Tuesday, 29 September 2015

MADरास- २

एकंदरीत मद्रासमध्ये आल्याआल्या आमचे खूपच हाल झाले. पहिल्या दिवसाचं वर्णन तर यथासांग केलंच आहे. दुसर्‍या दिवशी जाऊन गॅसचं दुकान शोधणं, सिलेंडर लावून घेणं, बाजार शोधून भाज्या दूध फळं यांची सोय करणं, दूधवाला शोधून रतीब लावणं वगैरे सर्व कामं करायची होती. घरासमोरच एक आज्जीआजोबा राहत होते. आजोबांकडे तीन चार भाडेकरू ठेवलेले होते. पैके दोन घरं मारवाड्यांची होती, म्हणजे एका गोष्टीची निश्चिंती झाली. “हिंदी” बोलता येणारं कुणीतरी होतं. आज्जीआजोबा आमच्या घरमालकांचे चांगले परिचित. सकाळीच आजोबांनी येऊन काही मदत हवी असेल तर सांगा असं सांगितलं. तेव्हा आजोबांशी बोलताना अजून एक दिलासेदार बाब समजली. आजोबांना इंग्लिश व्यवस्थित येत होतं. पन्नास वर्षांपूर्वी ते मुंबईमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे थोडीफार मराठी समजायची, बोलता येत नव्हतं पण त्यांचं इंग्लिश मात्र खणखणीत होतं. या अंकलमुळे आमचे मद्रासचे हे सुरूवातीचे दिवस थोडे सहज गेले. त्यांनी कामवाली शोधून दिली, तिच्याशी काय काम किती पैसे किती वाजता येणार वगैरे बाबी ठरवताना भाषांतरकार म्हणून ते हजर राहिले. नंतर पहाटे त्यांच्या घरी दूध घेऊन येणार्‍या माणसाकडे आमचा रतीब लावून दिला. इतर  दुकानाचे पत्ते वगैरे सर्व त्यांनीच दिले.


गॅसचं दुकान घरापासून अगदी जवळ. हायवे ओलांडला की  लगेच समोर. तिथं जाऊन सर्व कागदपत्रं पैसे वगैरे दिल्यावर काऊअंटरवरचा माणूस म्हणाला “चार पाच दिवसांत सिलेंडर येईल” धाबं परत दणाणलं. म्हटलं. अहो, लवकर द्या. (इथं लिहायला सोप्पंय. प्रत्यक्ष संवाद साधताना मला तमिळ येत नाही आणि समोरच्याला हिंदी इंग्लिश येत नाही अशा भाषिक करामती चालू) लहान बाळ आहे. मला स्वयंपाकाचा त्रास होइल. आम्ही इथं नवीनच आलोय  वगैरे वगैरे. शेवटी ववैतागून तो म्हणाला. “लेट्स सी वाट आय क्यान डू” तेवढ्या प्रॉमिसवर आम्ही परत यायला निघालो तर दारामध्ये एक बाई उभी होती. “शो मी युअर पेपर्स” म्हणाली. आम्ही ते बाड तिच्या हाती दिलं. तिनं कुणालातरी हाक मारली आणि काहीतरी सांगितलं. बरोबर दोन मिनीटांत रेग्युलेटर आमच्या हातात आणून दिला आणि दिवसाभरात सिलेंडर घरी पोचेल असं सांगितलं. (या बाई आपल्याला नंतर परत भेटत राहतीलच)


हुश्श! एक लढाई पार पडली. घरी सिलेंडर लागला की स्वयंपाकाची सर्व सोय झाली. इंडक्शन मायक्रोवेव्हवर कालचा आजचा दिवस पार पाडला होता, पण गॅस चालू झाल्याखेरीज जीवाला चैन पडली नसती. गॅस दुकानामधून बाहेर येऊन जवळच्याच ए्का  साध्या मेससारख्या  हॉटेकामध्ये जेवलो. तमिळ स्टाईल जेवणाची पहिलीच वेळ. केळीच्या पानावर वाढलेला भाताचा ढीग, त्यावर ओतलेलं सांबार, रस्सम आणि सोबत तीन चार भाज्यांच्या वाट्या. शिवाय दही. सुनिधीला बिस्कीट दिलं तर नक्को असं बाणेदारपणे सांगून तिनं नुसता भात खाल्ला. रस्सम वगैरे अतिजहाल असल्यानं तिला खाता येणं शक्य नव्हतं. माझी लेक तमिळनाडूमध्येच लहानाची मॊठी व्हायला किती योग्य आहे याची ही पहिलीच चुणूक. तिला जेवणामध्ये तिन्ही त्रिकाळ भात असला तरी फरक पडत नाही. दोन दिवसांपासून कोरडं सुकं काहीतरी खात होतो. गरम पांढराशुभ्र भात आणि त्यावरचं ते लालभडक रस्सम जीव तृप्त करून गेलं.


