Sunday, 6 September 2015

संंध्याकाळ

दिवसाभरामधली माझी सर्वात नावडती वेळ. संध्याकाळ. तिन्हीसांज. दिवस ढळायला आलेला असतो, रात्रीची कुठेतरी सुरूवात असते. सूर्य मावळतो, पण जाताजाता थोडाफार उजेड ठेवून जातो. हळूहळू तो उजेड काळोखानं निवळायला लागतो. आणि माझ्या मनाला कायमचीच हुरहूर लागते.
.. एक कसलीतरी अजब उदासी मनावर फिरू लागते.
संध्याकाळ नकोशी वाटते. कशाचीही अखेरच नकोशी वाटते. बहुतेक संध्याकाळी या घरात कोंडलेल्या अवस्थेमध्ये जात असतात, मच्छर येतील म्हणून दारंखिडक्या सर्व गच्च बंद करून बसायचं. बाहेर हळूहळू धूसर होत जाणारा त्या उजेडी-काळोखाचं मिलन बघायचंच नाही. श्वास रोखून धरल्यासारखं गच्च कोंडलेल्या अवस्थेमध्ये घरातच खुरटायचं...
संध्याकाळ ही प्रेमी लोकांची आवडती वेळ असते म्हणे. शाम हंसी, शाम जवां, शाम ढले वगैरे कित्येक गाण्यातून शेरोशायरीमधून ते झळकत असतंच. आमची गट्टी मात्र तलतच्या रेशमी आवाजामधून ठिबकणार्‍या शामे गम सोबतच जास्त जमणारी.  हल्लीहल्ली तर जास्तच. पण तो काळ असाहोताकी, संध्याकाळसुद्धा रोमॅण्टिक वाटायची. क्वचितच कधीतरी पण वाटायचे खरी.
सूर्यास्त झाल्यानंतर दिवस संपतो म्हणे. मग सुरू होते ती भुताखेतांची वेळ. करकरीत तिन्हीसांज चढत चढत जाते ती मध्यरात्रीपर्यंत. हा सगळा वेळ त्यांचा. जे काही अमानुष आहे, भयंकर आहे, भितीदायक आहे, आपल्या आकलनाबाहेरचं आहे- ही वेळ त्यांची. अंधाराच्या येण्याआधी देवासमोर दिवा लावायचा. शांत तुपाच्या वातीमध्ये जळत असलेली ती दिव्याची इवलाली ज्योत या सर्व अमानवी शक्तींसमोर पूर्ण शक्तींनिशी उभी ठाकून राहते. अमानवी शक्ती आहेत की नाहीत, हे मला माहित नाही, पण तरीही संध्याकाळी घरामध्ये लावलेला तो दिवा मला खूप आश्वासक वाटू लागतो.
तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण तेवढ्याच पुरतं.... दबकत दबकत उदासी फेर धरून येतच राहते. किंबहुना उदासी हाच संध्याकाळचा स्थायी गुण असावा.
अशीच तीही उदासभरली संध्याकाळ.
ऑफिस सुटल्यावर घरी आले. ऑफिस सुटतं  पाच वाजून तीस मिनिटांनी मी घरी येते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी, ते पण रमतगमत चालत आले तर. सकाळी ऑफिसला जाताना उशीर झाला तर तीन मिनिटांत पोचतेच. घराच्या समोर ऑफिस आणि ऑफिससमोर घर. मध्ये फक्त एक लांबच लांब पसरलेला रिकामा प्लॉट. आज दिवसभर ऑफिसात काम असं काही नव्हतंच. अख्खा वेळ याच्याशी त्याच्याशी बोलण्यात गेलेला.
घरी येऊन फ्रेश झाले. चहाकॉफीची काहीच सोय नाहीच, त्यामुळे येतानाच ऑफिससमोरच्या टपरीवरून वडापाव आणि चहा आणला होता. चहा गार व्हायच्या आधी पिऊन घ्यायला हवा. रात्री जेवणाचीही काही सोय नाही, बाहेरून ऑर्डर करावी लागेल. घरात करण्यासारखं काहीही नव्हतं. कंप्युटर नाही. टीव्ही नाही. पुस्तकं नाहीत, बोलायलापण कुणी नाही, एकाकीपणा सगळीकडून भरून आल्यासारखा. रिकाम्या घरासारखं वाईट काहीही नसतं.
फोनची बॅटरी संपत आली होती, तो चार्जिंगला लावला, त्याक्षणी शुभ वर्तमान कळाले. लाईट गेलेले होते. म्हणजे निवांत फोनवर गप्पा मारण्याचं ठरवलं होतं तेही गेलं. प्लास्टिकच्या पिशवीमधला चहा कपात ओतून घेतला. पावणेसहा होत आले होते.. हॉलमधल्या मोठ्या खिडकीला आता पडदे नाहीयेत. उघडीबोडकी दिसतेय ती खिडकी. तिथून बाहेर पहायलासुद्धा नको वाटतंय. बेडरूममधली खिडकी त्याहून लहान आहे. पण तिलाही पडदे नाहीत.
मच्छर यायची वेळ झाली म्हणून खिडक्यांच्या काचा ओढून घेतल्या. पण लगेच आता गरम होइल... खिळ्याला अडकवलेली गच्चीची चावी घेतली. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहते त्यांचं हे स्वत:चं टेरेस. एरवी कायम कुलूपबंदच असतं. क्वचित सुट्टीच्या दिवही कधीतरी तिथं जाऊन वारा खात बसायचं. गच्ची म्हणजे काय फार मोठी नव्हेच, एका रूमइतकीच. पण त्याला वर मोकळं आकाश आहे, आणि दोन बाजूंनी भिंती नाहीत म्हणून गच्ची म्हणायचं.


