Monday, 1 August 2016

MADरास (भाग ७)

चेन्नईमध्ये येऊन मला फारतर महिना झाला होता, मागे चौथ्या भागात लिहीलं तसं थोड्या दिवसांनी किराणा वगैरे संदर्भामध्ये शॉपिंगला जाणं ही गरज निर्माण झाली. आजूबाजूच्या बायांना सगळे भाषाअडचणी पार करत चांगला किराणा कुठे मिळेल याबद्दल विचारलं तर काही ठोस उत्तर मिळेना. गावामधला कुठलाच किराणा दुकानदार ठिकठाक वाटेना. एके दिवशी गेटमध्ये आमच्या समोरचे अंकल उभे होते. त्यांना “व्हेअर टू गो फॉर शॉपिंग?” असं विचारलं.
तर ते हस्त म्हणाले. “गो टू पॅरीस”
“पॅरीस?”
“येस येस. व्हेरी गूड शॉपिंग. यु विल लाईक देअर ओन्ली”
मला रागच आला. अंकल चक्क मला टोमणा मारत होते. मला काही फार भारी शॉपिंग करायची नव्हती, तर साधा नेहमीचा किराणा आणायचा होता. हे त्यांना मी सांगितलं होतं, तरीपण त्यांनी हसत का होइना हेच उत्तर परत दिलं. मी काही न बोलता घरात निघून आले. इतके दिवस आपल्याशी इतक्या मायेनं आणि आपुलकीनं बोलणार्‍या या अंकलनी आज असा आणि इतका टोमणा का मारावा ते समजेना. संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला दिवसांच्या इतर इत्यंभूत घटनेसोबतच हाही किस्सा सांगितला. त्यानं  याच्या एका ज्युनिअरला विचारलं. तो म्हणाला, “सार  नो प्रॉब्लेम. गो टू सावकारपेट. नीअर टू युअर एरीया.”
आता पुढचा प्रश्न साहजिक आला की या सावकारपेटला जावं तरी कसं.
ज्युनिअर म्हणे, “कॅच अ बस टू पॅरीस”
च्यामायला!!!! ये क्या भानगड है.. लगोलग गूगलकाकाला साकडे घातले. सावकारपेट हा ओल्ड चेन्नईमधला एक भाग आहे हे समजलं. प्रामुख्याने मारवाडी लोकांची इथे वस्ती आहे आणी हा भाग होलसेल मार्केटसाठी प्रसिद्ध आहे हे समजलं. माझ्या गावापासून इथवर यायला साधारण ४५ मिनिटे लागली असती असं गूगलकाका प्रेमानं म्हणाले. इथे येण्यासाठी मला मनाली न्यूटाऊन पासून मला हाय कोर्टापर्यंत बसने जाऊन अथवा पॅरीसपर्यंत टॅक्सीने जावं लागणार होतं.
सकाळी अंकल म्हणाले तेव्हा अथवा तो ज्युनिअर म्हणाला तेव्हा पॅरीस म्हटलं की समोर आयफेल टॉवरवालं शहर उभं ठाकलं होतं. आता नेटवर वाचताना नीट ध्यानांत आलं की ते Parry’s आहे.  पॅरीज कॉर्नर हा मद्रासमधल्या सर्वांत जुन्या भागांपैकी एक. पण आता हे स्पेलिंग वाचल्यावर तुम्हाला पटकन काय आठवलं सांगा? बरोब्बर. पॅरीज चॉकलेट्स. झोकदार रोमन अक्षरांत लिहिलेली Parry’s ची थोडी कडक असणारी मस्त खमंग चवीची चॉकलेट्स लहानपणी आपण सर्वांनी खाल्ली होतीच. त्याच कंपनीची एकेकाळी मुख्य ऑफिस असणारी ही भलीमोठी वास्तू म्हणजे पॅरीज. रस्त्याच्या कॉर्नरवर असल्याने त्या भागाला नाव मिळालंय पॅरीज कॉर्नर. या कॉर्नरवर चेन्नईचे दोन अतिशय महत्त्वाचे रस्ते- एन एस सी बोस रोड आणि राजाजी सलाई रोड सुरू होतात. चेन्नईचा इतिहास आणि भूगोल या पॅरीशिवाय अधुरा आहे. या बिल्डिंगबद्दल आणि ज्याने ती बांधली त्या पॅरीचा आणि या भागाचा इतिहास खूपच रोचक आणि मसालेदार आहे. नंतर कधीतरी तो याच मालिकेमध्ये लिहेन, पण तूर्तास समाधान इतकेच की, समोरचे अंकल मला कसलाही टोमणा वगैरे मारत नव्हते तर जेन्युइनली मला माहिती देत होते. माझ्याच गैरसमजामुळे मी सकाळी त्यांच्या उत्तरावर थॅंक्स इतकेसुद्धा न म्हणता धाडकन निघून आले होते.

