Monday, 14 September 2015

MADरास - ०

“कम आऊटसाईड” शेजारीण मला हाक मारतेय. रात्रीचे साडेआठ वाजलेत. नवरा चारपाच दिवसांसाठी  समुद्रांत् गेलाय त्यामुळे घरात मी आणि सुनिधी दोघीच.मी दरवाजा उघडला आणी एकदम “आं!!” केलं. आज दुपारभर लाईट नव्हते. टी एन ई बी ची लोकं काहीतरी खुसधुस करत होते. पण तेव्हा इतकं छान सरप्राईझ मिळेल असं वाटलं नव्हतं. चक्क नवीन स्ट्रीट लाईट्स. ते पण एल ई डी वाले. आमची अख्खी गल्ली रोशन रोशन झालेली.
दरवाजा उघडताक्षणी लेक बाहेर धावत गेली. शेजारीण, पलिकडची शेजारीण. तिच्या पलिकडची शेजारीण अशा सर्व रस्त्यांत उभ्या होत्या. आमचं नेहमीचं मिनिसंमेलन भरलं होतं. त्यांची मुलं रस्ताभर धावत होत्ती, माझी लेक त्यांना सामिल झाली.


“डेली मॉर्निंग वॉक!” वनिता माझ्या पाठीत गुद्दा घालत म्हणाली. “आता लाईट्स चांगले आहेत. पहाटे रोज उठून फिरता येईल.” मी मान डोलावली. या आधी पहाटेचे पाच वाजता फिरायला जायचे आमचे मनसुबे अनुक्रमे कुत्रा, गाय आणि रस्त्यात मध्येच पार्क केलेली बाईक यांनी उधळले होते. कुत्रे आमच्यामागे लागले, गायींनी केलेल्या प्रातर्विधीमध्ये वनितानं पाय घातलेला आणि त्या उभ्या असलेल्या बाईकला मी जाऊन धडकलेले. सगळं एकाच दिवशी नव्हे.  “आजपासून मॉर्निंग वॉक”करायचा असं दोन तीन महिन्यातून एकदा आम्ही ठरवतो. मग आज की उद्या की परवा अशा चर्चा घडत राहतात..मग क्वचित एखाददिवशी मी लवकर उठते, तिला फोन करते तर ती उचलत नाही, मग आम्ही परत चर्चा करत राहतो. नंतर साताठ दिवसांनी ती लवकर उठून मला फोन करते, तेव्हा मी गाढ झोपेत असते. मग कधीतरी मुहूर्त लाभतो आणि आम्ही घराबाहेर पडतो. मग आहेतच... कुत्रे, गायी आणि बाईक.आता अशी काहीच कारणं द्यायची गरज नाही कारण रस्ता पूर्णच उजळून निघालाय. आता रात्रीअपरात्री फिरायला भिती वाटणार नाही. लाईटचा एक पोल आमच्याच घरासमोर असल्यानं आम्हाला तर आता पुढच्या अंगणामधला लाईट लावायचीदेखील आवश्यकता नाही. इतका मस्त उजेड आहे.