गच्चीत घरमालकाचीच एक पत्र्याची खुर्ची आहे. जेमतेम अर्धा जिना चढून चहाचा कप घेऊन मी तिथं निवांत येऊन बसलेय. समोरची दिशा पश्चिम.. इथं बसलं की छान सूर्यास्त दिसतो. बिल्डिंगला लागून एक छोटा गावठाणातला रस्ता. त्यावर फारशी रहदारी नाहीच. त्याच्या पुढें रिकामा प्लॉट आणि मग त्याच्या समोर माझ्या ऑफिसची पिरॅमिडच्या आकारात बांधलेली विचित्र बिल्डिंग. प्लॉट आणि ऑफिसमध्ये मुख्य हायवे. त्यावरून गाड्या सणाणत धणाणत उधळत जाताहेत. या रस्त्यावर अद्याप सिग्नल नाहीत.  ट्राफिकचे नियम वगैरे गोष्टी तशाही ऑप्शनलाच असतात. तिथं कुणीतरी  अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड टांगलेला आहे. दॅट शूड सम माय लाईफ ऍज वेल. साली सगळी जिंदगीच अपघात प्रवण. जरा कुठं सावरतंय म्हणेपर्यंत काहीतरी घडतंच. अचानक. अनपेक्षित आणि मग त्यानंतर सगळंच उलट सुलट पलटून जातं.


ऑफिसच्या बिल्डिंगपाठीमागे खाडी आहे. तिथून येणारा तुफान वारा जाणवतोय. खारा समुद्राचा वारा. सूर्य हळूहळू मावळायला निघेल. क्षितिजाच्या आसपास पोचला की मला दिसणार नाही. कारण अध्येमध्ये बिल्डिंगी आहेत.


चहा निवत चाललाय, पण प्यावासा वाटत नाही. माझ्या हातचा चहा किती छान दाट मसालेदार होतो, हा खूप पांचट आहे, मीच मला सांगते. आणि मग अचानक दचकते. “माझ्या हातचा चहा” हे आक्रित नक्की घडलंय कधी? मागे कधीतरी मीच घरी पुरणपोळ्या केल्या होत्या. आठवतंय? माझं घर.. माझा संसार... माझं आयुष्य!!! सगळंच हातातून सुटून निघाल्यासारखं निघालंय. परत एकदा डोक्यामधले शंकासूर नाचायला लागतात.


चहा होता तसाच एका घोटात पिऊन टाकला. चहा प्यायल्यासारखं वाटलंच नाही... पण ठिक आहे.