हे असं आपल्यासोबत बर्‍याचदा घडतंच. खासकरून सोशल मीडीयावर. समोरचा माणूस वेगळंच काहीतरी सांगत असतो, आणि आपण आपल्याच समजुतीच्या परीघामध्ये त्याचा अर्थ काढून घेतो आणि गैरसमज करून घेतो. दुसर्‍या दिवशी सकाळी मी स्वत: अंकलच्या घरी गेले आणि थॅंक्स म्हणून आले. जाण्यासाठी योग्य बस कुठली, त्याचं टायमिंग काय वगैरे माहिती विचारून घेतली. पण त्यानंतर दोनच् दोवसांत आम्हाला चेन्नई सिटीमध्ये कॉलटॅक्सी घेऊन जावं लागलं आणि आम्ही येतानाच स्टारबझारमधून भरमसाठी किराणा घेऊन आलो. एक प्रश्न तर मिटला होता, पण होलसेल मार्केटमध्ये भटकत खरेदी करायची मजा निराळीच.
यादरम्यान नवरात्र जवळ आलं होतं, आमची शेजारीण शरण्या मला म्हणाली, की “मी या वीकेंडला सावकारपेटला जाणार आहे. मला साड्या घ्यायच्या आहेत.” ये तो औरभी चंगा हो गया. म्हटलं  मी पण येते. एकतर शरण्या इंग्लिश उत्तम बोलते (ती तेव्हा इंग्लिश लिटरेचरमध्ये एम ए करत होती शिवाय गावातल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.)म्हणजे भाषेचा मुख्य अडसर दूर झाला. शिवाय ती सोबत असताना आपण कुठंतरी भरकटण्याची शक्यता कमी. तशी मला खरेदी काही करायची नव्हती पण घरी बसूनही कंटाळा आला होता. त्या शनिवारी नवर्‍याला सुट्टी होती म्हणून त्याला आणि लेकीला घर सांभाळायची जबाबदारी दिली आणि चेन्नईला आल्यावर पहिल्यांदाच “निरूद्देश” (याला कोटमार्क का टाकलेत ते समजेलच!!) भटकायला बाहेर पडले.
