी उन्हाळ्यांतसुद्धा पाणीकपात होत नाही. अर्थात पाणी भरपूर असलं तरी त्याचे स्वत:चे नखरे असे वेगळेच आहेत. हार्ड वॉटर म्हणता येईल असल्या क्वालिटीचं पाणी, त्याला अजिबात चव नाही आणि प्यायचं पाणी म्हणून सुरक्षित अजिबात नाही.



चेन्नईमध्ये नळाला येणारं पाणी हे पिण्यालायक नसतं ही माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्यावर उपाय म्हणून तथाकथित बिसलेरीची कॅन विकत घ्यायचे हेही सांगितलं होतं. पंचवीस रूपयाला पाच लिटरचा कॅन.  हा काही मिनरल वॉटरचा कॅन नव्हेच. खारं पाणी गोडं करून विकतात, पण हे पाणी जंतुविरहीत वगैरे अजिबात नसतं. आम्हाला त्याची सत्यता फारच मनापासून नंतर पटली. इथे येऊन पंधरा-वीस दिवस झाले होते. सतिशच्या नोकरीची घडी बसत चालली होती. सुनीधीसाठी मी नर्सरी अथवा प्रीकेजी टाईप एखादं स्कूल शोधत होते. भाषेचा लढा चालूच होता. तर इतक्या सर्व गडबडींमध्ये तापाचं दुखणं निघालं. पहिला एक दिवस क्रोसीनवर घालवला. दुसर्‍या दिवशी मात्र प्रचंड अंगदुखी आणि ताप. सकाळी झोपेतून जागेच होता येईना इतका थकवा. सेम अवस्था नवर्‍याची सुद्धा. नवीन नोकरीमध्येच फार सुट्ट्या नकोत म्हणून तो कसाबसा कामावर गेला. मी मात्र अख्खा दिवस झोपूनच. जेमतेम घरातली काही कामं केली, स्वयंपाक म्हणायला काय खिचडीभात केला. 

सगळं अंग गळून गेलं होतं. संध्याकाळी तो घरी आला तोसुद्धा तापानं फणफणलेला. शेजारणीला हाक मारून सांगितलं की आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. कुणाकडे जाऊ? तिनं बाजारामध्ये असलेल्या एका डॉक्टरचा पत्ता सांगितला. मी आणि सतिश दोघंही तोपर्यंत अक्षरश: झोकांड्या जावेत इतके तापाने फणफणलेले होतो. चालत कसेबसे डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत गेलो, तिथं रीसेप्शन काऊंटवर एक अत्यंत अजागळ, घाणेरडी आणि उर्मट बाई बसली होती. वय साधारण पन्नाशीच्या पुढ्चं. आम्ही दोघं तिला सांगत होतो की खूप ताप आहे, बस्ण्याची सुद्धा ताकद नाहीये वगैरे. ती वस्सकन तमिळमध्ये आमच्यावर ओरडली. काय ओरडली ते शब्दश: समजलं नाही तरी टोकन घ्या आणी गप्प बसा, नंबर आला की आत सोडू हे असावं. अजून  वीसेक नंबर शिल्लक होते. शेजारी उभा असलेला पेशंट म्हणाला “और एक घंटा लगेंगा”. मला पाच मिनीटं उभं रहावत नव्हतं. जमलं तर लवकर नंबर लाव नाहीतर आम्ही घरी जातो, तासाभरानं परत येऊ तेव्हा लगेच नंबर दे असं त्या रीसेप्शनिस्टला सांगायचा प्रयत्न केल्यावर ती परत एकदा डबल वस्सकन ओरडली. तेही इतक्या जोरात की अर्धा दवाखाना आमच्याकडे वळून बघायला लागला.



दवाखान्यात लोकं गंमत म्हणून येत नाहीत काहीतरी त्रास होत असतो म्हणून आलेले असतात, त्यातही जर उशीर होत असेल तर नंतरचा नंबर देणं अथवा उशीरा यायला सांगणं हे त्या रिसेप्शनिस्टच्या कामामध्ये येत नाही का? त्याक्षणी बाहेर बसलेल्या पेशंटवर नजर टाकली तर बहुतेक पेशंट हे गरीब, मजूर आणि अशिक्षित असे दिसले. जर ही बया आमच्यासारख्या सुशिक्षित दिसणार्‍या लोकांसोबत बोलताना इतक्या घाणेरड्या टोनमध्ये बोलत असेल तर या बिचार्‍या पेशंटशी कशी बोलत असेल... काही पेशंट्स जमीनीवर बसले होते, त्यांना मुद्दाम तिथं बसायला सांगितलं होतं.. का ते कारण सांगायची गरज आहे का? एकंदरीत वातावरण खूप वाईट होतं.