हा जो समोर रिकामा प्लॉट आहे ना तो खरंतर रिकामा नाही, त्याच्यावर एक अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. गेली कित्येक वर्षं त्या जमिनीची कसली त री कोर्ट केस चालो आहे म्हणे. मी इथं पहिल्यांदा राहिला आले तेव्हा वाटलं की जर या बिल्डिंगचं बांधकाम चालू झालं तर आपलं काही खरं नाही, हॉल आणि बेडरूम दोघांच्याही खिडक्या एकदम समोरच की, त्या मजूर लोकांना वगैरे. बांधकामाची धूळ वगैरेचे त्रास तर होणारच. तेव्हा तडक दोन तीन दिवसांत मोहम्मद अलि रोडवर जाऊन जाड कापड आणलं आणि शिवून लगेच पडदे लावले. गेल्या दोन वर्षांत सुदैवानं ते बांधकाम काही चालू झालं नाही, आणि आता चालू झालं तरी पडदे जागेवरच नाहीत. तेपडदे कालच रात्री मी खोक्यात भरलेत. नवीन घरी वेगळे पडदे आहेत, म्हणजे हे पडदे लावायची गरज नाही. लक्कन सुरीनं एखादा तुकडा कापावा असं काहीतरी अचानक वाटून येतंय.  
हळूहळू अंधार पडत चाललाय. किंवा उजेड गायब होत 


चाललाय. कसं बघाल तसं म्हणा. सूर्यास्त झाला असणार. सगळ्याच भागाचे लाईट्स गेलेत त्यामुळे एरवी यावेळेपासून दिसणारे चमकणारी दुकानांची नावं हॉटेलचे बोर्ड वगैरे काहीच नाही. सगळीकडे दाटून राहिलेला तो गच्च राखाडी अंधार.
भणाण वारा सुटलाय. केस अस्ताव्यस्त उडतायत. पण सावरावेसे सुद्धा वाटत नाहीत. डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. डोळे शांत मिटून वारा अंगाखांद्यावर घेत राहिले

.
आजचा दिवस संपला. खर्‍या अर्थानं संपला. 


आता येणार रात्र. काळी काळोखानं भरलेली. दिवस आणि रात्रीच्या मध्ये कुठंतरी हिंदकळत असलेली ही संध्याकाळ. इथून पुढं जे काही आहे त्याची काहीच कल्पना नाही, जे काही घडून गेलंय त्याचं आता काहीच होऊ शकत नाही. तो भूतकाळ झाला. दिवसाचा भूतकाळ आणि रात्रीचा भविष्य काळ यांच्यामध्ये कुठंतरी असलेलं ही वर्तमानाची संध्याकाळ. डोळे मिटल्यावर क्षणाक्षणाला काहीबाही दृश्यं नजरेसमोरून जायला लागतात. या घराशी जोडलं गेलेलं पहिलं नातं. कोयरीच्या पैठणीचा पदर उलगडावा तश्या आठवणी उलगडल्या जातायत. आठवायचं म्हटलं की काहीच आठवत नाही. सहजच डोकावल्यासारख्या स्मृती येतायत आणि जातायत.घर ताब्यात घेतल्यावर आयुष्यात पहिल्यांदा केलेली झाडू फरशी सारखी कामं. तीपण एकटीनंच. नंतर  एकटीनंच बसून केलेली ती देवपूजा आणी मग दूध उतू घालवायचा विधी. हे खरंतर उगाचच. आई म्हणाली कर म्हणून. पण मग त्यानंतर पहिल्यांदाच करून घेतलेला चहा.. ऑफिसात सर्व चिडवतात, इतका गोड बासुंदीसारखा चहा पितेस म्हणून. पण मला चहा असाच लागतो. घट्ट, गोड आणि भरपूर उकळलेला. हा फ्लॅट भाड्यानं घेताना एजंट म्हणाला होता की याचा पायगुण चांगला आहे, जो कुणी इथं राहून गेलाय त्याचं चांगलंच झालंय.
इथं राहून माझं काय झालंय? चांगलं की वाईट? मुळात दोनतीन वर्षाचा कालावधी अश्याच दोन शब्दांमध्ये वर्णन करून संपतो का? चांगलं आणि वाईट! आज्जी गेली ती याच घरात असताना. प्रमोशन झालं ते याच घरात असताना. लग्नासाठी विनाकारण नकार ऐकले ते याच घरत असताना. “लग्न करेन तर तुझ्याशीच” असं तो म्हणाला तेही याच घरात असताना. मलेरीयाच्या तापानं रात्रभर एकटीच फणफणले तेही याच घरात असताना, आणि त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला तोही याच घरात असताना. काय चांगलं आणि काय वाईट... कसं ठरवणार? दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो, संध्याकाळच्या या किर्र वेळी बसून रात्र चांगली की दिवस वाईट हे कसं ठरवणार?