हायकोर्ट हा आमच्या बसचा लास्ट स्टॉप. त्या आधी येणारा स्टॉप बीच स्टेशन. हे चेन्नईच्या उत्तर भागाकडचे टर्मिनस आहे. जरी याचे नाव बीच असले तरी हे स्टेशन फेमस मरीना बीचजवळ नाहीये.  हा भाग चेन्नई पोर्टला फार जवळचा आहे. आमची बस अल्मोस्ट चेन्नईच्या बाहेरून चेन्नईमध्ये येत असल्याने आम्हाला आधी तिरूवट्ट्रीयुर, वॉशरमन्पेट, रोयापुरम असे भाग लागले. चेन्नई पोर्टाचे दृश्य तर अतिशय सुंदर दिसत होतं. जर हा बसचा रूट घेतला नाही तर आम्हाला एवरेडीच्या (तेच ते गिव्ह मी रेड बॅटरीवाले, त्यांचा कारखाना आहे इथं) डावीकडे वळून समद्र किनार्‍याच्या बाजूबाजूनं जाणार्‍या कोस्टल रोडने निवांत जाता येतं. पण चेन्नईमधली बस सिस्टीम अजबगजब आहे. बसचा रूट निवडताना शक्यतो अधिकाधिक फिरून कशी जाईल यावर अभ्यास केला जात असावा. प्रवाश्यांनाही फिकीर नसते. एकूणातच निवांत शहर आहे आमची चेन्नई. त्यामुळे आता ही बस या सर्व भागांमधल्या गल्ल्यांगल्ल्यांमधून फिरून मस्त जात होती. अर्थात, बस प्रचंड फिरली तरीही तिकीटमात्र त्यामानाने फारच कमी आहे. एकंदरीत पब्लिक ट्रान्सपोर्ट हा फारच स्वस्त मामला आहे. बसचं फिरणं नको असेल तर याच रूटवर शेअर ऑटो पण आहेत पण त्या बसपेक्षा जास्त पैसे घेतात आशी माहिती शरण्याने मला दिली. पुढे जेव्हा स्वत: एकटी फिरायला लागले तेव्हा समजलं की शेअर ऑटो पण काही तितक्या जास्त महाग नाहीत. उलट बस इतक्या फिरत नसल्याने वेळेच्या बाबतीत त्याच जास्त परवडतात. अर्थात हे नंतर आलेलं शहाणपण.

हाय कोर्टापासून चालायला सुरूवात केली तेव्हा समोरच रस्त्यावर भलामोठा बोगदा खोदून ठेवला होता. याभागामध्ये चेन्नई मेट्रो अंडरग्राऊंड जाणार आहे. त्याचं काम जोशात चालू होतं. अजूनही या भागात मेट्रो चालू झालेली नाही, आणि अद्यापही तो बोगदा रस्त्यावर आहे. परिणामी आपल्याला एक भलामोठा वळसा घालून चालत जायला लागतं.
सावकारपेट ही चेन्नईमधल्या मारवाड्यांची वस्ती. चेन्नई सेंट्रल स्टेशनपासून अतिशय जवळ असलेला हा बाजारी भाग. सावकारी धंद्यामध्ये सुरूवातीपासूनच असलेले गुजरात-राजस्थानामधून आलेले हे मारवाडी दुकानदार आता मोबाईलपासून ते किराणाभुसारीमालापर्यंत सगळ्यामध्ये व्यापार करतात. त्यामुळे इथं तमिळइतकंच हिंदीपण कानावर पडत राहतं. शिवाय दुकानदारांची आपापसामधली राजस्थानी-मारवाडी भाषा.
 मला इथे आल्यानंतर एकदम क्रॉफर्ड मार्केटजवळच्या गल्ल्यांमध्ये फिरल्यासारखंच वाटू लागलं. एकदम चिंचोळ्या गल्ल्या. छोटी छोटी कितीतरी दुकानं. पिढ्यानपिढ्या चालवलेली. एक गल्ली फक्त साडी घागर्‍याच्या दुकानांची, एक स्टेशनरीची. एक लाईटच्या दिव्यांचे, एक गल्ली खेळण्यांची, एक गल्ली फूलवाल्यांची. जागा मिळेल तिथे टेकलेले फळवाले आणि भाजीवाले. या सर्व दुकानांमधून चाललेली खरेदीविक्रेची लगबग, घासाघीस. “देने का बोलो ना भय्या, अंकल, हमेशा आपही से तो लेके जाते है, ठिक ही तो बता रहे है. हमको कौनसा ये बेचके बंगला बनाना है” सारखे संवाद केवल असल्याच बाजारामध्ये ऐकू येतात. मी “देसाई” आडनाव आणि मुंबईमध्ये अस्ताना गुज्जू बॉसच्या कृपेने शिकलेली थोडीफार गुजराती आणि बॉलीवूडी हिंदीच्या जोरावर बरीच घासाघीस करत खरेदी केली. खासकरून स्टेशनरी, दिवे, पणत्या, थोडीफार भाजी आणि फळं वगैरे. शरण्याला साड्य़ा घ्यायच्या होत्या तर तिला कंपनी म्हणून मी पण दोन साड्या घेतल्या. दोनच, जास्त नाही. (आता समजलं वर त्या “निरूद्देश”ला कोट मार्क का टाकले होते)
हा भाग जरी प्रामुख्याने राजस्थानी-मारवाड्यांचा असला तरीही काही दुकानदार इतर ठिकाणाहून आलेले आहेत. मला नंतर माहित असलेले काही दुकानदार मूळचे मिरजचे आहेत, तीन चार पिढ्या इथे राहूनही ते उत्तम मराठी बोलतात, मिरजेला त्यांचे नातेवाईक आहेत. आणि (हे सर्वांत महत्त्वाचे) त्यांच्या दुकानामध्ये विचारलं तर चटणी मसाला, कोल्हापुरी ठेचा, थालीपीठ भाजणी असले मराठमोळे पदार्थ मिळू शकतात.