मी, नवरा दोघंही तापानं आजारी होतो... तेव्हा बोलवागायचं सौजन्य तरी किमान दाखवणं इतकी चूक असते का? अगदी चकचकीत मेकप केलेली रीसेप्शनिस्ट नको. पण किमान स्वच्छ साडीनेसलेली, केस विंचरलेली आणी तोंडात पानपरागचा तोबरा भरलेली तरी नकोच. हे सर्व बघून नवरा मला म्हणाला, चल इथून. परत या दवाखान्यात यायला नको.


मघाशी ज्या शेजारणीला डॉक्टरणीचा पत्ता विचारला ती आमच्या पाठोपाठ दवाखान्यात आली, आम्ही व्यवस्थित पोचलो की नाही बघायला!!! आमची अवस्था बघून आणि इतकी गर्दी बघून ती म्हणाली की इथं एक नवीन दुसरी डॉक्टर आली आहे तिच्याकडे जाऊया का?



ही दुसरी डॉक्टरीण बाई अगदी नुकती महिन्याभरापूर्वी आली होती म्हणे. तिच्याकडे काहीही गर्दी नव्हती. तिनं तपासलं आणि एक दोन औषधं लिहून दिली. इंजेक्शन तर दिलंच. घरी आलो आणि जे काय होतं ते खाऊन झोपलो. रात्रीतून सुनिधीलादेखील ताप भरला. दुसर्‍या दिवशी नवरा ऑफिसला जाण्याच्या स्थितीमध्येच नव्हता. परत डॉक्टरीण बाईकडे गेलो. म्हणाली बहुतेक कावीळ आहे, ब्लड टेस्ट करावी लागेल. एका अतिशय जुनाट  लॅबचा पत्ता दिला. (लॅब इतकी जुनाट होती की तिथे त्या माणसानं ब्लड रीपोर्ट टाईपरायटवर टाईप केला. टाईपरायटर!! आठवला का? कीबोर्डसारखाच दिसतो पण जरा मॊठा असतो!! त्याच्यावर!!) कावीळ नव्हती. पण डॉक्टरीण बाई म्हणे, गडबड आहे आपण लगेच परत ब्लड टेस्ट करू. त्याच लॅबमध्ये. हे काय गौडबंगाल आहे कळेना. गेले तीन दिवस ताप जराही कमी झाला नव्हता. अंग दुखत होतं भरीसभर उलट्या चालू होत्याच. सुनिधीला ताप आला होता म्हणून बाईला म्हटलं पेडीयाट्रीशीअन रेकमेंड कर. तर म्हणे, मीच औषधं लिहून देते. कशाला हवा पेडीयाट्रीशीअन?


मला आता एकंदरीत डॉक्टरीण बाई बोगस वाटू लागली होती. त्याच दिवशी कामवालीने बॉम्ब टाकला, तुमच्याकडे काम करायला जमणार नाही. माझे पैसे द्या, मी उद्यापासून येणार नाही. हे राम!! ऊठाले रे बावा!! म्हणायची वेळ आली.


संध्याकाळी परत त्याच डॉक्टरकडे गेले तर म्हणे, तुला खूप अशक्तपणा आलाय, सलाईन लावते. म्हटलं आधी ताप तर उतरूदेत. त्यासाठी औषधं दे. तर म्हणे आता परत ब्लड टेस्ट करू. मगच औषधं देऊ.