मुळात जे घडलंय ते चांगलं के जे यापुढं घडणार आहे ते चांगलं. भविष्याची आजवर कधी भिती वाटलीच नाही... कारण भविश्यामध्ये कसलीच अनिश्चितता नव्हती, काळजी नव्हती. एकाकी भविष्याची किती म्हणून तमा बाळगायची...

मनामध्ये अजून गणितंच चालू आहेत. संपलेल्या दिवसांचे हिशोब होत आहेत. हरवलेल्या रात्रींचे अजून बाकी आहेत. भोवतालचा उजेड सेकंदासेकंदाला कमी होत जातोय. अजून लाईट आलेले नाहीत. सूर्य मावळल्यावर जाणवतंय. मळभ दाटलंय. पाऊस तर पडणार नाही, पण या मळभानं माझ्या मनातली उदासी अजून गहिरी होतेय त्याचं काय...


खरंतर उदास वाटायला नको. आनंद वाटायला हवा, पण वाटत नाहीये हेही खरंच. कुठून्तरी मनामध्ये काहीतरी आत आत तुटत चालल्यासारखं वाटतंय. माझंच काही तरी चुकतंय़ का? किती दिवस आपण या दिवसाची वाट पाहिली. काय –काय नि कसं कसं ठरवून ठेवलंय. अमुक करू, तमुक करू. मग आज अचानक या स्वप्नांपेक्षा हा एकटेपणा अचानक का महत्त्वाचा वाटायला लागलाय? काय बदलणार आहे नक्की? आयुष्य आहे, ते पुढे जाणारच. मागे काही व्यक्ती आयुष्यातून वजा झाल्या, आता काहींची बेरीज होणार.. आयुष्य आहे, ते पुढे वाहणारच. पण गणीतासारखंच आयुष्य इतकं कॉम्प्लीकेटेड का करून ठेवलेलं असतं आपणच..


हे घर ही वास्तू... आपल्या आयुष्यामध्ये केवळ दोन वर्षांसाठी आली. त्या दोनच वर्षांनी आपलं अख्खं आयुष्य डीफाईन होऊ शकतं का..


का नाही होऊ शकत? माझ्या केवळ एका निर्णयानं जर माझं आयुष्य बद्लू शकतं तर या दोन वर्षांमुळे आयुष्याचा लेखाजोखा मांडला जाऊ शकत नाही का? या दोन वर्षांनी मला घडवलं. अगदी छोटया छोट्या गोष्टीमध्ये मी कोण आहे आणी मला काय हवंय हे मला सांगितलंय.