एकंदरीत चेन्नईच्या या भागाशी माझा दोस्ताना फार मस्त जमला. या खरेदी प्रकरणानंतर मी एकटीपण या भागामध्ये भटकून येऊ लागले. एकट्या भटकंतीत मला अत्तर बाजाराचा पत्ता लागला. शिवाय स्टेशनजवळच्या एका गल्लीचं नाव कोवागल्ली असून तिथे दुधाचा अप्रतिम खवा मिळणारी दुकानांची रांग आहे वगैरे शोध लागले. अर्थात ज्या किराणासाठी म्हणून मी याभागात आले तो इथं कधीच फारसा घेत नाही, एक तर इथल्या छोट्या गल्ल्यांमधून इतक्यामोठ्या पिशव्या वागवत चालणं शक्य नाही. मात्र, सुकामेवा, अख्खे मसाले, वर्षाची चिंच, सुक्यामिरच्या वगैरे खासमखास पदार्थ मात्र मी इकडूनच घेते.  
पण खरेदी अथवा होलसेल मार्केट हीच आमच्या सावकारपेटची ओळख नाही. सावकारपेटच्या या चिंचोळ्या गल्ल्यांमधून एक अखंड जितीजागती खाद्यसंस्कृती नांदतेय.
चेन्नई म्हटलं की सर्वसाधारणपणे इडली-वडा-सांबार हेच पदार्थ चटकन आठवतात. पण चेन्नईची खाद्यसंस्कृती खकर्‍या अर्थाने जागते ती बिर्याणीमध्ये. चेन्नईत फिरताना एक गल्ली अशी नाही जिथे बिर्याणी स्टॉल नसेल – बिर्याणीवर आपण एक लेख लिहूयाच. पण सावकारपेट मात्र त्याला सणसणीत अपवाद आहे. टिपिकल गुजराती राजस्थानी पदार्थ, पण चेन्नई ट्विस्टने! महिन्यामधून एकदा मी या भागात खरेदीला फिरकत असल्याने बर्‍यापैकी “उत्तम खाऊची” काही ठिकाणं माहित झाली होती. तरीही ऑगस्टमध्ये साजरा केल्या जाणार्‍या मद्रास वीकसाठी फेसबूकवर श्रीधर वेंकटरामन यांची सावकारपेट फूडवॉकसंदर्भामधली पोस्ट पाहिली. गेली सतरा वर्षे आयटीमध्ये उच्चपदावर असलेल्या आणि सध्या शिक्षकी पेशा पत्करलेल्या श्रीधरचा “फूड” हा वीकपॉइंट आहे. केवळ हौस म्हणून ते असे फूड वॉक आयोजित करतात. त्यासाठी स्वत: प्रचंड फिरतात, माहिती गोळा करतात. त्यांचा पोस्ट्स फेसबूकावर आधीपासून वाचत होते, पण फूड वॉक हा प्रकार मला नवीन होता.

रविवार असल्याने यायला जमणारं होतं, म्हणून मी या फूडवॉकसाठी आले. तसं पहायला गेला तर वॉक करता करता बर्‍याचदा पेटपूजा होतेच, पण फूडसाठी असं चालत पहिल्यांदाच फिरणार होते. ग्रूपमधलं कुणीही ओळखीचं नव्हतं, तरीही किमान नवीन ओळखी तरी होतील वगैरे पण अगदी खरंखुरं कारण सांगू का? फूडवॉकचा पहिला स्टॉप वडापाव असा होता, सावकारपेटमध्ये इतके दिवस फिरूनही वडापाव काही मिळाला नव्हता, शिवाय पावभाजी, भेळ, कचोरी अशी इतरही बेस्टसेलर्स नावं होती. त्यामुळे बरीच उत्सुकता होती. या फूडवॉकमुळे सावकारपेट माझ्यासाठी अधिकच प्रिय झालं.  