घरी येऊन पोचलो आणि आमच्या मागोमाग सिलेंडर आला (हे कसं घडलंतर सिंपल आहे. आम्ही जेवेपर्यंत गॅसवाला दुकानतच होता, आम्ही बाहेर पडलेलं पाहिल्यावर आमच्या मागून हातगाडीवर सिलेंडर टाकून घेऊन आला) मग फ्रीज चालू करणे.. दूध तापवणे, वगैरे कामे चालू झाली. किचनमधलं सामान लावून घेतलं. हळूहळू कपाट लावणं वगैरे करत घर आकाराला आणत गेलो.


झिलमिल सितारॊंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा सारख्या कविकल्पनांनी नटवून घरं लावणारी लोकं कुठं असतात हो? इतक्यांदा घर सोडून परत घर लावलंय पण तरी दर वेळेला नवीनच काहीतरी समस्या वाट बघत उभ्या असतात. आमच्या या घराचा हॉल प्रशस्त होता, पण किचन छोटं होतं. अर्ध्याहून जास्त सामान किचनसमोर असलेल्य बेडरूममधेय ठेवावं लागलं (त्यामूळे आजही मला स्वयंपाक करताना किचन टू बेडरूम- जी सध्या स्टोअररूम म्हणून ओळखली जाते- धावपळ करावी लागते). किचनमध्ये असलेलं सिंक हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावर नंतर लिहेनच.



सध्या मात्र हे घर लावणं आणि एकंदरीत सेटल होणं हे सुरू होतं. हे करत असताना सर्व काही सुरळीत गोडीगुलाबीत अज्जिब्बात चालू नव्ह्तं. मद्रासमध्ये आल्यापासूनच माझी स्वत:ची प्रचंड चिडचिड होत होती. आयुष्यामध्ये कुठल्या क्षणाला तुम्हाला स्वत:विषयी कायतरी नवीन ज्ञान होइल हे सांगता येत नाही. तसं माझं इथं आल्यानंतर थोड्या दिवसांनी झालं.


मला बदल सहन करता येत नाही. बदल आवडतो, बदल हवा असतो. पण त्या एकंदरीत सेट झालेलं आयुष्य पूर्णपणे विस्कटून टाकताना  आणि त्यांची नंतर परत घडी घालताना मध्ये जो ट्रान्स्झिशन पीरीयड असतो तो मला अजिबात सहन होत नाही. मंगळूरहून मद्रासला आल्यावर हे फारच प्रकर्षानं जाणवलं. मी प्रत्येक गोष्टीची फूटपट्टी मुंबई अथवा मंगळूरची लावत होते. हे वेगळं शहर आहे, वेगळं गाव आहे हे माहित होतंच तरीही “इथं मुंबईसारखं नाही, मंगळूरसारख्या भाज्या मिळत नाहीत” वगैरे टुमणी चालूच होती. सतत चिडचिड सतत तक्रारी. एक-दोनदा अशाच कसल्यातरी फुटकळ गोष्टीवरून संताप येऊन हातामध्ये होती ती वस्तू फेकून पण दिली. राग यायला काही खास कारण होतंच अशातला भाग नाही. मद्रासमध्ये आल्या आल्या दोन तीन दिवसांचे जे काय निगेटीव्ह घडलं होतं तेच मनामध्ये घर करून बसलं होतं. “आपण इथं राहूच शकणार नाही” याची खात्री पटली होती. नवर्‍याला नवीन नोकरी होती, त्याला जास्त दिवस सुट्टी घेऊन चालणार नव्हतं. तो ऑफिसला जायला निघाला की माझी चिडचिड चालू व्हायची. विनाकारणच. काही गरज नसताना. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की कदाचित “तो नोकरी करतोय आणि मी घरात बसून आहे” या भावनेनं ती चिडचिड होत असावी. इथं येतानाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती, की मी नोकरी करू शकणार नाही. घरीच बसावं लागेल. मग चिडचिड होणार नाही का? आई़चा फोन आला तेव्हा दोन तीनदा रडलेसुद्धा. हा सगळा संताप कळत नकळत का होईना लेकीवर पण निघत होताच. एक तर तो इवलासा भांबावलेला जीव. इतके दिवस त्याच्या आजूबाजूला असणारे कुणीच दिसेनात. घर वेगळं. जागा वेगळी. त्यात परत आई अशी सारखी वसवस करत असलेली. बिचारं माझं लेकरू दिवसभर मला नुसतं चिकटून बसायचं. जरा दूर केली की रडायची आणि मग माझी कामं होत नाहीत म्हणून मी अजूनच चिडायचे. दोन तीनदा धपाटे पण घातले.