म्हणजे मला काय हवंय हे मला स्पष्ट माहित असतानासुद्धा मी हा जुगार का खेळतेय.. जुगारच नाहीये का? जोपर्यंत निर्णय तुमचा तुम्ही घेत असता तो पर्यंत तो जुगार नसतो,. पण ज्या क्षणापासून तुमचे निर्र्णय दुसर्‍या कुणावर अवलंबून रहायला लागतात तेव्हापासून जुगार चालू होतो. फासे पडायला सुरूवात होतेच.रात्र अंधारी असते म्हणून इतकी गूढ असते का? की ती गूढ असते म्हणून अंधारी होऊन येते. निर्णय घेण्याआधी जी घालमेल अस्ते ती फारच सुसह्य असते. निर्णय घेऊन झाल्यावर जी वाट पहावी लागते ती मात्र जीवघेणी असते. इट्स डन. तू हे ऑलरेडी निवडलं आहेस. हा निर्णय तुझा आणी फक्त तुझाच होता. मी स्वत:लाच समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करतेय. पावसाचे चुकारमुकार थेंब आकाशामधून खाली येऊन त्यामध्ये  उगाच स्वत:ची हांजी सांगून जातात. हा असला रिप्चिप पाऊस मला बिल्कुल आवडत नाही. बावा, पडायचंय ना तर सणकून कोसळ. असा कोसळ की मनामध्ये आणि डोळ्यामध्ये केवळ तूच राहशील. मग कदाचित इतकी सैरभैर होणार नाही मी. दोन पावलं कधीचीच पुढं टाकलीत. आता कितीसं अंतर उरलंय? पण तरीहे अंतर चालताना जीव मेटाकुटीला आलाय हे मात्र खरं. इतके दिवस मनामध्ये केवल प्रश्न होते, आज आता या क्षणी मात्र त्या प्रश्नांनी वादळ चालू केलंय.चुकलं तर मागे फिरायचा रस्ता शिल्लक नाही. निर्णय चुकला तर “वेगळं” होता येईल पण परत हे असं “एकटं” होता येणार नाही. एकाकी, एकटं, बेफाम, बेफिकीर, बिनधास्त आयुष्य. माझं आयुष्य!!
टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय विचारसरणीमध्ये लहानाची मोठी होऊनसुद्धा मी का या एकाच विषयाबद्दल इतकी का साशंक आहे. बरोबरीच्या मुलींनी अगदी नेटवर चॅट करून दहा दिवसांत लग्नंसुद्धा केली. त्या खुश आहेतच की. मला ते जमणारच नाही. प्रश्न केवळ खुशीचा नाही, मुळात बेसिक प्रश्न एकच आहे... का? “लग्नच का करावं?” हा प्रश्न मी स्वत:ला कित्येक्दा विचारतेच आहे. उत्तर मिळत नाही. मी लग्नाला नकार दिलाय याचा अर्थ त्यानं सोयिस्कररीत्या “त्याला” नकार दिलाय असा लावून घेतलाय... त्यावरून चिडला,, भांडला, हातदेखील उगारला. पण मला तो हवाय पण “लग्न” हे कृत्रिम नातं नकोय हे त्याला समजत नाहीये.. कसं समजणार?


घड्याळात किती वाजले होते कुनास ठाऊक... कितीवेळची इथं एकटीच बसून आहे. काळोख पूर्ण दाटलाय. लाईट नाहीतच. अंधारातच जिन्यावरून खाली आले. चाचपडायची वगैरे काही गरज नाही. इतका हा जिना सवयीचा झालाय. दाराची कडी उघडून आत आले. माझ्या घरामध्ये मला वावरायची चांगलीच सवय. रात्रीअपरात्री जाग आली तर एकही दिवा न लावता मी घरभर आरामात फिरू शकते. आजही फिरेनच...


आईग्गं! या कळवळ्या शब्दानंतर स्वत:साठी एकच इरसाल शिवी घातली. हा खोका इथं वाटेत मीच सकाळी ठेवलाय. दोन वर्षांतल्या सवयीमध्ये पायाला या खोक्याची सवय नव्हती. चांगलाच जोरात लागलाय. आता मात्र स्वत:वरचा आत्मविश्वास थोडाडळमळतोय. हातानं चाचपडत मला खुर्ची कुठे सापडतेय का ते बघते.  हाताला टेबल लागलंय, त्यावरचा मोबाईल. अजून बॅटरीमध्ये थोडी धगधुगी आहे. काही म्हणा, हे जुने नोकियावाले मोबाईल बॅटरीच्या बाबतीत फार दणकट होते. बाहेर पाऊस अजून झिमझिमच पडतोय. दिवसभर घरात साचलेला तो कुबटपणा आता संध्याकाळपासून खिडक्या बंद असल्यानं अजून जास्त जाणवतोय.


हाताशी जवळच ठेवलेल्या सॅकमधून टॉर्च शोधते. त्यानंच काल सांगितलं होतं आयत्यावेळी अलगनार्‍या वस्तो हाताशी राहू देत. इतर सर्व सामान मी कालच पॅक केलंय.