काकडारामप्रसाद हे सावकारपेटेमधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण. इतक्या चिंचोळ्या गल्लीमध्ये ही तीनमजली सुंदर इमारत शानसे उभी आहे. गुजराती जेवण, मिठाई, चाट आयटम्स ही त्यांची खासियत.
पण मी पहिल्यांदा इथे गेले तेव्हा गल्ल्यावरचा माणूस सोलापुरी सोलापुरी ओरडत होता. चादरींचं तर दुकान नाही आणि आपलं सोलापूर हे काय चाट आयटमसाठी फेमस नाही! भाकरी-चटणी तर नक्कीच विकत नसतील, म्हणून काय भानगड आहे या उत्सुकतेनं पाहिलं तर “छोला-पुरी” विकली जात होती. छोलेभटुर्‍यांचं मद्रासी नाव छोलापुरी असं होतं!!! काकडामध्ये गुजराती थाळी मिळते. पावभाजी मिळते, भेळ पाणीपुरी मिळते, पण इथला सर्वात महान प्रकार म्हणजे आलू पनीर टिक्की. बटाट्याचा पनीर घातलेला भलामोठा पॅटीस गोल्डन रंगावर तळलेला. त्यावर पांढरंशुभ्र दही, मग हिरव्या रंगाची पुदिना चटणी, आंबट गोड चिंचेची चटणी आणि वर भरपूर बारीक शेव. एक खाल्ला की आठवड्याभराच्या कॅलरीजचा हिशोब् संपलाच.
काकडाच्या जवळच कमल चाट हाऊस आहे, हे नावाला चाट हाऊस असलं तरी इथं तुमचं लक्ष वेधून घेईल तो जिलेबी तळल्याचा वास. ताजी गरमागरम केशरी जिलेबी बाहेरून कुर्रमकर्रम आणि आतमधून साखरेच्या पाकाने मऊसर झालेली. दिवसाच्या कुठल्याही वेळेत इथे ताजी ताजी जिलेबी मिळते.
पण जर तुम्ही सावकारपेटला गेलात, आणि अनमोल लस्सी प्यायला नाहीत तर तुमची खेप फुकट गेली. वाटल्यास, लस्सी पिऊ नका, पण दुकानवाल्याला भेट द्या. असा माणूस वारंवार भेटत नाही. मि. दिनेश सोनी हे स्वत:ची ओळख करून देतानाच सावकारपेट का डॉन म्हणून करून देतात, त्यांनी तशी ओळख करून दिली नाही तरी मनोमन हे पद आपणच त्यांना देऊ. सहा फुटाची उंची आणि उंचीला साजेशा बांधा. कपाळावर मोठा टिळा आणि दणदणीत आवाजामध्ये केलेलं समोरच्याचं स्वागत. एकेकाळी कुस्तीगीर असलेल्या दिनेश सोनींनी हे छोटंसं दुकान केवळ त्यांच्या लस्सीच्या क्वालिटीवर इतकं फेमस केलंय. लस्सीचा ग्लास कसला भलामोठा जगच आहे, दुकानामध्ये बसलेले दिनेश सोनी आपली लस्सी ही किती बेस्ट आहे आणि ते ताक-लस्सीसाठी केवळ बाटलीबंद मिनरल वॉटरच वापरतात. हे समोरच्याला सांगतात. मध्येच शेरोशायरी ऐकवतात. सावकारपेटेमध्ये खरेदी करून जीव दमला असेल तर या केसर लस्सीमुळे नाहीतर मसाला छांछमुळे त्वरित एनर्जाईझ व्हायलाच पाहिजे. अनमोल लस्सीच्या बाजूलाच दिल्ली हॉटेल म्हणून एक अतिशय छोटं हॉटेल आहे, मस्त पंजाबी जेवण मिळतं. (पंजाबी म्हणजे ते टिपिकल तेलकट मसालेदार टोमॅटो ग्रेव्हीने लतपतलेलं नव्हे, तर अस्सल ढाबा साईडकडे मिळणारं पंजाबी जेवण)