आम्ही लगेच गच्चीवर जाऊन सगळ्या गावाचा नजारा पाहिला. गाव काय छान दिसत होतं! इथं रहायला आलो तेव्हा मी “महिनाभर सुद्धा राहाणार नाहीय, नवीन जागा शोध” असं नवर्‍याशी भांडभांड भांडले होते. महिने जाता जाता तीन वर्षं झाली. तीन वर्षं. आणि आम्ही इकडचेच होऊन गेलो.इथं रहायला आलो तेव्हा, रस्त्यांवर लाईट्स नव्हते. अधेमध्ये कुठेतरी एखाद्या पोलवर ट्युबलाईट होत्या. त्यांचा उजेड जेमतेम. रस्ता पण नव्हता. कच्चा लाल रस्ता. मागच्या वर्षी इथं डांबरी रस्ता झालाय. आम्ही आलो तेव्हा किराण्याची जेमतेम दीड दुकानं होती, आता “सुपरमार्केट” असा शेरा घेऊन चार पाच दुकानं उपलब्ध आहेत. सुरूवातीला “किराणा घरी पोचता कराल का?” या प्रश्नाला “चला फुटा इथून. उचलून न्यायचं तर न्या नाहीतर राहूदेत” असं उत्तर मिळालं होतं. आता या सुपरमार्केटचे मालक “फोन करदो हम घर भेजेंगा” असं सांगतात. तरी अजून गावात एकही फोनवर ऑर्डर घेणारं हॉटेल आलेलं नाही. ते चालू झालं की एकदमच झकास वाटेल.आमचं हे गाव कागदोपत्री “चेन्नई”मध्ये येतं. पण प्रत्यक्षात आम्ही चेन्नईपासून बरेच दूर आहोत. मध्ये एक मोठा इंडस्ट्रीअल एरीया आहे. एन्नोरपोर्टला जाणारा हायवे आमच्या गावावरून जातो त्यामुळे ट्राफिक जाम हा आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे. चेन्नईमध्ये जाणंयेणं अतिमुश्किल वाटावं असं इथलं पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे. पण हळूहळू चीटशीट मिळत गेल्या आणि मद्रासमध्ये एकटीनं फिरणं जमायला लागलं.तीन वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडून टॅक्सीत बसलो तेव्हा आजूबाजूच्या गर्दीनं, धुळीनं आणि घाणीनं बेजार झालो होतो. पहिल्याच क्षणी मद्रास अजिबात आवडलं नाही. स्टेशनवरून आम्ही या आमच्या भागाकडे निघालो आणि हे शहर अजिबात रहाण्यालायकदेखील नाही, असा शोध लागला... कारण त्या ड्रायव्हरनं मद्रासमधले तमाम रस्ते सोडून आमच्या या भागाकडे येण्यासाठी डंपिंग ग्राऊंडमधला रस्ता निवडला होता.“दैंया ये मे कहां आ फंसी” असं गाण्ं मनातल्या मनात वाजायला लागलं. सोबत नवरा आणि दोन वर्षांची मुलगी आणि नवरा. आम्ही तिघंच. इतक्या  मोठ्या शहरात कुणीही ओळखीचं नव्हतं. भाषा येत नाही, ओळखपाख नाही आणि जवळ कुणीच नातेवाईक नाही...
स्टेशनवरून जवळजवळ दोनेक तासांचा प्रवास करून “मनाली न्यु टाऊन”ला पोचलो. नावावरून हे एखादं छोटंसं टुमदार उपनगर वगैरे असेल असं वाटलं होतं. वेल, छोटंस आहे, टुमदारही आहे. पण उपनगर नाही, खेडेगाव आहे. टाऊन असं नाव असूनदेखील आम्ही खेड्यांतच राहतोय.पण गेल्या तीन वर्षांत या गावानं, या घरानं आम्हाला बरंच काही दिलं. “कशी लोक राहतात इथं?” असा प्रश्न सुरूवातीला पडायचा, मग हळूहळू या गावाच्या प्रेमात पडत गेले. या शहराच्या प्रेमात पडत गेले. मुंबईच्या जुहू चौपाटीपेक्षा मरीना बीच किती स्वच्छ आहे, आणि पुण्याच्या पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा इथलं ट्रान्स्पोर्ट किती जास्त फालतू आहे, यावर चर्चा वाद घडायला लागले. आधी भेळवडापावच्या आठवणीनं डोळ्यांत पाणी यायचं. आता बोंडा-सुंदल कुठं चांगले मिळतात याची माहिती जमा व्हायला लागली. एकेकाळी इडली डोशा केवळ नाश्त्याचे पदार्थ होते. आता लंच डिनरचे आयटमसुद्धा झाले.
खूप आधी एकदा आयपीएलच्या दरम्यान दोनतीनदा चेन्नईला आले होते. पण तेव्हा शहर भेटलंच नव्हतं. आता एकदम कडकडून भेटलं. ओळखीचं झालं आणि “माझं शहर झालं”मद्रास ही मेट्रो सिटी खरंतर नावापुरतंच आहे. मुळात या शहराचा आत्मा खेडेगावाचा आहे.  इथं मुंबईसारखं धावतं लाईफ नाही. निवांत संथ गतीनं आरामात सर्व कामं चालतात. रात्रीअपरात्री मुलीबाळींना इथं फिरायला काही वाटत नाही. इथलं नाईट लाईफ म्हणजे पब आणि डिस्को नसून दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताच्या कचेरी असतात. अशा संगीत महफीलिंना तरूण म्हातारे सर्वचजण मनापासून आनंद घेताना दिसतात. “बिर्याणी” हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मरीना बीच हा मद्रासचा केंद्रबिंदू आहे, इथे हीरो हे केवळ आवडते नसतात तर ते “देवस्थानी” असतात. पिक्चर पाहणं हा इथला टाईमपास नसतो तर ते एक नैमित्तीक कार्य असतं. अत्यंत कलासक्त, रसिक आणि प्रेमळ असं हे माझं सध्याचं गाव. आधुनिकता आणि परंपरा यांचं मिश्रण असलेलं हे गाव.

मद्रासमध्ये येऊन तीन वर्षं झाली असं वाटतसुद्धा नाहीये. यापुढचे लेख अशाच या मद्रासमध्ये राहण्याच्या अनुभवांबद्दल. इथल्या ठिकाणांबद्दल, खाद्यपदार्थांबद्दल, भटकंतीबद्दल, मैत्रीबद्दल आणि एकूणातच मद्रासबद्दल. 

No comments:

Post a Comment