तिन्ही सांजेच्या त्या अर्धवट काळसर उजेडामध्ये मी एकवार माझ्या घरावर नजर फिरवली. दोनच खोल्या, पण त्याही रिकाम्या, भकास. गेल्या दोन वर्षांमधला संसार सगळा खोक्यांमध्ये रचून ठेवलाय. आजची रात्र या घरामधली शेवटची रात्र..


पण त्या रात्रीच्याही आधी असह्य होत जाणारी ही जीवघेणी संध्याकाळ. कधी एकदा पूर्ण रात्र पडतेय असं वाटायला लावणारी कातर कातर संध्याकाळ. खिडकीजवळ खुर्ची आणून बसलेय. वेळ जाता जात नाहीये. पण वेळ जाण्यासाठी काही करण्यासारखंदेखील नाही.


गेली आठ दिवस पॅकिंग करतेय. आधी क्वचित लागणार्‍या वस्तू. मग कपडे. मग किचनमधलं सामान. आज सकाळी ऑफिसला जायच्या आधी गॅस सिलेंडर परत केला. शेगडी खोल्यात घालून पॅक केली. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पाटावर ठेवलेले देव आणि असंच उरलंसुरलं सामान पॅक करायचं होतं. पण आता लाईट नाहीत म्हणून देव अजून तसेच आहेत.


तश्याच त्या काळोखामध्ये उठले. नकळत हात जोडले. मी काही फारशी देवभक्त वगैरे नाही... पण तरी आता या क्षणाला देवांचं अस्तित्व हवंहवंसं वाटत होतं. कुणीतरी माझी या आततायी निर्णयामध्ये पाठराखण करतंय असं सांगायला हवंय. अंधार असूनसुद्धा सवयीनं निरांजन लावलं. तुपातल्या निरांजनाचा स्निग्ध प्रकाश पाटावर पडला. बालगणेश तो प्रकाश पाहून गालातल्या गालात हसला. मी परत हात जोडले. “मला कधी विसरू नकोस” मी हळूच कानात सांगितल्यासारखं कुजबुजले.


तो विसरेल किंवा आठवणीत ठेवेल. पण त्याच्या भरवश्यावर मला राहता तर येणार नाही. परत एकदा मनावर उदासीची गर्द छाया अंधारून आली. अचानक माझंच मला जाणवलं. संध्याकाळ फक्त बाहेरच होत नाहीये. कुठंतरी माझ्या मनामध्ये पण होतेय. इतके दिवस असलेला आनंदाचा उजेड हळूहळू काळोखा होत चाललाय. साशंकतेची काजळी रात्र बनत चालली आहे.मोबाईल आता मात्र बंद पडलाय. मघाशी दिसणार्‍या उजेडात पाहिलं होतं तेव्हा साडेसात वाजले होते. लाईटचा अद्यप पत्ता नव्हता. किती वाजले होते त्याच्याशी आता काही देणंघेणं नव्हतंच. घरात नेहमी घालायचा टीशर्ट पायजमा घालूनच बाहेर पडले. नाहीतरी आपल्याला उद्या इथून जायचंय. कोण काय म्हणणार आहे? इतके दिवस तरी कुणाच्या म्हणण्याला काय किंमत दिली? घराजवळच्या हॉटेलामध्ये थाळीची ऑर्डर दिली. फोनवरून हेच मागवलं असतं पण आता फोन बंद पडला होता. अवघ्या तीन चार तासांपूर्वी ठरवलेल्या प्लानचा इतका मस्त फज्जा उडताना डोळ्यांसमोर दिसत होता. आणि मी अख्ख्या आयुष्याचे प्लान रचायला बघत होते. वेड लागलंय बहुतेक मला. हॉटेलात पण लाईट नव्हते. इव्हर्टरच्या जीवावर कुठंतरी तीन चार ट्युबलाईट मिणमिणत होत्या, इतकंच. उजेड एक तर लख्ख असावा नाहीतर संपूर्ण काळा काळोख. या असलय मिणमिणत्या उजेडात माझं डोकं दुखायला लागतं. वेटरनं आणून दिलेलं जेवण मुकाट गिळलं.