सावकारपेटेमध्ये मिळणारा अजून एक अफलातून प्रकार म्हणजे मुरूक्कू सॅंड्विच. मुरूक्कू म्हणजे तांदळाच्या चकल्या. आपल्याकडे बर्‍याचदा बटर चकली म्हणून मिळतात तश्या नाजुकसाजुक पांढर्‍या इवल्यश्या चकल्यांच्यामध्ये काकडी टोमॅटो आणि चाटच्या चटण्या घालून केलेला हा तोंडाला पाणी सुटेलच याची खात्री देणारा अनोखा प्रकार. याखेरीज, माया चाट हाऊसमधली गरमागरम कांदा कचोरी, अजनबी मिठाई हाऊस, अगरवाल भोजनालय, छोटूमोटूचे जैन सॅंडविच, नॉव्हेल्टीची पावभाजी असे अनेक जिभेला खवळणारी टिकाणं आहेत. पण सावकारपेटेची माझी वारी एका ठिकाणी गेल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे नाहीच!
कदाचित अख्ख्या सावकारपेटेमधलं हे एकमेव साऊथ इंडियन खाण्याचं ठिकाण असावं, सीनाभाई टिफीन सेंटर असं नाव असलेलं हे छोटंसं दुकान. याच्याकडे घी इडली / नै इडली मिळतात, म्हणजे मिनी इडल्या तुपावर परतून त्यावर चटणी भुरभुरवून देतात. (नै म्हणजे तूप बरं का!) या इडल्या अतिशय रूचकर लागतात त्या या लाल चटणीमुळे. गन पावडर असे सार्थ नाव असलेली ही जहाल चटणी इडली आणि तुपाबरोबर असली खमंग आणि बेस्ट लागते!!
मघाशी म्हटलं तसं, हा भाग सगळा परप्रांतामधून आलेल्या लोकांचा. इथली दुकानं अथवा हॉटेलं ही “नॉर्थ इंडियन स्पेशालिटी” असल्या नावाखाली भंपकपणा म्हणून उघडलेली नाहीत, तर या भागामध्ये व्यापाराच्या निमित्ताने, खरेदीसाठी येणार्‍या बहुतांश बाहेरील जनतेला “घरचं खाणं” असल्यासारखं तेही वाजवी दरामध्ये मिळावं म्हणून चालू झालेली. अर्थात जागा बदलली की पदार्थाचे घटक बदलले, चव बदलली मग मूळचे गुजराती-राजस्थानी पदार्थ हे मद्रासी रूप घेऊन तयार झाले. त्यातून काही नवीन पदार्थ तयार झाले, काहींनी रूपडं बदललं, काहींनी नाव. पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे, रसना तृप्त करणारी चव.

एकूणात काय, मद्रासमध्ये आल्यावर भटकंतीसाठी, कुठेतरी “आपल्या” माणसांमध्ये फिरल्यासारखं वाटणारं ठिकाण मला मिळालं. शेवटी सावकारपेटेमधले व्यापारी काय, अथवा आमच्यासारखी नोकरदार माणसं काय! आपलं गाव आणि शहर सोडून इतक्या लांब आलो तेच मुळात पोटासाठी. आता ज्या पोटासाठी दाही दिशा भटकायचे त्याचे थोडेतरी चोचले पुरवायला नकोत का? आता मी या भागात एकटीच भटकते. थोडीफार खरेदीसाठी, थोडीफार खाऊसाठी आणि बरीचशी स्वत:ला रीचार्ज करण्यासाठी. 
शिवाय हल्ली आम्ही "खरेदीला फक्त पॅरीसमध्येच जातो" असंही आम्हाला म्हणता येतंय!!!!! 
(क्रमश:) 

No comments:

Post a Comment