आजारपणामुळे आमच्या दोघांचं विचार करण्याचं यंत्रच बंद झाल्यासरखं वाटत होतं. तरीही ओळखीच्या दोन डॉक्टरांना शेवटी फोन केला. ते म्हणाले असे बारा बारा तासांनी रक्त तपासायची गरज नाही. दुसरा डॉक्टर बघा. आम्हाला काहीही समजेना. बाईला एकूणातच निदान होत नाहीय हे लक्षात आलं होतं. दिवसाभरात या डॉक्टरकडे चार चकरा मारल्या होत्या. या वाटेवर जिथे आमची गल्ली संपत होती तिथे एक भलामोठा बंगला होता. त्याच्या गेटवर नावांच्या दोन पाट्या होत्या. एक ऍडव्होकेटची आणि एक डॉक्टरची. माझा अंदाज होता की बाबा  वकील आणि मुलगा डॉक्टर. पण बंगल्यावर कुठेही दवाखान्याची पाटी दिसत नव्हती. म्हण्जे हा केवळ रीसीडेन्शियल बंगला होता, अशावेळी घरामध्ये जाऊन डायरेक्ट विचारणार कसं की डॉक्टर आम्हाला तपासतील का?  शिवाय गेटवर लिहिलंय केवळ डॉक्टर, पीएचडीवाला डॉक्टर असला तर कुठं आपलंच हसं करून घ्या. आज दिवसाभरातून दोन तीनदा या रस्त्यावरून फिरताना चौकशी करावी का असं मनात येऊन गेलं पण ओळख ना पाळख असताना कसं कुणाच्या घरात शिरणार...


तरी मी म्हटलं  आपण घरात जाऊन विचारू. किमान या दोन अतरंगी बायांव्यतीरीक्त इतर कुठल्या डॉक्टरांचं क्लिनिक जवळपास कुठे असेल तर त्याचा पत्ता विचारू.. तीन दिवसांत जीवाला जरासुद्धा आराम पडलेला नव्हता. शेवटी मीच त्या बंगल्याचं गेट उघडून आत गेले आणि तिसर्‍या सेकंदाला लगेच बाहेर पडले. कारण, एक भलं मॊठं कुत्रं.



आता मी भीत तर शैतानालासुद्धा नाही. पण कुत्रं इज अ डिफ़रंट गेम अल्टूगेदर. रस्त्यावरून जाताना दूर कुठे जरी कुत्रं  भुंकायला लागलं की माझी बोबडी वळते. इथं तर कोल्ह्यासारखं दिसणारं कुत्रं भ्वाक भ्वाक भुंकत होतं. तापामुळे खूप अशक्तपणा आलाय असं जे काय वाटलं होतं ते या कुत्र्यामुळे दूर झालं इतक्या सुसाट वेगानं मी गेटबाहेर आले. सुदैवाने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून एक आजोबा बाहेर आले. तोवर आम्ही रस्त्यावरच उभे. मग काय हवंय कसं हवंय नवीन आलोय ताप आलाय डॉक्टर आहेत का? असा एक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. मध्येमध्ये कुत्र्याचे भुंकणे बॅकग्राऊंड म्युझिकला. बोलताना समजलं की हे आजोबाच डॉक्टर (मेडीकलवाले) आहेत; त्यांचा मुलगा वकील आहे. त्यांनी आम्हाला घरात बोलावलं (कुत्रं नीट बांधलं आहे ना याची दोनतीनदा चौकशी करून) आम्ही आत गेलो. त्यांचा दवाखाना गावाच्या दुसर्‍या टोकाला होता, पण तरी त्यांनी आम्हाला पाहून औषधं लिहून दिली, आणि म्हणाले. “कावीळ वगैरे काही नाही. तुम्हाला इथलं पाणी सहन होत नाहीये. मी माझं मेडीकल मंगळूरला केलंय त्यामुळे मला माहित आहे तिथल्या पाण्याची क्वालीटी. तुम्ही आर ओ वॉटर प्युरीफ़ायर बसवून घ्या, लगेच आराम मिळेल”  हे मात्र खरंय, मंगळूरचं पाणी अतिशय गोड आणि चांगल्या प्रतीचं. आम्ही तिथं असताना केवळ लेकीसाठी उकळलेलं पाणी आणि आम्हाला साध्या फिल्टरचं पाणी, इतकंच पुरत होतं. त्या पाण्याला मुळातच तहान शमवणारी गोडसर चव होती. मद्रासचं पाणी कितीही प्यायलं तरी तहान भागल्यासारखी वाटायचीच नाही. त्यामुळे वॉटर पुरीफायर ही इथें चैन नसून अत्यावश्यक गरज होती.