संध्याकाळ आता रात्र बनली होती. पण नेहमीची प्रसन्न रातराणी वगैरे नव्हे, तर संध्याकाळचीच उदासी अजून गहिरी झाल्यासारखी रात्र. इतके दिवस आपला निर्णय कदाचित चुकीचा आहे, असं वाटत होतं. या राखाडी ढगाळ संध्याकाळीनं त्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं. माझं चुकलंय का? मी माझं आयुष्य दुसर्‍या कुणाच्या हाती सोपवायचा विचारच कसा करतेय.. घरी आले तेव्हा पाऊस किंचित जोरात चालू झाला.


करण्यासारखं काहीच नसल्यामुळे बेडवर येऊन पडले. त्याला सांगावं का... नाही येत मी तुझ्यासोबत. आपण वेगळेच राहू. किंबहुना आपण वेगळेच होऊया. मला एकटंच रहायला आवडेल. किती दिवस एकटी राहशील हा प्रश्न तो विचारणारच. त्याचं उत्तर मात्र माझ्याकडेही नाही. माझ्या या एकटेपणाच्या बदल्यात मला तू हवा की नको... या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. प्रेम, रोमान्स, मोहब्बत वगैरे संकल्पनांवर माझाच काय त्याचाही विश्वास नाही. आपण उर्वरीत आयुष्य एकमेकांसोबत काढू शकतो का हाच केवळ प्रश्न. त्याचं उत्तर होकारर्थी, माझं नकारार्थी!


“एकटी राहून तू सिनिकल होत चालली आहेस” तो मधूनच मला एकदा म्हणाला होता. असेलही कदाचित. पण हा एकटेपणा मला मनापासून भावतोय हे समजायला इतकं कठीण आहे का?


विचारांचा हायवे सुरू झाला की एक बरं असतं. मेंदूला काही कामच नसतं. कंप्युटरच्या गेममध्ये कसे कुठूनही कुणीही येत राहतात तसे कुठल्याही कोपर्‍यात साठवलेल्या आठवणी येतच राहतात. डोळे मिटून पडून राहिले.


आजची ही शेवटची रात्र. उद्यापासून तो सोबत असणार...


किंवा कदाचित नाही. श्या!! फोन चालू असता तर आताच फोन करून सांगितलं असतं... नको म्हणून. लाईट असते तर आता सगळं सामान खोक्यामधून काढायला  सुरूवात केली असती. माझा संसार. माझं घर. माझं आयुष्य.


विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही. गेली दोन-तीन रात्री पॅकिंग करत बसल्यानं धड झोप लागलीच नव्हती...
जाग आली ती टणाटना वाजाणार्‍या बेलमुळं. जागी झाले तर दोन सेकंद कळेचना, मी कूठं आहे...माझं घर पूर्णपणे अनोळखी होऊन माझ्याकडे टक्क बघत बसलं होतं. रात्री झोप लागल्यावर कधीतरी लाईट आले होते. मी झोपताना बहुतेक सर्व दिवे चालू ठेवले असणार. बेल परत एकदा वाजली. भिंतीवर घड्याळ नव्हतं, किती वाजले माहित नाही. बाहेर पाऊस जोरजोरात बरसत होता. मध्यरात्र नक्कीच होऊन गेली होती.


दार उघडलं तेव्हा तो बाहेर चिंब भिजून उभा होता. “फोन का बंद आहे? केव्हाचा ट्राय करतोय. मेसेजेसलापण उत्तर नाही.” त्याचा आवाज माझ्यावर चिडल्यासारखा, वैतागल्यासारखा. पण त्या वैतागापाठीमागे दडलेली प्रचंड मोठी काळजी. ढगाळ संध्याकाळीमागे दडलेल्या वादळी रात्रीसारखी.


मी काही न बोलता पेंगुळल्या डोळ्यांनी त्याच्या गळ्यात हात टाकते.


निर्णय घेऊन झालाय, आता तो निभवायचाय. इथून पाठी फिरणं शक्यच नाही. दोघांनाही.


फासे फेकून केव्हाचे झालेत, आता दान काय पडतंय त्याची केवळ वाट बघायची.
No comments:

Post a Comment