 एखादी गोष्ट माझ्या मनाविरूद्ध घड्ली तर चिडायची ओरडायची ही काय पहिलीच वेळ नाही. अशावेळी मी खूप बडबडते. अगदी तोल जाईल इतकी बोलते. पण ते बोलणं हेच माझ्यासाठी व्हेंट आऊट असतं. मनात खदखदत असलेली एखादी गोष्ट बोलून टाकली की तीच गोष्ट इतकी खदखदत नाही. मला इथलंच काहीच आवडलं नव्ह्तं. हवामान् चांगलं नव्हतं. खूप गर्मी होती, घरामधलं टॉयलेट खूप लहान होतं. किचनमध्ये सिंक नव्हतं. मायक्रोवेवला सेपरेट कनेक्शन नव्हतं. आधी राहणारे भाडॆकरू खूप घाणेरडे होते. फरशीवर काळे डाग पडले होते, केबलवर हिंदी चॅनल जेमतेम होते. गेटची कडी फार जोरात आवाज करते, इथं भाज्या चांगल्याच मिळत नाहीत. इथं पालेभाज्या दिसत सुद्धा नाहीयेत. इथल्या दुधावर साय येतच नाही. इथं धूळ फार आहे. इथलं पाणी खूप वाईट आहे. समोरच्या अंकलनी शोधून दिलेली कामवाली नीट काम करत नाही, ती कपडे नीट पिळून वाळत घालत नाही. एक ना दोन. हजार गोष्टी होत्या, ज्या मला पटत नव्हत्या. आणि त्या गोष्टी मला पटत नव्हत्या म्हणून माझी चीडचीड होत होती.



यापैकी कुठलीही गोष्ट बदलणं खरंतर नवर्‍याच्या हाती नव्हतं पण मी सोयीस्कररीत्या प्रत्येक गोष्टीचं खापर मात्र त्याच्या डोक्यावर फोडून मोकळी झाले होते. “त्यानं” “त्याच्या” “करीअरसाठी” ही नोकरी पकडली आणि म्हणून “माझी” अवस्था इतकी वाईट झाली असा एकंदरीत माझा निष्कर्ष होता. निर्णय घेताना दोघांनी आपापसांत चर्चा करूनच घेतलेला निर्णय होता, त्याच्या स्वभावानुसार तो कुठलीही गोष्ट धाडकन करून मोकळा होत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी चारी बाजूंनी विचार करून त्याचे फायदेतोटे काय आहेत याचा हिशोब मांडून मगच निर्णय घेतो. मेच त्याच्याउलट आहे. तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी घेतलेले बहुतेक निर्णय इंपल्सीव्हली अचानक घेतलेले आहेत. आधी निर्णय घ्यायचा, मग त्यानुसार वाट काढायची असा माझ्या आयुष्याचा आलेख. नंतर दोघांनी एकत्र रहायला सुरूवात केल्यावर अर्थातच दोघांच्याही आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय एकमेकांचा विचार करूनच व्हायला लागले. हे इथवर ठिक होतं. प्रश्न उभा राहतो तो निर्णय घेतल्यानंतर चुकवायच्या किमतीचा. त्याला ही किंमत फार थोडी चुकवावी लागली होती. उत्तम नोकरी,  प्रवासासाठी कमी वेळ, लेकीला सांभाळायची काहीच जबाबदारी नाही आणि रहाण्यासाठी उत्तम जीवनशैली असं चांगलं पॅकेज मिळालं होतं. माझ्याबाबतीत तसं काहीच घडलं नव्हतं. नोकरी अद्याप शोधायची होती, पण त्यासाठी दिवसाचा पाच ते सहा तास प्रवास (तीन ते चार वाहनं बदलून) करावा लागला असता, लेकीला सांभाळण्यासाठी काहीतरी सोय करावी लागली असती. इतकं करून भरभक्कम पगाराची नोकरी मिळेलच याची अजून शाश्वती नव्हतीच.