डॉक्टरांकडून बाहेर पडत असताना त्यांच्या कंपाऊंडमध्ये एक बाई अंगण झाडत होती. तिला इंग्लिशमधूनच विचारलं. “इथं कामाला आहेस का? आमच्याकडे काम करशील का?”
ती म्हणाली उद्यापासून येईन. अशा रीतीने पैसा वगैरे काहीही न बोलता काय काम करायचं हेही न ठरवता दुसर्‍या दिवसापासून सेल्व्ही आमच्याकडे कामाला येऊ लागली. मला या तिरपागड्या गावामध्ये स्थिर करायचं बरंचसं काम सेल्व्हीनं केलं. सेल्व्हीमुळे मला थोडंफार तमिळ  येऊ लागलं.  तमिळ पदार्थ आणि सणवार वगैरे समजत गेले.


सेल्वी धर्मानं ख्रिश्चन. पण तिला आमच्या दारात रांगोळी घातली जात नाही हे बिल्कुल सहन व्हायचं नाही. तिचा आणि माझा संवाद फार मजेशीर व्हायचा. ती तमिळमधून बोलायची, मी इंग्लिश आणि कानडीमधून. एकदा तिनं माझ्याकडं रांगोळी मागितली. मी तिला “बासमती चालेल?” असं विचारून पेलाभर तांदूळ दिला. तिनं कपाळावर हात मारून घेतला. (एफ वाय आय: तमिळमध्ये रांगोळीला कोलम म्हणतात. कोलम जातीच्या तांदळाचा इथं काहीही संबंध नाही) शेवटी तिनंच कुठूनतरी डबाभर रांगोळी आणली आणि रोज अंगण झाडून झाल्यावर पाणी मारून तिथं छानशी रांगोळी काढू लागली. बहुसंख्य तमिळ बायकांचं सकाळचं हे लाडकं काम असतं दारासमोरचं अंगण झाडून  पाणी मारून त्यावर रांगोळी काढायची. बहुतेकदा ही रांगोळी आपल्यासारखी ठिपक्यांची वगैरे नसते तर भौमितीक पॅटर्न्सनी सलग काढत गेलेली असते. ही सर्पाकृती, वेलीसारखे दिसणारे डीझाईन्स दिसायला खूप छान असतात आणि काढायला (सवय जमली की) फार चटकन होणारे असतात.



डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी ताप आटोक्यात आला, शिवाय लगेचच वॉटर प्युरीफायर बसवून घेतल्यामुळे आजवर पाण्यापासून काही त्रास झालेला नाही. डॉक्टरांना आम्हाला वारंवार यायला सांगून पैसे उकळणं सहज् शक्य होतं, तरीही त्यांनी एकाच फटक्यात योग्य निदान करून उपचार सुचवले त्याबद्दल आजही त्यांचे आभार मनापासून मानावेसे वाटतात. जगात देव आहे की नाही यावरून चिक्कार वाद घातला जाऊ शकतो. पण या जगामध्ये देवदूत आहेत हे मात्र नक्की.


राहिली ती आधीची डॉक्टरीण बाई. तर ती बोगस आहे हा माझा अंदाज दोन तीन महिन्यांतच बरोबर ठरला. ती कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे काम करत होती आणि तिथून सोडून आमच्या गावात दवाखाना थाटायला बघत होती. गरीबगुरीब लोकांना फसवणे हा तिचा मुख्य उद्देश. आमच्यासारखे यडे बकरे मिळालेत तरी चालेलच की. सुदैवानं कुणीतरी तिच्याविरूद्ध तक्रार केली आणि मग ती गाशा गुंडाळून पळून गेली असं ऐकलंय.



आमचा हा गाव मुख्यत्वेकरून कामगार लोकांचा गाव. जवळच असणारं मनाली पूर्णपणे इंडस्ट्रीअल भाग शिवाय याच गावापासून जवळ अशोक लेलॅंड, एन्नोर पोर्ट, थर्मल पॉवर प्लान्ट असे मोठेमोठे प्रोजेक्ट्स आहेत. या सर्व ठिकाणी काम करणारी लोकं इथे राहतात. (त्यात आमची म्हणजे कट्टुपल्ली शिपयार्डची नुकतीच भर पडली) पंचवीस तीस वर्षापूर्वी चेन्नईचं एक्स्टेन्शन म्हणून सरकारने हा भाग डेव्हलप करायला सुरूवात केली. इथे प्लॉट्स पाडून जमीनी विकल्या गेल्या. त्यावेळी बस-ट्रेन वगैरेची कनेक्टीव्हीटी मिळेल वगैरे बरेच प्लान्स होते. पण ते नंतर काही कामी आले नाहीत. परिणामी हे गाव सॅटेलाईट टाऊन म्हणून अजिबात विकसित झालं नाही. त्याकाळी बर्‍याच कामगारांनी स्वस्तात जमीनी घेऊन इथे घरं बांधली होती, हळूहळू सरकारचा इंटरेस्ट कमी झाला आणि इथला विकास अर्धवटच राहून गेला. पण त्यादरम्यान गावाला  विजेची, पाण्याची आणि रस्ते वगैरे सोयी चांगल्या मिळाल्या होत्या. (रस्त्यांची नंतर वाट लागली. आता परत सुधारले जात आहेत.) योजनाबद्ध रीतीनं गाव वसवलेलं असल्याने गाव अतिशय आटोपशीर आहे. नीट पाडलेले ब्लॉक्स आहेत. शाळा बांधल्या गेल्या आहेत. गावामध्ये मोठमोठी प्रचंड झाडं लावलेली आहेत. जरी एकेकाळी बहुसंख्य वस्ती कामगारांची असली तरी आता मात्र गावामध्ये इतरही बरेच लोक राहत आहेत. आजूबाजूच्या खेड्यांपेक्षा या गावामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे. तीन चार चांगल्या शाळा आहेत, परिणामी स्थलांतर करून येणारे मजूर इथं भाड्यानं राहण्याचं प्रमाणही जास्त आहे. इथे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन खोल्या एक्स्ट्रा काढून ते भाड्यानं द्यायची पद्धत आहे. दूरवरून आलेल्या गरीब मजूरांना (हे जास्तकरून युपी, बिहार, ओरिसा आणि आंध्रमधून येतात) नाडणारे लोकंही मग आपसूकच जास्त आहेत. वरच्या बोगस डॉक्टरणीचं तर केवळ एक उदाहरण, अशीच काही उदाहरणं नंतरही दिसलीच. नवीन ठिकाणी आल्यानंतर माझ्यासारखी शिकली सवरलेली बाई जर इतकी भांबावू शकत असेल तर शाळेचं कधीही तोंडही न पाहिलेल्या आजवर युपी बिहारच्या त्या गावामध्ये असताना कधीही बाहेरदेखील न पडलेल्या मुली जेव्हा नवर्‍याबरोबर इथं येतात तेव्हा त्या किती भांबावून जात असतील?


मी इथं राहून आता बर्‍यापैकी रूळल्यानंतर काही बायका मदतीसाठी माझ्याकडे येतात – ही नवीन भाडेकरू आलीये, हिला काही समजत नाहीये काय म्हणतेय ते जरा सांगा. मग मी त्या नवभाडेकरणीचं हिंदी समजून घेऊन ( आपली हिंदीची झेप ही बॉलीवूडी हिंदीपर्यंतच आहे!! तरीही हल्ली युपी बिहारी आणि छत्तीसगढची हिंदी हे वेगवेगळे भाषेचे प्रकार आहेत हे समजायला लागलंय) मला ते या तमिळ बायकांना तमीळमध्ये समजवायचं असतं. अशावेळी आपण शाळेत संस्कृत घेतलं होतं, आपण बरेच हिंदी पिक्चर पाहिलेत, आणि आपलं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय, आणि आपली मातृभाषा कानडी आहे याचा जो काय सणसणीत उपयोग होतो त्याबद्दल नंतर सविस्तर कधीतरी!!!



काही तमिळ बायका मला अजूनही हिंदीअम्मा म्हणतात. मी मराठी आहे असं सांगून काही उपयोग होत नाही. आपण नाही का सर्रास सर्व दाक्षिणात्यांना “मद्रासी” म्हणत. मग त्यांनी सर्व नॉर्थलाच एका तागडीत तोललं तर आपण का चिडावं?


पण आता मद्रासमध्ये येऊन महिना झाला होता. इतके दिवस मनाली न्यु टाऊनच्या खेड्यामध्ये ऍडजस्ट करण्यामध्येच गेले होते. पण अजून अख्खं मद्रास आपली वाट बघतंय. पुढच्या लेखापासून मद्रास भटकंती चालू!! 

No comments:

Post a Comment