या सर्वांचा परिणाम माझ्या चिडचिडीमध्ये !! सुदैवानं माझ्यापेक्षा माझा नवरा मला अधिक ओळखून आहे. त्यामुळे माझी ही चिडचिड त्यानं समजून घेतली. त्यावर त्याच्यापरीनं करता येईल तितके उपाय त्यानं केले, पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे हे सगळे बदल माझ्यापद्धतीनं इंतीग्रेट होण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ मला दिला. परवाच कधीतरी अविनाश अरूणचा “किल्ला” सिनेमा बघताना नवर्‍यानं मला टॊमणा मारलाच होता, “त्या सातवीच्या पोराला समजूतदारपणा आहे, आणि आमचं ध्यान अजून चडफड करतंय!”


तरी सुदैवानं आता चडफड खूप कमी झाली. जसे दिवस पालटत गेले तशी मी या जागेशी, घराशी, गावाशी खूप कंफर्टेबल होत गेले. मला कुणीच ओळखत नाही, माझ्याशी बोलायला कुणीसुद्धा नाही म्हणून सुरूवातीला खूप वाईट वाटायचं. सशेजारी बहुतेक तमिळ्मध्यमवयीन टिपिकल गृहिणी बायका. मी यांच्याशी काय बोलणार? भाषा येत नाही आणि तसेही बोलायचे कुठलेच विषय सारखे नाहीत. टिपिकल तमिळ गृहिणींसोबत मी कशी कम्युनिकेट करू शकले असते? पण हळूहळू “अलोहोमोरा” मंत्र प्रत्येक ठिकाणी मिळायला लागला.


आम्ही रहायला येऊन तीन चार दिवस झाले असतील, सुनिधीला घेऊन गेटमध्ये उभी होती. शेजारची मुलगी दुकानामध्ये निघाली होती. सहज पुढं येऊन “घर आवरलं का? वगैरे विचारत बोलू लागली.. ही बी एडच्या शेवटच्या वर्षाला होती. संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्यानं भाषेची अडचण नव्हती. मग पाच दहा मिनीटं असंच काहीबाही बोलताना म्हणाली.. “हू इज युअर फेवरेट हीरो?”

आपण सेकंदभराचाही वेळ न दवडता उत्तर दिलं “सलमान”


ती किंकाळली. “इव्हन माय फेवरेट हीरो. आय जस्ट लव्ह्ड हिम इन किक”

“मला तो खामोशीमध्ये फार आवडला.”


“खामोशी?” हा पिक्चर तिला माहित नव्हता. मग मनीषा कोईराला (दॅट हीरॉइन इन बॉम्बे) संजय भन्साळी (ओह, देवदास आं!!) वगैरे वगैरे विषय सुरू झाले. ती आणि मी आमच्या घराच्या गेटमध्येच बोलत होतो. बोलताना “व्हाय शाहरूख इज बेटर दॅन सलमान” वर परिसंवाद चालू झाला. तिची आई, पलिकडच्या भाभी, तिच्या पलिकडच्या घरातली वनिता सगळे बिनबुलाये आम्हाला सामिल झाले. हिंदी, तमिळ, इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून संवाद सुरू राहिला. गॅस एजन्सीमध्ये काम करणार्‍या शैलाआंटी (त्याच आधी उल्लेखलेल्या) दुकान बंद करून येत होत्या. त्या आमच्या गप्पांमध्ये खुशाल सामील झाल्या. मग गॅस सिलेंडरवरून विषय “आज क्या काना बनाया?”या आद्यप्रश्नाकडे वळाला. नंतरच्या गप्पा काय सांगायला हव्यात का?

गप्पा मारायला बोलायला काय विषय असं राहिलंच नाही. बॉलीवूड हा विषय भारतात कुठंही कायम हिट्ट विषय राहिलेलाच आहे.


अर्थात शेजारीपाजार्‍यांशी गप्पा चालू झाल्या म्हणून जादूची कांडी फिरल्यागत माझी मन:स्थिती ठीक झाली असं नाहीच. त्याला अजून खूप वेळ आहे. अजून माझा या गावाशी परिचय चालू आहे. इथं आल्यानंतर पंधरवड्यातच कामवाली सोडून जाणे या दणक्याला सामोरं जायचं आहे. आणि त्यानंतर मद्रासमधली सर्वात भयानक गोष्ट घडणार आहे. “इथलं पाणी बादणे!”


पण ते सर्व नंतर! तूर्तास संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी रस्ताभर इतर मुलांसोबत खेळताना धावत असणारी माझी मुलगी, हातात शेजारणीनंच आणून दिलेला फिल्टर कापीचा टंबलर आणि एकमेकांची नावं जाणून घेत ओळखी करून घेणारी मी.

(क्रमश: )


No comments:

Post a Comment